Islamdarshan

Latest Post

बोले तैसा चाले,‘ या म्हणीनुसार आपण नेहमीच पाहतो की कोणत्याही समाजसुधारकाच्या शिकवणींचा प्रभाव केवळ अशाच परिस्थितीत होत असतो की स्वतः समाजसुधारक त्या शिकवणींवर आचरण करीत असतो. अन्यथा ‘लोकां सांगे विश्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण‘ अशी अवस्था असेल तर त्याच्या शिकवणीचा कोणताही प्रभाव इतरांवर पडत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आचरण हे नेमके कुरआनाच्या शिकवणींचे परिपूर्ण स्वरूप होय. ईश्वरी आदेशावर कशाप्रकारे आचरण असावे, याचे परिपूर्ण प्रात्यक्षिक म्हणजेच त्यांचे समस्त जीवन होय. म्हणूनच त्यांचे आचरण हे एक आदर्श चरित्र आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) हे बालपणापासून खरे बोलणारे आणि लोकांच्या अनामतींचे रक्षण करणारे असल्याची ख्याती पूर्ण समाजात होती. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या याच गुणविशेषणामुळे ‘अमीन‘ व ‘सादिक‘ अर्थात सत्यवचनी व अनामतदार अशा गौरवास्पद विशेषणानी लोक संबोधित असत. त्यांनी कधीही अरब समाजातील अज्ञानता व अमानवी परंपरांचा बालपणापासूनच स्वीकार केला नाही. अन्याय व अत्याचारांची कधीही साथ दिली नाही. ते अत्यंत गंभीर, मधुरभाषी आणि दयाळू स्वभावाचे होते. इतरांचे दुःख त्यांना पाहवत नसे. इतरांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः कष्ट उचलायचे, लोकांच्या आर्थिक अडचणी स्वतःचा कमाईतून खर्च करून सोडवायच्या, स्वतःजवळ पैसे नसल्यास इतरांकडून कर्ज घ्यायचे, मात्र कोणत्याही याचकास त्याची अडचण भागविल्याशिवाय परत करीत नसत. स्वतः भूकेले तहानलेले राहून इतरांचे पोट भरायचे. फक्त मानवच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर दया करायचे. अनाथ, वृद्ध, विधवा आणि गरिबांवर त्यांची विशेष कृपा असे. त्यांच्या याच दयाळू आणि कृपाळू वृत्तीमुळे ते समाजात सर्वांचे लाडके आणि प्रिय होते. त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांनी स्वतःकरिता काहीही ठेवले नाही. जे प्राप्त झाले, ते इतरांना वाटले.
दरिद्री आणि रंजल्यागांजल्यांविषयी त्यांच्या मनात कमालीची आपुलकी होती. त्यांनी रंजल्यागांजल्यांसाठी कल्याण केले. एवढेच नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार्या या अंतिम प्रेषितास जीवनभर कधीही पोटभर जेवणसुद्धा मिळाले नाही. (संदर्भ : सीरतुन्नबी, प्रथम खंड) ते नेहमी म्हणत असत,
‘‘तुम्हास ईश्वराकडून जी सहायता आणि उपजीविका मिळते ती गरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या मदतीकरिता मिळते.‘‘ (संदर्भ : सहीह मुस्लिम)
त्यांच्या या वचनावरून हीच बाब स्पष्ट होते की आपल्याकडे असलेल्या संपत्ती, सामर्थ्य आणि शक्तीवर दीनदुबळ्यांचासुद्धा अधिकार आहे. त्यांचीच सेवा करण्यासाठी ईश्वराने आपल्याला हे ‘तन-मन-धन‘ प्रदान केलेले आहे.
संयम, शांती, दया आणि कृपाळू वृत्ती असलेल्या आदरणीय मुहम्मद (स.) यांची ही घटना अवश्य लक्षात घ्यावी. एकदा काय झाले की प्रेषित नेहमीप्रमाणे नमाज पढण्यासाठी मस्जिदकडे जात होते. रस्त्यात एका ‘ज्यू‘ समाजाच्या म्हातारीने त्यांच्या अंगावर कचरा फेकला. ते कचरा धुवून व कपडे बदलून परत मस्जिदीकडे गेले. हा नित्याचाच क्रम झाला. एके दिवशी म्हातारीचा कचराच अंगावर पडला नाही आणि प्रेषित अस्वस्थ झाले. ते सरळ म्हातारीस पाहायला व तिच्या खुशालीची विचारपूस करायला तिच्या घरी पोचले. म्हातारी आजारी पडली होती. प्रेषितांनी मोठ्या आपुलकीने तिची विचारपूस केली म्हणाले, ‘‘माते! आज तू माझ्या अंगावर कचरा फेकला नाही. म्हणून मला वाटले की कदाचित तू आजारी असावी. म्हणूनच तुला पाहायला आलो.‘‘ तिची शुश्रूषा केली. हा प्रकार पाहून म्हातारी दंग झाली. तिच्या डोळ्यांतून ढळा-ढळा अश्रु वाहायला लागले. प्रेषित मुहम्मद (स.) यांची हीच सहानुभूती आणि त्यांच्या मनातील सर्वांविषयी असलेले अपार प्रेम जेव्हा राजकीय आणि सामाजिक नभांच्या क्षितीजावर उगवले, तेव्हा समस्त मानवसमाज या सोनेरी किरणांनी उजळून निघाला. प्रत्येकाच्या मनातील द्वेष, मत्सर, ईर्ष्या आणि वैरभावाचे अंधकार नष्ट झाले. कोणी स्वीकारो अथवा न स्वीकरो! वस्तुस्थिती तर हीच आहे की, समाजाची अशा प्रकारे निःस्वार्थ भावाने सेवा केल्याशिवाय लोकांच्या मनमस्तिष्कावर आणि हृदयावर कोणासही अधिराज्य गाजविता येत नाही, हा सृष्टीचा नियमच आहे. त्यागाशिवाय प्रेम आणि सहानुभूती निरर्थक होय! हेच सत्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मक्का शहरावरील विजयाप्रसंगी स्पष्टपणे दिसून आले. त्यांनी याप्रसंगी लोकांना आणि समस्त मानवजातीस आपल्या अंतिम प्रवचनात स्पष्टपणे संबोधून म्हटले,
‘‘आज अज्ञानतेने बरबटलेल्या या वांशिक अभिमान आणि अहंकाराचा ईश्वराने नाश केला आहे. समस्त मानवजात आदम (अ.) अर्थात जगातील प्रथम मानवाची संतती असून आदमची निर्मिती मातीपासून झालेली आहे.‘‘ (संदर्भ : सीरतुन नबी, भाग - १)
मुळात हाच संदेश समस्त विश्वातील मानवांना ऐक्याची जबरदस्त आधारशिला उपल्बध करून देतो. प्रवचन संपल्यावर प्रेषितांनी प्रचंड जमलेल्या जवळपास सव्वालाख लोकांवर दृष्टी टाकली आणि मग कुरैश कबिल्यावर दृष्टी टाकली. या ठिकाणी ते अन्यायी व अत्याचारी लोकसुद्धा होते, ज्यांनी प्रेषितांनी सुरु केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता, प्रेषित आणि त्यांच्या सहकार्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यांना रक्तबंबाळ करून सोडले होते, त्यांना परिवार, संपत्ती आणि मायभूमीचा त्याग करण्यास भाग पाडले होते, कित्येकांना शहीद केले होते, कटकारस्थान कले होते, प्रत्येक प्रकारचा छळ केला होता. समस्त विश्वाकरिता दया आणि कृपा असलेल्या या अत्यंत उदार मनाच्या प्रेषितांनी त्यांना संबोधित करून विचारले,
‘‘आज मी तुमच्याबरोबर कसा व्यवहार करणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?‘‘
या निष्ठूर, कठोरहृदयी, अन्यायी व अत्याचारी स्वभावाच्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा पूर्ण विश्वास होता की प्रेषित मुहम्मद (स.) यांचा स्वभाव किती उदार आणि दयाळू आहे! ते किती थोर आहेत! त्यांनी साद घातली,
‘‘तुम्ही आमचे परम बंधु आहात!‘‘
विश्वबंधुत्वाचे आणि सत्य व न्यायाचे स्थापक प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सार्वजनिक अभयदानाची व क्षमादानाची घोषणा करीत म्हटले,
‘‘आज तुम्हा सर्वांना अभय देण्यात येत आहे! तुम्हा सर्वांना क्षमा करील आहे!‘‘
ही क्षमाशीलता, दया, प्रेम, त्याग आणि सहनशीलतेचे विलक्षण उदाहरण जगाच्या मानवेतिहासात कोठेच सापडू शकत नाही. आज म्हणजे मक्केच्या विजयाच्या प्रसंगी प्रेषितांकडे सर्वकाही होते. सत्ता होती, लष्करी सामर्थ्य होते. त्यांच्या फक्त एकाच इशार्यावर इस्लामविरोधी कृत्य करणार्यांच्या रक्तने मक्का शहराची भूमी लाल झाली असती. मक्का त्यागण्याच्या प्रसंगी विरोधकांनी हडपलेल्या संपत्ती आणि मालमत्ता परत घेता आली असती, मात्र प्रेषितांच्या या उदारपूर्ण स्वभावाचे कौतुक करण्याचा मोह इतिहासतज्ञ आवरू शकला नाही. एवढेच नव्हे तर आजपर्यंतच्या इस्लामविरोधक विचारवंतांनासुद्धा हे सत्य नाकारण्याचे धारिष्ट्य, झाले नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली ही क्रांती खरोखरेच अहिंसापूर्ण क्रांती होय.
इतिहासात ही बाब आपल्याला सातत्याने दिसून येते की एखाद्या समूहाने दुसर्या समूहावर जर का विजय प्राप्त केला की समजा विजेत्या पक्षाकडून लूटमार, हिंसा, सूड, अन्याय, अत्याचार, जाळपोळ, मानभंग यासारख्या असंख्य बाबी घडतात. पराजयाची नामुष्की पत्करलेल्या पक्षाच्या संपत्ती ताब्यात घेण्यात येतात. सर्वत्र अन्याय व अत्याचाराची आग लागलेली असते. दुसर्या महायुद्धाचे उदाहरण आजही इतिहासात प्रत्यक्ष पाहायला मिळते. या महायुद्धात फक्त पावने दोन कोटी लोकांच्या रक्तने लाल क्रांतीची लाल पहाट उगवली. या रक्तरंजित क्रांतीने इतिहासाची पाने आजही रक्तळलेली आहेत. अर्थात क्रांती म्हणजेच रक्तपात असे जणू समीकरणच झाले. मात्र इस्लामी क्रांती ही अहिसात्मक क्रांती होय, एवढे मात्र निश्चित! या क्रांतीची पहाट उगवली आणि मानवतेस अभय मिळाले. म्हणूनच मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती घोषित केले.
एक सामाजिक विश्लेषण
प्रारंभीच आपण इस्लामपूर्वीच्या अरब समाजाचे ‘सी.राइट मील्स‘ यांच्या दृष्टिकोनाच्या आधारावर तीन प्रकारे विश्लेषण केले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती मानवजातीने अनुभवली, त्यानंतर अरब समाजाचे याच तीन प्रकारांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले तर ते अशा प्रकारे होईल.
 1. समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट झाली. मानवसमाज ऐक्य आणि न्यायाच्या भक्कम आधारावर उभा राहिला. समाजाच्या प्रत्येक भागात शोषण आणि विरोधपूर्ण संबंध नष्ट होऊन त्या ठिकाणी न्यायसंगत आणि शोषणरहित संबंध स्थापित झाले. वांशिक आणि वर्णावर आधारित तसेच गरिबी आणि श्रीमंतीच्या आधारावर असलेला भेदभाव नष्ट झाला. उच्च-नीच आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या आधारावरील विषमता कायमची नष्ट झाली.
 2. मानवी इतिहासात या नवीन समाजास अत्यंत उच्च स्थान प्राप्त झाले. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले. अर्थात मानवतेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
 3. या नवनिर्मित समाजात जे लोक सत्तेमध्ये आले ते मानवतावादी, विनयशील, दयाळू, मानवसमानतेचे ध्वजवाहक, शोषणविरोधी मानसिकता असलेले आणि मानवतेचे खर्या अर्थाने प्रेरक होते. असत्यापासून दूर आणि सत्याची जीवंत उदाहरणे आहेत.
आजही जगाला याच परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. आजच्या शोचनीय परिस्थितीत विव्हळत असलेल्या, व्याकूळ आणि भेदभावाच्या आगीत होरपळत असलेल्या मानवतेस मुक्ती देण्याची गरज आहे. सर्वत्र फक्त न्याय, प्रेम, बंधुत्व आणि त्यागाचे नंदनवन फुलविण्याची गरज आहे, शेवटी एवढेच!

अरब समाजाची तर ही परिस्थिती होतीच, शिवाय अरब देशाव्यतिरिक्त जगाच्या पाठीवरील इतर देशांची परिस्थितीसुद्धा कमी-अधिक प्रमाणात अशीच दयनीय होती. मानवता शांती, समाधान आणि संरक्षणासाठी विषम परिस्थितीत सर्वत्र ठेचाळत भटकत होती. तिला कुठेही थारा मिळत नव्हता. अगदी रोम आणि पर्शियासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणार्या साम्राज्यांतसुद्धा मानवता रक्तबंबाळ होती. मानवाधिकारांची पायमल्ली करणे हा शब्द तर खूपच कमी, अगदी शेकडो माणसांना भुकेल्या वाघ, लांडग्यसारख्या हिंस्र पशुंसमोर फेकून देऊन मानवसंहाराचा खेळ पाहण्याची मौजमजा राजे-रजवाडे पाहण्यात दंग असत. असा प्रकार या सुसस्कृत देशात घडत असे.
अशा अमानवी परिस्थितीत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वराच्या आदेशाने कंबर कसली. सत्य आणि न्याय स्थापनेचे हे जागतिक पातळीवरील आव्हान मोठ्या संयम आणि शौर्याने स्वीकारले आणि समाजसुधारणेचा पाया प्रथम आपल्याच समाजात रोवून एक आदर्श समाज घडविला.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व प्राप्त झाले, तेव्हा त्यांनी या अमानवी आणि रूढीवादी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले आणि एका नवीन दृष्टिकोनाचे हत्यार उपसले. हा दृष्टिकोन कुरआनाच्या शब्दांत अशा प्रकारे सादर करण्यात आला,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की तुम्ही त्या आज्ञांचे अनुसरण करा ज्या अल्लाहने अवतरल्या आहेत तेव्हा ते म्हणतात की ‘‘आम्ही त्याच गोष्टींचे अनुसरण करू ज्याचे अनुसरण आमचे वाडवडील करीत होते.‘‘ त्यांना काहीही कळत नसताना व ते सन्मार्गावर नसतानादेखील त्यांचेच अनुसरण करणार का? इन्कार करणार्या लोकांची अवस्था अशी आहे जणू गुराखी जनावरांना हांक देतो आणि जनावरे ओरड व हांकेखेरीज अन्य काहीच ऐकत नाहीत. ते बहिरे, मुके आणि आंधळे आहेत त्यामुळे त्यांना काहीही कळत नाही.‘‘ (कुरआन: २ - १७०)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असत्याविरुद्ध आणि रूढीवादाविरुद्ध प्रत्यक्ष आवाज उठवला? एका न्यायहीन, अमानवी, शोषणवादी, जीर्ण-शीर्ण, विषमता असलेल्या रुढीवादी समाजाचे स्वरुप बदलून जागतिक क्रांतीच घडविली. सत्य, न्याय, बंधुत्व, समता, मानवता आणि आधुनिकतेची स्थापना केली. हा निश्चितच एक चमत्कार असून त्यांच्या या चमत्काराचे अगदी इस्लामविरोधकांनीसुद्धा तोंडभरून कौतुक केले. रात्रंदिवस दारुच्या झिंगेत वावरणारा, समता, न्याय, बंधुत्वाचा लवलेशही नसलेला, तुरळक कारणांवरुन माणसांचे मुडदे पाडणारा, मुलींना जीवंत गाडून फाजील अभिमान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणारा, लूटमार करणारा आणि सावत्र आईस बापाची जागीर समजून शय्येवर ओढणारा हा समाज, व्याजासारख्या भांडवलशाहीच्या भावनेने मस्तीला येऊन आर्थिक शोषण करणारा हा समाज, गुलाम आणि दासींची खरेदी-विक्री करणारा आणि प्राण्यांपेक्षाही तुच्छ वागणूक देणारा हा समाज, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सादर केलेल्या शिकवणुकीचा स्वीकार करतो, सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मानवी मूल्यांना उराशी कवटाळतो, महिलांचे वस्त्रहरण करणारा हा समाज महिलांना प्रतिष्ठेच्या सिंहासनावर बसवितो, मुलींच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा करतो, हा चमत्कार जागतिक इतिहासाच्या क्षितिजावर आजपर्यंत प्रखर सूर्याप्रमाणे तळपताना दिसत आहे.
कबीला बंदी
जो समाज विविध कबिल्यांमध्ये विखुरलेला होता आणि कबिलावादाच्या वैरभावाने फणफणत होता, एक-दुसर्याच्या जिवावर बेतलेला होता, एका कबिल्याच्या तलवारी इतर कबिल्याच्या लोकांच्या रक्तसाठी आसुसलेल्या होत्या, अशा असभ्य लोकांमध्ये स्नेह, प्रेम, ममत्व, समता आणि बंधुभाव निर्माण केला. समस्त वैरभाव आणि उच्च-नीचतेच्या भावनांना कायमची मूठमाती दिली. दुभंगलेली मने आणि फाटलेल्या हृदयांना जोडले. विखुरलेल्या समाजास जोडून जातीभेद आणि वर्णभेद नष्ट केला. एकास काटा रुतला तर दुसर्याच्या काळजास वेदना होऊ लागल्या. दुभंगलेल्या आणि विखुरलेल्या मानवतेने एका शरीराचे रूप धारण केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेल्या कामगिरीचे उदाहरण अवघ्या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. समाजातील आर्थिक, वांशिक आणि वर्णावर आधारित विषमता नष्ट करण्याचे समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारतामध्ये गांधीजींनी दलित बांधवांना उच्चवर्णीयांबरोबर समान अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी असाधारण प्रयत्न केलेत, कनिष्ठ समजल्या जाणार्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. १९५५ साली स्पृश्यास्पृश्यतेविरुद्ध कायदासुद्धा करण्यात आला, मात्र जातीय विषमतेचे वातावरण आजही भारतामध्ये मानवतेस होरपळून काढणारे बाकी आहेच, हे विशेष!
समता
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजातील विषमता नष्ट केली. संपत्तीचा भक्त, भौतिकवाद व चंगळवादासमोर मान तुकविणार्या ज्या समाजात संपत्तीच्या आणि शक्ती व सामर्थ्याच्या आधारावर माणसाची किंमत ओळखण्यात येत असे आणि श्रीमंत व सामर्थ्यवान म्हणजे प्रतिष्ठित, उच्च व सन्मानित तसेच दीन-दुबळा, गरीब आणि दरिद्री म्हणजे नीच, कनिष्ठ समजण्यात येत असे. अशा ठिकाणी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजाच्या मानसिकतेमध्ये आणि अगदी आत्म्यामध्ये अशी विचारसरणी निर्माण केली की माणूस हा साधन-संपत्ती, शक्ती व सामर्थ्यामुळे मोठा होत नसून सदाचार, उच्च नैतिकता आणि ईशपरायणतेमुळेच मोठा होतो. अर्थातच ईशपरायणता म्हणजे अंतरात्म्यातील अशा स्वरुपाच्या अनुभूतीचे नाव आहे, जिच्या आधारावर माणूस प्रत्येक कार्य ईश्वराच्या आदेशानुसार पार पाडण्याची अत्याधिक श्रद्धा आणि ईश्वरी आदेशांविरुद्ध असलेल्या कार्याप्रति अत्याधिक घृणा करतो. कुरआनात ही बाब अशा शब्दांत मांडलेली आहे,
‘‘आणि जे लोक न दिसणार्या आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात, त्याच्याकरिता उत्तम बक्षीस आणि मोबदला आहे.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-मुल्क – ६७ : १२)
ईश्वर हाच सर्वशक्तीशाली आणि महान असल्याचा निश्चितपणे स्वीकार करण्यात आला आणि सर्वांत जास्त त्याचेच भय मन-मस्तिष्कात असेल तर माणसाचे मोठेपण हे संपत्ती, वर्ण व वंशाच्या आधारे नव्हे तर उच्च नैतिकता आणि सदाचाराच्या आधारावर ठरविण्यात येईल. यावरून निश्चितच समाजाचे विषम स्वरुप समानतेमध्ये परिवर्तीत होईल. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कुरआनाच्या याच आदर्श विचारसरणीच्या आधारावर समाजात समता, न्याय व बंधुभाव निर्माण केला. समाजशास्त्रज्ञ ‘अॅलेक्स इंकलस‘ याने स्पष्टपणे म्हटले आहे की मानवाच्या महानतेमध्ये विश्वास आणि न्यायाची वाटणी आधुनिकता हे प्रमुख अंग होय.
अशा प्रकारे इस्लामने एक आधुनिक दृष्टिकोन सादर केला आणि केवळ सादरच केला नसून त्यास व्यावहारिक स्वरुपदेखील प्रदान करण्याची किमया घडवून आणली.
दारुबंदी
जगातील समस्त दुराचारांची जननी असलेली ही दारू अरबवासीयांच्या जीवनाचा कसा अविभाज्य घटक होता, याचा वरील प्रकरणात आपण उहापोह केलेलाच आहे. दारूच्या विरहात एक क्षणही सहन न करणार्या या समाजासमोर जेव्हा कुरआनाची ही शिकवण अवतरित झाली की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ही दारू, जुगार, वेदी व शकुन ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, त्यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-अलमाईदा - ८९)
माननीय अनस (रजी.) यांचे कथन आहे की,
‘‘मी एकदा अबू उबैदा, उबई इब्ने कअब आणि अबू तलहा वगैरेंना दारू पाजीत होतो. एवढ्यात अचानक एका व्यक्तीने येऊन इस्लाममध्ये दारू निषिद्ध झाल्याची सूचना दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामचा हा आदेश पाठविताच त्या मैफलीत बसलेल्या सर्वांनीच दारू भरलेले माठ फोडून टाकले. ही अवस्था केवळ अबू तलहा यांच्याच घराची नसून समस्त मदीना शहरातील लोकांनी आपापल्या हातांनी दारूचे माठ फोडून टाकले. पूर्ण शहरातील रस्त्यांवर लोकांनी फेकलेल्या दारूमुळे नद्या वाहत होत्या.‘ (संदर्भ : बुखारी - वचनसंग्रह)
जीवापाड प्रिय असलेली दारू इस्लामच्या केवळ एकाच इशार्यावर लोकांनी ठोकारून लावली. विशेष म्हणजे कोणतीही पोलिसयंत्रणा व कोणताही दारूबंदीचा अधिकारी नसताना हे अद्भूत कार्य घडले.
जुगार, व्याजखोरी आणि इतर दुष्कर्म
त्याचप्रमाणे जुगार, व्याजखोरी, व्यभिचार, स्त्रियांवरील अत्याचार, कन्या-हत्या, गुलामांवर अत्याचार आणि यासारख्या अनेक दुष्कर्मांवर कायमचा आळा बसला. व्याजखोरीवर कायमचा आळा बसवून मानवजातीस महाजनी वा भांडवलदारी व्यवस्थेच्या विळख्यातून कायमची मुक्ती मिळाली.
गुलामीची अमानवी प्रथा
गुलामीची अमानुष प्रथासुद्धा नष्ट करण्यात आली. गुलामांचे व दासींचे स्वातंत्र्य आणि त्यांच्याशी उत्तम व्यवहार हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आंदोलनाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट शब्दांत शिकवण दिली की,
‘‘जे लोक तुमच्या स्वाधीन आहेत (अर्थात गुलाम व दासी) त्यांनादेखील तेच खाऊ घाला, जे तुम्ही स्वतः खाता आणि वापरण्यासाठीही तेच वस्त्र द्या, जे तुम्ही स्वतः वापरता. त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम देऊ नका. त्यांच्यावर कामाचे जास्त ओझे झाल्यास तुम्ही स्वतः त्यांची मदत करा.‘‘ (संदर्भ : बुखारी - भाग २ वचनसंग्रह)
प्रेषित मुहम्मद (स.) यांची ही सूचना मिळताच त्यांच्या तात्कालीन अनुयायांनी आपापल्या गुलामांशी असा सद्व्यवहार केला की गुलाम कोण आणि स्वामी कोण, हे ओळखणे अशक्य होऊन बसले. लोक आपल्या कमाईतून गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करू लागले. अशा प्रकारे गुलामीची प्रथा नष्ट करण्यात आली.
वस्तुतः हा सगळा चमत्कार प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या असाधारण प्रभावाचा होता. गुलामांना पायाखाली ठेवणार्यांनी गुलामांना उराशी कवटाळले, सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम व सहानुभूती देऊ लागले. त्यांचा मान-सन्मान वाढला. वर्ण आणि वंशवादाला मूठमाती मिळाली. काळा-गोरा भेद नष्ट पावला. जो अरब समाज कृष्णवर्णीयांना तुच्छ लेखत होता आणि गुलामांना जनावरांपेक्षाही खालच्या पातळीची वागणूक देत होता, तोच अरब समाज आता मात्र कृष्णवर्णीय असलेले गुलाम माननीय बिलाल (रजी.) यांना प्रतिष्ठा व सन्मानाच्या दृष्टीने पाहण्यात धन्यता समजू लागला. त्यांना इस्लामी समाजात इतका मान व सन्मान मिळाला की मस्जिदे नबवीमध्ये आणि काबागृहावर त्यांनी अजान दिली. हा सन्मान इस्लाममध्ये इतर कोणालाही हेवा वाटावा असाच आहे.
आर्थिक परिवर्तन
दारु, जुगार, सट्टा, व्याजखोरी, व्यभिचार व गुलामीची तसेच कन्या-हत्यांची प्रथा नष्ट झाली. व्याजखोरी महाजनी व्यवस्थेच्या आर्थिक शोषणास बळी पडलेल्या सामान्य जनतेला मुक्ती मिळाली. व्याजावर आधारित कर्जाच्या ठिकाणी व्याजरहित कर्जाची आणि अनाथ, गोरगरीब, विधवा, वृद्ध, आजारी, वाटसरू, बेरोजगारांसाठी शासकीय अर्थसाह्याची व्यवस्था करण्यात आली. कुरआनात म्हटले आहे की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकाच्या बहुतेक धर्मपंडित व साधु सन्यासी लोकांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जो सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत. एक दिवस येईल की याच सोने व चांदीवर नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजु आणि पाठींना डागले जाईल. हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठविला होता, घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद.‘‘ (संदर्भ : कुरआन, ९:३४,३५)
अशाप्रकारे इस्लामने भांडवलशाही विचारसरणीच्या ठिकाणी एका समाजहितवादी विचारसरणीची स्थापना केली. आणि ‘सामाजिक न्याय व बंधुत्व‘ सारख्या मानवी मूल्यांची जोपासना होऊ लागली.
सामाजिक परिवर्तन
सामाजिक स्तरावर असमानतेच्या ठिकाणी समतेची स्थापना झाली. वंशभेद, गरिबी-श्रीमंतीतला भेद, वर्णभेद व आपला नि परक्यातील भेद नष्ट झाला. कारण इस्लामने अशी शिकवण दिली की, माणसाची प्रतिष्ठा आणि मोठेपणा हे वर्ण, वंश, संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर नसून ईश्वरी आदेशांवर आचरण करण्याच्या आधारावर आहे.
सांस्कृतिक परिवर्तन
मद्यपान, जुगार, व्यभिचार, लूटमार, चोर्या-मार्या, बलात्कार, गुलामीची प्रथा, भेदभाव आणि यासारख्या अनैतिक आचरण पद्धती नष्ट झाल्या आणि एका आदर्श संस्कृतीवर आधारित आदर्श समाजाची स्थापना झाली. स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार बंद झाले, स्त्री-पुरुषांतील अश्लीलतेने शीलतेचे स्वरुप धारण केले, व्यभिचार, नग्नता व लैंगिक शोषणाविषयी समाजात घृणा निर्माण झाली. व्यभिचार आणि बलात्कारासाठी कडक शिक्षा लागू करण्यात आली. स्त्रियांना संपत्तीमध्ये वारसा अधिकार देण्यात आला. भ्रूणहत्या आणि मुलींना जिवंत गाडण्याची प्रथा बंद करण्यात आली. तिच्या सर्वोपरी रक्षणास्तव लोक प्राणांची बाजी लावू लागले.
या ठिकाणी ही बाब मुळीच विसरता कामा नये की, आजही राजस्थान, तामिळनाडू आणि अन्य भागांत नवजात मुलींची हत्या करण्याची प्रथा सुरु आहे. शासनाने याकरिता कायदा करूनही ही प्रथा बंद झालेली नाही. सतीच्या अमानुष प्रथेविरुद्ध एकोणिसाव्या शतकात राजाराम मोहन रॉय यांनी आंदोलन केले आणि तात्कालीन ब्रिटीश शासनाने सती प्रथेविरुद्ध कायदासुद्धा केला. मात्र १९८७ साली राजस्थानात ‘देवराला‘ या ठिकाणी धूमधडाक्यात सतीची प्रथा आयोजित करण्यात आली. रुपकुंवर नावाच्या विधवेने सतीच्या नावावर आत्मदहन वा आत्महत्या केली.
यापूर्वीदेखील सतीच्या असंख्य घटना घडल्या आणि मानवतेची सर्रास राखरांगोळी झाली. अन्याय आणि अत्याचाराच्या भयानक आगीत मानवता सती गेली, तिच्या अवार्त टाहोने आजही भारतासारख्या आधुनिक देशाच्या संस्कृतीचे कान फाटत आहेत. देशातील समाजसुधारकांचे समस्त प्रयत्न निष्फळ ठरले, कायदा हतबल ठरला. मात्र ही बाब निश्चितच लक्षणीय आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्त्री-अत्याचारांचा समूळ नायनाट करण्याचा इतिहास घडविला.
राजनैतिक न्यायाची स्थापना
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घडविलेल्या क्रांतीने कबिल्यांवर अधिनायकत्वाच्या ठिकाणी परामर्शदायी सभेची स्थापना केली. परंपरागत पेशवाई नष्ट होऊन रयतेच्या मतदानावर आधारित राज्याची स्थापना झाली. सामान्यजनांना राजकीय घडामोडींमध्ये भाग घेण्याची संधी प्रदान करण्यात आली. शासक हा जनतेसमोर उत्तरदायी ठरविण्यात आला आणि हेदेखील निश्चित करण्यात आले की शासकास सामान्य रयतेच्या जीवनस्तरापेक्षा उच्च स्तरावर जगणे निषिद्ध ठरविण्यात आले. इस्लामने अशा प्रकारचे सत्यनिष्ठ शासन स्थापन करून दाखविले.
अशा प्रकारे एकीकडे समस्त जनतेच्या मानसिकता, स्वभाव आणि विचारसरणीत सुधारणा घडविण्यात आली, व्यक्तीगत आचरणाच्या सर्व पद्धतींत परिवर्तन घडविण्यात आले, तर दुसरीकडे मात्र अमानवी असलेले सामाजिक स्वरुप हे मानवताप्रिय स्वरुपात परावर्तीत करण्यात आले. हे अत्यंत मौलिक स्वरुपाचे परिवर्तन व्यक्तीगत स्तरावरच नव्हे तर सामूहिक स्तरावरसुद्धा झाले आणि ईश्वराच्या प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हे महान कार्य प्रेषितत्वांच्या अवघ्या तेवीस वर्षांतच पार पाडले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा विलक्षण कमाल
या समस्त मौलिक परिवर्तनामागे जी आश्चर्यकारक आणि चमत्कारिक बाब आहे, ती बाब अशी की, या ऐतिहासिक परिवर्तनामागे केवळ २३ वर्षांत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेले कार्य होय. हा बदल एका अशा समाजात घडवून आणला, जो समाज अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता. त्या ठिकाणी छापखाने नव्हते, वृत्तपत्रे, दैनिके, साप्ताहिके, मासिके नव्हती, टी.व्ही. आणि इंटरनेटसारखी गतिमान प्रसारमाध्यमे नव्हती. टेलिफोन, मोबाईलसेवा नव्हती, रेल्वे, मोटारगाड्या, विमानसेवा नव्हती, अत्याधुनिक शिक्षण संस्था नव्हत्या, ज्ञान व संशोधनाची व्यवस्था नव्हती, ए.टी.एम.सारख्या व्यवस्था नव्हत्या. एखादे संघटित शासनही नव्हते आणि लष्कर व पोलिसयंत्रणा तसेच कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नव्हती. ‘हम करे सो कायदा‘ आणि ‘बळी तो कानपिळी‘ सारख्या अवस्थेत वयाच्या चाळीसाव्या वर्षी मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांनी अवघ्या २३ वर्षांच्या अल्पावधीतच एवढी महान क्रांती घडवून आणण्याचा चमत्कार दाखविला.
धर्माचा कट्टर विरोधक असलेल्या कार्लमाक्र्सने ‘दास कॅपिटल‘ १८८७ मध्ये लिहिले आणि रशियातील समाजवादी क्रांती १९१७ मध्ये अर्थात तीस वर्षानंतर घडली. शिवाय ही क्रांती घडण्यापूर्वी रशियन जनतेत शिक्षण आणि विवेकशक्ती होती, विचारसरणीच्या प्रसारासाठी आधुनिक प्रसारमाध्यमे उपलब्ध होती. सर्वकाही असताना ही विचारसरणी शंभर टक्के जनतेने स्वीकारलेली इतिहासात कोठेही दिसत नाही. शिवाय जी क्रांती घडली तिच्यातील मानवी हिंसा आणि संहार जगजाहीर आहेच. मग आणखीन एक बाब लक्षणीय अशी की या विचारसरणीवर आधारित क्रांती १९९४ साली अर्थात ७७ वर्षानंतर सोविएत संघाची शकले विखुरल्यावर आपला उरला-सुरला प्रभावदेखील हरवून बसली.
‘न्यूज टाइम्स‘ च्या सप्टेंबर १९८८ च्या अंकामध्ये ‘आयगर अॅरिविक‘ यांनी लिहिले आहे की,
‘‘१९१७ साली रशियामध्ये क्रांती घडली आणि समाजाचे स्वरुपसुद्धा बदलले, मात्र यामुळे राष्ट्राची मानसिकता बदलली नाही. पूर्वीची भांडवलशाही मानसिकता तशीच राहिली. हीच मानसिकता अर्थात भांडवलशाही विचारसरणी घेऊन रशियात समाजवादी स्वरुपाचा समाज तयार झाला.‘‘
सदरील लेखकानुसार आतून भांडवलशाहीची कीड लागलेली ही समाजवादी समाजव्यवस्था रशियात उभी करण्यात आली. परिणामी समस्त जनतेच्या शक्तीवर कम्युनिस्ट दलाची शक्ती प्रस्थापित झाली आणि या शक्तीवर केवळ एकट्या व्यक्तीचा अर्थात स्टॅलीनचे प्रभुत्व स्थापन झाले. देशामध्ये खर्या अर्थाने सामाजिक व्यवस्था निर्माण होऊच शकली नाही. जनतेचे वैयक्तीक अधिकार समाजवादी नावाच्या एकाधिकारशाहीने गिळंकृत केले. मान्यवर लेखकाच्या कथनानुसार जनतेस पदव्या आणि नोकर्या त्यांच्या क्षमता आणि पात्रतानुसार न देता सामाजिक स्तराच्या आधारावर देण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच या अन्यायाच्या परिणामस्वरुपी रशियामध्ये स्वतंत्र चिंतन आणि नवनिर्माणाच्या आधारावर जोरदार आंदोलने सुरु झाली. समाजवादाच्या नावावर सुरु असलेल्या एकाधिकारशाहीचे पितळ उघडे पाडण्यासाठी ही आंदोलने जोमाने कार्य करू लागली. स्वतः रशियन विचारवंतानीच रशियात समाजवादी क्रांती खर्या अर्थाने आलीच नसत्याच्या सत्यावरून पडदा उचलला आणि रशियात ख्रिस्ती धर्माने पाय पसरले. मात्र येथील शोकांतिका संपता संपत नव्हती. मायकल हार्ट या अमेरिकी लेखकाने लिहिले की,
‘‘येशू मसीह हे ख्रिस्ती धर्माच्या विशिष्ट नैतिक आणि धार्मिक श्रद्धांचे कर्णधार असले तरी ख्रिस्ती धर्मज्ञानास सेंट पॉल यांनी विशिष्ट प्रगती दिली. त्यांनीच नवीन करारनाम्याचे अधिकांश भाग लिहिले.‘‘
तात्पर्य एवढेच की, जगात मोठमोठे समाजसुधारक आलेत, त्यांनी समाजसुधारणेचे कार्यदेखील केले. मात्र जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंत जेवढे समाजसुधारक येऊन गेले, त्यापैकी कोणताही असा समाजसुधारक सापडणे अशक्य आहे, ज्याने अवघ्या वीस-बावीस वर्षांच्या अत्यल्प काळामध्ये अरबच्या एका अशा अज्ञानी, अशिक्षित, मानवताविरोधी भावनांनी पेटलेल्या समाजातील एकेक व्यक्तीच्या व्यक्तीगत स्वभावात समस्त समाजात पूर्णपणे परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळविले असेल. हा ऐतिहासिक विश्वविक्रमी प्रयोग म्हणजे केवळ एक चनत्काराच असू शकतो आणि असा चमत्कार प्रेषितांकडूनच आणि विशेषतः प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडून घडू शकतो. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या सर्व शंभर महानतम व्यक्तीमध्ये मान्यवर लेखकांनी प्रथम स्थानावर प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठेवले असून पहिला अध्याय त्यांच्यावर आधारित लिहिला आहे, तो अशा प्रकारे,
‘‘जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तीमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रथम स्थानावर ठेवण्याच्या माझ्या या निर्णयामुळे काही लोकांना आश्चर्य वाटले असेल आणि काहीजण विरोध करतील मात्र इतिहासामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) हे एकच असे व्यक्तीमत्त्व होते जे धार्मिक आणि व्यावहारिक या दोन्ही स्तरांवर पूर्णरुपाने यशस्वी ठरले.‘‘ (पृष्ठ : ३३)
मान्यवर लेखकांनीसुद्धा तेच लिहिले, जे मी वरील मजकुरात सांगितले आहे,
‘‘या पुस्तकात उल्लेखलेल्या अधिकांश व्यक्तीना ही फायदेशीर संधी मिळाली होती की त्यांचा सभ्य व प्रगत संस्कृती असलेल्या समाजात जन्म झाला, शिक्षण-प्रशिक्षण झाले आणि समाजसुधारणेसाठी आवश्यक असलेली साधने त्यांना उपलब्ध होती. मात्र आदरणीय मुहम्मद (स.) यांना अशा संधी प्राप्त नव्हत्या. ते दक्षिणी अरब प्रदेशामध्ये जन्मले. त्या काळी हा प्रदेश जगाच्या पाठीवरील सर्वांत जास्त मासागलेला, पिछाडलेला, अज्ञानी, अशिक्षित आणि मानवताविरोधी मानसिकतेने पिसाळलेला होता. व्यापार, कला, ज्ञान-विज्ञान आणि संशोधनाचा लवलेशही नव्हता. धार्मिक आणि व्यावहारिक प्रक्रियेचा हा विलक्षण संबंध होता. मला असे मनापासून वाटते की यामुळे आदरणीय मुहम्मद (स.) यांना मानवेतिहासातील सर्वांत जास्त प्रभावशाली व्यक्तीत्व असण्याचा अधिकार प्राप्त आहे.‘‘ (पृष्ठ - ४०)
या ठिकाणी मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताच्या आत्म्याची हाक ऐकल्यावर आपल्यासमोर निश्चितच एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे असा की, हे कोणते आकर्षण होते, कोणती शक्ती होती, कोणता सत्यवाद होता, आणि कोणता चमत्कार होता की ज्यामुळे इतक्या कठीण संकटमय परिस्थिती आणि पावलो-पावली असह्य अडचणी असतानासुद्धा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जीवनाच्या अत्यंत अल्पशा काळामध्ये एका नवीन समाज निर्माण केला आणि हा समाज आदर्श नियमानुसार प्रत्यक्ष चालवूनही दाखविला. एक आदर्श आचरणशैली, आदर्श संस्कृतीचा प्रत्यक्ष नमुना जगासमोर ठेवला. एक न्यायसंमत जीवन आणि सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायावर आधारित समाजाचे केवळ सिद्धान्तच स्पष्ट केले नसून अशा आदर्श समाजाची प्रत्यक्ष स्थापनासुद्धा करून दाखविली.
मुस्लिम जगत आणि आदर्श आचरण
आता आपण या ठिकाणी या विषयावरसुद्धा थोडक्यात चर्चा करू या की, आदरणीय मुहम्मद (स.) हे अंतिम प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर आता या भूतलावर ईश्वरी वाणी अगर दैवी शिकवणी घेऊन कोणीही येणार नाही. शिवाय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर जो ग्रंथ अवतरित झाला अर्थात कुरआन, ग्रंथदेखील मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अंतिम ग्रंथ असल्याने प्रेषितांनी केलेल्या समाजसुधारणेच्या महान कार्याची जवाबदारी त्यांच्या अनुयायांवर अर्थात मुस्लिम जगतावर आहे. कुरआनात स्पष्टपणे ईश्वराचा हा आदेश मुस्लिम जगतास संबोधून आहे,
‘‘आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात, ज्यास मानवांच्या मार्गदर्शन व सुधारणेकरिता निवडण्यात आले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता आणि दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.‘‘ (संदर्भ : कुरआन, आलिइम्रान - ११०)
कुरआनाच्या या संदर्भानुसार समाजसुधारणेचे जे कार्य प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केले, त्याची जवाबदारी आता मुस्लिम समुदायावर टाकण्यात आली आहे. कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आदर्शाचे (अर्थातच कुरआनाची प्रत्यक्षात अंमलबजावणीची कार्यशैली) मार्गदीप आज मुस्लिमंच्या हाती आहे. याच मार्गदीपाच्या प्रखर असलेल्या सत्यप्रकाशाच्या माध्यमाने मानवताविरोधी आणि असत्याच्या अंधारातून स्वतः जीवनाची वाटचाल तर करायचीच आहे, मात्र इतरांना असत्य, अज्ञान आणि अन्यायाच्या अंधारात खितपत पडायला सोडून देणे हा अक्षम्य अपराध आहे. ईश्वराने हा जो मार्गदीप प्रदान केला आहे, तो समस्त मानवजातीस मार्गदर्शन करण्यासाठी दिला आहे. स्वतः पोटभर खाऊन शेजार्यास उपाशी ठेवणेदेखील ईश्वरास पसंत नहा. मग जीवनाच्या सर्वांत जास्त महत्त्वाच्या विषयी ही बाब ईश्वरास मुळीच पसंत नाही की स्वतः मार्गदीपाच्या प्रकाशात चालावे आणि इतरांना मात्र अंधारात चाचपडत सोडून द्यावे. खरे पाहता मुस्लिमांच्या जन्माचा उद्देशच समाजसुधारणेचे हे महान कर्तव्य पार पाडण्यासाठी झालेला आहे.
ही गोष्ट प्रत्येक मुस्लिम आणि मुस्लिमेतर जनतेने नीट लक्षात घ्यावयास हवी की, केवळ मुस्लिमाच्या घरी जन्म घेतल्यामुळे अथवा मुस्लिमासारखे नाव ठेवल्याने कोणी पूर्णपणे मुस्लिम होत नसतो. कारण मुस्लिम हा केवळ जन्मानुसार नव्हे तर कर्मानुसार होतो. कारण जात-पात आणि वंश व वर्णाचा इस्लामशी फक्त परिचय करून देण्याइतकाच संबंध आहे. ही बाब कुरआनात अशा शब्दांत मांडण्यात आलेली आहे,
‘‘हे बदावी (ग्रामीण अरबी) समजतात की, ‘‘आम्ही श्रद्धा ठेवली (अर्थात पूर्णपणे मुस्लिम झालो.) (मात्र) त्यांना सांगा की तुम्ही श्रद्धा ठेवली नाही, तर असे म्हणा की, आम्ही समर्पित झालो. (खर्या अर्थाने) श्रद्धा अद्यापही तुमच्या हृदयात दाखल झालेली नाही. जर तुम्ही अल्लाह आणि त्याचे प्रेषित (स.) यांची अज्ञाधारकता स्वीकारली तर तो तुमच्या कर्ममोबदल्यात कोणतीही कमतरता करणार नाही. खचितच अल्लाह मोठा क्षमाशील आणि परमकृपाळू आहे. खरोखर श्रद्धावंत तर ते आहेत, ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर (अर्थात प्रेषित मुहम्मद (स.)) यांच्यावर श्रद्धा ठेवली, मग त्यांनी कोणतीही शंका मनात येऊ दिली नाही. आणि आपल्या जीवितवित्तानिशी अल्लाहच्या मार्गात पराकाष्ठा केली तेच खरे श्रद्धावंत लोक होत.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-हुजरात - १४,१५)
अर्थातच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका सद्क्रांतीचे प्रत्यक्ष स्वरुप मानवजगतासमोर सादर केले आहे. म्हणून मुस्लिमांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी मानवतेच्या कल्याणास्तव सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्ध दंड थोपटावे आणि सत्य, न्याय, स्नेह व बंधुत्वासाठी प्रयत्नशील असावे.

आदरणीय प्रेषितांच्या जन्माविषयी माहिती मिळविण्यापूर्वी हे पाहणे आवश्यक आहे की त्यावेळी जगाची अवस्था काय होती? जगाच्या पाठीवर किती शासक आणि विजेते, दार्शनिक व मर्मज्ञ, उपदेशक व वक्ते कित्येक धर्मसंस्थापक आणि चरित्र व नैतिकतेच्या शिकवणी देणारे समाजसुधारक आणि कायदेतज्ज्ञ निर्माण झाले. नेते उठले त्यांनी संघटन उभे केले, वादळी व्यक्तिमत्त्व आले व त्यांनी तर्हेतर्हेच्या क्रांत्या आणल्या. प्रत्येकाने जीवनातील सर्व समस्या उलगडण्याचा व त्यांचे निराकरण करण्याचा दावा केला. प्रत्येकाला वाटत होते की, तो मानवतेस सुख-समाधानाच्या संपत्तीने मालमाल करील. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. काहीअंशी भरभराट दिसली तरी अन्याय व अमानुषतेने त्यांचा पिच्छा सोडलाच नाही. या बाबतीत एवढे मात्र निश्चितच सांगता येईल की, ईश्वराने पाठविलेल्या प्रत्येक प्रेषिताने केवळ सत्य आणि चांगुलपणाच्या बळावरच क्रांती घडवून आणली. हे वैशिष्ट्य केवळ प्रेषितांमध्येच आढळते. त्यांच्या सत्यमार्गास लोकांनी स्वीकारल्याने त्यांच्यात विलक्षण परिवर्तन घडले. त्याच्या वैयक्तिक जीवनासह त्याच्या परिवार व त्याच्या संपूर्ण समाजातच विलक्षण परिवर्तन घडले. संपूर्ण समाजाचा व्यवहार, नीतिमत्ता आणि पूर्ण वातावरणच प्रेषितप्रणालीने ढवळून निघाले.
अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांनी ज्या काळात या धरतीवर पहिला श्वास घेतला, त्या वेळी संपूर्ण विश्वातील मानवता अज्ञानाच्या तिमिर काळोखात बुडालेली होती. काही ठिकाणी असभ्यतेचे भयानक वादळ उठले होते, काही ठिकाणी एकमेव ईश्वराची उपासना सोडून कितीतरी कृत्रिम उपास्यांची उपासना करण्याची कुप्रथा चालू होती, तर काही ठिकाणी मानवजातीत रक्ताची होळी खेळण्यात येत होती. इजिप्त, भारत, बाबिल व नेनवा (वर्तमान इराक देशाचा काही भाग) चीन व ग्रीसमधील संपूर्ण संस्कृती व सभ्यता काळवंडून गेली होती. ‘कन्फ्यूशस’ आणि ‘मानी’ या थोर तत्त्वज्ञांचे सिद्धान्त तसेच वेदांत आणि बौद्ध मतांचे विचार अनाकलनीय झाले होते. ‘जस्टेनन’सारख्या कायदेतज्ञाची संहिता आणि ‘सोलन’सारख्या विद्वानांचे नियम धाब्यावर बसवून मानवी जीवन कायदाहीन बनले होते. रोमन आणि इराणी संस्कृतीच्या वरपांगी चकाकणार्या प्रतिभा असूनही तेथील सम्राट ईश्वरी प्रभुत्वाचा आणि स्वामित्वाचा आव आणित होते. मानवजातीवर जागीरदारवर्ग आणि धार्मिक तत्त्वांच्या संगनमताने अन्याय व अत्याचाराची न संपणारी शृंखला चालू होती. जनतेकडून त्यांच्या ऐपतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त कर वसूल करून तिचे कंबरडे मोडण्यात आले होते. मानवांकडून अक्षरशः प्राण्यापेक्षाही जास्त अमानुषपणे कष्टाची कामे करून घेतली जात होती. दोन्ही साम्राज्यांच्या दरम्यान होणार्या नेहमीच्या संघर्षात बिचारी पामर जनताच रगडली जात होती. त्यांना ‘ब्र’ काढण्याचा देखील अधिकार नसे. लोक कधीच अन्याय व अत्याचाराविरुद्ध उठाव करण्याची साधी कल्पनाही करू शकत नव्हते. त्यांच्या समस्या व दारिद्रयास सीमाच नव्हती. त्यांचा आत्मा अवार्त टाहो फोडत असे, परंतु ऐकणारा मात्र कोणीही नसे.
खुद्द अरब प्रदेशात ‘आद’ व ‘समूद’ यांच्या काळात आणि ‘सबा’, ‘अदन’ आणि ‘येमेन’च्या शासनाच्या छत्रछायेत सभ्यतेने जन्म तर घेतला होता, परंतु आता मात्र या नष्ट झालेल्या राष्ट्रांच्या पुरातन वास्तुंचे केवळ अवशेषच पाहायला तेवढे मिळत होते. नेहमीच्या लढाया, तंटे, लूटमार आणि रक्तपाताचे साम्राज्य होते. मद्यपान, व्यभिचार आणि जुगाराने ठासून भरलेल्या अज्ञानतापूर्ण संस्कृतीचे या विश्वास भयानक ग्रहण लागले होते. अरबच्या ‘कुरैश’ कबिल्याने मूर्तीपूजेवर आधारित असलेल्या धार्मिकतेच्या मुळावर पवित्र काबागृहाच्या पौरोहित्याचा धंदा सुरु केला होता. ‘ज्यू’ समाजाने ईश्वरीय ग्रंथात हेराफेरी करून संशोधनाच्या नावावर धर्माचा धंदा सुरु केला होता. ‘मक्का’ आणि ‘ताईफ’ येथील महाजनांनी मानवांना व्याजाच्या भयानक विळख्यात जखडले होते.
अशी ही अत्यंत भयानक व विदारक संकटमय परिस्थिती होती व याच विदारक व उग्र स्वरुपाच्या अगदी प्रतिकूल परिस्थितीच्या समोरासमोर क्रांतिदूत अंतिम प्रेषित मुहम्मद(स) हे एका मोठ्या परिवर्तनाचा ईश्वरी संदेश घेऊन उठले. प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म ‘मक्का’ शहरात झाला. हे ‘मक्का’ शहर म्हणजे मागे होऊन गेलेल्या प्रेषित इब्राहीम(अ) यांनी वसवलेले शहर आणि एकेश्वरवादाचे केंद्र होय. या ठिकाणी प्रेषित इब्राहीम(अ) यांनी ईश्वरासमोर केलेल्या प्रार्थनेनुसार परत एकदा इब्राहीमी जीवन शैलीच्या प्रकटीकरणाचे महान कार्य अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या परिश्रमातून पूर्ण होणार होते.
मानवजातीचे उद्धारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म हिजरी हि सन पूर्व ५२ च्या ‘रबिऊल अब्बल’ महिन्या (अर्थात २२ एप्रिल ५७१ इ.स.) मध्ये झाला. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पितावर्यांचे नाव ‘अब्दुल्लाह’ आणि मातावर्यांचे नाव ‘आमिना’ असे होते. त्यांच्या जन्मामुळे संपूर्ण घर प्रकाशमान झाले. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब’ त्यांना उचलून पवित्र ‘काबा’मध्ये घेऊन गेले आणि ईश्वरासमोर प्रार्थना केली. आजोबांना पडलेल्या एका शुभ स्वप्नानुसार त्यांनी आपल्या या नातवाचे नाव ‘मुहम्मद(स)’ म्हणजेच ‘प्रशंसनीय’ असे ठेवले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे पितावर्य मात्र त्यांच्या जन्माच्या काही काळापूर्वीच वारले होते. प्रेषित मुहम्मद(स) यांनी अनाथ बालकाच्या स्वरुपातच जन्म घेतला. त्याचप्रमाणे त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातेनेदेखील जगाचा निरोप घेतला. आता या बालकाच्या पालनपोषणाची जवाबदारी त्यांचे आजोबा ‘अब्दुल मुत्तलिब’ यांच्यावर आली. परंतु दोनच वर्षे लोटली की तेदेखील वारले. ईश्वराची योजना प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर ऐहिक संकटे टाकून आणि ऐहिक आश्रयांनी वंचित ठेवून एका महान व कठीण कार्यपूर्तीसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची होती. ही संकटे व अरिष्टे आणण्याचा ईश्वरी हेतूच मुळात असा होता की, प्रेषित मुहम्मद(स) यांच्यात प्रचंड सहनशक्ती व प्रचंड संयम निर्माण व्हावा. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी मृत्युसमयी आपल्या या लाडक्या नातवाच्या पालकत्वाची जवाबदारी त्यांचे काका अबू तालिब यांच्यावर सोपविली होती. काका अबू तालिब यांनी ही जवाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
तारुण्यात पाऊल ठेवण्यापर्यंत हा अनोखा मुलगा सामान्य मुलांसारखा नव्हताच मुळी. तो एका गंभीर आणि विवेकशील वृत्तीच्या स्वभावाच्या एखाद्या अनुभवी माणसासारखा वाटायचा. त्याने तारुण्यात पाऊल ठेवले. नैतिक बिघाड असलेल्या वातावरणातसुद्धा या तरुणाचे तारुण्य निष्कलंक आणि नजरा पवित्र होत्या. त्याचे विचार पवित्र होते. ज्या ठिकाणी गल्लोगल्ली आणि घरोघरी मद्य निर्मितीचे कारखाने होते, दारु पिणे व पाजणे अभिमान व गर्वाचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे; परंतु हा तरुण मात्र या दारुच्या आहारी जाण्याची कल्पनादेखील करीत नसे. ज्या ठिकाणी जुगार आणि सट्टा हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा खेळ समजला जात असे, तसेच नृत्य, शृंगार व संगीत देशाच्या संस्कृतीचा भाग बनला होता, त्या ठिकाणी हा पावन वृत्तीचा तरूण या सर्व बाबींपासून खूप दूर असायचा. ज्या ठिकाणी कित्येक देवीदेवतांची पूजा होत होती, त्या ठिकाणी एकेश्वरवादाचे प्रतीक असलेला हा तरूण केवळ एकमेव निर्मात्याचीच अर्थात ईश्वराचीच उपासना करीत असे. अरब समाजात होणार्या नेहमीच्या रक्तपातापासून हा तरूण नेहमीच दूर असायचा. या तरुणाने आपल्या समविचारी सवंगड्यांना घेऊन अत्याचारी जणांच्या अत्याचारास बळी पडलेल्या निर्धन आणि दुर्बलांना दुष्ट वृत्तींच्या विळख्यातून सोडविले.
प्रेषितत्व मिळाल्यावरसुद्धा त्यांनी ही घटना स्मरण करून एकदा म्हटले की, ‘‘जर मला अरब देशाची बहुमूल्य संपत्ती म्हणजेच लाल रंगांचे उंट देऊन सांगितले असते की, दुर्बलांचे समर्थन करू नये तरीसुद्धा मी ही बहुमूल्य संपत्ती झुगारून अत्याचारपीडितांचे सर्वशक्तीनिशी समर्थन करून त्यांना जोखडातून मुक्त केले असते आणि आजही जर मला एखाद्या अत्याचारपीडिताचा टाहो ऐकू आला तरी मी सर्व शक्तीनिशी हजर आहे.’’
‘पवित्र काबा’च्या पुरोहित आणि पुजारी परिवारात जन्म घेतलेल्या या तरुणाने पौरोहित्य स्वीकारुन काबागृहास मिळणार्या भेटवस्तू आणि नजराने मुळीच न स्वीकारता आपली उपजीविका भागविण्यासाठी व्यापाराचा पवित्र व प्रतिष्ठित मार्ग स्वीकारला. व्यापारासाठी भांडवल नसताना त्याने इतरांकडून व्याजमुक्त बटाई तत्त्वावर भांडवल घेऊन व्यापार उभारला. ‘सीरिया’ देशाचा दोन वेळा व्यापारी दौरा केला. त्याच्या अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक व्यवहाराच्या चर्चा दूर दूर पसरल्या. खरेदीदार आणि व्यवहार करणारे त्याच्या स्वच्छ व प्रामाणिक व्यवहार पद्धतीने अत्यंत प्रभावित झाले. ‘साईब’, ‘कैस’, ‘खदीजा(र)’ आणि इतर सर्वच व्यापारी भागीदारांना त्यांच्या प्रामाणिकतेचा आणि व्यवहारातील पवित्र नीतिमत्तेचा जेव्हा अनुभव आला, तेव्हा ते हुरळून गेले. त्या सर्वांनीच मुहम्मद(स) यांना ‘अनामतदार व्यापारी’ अशी उपमा दिली.
ज्या वेळी या अत्यंत सुशील आणि प्रामाणिक तरुणाने जीवनसाथी निवडण्याचा विचार मनात आणला, त्या वेळी ‘मक्का’ या शहरात कित्येक तरूण व सुंदर मुलींवर दृष्टी न टाकता त्यांनी आपल्यापेक्षाही पंधरा वर्षे वयाने मोठी असलेली विधवा महिला ‘माननीय खदीजा(र)’ यांना विवाहास्तव पसंत केले. ही महिला सुशील, प्रामाणिक, चारित्र्यवान व उत्तम आचरणाची असल्याने मुहम्मद(स) यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून असेच सिद्ध होते की, हा तरुण किती महान चारित्र्यवान होता.
शिवाय हा तरूण परिवाराच्या आणि व्यापार व धंद्याच्या अनेकानेक व्यस्ततेतून सवड काढून या सवडीचा वेळ मनोविहार आणि विलासात न घालवता ‘हिरा’ नामक एका गुहेत जाऊन एकांतात ईशस्मरण करण्यात व्यतीत करीत असे. सृष्टीची वास्तविकता आणि मानवी जीवनाच्या रचना व बिघाडावर सखोल आणि गंभीर शोधपूर्ण विचारमग्न होत. संपूर्ण मानवतेस अज्ञानाच्या तिमिरातून सत्यप्रकाशात आणण्याच्या बाबतीत विचार करीत. मुहम्मद(स) यांनी कित्येक दिवस त्या गुहेत चितन केले. ही गुहा मक्का शहरापासून तीन मैलाच्या अंतरावर आजही आहे.

अरब समाज ज्या अनैतिक गोष्टीने ग्रस्त होता त्यांचा येथे थोडक्यात आपण उहापोह करू या.
युद्धप्रियता आणि भांडखोर वृत्ती
अरब समाजात असलेल्या अहंकारी वृत्तीमुळे ते आपसांत खूप लढाया करीत असत, सूडबुद्धीने पेटलेल्या या लोकांची आपसांतील युद्धे पिढ्यान्पिढ्या चालत आणि अगदी क्षुल्लक कारणावरून रक्तपात होत असे. म्यानातून तलवारी बाहेर निघण्यासाठी साधे निमित्तच पुरेसे असे.
समाजातील भेदभाव
हा समाज संघटित नव्हता. छोट्या-छोट्या कबिल्यांत दुभंगलेला होता. प्रत्येक परिवार एकदुसर्यांविरुद्ध सुडाने पेटलेला, डोळ्यांत प्रचंड द्वेश आणि मत्सराच्या धगधगत्या ज्वाला आणि सर्वत्र आपसांत रक्तपात सुरुच. शांती आणि सद्भावनेचा मागमूसही कोठे दिसत नव्हता. त्यांच्या सामरिक वृत्तीचे चित्र एका इतिहासकाराने ‘अय्यामुल अरब‘ (अर्थात - अरब समाजाच्या संकटमय काळाचे स्मरण) या ग्रंथात शेकडो पृष्ठांवर रेखाटलेले आहे. ‘मीदानी नेशापुरी‘ (मृत्यू ११२४) या इतिहासकाराने ‘किताबुल अमसाल‘ या ग्रंथात १३२ युद्धांचे वर्णन करताना लिहिले की,
‘‘या युद्धांची गणना करणे हे कोणत्याही गणनाशास्त्रानुसार शक्यच नाही. म्हणून मी या ठिकाणी या युद्धांचे शक्यतोपरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला.‘‘
मुळात ही युद्धे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्वी लढण्यात आली होती. अर्थातच हिंसा, निर्दयीपणा, हत्या, लूटमार आणि यासारख्या अत्यंत क्रूर घटनांची एक कधीही न संपणारी शृंखला सुरुच होती.
दारुचे व्यसन
जगामध्ये प्रत्येक अनैतिकता, अन्याय, अत्याचार, दुष्कर्म, व्यभिचार आणि वैरभावाची जननी असलेली ही दारू! ही दारू समस्त अरब समाजाच्या कंठात रिचलेली होती. अरब समाजाचे साहित्य म्हणजे दारू, प्रतिष्ठा म्हणजे दारू, पाहुणाचार म्हणजे दारू, अभिमान म्हणजे दारू, मान-सन्मान म्हणजे दारू, त्यांचे सर्वकाही दारूच असे समीकरणच झालेले होते. मद्यपनाच्या मैफली सजन असत. सहकुटुंब सहपरिवार मिळून दारूचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा. दारुच्या प्रत्येक घोटावर आपल्या वंश-प्रतिष्ठेचे काव्यात्मक गुणगान होत आणि अश्लील कवन होत. दारूचे २५० प्रकार या समाजात अस्तित्वात होते. पूर्ण समाजास दारूने आपल्या कंठात रिचविले होते.
जुगार
पायापासून डोक्यापर्यंत दारूत चिंब झालेल्या या समाजास जुगाराची भंयकर कीड लागलेली होती. आपली धन-संपत्ती डावावर लावण्याची आणि ती संपली की बायका-मुलेसुद्धा डावावर लावायची, विजय-पराजयाच्या या खेळीमुळे आधीच सुडाने पेटलेल्या समाजात रक्तपात सुरु व्हायचा. धन-संपत्ती आणि अहंकाराच्या आहारी जाऊन पिढ्यान्-पिढ्या नष्ट व्हायच्या.
व्याज आणि सावकारी धंदा
अरबांच्या या विविध कबिल्यांत दुभंगलेल्या समाजामध्ये समस्त वाईट प्रथांप्रमाणेच मानवी शोषण आणि उत्पीडनाचे आणखीन एक भयानक स्वरूप होते आणि ते म्हणजे ‘व्याजखोरी‘. एका निश्चित व्याजदरावर कर्ज देऊन वेळेवर कर्ज परत न मिळाल्यास परतफेडीची संधी वाढवून देताना मुद्दल आणि व्याज एकत्र करून त्यावर वाढीव व्याज आकारण्यात येत असे. हे वाढीव व्याज इतके वाढीव होते की याची परतफेड करण्यासाठी पूर्ण संपत्तीच सावकाराच्या तिजोरीत जात असे. हा प्रकार शेतकरी आणि मजुरांच्या नशिबी येत असे. यामुळे शेतकरी आणि मजूर सावकारी करणार्यांच्या गुलामीत जखडलेले असत. मूठभर सावकार आणि श्रीमंतवर्ग मूठभर पैसा देऊन शेतकर्यांच्या सर्व जमिनी बळकावून घेत आणि यातूनही कर्जाची फेड न झाल्यास त्याला आजीवन गुलाम करून घेत आणि केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या बायकोला आणि मुलांना गुलामीच्या दावणीस बांधत असे. (संदर्भ: बुखारी)
म्हणजेच ‘सोने सत्य-मानव मिथ्या‘ असा प्रकार होता. संपत्तीसमोर माणसाची कवडीकिंमत नव्हती. प्रतिष्ठा, स्वाभिमान, अहंकार व प्रसिद्धीचा हव्यास, भोगविलास, कठोरता आणि क्रूरतेच्या या रखरखत्या वाळवंटात प्रेम आणि बंधुत्वाचा एक दवबिंदूसुद्धा नव्हता. भांडवलशाहीचा या काळात उदय झाला नसला तरी समस्त अरब समाज क्रूर आणि जुलमी भांडवलशाहीच्या अभिशापाने शापित झालेला होता.

लूटमार
दररोजची लुटालूट सुरुच होती. वाटमारी आणि दरोड्यांचे वातावरण होते. सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण होते. दरोडेखोरांचे विशिष्ट जत्थे होते. दरोडे आणि लूटमारीवर या जत्थ्यांचे अर्थार्जन, पोटपाणी व भोगविलास अवलंबून होते. दरोडे टाकण्याची पद्धतसुद्धा विलक्षण होती. दरोडे फक्त द्रव्य आणि संपत्तीवरच नव्हे तर बायकापोरांवरसुद्धा टाकण्यात येत असत. व्यापारीवर्ग मालवाहतूक करताना खंडणी दिल्याखेरीज पुढे सरकू शकत नव्हता. सफल आणि विजयी कामगिरी करणारे डाकू आपली कामगिरी आणि कर्तृत्व कविताबद्ध करीत असत आणि मोठ्या गर्वाने आपली ‘अहंकार गाथा‘ वाचून दाखवत असे.
चोरी
दरोडे टाकण्याव्यतिरिक्त गरिबी आणि दारिद्र्यास बळी पडून ग्रामीण भागातील लोक लहानसहान चोर्या आणि वाटमारी करायचे. काहीजणांनी तर पूर्णपणे हाच धंदा वा उपजीविका पत्करली होती. शिवाय हा धंदासुद्धा एक प्रकारे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून ते मिरवित असत.
बलात्कार, व्यभिचार आणि अश्लीलता
हा समाज व्यभिचार आणि लैंगिक मार्गभ्रष्टतेत खितपत पडलेला होता. स्त्रियासुद्धा यात कमी नव्हत्या. व्यभिचारीणी बाया आपापल्या घरांवर लैंगिक आमंत्रणाची खूण असलेले झेंडे लावून व्यभिचारी पुरुषांना आमंत्रित करीत असत. मोठमोठे प्रतिष्ठित व श्रीमंत लोक आपल्या दास्यांकडून पाहुण्यांचा पाहुणचार करीत, आपल्या दास्यांकडून देहविक्रीचा व्यवसाय करीत आणि यातून संपत्ती मिळवीत असत. या प्रकारच्या व्यभिचारांवर प्रशंसापूर्ण काव्य करण्यात येत असे.
निर्लज्जता आणि नग्नता
निर्लंज्जतेने सर्व सीमा ओलांडलेल्या होत्या. अगदी धर्माच्या आधारावरसुद्धा मानवतेच्या छातीवर या नग्नतेने तांडव माजविले होते. काबागृहात हजच्या प्रसंगी हजारो लोक हज करण्यासाठी येत असत. मात्र कुरैश कबिल्याव्यतिरिक्त सर्वजन बिनधास्त कपडे काढून काबागृहाची प्रदक्षिणा करीत.
महिलांवरील अत्याचार
जग अस्तित्वात आल्यापासून अत्याचारांमध्ये सुसंस्कृत देश काय आणि असंस्कृत देश काय, धार्मिक काय आणि निधर्मी काय, सर्वांच्याच अन्याय, अत्याचार, शौर्य आणि इतर सर्व बाबींचे जुलमी भोग महिलांनाच भोगावे लागतात. भूत असो, भविष्य असो की वर्तमान असो, प्रत्येक काळात तिचाच बळी जात आहे. हीच अवस्था नारीची होय. त्यातल्या त्यात अगदी असंस्कृत आणि असभ्य समजल्या जाणार्या अरब प्रदेशात तर विचारता सोय नाही. महिलांना वारसासंपत्तीत कोणताही अधिकार नसायचा, असंख्य महिलांशी लग्न करायची पुरुषांना पूर्ण मुभा असे आणि कधीही घटस्फोट देऊन घराबाहेर काढून देण्यात पुरुषार्थावर कोणतीही बाधा येत नसे. यामुळे कुटुंबव्यवस्था पूर्णतः कोलमडून गेलेली आणि महिला अन्याय व अत्याचारांच्या अÎalÉपरीक्षेतून कधीही बाहेर निघण्याची संभावना दिसत नव्हती. (संदर्भ: सीरतुन्नबी - लेखक सय्यद सुलैमान नदवी)
मुलींची हत्या
क्रूर सावकारी बाहूपाशात आवळलेली मानवता, सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान आणि उपासमारी, अहंकार आणि वंश-श्रेष्ठत्वाच्या विखारी झिंगेमुळे पेटलेला वैरभाव, द्वेष आणि मत्सर, गरीब व सर्वसामान्यांच्या मानगुटीवर भांडवलदारांचा जुलमी पाय, सर्वत्र चालू असलेली लूटमार आणि अशा परिस्थितीत पोटात उठलेली भुकेची आग, मान-सन्मानाच्या असुरक्षिततेची भावना आणि याच अवस्थेतून नको वाटत असलेला मुलीचा जन्म, काळजाचा तुकडा असलेल्या मुलींचा निर्घृण वध करून मानवता भरडून निघाली होती. मुलगी जन्मली की तिच्या रक्षणाचा, तिच्या पोटापाण्याचा प्रश्न बापाला भेडसावत असे. कोणीतरी आपला जावई होईल आणि आपली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, या कल्पनेने त्याच्या आत्म्याचा थरकाप उडत असे. म्हणून तो आपल्या प्रेम, ममत्वाची मुस्कटदाबी करून तिला जीवंत पुरुन टाकायचा आणि संपूर्ण अरब समाजात ही प्रथा बर्याच अंशी रुढ होती.
गुलामी
आपसात भेदभाव आणि वैरभावाने पेटलेल्या या समाजाचा आणखीन एक भयानक अभिशाप म्हणजे गुलामीची प्रथा होय. माणसांचा बाजार भरायचा, गुलाम पुरुष आणि स्त्रियांची जनावरांप्रमाणे खरेदी-विक्री व्हायची. गुलाम आणि दासींबरोबर पशुपेक्षाही जास्त जुलमी व्यवहार करण्यात येत असे.

सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच ५७१ साली अरबच्या मरुभूमीवर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला. या वेळी समस्त अरबसमाज अज्ञानतेच्या अंधकारात खितपत पडलेला होता. या समाजात समग्र अनिष्ट परंपरा आणि अमानवी रीती प्रचलित होत्या. तो श्वापदांपेक्षाही भयानक झाला होता, मानवतेचे क्रूरपणे लचके तोडत होता, हे अंधार युग होते. मानवता पशुच्या स्तराहून खालावली होती.
सामाजिक निरीक्षण
सुप्रसिद्ध समाजतज्ञ सी.राइट मिल्स यांनी एखाद्या समाजाचे अचूक निरीक्षण करण्यासाठी तीन पद्धती सांगितल्या आहेत.
 1. त्या समाजाचा ढाचा कशा स्वरुपाचा आहे आणि त्याच्या विभिन्न भागांचा परस्पर संबंध कसा आहे, याचे निरीक्षण करणे.
 2. मानव-इतिहासात त्या समाजाचे कोणते स्थान आहे आणि मानवतेच्या सर्वांगीण विकासाची त्या समाजात कोणती व्याख्या आहे, याचा मागोवा घेणे.
 3. त्या समाजावर कोणत्या प्रकारच्या लोकांचे वर्चस्व आहे, याचे निरीक्षण करणे.
  सी. राइट मिल्स यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार अरब समाजाचे निरीक्षण केल्यास आपल्याला त्याची निम्नलिखित तथ्ये प्राप्त होतात.
  1. हा समाज विभिन्न कबिल्यांमध्ये दुभंगलेला होता. कबिल्यांतर्गत प्रचंड भेदभाव होता. समाजातील विविध घटक एक-दुसर्यांचे शोषण करीत होते. ‘बळी तो कान पिळी‘ अशी या समाजाची स्थिती होती. आपसांत हेवे-दावे, इर्ष्या, द्वेश, मत्सर आणि वैरभावासारख्या अमानवी भावनांच्या ज्वालांनी पेटलेला होता, अक्षरशः धगधगत होता. वंश-वर्ण आणि श्रेष्ठत्व व कनिष्ठत्वाच्या अहंकारी भावनांच्या आहारी होता हा समाजाचा विशिष्ट गुणधर्म होता.
  2. मानव-इतिहासात या समाजाचे स्थान अत्यंत खालच्या पातळीवर होते. मानवतेचा वैरी असलेला हा समाज पूर्णतः भौतिकवादी आणि संपत्तीचा भक्त होता. थोड्या लोभापायी कोणाचाही गळा कापण्यासाठी किंचितही मागेपुढे पाहत नव्हता. दीन-दुबळ्यांना पायाखाली तुडवून त्यांची संपत्ती हस्तगत करून आपलेच वर्चस्व गाजविण्यापेक्षा जीवनाचा कोणताही हेतू शिल्लक नव्हता. अशा या दयनीय आणि शोचनीय परिस्थितीत मानवतेची अन्याय व अत्याचारांच्या धगधगत्या भट्टीतून सुटका होण्याची मुळीच संभावना दिसत नव्हती.
  3. समाजात दीन-पददलितांचे रक्त शोषून जे लोक गब्बर झाले होते आणि स्वतः सर्वांचे स्वामी व प्रभू झाले होते, ते संपत्तीची भक्ती, पूजा आणि भोगविलासात बरबटलेले होते. स्वतःस वरिष्ठ, श्रेष्ठ, स्वामी व प्रभू समजून इतरांना गुलाम समजत होते. गर्व, व्यर्थ अभिमान आणि अहंकारी भावनेने पिसाळून जाऊन सर्वांना आपले गुलाम व दास समजत होते. इतरांचे शोषण आणि पिळवणूक करून त्यांच्या रक्तने दात लाल करणेच जणू त्यांचा परमधर्म होता. सत्य, समता, न्याय आणि बंधुत्वाच्या शाश्वत मूल्यांची साधी कल्पनाच तेवढी बाकी होती. एकूणरित्या असत्य, अन्याय व अनैतिकतेची एक परिपूर्ण व्याख्या नीट समजून घ्यायची असेल तर या समाजास पाहावे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सामाजिक शास्त्राच्याच दृष्टीने जर निरीक्षण करावयाचे झाल्यास या समाजाचे उपरोक्ती चित्र समोर आलेले आहेच. ही बाब स्पष्ट करण्याचे कारण एवढेच आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा या भूतलावर जन्मले, तेव्हा त्यांच्यासमोर किती प्रचंड मोठे आव्हान होते. अर्थातच एका अत्यंत बिघडलेल्या आणि शाश्वत मानवी मूल्यांचा आधार हरवून बसलेल्या या समाजात सुधारणा घडवून आणणे किती अवघड कार्य होते!

खरे पाहता जगाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत हजारो प्रेषित आणि सुधारक येऊन गेले आहेत. सर्वांनीच समाजसुधारणेचे खूप कार्य केले मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती जेवढ्या अल्प काळात घडली, त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे.
या ठिकाणी ही गोष्ट लक्षणीय आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत केलेला धर्म अर्थात इस्लाम हा इतर सर्वच धर्मांपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. कारण हा केवळ धर्म नसून एक अत्यंत महान सामाजिक आंदोलन होय. इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. या आंदोलनाच्या माध्यमाने केवळ मानसिकताच बदलली नसून समाजाच्या आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये पूर्णतः क्रांती घडली. हा एक असा चमत्कार घडला की जगातील मोठमोठ्या विचारवंतांनी आश्चर्यचकीत झाले.

कुरआनच्या आदेशाचा सारांश असा की, वाचा, शिका त्या परमेश्वराच्या नावाने ज्याने ज्ञान दिले, माहीत नसलेले, लेखणीच्या द्वारे. शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी  प्रक्रिया आहे. ती कधीच थांबत नसते आणि ही विकासात्मक प्रक्रिया असते. ही जीवनाच्या सर्वच क्षेत्रात घडत असते, परिवर्तनशील आणि गतिशील असते.
पैगम्बर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या काळातील हदीस आहे की, ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन ला देखील जा. पैगरबर (स.अ.स.) यांच्या काळात मक्का हे तत्कालीन  आंतर्राष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. या बाजारपेठेत विविध देशाचे जीन्नस, कपडे, भांडी, विविध यंत्रे व नवसंशोधित बाबींची माहिती व वस्तू येत असत. कुरआन आणि पैगरबर (सल्ल)  यांच्या मार्गदर्शनाचे केंद्र चिंतन आहे. चिंतन हा मानवाच्या अंगी असलेला ईेशरदत्त आणि शक्तिशाली गुणधर्म आहे. यालाच चेतना माणून ही प्रत्येक समयी क्रीयाशील ठेवण्याचे  संशोधनात्मत आवाहन वारंवार कुरआन करीत असतो. आणि त्याच अनुषंगाणे पैगरबर सल्ल. यांनी नविन ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन पर्यन्त जाण्याची आज्ञा केलेली आहे.  मक्का शहराच्या बाजारात चीन निर्मीत विविध वस्तू जिन्नस येत असते. त्यांच्या उत्पादनाचे ज्ञान चीनमधे होते. तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी मुस्लिमांनी चीनला देखील जायला पाहिजे,  हा स्पष्ट संदेश होता.
याचा दुसरा अर्थ अगदी स्पष्ट आहे की, इस्लाम, कुरआन आणि पैगरबरांच्या शिक्षणात आध्यात्मिक शिक्षणाएवढेच भौतिक शिक्षणही महत्वाचे, आवश्यक व त्यासाठी कुठेही जाण्याची,  खर्च व त्याग करण्याची दिशा स्पष्ट आहे! इस्लाम, कुरआन यांचा शिक्षणाकडे पाहन्याचा दृष्टिकोण हा वास्तविक जगताच्या समाज विकास व भौतिक विकासाच्या संदर्भात देखील स्पष्ट  आहे.मानवाच्या, समाजाच्या विकासासाठी ज्ञानाकडे, शिक्षणाकडे इस्लाम निरपेक्ष (म्हटल्यास धमनिर्पेक्षपने!) दृष्टीने पहात असतो.
खलीफांच्या काळात व अनेक सुलतान,बादशाह यांच्या काळात (७ वे शतक ते १७ व्या शतकापर्यंत) मोठाल्या विद्यापीठांचि निर्मिति, विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांची निर्मीती, संशोधनाना  दिलेले उत्तेजन, आणि विशेष म्हणजे, अरब पंडितानी विविध भाषेतील ग्रन्थांचे केलेले भाषांतरण अत्यंत महत्वाचे व इस्लामच्या वैश्विक शैक्षणिक दृष्टिकोणाचे मार्गदर्शक आहेत.  इजिप्त आणि यूनान च्या तत्वज्ञानांचे, राज्यशास्त्र ते अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, गणीत, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र आणि विविध क्षेत्रातील वैज्ञानिकांचे केलेले संशोधन, त्यांच्या ग्रंथांचे विश्लेषण, भाषांतरण यावर मुस्लिम पंडितांनी केलेले श्रम त्यांच्या ज्ञान प्राप्तिच्या सन्दर्भातील तृष्णेचि ग्वाही देणारे आहे! कुरआन व पैगम्बर प्रणीत निरिक्षण करा, शोध घ्या, विचार  करा, निसर्गात दडलेल्या घटनांचे कार्यकारण भाव शोधा ईत्यादी मार्गदशन ज्ञानाच्या क्षेत्राच्या व्याप्तिला समजून घेण्यासाठीच आहे.
ज्ञान हे बंदिस्त, साचेबंद व स्तिथिवादी कधीच नसते! म्हणून ते नीट समजून घेण्यासाठी कुरआन दोन प्रकारच्या ज्ञान प्रवाहांचा मार्ग स्पष्ट करतो. एक प्रवाह ज्ञान प्रवाह तो, जो  प्रेषित, ईश्दूत यांच्या मार्फत दिल्या जातो! यात अध्यात्म, ईेशरीय रचना, प्रेरणा आदींचा समावेश असतो.
दुसऱ्या प्रकारात ज्ञान हे निसर्गात अस्तीत्वात आहेच! त्याचा शोध स्वतःच्या प्रज्ञेनें घ्यायचा असतो. यासाठी प्रत्यक्ष निरिक्षण, संशोधन, विश्लेषण व तर्क-परीक्षण या द्वारे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन आहे. यालाच वैज्ञानिक ज्ञान प्राप्तिचा मार्ग, असे इस्लामिक संशोधनांचे तत्वज्ञान आहे.
हे सर्व असतानांही, विशेष करून भारतीय मुस्लिमांत आणि महाराष्ट्रातील मुस्लीमात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे वर्तमानातील ६ टक्केच शिक्षित आहेत! मुसलमांनातील  आर्थिक- समाजिक दुर्बलतेच्या अनेक कारकांपैकी हे महत्वाचे कारण आहे.  मध्ययुगाच्या अंतापर्यंत जगात आद्योगिक व वैज्ञानिक क्रांतिने उचल खाल्लेली  होती. उत्पादन साधने तांत्रिक, आधुनिक बाजारपेठ, विपणन व्यवस्थेतील बदल, यासह वेगाने बदलत असलेले आर्थिक, सामाजीक व राजकीय व्यवस्थेतील बदल वेगाने घडत होते. या  बदलांच्या मुळाशी होते. मानवाला प्राप्त होत असलेले ज्ञान. त्याने संशोधन, प्रयोग, विज्ञानाच्या सहाय्याने लावलेले नवे शोध व नवे तंत्र व यंत्र. याबाबतचे त्याने लिपीबद्ध केलेले, ग्रंथांच्या स्वरूपात लिहिलेले फार्मुले, आणि पुढच्या ज्ञानासाठी सुचविलेला आणि प्रशस्त केलेले मार्ग. या ज्ञानाच्या विस्ताराने पारम्पारीक ज्ञान देणाऱ्या संस्था यांचे पारम्पारिक ज्ञान व  पद्धति ही कालबाह्य ठरू लागली. नव्या शाळा, कॉलेजेस, शिक्षण संस्था स्थापन व्हायला लागल्या. ज्ञानाच्या भाषा संशोधकांच्या व देश निहाय भाषांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था निर्माण व्हायला लागली.
ज्या मुस्लिम देशांनी हे वास्तव ओळखले आणि ज्ञानाच्या बाबतीत खऱ्या इस्लामिक मार्गदर्शनाचे वास्तव समजून घेतले, त्या-त्या देशांनी आपआपल्या शैक्षणिक व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणला. कुराणाची भाषा अरबी, म्हणून कुरआन समजून घेण्यासाठी या भाषेसोबत स्थानिक भाषांचा वापर हा ९ व्या, १० व्या शतकापासूनच या देशांनी चालू केला  (भारतात याला १८ वे शतक यावे लागले) मात्र, वास्तविक भौतिक ज्ञानासाठी इंग्रजी, भाषा व तत्सम ज्ञान देणारी भाषा शैक्षणिक म्हणून वापरली व जगातील ज्ञान, तंत्रज्ञान, व समस्त  स्पर्धेत अस्तित्वात राहिले! इजिप्त, तुर्कस्तान, ईरान, सीरिया, लेबनान असे असंख्य देश उदाहरणादाखल घेता येतील.
भारतातही इंग्रज राज्यानंतर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडत होते! या बदलात किमान त्याही काळी सुशिक्षित असलेला मुस्लिम (उर्दू भाषिक) वर्ग (मुस्लिमातील २० टक्के होता)  हा या स्पर्धेत तिकला पाहिजे म्हणून सर सय्यद अहमद, मौलाना आजाद, तुफेल अहमद मंगलोरी, मौलाना हसरत मोहानी यानी इंग्रजी शिक्षणाची कास धरण्याची, शिक्षणासाठी स्थापन  होत असलेल्या  मुस्लिमेतर शिक्षण संस्थांमधे शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन, तांत्रिक शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन करितच होते.
भारतीय मुस्लिमातील ८० टक्के समाज हा श्रम संस्कृतीतून आला असल्याने परम्परागत व्यवसायात जीवन जगणे व आपल्या धर्माचे पालन करणे एवढेच त्याच्या आवाक्यात होते!  म्हणून स्वातंत्र्यानंतरही भारतातील मुस्लिमांच्यां ७० ते ७५ टक्के अशिक्षित असण्याचे कारण सहज लक्षात येते. 
दूसरीकडे कुरआन स्पष्ट सांगत आहे की, ज्ञान घेणे मुस्लिमांसाठी फर्ज आहे, व हे सांगणारे आलीम, मौलाना साहेब कितीही घसा ओरडून सांगते झाले तरीही, शिक्षण घ्यायला व  द्यायला एका व्यवस्थेची गरज असते. शिक्षण संस्थेसह, वास्तुसह, मोठ्या नियोजनाची आणि आर्थिक व्यवस्थेची गरज असते. ही जबाबदारी दोन स्तरावर असते. एक तर सरकारने ही व्यवस्था पूरवायची असते. कारण हा समूह नागरिकांचा असतो व मतदान करून सरकार निवडून देत असतो.
दुसरे, भारताच्या संविधानाने असली व्यवस्था प्रत्येक समाजाला दिलेली आहे की त्यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणाच्या सोयी स्वतः उभाराव्यात. ही जबाबदारी त्या त्या समाजातील  उच्चवर्ग, साधन सम्पन्न वर्ग, जागरूक वर्गाची, सत्ताधारी वर्गाची असते. आज महाराष्ट्रात मराठा, जैन, मारवाड़ी, कुनबी, माळी आणि इतर समाजाच्या अनेक शैक्षणिक संस्था भौतिक  ज्ञान व स्पर्धेच्या युगात आपल्या समाज समुहांच्या अस्तित्व व सहभागासाठी उभ्या टाकलेल्या आहेत. या स्तरावर मुस्लिम समाजाचा विचार केला असता काही मोजक्या, अपवादात्मक  कॉलेज, शाळा सोडल्या तर दुःखदायक स्थिती आहे. मुस्लिमातील वरिष्ठ वर्गीय समाजाकडे भरपूर पैसा आहे. अफाट जमीनी आहेत. पण नाइलाजाने म्हणावे लागते, कुरआनने दिलेले  आदेश की ज्ञान प्राप्त करा, जे दिलेत लेखनीच्या माध्यमातून हे वास्तवात उतरविण्यासाठी कॉलेजेस, हॉस्टेल्स, शाळा, ग्रंथालय स्थापन करण्याची चळवळ उभारण्यासाठी दृष्टी नाही.  मोहल्ल्यातील शाळा बंद झाली, मात्र त्याच मोहल्ल्यात ४ मस्जिदी लोकवर्गनितून उभ्या झाल्याचे चित्र आहे. विचार करा, या मस्जिदीसोबत भौतिक-अभौतिक ज्ञान देणाऱ्या शाळा उभ्या  राहिल्यात तर, जगाचा विज्ञानाचा इतिहास लिहीणारा जॉर्ज सरटोंन आणि रॉबोर्ट ब्रिफोल्ट म्हणतात त्या प्रमाणे कुरआनच्या मार्गदर्शनाने ७ व्या शतकातील अंधकार युगात विज्ञानाची  प्रकाशमय दारे उघडली हे सत्य आजच्या युगात वास्तवतेत आणता येईल.

- हाजी प्रा.जावेद पाशा कुरेशी
9422154223

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget