August 2018

दिव्य कुरआनची शिकवण आहे की, मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे.
‘‘मी ‘मानव’ आणि ‘जिन’ यांना केवळ आपल्या उपासनेकरिताच निर्माण केले!’’ (दिव्य कुरआन)
ईश्वराने जगात जेवढे प्रेषित पाठविले ते केवळ याच उद्देशांसाठी की, मानवास ईश्वराच्या उपासनेची शिकवण द्यावी.
‘‘अल्लाहचीच उपासना करा आणि सैतानापासून दूर राहा.’’ (दिव्य कुरआन) 
आता आपणा सर्वांना हे जाणून घेणे आवश्यक आहे की, उपासना म्हणजे नेमके काय? तसेच इस्लामने आपल्यावर ज्या उपासना व आराधना अनिवार्य ठरविल्या त्यांचा मूळ आत्मा काय आहे? जर या बाबी आपण जाणून घेतल्या नाहीत, तर ज्या उद्देशपूर्तीसाठी आपण जन्म घेतला, तो उद्देश पूर्ण होणे शक्यच नाही.
उपासनेची अज्ञानी कल्पना
इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ केवळ भक्ती (Worship) नसून तो ‘दासत्व’ (Obediance) या अर्थात व्यापलेला आहे. उपासनेचा अर्थ केवळ भक्तीपुरता मर्यादित ठेवणे ही अज्ञानी कल्पना आहे. अज्ञानी समुदायाचे लोक असे समजत असतात की, ज्याप्रमाणे मोठी माणसे सरदार, प्रमुख अथवा राजे-महाराजे स्तुती केल्याने प्रसन्न होतात, भेटवस्तू दिल्याने मेहेरबान होतात, त्यांच्यासमोर हात जोडल्याने व नतमस्तक होण्यामुळे ते आपल्यावर कृपा करतात, तेव्हा अशाच पद्धतीने त्यांच्याकडून आपली कामे करून घ्यावीत, नेमक्या अशाच तऱ्हेने त्यांच्या उपास्याची आपल्या उपासकांकडून अपेक्षा व मागणी असते. आपल्या उपासकाचीसुद्धा दोन्ही हात जोडून, नतमस्तक होऊन व अजीजी करून त्यास प्रसन्न करावे आणि आपली मागणी पूर्ण करून घ्यावी. याच कल्पनेच्या आधारावर अज्ञानी धर्मांमध्ये काहीं विशेष पूजापाठ व कर्मकांडांना ‘उपासना’ असे नाव देण्यात आले आहे.
उपासनेची वैराग्यात्मक कल्पना
त्याचप्रमाणे इस्लाममध्ये उपासनेचा अर्थ असासुद्धा नाही की, मानवाने व्यावहारिक जीवनाचा त्याग करून संन्यास घ्यावा आणि केवळ ईशभक्तीत रममान व्हावे, ध्यानस्थ वा समाधिस्थ (Madiation) व्हावे, आपल्या इच्छा, आकांक्षा आणि गरजांना दाबून ठेवावे (Self Annihilation) व घोर तपश्चर्या करून (Spritual Exersises) आपली आत्मिक शक्ती वाढवावी अथवा साक्षात्कार आणि चमत्कारांची शक्ती आपल्यात निर्माण करावी. तसेच या व्यावहारिक जीवनाचा अर्थात संसाराचा त्याग करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी. उपासनेची ही कल्पना संन्यासी अथवा वैराग्य दृष्टिकोनावर आधारित आहे. या प्रकारात धर्म आणि सामाजिक जबाबदाऱ्या व व्यावहारिक जीवन हे आपसांत अगदी परस्पर विरुद्ध बाबी ठरतात. संसाराच्या जवाबदाऱ्या आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा मार्ग शोधणे अथवा पळ काढणे म्हणजे उपासना असा हा विचित्र दृष्टिकोन आहे. कारण या दृष्टिकोनामध्ये आत्मिक विकासाकरिता भौतिकतेतून मुक्त होणे वा सन्यास घेणे अनिवार्य आहे.
उपासनेची इस्लामी कल्पना
इस्लामच्या दृष्टिकोनात उपासनेची कल्पना उपरोक्त दोन्ही कल्पनांपेक्षा अगदीच भिन्न आहे. इस्लामचा दृष्टिकोन आहे की, मानव हा एकमेव ईश्वराचा दास आहे. मानवाचा निर्माता, पालनकर्ता आणि स्वामी केवळ एकमेव ईश्वरच आहे. ईश्वराने मानवास या भूतलावर आपला प्रतिनिधी नेमला आहे. त्याला काही जवाबदाऱ्या, अधिकार व महत्त्वपूर्ण सेवा प्रदान केल्या आहेत. मानवाचे कर्तृत्व म्हणजे आपला स्वामी अर्थात एकमेव ईश्वराचा उद्देश पूर्ण करणे, आणि आपल्या जवाबदाऱ्यांची जाण ठेवून कर्तव्य पूर्ण करणे, तसेच आपली शक्ती व अधिकार आपल्या वास्तविक स्वामीच्या कायद्यांनुसार आणि मजीनुसार वापरणे होय. मानवाच्या यशाचे रहस्य हे या गोष्टीत दडले आहे की, त्याने या ऐहिक जीवनात प्रयत्नांची पराकाष्ठा करून व प्राण पणाला लावून आपले कर्तव्य आणि जवाबदाऱ्या पूर्ण कराव्यात आणि इमानेइतबारे आपल्या एकमेव स्वामी असलेल्या ईश्वराच्या आदेश व कायद्यांचे पालन करावे. आपल्या कर्तव्यपूर्तीची मुदत पूर्ण झाल्यावर जेव्हा तो आपल्या एकमेव स्वामी ईश्वरासमोर आपल्या कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठी उभा राहील, तेव्हा त्याच्या जीवनकार्यावरून हे सिद्ध होईल की, तो कर्तव्याची जाण असलेला आणि ईश्वराचा आज्ञाधारक एक दास होता. इस्लामच्या या स्पष्ट दृष्टिकोनानुसार उपासनेची हीच वास्तविकता आहे. उपासनेच्या उपरोक्त दोन्ही कल्पनांशी इस्लामी उपासनेचा कवडीमात्र संबंध नाही. जो माणूस थोडासा वेळ काढून भक्ती केल्यानंतर असे समजतो की, मी आपल्या उपास्याचा हक्क पूर्ण केला आणि मोकळा झालो, आता आपल्या व्यावहारिक जीवनात वाटेल तसे वागण्यास मुक्त आहे. त्याचे उदाहरण असे आहे, जणू एखादा असा कर्मचारी ज्याला तुम्ही चोवीस तासांकरिता चाकरीवर ठेवले आणि पूर्ण पगार देऊन त्याचे पालनपोषण करीत आहात, परंतु तो कर्मचारी केवळ सकाळी व संध्याकाळी येऊन तुम्हास साष्टांग नमस्कार घालून जातो, तुमच्या चरणात फुले वाहून जातो आणि मग इतर वेळेत टवाळक्या करीत फिरतो अथवा दुसऱ्याची चाकरी करीत राहतो. याचप्रमाणे जो माणूस जगामध्ये व्यावहारिक जीवनातून व जवाबदाऱ्यांतून पळ काढतो आणि सांसारिक जवाबदाऱ्या सोडून एकांतात जाऊन आपला पूर्ण वेळ नमाज पढण्यात व ईश्वराचे नामस्मरण करण्यात घालवतो, त्याचे उदाहरण असे आहे की, जणू एखाद्या माणसास तुम्ही आपल्या बागेच्या रखवलीकरिता नियुक्त केले, परंतु तो बागेची राखण न करता व तेथील कामकाज न करता सकाळ ते संध्याकाळ व संध्याकाळ ते सकाळपर्यंत तुमच्या समोर हात बांधून उभा आहे व तुमच्या स्तुतिगाणात चोवीस तास तल्लीन आहे आणि बागेसंबंधी तुम्ही त्यास जी कामे सोपविली होती, त्या कामांची रुपरेखा मोठ्या आनंदाने तुमच्यासमोर केवळ पठण करीत आहे आणि त्या आदेशांनुसार मुळीच कोणतेही काम करीत नाही, अशा माणसाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटेल ? अर्थात तुम्हाला जे वाटेल, तीच भूमिका व दृष्टिकोन इस्लामचा आहे. अशा कर्मचाऱ्यांशी तुम्ही जे वर्तन कराल, तेच वर्तन अशा चुकीच्या कल्पनेनुसार उपासना करणाऱ्यांशी ईश्वर करील.
इस्लामचा उपासनेविषयी दृष्टिकोन असा आहे की, मानवाचे संपूर्ण जीवन ईश्वराच्या दासत्वात ((Whole time Servant)वा त्याच्या आदेशपालनात व्यतीत व्हावे. त्याने स्वतःस कायमस्वरुपी आणि प्रत्येक क्षणी ईश्वराचे दासत्व करायला हवे. अर्थात या जगामध्ये प्रत्येक बाब, प्रत्येक कार्य व प्रत्येक कृती ईश्वराने प्रदान केलेल्या कायद्यानुसार करावे. आपले झोपणे-जागणे, खाणे-पिणे, चालणे-फिरणे, अशाप्रकारे सर्वकाही ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार असावे. ईश्वराने ज्या संबंधात मानवास बांधले आहे, त्या सर्वांत तो बांधील असून हे संबंधसुद्धा ईश्वराच्याच मर्जी व कायद्यानुसार असावेत. ईश्वराने ज्या सेवा आणि कर्तव्य मानवास सोपविले आणि व्यावहारिक जीवनात ज्या जवाबदाऱ्या त्याच्यावर टाकल्या आहेत त्या ईश्वराच्या कायद्यानुसार स्वखुषीने पार पाडाव्यात. ईश्वराचा हा कायदा त्याने प्रेषितांच्या माध्यमाने मानवास प्रदान केला. मानवाने प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्य व कृतीस ईश्वराप्रती आपली जवाबदारी समजावी आणि याची पूर्णतः जाणीव ठेवावी की, आपल्या प्रत्येक कृती वा कार्याचा आपणास ईश्वरासमोर जाब द्यावा लागणार आहे. आपल्या घरी पत्नी व मुलाबाळांशी, गल्ली वा मोहल्ल्यात आपल्या शेजार-पाजाऱ्यांशी, आपल्या सोसायटीत वा समाजात मित्र-मंडळींशी, आपल्या व्यवहारात संबंधितांशी वर्तन करतेवेळेस प्रत्येक बाबीत आणि प्रत्येक कामात ईश्वराने निश्चित केलेल्या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये, याची खबरदारी घ्यावी. जेव्हा आपण रात्रीच्या काळोखात असू आणि आपल्याला पाहणारा पण कोणीच नसेल, अगदी अशा वेळीसुद्धा कोणतेही वाईट कर्म करताना याची प्रखर जाण असावयास हवी की, ईश्वर आपल्याला पाहात आहे. जेव्हा आपण एखाद्या जंगल अथवा अरण्यातही असू आणि ईश्वरीय अवज्ञा किवा अपराध करण्याची पुरेपूर संधी प्राप्त असेल, तसेच त्या ठिकाणी आपल्या अपराधाची साक्ष देणारासुद्धा कोणीच नसेल व कोणी अटक करणारा पोलीससुद्धा नसेल, अशा वेळीसुद्धा आपल्याला या गोष्टीची जाणीव असावी की, आपल्या अपराधाची कोणी साक्ष देवो अथवा न देवो, पोलीस अटक करो अथवा न करो, ईश्वर मात्र आपले कर्म पाहात आहे आणि आपल्या या पापी कर्माचा ईश्वरास जाब द्यावा लागणार आहे. अशा प्रकारच्या ईशभयामुळे निश्चितच आपल्याकडून पातक कर्म घडण्याचे टळेल. अशा ईशभय अथवा ईशपरायणता किवा ईश्वराच्या नाराजीमुळे माणूस आपला मोठ्यात मोठा लाभसुद्धा सोडून देऊ शकतो. ज्या वेळी सत्य आणि इमानदारीमध्ये आपल्याला नुकसान उचलावे लागते, तेव्हा आपल्याला दुःख होण्याऐवजी या गोष्टीमुळे समाधान व शांती प्राप्त होते की, माझ्या सत्य व इमानदारीमुळे माझा ईश्वर माझ्यावर प्रसन्न होत आहे.
सांसारिक जीवन, व्यावहारिक जवाबदाऱ्या, मुलेबाळे सोडून एकांतात जाऊन बसणे, संन्यास व वैराग्य पत्करणे आणि ईश्वराच्या नावाचा जप करीत बसणे, ही मुळी उपासनाच नव्हे. उलट व्यावहारिक जीवनाच्या जवाबदाऱ्या आणि घर-परिवार ईश्वराच्या मर्जी व कायद्यानुसार सांभाळणे हीच मुळात उपासना होय. ईशस्मरण म्हणजे जगातील ज्या बाबी माणसाला ईशस्मरणापासून गाफील करतात त्यांतच रहावे आणि ईश्वराच्या ध्यान आणि स्मरणापासून गाफील होता कामा नये. ऐहिक जीवनामध्ये ईश्वरीय कायदा मोडून अर्थात बेईमानी करून वा बट्टेबाजी आणि लबाडी करून अमाप संपत्ती कमविण्याच्या संधी असतात. अन्याय व अत्याचार करून भौतिक सुख मिळविता येते. तसेच ईश्वरीय मर्जी आणि कायदा पाळल्यामुळे मोठमोठ्या फायद्यांच्या संधी गमावून बसावे लागते. अशा प्रसंगी ऐहिक सुखाच्या लाभास बळी न पडता मोठमोठ्या संधी ईश्वराच्या मर्जीवर बळी चढविणे हेच ईश्वराचे वास्तविक स्मरण करणे होय. अशा प्रकारच्या व्यवहारात ईश्वराचे अशा प्रकारे स्मरण करावे. सत्ता हाती आली तरी हे विसरता कामा नये की, मी मानवांचा स्वामी अथवा उपास्य अगर ईश्वर नसून त्या सर्वशक्तिमान ईश्वराचा केवळ दास आणि सेवक आहे. न्यायदानाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यास एखाद्यावर अन्याय करण्याची शक्ती हाती आली असली तरी, हे विसरता कामा नये की, ईश्वराने माझ्यावर न्याय करण्याची जवाबदारी सोपविली आहे. या भूतलावरील अफाट भौतिक संपत्ती आणि भौतिक शक्ती हाती आली तरी, ही वास्तविकता विसरता कामा नये की, मी या संपत्ती आणि शक्तीचा मूळ मालक नसून केवळ रक्षक व अनामतदार आहे व मला एक-एक पैशाचा ईश्वरास हिशेब द्यावा लागणार आहे. कारण भूतलावरील समस्त संपत्तीचा वास्तविक स्वामी हा एकमेव ईश्वरच आहे. लष्कराचे प्रमुख असले तरी, ईश्वरासमोर जाब देण्याची जाणीव तुम्हाला शक्तीच्या तंद्रीत वा मस्तीत येऊन दुर्बलांवर अन्याय करण्यापासून परावृत्त ठेवील. राज्यकारभाराचे कठीण कार्य हाती आल्यावरसुद्धा सत्य, न्याय आणि सत्यसमर्थनाच्या कायमस्वरूपी ईश्वरीय नियमांच्या खडतर मार्गावर चालून दाखवावे. व्यवसाय, वित्त आणि उद्योगधंद्यात खुशाल प्रगती करावी, परंतु या प्रगतीच्या माध्यमांत पवित्र आणि अपवित्र अथवा वैध आणि अवैध बाबीमध्ये फरक ओळखून वैध मार्गाचाच अवलंब करावा. तुमच्या जीवनमार्गात प्रत्येक पावलावर निषिद्ध कमाई किवा अवैध बाबी अत्यंत सुंदर आणि मोहक स्वरुपात तुम्हास मोहिनी घालतील, परंतु तुम्ही त्या मोहिनीच्या आहारी जाता कामा नये, तुमची पावले डगमगता कामा नये. चोहीकडे अन्याय, अत्याचार, धोकेबाजी आणि व्यभिचाराचे मार्ग तुम्हास अगदी मोहक स्वरुपात आकर्षित करतील, ऐहिक आणि भौतिक सुखवस्तू यशाच्या स्वरुपात तुमच्यासमोर लोटांगण **घालतील, व्यभिचार आणि स्वैराचार आधुनिक प्रगतीचे रूप व सोंग घेऊन तुमच्यावर भुरळ टाकतील, परंतु तुमच्या अंतःकरणात ईश्वराचे स्मरण आणि त्याच्या समोर जाब देण्याच्या जाणिवेने तुम्ही या संपूर्ण अवैध बाबींचा त्याग कराल. ईश्वरीय कायदा स्थापन करण्याच्या मार्गात अगणित संकटे आणि समस्या दिसू लागतील, सत्याची कास धरण्यात आणि न्याय व सत्यावर तटस्थपणे कायम राहण्यात प्राण व संपत्तीचे नुकसान होताना दिसेल, तसेच ईश्वरीय कायदा आणि मर्जीनुसार जीवन जगण्याकरिता समस्त विश्वाचे वैर ओढवून घेण्यासमान असेल, परंतु तुमच्या उद्दिष्टाच्या अथांग सागरात किचितही हेलकावा येता कामा नये. अर्थात हीच आहे वास्तविक उपासना, याचेच नाव आहे ईश्वराचे स्मरण, हीच ती ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण आहे, ज्याच्याकडे दिव्य कुरआनाने अंगुलीनिर्देश करून म्हटले आहे की,
‘‘नमाज संपल्यावर भूतलावर अल्लाहची कृपा (उपजीविका) प्राप्त करा आणि अल्लाहचे स्मरण करा, जेणेकरून तुम्हास यश मिळावे.’’ (दिव्य कुरआन)

राष्ट्र म्हणून प्रत्येक मुस्लिमाचे जीवन हे इस्लामची साक्ष देण्यासाठी आहे. म्हणून या प्रकारचे जिहादचे महत्त्व अत्याधिक आहे. साक्ष देण्याच्या पुराव्यापेक्षा या जिहादचे महत्त्व अधिक आहे. जोपर्यंत इस्लामला दुसऱ्यापर्यंत योग्यरित्या पोहचविला जात नाही तोपर्यंत इस्लामची साक्ष देण्याचे कार्य पूर्णत्वाला पोहचत नाही. म्हणून साक्षीच्या सर्व आवश्यकतेनुसार इस्लाम दुसऱ्यापर्यंत पोहचला पाहिजे. इस्लामबद्दलचे गैरसमज आणि अप्रचारांना समर्पक उत्तरे दिली पाहिजेत. इस्लामची साक्ष देणे हे काही गुपित कावा अथवा गुप्त कार्य अजिबात नाही. इस्लाम जरी एक आहे तरी त्याचे विरोधक अनेक आहेत. इस्लामच्या तोंडओळखीसाठी एखादे व्याख्यान अथवा संभाषण पुरेसे आहे. परंतु इस्लामची साक्ष देणे हे यापेक्षा वेगळे आहे. त्याचे महत्त्व इस्लामची औपचारिकरित्या तोंडओळख करून देण्यापेक्षा अधिक पटीने जास्त आहे. ज्यांच्यासमोर इस्लामची साक्ष देण्यात येते ते लोक परधर्मिय असतात. त्यांची श्रध्दा वेगळ्या तत्त्वांवर, धर्मांवर, परंपरांवर आणि वेगळ्या राजकीय पध्दतीवर असते आणि मुस्लिमांना त्यांच्यासमोर इस्लामची साक्ष द्यावी लागते. इस्लामची साक्ष निरनिराळ्या आघाड्यांवर देणे जिकीरीचे आणि त्रासदायक कार्य आहे. या युध्दात कोणकोणत्या प्रकारची शस्त्र, अस्त्र वापरावयाची! किती कठीण आहे ही मोहीम सर करणे! शारीरिक अथवा सशस्त्र जिहाद एका विशिष्ट स्थितीत लढले जाते. परंतु या प्रकारच्या जिहादमध्ये विशिष्ट प्रकारचे वातावरण, वेळ-काळ अथवा परिस्थिती मुळीच नसते. हा अविरत चालणारा संघर्ष आहे. हे असे कर्तव्य आहे जे सदासर्वकाळ आणि कोठेही व कधीही पार पाडावे लागते. हे अंतहीन कार्य आहे. या कार्याला शेवट कधीच नसतो. जोपर्यंत सशस्त्र जिहाद करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत हा जिहाद सतत चालू राहतो.
इतिहास साक्ष आहे की अनेक प्रेषितांचे आयुष्य या प्रकारच्या जिहाद करण्यातच पार पडले परंतु सशस्त्र जिहाद करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. या प्रकारचा जिहाद हा खरा जिहाद आहे. यात बाहेरच्या जगाशी अविरत वैचारिक, बौध्दिक संघर्ष चालूच राहतो. सशस्त्र जिहाद हा विशिष्ट निकडींचा परिणाम आहे. इस्लामचे निमंत्रण देणे आणि इस्लामची साक्ष देणे यांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये अल्लाहच्या श्रेष्ठत्वाची आणि सार्वभौमत्वाबद्दलची जागृती निर्माण करणे आहे. तसेच लोकात श्रध्देला प्रज्वलित करणे आहे. श्रध्देला दुसऱ्यामध्ये प्रज्वल्लित करण्यासाठी आपापसातील सुसंवाद, बुध्दीविवेकाची गरज आहे तलवारीची नव्हे! इस्लामच्या निमंत्रण मार्गातील अडथळे दूर करण्यासाठीच तलवार उगारली जाते.
या प्रकारचा जिहाद अल्लाहला अतिप्रिय आहे. अल्लाहने यास ‘‘माझी मदत’’ म्हणून संबोधले आहे आणि जे त्या जिहादमध्ये सामील आहेत त्यांना ‘‘माझी मदत करणारे’’ म्हणून संबोधले आहे. कुरआन दिव्योक्ती आहे,
‘‘हे लोक हो ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे, ‘‘अल्लाहचे सहाय्यक’’ बना ज्या प्रकारे मरयमपुत्र ईसाने हवारींना उद्देशून सांगितले होते, ‘‘कोण आहे अल्लाहकडे (बोलविण्यात) माझा सहायक?’’ आणि हवारींनी उत्तर दिले होते, ‘‘आम्ही आहोत अल्लाहचे सहाय्यक.’’ त्या वेळी बनी इस्त्राईलच्या एका गटाने श्रध्दा ठेवली आणि दुसऱ्या गटाने इन्कार केला. मग आम्ही श्रध्दावंतांचे त्यांच्या शत्रुविरुध्द समर्थन केले आणि तेच विजयी ठरले.’’ (कुरआन ६१: १४)
हे सर्वश्रुत आहे की येशुचे आमंत्रण कार्य शारीरिक अथवा सशस्त्र जिहाद करण्याच्या स्थितीत कधीच पोहचले नाही. त्यामुळे ते आमंत्रण फक्त प्रचार आणि बुध्दीविवेकास आवाहन करण्यापर्यंत सीमित होते. तरीपण त्यांच्या त्या अविरत संघर्षामुळे येशूचे अनुयायींना (हवारी) अल्लाहचे सहाय्यक म्हणून संबोधले गेले आहे. याचाच अर्थ हा होतो की ही अत्यंत नामांकित उपाधी त्यांना याच कारणाने बहाल केली गेली की त्यांनी अल्लाहच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यास अविरत प्रयत्न केला. त्यांनी या कार्यास पूर्ण न्याय दिला. ‘अल्लाहचे सहाय्यक’ ही अत्यंत नामांकित उपाधी त्यांना त्याच वेळी बहाल करण्यात आली जेव्हा त्यांनी आपल्या पूर्ण शक्तीनिशी, संधी आणि बुध्दीनिशी दुसऱ्यापर्यंत अल्लाहचा धर्म विपरित स्थितीत मोठ्या धैर्याने आणि संयमाने पोहच केला आणि संकटांच्या वावटळांना न घाबरता अथवा शांत न बसता अविरत प्रयत्नशील राहिले. हा काही मानवी बुध्दीचा अनुमान अथवा कल्पना नाही तर ही उपाधी अल्लाहच्या दिव्य प्रकटनाद्वारे कुरआनने बहाल केलेली आहे. कुरआनचा अध्याय ‘आले ईमरान’मध्ये यावर आणखी खुलासा आलेला आहे. प्रेषित येशू (अ.) यांनी तेव्हाच हे शब्द उच्चारले आहेत जेव्हा त्यांच्या श्रोतेगणांना बनीइस्त्राईलच्या लोकांनी शेवटी नाकारले आणि येशूविरुध्दच्या यांच्या कारवाया शिगेला पोहचल्या. कुरआनोक्ती आहे,
‘‘जेव्हा ईसा (अ.) ला जाणवले की बनी इस्त्राईल नाकारण्यामध्ये तत्पर आहेत तेव्हा त्याने सांगितले, कोण अल्लाहच्या मार्गात माझा सहायक बनेल? हवारीनी उत्तर दिले, आम्ही अल्लाहचे सहाय्यक आहोत, आम्ही अल्लाहवर श्रध्दा ठेवली, साक्षी राहा की आम्ही मुस्लिम (अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक होणारे) आहोत. स्वामी! जे फर्मान तू अवतरले आहेस, आम्ही त्याला मानतो आणि प्रेषिताचे अनुसरण स्वीकारतो. आमची नावे ग्वाही (साक्षी) देणाऱ्यांत समाविष्ट कर.’’ (कुरआन ३: ५३-५४)
वरील दिव्य प्रकटनावरून हेच सिध्द होते की ‘‘अल्लाहचे सहाय्यक’’ बनण्याचा निर्णय तेव्हाच घेतला जातो जेव्हा इस्लामचे निमंत्रण आणि साक्ष देण्याचे कार्य हे प्रचार प्रसार आणि बुध्दी विवेकांपर्यंत सीमित न राहता अशा स्थितीत पोहचते की संकटांवर संकटे कोसळणे सुरू होते. श्रध्दावंत तेव्हा तोंड बंद करून बसलेले नसतात परंतु संयमाने आणि धैर्याने अल्लाहचा संदेश (इस्लाम) लोकांपर्यंत पोहचवितात. तेव्हाच त्यांना ‘अल्लाहचे सहाय्यक’ म्हटले जाते. कारण अल्लाहच्या मार्गात अविरत संघर्ष हाच खरा जिहाद आहे. आणि यालाच ‘‘अल्लाहच्या धर्माला मदत’’ असे संबोधले आहे.
सशस्त्र जिहाद: कुरआन आणि हदीसमध्ये याबद्दलच्या जिहादचे फायदे आणि वैशिष्ट्यांचा उल्लेख अनेकदा आलेला आहे. त्यांचे आकलन केल्यानंतर कळते की उपासनेनंतर जिहाद अल्लाहला प्रिय आहे. जो विरोधकांच्या गराड्यात लोकांना सत्याकडे आमंत्रित करतो. अशा श्रध्दावंताना अल्लाहने ‘‘त्याचे सहायक’’ म्हटले आहे. जो या कार्यात आपल्या संपत्तीचा शेवटचा पैसासुध्दा खर्च करतो त्या व्यक्तीला अल्लाहने ‘‘त्याचे सहाय्यक’’ म्हणून न संबोधता ‘त्याचे प्रियजन’ म्हणून संबोधले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘अल्लाहला तर प्रिय लोक ते आहेत जे त्याच्या मार्गात अशा प्रकारे फळी बांधून लढतात जणू काय ते शिसे पाजलेली भींत असावेत.’’ (कुरआन ६१: ४)
या प्रेमाबद्दलचा खुलासा हदीसमध्ये आलेला आहे, ‘‘सीमेचे रक्षण रात्रंदिवस करणारे महिनाभर उपवास व नमाज अदा करणाऱ्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत.’’
‘‘स्वतःचे कर्तव्य आपल्या मृत्युपश्चात संपुष्टात येते परंतु त्या व्यक्तीचे उदाहरण वेगळे आहे जो युध्दात भाग घेताना मृत्यू पावतो. तो अल्लाहसाठी युध्द करत होता. त्याचे हे कर्तव्य कयामतपर्यंत वृधिंगत होणार.’’ (तिरमीजी)
‘‘ते जे जिहादमध्ये भाग घेतात आणि ते जे सतत उपवास ठेवतात, नमाज अदा करतात आणि कुरआन पठण करतात दोघांचे कृत्य सारखेच आहे जोपर्यंत धर्मयोध्दा युध्दातून परत येत नाही.’’ (मुस्लिम, बुखारी)
अल्लाहच्या मार्गात जिहाद करणारेच फक्त त्याच्या प्रसन्नतेचे, कृपेचे पात्र ठरतात, असे नाही तर अशा व्यक्तींनासुध्दा चांगले स्थान प्राप्त होते जे अप्रत्यक्षरित्या जिहादला मदत करतात. प्रेषितकथन आहे,
‘‘जो कोणी मुजाहिदला (धर्मयोध्दा) सहाय्य करील जणूकाही तो स्वतः जिहादमध्ये भाग घेत आहे आणि जो कोणी मुजाहिदच्या कुटुंबाकडे लक्ष देईल तर तोसुध्दा जणूकाही जिहादमध्ये प्रत्यक्ष भागच घेत आहे.’’ (मुस्लिम, बुखारी)
‘‘एका धनुष्यबाणामुळे अल्लाहने तीन लोकांचा स्वर्ग प्रवेश निश्चित केला. एक तो जो धनुष्यबाण अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी बनवतो, दुसरा तो जो प्रत्यक्ष युध्दात त्याचा वापर करतो आणि तिसरी व्यक्ती धनुष्यबाण योध्याला पुरविणारी आहे.’’ (अबु दाऊद)
जर कोणी धनुष्यबाण (युध्दसामग्री) बनवून जिहादसाठी पुरवठा करत आहे अशा व्यक्तीस अल्लाह उत्तम मोबदला देतो तर ती व्यक्ती जो प्रत्यक्ष युध्दात आपले घरदार सोडून भाग घेतो आणि अल्लाहसाठी आपले रक्त सांडतो आणि शेवटी अल्लाहसाठी मरण पत्करतो त्याच्यासाठी किती महान मोबदला असेल? कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जे लोक अल्लाहच्या मार्गात ठार झाले त्यांना मृत समजू नका, ते तर खरे पाहता जिवंत आहेत, आपल्या पालनकर्त्यापाशी उपजीविका प्राप्त करीत आहेत, जे काही अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले आहे त्यावर ते फार खूष आहेत आणि समाधानी आहेत.’’ (कुरआन ३: १६९-१७१)
येथे हे स्पष्ट केले पाहिजे की कुरआनने त्या मनमोहक वाक्यरचना आणि उपाधी उल्लेख त्यांच्यासाठी केला आहे जे अल्लाहच्या मार्गात हुतात्मे बनले आहेत. कुरआनची ही खास शैली आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,
‘‘जे स्वर्गात दाखल होतील नंतर ते पृथ्वीवर परत येण्याचे विचारसुध्दा मनात आणणार नाहीत जरी त्याला पृथ्वीवरील सर्वकाही त्याचे मालकीचे करून दिले तरी! परंतु हुतात्मा (शहीद) ची ही स्थिती नसणार. जेव्हा त्यांच्यावर अल्लाहची कृपादृष्टी होईल आणि त्याला बहुमानित केले जाईल तेव्हा त्याला वाटेल की दहा वेळा पृथ्वीवर परत जावे आणि दहावेळा अल्लाहच्या मार्गात शहीद व्हावे.’’ (मुस्लिम, बुखारी)
परलोकात हुतात्मा (शहीद) विशेष प्राविण्य आणि बहुमान प्राप्त करील. जो मृत्युपावतो त्याला आंघोळ घातली जाते व शुभ्रवस्त्र परिधान केले जाते. परंतु हुतात्म्याला (शहीद) आंघोळ घातली जात नाही की पांढरे शुभ्रवस्त्र गुंडाळले जात नाही. त्यांना त्याच रक्ताने माखलेल्या कपड्यात दफन केले जाते. माननीय अब्बास (रजि.) यांनी माहिती दिली आहे,
‘‘प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की हुतात्म्याजवळून शस्त्र काढून घ्यावे. आणि त्यास जसे आहे त्या स्थितीत दफन करावे रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी आणि रक्तबंबाळ शरीरासह.’’ (अबुदाऊद)
अशीच दुसरी हदीससुध्दा आहे. शहीदचे रक्त हे काही साधे रक्त नसते. याशिवाय इतर काहीही इतके पवित्र असूच शकत नाही. हे ते रक्त आहे की पावित्र्य आणि स्वच्छतेपेक्षा ते अधिक चांगले आहे. अल्लाहने त्यास मश्क अत्तराहून अधिक सुगंधित म्हटले आहे,
‘‘त्याचा रंग केसरसारखा आणि सुगंध ‘मश्क’ सारखा आहे.’’ (तिरमिजी)
कुरआन आणि हदीसनुसार हुतात्मा लोकांचा दर्जा परलोकात उच्च असतो. शारीरिक आणि सशस्त्र जिहाद हा उत्तम जिहाद आहे. ते एक श्रेष्ठतम धर्मनिष्ठेचे कृत्य आहे आणि अल्लाहच्या उपासनेचे उत्तम प्रकार आहे. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले की जिहादचा उत्तम प्रकार कोणता आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिले,
‘‘उत्तम जिहाद ते आहे जे अश्रध्दावंतांशी तन, मन, धनासह संघर्ष केला जातो.’’ (अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले की उत्तम व्यक्ती कोण आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिले,
‘‘श्रध्दावंतांपैकी उत्तम तो आहे जो अल्लाहच्या मार्गात तन, मन, धनाने संघर्ष करतो.’’ (बुखारी)
जो आपल्या तन, मन, धनाने अल्लाहच्या मार्गात संघर्ष करतो तो उत्तम श्रध्दावंत आहे. हे एक पवित्र आणि उत्तम कृत्य आहे आणि त्याचा मोबदला पुरेपूर दिला जातो. खालील हदीस स्पष्ट करीत आहे,
‘‘नरकाग्नी दोन प्रकारच्या डोळ्यांना स्पर्श करणार नाही. जो डोळा अल्लाहच्या कोपच्या भयाने अश्रु ढाळत राहते आणि दुसरे ते जे अल्लाहच्या मार्गात रात्रभर पहारा करतो.’’ (तिरमिजी)
‘‘जिहाद करताना जो धुराडा उडतो तो आणि नरकाचा धुर एकमेकात कधीच एकत्रित होणार नाहीत.’’ (तिरमिजी)
हुनैनच्या युध्दात अनस बिन अबी (रजि.) यांनी रात्रभर खिडीकडे टकलावून पहारा केला. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या समोर हजर झाले. तेव्हा प्रेषितांनी सांगितले,
‘‘तुम्ही स्वर्गाला तुमच्यासाठी आवश्यक बनवले. याच्यानंतर तुम्ही काहीसुध्दा सदाचार केला नाही तरी.’’ (अबु दाऊद)
बदरच्या युध्दात ज्यांनी भाग घेतला होता त्यांच्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) उमर (रजि.) यांचेजवळ म्हणाले, ‘‘तुम्हाला याची कल्पना नाही की अल्लाहने बदरच्या योद्ध्यांकडे पाहिले आणि म्हणाला जा आणि तुम्हाला जे आवडेल ते करा. मी तुम्हाला प्रसन्न झालो.’’ (बुखारी)
शारीरिक आणि सशस्त्र जिहाद अल्लाहजवळ अत्युच्च दर्जाचे कृत्य आहे. जर अल्लाहची भक्ती करणे हेच मुस्लिमांचे जीवनाचे ध्येय असेल आणि मुस्लिम राष्ट्राची उभारणी फक्त एकमेव उद्देशासाठी झाली आहे की त्याने संपूर्ण जगापुढे सत्याची साक्ष द्यावी. अशा स्थितीत या दास्यत्वापेक्षा चांगले दास्यत्व कोणते आणि या साक्षीपेक्षा जास्त चांगली साक्ष कोणती की ज्यात मुस्लिम आपला जीव पणाला लावतो? म्हणून हे अगदी उघड सत्य आहे की हेच श्रेष्ठतम दास्यत्व आणि अति मूल्यवान साक्ष आहे. दुसऱ्या शब्दांत जिहाद हे अगदी योग्य साधन आहे मुस्लिमांपुढील ध्येयप्राप्तीचे! जेव्हा मुस्लिम आपले आयुष्य ध्येयासाठी वेचतो तेव्हा त्याची अल्लाहसाठीची अत्युच्चतम आज्ञाधारकता आणि सत्याची साक्षी देण्याचे कर्तव्य पूर्णपणे पार पाडले जाते. स्वतःचे आयुष्य वेचून जीव पणाला लावणे हे शेवटचे कृत्य ध्येय प्राप्तीसाठीचे आहे. अशीच व्यक्तीही सत्याचा ध्वज वाहक आणि अत्यंत आज्ञाधारक सेवक ठरतो. याच कारणामुळे प्रत्येक मुस्लिम जो सत्याची साक्ष त्याच्या आचरणाने आणि व्याख्यानाने (कथनी आणि करनी) देतो तो धर्माचा साक्षी (शाहीद) असतो. परंतु उपाधी आणि उत्कृष्ट नावे यांचा मात्र फक्त त्याच लोकांशी संबंध आहे जे आपले जीव अल्लाहच्या धर्मासाठी पणाला लावतात. कारण ते आपली अंतिम गोष्ट (प्राण) सुध्दा इस्लामच्या साक्षीसाठी त्याग करतात. याच कारणामुळे धर्माची साक्ष देणारे ‘‘शाहीद’’ ही उपाधी अशा हुतात्म्यांनाच (शहीद) शोभून दिसते.
येथे हेसुध्दा स्पष्ट केले पाहिजे की धनसंपत्तीचा आणि जीवनाचा त्याग अल्लाहच्या मार्गात करणे हे व्यक्तीच्या श्रध्देचा अत्युच्च बिदू आहे. जेव्हा एखादी व्यक्ती अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी मृत्युला कवटाळतो तेव्हा श्रध्देचा कोणताही उच्चबिदू सर करण्याचा शिल्लक राहत नाही. यानंतर फक्त एकच बिदू (जागा) शिल्लक राहते ते म्हणजे प्रेषितांचे स्थान! उत्बा इब्ने अबुस सलमी (रजि.) यांच्यानुसार ‘‘प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जिहादमध्ये श्रध्दावंत हौतात्म्य पत्करतात त्यांचे तीन प्रकार आहेत. प्रथम जो आपल्या धनसंपत्ती आणि प्राणानिशी जिहादमध्ये शत्रुशी लढत राहतो आणि अंततः हौतात्म्य पत्करतो. अशा हुतात्म्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
‘‘हा खरा आणि शाश्वत हुताम्या (शहीद) आहे. हा शहीद अल्लाहच्या राजसिहासनाखालील छतामध्ये वास्तव्य करील. प्रेषित याच्यापेक्षा वेगळे फक्त त्यांच्या प्रेषित्वामुळेच असतील.’’ (दारीमी)
शारीरिक जिहादच्या धार्मिक महत्त्वाचा एक पैलू अद्याप अस्पष्ट आहे. कुरआनमध्ये शारीरिक जिहादबद्दल जो उल्लेख आला आहे त्यावरून हे कळते की या प्रकारच्या जिहादचे धार्मिक आणि राष्ट्रीय महत्त्व प्रत्येक वेळी एकसारखे नसते. एक वेळ हे फक्त शौर्याचे आणि श्रेष्ठ कार्य आहे तर दुसऱ्यावेळी हे कृत्य धार्मिक आणि श्रध्देची निशाणी ठरते. जर जिहादची घोषणा करण्याची आवश्यकता नाही त्या वेळी आणि काही लोक त्यासाठी पुरेसे असतात. अशी ही मिलेटरी सेवा अशा वेळेस श्रेष्ठ कार्य ठरते. जर कोणी इतर भाग घेत नसेल तर त्याला दोषी ठरविले जात नाही. कुरआनोक्ती आहे,
‘‘मुसलमानांपैकी ते लोक की जे एखाद्या निमित्ताविना घरी बसून राहतात व जे अल्लाहच्या मार्गात प्राण व संपत्तीनिशी जिहाद करतात, दोघांची स्थिती एकसारखी नाही. अल्लाहने बसून राहणाऱ्यांपेक्षा प्राण व संपत्तीनिशी युध्द करणाऱ्यांचा दर्जाश्रेष्ठ ठेवला आहे. असे अल्लाहने प्रत्येकासाठी भलाईचेच वचन दिले आहे परंतु त्याच्याजवळ जिहाद करणाऱ्यांच्या सेवेचा मोबदला बसून राहणाऱ्यांपेक्षा फार जास्त आहे. त्याच्यासाठी अल्लाहकडून मोठे दर्जे आहेत आणि क्षमा व कृपा आहे आणि अल्लाह मोठा माफ करणारा व दया करणारा आहे.’’ (कुरआन ४:९५-९६)
मुस्लिम राजाने अथवा नेत्याने (अमीर) जिहादची घोषणा केली तर ते अनिवार्य धार्मिक कृत्य आणि श्रध्देचे प्रमाण ठरते. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात जेव्हा काहींनी जिहाद घोषित झाल्यानंतरसुध्दा जिहादमध्ये सामील होण्यास आळस केला अशांना कुरआनमध्ये तंबी देण्यात आली आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! तुम्हाला झाले तरी काय की जेव्हा तुम्हाला अल्लाहच्या मार्गात निघण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा तुम्ही जमिनीशी खिळून राहिलात? तुम्ही पारलौकिक जीवनाच्या तुलनेत या जगातील जीवनाला पसंत केले आहे का? असे असेल तर तुम्हाला माहीत असावे की ऐहिक जीवनाचा हा सर्व सरंजाम पारलौकिक जीवनामध्ये फारच थोडा भरेल. तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभे करील.’’ (कुरआन ९: ३८-३९)
तसेच ज्यांनी बहाणा केला आणि जिहादमध्ये भाग न घेण्यासाठी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचेकडे विनंती केली अशा लोकांना उद्देशून कुरआनने तंबी दिली आहे,
‘‘हे पैगंबर (स.), अल्लाह तुम्हाला क्षमा करो, तुम्ही त्यांना परवानगी का दिली? (तुम्ही खुद्द त्यांना परवानगी द्यावयास नको होती) जेणेकरून कोण खरे आहेत, हे तुम्हावर उघड झाले असते व खोट्यांनादेखील तुम्ही ओळखले असते. जे लोक अल्लाहवर व अंतिम दिनावर श्रध्दा ठेवतात ते तर कदापि तुमच्याकडे अशी विनंती करणार नाहीत की त्यांना आपल्या जीवित व वित्तानिशी युध्द करण्यापासून माफ केले जावे. अल्लाह ईशपरायण लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो. अशी विनवणी तर तेच लोक करतात जे अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रध्दा ठेवत नाहीत, त्यांच्या हृदयात शंका आहेत आणि ते आपल्या शंकेतच द्विधाग्रस्त झाले आहेत.’’ (कुरआन ९: ४३-४५)
वरील आयतींवरून हे सिध्द होते की जिहाद जेव्हा अनिवार्य कार्य ठरते तेव्हा त्यात भाग न घेणे हे श्रध्दाहीनतेचे लक्षण आहे. या आयतींवरून हेसुध्दा कळून येते की अल्लाहच्या मार्गात जिहादसाठी प्रोत्साहित करणेसुध्दा श्रध्देचाच एक अंग आहे. युध्दाचा प्रसंग कधी येईल हे भाकित कोणीही करू शकत नाही. श्रध्दावंत त्यासाठी सतत तयार राहतो. तरी त्याची आंतरिक इच्छा ही प्रतिक्षा करू शकत नाही. मुस्लिम जर खरा श्रध्दावंत असेल तर तो नेहमीच जिहादसाठी तयारीत राहतो. जर परिस्थिती तशी उद्भवली आणि जिहाद पुकारले गेले तर असा मुस्लिम घरात स्वस्थ बसून राहत नाही. जिहाद (शारीरिक) आणि श्रध्देमधील नैसर्गिक संबंधांविषयी खालील हदीस स्पष्ट आहे,
‘‘जो व्यक्ती धर्मासाठी संघर्ष (जिहाद) करू शकला नाही किवा त्याविषयी मनात कधीही विचार आणला नाही तर तो अश्रध्देच्या स्थितीत मरण पावला.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वरील निर्णयानुसार मुस्लिम समाज त्याच्या इच्छेनुसार जीवन जगू शकत नाही जसे दुसरे जगतात. त्याची निर्मिती खास उद्देशासाठी झाली आहे. या उद्दात्त हेतुसाठी त्या समाजातील व्यक्तीने सर्वस्व पणाला लावणे अपेक्षित आहे. अशी व्यक्ती आपल्या ध्येयप्राप्तीपुढे सर्व काही किबहुना स्वतःचा जीवसुध्दा क्षुल्लक समजतो. खरा मुस्लिम समुदाय हा अशा लोकांचा समुदाय असतो जो समर्पणाची भावना उरी बाळगून असतो. अशा वैशिष्टयाशिवाय हा समाज इतर समाजासारखाच गणला जातो. तो मुस्लिम समाज नसतोच मुळी! ज्याच्यासाठी त्याची निर्मिती झाली आहे ते कर्तव्य पार पाडण्यास हा समाज असमर्थ ठरतो. कुरआनच्या निर्णय अशा समाजाविषयी या जगासमोर आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! जर तुमच्यापैकी कोणी आपल्या धर्मापासून पराङमुख होत असेल (तर खुशाल व्हावे) अल्लाह आणखी कित्येक लोक असे निर्माण करील जे अल्लाहला प्रिय असतील आणि अल्लाह त्यांना प्रिय असेल. जे श्रध्दावंतांसाठी मृदू आणि अश्रध्दावंतांसाठी कठोर असतील, जे अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्टा (जिहाद) करतील आणि कोणत्याही निर्भर्त्सना करणाऱ्यांच्या निर्भर्त्सनेला भिणार नाहीत. ही अल्लाहची कृपा आहे, तो ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो. अल्लाह सर्वव्यापी आहे आणि सर्वकाही जाणतो.’’ (कुरआन ५: ५४)
वरील दिव्य प्रकटणाचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. विशिष्ट गुणसंपन्न लोक अल्लाहला त्याच्या धर्मासाठी आवश्यक आहेत. त्यापैकी एक गुणविशेष आहे अल्लाहच्या मार्गात जिहाद करणे. ज्याच्याजवळ हा गुणविशेष नाही तो धर्माची सेवा आणि धर्माला सहाय्य करू शकत नाही आणि धर्माची साक्ष देऊ शकत नाही. जो मुस्लिम हे कर्तव्य पार पाडणार नाही. तो मुस्लिम राहूच शकत नाही याच कारणामुळे ‘‘धर्मात कर्तव्यपरायण’’ न राहणे म्हणजे ‘‘धर्मापासून तोंड फिरविणे’’ आहे. कुरआनने हा निर्णय सुरे तौबा मध्ये दिला आहे,
‘‘तुम्ही उठणार नाही तर अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल, आणि तुमच्या जागी दुसऱ्या एखाद्या समूहाला उभे करील.’’ (कुरआन ९: ३९)
मनुष्य अथवा समुदाय तेव्हाच आपल्या पदावरून दूर हटविला जातो जेव्हा तो त्या पदाची जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरतो.

जिहादवर धर्माचे आयुष्य अवलंबून आहे. जिहाद इस्लामसाठी स्वाभाविक आहे. धर्मात जिहादचे स्वरुप साधारण नाही. कुरआन ज्या वेळी श्रध्दावंताची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करतो त्या वेळी जिहाद त्यापैकी एक महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘ज्या लोकांनी श्रध्दा ठेवली आणि ज्यांनी अल्लाहच्या मार्गात घरादारांचा त्याग केला, संघर्ष केला (जिहाद) व ज्यांनी आश्रय दिला व मदत केली तेच खरे श्रध्दावंत आहेत, त्यांच्यासाठी अपराधांची क्षमा व सर्वोत्तम उपजीविका आहे.’’ (कुरआन ८: ७४)
‘‘हे लोकहो, ज्यांनी श्रध्दा ठेवली आहे, मी दाखवू तुम्हाला तो व्यापार जो तुम्हाला यातनादायक प्रकोपापासून वाचवील? श्रध्दा ठेवा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर आणि प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करा अल्लाहच्या मार्गात आपल्या द्रव्यांनिशी आणि आपल्या प्राणानिशी. हेच तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही समजून घेतले.’’ (कुरआन ६१: १०-११)
कुरआनच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी श्रध्दा जिहादशिवाय अशक्य आहे. पारलौकिक जीवनात मुक्ती जिहादव्यतिरिक्त प्राप्त होऊ शकत नाही. वरील कुरआनोक्ती फक्त सशस्त्र जिहादचाच उल्लेख करीत आहे. परंतु इतर प्रकारच्या जिहादचासुध्दा उल्लेख कुरआनात आलेला आहे. परिस्थितीनुरूप संघर्ष हे श्रध्देचे प्रमाण आहे.
आंतरिक जिहाद: कुरआनने आंतरिक जिहादला श्रध्दा आणि अश्रध्देदरम्यानची सीमारेषा ठरवले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आंतरिक जिहादला श्रध्देची ओळख म्हटले आहे. ज्या हृदयात सदाचाराचा फैलाव करण्याची आणि दुराचाराचा नायनाट करण्याची प्रकट इच्छा शिल्लक नसेल तर असे हृदय हे अश्रध्देच्या अंधकाराने काळेकुट्ट झालेले असते. ही खऱ्या श्रध्दावंताची ओळख आहे की त्याला दुराचार सहन होत नाही. तो वाणीने त्याचा धिक्कार करू शकत नसेल तर मनाने त्यास वाईट समजून धिक्कार करतो. अर्थातच ही श्रध्देची शेवटची पायरी आहे. मुस्लिमांमध्येही शेवटच्या पायरीची श्रध्दासुध्दा नसेल तर अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या नजरेत तो मुस्लिम नाही.
आंतरिक जिहाद हा श्रध्देशी निगडीत अशा प्रकारे आहे की त्याला श्रध्दावंताचे, श्रध्दावंत लोकसमूहाचे आणि राष्ट्राचे प्रमाण ठरविण्यात आले आहे. ज्या राष्ट्राचे धार्मिक लोक सदासर्वकाळ त्यांच्या धर्मनिष्ठेचाच विचार करतात आणि दुराचाराकडे त्यांचे डोळे बंद करून ठेवतात तेव्हा त्यांची धर्मनिष्ठा मूल्यहीन ठरते. असे राष्ट्र वाळलेल्या गवताच्या जंगलासारखे जळत राहाते. जेव्हा अशा राष्ट्रावर प्रकोप येतो तेव्हा दुष्ट आणि धार्मिक लोक दोन्ही नष्ट होतात. थोडे काही यासाठी बचावतात की त्यांनी त्यांच्या परिने दुराचाराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना विनाशापासून वाचविण्यासाठी प्रयत्नशील राहिले होते. या दिव्योक्तीची साक्ष मानवी इतिहास देत आहे. कुरआन या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शन करीत आहे,
‘‘त्या लोकांत जे तुमच्यापूर्वी होऊन गेले आहेत, असली भली माणसे का शिल्लक राहिली नाहीत ज्यांनी लोकांना जमिनीत हिसाचार माजविण्यापासून प्रतिबंधित केले असते? असले लोक निघाले तरी फारच थोडे ज्यांना आम्ही त्या लोकांमधून वाचविले.’’ (कुरआन ११: ११६)
प्रेषित मुहम्मद (स.) यानी मुस्लिमांना बजावून सांगितले आहे,
‘‘शपथ आहे त्याची ज्याच्या मुठीत माझा प्राण आहे तुम्ही सदाचाराचा आदेश द्या आणि दुराचाराचा नाश करा अन्यथा अल्लाह निश्चितच कठोर शिक्षा देईन आणि तुम्ही प्रार्थना करा तर ती कबूल होणार नाही.’’
वरील हदीस (प्रेषित कथन) आणि इतर आणखी काही प्रेषितवचने खालील दिव्योक्तीला अधिक स्पष्ट करतात.
‘‘आणि सावध राहा त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम प्रामुख्याने फक्त त्याच लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही. ज्यांनी तुमच्यापैकी पाप केलेले असेल आणि जाणून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.’’ (कुरआन ८: २५)
कठोरतम शिक्षा इस्राइलच्या संततीवर कोसळली जेव्हा ते त्यांच्या आंतरिक जिहादच्या कर्तव्याला पूर्ण विसरले. त्यांचा समाज इतक्या खालच्या स्थितीला जाऊन पोहचला की दुराचार तेथे काँग्रेस गवतासारखा फोफावत गेला आणि दुराचाराचा नाश करण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाही. दिव्य कुरआन त्यांच्या स्थितीला स्पष्ट करीत आहे,
‘‘इस्राईलपैकी ज्या लोकांनी अश्रध्देचा मार्ग अवलंबिला ते दाऊद (अ.) आणि मरयमपुत्र येशू यांच्या वाणीद्वारे धिक्कारले गेले कारण ते दुराचारी झाले होते व मर्यादा भंग करू लागले होते, त्यांनी एकमेकांना अफत्यापासून परावृत्त करण्याचे सोडून दिले होते, वाईट आचरण होते त्यांचे जे त्यांनी अंगिकारले.’’ (कुरआन ५: ७८-७९)
या प्रकारचा जिहाद (आंतरिक जिहाद) अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे श्रध्दा (ईमान) टिकून राहते. धर्माची साक्ष ही साक्ष देण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यावर अवलंबून असल्याने आंतरिक जिहादवर त्याची सफलता अवलंबून आहे. जर इस्लामची साक्ष देण्यास असफल ठरलात आणि दुसरीकडे इस्लामवर प्रेम प्रदर्शित करण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले तर त्यांची अशी साक्ष परिणामहीन ठरते. अशा प्रकारचे अनुयायी इस्लामचे नव्हे तर अश्रध्देचे साक्षी बनून राहतात. अशा स्थितीत जगाला वाटते की हा इस्लामच्या श्रेष्ठत्वाचा आणि अभिमानाचा फक्त देखावा आहे. जगाची इस्लाम आणि त्याच्या अनुयायींबद्दलची हीच धारणा बनते. म्हणून जगाला इस्लामची साक्ष देण्याअगोदर त्याने आपला आंतरिक जिहाद स्वतःशी करून प्रथमतः आपल्यातील दुष्प्रवृत्तींचा नाश करून जगापुढे इस्लामी आदर्श बनले पाहिजे.

सशस्त्र जिहाद मग तो बचावात्मक अथवा सकारात्मक असो स्वच्छंदपणे करता येत नाही. काही अटींअंतर्गतच त्यास परवानगी दिली आहे. अटींची पूर्तता केल्यानंतरच या जिहादला धर्ममान्यता असते. अटीविना याचे महत्त्व नाही. हा मुळात जिहादच नाही. अल्लाहची अप्रसन्नता या जिहादमुळे पदरी पडते.
सशस्त्र जिहादच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
१) स्वतंत्र आणि स्वावलंबी मुस्लिम व्यक्तीच या जिहादसाठी पात्र आहे आणि अमीरच्या (प्रमुख) नेतृत्वात जिहादला मान्यता आहे. सामाजिक व्यवस्थेशिवाय (शासनव्यवस्था) आणि प्रमुखाविना (अमीर) जिहाद अयोग्य आहे. बचावात्मक जिहादसाठीसुध्दा ही अट आहे. मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) यांचे वास्तव्य प्रारंभी असताना ही अट पूर्ण होत नव्हती म्हणून तर जिहादची परवानगी दिली गेली नाही. त्या काळी कुरैश समुदायाचे प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायींवर अत्याचार परम सीमेला पोहचले होते आणि ते इस्लाम प्रचारकार्य गुप्तपणे करीत होते. त्यांनी मदीना शहरी स्थलांतर केल्यानंतर तेथे ते स्वतंत्रपणे आपले कार्य करीत होते आणि तेथे एक स्वतंत्र इस्लामी व्यवस्था स्थापित झाली होती, तेव्हाच जिहादची अनुमती दिली गेली. स्वतः प्रेषित तत्कालिन इस्लामी शासनव्यवस्थेचे अमीर (प्रमुख) होते. हीच परिस्थिती इतर प्रेषितांचीसुध्दा होती.
२) पुरेसे सैन्यबळ आणि सामरिकबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. शत्रुविरुध्द युध्द (सशस्त्र जिहाद) अन्यथा अयोग्य ठरते. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘कुणावरही त्याच्या कुवतीपेक्षा जास्त ओझे टाकू नये.’’ (कुरआन २: २३५)
याच तत्त्वांवर कुरआनमध्ये दिव्यादेश आहे,
‘‘तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्यावरील अल्लाहचे कर्तव्य पार पाडत जा.’’ (कुरआन ४: १६)
३) जिहाद फक्त आणि फक्त अल्लाहसाठीच पाहिजे आणि त्याचा एकमेव उद्देश धर्माची सेवा करणे आणि अल्लाहची प्रशंसा आहे. जिहादीचा एकमेव उद्देश दुराचाराचे निराकरण आणि सदाचाराचा फैलाव करणे आहे. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठीच जिहाद केला जातो. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उद्देश या पवित्र युध्दाचा नसावा. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले गेले की वेगवेगळ्या उद्देशाला समोर ठेवून लोक युध्द करीत आहेत. कोणी धनसंपत्तीसाठी, कोणी नावासाठी, कोणी देशासाठी, कुणाचे युध्द जिहाद आहे? यावर प्रेषितांनी उत्तर दिले,
‘‘जो अल्लाहच्या नावाचा महिमासाठी युध्द करतो त्याचेच युध्द हे अल्लाहसाठी असते.’’ (मुस्लिम, बुखारी)
दुसऱ्या एका प्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले की, ‘‘जर एखाद्याने अल्लाहसाठी संघर्ष करण्याचे ठरविले परंतु त्याबरोबर ऐहिक फायदे मिळण्याची इच्छासुध्दा आहे, तर अशासाठी आपले काय मत आहे?’’ प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘त्याला काहीही मोबदला मिळणार नाही.’’ (अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी खालील तत्त्व मांडले,
‘‘जो कोणी आपली पूर्वग्रहदूषितता ठेवून संघर्ष करीत असेल तर तो आपल्यातला नाही. तसेच जर कोणी पूर्वग्रहदूषिततेसाठी मरण पावला तर तोसुध्दा आपल्यापैकी नाही.’’ (अबु दाऊद)
वरील दोन अटी या अगदी स्पष्ट आहेत परंतु तिसऱ्या अटीसंदर्भात थोडा खुलासा आवश्यक आहे. इस्लाममध्ये दुराचाराचा नायनाट करण्यासाठी जिहादची आवश्यकता सांगितली आहे. दुराचाराचा नायनाट आणि सदाचाराला प्रस्थापित करणे हा जिहादचा उद्देश आहे. अल्लाहची उपासना आणि सदाचाराचा फैलाव काय दुराचारी माणसांपासून अपेक्षित आहे की त्यासाठी संघर्ष ते करतील? कधीही नाही. या परिस्थितीत एक दुष्प्रवृत्तीचा अथवा दुराचारांचा नाश करून दुसरे दुराचार अथवा दुष्प्रवृत्ती पहिल्याची जागा घेईल. ही प्रवृत्ती इस्लामला लाभदायक मुळीच नाही तर ती हानीकारक आहे. ते इस्लामच्या नावाखाली हा दुष्प्रवृत्त खेळ खेळतील तर परिणामतः लोक इस्लामपासून दूर जातील.

हे जग चांगले आणि वाईटाचे घर आहे. दोन्ही चांगल्या आणि वाईट शक्तींना या जगात स्वातंत्र्य आहे. परिणामतः दोघेही निरंतर लढाई लढत आहेत. एकमेकांवर वर्चस्व स्थापन करण्याचे प्रयत्न सतत दोघांकडूनही होत असतात. याचमुळे स्वाभाविकपणे इस्लामपुढे या जगात अडथळे निर्माण केले गेले आहेत. इस्लामच्या अनुयायींचे अस्तित्व स्वीकारले जात नाही आणि सहनसुध्दा केले जात नाही. प्रत्येक धर्माच्या इतिहासात आपणास हे पाहावयास मिळेल. मुस्लिमांनी हे अडथळे दूर कसे करावेत? इस्लाम या स्थितीला तोंड देण्यास समर्थ आहे. या अडथळ्यांना दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणे म्हणजेच ‘जिहाद’ आहे. यास अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे (जिहाद करणे) असे म्हणतात.
जिहादचा शब्दशः अर्थ होतो एखादे ध्येय गाठण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊनच प्रयत्नांचे स्वरुप ठरते. यास संधीसाधूपणा म्हणणे चुकीचे आहे. हे कार्य अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. प्रत्येक प्रयत्न करण्यामागे काही विशिष्ट हेतु असतो. हे साध्य प्राप्त करण्याचे साधन असते साध्य नव्हे. प्रचलित स्थितीच्या स्वरुपास आणि गांभीर्यास अगोदरच समजून घेतले तर अपेक्षित साध्य प्राप्त करणे सोईस्कर जाते. हे तत्त्व आत्मसात न केल्यास कठीण परिश्रमही वाया जातात. हे मूर्खपणाचे प्रयत्न सिध्द होते आणि ते अस्वाभाविक ठरते. अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे (जिहाद) हे त्या त्या स्थितीनुरुप ठरते. इस्लामने तीन प्रकार जिहादचे सांगितले आहेत ज्यांना परिस्थितीनुसार उपयोगात आणले जाऊ शकते.
१) आंतरिक जिहाद २) ज्ञानासाठी व धर्म प्रचारासाठी जिहाद ३) लढाईद्वारा (युध्द) जिहाद.
१) आंतरिक जिहाद: मुस्लिम समाजाच्या दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी छेडलेले युध्द हा आंतरिक जिहाद आहे, कारण या दुष्ट प्रवृत्तींमुळे इस्लामच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होतो. हा फार गंभीर धोका आहे आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याविरुध्द खालील शब्दांत चेतावणी दिली आहे,
‘‘माझ्यापूर्वी जे काही प्रेषित अल्लाहने या भूतलावर पाठविले होते त्यांचे अनुयायी प्रामाणिक होते. त्यांनी त्यांच्या प्रेषितांच्या शिकवणींना श्रध्दापूर्वक स्वीकारले. परंतु त्या अनुयायींनंतरचे अश्रध्दावंत आणि अप्रामाणिक अनुयायीं होते. त्यांचे कृत्य त्या प्रेषितांच्या शिकवणींविरुध्द होते. जो अशा अप्रामाणिक लोकांविरुध्द भांडत राहिला तोच खरा अनुयायीं होता. ज्यांनी तोंडी विरोध केला तेसुध्दा खरे श्रध्दाळू होते. इतरजन आपल्या मनात अशा गोष्टींना वाईट समजून गप्प बसत असत. परंतु ही श्रध्दाशीलता अगदी शेवटच्या थरातील आहे आणि यानंतर श्रध्देच्या एक अणुचेही अस्तित्व शिल्लक राहत नाही.’’ (मुस्लिम)
अर्थातच वरील हदीस हे फक्त बातमी अथवा कथन नाही. हा एक आदेश आहे. एक दिव्य आदेश! याद्वारे मुस्लिमांना सावधान करण्यात आले आहे की अशा परिस्थितीला त्यांनासुध्दा सामोरे जावे लागणार आहे. अशा स्थितीत कोणती कृती करावी हे सूचित करण्यात आले आहे. या हदीसीद्वारे दोन गोष्टी स्पष्ट होतात.
१) कोणत्याही प्रकारचे दुष्कर्म अथवा दुष्प्रवृत्ती मुस्लिम समाजात बोकाळली तरी तिचा नायनाट करण्यासाठी ‘जिहाद’ (अथक प्रयत्न) आवश्यक आहे.
२) दुष्प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठीचे उपाय आणि त्यासाठीचा (श्रध्दाशीलतेचे) अग्रक्रम.
दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी उत्तम उपाय त्याविरुध्द आमनेसामने आरपारची लढाई करणे हा आहे. आरपारची लढाई करण्याची हिंमत नसेल तर तोंडी सामना प्रचलित दुष्प्रवृत्तींविरुध्द करणे आवश्यक आहे. त्या दुष्प्रवृत्तींचा तोंडी धिक्कार केला पाहिजे. लोकांमध्ये त्याविरुध्द जागृती निर्माण केली पाहिजे. अल्लाहच्या कोपचे भय लोकांना दाखविले पाहिजे. यानंतरसुध्दा लोकांनी ऐकले नाही तर त्यांना कडक शब्दांत तंबी दिली पाहिजे.
जर तोंडी स्पष्टपणे जाहीररित्या दुष्प्रवृत्तींचा धिक्कार करणेसुध्दा अशक्य असेल तर लोकांनी प्रचलित दुष्प्रवृत्तींचा मनातल्यामनात धिक्कार केला पाहिजे. तो या दुष्प्रवृत्तींविरुध्द इतका संवेदनशील बनतो की त्यांचा विचारसुध्दा त्याला अस्वस्थ करुन सोडतो. दुष्प्रवृत्ती त्याच्यासाठी मनाला क्लेष देणारी ठरते. त्याची प्रखर इच्छा असते की दुष्प्रवृत्तींचा नायनाट लवकर व्हावा. त्याची मनोमन प्रार्थना असते की जे कोणी दुष्प्रवृत्तींने ग्रस्त आहेत त्यांना सन्मार्ग प्राप्त व्हावा. त्याला दुष्प्रवृत्तींच्या परिणामांची जाणीव असते आणि त्या दुष्प्रवृत्तींपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतो. श्रध्दाशीलतेचा हा सर्वांत शेवटचा टप्पा आहे. अशा प्रकारे या तीन पध्दतींद्वारा मुस्लिम समाज सर्व प्रकारच्या दुष्प्रवृत्तींपासून शुध्द होऊ शकतो. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नाही. या तिन्ही पध्दती म्हणजे जिहाद होय. या तीन प्रकारांतील प्रत्येक प्रकार हा सत्य प्रस्थापनेसाठीचा लढा आहे आणि इस्लामची साक्ष देणारा आहे. सत्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ‘जिहाद’ आहे हाच अल्लाहच्या मार्गातील जिहाद (जिहाद फीसबिलिल्लाह) आहे.
समाजातील दुष्प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे यास अल्लाहच्या मार्गात जिहाद करणे (जिहाद फीसबीलिल्लाह) असे वरील हदीसमध्ये म्हटले आहे. काही ठिकाणी या प्रयत्नास दुष्प्रवृत्तींचे परिवर्तन करणे असे म्हटले आहे.
‘‘ज्यानी दुष्प्रवृत्ती पाहिली तर त्याने तिला आपल्या हाताने बदलले पाहिजे जर ती व्यक्ती असे करू शकत नाही तर तोंडी रोखले पाहिजे. जर ती व्यक्ती तोंडी प्रतिकारसुध्दा करू शकत नसेल तर मनातल्या मनात दुष्प्रवृत्तीस वाईट समजले गेले पाहिजे आणि ही अगदी खालच्या दर्ज्याची श्रध्दा आहे.’’ (मिश्कात)
दुसऱ्या ठिकाणी या कृत्यास ‘निषिध्द मानणे’ असे म्हटले आहे कुरआनोक्ती आहे,
‘‘सत्कृत्यांचा आदेश द्या आणि दुष्कृत्यांचा नायनाट करा.’’ (कुरआन ३१: १७)
‘‘सत्कृत्यांसाठी एकमेकांचे अनुकरण करा आणि दुष्कृत्यांविरुध्द एकमेकांची मने वळवा.’’ (तिरमीजी)
वरील संदर्भावरून आपण या निर्णयाप्रत येतो की ‘‘प्रयत्नाची पराकाष्ठा समाजातील दुष्प्रवृत्तींविरुध्द करणे’’ तसेच ‘‘समाजातील दुष्कृत्यें आणि दुष्प्रवृत्तींमध्ये परिवर्तन घडवून आणणे’’ आणि ‘‘समाजातील लोकांची मने दुष्प्रवृत्तीविरुध्द तयार करणे’’ इ. सर्व एकाच प्रयत्नाची (जिहाद फीसबिलील्लाह) रूपे आहेत. आपण ज्याची निवड कराल तर ते ध्येयप्राप्तीकडे आपणास काही बदल न होता प्रवृत्त करते.
वरील हदीसींद्वारे (प्रेषितवचन) हेच सिध्द होते की जिहाद ‘ही सामुदायिक जबाबदारी आहे. मुस्लिम समाजाचे ‘जिहाद’ हे सामूहिक कर्तव्य आहे. व्यक्ती, समाज व राष्ट्र यापासून वेगळे जाऊ शकत नाही. प्रत्येकाचा या ‘जिहाद’मध्ये वाटा असतोच. जिहाद ह्या महत्त्वाच्या जबाबदारीत मात्र प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे त्याचा वाटा त्याने उचलावा हे त्याचे कर्तव्य ठरते. कुरआनने या मुद्यास स्पष्ट करताना खुलासा केला आहे,
‘‘श्रध्दावंत पुरुष व श्रध्दावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भले पणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगम्बराचे आदेश पाळतात, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच.’’ (कुरआन ९: ७१)
याचाच अर्थ असा होतो की भलेपणाचा आदेश देणे व वाईट गोष्टींपासून रोखणे ही मुस्लिमाची शाश्वत ओळख आहे. इस्लामचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. जिथे जिथे मुस्लिम आहे तिथे तो हे कर्तव्य पार पाडतच असतो. जो मुस्लिम आहे त्याला हे कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. इस्लामी शासनासंबंधी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘अल्लाह मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे. हे ते लोक आहेत ज्यांना आम्ही जर पृथ्वीवर सत्ता बहाल केली तर ते नमाज कायम करतील, जकात देतील, सत्कर्मांचा आदेश देतील. आणि वाईटाला प्रतिबंध करतील, आणि सर्व बाबींचा अंतिम परिणाम अल्लाहच्या अखत्यारित आहे.’’ (कुरआन २२: ४१)
वरील कुरआन आयतीनुसार हेच स्पष्ट होते की मुस्लिम व्यक्तिशः आणि सामान्यतः वाईट कृत्यांना (दुराचार) बहर आलेला पाहूच शकत नाही. मुस्लिम सत्तेत आला तर प्रथम वाईटाला प्रतिबंध करतो. दुराचाराचा समूळ नायनाट हे त्याच्या शासनाचे ध्येय ठरते.
२) ज्ञानासाठी व धर्म प्रचारासाठी जिहाद: या जिहादच्या प्रकारामध्ये इस्लामवर घेतलेले आक्षेप, शंकाकुशंका आणि इस्लामाविरुध्द प्रचलित चर्चेला आणि दुष्प्रचाराला चोख उत्तर देऊन इस्लामबद्दलचे आक्षेप, शंकाकुशंका आणि दुष्प्रचार समूळ नाहीसे करणे आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा मक्का शहरातील कार्यकाल हा याच प्रकारच्या जिहादचा कार्यकाल होता. अल्लाह कुरआनमध्ये आदेश देत आहे,
‘‘तर हे पैगम्बर (स.) अश्रध्दावंतांचे म्हणणे मुळीच ऐकू नका आणि या कुरआननिशी त्यांच्याबरोबर जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा करा.’’ (कुरआन २५: ५२)
त्यांच्याबरोबर (अश्रध्दावंतांच्या) कुरआननिशी प्रयत्नांची पराकाष्ठा करा म्हणजे तुम्ही अश्रध्दावंतांसमोर कुरआनच्या त्या तपशीलास ठेवा ज्यामध्ये इस्लामची सत्यता उघड केली आहे. याद्वारे त्यांच्या श्रध्दाहीनतेच्या निष्फळ चर्चेला रोखू शकता. कुरआनचे दाखले देऊन तुम्ही त्यांचे वादग्रस्त मुद्दे खोडून काढू शकता. तुम्ही हे नियमित करत राहा. शेवटी ते त्यांचे खोटे पुरावे घेऊन पळ काढतील. यासाठी कृतीत सातत्य आणि स्वभावात संयम आवश्यक आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अशा प्रकारच्या जिहादला जिभेचा जिहाद (तोंडी जिहाद) म्हटले आहे. त्यांचे कथन आहे,
‘‘श्रध्दाहीन लोकांविरुध्द तुमच्या धनाने, तुमच्या तनाने आणि तुमच्या संभाषणाद्वारे जिहाद करा.’’ (अबू दाऊद)
या प्रकारच्या जिहादमध्ये व्यक्ती आपल्या बुध्दीचातुर्याने सुसज्ज होऊन शत्रूचा मुकाबला करतो. हे युध्द शत्रुच्या बुध्दीचातुर्याचा आणि तात्त्विकतेचा किल्ला जमीनदोस्त होईपर्यंत चालूच राहते. ज्ञानाची प्रत्येक शाखा या कामासाठी उपयोगात आणली जाते. भौतिकशास्त्र, इतिहास, संस्कृति, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान, दर्शनशास्त्र; थोडक्यात सर्व प्रकारच्या ज्ञानशाखांचा उपयोग केला जातो. कुरआन ज्या पध्दतीने आक्षेपांना आणि वादग्रस्त मुद्यांना सडेतोड उत्तर देतो ते सर्व अद्वितीय आहे. यासंदर्भातील खालील दिव्य प्रकटन पाहू या.
‘‘आणि (यात हा गर्भित उद्देशही आहे) की जेव्हा कधी ते तुमच्यासमोर एखादी निराळी गोष्ट (अथवा चमत्कारिक प्रश्न) घेऊन आले त्याचे योग्य उत्तर वेळीच आम्ही तुम्हाला देऊन टाकले आणि उत्तम प्रकारे गोष्टीची उकल केली.’’ (कुरआन २५: ३३)
या प्रकारच्या जिहादसाठी कुरआनने खालीलप्रमाणे मूलतत्त्व सांगितले आहे,
‘‘हे पैगम्बर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहित, आणि लोकांशी विवाद करा अशा पध्दतीने जी उत्तम असेल.’’ (कुरआन १६: १२५)
या पध्दतीच्या यशात त्याचे गुण दडून बसले आहेत. उत्तम पध्दत आणि चर्चेची कुरआनची पध्दतीद्वारे इस्लाम संदेश लोकांना दिल्यास ते तुमच्या जवळ येऊ लागतात. लोक त्यांच्या वादग्रस्त मुद्यांची सत्यता पडताळून पाहू लागतात आणि इस्लामसाठी (सत्यासाठी) त्यांची मने उघडी करू लागतात. हे तेव्हाच घडू शकते जेव्हा तुमचा एक न् एक शब्द बुध्दीविवेकपूर्ण असेल आणि श्रोत्यांचा समजण्यासाठी सहज सुलभ असेल. भाषाशैली आणि वक्त्याचे खरे भावनिक गांभीर्यसुध्दा आवश्यक आहे. या बौध्दिक अथवा तोंडी जिहादची दुसरी आवश्यकता आहे. संयम आणि दृढता. वरकरनी हे जरी गुण सहाय्यभूत दिसत असले तरी त्यांची जिहादच्या सफलतेसाठी निकडीची गरज आहे. हे सर्वश्रुत आहे की इस्लामच्या आमंत्रणास चांगला प्रतिसाद कधीच मिळत नाही. अश्रध्दावंतामध्ये इस्लामचा प्रसार करताना त्यांच्यापासून प्रामाणिकपणाची आणि गांभीर्यपूर्वक ऐकून घेण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे कारण अश्रध्दावंत हे खुल्या मनाचे कधीच नसतात. इस्लामचा प्रसार करताना आपणास नेहमीच अनुभव येतो की अश्रध्दावंत हे पूर्वग्रहदूषित आणि भावनाशील असतात, तसेच भ्रामक आणि चुकीच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांनी ते ग्रासलेले असतात. गंभीर चर्चेला ते लबाड बुध्दीने आणि कठोर शब्दांत धक्कादायक अविर्भावात उत्तर देतील. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यांपेक्षा मृदुवाणी, अधिक श्रध्दापूर्वक, गांभीर्यपूर्वक आणि विवेकपूर्वक आवाहन दुसरे कोण करू शकेल? तरी त्यांना अशा वेळी असहाय परिस्थितीला तोंड द्यावेच लागत होते. अल्लाहने त्यांना खालील शब्दांत सचेत केले आहे,
‘‘मुस्लिमांनो, तुम्हाला प्राण व वित्त या दोहींच्या परीक्षा द्याव्याच लागतील, आणि तुम्ही ग्रंथधारक व अनेकेश्वरवादींकडून पुष्कळशा त्रासदायक गोष्टी ऐकता. जर या सर्व स्थितीत तुम्ही संयम आणि ईशपरायणतेच्या वर्तनावर दृढ राहाल तर हे मोठे धाडसाचे कार्य होय.’’ (कुरआन ३: १९६)
हे अगदी साहजिक आहे की ही मौखिक इस्लामची साक्ष (मौखिक जिहाद) व्यक्तीपुढे संकटांचे वावटळ उभे करते. या स्थितीला त्याला नियमित तोंड द्यावेच लागते. असे नेहमीच घडते की शुभेच्छा कठोर टीकेला शीघ्र घेऊन येतात तर शुभ संदेशाच्या मागे शिव्या खाव्या लागतात. चर्चा करताना दगड खावे लागतात. किस्सा येथेच थांबत नाही तर इस्लाम प्रचारकाला चीरनिद्रा (खून) दिली जाते. परंतु इस्लामची साक्ष अशा घटनांकडे दुर्लक्ष करून समस्त मानवजातीला तिच्या निर्माणकर्त्याच्या उपासनेकडे आमंत्रित करण्यास प्रवृत्त करते. हे कार्य अशा संकटांसह आणि नकारांसह चालूच राहिले पाहिजे. परिस्थिती कितीही बिकट असो मुस्लिमाने त्या परिस्थितीशी समझोता करण्याचा विचारसुध्दा मनात आणू नये. अल्लाहने असा परिस्थितीत प्रेषित मुहम्मद (स.) यांना बजावून सांगितले,
‘‘तर हे पैगम्बर (स.) तुम्हाला ज्या गोष्टीची आज्ञा दिली जात आहे ती पुकारून सांगा, हाक देऊन सांगा (जाहीररित्या) आणि अनेकेश्वरवादींची अजिबात पर्वा करू नका.’’ (कुरआन १५: ९४)
इस्लामचे आमंत्रण देणे हे तेव्हाच जिहाद सिध्द होईल जेव्हा विरोधांच्या आणि संकटांच्या वावटळामध्ये इस्लामची साक्ष देणे अविरत चालत राहील.
३) लढाईद्वारा (सशस्त्र) जिहाद: शारीरिक सामर्थ्यांसह जिहाद त्यांच्याविरुध्द असतो जे इस्लामच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. जोपर्यंत अडथळा दूर होत नाही तोपर्यंत जिहाद सुरूच राहतो. जिहादची ही शेवटची पायरी आहे. यास किताल (युध्द) सुध्दा म्हणतात. व्यावहारिकतः हा प्रकार कठीण परंतु धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे निकडीचे महत्त्व कुरआनने प्रखर केले आहे,
‘‘तुमच्यावर युध्द नियत केले आणि तुम्हाला ते योग्य वाटत नाही. परंतु शक्य आहे की जी गोष्ट तुम्हाला नापसंत असेल तीच तुमच्यासाठी अधिक चांगली असेल आणि हेही शक्य आहे की जी गोष्ट तुम्हाला पसंत असेल ती तुमच्यासाठी वाईट असेल. अल्लाह जाणतो तुम्ही जाणत नाही.’’ (कुरआन २: २१६)
युध्द मुस्लिमांसाठी आणि इस्लामसाठी कसे चांगले आहे याचा खुलासा खालील कुरआनोक्तीमध्ये युध्दाचा हेतु सांगताना केला आहे,
‘‘आणि त्यांच्याशी तोपर्यंत युध्द करा जोपर्यंत उपद्रव शिल्लक राहील आणि अल्लाहसाठीच धर्म होईल. नंतर जर ते परावृत्त झाले तर लक्षात ठेवा की अत्याच्याऱ्यांशिवाय कुणाशीही शत्रुत्व ठेवू नका.’’ (कुरआन २: १९३)
युध्द करण्याची परवानगी यासाठी देण्यात आली की उपद्रव भूतलावर शिल्लक राहू नये आणि अल्लाहच्या मर्जीनुसार आणि आदेशानुसार जीवन व्यतीत करण्यासाठी मार्ग सुकर व्हावा. कुरआनमध्ये उपद्रवासाठी ‘फितना’ हा शब्द वापरात आला आहे ज्याचा अर्थ होतो की लोकांना इस्लामपासून रोखणे आणि आपल्या निर्माणकर्त्याच्या उपासनेपासून परावृत्त करणे हा असा गुन्हा आहे ज्याचा समकक्ष गुन्हा दुसरा कोणताही नाही. एखाद्या निरपराध व्यक्तीचा खून करण्यापेक्षा हा भयंकर गुन्हा ‘उपद्रव’ (फितना) आहे. कारण व्यक्तीचा खून केला तर त्याला या क्षणिक ऐहिक जीवनापासून वंचित ठेवले जाते, परंतु व्यक्तीला जर अल्लाहच्या उपासनेपासून परावृत्त केले तर त्या व्यक्तीला अल्लाहचा खरा दास बनण्यापासून रोखले जाते आणि त्याच्या खऱ्या जगाचा सर्वनाश करून परलोकातील देणग्यांपासून वंचित केले जाते. अर्थातच दोन्ही कृत्ये निंदनिय आहे. परंतु दोघांतून एकाची निवड करावयास सांगितले तर एखादा वेडा मनुष्य पहिल्यास दुसऱ्यावर प्राधान्य देईल. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘उपद्रव माजविणे (फितना) हत्या करण्यापेक्षा वाईट आहे.’’ (कुरआन २: १०१)
याबाबत दोन पर्याय असूच शकत नाही. अल्लाहच्या आज्ञाधारकतेला सर्व गोष्टींवर प्राधान्य दिले तर इस्लामच्या मार्गातील अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांना आव्हान देऊच शकत नाही. स्वतःचे अथवा दुसऱ्याचे जीव या कामी लागले तरी बेहत्तर! कुरआन जिहादच्या महत्त्वाबद्दलचे वर्णन खालीलप्रमाणे करीत आहे,
‘‘जर अल्लाह लोकांना एक दुसऱ्याकरवी हटवीत नसता तर मठ आणि चर्च व सिनेगॉग आणि मशिदी ज्यात अल्लाहचे नाव मोठ्या प्रमाणात घेतले जाते, सर्व उद्ध्वस्त केली गेली असती. अल्लाह जरूर त्या लोकांना सहाय्य करील जे त्याला सहाय्य करतील. अल्लाह मोठा शक्तिशाली आणि जबरदस्त आहे.’’ (कुरआन २२: ४०)
वरील कुरआनोक्तीने आणखी स्पष्ट होते की जर धर्मासाठी शस्त्रांचा वापर केला गेला नाही तर उपद्रव मुळासकट नाहीसे केले जाऊ शकत नाहीत आणि धर्म लयास जातो. दुराचारी धार्मिक आचरणास विरोध करतात आणि धार्मिक स्थळांना उद्ध्वस्त करू लागतात. याच एकमेव कारणामुळे बळाचा वापर धर्माला अखंड करण्यासाठी अनिवार्य आहे.
बळाचा वापर करून धर्माच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास सशस्त्र जिहाद म्हणतात. सशस्त्र जिहादचे स्वरुप वेगवेगळे आहेत म्हणून त्यांचा सामना करण्यासाठीचे उपाय एकसारखे असू शकत नाहीत. त्यांचे दोन प्रकार आहेत-
१) पहिल्या प्रकारात ते अडथळे आणि संकट येतात जी नवमुस्लिमांना भेडसावतात. नवमुस्लिमांना त्रास दिला जातो आणि अनेक प्रकारे मानहानी केली जाते. त्यांना त्यांचा नवीन धर्म सोडून पुन्हा जुन्या धर्माकडे बळजबरीने आणले जाते.
२) मुस्लिमांना इस्लाम धर्माची शिकवण मुस्लिमेतरांना न देण्यास भाग पाडले जाते किवा त्यांना इस्लामच्या ज्ञानापासून दूर अतिदूर ठेवण्याचे षङयंत्र रचले जाते.
वरील दोन प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठीसुध्दा दोन प्रकारच्या जिहादचा वापर केला जातो. पहिला प्रकार हा कठीण आणि फक्त निराशादायीच नसून तो अत्यंत आव्हानात्मकसुध्दा आहे. या आक्रमणाला बचावात्मकरित्या सामोरे जावे लागते. हे बचावात्मक युध्दच म्हणावे लागेल. अल्लाहने या प्रकारचे युध्द करण्यास खालील दिव्य आदेशाने अनुमती दिली आहे,
‘‘परवानगी दिली गेली युध्द करण्याची त्या लोकांना ज्यांच्याविरुध्द युध्द सुरू आहे, कारण ते अत्याचारपीडित आहेत. आणि अल्लाह निश्चितपणे त्यांच्या मदतीस समर्थ आहे. हे ते लोक आहेत जे आपल्या घरातून नाहक बाहेर काढले गेले, केवळ या अपराधापायी की ते म्हणत होते, आमचा पालनकर्ता अल्लाह आहे.’’ (कुरआन २२: ३९-४०)
वरील दिव्य प्रकटन प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मदीना कालखंडात अवतरित झाले. दिव्य आदेशाचे त्यात समर्थन दिले आहे. मुस्लिमांना मक्केतील आक्रमक कुरैश जमातीविरुध्द शस्त्र हातात घेण्याची परवानगी दिली गेली. त्यांच्यावर कुरैश सैन्याने आक्रमण केले होते. म्हणून त्यांच्याविरुध्द युध्द पुकारण्याचा आदेश देण्यात आला. जेव्हा जेव्हा कुरैशांनी आक्रमण केले तेव्हा त्यांच्याविरुध्द युध्द पुकारले गेले. हे युध्द बचावात्मक स्वरुपाचे होते.
दुसऱ्या प्रकारच्या जिहादवर चर्चा करण्याअगोदर आपण त्याच्या स्वरुपाविषयी तपशीलात जाऊ या. मागील प्रकरणात मुस्लिमांचे कर्तव्याविषयी आपण चर्चा केली आहे. आपण पाहिले आहे की इस्लाम धर्म समस्त मानवजातीसाठी आहे. इस्लाम हे एकमेव सत्य आहे. पारलौकिक मुक्तीसाठी इस्लाम ही पूर्वअट आहे. इस्लामव्यतिरिक सर्व असत्य आहे आणि अल्लाहजवळ अमान्य आहे. मुस्लिमांना इस्लामच्या या स्थितीला सुरक्षित आणि शाबूत ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. इस्लाम संदेश समस्त जगाला देण्यासाठी मुस्लिम जबाबदार आहेत. ते सत्याचे साक्षी आहेत. मुस्लिमांनी लोकांना अल्लाहचे आज्ञाधारक बनवून त्यांना पारलौकिक जीवनाचा सर्वनाश करण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अनिवार्य आहे. या दोन वैशिष्ट्यांमुळे मुस्लिमांनी फक्त त्यांच्याच समाजात घुटमळत न बसता सर्व जगाच्या भल्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात इस्लाम संदेश पोहचविला पाहिजे. असे करताना ज्यांची हृदये इस्लामसाठी खुली नाहीत, त्यांच्यावर बळजबरी करता येणार नाही. दुसऱ्यांवर या बाबतीत पहारेकरी बनून राहण्याची परवानगी इस्लाम देत नाही. जोरजबरदस्तीच्या वातावरणात इस्लामला जवळून पारखणे शक्य होत नाही. शासनव्यवस्थेचा परिणाम जनमानसावर होत असतो. अशा स्थितीत इस्लामी समाजव्यवस्थेला जनमानसात रुजविण्यासाठी शासनव्यवस्था इस्लामी असणे क्रमप्राप्त ठरते. कारण प्रचलित व्यवस्था ही दुसऱ्या व्यवस्थेला आपल्या समाजात शिरकाव करू देत नाही. म्हणून जोपर्यंत गैरइस्लामी व्यवस्था समाजात प्रभावी आहे तोपर्यंत इस्लामी तात्त्विक आणि राजकीय व्यवस्था जनमानसात रूजत नाही. इस्लामच्या प्रगतीतील हा मोठा अडथळा आहे. जगातील प्रचलित सर्व समाजव्यवस्था इस्लामच्या मार्गातील प्रमुख अडथळे आहेत. याउपर ठपका हा ठेवला जातो की इस्लामी शासनव्यवस्था इतर शासन अथवा समाजव्यवस्थेला सामावून तर घेत नाही. परंतु पूर्ण सत्ता मुस्लिम राज्यकर्त्यांचा हातातसुध्दा न देता स्वतःकडे ठेवते. अशा स्थितीत इस्लामच्या सार्वभौमत्वालाच आव्हान दिले जाते. मग अशा परिस्थितीत बचावात्मक पवित्रा न घेता बळाचा वापरच योग्य ठरतो. याच कारणाने कुरआनने बचावात्मक पवित्र्याचे समर्थन फार काळ केल्यानंतर परिस्थितीनुरूप बळाचा वापर करण्यास अनुमती दिली आहे,
‘‘तो अल्लाहच आहे ज्याने आपल्या पैगंबराला मार्गदर्शनासह आणि सद्धर्मासह पाठविले आहे की त्याचे इतर सर्व धर्मांवर सर्व प्रकारे वर्चस्व प्रस्थापित करावे. मग अनेकेश्वरवादींना हे कितीही असह्य का होईना!’’ (कुरआन ९: ३३)
‘‘इतर सर्व धर्मांवर सर्व प्रकारे वर्चस्व प्रस्थापित करावे’’ याचा अर्थ इस्लामने तात्त्विक आणि राजकीयदृष्ट्या सर्व धर्मांवर वर्चस्व स्थापित करावे. याचमुळे अल्लाह पुढे आदेश देतो,
‘‘व सर्व मिळून अनेकेश्वरवादींशी लढा द्या, जसे ते सर्व मिळून तुमच्याशी लढतात. आणि समजून असा की अल्लाह ईशपरायणांच्या समवेत आहे.’ (कुरआन ९: ३६)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या जिहादला सतत चालणारी प्रक्रिया म्हटले आहे. ही मुस्लिमांची न संपणारी गरज आणि जबाबदारी आहे. त्यांनी मुस्लिमांना बजावून सांगितले की ‘‘जिहाद माझ्या काळापासून जो सुरू झाला तो तसाच शेवटपर्यंत म्हणजे दज्जालशी माझा शेवटचा अनुयायी लढेपर्यंत चालूच राहणार आहे. (कयामतपर्यंत) हा जिहाद क्रूर शासकाच्या क्रूर कारवायांना पाहून स्थगित होणार नाही की एखाद्या न्यायाधीशाच्या तथाकथित निवाड्यानेसुध्दा थांबू शकणार नाही.’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) आणि चार आदर्श खलीफा (शासक) यांनी परदेशातील शासनकर्त्यांना इस्लामचे आमंत्रण दिले होते. जेव्हा त्यांच्याकडून हे आमंत्रण स्वीकारले गेले नाही तेव्हा त्यांना बळाने इस्लामच्या प्रभुत्वाखाली आणले गेले. त्यांना इस्लामच्या व्यवस्थेच्या अंकित ठेवणे हे वरील उद्देशाला धरूनच होते. (‘‘इतर धर्मांवर सर्व प्रकारे इस्लामचे वर्चस्व स्थापिक करावे’’) म्हणून हा जिहाद बचावात्मक प्रकारचा नव्हता तर सकारात्मक कार्यवाही होती. म्हणून यास सकारात्मक जिहाद म्हणू या. या प्रकारच्या जिहादला समजून घेण्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत.
प्रथमतः इस्लामला जबरदस्तीने स्वीकारण्याचा हेतु या जिहादचा मुळीच नाही. इस्लामचा स्वीकार करणे याचा संबंध मनाशी आहे की ज्यामुळे बळाने काहीच करता येत नाही. म्हणून इस्लाम बळजबरीने कोणावरही थोपवता येत नाही. कुरआनमध्ये वारंवार सांगितले गेले आहे की अल्लाहची इच्छा आहे की मनुष्यजातीमध्ये जगात कोणीही अश्रध्दावंत राहू नये. अल्लाहने सर्वांना मुस्लिम (आज्ञाधारक) म्हणून जन्माला घातले आहे आणि त्यांना (समस्त मानवजातीला) अल्लाहने इच्छिले असते तर त्याच्या या निर्मितीला मुस्लिम बनवले असते. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘जर अल्लाहने इच्छिले असते तर सर्व मानवांना बोध दिला असता.’’ (कुरआन १३: ३१)
मग त्याने (अल्लाहने) प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायींमध्ये बळाने मुस्लिम बनविण्यासाठी भेदभाव केला नसता. अशा प्रकारची अट ही मानवनिर्मितीच्या उद्देशाविरुध्द आहे म्हणून त्याला अस्वीकार्य केले गेले. अल्लाहने स्पष्टपणे सांगितले आहे की मनुष्य हा धर्माच्या बाबतीत स्वतंत्र आहे. त्याच्यावर या बाबतीत जोरजबरदस्ती करू नये.
‘‘धर्माच्या बाबतीत जोरजबरदस्ती नाही.’’ (कुरआन २: २५६)
अशा परिस्थितीत, अल्लाह इस्लामविषयी जोरजबरदस्तीला योग्य कसे ठरवील? आणि प्रेषित मुहम्मद (स.) त्यांच्या अनुयायींना इस्लाम धर्मासाठी जोरजबरदस्ती करण्याची परवानगी कसे बरे देतील?
१) याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या देशातील मुस्लिमांनी जर त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर त्यांनी बचावात्मक पवित्रा घेऊन त्या अत्याचाराचा प्रतिकार करू नये. अत्याचाराविरुध्द दोन हात करणे हे धर्मकार्य आहे आणि त्यात ती व्यक्ती मारली गेली तर शहीद (हुतात्मा) बनते.
अनुमती कशी मिळेल? वरील दिव्योक्तीने हेच सिध्द होते की कोणालाही इस्लामचा स्वीकार करण्यासाठी बळजबरी केली जाणार नाही. प्रत्येकाला धर्माबाबतचे स्वातंत्र्य आहे. त्याला पसंत पडले तर इस्लामच्या स्वीकार करील अन्यथा अस्वीकार करील.
२) जिहाद ही काही मोहिम अथवा चळवळ नाही की शासकवर्गाला बळाने दासत्वाच्या स्थितीत परिवर्तीत करावे. जिहाद वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या विरोधी आहे. होय जिहाद ही मानवजातीचे कल्याण करण्यासाठीची मोहीम जरूर आहे. सत्याला या भूतलावर स्थापित करून मानवाचे लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवनात कल्याण करणे हेच एकमेव ध्येय जिहादचे आहे. अल्लाहच्या दासत्वात पूर्णपणे आलेला समाज इतरांचे दासत्व कसे बरे स्वीकार करील? असा समाज दुसऱ्यांपासून काही लाभ प्राप्त करण्यासाठी धडपड करत नाही तर दुसऱ्यांच्या फायद्यासाठीच (लोक परलोकचा फायदा) प्रयत्नशील राहतो.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget