इस्लाम आणि मनुष्य

ज्यांना ज्यांना अल्लाहने इच्छा आकांक्षा आणि निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आहे त्या निर्मितींपैकी मनुष्यसुध्दा एक आहे. तो फक्त त्यापैकी एक नाही तर त्यांच्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी निर्मिती आहे. म्हणूनच मनुष्याला अल्लाहने दिव्य प्रकटन तथा दिव्य आदेश देऊन मार्गदर्शन केले आहे. दिव्य कुरआननुसार जेव्हा प्रथम मानवाला पृथ्वीवर अल्लाहने पाठविले त्यावेळी अल्लाहने आदेश दिला,
‘‘नंतर जर माझ्याकडून तुमच्याकडे काही मार्गदर्शन लाभले तर जे माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतील तर त्यांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील. आणि जे लोक हे नाकारतील आणि आमच्या वचनांना खोटे ठरवतील तेच नरकाग्नीमध्ये पडतील आणि तिथेच सदैव खितपत राहतील.’’ (कुरआन २: ३८-३९)
या आदेशांना दिव्य प्रकटन (मार्गदर्शन) अवतरित करण्यासाठी अट ‘जरतर’च्या भाषेत घातली आहे. खरे पाहता ती अट नाही, परंतु ती एक अप्रतिम अशी वर्णनशैली आहे आदेश देण्याची! वरील संकेतवचनाचा गर्भितार्थ हा आहे की माझे दिव्य प्रकटन तुमच्याकडे यासाठी येत आहेत की तुम्ही त्यानुसार आचरण करावे.
खालील कुरआनोक्तीमध्ये हेच अधिक प्रभावीपणे स्पष्ट केले आहे,
‘‘आणि कोणताही लोकसमुदाय (राष्ट्र) असा होवून गेला नाही ज्यात कोणी सावध करणारा आला नाही.’’ (कुरआन ३५: २४)
वरील दोन्ही संकेतवचनांद्वारे हे निर्विवाद स्पष्ट होते की मनुष्याचे पृथ्वीवरील जीवन आणि दिव्यप्रकटन हे दोन्ही एक साथ आलेले आहेत आणि हे जग कधीही धर्मविरहित आणि ईशआदेशविरहित नव्हते. आणि एकही असा लोकसमूह (राष्ट्र) पृथ्वीवर नाही की ज्यास दिव्यप्रकटन (मार्गदर्शन) न देता ज्ञानाविरहित ठेवण्यात आले आहे. मनुष्य हा इच्छा-आकांक्षा आणि बुध्दीविवेक ठेवणारा तसेच निवड करण्याची योग्यता असणारा आहे, त्यामुळे त्याला ईशमार्गदर्शनाची गरज आहे. दिव्य प्रकटन आणि ईशधर्म (इस्लाम) मनुष्यासाठी स्वाभाविक आहे.
सर्वांचा धर्म एक: दिव्य प्रकटन तथा ईशआदेश निर्मितीकाळापासून मनुष्याजवळ अल्लाहने अवतरित केले आहेत. अल्लाहच्या आदेशांचे पालन करणे म्हणजे अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारणे होय. म्हणून निर्मितीकाळापासून (प्रारंभापासून) आलेले धर्म दुसरे तिसरे काही नसून इस्लाम आहे आणि त्या धर्मांचे अनुयायी मुस्लिम आहेत. परिणामतः दिव्य कुरआन पूर्ण एकवाक्यतेने, बुध्दीविवेकाने आणि पुराव्यानिशी निर्णय देत आहे. प्रेषित इब्राहीम (अ) यांच्याविषयी कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘इब्राहीम (अ.) यहुदीही नव्हता की ख्रिस्तीदेखील नव्हता किबहुना तो तर एक एकचित्त मुस्लिम होता आणि तो कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नव्हता.’’ (कुरआन ३: ६७)
कुरआनमध्ये एकेठिकाणी पुराव्यानिशी स्पष्टोक्ती आहे,
‘‘जेव्हा पालनकर्त्यांने त्याला सांगितले, ‘‘स्वतःला समर्पित कर.’’ तेव्हा तो त्वरित म्हणाला. ‘‘मी तर साऱ्या सृष्टीच्या पालनकर्त्याला समर्पित झालो आहे!’’ आणि अशाच प्रकारचे आचरण करण्याचा आदेश इब्राहीमने आपल्या मुलाबाळांना दिला होता. आणि तोच आदेश याकूबनेही आपल्या संततीला दिला होता. त्याने म्हटले की, ‘‘माझ्या मुलांनो, अल्लाहने तुमच्यासाठी हा धर्म पसंत केला आहे तेव्हा मरेपर्यंत अल्लाहला समर्पित होऊन राहा.’’ (कुरआन २: १३१-१३२)
अशाच प्रकारची स्पष्टीकरणे कुरआनने लुत (अ), मुसा (अ), सुलैमान (अ), ईसा (अ) आणि इतर अनेक प्रेषितांबद्दल दिलेली आहेत आणि स्पष्ट उल्लेख आहे की हे सर्व प्रेषित आणि त्यांचे अनुयायी मुस्लिम होते आणि त्या सर्वांचा धर्म इस्लाम होता.
मुळचा धर्म इस्लाम: वर उल्लेख केलेल्या स्पष्टीकरणामुळे हे अगदी स्पष्ट आहे की आता नावाबद्दल आणि ईशधर्माबद्दल अर्थ लावण्यासाठी दुमत होऊच शकत नाही. प्रत्येक ईशधर्म मग तो कुरआनप्रणित असो (शरियतनुसार) अथवा तौरेतनुसार किवा आदम (अ) चा धर्म असो की नूह (अ) चा, किंवा इब्राहीम (अ) आणि ईसा (अ) यांच्यावर अवतरित झालेले ईशमार्गदर्शन असोत, प्रत्येकाच्या धर्माचे नाव इस्लाम होते आणि त्यांचे अनुयायी मुस्लिम होते. कारण या सर्वांचे मूलभूत स्रोत आणि वास्तवतः ईशमार्गदर्शन (शरियत) होते. हे दिव्य प्रकटन (ईशमार्गदर्शन व आदेश) हेच इस्लाम आहे आणि त्यांचे अनुयायी मुस्लिम! परंतु प्रत्यक्षमात्र वेगळेच काही घडले. हे अगदी विपरीत आहे. दिव्य कुरआनच्या विशेष अशा परिभाषेत इस्लाम हे त्या धर्माचे नाव आहे जे आदरणीय अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांच्यावर अवतरित झाले आहे. म्हणून ‘मुस्लिम’ हे नावसुध्दा प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायींनाच देण्यात आले. जेव्हा कुरआन ‘अल् इस्लाम’ म्हणून उल्लेख करतो त्या वेळी सामान्यतः अर्थ अभिप्रेत नसून फक्त एक धर्म आणि त्याचे दिव्य अवतरणच अभिप्रेत आहेत. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे.’’ (कुरआन ५: ३)
‘‘अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (कुरआन ३: १९)
या संकेतवचनांत ‘अल इस्लाम’ हा शब्द फक्त एकच धर्म दर्शवितो आणि तो म्हणजे कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स) द्वारा अवतरित झालेला इस्लाम होय.
‘मुस्लिम’ या शब्दाबद्दल तर अगदी स्पष्ट आदेश आहे,
‘‘अल्लाहने पूर्वीसुध्दा तुमचे नाव मुस्लिम ठेवले होते आणि या (कुरआनात) मध्येसुध्दा (तुमचे असेच नाव आहे).’ (कुरआन २२: ७८)
या शब्दांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. वरील संकेत वचनांनुसार खात्रीलायक अगदी ठामपणे हे सत्य मांडले आहे की ज्यांनी ज्यांनी प्रेषितांवर विश्वास ठेवला, मग ते कोणतेही प्रेषित असोत, ते सर्व मुस्लिम आहेत. तथापि हा मान त्याच श्रध्दावंतासाठी आहे ज्यांनी मूलभूत धर्म इस्लाम वर श्रध्दा ठेवली व जे आचरणाने मुस्लिम आहेत, हेच लोक मुस्लिम आहेत. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांच्या अनुयायांव्यतिरिक्त कोणत्याच समुदायाला मुस्लिम म्हटले जात नाही. जरी एखाद्या लोकसमुदायाला ‘मुस्लिम’ हे नाव दिले तरी ‘‘तुम्हाला मुस्लिम नाव बहाल केले गेले आहे’’ या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही. सर्व श्रध्दाशील लोक मुस्लिम होते. तेव्हा त्यांपैकी एखाद्या समाजाला मुस्लिम नावाने ओळखण्याची गरज भासत नव्हती. म्हणून जरी कुरआन एखाद्या लोकसमुदायाला मुस्लिम म्हणून संबोधन करतो त्या वेळी त्या शब्दाचा खरा आशय अभिप्रेत असतो. आपण म्हणू या की इस्लाम त्यांचे गुणवैशिष्ट्य होते आणि नाव अथवा शीर्षक नव्हते.
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget