November 2018

मदीना स्थायिक झाल्यावर प्रेषितांनी ‘नमाज’ प्रस्थापित करणे, अन्सार आणि मुहाजिरीनना आपसात बंधु बनविणे व संवैधानिक करार करणे याव्यतिरिक्त आणखीन एक मोठे कार्य केले, ते म्हणजे मदीना शहराची प्रतिरक्षात्मक व्यवस्थेची स्थापना आणि मुस्लिमांचे सैन्यप्रशिक्षण.
खरे पाहता बर्याच कारणास्तव आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायांच्या दृष्टीने सामरिक कार्यवाहीचा मार्ग म्हणजे काही चांगला मार्ग नव्हता. परंतु मुस्लिमांच्या रक्षणात्मक गरजांस्तव हे आवश्यक होते. विरोधकांचा हल्ला कोणत्याही समयी शक्य होता. त्याचप्रमाणे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे अशा मर्यादित धर्माची शिकवण देणारेदेखील नव्हते की एका गालावर कोणी झापड मारली तर त्यास दुसराही गाल द्यावा. येथे तर एका क्रांतीची योजना होती आणि क्रांतीचे पहिले पर्व हे हिजरत (स्थलांतर) असते तर त्यापुढील दुसरे पर्व संघर्षाचे आणि शत्रुला धूळ चारण्याचे असते. ईश्वरी कायद्याच्या आधारावर एका नवीन विश्वनिर्मितीसाठी जी ‘उम्मते वस्त’ (अर्थात मध्यममार्गी समूह) उभी होती, तिला माहीत होते की, ज्या अमानुष शक्तीने तिला तेरा वर्षांपर्यंत अन्याय व अत्याचाराच्या भट्टीत तापविले होते, घरदार, संपत्ती आणि वतन त्यागण्यास विवश केले होते, त्यांच्या लढण्याच्या मानसिकतेची तलवारसुद्धा डोक्यावर लटकत आहे.
मुळात इस्लाम स्वीकारतानाच मुस्लिमांना माहीत होते की, या स्वीकृतीमध्ये संघर्षाचे घटकसुद्धा आहेत. सत्यावर प्राण ओवाळणारे प्रेषितांचे अनुयायीं या दुहेरी कर्तव्यपूर्तीसाठी नेहमीच तयार आणि दक्ष असत. त्यांना यांची पूर्ण जाणीव असे की, आपले एक पाऊल जानमाज (नमाज अदा करण्याची छोटी चादर) वर तर दुसरे पाऊल सत्यासाठी प्राणांची आहुती देण्यास्तव रणभूमीवर असते. परंतु रक्षणात्मक जवाबदार्या पूर्ण करण्यासाठी भावना आणि प्रेरणांवर काम भागत नसून उत्तम संगठन आणि प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता असते. स्वयं ईश्वरानेच पाठविलेले प्रशिक्षक आणि विद्वत्तेने आदरणीय प्रेषितांनी अतिशय प्रतीकूल परिस्थितीत आपल्या अनुयायांच्या समूहास अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने प्रतिरक्षासाठी तत्काळ तयार केले. हीच बाब या गोष्टीची साक्ष दतो की ईश्वराने प्रेषितांना उत्तम सेनापती आणि मुत्सद्दीसुद्धा बनवून पाठविले.
मदीनाच्या सभोवताली तिन्ही बाजुंना पर्वतांच्या रांगा, दाट वस्त्या आणि खजुरीच्या बागा किवा खडकाळ मैदान होते. जणू ते नैसर्गिकरीत्या सुरक्षित किल्लाच आहे. केवळ उत्तर दिशेकडून एकच मार्ग या शहरास उघडा होता. मक्का शहर हे मदीना शहराच्या दक्षिणेस होते.
मक्कावासीयांना दक्षिणेकडून येऊन उत्तरेकडील मार्गाने मदीनावर हल्ला चढविणे केवळ जिकीरीचेच नसून हानीकारकदेखील होते. ईश्वरी इच्छेनुसार प्रेषितांनी हे काम केले की ‘मदीना’ शहराससुद्धा ‘मक्का’ शहराप्रमाणेच ‘हरम’ (शांतीचे पवित्र स्थळ) ठरवून अशी घोषणा केली की, कोणत्याही शत्रूने मदीना शहरावर हल्ला चढवून त्यांची शांती पवित्रता भंग करण्याचा जर विचारही केला तर शत्रू ‘हरम-ए-मक्का’ (शांतीस पात्र असलेले ‘मक्का’) मध्येसुद्धा सुरक्षित राहू शकणार नाही.
मुस्लिमांच्या सैनिकी प्रशिक्षणासाठी नमाजमध्ये एका रांगेत उभे राहण्याच्या नियमांस आधार बनविण्यात आले. धनुर्विद्या आणि घोडेस्वारीच्या कौशल्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. छोट्याछोट्या सैन्य तुकड्या तयार करून त्यांना सैन्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सीमेवर गस्त करण्यासाठी पाठविणे सुरु केले. क्रमाक्रमाने प्रत्येकास रात्रीच्या पहार्यासाठी डयुट्या सोपविण्यात आल्या. सैनिकात सांकेतिक भाषा शिकविण्यात आली. प्रेषितांनी संपूर्ण सैन्यास सामरिक दृष्टिकोनातून शहराच्या भौगोलिक परिस्थितीचे प्रयोगात्मक ज्ञान दिले. तसेच सीमेवर फिरता पहारा ठेवून प्रेषितांनी इतर प्रदेशातील लोकांना या गोष्टीची जाणीवदेखील करून दिली की आता मात्र या ठिकाणी एक सुसंगठित राज्य अस्तित्वात आहे.
‘बद्र’च्या युद्धापूर्वी सीमावर्ती पहारा आणि देखरेखीसाठी सात-आठ विशेष तुकड्या रवाना करण्यात आल्या. पहिल्या हिजरी सनाच्या रमजान महिन्यात माननीय हमजा बिन अब्दुल मुतल्लिब(र) यांच्या नेतृत्वात तीस सैनिकांची एक तुकडी ‘सैफुल बहर’कडे पाठविण्यात आली. प्रेषित आणि इस्लामचा कट्टर वैरी तीनशे माणसांची एक तुकडी घेऊन आक्रमणाच्या उद्देशाने आला होता. परंतु मुस्लिमांना दक्ष असल्याचे पाहून तो परतला. ‘शव्वाल’ महिन्यात साठ सैनिकांची एक तुकडी माननीय उबैदा बिन हारिस(र) यांच्या नेतृत्वाखाली मक्केतील विरोधकांची स्थिती जाणून घेण्यासाठी रवाना करण्यात आली. या तुकडीस शत्रूपक्षाचे दोनशे सैनिक ‘सनियतुल मुर्रा’ या ठिकाणी आढळले. या शत्रूच्या टोळीची वार्ता ‘मदीना’च्या व्यवस्थापनास देण्यात आली. ‘जीकादा’ महिन्यात माननीय साद बिन अबी वक्कास(र) यांच्या नेतृत्वाखाली ८१सैनिकांची एक तुकडी ‘जोहफा’ या स्थानावर पाठविण्यात आली. ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या दुसर्या वर्षी ‘सफर’ महिन्यात प्रेषित हे स्वतः सत्तर सैनिकांची तुकडी घेऊन ‘अबवा’ या ठिकाणी गेले होते. हे ठिकाण ‘कुरैश’ टोळीचा व्यापारी मार्ग होता. प्रेषितांनी तेथे जाऊन भौगोलिक परिस्थितीचा अचूक अभ्यास केला. तसेच ‘मख्शी बिन उमर’ आणि ‘हजरी’ यांच्याशी समझोता केला. मग ‘रबिउल अव्वल’ च्या महिन्यात दोनशे शिपायांची तुकडी घेऊन ‘बुवाह’ या ठिकाणी गेले. हे स्थान ‘यम्बूह’च्या जवळ आहे. रस्त्यात ‘उमैया बिन खल्फ’ या शत्रूच्या टोळीची गाठ पडली. परंतु दोन्ही पक्षांकडून कोणतीच प्रतिक्रिया झाली नाही. ‘रबीऊल अब्वल’ च्या महिन्यातच ‘करज बिन जाबिर’ याने मदीनाच्या पाळीव प्राण्यांवर दरोडा टाकला. सूचना मिळताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सत्तर तरुणांना सोबत घेऊन त्याचा पाठलाग केला. परंतु शत्रू पळण्यात यशस्वी झाला. नंतर प्रेषित ‘जुमादल उखरा’मध्ये दीडशे सैनिकांची तुकडी घेऊन ‘जुल उशैरा’ या ठिकाणी गेले आणि येथील ‘मुदलज’ आणि ‘जोहरा’ परिवाराशी समझोता करार केला.
‘रजब’च्या महिन्यात अब्दुल्लाह बिन जहश’च्या नेतृत्वात १२५ योद्ध्यांची एक तुकडी ‘नखला’ च्या मोहिमेवर रवाना केली. ‘कुरैश’च्या एका छोट्याशा काफिल्याशी झडप होऊन शत्रूसैन्याचा एक माणूस ठार झाला. दोन जणांना कैद करण्यात आले आणि एक शत्रु पळून गेला. शत्रूसैन्याची संपत्ती (अर्थात स्वार्या, हत्यार वगैरे) हस्तगत झाली. ही तुकडी मदीना पोहोचली आणि प्रेषितांना संपूर्ण वृत्तान्त कळविला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) त्यांच्या कृत्यावर खूप नाराज झाले. कारण अद्यापपर्यंत प्रेषितांनी युद्धाची परवानगी कोणालाच दिली नव्हती. शत्रूचे दोन कैदी सोडून देण्यात आले. ठार झालेल्या शत्रूसैनिकाच्या हत्येचा मोबदला आणि त्यांची संपत्ती कुरैशजणांना परत पाठविण्यात आली. ‘नखला’ येथील या अनपेक्षित घटनेमुळे मक्कावासी चवताळले.
अशा प्रकारच्या तयारीसह आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी सभोवतालच्या बहुतेक कबिल्यांशी संफ साधून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. या मित्रकबिल्यामध्ये ‘हमजा’, ‘जुहैना’,‘जमरा’, ‘जुरआ’, ‘रुबआ’, ‘मुदलज’ आणि ‘जोहरा’ वगैरे परिवारजण सामील होते. यांपैकी काही कबिल्यांबरोबर संयुक्त प्रतिरक्षात्मक करार असून काही कबिल्यांनी केवळ एवढेच स्वीकारले की, मुस्लिमांच्या शत्रूंशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यात येणार नाहीत.
मागे उल्लेख झालाच आहे की, मदीना समझोता कराराचेसुद्धा प्रतिरक्षात्मक महत्त्व आहे. या कराराशी समझोता करणार्या सर्वांनीच ही गोष्ट स्वीकारली होती की, अरब कबिल्यांत जे मूर्तीपूजक आणि ‘ज्यू’ सामील आहेत ते मुस्लिमांच्या अधीन आणि युद्धप्रसंगी त्यांचे सहयोगी असतील. त्याबरोबरच ते मक्का शहरातील इस्लामद्वेष्टांना अभय देणार नाहीत आणि युद्ध झाल्यास मुस्लिमांच्या मार्गांत अडचणी निर्माण करणार नाहीत. ‘ज्यू’ शी असा संवैधानिक करार झाला की, युद्ध आणि तहाच्या बाबी सर्व मदीनावासीयांत संयुक्त असतील आणि ‘ज्यू’ समाजाचे लोक मुस्लिमांविरुद्ध लढणार्यांशी लढतील आणि मुस्लिमांनी ज्यांच्याबरोबर तह केला, त्यांच्याशी तह करतील. ‘मदीना समझोता’ कराराच्या या अटींवरून हेच सिद्ध होते की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची विवेकदृष्टी किती प्रगल्भ आणि खोल होती.
प्रतिरक्षणात्मक तयार्यांची एक बाजू अशी होती की, मुस्लिमांमध्ये ईशमार्गात धन खर्च करण्याची प्रचंड शक्तिशाली प्रेरणा निर्माण करण्यात आली. प्रत्येकजण ईश्वर आणि प्रेषितांच्या एका संकेतावर आपले तन, मन, धन अर्पण करण्यास तयार होता आणि समृद्धजण सढळ हाताने व दिलखुलासपणे गरजवंतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपली संपत्तीची दारे उघडत असत.
सरतेशेवटी हे स्पष्ट करणे पण गरजेचे आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सामरिक अथवा प्रतिरक्षात्मक तयारीमध्ये ही बाबसुद्धा सामील होती की, सैन्यामध्ये सामरिक शक्तीबरोबरच नैतिकशक्ती वृद्धिगत करावी. अनुशासनाचे महत्त्व केवळ संघटनात्मक दृष्टीनेच नसते. इस्लामने त्यास नैतिक कर्तव्यशक्तीची कौशल्यपूर्ण जोड दिली. अनुशासन भंग केल्याने पूर्ण योजना कोलमडून जाते. ‘नंखला’ च्या मोहिमेवरून ही बाब स्पष्ट झालीच. ‘अब्दुल्लाह बिन जहश(र) यांनी ‘कुरैश’च्या काफिल्यावर छापा मारला असल्याने प्रेषित खूप नाराज झाले. या नाराजीचे कारण असे होते की, केंद्रीय नेतृत्वाकडून असा कोणताच आदेश नसताना त्यांनी छापा मारला होता. आदरणीय प्रेषितांच्या नेतृत्वात चालणार्या राज्यात प्रत्येक मुस्लिमास श्रद्धास्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य आणि ईश्वराची आज्ञा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच प्रत्येकास अन्याय व अत्याचार नष्ट करणारा सैनिक ठरविले आहे. अर्थात प्रत्येकाची ही नैतिक जवाबदारी आहे की, इस्लामी राज्याची सुरक्षा आणि इस्लामी आंदोलनातील अडसर दूर करण्यासाठी गरज पडली तर रणांगणावर उतरावे. संपूर्ण सैनिक प्रेषितांसमोर प्रतिज्ञा करीत असत की, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शत्रुचा सामना करू. आदरणीय प्रेषितांचा हा आदर्श संपूर्ण मुस्लिम समूदायाकरिता आहे.
आदरणीय प्रेषितांनी स्त्रिया, वृद्ध, अपंग आणि युद्धाशी संबंध न ठेवणार्यांना तसेच मंदीर व पूजास्थळातील संन्याशांना ठार करण्याची सक्तीने मनाई केली. त्याचप्रमाणे असा आदेश देखील दिला की, लढताना शत्रूच्या मुखावर ‘इस्लामचा कलमा’ (इस्लामी धर्मसूत्र)आल्यास त्याला ठार करू नये. तसेच ज्या वस्तीतून ‘अजान’ पुकारण्याची साद ऐकू येते अशा वस्तीवर हल्ला करू नये. एखाद्या शत्रूने अभय मागितल्यास किवा शरण येण्याची घोषणा केल्यास त्याला जीवदान द्यावे. या हेतुपूर्तीसाठी युद्ध सुरु करण्यापूर्वी इस्लामी लष्कराकडून घोषणा करण्यात येते की, प्रतिस्पर्धी लष्करास इस्लामी लष्कराची ताबेदारी स्वीकारावयाची असल्यास व शरण येऊन इस्लामच्या अटी मान्य करावयाच्या असल्यास हल्ला करण्यात येणार नाही व संपूर्ण लष्करास जीवदान देण्यात येईल. इस्लाम स्वीकारल्यासही हल्ला करण्यात येणार नाही. या दोन्हींपैकी कोणतीही अट मान्य नसल्यास युद्ध अटळ होईल. युद्धाची हीच पद्धत इस्लाममध्ये आहे. प्रेषितांनी अशी शिकवण दिली की, शत्रूपक्षांकडुन त्यांच्यातील एखाद्या सामान्यजणानेही शरण मिळण्याची विनंती केल्यास संपूर्ण लष्करास शरण देण्यात येईल. तसेच प्रेषितांनी असेही वचन दिले की, शत्रूपक्षाच्या मृतांच्या शवांचा अनादर केला जाणार नाही. पराभूत जणांचे नाक, कान कापण्याची व त्यांच्या शरीराची विभत्सना करण्याची प्रेषितांनी सक्तीने मनाई केली.
हे सामरिक नियम अगदी त्या काळात प्रेषितांनी घालून दिलेले आहेत की, ज्या वेळी कोणतेच आंतरराष्ट्रीय कायदे अस्तित्वात नव्हते. कोणतेही संयुक्त राष्ट्र संघ अस्तित्वात नव्हते. अशा या परिस्थितीत संपूर्ण जगाच्या इतिहासात प्रेषित मुहम्मद(स) हेच पहिले तत्वज्ञानी आहेत की ज्यांनी युद्धभूमीवरसुद्धा शत्रूंचे अधिकार आणि मुस्लिमांचे कर्तव्य निश्चित करून दिले. एवढेच नव्हे तर एकार्थाने शत्रूंचे संरक्षणसुद्धा यात आलेच. अपंग, वृद्ध आणि स्त्रियांच्या व युद्धात भाग न घेणार्या लोकांच्या शीलता, प्राण आणि संपत्तीची पूर्ण संरक्षण हमी देण्यात आली.
आजच्या प्रगत युगात मानवाधिकाराचा तोंडी जयघोष होताना आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या गप्पा मारताना आपण पाहतोच आहोत. संयुक्त राष्ट्रसंघ आणि मानवाधिकाराची जोपासना करण्याच्या गप्पा मारणार्या इतरही संस्था सध्या आहेतच. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकाराचे नियम व कायदे करण्यात आलेले आहेत. परंतु सुसभ्य, सुशील व प्रगत राष्ट्रेसुद्धा जेव्हा युद्धाच्या मैदानात उतरतात तेव्हा पराभूत पक्षाच्या लोकांचे प्राण घेण्यात येतेच, शिवाय त्यांच्या स्त्रियांच्या शीलतेवर हिंस्त्र पशूप्रमाणे हल्ले होतात. आबालवृद्धसुद्धा विजयीपक्षाच्या तावडीतून सुटत नाहीत. त्यांचा टाहो कुणाच्याही अंतःकरणास पाझर फोडत नाहीत. जीवदान आणि शीलदान मागणार्यांच्या झोळीत अत्याचाराचे निखारे टाकण्यात येतात. प्राण आणि शीलतेबरोबरच संपत्ती नष्ट करण्यात येते. या आधुनिक आणि प्रगत युगातही जेव्हा एखाद्या ठिकाणी टोळीयुद्ध वा सामुदायिक संघर्ष होतात अथवा एखादी क्रांतीची दावेदार शक्ती डोके वर काढते तेव्हा मानवता, शीलता, न्याय वगैरेंची सर्रास होळी करण्यात येते. याची बरीच उदाहरणे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो.
हे एक मोठेच दुर्दैव म्हणावे की, हे आधुनिक आणि प्रगत जग आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या मार्गदर्शन स्त्रातापर्यंत पोहोचले नाही.

जी माणसे आणि जे समूह एखादा महान उद्देश बाळगतात आणि या उद्देशपूर्तीस्तव ते जेव्हा हिजरत (देशत्याग) करतात, ते नवीन ठिकाणी आल्यावर धन-संपत्तीवर तुटून न पडता आपले मूळ उद्दिष्ट पूर्ण करण्याची चिता करीत असतात. ईशमार्गातील सच्चा मुहाजिर (स्थलांतरित वा वतनत्यागी) हा ईश्वरी अवज्ञेपासून स्वतःस वाचविण्यासाठी अणि ईश्वरी धर्मास प्रस्थापित करण्यासाठी वतन व आपले सर्वकाही त्यागणारा असतो.
मदीना शहर गाठताच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि इस्लामी आंदोलनावर प्राणार्पण करण्यास तयार असणार्या त्यांच्या अनुयायांचे पूर्ण लक्ष हे सत्य व्यवस्थास्थापनेस व्यावहारिक स्वरुप देण्याकडे लावले. त्यामुळे न्याय आणि दयेचे प्रतीक प्रेषित मुहम्मद(स) यांनी पहिल्याच ‘हिजरी सन’मध्ये या कामाची सुरुवात केली व यापैकी बरेच कार्य ‘हिजरी सन’ दोनमध्ये तडीस लावले.
आदरणीय प्रेषित आणि त्यांच्या सोबत्यांनी सर्वप्रथम नमाज कायम करण्याची व्यवस्था चालविण्यासाठी तत्काळ ‘मस्जिद’ निर्मितीची आधारशिला ठेवली. हीच मस्जिद पुढे चालून संसद, न्यायालय, विद्यालय आणि विद्यापीठ तसेच खजिना व अतीथी-गृह सिद्ध झाली.
आदरणीय प्रेषितांची सांडणी ज्या ठिकाणी बसली होती ती जागा दोन अनाथ बालकांच्या मालकीची होती. प्रेषितांनी त्या जागेची भरघोस किमत देऊन जागा खरेदी केली आणि मस्जिदबांधकाम सुरु केले. या कार्यात स्वतः प्रेषितांनी माती कालवण्यापासून ते दगड उचलण्यापर्यंत अक्षरशः मजुराप्रमाणे काम केले.
मस्जिद निर्माण झाल्यावर एक प्रश्न उठला की, मस्जिदीपासून दूरच्या लोकांना नमाज अदा करण्यासाठी कशा प्रकारे बोलविण्यात यावे. याविषयी अनेक प्रस्ताव लोकांनी प्रेषितांसमोर ठेवले. माननीय उमर(र) यांनी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाचे वर्णन प्रेषितांसमोर ठेवले की, त्या स्वप्नात त्यांनी अजानचे बोल ऐकले, असेच स्वप्न माननीय अब्दुल्लाह बिन जैद(र) यांनादेखील पडले. त्यांनीही स्वप्नात ऐकलेले बोल प्रेषितांना सांगितले. यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी हेच बोल ‘अजान’क्रियेसाठी पसंत केले आणि माननीय बिलाल(र) यांना अजान देण्याचा आदेश दिला. माननीय बिलाल(र) मोठ्या आदरभावनेने ‘अजान’ देऊ लागले. मस्जिदीस लागूनच गवत आणि चिखलाच्या साह्याने प्रेषितांसाठी एक साधे निवासस्थान तयार करण्यात आले. ही मस्जिद तयार झाली तेव्हा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे वय ‘त्रेपन्न वर्षे आणि एक महिना’ एवढे होते. हे ‘हिजरी सनाचे’ पहिले वर्ष आणि ‘रब्बिउल अव्वल’चा महिना होता.
ज्या लोकांना मोठमोठे पुण्यकर्म करावयाची असतात त्यांना या कर्मांपासून कोणतीही कठीण परिस्थिती रोखू शकत नाही. ते लवकरात लवकर हे कार्य तडीस लावतात. मस्जिद निर्माण होताच उपदेश आणि प्रवचनाचे कार्य सुरु झाले, जेणेकरून इस्लामी ज्ञानाचा प्रचार व्हावा, तसेच विचारसरणी आणि चारित्र्यनिर्मिती व्हावी. याच मस्जिदमध्ये एक पाठशाळा स्थापित झाली. यातील विद्यार्थ्यांना ‘असहाब-ए-सुफ्फा’ (अर्थात चबुतर्याचे विद्यार्थी) असे म्हणत. म्हणजे ‘सुफ्फा’ नावाचा एक चबुतरा होता. या ठिकाणी अविवाहित विद्यार्थी धर्मशिक्षण घेत असत आणि रात्री येथेच झोपत असत. या विद्यार्थ्यांच्या उपजीविकेची जवाबदारी मदीनावासीयांवर होती.
एखाद्या शहरास त्यागून आणि आपले सर्वस्वी उजाडून दुसरीकडे स्थलांतरीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा बिकट असतो. यामध्ये मानवसंबंध बिघडतात. लोकांमधील शालीनता निघून जाते. नैतिकमूल्ये नष्ट होऊ लागतात. कारण स्थानिक आणि स्थलांतरितांदरम्यान स्पर्धा निर्माण होते. संपत्ती वाटणीमध्ये तंटे बखेडे चालू होतात. स्थानिक हे स्थलांतरितांना परके समजून त्यांचे अधिकार हिरावून घेण्याच्या प्रयत्नात असतात. त्यातल्या त्यात मदीना शहर तर एक छोटेसे शहर होते. तेसुद्धा विविध वस्त्यांचे मिळून. साधनसामग्रीचा अभाव त्या ठिकाणी होता. अशा बिकट परिस्थितीतही मुहाजिरीन (अर्थात स्थलांतरित) ची जवळपास पंधरा ते वीस टक्के भरती तेथे झाली. परंतु या ठिकाणी जे घडले ते विचित्रच. कोणतीही स्पर्धा आणि ओढाताण झाली नाही. ‘अन्सार’ (मदीनावासीयांनी) मुहाजिरीनना भरभरून दिले. त्यांची अवहेलना मुळीच केली नाही. त्यांना बंधुभाव आणि स्नेहाने सर्व काही दिले. त्यांच्या गरजांची पूर्तता केली. कारण हे दोन्ही समूह प्रेषित मुहम्मद(स) यांचे अनुयायी असल्याने आपसात बंधुच हते. जगामध्ये असत्याविरुद्ध लढणारे आणि तेही प्रेषितांच्या नेतृत्वाखाली लढणारे एकजूट लष्कर होते. एका पक्षाने दुसर्या पक्षाचा भरभरून पाहुणाचार केला.
असे असले तरी ही बाब केवळ भावनिक होती. त्यामुळे एका स्थायी आणि कायमस्वरुपी भातृत्व व्यवस्थेची गरज होती. मानवकल्याणाचे ईश्वरी दूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय अनस बिन मालिक(र) यांच्या घरी एक सभा बोलावली. या सभेतील उपस्थितांची संख्या एकूणनव्वद होती. आदरणीय प्रेषितांनी प्रत्येक अन्सार आणि मुहाजिरमध्ये बंधुत्वाचे नाते प्रस्थापित केले. अशा रितीने जणू प्रत्येकामागे एक प्रकारचे सेवा कर्तव्य लावण्यात आले. अनसार (मदीनावासी) यांनी आपल्या जमीनी, शेती, बागा आणि घर व संपत्तींचा निम्मा वाटा मुहाजिरीन (स्थलांतरित) ना सादर केला. अन्सारच्या संपत्तीतून मुहाजिरीनना वारसाहक्क मिळू लागला. परंतु बरेच मुहाजिरीन असे होते की ज्यांनी अन्सारकडून संपत्ती स्वीकार केली नाही व व्यापारासंबंधी त्यांचे मार्गदर्शन मागितले. स्वतःच्या कष्टाने आणि व्यापार-धंद्याच्या माध्यमाने उपजीविका भागवू लागले.
कोणत्याही समूहाने अथवा पक्षाच्या व्यक्तीने इतर व्यक्तीशी कोणत्याही कारणास्तव किचितही कलह बाळगला नाही. कोणत्याही प्रकारचा संदेह बाळगला नाही. कबिला आणि क्षेत्रावर आधारित भेदभाव केला नाही.
संपूर्ण मानवी इतिहासात कोणतीही विचारसरणी वा आंदोलन विशेषकरून वर्तमान युगातील मुहाजिरीनांच्या पुनर्वसनाचे असे कोणतेच उदाहरण मिळणे शक्य नाही, जे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या अनुयायांनी सादर केले. त्यांचा मूळ चमत्कराच हा आहे की, त्यांनी अशा मानवी स्वभावाची रचना केली की ज्यांच्या दृष्टीने ईश्वर, प्रेषित आणि धर्माच्या तुलनेत विश्वाची संपूर्ण संपत्ती आणि प्रत्येक वस्तू कवडी मोल असते. देश, वतन, भूभाग, वंश, परिवार, धन दौलत यापैकी कोणतीच वस्तू सत्यधर्मासमोर महत्त्वाची नसते. वास्तविक इस्लामची शिकवणच मुळात अशी आहे की, या संपूर्ण अनैसर्गिक मर्यादा व सीमारेषा अथवा भेदभावांपासून मानवास दूर ठेवावे. खरे पाहता एखाद्या देश किवा प्रदेशाचे सर्वसमंत संविधान लागू करणे किती कठीण कार्य असते. या प्रगत काळामध्येसुद्धा काही राष्ट्रांना संविधान लागू करण्यासाठी कितीतरी वर्षांचा कालावधी लागतो. परंतु ही अतिशय विलक्षण बाब इतिहासात नोंद आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी राजकीय विवेकशीलतेचा उपयोग करून पहिल्याच हिजरी सनामध्ये ‘ज्यू’ लोकांच्या तीन मोठमोठ्या कबिल्यांना आणि अन्सारच्या दोन मोठ्या कबिल्यांना तसेच मुहाजिरीनच्या समूहास एका संवैधानिक समझोत्यावर सहमत केले. ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे की, अत्यंत विरुद्ध विचारधारा असतानासुद्धा मुस्लिम अल्पसंख्याकांचे नेते प्रेषित मुहम्मद(स) यांनी बिगर मुस्लिम बहुसंख्याक समूदायाकडून असा करारानामा तयार करून घेतला की ज्याचा सार अशाप्रकारे आहे.
  1. मदीनामध्ये जो नवीन समाज प्रेषित गठित करीत होते, त्यासाठी ईश्वराच्या अर्थात शरीयत (इस्लामी विधी) च्या कायद्यास मौलिक स्थान आहे.
  2. राजनीतिक, कायद्यात्मक आणि न्यायिक दृष्टीत अंतिम अधिकार प्रेषित मुहम्मद(स) यांच्या हाती असतील.
  3. प्रतिरक्षणात्मक दृष्टीने मदीना आणि सभोवतालची संपूर्ण वस्ती एक संयुक्त शक्ती बनली असून कोणत्याही घटकासाठी इस्लामद्रोही असलेल्या कुरैशजणांचे समर्थन करण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्याबरोबरच प्रतिरक्षणात्मक दृष्टीनेसुद्धा निर्णायक स्थान हे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासाठीच निश्चित करण्यात आले आहे.
मदीनाचा हा संवैधानिक करार हा वस्तुतः इस्लामी राज्यस्थापनेचे स्पष्ट दस्तावेज होते.
यावरून अनुमान करता येईल की, निश्चय पक्का असला आणि प्रबळ निर्णयक्षमता असली तर अत्यंत कठीण परिस्थितीमध्येसुद्धा मार्ग खुला होऊन उद्दिष्टांची प्राप्ती होते.

इस्लामी प्रचारकांच्या आंदोलकांसाठी मक्का शहरातील अन्यायपूर्ण वातावरण अत्यंत प्रतिकूल आणि जीवघेणे झाले होते. अत्याचारांची सीमा पार झाली होती. तर दुसरीकडे ‘मदीना’ शहरात इस्लामी आंदोलनासाठी वातावरण अतिशय अनुकूल झाले होते. यामुळे प्रेषित मुहम्मद (स.) यांचा उत्साह वाढत होता. प्रेषितांनी आपले सोबती मदीनेस पाठविले. आता केवळ माननीय अबू बकर(र) आणि अली(र) हे दोघेच मक्का शहरात राहिले.
सत्यधर्माच्या आंदोलनाचे विरोधक अत्यंत चितातूर होते. कारण इस्लामी प्रचाराचे अंकुर आता एका मोठ्या वृक्षात रुपांतरित झाले होते. त्यांच्यासमोर एकेश्वरवादाच्या स्त्रोतामुळे आलेल्या परिवर्तनाचे एक मोठे वादळ उभे होते. आता मात्र त्यांना कळून चुकले की, या वादळामुळे त्यांची अमानुष आणि अनेकेश्वरी व्यवस्था, त्यांचे पद व हुद्दे आणि अज्ञानावर आधारित कर्मकांड प्रथा, हे सर्वकाही नष्ट होणार आहे. या संकटाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी एके दिवशी मक्काच्या सर्व सरदारांनी ‘दारुल नदवा’ या सार्वजनिक हॉलमध्ये परिषद बोलाविली. चर्चा होत गेली. प्रेषितांचे आंदोलन चिरडण्यासाठी नवनवीन प्रस्ताव समोर येऊ लागले. परंतु इस्लामचा अतिशय कट्टर विरोधक असलेल्या ‘अबू जहल’ याने एक जबरदस्त योजना सादर केली.
ती योजना अशी होती की, प्रत्येक कबिल्याच्या एक एक प्रतिष्ठित तरूणाने शस्त्र घेऊन पुढे यावे. प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर सर्वच सशस्त्र तरुणांनी एकत्रितपणे हल्ला चढवून त्यांचा वध करावा. या हत्येची जवाबदारी कोणा एका कबिल्यावर न येता सर्वच कबिल्यांवर येईल आणि या सर्व कबिल्यांशी प्रेषितांच्या परिवाराची टक्कर घेण्याची हिम्मत होणार नाही.
हा प्रस्ताव इतका जबरदस्त होता की, परिषदेतील सर्वच सरदारांनी याचे समर्थन केले. इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना ‘मक्का’ शहर त्यागण्याचा ईश्वरी आदेश झाला. वैर्याची रहस्यमय रात्र येऊन ठेपली. ती प्रेषितत्वाच्या तेराव्या वर्षाची ‘सफर’ महिन्याची शुक्रवारची सत्तावीस तारीख होती. इकडे प्रेषितांनी आपले विश्वासू सोबती माननीय अली(र) यांना बोलावून सांगितले की, ‘‘मला ‘हिजरत’ ची (अर्थात स्थलांतर करण्याची) ईश्वरी आज्ञा झाली आहे. त्यामुळे आज रात्री मी आपल्या घरी झोपणार नाही. माझ्या जागी तुम्ही झोपावे. लोकांच्या ज्या अनामती माझ्याकडे आहेत त्या तुम्ही सकाळ होताच त्यांच्या त्यांना परत कराव्यात.’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या स्वच्छ चारित्र्याचे हे दर्शन होय. या अनामती सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने लोकांनी त्यांच्याकडे ठेवल्या होत्या. या लोकांमध्ये विरोधकसुद्धा होते. परंतु प्रेषितांनी विरोधकांच्या अनामतीसुद्धा जशास तशा परत केल्या. मग ते सरळ माननीय अबू बकर(र) यांच्या घरी आले. त्यांना ‘हिजरत’चा पूर्ण कार्यक्रम समजावून सांगितला. माननीय अबू बकर(र) यांनी सुरुवातीलाच या कार्यपूर्तीस्तव दोन सांडण्या तयार ठेवल्या होत्या. माननीय अबू बकर(र) यांनी एक सांडणी प्रेषितांना सादर केली, परंतु प्रेषितांनी आग्रह करून सांडणीची किमत त्यांना दिली. माननीय अबू बकर(र) यांच्या कन्या माननीय अस्मा(र) यांनी ताबडतोब एका कपड्यात खाण्याच्या वस्तू बांधून दिल्या. एक कापड पाण्याच्या मटक्यास बांधले.
नियोजित वेळेवर प्रेषित मुहम्मद(स) आपले सहकारी मा. अबू बकर(र) यांना घेऊन रात्रीच्या अंधारात ‘मदीना’च्या प्रवासावर निघाले. मक्का शहर त्यागतेवेळेस प्रेषितांच्या भावना ‘हेलावल्या’, त्या त्यांच्या मुखावर अशा रितीने प्रकटल्या,
‘‘ईश्वराची शपथ! ही भूमी ईश्वराची सर्वांत जास्त प्रिय भूमी आहे. मला ही भूमी त्याग करण्यावर विवश न केले गेले असते तर मी कधीच हिचा त्याग केला नसता!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपले जीवाभावाचे मित्र माननीय अबू बकर(र) यांच्यासोबत ‘सौर’ नावाच्या गुहेत पोहोचले. इकडे माननीय अली(र) हे प्रेषितांच्या बिछान्यावर चादर तानून निश्चित झोपले होते. विरोधक कुरैशांनी त्यांच्या निवासस्थानाचा घेराव केलेला होता. पूर्ण शहराची नाकेबंदी केली होती. रात्र संपत आली आणि विरोधक प्रेषितांच्या निवासस्थावर पोहोचले. घरात घुसून प्रेषितांच्या बिछान्यावर माननीय अली(र) यांना पाहताच त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. त्यांची पूर्ण योजना धुळीस मिळाल्याचा त्यांना भयंकर संताप चढला. प्रेषित त्यांच्या हातून निसटले होते. त्यांनी प्रेषितांचा पाठलाग करण्यासाठी चोहीकडे सशस्त्र माणसे पिटाळली. पाठलाग करणारे प्रेषितांनी आश्रय घेतलेल्या ‘सौर’ गुहेपर्यंत पोहोचले. आत प्रेषितांचे सोबती माननीय अबू बकर(र) हे चिताग्रस्त झाले. त्यांना वाटले की, शत्रू गुहेत शिरले तर अनर्थ होईल. पूर्ण इतिहासाची दिशाच बदलून जाईल. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना ईश्वराची विशेष सूचना प्राप्त होती. त्यांनी आपले सोबती माननीय अबू बकर(र) यांचे सांत्वन करताना म्हटले, ‘चिता करु नका, ईश्वराची मदत आपल्याबरोबर आहे.’ हे शब्द ऐकताच माननीय अबू बकर(र) यांच्या मनातली संपूर्ण भीती पार नाहीशी झाली. शत्रूने गुहेजवळ येऊन पाहिले. गुहेचे द्वार छोटे असल्याने त्यांना वाटले की, एवढ्या छोट्याशा द्वारातून कदाचित दोन माणसे आत जाऊ शकणार नाहीत. तेथून ते परत फिरले. प्रेषित मुहम्मद(स) आणि माननीय अबू बकर(र) यांनी तीन दिवस गुहेतच राहून काढले. माननीय अबू बकर(र) यांचे सुपुत्र अब्दुल्लाह(र) हे रात्रीच्या अंधारात येऊन मक्का शहरातील शत्रूंच्या हलचालीबद्दल प्रेषितांना पूर्णपणे खबर पोहोचवित असत. तसेच माननीय अबू बकर(र) यांचा नोकर आमिर हा शेळ्यांचा कळप घेऊन अंधार्या रात्री गुहेत येऊन त्यांना दूध पोहोचवित. शेळ्यांच्या चालण्याने मानवी पदचिन्हेसुद्धा मिटून जात असत आणि शत्रूला मानवी पायखुणा न दिसल्याने त्यांना वस्तुस्थितीचा अनुमान लावता येत नसे.
तीन दिवसांनंतर ‘अब्दुल्लाह बिन उरैकत’ हा निश्चित ठरलेल्या समयी ‘सौर’ गुहेत पोहोचला. त्याला वाळवंटातील आणि पर्वतातील रस्त्यांचे उत्तम ज्ञान असल्याने प्रेषितांनी त्यास ‘गाईड’ म्हणून अगोदरच नेमले होते. अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स), माननीय अबू बकर(र), अब्दुल्लाह बिन उरैकत आणि आमिर बिन कुहैरा या चौघांचा काफिला ‘रब्बिउल अव्वल’ महिन्याच्या एक तारखेस ‘मदीना’कडे रवाना झाला.
इकडे मक्का शहरात विरोधकांचा वैफल्याने अक्षरशः जळफळाट होत होता. त्यांनी मक्का शहरात दवंडी दिली की, ‘‘जो माणूस प्रेषित मुहम्मद(स) आणि अबू बकर(र) यांना जीवित अथवा मृत अवस्थेत आणून देईल त्यास शंभर उंट बक्षीस देण्यात येतील.’’ ही दवंडी ऐकताच मक्का शहरातील एक पटाईत घोडेस्वार ‘सुराका बिन मालिक’ नावाचा तापट तरूण आपला घोडा घेऊन प्रेषितांच्या मागावर लागला. तो पाठलाग करीत प्रेषितांच्या जवळ पोहोचला. परंतु अचानक त्याचा घोडा ठेचाळला. त्याने परत प्रेषितांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच परत त्याचा घोडा ठेचाळला आणि तोही घोड्यावरून कोसळला. तिसर्यांदा परत असेच घडले आणि त्याचे आंतरमन जागे झाले. त्याला वाटू लागले की, आदरणीय मुहम्मद(स) हे खरोखरच ईश्वराचे प्रेषित असल्याने त्यांच्यावर हात घालणे अशक्य आहे. त्याने प्रेषितांची माफी मागितली आणि प्रेषितांनी त्याच्या विनंतीवरून त्यास अभयपत्र लिहून दिले. प्रेषितांनी त्यास आज्ञा दिली की, ‘‘माझा पाठलाग करणार्यास परत पाठवा.’’ त्याने परत निघून पाठलाग करणार्या शत्रूंना सांगितले की, ‘‘मी या मार्गावर प्रेषितांना पाहिलेच नाही.’’ शत्रू ‘सुराका’ च्या शब्दांचा विश्वास करून परत फिरले.
या प्रवासामध्ये प्रेषितांचा हा काफिला ‘खुजाआ’ या कबिल्याच्या ठिकाणी पोहोचला. प्रेषितांनी त्यांना खाणपानाच्या वस्तूंबाबत विचारले, परंतु त्यांनी सांगितले, ‘‘हे प्रेषित! ईश्वराची शपथ! आमच्या घरी खाण्यापिण्याची काही जरी वस्तु असती तर आम्ही आपणास निश्चितच दिली असती. त्या ठिकाणी एक अटलेली शेळी होती. प्रेषितांनी तिचे दूध काढण्याची परवानगी घेतली आणि इतके दूध काढले की, प्रेषितांच्या सोबत्यांबरोबरच ‘उम्मे माअबद’च्या सर्व परिवारजणांनी पोटभरून दूध पिले. परत आणखीन दूध काढले आणि ‘उम्मे माअबद’ यांना दिले. ‘उम्मे माअबद’ यांचे पती आपल्या शेळ्या घेऊन संध्याकाळी घरी परतले, तेव्हा पत्नीने संपूर्ण वृत्तान्त पतीस सांगितला.
पत्नीच्या तोंडून संपूर्ण वृत्तान्त ऐकल्यावर पतीला कळून चुकले हा माणूस नक्कीच ईश्वराचा प्रेषित आहे. अटलेल्या शेळीच्या स्तनातून दूध निघणे म्हणजे प्रेषितांवर झालेली दैवी कृपाच होय.
प्रेषितांच्या प्रवासामध्ये रस्त्यात त्यांना माननीय जुबैर(र) ‘सीरिया’कडून व्यापारी दौरा आटोपून येताना भेटले. त्यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि माननीय अबू बकर(र) यांना पांढरे वस्त्र भेट म्हणून सादर केले. आदरणीय प्रेषितांना ठार करण्यासाठी ‘बुरैदा अस्लमी’ आपल्या सत्तर सहकार्यांसह शस्त्रे घेऊन आले. त्यांनी प्रेषितांशी लढण्यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला. प्रेषितांनी त्यांना दिव्य कुरआनातून ईश्वरी संदेश दिला. या संदेशामुळे ‘बुरैदा अस्लमी’ आणि त्यांचे सत्तर सशस्त्र सहकारी इतके प्रभावित झाले की, या सर्वांनी याच ठिकाणी इस्लामची दीक्षा घेतली. आपल्या चुकीच्या निर्णयाचा त्यांना भयंकर पश्चात्ताप झाला. दयाळू प्रेषितांनी त्यांचे सांत्वन केले. माननीय बुरैदा अस्लमी यांनी इच्छा व्यक्त केली की, आपल्या या ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या मंगल प्रवासामध्ये आपल्या पुढे एक झेंडा असावयास हवा. आदरणीय प्रेषितांनी त्यांच्या विनंतीस मान देऊन आपली पगडी काढली व त्यांच्या भाल्यास बांधून झेंडा तयार केला व तो ‘बुरैदा अस्लमी’ यांच्या हाती दिला. माननीय बुरैदा अस्लमी(र) हे झेंडा घेऊन पुढे चालत होते आणि हा काफिला ईश्वर महिमत्वाचे नारे लावत चालत होता.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या ‘मदीना’ स्थलांतराची शुभवार्ता मदीना शहरात पोहोचली. मदीनावासी प्रेषितांची अत्यंत आतुरतेने वाट पाहू लागले. प्रेषित मदीना शहराच्या जवळ येताच एका ‘ज्यू’ माणसाने त्यांना किल्ल्यावरून पाहिले आणि सर्व मदीनावासीयांना आवाहन करून सांगितले की, ‘मदीनावासीयांनो! तुम्ही ज्या सद्गृहस्थांची आतुरतेने वाट पाहात होता, ते येऊन पोहोचले आहेत.’’
‘रब्बिउल अव्वल’ महिन्याची ही आठ तारीख होती. अन्सारां (मदीनावासी) मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी आपापली हत्यारे उंचावून प्रेषितांच्या आगमनाचा जल्लोष साजरा केला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे काही दिवस मदीना शहराबाहेरील ‘कुबा’ या वस्तीत तेथील सरदार ‘कुलसुम बिन हिजम’ यांच्या निवासस्थानी थांबले. तेवढ्यात माननीय अली(र) हेसुद्धा प्रेषितांच्या सूचनेनुसार लोकांच्या अनामती परत करून प्रेषितांना येऊन भेटले. ‘अन्सार’ (मदिनावासी) प्रेषित आणि त्यांच्या सोबत्यांना गटागटाने येऊन भेटू लागले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी या ठिकाणी पहिल्या मस्जिदीचा पाया रोवला. बांधकामामध्ये प्रेषितांनी जातीने कष्ट घेतले. याच ठिकाणी त्यांनी ‘जुमा’ (शुक्रवार) ची नमाज अदा केली आणि अत्यंत प्रभावी खुतबा (भाषण) दिला.
‘कुबा’ या ठिकाणी चौदा दिवस व्यतीत करून ‘जुमा’ची नमाज आटोपून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) मदीनाकडे रवाना झाले. प्रत्येक ठिकाणी प्रेषितांचे जल्लोषपूर्ण स्वागत होत होते.
मदीना शहरातील प्रत्येक मुस्लिम प्रेषितांच्या सांडणीची लगाम धरून आपल्या घरी घेऊन जाऊन पाहुणाचार करू इच्छित होता. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘सांडणीस सोडून द्या. ही ईश्वराकडून नियुक्त करण्यात आली आहे. ही स्वतःहून ज्याच्या दारासमोर उभी राहील, त्याचा पाहुणचार मी स्वीकार करेन!’’ चालता चालता त्यांची सांडणी ‘माननीय अबू अय्यूब अन्सारी(र)’ यांच्या घरासमोर बसली. अशा रितीने प्रेषितांच्या पाहुणचाराची शुभसंधी त्यांना मिळाली.
या प्रसंगापासून इस्लामी इतिहासातील न्याय आणि दयाभावाच्या नवीन अध्यायाची सुरुवात झाली. संघर्षाच्या एका नवीन पर्वाची आणि त्याचबरोबर उत्कर्षाच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे एकेदिवशी भल्या पहाटेच घरून निघाले आणि सुख व शांतीचा ईश्वरी संदेश देण्यासाठी गल्लोगल्ली फिरले. पूर्ण दिवस पायपीट करूनही एकही व्यक्ती प्रेषितांचा संदेश स्वीकारण्यास तयार झाला नाही. प्रेषित दिसताच त्यांच्याशी गुंडगिरी करणे व टवाळखोरी करणे, अशी योजनाच विरोधकांनी तयार केली होती. ज्यांच्या कल्याण व भलाईसाठी प्रेषित अहोरात्र झटत होते, तेच लोक स्वतःच्या कल्याणापासून दूर पळत होते. प्रेषित मुहम्मद(स) सायंकाळी खूप व्यथित झाले.
दुसर्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास मक्का शहराची जमीनच आता नापीक होत होती. चांगले व सज्जन लोक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याभोवती गोळा झाले होते आणि सज्जनता व शृजनशीलतेचा अभाव असणारेच तेवढे प्रेषितांचा विरोध करीत होते. ही दुःखद स्थिती पाहूनच कदाचित प्रेषितांनी मक्का शहराच्या बाहेर इतर मानवांना सत्य संदेश देण्याचा कार्यक्रम आखला. यासाठी ते माननीय जैद बिन हारिसा(र) यांना घेऊन ‘तायफ’ शहराकडे रवाना झाले.
हा खडतर प्रवास त्यांनी पायीच केला. रस्त्यात ज्या वस्त्या होत्या, तेथील लोकांना त्यांनी ईश्वरी धर्माचा संदेश दिला. हा प्रवास पूर्णतः एक महिन्याचा होता.
‘तायफ’चा भूप्रदेश खूप सुपीक आणि वैभवसंपन्न असल्याने तेथील लोकांना ईश्वराचा विसर पडलेला होता. चारित्र्य आणि नैतिकतेची बंधने झुगारुन ते स्वैर जीवन जगत होते. शिवाय व्याजखोरीमुळे तेथील लोकांच्या मानवी भावनांमध्ये खूप मरगळ आलेली होती.
‘तायफ’ शहरी पोहोचून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘सकीफ’ कबिल्याच्या प्रमुखांची अर्थात ‘अब्दे या लैल’, ‘मसऊद’ आणि ‘हबीब’ यांची भेट घेतली. प्रेषितांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि प्रभावपूर्ण सत्यधर्माचा संदेश देऊन समर्थन मागितले. परंतु ते तिन्हीही सरदार विपरित बुद्धीचे निघाले. प्रेषितांना एकाने उत्तर दिले की, ‘‘जर ईश्वरानेच खरोखर आपणास प्रेषित म्हणून पाठविले असेल तर तो काबागृहावरील ‘गिलाफ’चे तुकडेतुकडे करू इच्छितो.’’ (अर्थात ईश्वराने मूर्खपणाचाच निर्णय घेतला.)
दुसरा उत्तरला,
‘‘अरे तर ईश्वराला तुमच्यापेक्षा जास्त योग्य दुसरा कोणी प्रेषित बनविण्यासाठी मिळाला नाही काय?’’आणि तिसर्याने उत्तर दिले,
‘‘मी तर तुमच्याशी काहीच बोलू इच्छित नाही. कारण तुम्ही जर खरोखरच ईश्वराचे धाडलेले प्रेषित असाल तर तुमच्याशी बोलणे म्हणजे प्रेषिताचा अपमान ठरेल. जर तुमचे बोलणे खोटे असेल तर तुमच्याशी बोलणेच उचित ठरणार नाही.’’ या तिन्ही सरदारांची नकारार्थी उत्तरे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काळजात जणू विषारी बाणांसारखी उतरली. परंतु ते संयमाचे पर्वत होते. त्यांनी मोठ्या धैर्याने म्हटले,
‘‘बरे ठीक आहे! तुम्ही या गोष्टी स्वतःपर्यंतच सीमित ठेवा. इतरांत सांगू नका!’’ परंतु या तिन्ही सरदारांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या विनंतीकडे कानाडोळा करून शहरातील टवाळ मुलांना, नोकरांना व गुलामांना प्रेषितांच्या मागे त्यांना शहराबाहेर काढण्यासाठी लावले. टवाळांचे टोळके प्रेषितांमागे लागले. त्यांच्यावर दगडांचा वर्षाव झाला, प्रेषितांचा रक्तस्त्राव झाला. प्रेषितांच्या पायांतील वाहना रक्ताने माखल्या, रखरखत्या उन्हात रक्तबंबाळ करून त्यांना शहराच्या बाहेर काढण्यात आले. खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांना प्रचंड थकवा आला. अरब प्रदेशाच्या वाळवंटी वातावरणातील उष्णतेने त्यांना प्रचंड तहान लागली. सोबत असलेल्या माननीय जैद(र) यांनी त्यांचे रक्त साफ केले. ते दोघे शहराबाहेर आले आणि एका बागेत प्रेषितांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. शरीरातून रक्त आणि डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबायचे नाव घेत नव्हते. परंतु अतिदयाळू प्रेषितांनी या झाडाखाली दम घेऊन प्रार्थना केली, ‘‘हे ईश्वरा! आपल्या अशक्तपणाची आणि विवशतेची फिर्याद केवळ तुझ्यासमोरच करतो. तूच माझा स्वामी आहेस. तू जर माझ्याशी प्रसन्न असला तर मला विरोधकांची मुळीच चिता नाही. मी केवळ तुझ्याच आश्रयाची याचना करतो. तुझ्याच कांतीमय मार्गदर्शनाची आशा बाळगतो की, ज्यामुळे अन्याय, अत्याचार आणि मार्गभ्रष्टतचे सर्व काळेकुट्ट अंधार हे सतमार्गात परिवर्तीत होतात आणि विश्वाच्या सर्व समस्यांचे निराकरण होते. तुझ्याशिवाय ही शक्ती व सामर्थ्य इतर कोणातच नाही.’’
बागेच्या मालकांनी आपल्या ‘अद्दास’ नावाच्या नोकराकरवी द्राक्षांची थाळी प्रेषितांना पाठविली. प्रेषितांनी स्वीकार केला. प्रेषितांनी ईश्वराचे नाव घेऊन द्राक्षे खाण्यासाठी हात पुढे केला. ईश्वराचे नाव कानी पडताच ‘अद्दास’ विस्मयचकित झाला, कारण खाण्यास सुरुवात करताना ईश्वराचे नामस्मरण करणे हे प्रेषितत्वाचेच गुणधर्म आहेत, हे त्यास चांगले ठाऊक होते. त्याने मोठ्या आस्थेने प्रेषित मुहम्मद(स) यांची सेवा केली. हा ‘अद्दास’ नावाचा नोकर मालकांकडे परत आला तेव्हा मालकांनी त्याची कानउघाडणी करून दम दिला की, मुहम्मद(स) यांच्या शब्दांत येऊन त्यांचा धर्म स्वीकारु नकोस! परंतु अद्दासने मालकांना उत्तर दिले की, ‘‘त्यांच्यापेक्षा कल्याणकारी मानव या जगात कोणीच नाही. कारण त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली जी केवळ प्रेषितच सांगू शकतो.’’
थोडी विश्रांती झाल्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना जैद(र) यांनी आपल्या खांद्यावर घेऊन ‘कर्नुस्सअलिब’ या ठिकाणी आणले. प्रेषितांचे रक्त धुतले. प्रेषितांनी या ठिकाणी विश्रांती घेतली. माननीय जैद(र) यांना प्रेषितांची ही अवस्था पाहून खूप दुःख होत होते. त्यांनी प्रेषितांना म्हटले की, ‘‘या ‘तायफ’वाल्यांना श्राप द्यावा.’’ परंतु अतिदयाळू प्रेषित म्हणाले,
‘‘मुळीच नाही, मला ईश्वराने मानवांसाठी दयाभावनांचा आदेश दिला. मी त्यांना श्राप कसा काय देईन? या लोकांनी जरी इस्लाम स्वीकारला नाही तर भविष्यात यांची संतती निश्चितच इस्लामचा स्वीकार करील.’’
प्रेषित मुहम्मद(स) आणि माननीय जैद(र) तेथून ‘नखला’ या ठिकाणी काही दिवस राहिले. मग ‘मुतईम बिन अदी’च्या समर्थनामुळे प्रेषित काबागृहात परतले. त्यांनी काबागृहात प्रथम नमाज अदा केली आणि मग घरी परतले.
‘तायफ’च्या प्रचारदौर्यामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर जे अत्याचार करण्यात आले त्यांना काही मोजक्या शब्दांत आम्ही वर्णन केले आहे. त्या अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खरे तर शब्द अपुरे पडतात. ‘तायफ’ येथील सरदारांकडून झालेल्या अमानवी व्यवहाराचे प्रेषितांच्या शरीरावर आणि मनावर पडलेले घाव जाणून घेण्यासाठी एका मानवी भावनांनी भरलेल्या अंतःकरणाचीच गरज आहे.
एकदा प्रेषितपत्नी मा. आयशा(र) यांनी प्रेषितांना विचारले,
‘‘हे प्रेषिता! तुमच्यावर ‘उहुद’च्या युद्धाच्या दिवसांपेक्षाही जास्त कष्टदायक घटना कोणती घडली?’’ आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले,
‘‘हे आयशा! तुमच्या परिवारजणांकडून जो त्रास झाला, तो तर झालाच. परंतु त्याहीपेक्षा माझ्यावर जी कष्टदायक घटना घडली ती तायफ येथील प्रचारदौर्याच्या प्रसंगी घडली. तो दिवस माझ्यावर अतिशय कठीण होता की, ज्या दिवशी मी ‘तायफ’च्या सरदारांना सत्यधर्माचे निमंत्रण देत होतो आणि त्यांनी हे निमंत्रण झुगारुन लावले होते. त्याचे दुःख मला अनावर झाले होते.
‘तायफ’ वरून परत आल्यावरसुद्धा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी धीर सोडलेला नव्हता. त्यांनी आपली चळवळ अधिक तीव्र केली. कारण ईश्वराने पाठविलेले धैर्यवान प्रेषित जे समस्त विश्वासाठी हितैषी असतात आणि समस्त मानवजातीसाठी कल्याणाच्या वाटा उघडण्यासाठी असतात, ते निश्चय व संकल्पाचा एक मार्ग बंद पडताच दुसरा मार्ग काढतात.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी पाहिले की, मक्का शहराप्रमाणेच तायफ शहराची भूमीसुद्धा नापीक आहे, तेव्हा त्यांनी मक्का शहराबाहेर रस्त्यावर येऊन वाटसरूंना आपला संदेश पोहोचविण्यास सुरुवात केली. कधीकधी ते शेजारच्या एखाद्या वस्तीत जाऊन तेथील कबिल्यांच्या सरदारांपर्यंत पोहोचून इस्लामचा संदेश देत. अशा प्रकारे त्यांनी जवळपासच्या चौदा-पंधरा कबिल्यांपर्यंत सत्यधर्माचा संदेश पोहोचविला.
त्या काळात प्रेषित मुहम्मद(स) हे ‘किन्दा’ या कबिल्याच्या सरदारांना जाऊन भेटले व म्हणाले,
‘‘तुमच्या आजोबांचे नाव ‘अब्दुल्लाह’ (अर्थात एकाच ईश्वराचे दास) होते. तेव्हा तुम्हीसुद्धा एकाच ईश्वराची उपासना करून आपल्या आजोबांच्या नावाचा मान राखा आणि त्यानुसार आपले जीवन एकाच ईश्वराच्या आज्ञेस समर्पित करा!’’
‘हज’ करण्यासाठी येणार्या इतर कबिल्यांच्या लोकांनासुद्धा पूर्वीप्रमाणेच प्रेषितांनी इस्लामचा संदेश दिला.
एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘आमिर बिन सअ्सआ’ या कबिल्याच्या ‘बहैरा’ सरदारास इस्लामचा संदेश दिला. ‘बहैरा’ ने प्रेषितांना विचारले,
‘‘जर मी तुमच्या संदेशाचा स्वीकार करून तुमची साथ दिली आणि तुमच्या विरोधकांवर प्रभुत्व मिळविले, तर तुमच्यानंतर इस्लामी शासनाची धुरा माझ्या हाती येईल काय?’’
‘‘ते ईश्वराच्या अख्त्यारित आहे. तो ज्यास योग्य समजेल त्यास माझा वारस बनविल!’’ प्रेषित उत्तरले. मुळात ‘बहैरा’ असे समजत होता की, इस्लाम स्वीकारण्याच्या परिणामस्वरुप प्रेषितांचे राज्य स्थापन होईल. प्रेषितांनी या ठिकाणी राजकीय सौदेबाजी नाकारली. कारण सत्यधर्मात सौदेबाजीला कोणतेच स्थान नाही.
यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे ‘हुजैल बिन शैबान’ कबिल्यात गेले. सोबत प्रेषितांचे परममित्र माननीय अबू बकर(र) हेही होते. कबिल्याच्या लोकांनी प्रेषितांचा संदेश मनःपूर्वक ऐकला. कबिल्याचा सरदार मफरुक म्हणाला,
‘‘आपला मूळ संदेश काय आहे?’’
यावर प्रेषितांनी दिव्य कुरआनची ही आयत पठण केली,
‘‘ईश्वर एकमेव उपास्य असून मी त्याने पाठविलेला प्रेषित आहे!’’ ही दिव्य कुरआनची ‘सूरह-ए-अनआम’ची आयत क्र. १५२ आहे. ‘मफरुक’च्या सोबत ‘मुसन्ना’ आणि ‘हानी’ हे सरदारदेखील होते. सर्वांनी प्रेषितवाणीची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘ही वाणी तर अत्यंत मनाला हेलावून ठेवणारी आहे. परंतु आपली धारणा आणि श्रद्धा अचानक बदलणे म्हणजेच आमच्या पारंपरिक धर्माला सोडण्यासारखे होईल. हे आमच्यासाठी कठीण आहे. शिवाय ‘ईराण’चा सम्राट ‘किसरा’शी आमचा समझोता आहे की आम्ही त्यांच्याशिवाय कोणाच्याच प्रभावाधीन राहणार नाही.’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांची स्पष्टोक्ती खूप पसंत केली आणि म्हणाले,
‘‘असो! आपल्या धर्माचे रक्षण ईश्वर स्वतःच करेल!!’’
इतक्या कबिल्यांना प्रेषित मुहम्मद(स) यांनी इस्लामचा संदेश दिला, परंतु त्या कबिल्यांचे दुदैवच! त्यांच्यापैकी एकानेही इस्लामचा स्वीकार केला नाही. एकार्थाने प्रत्येक प्रयत्न विफल होत गेले. एवढे असूनही प्रेषितांनी कधीच आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही.
अत्याचारांनी आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडल्या आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मानवसमाजाच्या शेतीत सत्यधर्माच्या संदेशाचे बी पेरूनही ते उगत नव्हते, तेव्हा याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, आता मात्र एखादी प्रचंड मोठी घटना घडणार आहे.

या जगात एखादे कार्य विकास पावत असल्यास जळफळाट करून घेणार्यांचा विरोध आणखीनच तीव्र होत जातो. मक्कामध्येदेखील असेच घडले. एकीकडे दोन प्रमुख व्यक्ती क्रांतिदूत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याने इस्लामी आंदोलनास बळ प्राप्त झाले, तर दुसरीकडे विरोधकांचा जळफळाट होऊन त्यांच्या विरोधाच्या ज्वाला अधिक तीव्र झाल्या.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे काका माननीय हमजा(र) यांनी अद्याप इस्लाम स्वीकार केला नव्हता. तसेच इतर विरोधकांप्रमाणे त्यांनी प्रेषितांचा विरोधही केला नव्हता. ते नेहमी शिकार करणे आणि सैरसपाटा करण्याच्या छंदातच मग्न असत. यामुळे त्यांना प्रेषितांच्या सत्यधर्माच्या संदेशाकडे लक्ष देण्याची सवडही मिळत नसे. एक दिवशी नेहमीप्रमाणे ते शिकारीवरून परत येत असताना ‘इब्ने जुदआन’ची दासी त्यांना रस्त्यात भेटली आणि त्यांना धिक्कारून म्हणाली, ‘‘हे अबू अम्मारा! (हमजा यांचे टोपण नाव) थोड्या वेळापूर्वी जर तुम्ही येथे असता तर तुम्ही डोळ्यांनी पाहिले असते की, ‘अबू जहल’ याने तुमच्या पुतण्याशी (मुहम्मद(स) यांच्याशी) किती वाईट आणि अमानुष वर्तन केले. त्यांना शिवीगाळ केली. अंगावर माती आणि शेण टाकले, शारीरिक इजा पोहोचविली. धिक्कार असो तुमचा आणि तुमच्या ‘हाशिम’ परिवारजणांचा की त्या अनाथाच्या रक्षणार्थ हात उचलण्यासाठी तुमच्यात दम नाही!’’
माननीय हमजा(र) यांचा संताप अनावर झाला. ‘अबू जहल’ अजूनही तेथेच होता. माननीय हमजा(र) यांनी आपल्या धनुष्याचा वार त्याच्या डोक्यावर इतक्या जोरात मारली की, अबू जहल रक्तबंबाळ झाला. तसेच आवेशाच्या भरात त्यास खडसावले की, ‘‘तू मुहम्मद(स) यांना शिव्या देतोस आणि त्रस्त करतोस, तेव्हा कान उघडून ऐकून घे! आजपासून मीच प्रेषित मुहम्मद(स) यांचा धर्म स्वीकारतो. मग पाहतो की, मला रोखण्याची कोणात हिमत आहे!!’’
मग माननीय हमजा(र) सरळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत हजर होऊन म्हणाले, ‘‘मुहम्मद(स)! मी तुम्हाला आनंदाची बातमी देत आहे. अबू जहलने तुमच्यावर केलेल्या अत्याचाराचा मी बदला घेतला आहे.’’ प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘काकावर्य! ज्या वेळेस आपण मूर्तीपूजा सोडून सत्यधर्माचा स्वीकार कराल, तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा असेल.’’
या ठिकाणी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना आपल्या वैयक्तिक भावनांच्या समाधानापेक्षा जास्त काळजी सत्यधर्माच्या प्रसाराचीच आहे. त्यांचा उपदेश ऐकून माननीय हमजा(र) रात्रभर विचार करीत राहिले आणि पूर्ण विचारांतीच त्यांनी इस्लाम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सकाळी त्यांनी प्रेषितदरबारी येऊन इस्लामचा स्वीकार केला.
माननीय हमजा(र) यांच्या इस्लाम स्वीकारण्याची वार्ता मक्का शहरात वणव्यासारखी पसरली. इस्लामच्या अनुयायांना एकीकडे अत्यानंद झाला, तर दुसरीकडे विरोधक मात्र खूप संतापले. या घटनेच्या प्रतिक्रेयेत विशेषकरून अबू जहलचे त्यांच्याशी वैर जास्तच वाढले. त्याने आवेशपूर्ण घोषणा केली की, ‘‘जो माणूस मुहम्मद(स) यांचा वध करून त्यांचे शीर माझ्यासमोर हजर करील त्यास शंभर लाल रंगाचे उंट आणि एक हजार तोळे चांदी बक्षीस देण्यात येईल.’’ विशेषतः ‘अबू जहल’ याने आपले तरूण आणि युद्धपटू व कोणालाही न जुमानणारे भाचे माननीय उमर(र) यांना या कामासाठी उत्तेजित केले. (या वेळी माननीय उमर(र) यांनी इस्लामचा स्वीकार केला नव्हता) माननीय उमर(र) यांनी तलवार उपसली आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या वधाचा पक्का निर्धार केला.
आधी ते सरळ माननीय अरकम(र) यांचा समाचार घेण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाले. रस्त्यात त्यांचे मित्र नुएम बिन अब्दुल्लाह भेटले व त्यांना विचारले, ‘‘हे उमर(र)! कोठे निघाला आहात?’’ ‘‘मी मुहम्मद(स) यांचा शीरच्छेद करण्यासाठी निघालो आहे!’’ उमर(र) ताडकन उत्तरले. ‘नुएम’ म्हणाले, ‘‘आधी आपल्या घरच्यांचा तर समाचार घ्या.’’
‘‘काय केले माझ्या घरच्या लोकांनी?’’ उमर(र) यांनी आश्चर्यचकित होऊन विचारले, ‘‘माझे कोणते घरचे लोक?’’
‘‘तुमची बहीण ‘फातिमा’ आणि मेहुणे ‘सईद बिन जैद’ यांनी इस्लामचा स्वीकार केला आणि मानवकल्याणाकडे हाक देणार्यांच्या अनुयायांत सामील झाले.’’
‘नुएम’ यांचे उत्तर ऐकताच उमर(र) यांचा संताप अनावर झाला. त्यांनी माननीय अरकम(र) यांच्या घराची वाट सोडून प्रथम आपल्या बहीण-मेहुण्याचा समाचार घेण्यासाठी निघाले. दरवाजावर खटका दिला, तेव्हा दोघे पती-पत्नी माननीय खब्बाब(र) यांच्याकडून कुरआनची शिकवण घेत होते. दारावर जोरदार थाप ऐकताच घरच्यांनी ओळखले की, माननीय उमर(र) आले. ते तिघेजण खूप घाबरले. माननीय खब्बाब(र) यांनी घराच्या मागच्या भागात धूम ठोकली. बहीण फातिमा(र) यांनी दिव्य कुरआनची पाने लपविली आणि दार उघडले. उमर(र) संतापाच्या अतिरेकाने थरथर कापत होते. त्यांनी रागाच्या भरात आवेशोद्गार काढले,
‘‘माझ्या कानी आले की, तुम्ही दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. म्हणून तुम्हा दोघांना कायमचा धडा शिकविण्यासाठी आलो आहे!’’ एवढे सांगून ते माननीय सईद(र) यांच्यावर तुटून पडले. त्यांचे केस धरून त्यांना जमिनीवर पाडून अमानुषपणे बदडण्यास सुरुवात केली. माननीय फातिमा(र) आपल्या पतीच्या रक्षणार्थ आडवी आली आणि माननीय उमर यांचा एक जोरदार प्रहार फातिमा(र) च्या चेहर्यावर पडला. प्रहारामुळे त्या रक्त बंबाळ झाल्या. अशा अवस्थेतच माननीय फातिमा(र) दृढ निश्चयपूर्वक उद्गारल्या, ‘‘होय! आम्ही इस्लाम धर्म स्वीकार केला! ईश्वराच्या प्रेषितांच्या अनुयायांत सहभागी झालो! आता तुला काय करायचे ते करून घे! आमच्या हृदयावर शिक्कामोर्तब झालेले ईश्वरी चिन्ह तुला कधीच नष्ट करता येणार नाही!’’
रक्तबंबाळ झालेल्या आणि डोळ्यांत अश्रू आलेल्या बहिणीचे निश्चयपूर्ण वाक्य ऐकून माननीय उमर(र) यांचे बहिणीशी असलेले ममत्व जागृत झाले. आपल्या बहिणीच्या आपणच केलेल्या दुरावस्थेचा त्यांना पश्चात्ताप झाला आणि त्यांच्या संतापाची तीव्रता शमली. मग त्यांनी आपल्या बहिणीस प्रेमाने विचारले, ‘‘बरे तुम्ही जी वाणी वाचत होता ती मलादेखील दाखवा!’’ ‘‘तू त्या वाणीस नष्ट करशील!’’ बहीण फातिमा(र) उत्तरल्या. माननीय उमर(र) यांनी प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, ‘‘मी वाचून परत देईन.’’ फातिमा(र) यांनी सांगितले, ‘‘उमर(र)! ही ईश्वराचीं वाणी आहे. शुचिर्भूततेशिवाय यास (कुरआनास) हात लावता येणार नाही. तू आधी स्नान करून मगच वाचायला घे.’’
माननीय उमर(र) यांनी बहिणीच्या विनंतीवरून स्नान केले. फातिमा(र) यांनी दिव्य कुरआन त्यांना दिले. या ठिकाणी ‘सूरह-ए-ताहा’ असलेले. पान उमर(र) पठण करू लागले. पठण करताना त्यांचे रोम रोम कापू लागले. दिव्य कुरआनचा त्यांच्या आंतरात्म्यावर कमालीचा प्रभाव होत होता. परिणामी त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले आणि त्यांनी आरोळी ठोकली, ‘‘खरोखरच मी साक्ष देतो की, ईश्वराशिवाय कोणीच उपास्य नसून मुहम्मद(स) ईश्वराचे प्रेषित आहेत.’’
त्यांची आरोळी ऐकताच घराच्या मागच्या भागात लपून बसलेले माननीय खब्बाब(र) समोर आले व म्हणाले, ‘‘हे उमर(र)! तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी कालच ईश्वरदरबारी प्रार्थना केली होती की, ‘‘हे ईश्वरा! तू उमर बिन हिश्शाम (अबु जहल) आणि उमर बिन खत्ताब(र) या दोघांपैकी एकास इस्लाममध्ये दाखल करून इस्लामी आंदोलनास शक्ती प्रदान कर!’’ माननीय खब्बाब(र) यांच्यासोबत माननीय उमर(र) आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या दरबारी हजर झाले. ‘‘हे उमर(र)! कोणत्या उद्देशाने आलात?’’ आदरणीय प्रेषितांनी नम्रपणे विचारले.
‘‘एकमेव ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवण्याचा स्वीकार करण्यासाठीच आलो!’’ माननीय उमर(र) भावूक होऊन उत्तरले. हे ऐकून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांचे सर्व अनुयायी आनंदाने म्हणाले, ‘‘अल्लाहु अकबर!’’ (अर्थात ‘‘ईश्वर सर्वांत महान आहे!’’)
माननीय उमर(र) हे अरब समाजातील अतिशय शूर, शक्तिशाली, महापराक्रमी व महाप्रतापी व्यक्ती समजले जात होते. माननीय हमजा(र) आणि उमर(र) या दोन शक्तींमुळे इस्लामी आंदोलनास प्रचंड शक्ती मिळाली. मुस्लिमांवर अमर्याद अत्याचार होत असताना या व्यक्तीमुळे इस्लाम धर्माचा स्वीकार करून सत्याच्या आंदोलनास प्रचंड शक्ती मिळाली. आता मात्र तेथील वातावरणात प्रचंड परिवर्तन झाले. माननीय उमर(र) यांनी विचार केला की, ‘कुरैश’ कबिल्यामध्ये ‘जमील बिन मअमर’ हा माणूस आपल्या इस्लामस्वीकृतीची वार्ता चांगल्यारीतीने पसरवू शकतो. म्हणून ते सकाळीसकाळीच त्याच्या घरी गेले आणि त्यास सांगितले की, ‘‘मी प्रेषित मुहम्मद(स) यांच्या ईश्वरी धर्माचा स्वीकार केला आहे.’’ ‘जमील बिन मअमर’ याने तत्काळ चादर ‘‘हे कुरैश कबिल्याच्या लोकांनो! हा माणूस खोटे बोलत आहे. मी निधर्मी मुळीच झालो नाही! मी तर सत्यधर्माचा स्वीकार करून मुस्लिम झालो आहे आणि आपल्या अमानवी पारंपरिक असत्यधर्मांचा धिक्कार केला आहे!’’
माननीय उमर(र) यांची ही घोषणा ‘कुरैश’ कबिल्याच्या जखमेवर मीठ चोळणारी व त्यांच्यात लागलेल्या आगीत तेल ओतून भडका करणारी होती. हा भडका अतिशय तीव्र झाला. विरोधकांच्या तलवारी चमकल्या. माननीय उमर(र) यांच्यावर वार होत गेले. परंतु उमर(र) यांनी सर्वांचा मुकाबला केला. लढाई चालूच होती. एवढ्यात ‘कुरैश’ कबिल्याचा सरदार ‘आस बिन वाईल’ तेथे पोहोचला आणि मध्यस्थी करीत म्हणाला, ‘‘या व्यक्तीने (माननीय उमर(र) यांनी) स्वतःसाठी एक मार्ग निवडला आहे. तुम्हाला त्याच्याशी काय घेणे आहे?’’ असे म्हणून त्या ठिकाणी हे प्रकरण त्याने आवरते घेतले.
माननीय उमर(र) यांनी काबागृहात खुलेआम नमाज अदा करण्याची घोषणा केली आणि सर्व मुस्लिम उघडपणे काबागृहात नमाज अदा करू लागले. परिस्थितीत घडून येणारे हे एक जबरदस्त परिवर्तन होते. सत्यद्रोही शक्ती हताश होऊन हे सर्व काही होताना पाहत होती. सत्यधर्माच्या आंदोलनाचा हा महापूर ओसंडून वाहत होता आणि यात हळूहळू मोठमोठ्या व्यक्ती सामील होत होत्या.
आता मात्र इस्लामविरोधी शक्तींनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून इस्लामी आंदोलनाचा खातमा करण्यासाठी कंबर कसली. कुरैश कबिल्यातील विरोधकांनी संपूर्ण मक्कावासीयांना एकत्र करून करार केला की, ‘‘हाशिम’’ परिवाराचा (प्रेषित मुहम्मद(स) यांच्या परिवाराचा) सामाजिक बहिष्कार करावा. त्या परिवाराशी असलेले सर्व संबंध तोडण्यात यावे. सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्यात यावेत. ‘हाशिम’ परिवारास चांगलेच वेठीस धरण्यात यावे. इथपावेतो की, त्यांनी मुहम्मद(स) यांना आमच्या स्वाधीन करावे. मग आम्ही त्यांचा वध करून हे प्रकरण संपवून टाकू. हा करारनामा लिखित होता. हा काळ तब्बल तीन वर्षांचा होता.
या अमानुष करारामुळे ‘हाशिम’ परिवाराने ‘शैबे अबी तालिब’ या ठिकाणी आश्रय घेतला. एकार्थाने संपूर्ण इस्लामी परिवार तीन वर्षे नजरकैदेत होता. या बहिष्काराच्या करारामुळे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार बंद झाला. त्यांचा अन्नपुरवठा बंद करण्यात आला आणि इस्लामी आंदोलकांवर एक महान संकट कोसळले. अन्न मिळत नसल्याने प्रेषितांच्या अनुयायांना झाडाची पाने खाऊन दिवस कंठावे लागले. लहान लहान मुले अन्नावाचून अक्षरशः तडफडत होती.
‘एकदा हकीम बिन हिजाम’ या माणसास मुस्लिमांची दया आली. त्याने थोडेसे गहू आपल्या गुलामामार्फत गुपचूपपणे पाठविले. परंतु इस्लामद्रोही अबू जहल याची नजर पडताच तो ते धान्य हिसकावून घेऊ लागला. एवढ्यात ‘अबू बख्तरी’ तेथून जात होते. त्यांनी अबू जहलचे हे दुष्कृत्य पाहिले आणि अबू जहल यास सांगितले की, ‘सोडून द्या! पुतण्याने आपल्या आत्याकरिता पाठविले तर काय बिघडते.’’ अशा प्रकारे ‘हिश्शाम बिन अम्र’ हे लपून छपून धान्य पाठवित असत.
हाच ‘हिश्शाम बिन अम्र’ या अमानवी करारास निरस्त करण्यासाठी पुढे आला. मूळ गोष्ट अशी की, एकीकडे अत्याचार वाढत असताना दुसरीकडे त्या अत्याचाराविरुद्ध मानवी स्वभावात दयाळू भावना निर्माण होत असते. ‘हिश्शाम बिन अम्र’ हा जुहैर बिन अबि उमैया’कडे गेला आणि याविषयी त्याने अत्यंत प्रभावशाली व दयापूर्ण आपले मत मांडले. मग तो ‘मुतईम बिन अदी’ यास भेटला आणि शेवटी ‘अबू बख्तरी’ आणि ‘जमआ बिन असवद’ यांना भेटून मुस्लिमांच्या अत्याचारांविरुद्ध असलेले वातावरण बदलून टाकले. ‘हाशिम’च्या परिवारजणांनी सर्वसहमतीने योजना तयार केली आणि एकेदिवशी पवित्र काबागृहामध्ये संपूर्ण अरब समुदायास संबोधित करून म्हणाला, ‘‘हे मक्कावासीयांनो! हे कर्म कितपत उचित आणि योग्य आहे की, आपण सर्वांनी पोट भरून जेवायचे आणि चांगली वस्त्रे परिधान करावयाची आणि ‘हाशिम’ परिवारजणांना उपाशीपोटी आणि वस्त्रविरहित जीवन कंठित करण्यासाठी सोडून द्यावयाचे?’’ मग त्याने चेतावणी देताना सांगितले की, ‘‘ईश्वराची शपथ! अत्याचाराच्या आधारावर तयार झालेल्या सामाजिक बहिष्कार करणार्या करारपत्राचे मी जोपर्यंत तुकडे तुकडे करणार नाही, तोपर्यंत सुखाने श्वास घेणार नाही!’’
त्याचे हे शब्द ऐकताच ‘अबू जहल’ हा संतापलेल्या स्वरात म्हणाला, ‘‘ईश्वराची शपथ! तू खोटारडा आहेस, तू ते करारपत्र मुळीच फाडू नये.’’ ‘जमआ बिन असवद’ ने ‘अबू जहल’ यास उत्तर दिले की,
‘‘ईश्वराची शपथ! तूच सर्वात जास्त खोटारडा आहेस. ज्या प्रणालीवर हा करार करण्यात आला आहे, तीच प्रणाली मुळात आम्हास मान्य नाही.’’
त्याचे समर्थन अबू बख्तरी यानेदेखील केले आणि म्हणता म्हणता सर्वांनीच ‘हिश्शाम बिन अम्र’चे समर्थन करण्यासाठी कंबर कसली. ‘अबू जहल’ला त्याच्या पायाखालची जमीन हलताना दिसू लागली आणि तो विवश झाला. पवित्र काबागृहाच्या भितीवर टांगण्यात आलेले बहिष्काराचे करारपत्र काढून नष्ट करण्यासाठी लोकांचे हात सरसावले. परंतु अश्चर्यम! आधीच ते करारपत्र वाळवी लागून नष्ट पावले होते. त्यावर केवळ ‘ईश्वराच्या नावे’ एवढेच शब्द बाकी राहिले होते. अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या समवेत असलेल्या हाशिम परिवाराच्या लोकांच्या नजरबंदीचा कठीण काळ संपुष्टात आला. हे प्रेषितत्वाचे दहावे वर्ष होते. आता मात्र पूर्वीपेक्षाही जास्त कठीण काळाची सुरुवात झाली होती.
या वर्षीच आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे काका म्हणजेच माननीय अली(र) यांचे पिता अबू तालिब यांचे देहावसन झाले.
‘अबू तालिब’ हे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची खूप मदत करीत. त्यांचे संरक्षण करीत आणि इस्लाम व मुस्लिमांवर येणार्या संकटांना परतवून लावीत असत. त्यांच्या देहावसानामुळे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) खूप व्यथित झाले. शिवाय प्रेषितांचे पिता त्यांच्या जन्मापूर्वीच वारलेले असल्याने ‘अबू तालिब’ हेच त्यांचे पालक होते. त्यांनी आपल्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त काळजीपूर्वक प्रेषितांचे पालनपोषण केले. प्रेषित या आकस्मात दुःखातून सावरलेही नव्हते तोच त्यांची भार्या सन्माननीय खदीजा(र) यासुद्धा स्वर्गवासी झाल्या. सन्माननीय खदीजा(र) या प्रेषित मुहम्मद(स) यांच्या केवळ पत्नींच नसून इस्लाम स्वीकारणार्या त्या प्रथम महिला होत्या. त्यांनी प्रेषितांना खूप साथ दिली होती. ज्या वेळेस प्रेषिताचे अश्रू पुसणारा कोणी नव्हता, त्या वेळी यांनीच त्यांना सावरले होते. त्यांना मायेची ऊब दिली होती. धीर दिला होता. आपली संपूर्ण संपत्ती इस्लामी आंदोनासाठी समर्पित केली होती. प्रत्येक पावलावर प्रेषितांना साथ दिली होती. त्यामुळे प्रेषितांवर दुःखाचे एका पाठोपाठ दोन डोंगर कोसळले.
अर्थात, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे रक्षण करणारे अबू तालिब आणि आपल्या सर्वार्थाने
मदत करणार्या खदीजा(र) दोन्ही निवर्तले आणि विरोधकांचे धैर्य वाढले. त्यांचा विरोध अधिकच तीव्र झाला. ईश्वरी इच्छेला कदाचित हेच मान्य होते की, आता सत्याने आपले रक्षण स्वतःच करावे आणि स्वतःच आपला मार्ग शोधावा.
प्रेषितांचे कट्टर विरोधक असलेले व त्यांच्याच कुरैश कबिल्याचे लोक नीचपणावर उतरले. टवाळ मुलांच्या झुंडीच्या झुंडी प्रेषितांना यातना देण्यासाठी त्यांच्या मागे लावण्यात आल्या. प्रेषित मुहम्मद(स) नमाज अदा करतेवेळेस हलकल्लोळ माजविण्यात येत असे. शिवीगाळ करण्यात येत असे. अंगावर थुंकण्यात येत असे.
एकदा इस्लामचा विरोधक ‘अबू लहब’ याची दुष्ट पत्नी ‘उम्मे जमील’ हिने प्रेषित मुहम्मद(स) यांना ठार करण्याचा बेत रचला. प्रेषितांना शोधताना ती काबागृहात आली. परंतु प्रेषित तिला दिसले नाहीत. एकदा इस्लामद्रोही ‘अबू जहल’ यानेदेखील प्रेषितांना दगडाने ठेचून वध करण्याचा मानस केला. परंतु त्याला यश मिळाले नाही.
यातनांचा अंत होत नव्हता. मारझोडदेखील होत होती. बर्याच वेळा प्रेषित मुहम्मद(स) यांना मारझोड झाली. जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अमानवी कृत्य करण्यात आले. परंतु प्रेषितांनी संयमाने आपला धर्मप्रचार सुरुच ठेवला.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget