July 2019

- सय्यद अबुल आला मौदूदी

या पॉकेट साईझ पुस्तकात सांगितले आहे की धरती आणि त्यातील सर्व वस्तुंना अल्लाहने मानवजातीसाठी निर्माण केले.
मानवाच्या आर्थिक जीवनात न्याय व्यवस्था कायम राखण्यासाठी इस्लामने काही सिद्धान्त आणि मर्यादा घालून दिल्या आहेत. जेणेकरून संपत्तीची निर्मिती, उपयोग व वितरणाची संपूर्ण व्यवस्था त्याने नेमून दिलेल्या मर्यादेच्या आत घालावी.

आयएमपीटी अ.क्र. 137    -पृष्ठे - 08    मूल्य - 06  आवृत्ती - 2 (2012)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/154s221gdd46bja3fxx5klemhwumc8r0

मुस्लिमांना आम्ही ज्या गोष्टीकडे बोलावितो ती गोष्ट ही आहे की, त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल व ती पूर्ण करण्यासाठी ते तयार होतील. ती जबाबदारी जी की मुस्लिम  होण्याच्या नात्याने त्यांच्यावर येते. तुम्ही फक्त एवढे म्हणून सुटका करून घेऊ शकणार नाहीत की, ’’आम्ही मुस्लिम आहोत आणि आम्ही अल्लाह आणि त्याच्या धर्माला मानलेले  आहे.’’ उलट जेव्हा तुम्ही अल्लाहला आपला ईश मानलेले आहे आणि त्याने जो धर्म तुम्हाला दिलाय त्याचा तुम्ही एक व्यवस्था म्हणून स्वीकार केलेला आहे. तर त्यासोबत काही  जबाबदाऱ्यासुद्धा तुमच्यावर येतात ज्यांची जाणीव तुम्हाला असायला हवी आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची चिंता तुम्हाला असायला हवी. जर तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार  नाहीत तर त्याच्या कोपापासून या जीवनात वाचू शकाल ना परलोकात. त्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्या फक्त एवढ्याच नाहीत की तुम्ही अल्लाहवर, त्याच्या दुतांवर, त्याच्या  ग्रंथावर, त्याच्या प्रेषितांवर आणि निवाड्याच्या दिवसावर विश्वास ठेवला. ती जबाबदारी फक्त एवढीही नाही की तुम्ही नमाज अदा केली, रोजे राहिले, हजला गेले आणि जकात दिली.  ती फक्त एवढीही नाही की तुम्ही विवाह, घटस्फोट, वारसाहक्क इत्यादी गोष्टींमध्ये इस्लामने घालून दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली. या सर्वासोबत एक मोठी आणि अवजड  जबाबदारी आपल्यावर ही अनिवार्यरित्या येते की, तुम्ही सगळ्या जगासमोर या सर्व गोष्टींचे साक्षीदार म्हणून उभे रहा. ’मुस्लिम’ या नावाने तुम्हाला एक वेगळा समुदाय  बनविण्यामागचा जो उद्देश्य कुरआनने स्पष्ट केलेला आहे तो हाच आहे की, तुम्ही अल्लाहच्या सर्व बंद्यांसमोर सत्याची साक्ष द्याल. जेणेकरून उद्या ते हे आरोप करू शकणार नाहीत  की त्यांना अंधारात ठेवले गेले.
कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आणि या प्रमाणे आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ट समुह बनविलेला आहे जेणेकरून तुम्ही लोकांसमोर साक्ष द्याल आणि प्रेषित तुमच्यासमोर साक्ष  देतील.’’ (सुरे बकरा आयत नं. 145).
हा मुस्लिम समुदायाला जन्माला घालण्याचा खरा उद्देश आहे. जर का हा उद्देश तुम्ही पूर्ण केला नाही तर लक्षात ठेवा तुम्ही तुमचे आयुष्य व्यर्थ घालविले आहे. सत्याची साक्ष देण्याचे  कर्तव्य अल्लाहने तुमच्यावर टाकलेले आहे. त्याचा आदेश आहे की, ’’हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा बाळगली, अल्लाहसाठी उभे राहणारे आणि ठीक-ठीक सत्याची साक्ष देणारे बना.’’ (सुरे  मायदा आयत नं.6). आणि हा फक्त केवळ आदेशच नाही तर ताकीदवजा आदेश आहे. अल्लाह फरमावितो की, ’’त्या व्यक्तीपेक्षा मोठा अत्याचारी आणखीन दूसरा कोण असेल  ज्याच्याकडे अल्लाहकडून एक साक्ष आलेली आहे आणि त्याने ती लपविली.’’ (सुरे बकरा आयत नं. 140).
त्यानंतर अल्लाहने तुम्हाला हे सुद्धा दाखवून दिले आहे की, या कर्तव्यपूर्तीचा परिणाम काय होणार आहे? तुमच्यापूर्वी या साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये ज्यू लोकांना उभे केले गेले होते.  मात्र त्यांनी काही प्रमाणात सत्याला लपविले आणि काही प्रमाणात सत्याच्या विरूद्ध साक्ष दिली. म्हणून ते सत्याचे नव्हे तर असत्याचे साक्षीदार होऊन गेले. याचा परिणाम हा झाला की  अल्लाहने त्यांना दूर लोटून दिले. त्यांच्यावर अल्लाहचा कोप झाला. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’अपमान आणि दारिद्रय त्यांच्यावर टाकून देण्यात आले आणि त्यांनी आपल्या  डोक्यावर अल्लाहचा कोप ओढवून घेतला.’’ (सुरे बकरा आयत नं.61).
हीच साक्ष ज्याची जबाबदारी आता तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे. याचा अर्थ जे सत्य तुमच्याकडे आलेले आहे, जे सत्य तुमच्यावर स्पष्ट करण्यात आलेले आहे, मानवाला  जीवनात आणि मरणोप्रांत जीवनात यशस्वी होण्याचा जो एकमेव मार्ग आहे, तो तुम्हाला दाखविण्यात आलेला आहे. या सर्वांची साक्ष तुम्ही जगासमोर द्यावी व सांगावे की, हाच सत्य  मार्ग आहे. तुमची साक्ष अशी असायला हवी की, सत्य आणि असत्य दोहोंमधील फरक ठळकपणे वेगळा दिसेल आणि जगातील लोक हा तर्क देऊ शकणार नाहीत की, आम्हाला तर  सत्याचा पत्ताच नव्हता. हीच साक्ष घेऊन अनेक प्रेषित पृथ्वीवर पाठविण्यात आले होते. हीच साक्ष देणे त्या सर्वांवर अनिवार्य करण्यात आले होते आणि शेवटचे प्रेषित मुहम्मद  (सल्ल.) यांच्यानंतर ही साक्ष देण्याची जबाबदारी सामुहिकरित्या मुस्लिम समाजावर टाकण्यात आलेली आहे. जशी की ती पे्रषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर त्यांच्या जीवन काळामध्ये  व्यक्तीगत स्तरावर टाकण्यात आलेली होती.
ही साक्ष किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज याच गोष्टीवरून लावा की, मानवजातीसाठी अल्लाहने विचारपूस आणि बक्षीस आणि शिक्षेचा जो कायदा केलेला आहे तो पूर्णपणे याच  साक्षीवर अवलंबून आहे. अल्लाह युक्ती (हिकमतवाला), दया आणि न्याय करणारा आहे. त्याच्या हिकमत आणि दया तसेच न्यायप्रियतेशी ही गोष्ट अजिबात सुसंगत नाही की लोकांना  त्याची मर्जी माहितच नसावी आणि त्याने त्यांना त्याच गोष्टीला जबाबदार धरावे की ते त्याच्या मर्जीच्याविरूद्ध का चालले? लोकांना हे माहितच नसेल की सत्य मार्ग कोणता आहे?  आणि तो (अल्लाह) लोकांची मार्गभ्रष्ट झाले म्हणून पकड करेल. लोकांना या गोष्टीचा थांगपत्ताच नसेल की त्यांना कोणत्या गोष्टींबाबत विचारले जाईल ? आणि त्या अनोळखी  गोष्टीबद्दल त्यांच्याशी विचारपूस केली जाईल. म्हणूनच अल्लाहने जगाची सुरूवातच एका प्रेषिताला पाठवून केली. त्यानंतर वेळोवेळी अनेक प्रेषित पाठविले. ज्यांनी लोकांसमोर सत्याची  साक्ष दिली व त्यांना समजावून सांगितले की तुमचे व्यवहार कसे असावेत व तुम्हाला जन्माला घालण्याचे कारण काय? तसेच अल्लाहची मर्जी काय आहे?
जीवन जगण्याचा हाच खरा मार्ग आहे. हीच पद्धत आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालका (अल्लाह)ची मर्जी संपादन करू शकता. हे ते काम आहे जे तुम्ही करायला हवे आणि हे ते  काम आहे ज्यांच्यापासून तुम्हाला लांब रहायचे आहे. ह्या अमुक गोष्टी आहेत ज्यांच्याबाबतीत मेल्यानंतर तुमच्याकडे विचारपूस केली जाईल. हीच ती साक्ष आहे जी अल्लाहने आपल्या  प्रेषितांच्या मार्फत लोकांसमोर दिली होती. त्याचा उद्देश्य कुरआनमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे की, लोकांना अल्लाहसमोर हा तर्क देण्याची संधी राहू नये की आम्ही अनभिज्ञ होतो  आणि जी गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती त्याला जबाबदार धरून तुम्ही आम्हाला पकडताय. ’’ (हे सारे प्रेषित) आनंद वार्ता देणारे आणि भीती घालणारे बनवून पाठविण्यात आले होते  जेणेकरून हे प्रेषित आल्यानंतर लोकांकडे (आपण निर्दोष) असल्याचा तर्क अल्लाहसमोर कोणी देऊ शकणार नाही. अल्लाह जबरदस्त शक्तीमान आणि हिकमतवाला आहे’’ (सुरे निसा  : 165).’’येणेप्रमाणे अल्लाहने हा तर्क पुढे केला जावू नये म्हणून त्याची जबाबदारी प्रेषितांतवर टाकली आणि त्यांना या महत्वाच्या जबाबदारीवर नेमले की, जर त्यांनी सत्याची साक्ष लोकांसमोर ठीक-ठीक दिली तर मग लोक आपल्या कर्मासाठी स्वतः जबाबदार राहतील. मात्र जर प्रेषितांकडून साक्ष देण्यामध्ये निष्काळजीपणा करण्यात आला आणि त्यामुळे लोक  पथभ्रष्ट झाले तर मात्र प्रेषितांची पकड होईल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रेषितांच्या पदाची ही नजाकत होती की, एक तर त्यांनी सत्याची ठीक- ठीक साक्ष देऊन लोकांना कारण  सांगण्याची संधीच देऊ नये, नाहीतर लोक उलट त्यांच्यावर आरोप लावतील की, ह्यांनी आपल्या पदाचा मान राखत अल्लाहचा संदेश आमच्यापर्यंत ठीक- ठीक पोहोचवलेला नाही. लोक  म्हणतील ऐ अल्लाह! जीवन जगण्याचा जो सरळ मार्ग तुम्ही प्रेषितांना सांगितला होता तो मार्ग तर त्यांनी आम्हाला दाखविलाच नाही. हेच कारण होते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. आपल्यावरील या जबाबदारीच्या ओझ्याच्या जाणीवेसंबंधी अतिशय संवेदनशील होते. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या तर्फे सत्याची साक्ष देण्यामध्ये कुठलाच निष्काळजीपणा केला नाही  आणि लोकांना त्यांच्यावर आरोप करण्याची संधीच मिळू नये यासाठी आयुष्यभर जीव तोडून प्रयत्न केले.
प्रेषितांच्या मार्फत ज्या लोकांपर्यंत सत्य, ज्ञान आणि उपदेशाचा मार्ग पोहोचला ते एक उम्मत (समुदाय) बनवले गेले आणि त्यांच्या दर्जाला शोभेल अशी ही नाजूक जबाबदारी, जीचे  ओझे प्रेषितांवर टाकले गेले होते आता या उम्मतच्या वाट्याला आलेले आहेत. प्रेषित (सल्ल.) यांचे पायीक आणि वारस होण्याच्या प्रतिष्ठेतून त्यांचा हा मान ठरविला गेला की, त्यांनी  सत्याची साक्ष द्यावी. त्यानंतरही लोक सुधरले नाही तर मग त्यांची पकड केली जाईल. आणि जर यांनी (मुस्लिमांनी) सत्याची साक्ष देण्यामध्ये टाळाटाळ केली किंवा सत्याऐवजी  असत्याची साक्ष दिली तर इतर लोकांच्या अगोदर हे स्वतः पकडले जातील. अगोदर त्यांच्याकडून त्यांच्या कामागिरीबद्दल विचारपूस होईल आणि त्या लोकांच्या कर्माबाबतही विचारपूस  यांच्याचकडून केली जाईल की तुम्ही सत्याची साक्ष न दिल्यामुळे किंवा चुकीची साक्ष दिल्यामुळे हे बाकीचे लोक मार्गभ्रष्ट, दंगेखोर आणि पापी झाले.

(क्रमशः)

१. माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की कर्मांची भिस्त फक्त दृढनिश्चयावर आहे आणि मनुष्याला ते सर्व मिळेल ज्याचा   त्याने निश्चय केला असेल, अल्लाह आणि पैगंबरांसाठी केलेली ‘हिजरत’ उत्तम ‘हिजरत’ होय आणि भौतिक जगासाठी केलेली अथवा एखाद्या महिलेशी विवाह करण्यासाठी असलेली  ‘हिजरत’ या जगासाठी अथवा महिलेसाठीच समजली जाईल. (बुखारी व मुस्लिम)
२. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह तुमचा चेहरामोहरा आणि तुमच्या संपत्तीला पाहणार नाही तर तुमची हृदये आणि  तुमच्या कर्मांना पाहील. (मुस्लिम)
३. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले की अंतिम निवाड्याच्या (‘कयामत’च्या) दिवशी सर्वप्रथम एका अशा   मनुष्याच्या बाबतीत निर्णय देण्यात येईल ज्याला हौतात्म्य लाभले असेल, त्याला अल्लाहच्या न्यायालयात उभे केले जाईल. मग अल्लाह त्याला आपल्या सर्व देणग्यांची आठवण करून  देईल आणि त्याला त्या सर्व देणग्या आठवतील तेव्हा विचारले जाईल, ‘‘तू माझ्या देणग्या प्राप्त करून कोणते काम केले?’’ तो म्हणेल, ‘‘मी तुझ्या प्रसन्नतेसाठी (तुझ्या जीवनधर्माचा  (‘दीन’चा) विरोध करणाऱ्यांविरूद्ध) युद्ध केले, इतकेच नव्हे तर मी आपले प्राण दिले.’’ अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘तू ही गोष्ट खोटी सांगितली की माझ्यासाठी युद्ध केले, तू फक्त यासाठी  युद्ध केले (आणि शौर्य दाखविले) की लोकांनी तुला शूरवीर म्हणावे. मग जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘त्या हुतात्म्याला तोंडघशी फरफटत घेऊन जा  आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला नरकात टाकले जाईल. मग एक दुसरा मनुष्य अल्लाहच्या न्यायालयात उभा केला जाईल, तो ‘दीन’ (जीवनधर्म) चा ज्ञानी आणि ‘दीन’  शिकविणारा असेल. त्याला अल्लाह आपल्या देणग्यांची आठवण करून देईल आणि त्याला सर्व देणग्या आठवतील. तेव्हा त्याला विचारले जाईल, ‘‘त्या देणग्या प्राप्त करून तू कोणते   कर्म केले?’’ तो म्हणेल, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्यासाठी तुझ्या ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले आणि तुझ्यासाठी दुसऱ्यांना त्याचे ज्ञान दिले आणि तुझ्यासाठी पवित्र कुरआनचे पठण केले.’’   अल्लाह म्हणेल, ‘‘तू खोटे सांगत आहेस. लोकांनी तुला ‘आलिम’ (विद्वान) म्हणावे यासाठी तू ज्ञान प्राप्त केले, लोकांनी तुला कुरआन जाणणारा म्हणावे यासाठी तू कुरआनचे पठण   केले; तेव्हा जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत घेऊन जा आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला फरफटत नेण्यात आले आणि   नरकात फेकण्यात आले. आणि तिसरा मनुष्य तो असेल ज्याला अल्लाहने जगात ऐशोआराम प्रदान केला होता आणि प्रत्येक प्रकारची संपत्ती दिली होती. या मनुष्यास अल्लाहसच्या  समोर हजर केले जाईल आणि तो आपल्या सर्व देणग्या सांगेल आणि त्याला अल्लाहच्या सर्व देणग्या आठवतील आणि मान्य करील की होय, या सर्व देणग्या त्याला देण्यात आल्या  होत्या. तेव्हा त्याचा पालनकर्ता त्याला विचारील, ‘‘माझ्या देणग्या प्राप्त करून तू कोणते कर्म केले?’’ तो उत्तर देईल, ‘‘जेथे जेथे खर्च करणे तुला पसंत होते तेथे मी तुझी प्रसन्नता  प्राप्त करण्यासाठी खर्च केले.’’ अल्लाह म्हणेल, ‘‘खोटे बोलतोस. तू ही सारी संपत्ती लोकांनी तुला दानशूर म्हणावे यासाठी खर्च केलीस. मग त्याच्या बदला तुला जगात मिळाला.’’  मग  आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत न्या आणि नरकाच्या आगीत फेकून द्या.’’ तद्वत त्याला नेऊन नरकाच्या आगीत फेकून देण्यात येईल.

(हदीस : सही मुस्लिम)

इस्लाम एक नैसर्गिक व्यवस्था आहे. माणसाच्या प्रकृतीशी अनुकूल आहे. जी माणसाची प्रकृती आहे तोच इस्लाम आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’आणि जेव्हा हे त्यांना ऐकवले  जाते तेव्हा ते म्हणतात आम्ही यावर श्रद्धा ठेवली.’’ हे सत्य आहे की, हे आमच्या अल्लाहकडून आहे. आम्ही तर पहिल्यापासूनच मुस्लिम आहोत’’ प्रत्येक चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाला  असेच वाटते. जेव्हा इस्लामी मुल्य त्यांच्यासमोर सादर केली जातात तेव्हा त्यांच्या अंतरआत्म्यातून त्याला स्वीकारण्याची आवाज येते. इस्लामकडे परत येणे वास्तविक पाहता आपल्या  मूळ प्रवृत्तीकडे परत येण्यासारखे आहे. जर काही लोकांना इस्लाम विषयी संवेदना वाटत नसेल, त्याच्या संदेशामुळे कोणाला अस्वस्थ वाटत असेल, इस्लाम विषयी घृणेचा भाव उत्पन्न  होत असेल तर त्याचे कारण हे आहे की, त्यांच्या प्रवृत्तीवर काही पडदे पडलेले आहेत. त्या पडद्यांना हटवून इस्लामचा संदेश त्यांच्यासमोर मांडावयाचा आहे. ज्या अडचणी आहेत त्या  दूर कराव्या लागतील. मग प्रश्न असा पडतो की, हे पडदे किंवा अडचणी काय असू शकतात? सर्वात मोठा पडदा तर गैरसमजाचा पडदा आहे. अशा लोकांनी चुकीच्या प्रवृत्तीच्या  मुस्लिमांकडे पाहून इस्लामविषयी आपले मत बनविलेले असते. मुस्लिम समाजात स्थापित झालेल्या चुकीच्या पद्धती, गुन्हेगारी इत्यादीकडे पाहून त्यांनी इस्लामविषयी स्वतःचे मत  बनविलेले आहे. अनावश्यक जातीय प्रतिस्पर्धा, हट्ट आणि जातीय अस्मितेमुळे हट्टीपणा वाढतो. हा सुद्धा एक पडदाच आहे. अशा पद्धतीचे हे जे पडदे आहेत, त्यांना हटवावे लागेल आणि  इस्लामची वास्तविक संकल्पना त्यांच्यासमोर सादर करावी लागेल. असे झाल्यास मानवाची मूळ प्रवृत्ती आपोआप त्याकडे आकर्षित होईल.
अशा परिस्थितीमध्ये करावयाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आपल्याला सामाजिक स्तरावर एक शक्तीशाली आंदोलन चालवावे लागेल. देशबांधवांसमोर व त्यांच्यातील वेगवेगळ्या  गटांशी आपले चांगले संबंध वृद्धींगत करावे लागतील. त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागेल,  त्यांच्या मनाची दारे ठोठवावी लागतील, त्यांची मने जिंकावी लागतील, त्यांना सांगावे लागेल की  खरा इस्लाम काय आहे? आणि इस्लामचा संदेश काय आहे? तुम्ही त्यांना दाखवून द्या की इस्लाम शांतीचा ध्वजवाहक आहे, इस्लाम आंतरराष्ट्रीय बंधूभावाचे नाव आहे, इस्लाम माणुसकीचे नाव आहे, हा कुठल्या खास गटासाठी नाही तर जगातील सर्व लोकांसाठी आहे. सर्व लोकांना आपसात जोडणे, हा त्याचा उद्देश आहे. मानवाला या जीवनामध्ये आणि  मरणोपरांत जीवन जे की कायम राहणार आहे, दोन्हीमध्ये यशस्वी करण्यामध्ये त्याला रस आहे. हे जगातील सर्वात मोठे सत्य आपल्याला अतिशय प्रेम, सहृदय आणि अत्यंत तडफेने  इथल्या लोकांना सांगावे लागेल.
हे सामाजिक कार्यच जातीयवादाला समाप्त करू शकेल. जातीयवाद नष्ट करण्याचा दूसरा कुठला मार्गच नाही. तुम्ही जर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस जातीयवादाचा सामना करत बसाल  तर कितीही शतके झाली तरी जातीयवाद नष्ट होणार नाही. हा जातीयवाद सामाजिक कार्याने समाप्त होईल आणि सामाजिक काम याचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आहे. तुम्ही  त्यांच्यापर्यंत पोहचा. त्यांच्या बुद्धी आणि मनावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. मी एसआयओमध्ये असतांना माझ्या तरूण मित्रांना नेहमी सांगत होतो आणि सांगतो की, जे  विद्यार्थी महाविद्यालय आणि विद्यापीठात आपल्या सोबत विद्यार्जन करत आहेत तेच उद्या या देशाची सुत्रे सांभाळतील. प्रत्येक विद्यार्थी 11 वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत  कमीत कमी 7 वर्षे तेथे असतो. जर मुस्लिम विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतला आणि शपथ घेतली की आपल्या सात वर्षाच्या या महाविद्यालयीन कालखंडामध्ये सात विद्यार्थ्यांना  इस्लामचा परिचय करून देऊ आणि इस्लामचा खरा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू, तेव्हा त्यांच्या मनामध्ये इस्लाम विषयी एक ओलावा निर्माण होईल. इस्लामचा संदेश काय आहे हे  आपल्या वाणी आणि वर्तनाने या सात वर्षात सात विद्यार्थ्यांसमोर मांडणे अवघड काम आहे काय? आज भारतातील सर्वच मुस्लिम तरूणांनी हे काम करण्याचा निश्चय केला तर दहा  वर्षानंतर भारत कसा असेल याची कल्पना करा.
आज तुम्ही ज्या मोठ-मोठ्या वृत्तवाहिन्याने हैराण आहात उद्या त्या चॅनलच्या टेबलावर तेच लोक असतील जे आज तुमच्या सोबत शिक्षण घेत आहेत. ज्यांच्या मनाला तुम्ही स्वच्छ  केलेले असेल. ज्यांच्यापर्यंत इस्लामचा संदेश योग्य स्वरूपात पोहोचवलेला असेल. जे लोक उद्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेतृत्व करणार आहेत ते हेच लोक असतील ज्यांच्यापर्यंत  तुम्ही इस्लामचा संदेश विद्यार्थी अवस्थेमध्येच पोहोचवलेला असेल. नोकरशाहीमध्ये, पोलिसांमध्ये प्रत्येक ठिकाणी हेच लोक असतील ज्यांच्या विद्यार्थी दशेमध्येच त्यांच्यापर्यंत  इस्लामचा वास्तविक संदेश पोहोचलेला असेल. घृणेला संपविण्याचा, जातीयवादाशी सामना करण्याचा, वर्गव्यवस्थेला नष्ट करण्याचा, देशात खऱ्या अर्थाने न्यायाची स्थापना करण्याचा  हाच सर्वात सोपा मार्ग आहे. हे सर्व तुम्हा विद्यार्थ्यांच्या हातात आहे. तुम्ही जर निश्चय केला की हे काम करायचेच आहे तर हे काम सहजरित्या होऊ शकेल. अलिगढ विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांना या कामामध्ये पुढाकार घ्यावा लागेल. अल्लाहने तुम्हाला एका अशा ठिकाणी आणि अशा स्तरावर ठेवलेले आहे की, पूर्ण देशातील विद्यार्थ्यांवर तुमचा परिणाम होतो.  तुम्हाला याची खात्री करावी लागेल की, तुमच्या विद्यापीठातील प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी हे काम करेल. इन- शा- अल्लाह. मग देशातील प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी या कामाकडे  आकर्षित होणे अवघड नाही. देशात हा जो जातीयवाद पसरलेला आहे अशाच पद्धतीने पसरवला गेलेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मन आणि बुद्धीला प्रभावित केलेले आहे. म्हणून याची  सफाईसुद्धा याच पद्धतीने करावी लागेल.
इस्लामचा संदेश केवळ मौखिकरित्या देउन उपयोग होणार नाही. असे प्रयत्न परिणामकारक ठरणार नाहीत. आपण भाषण कराल, त्यांना पुस्तकं द्याल आणि मौखिकरित्या सांगाल  की  इस्लाम सर्वश्रेष्ठ जीवन व्यवस्था आहे. पण हे पुरेसे नाही. या सोबत आपल्या वर्तणुकीतून इस्लाम श्रेष्ठ असल्याचा पुरावा त्यांच्यासमोर ठेवावा लागेल. आम्हाला प्रत्यक्षात इस्लाम कसा  आहे, याची साक्ष आपल्याला वर्तनाने द्यावी लागेल. आपले वैयक्ति आणि सामुहिक चारित्र्य सुद्धा दुसऱ्यांना इस्लामकडे आकर्षित करेल असे ठेवावे लागेल.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला इस्लामचे नाव वाढविणाऱ्यांमध्ये केंद्रीय स्थान प्राप्त आहे. लोक येथील वातावरणावरून मुस्लिम समाजाला समजण्याचा प्रयत्न करतात. म्हणून येथील  विद्यार्थ्यांना माझी दूसरी विनंती अशी आहे की, या विद्यापीठाला त्यांनी इस्लामचे केंद्र बनवावे. इस्लाम काय आहे? त्याचा संदेश काय आहे? इस्लामचा संदेश शांती आणि प्रेम कसा आहे? तो समतामूलक कसा आहे? अलिगढ विद्यापीठामध्ये प्रवेश केल्याबरोबर येथील वातावरणातून लोकांना त्याची जाणीव व्हायला हवी. काल मला खूप आनंद झाला जेव्हा माझ्या  मित्रांनी मला कळविले की, येथे मुलींबरोबर जी वर्तणूक ठेवली जाते ती अतिशय चांगली आहे. त्यांना सुरक्षित वातावरण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांचा जो  सन्मान या ठिकाणी होतो ते पाहून बहुसंख्यांक बंधुसुद्धा आपल्या मुलींना उच्चशिक्षणासाठी या ठिकाणी पाठवून आनंदी होत आहेत. मला हे ही सांगण्यात आले आहे की, अनेक  महत्त्वाच्या पदावर असलेल्या हिंदू बंधूंनी त्यांना सांगितले की, या विद्यापीठामध्ये आपल्या मुलींना पाठवून त्यांना समाधान मिळत आहे. त्यांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबद्दल  काळजी वाटत नाही. त्याच वेळेस त्यांनी हे ही सांगितले की, देशातल्या कुठल्याच विद्यापीठामध्ये असे वातावरण नाही. हे ऐकूण आपल्याला अंदाज होणार नाही की, मला किती आनंद  झाला. माझी मान गर्वाने उंच झाली. तुमच्यासाठी माझ्या मनातून उत्स्फूर्तपणे दुआ निघाली. यासाठी मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. प्रत्येक गोष्टीमध्ये या विद्यापीठाची अशीच  प्रतिमा राहिली तर त्याचा अर्थ असा होईल की इथे इस्लाम प्रत्यक्षात आचरणात आणला जातोय आणि हे विद्यापीठ इस्लामच्या खऱ्या शिक्षणाची साक्ष देण्याचे केंद्र बनून जाईल. हे  वाळवंटातील ओयासिस (मरूद्यान) सारखे केंद्र बनून जाईल की सगळे लोक याच्याकडे आकर्षित होतील. सगळ्या देशाला हे जर कळेल की, अलिगढ विद्यापीठ हे एक असे विद्यापीठ  आहे जेथे रॅगिंग होत नाही. कारण इस्लामला ते मान्य नाही, जेथे मुलींशी छेडछाड केली जात नाही, त्यांना कुठलाच त्रास दिला जात नाही, कारण की इस्लामला ते मान्य नाही. हे एक  असे विद्यापीठ आहे की ज्याच्या वातावरणामध्ये प्रेम, आपुलकी, शांती खच्चून भरलेली आहे. कारण हाच इस्लामचा संदेश आहे.
हे एक असे विद्यापीठ आहे ज्या ठिकाणी जाती आणि धर्मावरून विद्यार्थ्यांमध्ये कुठलाच भेदभाव केला जात नाही. एका दलित विद्यार्थ्याला भाऊ समजून त्याची गळाभेट घेतली जाते.  त्याचा माणूस म्हणून सन्मान केला जातो. त्याला तेच स्थान मिळते जे कुठल्याही उच्चभ्रू वर्गातील विद्यार्थ्याला मिळते. हे भारताचे एकमेव विद्यापीठ आहे जेथे असे सकारात्मक  वातावरण आहे. याचे प्रात्यक्षिक देशभरामध्ये प्रचारित केले गेले तर ती ही वर्तणुकीतून इस्लामची दिलेली साक्ष ठरेल. हे इस्लामचे प्रात्यक्षिक आहे. हे असे एक विद्यापीठ आहे जेथे  गरीब विद्यार्थी प्रवेश घेताच सर्व विद्यार्थी त्याच्या मदतीला धावून येतात. त्याला एक क्षणासाठीही असे वाटत नाही की विद्यापीठाचे अमूक क्षुल्क भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत,  पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, बाईक घेण्यासाठी पैसे नाहीत, येणेप्रमाणे त्याला वंचित असल्याचा अनुभव येथील विद्यार्थी येवूच देत नाहीत. सारे विद्यार्थी पुढे येवून त्याला  आपला भाऊ समजून जमेल तशी त्याला मदत करतो. अशी प्रतिमा जर आपण तयार करू शकाल तर ती सुद्धा इस्लामची प्रत्यक्ष साक्ष देण्यासारखे होईल आणि आपली ही वर्तणूक  हजारो भाषणांवर, लाखो पुस्तकांवर, अनेक शिबिरांवर भारी पडेल. मीडियाने पसरविलेले सारे विष निघून जाईल. मग त्यानंतर टेलिव्हिजनवाले कितीही ओरडत राहो इस्लाम आतंकवाद  पसरवितो, म्हणून कितीही म्हणत राहो, महिलांवर अत्याचार करतो म्हणून कितीही ओरडत राहो, मुस्लिम ’असे’ आहेत ’तसे’ आहेत, असे कितीही म्हणो, आपल्या सामुहिक चारित्र्याच्या नमुन्यापुढे हा सारा दुष्प्रचार धाराशाही होऊन जाईल. लोकांशी असलेले स्नेहपूर्ण संबंध टेलीव्हिजनच्या व्यर्थ चर्चेपेक्षा श्रेष्ठ असतात. मीडियाचा दुष्प्रचार त्या ठिकाणी यशस्वी होतो ज्या ठिकाणी तुमचे संबंध इतरांशी नसतात. जर का तुम्ही आपल्या वाणी आणि वर्तनातून लोकांना तुमच्याबद्दल खरी माहिती द्याल तर मीडियाच्या चुकीच्या प्रचारावर कोणीही  विश्वास ठेवणार नाही. एखाद्या व्यक्तीबाबत मीडियाने तो चोर आहे म्हणून प्रचार करावयास सुरूवात केली तर ते लोक त्याला चोर समजू शकतात जे त्याला ओळखत नाहीत. मात्र जे  लोक त्या व्यक्तीशी रास्त संपर्कात आहेत, जे त्याच्या चारित्र्याला जाणून आहेत, ते मीडियाच्या दुष्प्रचारावर मुळीच विश्वास ठेवणार नाहीत उलट ते मीडियाच्या या प्रचाराकडे दुर्लक्ष करतील.
प्रिय मित्रांनों ! माझी विनंती ही आहे की, आपण इस्लामचा संदेश देण्याच्या कामाचे ध्वजवाहक बना. दुसरी विनंती अशी की, या विद्यापीठाला इस्लामचे प्रात्यक्षिक केंद्र बनवा, चलता-  फिरता इस्लाम या ठिकाणी इतरांना दिसायला हवा. लोकांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी इस्लामला येथे पहावे. त्यांना येथे येताच या गोष्टीचा अनुभव यावा की इस्लामचे पवित्र वातावरण  कसे असते? इस्लाममुळे कसे लोक घडतात आणि विद्यार्थ्यांचा कसा समाज निर्माण होतो?
मित्रांनों! शेवटची गोष्ट अशी की, याचबरोबर हे सुद्धा आवश्यक आहे की, आपण उच्चशिक्षण ग्रहण करावे, समाजावर परिणाम करण्यासाठी आपण उच्चशिक्षित असणे आवश्यक आहे. उच्च योग्यता प्राप्त करणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल आलेले आहेत. जे त्याच्यात यशस्वी झालेले आहेत ते जर येथे उपस्थित असतील तर  किंवा त्यांचे नातेवाईक येथे उपस्थित असतील तर किंवा त्यांचा गुरूजनवर्ग येथे उपस्थित असेल तर मी मनापासून त्या सर्वांचे अभिनंदन करतो. अल्लाह त्यांच्यातील योग्यता आणखीन  वृद्धींगत करो. त्यांना देश आणि देशबांधवांसाठी उपयोगी बनवो. मित्रांनों! प्रत्येक मुस्लिम विद्यार्थी समाजासाठी ज्ञानाचे भांडवल आहे. भांडवल बनण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक इच्छाशक्ती आणि दूसरे दुसऱ्यांसाठीचे प्रेम. तुम्ही सर्व समाजसेवेसाठी संवेदनशील व्हा. देशाचे आपण काहीतरी देणे लागतो, याची मनात खूनगाठ बांधा. सर्व मंगल हो.   योग्यता नसेल तर आपण फार छोट्या प्रमाणात काम करू शकतो. मात्र आपण उच्च योग्यता प्राप्त केली असेल तर आपण मोठी सेवा बजावू शकतो.
तुम्ही नोबेल पारितोषिक पटकाविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात वेगवेगळ्या विषयामध्ये नोबेल पारितोषिकाला गवसणी घालावी. आपल्या  विषयामध्ये असाधारण संशोधन करावे. असे झाल्यास त्याचा उपयोग सुद्धा देशाला मोठ्या प्रमाणात होईल. देशासाठी आपण भांडवल बनाल आणि तेव्हा तुम्ही जो संदेश द्याल संपूर्ण देश तो संदेश लक्षपूर्वक ऐकेल. तुम्ही कॅन्सरवरील औषध शोधून काढा, इतर घातक आजारांवरील औषध शोधून काढा, इतर मोठ्या समस्यांवर उपाय शोधून काढा, तुम्ही आर्थिक आणि  सामाजिक समतेचे नवीन मापदंड शोधून काढा, तेव्हा देश तुमचा संदेश लक्षपूर्वक ऐकेल. अशा प्रकारे तुम्ही देशावर स्वतःची छाप पाडू शकाल. जर आपल्याला आपल्या समाजाला श्रेष्ठ   बनवायचे असेल, समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर उच्चकोटीची योग्यता अंगी बाळगणे आवश्यक आहे. खासकरून विद्यार्थीदशाच ती आदर्श अवस्था आहे जिच्यामध्ये  आपण उच्च योग्यता प्राप्त करू शकू. माझी विनंती राहील की आपण आपले लक्ष उच्च ठेवा. विद्यापीठाची परीक्षा पास करणे त्यात चांगले गुण प्राप्त करणे हा काही मोठा उद्देश्य  नाही. यापेक्षाही मोठे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवा. आपल्या विषयात तुम्ही जगाचे नेतृत्व करण्याइतपत योग्यता मिळविण्याचे लक्ष ठेवा. जर तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असाल तर  अर्थशास्त्रामध्ये नेतृत्व देण्याइतपत, जर तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी असाल तर राज्यशास्त्रामध्ये नेतृत्व देण्याइतपत क्षमता तुमच्यामध्ये हवी आणि ती क्षमता निर्माण करणे हेच  तुमचे ध्येय असायला हवे आणि ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती योग्यता मिळविण्यात तुम्ही जर यशस्वी झालात तेव्हा तुम्ही जे म्हणाल त्याचा परिणाम साऱ्या देशावर होईल  आणि तेच सकारात्मक बदलाचे कारण ठरेल.
मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. या विद्यापीठाने भूतकाळामध्ये अडचणीच्या वेळेस मुस्लिम समाजाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यांचे नेतृत्व केलेले आहे. त्यांना मार्ग  दाखविलेला आहे. फसलेल्या समाजाला चक्रव्यूवहातून बाहेर काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. मी आशा करतो भूतकाळातील आपल्या भूमिकेशी साधर्म्य राखून  भविष्यातही आपण आपली भूमिका वठवाल. अल्लाह आपल्या सर्वांना आपल्या जबाबदाऱ्या अतिशय उत्कृष्टपणे पार पाडण्याची प्रेरणा देवो, मदत करो आणि त्यासाठी आवश्यक ती  योग्यता प्रदान करो. आमीन.

(सदरचे भाषण अमीरे जमात सआदतुल्लाह हुसैनी यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थी परिषदेसमोर 21 एप्रिल 2019 रोजी दिलेले होते. उर्दूचे मराठी भाषांतर एम.आय. शेख व बशीर शेख यांनी केले.)

आदरणीय जाबीर (रजी.) कथन करतात की, आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा प्रवासात निघत तेव्हा सगळ्यांच्या (काफीला) पाठीमागे चालत. कृश, कमजोर लोकांना आपल्या  वाहनावरती (उंटावर) बसवून घेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करीत असत. (अबु दाऊद) आदरणीय अनस (रजी.) प्रेषिताविषयी आपला अनुभव सांगतात की, प्रेषित (स.) आजारी  व्यक्तिची विचारपूस करीत. अंत्ययात्रेमध्ये सामिल होत होते. नोकर आणि गुलामांचे निमंत्रण स्विकारीत. (बहकी)
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) चे जीवन सर्व जगातील मानवांसाठी एक आदर्श मॉडेल आहे. त्याच्या जीवनातील प्रत्येक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी, चमक देतो. त्याच्या  जीवनातील प्रत्येक क्षण अनुकरणीयच नव्हे तर मानवांसाठी मार्गदर्शन आहे. त्यांचे जीवन एक खुले पुस्तक आहे ज्याच्या प्रत्येक पानावर आम्हाला जीवन जगण्यासाठी प्रकाश आहे जो  जीवनाच्या कठीणतम मार्गात सुद्धा मार्गदर्शन करीत असतो. प्रेषिताचे जीवन राजे महाराजासारखे नव्हते तर समाजातील एकत्र सामान्य माणसाच्या जीवनासारखे होते. असामान्य  व्यक्तिमत्वाचे सामान्य जीवन होते. समाजातील प्रत्येक मागासाबरोबर ते सहजपणे मिसळत, जेणेकरून त्या सामान्य माणसाला प्रेषित आपलेच आहेत असे वाटावे.
आदरणीय जाबीर हे प्रेषितांचे सहयोगी होते. ते आपल्या अनुभव कथन करतात आणि हा अनुभव प्रवासातील आहे. प्रेषित (स.) जेव्हा प्रवासात निघत तेव्हा त्यांच्या बरोबर पुष्कळ  लोक असत. ज्याप्रमाणे अरबस्तानात त्याकाळी लोक जत्थ्यांनी प्रवासाला निघत. जेव्हा हे जत्थे निघत तेव्हा जत्त्थाचा प्रमुख सर्वात पुढे असायचा. पण जेव्हा प्रेषित (स.) प्रवासाला  निघत तेव्हा ते जत्थाच्या सर्वात शेवटी राहत. प्रवास करत ह्याला कारण म्हणजे ते सर्व जत्थाधील सर्वांची काळजी घ्यायचे, सर्वांकडे लक्ष द्यायचे, कुणी जत्थ्यामधून सुटला तर नाही  ना? ह्याची देखरेख ते स्वत: करायचे. आजारी, कमजोर, वृद्ध लोकांना आपल्या वाहनावरती बसवून घेऊन जात. म्हणजेच ह्या लोकांना वाऱ्यावर न सोडता त्यांची आपलुकीने काळजी  घेत. येवढे करून आदरनीय प्रेषित थांबत नसत तर परमदयाळू अल्लाहपाशी त्या सर्व आजारी, वृद्ध लोकांसाठी दुआ (प्रार्थना) करीत. जगात अनेक महापुरुष होऊन गेले पण ह्या  पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेणारा विरळाच. म्हणून तर त्यांचे सहकारी त्यांचा अत्यंत आदर करीत, त्यांना जावापलीकडे जपत, त्यांच्या आज्ञा तंतोतंत पाळीत. एकदा  मशीदीत प्रेषित प्रवचन देत होते, समोर काही लोक उभे होते. प्रेषितांना बसण्यास सांगीतले. ते उभे असलेले तर खाली बसले, परंतु ज्यांनी हे ऐकले ते बसले म्हणजेच मशीदीच्या बाहेर  जे लोक होते ते सुद्धा बसले. असे आज्ञापालन व्हायचे. प्रेषितांच्या आदेशाचे ह्याला कारण म्हणजे प्रेषितांचे सर्वाबरोबर प्रेमळ वागणे होय.
दुसऱ्या कथनात प्रेषितांचे दुसरे एक अनुयायी आपला अनुभव कथन करतात. आदरणीय प्रेषित आजारी माणसांची नेहमी विचारपूस करीत. आदरणीय प्रेषित, जेव्हा त्यांना माहीत होई   की, क्ष व्यक्ति आजारी आहे, तेव्हा ते स्वत: त्या आजारी व्यक्तिच्या घरी जात. त्याच्या कपाळावर हात ठेवित. त्याला काही सूचना करीत. त्याला धीर देत आणि परतताना त्याच्या  आरोग्यासाठी अल्लाहपाशी दुआ करीत. आजारी माणसाची विचारपूस करणे हे सत्कृत्य मानले गेले. प्रेषित नेहमी कामात अग्रेसर राहत. जेव्हा जेव्हा कुणाचा मृत्यू होत असे तेव्हा  प्रेषित त्याच्या अंतयात्रेमध्ये स्वत: सामील होत होते. मग तो गरीब असो की श्रीमंत. अंत्ययात्रेत सामील होऊन प्रेषित कबरस्तानापर्यंत जात. मयत व्यक्तिबद्दल अल्लाहशी दुआ करीत  आणि मयताचा दफनविधी होईपर्यंत थांबत.

- प्रा. खुर्शीद अहमद

इस्लाममध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. मानवी इतिहासात केवळ इस्लाम परिपूर्ण ज्ञानाच्या स्वरूपात अवतरला आहे आणि त्याच्या अवतरणानेच ज्ञानाचे क्रांतिकारक वातावरण सर्वत्र पसरलेले आहे.
या पुस्तिकेत शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाबाबतच्या गैरसमजुतीचे निरसन, श्रद्धाहीन शिक्षणाचे दुष्परिणाम, इस्लामी शिक्षण पद्धत, शिक्षणाचा उद्देश, शिक्षणाचे ऐतिहासिक स्वरूप, प्रेषित कालीन शिक्षण व्यवस्था आणि प्रेषितानंतरचा काळ यांचे वर्णन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 134    -पृष्ठे - 20   मूल्य - 10  आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/nvwoxzl182p0mi2g82s783ta087ns7o6

मा. इब्ने उमर (र.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘हृदयावरही गंज चढतो, ज्याप्रमाणे लोखंडाला पाण्याने गंज लागतो.’’ विचारले गेले की हृदयाला  लागलेला गंज दूर करणारी वस्तू कोणती? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हृदयाचा गंज अशाप्रकारे दूर होतो की माणसाने मृत्यूला अधिकाधिक स्मरणात राखावे आणि दूसरे हे  की कुरआनचे पठन करावे. (हदीस : मिश्कात)
भावार्थ- मृत्यूचे स्मरण करण्याचा अर्थ असा की माणसाने हा विचार करावा की जीवनाची ही संधी फक्त एकदाच लाभलेली संधी आहे. पुन्हा दुसऱ्यांदा कर्म करण्याची संधी लाभणार  नाही. कुरआन पठनाचा अर्थ, कुरआनातील शब्दांना योग्य ुच्चारांसह वाचणे, त्यात जे काही सांगितले गेले आहे, ते समजून घेणे व त्यास आचरणात आणणे. किंबहूना आणखी एका  अर्थाने येतो, म्हणजे हे की कुरआनचा प्रचार व प्रसार करावा. त्याला इतरांपर्यंत पोहोचवावे.

सदाचारपूर्ण वर्तन
मा. अबु ज़र ग़फ्फारी (र.) कथन करतात की, प्रेषित यांच्या सेवेत हजर होऊन मार्गदर्शनाची विनंती केली. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहचे भय बाळगून  सदाचारपूर्ण वर्तन अंगिकारा. ही गोष्ट तुमच्या संपूर्ण धर्मास आणि समस्त व्यवहारांना योग्य स्थितीत राखणारी आहे.’’ मी म्हणालो, आणखी काही सांगा. प्रेषित (स.) म्हणाले,  ‘‘स्वत:ला कुरआन पठण आणि प्रभावशाली अल्लाहच्या नाम:स्मरणाची सवय लावून घ्या. तेव्हा अल्लाह तुमचे आकाशात स्मरण करील आणि जीवनाच्या अंध:कारात तुमच्यासाठी  उजेडाचे काम देईल. (हदीस - मिश्कात)
भावार्थ- ‘‘अल्लाह स्मरण करील’’ याचा अर्थ अल्लाहला तुमचा विसर पडणार नाही. अल्लाह तुम्हाला आपल्या संरक्षणात राखील. अल्लाहचे स्मरण आणि कुरआन पठणाने  ईमानधारकाला प्रकाश प्राप्त होतो. जीवनाच्या अंध:कारात तो उचीत मार्ग प्राप्त करतो.

सर्वोत्तम सदका (दान)
मा. सराका बिन मालिक (र.) कथन करतात की, प्रषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘मी तुम्हाला सर्वोत्तम सदका (दान) कोणते ते सांगू? ती तुझी मुलगी होय. जी तुझ्या  जवळ फाठविली गेली आहे आणि तिला तुझ्याखेरीज दुसरा कोणी कमाविणारा, खाऊ घालणारा नाही.’’ (हदीस - इब्ने माजा) अर्थात अशी मुलगी जिच्या कुरुपतेमुळे किंवा एखाद्या  शारिरिक व्यंगदोषामुळे विवाह होत नाही किंवा विवाहानंतर तलाक (घटस्फोट) मिळाला. आणि तुमच्याखेरीज अन्य कोणी तिचे पोषण करणार नाही. तर अशा असहाय मुलीवर तुम्ही जे  काही खर्च कराल, तो अल्लाहच्या दृष्टीने सर्वोत्त सदका (दान) ठरेल.

विधवांना प्रेषितांचे सामीप्य
मा. औफ बिन मालिक (र.) कथन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘मी (प्रेषितास) आणि करपलेल्या चेहऱ्याची (वैधव्याच्या संकटामुळे) स्त्री कयामतीच्या दिवशी या  दोन बोटाप्रमाणे असतील. (हे हदीस वचन कथन करताना, आपले मधले बोट आणि तर्जनीचे बोटाकेड इशारा केला). अर्थात ती स्त्री जिचा पती मृत्यू पावला आणि ती वांशिक प्रतिष्ठा  राखते ती स्वत: सौंदर्यवान ही आहे परंतु तिने आपल्या मृत पतीचा आपल्याखातीर स्वत:ला दुसरा निकाह करण्यापासून रोखून ठेवले.
भावार्थ- एखादी स्त्री विधवा झाली, पण त्याला लहान मुले असतील, लोक तिच्याशी विाह करण्यासही उत्सुक ही असतील परंतु ती आपल्या अनाथ मुलांच्या संगोपनाकरीता पुनर्विवाह न  करता, प्रतिष्ठा व सत्शीलतापूर्वक जीवन व्यतीत करते तर अशा स्त्रीला कयामतच्या दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे सामीप्य प्राप्त होईल.

इस्लामने प्रत्येक सक्षम स्त्री-पुरूषावर हजयात्रा अनिवार्य केली आहे. याचाच अर्थ हजयात्रा जीवनाचे अंतिम ध्येय आहे. ते पूर्ण करणे सर्वांना बंधनकारक आहे. मात्र जर एखादी मुस्लिम वयस्क व्यक्ती (स्त्री अथवा पुरूष) वाहनात बसू शकत नाहीत, कारण तिच्यात तेवढी ताकद नाही, पण हजयात्रा तर करावयाची आहे. अशा वेळी त्या वयस्क व्यक्तीच्या वतीने तिच्या नातेवाईकाने हजयात्रा केली तर त्या वयस्क व्यक्तीच्या नावाने ’हजयात्रा कर्ज’ अदा होईल.
हजला जाणार्‍या स्त्री-पुरूषांची प्रार्थना ईश्‍वर स्वीकारतो. यामुळे हाजींना (हजला जाणारे) ईश्‍वराची प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून हाजींची रवानगी करताना त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ठ, मित्रमंडळी, परिवारातील, गल्लीतील, गावातील लोक विनंती करतात, ”आमच्या कल्याणासाठीसुद्धा अल्लाहकडे प्रार्थना करा.”
इस्लाम जगात शांतीचा मार्ग सांगणारा धर्म आहे. इस्लाममध्ये दाखल होण्यासाठी कोणाही स्त्री-पुरूषांवर बळजबरी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण  इस्लाम स्वीकारणे ही सामान्य बाब नाही. इस्लाम स्वीकारल्याने त्या धर्माची सर्व तत्त्वे अंगीकारायला हवीत.
स्त्रीने पुरूषांशी संबंध आल्यास त्यांच्याशी अगदी स्पष्ट आणि ठळक शब्दांत संवाद साधावा. समजा, आपण परपुरूषांशी बोलताना दबक्या आवाजात बोललो, आपल्या बोलण्यात लचक, मिठास असेल तर समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या घोड्याला लगाम घालणे कठीण होते व त्याचा विचार ना-ना तर्‍हेने, ना-ना मार्गाने थैमान घालतो व त्याच्या डोक्यात वाईट विचार आपोआपच काहूर घालतो.
शृंगाराचे प्रदर्शन आपल्या पतीशिवाय कोणासमोरही करू नका. घरी परपुरूष आला असता त्या वेळी घरातदेखील स्त्रीने परद्यात असावे. हे फक्त इस्लाम धर्मातच आहे असे नाही तर इतर धर्मांतही गोशा पद्धती प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांसाठी परदा हा अनिवार्य आहे. तसेच परपुरूषांशी नजरानजर करू नये. आपल्या दृष्टीचेे रक्षण करावे. त्याचबरोबर आपल्या लज्जास्थळाचेही रक्षण करावे. शरीराला तंग असणारे व तोकडे कपडे परिधान करू नयेत. नखशिखांत पोशाख परिधान करावा. जशी पुरूषांना आपले चारित्र्य सांभाळण्याची सूचना केलेली आहे तशी चारित्र्याच्या संरक्षणाची स्त्रियांना ताकीद केलेली आहे. स्त्रीने व्यभिचार आपल्यापासून कोसो (मैल) दूर ठेवावा. व्याभिचारी स्त्री इस्लाम धर्मात अत्यंत अप्रतिष्ठित समजली जाते. रस्त्यावरून चालत असतानादेखील तिने कसे चालावे याच्याही सूचना कुरआन देतो. स्त्रियांनी रस्त्यावरून चालताना रस्त्याच्या एका बाजूने चालावे. समाजात वावरत असताना स्त्रियांनी चारदीचा एक पदर कायम आपल्या शरीरावर लटकवावा, कारण या स्त्रिया श्रद्धावान आहेत व त्यांना कोणीही त्रास देऊ नये. चादरीचा पदर आपल्या शरीरावर लटकावणे म्हणजे ती नीतीवान आहे याचा संकेत त्यातून लोकांना मिळतो आणि आपल्या शीलाचे व नजरेचे रक्षण केवळ त्या संकेतामुळे होते. चौदाशे वर्षापूर्वी इस्लामने स्त्रीच्या चारित्र्याच्या रक्षणासाठी असे संकेत निर्माण केले, याची आज किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते याचे दर्शन होते. आज कोणत्याही लहानातलहान शहरापासून मोठ्यातमोठ्या शहरापर्यंत बघा. त्या ठिकाणी वावरताना मुली, महिला स्कार्फ आपल्या जवळ बाळगतात आणि  तो आपल्या चेहर्‍यावर बांधलेला असतो. याचे कारण शोधले तर हे निदर्शनात येते की धुळीपासून स्वतःच्या चेहर्‍याचे संरक्षण व्हावे, तसेच नाकाद्वारे सूक्ष्म जीवजंतू आपल्या शरीरात जाऊ नयेत ही वरकरणी स्वरूपाची त्यांची उत्तरे असतात. पण त्यामागची खरी कारणीमांसा पाहिली तर त्यांना तो स्कार्प वापरण्यामध्ये सुरक्षितता वाटते व रस्त्यावरील लोकही त्यांना त्रास देत नाहीत.
इस्लाममध्ये स्त्रियांनी चादरीचा पदर आपल्यावर अच्छादून ठेवण्यास सांगितले. ’हिजाब’ करण्याचा आदेश दिला. ’हिजाब’ म्हणजे एक प्रकारची मोठी चादर ज्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाऊ शकते. या चादरीचा वापराचा तात्विक लाभ अशा प्रकारे वर्णन करण्यात आला आहे की यामुळे ती पवित्रख्याली, सदाचारी आणि कुलीन स्त्री वाटते आणि त्यांना छेडण्याची व त्यांच्यावर हात घालण्याची कोणाची हिंमत नाही. ’हिजाब’च्या वापराबरोबरच ’गज्जेबसर’चा आदेश दिला आहे. ’गज्जेबसर’ म्हणजे आपली नजर खाली ठेवणे. बोलताना हळू लचकदार बोलू नये. याचा आधार पुढीलप्रमाणे,
”पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नीनो! तुम्ही सामान्य स्त्रियांप्रमाणे नाहीत. जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगणारे असाल तर हळू आवाजात बोलत जाऊ नका की विकृत हृदयाचा एखादा माणूस लालसेत पडेल तर स्पष्ट सरळ बोलणे बोला.”
इस्लाम धर्माने स्त्रीला दिलेल्या अधिकारांचा सन्मान करून ते अधिकार तिला मिळवून दिल्यास त्या समस्याच मुळात उद्भवणार नाहीत ज्यांचा संदर्भ देऊन संपूर्ण इस्लामी विधीलाच (शरियत) बदनाम करण्याचा व तिला बदलण्याचा आरडाओरडा करण्यात येतो. इस्लाम धर्माने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या गर्तेतून बाहेर काढले. तिला न्याय दिला, तिला मानवाधिकार दिले, मान-सन्मान दिला आणि समाजात सन्मानाने जगण्याची शिकवण दिली.


 (इस्लाम सुरक्षित सावलीतली स्त्री या पुस्तकातील सर्व लेखमाला समाप्त झाले. सदर पुस्तक प्रा.ए.जी.पाटील यांनी लिहिले असून, ते आयएमपीटी,मुंबई ने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील वापरलेले संदर्भ ग्रंथ - 1) इस्लामी समाज जीवन व्यवस्था आणि हुंडा प्रथा - उमर हयात खान गौरी, 2. स्त्री भ्रृणहत्या कारणे व उपाय- डॉ. रजीउल इस्लाम नदवी, 3. जीवनदर्शन -
मुहम्मद युसूफ इस्लाही, 4. इस्लामी कुटुंब - सय्यद जलालुद्दीन उमरी, 5. स्त्री आणि इस्लाम - सय्यद जलालुद्दीन उमरी, 6. इस्लाम आणि स्त्री - मकबूल अहमद फलाही, 7. स्त्री आणि निसर्गनियम - सय्यद अबुल आला मौदूदी, 8. तलाक-समज गैरसमज - गुलाम रसूल देशमुख, 9. इस्लाम आणि मानवाधिकार - सय्यद अबुल आला मौदूदी, 10. इस्लाम आणि लैंगिक समानता - मु.मजहरूद्दीन सिद्दीकी, 11. सुखी कुटुंब - शेख मुहम्मद कारकुन्नु, 12. स्त्री-कुरआनच्या दृष्टिक्षेपात - शमीमा मोहसीन, 13. गोशा (पडदा) - सय्यद अबुल आला मौदूदी, 14. बहुपत्नित्व - सय्यद हामिद अली, 15. दांम्पत्यिक अधिकार - सय्यद अबुल आला मौदूदी, 16. अवैध दहेज व हुंडाप्रथा आणि इस्लाम - गुलाम रसूल देशमुख, 17. ध्येयपथ - जलील अहसन नदवी.).

- सैय्यद अबुल आला मौदूदी

वर्तमान काळात आर्थिक समस्यांना केंद्रिय स्थान प्राप्त आहे. त्यांचा इस्लामी उपाय या पुस्तकात संक्षिप्तपणे सांगण्यात आला आहे. उत्तर दायित्वाच्या प्रखर भावनेतून पैगंबर (स.) यांनी नैतिक नियम व कायदे दिले आहेत. ज्यात आर्थिक व्यवस्था एक महत्त्वाचा भाग आहे, हे सर्व पूर्णत: ईश आदेशांवर आधारित आहे.
जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसे की तसे स्वीकारले नाही तर इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसही योग्य आत्म्याचे चालू शकणार नाही की तिचे काही उल्लेखनीय लाभ सुद्धा मिळणार नाही, हे सांगितले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 132    -पृष्ठे - 32    मूल्य - 16    आवृत्ती - 2 (2014)

डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/gncqlu4pf09x314k515q8pnptnp2x4w9



मा. अब्दुल्ला बिन अब्बास (र.) याचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या काकांना संबोधन करून सांगितले, ‘‘हे काकावर्य! मी लोकांशी केवळ कलम्याची (अर्थात  एकेश्वरवाद स्विकार करण्याची) मागणी करतो. हा कलमा (धर्मसूत्र) असा आहे की, लोकांना याचा स्विकार केल्यास पूर्ण अरबदेश तुमच्या अधिपत्याखाली येईल आणि अरबेतर लोक  त्यांना जिझिया (नागरीक कर) देतील. हे ऐकताच सर्वजण आश्चर्यचकीत झालेत व म्हणाले, ‘‘तुमच्या पितावर्याची शपथ! असे असल्यास तुमच्या एका नव्हे, तब्बल दहा ‘कलम्यांचा’  आम्ही स्विकार करू. आम्हांला सांगा की तो कलमा कोणता आहे? अबू तालिब (प्रेषितांचे काका) यांनी पण विचारले की, हे पुतण्या! तो कलमा कोणता आहे? यावर प्रेषितांनी (स.)  सांगितले, ‘‘तो कलमा, ‘‘ला-इलाहा इल्लल्लाह आहे.’’ (हदीस : मस्नद अहमद, निसाई)

भावार्थ
कलमा-ए-तौहीद (एकाच ईश्वराच्या उपासनेचे सूत्र) ‘ला इलाहा इल्लल्लाह’ केवळ एक धर्मसूत्र नसून पूर्ण एकेश्वरवादी व्यवस्था आहे, जे माननीय जीवनाच्या संपूर्ण व्यवहारांशी व संपूर्ण बाबींशी संबंधीत आहे. केवळ नमाज व रोजा पर्यंतच मर्यादित नसून, या कलम्याच्या आधारावर राजकीय व्यवस्था प्रस्थापित करणे अभिप्रेत आहे. जर हे वास्तव नसते तर प्रेषित ह.  मुहम्मद (स.) यांनी याचा हा अर्थ स्पष्ट केलाच नसता की, ‘‘अरब देश तुमच्या अधिपत्याखाली येईल व अरबेतर लोक तुम्हांस जिझिया (कर) देतील, प्रे. मुहम्मद (स.) यांनी अशावेळी  ही चर्चा केली जेव्हा अरबमधील कुरैश कबील्याचे नेतेगण, आपले प्रमूख सरदार ‘अबू तालीब’ (प्रेषितांचे काका) यांच्याकडे, त्यांचे पुतणे ह. मुहम्मद (स.) यांची तक्रार घेऊन आले होते  की, अबू तालीब यांनी आपले वजन वापरून, दबाव घालून प्रेषितांचे इस्लाम प्रचार कार्य थांबवावे. प्रेषितांनी आपले काका, अबू तालीब यांना सांगितले की, हे काकावर्य! माझ्या उजव्या  हातात सूर्य व डाव्या हातात चंद्र आणून दिले तरी मी इस्लामचे प्रचार कार्य बंद करणार नाही. इथपावेतो ईश्वर यास प्रस्थापित करो अथवा याच अवस्थेत मला मृत्यू येवो. इस्लाम  दर्शनाचा वास्तविक अर्थ असाच आहे व दिव्य कुरआनमध्ये ज्या ज्या ठिकाणी हा शब्दप्रयोग झाला आहे, तिथे केवळ ‘राजकीय वर्चस्वच’ अभिप्रेत आहे.

ह. अब्बाज (र.) कडून कथन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘इस्लामची गोडी चाखली त्या माणसाने, जो अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म (व्यवस्था) मानून, आणि मुहम्मद (स.) यांना आपला प्रेषित स्विकारून, आनंदीत झाला. (हदीस : बुखारी व मुस्लीम)

भावार्थ
सर्वश्रेष्ठ अल्लाहच्या भक्ती-उपासनेत आणि आज्ञा पालनात स्वत:ला सुपूर्द करून आणि इस्लामी शरियत (शास्त्रनियम) चे पालन व अनुसरण करून, स्वत:ला प्रेषित (स.) यांच्या मार्गदर्शनाच्या हवाली करून पूर्णत: संतुष्ट आहे. त्याचा फैसला आहे की, मला अन्य कोणाची उपासना आणि आज्ञापालन करायचे नाही आणि कोणत्याही परिस्थितीत इस्लाम  जीवनधर्मावर चालायचे आहे. आणि प्रेषित (स.) यांच्या खेरीज कोणत्याही माणसाच्या मार्गदर्शनाखाली जीवन पार पाडायचे नाही. ज्या माणसाची अशी अवस्था होईल तेव्हा समजून घ्या  की त्याने इमानची गोडी प्राप्त केली.

मा. अबु अमाया (र.) कथन करतात की, ह. मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘ज्याने अल्लाहकरीता दोस्ती केली आणि अल्लाहकरीता दुश्मनी (शत्रूता) केली आणि अल्लाहकरीता दिले आणि  अल्लाहकरीता रोखून ठेवले, त्याने आपल्या इमानास (श्रद्धेस) परिपूर्ण केले. (हदीस : बुखारी)

भावार्थ
माणसाचे प्रेमभाव अथवा वैरभाव आपल्या व्यक्तिगत गरजेपोटी आणि ऐहीक लाभासाठी नसावे तर केवळ अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच असावे. ही अवस्था म्हणजे त्याचे इमान परिपूर्ण झाले.

पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी इस्लामच्या प्रगटनाच्या वेळी समाजामधील अनिष्ठ रूढी, परंम्परा, अनेकेश्वरवादी, अंधश्रद्धा, मूर्तिपूजेच्या विरोधात कार्य करीत असताना प्रचंड वाईट  प्रतिक्रिया समाजात व्यक्त होत होत्या आणि त्यावर मात करीत असताना मोठा त्रास पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांना झाला. पण त्यांनी धर्माचे कार्य सोडले नाही. या कार्यात अनेक लोकांनी सहभाग नोंदविला व ते कार्य चालू ठेवले. या कार्यात पुरूषांप्रमाणेच स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या. शहीददेखील अनेक झाले. अम्मारची आई सुमैय्या (रजि.) इस्लामच्या  कार्यात शहीद होणाऱ्यांत प्रथमस्थानी होत्या. मागील विवरणावरून हे ध्यानी येते की धार्मिक कार्यात पुरूषांच्या बरोबर स्त्रियांचेही योगदान आहे.
कोणत्याही प्राण्याला जिवंत राहण्यासाठी जसे प्राणवायूची गरज असते तसे धर्माच्या कार्यात उपासनेला स्थान आहे. म्हणजे आपण जसे प्राणवायूशिवाय जिवंत राहू शकत नाही तसे  उपासनेशिवाय धर्माची उभारणी होत नाही आणि धर्म टिकावही धरत नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची आचारसंहिता आणि याच आचारसंहितेचे पालन करणे म्हणजे धर्माची ईश्वराची  उपासना करणे होय. प्रामाणिकपणे ईश्वराची केलेली उपासना ही ईश्वराच्या जवळ नेते. ईश्वराची उपासना जर निष्काळजीपणे खंडितपणे, केव्हातरी (सवडीनुसार) केल्यास ईश्वर आणि  भक्त यांच्यातील संबंध निर्बल होतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सर्वच्या सर्व पत्नी ईश्वराची प्रामाणिकपणे उपासना करणाऱ्यांमध्ये उल्लेखनीय आहेत. प्रत्येक स्त्री व पुरूषाने ईश्वराचे  भय बाळगून त्याची आराधना-उपासना केली पाहिजे. उपासनेत नमाजला अनन्यसाधारण महत्व आहे. नमाज अदा करताना काही नियम काटेकोरपणे पाळले जावेत. उदा. नमाज  निश्चित वेळेतच पढली जावी. आपली नमाज अवेळी होणार नाही याची काळजी घ्यावी. मग तो पुरूष असेल अथवा स्त्री. जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये स्त्रियांनी सामील झालेच  पाहिजे असे बंधन नाही. त्यांनी आपल्या सोयीनुसार घरी नमाज अदा करावी. नमाज सामुदायिक पठणावर जे लाभ होतात, ते एकट्याने नमाज अदा केल्याने होत नाहीत. म्हणून   स्त्रियांना जमाअतसह नमाज अदा करण्यापासून वंचित ठेवलेले नाही म्हणजेच स्त्रिया सामुदायिक नमाजसाठी मस्जिदमध्ये जाऊ शकतात. आज स्त्रियांच्या मस्जिदमध्ये येण्या- जाण्याबाबत प्रचंड संदेह निर्माण झाले आहेत, ते केवळ धार्मिक ज्ञानाच्या अभावाने.
मस्जिदमध्ये जाण्यासाठी जर परिस्थिती अनुकूल असेल व कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल तर स्त्रिया जाऊ शकतात. कोणताही पुरूष मग तो पिता, पती, पुत्र कोणीही असो तो  आपली मुलगी, पत्नी, आई कोणालाही मशिदमध्ये जाण्यास परवानगी मागितली तर तिला मनाई करू शकत नाही म्हणून काही मशिदमध्ये स्त्रियांसाठी काही जागा राखीव ठेवली आहे.  एवढेच नाही तर नमाज संपल्यावर स्त्रियांनी मशिदबाहेर अगोदर पडावे व नंतर पुरूषांनी बाहेर यावे. स्त्रियांना मशिदमध्ये येण्यास काहीही हरकत नाही. हे जरी सत्य असले तरी त्यांनी  (सवलतीसाठी) नमाज घरीच अदा करणे जास्त उत्तम, असेही कथन आहे. एवढेच नाही तर पैगंबरांनी विशेष नामस्मरणाचादेखील उपदेश केला आहे. उदा. दिवसभर काम-धंदा, नोकरी,  कष्ट, मेहनत, कार्य करून रात्री थकवा आलेला असतो, तेव्हा आपण 33 वेळा ’सुबहानल्ला’, 33 वेळा अलहम्दुलिल्लाह व 34 वेळा अल्लाहु अकबर हा जप जपून नामस्मरण करा.   त्याचबरोबर दैनंदिन जीवन जगताना जेव्हा एखादी सुंदर, चांगली, सुरेख, उत्तम वस्तू वा बाब निदर्शनास आली तर मुखातून ’सुबहानल्लाह’ उच्चारून कृतज्ञता व्यक्त करा. अर्थात हे  सर्व निर्माण करणारा ईश्वर यापेक्षा कितीतरी चांगला आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, कितीतरी चांगली आहे. तसेच एखादी बाब प्रचंड मोठी, विराट, भव्य, विहंगम  दिसली तर आपण ’अल्लाहु अकबर’ उच्चारून हे सर्व निर्माण करणारा याच्यापेक्षा परमेश्वर मोठा आहे की कृतज्ञता व्यक्त करावी, तीही समस्त स्त्री-पुरूषांनी. ईश्वराच्या या उपासनेने  व्यक्तीच्या बळात व कार्यशक्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होते व आपल्यामध्ये चांगुलपणा आपोआप निर्माण होतो. या नामस्मरणावर विश्वास ठेवला तर अल्लाह आपले रक्षण करतो,  म्हणून व्यक्तीने मग ईश्वराचे स्तवन कितीही केले तरी ते कमीच आहे.
इस्लाममध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजा म्हणजे केवळ अन्नपाण्याशिवाय विशिष्ठ कालावधीपर्यंत उपाशीपोटी राहणे नाही तर शरीराच्या असंख्य अवयवांचाही रोजा  असतो. उदा. जीभ, डोळे, हात, कान, पाय, नाक अशा अनेक अवयवांचा रोजा असतो. वाईट बोलू नये, कोणाची चहाडी-चुगली करू नये, शिव्या-शाप देऊ नये, हा जिभेचा रोजा आहे.   डोळ्यांनी वाईट कृत्य पाहू नये, तर कानांनी चांगलेच ऐकावे, हाताने परोपकाराचे कार्य करावे, लाचलुचपत घेणे-देणे करू नये. असे अनेक प्रकारचे रोजे आहेत. त्याविषयी आपणास  सविस्तर ज्ञात आहेच. रोजा वर्षाच्या बारापैकी एक पवित्र महिना ’रमजान’मध्ये पकडला जातो. रोजा सर्वांना (स्त्री-पुरूष) अनिवार्य आहे. रोजा केवळ ईश्वराची आराधना म्हणून पकडला  जात नाही तर वर्षातील उर्वरित अकरा महिने (रमजान वगळून) समाजात आपण कसे जगावे याचे प्रशिक्षण आहे. इस्लामने सदाचारी जीवन जगण्यासाठी वर्षातून एकदा एक महिन्याची  रोजारूपी परीक्षा ठेवी आहे. प्रत्येक स्त्री-पुरूष जाणते झाल्यापासून रोजा अनिवार्य आहे. या उपवासात फक्त आणि फक्त गरोदर महिलेस सूट आहे. तसेच एखादी वयस्कर स्त्री असेल  आणि तिच्यात रोजा धरण्याएवढीही ताकद नसेल तर मात्र त्यापासून तिला सूट मिळू शकते. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरूष) जर ऐन रमजान महिना चालू असताना आजारी पडली व  ती रोजे नाही धरू शकली तर तिने ईद झाल्यानंतर आपले चुकलेले रोजे पुन्हा कधीही करायचे, ही अनिवार्यता आहे. रमजानच्या रोजाप्रमाणेच नफील (अतिरिक्त) रोजे ही धरले जातात.  नफील रोजे हे अनिवार्य नाहीत तर ते अनुयायांच्या मर्जीचे आहेत. ते रमजान वगळता उर्वरित अकरा महिन्यांत केव्हाही केले जाऊ शकतात. हे रोजेदेखील रमजानच्या रोजाप्रमाणेच  पवित्र असतात.

इस्लाममध्ये दानधर्म
अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास महत्व दिले आहे. पवित्र कुरआनमध्ये नमाज व रोजानंतर अल्लाहच्या मार्गातील खर्च-जकात (अडीच टक्के) याला महत्व देण्यात आले आहे. जकात  हे इस्लाममधील कायदेशीर तत्व आहे. ज्याप्रमाणे नमाज पढत असताना अनुयायाचे मन, मनगट, मस्तक, मनका, मान, हृदय, तसेच शरीराचे सर्व अवयव अंगप्रत्यांग ईश्वरासमोर  नतमस्तक आहे. त्यांच्यावर ईश्वराचाच अधिकार आहे. कारण ईश्वराने आपणास ते बहाल केले आहे. तसेच आपल्याजवळ असणारी संपत्ती, पैसा, सोने, मौल्यवान वस्तू याचीही  निर्मिती अल्लाहनेच केली आहे. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या मालमत्तेवरील अडीच टक्के रक्कम दानधर्माच्या कार्यात (जकात) खर्च केलीच पाहिजे. त्यामुळे ही मालमत्ता आपली  नाही ती ईश्वराची आहे असा तो अनुयायी समजतो. अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या अनुयायांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे, ’’निःसंशय दानधर्म करणारे  पुरूष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि अशा अनेक बाबींचा विचार करून विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिल्याचे हदीसमध्ये जाणवते.
इस्लाम सांगतो की आपल्याजवळ जे आहे त्यातील उदरनिर्वाहासाठी खर्च करून जे शिल्लक राहते ते गरीबांना वाटा. जे तुम्ही इतरांना वाटाल तेच तुमच्या नावावर शिल्लक राहणार  आहे. याचा दाखला आपणास पुढील प्रसंगातून मिळतो.
माननीय आएशा (रजि.) म्हणतात, ’’आम्ही एकदा बकरी कापली आणि वाटून टाकली.’’ पैगंबरांनी विचारणा केली, ’’त्यापैकी काही शिल्लक आहे का?’’ ’’केवळ फरा उरलेला आहे.’’  माननीय आएशा (रजि.) म्हणाल्या. पैगंबर म्हणाले, ’’असे म्हणा, फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’
याचा मतितार्थ, आपल्याजवळील असणारे आपल्या गरजा भागवून उरलेले इतरांसाठी द्या. आपण जे स्वतःसाठी शिल्लक राखून ठेवतो ते आपल्यासाठी राहत नाही तर आपण जे  इतरांसाठी खर्च केले आहे. इतरांना वाटले आहे; तेच आपल्यासाठी पुण्यकर्मात शिल्लक राहते. व्यक्ती जे दानधर्म करते तेच त्याच्यासाठी राहते आणि ते पुण्य वाया जात नाही. वाया  जाते ते जे आपण खाऊन-पिऊन संपवतो. ज्याप्रमाणे श्रीमंत दानधर्म करतात, त्यांच्यासारखे दानधर्म आपण करू शकत नाही ही भावना गरिबांची असते. त्यावेळी त्यांना उद्देशून पैगंबर  उपदेश करतात,
’’दान लहानात लहान वस्तुचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की गरजूची खरी गरज पूर्ण होत नसेल, पण प्रसंगी त्याला आधार मिळू शकतो.’’
माननीय आएशा (रजि.) यांनी सांगितले, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणतात, ’’खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे तो उपयोगी पडतो त्याप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’
दान किती लहान आणि किती मोठे याला किंमत नाही, तर दान देऊन दुसऱ्याची गरज भागविण्याचा विचार किंमतीचा. आपल्या नरकयातना थांबवण्यासाठी किंवा नरकापासून दूर   राहण्यासाठी दानधर्म महत्त्वाचा. दानधर्म न करणे ही एक प्रकारची विकृती आहे. समजा, आपण उपाशी असताना जेवण करणे ही ’प्रवृत्ती’, तर आपण पोटभर खाल्लेले असतानाही  पुन्हा खाणे ही ’विकृती’ आहे आणि आपण उपाशी असताना आपल्या भाकरीतील आर्धी भाकरी दुसऱ्याला देणे ही ’संस्कृती’ आहे. म्हणजेच जे आपण खातो ते संपून जाते आणि जे  आपण देतो ते आपल्यामागे शिल्लक राहते. स्त्रियांना उद्देशून पैगंबर सांगतात, ’’याचकाला दारातून रिकाम्या हाताने पाठवू नका.’’ घरात काहीही नसेल तर करपलेले अन्न का असेना  त्याला द्या. दानधर्म केल्याने अल्लाहकडून त्याचा दुप्पट मोबदला मिळतो. आपण आपल्या कमाईतील रक्कम जशी बाहेरच्या व्यक्तीवर खर्च करतो तशी घरातील व्यक्तीवर खर्च  केल्यानेही पुण्यप्राप्ती होते. पैगंबर एकेठिकाणी म्हणतात (माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन),
’’ हे मुस्लिम स्त्रियांनो, तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये, जरी शेळीची खुर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’
तात्पर्य असे की प्रत्येक मुस्लिम स्त्रीने आपल्या शक्तीनुरूप आपल्या शेजारणीला मदत केलीच पहिजे. इस्लामने दानधर्म करणे हे धार्मिक कार्य संबोधले आहे. दानमर्ध करून आपण  आपल्या स्वतःसाठी स्वर्गाची दारे खुली करून घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यातील दानधर्मातून स्वर्गात प्रवेश करू शकतो. जी स्त्री पाचवेळा नमाज पढते, ईश्वराची आराधननाम  स्मरण करते, आपल्या पतीची आज्ञा पाळते ती स्वर्गाच्या ज्या द्वारातून जाऊ इच्छील तिला प्रवेश मिळेल. इस्लाम ज्या स्तंभावर उभारलेला आहे त्यापैकी एक आधारस्तंभ म्हणजे  हज होय. ’हज’ विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. हजबरोबरच (हज्जच्या वेळेव्यतिरिक्त) ’उमरा’मध्येही जवळजवळ हजसारखेच विधी अदा  करण्यात येतात. हज आणि उमरा याची प्रचंड मोठी महानता आहे. हजयात्रा इस्लामच्या जीवनातील सर्वात शेवटचे व सर्वात उच्च असे धार्मिक कार्य संबोधले आहे. प्रत्येक मुस्लिम  स्त्री-पुरूषाच्या जीवनाचे हजयात्रा एक अत्यंत पवित्र ध्येय समजले आहे. हजची यात्रा म्हणजे जिहाद (धर्मयुद्ध) होय. यावरून माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना  विचारले,’’ आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ पैगंबरांनी सांगितले, ’’तुम्हा स्त्रियांसाठी सर्वात चांगला व सुंदर जिहाद ’हज्जे-मबरूर’ (स्वीकृत हज) आहे.’’  इस्लामने इतर समाजव्यवस्थेप्रमाणे अथवा धर्मव्यवस्थेप्रमाणे स्त्री-पुरूष असा मतभेद करून दोघांसाठी वेगवेगळी आचारसंहिता बनविली नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरूषांबरोबर स्त्रियांना मान- सन्मान दिला व जीवन जगण्याची एकच आचारसंहिता बनविली. हजयात्रा जेवढी पुरूषांच्या जीवनात महत्त्वाची सांगितली तेवढीच स्त्रियांनादेखील महत्त्वाची आहे. हजयात्रा अल्लाहच्या  काबागृहाची यात्रा स्त्रियांसाठी सर्वांत सुंदर जिहाद आहे. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी जेव्हा अंतिम हजयात्रा (हज्जतुलविदाअ) केली, तेव्हा त्यांच्याबरोबर दहा हजार सोबतीही होते.  एवढेच नव्हेतर त्या महिला सोबतींमध्ये आजारी, गर्भवती व मुलेबाळे असणाऱ्या महिलांचाही समावेश होता. जी स्त्री आपल्या लहा
न मुलाची हजयात्रा करवून घेईल, तेव्हा त्याचे पुण्य  नक्कीच तिच्या पदरात पडणार आहे. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती देणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे याचा आदेश दिला आहे. हजयात्रा स्वतःही करता येते व ती मजबूरी  असेल तर दुसऱ्याकडूनही करवून घेता येते. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, जुहैना टोळीची एक स्त्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाली, ’’माझ्या आईने हजला जाण्यास नवस केला होता, परंतु हजयात्रा करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, तर तिच्या वतीने मी हजयात्रा करू शकते का?’’ यावर पैगंबरानी सांगितले, ’’तिच्यातर्फे तुम्ही हजयात्रा करू शकता. जर तुमच्या आईवर कर्ज असते तर तुम्ही ते अदा केले नसते का? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे. त्याचे कर्ज अदा केले जावे.’’- 

(’इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री’ इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबईने प्रकाशित केले आहे. त्यातील हे लेख. ज्या वाचकांना लेखकाशी भेटण्याची इच्छा आहे त्यांनी 8030273038 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget