कर्जफेडीचे महत्त्व आणि टाळाटाळ करण्यास मनाई

माननीय अबू राफेअ (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एक उंट एका व्यक्तीकडून कर्जस्वरूपात घेतला, मग पैगंबरांजवळ जकातस्वरूपात काही उंट आले तेव्हा  त्यांनी मला आदेश दिला, ‘‘त्या व्यक्तीला तो उंट देऊ?’’ मी म्हणालो, ‘‘या उंटांमध्ये फक्त एकच उंट खूप चांगला आहे आणि सात वर्षांचा आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तोच त्याला द्या,  कारण उत्तमप्रकारे कर्जफेड करणारा मनुष्य उत्तम असतो.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सधन कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यात टाळाटाळ करणे अत्याचार आहे आणि जर कर्जदार  ‘‘अमुक सधन व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करून घ्या’’ असे म्हटल्यास विनाकारण कर्जदाराच्या डोक्यावर स्वार होता कामा नये, त्याचे हे म्हणणे मान्य करावे आणि ज्याचा त्याने  हवाला दिला आहे त्याच्याकडून कर्जाची परतफेड करून घ्यावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
मनुष्याजवळ कर्जफेड करण्यासाठी काहीही नसेल आणि तो म्हणाला की ‘‘जा अमुक व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करून घ्या. आमच्यात त्याबाबत बोलणी झालेली आहे. तो कर्जफेड  करण्यास राजी आहे.’’ तेव्हा कर्ज देणाऱ्याने असे म्हणू नये की ‘‘मी तर तुझ्याकडूनच कर्जफेड करून घेईन. मी दुसऱ्या कुणाला ओळखत नाही.’’ इतकेच नव्हे तर त्याच्याशी मृदु स्वरात  बोलावे आणि ज्याचा तो हवाला देत आहे त्याच्याकडून कर्जफेड करून घ्यावी.

माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य लोकांचा माल (कर्जाच्या स्वरूपात) घेईल आणि तो त्याच्या परतफेडीची मनोकामना बाळगत  असेल तर अल्लाह त्याच्याकडून त्याची परतफेड करील आणि ज्या मनुष्याने माल कर्जाच्या स्वरूपात घेतला आणि त्याच्या परतफेडीची मनोकामना नसेल तर अल्लाह त्या कारणास्तव  त्या मनुष्याचा विनाश करील.’’ (हदीस : बुखारी)

माननीय शरीद सुलमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कर्ज परतफेड करू शकणाऱ्याचा (न फेडण्यासाठीचा) बहाणा त्याच्या अब्रूला आणि त्याच्या  शिक्षेला वैध ठरवितो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

‘अब्रू’ला वैध ठरविणे म्हणजे जो मनुष्य कर्ज घेतो आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता असूनदेखील परतफेड केली नाही तर त्याचा हा अपराध आहे की समाजाच्या दृष्टिकोनातून  त्याला लज्जित केले जाऊ शकते आणि त्याला शिक्षा दिली जाऊ शकते. जर एखाद्या देशात इस्लामी कायदा असेल आणि तेथे एखादा असा मनुष्य आढळला तर इस्लाम कायद्याची  अंमलबजावणी करणारे त्याला शिक्षा देऊ शकतात आणि त्याला अपमानीत करण्याची दुसरी पद्धतदेखील अवलंबिली जाऊ शकते.

Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget