रमजानमधील मक्का विजयाचा शांतीचा संदेश

- नौशाद उस्मान

रमजान मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा महिना. या महिन्यातच प्रेषितांनी मक्केवर विजय मिळवतानाच शांतीचा संदेश दिला होता. कसा ते समजून घेऊया

रमजानमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. बद्रच्या युद्धाखेरीज काही वर्षांनी आणखी एक युद्ध होता होता वाचले आणि युद्ध न होताच शांतीच्या मार्गाने रक्तहीन क्रान्ती घडली होती. हो,   रमजानमध्येच प्रेषितांनी मक्का शहरावर विजय मिळवला होता. त्याची पार्श्वभूमी आपण सुरुवातीला समजून घेऊ.

प्रेषित आदम यांच्यापासून तर प्रेषित इब्राहिम (यांचा इ.स.पूर्व १८६१ मध्ये जन्म म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या २,४३१ वर्षांपूर्वी) आणि प्रेषित इस्माईल (जन्म- इ.स.पूर्व १७८१ म्हणजे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या २, ३५१ वर्षांपूर्वी) यांच्यापर्यंत काबागृहात एकाच निर्गुण निराकार अल्लाहची उपासना होत होती. तीस चाळीस फूट उंच, लांब आणि जवळपास तेवढीच रुंद चौरस इमारत असलेल्या काबागृहात त्याकाळी काहीही मांडलेले नव्हतं, आत स्वच्छ जागा होती फक्त अल्लाहच्या उपासनेकरिता. प्रेषित इस्माईल नंतर मात्र खूप वर्षांनी हारिस इब्न अमीर नावाचा एका पुढाऱ्याने सीरियाहून काही मुर्ती आणून काबागृहात ठेवल्या. उज्जा, मनात, लात, हुबल अशी त्या मुर्तींची नावं होती.  त्यानंतर तिथे त्या मुर्तींची पूजा होऊ लागली. (संदर्भ: मुस्लिम मनाचा शोध, ले. प्रा.शेषराव मोरे) अशाप्रकारे काबागृहात पुरोहितगिरी सुरु झाली होती. तसेच तिथे ज्योतिषगिरीदेखील वाढली होती. लहान सहान कामासाठी लोकं तिथे फल ज्योतिष्य पाहायला यायचे. तिथले पुरोहित तिथल्या भोळ्या भाबड्या बहुजन जनतेचे शोषण करत होते. अशा या पुरोहितगिरीतून प्रेषित मुहम्मद सल्लम यांना काबागृहाला आणि पर्यायाने समस्त जनतेलाच मुक्त करायचं होतं. त्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्लम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रस्थापितांविरुद्ध चळवळ सुरु केली होती. पण प्रस्थापितांनी प्रचंड छळ केल्याने त्यांनी सहकाऱ्यांसह मक्केहून मदिनेकडे स्थलांतर केले होते.

मदिनेत समतावादी व्यवस्था कायम केल्यानंतर काही वर्षांनी प्रेषितांनी मक्केकरांसोबत ''दोन्ही पक्ष एकमेकांच्या लोकांवर हल्ला करणार नाहीत'' असा शांतता करार केला होता. पण मक्केकरांकडच्या लोकांकडून या कराराचा भंग झाल्यामुळे प्रेषितांनी दहा हजारांची फौज सोबत घेऊन मक्केकडे कूच केले. प्रेषित आणि त्यांचे सैन्य मक्केजवळील एका डोंगराजवळ थांबले. प्रेषितांनी रात्री प्रत्येक सैनिकाला दहा दहा चुली पेटवायला सांगितले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात दहा हजारांनी पेटवलेल्या एक लाख चुलीच फक्त डोंगरावरून बघत असलेल्या मक्केकरांना दिसत होत्या. ते पाहून मक्काप्रमुख अबू सुफियान शरण आले. तेदेखील प्रेषितांचे अनुयायी बनले. अशाप्रकारे रक्ताचा एक थेंबही न सांडता प्रेषितांनी २० रमजान हिजरी ८ (११ जानेवारी इ.स. ६३०) ला मक्केवर विजय मिळविला आणि सर्व सैनिकांसह मक्का शहरात प्रवेश केला. काबागृहात जाऊन तेथील सर्व मुर्तींचे अतिक्रमण तेथून काढून काबा स्वच्छ केले. आता प्रेषित आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची हीच वेळ होती. पण प्रेषितांनी सर्वांना सांगितलं कि, ''जा माफ केलं तुम्हाला.'' क्षमा आणि दयेचा हा कळस आहे.

त्यांनतर आफ्रिकन आदिवासी समाजातून आलेले आदरणीय बिलाल हबशी यांनी काबागृहावर उभे राहून मक्केतली पहिली अजान दिली. हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या एका पुरोहितवाद्याने पाहिले आणि तो पुटपुटला कि, ''माझा बाप आज जिवंत असता तर हे दृश्य (आफ्रिकन आदिवासी समाजातला माणूस काबागृहावर पाय देऊन उभा असल्याचे दृश्य) पाहून तो दुःखावेगाने मरून गेला असता.'' इतका भयानक असलेला वर्णवाद, पुरोहितवाद प्रेषितांनी संपविला.

मक्का विजयानंतर केलेल्या आयुष्यातील त्यांच्या अंतिम प्रवचनात प्रेषितांनी घोषणा केली कि, आज मी सगळा वर्णवाद माझ्या पायाखाली तुडवलाय. कोणत्याही अरबाला कोणत्याही अरबेतरावर आणि कोणत्याही अरबेतराला अरबावर श्रेष्ठत्व नाहीये तसेच कोणत्याही काळ्याला गोऱ्यावर आणि गोऱ्याला काळ्यावर श्रेष्ठत्व नाहीये. तुम्ही सगळे आदमची संतती आहात आणि आदम मातीपासून बनलेले होते.''
अशाप्रकारे रमजान महिन्यात झालेली ही इमान, समता, बंधुता, न्याय व बंधुभावावर आधारित रक्तहीन झालेली क्रान्ती म्हणजे मक्का विजय होय. ही घटना रमजानच्या वीस तारखेला घडली होती. म्हणून आजही अनेक जागी विसाव्या रोजच्या दिवशी ''फतेह मक्का'' (मक्का विजय)''चा कार्यक्रम घेतले जातात आणि लोकांचे या ऐतिहासिक घटनेतून अहिंसेचे महत्व विशद केले जाते. इस्लामवर रक्तपाताचा आरोप करणाऱ्यांना ही ऐतिहासिक रक्तहीन क्रान्ती म्हणजे एक सडेतोड उत्तरच म्हणावे लागेल.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget