December 2018

ईशपरायणता रोजामुळे मनुष्यात निर्माण होते हे कळल्यानंतर इतर महत्त्वाचे काही विचार करण्यासाठी उरत नाहीत, कारण जो ईशपरायणता धारण करतो तो अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घालून दिलेल्या मर्यादांचे तंतोतंत पालन करीत राहतो. यामध्ये संपूर्ण धर्माचरण समाविष्ट आहे. तरी आणखी काही फायदे रोजामुळे होतात त्यांना आपण येथे पाहू या, जेणेकरून आपणास रोजाचे अनन्यसाधारण महत्त्व कळून येईल.
१) रोजामुळे अल्लाहचे प्रभुत्व आणि सार्वभौमत्वाच्या विश्वासाला आणखी बळकटी मिळते. पहाटे सहेरी केली जाते, परंतु जेव्हा उषःकाल होतो त्याचक्षणी खाणेपिणे आणि जीवनातील इतर सुखांचा उपभोग घेण्यापासून मनुष्य दूर राहतो. संपूर्ण दिवसभर त्याला ईशपरायणता यापासून रोखून धरते. सूर्यास्तानंतर लगेचच रोजा सोडल्यानंतर त्याला खाण्यापिण्याला आणि जीवनांनद उपभोगता येतो. हा आदेश आणि आज्ञापालनाची व्यवस्था इतर कोणत्याच धर्मात तुम्हाला सापडणार नाही. हे पाहणाऱ्याला अल्लाहचे स्वामीत्व आणि प्रभुत्वाची जाणीव करून देते.
२) रोजा समाजात सहानुभूतीचे वातावरण निर्माण करतो. सहजीवनाच्या इस्लामी समाजनिर्मितीला प्रोत्साहन देतो. श्रीमतांना गरीबीचे चटके कळून येतात. महिनाभर त्यांना ही आठवण येत राहते. भूक आणि तहान काय असते हे त्यांना कळते. यातूनच गरीबांबद्दलची सहानुभूती त्यांच्या मनात निर्माण होते आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची मानसिकता तयार होते. याच कारणावरून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी रमझान महिन्यास ‘‘सहानुभूतीचा महिना’’ म्हणून संबोधले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) रमजान महिन्यात त्यांच्याकडील सर्व गुलामांना सोडून देत असत आणि प्रत्येक भिक्षुकाला भिक्षा देत असत.
‘‘रमजान महिन्यात प्रेषित मुहम्मद (स.) प्रत्येक गुलामास मुक्त करीत असत आणि प्रत्येक मागणाऱ्यास दान देत असत.’’ (मिश्कात)
इब्ने अब्बास यांच्यानुसार, प्रेषित मुहम्मद (स.) सर्वांपेक्षा दयाळू जरी होते तरी ते रमजानमध्ये अतिशय दयाळू होत असत.
‘‘अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) हे सर्व मानवांपेक्षा दानशूर आणि दयाळू होते. आणि विशेषतः रमजानमध्ये ते अतिशय दानशूर बनत असत.’’ (बुखारी)
३) रोजा एकतेची भावना समाजात वाढीला लावते. रमजान महिन्यात समाजातील श्रीमंत आणि गरीब, राजा आणि रंक, सर्वसामान्य आणि सामान्येतर सर्व एकसारखे असतात. प्रत्येकजण एकसारखीच आज्ञाधारकता बाळगून असतो, त्या सर्वांचे चेहरे जगाला दाखवून देतात की आम्ही एकाच स्वामीचे दास आहोत. आम्हा सर्वांचा मालक- शासक एकच आहे. त्यांची ही मानसिकता समाजातील सर्व लोकांना एका स्तरावर एकत्र करते आणि समाजात एकीला बळ देते.
४) रोजादार व्यक्तीस रोजा अल्लाहच्या मार्गात काबाडकष्ट झेलण्यास तयार करतो. यासाठी मनुष्याला तहान, भूक आणि इतर गैरसोयीच्या कठीणतेची जाणीव होते. या सर्व हालअपेष्टा आणि कष्ट तो अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच फक्त सहन करतो. अशी व्यक्ती अल्लाहच्या प्रसन्नतेखातरच आपली संपत्ती खर्च करते आणि वेळ पडल्यास आपला जीवसुध्दा त्यागून देते. हे फक्त तीच व्यक्ती करू शकते जी संयमी आहे, ईशपरायण आहे, रोजा हे त्यासाठी अत्युत्तम प्रशिक्षण आहे. हालआपेष्टांना सामोरे जाण्यासाठी तयारी याच महिन्यात माणूस करून घेतो. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या महिन्यााला ‘संयमाचा महिना’ म्हणून संबोधले आहे आणि रोजा त्याचा निम्मा संयम आहे असे म्हटले आहे.
५) रोजाच्या मान्य व्यवस्थेमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळते. यामुळे मनुष्यांना सतत स्मरण करून दिले जाते की तुम्ही एकेश्वरवादी चळवळीचे ध्वजवाहक आहात. प्रत्येकजण रमजान महिन्यातच रोजा पाळतो, कारण तसा ईशआदेश आहे. प्रत्येकजण प्रातःकाळापूर्वी सहेरी करतो आणि दिवसाचे १२ ते १४ तास काही न खाता-पिता आणि वासनेपासून दूर राहून सूर्यास्तानंतर लगेचच उपवास सोडतो. रोजाची ही वैश्विक व्यवस्था आहे. एकाच कालावधीत जगभर रोजा पालन केले जाते. जगभरातील मुस्लिम एकाच कारणासाठी, एकाच वेळी, एकाच ध्येयासाठी एकसारखा असा शिस्तबध्द रोजापालन महिनाभर करत राहतात. जगात कोण्याही दुसऱ्या धर्मात ही वैश्विक व्यवस्था आपणास सापडणार नाही.
काही अटी: इतर सर्व उपासनापद्धतींप्रमाणे रोजाचे फायदे मिळविण्यासाठी खालील अटींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.
१) रोजाच्या पूर्ण औपचारिकतेचे पालन होणे आवश्यक आहे. हेतुचे गांभीर्य, अल्लाहचे भय आणि दृढ विश्वास की अल्लाह आणि फक्त अल्लाहच पूजनीय आहे आणि मनुष्य काहीच नाही, परंतु त्याचा दास आहे. तसेच अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याची ओढ आणि पारलौकिक जीवनातील यशप्राप्तीसाठी सतत कार्यरत राहणे या रोजासाठीच्या पूर्वअटी आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कथनानुसार, रोजापालन पूर्ण श्रध्देने आणि आत्मपरीक्षणपूर्वक होणे आवश्यक आहे. वरील अटींशिवाय रोजा निव्वळ उपाशी राहण्यासारखे आहे. या अटींशिवाय जो कोणी रोजापालन करीत असेल आणि तो समजत असेल की माझे कर्तव्य मी बजावत आहे आणि इस्लामच्या आधारस्तंभाला उभारण्याचे काम मी करीत आहे तर ही त्याची घोडचूक आहे. त्याचे असे रोजापालन निरर्थक आहे.
२) फक्त अनिवार्य रोजापालन करून भागले असे समजू नये, तर ऐच्छिक रोजापालनसुध्दा माणसाने करीत राहावे. या ऐच्छिक रोजापालनमुळे त्याला रोजाचे उद्देश सतत स्मरणात राहतील. असे करण्याने ती व्यक्ती स्वयंनियंत्रणासाठीचे प्रशिक्षणसुध्दा वारंवार घेत राहते. ऐच्छिक रोजापालनसाठी तपशीलवार माहिती प्रेषित कथनांत आलेली आहे. त्यातून कोणते रोजे (उपवास) पाळावेत हे प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार ठरवावे, कारण ते ऐच्छिक आहेत.

इस्लामने आपल्या आरंभीच्या काळात त्या वेळची विशिष्ट परिस्थिती नजरेसमोर ठेवून जकात वसूल करण्याची रोखीच्या अगर इतर स्वरुपात कायदेशीर पद्धत ठरविली होती. परंतु याचा असा अर्थ होऊ शकत नाही की जकात वाटपाची एवढी एकच पद्धत होती की गरजुंनी स्वतःच जाऊन जकात गोळा करीत फिरावे व दुसरी कसलीही पद्धत अवलंबली जाऊच शकत नाही. इस्लामी कायद्यात अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही, ज्यामुळे असा निष्कर्ष काढणे शक्य व्हावे. इस्लाम जकातच्या रकमेतून शाळा, इस्पितळे वगैरे जनकल्याणाच्या संस्था स्थापन करण्यास रोखत नाही. तसेच अशा रकमेतून सहकारी संस्था व कारखाने निर्मांण करण्यातही अडचण असू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जकातची रक्कम सामाजिक कल्याणाच्या सर्व हितकर कामाकरिता खर्च केली जाऊ शकते. जकातच्या मालातून रोख रकमेचे सहाय्य फक्त वृद्धांना, बालकांना व रुग्णांना दिले जाते आणि इतरांना निर्वाहाची साधने उपलब्ध करण्यासाठी अगर त्यांना हितावह असणाऱ्या योजनाच्या पूर्ततेसाठी असे सहाय्य दिले जाऊ शकते, कारण इस्लामी समाज एक असा समाज आहे ज्यामध्ये निव्वळ जकातीच्या सहाय्यावर सतत निर्वाह करणारा दरिद्री वर्ग आढळून येत नाही.

जकात देणे अनिवार्य का ठरविले आहे याबद्दल आता आपण चर्चा करू या. तसेच जकातमुळे कोणता हेतु साध्य होतो हेसुध्दा पाहू या. कुरआन अध्ययन आणि हदीसचा परामर्श घेतल्यानंतर कळून येते की जकातचे तीन हेतू आहेत. पहिला मौलिक आणि विशिष्ट प्रकारचा आहे तर दुसरे दोन दुय्यम आणि सामुदायिक महत्त्वाचे आहेत.
मनाचे पावित्र्य: जकातचा मौलिक हेतु मनाचे शुध्दीकरण करणे होय. यामुळे संपत्तीची लालसा जाऊन त्या जागी मनात ईशपरायणता निर्माण होते आणि मनुष्य सदाचारी बनतो. कुरआनोक्ती आहे,
‘‘निःसंदेह मार्ग दाखविणे आमच्यावर आहे आणि खरे पाहता परलोक आणि इहलोक, दोन्हीचे स्वामी आम्हीच आहोत. तर मी तुम्हाला खबरदार केले आहे भडकत्या अग्नीपासून. त्यात होरपळणारे नाही परंतु तो अत्यंत दुर्देवी ज्याने खोटे ठरविले आणि तोंड फिरविले, आणि त्यापासून दूर ठेवला जाईल तो अत्यंत पापभीरू, जो निर्मळ होण्यासाठी आपले धन देतो, त्याच्यावर कुणाचेही काही उपकार नाहीत. ज्याचा बदला त्याने द्यायला हवा, तो तर केवळ आपल्या उच्चतर पालनकर्त्याच्या प्रसन्नता प्राप्तीसाठी हे कार्य करतो. आणि जरूर तो (त्यावर) प्रसन्न होईल.’’ (कुरआन ९२: १२-२१)
दुसऱ्या ठिकाणी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘है पैगम्बर (स), तुम्ही याच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुध्द करा आणि (सदवर्तनाच्या मार्गात) यांना पुढे करा आणि यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुवा यांच्यासाठी समाधानकारक ठरेल, अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.’’ (कुरआन ९: १०३-१०४)
वरील कुरआन संकेत वचनाने जकातचे महत्त्व अगदी स्पष्ट होते. जकात देण्याने मन निर्मळ होऊन आत्मशुध्दी होते. हे सर्वश्रुत आहे की या जगातील वस्तूवरील प्रेम (भौतिक प्रेम) हाच खरा शत्रु आहे नमाज आणि जकात यांचा! हे मनुष्याला अल्लाह आणि परलोकपासून दूर अतिदूर ठेवते. प्रेषित (स) एकदा म्हणाले होते,
‘‘प्रत्येक पापी कृत्याच मूळ हे भौतिक प्रेमात आहे.’’ (मिश्कात)
हे ऐहिक प्रेमात अनेकानेक गोष्टी येतात परंतु सर्वांत शक्तिशाली आणि धोकादायक साधनसंपत्तीबद्दलचे प्रेम आहे. म्हणून प्रेषित (स) यांनी साधनसंपत्तीच्या प्रेमाला मुस्लिमांचा सर्वांत धोकादायक शत्रू ठरविले आहे.
‘‘माझ्या अनुयायींची कसोटी साधन संपत्ती आहे.’’ (तिरमिजी)
मुस्लिम हा धनलालसेपासून अलिप्त राहिला तर तो इतर अनेक पाफत्यांपासून दूर राहू शकतो. या शत्रूपासून सुटका म्हणजे इतर अनेकानेकांपासून सुटका, मुक्तता मिळणे होय. ऐहिक प्रेमापासून मनाला निर्मळ ठेवणे म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर मनशुध्दी - मनःशांती होय! जकात देण्यामुळे ऐहिक साधनसामुग्रीच्या प्रेमापासून मन स्वतंत्र होते, तर याचाच अर्थ हा आहे की त्यामुळे आत्मशुध्दी होते. ऐहिक सुख व ऐहिक लालसेपासून स्वतंत्र मनुष्य अल्लाहची प्रसन्नता आणि परलोक सफलता (मुक्ती) प्राप्त करून घेतो. तो सदाचारी बनतो. म्हणूनच जकातचा परिणाम फक्त मनशुध्दीपर्यंतच सीमित नाही. त्याने अनेक सकारात्मक फायदे होतात. जकातमुळे सदाचार करण्याची एक प्रेरणा सतत मनात जागृत राहते.
इस्लाममध्ये गरीबांचा हक्क अदा करण्यासाठी जकात हा शब्द त्याच्या हेतु आणि उद्देशामुळेच वापरला जातो. जकातचा शब्दशः अर्थ होतो ‘‘शुध्दीकरण आणि वाढ’’. एखाद्याने दुसऱ्या गरजू, गरीब मनुष्याला आपल्या संपत्तीतून काही विशिष्ट भाग अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी देणे जकात आहे, कारण ते आत्मशुध्दी करते आणि धनसंचय शुध्द करते आणि त्यात वाढ करते.
हेसुध्दा येथे ध्यानात ठेवले पाहिजे की जकातचा उद्देश फक्त उत्पन्नाचा काही भाग गरीबास देऊन प्राप्त होत नाही तर तो उद्देश प्राप्त करण्यासाठी जकात शुध्द मनाने आणि व्यावहारिक कष्टाने प्रेरित असणे आवश्यक आहे. अल्लाहची प्रसन्नता ही प्रथम आणि सर्वांत महत्त्वाची अट आहे. इतर सर्व उद्देशांपासून हे कृत्य अलिप्त राहाणे अत्यावश्यक आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘हे नबी (स), लोकांना सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी तुमच्यावर नाही. अल्लाह ज्याला इच्छितो त्यालाच मार्गदर्शन प्रदान करतो आणि कल्याणकारी मार्गात जी संपत्ती तुम्ही खर्च करता ती तुमच्या स्वतःच्या हिताकरिता होय, शेवटी तुम्ही याचकरिता खर्च करताना की अल्लाहची मर्जी संपादन करावी. म्हणून जी काही संपत्ती तुम्ही कल्याणकारी मार्गात खर्च कराल त्याचा पुरेपूर मोबदला तुम्हाला दिला जाईल आणि तुमचा हक्क कदापि हिरावला जाणार नाही.’’ (कुरआन २: २७२)
‘‘शेवटी तुम्ही याचकरिता खर्च करताना, की अल्लाहची मर्जी संपादन करावी.’’ या वाक्यामुळे जकात देण्याची तत्त्वे मांडली गेली आहेत.
कुरआन वारंवार हे स्पष्ट करीत आहे की सच्चा मुस्लिम तोच आहे जो जकात देतो दानधर्म करतो ते फक्त अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच! म्हणून जकात देण्यास ‘‘अल्लाहच्या मार्गात खर्च करणे’’ असेही संबोधले आहे.
दुसरी अट जकात ही वैध (हलाल) मार्गाने कमविलेल्या संपत्तीतूनच अदा केली जाते कुरआनोक्ती आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो! जी संपत्ती तुम्ही कमविली आहे आणि जे काही आम्ही जमिनीतून तुमच्याकरिता उत्पन्न केले आहे, त्यापैकी उत्कृष्ठ भाग अल्लाहच्या मार्गात खर्च करा.’’ (कुरआन २: २६७)
प्रेषित (स) यांनी वरील कुरआनोक्तीला स्पष्ट करताना खुलासा दिला आहे,
‘‘लोकहो! अल्लाह सर्वोत्तम गुणांनी संपन्न आहे आणि तो उत्कृष्ठतेचाच स्वीकार करतो अन्य काहीही नाही. तो शुध्द आहे आणि शुध्दतेचाच स्वीकार करतो.’’
तिसरी महत्त्वाची अट आहे अल्लाहच्या मार्गात चांगलेच खर्च करा निकृष्ट खर्च करणे हा दांभिकपणा आहे.
‘‘असे होता कामा नये की त्याच्या मार्गात देण्याकरिता निकृष्टतम प्रतीची वस्तू निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करावा.’’ (कुरआन २: २६७)
चौथी अट आहे की जकात ज्याला दिली जाते तो गरीब मनुष्य उफत होता कामा नये. त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू नये. अन्यथा जकात देणे व्यर्थ ठरते. कुरआनोक्ती आहे,
‘‘हे श्रध्दावंतांनो, आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देऊन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती केवळ लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो.’’ (कुरआन २: २६४)
हदीसनुसार तीन माणसे सर्वप्रथम नरकात जाणार आहेत. त्यांच्यापैकी एक आहे तो मनुष्य जो दान फक्त आपले वर्चस्व समाजात वाढावे आणि लोकांनी आपणास दानशूर म्हणावे याच हेतुने दान करतो. दुसऱ्या हदीसमध्ये चांगलीच कानउघाडणी केली आहे,
‘‘जो कोणी दान दुसऱ्यांनी प्रशंसा करावी म्हणून देत असेल तर असा मनुष्य अल्लाहशी शत्रुत्व स्वीकारतो.’’ (मिश्कात)
जकात देतानाच्या काही अटी आहेत. या अटींचे काटेकोर पालन केल्यास हे कृत्य पुण्यमयी आणि शुध्दीकरणाचे स्त्रोत ठरते. जकात माणसात एक नैतिक अधिष्ठान निर्माण करते. याचमुळे सर्वसाधारण दानधर्म करणे आणि जकात देणे यात मौलिक अंतर आहे. जकात देण्याच्या अटींचा जर विचार केला तर असे कळते की स्वतःचे काटेकोर आत्मपरीक्षण करणे हे त्याचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. ही एक अशी उपासना व भक्ती आहे की जिच्या आजुबाजूला असंख्य विरोधी तत्त्वे कार्यरत असतात. त्यावर कुठाराघात करण्यासाठी म्हणून कुरआनने सदाचरणी माणसाची मानसिकता स्पष्ट करताना म्हटले आहे,
‘‘आणि अल्लाहच्या प्रेमात गरीब आणि अनाथ व कैद्यांना जेवू घालतील आणि त्यांना म्हणतील.’’ आम्ही तुम्हाला केवळ अल्लाहसाठी जेवू घालीत आहोत, आम्ही तुमच्याकडून कोणताही मोबदला इच्छित नाही की आभार प्रदर्शन.’’ (कुरआन ७६: ८-९)
‘‘जे लोक आपल्या पालनकर्त्याच्या धास्तीने भयभीत होणारे असतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या संकेतांवर श्रध्दा ठेवतात, जे आपल्या पालनकर्त्यांबरोबर कोणाला भागीदार बनवीत नाही, आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचाराने थरकाप होत असतो की आम्हाला आमच्या पालनकर्त्यांकडे परतावयाचे आहे.’’ (कुरआन २३: ५९-६०)
गर्वाबद्दल काय बोलावे? अत्यानंद, डामडौल इ. लाभकारींच्या आत्मसन्मानाला आघात करतात. जकात देताना श्रध्दावंत हे अल्लाहच्या भयाने भयभीत झालेले असतात ते यामुळे की मनात काही अविचार गुपचूप येऊन त्यांच्या या सत्कृत्याला वाया घालवू नये. त्याला भीती असते की पुनरुत्थानाच्या दिवशी अल्लाहसमोर त्याचे दान देणे, जकात देणे हे सर्व वाया जाऊ नये.
गरीबांची मदत: आता आपण दुय्यम दर्जाच्या हेतुचा विचार करू या जकात देताना गरीब मुस्लिमांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी मदत करणे हा हेतु कार्यरत असतो. प्रेषित (स) यांचे कथन आहे,
‘‘अल्लाहने जकात त्यांच्यावर अनिवार्य केली आहे. श्रीमंत मुस्लिम कडून जकात घेऊन ती गरीब मुस्लिमांना देण्यात यावी.’’ – मुस्लिम
कुरआन जकात देणे हे सदाचारी मुस्लिमाचे लक्षण ठरवतो आणि जकात देण्याचा तपशील खालीलप्रमाणे स्पष्ट करतो.
‘‘सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किवा पश्चिमेकडे करावे तर सदाचार हा आहे की जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान धारण करतात. तसेच सर्व दूतांवर, सर्व ग्रंथ आणि सर्व प्रेषितांवर ईमान धारण करतात. ईशप्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपले नातेवाईक आणि अनाथ, गरजवंत, वाटसरू व याचक तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात. तसेच दिलेल्या वचनांची पूर्तता करतात आणि अडचणी संकटे आणि युध्दप्रसंगीदेखील संयम राखतात. हेच लोक सत्यशील आणि अल्लाहच्या कोपचे भय बाळगणारे आहेत.’’ (कुरआन २: १७७)
वरील संकेतवचनावरून हे सिध्द होते की जकात अदा करण्याचा आर्थिक आणि सामाजिक अंग आहे. त्याच्याशिवाय जकात देण्याला काहीच अर्थ उरत नाही. जकात देणारा तर आपली आत्मशुध्दी करून घेतो. परंतु गरीबाला ती रक्कम (जकात)दिल्यानंतरच त्या रकमेतून तो गरजू आपली गरज भागवितो. यानंतरच त्याचे (जकातचे) उद्देश साध्य होते. म्हणूनच कुरआन जकातचा उल्लेख श्रीमंत लोकांच्या धनसंपत्ती वर गरीबांचा हक्क असा उल्लेख करतो.
‘‘परंतु ते लोक जे नमाज अदा करतात, जे आपल्या नमाजात नेहमी नियमित पणा ठेवतात, ज्यांच्या मालमत्तेत याचक व वंचित असलेल्यांचा एक ठराविक हक्क आहे. जे मोबदल्याच्या दिवसाला सत्याधिष्ठित मानतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या कोपचे भय बाळगतात.’’ (कुरआन ७० : २३-२६)
या हक्कासाठी इस्लामी शासनाला युध्द घोषित करण्याचा अधिकार आहे. आदरनीय अबू बकर (र) यांच्या उदाहरणाने वर हे स्पष्ट झालेले आहे. गरीबांना मदत करणे हा जकात देण्याचा दुय्यम हेतु जरी असला तरी त्याचे महत्त्व हे असाधारण असे आहे. त्याचे महत्त्व या ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनात उल्लेखनीय असे आहे. खालील हदीसनुसार त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.
१) ‘‘जो स्वतः पोट भरून खातो आणि त्याचा शेजारी मात्र उपाशी पोटी राहतो, तर असा मनुष्य खरा मुस्लिम नाही.’’ (मिश्कात)
२) न्यायदानाच्या दिवशी अल्लाह विचारणा करील की,
‘‘हे आदमच्या संततीनो, मी तुम्हाला अन्नाबद्दल विचारले होते परंतु तुम्ही मला ते दिले नाही.’’ मनुष्य उत्तर देईल, ‘‘हे माझ्या प्रभुस्वामी, मी तुला अन्न कसे देणार की जेव्हा तू सर्वांचाच अन्नदाता आहेस!’’ या प्रश्नाचे उत्तर अल्लाह देईल की ‘‘तुला आठवत नाही की तुझ्याकडे एक मनुष्य आला होता आणि तो उपासी होता. तो तुझ्याकडे अन्नासाठी भीक मागत होता आणि तू त्यास नकार दिला?’’ (मुस्लिम)
हे अगदी निर्विवाद आहे की इस्लाम गरीबांच्या आणि गरजूंच्या गरजा भागविण्याबद्दल अत्यंत भावनाशील आहे. गरीबांच्या गरजा पुऱ्या करणे इस्लाममध्ये असाधारण असे कृत्य आहे.
इस्लामचा आधार: इस्लाममध्ये जकातचा दुय्यम हेतु मदत करणे आहे. कुरआन जकातच्या लाभ धारकांबद्दल तपशील देताना स्पष्ट निर्देश देत आहे,
‘‘हे दान तर खऱ्या अर्थी फकीर आणि गोर-गरीबांसाठी आहे. आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईशमार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे. एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्व काही जाणणारा द्रष्टा व बुध्दिमान आहे.’’ (कुरआन ९: ६०)
अल्लाहच्या मार्गात (ईशमार्गात) ही शब्दावली इस्लामसाठी केलेला संघर्ष दर्शविते, विशेषतः जिहादच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी जकात व दान देणे हेसुध्दा उद्देशांपैकी एक उद्देश आहे. या उद्देशाने मुस्लिमांना कुरआन सतत सतर्क ठेवित आहे.
‘‘निघा, मग तुम्ही हलके असा अगर बोजड असा व संघर्ष करा अल्लाहच्या मार्गात आपल्या जीवित व वित्तानिशी, हे तुमच्यासाठी उत्तम आहे जर तुम्ही जाणत असाल.’’ (कुरआन ९: ४१)
कुरआन ज्या वेळी सदाचारी मुस्लिमांच्या गुणांचा उल्लेख करतो त्या वेळी हा गुण उल्लेखित केला जातो की ते अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करतात आपल्या वित्तानिशी. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जिहादसाठी जो काही खर्च होतो तो मुस्लिमांनी आपल्या खाजगी मालमत्तेतून देणे आवश्यक आहे. धर्माचे रक्षण आणि धर्माची मदत करणे ही काही साधी बाब नाही. म्हणूनच आपली संपत्ती त्यासाठी खर्च करणे हे अतिमहत्त्वाचे आहे. जिहादवर खर्च करण्यासाठी आदेश देताना कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘अल्लाहच्या मार्गात (संपत्ती) खर्च करा आणि आपल्या हाताने स्वतःला अडचणीत टाकण्यापासून (स्वतःचा विनाश करण्यापासून) परावृत्त राहा आणि सद्वर्तन करा, अल्लाहला सद्वर्तन करणारेच आवडतात.’’ (कुरआन २: १९५)
यावरून हे सिध्द होते की धर्माचे रक्षण आणि धर्माला मदत करण्यासाठी आपली संपत्ती खर्च न करणे म्हणजे स्वतःच्याच हातून स्वतःचे लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवन उध्वस्त करणे होय. आपल्या हाताने स्वतःचा विनाश करणे थांबविण्यासाठी दान व जकात देणे ही काही साधी बाब नाही. हे एक महान सद्वर्तन आहे

हजयात्रेच्या गुणाबद्दल विचार करताना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की हजयात्रा एक उत्तम उपासनापध्दती आहे कारण,
१) हजयात्रेत प्रार्थनेचा (नमाजचा) समावेश आहे. प्रार्थना (नमाज) दुसरे तिसरे काही नसून अल्लाहचे स्मरण आहे. आपण हे पाहिले आहे की हजयात्रेच्या काळात हाजी लोक अल्लाहचे पूर्ण स्मरण करीत असतात. नमाजमध्ये मग्न राहतात.
२) हजयात्री आपल्या बलिदान दिलेल्या पशुचे मांस गरिबांमध्ये वाटतो. गरिबांचा हिस्सा देणे प्रत्येक हजयात्रीवर बंधनकारक आहे.
‘‘स्वतःदेखील खावे आणि अडचणीत असलेल्या वंचित लोकांनासुध्दा द्यावे.’’ (कुरआन २२: २८)
हजयात्रेवर धन खर्च करण्याचा एकमेव उद्देश अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे हा आहे. या उद्देशाव्यतिरिक्त हजयात्रा सफल ठरत नाही. तशीच जकातसुध्दा अल्लाहच्याच प्रसन्नतेसाठी दिली जाते.
३) हजयात्रेत उपवासाचे तत्त्व कार्यान्वित केलेले आहेत. उपवासकाळात दिवसा आपल्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवणे निषिध्द आहे, पण हजयात्रेच्या काळात पूर्णतः हे निषिध्द केले आहे. हजयात्रेत खाण्यावर बंदी नाही, परंतु उपवासात खाणे पिणे निषिध्द आहे. परंतु हजयात्रेत साज-शृंगार आणि सुंगध निषिध्द केले आहे. अशा प्रकारे मनोकामनांना नियंत्रणात ठेवण्याचे कार्य उपवास या उपासनापध्दतीप्रमाणे हजयात्रेतसुध्दा केले जाते.
४) काबागृहाची इमारत अल्लाहच्या एकेश्वरत्वावर उभी आहे. काबागृहाकडे पाहून मुस्लिम आपली श्रध्दा आणखी दृढ करतो. हजयात्रेचे सर्व विधी अल्लाहच्या एकेश्वरत्वावरील विश्वास आणखी दृढ करतात. सतत करण्यात येणारी उद्घोषणा, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’ तसेच काळ्या दगडाचे चुंबन घेणे, काबागृहाची परिक्रमा, सफा मरवा दरम्यान धावणे, जनावरांचा बळी (कुर्बानी) देणे इ. सर्व उपासनाविधी अल्लाहच्या एकेश्वरत्वाला बळकटी देणारे आहेत.
५) हजयात्रमध्ये सैतानाच्या अडथळ्यांचेसुध्दा स्मरण करून दिले जाते. मीना येथे सैतानी खांबांना लहान लहान दगड मारणे हे कृत्य हाजी लोकांच्या मनात इब्राहीम (अ.) यांच्यासारखा एकेश्वरत्वाचा दृढविश्वास जागृत करते.
६) हजयात्रेने लोकांच्या मनावर धर्मशीलता व नैतिकतेची प्रभावी आणि अद्वितीय छाप पडते. इतर गुणांसह हजयात्रेमुळे हाजी लोकांत अल्लाहबद्दल असीम प्रेम निर्माण होते. धैर्यशीलता, सहनशीलता, समाधानी वृत्ती, अल्लाहवर दृढ विश्वास, ईशइच्छेला शरण जाणे, तसेच भौतिक सुखाला गौणत्व देणे, समानता, बंधुता इ. सद्गुणांना बळकटी मिळते.
७) या उपासनापध्दतीला (हजयात्रा) जो कोणी कमी लेखेल आणि पात्रता असूनसुध्दा हजयात्रेला जात नसेल तर अशी व्यक्ती धार्मिक जीवन जगत आहे असे म्हणणे निरर्थक आहे. ती हजयात्रेला जाण्यासाठी सक्षम आणि पात्र असूनसुध्दा जात नसेल म्हणजेच हजयात्रेच्या या उपासनापध्दतीला ती व्यक्ती कमी लेखत आहे. अशा स्थितीत त्या व्यक्तीच्या श्रध्दाशीलतेवर प्रश्नचिन्ह लागते, किबहुना त्या व्यक्तीची श्रध्दा अपूर्ण ठरते. जी व्यक्ती योग्यता असल्यास हजयात्रा लवकरात लवकर पार पाडते, ती व्यक्ती आपल्या श्रध्दाशीलतेला बळकटी देते आणि इस्लामच्या श्रध्देचा पाया मजबूत करून घेते.
अशा प्रकारे हजयात्रेचा प्रत्येक उपासनाविधी एक विशिष्ट आणि स्वतंत्र महत्त्व ठेवून आहे. आपणास हे कळले आहे की हे काही कर्मकांड नाही तर ते सदाचाराचे आणि अल्लाहच्या उपासनेचे प्रेरणास्रोत आहेत. प्रत्येक विधी अल्लाहच्या आज्ञाधारकतेत आणि अल्लाहजवळ शरणागती पत्करण्यात आपापला हिस्सा उचलत आहे. अल्लाहच्या आज्ञाधारकतेमध्ये (मुस्लिम) पूर्णत्व आणण्यासाठी हे सर्व विधी अत्यंत प्रभावी भूमिका पार पाडत आहेत. प्रत्येक विधी स्वतःची भूमिका स्वतः पार पाडतो, दुसरा विधी त्याची जागा घेऊच शकत नाही. हे सर्व उपासनाविधी एकत्रितपणे हाजीलोकांच्या हृदयात आणि मनमस्तिष्कावर इस्लामबद्दल पूर्ण समाधान रूजवतात. ईशइच्छेसाठी त्यांची हृदये मोकळी होतात. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी अविरत परिश्रम करणारे मन तयार होते. अल्लाहची आज्ञाधारकता संपादन करण्यासाठी ते नेहमी अल्लाहचे आदेश तत्परतेने पालन करण्यास तयार होते. हजयात्रेच्या सर्व उपासनापध्दतींमध्ये अशा प्रकारे इस्लामच्या इतर उपासनापध्दतींचे गुणवैशिष्ट्य सामावलेले आहे. हजयात्रा हे इस्लामच्या आधारस्तंभांपैकी एक महत्त्वाचा आणि शेवटचा आधारस्तंभ आहे.
‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’

एखादी मुस्लिम व्यक्ती जेव्हा हजयात्रेसाठी निघते तेव्हा ती जाहीररित्या सर्वांना त्याची सूचना देते. ‘एहराम’ विशिष्ट प्रकारचा साधा पोषाख (सोवळं) असतो तो परिधान करण्यापूर्वी ती व्यक्ती शुचिर्भूत होते. स्नान केल्यानंतर ते वस्त्र ‘एहराम’ परिधान केले जाते. साधे दोन पांढरे शुभ्र कापड विना शिवलेले असते. एक कमरेभोवती गुंडाळले जाते आणि दुसरे खांद्यावर सोडले जाते. नंतर ती व्यक्ती दोन रकात नमाज अदा करते आणि औपचारिकरित्या हजयात्रेसाठी इरादा खालीलप्रमाणे मोठ्याने जाहीर केला जातो.
‘‘लब्बैक! अल्लाहुम्मा! लब्बैक! लब्बैक! ला शरीक लक! लब्बैक! इन्नीलहम्द वन नियमत लक, वल मुल्क ला शरीक लक!’’
(हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! मी हजर आहे! मी हजर आहे! तुझा कोणीही भागीदार नाही! मी हजर आहे! मी हजर आहे! सर्व प्रशंसा तुझ्यासाठीच आहे! प्रशंसा आणि समृध्दी तुझ्यासाठीच आहे! तुझा कोणीही भागीदार नाही!)
व्यक्ती जेव्हा ‘लब्बैक’ (मी हजर आहे) ‘लब्बैक’ ( मी हजर आहे) अशी ग्वाही देतो, तर त्याच क्षणी तो ‘एहराम’च्या स्थितीत असतो. हे शब्द तो हजच्या काळात सतत उच्चारत असतो. प्रत्येक नमाजनंतर, चढताना, उतरताना, चालताना, बसताना अशा प्रत्येक क्षणी तो हे शब्द उच्चारत राहतो. एहरामच्या स्थितीत सुख-चैनीच्या वस्तू त्याच्यासाठी ताज्य असतात. तो आपला नेहमीचा पोषाख सोडून देतो आणि या साध्या पोषाखात हजच्या काळात वावरतो. जी दोन वस्त्रे त्याच्या अंगावर असतात तीसुध्दा शिवलेली नसतात. रंगीत कापड त्याला अंगावर घालण्याची मनाई आहे. तो आपला चेहरासुध्दा झाकू शकत नाही किवा डोक्यावर काही सावलीसाठी आच्छादन घेऊ शकत नाही. आपले अंगावरचे केस अथवा नखेसुध्दा कापू शकत नाही. सुंगधसुध्दा वापरू शकत नाही की स्नान करताना साबणसुध्दा वापरू शकत नाही. पत्नीशी त्या काळात शरीरसंबंध ठेवणे निषिध्द केले आहे. त्या कृत्याची इच्छा करणे अथवा चर्चा करणेसुध्दा अवैध ठरविले आहे. हजयात्रेच्या काळात ती व्यक्ती शिकार करू शकत नाही. अशा प्रकारे तो मक्का शहराकडे रवाना होतो. जेव्हा त्याला काबागृह प्रथमतः दिसते तेव्हा तो आनंदाने आणि मोठमोठ्याने उद्गारतो ‘‘अल्लाहु अकबर! अल्लाहु अकबर!’’ (अल्लाह महान आहे! अल्लाह महान आहे!) ‘‘लाईलाहा इल्लल्लाह.’’ (अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीही ईश्वर नाही.) मक्का शहरात प्रवेश केल्यानंतर तो प्रथमतः काबागृहाकडे जातो. काबागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या काळ्या दगडावर (संगेअस्वद) आपले दोन्ही हाथ ठेवून तो चुंबन घेतो. नंतर तो काबागृहाला सात फेऱ्या मारतो. त्यानंतर इब्राहीमच्या स्थानावर तो दोन रकात नमाज अदा करतो. जेव्हा तो काबागृहाच्या बाहेर येतो तेव्हा तो ‘सफा’ नामक टेकडीवर चढतो. ही टेकडी काबागृहालगतच आहे. टेकडीवरून तो काबागृहाकडे पाहतो आणि म्हणू लागतो, ‘‘अल्लाह महान आहे - अल्लाह महान आहे. अल्लाहव्यतिरिक्त कोणीही ईश्वर नाही.’’ नंतर ती व्यक्ती मुहम्मद (स.) यांच्यासाठी अल्लाहचा आशीर्वाद मागते व सफा टेकडीवरून उतरून दुसऱ्या समोरच्या टेकडीवर जिचे नाव ‘मरवा’ आहे चढते. मरवा टेकडीवरूनसुध्दा तीच प्रार्थना म्हटली जाते जी ‘सफा’ टेकडीवर म्हटली होती. दोघांमध्ये सात फेऱ्या मारल्या जातात. त्यानंतर ती व्यक्ती मक्का शहरात राहू लागते आणि ज्या ज्या वेळी संधी मिळाली काबागृहाकडे धाव घेते. यात्रेच्या सातव्या दिवशी सर्व हाजी लोक काबागृहात एकत्र येतात आणि इमाम (नेता) चे व्याख्यान ऐकतात. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी इब्राहीम (अ.) आणि त्यांचे सुपुत्र इस्माईल (अ.) या पितापुत्रांच्या शुभहस्ते काबागृहाचे बांधकाम पार पडले. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि स्मरण करा की जेव्हा इब्राहीम आणि इस्माईल या गृहाच्या भिती उभारीत होते व प्रार्थना करीत होते की हे आमच्या पालनकर्त्या, आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर.’’
काबागृहाची स्थाननिश्चिती आणि काबागृहाचे बांधकाम या दोन्ही गोष्टी अल्लाहकडून निवडल्या गेल्या आहेत. कुरआनोक्ती आहे,
‘‘स्मरण करा ती वेळ जेव्हा आम्ही इब्राहीम (अ.) साठी या पवित्र काबागृहाची जागा योजिली होती.’’ (कुरआन २२: २६)
जेव्हा त्या पवित्र काबागृहाचे बांधकाम पूर्ण झाले लोकांना हजयात्रा करण्याचा आदेश देण्यात आला. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि लोकांमध्ये हजयात्रेची आम घोषणा करा’’ (कुरआन २२: २७)
या पवित्र काबागृहाचे महत्त्व आणि उद्देश स्षष्ट करताना अल्लाहने कुरआनमध्ये स्पष्ट नमूद केले आहे,
‘‘आणि या काबागृहाला आम्ही साऱ्या लोकांसाठी ‘मध्यवर्ती शांतीस्थान’ निश्चित केले आणि लोकांना आदेश दिला की इब्राहीम ज्या ठिकाणी प्रार्थनेसाठी उभा राहतो त्या स्थानाला कायमस्वरूपी नमाजचे स्थान बनवा आणि इब्राहीम व इस्माईलला आदेश दिला की माझ्या या घराला परिक्रमा आणि एकांतवास तसेच रुकूअ व सजदा करणाऱ्यांसाठी (नमाजसाठी) स्वच्छ (पवित्र) ठेवा.’’ (कुरआन २: १२५)
‘‘निःसंशय सर्वप्रथम उपासनास्थळ जे मानवांकरिता बांधण्यात आले ते तेच आहे जे मक्का शहरी विद्यमान आहे. त्याला मांगल्य व समृध्दी दिली गेली आणि सर्व जगवासियांकरिता मार्गदर्शनाचे केंद्र बनविले गेले.’’ (कुरआन ३: ९६)
‘‘आठवा ती वेळ जेव्हा आम्ही इब्राहीम (अ.) साठी या काबागृहाची जागा योजिली होती (या आदेशासह) की माझ्यासमवेत कोणासही भागीदार करू नका आणि माझ्या घराची पवित्र प्रदक्षिणा करणाऱ्या, उभे राहणाऱ्या आणि झुकणाऱ्या व नतमस्तक होणाऱ्यांसाठी पवित्र ठेवा, आणि लोकांत हजयात्रेची आम घोषणा करा. की त्यांनी तुमच्यासाठी प्रत्येक लांबवरच्या ठिकाणाहून पायी व उंटावर स्वार होऊन यावे.’’ (कुरआन २२: २६-२७)
अशा प्रकारे मक्का शहरी विद्यमान काबागृहाला अल्लाहने मांगल्य आणि समृध्दी प्रदान केली आहे. त्याला सर्व जगवासियांकरिता मार्गदर्शनाचे केंद्र बनविले आहे. तसेच नमाजसाठीचे आणि एकेश्वरत्वाचे केंद्र बनविले आहे. आपण या सर्व बाबींचा विचारपूर्वक अभ्यास केला तर उमजून येईल की ही वैशिष्ट्ये एकमेकांत गुंफलेली आहेत. मार्गदर्शनाचे केंद्र हे प्रार्थना केंद्र असणारच, अशा स्थानाला मांगल्य आणि समृध्दी राहणारच कारण ते एकेश्वरत्वाचे केंद्र आहे.
आपण यापूर्वीच एकेश्वरत्वावर आणि श्रध्दाशीलतेवर सविस्तर चर्चा केली आहे. उपासनापध्दती व्यावहारिकतेत धर्माचे मूलतत्त्व आहे. काबागृह हे केंद्र आहे जिथे प्रार्थना आणि एकेश्वरत्वाची एककेंद्राभिमुखता आहे. म्हणून हे म्हणणे योग्य आहे की काबागृह हे धर्माचे केंद्रिय स्थान आहे आणि याच कारणामुळे अल्लाहने काबागृहाला ‘अल्लाहचे घर’ म्हणून कुरआनमध्ये संबोधिले आहे. म्हणून काबा हे गृह अथवा केंद्र आहे ईशधर्माचे! हे पवित्र घर इब्राहीम (अ.) यांनी बांधले ते ईशधर्माचे आणि इस्लामचे केंद्र कसे बनले? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी आपणास काबागृहाच्या बांधकामाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. हे बांधकाम कधी पूर्ण झाले हे जाणून घेणेसुध्दा महत्त्वाचे आहे. काबागृहाचा हेतु साध्य करण्यासाठी कोणती व्यावहारिक पावले उचलली गेली याबद्दलची माहिती करून घेणे गरजेचे आहे. पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे,
इब्राहीम (अ.) यांना त्यांच्या लोकांनी जेव्हा जबरदस्तीने स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यांनी त्यांचे घरदार सोडले आणि धर्माची शिकवण देण्यासाठी व सत्याचे आवाहन करण्यासाठी भटकंती सुरू केली. त्या ठिकाणी इब्राहीमच्या स्वप्नाची प्रसिध्द घटना घडली. त्यांना स्वप्न पडले की ते स्वहस्ते आपल्या पुत्राला बळी देत आहे. जेव्हा त्यांनी आपले हे स्वप्न आपल्या सुपुत्राला इस्माईलला सांगितले तेव्हा क्षणाचाही विलंबन न लावता इस्माईल (अ.) म्हटले, ‘‘की पिताश्री आपण अल्लाहच्या आदेशाचे पालन करा, तुम्ही मला ईशपरायणशील पाहाल.’’ इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पुत्राला जमिनीवर ओणवे केले आणि पुत्राच्या गळ्यावर सुरी ठेवली आणि पुत्राला बळी देणार तोच ईशवाणी झाली,
‘‘इब्राहीम तुझे हात रोखून धर तू परीक्षेत पूर्ण उतरला, आम्ही इस्माईलच्या जागी एक मेंढरु देऊन इस्माईलची मुक्तता केली.’’
इब्राहीम (अ.) यांचे संपूर्ण आयुष्य अशा प्रकारच्या परीक्षांनी भरलेले होते. ही घटना त्यांच्या आयुष्यातील शेवटची परीक्षा होती. या अंतिम परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्याने त्यांना ईशपारितोषिक बहाल करण्यात आले. अल्लाहने त्यांना शुभवार्ता दिली,
‘‘मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.’’ (कुरआन २: १२४)
इब्राहीम (अ.) यांना हे ईशपारितोषिक बहाल करण्याचा सोहळा काबागृहाच्या भिती पितापुत्र बांधत असतांना ईशआदेशाने (दिव्यप्रकटन) सुरू झाला. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आणि आठवण करा जेव्हा अल्लाहने इब्राहीमकडून काही गोष्टींमध्ये परीक्षा घेतली आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाहने त्याला म्हटले ‘‘मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.’’ (कुरआन २: १२४)
या ऐतिहासिक घटनेची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत,
१) ईस्माइलला बळी देण्याची घटना मीना या ठिकाणी घडली जे मक्का शहराच्या अगदी जवळ आहे.
२) इब्राहीम आणि इस्माईल (अ.) या पितापुत्रांनी स्वप्न साकार करताना जे धैर्य आणि ईशपरायणतेचे दर्शन घडविले ते मानवी इतिहासात अद्वितीय आहे. अल्लाहने यास इस्लाम (आज्ञाधारकता) म्हणून संबोधले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘सरतेशेवटी जेव्हा या दोघांनी आज्ञापालनात (इस्लाम) मान तुकविली आणि इब्राहीम (अ.) ने पुत्राला ओणवे केले.’’ (कुरआन ३७: १०३)
काबागृह बांधण्याचा हेतु साध्य करण्यासाठी खालीलप्रमाणे मानवी इतिहासात त्या ऐतिहासिक घटना घडत गेल्या ज्यांची नोंद कुरआनने कायमस्वरूपी घेतली आहे. त्या व्याख्यानात अल्लाहचे आदेश तसेच हजच्या विधीविधानांबद्दल माहिती दिली जाते. आठव्या दिवशी सर्व हाजी (यात्रेकरू) मीना या स्थळी रवाना होतात. मीना मक्का शहारापासून तीन मैलांच्या अंतरावर आहे. हाजी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तेथे राहतात. नंतर आराफात स्थळी रवाना होतात. ‘आराफात’ हे एक विस्तृत मैदान आहे. ते मक्कापासून बारा मैलाच्या अंतरावर आहे. दुपारच्या प्रार्थनेपूर्वी सर्व हाजीलोक आराफात येथे एकत्र येतात. जेव्हा मध्यान्हानंतर सूर्य ढळायला लागतो तेव्हा पुन्हा एकदा इमाम (नेता) सर्वांना उद्देशून व्याख्यान देतो. त्यानंतर इमामच्या पाठीमागे सामुदायिकरित्या नमाज अदा केली जाते. इमामच्या पाठीमाग सर्वजण मध्यान्हीची (जुहर) आणि संध्याकाळ (असर) ची नमाज एकत्र अदा करतात. नमाज झाल्यानंतर सर्व हाजी लोक अशा प्रकारे स्थानापन्न होतात की त्यांचा इमाम ‘जब्लेरहमत’ नामक टेकडीजवळ असेल. इमाम उंटावर स्थानापन्न असतो आणि खाली उतरत नाही. काबागृहाकडे त्याचे (इमामचे) तोंड असते आणि तो सतत प्रार्थना करीत राहतो.
‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे, हे अल्लाह! मी हजर आहे!’’
एक मोठा हाजी लोकांचा समुदाय इमामच्या मागे उभा राहतो आणि त्याच्यासोबत प्रार्थना करीत राहतो. या वेळी इमाम आणखी एक छोटेखानी औपचारिक व्याख्यान देतो आणि हाजी लोक ऐकतात. सूर्यास्तापूर्वी हाजी लोक ‘‘अल मुजदल्फा’’ या ठिकाणी जातात आणि आपापल्या जागेवर विसावतात. त्यांचा इमाम ‘कझा’ नामक टेकडीजवळ थांबतो. सूर्यास्तानंतर इमामच्या मागे सर्वजण नमाज अदा करतात. येथे मगरीबची (सूर्यास्तानंतरची) आणि ईशाची (रात्रीची) प्रार्थना (नमाज) एकत्र अदा केली जाते. येथे सर्व हाजी लोक रात्रीचा मुक्काम करतात. दहाव्या दिवशी तिथे प्रातःकाळची नमाज (फर्ज) अदा केली जाते. या नमाजनंतर प्रत्येक हाजी अल्लाहजवळ क्षमायाचना करतो. अल्लाहचे स्मरण करतो आणि म्हणत जातो,
‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’
सूर्य उगवल्यानंतर हाजी लोक मीनाकडे रवाना होतात. तिथे ते तीन सैतानाच्या खांबांना लहान दगड मारण्याचा विधी पार पाडतात. प्रत्येक खांबाला सात सात दगड मारले जातात आणि प्रत्येक वेळी म्हटले जाते की ‘‘अल्लाह महान आहे.’’
सैतानी खांबांना दगड मारून झाल्यानंतर हाजी लोक त्यांच्या ओठांवर असलेली उद्घोषणा (हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे!...) करण्याचे बंद करतात. ह्यानंतर मीना येथे पशुबळी (कुर्बानी) दिले जातात. हा अनिवार्य विधी आहे. बळी (कुर्बानी) दिल्यानंतर हाजी डोक्याचे मुंडन करतात आणि एहेरामच्या स्थितीतून बाहेर येतात. पुन्हा एकदा ते काबागृहाचे सात फेरे मक्का येथे जाऊन पूर्ण करतात. आणखी एकदा हाजी सैतानी खांबांना दगड (सात/सात) मारण्याचा विधी ‘‘अल्लाह महान आहे’’ ही उद्घोषणा करताना पार पाडतात. आणि नंतर हाजी लोक मक्का येथे परत येतात आणि काबागृहाची परिक्रमा करतात. हा विधी (परिक्रमा) संपल्यानंतर हाजी लोक काबागृहाच्या प्रवेशद्वाराचे चुंबन घेतात आणि त्यांची छाती आणि चेहरा ‘मुएतजम’ या ठिकाणी लावतात. मुएतजम हे ठिकाण काबागृहाचे प्रवेशव्दार आणि हजरे अस्वदच्या मध्यस्थानी आहे. काबागृहाच्या आच्छादनाला धरून हाजी भावनाविभोर होऊन काकुळतीने अल्लाहजवळ प्रार्थना करतात आणि क्षमायाचना करतात. त्यानंतर हाजी लोक मिश्र मनःस्थितीत (सुख-दुःखाच्या) आपापल्या घरी परतु लागतात. अल्लाहच्या घराचे प्रेम हृदयात साठवून आणि त्या काबागृहापासून दूर जाण्याचे दुःख उरी बाळगून परतीचा प्रवास सुरू होतो.
हा अत्यंत संक्षिप्त असा ‘हज’ या उपासना विधीचा आढावा आपण येथे घेतला आहे. काही विधी असे आहेत की त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतरच त्या विधीचे महत्त्व स्पष्ट होते. यासाठी आपण थोडक्यात त्या उपासना विधींचा मागोवा घेऊ या.
१) काबागृह:- याबाबत वरील विवेचनात अनेक दाखले आणि घटना आपल्यासमोर आलेल्या आहेत त्यातून वाचकाला स्पष्ट खुलासा होतो.
२) सफा आणि मरवा टेकड्या :- या दोन्ही टेकड्यांबद्दल कुरआनमध्ये स्पष्ट दिव्य प्रकटन आलेले आहे,
‘‘निःसंशय सफा आणि मरवा अल्लाहच्या संकेतांपैकी आहेत.’’ (कुरआन २: १५८)
‘‘अल्लाहच्या संकेतांपैकी’’ हे शब्द स्पष्टपणे अल्लाहची आज्ञाधारकता दर्शवितात. अल्लाहचे ते संकेतचिन्ह का आहेत? तर त्यासाठी आपणास इतिहासात डोकावून पाहावे लागेल. इतिहास साक्ष आहे की सफा आणि मरवा या त्या दोन टेकड्या आहेत ज्यांच्या दरम्यान माता हाजरा यांनी पाण्याच्या शोधात चकरा मारल्या होत्या. जमजम पाण्याचा झरा त्या दोन टेकड्याजवळच उदयाला आला.
३) जमरात :- मीना शहराच्या लगतच तीन खांब आहेत. प्रत्येक खांबाला जमरा म्हणतात. त्याचे अनेकवचन जमरात आहे. हे ते स्थळ आहे जिथे सैतानाने इब्राहीम (अ.) यांच्या मनात दुष्प्रवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा ते आपल्या प्रिय पुत्राला बळी देण्यास निघाले होते.
हजयात्री आणि उपासना: आपण हजच्या प्रत्येक उपासनाविधीच्या खोलात जाऊन विचार केला तर कळून येईल की त्या प्रत्येकामागे अल्लाहला समर्पण होण्याची तीव्र भावना कार्यरत आहे.
१) हाजी जे पवित्र वस्त्र हजकाळात अंगावर घेतात त्याला एहेराम म्हणतात, तो काही पोषाख मुळीच नाही. मनुष्याच्या दासत्वाचे व गुलामगिरीचे ते द्योतक आहे आणि त्यागाचे प्रतीक आहे. जेव्हा भिकारी आपला कटोरा घेऊन कृपाळू धनाढ्य मनुष्यापुढे उभा राहतो तर त्याचे प्रत्यक्ष कपडे, हेतु आणि भावना वर्णन करण्यापलीकडचे असतात. त्याचे बाह्यरूप सर्व सांगून जाते. त्याचप्रमाणे हजयात्रीचे बाह्यरुप स्पष्ट दर्शविते की तो काहीएक नसून अल्लाहचा भिकारी आहे. तो सर्व भौतिक सुखे त्यागून ईशसमाधानाकडे आपले मन वळवितो. अल्लाहच्या विचाराने तो भारावून जातो आणि त्याच्यासाठी आपला त्याग करण्यासाठी तयारीत राहातो. हजच्या काळात तो अल्लाहचा भिकारी आणि अल्लाहचा शिपाई या दोन्ही भूमिकेत राहातो.
एहेरामचा दुसरा महत्त्वाचा फायदा जगाला दिसून येतो तो म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेला प्रत्येक हाजी हेच साधे एहेरामचे वस्त्र अंगावर घालून असतो आणि उद्घोषणा करीत राहतो, ‘‘अल्लाह मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह, मी हजर आहे!’’ त्या वेळी जग इस्लामी राष्ट्रीयत्व पाहून दंग राहते. आंधळासुध्दा पाहू लागतो की इस्लामी नाते हे जगातील इतर कोणत्याही नात्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. माणसाला दुसऱ्या माणसाशी एकत्र करणारे एकमेव बंधन इस्लामचे नाते आहे. जेव्हा सर्व आसमंत दुमदुमू लागतो,
‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह, मी हजर आहे!’’
ही उद्घोषणा हज काळात सर्व हाजी लोकांच्या ओठावर असते. काबागृह बांधताना अल्लाहने आदेश दिला, ‘‘लोकांत हजयात्रेची आम घोषणा करा.’’ या आदेशाचे पालन करताना त्यास प्रतिसाद ‘‘हे अल्लाह मी हजर आहे!’’ ही उद्घोषणा करून सर्व हजयात्री देत असतात.
२) इब्राहीम (अ.) यांनी केलेली घोषणा काही औपचारिक नव्हती किवा ती कर्मकांडाचा भाग नाही. इस्लामच्या तत्त्वाला आणि श्रध्दाशीलतेला बळकटी देण्यासाठीची ती संजीवनी आहे. म्हणूनच त्याला दिलेला प्रतिसाद ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह! मी हजर आहे!’’ ही काही पोकळ घोषणा नाही. हे ते अभिवचन आहे जो दास आपल्या निर्माणकर्त्या प्रभु, अल्लाहला देतो आणि स्वतःला अल्लाहसमोर समर्पित करतो.
३) हजयात्री जेव्हा काबागृहाला प्रथम पाहतो तेव्हा त्याच्या नजरेसमोर त्याच्या बांधकामाचे पूर्ण दृष्य उभे राहाते. त्याला स्मरण होते की मी त्या राष्ट्राचा (जनसमुदायाचा) सदस्य आहे ज्याच्यासाठी इब्राहीम (अ.) यांनी प्रार्थना केली होती. त्या राष्ट्राला इब्राहीमने अल्लाहशी प्रार्थना करताना आज्ञाधारक (मुस्लिम) राष्ट्र म्हणून संबोधले होते. इब्राहीम (अ.) यांनी अशा राष्ट्रासाठी प्रार्थना केली होती की जो अल्लाहला आणि त्याच्या धर्माला पूर्णतः समर्पित होऊन आज्ञाधारक (मुस्लिम) बनून राहील.
४) जेव्हा हजयात्री आपले हात त्या काळ्या दगडावर ठेवतो तेव्हा त्याला वाटू लागते की तो आपले हात अल्लाहच्या हातात देऊन त्या प्रतिज्ञेला उजाळा देत आहे. अल्लाहला समर्पण, त्याची गुलामी आणि अल्लाहच्या आदेशांचे पालन करण्यासाठी प्रतिज्ञा! दोन्ही हात ठेवल्यानंतर त्या काळ्या दगडाचे चुंबन घेतले जाते. त्या वेळी हजयात्रीच्या मनात विचार येतात की अल्लाहला दिलेल्या अभिवचनाचा पुनरुच्चार करताना आपण आपल्या स्वामीजवळ आणि आपल्या निर्माणकर्त्या प्रभुसमोर, जो सर्व सृष्टीचा मालक, पालक आणि शासक आहे, तोच आपल्या उपासनेचा एकमेव हकदार आहे, याची प्रचिती येते. आपल्या प्रेमाचा आणि उपासनेला तोच एकमेव पात्र आहे. म्हणून तो हजयात्री जेव्हा काबागृहात प्रवेश करतो तेव्हा अल्लाहप्रती आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून उंबरठ्याचे चुंबन घेतो. म्हणजेच काळ्या दगडाचे चुंबन घेतो, जो प्रवेशद्वाराजवळ आहे.
५) तवाफ (परिक्रमा) म्हणजे काय? ते काहीएक नसून भावनेचे प्रकटीकरण आहे. त्या उत्कट भावनेचे आणि इच्छेचे की अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी स्वतःचा त्याग करणे, स्वतःचा बळी देणे. जेव्हा मुस्लिम काबागृहाची परिक्रमा करतो तेव्हा त्याला स्फुर्ती मिळते आणि उत्साह द्विगुणित होतो. हजयात्री आज्ञाधारकतेचा आणि ईशप्रेमाचा दृश्य रूप बनतो. तो स्वतःला विसरून जातो. तो अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या जिवावरसुध्दा उदार होतो.
काबागृहाला परिक्रमा (तवाफ) करणे हे आणखी एका सत्याचे द्योतक आहे की अल्लाह एक आहे आणि अल्लाहचा धर्म एक आहे, त्याचप्रमाणे त्याचे श्रध्दावंत दास सर्व एक आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या कुळाचे लोक येथे एकत्र येऊन काबागृहाची परिक्रमा करताना एकरूप होतात.
६) सफा आणि मरवा या दोन टेकड्यांमध्ये धावत जाण्याचा जो विधी आहे तो या हजयात्रेचा सर्वसंमत ठरावाचे प्रदर्शनच आहे की आम्हाला आदरणीय माता हाजरा यांचे ते कठीणतम परिश्रम आठवतात, जे त्यांनी अल्लाहचे आदेशपालन करण्यासाठी झेलले होते. तशाच प्रकारचे परिश्रम झेलण्यास आम्हीसुध्दा तयार आहोत.
७) हजयात्रेच्या सातव्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत हजयात्री आपल्या इमाम (नेता) च्या अधिपत्याखाली असतो. ते एकत्र चालतात व एकत्र थांबतात. पहिल्या दिवशी ते सर्वजण इमामसह काबागृहात असतात. दुसऱ्या दिवशी मीनामध्ये एकत्र येतात तर तिसऱ्या दिवशी सकाळीच ‘आराफात’च्या विस्तृत मैदानात येतात. रात्री ते ‘मुज्दलफा’ येथे मुक्कामी असतात आणि पुढच्या दिवशी मीनामध्ये पुन्हा येतात. कधी ते आपल्या नेत्याचे व्याख्यान लक्षपूर्वक ऐकतात तर दुसऱ्याच क्षणी ‘‘हे अल्लाह! मी तुझ्या सेवेत हजर आहे! हे अल्लाह मी हजर आहे!’’ अशी उद्घोषणा करीत राहतात. सर्व हजयात्री आपापले हजविधीविधान व्यवस्थित आणि गांभिर्यपूर्व पार पाडण्यात मग्न असतात. ते कधी कधी दोन नमाज एकत्र करून अदा करतात. या सर्व घडामोडी एका शिस्तबध्द रीतीने चालत राहतात. हजयात्रेचे हे सर्व विधी शिस्तबध्द मिलीटरी जीवनाचे (शिस्तबध्द सैनिकी जीवनाचे) जगाला दर्शन घडवितात. हजच्या काळात प्रत्येक हजयात्री अल्लाहचा सैनिकच असतो, हे आपण वर पाहिले आहे. हा अलोट सैन्यसमुदाय जो एका पवित्र आणि साध्या वस्त्रात वावरत असतो त्यांना पाहून असे वाटते की एक महान सैन्यदल अल्लाहसाठी जीवदान देण्यास तत्पर आहे.
हज उपासनेचा हा दृष्टिकोन आणि उपासनेचे हे स्वरूप सिध्द करते की शिस्तबध्द सामुदायिक जीवन आणि सामुदायिक लष्करी आचरण व आज्ञाधारक (मुस्लिम) राष्ट्र या संकल्पना एकमेकास पूरक आहेत. अशा राष्ट्राची (आज्ञाधारक) सर्व शक्ती अल्लाहच्या सेवेत अल्लाहचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि त्याच्या धर्माचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी खर्च केली जाते.
८) तीन स्तंभांना दगड मारणे हा विधीसुध्दा त्या अद्वितीय ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो. अब्राहा नामक राजाच्या बलाढ्य सैन्यदलाची पक्ष्यांनी आपल्या चोंचीतून त्यांच्यावर आकाशातून वर्षाव केल्याने दाणादाण उडाली होती. काबागृहाला तोडण्यासाठी हा राजा आपल्या बलाढ्य सैन्यदलास घेऊन आगेकूच करीत असताना आकाशातून पक्ष्यांनी त्यावर गारगोटींचा वर्षाव केला होता. हा विधी पार पाडताना हजयात्री ‘‘अल्लाह महान आहे’’ अशी जी घोषणा करीत जातो ते म्हणजे जगाला त्यांनी दिलेले आव्हान आहे, या दृढनिश्चय आणि सर्वसंमत ठरावाचे की जर कोणी या ईशधर्मावर वाकडी नजर टाकली तर त्यांचा विनाश निश्चित आहे. ही हजयात्रेकरूंची जाहीर घोषणा आहे की जो कोणी या पवित्र काबागृहावर चाल करून आला तर त्याला चिरडले जाईल.
९) ईदुल अजहा हा सण दरवर्षी मानवी इतिहासातील त्या श्रेष्ठतम आणि अद्वितीय अशा बलिदानाची आठवण करून देत आहे. अल्लाहने एक मोठे बलिदान इस्माईल (अ.) यांच्यासाठी दिले आणि त्यांची सुटका केली. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली.’’ (कुरआन ३७: १०७)
पशुचे अल्लाहच्या मार्गात बलिदान देणे म्हणजे स्वतःचे बलिदान देण्यासारखे आहे. अल्लाहने जेव्हा कधी त्यांना आपल्या जिवाचे बलिदान देण्यास सांगितले तर ते त्वरित तयार होतील कारण त्याचे संपूर्ण जीवन हे अल्लाहला समर्पित असते. पशुंना बळी देताना त्यांचे रक्त बाहेर पडते ती निशाणी आहे की आपणसुध्दा स्वेच्छेने रक्त सांडवू जेव्हा अल्लाहने तसा आदेश दिला. या बलिदानाचा दुसरा तिसरा काहीएक हेतु नाही. अन्यथा पशुची निव्वळ कत्तल धार्मिक अथवा चांगले कृत्य होऊच शकत नाही.
‘‘त्यांचे मांसही अल्लाहला पोहचत नाही आणि त्यांचे रक्तदेखील नाही, परंतु त्याला तुमची निष्ठा पोहचते.’’ (कुरआन २२:३७)
अशा प्रकारे हजविधींचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होते की त्या प्रत्येक विधीमध्ये अल्लाहची आज्ञाधारकता आणि अल्लाहला समर्पण (शरण) जाण्याची वृत्ती स्पष्ट दिसून येते. विशेषतः अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची (जिहाद) जिद्द जाणवते जे सर्वश्रेष्ठ असे समर्पण आहे. शरणागती आहे. व्यावहारिक आणि बौध्दिकदृष्ट्या संपूर्ण हजविधी हे सामूहिकरित्या अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा (जिहाद) करण्याचे एक उत्तम असे दृष्य स्वरूप आहे.
आदरणीय माता आयशा यांनी एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘जिहाद ’ (धर्मयुध्द) एक सर्वश्रेष्ठ कृती आहे. आम्हा स्त्रियांना त्यात भाग घेण्यापासून का रोखले गेले आहे? प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘स्त्रियांसाठी जिहाद (सर्वश्रेष्ठ कृती) हा आहे की त्यांनी पूर्णपणे निर्दोष हजयात्रा करावी.’’ (बुखारी)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget