July 2018

वर्तमानकाळात इस्लामचा सत्यनिष्ठ व सरळ मार्ग जाणून घेण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण व पवित्र ‘कुरआन’ या दोहोंखेरीज अन्य कुठलेही साधन नाही. प्रेषित मुहम्मद (स.) हे अखिल मानवजातीसाठी ईश्वराचे प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर प्रेषित धाडण्याची परंपरा व क्रम याची सांगता झाली. (१) मानवाला ज्या प्रमाणात आदेश देण्याचा व मार्गदर्शन करण्याचा ईश्वराचा मानस होता ते सर्वच्या सर्व त्याने आपल्या शेवटच्या प्रेषिताकरवी पूर्ण केले. आता ज्या कोणाला सत्याची आवड असेल व ईश्वराचा आज्ञाधारक दास (मुस्लिम) होण्याची त्याच्या मनाची इच्छा असेल त्याला ईश्वराच्या या शेवटच्या प्रेषिताशी ईमान व दृढश्रद्धा बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या शिकवणुकीचा स्वीकार करून त्यांनी दाखवून दिलेल्या पद्धतीनुसार त्यावर आचरण करणे अनिवार्य आहे.

प्रेषित्व समाप्तीचा युक्तिवाद -
प्रेषित्वासंबंधी सविस्तर हकीकत यापूर्वी सांगितली गेली आहेच. ती नीटपणे समजून घेतल्यास व तिच्यावर विचार-चिंतन केल्यास स्वतःची खात्री होईल की, प्रेषित प्रतिदिनी जन्माला येत नसतात. तसेच प्रत्येक जाती-वंशासाठी प्रत्येक काळी एक प्रेषित असणे हेही आवश्यक नाही. प्रेषिताचे जीवन खरेतर त्याने दिलेल्या शिकवणुकीच्या व मार्गदर्शनाच्या जिवंत अस्तित्वाचाच काळ आहे. जोपर्यंत त्याची शिकवण व उपदेश जिवंत आहेत तोवर जणू प्रेषित स्वतःच जिवंत आहेत. मागील प्रेषित या दृष्टीने जिवंत नाहीत कारण त्यांनी दिलेल्या शिकवणुकीत लोकांनी नंतर फेरबदल करून टाकले आहेत. त्यांनी आणलेल्या ग्रंथांपैकी एकसुद्धा त्याच्या मूळरूपात आज उपलब्ध नाही. प्रेषितांनी दिलेल्या ग्रंथाची मूळप्रत आमचेकडे आहे असा दावा खुद्द त्यांचे अनुयायीसुद्धा करू शकत नाही. त्यांना त्यांच्या प्रेषिताच्या जीवनचरित्राचासुद्धा विसर पडला आहे. या अगोदरच्या प्रेषितांपैकी एकाचेही खरेखुरे व विश्वसनीय असे जीवनचरित्र आज कोठेही उपलब्ध नाही.
त्यांचा जन्म कोणत्या काळात झाला, कोठे झाला, त्यांनी कोणकोणती कर्तृत्वे केली, त्यांनी कशा प्रकारचे जीवन व्यतीत केले, कोणती शिकवण दिली व लोकांना कोणत्या गोष्टीपासून परावृत्त केले, हेही निश्चितपणे व विश्वसनीयरीतीने सांगितले जाऊ शकत नाही. हाच त्यांचा मृत्यू आहे. या दृष्टिकोनातून ते आज जिवंत नाहीत. परंतु प्रेषित मुहम्मद (स.) जिवंत आहेत कारण त्यांची शिकवण व मार्गदर्शन जिवंत आहे. जे कुरआन त्यांच्याकरवी अवतरले ते आपल्या मूळ शब्दांनिशी आजसुद्धा उपलब्ध आहे व त्यात एक अक्षराचा व कानामात्राचाही फेरबदल झालेला नाही. त्यांच्या जीवनातील घटना, त्यांची उक्ती, त्यांच्या कृती, हे सर्वच्या सर्व सुरक्षित आहेत. चौदाशे वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला असतानाही इतिहासात त्यांचे प्रतिबिंब इतके स्वच्छ व स्पष्ट दिसते की जणू आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनीच खुद्द प्रेषित मुहम्मद (स.) यांना पाहात आहोत. जगातील कोणाही व्यक्तीचे जीवनचरित्र इतके सुरक्षित नाही जितके ते प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आहे. जीवनातील प्रत्येक बाबतीत आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रापासून प्रत्येक प्रसंगी बोध घेऊ शकतो. हे याचे प्रमाण आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या नंतर अन्य प्रेषिताची आवश्यकता उरली नाही.

एका प्रेषितानंतर पुन्हा दुसरा प्रेषित येण्यासाठी केवळ खाली दिलेली तीन कारणेच असू शकतात.

  • पूर्वीच्या प्रेषिताने दिलेली शिकवण पूर्णपणे नष्ट झालेली असणे व ती शिकवण पुन्हा मानवांत प्रस्तुत करण्याची गरज निर्माण होणे.
  • पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांनी दिलेली शिकवण ही परिपूर्ण नसणे व तिच्यात सुधारणा व वृद्धी करण्याची गरज असणे.
  • पूर्वीच्या प्रेषितांनी दिलेली शिकवण एका विशिष्ट देशापुरतीच मर्यादित असणे व शेष जगासाठी प्रेषिताची गरज असणे. (२)

वर सांगितलेली तिन्हीही कारणे आता उरलेली नाहीत. त्याबद्दल स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे.

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मानवजातीला दिलेली शिकवण जिवंत आहे. त्यांनी पुरस्कारलेला धर्म कोणता होता, त्यांनी कशाचे मार्गदर्शन व उपदेश दिले, कोणती जीवनपद्धत रूढ केली, कोणती जीवनपद्धत संपविण्याचे व तिच्यापासून जनसमूहाला परावृत्त करण्याचे प्रयत्न केले, हे सर्व जाणून घेण्यासाठी सुरक्षित व आवश्यक असणारी सर्व ऐतिहासिक साधने आज उपलब्ध आहेत. म्हणून जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेली शिकवण जर नष्ट झालेलीच नाही तर त्या शिकवणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणाही प्रेषिताच्या आगमनाची आवश्यकता उरलेली नाही.
अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या करवी संपूर्ण जगाला इस्लामची परिपूर्ण शिकवण दिली गेली असून त्यात काहीही कमी-अधिक करण्याची गरज उरलेली नाही.

तिच्यात कसलीही उणीव राहिलेली नाही की जी दूर करण्यासाठी कोणा दुसऱ्या प्रेषिताच्या आगमनाची गरज भासावी. असे दुसरे कारणही उरले नाही.

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषित्व देऊन पाठविले गेले, ते कोणत्या एका विशिष्ठ जातीवंशापुरतेच व एखाद्या देशापुरतेच मर्यादित नसून जगातील सर्व मानवजातीसाठी आहे. त्यांनी दिलेली शिकवण सर्व मानवजातीसाठी पुरेशी आहे. म्हणूनच कोणाही विशिष्ट जातीवंशासाठी आता वेगळा प्रेषित येण्याचीही गरज उरली नाही. अशा रीतीने तिसरे कारणही दूर झाले.
याच आधारावर प्रेषित मुहम्मद (स.) यांना ‘खातिमुन नबीय्यीन’ (अंतिम प्रेषित) म्हणजेच दुसऱ्या शब्दांत प्रेषित्वाच्या क्रमाची सांगता करणारा असे संबोधले गेले आहे. आज जगात अन्य कोणत्याही प्रेषिताच्या आगमनाची गरज उरलेली नसून केवळ स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या पद्धतीचे अनुकरण करणाऱ्या आणि इतरांना तसे करण्यास उद्युक्त करणाऱ्या लोकांचीच आता आवश्यकता आहे. त्यांची शिकवण नीट समजून घ्यावी आणि त्यानुसार आचरण करावे. जे नियम घेऊन प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन झाले होते ते नियम संबंध जगात रूढ होऊन त्या नियमावर अधिष्ठित शासन व सत्ता या भूमंडलावर प्रस्थापित व्हावी केवळ याचीच आता गरज आहे.(३)

१) पाहा, दिव्य कुरआन सूरह ३३ आयत ४०.

२) चौथे कारण असेही असू शकते की यात असलेल्या एका प्रेषिताला सहाय्य करण्यासाठी दुसरा प्रेषित पाठविण्यात यावा, परंतु याचा उल्लेख आम्ही केवळ याच कारणासाठी केला नाही की पवित्र कुरआनमध्ये अशी दोनच उदाहरणे दिलेली आहेत. अशा या अपवादात्मक उदाहरणांवरून सहाय्यक प्रेषित पाठविण्याचा अल्लाहचा सर्वसाधारण नियम आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.

३) काही लोकांच्या मनात शंका येते की इस्लामने मानवी जीवनासाठी जे कायदेकानू व नियम दिले आहेत ते परिस्थितीनुरूप व काळानुरुप मनुष्याची साथ कशी देतील. काळानुरूप व परिस्थितीनुरुप नियम बदलत असणे उचित आहे. अशा प्रकारच्या गोष्टी चिंतन-मनन न करताच सांगितल्या जातात. या संदर्भात काही मूलभूत गोष्टी डोळ्यांसमोर असल्यास मनात अशा प्रकारची शंका येत नाही.

  • इस्लाम ईश्वराने अवतरित धर्म आहे. ईश्वराचे ज्ञान पूर्ण आहे. ईश्वराला काळाची सुरवात व अंत माहीत आहे. त्याला माहीत आहे की मनुष्याला कोणकोणत्या परिस्थितींना तोंड द्यावे लागेल.
  • इस्लामचे सिद्धान्त व नियम खरेतर मानवी प्रकृतीनुसार आहेत. समयपरिवर्तनाने मानवी प्रकृतीत परिवर्तन होत नाही.
  • हे समजून घेणे आहे की जीवनाचे मूलभूत सिद्धान्त व मूलभूत मान्यतांमध्ये फरक पडत नाही. समयाच्या प्रगती व परिवर्तनामुळे समाज व जीवनाचे केवळ बाह्यरूपातच परिवर्तन घडते. जीवनाच्या मौलिक व स्थायिक तत्त्वांमध्ये कोणतेच परिवर्तन येत नाही. इस्लामने मानवी जीवनासाठी जे सिद्धान्त व नियम दिले आहेत ते असे आहेत जे सदैव काम येणारे आहेत. ते नियम व सिद्धान्त शाश्वत आहेत. मनुष्याने ‘इज्तेहाद’ द्वारा म्हणजे आपल्या विवेकबुद्धीने काम घेऊन त्यांना एखाद्या काळात अथवा विकसित किंवा अविकसित समाजात लागू करू शकतो. इस्लामने दिलेले मौलिक सिद्धान्त आणि त्याने निश्चित केलेल्या जीवनाच्या मान्यता मनुष्याला नेहमी सरळ व सत्य मार्गावर मार्गस्थ करतील. इस्लाम मनुष्याच्या बुद्धीविवेकाचा आदर करतो. मनुष्याच्या मानसिक विकासासाठी हे आवश्यक होते की मनुष्याला त्याच्या बुद्धीविवेकाने काम करण्याची संधी प्राप्त होत जावी. मनुष्य आपल्या बुद्धीविवेकाने काम घेऊन ईश्वराने अवतरित प्रकाशात प्रत्येक युगात व समाजात स्वतःसाठी मार्ग काढू शकतो.

मानवी इतिहासातील प्रत्येक महान व्यक्तिमत्त्व हे तात्कालीन सामाजिक वातावरणाने व परिस्थितीने प्रभावित झालेले असतात. परंतु या व्यक्तीची शान काही औरच आहे. त्याला घडविण्यात तात्कालीन परिस्थितीचा काहीच वाटा नाही. कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याने हे सिद्ध होऊ शकत नाही की अरबाची तात्कालीन स्थिती त्या वेळी ऐतिहासिक रूपात अशा व्यक्तीच्या जन्माची मागणी करीत होती. ओढून ताणून तुम्ही असे म्हणू शकता की ऐतिहासिक कारण अशा नेत्याची मागणी करीत होते ज्याद्वारा तात्कालीन अव्यवस्था व भिन्नता नष्ट करून एक राष्ट्र बनवून इतर देशांना पराजित करून अरबांना समृद्ध करील. असा राष्ट्रवादी अरबी वैशिष्ट्याने परिपूर्ण नेता अन्याय, निर्दयता, रक्तपात, धोकाधडी करून अरब देशाला संपन्न करून साम्राज्याची निर्मिती करील आणि उत्तराधिकाऱ्यांसाठी हा वारसा सोडून जाईल. याशिवाय त्याकाळची अरबी इतिहासाची दुसरी मागणी तुम्ही सिद्ध करू शकत नाही. हेगेल (Hegel)व माक्र्स (Marx)यांच्या इतिहासाच्या भौतिक व्याख्येनुसार तिथे एक राष्ट्र आणि एक साम्राज्य बनविणारा निर्माण होणे काळाची गरज होती. परंतु हेगेल व माक्र्सचे तत्त्वज्ञान या घटनेची व्याख्या करूच शकत नाही की त्या वेळी त्या स्थितीत एक असा मनुष्य जन्माला आला जो उत्तम नैतिक शिकवण देणारा, मानवतेला सावरणारा, आत्म्यांना शुद्ध करून त्यांना विकसित करणारा आणि अज्ञानाच्या अंधविश्वासांना व पक्षपातीपणाला नष्ट करणारा होता. अशा महात्म्याची दृष्टी जातीपाती, वंश, देशाच्या सीमा तोडून संपूर्ण मानवतेवर फैलावली, ज्याने आपल्या समाजासाठीच फक्त नव्हे तर मानवतेसाठी एक नैतिक आध्यात्मिक, सांस्कृतिक व राजनैतिक व्यवस्थेचा पाया घातला. ज्याने आर्थिक व्यवहार, लोक राजकीय व आंतरराष्ट्रीय संबंधांना कल्पनाविश्वात नव्हे तर प्रत्यक्षात नैतिक आधारावर स्थापित करून दाखविले आणि आध्यात्मिकता व नैतिकतेचा संतुलित समावेश केला जे आजसुद्धा ज्ञान, तत्त्वज्ञान व बुद्धीची तशीच मुख्य कृती आहे जशी त्या वेळी होती. काय अशा व्यक्तीला अरब अज्ञानाच्या वातावरणाची उपज म्हणू शकाल?

असेच फक्त नाही की ही व्यक्ती तात्कालीन परिस्थितीची निर्मिती नाही तर जेव्हा आम्ही तिच्या किर्तीवर विचार करतो तर माहीत होते की काळ व स्थानाच्या बंधनांनी मुक्त आहे. तिची नजर स्थान व काळाच्या बंधनांना तोडत हजारो वर्षांच्या (Milleniums) पडद्यांना चिरून पुढे जाते. तो मनुष्याला प्रत्येक युगात व वातावरणात पाहतो आणि त्याच्या जीवनासाठी असे नैतिक व व्यावहारिक मार्गदर्शन करतो जे प्रत्येक स्थितीत योग्य ठरते. तो त्या विभुतिंपैकी नाही ज्यांना इतिहासाने गतकालीन करून ठेवले आहे. ते त्यांच्या काळातील एक चांगले नेता होते असेच आपण इतरांसाठी म्हणू शकतो. परंतु हा विश्वनेता असा आहे जो संपूर्ण मानवतेचा मार्गदर्शक आहे, जो काळाबरोबर प्रगती करत जातो आणि प्रत्येक युगात आधुनिक सिद्ध होतो जसा मागील युगात होता.

लोक ज्यांना उदारतेने इतिहास घडविणारे (Makers of History) अशी पदवी देतात ते खरे तर इतिहासाने घडविलेले असतात. (Creatures of History) खरे तर इतिहास घडविणारे संपूर्ण मानवी इतिहासात हेच एकमेव व्यक्तित्व आहे. या जगातील जेवढ्या नेत्यांनी इतिहासात क्रांती घडविली, त्यांच्या वृत्तांतावर विवेचनात्मक दृष्टी टाकल्यास कळून येते की पूर्वीपासून तिथे क्रांतीची कारणे उत्पन्न होत होती आणि ती कारणे स्वतः त्या क्रांतीची दिशा व मार्ग निश्चित करीत होती, ज्याच्या येण्याची ते मागणी करीत होते. क्रांतिकारी नेत्याने फक्त इतकेच केले की स्थितीच्या मागणीच्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी त्या अभिनेत्याची भूमिका पार पाडली ज्यासाठी स्टेज व कर्म पूर्वीपासून निश्चित होते. 

परंतु इतिहास घडविणारे व क्रांती करणाऱ्यांपैकी हेच एक असे व्यक्तिमत्त्व आहे की जिथे क्रांतीची कारणे नव्हती. तिथे त्याने स्वतः क्रांतीची कारणे निर्माण केली. जिथे त्या क्रांतीचे ‘बी’ (स्पिरीट) व व्यावहारिक योग्यता लोकांमध्ये नव्हती तिथे त्याने स्वतः उद्देशानुसार मनुष्य घडविले. स्वतःच्या व्यक्तित्वाला विरघळवून हजारो लोकांच्या मनात उतरविले आणि त्यांना तसेच बनविले जसे तो बनवू इच्छित होता. त्याच्या संकल्प सामर्थ्याने व बळाने स्वतःच क्रांतीची सामुग्री निर्माण केली, तिला आकार दिला आणि समयगतीला त्या मार्गावर चालविले ज्या मार्गावर तो चालवू इच्छित होता. वैभवशाली इतिहास घडविणारा आणि असा महान क्रांतिकारी मानवी इतिहासात तुम्हाला कुठे सापडतो?

सज्जड पुरावा
आता आपण या प्रश्नावर विचार करू या की, चौदाशे वर्षांपूर्वीच्या अंधकारमय जगात अरबसारख्या घोर अंधकारमय देशाच्या एका कोपऱ्यात एक मेंढपाळ, निरक्षर मरुस्थळवासी व्यक्तीच्या अंतरंगात इतके ज्ञान, इतके प्रकाश, बळ, इतके चमत्कार, इतकी प्रबळ व परिपूर्ण शक्ती-सामर्थ्य उत्पन्न होण्याचे कोणते साधन होते? लोक म्हणतात की ते सर्व त्याच्या मन व मस्तिष्काची उपज होती. माझे असे म्हणणे आहे की जर हे त्याच्या मन व मस्तिष्काची निर्मिती होती तर त्याला ईश्वर होण्याचा दावा करावयास हवा होता. त्याने जर असा दावा केला असता तर ते जग ज्याने रामाला ईश्वर बनवून टाकले, ज्या जगाने कृष्णाला भगवान म्हणण्यात संकोच केला नाही, ज्याने बुद्धाला पूज्य बनविले आणि ज्या जगाने ईसा मसीह (अ.) यांना स्वेच्छेने खुदाचा पुत्र बनविले, तसेच ज्या जगाने हवा, पाणी, अग्निचीसुद्धा पूजा केली, त्या जगाने अशा महान कीर्तिमान व्यक्तीला ईश्वर मान्यच केले असते. परंतु पाहा तो स्वतः काय सांगत आहे. तो त्याच्या किर्ती व चमत्कारांपैकी एकाचेसुद्धा क्रेडीट स्वतः घेत नाही. तो म्हणतो, ‘‘मी एक मनुष्य आहे, तुमच्याचसारखा मनुष्य, माझ्याजवळ माझ्या स्वतःचे काहीच नाही, सर्वकाही ईश्वराचे आहे आणि ईश्वराकडूनच आहे. ही वाणी ज्याच्यासारखी दुसरी वाणी निर्माण करण्यात मानव असमर्थ आहे, ही माझी वाणी नाही? माझ्या बुद्धीची उपज नाही. या वाणीचा शब्द न शब्द ईश्वराकडून माझ्याकडे आला आहे. यासाठीची सर्व प्रशंसा ईश्वरासाठीच आहे. हे कार्य जे मी स्वतः केले, जे कायदेकानू मी बनविले, हे सिद्धान्त जे मी तुम्हाला शिकविले यापैकी काहीएक मी स्वतः घडवलेले नाही. मी स्वतःच्या योग्यतेने काहीसुद्धा निर्मित करण्याचे सामर्थ्य ठेवत नाही. मी प्रत्येक गोष्टीत ईश्वराच्या मार्गदर्शनाचा (Divine Guidance) मोहताज (आश्रित) आहे. ईश्वराकडून जे अवतरित होते तेच सांगतो व करतो.’’

पाहा, हे कशा प्रकारचे आश्चर्यजनक सत्य आहे! कशा प्रकारची सत्यता व सत्यवादिता आहे! खोटारडा व्यक्ती मोठा बनण्यासाठी दुसऱ्यांच्या कीर्तिचे क्रेडीटसुद्धा घेण्यात संकोच करीत नाही आणि त्याविषयी सहज माहीत होते की हे त्याने कोठून घेतले आहे. परंतु हा व्यक्ती त्या कीर्तिचा संबंधसुद्धा स्वतःशी जोडत नाही ज्याला तो स्वतःची कीर्ति (महानता) घोषित केली असती तर कोणी त्यास खोटा म्हटले नसते कारण कोणाजवळ त्याच्या वास्तविक उगमस्त्रोतापर्यंत पोहचण्याचे साधनमात्र नव्हते. सत्यतेचा यापेक्षा अधिक स्पष्ट पुरावा आणखीन कोणता असू शकतो? त्या व्यक्तीपेक्षा अधिक सच्चा आणखीन कोण असू शकतो ज्याला एका अत्यंत गुप्त साधनाद्वारा (दिव्यप्रकटन) असे अनुपम चमत्कार प्राप्त होतात आणि तो निःसंकोचपणे सांगतो की हे चमत्कार त्याला कोठून प्राप्त झाले? आता सांगा, का म्हणून आम्ही त्या व्यक्तीला सच्चा म्हणू नये?

पाहा, हे आहे आम्हा सर्वांचे नायक, संपूर्ण जगाचे पैगंबर (प्रेषित) मुहम्मद (स.)! त्यांच्या प्रेषित्वाचे उघड प्रमाण त्यांची सत्यता आहे. त्यांचे महान कार्य, त्यांचा स्वभाव, त्यांचा पवित्र जीवनवृत्तांत, सर्वकाही इतिहाससिद्ध आहे. जो व्यक्ती शुद्धहृदयी, सत्यप्रियता आणि न्यायसंगत त्यांच्या जीवनाचे अध्ययन करील, त्याचा आत्मा साक्ष देईल की हेच ईश्वराचे पैगंबर-प्रेषित आहेत. ती वाणी जी त्यांनी सादर केली तो हाच कुरआन आहे ज्याचे तुम्ही अध्ययन करता. या अनुपम ग्रंथाचे जो कोणी खुल्या मनाने अध्ययन करील, त्याला मान्यच करावे लागेल की, हा ग्रंथ अवश्य ईशग्रंथच आहे. कोणीही अशा प्रकारच्या ग्रंथाची निर्मिती करू शकणार नाही.


वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत तो एक सर्वसाधारण अरब होता त्याकाळात या व्यक्तीला जगाने आश्चर्यकारक भाषणकर्ता म्हणून पाहिले नाही. कोणीही त्यास ज्ञानी, बुद्धीमत्तापूर्ण व तत्त्वदर्शितेच्या गोष्टी करताना ऐकले नव्हते. अध्यात्म, राजनीती, नैतिकता, अर्थकारण, समाजकारण व कायदेकानूविषयी बोलताना त्यास कोणीही ऐकले नव्हते. ईश्वर, देवदूत (फरिश्ते) ईशग्रंथ, प्राचीन जाती व प्रेषित, पारलौकिक जीवन, जन्नत व जहन्नमविषयी एक शब्दसुद्धा उच्चारताना ऐकले नव्हते.

उत्तम चरित्र, पवित्र आचरण व सदाचार त्यास अवश्य प्राप्त होता परंतु वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत त्या व्यक्तीमध्ये असाधारण असे काहीही नव्हते ज्यामुळे लोकांना वाटावे की पुढे हा एक असामान्य व्यक्ती बनणार आहे. वयाच्या चाळीस वर्षापर्यंत लोक त्यास एक मौनप्रिय, शांतिप्रिय व अतिसज्जन व्यक्तीच्या रूपाने ओळखत होते. परंतु चाळीस वर्षानंतर जेव्हा तो गुफेतून एक नवीन संदेश प्राप्त करून बाहेर पडला तेव्हा त्याचा कायापालट झाला होता.
आता तो एक आश्चर्यकारक वाणी ऐकवित होता ज्याला ऐकून संपूर्ण अरब देश आश्चर्यचकित झाला. त्या वाणीच्या प्रभाव इतका होता की त्याचे कट्टर शत्रूसुद्धा त्या वाणीला ऐकण्यास भीत होते. कारण ती वाणी एखाद्यावेळेस मनात घर करून बसू नये. वाणीची उत्तमता समरसता व वर्णनशैली अशा प्रकारे प्रभावशाली व शक्तिशाली असल्याने संपूर्ण अरब देशाला ज्यात मोठमोठे कवि, वाक्पटू होते, त्या सर्वांना त्या वाणीने आव्हान दिले. सर्वांनी मिळून एक सूरह यासारखा रचून दाखवावा परंतु कोणीही अशा प्रकारचे धाडस केले नाही. ही एक अनुपम अशी वाणी अरब लोकांनी कधीही ऐकली नव्हती.

व्यापक संदेश
आता तो अचानक अपूर्व तत्त्वदर्शी, नैतिकता, सभ्यता व संस्कृतीचा एक अद्वितीय सुधारक, एक आश्चर्यजनक राजनीतिज्ञ, एक महान कायदेतज्ञ, एक उच्चश्रेणी जज तसेच एक अद्वितीय सेनापती बनून जगासमोर प्रकटला. त्या अशिक्षित, मरुस्थलवासी व्यक्तीने तत्त्वदर्शिता (ेंग्े्दस्) व बुद्धीमत्तेविषयी असे सांगण्यास प्रारंभ केला की तत्पूर्वी कोणीही सांगितल्या नव्हत्या आणि तद्नंतर कोणी सांगितल्या नाहीत. त्या निरक्षर व्यक्तीने अध्यात्म व ब्रह्मज्ञानाच्या महान प्रसंगावर निश्चयात्मक भाषण देणे सुरु केले. जनसमूहाच्या इतिहासापासून ते देशाच्या उन्नती व अवनतीच्या मूळ सिद्धान्तांवर व्याख्यान देऊ लागला. प्राचीन सुधारकांच्या कार्याचे समालोचन करून जगातील धर्मातील सत्य व असत्य तत्त्वांवर स्वतःचे विचार प्रकट करू लागला. तसेच विभिन्न जनसमूहांच्या परस्परातील भेदनीतीवर निर्णय देऊ लागला. तो नैतिकता व सभ्यतेची शिकवण देऊ लागला.

तो सामाजिक, आर्थिक तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीचे नियम व कायदे बनवू लागला आणि अशी कायदेप्रणाली निर्माण केली की मोठमोठे विद्वान व बुद्धीवंत विचार-चिंतन करून व जीवनभराचे अनुभवांती त्यात अंतर्भूत असणाऱ्या बुद्धी विवेकाचा उलगडा त्यांना होतो. जगाच्या अनुभवात जसजशी वृद्धी होत आहे, तसतशी त्या नियमात सामावलेले विवेक अधिकाधिक दृगोच्चर होत असतात. हा मौनधारी शांतिप्रिय ज्याने जीवनात कधी तलवार बाजी केली नाही, कधीही सैनिक प्रशिक्षण घेतले नव्हते. तो जीवनात एकदाच दर्शक म्हणून लढाईत सामील झाला होता, पाहता पाहता तो एक धीरोदात्तवीर योद्धा बनला. असा महान सेनापती बनला ज्याने नऊ वर्षात संपूर्ण अरब देशावर विजय प्राप्त केला. तो असा अद्भूत सैनिक लीडर बनला की त्याने निर्माण केलेल्या सैनिक प्रबंध व युद्धनीतीच्या प्रभावाखाली सामुग्रीविहीन अरबांनी अल्पावधित तत्कालिन जगातील महानशक्ती (एल्जी झ्दैी) रोम व ईराण यांना परास्त केले.

हा एकान्तप्रिय व शांतीप्रिय व्यक्ती ज्यात कोणीही चाळीस वर्षापर्यंत राजनैतिक रूचिचा गंधसुद्धा अनुभवला नव्हता, तो अचानक महान समाजसुधारक (ींदिीसी) आणि महान नीतिज्ञ बनून प्रकट झाला आणि तेवीस वर्षाच्या अल्पावधित बारा लाख क्षेत्रफळाच्या वाळवंटी प्रदेशातील असंघटित भांडखोर, अज्ञानी, उदंड, असभ्य टोळ्यांना रेल, रेडिओ व प्रेसच्या साहय्यतेविना एक धर्म, एक सभ्यता, एक विधान व एक शासन प्रणालीच्या अधीन बनविले. त्याने त्यांच्या भावना व स्वभाव बदलून टाकले, त्यांचे आचरण बदलून टाकले. त्यांच्या अशिष्टतेला उच्चश्रेणीच्या शिष्टाचारात परिवर्तीत केले. त्यांच्या बर्बरतेला उत्तम नागरिकतेत, त्यांच्या कुचरित्र व अनैतिकतेला सुचरित्र, ईशभक्ती, संयम व श्रेष्टनैतिकतेत आणि त्यांच्या उदंडतेला व निरंकुशतेला अत्यंत नियमबद्धतेत आणि आज्ञापालनात परिवर्तीत केले. त्या वांझोट्या लोकसमूहात शतकानुशतके कोणी सत्चरित्र माणसाने जन्म घेतला नव्हता, त्याने त्या लोकसमूहास असे सत्पुरुषोत्पादक बनविले ज्यात हजारो महान मानव जन्माला आले आणि ज्यांनी जगाला धर्म, नैतिकता व सभ्यतेचे धडे शिकविण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यात संचार केला.

हे कार्य त्याने अत्याचार, धोकाधडी, बळपूर्वक व छळकपटाने केले नाही तर मनमोहक स्वभाव आत्म्यांवर राज्य करणारी सज्जनता आणि मस्तिष्कावर अधिकार गाजविणाऱ्या शिकवणीद्वारा केले. त्यांनी स्वतःच्या स्वभावाने त्यांच्या शत्रूंना मित्र बनविले, दया व अनुकंपेने मनं मऊ बनविली. न्याय व न्यायनिष्ठ शासन केले. सत्यतेपासून तसूभरसुद्धा दूर गेले नाही. युद्धासमयीसुद्धा कुणाशीही विश्वासघात केला नाही की, प्रतिज्ञाभंग केला नाही. कट्टर शत्रुंशीसुद्धा त्यानी कधीही अत्याचारपूर्ण व्यवहार केला नाही.

जे त्यांच्या रक्ताचे तहानलेले होते, त्याच शत्रुंनी त्यांच्यावर दगडमार केली, देशत्याग करण्यास विवश केले. पूर्ण अरब देशाला त्यांच्याविरुद्ध उभे केले आणि शत्रुत्वांत आंधळे बनून त्यांच्या चुलत्याचे काळीज काढून चावले होते. अशा शत्रुंना विजयप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी क्षमादान केले. त्यांनी कधीही स्वतःसाठी दुसऱ्याशी बदला घेतला नाही.

याशिवाय त्यांच्या आत्मसंयमी व निस्वार्थीपणाचा कळस तेव्हा झाला जेव्हा ते अरब देशाचे शासक बनले. त्या वेळी ते तसेच फकीर बनून राहिले जसे पूर्वी होते. झोपडीत राहत, चटईवर झोपत, जाडेभरडे कपडे नेसत आणि गरिबांप्रमाणे जेवण घेत असत. कधी कधी उपाशी झोपत आणि गरिबांची सतत सेवा करीत असे. ते रात्रभर ईश्वराच्या उपासनेत घालवित, मजुराप्रमाणे काम करीत असत. शेवटपर्यंत त्यांच्यात राजकीय दंभ व श्रीमंतीचा रूबाब व अहंकार निर्माण झाला नाही. ते सर्वसामान्यप्रमाणे लोकांना भेटत व त्यांच्यात मिसळत असत, त्यांच्या सुखदुःखात सामील होत असत. लोकांसमवेत बैठकीत बसण्याची ढब अशी होती की जर कोणी तिऱ्हाईत मनुष्य तिथे आला तर अरब जातीचा नायक व देशाचा शासक नेमका कोणता हे ओळखणे त्याला कठीण जात असे. इतके महान व्यक्तिमत्त्व असूनही एखाद्या क्षुल्लक माणसाशीसुद्धा अगदी बरोबरीचा व्यवहार करीत असे. जीवनभर खडतर परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात कसलीही कुचराई ती व्यक्ती करीत नाही. इतके करूनही स्वतःसाठी काही शिल्लक ठेवीत नाही. आपली सर्व मालमत्ता समाजाला दान करतो. अनुयायींवर स्वतःच्या संततीचे कसलेही हक्क ठेवले नाहीत. स्वतःच्या संततीला जकात स्वीकारण्याच्या हक्कापासून केवळ यासाठीच वंचित ठेवले की, न जाणो भविष्यात जकातची सर्व रक्कम त्याच्या संततीलाच दिली जाऊ लागेल.

मानवतेवर व्यापक प्रभाव
अशा या महान व्यक्तीने घडविलेले चमत्कार अद्याप संपलेले नाहीत. तिच्या महानतेचा नीटपणे अंदाज येण्यासाठी संपूर्ण विश्वावर एक नजर टाकू या. तुम्हाला असे दिसून येईल की, चौदाशे वर्षापूर्वीच्या काळोखमय युगात अरबस्तानातील रूक्ष वाळवंटी प्रदेशात जन्मलेला तो निरक्षर वाळवंटनिवासी; वास्तविकपणे नवयुगप्रवर्तक व संपूर्ण जगाचाच नेता आहे. त्याचे नेतृत्व त्याला नेता मानणाऱ्यांपुरतेच मर्यादित नसून न मानणाऱ्यांनाही ते लागू आहे. ज्यांना हे ज्ञान नाही की, ज्याच्याविरुद्ध ते बोलतात त्याचे मार्गदर्शन कशा प्रकारे त्यांच्या विचारसरणीत व भावना विश्वात आणि त्यांच्या जीवन सिद्धांतात, आचारसंहितेत आणि त्यांच्या आधुनिक युगाच्या आत्म्यामध्ये विलीन झालेले आहेत.

याच व्यक्तीने जगातील संकल्पना, धारणा व विचार प्रवाहाला भ्रम, अंधविश्वास, विलक्षणप्रियता व वैराग्यापासून मुक्ती देऊन बुद्धीवाद, यथार्थप्रियता व पवित्र भौतिक जीवनाकडे वळविले आहे. डोळ्यांनी दिसणाऱ्या चमत्कारांची मागणी करणाऱ्या या जगाला त्यानेच बौद्धिक चमत्कारास समजणे व त्यास सत्याची कसोटी मान्य करण्याची अभिरूची निर्माण केली. त्यानेच अनैसर्गिक गोष्टीत ईश्वराच्या ईशत्वाची चिन्हे शोधणाऱ्यांचे डोळे उघडले आणि त्यांना निसर्गात ईशचिन्ह(Natural Phenomena) पाहण्यास शिकविले. अनुमान व कल्पनाविलासी वृत्तीला त्यागून बुद्धी, विचार, निरीक्षण व संशोधनाचा मार्ग दाखविला. त्यानेच बुद्धी, अनुभव व अंतर्ज्ञानाच्या विशिष्ट सीमा मनुष्याला दाखवून दिल्या. भौतिकवाद व अध्यात्मवादामध्ये ताळमेळ बसविला आणि धर्माशी ज्ञान व कर्माचा आणि ज्ञान व कर्माशी धर्माचा संबंध स्थापित केला. धर्मशक्तीपासून जगात ‘साइंटिफिक स्पीरिट’(Scientific Spirit)आणि ‘साइंटिफिक स्पीरिट’ पासून शुध्द धर्मवाद निर्माण केला. त्यानेच अनेकेश्वरत्व (शिर्क) व मूर्तिपूजेचा पाया उखडून टाकला आणि ज्ञानशक्तीने एकेश्वरत्वाचा (तौहीद) विश्वास असा मजबूतपणे स्थापित केला, ज्यामुळे अनेकेश्वरवादी (मुशरीक) व मूर्तिपूजकांचा धर्मसुद्धा एकेश्वरत्वाचा रंग ग्रहण करण्यास विवश बनला. त्यानेच नैतिकता व आध्यात्मिकतेच्या मौलिक धारणा बदलून टाकल्या. जे लोक वैराग्य (संन्यास) व इच्छादमन कार्यास विशुद्ध नैतिकता समजून होते; ज्यांच्या दृष्टिकोनातून मन व शरीराचा हक्क देण्यात व सांसारिक जीवनात भाग घेतल्याने आध्यात्मिक उन्नती तसेच मुक्ती प्राप्त होणे अशक्य प्राय आहे; अशांना त्यानेच नागरिकता, समाज व भौतिकतेच्या मध्ये नैतिकतेची श्रेष्ठता, आध्यात्मिक विकास, मुक्ती प्राप्तीचा मार्ग दाखविला. मग तोच आहे ज्याने मनुष्याला त्याच्या वास्तविक मूल्याचे ज्ञान करून दिले. जे लोक भगवान, अवतार व ईश्वर पुत्राशिवाय कोणालाही मार्गदर्शक आणि नेता मान्य करण्यास तयार नव्हते, त्या लोकांना त्यानेच दाखवून दिले की मनुष्य आणि तुमच्याचसारखा मनुष्य स्वर्ग राज्याचा प्रतिनिधी आणि ईश्वराचा प्रतिनिधी (खलीफा) होऊ शकतो. जे लोक प्रत्येक सामर्थ्यवानास ईश्वर बनवून टाकीत होते, त्यांना त्यानेच समजाविले की मनुष्य हा मनुष्यच आहे, इतर काहीही नाही. कोणीच पवित्र शासक व पालक बनून जन्माला आला नाही आणि कुणीही अपवित्रता, पराधीनता व दासतेने जन्मतःच डागाळलेला नाही. या शिकवणीमुळे जगात मानवी एकता, समानता, स्वाधिनता तसेच जनतंत्राच्या विचारप्रणालीचा मार्ग प्रशस्त झाला.

कल्पनाविश्वातून बाहेर पडून तुम्हाला या निरक्षर व्यक्तीच्या नेतृत्वाची व्यावहारिक फलनिष्पत्ती जगाच्या जीवनव्यवहारात, विधी-नियमात अतिप्रमाणात दिसून येते.

नैतिकता, सभ्यता, शिष्टाचार, स्वच्छता, पावित्र्याचे अनेक असे नियम आहेत जे त्याच्या शिकवणीत उगम पावून जगभर फैलावले आहेत. सामाजिक नियम जे त्याने बनविले, त्यांचा लाभ जगाने पुरेपूर घेतला आहे आणि आजसुद्धा घेत आहे. अर्थनीतीविषयीच्या ज्या सिद्धान्ताची शिकवण त्याने दिली, त्यापासून जगात अनेक आंदोलनांनी जन्म घेतला आणि आजसुद्धा होत आहेत. शासनाविषयी ज्या पद्धतींचा त्याने स्वीकार केला त्यापासून जगात राजकीय दृष्टिकोनात क्रांती घडून आली आणि होत आहे. न्याय-विधीचे जे सिद्धान्त त्याने बनविले होते, त्याद्वारा जगातील न्याय-विधी क्षेत्र अतिप्रभावित झाले आहे. युद्ध, करार व आंतरराष्ट्रीय सबंधाविषयीची सभ्यता ज्या व्यक्तीने व्यवहारात जगात स्थापित केली, तो तर अरबचा एक निरक्षर व्यक्ती आहे. जगाला पूर्वी हे तर माहीतच नव्हते की युद्धाची एक सभ्यता असते आणि देशादेशांमध्ये मानवी आधारावर (Common Humanity) संबंध दृढ होणे शक्य आहे.

मानवी इतिहासाच्या पार्श्वभूमीत या आश्चर्यकारक व्यक्तीचे उच्च व महान व्यक्तिमत्त्व उच्चतर दिसून येते की सुरवातीपासून आजपर्यंत जितके महान नेते होऊन गेलेत, त्या सर्वांचे व्यक्तिमत्त्व या व्यक्तित्वासमोर खुजे पडते. जगातील कोणताच नेता असा नाही ज्याच्या पूर्णत्वाचा प्रकाश मानवी जीवनाच्या सर्वांगावर पडलेला आहे. कोणी धारणा व सिद्धान्ताविषयीचा सम्राट आहे तर त्याला व्यावहारिक सामर्थ्य प्राप्त नाही. कोणी कर्मांचा पुतळा आहे, मात्र विचारसरणीत तो कोरा आहे. कोणाचे चमत्कार राजनीतीपर्यंत मर्यादित आहेत तर कोणी फक्त सामरिक प्रतीक आहे. एखाद्याची नजर सामाजिक जीवनाच्या एका क्षेत्रावर प्रभाव ठेवून असते तर दुसरी क्षेत्रे मात्र दुर्लक्षित असतात. कोणी नैतिकता व आध्यात्मिकतेलाच घेऊन बसले आणि राजनैतिक व आर्थिक क्षेत्राला विसरून बसले. कोणी याउलट राजनैतिक आर्थिक विषयाला घेतले आणि आध्यात्मिक व नैतिक क्षेत्राची उपेक्षा केली. सारांश इतिहासात प्रत्येक ठिकाणी अपूर्ण हिरो (नेता) दिसून येतो परंतु मानवी इतिहासात हे एकमेव व्यक्तिमत्त्व असे आहे जे सर्वगुणसंपन्न आहे. तो स्वतः एक तत्त्वज्ञानी आहे आणि स्वतःच्या तत्वज्ञानाला व्यावहारिक जीवनात प्रत्यक्षात आणणारासुद्धा आहे. तो सेनानायक, राजनीतिज्ञ, कायदे बनविणारा, नैतिकतेची शिकवण देणारा आणि धार्मिक व आध्यात्मिक नेतासुद्धा आहे. त्याची दृष्टी मानवी जीवनाच्या सर्वांगावर पडते आणि सूक्ष्म गोष्टीपर्यंत जाते. खाण्यापिण्याचे नियम आणि शारीरिक स्वच्छेतेपासून ते आंतरराष्ट्रीय विषयापर्यंत त्याचे आदेश लागू होतात. तो स्थायी सभ्यतेचा निर्माता आहे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये असे वास्तविक संतुलन निर्माण करतो ज्यामुळे कुठेच अधिकता, अपूर्णता, न्युनता दिसून येत नाही. काय जगात कोणी दुसरा मनुष्य अशा व्यापक गुणवैशिष्ट्यांचा तुमच्या नजरेत आहे?

तुम्ही स्वतः जेव्हा अमुक एक मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे स्पष्टपणे ओळखता तेव्हा त्याच्या सांगण्याचा स्वीकार करणे, त्याच्या आज्ञांचे पालन करणे व त्याच्या पद्धतीचे अनुकरण करणे आवश्यक ठरते. एखाद्या माणसाला प्रेषित तर मानायचे व त्याचे सांगणे मात्र ऐकावयाचे नाही. हे बुद्धीला पटत नाही कारण त्याला प्रेषित मानण्याचा अर्थ असा की, तो जे काही सांगत आहे ते सर्व तो ईश्वराच्या वतीने सांगत आहे व जी काही कृती करीत आहे ती ईश्वरेच्छेनुसारच करीत आहे. आता त्याच्याविरुद्ध तुमची उक्ती व कृती ही ईश्वराविरुद्ध ठरेल व जी गोष्ट ईश्वराविरुद्ध असेल ती कदापि सत्यावर व न्यायावर अधिनिष्ठित असू शकत नाही. म्हणून एखाद्याला प्रेषित मानल्यानंतर ही गोष्ट अनिवार्य ठरते की, त्याचे सांगणे कसलीही शंकाकुशंका न बाळगता स्वीकारण्यात यावे व त्याच्या आदेशा पुढे नतमस्तक व्हावे. मग उद्देश व त्यामागील होणारा लाभ, तुम्हाला कळो वा न कळो. जे प्रेषिताकडून सांगितले गेले ते प्रेषितांकडून असणे हीच बाब सत्य असण्याचा पुरावा आहे. त्यात सर्व तत्त्वदर्शिता व हितकारक उपदेश सामावलेले असते. एखाद्या गोष्टीचे तुम्हाला आकलन होत नसेल तर दोष त्या गोष्टीचा नसून तुमच्या आकलनशक्तीचा आहे.

जो मनुष्य एखाद्या कलेत अथवा विद्येत पारंगत नाही, तो त्या कलेतील बारकावे जाणू शकत नाही, ही गोष्ट उघड आहे. जर असा मनुष्य त्या कलेत पारंगत असलेल्या व्यक्तीचे म्हणणे केवळ एवढ्यासाठीच मान्य करीत नसेल की, त्याला आकलन होत नाही तर असा मनुष्य किती मूर्ख असेल? जगातील प्रत्येक कार्यक्षेत्रात विशेषज्ञांची गरज असते आणि विसेषज्ञांकडे रुजू झाल्यावर त्याच्यावर श्रद्धा ठेवली जाते व त्याच्या कार्यात कसलीही ढवळाढवळ केली जात नाही. कारण सर्व माणसे सर्व प्रकारच्या कार्यात तज्ञ असू शकत नाहीत व सर्वकाही ते जाणू शकत नाहीत. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा व चातुर्याचा वापर एक सर्वोत्तमसाठीच करावयास हवा. एक सर्वोत्तम तज्ञ शोधून काढा. एखाद्या व्यक्तीसंबंधी तुम्हास खात्री झाली की तो विशेषज्ञ आहे, तर त्यावर तुम्हास संपूर्ण विश्वास टाकावा लागेल. मग त्याच्या कर्मात हस्तक्षेप करणे व प्रत्येक बाबीसंबंधी असे म्हणणे की आधी आम्हाला ते समजून सांगा नाहीतर आम्ही मान्य करणार नाही, असे वागणे हा शहाणपणा नसून शुद्ध मूर्खपणा आहे. एखाद्या वकिलास आपला खटला सुपूर्द केल्यावर त्याच्याशी एखाद्या मुद्यावर हुज्जत घातल्यास तुम्हाला त्याच्या कार्यालयातून तो बाहेर घालवून देईल. तसेच एखाद्या डॉक्टरला त्याने दिलेल्या औषधातील प्रत्येक घटकाबद्दल खुलासा विचारला तर तो तुमचा औषधोपचार बंद करील. असाच प्रकार धर्माबाबतही आहे. तुम्हाला ईश-ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत कोणती आहे,

हे तुम्ही जाणू इच्छिता. स्वतः तुमच्याकडे या सर्व गोष्टी जाणून घेण्याचे साधन नाही. तेव्हा आता तुमचे हे कर्तव्य ठरते की, तुम्ही ईश्वराच्या खऱ्या प्रेषिताचा शोध घ्यावा. या शोधकार्यात तुम्हाला अत्यंत चातुर्याने व समंजसपणे वागावे लागेल, कारण जर तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसाची निवड केलीत तर तो तुम्हाला चुकीच्या वाटेने नेईल. परंतु सर्व प्रकारचा शोध केल्यावर तुमची अशी खात्री झाली की, अमुक मनुष्य ईश्वराचा खराखुरा प्रेषित आहे तर त्याच्यावर तुम्हास संपूर्ण विश्वास टाकावयास हवा व त्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करावयास हवे.

प्रेषितांवर ईमान धारण करण्याची आवश्यकता
ईश्वरातर्फे प्रेषित जो मार्ग दाखवितो. तोच इस्लामचा सत्य व सरळ मार्ग आहे, हे तुम्हाला कळले आहे. आता तुम्ही स्वतःच हे समजू शकला की, प्रेषितांवर ईमान धारण करणे व त्यांच्या आज्ञेचे पालन व अनुकरण करणे सर्व मानवजातीला अनिवार्य आहे. जो मनुष्य प्रेषिताचा मार्ग सोडून स्वतःच्या बुद्धीनुसार मार्ग अनुसरतो, तो निश्चितपणे मार्गभ्रष्टच आहे.

याबाबतीत लोक अनेक प्रकारच्या विचित्र चुका करतात. काही लोक असे आहेत की, ते प्रेषितांची सत्यनिष्ठा मानतात, परंतु त्यावर ते ईमान धारण करीत नाहीत. तसेच त्यांचे आज्ञापालन करीत नाहीत. हे नुसते ‘श्रद्धाहीन’ (काफिर) नसून मूर्खही आहेत. कारण की प्रेषिताला खरा मानल्यानंतर त्यांची अवज्ञा करणे याचाच अर्थ असा होतो की असा मनुष्य जाणूनबुजून असत्याचा मार्ग अनुसरतो. यापेक्षा मोठी घोडचूक असू शकत नाही, हे उघड आहे.

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, आम्हास प्रेषितांचे अनुकरण करण्याची आवश्यकताच नाही. आम्ही आपल्या स्वयंबुद्धीने सत्याचा मार्ग जाणून घेऊ. हीसुद्धा एक मोठी चूक आहे. तुम्ही भूमितीचा अभ्यास केलेला आहे. तुम्हास हे माहीत आहे की एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकच सरळ रेषा असू शकते. तिच्याव्यतिरिक्त जितक्या रेषा असतील त्या एकतर वाकड्या असतील किंवा त्या दोन्हीबिंदूशी मिळणाऱ्या नसतील. अशीच वास्तवता सत्यमार्गाचीही आहे, ज्याला इस्लामच्या भाषेत ‘‘सिराते-मुस्तकीम’’ म्हणजे सरळ मार्ग असे म्हटले जाते. हाच मार्ग मनुष्यापासून प्रारंभ पावून ईश्वराप्रत जातो व भूमितीच्या या सिद्धांताप्रमाणेच तोसुद्धा एकच मार्ग असू शकतो. त्याच्याखेरीज जितके मार्ग असतील ते एकतर वेडेवाकडे असतील किंवा ते ईश्वरापर्यंत न पोहचणारे असतील. आता विचार करा की जो सरळ मार्ग आहे तो तर प्रेषिताने दाखवून दिला आहे व त्याशिवाय अन्य कोणताही सरळ मार्ग होऊच शकत नाही. हा मार्ग सोडून जो मनुष्य स्वतःच दुसरा मार्ग शोधील त्याला खालील दोन अवस्थांपैकी एक अवस्था अनिवार्यपणे प्राप्त होईल. एकतर त्याला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्गच सापडणार नाही. दुसरा जर सापडलाच तर तो अतिशय लांब व वक्र असा असेल. ती सरळरेषा असणार नाही तर ती अतिवक्र रेषा असेल. पहिल्या अवस्थेत तर त्याचा सर्वनाश उघड आहे. उरली दुसरी अवस्था तर तीसुद्धा निस्संशयपणे मूर्खपणाचीच असेल. निर्बुद्ध जनावरसुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वक्र मार्ग सोडून सरळ मार्गानेच जातो. मग अशा माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याला ईश्वराचा एक सदाचरणी दास सरळमार्ग दाखवित असताना तो म्हणतो की ‘‘मी तुम्ही दाखविलेल्या मार्गाने जाणार नाही व स्वतःच वेड्यावाकड्या मार्गाने भरकटत जाऊन मी माझे इच्छित स्थानापर्यंत पोहोचेन.’’

तुम्ही खोलवर विचार केल्यास कळून चुकेल की जो कोणी प्रेषितावर ईमान धारण करण्याचे नाकारतो त्याला ईश्वराप्रत पोहचण्यास कोणताही मार्ग सापडू शकत नाही, सरळ मार्गही नाही व वाकडाही नाही. कारण असे की, जो मनुष्य सत्यनिष्ठ व सदाचारी मनुष्याचे म्हणणे स्वीकारण्याचे व मान्य करण्याचे नाकारतो त्याच्या मस्तकात काही दोष नक्कीच असतो ज्या कारणाने तो सत्यापासून तोंड फिरवतो. त्याची बुद्धी व समंजसपणा दोषयुक्त असेल किंवा त्याच्या मनात अहंकार भरलेला असेल वा त्याचा स्वभावधर्म इतका वक्र असेल की तो सत्य व सदाचाराच्या गोष्टी स्वीकारण्यास तयारच होणार नाही. तो पूर्वजांच्या रूढीचे अंधानुकरण करणारा असेल व ज्या काही असत्य गोष्टी रूढींच्या स्वरूपात पूर्वापार चालत येत असतात त्याविरुद्ध कसलेही ऐकून घ्यायला तयार नसेल. तो आपल्या इच्छा वासनांचा दास असेल आणि प्रेषितांच्या शिकवणुकीचा स्वीकार करण्यास यासाठीच नकार देत असेल की स्वीकार केल्यानंतर बेकायदेशीर गोष्टी व पापकर्म करण्याचे स्वातंत्र्य शिल्लक उरणार नाही. वर उल्लेखलेल्या सर्व बाबींपैकी एखादा जरी दुर्गुण कोणा माणसांत असेल तर त्याला ईश मार्ग सापडणे केवळ अशक्यप्राय आहे. एक खरा सदाचरणी व तटस्थ वृत्तीचा भला मनुष्य एका सच्चा प्रेषिताच्या शिकवणुकीचा स्वीकार करण्यास नकार देईल, हे अशक्य आहे.

प्रेषित ईश्वराने पाठविलेले असतात व ईश्वराचाच असा आदेश आहे की, त्यांच्यावर ईमान धारण करा व त्यांच्या आज्ञा पाळा. असे असतांना जर कोणी प्रेषितावर ईमान धारण केले नाही तर ते ईश्वराविरुद्ध बंड ठरते. तुम्ही ज्या राज्यातील प्रजा असाल त्यातील राजाने नियुक्त केलेल्या शासकांनाही तुम्हास मान्य करावे लागेल. जर तुम्ही त्याला शासक मानावयास नकार दिला तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही खुद्द राजाज्ञेविरुद्ध बंड पुकारले. राजाला मानायचे व राजाने नियुक्त केलेल्या शासकास मानायचे नाही, या दोन्ही परस्पर विरोधी व विसंगत गोष्टी आहेत. ईश्वर व त्याने पाठविलेल्या प्रेषिताचेही उदाहरण याच प्रकारचे आहे. ईश्वर सर्व मानवजातीचा वास्तविक सम्राट आहे. ज्या माणसाला त्याने मानवजातीच्या उपदेशार्थ व मार्गदर्शनार्थ पाठविले व ज्याच्या आज्ञापालनाचा आदेश दिला, त्याला प्रेषित मानणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरते. इतर सर्व गोष्टींचे अनुकरण व आज्ञा पाळण्याचे सोडून देऊन केवळ त्याचीच आज्ञा पाळावयास हवी. त्यांच्यापासून तोंड फिरवणारा मग तो ईश्वरास मानणारा असो की न मानणारा कोणत्याही अवस्थेत तो ‘श्रद्धाहीन’च (काफिर) आहे.

माननीय इब्ने अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापाशी सकाळच्या प्रहरी बसलो होतो. इतक्यात काही लोक अंगावर कांबळें लपेटून हातात तलवार घेऊन आले. त्यांच्या शरीराचा बहुतांश भाग विवस्त्र होता आणि त्यांच्यापैकी अधिकांश लोक मुजर कबिल्याचे होते, म्हणजे जवळपास सगळेच मुजरी होते. त्यांचे दारिद्र्य आणि  गरिबी पाहून पैगंबरांचा चेहरा चिंतेमुळे पिवळा पडला. मग पैगंबर घरात गेले आणि बाहेर येऊन बिलाल (रजि.) यांना अजान देण्याचा आदेश दिला. (नमाजची वेळ झाली होती.) तेव्हा  बिलाल (रजि.) यांनी ‘अजान’ आणि ‘तकबीर’ (नमाज सुरू होण्यापूर्वी ‘अल्लाहु अकबर’ म्हणणे) चे पठण केले. पैगंबरांनी नमाजचे नेतृत्व केले आणि नमाजनंतर भाषण दिले, त्यात  पैगंबरांनी ‘सूरह निसा’ची पहिली आयत आणि ‘सूरह हश्र’च्या शेवटच्या ‘रुकूअ’मधील (चरणातील) पहिली आयत पठण केली. त्यानंतर म्हणाले, ‘‘लोकांनी अल्लाहच्या मार्गात सदका  (दान) द्यावे, दीन द्यावे, दिरहम द्यावे, कपडे द्यावेत, दोन शेर गहू द्यावेत, दोन शेर खजूर द्यावेत.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘इतकेच नव्हे तर एखाद्याकडे खजुराचा अर्धा तुकडा जरी  असेल तरी तो द्यावा.’’ भाषण ऐकल्यानंतर अन्सारांपैकी एक मनुष्य आपल्या हातात एक पिशवी घेऊन आला जी त्याच्या हातात मावतही नव्हती. मग लोकांनी एकापाठोपाठ एक  सदका (दान) देण्यास प्रारंभ केला. इतकेच नव्हे तर मी धान्य आणि कपड्यांचे दोन ढीग पाहिले. लोकांनी अशा पद्धतीने सदका दिल्याचे पाहून पैगंबरांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा  दिसू लागल्या, जणू चेहऱ्यावर सोन्याचे पाणीच लावण्यात आले आहे. मग पैगंबरांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाममध्ये एखादी चांगली पद्धत सुरू करील त्याला त्याचा बदला मिळेल  आणि जे लोक या चांगल्या पद्धतीचा नंतर अवलंब करतील त्यांनाही त्याचे पुण्य मिळेल आणि काम करणाऱ्यांच्या बदल्यामध्ये घट केली जाणार नाही. त्याचप्रमाणे ज्याने इस्लाममध्ये  एखाद्या वाईट पद्धतीची सुरूवात केली त्याला त्या पापाची शिक्षा मिळेल आणि नंतर त्याचे अनुकरण करणाऱ्यांचे पापदेखील त्याच्याच कर्मपत्रात लिहिले जाईल. तसेच अनुकरण  करणाऱ्यांचे पापांमध्ये काहीही घट केली जाणार नाही. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण : इस्लामच्या दोन मूलभूत शिकवणी आहेत- पहिले एकेश्वरत्व आणि दुसरे अल्लाहच्या भक्तांपैकी गरीब व गरजवंतांवर कृपा व दया करणे. याच कारणास्तव पैगंबर  मुहम्मद (स.) यांचा चेहरा चिंतेने पिवळा पडला आणि जेव्हा त्यांच्यासाठी (गरीब व गरजवंतांसाठी) कपडे व अन्नधान्याची व्यवस्था झाली तेव्हा पैगंबरांचे मुखकमल सोन्यासारखे चमकू  लागले. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या भाषणात ‘सूरह निसा’ची पहिल्या आयतीचे पठण केले, त्याचा अर्थ असा आहे- ‘‘लोकहो, आपल्या पालनकत्र्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला  एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याचे जोडपे बनविले आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’  (कुरआन,४:१)
या आयतमध्ये अल्लाहने दोन गोष्टी सांगितल्या आहेत. एक ‘वहदत-ए-इलाह’ आणि दुसरी ‘वहदत-ए-बनी आदम’. ‘वहदत-ए-इलाह’चा अर्थ आहे फक्त अल्लाह उपासना व  आज्ञाधारकतेचा हक्कदार आहे, यालाच ‘तौहीद’ (एकेश्वरत्व) म्हणतात. ‘वहदत-ए-बनी आदम’चा अर्थ आहे सर्व मानव एकाच माता-पित्याची लेकरे आहेत, म्हणून त्यांच्यादरम्यान कृपा  व दयेवर आधारित वर्तणूक व्हायला हवी. त्या गरिबांना पाहून सदका (दान) देण्यासाठी आवाहन करून पैगंबर मुहम्मद (स.) यांचे या आयतीचे पठण स्पष्टपणे या गोष्टीकडे निर्देश  करते की समाजातील गरिबांची मदत न करणे अल्लाहचा क्रोध व रागाचे कारण बनते. 
तसेच ‘सूरह हश्र’ची जी आयत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पठण केली आहे त्याचा अनुवाद असा आहे, ‘‘हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगा आणि  प्रत्येक इसमाने हे पाहावे की त्याने उद्यासाठी काय सरंजाम केला आहे. अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळगत राहा. अल्लाह खचितच तुमच्या त्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे जी  तुम्ही करता.’’ (कुरआन,५९:१८) या आयतीचे पठण करून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या गोष्टीकडे इशारा केला आहे की गरिबांवर जी संपत्ती खर्च केली जाते ती मनुष्यासाठी  परलोकात संचय होतो, ती नष्ट होत नाही. ज्या मनुष्याने सर्वांत अगोदर सदका (दान) केले होते त्याची पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्तुती केली आहे आणि म्हणाले, ‘‘त्याला त्याच्या  ‘सदका’चेही पुण्य लाभेल आणि त्याला पाहून इतर लोकांमध्येही सदका देण्याची भावना जागृत झाली त्याचाही बदला त्याला मिळेल.’’ 

‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ शांती असा होतो. पण ही शांती फक्त मर्यादित कुठल्याही एका व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी, किंवा घराण्यासाठी नाही तर संपूर्ण विश्वासाठी आहे. इस्लाम हा  असा एकमेव धर्म आहे ज्यात अनेकेश्वरवादाला थारा नाही. जसे एक सुर्य, एक चंद्र, एक पृथ्वी तसेच एकच ईश्वर. इस्लाममध्ये जरी वेगवेगळ्या जाती, पंथ असल्या तरी सर्वांची  शिकवण एकेश्वरवादाचीच आहे. ‘ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह’ म्हणजेच अल्लाह एक आहे व मुहम्मद सलअम् अल्लाहचे प्रेषित आहेत. हा इस्लामचा मुख्य पाया आहे.
मनुष्य त्याची दैनंदिन जीवनशैली जगत असताना एका विशिष्ट चौकटीत जगत असतो. प्रत्येक गोष्टीत, कामात तो काही नियमांचे पालन करत असतो. 
त्याचप्रमाणे ज्याने मानवाला  या सृष्टीला निर्माण केले त्या विधात्याने मनुष्याला एक जगण्याची कला शिकवली. काही नियम त्याच्या भल्या साठी लागू केले. त्या इस्लामी नियमानुसार जर मनुष्य जगत असेल तर खरोखरच त्याचे जीवन आनंदमयी व सुखकारक ठरेल. इस्लाम अत्यंत सोपा, सर्वांना पटेल, रूचेल आणि जीवनात आनंद आणणारा धर्म आहे.  इस्लामची इमारत मूळ पाच स्तंभांवर आधारलेली आहे. हे स्तंभ म्हणजे एकेश्वरवाद, नमाज, रोजा, जकात आणि हज. या पाच स्तंभांपैकी एक जरी स्तंभ मनुष्याच्या आयुष्यातून  ढासळत असेल तर त्या व्यक्तीचा धर्म अधुराच म्हणाव लागेल. 
‘तौहीद’ म्हणजे एकेश्वरवाद. फक्त एकच ईश्वराचा स्वीकार करणे. अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही व कोणीही पुजनीय नाही या गोष्टीवर मनपूर्वक श्रद्धा ठेवने यालाच तौहीद  म्हणतात.
दुसरा इस्लामी स्तंभ आहे ‘नमाज’. इस्लामचे शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना नमाज अल्लाहकडून भेट म्हणुन मिळालेली आहे व प्रत्येक मुस्लिम व्यक्तीसाठी नमाज अनिवार्य आहे.  आनंदाची बाब म्हणजे प्रत्येक मुस्लिम व्यक्ती आपल्या जीवनात नमाजला अनन्य साधारण महत्त्व देतो.

तिसरे इस्लामी कर्तव्य आहे ‘रोजा’. रोजा म्हणजे उपवास. हा रोजा मनुष्याला त्यागाची शिकवण देतो. एक रोजेदार दिवसभर स्वत:ची तहान भूक विसरून पूर्णपणे स्वत:ला अल्लाहच्या  स्वाधीन करतो. रमजान हा असा महिना आहे जो आपल्याला वारंवार अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाग पाडतो. असा हा मंगलमय महिना.

‘जकात’ म्हणजे दान. समाजातील सक्षम लोकांना इस्लाम गरीब व गरजू लोकांना दान देण्याचा आदेश देतो. कोणीही व्यक्ती भुकेला, तहानलेला किंवा निर्वस्त्र राहू नये, निदान त्याच्या  प्राथमिक गरजा तरी लाभाव्यात यासाठी जकात दिली जाते आणि गरजूच्या आयुष्यात एक छोटासा आनंदाचा क्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.

शेवटचे इस्लामी कर्तव्य आहे ‘हज’. पण जर कोणाची आर्थिक स्थिती नसेल हज करण्याची तर हज माफ आहे.. इस्लाम हा खूप सोपा धर्म आहे.. तुम्ही तुमच्या जन्मदात्या आईकडे  पाहून स्मितहास्य केले तरी हजचे पुण्य पदरात पडले... 
एकंदरीत तथाकथित थोतांड बातम्यावरुन इस्लाम आणि मुसलमान यांची प्रतिमा मलीन झाली आहे. दुसऱ्या समाजांसमोर इस्लामचे चित्र खूप वाईट रितीने मांडले जात आहे. पण  इस्लामचा व्यवस्थितपणे अभ्यास केल्यास लक्षात येते की इस्लाम हा तलवारीच्या जोरावर नव्हे तर सत्य व शांतीच्या जोरावर पसरला आहे. पैगंबर मुहम्मद सलअम् यांनी आयुष्यभर  संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश दिला. समाजात बंधुभाव टिकून राहण्यासाठी अतोनात यातना सहन केल्या. शेवटी असे म्हणावे वाटते,
‘‘असे प्रेषित होउन गेले
समभावाची शिकवण देऊन गेले!
मानवजातीसाठी सर्व जीवन समर्पित केले!!’’

-अल्फिया तौकीर ईनामदार
अकोला / ७७०९०६२६६६

- डॉ. मॉरिस बुकाले
या पुस्तकात डॉ. बुकैले यांनी त्यांना जो कुरआन साक्षात्कार झाला, त्याचा उल्लेख केला आहे. या पुस्तकात विशेषत: आधुनिक शास्त्रज्ञांसाठी व सामान्य जनांसाठी एक बहुमूल्य संदेश आहे. कुरआन मनुष्याला बाह्य सृष्टीवर विचार व निरीक्षण करण्याचे आवाहन करतो तर त्यापासून त्याचा उद्देश केवळ अल्लाह फक्त सर्वशक्तीमान आहे. यावर भर देणे आहे. कुरआन काही वैज्ञानिक ग्रंथ नव्हे तर अत्युत्तम व अतुलनिय धार्मिक ग्रंथ आहे.
डॉ. मॉरिस बुकैले म्हणतात, ``सत्याविषयी असलेल्या शोधवृत्तीनेच माझे मार्गदर्शन केले आहे. बायबलचे कथन मात्र वैज्ञानिक दृष्ट्या स्वीकार करण्या योग्य नाही.''

आयएमपीटी अ.क्र. 38   -पृष्ठे - 24     मूल्य - 12          आवृत्ती - 3 (2012)
डाऊनलोड लिंक :

- स. जलालुद्दीन उमरी
आजच्या युगात इस्लाम विषयी जे गैरसमज मुद्दाम पसरविले जातात. त्यापैकी एक म्हणजे इस्लामने स्त्रीवर अन्याय केला आहे. इस्लामने स्त्रीला पुरुषाबरोबरीचा दर्जा दिला नाही आणि त्यांच्या धावपळीवर अनेक निर्बंध घातले आहेत परिणामत: त्या जीवनाच्या स्पर्धेत मागे राहतात. इस्लाम स्त्रीला पुरुषाच्या अधिन ठेवतो इ.
परंतु या पुस्तकात लेखकाने स्पष्ट केले आहे की इस्लामनेच सर्व प्रथम स्त्री व पुरुष समान आहेत असा उद्घोष केला. इस्लामच्या दृष्टीने स्त्रीने घराची व पुरुषाने बाहेरची जबाबदारी उचलली पाहिजे. इस्लाम स्त्रीला घरची स्वामिनी व व्यवस्थापक आहे, तिने बाहेरचे जग सुंदर करण्यासाठी स्वत:चे घर ओसाड करू नये. घरची जबाबदारी पेलून मुस्लिम महिलांनी समाजात स्वाभाविक कार्यक्षेत्रात आश्चर्यजनक कामगिरी केली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 39              -पृष्ठे - 80                  मूल्य - 30            आवृत्ती - 3 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/5b8mbww9nbd3skf1vudm1tbi9fp916cx


सुबह होती है शाम होती है 
उम्र यूं ही तमाम होती है
माणसाचे अर्धे जीवन नशीबावर आधारित असते तर अर्धे शिस्तीवर. शिस्तीवर आधारित जीवन अधिक महत्त्वाचे असते, कारण त्याच्याशिवाय माणूस नशिबाने मिळालेल्या संधींचा पूरेपूर उपयोग करून घेऊ शकत नाही. जगात आज जगण्याचे दोन सर्वमान्य उद्देश आहेत. एक जीवनाचा स्तर उंचवणे, दोन मनोरंजन. या दोन्ही उद्देशांच्या प्राप्तीसाठी पैशांची गरज असते. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी अधिकाधिक खर्च करण्यासाठी प्रेरित केले जाते. तर मनोरंजनामध्ये कोट्यावधी डॉलरची अनुत्पादक गुंतवणूक केली जाते. 
जगातील बहुतेक मुस्लिम लोक पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. त्यामुळे पश्चिमेने दिलेले जीवन जगण्याचे वर नमूद दोन्ही उद्देश्य त्यांनी नकळत स्विकारलेले आहेत व ते साध्य करण्यासाठी ते रात्रं-दिवस कष्ट करीत आहेत. वस्तूंवर प्रेम करीत आहेत तर माणसांचा उपयोग करीत आहेत. वास्तविक पाहता माणसांवर प्रेम करून वस्तूंचा उपयोग करणे अपेक्षित होते. 
पूर्वीच्या काळी जगात सर्वत्र गुलामगिरीची पद्धत रूढ होती. गुलामांची खरेदी-विक्री होत असे. त्यासाठी बाजार भरत असत. गुलाम हे शरिरानेच नव्हे तर मनाने सुद्धा गुलाम असत. अत्यंत दयनीय अवस्थेत जगावे लागत असले तरी स्वतंत्र होण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नसे. कोणी धाडस केलेच तर त्याचा अमानुष छळ करून कत्तल करण्यात येई, म्हणून गुलाम लोक स्वतंत्र होण्याची संधी मिळूनही प्रयत्न करत नसत. अपवादात्मकरित्या एखादा गुलाम कधीकाळी गुलामगिरीतून पळून जावून स्वतंत्र झालाच तर तो इतर गुलामांच्या नजरेत नायक ठरत असे व ही घटना इतर गुलामांसाठी उत्सवाची घटना मानण्यात येत असे. 
आजचे मुस्लिम सुद्धा पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. म्हणूनच एखाद्या मुस्लिमाने पाश्चिमात्य विधीमागे एखादे उच्चस्थान पटकाविले. उदाहरणार्थ ऑस्कर किंवा नोबेलसारखे पुरस्कार मिळविले, क्रिकेट किंवा टेनिसच्या रँकिंगमध्ये उच्च मानांकन मिळविले, चित्रपटामध्ये व्यावसायिक यश मिळविले तर बाकी मुस्लिमांना आनंदाचे भरते येते. त्यांच्यात उत्साह संचारतो. शाहरूख खान, सलमान खान, ए.आर. रहमान यांच्याबद्दल मुस्लिमांच्या मनामध्ये जो अभिमान आहे तो याच मानसिकतेतून आलेला आहे. कोणीही हा विचार करीत नाही की हे नाचे समाजामध्ये अनैतिकतेला प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे वर्तन इस्लामविरोधी आहे. ते आपले नायक होवूच शकत नाहीत. 
पाश्चिमातीकरण म्हणजे आधुनिकीकरण अशी आमची धारणा झालेली आहे, जी की चुकीची आहे. आज भारतीय मुस्लिमांची परिस्थिती अशी आहे की, 10 आशरा-ए-मुबश्शीरा (ते दहा भाग्यवान व्यक्ती ज्यांना अल्लाहने जीवंतपनी जन्नतची शुभवार्ता दिली होती) ची नावे एक टक्का मुस्लिमांना सुद्धा माहित नसतील. मात्र शाहरूख खान, सलमान खान सारख्यांची नावे त्यांच्या चित्रपटांच्या बारीक-सारीक तपशीलासहित बहुसंख्य मुस्लिमांना पाठ आहेत. 
जीवनमान उंचावणे गैर नाही. मात्र ते उंचावण्यासाठी, ” काही पण” करणे गैर आहे. भ्रष्ट पद्धतीने जीवनमान उंचावणे इस्लामला मान्य नाही. आज कुठले ना कुठले अनैतिक कृत्य केल्याशिवाय माणसाला गबर बनता येत नाही, हे कटू सत्य आहे. अमेरिका आणि युरोपची प्रगती जगातील गरीब देशांचे रक्त (अर्थ) शोषण करून झालेली आहे. भारतातही शहरांचा विकास ग्रामीण भागावर अन्याय करून झालेला आहे. आपल्या देशातच नव्हे तर जगात सुद्धा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता प्रस्थापित झालेली नाही. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ती शक्यही नाही. 
जीवनमान उंचावणे आणि मनोरंजन या प्रक्रिया सतत चालू असतात. त्यातून अनुत्पादक गोष्टींना अकारण महत्व प्राप्त होत जाते तर जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे महत्त्व कमी होत जाते. मुठभर लोकांच्या हाती त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पैसा जमा होतो. तर बहुसंख्य लोकांच्या वाट्याला फार कमी पैसा येतो. यातूनच अगोदर विषमता व नंतर वर्गकलह निर्माण होतो. समाजात नेहमी असे लोक मोठ्या संख्येने असतात जे आपल्या पोषणासाठी श्रीमंतांकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात. मात्र श्रीमंतांना त्यांची दया येत नाही. समाजात गरीबी कायम राहणे त्यांच्या हितासाठी आवश्यक असते. कारण त्यांच्या कारखान्यांना स्वस्तात मजूर मिळत असतात. याच मानसिकतेतून बहुसंख्यांना कायम गरीबीत ठेवण्याचे षडयंत्र रचले जाते. 
जीवन जगण्याचे खरे उद्देश्य
जीवनाचा स्तर सतत उंचवत ठेवणे व सतत मनोरंजनात व्यस्त राहणे हे मानवी जीवनाचे उद्देश्य असूच शकत नाही. ही बाब किमान साहेब-ए-शरियत (मुस्लिम) लोकांच्याही लक्षात येवू नये, यासारखे दुर्देव नाही. कुरआनने मानवजातीसाठी जगण्याचे जे उद्देश्य ठरवून दिलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे. 
1. ”मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी” (कुरआन : सुरे अज्जजारियात आयत नं. 56).  
या आयातीवरून स्पष्ट होते की, माणसाच्या जीवनाचे उद्देश्य अल्लाहची भक्ती हेच आहे. या ठिकाणी वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून स्पष्ट करू इच्छितो की, भक्ती या शब्दाचा अर्थ केवळ कलमा, नमाज, रोजा, जकात, हज इथपर्यंतच मर्यादित नाही तर या ठिकाणी जीवन जगण्याची अल्लाहला मान्य असलेली पद्धती अशा व्यापक अर्थाने भक्ती हा शब्द उपयोगात आणलेला आहे. जीवन जगताना अल्लाहने शरियाच्या माध्यमातून दिलेल्या आदेशांची अवहेलना होणार नाही याकडे लक्ष दिल्यास दुसऱ्यांना त्रास होत नाही व आदर्श समाजाची रचना होते. आदर्श समाजाच्या रचनेपेक्षा दूसरे कोणते महान उद्देश असूच शकत नाही. 
2. ”तुम्हा लोकांना जास्तीत जास्त आणि एकमेकापेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहाने बेसावध करून टाकले आहे. इथपावेतो की (याच चिंतेत) तुम्ही थडग्यापर्यंत पोहोचा. कदापि, नाही! लवकरच तुम्हाला कळून येईन. पुन्हा (ऐकून घ्या) कदापि नाही! लवकरच तुम्हाला कळून येईल. कदापि नाही! जर तुम्ही खात्रीचे ज्ञान म्हणून (या चालीच्या परिणामाला) जाणत असता तर (तुमचे वर्तन असे नसते). तुम्ही नरक पाहणारच. पुन्हा (ऐकून घ्या) तुम्ही अगदी खात्रीने नरक पहाल. मग नक्कीच त्या दिवशी या देणग्यां (जीवनात मिळालेल्या गोष्टीं) संबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल” (सुरे अत्तकासूर : आयत नं. 1 ते 8). 
या आयातींमध्ये कुठल्याही मार्गाने जास्तीत जास्त धन प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनैतिक उठाठेवी संबंधी सावध करण्यात आलेले आहे. या आयातींच्या शब्दरचनेमध्ये पुन्हा-पुन्हा ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून देण्यात आलेली आहे की, तुम्ही जीवनमान उंचवण्यासाठी उलट-सुलट मार्गाने आज जरी धन गोळा करण्यामध्ये यशस्वी झालात तरी एक दिवस तुम्हाला नक्कीच त्याच्या बदल्यात नरकात जावे लागेल. इमानधारकांच्या मनाचा थरकाप उडविण्यासाठी या आयाती पुरेशा आहेत. 
3. ”ऐहिक जीवन तर एक खेळ-तमाशा आहे. वास्तविक पाहता मरणोत्तर जीवनाचे ठिकाणच त्या लोकांकरिता अधिक उत्तम आहे जे दुराचारापासून अलिप्त राहू इच्छितात. मग काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करणार नाही? (सुरे अल्अनाम : आयत नं. 32).
या आयातींचा अर्थ सांगताना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”जीवनाला जरी खेळ-तमाशा म्हणून संबोधिले आहे तरी याचा अर्थ असा बिल्कुल नाही की जीवनामध्ये कुठलेही गांभीर्य नाही आणि जीवन फक्त खेळ-तमाशासाठी बनविले गेले आहे. वास्तविक पाहता या आयातीचा अर्थ असा आहे की, आखिरत (मृत्यूनंतरच्या जीवना)च्या असीमित जीवनाच्या तुलनेत या पृथ्वीवरील जीवन असे आहे जसे एखादा व्यक्ती काही वेळा करिता मनोरंजनासाठी एखादा खेळ खेळतो आणि परत आपल्या वास्तविक जीवनामधील गंभीर गोष्टींकडे वळतो.” (तफहिमुल कुरआन खडं 1 - आयत नं.32, पान क्र. 533).  
शेवटी एवढेच सांगू इच्छितो की, मानवी जीवन अत्यंत सुंदर आहे व जबाबदारीने जगण्यासाठी देण्यात आलेले आहे. हे जीवन एकदाच मिळालेले आहे. या जीवनात आपण कसे वागतो यावरच मृत्यूनंतर आपली काय गत होईल हे अवलंबून आहे. बुद्धीमान माणसासाठी एक तर्क सादर करत आहे की, आपल्या जन्माअगोदरच्या जीवनावर आपला काहीच अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावरही काहीच अधिकार राहणार नाही. मग या 60-70 वर्षाच्या जीवनावरच आपल्याला अमर्याद अधिकार कसा मिळू शकतो की आपण कसेही वागलो तरी काहीही फरक पडणार नाही. क्षणभर डोळे मिटून याचा विचार केल्यास आपल्याला साक्षात्कार होईल की हे जीवन अल्लाहने दिलेल्या मार्गदर्शनाशिवाय व्यतीत केल्यास त्याचे वाईट परिणाम  मृत्यूनंतरच्या जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मृत्यूनंतरच्या असीमित जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे जीवन जबाबदारीने, काटेकोरपणे आणि नैतिक पद्धतीने जगणे आवश्यक आहे. जगण्यासाठी मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात कुरआन आणि हदीसमध्ये उपलब्ध आहे. त्यातूनच हस्तगत केलेल्या संहितेला शरिया असे म्हणतात. नैतिक जीवन जगण्याचा एकमेव मार्ग शरिया हाच आहे. मग तो कोणाला आवडो किंवा न आवडो.

- एम.आय.शेख
9764000737

3. नमाज कायम करणे
    आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु व त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया तिसरी  गुणवत्ता ‘ नमाज कायम करणे’ ज्याची कुरआनात ईश्वर वारंवार आपणास आठवण करुन देत आहे.  नमाज कायम करणे म्हणजे आपल्या मनाला वाटेल तेव्हा अदा करणे नव्हे तर ती वेळेवर अदा करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा अजान होते तेव्हा एका मुस्लिम पुरुषाने आपले सर्व काम बाजूला सारून मस्जिदीकडे प्रस्थान करावे व त्याचबरोबर एका मुस्लिम स्त्रीने घरची सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या मुलाबाळांना सोबत घेवून नमाज अदा करावी. असे का? कारण ही एक अशी प्रार्थना आहे जी आपल्यासाठी  ईश्वर आणि आपल्यामधे संबंध ठेवण्याचे काम करते. आणि आपल्यासाठी ईश्वराविषयी प्रेम, निष्ठा आणि नम्रता व्यक्त करण्याचे हे साधन आहे. हे नाते कधीही तुटू नये हीच अल्लाहची इच्छा आहे. म्हणून अल्लाहने आपल्याला सर्व परिस्थितीत दररोज प्रार्थना चालू ठेवण्याचा आदेश दिला आहे. आपण उभे राहून आपली प्रार्थना करण्यास असमर्थ असल्यास, अल्लाह तुम्हाला खाली बसून प्रार्थना करण्यास सांगतो. आपण तसे करण्यास असमर्थ असल्यास, आपण अंथरूणावर पडल्या-पडल्या प्रार्थना करावी, किंवा आवश्यक असल्यास डोळ्यांच्या हालचालीने देखील प्रार्थना करावी. जर तुम्हाला ईश्वराचे विशेष मार्गदर्शन पाहिजे असेल आणि ऐहिक जीवन व परलोक जीवनात यश हवे असेल तर जोपर्यंत आपण मृत्यूच्या पुढे जात नाही तोपर्यंत दररोजच्या प्रार्थनांचे पालन करण्याच्या कर्तव्यातून मुक्त होऊ शकत नाही. अल्लाहला तुमच्या प्रार्थनेची गरज नाही तर तुम्हाला त्याची गरज आहे जेणेकरून तुम्ही सरळ मार्गाने चालावे. परिणामत: आज काही मुस्लिम पाच वेळेची नमाज कायम करतात परंतु आजही ते अशांत का? का त्यांच्या कामात यश येत नाही? का तो अल्लाहचा गुलाम न बनता दुनियावी पशाचा गुलाम बनला आहे? कारण तो मस्जिदमध्ये नमाज तर पढतो परंतु  घरच्यांशी व बाहेरच्यांशी चांगली वर्तणूक ठेवत नाही, गोरगरिबांना दान करत नाही, कधी जकात दिली तर बँकेत ठेवलेल्या पैशाच्या व्याजाला जकातचे नाव देवून मनाची समजूत घालतो की मी ईश्वराच्या आज्ञेेचे पालन करतो पण एवढे  असून त्याच्या  कामात यश नाही. असे का?कधी डोळसपणे मनाशी खोलवर जाऊन विचार केला का? आपण नमाजमधे ईश्वराशी काय संवाद करतो? त्याला काय मागतो?  त्याचबरोबर  काही मुस्लिमांची विचारधारणा अशी  आहे की जुम्मा ते जुम्मा नमाज पडायची. कारण त्याना आज नमाज दुय्यम दर्जाची वाटते व पैसा प्रथम दर्जाचा वाटतो. मग तो कसाही येवो. मग तो हलाल असो वा हराम; त्यांना काही फरक पडत नाही. मुस्लिमांना हे समजत नाही आहे की जो संपत्ती देणारा आहे, जो खऱ्या यशाच्या मार्गाकडे अजानद्वारे आपणास वारंवार बोलावत आहे, त्या पालनकर्त्याची वाट ठोकरून तो नकळतपणे मनुष्याचा गुलाम बनत आहे. कारण त्याला भीती असते की मी नमाज कायम केली तर ह्या दुनियावी स्थान मला गमवावे लागेन आणि अगदी कहर म्हणजे घरातील कुणी व्यक्ती  कुरआनचे नियम सांगत असेल तर त्या व्यक्तीला कुरआन वाचण्यास प्रवृत्त करत नाही. आज तर बोटावर मोजण्याचे इतके  मुस्लिम पुरुष पाच वेळा नमाज पढत असतील व त्यातूनही तुरळक स्त्रीया नमाज पढत असतील. कारण त्यांचे प्रमुख कर्तव्य टीव्ही पाहणे, एकमेकांना जेवण्याची दावत देणे व लग्नात अगदी जोराने स्पर्धा लावून नटणे-थटणे ,एकमेकांची निंदा करणे हे समजून बसलेल्या आहेत. त्यांचे हे विचार आचरण कळत-नकळत पणे हेच सांगत आहेत की नमाज ने काहीच होत नाही. बरं मग पैशातूनच आपण सर्वकाही प्राप्त करु शकतो तर आज मुस्लिम समाज अधोगतीवर का? जेव्हा की पैगंबरांनी सगळीकडे  इस्लाम संबंधी जागृती केली होती तेव्हा मुस्लीम समाजाने सर्वात जास्त राज्य प्रस्थापित केले होते व ते पैगंबरानंतर सतत 600-800 वर्ष कायमही राहीले होते. पण तो आज प्रत्येक क्षेत्रात मागे का? जसे शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा तुम्ही  नजर टाकाल तर तुम्हाला तिथे खालच्या दर्जाचे शिक्षण घेणारे मुस्लिमच दिसतील. आज परिस्थिती थोडीफार सुधारलेली आहे परंतु ती आधीच सुधारायला हवी होती. मुस्लिमांनी मुलांना शिक्षणात पुढे आणनाऱ्या स्त्रीला कधी शिकविलेच नाही! जेव्हा की फक्त इस्लामम सर्वप्रथम शिक्षणाचा हक्क स्त्रीलाच देण्यात आला. पण आचरणात याउलट आहे. कारण तिचे कमी वयात लग्न करुन द्यायचे मग शिकवायचेही नाही. कारण तिला सांगण्यात आले चुल आणि मुल हेच तिचे जीवन आहे. परिणामत: आज आईला मुलाला ळलीश इेरीव चा अभ्यासक्रम शिकविता येत नाही म्हणून ती त्यांना ीील बोर्ड च्या शाळेत टाकते. आणि मग ती या भौतिक दुनियेला आकर्षित होवून फक्त त्याला पैसा कमविण्याचे शिकविते. जर मुले बिघडली तर इंग्रजी भाषेला नाव ठेऊन स्वत:च्या चुकांना आवरण घालते पण खरे कारण तिच्यामधील धार्मिक शिक्षण व तांत्रिक शिक्षणाच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच मुस्लिम समाज शिक्षण क्षेत्रात मागासलेला आहे . तसेच सामाजिकरित्या पाहिले तर मुस्लिम आचरणात सर्वात  कमी दर्जाचे आहेत असे इतर समाजातील लोकांचा दृष्टीकोण आहे म्हणूनच इतर कुठल्याही समाजात त्यांचे विशेष स्थान नाही. सतत स्वार्थ, बंडखोरी, एकमेकांना शिविगाळ, पैशाचे लोभी हे  त्यांचे गुणविशेष सांगण्यात येतात. जेव्हा की याउलट इस्लाम न्यायाची शिकवण देतो व प्रत्येक मनुष्याला नैतिक कर्माने माणूस बनायला शिकवितो. बाकी समाजात सोडा त्यांनी स्वत: मध्येच विघटन केले आहे जसे सुन्नी, शिया, अहले हदीस, दर्गेवाले अजून बरेच काही. ते इस्लामची एकात्मता आचरणात आणण्याऐवजी ते एकमेकांना खाली खेचण्यामधे व्यस्त आहेत. अगदी तसेच आज अरब देश दुसऱ्या अरब देशाशी भांडण्यात व्यस्त आहेत. मात्र कधी देशाच्या पंतप्रधानाने यांच्यावर अत्याचार दर्शविला असता तेव्हा मात्र काही क्षणाला मुस्लिम संघटित असल्याचा दावा करतात. त्याशिवाय अगदी कहर म्हणजे मुस्लिम समाजाने ईश्वराच्या प्रार्थनेमधे (नमाज) विघटन केले आहे जसे ते एकदम गुर्मीने म्हणतात जमातनुसार नमाज पडायची असते . काय खरंच ईश्वराने तुम्हाला वेगवेगळी नमाज पडण्याची आदेश दिला आहे? काय पैगंबराने तशी शिकवण दिली? सत्याची पडताळणी करण्यासाठी कधी कुरआन वाचन्याचे धाडस केले आहे का? ही प्रश्‍नावली ऐकून तुमचे मन अगदी सहज उत्तर देते- नाही! !!! याचे कारण म्हणजे आपणास यासाठी मौलाना/इमाम  यांनी कधीच प्रोत्साहित केलेच नाही. कुरान सामान्य मुस्लिमांनी वाचले व समजले तर  त्यांची मक्तेदारी कमी होईल. मौलाना/इमाम यांचा हा विचार आणि  मंदिरातल्या  पुरोहितांच्या विचारांमधे फारसा फरक दिसून येत नाही. तसे असले असते तर प्रत्येक मुस्लिमाला अरेबी भाषा समजली असती व कुरान समजून घेण्यात गोडी निर्माण झाली असती आणि मुस्लिम पुरुष मस्जिदीमध्ये मोमिन व मस्जिदीबाहेर आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनला असता. त्याचबरोबर मुस्लिम स्त्री घरामध्ये आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनली असती. तुम्ही पहाल कोणताही मनुष्य जेव्हा पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे जेव्हा जीवन चरित्र वाचतो तेव्हा अगदी मनातून उद्गारतो मनुष्य असावा तर असा. मी जेव्हा-जेव्हा इस्लामची सत्यता मुस्लिमेत्तर लोकांना सांगते तेव्हा ते एकच प्रश्‍न घेवून बसतात इस्लाम एवढा सुंदर असताना मुसलमान वागणुकीत खराब का? मित्रांनो! मी इथे आपण किती खराब झालो हे सांगत नाही आहे तर मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण असे का झालो?  आपणच अधोगतीवर का? आपल्यासोबतच अन्याय का? याचे कारण म्हणजे तुम्ही दिवसा पाचवेळा जेव्हा ईश्वराला प्रार्थना करता तेव्हा त्याच्याशी काय संवाद करता? त्याला काय मागता?  तो तुम्हाला काय देतो आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे? हे कधी समजून घेतले आहे का? जसे आपण ईश्वराला नमाजमधे सरळ मार्गदर्शन (हिदायत) मागतो तेव्हा ईश्वर म्हणतो तुला माझे मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते कुराणात आहे मग त्यातून आत्मसात कर व आचरणात आण. मग पुन्हा अजानद्वारे यशाकडे ये. पुन्हा मला माग. मी तुला विशेष मार्गदर्शन (तौफिक) देईन. विचार बदला परिस्थिती बदलेल. पहा आपण विचार उत्पन्न करु शकत नाही तर ते अल्लाहच आपल्या मनामध्ये  उत्पन्न करतो मात्र ते निवडण्याचे स्वातंत्र्य त्याने आपणास दिले आहे. मग कोणता विचार निवडायचा? कुठल्या मार्गावर ठाम राहिल्यास माझे कर्म आचरण सात्विक बनेल. ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहुया . एकदा जर आपणासमोर दारू  पिण्याची परिस्थिती निर्माण झाली असता आपल्या मनात तीन विचार येतात पहिला दारु पिली तर या दुनियेत उच्च स्थान मिळते  दुसरे आज पिऊन घेवुया उद्यापासून पिणार नाही आणि तिसरे मी पिणार नाही. कारण मला माझ्या ईश्वराने सांगितले आहे. मग दुनियेतील स्थान माझ्यासाठी दुय्यम दर्जाचे  आहे.  तुम्ही तिसऱ्या विचारावर तेव्हाच ठाम राहाल जेव्हा तुम्ही कुराण वाचाल आणि कुराण तेव्हाच वाचाल जेव्हा याचे मार्गदर्शन तुम्ही ईश्वराला मागाल. जेणेकरून तुम्ही तोच मार्ग निवडाल ज्याने तुमचे आचरण सात्विक बनेल आणि या दुनियेतील तुमचे यश जणूकाही एका वाळवंटात गुलाबाचे फुल उमलल्यासारखे असेल. आणि परलोकातील यश तुमची वाट पाहत असेल. कारण ही सात्विकता नैतिक आचरण व यश हे तुम्हाला ईश्वराने दिलेले असेल. मग तिथून तुम्हाला कोणीही खाली खेचू शकत नाही. पण तुमची श्रद्धा चुकली तर विचार चुकतात आणि विचार चुकले तर आचार चुकतात मग निश्चितच अधोगाती, अन्याय, अत्याचार याचा सामना या दुनियेत व मृत्युनंतरही करावा लागेल. यावरुन तुम्ही म्हणाल इतर लोक तर ईशमार्गावर नसून यश प्राप्त करत आहेत मग आम्हीच अपयशी का? याचे उत्तर अगदी सोपे आहे, असे की, अल्लाह आपल्याला या दुनियेत व परलोकात कायमस्वरूपी यश देऊ इच्छित आहे. मात्र ईश्वराने आपणास यशाचा मार्ग सांगूनही आपण जाणूनबुजून  अपयशी मार्ग स्वीकारतो आहे. या यशाची चव तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल आणि ती वाट दुसरी कुठलीही नाही तर नमाज आहे. ती समजून पठण केली तर तुमचे ईश्वराशी नाते अतूट बनेल. तुमच्यात कुराणविषयी गोडी निर्माण होईल. ईश्वराच्या प्रेमापोटी तुमचे आचरण सात्विक बनेल त्याच्या विशेष मार्गदर्शनाने तुम्हांला ईशमार्गावर ठाम राहण्यास मदत होईल.”श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एकमेकांचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतूर व बुद्धिमान आहे.”(कुरआन 9:71-72). ”या श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचा वायदा आहे की त्यांना अशा बागा प्रदान करील ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील, त्या सदाबहार बागांत त्यांच्याकरिता स्वच्छ निवासस्थाने असतील, आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठे यश आहे.  (कुरआन 9:71-72). हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही नमाजमधील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्याल. चलातर नमाजमधील प्रत्येक श्‍लोकाचा सविस्तर अर्थ पाहूया पुढील भागात

- सीमा देशपांडे
7798981535

 - इनामुर्रहमान खान
फेब्रुवारी 1964 मध्ये वयोवृद्ध लेखकाचा हा लेख उर्दु मासिक `जिंदगी' मध्ये प्रकाशित झाला होता. या लेखाचे देशव्यापी महत्त्व त्या काळीही होते आणि आज तर त्याचे महत्त्व आणखीन वाढले आहे. उग्र राष्ट्रवाद आणि भौतिकवादी नैतिकतेची पाश्चिमात्यांनी दिलेली देणगीने आपला देश नरक करून टाकल आहे.
जातीय दंगलीचे ऐतिहासिक व तात्कालिक कारण सांगून तात्कालिक व स्थानिय उपाय सांगितले गेले आहेत आणि या भीतीच्या व दहशतीच्या परिस्थितीतून एक आशेचा प्रकाश किरण हा काळोख दूर करण्यास सक्षम आहे.

आयएमपीटी अ.क्र.37    -पृष्ठे - 24     मूल्य - 10  आवृत्ती - 3 (2012)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/x5cftzduvpoj0bgut7kwz9haptgmfgil

जमाअत-ए- इस्लामी हिंदची पार्श्‍वभूमी

कुव्वते फिक्रो अमल पहले फना होती है, 
तब किसी कौम के शौकत का जवाल आता है
सहाव्या शतकामध्ये अरबस्थानातील मक्का शहर म्हणजे एक मोठी बाजारपेठ होती. तेथे एक काबागृह होते. ज्यात 360 मुर्त्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक कबिल्याची एक देवता होती. रोज एक कबिल्याचे लोक काबागृहात येवून आपल्या कुलदैवतीची पूजा करत. त्यांच्याकडून बकऱ्यापासून ते ऊंटापर्यंतचे रोज बळी दिल्या जायचे. मक्काच्या लोकांची जनावरे विकली जायची. मोफत मांस खायला मिळायचे. या कबिल्याचे लोक जेंव्हा मक्केत यायचे तेंव्हा भरपूर खरेदी करायचे. या उलाढालीतून मक्काची अर्थव्यवस्था वर्षागणिक सुदृढ व्हायची. सर्व काही सुरळीत चालू असतांना अचानक एका दिवशी त्यांच्यातील बनी हाशम कबिल्यातील एका तरूणाने गार-ए-हिरामधून बाहेर येऊन सबाची टेकडी गाठली व घोषणा केली की, ’ईश्‍वर एक आहे त्याचे नाव अल्लाह आहे. मी त्याचा प्रेषित (संदेश देणारा) आहे. मला जिब्राईल अलै. नावाच्या एका देवदूताने हा संदेश दिला आहे की यापुढे जगात मी दिलेला संदेश हाच अंतिम संदेश मानला जाईल व कयामत पर्यंत याच संदेशाप्रमाणे लोकांना जगावे लागेल. जे माझे म्हणणे मान्य करतील ते आपल्या या जीवनातही यशस्वी होतील व मृत्यू नंतरच्या जीवनातही यशस्वी होतील.’ 
झाले! या घोषणेनंतर मक्कामध्ये एक सामाजिक भुकंप झाला. काही लोकांनी हजरत मुहम्मद सल्ल. वर तात्काळ विश्‍वास ठेवला मात्र बहुसंख्यांकांनी त्यांच्या ’एक ईश्‍वर’च्या संदेशाचा विरोध केला. हळू-हळू प्रेषित सल्ल. यांच्यावर नवीन-नवीन आयतींचा नुजूल (अवतरण) सुरू झाला व एक-एक गोष्ट हराम (निषिद्ध) होत गेली. दारू निषिद्ध झाली, व्याज निषिद्ध झाले, काय करावे व काय करू नये?, काय खावे, काय खाऊ नये? पासून तर काय चांगले काय वाईट, इथपर्यंतची एक आचार संहिताच प्रेषितांंनी लोकांसमोर मांडली. महिलांचे मोकळे (विनापरदा) फिरणे निषिद्ध झाले. थोडक्यात मानवी जीवनाला कलंकित करणाऱ्या सर्व गोष्टी निषिद्ध होत गेल्या. त्यांच्या या संदेशाची गोडी सदप्रवृत्तीच्या लोकांना लागू लागली व त्यांच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली.
सुरूवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मक्काच्या प्रस्थापितांना फार काळ दुर्लक्ष करणे परवडले नाही. जस-जशी प्रेषित सल्ल. यांच्याकडे लोकांची रीघ वाढू लागली तस-तशी मक्काची अर्थव्यवस्था ढासळू लागली. ऐकेश्‍ववादी व अनेकेश्‍वरवादी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. म्हणून सर्व कबिल्यांची एक संयुक्त  बैठक झाली व त्यात असे ठरले की प्रत्येक कबिल्याचा प्रतिनिधी असलेल्या सरदारांचे एक प्रतिनिधी मंडळ अबु तालीब (प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चुलते) यांचेकडे जाईल व त्यांच्या समक्ष आपले म्हणणे सादर करील. जेणेकरून प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना त्यांच्या मिशनपासून रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांना विश्‍वास होता की जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झाल्यामुळे प्रेषित सल्ल. यांचे लालन-पालन त्यांचे चुलते अबु तालिब यांनीच केले होते. प्रेषित सल्ल. त्यांचे म्हणणे कधीच टळणार नाहीत. 
ठरल्याप्रमाणे मक्कातील सरदारांचे एक प्रतिनिधी मंडळ संयुक्तरित्या अबु तालीब यांच्या भेटीला गेले व त्यांच्यासमोर कथन केले की, ”तुमचा पुतण्या मुहम्मद सल्ल. यांनी हे काय चालवले आहे? ते ईश्‍वर एक असल्याचे सांगत आहेत. स्वतःला प्रेषित म्हणून घेत आहेत. त्यांच्या कच्छपी लागून मक्कातील अनेक लोक धर्मभ्रष्ट होत आहेत. त्यांच्या या संदेशामुळे घरा-घरात भांडणे लागलेली आहेत. अनेक लोक आपल्या कुलदैवतांचा इन्कार करत आहेत. त्यामुळे मक्कामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या घटत आहे. असेच सुरू राहिले तर आपली अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल. तुम्हाला माहित आहे की, आपल्या कमाईचे प्रमुख स्त्रोत काबागृह आहे. आपल्या पुतण्याने त्याचाच विरोध सुरू केला आहे. हे असेच सुरू राहणे आपल्याला परवडणारे नाही. तुम्ही त्यांना आवरा नसता आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. 
अबु तालीब एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. पण सर्व काबिल्यांचे मिळून एक संयुक्त प्रतिनिधीमंडळ आल्याने त्यांचाही नाईलाज झाला. त्यांना काही बोलता आले नाही. त्यांनी सरळ प्रेषित सल्ल. यांना बोलावून घेतले व प्रतिनिधी मंडळाची थेट भेट घालून दिली. प्रतिनिधी मंडळाने त्यांच्या समोर तीन मुद्दे ठेवले. 
1. तुम्हाला आम्ही आपला सरदार माणण्यास तयार आहोत. 2. तुम्हाला जर पैसा हवा असेल तर आम्ही सर्वजण तुम्हाला एवढे धन देवू की तुम्ही अरबमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हाल. 3. तुम्हाला कुठली स्त्री हवी असेल तर आमच्या कबिल्यातील कोणत्याही स्त्रीयांशी लग्न करू शकाल. आम्ही त्यांना तुमच्या स्वाधीन करू पण तुम्ही ईश्‍वर एक आहे आणि तुम्ही त्याचे प्रेषित आहात असे म्हणणे सोडून द्या. त्यावर प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, ” माझ्या एका हातात चंद्र आणि दुसऱ्या हातात सूर्य जरी दिला तरी मी माझ्या मिशनपासून ढळणार नाही. कारण मी जो संदेश देतोय तो माझ्या मनाप्रमाणे देत नाही तर अल्लाहच्या आदेशानुसारच देत आहे व यातच मानवतेचे कल्याण आहे.”
हे विवेचन यासाठी मी वाचकांसमोर मांडलेले आहे की इस्लामी व्यवस्था ही कंपाऊंडेबल (तडजोडी योग्य) नाही. हे वाचकांच्या लक्षात यावे. ही व्यवस्था व्यक्तीगत व सामुहिक जीवनात अंगिकारल्याशिवाय मानवी कल्याण शक्य नाही. इस्लामच्या या मूळ शिकवणीचा भारतीय मुस्लिमांना विसर पडलेला आहे. शुद्ध इस्लामी व्यवस्थेचे जे महत्व जमाअत-ए- इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) यांच्या लक्षात 20 व्या शतकाच्या सुरूवातीला आले होते ते आजही बहुतेक मुस्लिमांच्या लक्षात आलेले नाही. म्हणून कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज या इबादतींनाच भारतीय मुस्लिम इस्लाम समजतो. निःसंशय ह्या पाचही बाबी इस्लामी व्यवस्थेच्या मुलभूत बाबी आहेत. पण इस्लाम इथेच संपत नाही तर या बाबीचा अंगिकार करून एक आदर्श समाजाची रचना करावी, समाजात चालू असलेल्या कुरीती संपवाव्यात, त्यांच्या जागी सुरीतींची प्रतिष्ठापणा करावी, वाईट गोष्टींचे उच्चाटण करावे व चांगल्या गोष्टी रूजवाव्यात, जेणेकरून एक नीतिमान समाज निर्माण होईल. हा इस्लामचा मूळ उद्देश आहे. यालाच कुरआनने ’अम्रबिल माअरूफ व नही अनिल मुनकर’ म्हटलेले आहे. 
हे काम कठीण आहे म्हणून साधारणपणे मुस्लिम समाज वर नमूद पाच तुलनेने सोप्या गोष्टींचेच पालन करतो. यामुळे इस्लाम ही फक्त त्यांची धारणा बनलेली आहे, श्रद्धा नव्हे. श्रद्धा असती तर त्यांनी कुरआन समजून घेऊन त्यानुसार आचरण केले असते. लग्न साध्या पद्धतीने केले असते, व्याज सोडून दिले असते, अश्‍लीलतेपासून दूर राहिले असते, दारूचा त्याग केला असता. इस्लामचा संदेश आपल्या देशबांधवांपासून लपवून ठेवला नसता. आपल्या वाणी, लेखीन आणि आचरणातून इस्लामचे कल्याणकारी रूप देशबांधवांसमोर मांडले असते. जमाअते इस्लामीच्या स्थापनेमागे इस्लामची स्थापना (अकामते दीन) हाच उद्देश होता. भारतीय मुस्लिम हे करण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून बहुसंख्य बांधवामध्ये मुस्लिमांबद्दल ठीक तसाच तिरस्कार निर्माण झालेला आहे जसा सातव्या शतकात प्रेषित मुहम्मद सल्ल. ) आणि त्यांच्या सोबत्यां (सहाबा रजि.) बद्दल सुरूवातीच्या काळात निर्माण झाला होता. जोपर्यंत मुस्लिम म्हणून आपण अल्लाहचा संदेश देशबांधवांपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहचविणार नाही व त्याचे लाभ त्यांना ’याची देही याची डोळा’ दाखवून देणार नाही, त्यांचा तिरस्कार सहन करूनही त्यांच्यावर प्रेम करणार नाही, त्यांच्या हितासाठी यथाशक्ती निरंतर प्रयत्न करणार नाही, त्यांच्या हिंसक तिरस्काराचे उत्तर अहिंसक प्रेमाने देणार नाही तोपर्यंत ते आपल्याला एक प्रतिस्पर्धी धार्मिक गटच नव्हे तर शत्रू स्थानी समजतील व मुस्लिमांचे अधिकाधिक नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. 
आज 21 व्या शतकातही आपल्या समोर परिस्थिती तशीच आहे जशी सातव्या शतकात प्रेषित (सल्ल.) व त्यांच्या सहाबा (रजि.) समोर होती. ज्याप्रमाणे त्या काळातही बहुसंख्यांक लोकांकडून अल्पसंख्यांक मुस्लिमांची मॉबलिंचिंग केली जात होती तशीच आजही केली जात आहे. 
अशा परिस्थितीही सब्र (संयम) ठेऊन, बहुसंख्यांकाडून होणारे अत्याचार सहन करूनही, प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या विषयी करूणा बाळगून त्यांना सत्यमार्ग दाखविला होता. अनेक सहाबा रजि. यांची शहादत पचवून, पावलो-पावली होणारा तिरस्कार सहन करूनही आपल्या प्रिय प्रेषित सल्ल. यांनी जसे मक्काच्या बिगर मुस्लिमांवर प्रेम केले होते, तसेच प्रेम आपल्याला आपल्या देशातील बहुसंख्य बांधवावर करावे लागेल. त्यांच्या हितासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. त्यांच्या प्रती करूणेचा भाव मनात ठेवावा लागेल. त्यांच्याशी सामाजिक संबंध प्रस्थापित करावे लागतील. त्यांच्या सुख-दुःखात फक्त सामिल होऊनच चालणार नाही तर त्यांचे दुःख निवारण करण्यासाठी सर्वशक्तीनिशी झटावे लागेल. फक्त मुस्लिम समाजाच्या कल्याणाची नव्हे तर समस्त भारतीय समाजाच्या कल्याणाची चिंता करावी लागेल. या खऱ्या इस्लामी अख्लाकचा परिचय मुस्लिम्मेतरांना करून द्यावा या उद्देशाने जमाअत-ए-इस्लामीच स्थापना करण्यात आली. एवढा व्यापक विचार साधारणपणे कुठल्याच मुस्लिम संस्थे, संघटनेकडून व्यक्त केला जात नाही. केला गेला तरी अमलात आणला जात नाही. हाच फरक इतर मुस्लिम संघटना आणि जमाअते इस्लामी हिंदमध्ये आहे.
जमाअते इस्लामी हिंद आपल्या स्थापनेपासूनच बहुसंख्य बांधवांशी आपले संंबंध टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जमाअतचे विचार प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मूळ शिकवणीवर आधारित आहेत. ज्यात कृष्णवर्णीय आदिवासी ह.बिलाल रजि. यांनाही तेवढेच महत्व आहे जेवढे कुलीन हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना आहे. ह्याच समतेच्या विचारसरणीला देशबांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी जमाअते इस्लामी आपल्या स्थापनेपासून प्रयत्नशील आहे. जमाअतची रचना व कार्य या संबंधी माहिती इन्शाअल्लाह पुढील अंकी समजून घेऊ. क्रमशः

एम.आय. शेख 
9764000737

गुण २ : परोक्षावर श्रद्धा ठेवणे -  (कुरआन 2: 3)
आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्‍वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु, त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया दुसरी गुणवत्ता ‘ परोक्षावर  श्रद्धा’ म्हणजे अदृश्य ईश्‍वरावर विश्‍वास ठेवणे. शब्दश:, अदृश्याचा संदर्भ असा होतो की अश्या गोष्टी ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांपासून वंचित (अनुपस्थित) आहेत. ’ अल्लाहने त्याचे मार्गदर्शन व संरक्षण प्राप्त करण्यासाठी याला प्रमुख अट का बरे ठरविले आहे? अदृश्य काय आहे? जसे मनुष्यात प्रामुख्याने, पाच मुख्य इंद्रिय असतात   ( ऐकणे, दृष्टी, गंध, चव आणि स्पर्श ) ज्या  गोष्टी  आपल्या या इंद्रियांपासून कळतात, अश्या गोष्टीं बद्दल कोणतेही वाद नाही, कारण आपण त्या वस्तू पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो, स्वाद घेऊ शकतो आणि गंध करू शकतो. अगदी तसेच आपण अदृश्य भावनांना सामोरे जाऊ शकत नाही व त्याची अनुभुती करु शकत नाहीत. 
    याव्यतिरिक्त आपल्याकडे  ज्ञानेंद्रियांच्या  क्षमतेशिवाय  अनेक अशा क्षमता आहेत ज्या आपल्याला गोष्टी समजून घेण्यास, अनुभुती करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ,जेंव्हा तुम्हाला भूक लागते तेंव्हा तुम्ही भुकेले आहात हे तुम्हांला कोणते इंद्रीय  सांगत आहे? कोणता इंद्रीय आपल्याला झोपेतून जाग आणतो? तसेच, स्त्रीला गर्भ राहिल्यास तो गर्भ तिच्या शरिराचा भाग असूनदेखील ती जाणू शकत नाही की तिच्या गर्भात काय वाढत आहे? म्हणून एक अदृश्य शक्ती जी आपल्या पाच इंद्रीयांना समजत नाही व दिसत नाही म्हणून ती उद्भवत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. म्हणून या (आयात) वचनात ज्या अदृश्य शब्दांचा उल्लेख आहे ते सर्व आपल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमते पलीकडचे आहे. 
    चला एक पाऊल पुढे जाऊया. जर एखाद्या विद्यार्थ्याला बीजगणितचे समीकरण सोडवण्यासाठी दिले गेले, आणि नंतर तो किंवा तीने सोडवून उत्तर काढले, तर आपण म्हणतो की या विद्यार्थ्याने अदृश्य शोधून काढले आहे? अजीबात नाही, कारण विद्यार्थ्यांनी ठराविक नियम आणि तत्त्वे यावर आधारित उपाय योजले व उत्तर काढले. त्याचप्रमाणे, हवामानशास्त्राच्या केंद्राने उद्या पावसाळा घोषित केला असेल, तर हवामानशास्त्रज्ञांनी अनदेखीचा खुलासा केला आहे का? पुन्हा, उत्तर नाही असेच आहे, कारण त्यांनी ज्ञान आणि संशोधनावर त्यांचे निष्कर्ष काढले आहेत. तसे नसल्यास कुठल्या मनुष्य /प्रेषित /अवताराने सूर्य पूर्वेकडुन पश्‍चिमेकडे उगविन्याचे धाडस दाखविले?  पृथ्वीवर पाऊसच पडला नाही तर मनुष्य समुद्र, विहीर, तलाव, नदी याची निर्मिती करु शकतो का? हे प्रश्‍न आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात की मनुष्य यासाठी असमर्थ आहे. म्हणून या कुरआनच्या (आयात) वचनात उल्लेख केलेल्या अदृश्य शब्दांचे अर्थ निष्कर्ष आणि संशोधन या ज्ञानाने काढता येत नाही. 
    आणि अखेरीस, जर एखाद्या मित्राने आपल्याला सूचित केले की आपला चोरीस गेलेला मोबाईल फोन अमक्याकडे  आणि अमूक ठिकाणी आहे, याचा अर्थ आपल्या मित्राला अदृश्य गोष्टीची माहिती आहे का? उत्तर नाही असेच आहे. तसे नसल्यास मनुष्य स्वत: व इतरांचे जन्म-मृत्यू सांगू शकतो का? अर्थातच नाही. कारण अदृश्य तुम्हाला किंवा तुमच्या सारख्या कोणालाही ज्ञात नाही. म्हणून या आयात (वचनात)मधील उल्लेखित ‘ अदृश्य’ शब्द आपल्यासाठी ज्ञात नाही. या अर्थानेच घ्यावा लागेल. 
    त्याचप्रमाणे, अगदी संदेष्टे (प्रेषित) आणि दूत यांना देखील अदृश्याबद्दल  ज्ञान व जाणिव नसते. खरं तर, अदृश्याचे ज्ञान अल्लाह  सर्वशक्तिमान वगळता कोणालाही नाही. आणि फक्त अल्लाहच स्वत: निवडतो ज्यास त्याला याचे ज्ञान द्यायचे आहे. कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो,”तो परोक्षाचा(अदृश्य) ज्ञाता आहे, आपले परोक्ष कोणावरही उघड करीत नाही” ( कुरआन 72:26).
    ’ त्या प्रेषिताखेरीज ज्याला त्याने (परोक्ष ज्ञान देण्यासाठी) पसंत केले असेल. तर त्यांच्या पुढे व मागे तो रक्षक ठेवतो’ (   कुरआन 72:27)
    ईश्‍वर त्याच्या ज्ञानापैकी काही  अंश आपल्या प्रेषितांना  सामायिक (शेअर) करतो आणि ते त्यांच्यासाठी पाठोपाठ जगात एक चमत्कार बनते. याचा अर्थ असा होत नाही एखाद्या प्रेषितांना परोक्षाचे पूर्ण ज्ञान आहे व आपण त्यांची उपासना करावी. कदापि नाही! !! ईश्‍वर पैगंबर मुहम्मद (स.) यांना कुरआनात म्हणतो, ”हे लोक तुम्हाला विचारतात की शेवटी ती पुनरुत्थानाची घटका अवतरणार तरी कधी? सांगा.” ”त्याचे ज्ञान माझ्या पालनकर्त्याजवळच आहे, तिला तिच्या वेळेवर तोच जाहीर करील. आकाशात व जमिनीत ती अत्यंत कठीण वेळ असेल, ती तुमच्यावर अकस्मात येईल.” हे लोक त्यासंबंधी तुम्हाला अशाप्रकारे विचारतात जणू काही तुम्ही तिच्या शोधात लागला आहात. सांगा, ”त्याचे ज्ञान तर केवळ अल्लाहला आहे पण बहुतेक लोक या सत्यापासून अनभिज्ञ आहेत.” ( कुरआन 7:187)
    ” हे पैगंबर (सल्ल.), यांना सांगा की, मी (अर्थात पैगंबर सल्ल.) स्वत:करिता कोणत्याही नफा तोट्याचा अधिकार बाळगत नाही, अल्लाहच जे काही इच्छितो ते होते आणि जर मला परोक्षाचे ज्ञान असते तर मी पुष्कळसे लाभ स्वत:साठी प्राप्त करून घेतले असते व मला कधीही एखादे नुकसान पोहचले नसते. मी तर केवळ एक खबरदार करणारा व खुषखबर ऐकविणारा आहे, त्या लोकांसाठी  जे  माझे  म्हणणे  मान्य  करतील. ”(कुरआन 7:188)
    अल्लाहवर विश्‍वास म्हणजे अदृश्य गोष्टींवर विश्‍वास ठेवण्याचे सर्वात उच्च स्वरूप, म्हणजे त्याचे स्वर्गदूत, ग्रंथ आणि न्यायाचा दिवस ह्यांवर विश्‍वास. जरी या सर्व गोष्टी आपल्यापासून पड्द्याआड ठेवल्या आहेत. तरी, आपण देवदूतांच्या उपस्थितीवर विश्‍वास करतो कारण अल्लाहने  त्यांच्या अस्तित्वाविषयी आपणास प्रेषित व ग्रंथाद्वारे सांगितलेले आहे. आम्ही पुनरुत्थानाच्या दिवसावरही(स्वर्ग-नर्क) विश्‍वास करतो कारण अल्लाहने याची पण माहिती आपणास दिलेली आहे.
    आता आणखी एका जिव्हाळ्याच्या गोष्टीचे उदाहरण बघूया. जे तुम्हाला अदृश्य ईश्‍वर कळण्यास मदत होईल. तुमच्या शरीरातील  आत्मा तुम्हाला जीवन प्रदान करतो. मग विचार करा तुम्ही तुमचे प्राण पाहीलेले आहे का? किंवा आपण त्याची चव घेउन पाहिली किंवा सुगंध घेतला किंवा त्याला स्पर्श करुन पाहिले आहे का? नक्कीच नाही! परंतु ईश्‍वराने आपल्या शरीराला जीवन देण्याच्या त्याच्या प्रभावामुळे आपल्याला आपल्या आत्म्याबद्दल कळणे शक्य झाले. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या  शरीरातल्या काही गोष्टी शोधणे आणि समजून घेणे कठीण व अशक्य  आहे, तर तुम्ही  तुमच्या इंद्रीयांमार्फत ईश्‍वराच्या अस्तित्वाची जाणीव कशा प्रकारे करू शकता? विचारात पडलात ना! परंतु, अल्लाहने आपण सर्वाना  असेच सोडून दिलेले नाही. आपणास विवेकशील मन  दिले आणी अनेक संकेत दिलेत जेणेकरून आपण त्यावर विचार करावा. अल्लाहने आपल्यासाठी (परिसरात) आजूबाजूला अशी चिन्हे मांडली व दर्शविली आहेत. त्यांचे बारकाईने निरक्षण करा, जाणीव करा आणी निष्कर्षावर पोहोचा. या विश्‍वाचा एक निर्माणकर्ता आहे. इतके तंतोतंत व काटेकोरपणे निर्माण केलेली  निर्मिती योगायोगाने स्वत:हून निर्माण होऊ शकली असती का? उलट योगायोगाने स्वत:हून तयार झालेल्या  गोष्टी यादृच्छिक असंगठित अल्पायुषी असतात. जर विश्‍वाची निर्मिती आणि परिरक्षणामागे ब्रह्मरुप शक्ती नसली असती तर सूर्य, चंद्र, तारे आणि पृथ्वी एकमेकांपासून दुभंगले असते आणि एक निर्मात्या विना, जीवन आणि संपूर्ण प्रणाली नष्ट झाली असती.
    वरील उदाहरणांवर विचार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा पूर्ण उपयोग केलेला आहे आणि मी या निष्कर्षावर पोहचले आहे की या विश्‍वाची तंतोतंत व काटेकोर निर्मिती, त्यातले जीवन आणि सौंदर्य फक्त आणि फक्त अल्लाह/परमेश्‍वर  मुळेच आहे व फक्त तोच या विश्‍वाचा निर्माता आहे. म्हणून जर प्रेषित सल्ल. यांनी  आपल्याला सांगितले की अल्लाह (एकेश्‍वरत्व) हाच विश्‍व निर्माण करणारा आहे आणि  चमत्कारांचा दावा करीत आहे तर आपण त्याच्यावर विश्‍वास ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमच्या मनात ही निश्‍चितता कायम होते तेव्हा तुमची श्रद्धा, तुमचे आचार-विचार सुद्धा हाच दावा करतात की अल्लाहकडून मिळणारे सर्वस्व हेच अंतिम सत्य आहे, आणि मी त्याच्याच नियमावलीच्या मार्गानुसार जीवन व्यतीत करेन. मग मला पर्वा नाही आपल्या संवेदनांना (नफ्स) ते समजून घेऊ शकते किंवा नाही. पण आज मनुष्य त्याच्या हृदयावर  आपल्या संवेदनांचे आपल्या वाडवडिलांच्या विचारांचे व या दुनियावी आकर्षकतेचे आवरण घातले आहे व तो कळतनकळत पणे आपल्या अदृश्य ईश्‍वराला विसरून गेला आहे. कारण तो आज सर्वात जास्त भीती बाळगतो त्याच्या मृत्यूची. त्यामुळे तो याच संभ्रमात पडलाय की हेच अंतीम जीवन आहे. पण हे जीवन तर क्षणभंगुर आहे. ईश्‍वर म्हणतो ’ आणि हे लौकिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते (कुरआन 29:64.) 
    जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांना सोडून दूर राहतो तेव्हा आपल्याला पदोपदी त्याना भेटण्याची आस लागते व त्यांच्या गैरहजेरीत आपण त्यांची आठवण व त्यांचा आदर म्हणून त्यांच्या नियमांचे पालन करतो. हेच प्रेमाचे आवरण आपण आपल्या पालनकर्त्याविषयी का बाळगत नाही? का आपण मृत्युला घाबरतो? आपण का बरे विचार करत नाही की माझा मृत्यु हा शेवट नसून त्यानंतर माझ्या जीवनाची खरी सुरुवात आहे आणि तिथे मला माझ्या ईश्‍वराला भेटायचे आहे. ही विचारसरणी आपणास मृत्युची भीती बाळगू देत नाही तर ईश्‍वराविषयी प्रेम निर्माण करते व त्याच्या नियमाचे पालन करण्यास भाग पाडते . ईश्‍वराची सदैव इच्छा हीच आहे की त्याचे भक्त श्रद्धा-विचार-आचारणाने चांगले बनावेत व मृत्युनंतर स्वर्गात जावेत. 
    अशाप्रकारे, जोपर्यंत कुठलाही मनुष्य परोक्षावर श्रद्धा ठेवत नाही व न्यायाच्या दिवसाचे भय बाळगत नाही तोपर्यंत तो मोमीन बनू शकत नाही. ईश्‍वर म्हणतो, ’ त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही.’  ( कुरआन 2:281)
    उर्वरित गुण पाहूया पुढील लेखात.


- सीमा देशपांडे
7798981535

माननीय मुआविया बिन हकम सुलमी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर नमाज अदा करीत होतो, इतक्यात एका मनुष्याला शिंक आली तेव्हा मी  नमाज संपताच ‘‘यरहमुकल्लाह’’ म्हटले तेव्हा लोक माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणालो, ‘‘अल्लाह तुम्हाला आयुष्य प्रदान करो. तुम्ही सर्वजण मला का पाहात आहात?’’ त्या लोकांनी  मला गप्प राहण्यास सांगितले तेव्हा मी गप्प झालो. जेव्हा पैगंबरांची नमाज पूर्ण झाली, (माझे माता-पिता पैगंबरांवर कुर्बान) मी पैगंबरांपेक्षा उत्तम शिक्षण-प्रशिक्षण करणारा न भूतो न  भविष्यती पाहिला. पैगंबर मला रागावले  नाहीत, त्यांनी मला मारले नाही की मला वाईट बोललेही नाहीत, फक्त इतकेच म्हटले, ‘‘ही नमाज आहे, यात बोलणे योग्य नाही. ‘नमाज’  नाव आहे अल्लाहचे पावित्र्य वर्तविण्याचे, त्याचे श्रेष्ठत्व सांगण्याचे आणि कुरआनचे पठण करण्याचे.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका खेडुताने मस्जिदमध्ये लघुशंका केली तेव्हा लोक त्याला मारण्यासाठी धावले तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘त्याला सोडून  द्या. त्या ठिकाणी एक डोल पाणी ओतून स्वच्छ करा. दीनला लोकांसाठी सोपे बनविण्यासाठी आणि त्यांना दीन (इस्लाम) कडे आकर्षित करण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात आले आहे.  आपल्या अभद्र पद्धतीने लोकांसाठी दीनकडे येण्याचा मार्ग खडतर करावा, यासाठी तुम्हाला यासाठी अल्लाहने पाठविलेले नाही.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माननीय अबू मूसा (अ.) आणि मुआज यांना यमनला पाठविताना असा उपदेश केला होता की ‘‘यस्सिरा वला तुअस्सिरा व सक्किना वला  तुऩिफ्फरा.’’ तुम्ही दोघांनी तेथील लोकांसमोर ‘दीन’ (इस्लाम धर्म) इतक्या आकर्षकपणे सादर करा की तो त्यांना सोपा वाटावा. अशा पद्धतीचा अवलंब करू नका की लोकांना ‘दीन’  अवघड वाटावा आणि लोकांना तुमचा स्वभाव प्रेमळ वाटावा, त्यांना कसल्याही प्रकारची इजा पोहोचवू नका आणि त्यांना भडकवू नका.’’

माननीय मालिक बिन हुवैरिस (रजि.) यांच्या कथनानुसार,
आम्ही काही समवयस्क तरुण ‘दीन’ (इस्लाम धर्म) चे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आलो होतो. येथे आम्ही वीस दिवस राहिलो. पैगंबर अतिशय दयाळू व  मृदु स्वभावाचे होते. पैगंबरांना वाटू लागले की आम्ही सर्वजण घरी जाऊ इच्छित आहोत. तेव्हा पैगंबरांनी आम्हाला विचारले, ‘‘तुमच्या मागे (कुटुंबात) कोण कोण आहेत?’’ आम्ही  उत्तर दिले तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘आपल्या मुलाबाळांमध्ये परत जा आणि जे काही तुम्ही ज्ञान प्राप्त केले आहे त्यांना शिकवा. त्यांना चांगल्या गोष्टी सांगा आणि समृद्ध व्हा, नमाज  वेळेवर अदा करा आणि अमुक नमाज वेळेवर अदा करा.’’ (एका हदीसमध्ये असेही आढळून येते की ‘‘आणि तुम्ही मला ज्या पद्धतीने नमाज अदा करताना पाहिले आहे त्याच पद्धतीने  तुम्हीदेखील अदा करा.’’) आणि जेव्हा नमाजची वेळ होईल तेव्हा तुमच्यापैकी एकाने अजान द्यावी आणि जो तुमच्यापैकी ज्ञान व चरित्राच्या दृष्टीने श्रेष्ठ असेल त्याने ‘इमामत’  (नमाजचे नेतृत्व) करावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

 - डॉ. इल्तिफात अहमद
मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. समाज त्याची गरज आहे. समाजाला संघटित करण्यासाठी काही कायदे व नियम आवश्यक आहेत, त्यांना मराठी व हिंदीत `जीवन सिद्धान्त' इग्रंजीत `वे ऑफ लाईफ' आणि अरबीत `दीन' म्हणतात.
जीवनमार्ग (दीन) समाजाची सर्वात मोठी आवश्यकता आहे. चांगला असेल तर पूर्ण समाज चांगला असतो. चांगला जीवनमार्ग म्हणजे काय आणि तो कोण बनवितो या विषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तिकेत आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 35      -पृष्ठे - 24         मूल्य - 10           आवृत्ती - 4 (2012)डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/ij4ctjm5esnww0bcre8wnow7v1n3al44

- आर. एस. विद्यार्थी
या पुस्तिकेत दलित वर्गाच्या ज्वलंत मूळ प्रश्नांचे समाधान प्रस्तुत करून अचूक व कायम स्वरूपी मार्गदर्शन करण्यात आले आहे. यासाठी एक सशक्त, साहसी व यथार्थवादी आणि अत्यंत यथार्थवादी दृष्टिकोन स्वीकारला गेला आहे.
लेखक आर. एस. विद्यार्थी यांनी सलग दहा वर्ष भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश कार्यकारणीचे अध्यक्ष पद भूषविले आहे. या पुस्तिकेत डॉ. बाबासाहेब द्वारा निरूपित व निर्धारीत उद्देश प्राप्त करण्यासाठी ही पुस्तिका निश्चितच सहाय्यक सिद्ध होईल.

आयएमपीटी अ.क्र. 36   -पृष्ठे -32    मूल्य - 16  आवृत्ती - 9 (2013)


डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/zehin6cffa2rfnqj1nc7jzpb6iuszuen

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget