लैंगिक अपराधांवर इस्लामी उपाय

Justice
भूक लागणे, तहान लागणे, राग, क्षोभ, स्नेह, प्रेम, ममत्व या जशा नैसर्गिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे लैंगिक भावनासुद्धा अगदी नैसर्गिक आहेत. भुकेल्यास भाकर मिळाली नाही, तहानलेल्यास पाणी मिळाले नाही तर ज्याप्रमाणे तो आपली विवेकशक्ती हरवून बसतो, त्याचप्रमाणे लैंगिक तृष्णा जर भागली नाही तर माणूस विवेकशक्ती हरवून बसतो, वेडापिसा होतो. मग जर त्याला सहजरित्या आणि वैध मार्गाने ही तृष्णा भागविता आली नाही, तर निश्चितच तो आपली ही नैसर्गिक गरज पूर्ण करण्याकरिता पिसाळलेल्या श्वापदाप्रमाणे दिसेल त्या वाटेने स्वैर धावत असतो, सापडेल त्याला फाडत असतो, सर्वत्र उपद्रव माजवित असतो. आज याच उपद्रवाचा भीषण उद्रेक सर्वत्र पाहायला मिळतो. याविषयी सविस्तर उल्लेख मागे आपण पाहिलाच आहे. मात्र इस्लामी कायद्याने या अपराधावरसुद्धा त्याचे मूळ शोधून यशस्वी तोडगा काढला आहे. माणसाला भूक लागताच जेवण देणे, तहान लागताच पाणी देणे, तसेच लैंगिक तहान लागताच त्याचे वैध आणि धर्मसंमत साधन पुरविणे याच निसर्गनियमानुसार इस्लामने मुलगा-मुलगी वयात येताच त्यांचे लग्न करून देण्याची शिकवण दिली आहे. कारण लैंगिक भावना ही नैसर्गिक भावना आहे. कोणीही धर्मात्मा असो, महात्मा असो, त्यागी पुरुष असो की साधू-संत असो. त्याने लग्न करून पारिवारिक जवाबदारी पूर्ण करायलाच हवी. अन्यथा त्याचे महात्म्य आणि त्यागाला अगर धर्मात्म्याला काहीच अर्थ नसतो. म्हणूनच इस्लामने संन्यास आणि वैराग्य धारण करून समाजाच्या जवाबदार्यांतून पळपुटेपणा करण्यास निषिद्ध ठरविले आहे. अर्थातच संसारत्याग आणि लैंगिक भावनांना दाबून टाकणे हे निसर्गनियमांविरुद्ध बंडखोरी आहे आणि ज्या ज्या वेळी माणूस निसर्गनियमांशी(अर्थातच इस्लामशी) बंडखोरी करतो, तेव्हा अपराध आणि गुन्हेगारीचे तांडव माजते, समाजजीवन विस्कळीत होते. यासाठीच प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘हे वयात आलेल्या तरुणांनो(आणि तरुणींनो)! विवाह करा. यामुळे तुम्ही तुमच्या लैंगिक आचरणाचे पावित्र्य अबाधित राखू शकाल.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
उपरोक्त प्रेषित विधानावरून हे स्पष्ट होते की वयात आलेल्या तरुण-तरुणींनी लवकरात लवकर लग्न आटोपून घ्यावे. यामुळे निश्चितच लैंगिक अपराधांवर आळा बसेल.
याशिवाय स्त्रियांनी विनाकारण घराबाहेर एकट्या फिरू नये. त्याचप्रमाणे परपुरुषांबरोबर विनाकारण अगर कामानिमित्त वावरू नये. पडदापद्धतीचा अंगीकार करावा. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास एकटी अगर परपुरुषासोबत करू नये.
प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘ईश्वर आणि परलोकी जीवनावर श्रद्धा ठेवणार्या स्त्रीसाठी हे वैध अगर धर्मसंमत नाही की तिने एका दिवसाकरिताही ‘गैर महरम‘(परपुरुषाबरोबर) प्रवास करावा.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
‘गैर महरम‘ पुरुष म्हणजे कोण? गैर महरम म्हणजे असा पुरुष, ज्याच्याशी विवाह करणे वैध असते. अर्थात मुलगा, पती, पिता, भाऊ, दूधभाऊ, भाचा, पुतन्या, काका, मामा, नातु, सासरा, सावत्र मुलगा, सावत्र पिता सोडून जेवढे पुरुष असतील, ते सर्व पुरुष इस्लामने गैर महरम ठरविले आहेत व यांच्याबरोबर लांब पल्ल्याचा अगर दिवसभराचा प्रवास आणि एकांतातील सहवास इस्लामने निषिद्ध ठरविला आहे.(संदर्भ : सूरह-ए-निसा - २२)
याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) यांनी संध्याकाळ झाल्यावर मुलांनी जास्त वेळ बाहेर न घालविण्याचीही शिकवण दिली आहे. कारण बरीच कृष्णकृत्ये रात्रीच्या वेळी अगर संध्याकाळच्या अंधारात घडतात.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget