कुफ्रची वास्तवता व त्यापासून होणारे नुकसान

जो उपजत मुस्लिम आहे आणि संपूर्ण आयुष्यभर अजाणतेपणे मुस्लिम राहिला. परंतु आपल्या ज्ञानशक्ती व बुद्धीचे सहाय्य घेऊन त्याने आपल्या ईश्वराला ओळखले नाही आणि आपल्या ऐच्छिक कार्यक्षेत्रात त्याने ईश्वराच्या आज्ञा झुगारुन दिल्या. हा मनुष्य काफीर (विद्रोही, श्रद्धाहीन, सत्याचा इन्कार करणारा) आहे. ‘कुफ्र’ चा खरा अर्थ लपविणे, झाकणे असा आहे. अशा माणसाला विद्रोही (काफीर) अशासाठी म्हटले जाते की त्याने आपल्या प्राकृतिक स्वभावावर नादानीचे पांघरूण घातले आहे. तो इस्लामी प्रकृतीवर जन्माला आला आहे. त्याचा संपूर्ण देह व देहाचे सर्व अवयव इस्लामी प्रकृतीनुसार कार्यरत आहेत. त्याच्या सभोवार सर्व सृष्टी इस्लामवरच कार्यान्वित आहे. परंतु त्याच्या बुद्धीवर पडदा पडलेला आहे. सर्व सृष्टीचा तसेच त्याचा स्वतःचा प्राकृतिक स्वभाव त्याच्यापासून दडलेला आहे. त्याची विचारधारणा त्याच्या उलट आहे आणि त्याविरुद्ध आचरण करण्यास तो प्रवृत्त होतो. जो मनुष्य ‘विद्रोही (काफीर)’ आहे तो किती मोठ्या प्रमाणात पथभ्रष्ट झाला आहे, हे तुम्ही पाहू शकता.
‘कुफ्र’ पासून होणारे नुकसान
‘कुफ्र’ एक घोर अज्ञान आहे, किंबहुना खरे अज्ञान ‘कुफ्र’ च होय. मनुष्य ईश्वराशी अनभिज्ञ असणे यापेक्षा मोठे अज्ञान आणखी कोणते असू शकते? एक मनुष्य विश्वाच्या या प्रचंड व्यापार प्रबंधाला अहोरात्र कार्यान्वित असलेला डोळ्यांनी पाहतो परंतु या प्रचंड व्यवस्थेचा निर्माता व चालक कोण आहे, हे तो जाणत नाही. ज्याने कोळसा, लोह, कॅल्शियम, सोडियम इत्यादी काही घटकांच्या मिश्रणाने अनुपम मानवनिर्मिती केली तो निर्माता कोण आहे? हे ही तो जाणत नाही.
एक मनुष्य सृष्टीमध्ये चहुकडे अशा वस्तु व असे कार्य होत असताना पाहातो ज्यामध्ये अप्रतिम कौशल्य व कारागिरी आहे. गणिती ज्ञान व रसायन शास्त्रज्ञान परिपूर्णपणे भरलेले आहे. तसेच सर्व परमकोटीची निपुणता व चमत्कार त्यामध्ये दृष्टीस पडतात परंतु ते सर्वज्ञ व निपुणता असणारे व ज्याने विश्वामध्ये हे सर्व कार्य निर्माण केले आहे ते अस्तित्व कोणते आहे? हे तो जाणत नाही!! ज्याला ज्ञानरूपी साखळीची पहिली कडीच सापडली नाही, अशा माणसाला खऱ्याखुऱ्या ज्ञानाची कवाडे कशी उघडली जाऊ शकतात? तो कितीही विचार व चिंतन करो किंवा कितीही संशोधन करो, त्याला कोणत्याही क्षेत्रात ज्ञानाचा सरळ व उचित मार्ग आढळणार नाही कारण सुरवातीलाच अज्ञानरूपी अंधकारच त्याच्या दृष्टीस पडेल आणि शेवटीही अंधारातच तो चाचपडत असेल.
‘कुफ्र’ एक अत्याचार आहे किंबहुना सर्वांत मोठा अत्याचार ‘कुफ्र’च होय. अत्याचार कशाला म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे? कोणत्याही वस्तुचा वापर तिच्या प्राकृतिक व नैसर्गिक स्वभाव धर्माविरुद्ध करणे हाच अत्याचार होय. आता तुम्हाला हे कळून चुकले आहे की सृष्टीतील सर्व चराचर वस्तु अल्लाहच्या आदेशाच्या अधीन आहेत व त्यांची प्रकृतीच ‘इस्लाम’ आहे. म्हणजेच ईशनियमांचे आज्ञापालन होय. खुद्द माणसाचा देह व त्याचा प्रत्येक अवयव, याच प्रकृतीनुसार उत्पत्ती पावलेला आहे. ईश्वराने या अवयवावर तसेच वस्तुवर अधिकार बाळगण्याचे थोडेसे स्वातंत्र्य माणसाला अवश्य दिले आहे. परंतु प्रत्येक वस्तूची प्रकृती असे इच्छिते की तिचा वापर ईशइच्छेनुसार केला जावा. परंतु जो मनुष्य ‘कुफ्र’ करतो, तो या सर्व वस्तुंचा वापर त्यांच्या प्रकृतीविरुद्ध करीत असतो. तो आपल्या हृदयात इतरांचा आदर, प्रेम व भयरुपी मूर्तीची प्रतिस्थापना करतो.
वास्तविकपणे हृदयाची प्राकृतिक हाक अशी आहे की त्यामध्ये केवळ अल्लाहची महानता, प्रेम व भय यांनाच स्थान असावे. मनुष्य आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचा व सृष्टीतील त्याच्या अधिकारा खालील सर्व वस्तूंचा वापर व उपयोग मात्र ईशइच्छेविरुद्ध करतो. खरेतर प्रत्येक वस्तुची प्राकृतिक धारणा अशी आहे की तिचा वापर केवळ ईशनियमानुसार केला जावा. तुम्हीच सांगा की अशा माणसापेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी व प्रत्येक वस्तुवर येथपर्यंत की खुद्द आपल्या अस्तित्वावरही अत्याचार करीत असतो?
‘कुफ्र’ केवळ अत्याचारच नसून तो विद्रोह, कृतघ्नपणा व नमकहरामीपणासुद्धा आहे. थोडासा विचार करा की मनुष्यापाशी आपली स्वतःची अशी कोणती वस्तू आहे? त्याचा मेंदू त्याने स्वतः निर्माण केला आहे की ईश्वराने? त्याचे हृदय, डोळे, जीभ, हातपाय व सर्व अवयवांची निर्मिती त्याने स्वतः केली आहे की ईश्वराने? त्याच्या सभोवताली जितक्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता तो स्वतः आहे की ईश्वर? या सर्व वस्तुंना माणसासाठी उपयुक्त बनविणे व कार्यान्वित करण्याची कृती त्याची स्वतःची आहे की ईश्वराची? तुमचे उत्तर हेच असेल की या सर्व वस्तू ईश्वराच्याच आहेत. त्यानेच त्याना निर्माण केले. ईश्वरच त्यांचा स्वामी आहे व ईश्वराच्याच देणगीने या सर्व वस्तू माणसाला प्राप्त झाल्या आहेत. खरी वस्तुस्थिती ही आहे पण मनुष्य ईश्वराने प्रदान केलेल्या बुद्धीचा वापर ईश्वरेच्छेविरुद्ध विचार करण्यासाठी करतो. ईश्वराने प्रदान केलेल्या हृदयात ईश्वराविरुद्ध धारणा बाळगतो. ईश्वराने जे डोळे, जीभ, हात व पाय व इतर वस्तू प्रदान केलेल्या आहेत त्यांचा वापर ईश्वरेच्छेविरुद्ध करतो. अशा माणसापेक्षा बंडखोर कोण असेल? एखाद्या सेवकाने आपल्या धन्याचे मीठ खाऊन जर त्याच्याशी बेईमानी केली, तर त्याला तुम्ही नमकहराम म्हणता.
एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने त्याला शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर जर शासनाविरुद्ध केला तर तुम्ही त्याला द्रोही म्हणता, एखाद्या उपकारकर्त्याशी जो दगाबाजी करतो तर त्याला तुम्ही कृतघ्न म्हणता. परंतु माणसाविरुद्ध माणसाची नमकहरामी, द्रोह व कृतघ्नपणाची वास्तवता काय आहे? मनुष्य दुसऱ्या माणसाला कोठून उपजीविका देतो? ती ईश्वराने प्रदान केलेली उपजीविका होय. शासन आपल्या कर्मचाऱ्यांना जे अधिकार देते ते कोठून आलेले आहेत? ईश्वरानेच शासनाला ही सत्ता प्रदान केलेली आहे. कोणीही उपकारकर्ता दुसऱ्या व्यक्तीवर कसा उपकार करू शकतो? ते सर्वकाही ईश्वरानेच तर दिलेले आहेत. माणसावर सर्वांत जास्त हक्क त्याच्या मातापित्याचा आहे. परंतु मातापित्याच्या हृदयात आपल्या अपत्याबद्दलचे प्रेम कोणी निर्माण केले? मातेच्या वक्षस्थळात दुधाची निर्मिती कोणी केली? पित्याच्या मनात अशी भावना कोणी प्रविष्ट केली की आपल्या श्रमाच्या घामाने मिळविलेली संपत्ती मांसाच्या एका निरुपयोगी गोळ्यासाठी आनंदाने उधळावी व त्याच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी व संस्कारासाठी आपला वेळ आपला पैसा व आपले सर्व सुखसमाधान अर्पण करावे. आता तुम्ही सांग जो ईश्वर माणसाचा खराखुरा उपकारकर्ता आहे, वास्तविक स्वामी आहे, सर्वांत मोठा पालनकर्ता आहे, त्याच्याशीच माणसाने जर ‘कुफ्र’ केले, त्याला ईश्वर मानले नाही. त्याची बंदगी करण्यास नकार दिला व त्याचे आज्ञापालन करण्यापासून तोंड फिरविले तर हे किती मोठे बंड व द्रोह आहे! किती मोठा कृतघ्नपणा व नमकहरामीपणा आहे!!
कोणी असा समज करून घेऊ नये की ‘कुफ्र करून मनुष्य ईश्वराचे काही वाकडे करतो. त्या सम्राटाचे राज्य इतके विशाल आहे की मोठ्यात मोठी दुर्बिण लावून आम्ही पाहिले तरी अद्यापपर्यंत आम्ही हे जाणू शकलो नाही की त्याच्या राज्याचा आरंभ कोठून होतो व त्याचा शेवट कोठे आहे. ज्या सम्राटाची शक्ती इतकी जबरदस्त व प्रचंड आहे की आपली पृथ्वी, सूर्य, मंगळ व अशाच प्रकारचे कोट्यवधी ग्रह त्याच्या इशाऱ्यावर चेंडूप्रमाणे भ्रमण करीत आहेत. त्या सम्राटाची संपत्ती इतकी अगणित आहे की समस्त विश्वामध्ये जे काही आहे ते सर्व त्याचेच आहे आणि त्यामध्ये अन्य कोणीही त्याचा वाटेकरी नाही. तो सम्राट असा निरिच्छ व निरपेक्ष आहे की, सर्व चराचर सृष्टी त्याचीच गरजू व कृपाभिलाषी आहे. बरे तर, माणसाची अवस्था व त्याचा दर्जा तरी असा काय आहे की त्याच्या स्वीकृतीने किंवा अस्वीकृतीने अशा सम्राटाचे काही नुकसान व्हावे? त्याच्याशी ‘कुफ्र’ व अवज्ञा करून मनुष्य त्याची काहीही हानि करीत नाही तर उलट मनुष्य स्वतः आपल्या विनाशाची तरतूद करतो.
‘कुफ्र’ व अवज्ञा करण्याचा अपरिहार्य परिणाम असा आहे की, मनुष्य स्वतः नेहमीसाठी अयशस्वी व विफल होतो. अशा माणसाला ज्ञानाचा सरळ मार्ग कधीही
सापडणार नाही कारण जे ज्ञान आपल्या निर्मात्यालाच जाणत नाही ते कोणत्या वस्तूला खऱ्या अर्थाने जाणू शकते? त्याची मति सतत कुमार्गानेच जाईल कारण जी बुद्धी आपल्या निर्माणकर्त्यालाच ओळखण्यात चूक करते ती दुसऱ्या कोणत्या वस्तूला खरे जाणून घेऊ शकते? तो आपल्या जीवनातील सर्व व्यवहारामध्ये सतत ठेचा खात राहील. त्याचे चारित्र्य बिघडेल, त्याची संस्कृती व संस्कार बिघडेल, त्याचा समाज बिघडेल, त्याची उपजीविकेची अर्थव्यवस्था भ्रष्ट व विकृत होईल, त्याचे शासन व राजकारण वाईट व दोषपूर्ण असेल. तो जगात अशांतता पसरविल, रक्तपात करील, इतरांचे हक्क ओरबडून व हिसकावून घेईल, जुलूम व अत्याचार करील व आपल्या कुविचारामुळे, खोडसाळपणामुळे व आपल्या दुष्कृत्यामुळे तो स्वतःचे जीवन स्वतःसाठीच कटू व अप्रिय करून घेईल. नंतर जेव्हा तो इहलोकातून परलोकात जाऊन पोहचेल तेव्हा आयुष्यभर त्याने ज्या ज्या वस्तूंवर अत्याचार केला त्या सर्व वस्तू त्याच्या विरुद्ध तक्रार करतील. त्याचा मेंदू, त्याचे हृदय, त्याचे नेत्र, त्याचे हात-पाय किंबहुना त्याच्या शरीरातील प्रत्येक रोम न रोम अल्लाहच्या न्यायालयात त्याच्याविरुद्ध असा दावा करतील की या अत्याचारी मनुष्याने तुझ्याविरुद्ध बंड व द्रोह केला व त्या द्रोहात त्याने आमच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले. ज्या भूमीवर तो अवज्ञा करीत फिरला, राहिला, जी संपत्ती त्याने अनुचित तऱ्हेने मिळविली, जे धन त्याने निषिद्ध साधनाद्वारे मिळविले व निषिद्ध हेतूसाठी खर्च केले, बंडखोर होऊन त्याने ज्या ज्या वस्तूवर कब्जा केला व त्याचा गैरवापर केला, ती सर्व साधने व उपकरणे ज्यांचा त्याने आपल्या बंडखोरीत वापर केला; हे सर्व त्याच्याविरुद्ध फिर्यादी रुपात उभे ठाकतील. ‘अल्लाह’ जो वास्तविक न्याय देणारा आहे तो या पीडितांची कैफियत ऐकून घेईल व त्या बंडखोराला अपमानजनक शिक्षा ठोठावील.
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget