July 2020

माननीय अबू हुरैरह (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
"जो माणूस 'हज' अगर 'उमरा' अगर 'जिहाद' करण्याच्या इराद्याने घरातून निघाला आणि वाटेत त्याला मृत्यू आला तर सर्वश्रेष्ठ अल्लाहकडून त्याला तेच पुण्य व फळ लाभेल, जे हाजी, गाजी व उमरा करणाऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेले आहे."
(मिश्कात)

माननीय अबू दर्दा (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“जो माणूस तहज्जुद' ची नमाज अदा करण्याचा संकल्प करून झोपला, परंतु त्याला गाढ झोप लागली व पहाट झाली तरी तो उठू शकला नाही. अशा माणसाच्या कर्मपत्रामध्ये त्या रात्रीची तहज्जुदची नमाज लिहिली जाईल आणि त्याला लागलेली झोप ही त्याला त्याच्या पालनकर्त्याकडून लाभलेली देणगी समजली जाईल."
(इब्ने माजा, नसाई) पवित्र कुरआनचे स्मरण ताजे ठेवा ___ माननीय उबैदा मुलैकिई (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“हे कुरआनला मानणाऱ्या लोकांनो! कुरआनला उशी बनवू नका. रात्री व दिवसा त्याचे योग्य प्रकारे पठण करा. त्याच्या अध्ययन, अध्यापन नियमीत करा त्याच्या शब्दांना योग्य प्रकारे वाचा. जे काही कुरआनमध्ये निवेदन केले गेले आहे त्यावर मार्गदर्शन प्राप्त करण्याच्या हेतूने चिंतन व मनन करा, म्हणजे तुम्हाला यश लाभू शकेल आणि त्याचे पठन ऐहिक जीवनासाठी नव्हे तर अल्लाहची प्रसन्नता लाभावी म्हणून करा.” (मिश्कात)
कुरआनला उशी बनवू नका. म्हणजे कुरआनबद्दल निष्काळजी राहू नका. पवित्र कुरआन हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ, कुरआनला मानणारे लोक म्हणजे मुस्लिम. मुस्लिमांनी नेहमी पवित्र कुरआनचे पठण केले पाहिजे. पवित्र कुरआनची शिकवण समजावून घेणे, ती दुसऱ्याना समजावून सांगणे व त्या शिकवणीनुसार स्वत: आचरण करणे व दुसऱ्याना त्यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहन देणे हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे. हे सर्व अल्लाहची प्रसन्नता लाभावी या एकमेव उद्देशाने झाले पाहिजे.
सदाचाराची व्याप्ती माननीय अबू हुरैरह (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“दोघांमध्ये समझोता घडवून आणा. हा सदाचार आहे. तुम्ही तुमच्या वाहनावर कोणाला बसवून घेतले वा त्याचे ओझे आपल्या वाहनावर ठेवून घेतले तर तोही सदाचार आहे. चांगली गोष्ट सांगणे हाही सदाचार आहे. तुमचे प्रत्येक पाऊल जे नमाजासाठी उठते, तो सदाचार आहे. रस्त्यामधून दगड, काटे दूर करणे हासुद्धा सदाचार आहे." १ तहज्जुद-रात्रीच्या शेवटच्या प्रहरी प्रात:कालापूर्वी एकांतवासात अदा केली जाणारी नमाज. हिचे महत्त्व फार आहे व फळही मोठे आहे.

- मिर्जारफीउद्दीन अहमद

    या पुस्तिकेत पैगंबर (स.) यांच्या द्वारा जी क्रांती अल्पकाळात घडली तिचे उदाहरण या जगात सापडणे अशक्य आहे, हे नमूद केले आहे. पुस्तिकेत पुढे वर्णन आहे,
    इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. इस्लामी आंदोलनाने केवळ मानसिकताच बदलली नाही तर समाजाच्या आर्थिक नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेत पूर्णत: क्रांती घडली.

आयएमपीटी अ.क्र. 203    -पृष्ठे - 24   मूल्य - 10      आवृत्ती - 1 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/2yyc8u2qfh09guomhscqv49cqzvvn4qy

Madina
मुहम्मद (स.) समानतेचे व लोकसत्तेचे भोक्ते होते. त्यांच्या लोकसत्तेच्या गर्जनेने, राजेमहाराजे व धर्मोपदेशक गडबडून गेले. मानवी बुद्धीने बंड करावे म्हणून तो इशारा होता. त्या वेळेस जुलमी संस्था व भांडकुदळ पंथ यांचा बुजबुजाट झाला होता. दुर्बोध चर्चांत मानवी आत्मा गुदमरत होता आणि मानवी शरीर वतनदारांच्या वर्चस्वाखाली तुडविले जात होते; परंतु पैगंबर आले. त्यांनी ही मिरासदारीची भिंताडे साफ पाडली. विशिष्ट हक्क त्यांनी नष्ट केले. स्वार्थी लोकांनी ईश्वराकडे जावयाच्या रस्त्यावर जी जाळी विणून ठेवली होती. ती पैगंबरांनी आपल्या जोरदार पुंâकरीने नष्टकेली. रस्ता साफ मोकळा झाला. ‘‘अल्लाहजवळ तुम्ही सारे निर्धास्तपणे जा. तेथे सारे समान. तेथे कोणाला जादा अधिकार नाहीत.’’ पैगंबर स्वत: पंडित नव्हते; परंतु ज्ञान-विज्ञानाची महती त्यांनी गायिली आहे. मानवी इतिहास लेखणीने लिहिला जातो. लेखणीने मानवाचा निवाडा केला जातो, न्याय दिला जातो. मानवी कृत्यांची छाननी करणारे, अल्लाहच्या दृष्टीने छाननी करणारे साधन म्हणजे लेखणी, लेखणी म्हणजेज्ञान, ज्ञानाशिवाय सारे फोल आहे. ‘‘शिका, वाचा, पाहा.’’ असे मुहम्मद (स.) सांगतात.
ते बुद्धीवर फार जोर देत. आश्चर्ये, चमत्कार असल्या प्रकारांना ते कधीही उत्तेजन देत नसत. भोळसटपणा व बावळटपणा त्यांना पसंत नव्हता. ईश्वरी शासनाविषयीची जी त्यांची कल्पना होती ती सर्वांना समान प्रवेश देणारी होती. पैगंबरांचा ईश्वर लोकशाहीचा भोक्ता आहे. तो कोणी हुकूमशहा नाही.
मुहम्मद (स.) यांचे धार्मिक ध्येय व्यापक आहे. त्यांची मानवता साधी व सरळ आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या म्हणजे मुहम्मद (स.) यांचे पूर्वीच्या धर्माचार्यांपेक्षा विशिष्टत्व दिसते. ते जणू अर्वाचीन महर्षी आहेत, असे वाटते. त्यांचे जीवनकार्य उघडे आहे. स्पष्ट समोर जगाच्या पुढे आहे. त्यात गूढता नाही. अस्पष्टततेत ते लपलेले नाही. त्यांच्या व्यक्तित्वाभोवती पुराणे रचली गेली नाहीत. दंतकथा गुंफिल्या गेल्या नाहीत.
अरबस्तानातील जमातीपाठीमागून जमाती नवधर्माच्या स्वीकारार्थ जसजशा येऊ लागल्या तसे मुहम्मद (स.) यांना वाटू लागले की आपले कार्यही समाप्त होण्याची वेळ आली. मक्केची शेवटची यात्रा करून यावे असे त्याच्या मनात आले. इ. स. ६३२ च्या फेब्रुवारीच्या २३ तारखेस ते निघाले. त्याच्या बरोबर लाख दीड लाख यात्रेकरू होते. ‘हज्जतुल विदा’ म्हणजे पैगंबरांची अंतिम हज यात्रा किंवा इस्लामी यात्रा. मीनाच्या दरीत यात्रेचे सारे विधी त्यांनी केले. हे विधी उरकण्यापूर्वी ७ मार्च रोजी जबल-उल-अरफात या टेकडीवरून हजारो मुस्लिमांसमोर त्यांनी शेवटचे प्रवचन दिले. मुहम्मद (स.) एक वाक्य उच्चारीत. ते वाक्य खालच्या लोकांत असलेला पुन्हा उच्चारी. त्या वेळेस ध्वनिक्षेपक नव्हते. सर्वांना ऐकू जावे म्हणून जिवंत ध्वनिक्षेपक उभे केले होते. ते साधे सरळ प्रवचन होते.
‘‘बंधुंनो, मी आज सांगतो ते ऐका. कारण आणखी एखादे वर्ष मला लाभेल असे वाटत नाही. या जागी पुन्हा तुमच्यात मी दिसेन, वावरेन, बोलेन असे वाटत नाही. हा आजचा दिवस व हा महिना जसा सर्वांना पवित्र वाटतो, त्याप्रमाणे सर्वांचे जीवन व मालमत्ता पवित्र माना. तुम्ही एकमेकांचे जीवन पवित्र माना. एकमेकांना सांभाळा. ईश्वरासमोर जाण्याची वेळ येईपर्यंत असे प्रेमाने व बंधुभावाने वागा. कोणाच्या प्राणांचा वा घरादारांचा नाश नका करू. एके दिवशी ईश्वराच्या न्यायासनासमोर उभे राहावयाचे आहे, हे कधीही विसरू नका. त्या दिवसाची नेहमी आठवण ठेवा. तेथे सर्व कृत्यांचा हिशेब द्यावा लागेल.
‘‘मित्रांनो, पतीचे पत्नीवर काही हक्क आहेत, तसेच पत्नीचेही पतीवर आहेत. आपल्या बायकांना प्रेमाने व सहानुभूतीने वागवा. कठोर नका होऊ, दयाळू राहा. तुम्ही ईश्वराला साक्षी मानून आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. खरे ना? ईश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर भार्या झालेल्या असतात, ही गोष्ट विसरू नका.
‘‘तसेच तुमच्यावर कोणी विश्वास टाकला तर विश्वासघात करू नका. दिला शब्द पाळा, पाप टाळा. सावकारी निषिद्ध आहे, व्याजबट्टा वज्र्य आहे, हे ध्यानात धरा. पैसे उसने घेणाऱ्याने घेतले तेवढे परत करावे, व्याज देऊ नये, मुद्दलाची फेड व्हावी. माझ्या मंडळीपासूनच याची अंमलबजावणी सुरू होईल. चुलते अब्बास ऋणकोपासून मुद्दल तेवढेच घेतील.
‘‘आणि प्राचीन काळापासून तुम्ही जाहिलियत मानीत आलात. रक्ताचा सूड घेत आलात. खुनाचा बदला घेत आलात; परंतु आजपासून ते बंद होत आहे. ही गोष्ट निषिद्ध आहे. इस्लाममान्य नाही. आजपासून सारी सुडाची भांडणे रद्द झाली. हारीसाचा मुलगा रबिया यांचा खून झाला; परंतु त्याचा सूड घेण्यात येणार नाही. माझ्याच आप्तेष्टांपासून हा नवीन नियम सुरू करू या. इब्न रबियाच्या या उदाहरणाने आपण नवीन आरंभ करू या. (इब्ने रबिया लहान असताना दुसऱ्या जमातीच्या ताब्यात संरक्षणार्थ देण्यात आला होता; परंतु हुझैल जातीने त्याचा व्रूâरपणे वध केला होता. पैगंबर मुहम्मद ( स.) यांचा हा चुलत भाऊ होता.)
‘‘आणि तुमचे गुलाम. त्यांना नीट वागवा. तुम्ही खाल तेच त्यांनाही खायला द्या. तुम्ही कपडे घालाल तसेच त्यांना द्या. अक्षम्य असा अपराध त्यांनी केला तरच त्यांना सोडा. लक्षात ठेवा की, कसेही झाले तरी तेही खुदाचे बंदे आहेत. त्यांना कठोरतेने  वागवता कामा नाये. मित्रांनो, माझे शब्द ऐका, नीट समजून घ्या. सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊ आहेत हे कधीही विसरू नका. तुमचे सर्वांचे एक जणू भ्रातृमंडळ, एक तुमचा महान भ्रातृसंघ. जे दुसऱ्याचे आहे ते त्याने स्वेच्छेने, खुशीने दिल्याशिवाय त्याला हात लावू नका. अन्यायापासून व अन्याय करणाऱ्यापासून दूर राहा, सावध राहा. जे येथे आज हजर आहेत त्यांनी हे सारे गैरहजर असणाऱ्यांस सांगावे. येथे ऐकणाऱ्यांपेक्षाही ज्याला सांगितले जाईल तो कदाचित ते अधिकच लक्षात ठेवण्याचा संभव आहे.’’
असे हे प्रवचन बराच वेळ चालले होते. साधे, सरळ, कळकळीचे, वक्तृत्वपूर्ण असे ते प्रवचन होते. भावनाप्रधान श्रोत्यांची अंत:करणे उचंबळत होती, थरारत होती आणि प्रवचन संपल्यावर पैगंबरांनी पुढील शब्दांनी शेवट केला : ‘‘हे अल्लाह, मी तुझा संदेश दिला. मी माझे कार्य पुरे केले आहे.’’
त्याचबरोबर सभा गर्जती झाली, ‘‘खरोखरच तुम्ही आपले कार्य पुरे केले आहे.’’ पैगंबर पुन्हा अखेर म्हणाले, ‘‘हे अल्लाह! माझ्या कामाला तुझीच साक्ष. दुसरे मी काय सांगू? हीच माझी प्रार्थना.’’
खिस्ताचे पर्वतावरील प्रवचन अधिक काव्यमय वाटते. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे हे पर्वतोपनिषद साधे आहे. त्यात गूढ गहन काही नाही. साध्या गोष्टी; परंतु रोजच्या जीवनातील. घरीदारी कसे वागावे, संसारच सुंदर व सारमय कसा करावा, ते त्यांनी सांगितले. सर्वसामान्य लोकांना नैतिक मार्गदर्शनार्थ स्पष्ट व सुबोध दिशा हवी असते, ती स्पष्ट दिशा या प्रवचनात होती.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी रानटी लोकांतून नवी संस्फूर्त असे संघटित राष्ट्र निर्माण केले. त्यांना ईशज्ञान देऊन कृतार्थ केले, पवित्र केले. त्यांना धर्मग्रंथ दिला. नाना देवांची उपासना करणारे, रक्तपातात रंगणारे असे अरब होते. त्यांना ‘तो सत्यमय व प्रेममय एक अद्वितीय ईशपूजा’ असे ते सांगते झाले. विभक्तांना त्यांनी एकत्र केले. विभक्त झालेल्या अरबांना त्यांनी जोडले. बंधुभावाने बांधले. संघटित केले. अनादिकाळापासून हे द्वीपकल्प अंधारात गुडुप होते. आध्यात्मिक जीवनाचे नावही नव्हते. ज्यूंच्या वा खिस्तांच्या धर्माचा टिकाऊ परिणाम अरबांवर झाला नव्हता. रुढी, दृष्टता, दुर्गुण यांच्या घाणीत सारे बरबटलेले होते. व्यभिचार होता. लहान मुलींना पुरीत! मोठा मुलगा स्वत:च्या आईशिवाय बापाच्या ज्या इतर बायका असत, त्यांना स्वत:च्या बायका करी.
थोड्या वर्षांपूर्वी असा हा अरबस्तान होता. परंतु मुहम्मद (स.) यांनी केवढे स्थित्यंतर केले! जणू स्वर्गातील देवदूत खाली वावरायला आला. ज्यांची मने अर्धवट जंगली होती, अशांची मने भ्रातृभाव व प्रेम यांनी भरून गेली. अरबस्तान नैतिकदृष्ट्याही ओसाड वाळवंट होते. देवाच्या व माणुसकीच्या सर्व कायद्यांची तेथे पायमल्ली होत होती; परंतु मुहम्मद (स.) यांनी तेथे नैतिक नंदनवन फुलविले. नीतीचे मळे फुलविले. प्रेमाची फुले फुलविली. मूर्तिपूजा व तद्नुषंगिक इतर वाईट चाली यांचे निर्मूलन केले.
जो अल्लाह स्वत:च्या सामर्थ्यने व प्रेमाने या विश्वाचे नियमन करतो त्या एकमेव अल्लाहची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजेचा संपूर्ण त्याग मुहम्मद (स.) यांनीच करून दाखविला. इस्लाम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुन्हा आली नाही आणि जी अरब जात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एका ईश्वराला भजणारे मुहम्मद (स.) यांनी केले. ही खरोखर अद्भुत व अपूर्व अशी गोष्ट होती.
पैगंबर मुहम्मद (स.) यांची वाणी अत्यंत प्रभावी होती. ती दैवी संस्फूर्त वाणी वाटे. अल्लाहचे अद्वितीयत्व इतक्या उत्कटपणे, तीव्रपणे क्वचितच कोठे उपदेशिले गेले असेल, उद्घोषिले गेले असेल. अरब अत:पर केवळ ऐहिकदृष्टीचे राहिले नाहीत. मरणानंतर अधिक उच्चतर, शुद्धतर व दिव्यतर असे जीवन असते. त्या पारलौकिक जीवनासाठी या जीवनात दया, चांगुलपणा, न्याय, सार्वत्रिक प्रेम जीवनात दाखविली पाहिजेत, असे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी शिकविले.
हा जो अमूर्त ईश्वर तो अनाद्यनन्त आहे तो विश्वाधार आहे. सर्वशक्तिमान, प्रेमसिंधू व दयासागर आहे. ही जी नवजागृती आली त्याचे मुहम्मद (स.) स्फूर्तिस्थान होते. ईश्वराच्या आदेशाने या नवचैतन्याचे ते आत्मा होते, प्राण होते ते! जणू नवप्रेरणेचे अनंत निर्झर होते. या झऱ्यातून अरबांच्या शाश्वत आशांचे प्रवाह वाहत होते आणि म्हणून मुहम्मद (स.) यांच्याविषयी भक्तिभाव ते प्रकट करीत.
सर्व अरबांची जणू आता एकच इच्छा झाली की त्या अल्लाहची सत्याने व पावित्र्याने सेवा करावी. अल्लाहची आज्ञा व इच्छा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतून प्रकट करावी. या वीस वर्षांत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जे जे सांगितले, जी जी वचने उच्चारिली, जे जे मार्गदर्शन केले, जी सत्ये दिली, ते सारे अरबांच्या हृदयात जणू कोरल्यासारखे झाले होते. त्यांच्या जीवनाची ती श्रुतिस्मृति झाली होती. कायदा व नीती यांचे ऐक्य झाले. सद्सद्विवेकबुद्धीसाठी आनंदाने बलिदाने करणारे दिसू लागले. त्यागाची पराकाष्ठा करणारे शोभू लागले. जगाला एवढी मोठी जागृती इतक्या तीव्रपणे व उत्कटपणे क्वचितच कोणी दिली असेल.
मुहम्मद (स.) यांनी आपल्या हयातीत आपले कार्य पुरे केले. बुद्धाचे काम अशोकाने पुरे केले. खिस्ताचे कॉन्स्टंटाईनने, झरतुष्ट्राचे उरायसने, बनीइस्राईलांचे जोशुआने. परंतु मुहम्मद (स.) एक असे झाले ज्यांनी स्वत:चे व पूर्वी होऊन गेलेल्यांचेही कार्य पुरे केले. जणू सारे काम अल्लाहच करवीत होता, मुहम्मद (स.) निमित्तमात्र होते, असे मुस्लिमांनी म्हटले तर त्यात काय आश्चर्य?
ज्याला कालपरवापर्यंत दगड फेकून मारीत होते, ज्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधित आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम, सहस्त्रप्रणाम, त्या महापुरुषाला.
मुहम्मद (स.) यांचे जीवन उदात्ततेचा आदर्श आहे. उदात्त कर्मांनी खच्चून भरलेले असे हे पुण्यश्लोक जीवन आहे. सुप्त लोकांत त्यांनी चैतन्याची कळा संचरविली. परस्पर भांडणाऱ्यांना त्यांनी एक केले. अमर जीवनाच्या आशेने कर्तव्यकर्म करण्याची त्यांनी प्रेरणा दिली. मानवी हृदयावर इतस्तत: पडलेले किरण वेंâद्रिभूत व पुंजीभूत करून त्यांनी प्रचंड प्रकाशाचा झोत निर्माण केला आणि त्यांचा उत्साह कसा, आशा कशी अदम्य व अमर! थांबणे नाही. तडजोडीस वाव नाही.
अप्रतिहत धैर्याने हा महापुरुष सारे अडथळे झुगारून पुढेच जात राहिला. त्यांनी परिणामांची दरकार कधीच बाळगिली नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवून जात होते. एकाच ध्येयाचा त्यांना सदा निदिध्यास. स्वत:च्या जणू संपूर्ण विसर त्यांना पडला होता. खिस्ताने निराकार प्रभूचा धर्म दिला; परंतु त्या धर्मात मेरीची मूर्तिपूजा शिरली. परंतु मूर्तिपूजेत चुस्त गढून गेलेल्या अरबांना या न पढलेल्या फकीराने इतक्या प्रखरतेने ईश्वराची एकता पटविली की ती वज्रलेप झाली. ज्यांनी ज्यांनी म्हणून पैगंबरांची वाणी एकदा ऐकली, त्यांच्या मनावर ईश्वराचे अद्वितीयत्व व मानवी बंधुभाव यांचा वज्रप्राय ठसा उमटल्याशिवाय राहत नसे.

उमर (र.) निवेदन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
“आचरण हेतूवर अवलंबून आहे आणि प्रत्येक माणसाला त्याच्या हेतूप्रमाणे फळ मिळेल. अल्लाह व त्याचे प्रेषित यांच्यासाठी माणसाने देशत्याग केला (हिजरत) तर ती त्यांच्यासाठी आहे आणि ऐहिक गरजेपोटी अगर एखाद्या स्त्रीबरोबर विवाह करण्यासाठी त्याने देशत्याग केला (हिजरत) तर ज्या हेतूने त्याने तसे केले त्यासाठीच ते राहील."
(सर्वसंमत) 'हिजरत'चा अर्थ धर्मरक्षणासाठी स्थलांतर करणे. पूर्वी लोक मक्केहून मदीनेस प्रयाण करीत, त्याला 'हिजरत' म्हणत.
आचरणाचा अभिप्रेत अर्थ सदाचरण हा आहे. दुराचार कोणत्याही हेतूने केलेला असला तरी तो दुराचारच व ईश्वराजवळ त्याची काही किंमत नाही. सदाचारसुद्धा सद्हेतूने केलेला नसेल तर तोदेखील निरर्थकच व ईश्वराजवळ अशा आचरणाबद्दल काही फळ मिळत नाही.
नमाज अदा करणे हे चांगले आचरण. ईश्वराने नेमून दिलेले कर्तव्य म्हणून हे आचरण करीत राहिल्यास ईशदरबारी दासाची ही सेवा रुजू होऊन त्याला त्याचे फळ लाभेल. पण लोकांनी आपणास नमाजी म्हणावे, धार्मिक वृत्तीचा म्हणावे या हेतूने कोणी नमाज पढत असेल तर त्याची नमाज ईशदरबारी कवडीमोल आहे.
आचरण व त्यामागील हेतू यांचा विचार होऊनच अल्लाहच्या दरबारी त्यांचे चांगले वा वाईट फळ मिळते. अल्लाहच्या कृपेचा लाभ होण्यासाठी आचरणही चांगले हवे व त्यामागील हेतूही चांगला हवा.

waterfall
धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन पर्यावरणीय विनाशाला धार्मिक निष्ठा जबाबदार असल्याचा ठपका ठेवतो. मात्र याउलट, भौतिक जगावरील विश्वासाचा दृष्टिकोन पारलौकिक निष्ठेच्या तुलनेत पर्यावरणीय विश्वासापेक्षा अधिक हानिकारक आहे. वैज्ञानिक भौतिकवाद आणि लौकिक निराशावाद पर्यावरणीय नैतिकतेशी सुसंगत नाहीत.
जॉन हॉट (John F. Haught - an American theologian) यांच्या मते :
‘‘जर प्रत्येक गोष्ट ‘निरपेक्ष शून्यते’साठी निश्चित असेल आणि भौतिकवाद विश्वाकडे अत्यंत क्षुल्लक आणि अंतिम शोकांतिकेच्या रूपात पाहात असेल तर खरोखरच आपण तिची कदर केली असती? अशा तत्त्वज्ञाद्वारे आपल्याला पृथ्वीच्या सुंदर खजिन्याची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित केले जाऊ शकते?हे शक्य आहे, असे आम्हाला वाटते.’’
परलोकावरील श्रद्धा आपल्याला निसर्गावर प्रेम करण्याचे आमंत्रण देते, कारण निसर्गाकडे स्वतःची अंतर्गत भावी इच्छा असते ज्यासाठी आपण इच्छित आहोत, म्हणूनच निसर्गाचा नाश म्हणजे खरोखरच स्वतःला व ब्रह्मांडाला आपल्या भविष्यापासून नष्ट करणे होय. जगातील अनेक वस्तूंच्या अस्तित्वाचे नाविन्य सध्याचे युग आणि जगाच्या समाप्ती दरम्यान सातत्य ठेवण्याची आशा निर्माण करते. सुंदर वातावरण, नैसर्गिक आकांक्षांचे समाधान व आनंद, सुख व शांतीची इच्छा ही स्वाभाविक बाब असली तरी याच्या पूर्ततेसाठी सध्याचे जग पुरेसे नाही. यासाठी धर्म नंदनवनाची (स्वर्गाची) संकल्पना देतो जेथे या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या जातात.
आपण पृथ्वी आणि नैसर्गिक जगाकडे नंदनवन म्हणून
पाहू नये, अशी परलोकावरील श्रद्धेची अपेक्षा आहे. त्याकडून आपण परिपूर्णतेची अपेक्षा करू नये तर ते पूर्ण होण्याची (पारलौकिक जीवनात) आशा बाळगू शकतो. अशा प्रकारे आपण त्याचे दोषही उघड करू शकतो. खरं तर, अनेक पर्यावरणीय समस्या स्वत:साठी सुखकारक स्वर्ग निर्माण करण्याच्या मनुष्याच्या तीव्र इच्छेचा परिणाम आहेत आणि यासाठीच तो नैसर्गिक देणग्या आणि त्याच्या मौल्यवान स्रोतांचा अंधाधुंध वापर करू लागतो. या जगात नंदनवनाची प्राप्ती (स्वर्गप्राप्ती) शक्य नाही. तथापि, कुरआनात उल्लेखित धर्मशास्त्र आणि स्वर्गातील बोधकथा एक उच्च ध्येय ठेवतात जेणेकरून हे ऐहिक जीवन नेहमीच ईश्वराच्या मार्गदर्शनानुसार सर्वोच्च पूर्णतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
फक्त पारलौकिक संकल्पनेचा मानवी नैतिकतेशी जवळून संबंध आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. निवाड्याच्या दिवसाविषयी धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशेब द्यावा लागेल कारण तो न्यायाचा दिवस आहे. हा विश्वास लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करतो.
पर्यावरणीय इतिहासकार सायमन (एग्स्दह) पारलौकिक जीवनाचे महत्त्व असे सांगतात -
‘‘पृथ्वी केवळ एक तात्पुरते निवासस्थान आहे या कल्पनेवर आधारित सर्व मानवी क्रियाकलाप असले पाहिजेत (मनुष्य एक श्रेष्ठ निर्मिती असला तरी) आणि आपली कृती विश्वासाचे प्रकटीकरण म्हणून योग्यरित्या प्रशासित केली जाणे आवश्यक आहे. यामध्ये न्याय आणि धार्मिकता तसेच पर्यावरणाच्या समस्यांचे योग्यज्ञान आणि आकलनाचा समावेश आहे.’’
या चर्चेमुळे आम्हाला असा निष्कर्ष काढण्यास मदत होते की पृथ्वीची पर्यावरण व्यवस्था नष्ट करण्याची परवानगी धर्माचा परिणाम नसून धार्मिक जागृतीच्या अभावाचा परिणाम आहे. जॉन हॉट (व्दप्ह प्aल्ुप्ू) यांनी याच मताचे समर्थन करताना धर्मनिरपेक्षतेला याच्या खऱ्या अपराधाबद्दल दोषी ठरवले. धर्मनिरपेक्षतेने ईश्वराला ब्रह्मांडापासून वेगळे करून बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद यांना ही पोकळी भरून काढण्याची संधी दिली. या मतांच्या प्रभावामुळे निसर्गावर मानवी वर्चस्वाची कल्पना नाहीशी झाली.
सर्व प्राणीमात्राची निर्मिती केल्यानंतर अल्लाहने त्यांना एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून ठेवले आणि याच आधारावर जगात संतुलन व समतोल राखला जातो. सर्व प्राणी, सजीव आणि निर्जीव, एक मौल्यवान संपत्ती आहे जी आपल्या अस्तित्वाचा हेतू पूर्ण करण्यात गुंतलेली आहे. जर मनुष्य हे संतुलन बिघडवितो, या नैसर्गिक स्रोतांचा गैरफायदा घेतो, त्यांचा गैरवापर करतो किंवा त्यांचा अपव्यय करतो, त्यांना प्रदूषित करतो तेव्हा त्याचा लौकिक संतुलन आणि न्यायावर परिणाम होईल, जो स्वतः मनुष्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी या नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षण आणि अस्तित्वासाठी कार्य करणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. निसर्गाविरूद्धच्या लढाईत मनुष्याचा पराभव निश्चित आहे. परिणामस्वरूप असे म्हणता येईल की आधुनिक काळातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आधुनिक शोधांचा दुरुपयोगामुळे पर्यावरणीय संकट ओढवले गेले आहे. त्याचा सामना करण्यासाठी धार्मिक शिकवण, नैतिक, मानसिक शुद्धतेला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.

(भाग ४) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४

Success
आतापर्यंत ज्या गोष्टींचा उहापोह करण्यात आला, त्या गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. मात्र यासाठी आपले मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणेही आवश्यक आहे. जर पूर्वीच आपण एखादा विशिष्ट विचार मनात घेऊन बसलो तर कोणतेही सत्य आपल्या अंत:करणास स्पर्श करू शकत नाही, हे निश्चित!शिवाय ज्या ज्या वेळी या जगात अथवा देशात धर्म हा आपल्या मूळ स्वरूपात आला, त्या प्रसंगी या मूळ धर्माकडूनसुद्धा हेच घोषित करण्यात आले. आजसुद्धा या गोष्टी कोणत्या न् कोणत्या स्वरूपात जगातील समस्त धर्मांत आढळतात. कारण असे की धर्म हा नेहमीच आपल्या मूळ स्वरूपानुसार एकच असतो आणि असे व्हावयासही हवे. अल्लाह एकच आहे! म्हणूनच त्याच्याकडून येणारा संदेशसुद्धा एकच असून त्याचे खरे नाव इस्लाम असे आहे. अर्थातच असा धर्म जो मानवास अल्लाहसमोर आत्मसमर्पण करण्याची शिकवण देतो. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देश वा राष्ट्रात त्याच्या पैगंबरांच्या माध्यमाने जो धर्म आला, तो मुळात इस्लाम हाच धर्म होय. मात्र जसजसा काळ लोटत गेला तसतसे लोकांनी आपापल्या सवलतीनुसार परिवर्तन घडवून आणले. पाहिजे ते समाविष्ट केले आणि नको ते वजा केले. याच प्रकारातून मग विविध शाखा फुटल्या आणि बरेच कृत्रिम धर्म निर्माण झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच असून या मूळ धर्माचा आधार निम्नलिखित तीन गोष्टींवर आहे. (१) हे विश्व अल्लाहशिवाय निर्माण झालेले नसून अल्लाहशिवाय कार्यरत नाही. तो सर्वगुणसंपन्न असून त्याच्या समान इतर कोणीही नाही.(२)अल्लाहने आपली महत्त्वपूर्ण निर्मिती अर्थात मानवजातीस आपला संदेश पैगंबरांच्या माध्यमाने पाठविला आणि प्रत्येक  काळ  व  प्रत्येक  भूभागात  पाठविला. कोणासही यापासून वंचित ठेवले नाही. (३) समस्त मानवांना एके दिवशी आपल्या खऱ्या स्वामीसमोर अर्थात अल्लाहसमोर आपल्या भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. प्रत्येकास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला आणि वाईट कर्माचा वाईट मोबदला मिळणारच.
या तीन गोष्टी इस्लामच्या मूलभूत गोष्टी असून इस्लाम हाच धर्म नेहमीकरिता अल्लाहकडून आलेला सत्यधर्म होय. सर्वांत शेवटी इस्लाम धर्म आपल्या मूळ, परिपूर्ण आणि अंतिम स्वरूपात अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत जगात आला. त्यांचे पूर्ण जीवन आजही आपल्या मूळ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही पैगंबराच्या जीवनाचा मूळ इतिहास आज उपलब्ध नाही.याचप्रमाणे अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झालेला ईशग्रंथ अर्थात कुरआनसुद्धा मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त जगात इतर कोणताही ईशग्रंथ त्याच्या मूळ स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. आता जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आणलेला धर्म अर्थात इस्लाम धर्म मार्गदर्शन करू शकतो. या काळात स्वत:ला इस्लाम धर्माचा अनुयायी असण्याचा दावा करणारे भरपूर लोक आहेत. मात्र अल्लाहच्या दृष्टिकोनात खरा मुस्लिम केवळ तोच आहे, जो इस्लामच्या नियमांवर आपले विचार आणि भावना तसेच आपले जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. इस्लाम व कोण्या विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांचा, विशिष्ट भू-प्रदेशाचा अथवा विशिष्ट काळापुरता धर्म नसून तो अल्लाहकडून समस्त मानवजातीकरिता व जग अस्तित्वात असेपर्यंत एक विश्वव्यापी जीवनमार्ग आहे. या धर्माची सर्वप्रथम शिकवण अशी की मानवाने एकाच अल्लाहस या जगाचा निर्माता, पोशिंदा आणि पूज्य स्वीकारावे. त्याचीच एकट्याची आराधना करावी, त्याच्या आदेशांचे पालन करावे. इतर कोणासही त्याच्यासम ठरविता कामा नये. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा करता कामा नये, कोणाच्याही आदेशाचे पालन करता कामा नये. अर्थातच यावर पूर्ण विश्वाससुद्धा असावा की अल्लाहच पूज्य आणि आराध्य असून केवळ त्याच्या मर्जी व कायद्यानुसारच जीवनाची वाटचाल करावी, आपले तन-मन-धन केवळ त्याला समर्पित करावे, त्याच्याच समोर नतमस्तक व्हावे, त्यालाच मदत मागावी, त्याचाच धावा करावा आणि त्याच्याच मर्जीचे जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत पालन करावे. या विश्वाचा व आपला स्वामी त्यालाच मानावे. त्याच्याव्यतिरिक्त इतक कोणाचीही आज्ञा पाळता कामा नये. इतर कोणाही व्यक्तीने दाखविलेला मार्ग स्वीकारून जीवनाची वाटचाल करून स्वत:चे वाटोळे करून घेता कामा नये.
जी व्यक्ती अशा स्वरूपात अल्लाहचा स्वीकार करते, ती ईशमार्गाशिवाय इतर कोणाच्याही मार्गदर्शनाचा अवलंब करू शकत नाही. स्वत:च्या इच्छा-अभिलाशा आणि आवडीनिवडीसुद्धा अल्लाहच्या मर्जीच्या स्वाधीन करते. अल्लाहने आपल्या अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिलेल्या जीवनमार्गानुसार जीवन जगून यशस्वी व कल्याणकारी जीवनाची वाट धरावी. इस्लामची दुसरी अट अशी आहे की अल्लाहने जीवन जगण्यासाठी जो मार्ग दिला तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिला आणि इस्लाम हेच त्याचे नाव होय. अर्थात माणसाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना अंतिम पैगंबर मानावे आणि अशी धारणा ठेवावी की ते या समस्त जगवासियांकरिता अल्लाहचा संदेश घेऊन आले आणि सर्वांचे पैगंबर व कल्याणकारी सुधारक आहेत. त्यांच्यानंतर आता कोणीही पैगंबर येणार नाही. यासाठी त्यांच्यावर अल्लाहकडून अवतरित झालेला अंतिम ईशग्रंथ हा कुरआन असून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या ग्रंथानुसार स्वत: प्रत्यक्ष कर्म करून दाखविले. इस्लामची तिसरी धारणा अशी की मानवाने या गोष्टीवर श्रद्धा ठेवावी की त्यास मृत्यूपश्चात आपल्या प्रत्येक कर्माचा अल्लाहसमोर जाब द्यावा लागणार आहे. यासाठी त्यास परत जीवन प्राप्त होणार असून ते कधीही संपणारे नसेल. माणसास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला मोबदला स्वर्गरूपी जीवनाच्या स्वरूपात मिळणार आणि वाईट कर्मांचा मोबदला नरकाच्या यातनामय जीवनाच्या स्वरूपात मिळणार आहे, हे निश्चित!
या इस्लामच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण शिकवणी असून या शिकवणी माणसाच्या अंत:करणाची साद होय. हे समजून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही!

- मौ. मुहम्मद फारूक खान

    पैगंबर मुहम्मद (स.) यांचा शत्रूंशी व्यवहार करूणामय, दया, प्रेम, ममत्व व सहानुभूती पूर्ण होता. पैगंबर (स.) यांना अल्लाहने समस्त मानव जातीसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे. ते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे म्हणूनच त्यांनी शत्रूंबरोबर सुद्धा शत्रूंबरोबर सुद्धा न्यायपूर्ण व सदाचारी व्यवहाराची शिकवण दिली.
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या कोणत्याही शत्रूंशी वैयिक्तक बदला घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही तर शत्रूंना दयाळुपणा आणि ममत्वाची वागणुक दिली, यास इतिहास साक्ष आहे. हे वर्णन पुस्तिकेत आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 202    -पृष्ठे - 12     मूल्य - 08    आवृत्ती - 1 (2012)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/9ql9r0sxvj88lvowffxfgxr4nzplg3eq

मुहम्मद (स.) एका ईश्वराचे पैगंबर म्हणून प्रचार करू लागले. चाळिशी नुकतीच संपली होती आणि आयुष्याचा उरलेला भाग आता ईश्वरदत्त महान कार्यासाठी ते अर्पण करू लागले आणि त्याच्यावर प्रथम विश्वास कोणी ठेवला? त्याच्याजवळच्या मंडळींनी, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उत्कट तळमळीची व सत्याची याहून दुसरी कोणती निशाणी? जवळची मंडळी त्यांचा नवधर्म घेती झाली. त्यांना शंका वाटली नाही. हा ईश्वरी पुरुष आहे असे त्यांना वाटले. त्यातही सर्वांत आधी खदीजा (रजि.) ती पहिली अनुयायी, पैगंबर मुहम्मद (स.) यांस ईशज्ञान झाले आहे असे जर कोणी पाहिल्याने विश्वासपूर्वक मानले असेल तर ते खदीजाने. मूर्तिपूजा सोडून, त्या परम कारुणिक ईश्वराची, मुहम्मद (स.) यांच्याबरोबर प्रथम जर कोणी प्रार्थना म्हटली असेल तर ती खदीजा (रजि.)  यांनी  मुहम्मद (स.) यांच्या ईश्वरी जीवनकार्यावर तिनेच प्रथम श्रद्धा ठेवली. इतकेच नव्हे तर पुढील विवादात तिने त्यांना सदैव धीर दिला. जेव्हा ते कावरेबावरे होऊन त्या रात्री तिच्याकडे आले व ‘‘खदीजे, खदीजे; पांघरुण घाल माझ्यावर, कपड्यात लपेट मला.’’ असे म्हणाले त्यावेळेस ईश्वराने खदीजेच्या रूपानेच जणू त्यांना धीर दिला, शांती दिली. तीच त्यांना म्हणाली, ‘‘उठा.’’ तिनेच त्यांचा बोजा हलका केला. माझी तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणाली. लोकांना वाटेल ते बडबडू द्या. लक्ष नका देऊ, असे म्हणाली. ईश्वराने ज्ञान दिले, खदिजेने शांती व विश्वास दिला. दुसरे अनुयायी अली (रजि.) व तिसरा अनुयायी जैद (रजि.) झाला. तो गुलाम, ज्याला मुहम्मद (स.) यांनी एकदम मुक्त केले होते, त्याने हा नवधर्म घेतला आणि चौथे अनुयायी कोण झाले? अबू बकर (रजि.), ते मक्केतील श्रीमंत व्यापारी होते. उदार, शहाणे, धोरणी, शांत, धीराचे होते. मुहम्मद (स.) यांना ‘अल्-अमीन’ म्हणत, तसे यांना ‘अस्-सिद्दीक’ म्हणजे सच्चा असे म्हणत. मुहम्मद (स.)याहून दोनच वर्षांनी ते लहान होते. त्यांना काबाचा सेवक असेही म्हणत. अशा वजनदार व थोर पुरुषाने हा नवधर्म एकदम स्वीकारला, या गोष्टीचा मोठा नैतिक परिणाम झाला. त्यांच्या पाठोपाठ आणखी पाच या नवधर्मात आले. अबू बकर (रजि.) पुढे खलीफा झाले. तसेच पुढे खलीफा होणारे उस्मान (रजि.) हे मिळाले. उस्मान (रजि.) हा प्रतिस्पर्धी उमैया घराण्यातील होता. दुसरा अब्दुल रहमान (रजि.), तिसरा साद (रजि.)- ज्याने पुढे इराण जिंकून घेतला. चौथा खदीजा (रजि.) चा नातलग जुबैर (रजि.) आणि पाचवा तो शूर लढवय्या तल्हा (रजि.). उस्मानने नवधर्म स्वीकारला हे ऐकून त्याचे चुलते संतापले.
त्यांनी उस्मान (रजि.)ला बांधले व विचारले, ‘‘पूर्वजांच्या धर्मापेक्षा तुला का हा नवा धर्म पसंत आहे? जो नवा धर्म तू घेत आहेस तो जोपर्यंत तू सोडणार नाहीस, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही.’’ परंतु उस्मान (रजि.) उत्तरला, ‘‘त्या ईश्वराचीच शपथ घेऊन मी सांगतो, की तो नवधर्म मी प्राण गेला तरी सोडणार नाही!’’
काही अनुयायी कनिष्ठ व सामान्य जनतेतीलही मिळाले. मक्केतील काही निग्रो गुलाम या नवधर्माचा स्वीकार करते झाले. तो हब्शी ‘बिलाल’(रजि.) इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. इस्लामी धर्माचा पहिला मुअज्जिन म्हणून बिलाल प्रसिद्ध आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा हा अत्यंत निष्ठावंत शिष्य होता. अभंग श्रद्धेचा धर्मात्मा होता. मुहम्मद (स.) प्रेमाने म्हणत, ‘‘बिलाल म्हणजे अ‍ॅबिसिनियाचे सर्वोत्तम फळ आहे!’’
मुहम्मद (स.) यांच्या अत्यंत जवळचे आप्त मित्र त्यांचे पहिले अनुयायी. मुहम्मद (स.) यांची तळमळ, त्यांची दैवी स्फूर्ती, त्यांची पवित्र शिकवण, त्यांची उत्कटता यांचा हा पुरावा आहे. या जवळच्या सूज्ञ मंडळींना मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीत वंचना दिसती, अश्रद्धा वा केवळ ऐहिकता दिसती तर मुहम्मद (स.) यांची सामाजिक सुधारणेची व नैतिक पुनरुज्जीवनाची सारी आशा मातीत मिळाली असती. या अनुयायींनी छळ सहन केले. संकटे सोसली. शारीरिक वेदना व मानसिक दु:खे सहन केली. बहिष्कार, मरण यांनाही तोंड दिले. मुहम्मद (स.) यांच्या ठायी त्यांना यत्किंचितही काळे दिसते तर अशी अडग श्रद्धा जन्मेल का? खिस्तावर त्यांच्या भावांचा जवळच्या मंडळींचा यत्किंचितही विश्वास नव्हता. परंतु मुहम्मद (स.) या बाबतीत दैववान होते. मुहम्मद (स.) यांच्या अनुयायांची अचल श्रद्धा हीच त्यांच्या स्वीकृत कार्याविषयीच्या अत्यंत प्रामाणिकपणाची खूण आहे.

माननीय इब्ने अब्बास (र.) निवेदन करतात, मी एकेदिवशी प्रेषितांच्या मागे उंटावर स्वार होतो, तेव्हा त्यांनी सांगितले,
“हे मुला! मी तुला काही गोष्टी शिकवितो, १. अल्लाहच्या दीनचे (जीवनपद्धतीचे) रक्षण कर. अल्लाह तुझा संरक्षक होईल. २. अल्लाहच्या दीनचे रक्षण कर. तुला अल्लाहची कृपा लाभेल. ३. मागावयाचे झाल्यास अल्लाहजवळ माग. तुला मदतीची गरज भासल्यास अल्लाहची याचना कर.
हे जाण की साऱ्या लोकांचे तुला फायदा पोहोचविण्याबद्दल एकमत झाले तरी ते तुला फायदा पोहोचवू शकत नाहीत. फक्त अल्लाहने निश्चित केले आहे त्याच प्रमाणात तुझा फायदा होईल आणि सर्वांनी मिळून तुझे नुकसान करण्याचे ठरविले तरी हे तुझे नुकसान करू शकत नाहीत. फक्त अल्लाहने ठरविले आहे त्याच प्रमाणात तुझे नुकसान होईल."
(मिश्कात) दीनचे रक्षण करणे म्हणजे इस्लाम धर्मानुसार आचरण करणे. इस्लामच्या सर्व आज्ञा पाळणे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे बिधाड, कमी-जास्त होऊ न देणे. इस्लाममध्ये नवीन प्रथा, गोष्टी, रूढी, रीतीरिवाज यांचा शिरकाव होऊ न देणे. इस्लामचे मूळ स्वरूप कायम राखणे.

माणसाने इस्लामचे संरक्षण केल्यास त्याला अल्लाहच्या कृपेचा लाभ होऊन त्याचे संरक्षण होईल.
सर्व काही अल्लाहच्या हाती आहे म्हणून माणसाने अल्लाहचीच याचना करावी व त्याचेच आज्ञापालन करावे.

पर्यावरणीय संकटाची खरी कारणे

पर्यावरणीय संकट हे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा परिणाम आहे हे नाकारता येत नाही. वैज्ञानिक युगात एका तासातील विनाश हा गैर-वैज्ञानिक युगातील हजारो वर्षांच्या विश्वाच्या विनाशापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की विज्ञान स्वतः दोषी आहे, परंतु ही एक दैवी देणगी आहे ज्यामुळे ब्रह्मांडातील शक्तींवर विजय मिळविणे आणि त्याचा उपयोग करणे आमच्याकरिता शक्य झाले आहे. पश्चिमेमध्ये आधुनिक विज्ञानाचा विकास निरीश्वरवादाच्या प्रभावाखाली झाला असल्याने ते कोणत्याही प्रकारच्या मूलभूत व्यवस्थेपासून मुक्त आहे, त्याचे संपूर्ण लक्ष्य भौतिक प्रगतीवर केंद्रित आहे. त्याने या आध्यात्मिक उत्क्रांतीकडे आणि परिणामी मानवी प्रगतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. धर्मनिरपेक्ष भौतिकवादाच्या प्रभावाखाली असलेली सभ्यता, ईश्वर व पारलौकिक संकल्पनेशी पूर्णपणे अपरिचित आहे. तिचे मूळ स्वार्थ आणि शोषणावर आधारित आहे, ज्यामध्ये मनुष्याचे अंतिम लक्ष्य साधेपणा, भौतिकवाद, सुख शोधणे आणि पाशवी वृत्तीचा अवलंब आढळून येतो. भावनांच्या समाधानाशिवाय आणि शारीरिक इच्छांच्या पूर्ततेशिवाय काहीही नाही. मानवी प्रगतीऐवजी मानवी विनाशात आधुनिक साधने आणि संसाधने वापरली जात आहेत आणि भौतिक प्रगतीचे शिखर गाठूनदेखील आत्मिक समाधान शून्य आहे. याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
आधुनिक भौतिक सभ्यतेने मनुष्याला ईश्वर आणि निसर्गापासून विभक्त केले आहे आणि केवळ त्याच्या आत्म्याचाच नाश केला नसून त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय व्याधीमुळे त्याचे शारीरिक अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, विचारवंत आणि बुद्धिजीवी पर्यावरणीय संकटाची कारणे कार्यरत आहेत. मुस्लिम आणि बिगर मुस्लिम विद्वान पर्यावरणीय संकटाला नैतिकतेचे आणि मूल्यांचे संकट म्हणत आहेत, जो खरे तर मानवी जीवनातील आध्यात्मिक पोकळीचा परिणाम आहे. पर्यावरणीय संकटाचे विश्लेषण करताना, विविध विचारवंतांनी लोभ, दारिद्र्य, संपत्तीचे असमान वितरण, लोकसंख्यावाढ, असीमित आर्थिक वाढीची लालसा, उद्योग, राष्ट्रीयत्व, सैन्यवाद, उपभोक्तावाद आणि भौतिकवाद यामागील कारणे दर्शविली आहेत. आणि त्याच्या निराकरणासाठी, नम्रता, कृतज्ञता, न्याय, दया आणि सजीवांसाठी असलेले प्रेम यासारख्या नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांवर जोर देण्यात आला आहे, परंतु नैतिक मूल्यांचा वास्तविक स्रोत धर्म आहे, नास्तिकवाद नाही आणि धर्माशिवाय नैतिक मूल्यांची कल्पना करणे अशक्य आहे.
सध्याची परिस्थिती ही व्यक्तिशः आणि समाजावरील धर्माची पकड ढिली पडण्याचा परिणाम आहे, कारण मानवी चरित्र सुधारण्यासाठी आणि नैतिक बदनामी रोखण्यासाठी धर्मापेक्षा प्रभावी आणि सामथ्र्यवान प्रेरणा दुसरी असूच शकत नाही.
‘न्यूयॉर्क अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अध्यक्ष क्रॅसी मेरीस म्हणाल्या:
‘‘शिष्टाचार व आदर, औदार्य, चरित्र, नैतिकता, उच्च आदर्श आणि ज्यांना दैवी गुण म्हटले जाऊ शकते ते निरीश्वरवादातून निर्माण होऊ शकत नाहीत, जो खरे तर त्याची निर्मिती हाच एक विचित्र प्रकार आहे ज्यात माणूस स्वत:ला ईश्वराच्या जागी ठेवतो. विश्वास आणि श्रद्धाविना सभ्यता नष्ट होईल. शिस्तीचे परिवर्तन अराजकतेत होईल, आत्मनियंत्रण अदृश्य होईल आणि सर्वत्र विनाशा पसरेल. ईश्वरावरील आपली श्रद्धा आणखीन दृढ करण्याची सध्या गरज आहे.’’
जबाबदार व संतुलित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी आणि नीतिमान सभ्यतेच्या स्थापनेसाठी ईश्वर आणि पारलौकिक जीवनाच्या संकल्पनेची आवश्यकता आहे. वहीदुद्दीन खान यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘‘खरे तर सभ्यता निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचे एकमेव आणि योग्य उत्तर म्हणजे धर्म होय. धर्म आपल्याला वास्तविक, विधिमंडळ, कायद्याचा सर्वात योग्य आधार, जीवनाच्या प्रत्येक बाबतीत सर्वांत योग्य मार्गदर्शन करतो, ज्याच्या प्रकाशात आपण जीवनाचा संपूर्ण आराखडा बनवू शकतो. ते मार्गदर्शन कायद्याचा मानसिक पाया प्रदान करतो. या मार्गदर्शनाशिवाय हा कायदा व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतो. त्याच्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीकरिता समाजात अनुकूल वातावरण निर्माण होते. अशा प्रकारे धर्म आपल्याला सर्व काही प्रदान करतो. आपल्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी आम्हाला जे हवे आहे ते देतो तर निरीश्वरवाद यापैकी काहीही देऊ शकला नाही आणि खरोखर देऊ शकत नाही.’’
(भाग ३) - क्रमश:

- शाहजहान मगदुम
(मो.: ८९७६५३३४०४)

Dua
या सृष्टीचा निर्माता, पोशिंदा, स्वामी व प्रभू परम दयाळू व कृपाळू अल्लाह असून तो मानवजातीच्या कल्याणकारी मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठवितो, जे या जगाच्या पाठीवर वसणाऱ्या समस्त मानवांना योग्य मार्गदर्शन करतात, सत्य-असत्य, खरे-खोटे, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय आणि चांगल्या-वाईटाचा फरक सांगतात. सत्याची, न्यायाची आणि सदाचाराची स्थापना करतात. माणसास माणूस बनवितात.
मात्र आपण याबरोबरच हेसुद्धा पाहिले आहे की मानव हा एक स्वतंत्र आणि स्वावलंबी जीव आहे. तो इतर सजीवांप्रमाणे विवश, निष्प्रभ आणि हतबलसुद्धा नाही. चांगल्या आणि वाईट, सत्य आणि असत्य मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य त्याच्यात आहे. सत्याचा मार्ग हा पैगंबरांनी दाखविलेला मार्ग असून पैगंबरांच्या मार्गाविरूद्ध असलेला मार्ग म्हणजे असत्य, अन्याय व दुराचाराचा मार्ग होय. या जगाच्या इतिहासात लोकांनी याच दोन मार्गांपैकी एका मार्गाची निवड केली आहे. आजही याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आज आपण पाहतो की या जगामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ईशमार्गावर चालणारेही आहेत आणि ईशद्रोहीसुद्धा आहेत.
या परिस्थितीवर गंभीरपणे जर आपण विचार केला तर हा प्रश्न उभा राहतो की सरळमार्गी आणि दुष्कर्मी वा अन्यायी लोकांत साम्य आहे काय? दोघांचा परिणाम सारखाच होईल काय? मुळीच नाही. शक्यही नाही. कारण अल्लाहकडून मार्गदर्शन अथवा जीवनाचा योग्य आणि सत्यमार्ग मिळाल्यास तसेच हा सत्यमार्ग स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असूनही न स्वीकारणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात येणार नाही आणि स्वीकारणाऱ्यांना त्यांच्या आज्ञाधारकतेचा कोणताही बदला मिळणार नाही, हे तर बुद्धीला मुळीच पटणारे नाही.
अल्लाहच्या पैगंबरांनी अल्लाहचा संदेश मानवजातीला प्रदान केला व या संदेशाबरोबरच या वस्तुस्थितीबाबतही खबरदार केले आहे की वर्तमान जीवनाची ही मुदत मुळात एका परीक्षेपुरता कार्यकाळ आहे. अल्लाहने मानवास चांगले वा वाईट निवडण्याचे जे स्वातंत्र्य प्रदान केले, ते यासाठीच केले की मानवाची परीक्षा घ्यावी की कोणती व्यक्ती आपल्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आणि चांगल्या प्रकारे वापर करते, सदुपयोग करते आणि कोणती व्यक्ती याचा दुरुपयोग करते. अल्लाहने मानवजातीस मार्गदर्शन देण्याचा एक पैलू हादेखील आहे की लोकांनी हे मार्गदर्शन स्वीकारावे आणि याचा योग्य व पुरेपूर मोबदला प्राप्त करावा. त्याचप्रमाणे ज्यांनी हे मार्गदर्शन डावलले आणि आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून मनमानी केली, त्यांना याची शिक्षाही भोगावी लागणार. म्हणूनच अल्लाहच्या पैगंबरांनी मानवजातीस स्पष्ट शब्दांत खबरदार केले की हे वर्तमान जीवन कर्म करण्याचे कार्यक्षेत्र आहे. या जीवनात जी व्यक्ती अल्लाहने दाखविलेल्या मार्गदर्शनानुसार जीवनाची  वाटचाल करील, अल्लाहने दाखविलेल्या सत्यमार्गावर जीवन व्यतीत करील, नेकी आणि सदाचाराचे जीवन व्यतीत करील, त्यास याचा उत्तम मोबदला मिळेल. त्याचप्रमाणे जी व्यक्ती या मार्गाविरूद्ध जीवन व्यतीत करील, त्या व्यक्तीस कठोर शिक्षा मिळेल. त्यांनी याविषयीदेखील मानवजातीस खबरदार केले की आम्ही (पैगंबर) अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समस्त मानवांना हे दाखवू इच्छितो की हा विश्वरूपी कारखाना एके दिवशी नष्ट करण्यात येईल. समस्त मानवजातीस परत जीवित करण्यात येईल आणि प्रत्येकास प्रभु, अल्लाहसमोर आपापल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. या गोष्टीचा जाब की अल्लाहने प्रदान केलेल्या शक्ती व सामर्थ्यचा, स्वातंत्र्य व क्षमतेचा, कौशल्य व पात्रतेचा वापर कोणत्या व कशा पद्धतीने केला. अल्लाहच्या मर्जीनुसार केला की त्याच्या अवज्ञेनुसार केला. याबरोबरच अल्लाहने आपल्या पैगंबरांच्या माध्यमाने हेदेखील स्पष्ट केले की अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याचे प्रचंड बक्षीस मिळेल, अर्थात अविनाशी असलेली स्वर्गप्राप्ती होईल. याउलट अल्लाहची अवज्ञा करून इतर कुणाच्या आज्ञेनुसार वा मर्जीनुसार जीवन जगण्याचे फलित अत्यंत वाईट मिळेल, अर्थात कधीही न संपणाऱ्या नरकयातना मिळतील. यातून कधीही सुटका होणार नाही.
मृत्यूनंतर परत जीवन मिळणार की नाही, मृत्यूनंतरचे जीवन कसे असेल, याविषयीची माहिती मिळविण्याची साधने आपल्याकडे नाहीत. काहींचे मत आहे की आपले हेच वर्तमान जीवन एवढेच आहे. मृत्यूनंतर कोणतेही जीवन नाही. मृत्यूनंतर जीवनाची कल्पना करणे हे केवळ एक कपोलकल्पित बाब आहे. वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही. मात्र जर असे असते तर प्रश्नच मिटला असता. यावर विचार करण्याची गरजसुद्धा पडली नसती. कसले पुण्य आणि कसले पाप? पद्धतशीरपणे मस्तपैकी जीवन भोगायचे नि मरून जायचे, संपले! मात्र ही वस्तुस्थिती विसरण्यासारखी मुळीच नाही की आपल्या वर्तमान जीवनाशी या कल्पनाविलास वाटणाऱ्या बाबीचा दृढ संबंध आहे. विशेषत: आपल्या नैतिक जीवनाचा तर याशीच संबंध आहे. उदाहरणार्थ, आपण थोड्या वेळेसाठी असे समजू या की मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे जीवन नाही आणि आपल्या जीवनाचा वा भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार नाही, ज्या जीवनाच्या यशापयशाची मदार वर्तमान जीवनावर आहे. तर याचा परिणाम निश्चितच आपल्या वर्तमान जीवनावर असा होईल की आपल्या जीवनातून पाप-पुण्याचा कोणताही मोबदला जर मिळत नसेल आणि पापाची कोणतीही शिक्षा भोगावी लागणार नसेल तर मग चांगले आणि सदाचाराचे विनाकारण लचांड गळ्यात घालून घ्यायचेच कशाला? मग वाटेल तसे जगायचे. नैतिकता, मानवता आणि सदाचाराची बिनधास्त होळी करायची. आपले जीवन रंगवून घेण्यासाठी इतरांच्या रक्ताने बिनधास्त शिमगा खेळायचा, वाटेल त्याला खपवायचे, वाटेल ते हिसकावून घ्यायचे, साऱ्यावर आपलीच मनमानी स्थापन करायची. कारण जीवन हे एकदाच मिळालेले असते, ते वाटेल तसे भोगायचे, मौज-मजा करण्याची कोणतीही संधी चुकवायची नाही. कारण आपल्याला कोण विचारणार, आपला कोण जाब घेणार? मात्र हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. यावर गंभीरपणे विचार केल्याशिवाय मुळीच गत्यंतर नाही. आपल्याला यावर विचार करावाच लागणार आहे की मृत्यूनंतरच्या जीवनातील यशापयशाचे परिणाम आपल्या वर्तमान जीवनावर काय होतात.
आपण जर यावर खरोखरच विचार केला तर आपल्याला हे स्पष्टपणे आढळून येईल की या जगात बरेच लोक चांगले व वाईटही आहेत आणि बरेचजण सदाचारी व दुराचारीही आहेत. दुराचारी लोक अत्यंत मौज-मस्तीत जीवन व्यतीत करून जगाचा निरोप घेतात. त्यांच्या जीवनात समस्त सुखसाधने असतात. तर याउलट सदाचारी व सद्वर्तनी लोक दु:ख, समस्या, अडचणी आणि ना-ना प्रश्नांशी झुंजत असताना दिसतात. असेच समस्याग्रस्त जीवन कंठून ते या जगातून निघून जातात. या ठिकाणी विचार करण्यासारखी बाब अशी आहे की जे लोक सद्वर्तनी, सत्यनिष्ठ आणि सदाचारी असतात व याच सत्यनिष्ठतेपायी संकटमय जीवन जगत असतात, अल्लाहच्या निर्णयाचे प्रत्येक संकटमय पावलावर स्वागतच करीत असतात, मोठमोठ्या संकटांना न घाबरता आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता सत्याची कास सोडत बसतात, न्याय आणि सदाचाराकरिता अख्खे जीवन अल्लाहला सर्मिपत करतात आणि याच सत्याच्या मार्गावर जीवनाची वाटचाल करून जीवनाची सांगता करतात, त्यांच्या मनात निश्चितच ही जाणीव तीव्रपणे उचंबळून येते की जगाचा निर्माता व पोशिंदा प्रभू अल्लाह निश्चितच न्यायी आहे, तो आपल्या सत्यनिष्ठा व सदाचाराचा, आपल्या भावनांच्या बलिदानांचा, आपल्या सत्य समर्पणाचा निश्चितच उत्तम मोबदला देईल. या सदाचाराच्या बदल्यात एका अशा स्थायी, समाधानकारक, दु:खरहित आणि आनंददायी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. एका अशा जीवनाची गरज आहे जेथे निश्चितच सदाचाराचे चांगले फळ आणि दुराचाराची शिक्षा मिळावी. शिवाय ज्या माणसाला या गोष्टीवर विश्वास असेल की या विश्वाचा रचयिता, निर्माता, सृष्टा, पोशिंदा, प्रभु अल्लाह आहे आणि त्यानेच हे सारे काही आपल्या सामर्थ्यने निर्माण केले, आपले स्वामित्व गाजविले, आपल्या प्रभुत्वाने सारी सृष्टी पोसली, तोच प्रभु अल्लाह निश्चितच सहजरित्या परत ही सृष्टी निर्माण करील. यात त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याचा प्रश्नच नाही. अशा अमर्याद सामर्थ्यशाली निर्मात्या प्रभु अल्लाहसाठी प्रत्येक मानवास परत जीवन देण्यात काहीही अडचण येणार नाही. मग शेवटी अल्लाहच्या पैगंबरांनी परलोकी जीवनाची जी खबर अथवा वार्ता दिली, त्यात मुळीच शंका वाटण्याचे कारण नाही.
आणखीन एक सांगायचे झाल्यास तुम्ही कदाचित म्हणाल की माणसाला चांगल्या आणि वाईट कर्माचे फलित मिळण्यासाठी दुसऱ्या जीवनाची काय गरज आहे? हे तर या जीवनातही शक्य आहे! येथेसुद्धा दु:ख आहे, कष्ट आहे, सुख-समाधान आहे. येथेही उच्च-नीच आहे आणि या आधारावर हेदेखील जर मान्य करण्यात आले की याच जगात आपल्या पाप-पुण्याईचा मोबदला प्राप्त करण्यासाठी याच जगात वारंवार माणूस जन्म घेऊ शकतो. पुण्याईच्या बदल्यात सुखी-समाधानी जीवन प्राप्त होऊ शकते, पापकर्मांच्या मोबदल्यात दु:ख व यातनामय जीवन मिळू शकते. मात्र यावर थोडाजरी विचार केला तर तुम्हाला निश्चितच या गोष्टीवर विश्वास येईल की पाप-पुण्याच्या बदल्यात या वर्तमान जीवनात तर काहीही मिळणे शक्य नाही. जर आपण हे मान्य केले की सध्या अडीअडचणीत असलेली व्यक्ती मागच्या जन्मीच्या पापाची फळे भोगत असून सुखी-समाधानी व्यक्ती मागील जन्माच्या पुण्याची फळे चाखत आहे, तर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असा उभा राहतो की या जगात सर्वप्रथम पाऊल ज्या व्यक्तीने ठेवले होते, त्यास कोणत्या जन्माच्या पुण्य अथवा पापाचे फळ भोगण्यासाठी या जगात पाठविण्यात आलेले होते?कारण यापूर्वी तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक जीवन नव्हते. यापेक्षाही आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की आज जे लोक सुखी-समाधानी आहेत अथवा समस्या व संकटांनी ग्रस्त जीवन कंठीत आहेत, त्याच्यासंबंधी हे सांगता येणे शक्य नाही की ते पुण्यकर्माची बक्षिसे प्राप्त करताहेत की पापाची कडू फळे चाखत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या दीन-दु:खी आणि संकटग्रस्त व्यक्तीस पाहा. कदाचित तो या अवस्थेच्या स्वरूपात शिक्षा भोगत असेल. कारण मागच्या जन्मी कदाचित त्यास धन-दौलत अगर सत्ता मिळालेली असेल आणि त्याने कदाचित दुराचार वा पापकर्मे केली असतील आणि त्याच्या परिणामस्वरूपी तो या जन्मी शिक्षा भोगत असेल. याबरोबरच हेदेखील शक्य आहे की ही अवस्था मागील जन्मातील चांगल्या कर्मांचे उत्तम बक्षीस भोगण्यासाठी असावी. कारण मागच्या जन्मी तो कदाचित एखादा प्रामाणिक कुत्रा असावा आणि त्याच्या प्रामाणिकतेचे फळ म्हणून त्यास हे मानवी जीवन मिळालेले असेल. मग हे जीवन समस्या आणि संकटांनी ग्रस्त का असेना. शिवाय या अडचणींव्यतिरिक्त आणखीन एक मोठी अडचण अशी दिसते की या जन्मात माणूस पुढील जन्मासाठी काही कष्ट करून पुण्याईची कमाई करीत असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर असेही म्हणणे वावगे ठरणार नाही की या वर्तमान जीवनात माणूस पुढील जन्मासाठी काही पुण्य कमावित असेल अथवा पुढील जीवनाच्या यशापयशाची पूर्ण भिस्त या जीवनाच्या पुण्य व पापकर्मांवर असेल. मग यातदेखील आणखीन एक अडचण अशी निर्माण होते की एक माणूस एकीकडे शिक्षा भोगत आहे वा बक्षीस मिळवित आहे आणि दुसरीकडे तर हीच शिक्षा आणि बक्षीस त्याच्या पुढील जन्माकरिता यशापयशाचे कारण ठरत असेल, हे कोणत्याही पैलूने बुद्धिसंमत वाटत नाही.
या समस्त बाबींव्यतिरिक्त आणखीन एक पैलू असा की आपण जर कोणत्याही दृष्टिकोनानुसार या वारंवार जन्म घेण्यावर विचार केला तर ते शक्य वाटत नाही. या जीवात जो माणूस जेवढी कर्मे करतो, ती सर्व प्रकरणे त्याच्या जीवनाबरोबरच संपूर्ण जाणारी बाब मुळीच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या नराधमाने एखाद्या निष्पाप माणसाचा वध केला आणि जर त्या खुन्यास या अपराधास्तव फाशीची शिक्षा देण्यात आली तर हे प्रकरणदेखील इथेच संपत नाही. कारण त्याचा एक गुन्हा असा होता का त्याने एका निष्पाप माणसाला जीवातून उठविले. मात्र याबरोबरच मृताच्या परिवारास असंख्य आर्थिक, मानसिक छळ सोसावा लागला. बिचाऱ्याची मुलेबाळे रस्त्यावर आली, पत्नी विधवा व निराधार झाली. मुले अनाथ झाल्याने शिक्षणाची सोय झाली नाही आणि दर-दर भीक मागून अख्खे जीवन व्यर्थ घालवावे लागले. शिवाय नंतरच्या कित्येक पिढ्या या दुष्कृत्यामुळे वाया गेल्या अर्थात त्याच्या खून करण्याच्या अपराधाचे परिणाम फक्त मृतकासच नव्हे तर परिवार, समाज आणि न जाणो कोणाकोणास भोगावे लागले असतील. जर सत्य आणि न्यायासहित त्यास त्याच्या पापाची पूर्णपणे शिक्षा द्यायची झाल्यास केवळ फाशी दिल्याने कसे चालेल?मृतकाच्या परिवारजनांचे जे जीवन उद्ध्वस्त झाले त्याचे काय? जर फाशी होताच त्याच्या पापाची शिक्षा म्हणून त्यास कुत्रा अथवा मांजराच्या जन्मी घालण्यात आले तर ते असे ठरेल जणू एखाद्याचे खाते बंद करण्यापूर्वीच त्याचा हिशेब पूर्ण करण्याचा एखाद्याने निर्णय घ्यावा. हीच परिस्थिती पुण्यकर्मांचीदेखील आहे. माणूस बरीच कर्मे अशी करतो, ज्यांचे उत्तम परिणाम त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा मानवजातीस प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने एखादी शाळा काढली. जोपर्यंत लोक त्या शाळेत शिक्षण घेत राहतील तोपर्यंत त्यास याचे पुण्य लाभत असेल. कोण जाणे किती शतकांपर्यंत ही शाळा सुरू राहील आणि लोकांना शिक्षणासारखी अमूल्य संपत्ती प्राप्त होत राहील. अशा अवस्थेत त्याला मेल्यानंतर तात्काळ त्याच्या पुण्याचा मोबदला कसा देता येईल. कारण अद्याप त्याच्या पुण्यकर्माचे खातेच बंद झालेले नसणार.
अशाप्रकारे विचार केल्यास हीच बाब स्पष्ट होते की जर माणसाला त्याच्या पुण्य वा पापाचे योग्य फलित मिळावयास हवे असेल तर त्यास एक असे जीवन हवे जे हे जग नष्ट झाल्यानंतर सुरू व्हावे आणि ते परलोकी जीवन कायमस्वरूपी व स्थायी स्वरूपाचे असावे. ज्या ठिकाणी माणसाला पूर्ण रूपाने त्याच्या पुण्य वा पापांची फलिते मिळणे शक्य व्हावे. कारण या वर्तमान जगातील क्षणभंगूर जीवन या फलितांसाठी पुरेसे ठरू शकत नाही, मात्र निश्चित!

- अबू सलीम मुहम्मद अब्दूल 

    या पुस्तिकेत यशाचा खरा व एकमेव मार्ग सांगितला गेला आहे. यासाठी मनुष्याचे मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणे आवश्यक आहे. पूर्व ग्रहदूषित मन कोणतेही सत्य आत्मसात करू शकत नाही. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देशात त्याच्या प्रेषितांच्या माध्यमाने जो धर्म आला तो मूळात इस्लाम धर्म होता.
    परंतु कालपरत्वे लोकांनी मूळ धर्मात फेरबदल केला आणि बरेच कृत्रिम धर्म तयार झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच आहे आणि तो म्हणजे इस्लाम म्हणूनच इस्लामच्या मूलभूत शिकवणी मनुष्य अंत:करणाची साद होय, या विषयी विवेचन आहे.

आयएमपीटी अ.क्र. 201   -पृष्ठे - 16     मूल्य - 08      आवृत्ती - 1 (2012)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/0m3zmhli79vcnn4tdee2e603sskyga4bMadina
अब्दुल्लाह यसरिबला सासुरवाडीस जात असता वाटेत मरण पावला. त्याचे वय फक्त पंचवीस वर्षांचे होते आणि त्याच्या दु:खी पत्नीने पुढे लवकरच एका मुलाला जन्म दिला. तेच आपले पैगंबर मुहम्मद (स.)! जो पुढे सर्व अनाथांचा मायबाप झाला, तो जन्मताच पितृहीन होता! इ. स. ५७१ ची तारीख. जेव्हा हा महापुरुष जन्मला. अब्राहा सैन्याच्या नाशानंतरचा तो पन्नासावा दिवस होता.
अरब चालीप्रमाणे एका खेडूत दाईने दूध पाजून महुम्मद (स.) यांस वाढविले. पुढे तिने अमीनाजवळ ते वाढलेले लेकरू आणून दिले. अमीना मोठ्या प्रेमाने व काळजीने देवाचा हा ठेवा वाढवू लागली. तिचे हृदय दु:खाने पोळलेले होते. परंतु मुहम्मद (स.) यांच्या बालमूर्तीकडे पाही व शांत राही. परंतु तीही लवकरच मरण पावली. मुहम्मद (स.) लहानपणीच पोरके झाले! मुहम्मद (स.) यांचे वय सहा वर्षांचे, आई-बापाच्या प्रेमाची पाखर जगात कुठे मिळणार? तसे वात्सल्य कोण देणार? मुहम्मद (स.) यांच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. पोरक्या मुलांना फसवू नका, त्यांना प्रेम द्या, असे कुरआनात अनेक उल्लेख आहेत. पोरक्या मुलांची कधी दीनवाणी स्थिती होत असेल, याचा त्यांना अनुभव आलेला होता. ती आठवण ते कधी विसरले नाहीत.
आजोबांनी, अब्दुल मुत्तलिब यांनी मुहम्मद (स.) यांना आपल्याजवळ घेतले. या नातवावर ते फार प्रेम करीत. देवाला बळी देऊ केलेल्या मुलाचा हा मुलगा. पुढे चालून अब्दुल मुत्तलिब आजारी झाले. आपला मुलगा अबू तालिब यास त्यांनी बोलावले व मरणशय्येवरून सांगितले, ‘‘हा तुझ्या भावाचा पोरका मुलगा तुझ्या स्वाधीन मी करत आहे. त्याला प्रेम दे.’’ आणि इ. स. ५७९ च्या अखेर अब्दुल मुत्तलिब देह सोडून गेले.
चुलते अबू तालिब यांच्या घरी मुहम्मद (स.) राहू लागले. लहानपणापासूनच मुहम्मद (स.) विचारी होते. ते नेहमी विचारमग्न असत. डोळे मोठे काळेभोर. जणू आसारांतील सार शोधायला आले होते. सत्यशोधक, जिज्ञासू डोळे. कधी हा मुलगा एकटाच टेकड्यांवर जाई व सृष्टीसौंदर्य पाहत बसे. तेथे रमे, तल्लीन होई. स्वभाव मोठा सौम्य व गोड. दुसऱ्याच्या दु:खाने लगेच दु:खी होत. गहिवरत. फार करुण, कोमल हृदय होते ते. असा भावनोत्कट मुलगा सर्वांचा लाडका झाला. चुलत्या- पुतण्यांत अपार प्रेम जडले. ‘जणू देवदूताने येऊन त्यांची हृदये उघडून आत प्रकाश भरला.’
एकदा चुलत्याबरोबर ते सीरियात व्यापारी काफिल्याबरोबर गेले. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आजोबांनीच दरवर्षी यमन व सीरियात मक्केहून काफिला पाठविण्याची पद्धत सुरू केली होती. ती अद्याप होती. या प्रवासात मुहम्मद (स.) यांनी सामाजिक दु:खे पाहिली, ऐकली. धार्मिक अध:पात सर्वत्र झालेला पाहिला. सीरियाच्या या प्रवासातच वाटेत एके ठिकाणी त्यांना एक खिश्चन साधू भेटला होता. या प्रवासात त्यांनी जे जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्याची स्मृती त्यांच्या हृदयातून कधीही गेली नाही.
मुहम्मद (स.) यांना घरचे कामधाम करावे लागे. ते उंटांना चारायला नेत. शेळ्या घेऊन जात. मुहम्मद (स.) पुढे म्हणत असत, ‘‘ईश्वराने मेंढपाळांतूनच पैगंबर पाठविले!’’ उंट व शेळ्या-मेंढ्या चारताना ते डोंगरावर बसत. सृष्टीसौंदर्य पाहत. पृथ्वीच्या व आकाशाच्या अनंत सौंदर्याची उक्ती कुरआनात पदोपदी आहे. आकाशात व धरेवर सर्वत्र पाहणाऱ्यास ईश्वराच्या खुणा आहेत, असे कुरआन पदोपदी सांगत आहे. ईशज्ञान मुहम्मद (स.) यांना विश्वव्यापक प्रभूच्या सौंदर्यानेच करून दिले असावे. कुरआनातील भव्य सृष्टीवर्णनांची बीजे या वेळेसच, शेळ्या-मेंढ्या, उंट चारतानाच-मुहम्मदांच्या हृदयभूमीत पेरली जात होती.
मुहम्मद (स.) आता तारुण्यात होते. विशी-पंचविशीचे वय. या वेळेस ते पुन्हा सीरियात काफिल्याबरोबर गेले. कुरैश घराण्यातील एक स्त्री खदीजा. तिच्या मालाचे उंट घेऊन मुहम्मद (स.) गेले. खदीजा ही दूरची नातलग होती. खदीजा श्रीमंत होती. उदार होती. मुहम्मद (स.) परत आले. त्यांची कार्यनिष्ठा व प्रामाणिकपणा यांचा खदीजेवर परिणाम झाला आणि त्यांचा विवाह झाला. खदीजेचे वय अधिक होते. ती गतविधवा होती. चाळीस वर्षांची होती. मुहम्मद (स.) पंचवीस वर्षांचे. परंतु मुहम्मद (स.) ही आनंदाने लग्नास उभे राहिले!
हे लग्न अत्यंत कल्याणप्रद व शुभमंगल असे झाले. दोघांचे एकमेकांवर फार प्रेम. खदीजेचे हृदय अत्यंत प्रेमळ होते. मुहम्मद (स.) विषयी अपार प्रेम वाटे. या लग्नाने मुहम्मद (स.) यांना शांती, विश्रांती मिळाली. ज्या महान कार्यासाठी त्यांचा जन्म होता, त्याचा विचार करायला त्यांचे मन मोकळे झाले. प्रेमळ स्त्रीहृदय त्यांना मिळाले. या अवघ्या जगात त्यांच्या पैगंबर कार्यावर तिनेच प्रथम विश्वास ठेवला. निराशेत ती त्यांना शांतकरी, आधार देई, धीर देई. ती आशेची ज्योत विझू देत नसे. जेव्हा जगाचाच नव्हे तर स्वत: मुहम्मद (स.) यांचाही स्वत:वर विश्वास बसेना तेव्हा तिने विश्वास ठेवला! ज्या वेळेस मुहम्मद (स.) यांच्या डोळ्यांसमोर सर्व जग अंधारमय होते, तेव्हा तिने श्रद्धेचा, आशेचा दीप प्रज्वलित ठेवला.
माननीय खदीजा (रजि.) पासून मुहम्मद (स.) यांना सात मुले झाली. तीन मुलगे व चार मुली. परंतु सारे मुलगे बालपणीच निधन पावले. मुहम्मद (स.) यांना मुलगा राहिला नाही. त्यांचे शत्रू त्यांचा उपहास करण्यासाठी ‘अल् - अब्तर’ म्हणजे निपुत्रिक असे त्यांना संबोधित.
लग्नानंतरची पंधरा वर्षे मक्केत आत्मचिंतनात गेली. ते फारसे बोलत नसत. परंतु जेव्हा बोलत तेव्हा जोर देऊन बोलत, ठासून बोलत, विचारपूर्वक, जाणून समजून बोलत. पैगंबर मुहम्मद (स.) जे बोलत ते ऐकणारा कधी विसरत नसे. त्यांच्या बोलण्याचा ऐकणाऱ्यांवर विलक्षण परिणाम होई. पुष्कळ वेळा ते अशांत, चिंतीत, कष्टी असे असत. परंतु एकदम कोठूनतरी त्यांना स्फूर्ती येई. उत्साह संचारे. खिन्नता अस्तंगत होई. प्रसन्नता मुखावर पसरे. ते हसू बोलू लागत.
आणि लहान मुले म्हणजे त्यांचा प्राण! ही भावी पिढी जणू ते तयार करीत होते. रस्त्यांत मुलांना थांबवतील, त्यांच्या पाठीवरून हात फिरवतील. त्यांना लहानलहान गोष्टी सांगतील, त्यांच्याबरोबर दऱ्याखोऱ्यातून, पहाडांतून भटकतील. त्यांच्याबरोबर खेळतील. खिस्तही लहान मुलांचे असेच शौकीन होते. मुले म्हणजे देवाची प्रभा! या पंधरा वर्षांच्या काळात अंतपरीक्षण चालले होते. श्रद्धा व संशय यांची लढाई चालली होती. भावी कार्याची सिद्धता, तयारी होत होती. आध्यात्मिक ऐक्य अंतरंगी अनुभवीत होते.
मक्केत लोकांचे जीवन सुरक्षित नसे. त्यांची मालमत्ता लुटली जाई. त्यांच्या बायकामुली पळविल्या जात. पैगंबर मुहम्मद (स.) यांना हा अन्याय पाहवेना. ‘हल्फ-उल्-फझूल’ नावाची त्यांनी एक संस्था स्थापिली. प्राचीन काळी अशी एक संस्था होती. त्या प्राचीन संस्थेचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पुनरुज्जीवन केले. या संस्थेच्या दबदब्यामुळे दुबळ्यांस व गरिबांस संरक्षण मिळे. या संस्थेने जरा धमकी देताच काम होत असे. दुष्कर्मीयांच्या दुष्ट कृत्यांस आळा बसला. ही संस्था पुढे सातव्या शतकाच्या अखेरपर्यंत होती.
पैगंबर  मुहम्मद (स.) गंभीरपणे विचार करू लागले. त्यांचा आत्मा उड्डाण करू लागला. सृष्टीच्या गुढ रहस्यात त्यांचा आत्मा डोकावू लागला. अनंततेच्या दरीत पाहू लागला. सत्य काय असत्य काय? जीवन मरण काय? या विश्वाच्या गोंधळातही काही व्यवस्था आहे का? मुहम्मद (स.) शोधू पाहत होते. त्यांना तळमळ लागली आणि देवाची वाणी त्यांच्या पवित्र, उदात्त हृदयाने ऐकली व ती वाणी जगाला नवजीवन देती झाली.
‘‘ऊठ, जगाला सत्याची सूचना दे. प्रभुचे गौरवगान गा. त्याचे वैभव गा.’’
असा स्पष्ट आदेश मिळाला. अंत: शंका-संभ्रम नाही. मुहम्मद (स.) आता उभे राहिले. अचल श्रद्धेने व अपार विश्वासाने उभे राहिले. सारे छळ, यातना, हालअपेष्टा यांना न जुमानता उभे राहिले. सत्यासाठी उभा राहिलेला हा महापुरुष असत्यासमोर शेवटपर्यंत नमला नाही.
हा सारा मनाचा खेळ होता का? मुहम्मद (स.) यांना जे देखावे दिसत, जे शब्द ऐकू येत, जे देवदूत दिसत ही सारी का प्रक्षुब्ध मनाची निर्मिती होती? ही का केवळ स्वत:ची स्वप्ने? सांगता येणार नाही. मानसशास्त्राचा अभ्यास अर्वाचीन शास्त्रज्ञांना अद्याप करावयाचा आहे. इंद्रियातील अशीही एक ज्ञानप्राप्तीची शक्ती मनुष्याला आहे. ते ज्ञान खोटे असे कोण म्हणेल? ते अनुभव खोटे असे कोण म्हणेल? महापुरुष सांगतात की आम्हाला असे असे अनुभव आले. ते प्रत्यक्षाच्याच गोष्टी बोलतात, करतात. तुम्हा-आम्हाला जे प्रत्यक्ष नसते ते त्यांना असते. त्यांना ते पाहण्याचे डोळे असतात. जणू निराळीच इंद्रिये मनाला फुटतात! काही असो, ती आत्मवंचना खास नव्हती.
‘‘तो मी ईश्वराचा दूत जिब्रिल (अ.). मी तुला ईश्वराचा मंगल संदेश घेऊन आलो आहे, ऊठ ईश्वराचा महिमा गा, उत्साही हो, पवित्र हो, शुद्ध हो, प्रत्युपकाराची, फळाची अपेक्षा ठेवून उपकार करू नको, तू भले कर, सर्वांचे मंगल कर, तुझ्या मंगल कार्याला फळ येईल, वाट पाहा,  ईश्वरावर श्रद्धा ठेवून धीराने, उतावीळ न होता वाट पाहा.’’
असे शब्द त्यांना ऐकू येत. जणू समोर दिसत आणि संशय झडझडून टाकून आत्मविश्वासाने एका ईश्वराचे, त्या अद्वितीयाचे गुणगान गावयास ते उभे राहिले.

माननीय उमर (र.) निवेदन करतात,
एके दिवशी आम्ही अल्लाहच्या प्रेषितांच्या जवळ बसलो होतो. अचानक एक माणूस आमच्यासमोर आला. त्याचे कपडे पांढरेशुभ्र होते व केस काळेभोर होते. त्याच्या चेहऱ्यावर प्रवासाचा शीण नव्हता व आमच्यापैकी कुणी त्याला ओळखत नव्हते. तो पुढे होऊन प्रेषितांच्या गुडघ्याबरोबर गुडघे जुळवून त्यांच्यासमोर बसला आणि आपले हात प्रेषितांच्या मांडीवर ठेवून नम्रपणे म्हणाला,
“हे मुहम्मद (स.) ! इस्लाम काय आहे?"
प्रेषितांनी सांगितले, “इस्लाम म्हणजे अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही आणि मुहम्मद हे अल्लाहचे प्रेषित आहेत याची ग्वाही देणे, नमाज कायम करणे, जकात देणे, रमजानचे रोजे करणे आणि प्रवासाची ऐपत असल्यास बैतुल्लाहचा हज करणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले.”
आम्हाला आश्चर्य वाटले की हा माणूस प्रेषितांना प्रश्न विचारतो व त्याचे उत्तर बरोबर असल्याचे स्वत:च सांगतो. त्यानंतर त्या माणसाने विचारले, “ठीक, आता मला 'ईमान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, "ईमान'चा अर्थ हा की, अल्लाह, त्याचे फरिश्ते, त्याचे ग्रंथ, त्याचे प्रेषित, परलोक आणि चांगल्या व वाईट दैवावर श्रध्दा ठेवणे."
तो माणूस म्हणाला, “आपण बरोबर सांगितले." व पुन्हा त्याने विचारले, “मला ‘एहसान' म्हणजे काय ते सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “तुम्ही अल्लाहची उपासना अशाप्रकारे करा की, जणू तुम्ही त्याला पाहत आहात. तुम्ही जरी त्याला पाहत नसला तरी नि:संशय तो तुम्हाला पाहत आहे.”
त्याने पुन्हा विचारले, “मला त्या वेळेबद्दल (अंतिम निवाड्याचा दिवस) माहिती सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “ज्याला विचारले जात आहे, तो प्रश्नकर्त्यापेक्षा अधिक जाणत नाही."
तो माणूस म्हणाला, “ठीक, निदान मला त्या वेळेच्या काही निशाण्या तरी सांगा."
प्रेषितांनी सांगितले, “दासी आपल्या मालकाला जन्म देईल. अनवाणी चालणारे व उघडे शरीर असणारे कंगाल व मेंढपाळ मोठमोठ्या इमारती बांधण्याच्या बाबतीत एकदुसऱ्याशी चढाओढ करतील."
नंतर तो माणूस निघून गेला आणि मी काही वेळ तेथे थांबलो.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले, “हे उमर ! हा प्रश्नकर्ता कोण होता हे तुला माहीत आहे काय?"
मी उत्तर दिले की, “अल्लाह व त्याचे प्रेषित यांनाच अधिक माहीत."
प्रेषितांनी सांगितले, “ते जिब्रईल (अ) होते. तुमच्याजवळ तुम्हाला तुमच्या दीनची शिकवण देण्यासाठी आले होते."
(मुस्लिम) अल्लाहच्या सर्व ग्रंथांवर, त्याच्या सर्व प्रेषितांवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे. अल्लाहने माणसाला निर्माण केले. त्याला लागणाऱ्या अन्न, पाणी, वस्त्र, निवारा वगैरे सर्व गोष्टींची व्यवस्था जशी अल्लाहने केलेली आहे, त्याचप्रमाणे त्याने त्याच्या शिकवणीचीदेखील व्यवस्था केली आहे. ईश्वराने निरनिराळ्या काळात व भूभागात आपले प्रेषित पाठविले. त्यांच्यावर आपले ग्रंथ उतरविले प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत व कुरआन हा अल्लाहचा शेवटचा ग्रंथ आहे. या सर्व वस्तुस्थितीवर श्रद्धा बाळगणे आवश्यक आहे.
दासी आपल्या मालकाला जन्म देईल, याचा अर्थ असा की संतती अवज्ञाकारी व विद्रोही निपजेल. मुले आई-वडिलांचा आदर राखणार नाहीत. त्यांच्याशी चांगली वागणूक ठेवणार नाहीत. आईला दासी समजून तिच्याबरोबर एखाद्या मालकाप्रमाणे वर्तणूक केली जाईल.
अपात्र लोकांच्या हाती अयोग्य मार्गाने भरमसाठ पैसा येईल व ते लोक मोठमोठ्या इमारती बांधून ईर्षा व गर्व करू लागतील आणि आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करीत राहतील.
जगात अशी परिस्थिती निर्माण झाली की जाणावें, आता जगाचा शेवट जवळ आलेली आहे.

Human
इमानवंतांसाठी मानवाच्या मौलिक अधिकारांची कल्पना काही नवी कल्पना नाही. हे शक्य आहे की दुसर्‍यांच्या दृष्टीने या हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून सुरू होत असेल अथवा इंग्लंडच्या मॅग्नाकोटापासून प्रारंभ झाला असेल. परंतु, आमच्यासाठी या कल्पनेचा आरंभ फार पूर्वीच झाला आहे. या प्रसंगी मानवाच्या मौलिक अधिकारांवर प्रकाश टाकण्यापूर्वी संक्षेपात मी हे सांगणे आवश्यक समजतो की मानवी हक्कांच्या कल्पनेचा आरंभ कसा झाला. वस्तुत: ही काहीशी आश्‍चर्यकारक गोष्ट आहे की जगात मनुष्यच एकमात्र असा प्राणी आहे ज्याच्या संबंधाने खुद्द माणसातच वारंवार हा प्रश्‍न उत्पन्न होत राहिला आहे की, त्यांचे मौलिक अधिकार काय आहेत? मनुष्याव्यतिरिक्त दुसरी सृष्टी या विश्‍वात राहत आहे तिचे अधिकार खुद्द निसर्गाने दिले आहेत. ते आपोआप मिळत आहेत, तेही त्याच्यासाठी विचार केल्याविना मिळत आहेत. परंतु केवळ मनुष्य अशी निर्मिती आहे, ज्याच्यासंबंधी प्रश्‍न होतो की त्याचे अधिकार काय आहेत आणि याची गरज भासते की त्याचे अधिकार निश्‍चित केले जावेत. तितकीच आश्‍चर्याची गोष्ट ही सुद्धा आहे की या विश्‍वातील कोणतेही सजातीय असे नाहीत जे आपल्याच सजातीयांशी असा व्यवहार करीत आहे जसा एक मनुष्य आपल्या सजातीय व्यक्तीशी करीत आहे. एवढेच नव्हे तर आपण पाहतो की प्राणीमात्राची कोणतीही जात अशी नाही जी दुसर्‍या कोणत्या जातीच्या प्राण्यावर केवळ आनंद व मजेखातर अथवा त्यांच्यावर शासक बनण्यासाठी हल्ला चढविते.
    निसर्गाच्या नियमाने एका प्राण्याला दुसर्‍या प्राण्याचे खाद्य बनविले आहे, तर ते केवळ अन्नाच्या सीमेपर्यंतच त्यावर तो हल्ला करतो! कोणतीही हिंस्त्र पशू असा नाही जो अन्नाच्या आवश्यकतेशिवाय अथवा ती गरज पूर्ण झाल्यानंतर विनाकारण जनावरांना ठार करून त्यांची थप्पी लावत असेल, खुद्द आपल्या सजातीयांशी प्राणीमात्राचा तसा व्यवहार नाही, जसा मनुष्य आपल्या सजातीय मनुष्यप्राण्यांशी करतो. संभवत: हा परिणाम त्याच्या त्या श्रेष्ठत्वाचा आहे. जो महान अल्हाने प्रदान केलेल्या बुद्धिमत्ता व शोधक शक्तीचा हा चमत्कार आहे ! माणसाने जगात ही असामान्य वर्तणूक धारण केली हे सत्य आहे. सिंहानी अद्याप कोणतीही सेना उभी केली नाही. कोणत्याही कुत्र्याने आजपर्यंत दुसर्‍या कुत्र्यांना गुलाम बनविले नाही. कोणत्याही बेडकाने दुसर्‍या बेडकांचे तोंड बंद केले नाही. हा मनुष्यच आहे, ज्याने श्रेष्ठ अल्लाहच्या आदेशांची पर्वा न करता जेव्हा त्याने दिलेल्या शक्तींचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला तेव्हा आपल्याच सजातींवर अत्याचार करण्यास सुरवात केली. जेव्हापासून मनुष्य या पृथ्वीतलावर आहे तेव्हापासून आजतागायत सर्व पशूंनी इतक्या माणसांचे जीव घेतले नसतील जितके माणसांनी केवळ दुसर्‍या महायुद्धात इतर माणसांचे जीव घेतले. यावरून सिद्ध होते की माणसाला खरोखर दुसर्‍या माणसांच्या मौलिक हक्कांची कसलीही चाड नाही. केवळ अल्लाहच आहे ज्याने मानवजातीचे या बाबतीत मार्गदर्शन केले आहे आणि आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने मानवी अधिकारांबद्दलचे ज्ञान पुरविले आहे. वस्तुत: मानवी अधिकारांची निश्‍चिती करणारा मानवांचा सृजनकर्ताच असू शकतो. म्हणून त्या सृजनकर्त्याने मानवाचे अधिकार अत्यंत तपशीलवार सांगितले आहेत.        

- सय्यद अबुल आला मौदूदी रहे. (मानवाचे मौलिक अधिकार या पुस्तकातून)

पर्यावरण :
पर्यावरणाचा अर्थ शब्दकोषात स्थिती आणि स्वरूपाच्या अर्थासह वापरला जातो, ज्यास अरबीमध्ये ‘बाईट’ म्हणतात. पर्यावरणाचा एक अर्थ खालीलप्रमाणे आहे : जे व्यक्ती आणि समूहाभोवती असते आणि त्यास प्रभावित करते, त्याला म्हणतात नैसर्गिक पर्यावरण, सामूहिक पर्यावरण आणि राजकीय पर्यावरण.
पर्यावरण हा शब्द आसपासच्या सर्व गोष्टींचा संदर्भ देतो.डॉ. सईदुल्लाह काझी लिहितात : ‘‘पर्यावरण प्रदूषण फक्त हवा, पाणी, जमीन आणि मातीशी संबंधित नाही तर त्यात नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांचादेखील समावेश आहे.’’ आपले जीवन आणि जगण्यासाठी ज्या गोष्टी आमच्याशी संबंधित आहेत त्या सर्व गोष्टी जसे की गृहनिर्माण, अन्न, पेय, श्वासोच्छवास, वैद्यकीय उपचार आणि काम, तसेच संवाद आणि संबंध अवलंबून असलेल्या सर्व बाबी. या संपूर्ण स्थितीला पर्यावरण म्हणतात.
जर पर्यावरणात समतोल असेल तर मानवी जीवन निरोगी आणि शांत राहील आणि जर पर्यावरण बिघडले तर जीव धोक्यात येईल. जीवनाच्या इतर सर्व बाबींबद्दल, इस्लाम आपल्याला पर्यावरणाशी संबंधित सुवर्ण नियमदेखील प्रदान करतो ज्याद्वारे आपण इस्लाम धर्म आणि जगात दोन्ही ठिकाणी यश मिळवू शकतो.
याच कारणास्तव सर्वशक्तिमान अल्लाहने पर्यावरण संतुलित केले आहे. यामध्ये निर्माणकर्त्याची उच्च कारागिरी स्पष्ट नैसर्गिक पर्यावरण एका विशिष्ट मार्गाने तयार केले आहे, जोपर्यंत त्यामध्ये मानवी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत ते संतुलित राहील, कारण अल्लाहने पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असलेला जीवनाचा प्रत्येक घटक विशिष्ट गुणधर्म आणि उपयुक्ततेसह तयार केला आहे. अल्लाहने सूचना दिली आहे की,
‘‘आम्ही भूतलाचा विस्तार केला, त्यात पर्वत रोवले, त्यात प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य प्रमाणात उगविली आणि त्यात उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध केली.’’ (कुरआन- १५:१९)
‘‘आणि तोच आहे ज्याने ही पृथ्वी विस्तृत केली आहे, हिच्यात पर्वतांच्या मेखा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या. त्यानेच प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या निर्माण केल्या आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करीत असतो. या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात.’’ (कुरआन- १३:३)
कुरआनमधील या श्लोकांवरून हे स्पष्ट होते की अल्लाहने पृथ्वीवर सर्व काही संतुलित पद्धतीने तयार केले आहे. त्याने अशी वनस्पती तयार केली आहेत की एकीकडे जैविक प्रजातींचे अन्न व गरजा पूर्ण होतात आणि दुसरीकडे वनस्पतींचे प्रकार अशा तऱ्हेने तयार करण्यात आले आहेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.
आपल्या सभोवती जी काही औषधी घटक आहेत त्यांना त्याच औषधी अवस्थेत ठेवण्यात यावे आणि त्यांना सर्व प्रकारच्या आण्विक आणि अवैद्यकीय विनाशांपासून सुरक्षित ठेवले जावे, याद्वारेच पर्यावरणाचे संतुलन प्रस्थापित होते, असे म्हणणे योग्य ठरेल. परंतु जर मनुष्य या नैसर्गिक घटकांचा अविरतपणे वापर करीत राहिला तर त्यांचे संतुलन राखले जाणार नाही आणि याचा परिणाम असा होईल की ते नेहमीप्रमाणे जैवविविधतेच्या गरजा पूर्ण करू शकणार नाहीत.

(भाग २) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
(मो.: ८९७६५३३४०४)

हजरत अली बिन अबु तालीब यांचा जन्म इ.स.599/600 मध्ये झाला. त्यांच्या आई हजरत फातेमा ह्या काबागृहाचा तवाफ करत असतांनाच त्यांची प्रसुती झाली व त्यांनी एका बाळाला जन्म दिला. काबागृह म्हणजे अल्लाहचे घर व अल्लाहच्या घरी जन्मलेल्या बाळाचे नाव अल्लाहची सातत्याने आठवण देणारे असावे, यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्या बाळाचे नाव अली ठेवले. ज्याचा शब्दकोशीय अर्थ उदार / उदात्त असा होतो.
    अबु तालीब हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वडील अब्दुल्लाह यांचे सख्खे भाऊ होते व अब्दुल्लाह हे प्रेषित सल्ल. यांच्या जन्माअगोदरच वारल्याने अबु तालीब यांनीच प्रेषित (सल्ल)यांचा प्रतीपाळ केला होता. येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. आणि अली रजि. हे चुलतभाऊ होत. हजरत अली रजि. हे प्रेषित सल्ल. पेक्षा 30 वर्षांनी धाकटे होते. मात्र इस्लाम स्वीकारण्यामध्ये जगात त्यांचा चौथा तर मुलात पहिला क्रमांक होता. इस्लाम स्विकारतांना ते अवघे 8 वर्षांचे होते. हजरत अली हे प्रेषित सल्ल. यांचे विश्‍वासू साथीदार व जावाई होते. प्रेषित सल्ल. यांच्या कन्या फातीमा ह्या त्यांच्या सुविद्य पत्नी होत. प्रेषित सल्ल. यांचा त्यांच्यावर एवढा विश्‍वास होता की, मदीनाला हिजरत करताना आपल्या स्थानी त्यांनी अंथरूनावर हजरत अली रजि. यांना झोपविले होते.

हजरत अली रजि. यांचे शौर्य
    शौर्याच्या बाबतीत हजरत अली रजि. व हजरत खालीद इब्ने वलीद रजि. हे इस्लामी इतिहासात सुप्रसिद्ध आहेत. त्यातही हजरत अली रजि. यांचे शौर्य अतुलनीय असे होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण अशी दुधारी तलवार होती, जिचे नाव ’जुल्फेखार’ होते. त्या तलवारीपुढे भले-भले गुडघे टेकत. आजकाल प्रसिद्धीच्या झोतात असलेली तुर्की मालिका अर्तुर्गुल गाजी मधील प्रमुख पात्र असलेल्या नायकाच्या तोंडी जो संवाद आहे, त्याबाबतीत अशी अख्यायिका आहे की, ह. अली रजि. संबंधी तो संवाद जन्नतमधील फरिश्ते एकमेकांना बोलताना करत. तो संवाद म्हणजे, ’हजरत अलीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि जुल्फेखारपेक्षा चांगली तलवार कोणतीच नाही’ याच तलवारीने हजरत अली यांनी इ.स.624 मध्ये बदरच्या युद्धात कुरैशच्या 30 लोकांना कंठस्थान घातले होते. त्यांच्या या शौर्यामुळेच प्रेषित सल्ल. यांनी त्यांना ’हैदर’ (न हरनारा) ही पदवी प्रदान केली होती. मुस्लिमांच्या सोबत राहून मुस्लिमांविरूद्धच कागाळ्या करणार्‍या मदिना येथील ज्यूंच्या दोन टोळ्या बनू कैनुका यांना इ.स. 625 व बनू कुरैजा यांना 626 मध्ये मदिनाबाहेर घालविण्याची कामगिरीही हजरत अली रजि. यांचीच.
    इ.स.625 मध्ये झालेल्या ओहदच्या लढाईत जरी मुस्लिमांना यश आले नव्हते तरी एकट्या अली रजि. यांनी आपल्या झुल्फेखारने 200 कुरैशींचा खात्मा केला होता. हे ऐतिहासिक सत्य अनेक इतिहासकारांनी मान्य केलेले आहे. त्या दरम्यान त्यांच्या शरीरावर 16 जखमा झाल्या होत्या. मदिनातून पिटाळून लावलेल्या ज्यूंनी खैबरमध्ये वस्ती करून तेथील भक्कम असा किल्ला ताब्यात घेऊन मुस्लिमांविरूद्ध पुन्हा कागाळ्या सुरू केल्या होत्या. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्या किल्ल्याचा पाडाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. हजरत अबुबकर रजि. व हजरत उमर रजि. यांनासुद्धा तो किल्ला सर करण्याच्या मोहिमेवर पाठविले होते. पण त्यांनाही तो किल्ला सर करता आली नाही. उलट अनेक बिनीचे शिलेदार त्या मोहिमांमध्ये मृत्युमुखी पडले होते. शेवटी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना या मोहिमेसाठी बोलाविलेे. त्यावेळी त्यांची तब्येत ठीक नव्हती. दोन्ही डोळे सुजून लाल झाले होते. अंगात ताप होता. तशाही परिस्थितीत ते हजर झाले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्यांची स्थिती पाहून आपल्या तोंड्यातील लाळ त्यांच्या डोळ्यांत लावली आणि मोहिमेवर रवाना केले. हजरत अली रजि. यांचे डोळे बरे झाले व ते मोहिमेवर रवाना झाले. त्यांनी संपूर्ण ताकदीशी खैबरवर हल्ला चढविला. अनेक धडका देऊन खैबरचे मुख्य दारच उखडून टाकले. यात अली रजि. यांनी तीन पराक्रमी ज्यूंना आपल्या जुल्फेखारने कंठस्थान घातले. येणेप्रमाणे खैबर किंण्याची अशक्यप्राय कामगिरी त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे खैबर जवळील ’फिदक’ येथील सुपीक जमीन लढाई न करता अली रजि. यांच्या ताब्यात आली. लढाई न करता किंल्यामुळे ही जमीन शरीयतच्या नियमाप्रमाणे प्रेषित सल्ल. यांची मालमत्ता बनली.
    इ.स.630 मध्ये मक्का विजयानंतर काबागृहात ज्या 360 मुर्त्या होत्या त्या फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांची मदत घेतली होती. उंचस्थानी विराजमान मुर्त्यांना तोडण्यासाठी विशेषत: हुबल नावाची मुर्ती फोडण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हजरत अली रजि. यांना आपल्या खांद्यावर उभे करून ती मूर्ती फोडून टाकली होती. इतिहासामध्ये प्रेषितांच्या खांद्यावर पाय ठेवण्याचे सौभाग्य फक्त दोन लोकांच्या वाट्याला आले आहे. उपरोक्त प्रसंगी हजरत अली रजि. यांच्या वाट्याला व काबागृह किंल्यानंतर काबागृहाच्या वर चढून अजान देण्यासाठी हजरत बिलाल यांना आपल्या खांद्यावर पाय ठेऊन वर चढण्याचा आदेश प्रेषित सल्ल. यांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी चढून काबागृहावर उभे राहून अजान दिली होती. इ.स.631 पर्यंत अरबस्थानातील बहुतेक लोकांनी इस्लाम स्विकारलेला होता. न स्विकारणारे जे मुठभर लोक होते त्यांना त्या पवित्र भूमीतून निघून जाण्याचा आदेश कुरआनमध्ये आला होता. ते घोषणापत्र वाचण्याची जबाबदारीही हजरत अली रजि. यांनी पूर्ण केली होती.

हजरत अली रजि. व प्रेषित सल्ल. यांच्या उत्तराधिकार्‍याची निवड
    इ.स. 632 मध्ये हज आटोपून मदिनेला परत येतांना खुम-ए-़गदीर येथे प्रेषित सल्ल. यांनी बोलताना सर्वांसमक्ष असे उद्गार काढले होते की, ”अली हे माझ्यासाठी तसे आहेत जसे हजरत हारून अलै. हे प्रेषित मुसा अलै. साठी होते. जो कोणी मला, ”मौला” (मार्गदर्शक) म्हणून स्विकारत आहे त्याने हजरत अली रजि. यांना सुद्धा, ” मौला” म्हणून स्विकारले पाहिजे. हे अल्लाह ! हजरत अलींच्या मित्राचा तू मित्र बन आणि शत्रूंचा शत्रू. ते ज्याला मदत करतील तू त्यांना मदत कर आणि जे त्यांना कमी लेखतील त्यांच्या आशा निष्फळ बनव”. प्रेषित सल्ल. यांच्या या म्हणण्यामुळे मुसलमानांमध्ये एक सामान्य विचार असा दृढ झाला होता की, हजरत अली रजि. हेच प्रेषित सल्ल. यांचे उत्तराधिकारी असतील. शिवाय ते प्रेषित सल्ल. यांचे जावाई असल्यामुळे व प्रेषितांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा दावा हा दावा नसून हक्क आहे, असाही लोकांचा समज होता. त्यातूनच प्रथम खलीफा म्हणून हजरत अबुबकर रजि. यांच्या निवडीला काही लोकांनी विरोध केला होता. नव्हे हजरत अबुबकर रजि. यांच्याविरूद्ध बंड करण्यासाठी उम्मैय्या कुळ गटातील अबु सुफियान सारख्या सरदारांनी हजरत अली रजि. यांना प्रोत्साहित केले होते. पण हजरत अली रजि. हे अत्यंत संयमी व्यक्तीमत्व होते. त्यांनी अशा सर्व सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर खलीफा पदाने तीन वेळेस हुलकावणी दिल्यावरही ते शांत राहिले. त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हजरत फातीमा रजि. यांचा ठाम विश्‍वास होता की जनता हीच त्यांना खलीफा म्हणून निवडेल. तीन्ही वेळेस खलीफा निवडताना हजरत अली रजि. यांचे नाव हे प्रामुख्याने विचारात घेतले गेले होते. तरी परंतु, खलीफा पदाने तीन्ही वेळेस त्यांना हुलकावणी दिली होती. तरी सुद्धा हजरत अली रजि. हे विचलित झालेले नव्हते. तिन्ही खलीफांनी त्यांचा उचित सन्मानसुद्धा राखला होता. पहिल्या दोन खलीफांनी तर त्यांना देशाचे प्रमुख काझी (न्यायाधिश) आणि प्रमुख सल्लागार म्हणून नेमले होते. तथापि, हजरत उस्मान रजि. यांनी त्यांचे काझी पद कायम ठेऊन सल्लागारपदी दुसर्‍याची नेमणूक केली होती.

चौथ्या खलीफा निवडीची प्रक्रिया
    हजरत उस्मान रजि. यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कुफा, बसरा आणि सिरीयाच्या दोन हजार मुस्लिमांनी मदिनामध्ये घुसून खलीफा उस्मान रजि. यांची हत्या करून मदिना शहर ताब्यात घेतले होते. मदिना मस्जिदीमधील सामुहिक प्रार्थनेचे नेतृत्वही तेच करू लागले. सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. लोक आपापल्या घरात बसून होते. त्यांचा सामना करता येत नसल्या कारणाने हजरत उस्मान रजि. यांचे नातलग उमय्यी लोक सिरीयातील अमीर मुआविया रजि. यांच्याकडे निघून गेले होते. अराजक माजल्यामुळे मदिना शहराबाहेरच्या टोळ्यांनी सुद्धा मदिनेत येऊन लुटमार करण्यास सुरूवात केली होती. त्यात पर्शियन व रोमन साम्राज्यातून आलेल्या गुलामांची संख्या मोठी होती. इस्लामी साम्राज्याला राज्यप्रमुखच उरला नव्हता. तीन दिवस झाले तरी खलीफाचे नाव जाहीर झालेले नव्हते. बंडखोरांना परत जावयाचे होते. हजरत अली रजि., हजरत तल्हा रजि. व हजरत जुबेर रजि. यांच्यापैकी एक त्यांना खलीफा म्हणून पाहिजे होता. कारण बंडखोरांमध्येही तीन गट होते. इजिप्तचे, कुफाचे आणि बसराचे तीन गट होते. कुफाच्या बंडखोरांना हजरत जुबेर रजि. तर बसराच्या बंडखोरांना हजरत तल्हा रजि. हवे होते. मात्र इजिप्तच्या बंडखोरांना हजरत अली रजि. हवे होते. चौथ्या दिवशी बंडखोरांचा नेता मलिक बिन अश्तर याने खलीफा निवडीच्या प्रक्रियेची सुत्रे आपल्या हातात घेतली. हजरत अली रजि. यांना त्याने राजकीयदृष्ट्या तुम्हीच खलीफा होणे आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हजरत अली रजि. यांनी स्पष्टपणे नकार दिला. शेवटी पाचव्या दिवशी मलिक बिन अश्तर याने मदिनातील लोकांना मस्जिद-ए-नबवीमध्ये बोलावून खलीफा निवडा नसता अधिक रक्तपात होईल व त्यात तुमच्या सरदारांना उदा. हजरत अली, हजरत तल्हा, हजरत जुबेर रजि. सह अनेक प्रतिष्ठांना ठार केले जाईल, अशी धमकी दिली. तेव्हा लोकांनी मस्जिद-ए-नबवीमध्ये जमा होऊन अली रजि. यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्यांच्या नावाच्या जयघोष ऐकूण हजरत अली रजि. हे स्वत: मस्जिद-ए-नबवीमध्ये हजर राहिले. हजर लोकांपैकी सर्वांनी त्यांना खलीफा म्हणून जबाबदारी उचलण्याची गळ घातली. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ”मला क्षमा करा, जर तुम्ही अन्य व्यक्तीला खलीफा म्हणून निवडले तर. एकनिष्ठ नागरिक म्हणून मी त्यांच्या आज्ञा पाळण्यास बांधिल आहे. पण जर तुम्हाला मीच हवा असेल तर मी अधीच सांगून ठेवतो की, मी कोणाचे ऐकणार नाही. अल्लाहच्या ग्रंथानुसार व माझ्या न्याय बुद्धीनुसार प्रशासन करेन. सर्वांनी ही अट मान्य केली. तेव्हा हजरत अली रजि. यांनी खलीफा बनण्यास होकार दिला.
हजरत उस्मान रजि. यांच्या हत्येनंतर सातव्या दिवशी म्हणजे 24 जून 656 रोजी हजरत अली रजि. यांनी सार्वजनिक रित्या झालेल्या एका कार्यक्रमात खलीफा म्हणून सुत्रे स्विकारली. शपथविधी पार पडल्यानंतर हजरत अली रजि. यांनी सर्वांना उद्देशून जे छोटेखानी भाषण केले ते खालीलप्रमाणे - ,” अल्लाहने आपल्याला एक असा ग्रंथ दिलेला आहे की, ज्यात लोकांना मार्गदर्शन व सर्व चांगला व वाईट गोष्टींबद्दल सांगितलेले आहे. अल्लाहने बेकायदेशीर गोष्टी कोणत्या आहेत, हे ही त्यात नमूद केलेले आहे. त्यांच्यापैकी सर्वात मोठी बेकायदेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिमांचे रक्त सांडणे ही होय. अल्लाहने मुस्लिमांना बंधू म्हणून राहण्याचा आदेश दिलेला आहे. मुस्लिम तोच होय जो की इतर मुस्लिमांना हाताने व जिभेने हानी पोहोचवत नाही. अल्लाहच्या आज्ञा पाळा. (संदर्भ : चार आदर्श खलीफा, शेषेराव मोरे, पान क्र. 485. )

- एम.आय.शेख

Madina
पूर्ण विश्व स्वयं अल्लाहने निर्माण केले, त्यानेच याची रचना केली. तोच एकटा या समस्त विश्वाचा स्वामी आहे. त्याच्याच मर्जी व आदेशाने समस्त कार्य सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरू आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू ज्या कार्यासाठी तयार करण्यात आली ते कार्य ती करीत आहे. प्रत्येक वस्तूचे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत. त्या ठराविक नियमांचे पालन प्रत्येक वस्तू विनातक्रार करीत आहे. पाणी वाहण्याचे, त्याचे बाष्पीभवन होण्याचे, बर्फ बनण्याचे विशेष नियम ठरवून देण्यात आले आहेत ते या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचे, ग्रह आणि नक्षत्रांचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांचे किंचितही उल्लंघन कोणी करू शकत नाही. या नियमांबाहेर तसूभरही सरकण्याचे कोणातही सामर्थ्य नाही. आकाशातून पर्जन्यवृष्टी होते, जमिनीतून फळे, फुले आणि धान्य मिळते. मात्र ही समस्त वनस्पती-सृष्टी स्वत:च्या मर्जीने काहीही करू शकत नाही. अर्थातच या विश्वातली प्रत्येक निर्मिती ज्या कामासाठी तयार करण्यात आलेली आहे ती तेच नेमून दिलेले काम नेमून दिलेल्या नियमानुसार सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पाडीत आहे. विश्वातील सर्वच वस्तू ज्याप्रमाणे अल्लाहची निर्मिती आहेत, त्याचप्रमाणे मानवदेखील अल्लाहची निर्मिती आहे, उत्कृष्ट रचना आहे. मानवाची निर्मिती, त्याचे जीवित राहणे, मरणे वगैरे सर्वकाही निश्चित करून देण्यात आले आहे. याच नेमून दिलेल्या कायद्यानुसार जन्मापासून अर्थात मातेच्या गर्भातील निर्मितीपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्य मानवाकडून होत असते. मानवसुद्धा या नियमांचे तसूभरही उल्लंघन करू शकत नाही. जन्माचे जे नियम आहेत, त्याच नियमानुसार तो जन्म घेऊ शकतो.डोळ्यांनी ऐकण्याचे, कानांनी बोलण्याचे, पायांनी खाण्याचे, तोंडाने चालण्याचे काम करू शकत नाही. तो निश्चितच आपले पूर्ण कार्य अल्लाहने नेमून दिलेल्या निसर्ग-नियमांनुसार करू शकतो. या नियमांच्या किंचितही बाहेर जाऊ शकत नाही.
मानवाचा आणखीन एक पैलू आहे आणि तो असा की मानवाचा दर्जा आणखीन इतर वस्तूंपेक्षा विशेष आहे. मानव हा या सृष्टीची विशेष निर्मिती आहे. अल्लाहने इतर निर्मितींना प्रदान न केलेले विवेकसामर्थ्य आणि बुद्धी केवळ मानवालाच प्रदान केली आणि याबरोबरच त्याला कार्यस्वातंत्र्य प्रदान केले, विचारस्वातंत्र्य प्रदान केले, भूमिकास्वातंत्र्य प्रदान केले. चांगला आणि वाईट या दोन्ही मार्गांपैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. ईशप्रदत्त शक्ती व सामर्थ्यचा चांगल्या आणि वाईट या दोन्ही पद्धतीने वापर करू शकतो. अशाप्रकारे अल्लाहने मानवास एका पैलूने कार्यस्वातंत्र्य दिले.
अल्लाहने मानवास जे कार्यस्वातंत्र्य दिले आहे, त्याचा वापर कसा करावा हा एक सर्वांत मूळ प्रश्न आहे. कारण याच स्वातंत्र्याचा वापर करण्यावर त्याच्या जीवनाचे यश आणि अपयश अवलंबून आहे. याच आधारावर जगाच्या व्यवस्थेचा सुधार आणि बिघाड अवलंबून आहे. तुम्ही कदाचित असेही म्हणू शकता की मानवास जे विवेकसामर्थ्य अल्लाहने प्रदान केलेले आहे, त्याचा वापर करून तो आपल्या कार्यस्वातंत्र्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. मात्र तुम्हाला हेदेखील स्वीकारावे लागेल की मानवाचे विवेकसामर्थ्यसुद्धा मर्यादित स्वरूपाचे आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीची विवेकशक्ती भिन्न असून तो आज घेतलेला निर्णय तीच व्यक्ती उद्या आपल्या अनुभवाच्या आधारावर आपला निर्णय बदलते. घेतलेला निर्णय आजच्या अनुभवाच्या आधारावर चुकीचा ठरविते. एकजण जो निर्णय योग्य ठरवितो, तोच निर्णय दुसराजण चुकीचा ठरवितो. भूतकाळातील घेण्यात आलेले निर्णय ज्याप्रमाणे आज आपण चुकीचे ठरवितो त्याचप्रमाणे आज आपण घेतलेला आणि योग्य वाटणारा निर्णय उद्या येणारी पिढी चुकीचा व अयोग्य ठरवू शकते. यावरून हेच सिद्ध होते की मानव हा केवळ आपल्या स्वत:च्या विवेकसामर्थ्यच्या आधारावर आपला जीवनमार्ग निश्चित करू शकत नाही. त्याला निश्चितच बिनचूक आणि कोणत्याहीत्रुटीपासून मुक्त असलेल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा प्रकारचे परिपूर्ण आणि बिनचूक मार्गदर्शन, जे माणसाच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातही योग्य असावे, प्रत्येक वृत्तीच्या आणि भिन्न स्वभावाच्या व्यक्तीसाठी योग्य ठरावे.
आपण पाहतो की मानवास हे जीवन जगण्यासाठी असंख्य बाबींची आवश्यकता असते. श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, पोषाख, निवारा आणि इतर बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्याचप्रमाणे मानव हा या सृष्टीत जन्मला असून त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त गरजांची मोठ्या कौशल्याने निर्मिती करून देण्यात आलेली आहे. हवा, अन्न, पाणी, निवारा, स्वारी, कपडालत्ता आणि यासारख्या ना-ना वस्तू पुरविण्यासाठी पूर्णपणे प्रबंध अल्लाहने करून ठेवले आहेत. याचाच अर्थ असा की अल्लाहने मानवाची निर्मिती केली, जीवन प्रदान केले आणि त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त वस्तुंची योग्य प्रकारे व्यवस्था केली. म्हणजेच मानवास जीवन व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शनाचीसुद्धा गरज आहे. आपले स्वातंत्र्य, आपली शक्ती आणि सामर्थ्यचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन त्यास नितांत आवश्यक आहे. कारण मार्गदर्शनाशिवाय मानव आपल्या स्वातंत्र्य, शक्ती आणि सामर्थ्यचा गैरवापर करू शकतो आणि अशा प्रकारे त्याचे जीवन विध्वंसाच्या मार्गावर जाऊ शकते. अर्थातच जीवन जगण्यासाठी भौतिक पदार्थ, अन्न, पाणी, निवारा वगैरेची ज्याप्रमाणे गरज आहे अगदी त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शनाचीसुद्धा मानवास नितांत गरज आहे. परमदयाळू आणि कृपाळू अल्लाहने मानवास जगण्याकरिता अन्न, पाणी, हवा आणि इतर वस्तूंची ज्याप्रमाणे पूर्णत: व्यवस्था केली, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या मार्गदर्शनासाठीदेखील पूर्ण व्यवस्था केली आहे आणि यात नवल वाटण्यासारखेसुद्धा काहीही नाही. कारण हे तर मुळीच शक्य नाही की जो अल्लाह भावनांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या विश्वात मातीच्या प्रचंड विशाल ग्रह-तारे, समुद्र, हवा, चंद्र व सूर्याला कामाला लावून अन्न, पाणी, निवारा आणि यासारख्या ना-ना अद्भूत वस्तूंची निर्मिती केली, तो दयाळू आणि कृपाळू अल्लाह मानवाच्या मार्गदर्शनाची गरज पूर्ण करणार नाही.
मानव इतिहास आपल्या समोर आहे. देश आणि राष्ट्रांत मानवास जीवन जगण्यासाठी काही असे कायदे आहेत ज्याविषयी असा दावा करण्यात येतो की हे अल्लाहचे कायदे आहेत. प्रत्येक राष्ट्रात असे बरेचजण होऊन गेले ज्यांचा असा दावा होता की त्यांच्याकडे मानवाच्या योग्य मार्गदर्शनासाठी ईशसंदेश आहे. या महामानवांनी प्रत्येक काळात हे दाखविले की अल्लाहची मर्जी काय आहे आणि त्याने मानवास जे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले आहेत, त्यांचा वापर कशा पद्धतीने व्हावा. या महामानवांनी प्रत्येक काळात सांगितले आहे की चांगले काय आहे नि वाईट काय आहे, सत्य काय आहे नि असत्य काय आहे, पुण्य काय आहे नि पाप काय आहे. ही वेगळी गोष्ट आहे की या बाबतीत बऱ्याच लोकांकडून मूळ सत्य अस्पष्ट होत गेले. उदा.- (१) काही लोकांनी या महामानवाच्या मूळ शिकवणीत इतर काहीजणांच्या शिकवणी समाविष्ट केल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या आज मूळ शिकवणींना भेसळमुक्त करणे अशक्य होऊन बसले. (२) बऱ्याच लोकांनी या महामानवांच्या मूळ चारित्र्यास कथा-दंतकथा आणि साहित्याचा मुलामा दिला. यामुळे आज हे जाणून घेणे अशक्य झाले की कोणत्या महामानवाची शिकवण कोणती आहे. (३) काहीजणांनी या महामानवांना मानव म्हणून न स्वीकारता अल्लाहच्याच स्थानावर स्थानापन्न करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचजणांना भ्रम झाला की साक्षात ईश्वरच मानवाचा अवतार घेऊन पृथ्वीवर अवतरला आणि या जगातून असत्य व अन्यायाचा नाश केला. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहचे मानवरूपात प्रकट होणे हे कोणत्याही प्रकारे शोभणीय नसून तो आपल्या काही नेक भक्तांना मानवाचे मार्गदर्शन करण्यासाठी निवडतो.
ज्या नेक भक्तींची अल्लाहने मानवजातीस सत्यमार्ग दाखविण्याकरिता निवड केली, त्यांनाच मुळात पैगंबर असे म्हणतात. अल्लाह त्यांना प्रत्येक दुराचारापासून मुक्त ठेवतो. त्यांना आपला संदेश देतो जेणेकरून अल्लाहचा हा संदेश त्यांनी मानवजातीपर्यंत पोचवावा. जी व्यक्ती अल्लाहवर तर श्रद्धा ठेवते आणि मान्य करीत नसेल की अल्लाहकडून काहीजण धर्ममार्ग, सत्यमार्ग अथवा न्यायाचा मार्ग दाखविण्यासाठी पैगंबर पाठविण्यात आले, तर तो त्याला मान्य असलेल्या धार्मिक शिकवणी वा ईशमार्गदर्शन हे अल्लाहकडूनच प्राप्त असण्याचा दावा कशाच्या आधारे करू शकतो? पैगंबर हे तर अल्लाह आणि त्याचे दास अर्थात मानवजात या दोहोंदरम्यान एक दुवा आहे. अर्थात असा प्रामाणिक पुण्यकर्मी माणूस जो अल्लाहचा संदेश मानवजातीपर्यंत पोचवितो यालाच पैगंबर अथवा पैगंबर असे म्हणतात.

लेखक
मुहम्मद जैनुल आबिदीन मन्सुरी
डॉ. मुहम्मद अहमद
डॉ. सय्यद शाहिद अली

अनुवादक
सय्यद जाकिर अली

मानवासमोर असे काही प्रश्न आहेत, ज्यांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे मिळणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- जीवन काय आहे? जीवनाचा दााष्टा कोण आहे? आपल्याकडून त्यास  काय अभिप्रेत आहे? त्याने आपल्याला हे जीवन कशासाठी दिले? मृत्यू म्हणजे काय? मृत्यू हाच जीवनाचा अंत आहे काय? की मृत्यूनंतरही जीवन आहे? जर जीवन आहे तर यात सफल  होण्याचा कोणता मार्ग आहे? अथवा या पारलौकिक जीवनात यश मिळविण्यासाठी या ऐहिक जीवनात काय करावे लागेल?
वाचकगणांस पुस्तकाच्या अध्ययनामुळे जीवनाच्या या मूळ आणि महत्त्वपूर्ण सत्याला समजण्यासाठी तसेच त्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासंबंधी पूर्ण मदत मिळेल.

आयएमपीटी अ.क्र. 200      पृष्ठे - 40    मूल्य - 20                आवृत्ती - 2 (Jan 2016)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vuvnwe6wkofsoxi7wax6eolw5pd4ltj1

Muhammad
मुहम्मद (स.) यांचे आगमन केवळ अरबस्तानापुरते नव्हते, ते सर्व जगासाठी होते. कारण त्या काळात सर्वत्रच धार्मिक अवनती झाली होती. झरतुष्ट्र, मोझेस, खिस्त यांनी पेटविलेल्या पवित्र ज्वाला विझून गेल्या होत्या. इराणात श्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडे माजली होती. सत्य धर्म लोपला होता. खिश्चन धर्म आपापसातील मतभेदांनी कत्तली करीत होता. शांती देणारा धर्म रक्तस्नात होत होता! हिंदुस्तानाकडेही निराशाच होती. बुद्धांनी दिलेला नीतिधर्म पुन्हा नष्ट झाला. पुन्हा हिंदूधर्माने उचल केली. अनेक देवदेवतांचा धर्म रूढ झाला. नाना देवतांची पुराणे रचिली जाऊ लागली. निरनिराळ्या देवतांचे उपासक आपसात झगडत होते. शाक्तमते पुढे येत होती. उपनिषदांतील थोर धर्म मूठभर लोकांजवळ होता. इतरांचा धर्म म्हणजे कर्मकांड! स्पृश्य-अस्पृश्य, श्रेष्ठनिष्ठपणा यांना सीमा राहिली नाही. निर्गुण, निराकार ब्रह्म शून्य झाले. कर्मकांड वाढले. सतराशे देवदेवतांचा बुजबुजाट झाला. उच्चनीचपणाला ऊत आला. आणि बौद्धधर्म हिंदुस्तानाबाहेर सर्वत्र होता. त्याचे शुद्ध स्वरूप राहिले नाही. बुद्धांचे अनेक अवतार झाले. नाना बुद्ध निर्माण झाले. त्या त्या देशांनी आपले रंग बौद्धधर्माला दिले. कारण निर्वाणात्मक अभावरूप बौद्धधर्म कोणास पटणार?बुद्धालाच त्यांनी देव केले!

स्त्रियांची सर्वत्र शोचनीय स्थिती होती. गरिबांना मान नव्हता. सर्वत्र दु:ख होते. अपमान होते. माणुसकीचा अभाव होता. खरा धर्म लोपला होता. अशा काळात मुहम्मद (स.) आले. त्यांचे येणे आकस्मिक नव्हते. जगाच्या कोंडलेल्या बुद्धिशक्तींना, आत्मशक्तींना मुक्त करण्यासाठी ते आले. मुहम्मद (स.) यांचे आगमन जगाच्या इतिहासाशी संबद्ध होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक शिथिलतेचा तो काळ होता. अशा परिस्थितीतून नवश्रद्धेचा जन्म होणे अपरिहार्य होते. अशा चिखलातून नवीन सहस्रदल सुंदर कमळ मुहम्मद (स.) यांच्या रूपाने फुलले. जगभर त्याचा गंध गेला. आर्तांस त्यातील अनंत मकरंद मिळाला.
कोठे जन्मला हा महापुरुष? अरबस्तानात जन्मणाऱ्या पैगंबर मुहम्मद (स.) यांस दोन अनुकूलता हव्यात. अरबी धर्माच्या पुण्यक्षेत्री, परंपरागत स्थानी जन्मलेला तो असावा आणि अरब रक्ताच्या थोर कुळात तो जन्मलेला असावा. मुहम्मद (स.) यांना या दोन्ही अनुकूलता मिळाल्या. ते मक्केत जन्मले. काबागृहाची पूजा करणारे श्रेष्ठ कुरेश, त्यांच्या घराण्यात जन्मले.

मक्का शहर अरबस्तानचे वेंâद्र होते. धर्माचे व व्यापाराचे उत्तर-दक्षिण दरीत ते वसले होते. पश्चिमेकडे उंच टेकड्या. पूर्वेकडेही उंच दगड. मक्केच्या मध्यभागी काबागृहाचे पवित्र प्रार्थनागृह, प्रार्थनागृहाजवळच सार्वजनिक दिवाणखाना. घरे तटबंदी केलेली. रस्ते नीटनेटके व फरसबंदी. असे हे भरभराटलेले, समृद्ध व बळवंत शहर होते.
अशा या मक्केच्या गजबजलेल्या रस्त्यातून एक शांततापूर्ण व्यक्ती हिंडताना दिसे. विचारमग्न व गंभीर अशी ती व्यक्ती दिसे. डोक्यावरील पागोट्यावरून एक रूमाल टाकलेला असे. त्याचे एक टोक उजवीकडून गळ्याखालून डाव्या खांद्यावर टाकलेले असे. कोण ती व्यक्ती? कोण तो पुरुष? मध्यम उंचीचा, रुंद खांद्याचा, दणकट मनगटाचा कोण तो पुरुष? काळेभोर दाट केस खांद्यावर आले आहेत आणि डोके कसे आहे पाहा. भव्य विशाल डोके! आदरणीय डोके! तोंड जरा लांबट, पिंगट रंगाचे, तांबुस छटेचे आणि भुवया बघा कशा सुंदर कमानदार आहेत! आणि दोन भुवयांच्या मध्ये ती पाहा एक ठसठशीत शीर आहे. भावनोत्कट प्रसंगी ती थरारे आणि डोळेही काळेभोर, मोठे. ते डोळे काहीतरी शोधीत आहेत. कोठेतरी पाहत आहेत. अस्वस्थ आहेत ते डोळे! जाड व लांब पापण्यांमधून ते डोळे चमकत. नाकही बाकदार व मोठे आहे आणि दात पहा किती स्वच्छ शुभ्र! दातांची फारच काळजी घेतो वाटते हा?आणि ती साऱ्या बाजूने असलेली सुरेख दाढी. किती रुबाबदार, सुंदर, सामर्थ्यसंपन्न चेहरा हा! कोणाचा हा? काय याचे नाव? कातडी मऊ आहे, स्वच्छ आहे. मुद्रा शुभ्र व लाल आहे आणि हात पाहा, रेशमासारखे, मखमलीसारखे मऊ आहेत. पोशाख साधा. चाल द्रुतगतीची परंतु दृढ. जणू वरून खाली येत आहे. देवाकडून मानवांकडे येत आहे. गंभीर मुखावरही रस्त्यात मुले भेटताच हास्य फुलते आहे पाहा. वाटेत मुले भेटली तर त्यांच्याजवळ प्रेमाने बोलल्याशिवाय हा पुरुष राहत नसे. मुलांचा प्रेमी होता. कारण मुलांजवळ देवाचे राज्य असते. अद्याप स्वर्गाच्या जवळ ती असतात. मुलांचेही त्याच्यावर प्रेम होते. ती त्यांच्याभोवती गोळा होत. आपल्या विचारात मग्न होऊन जरी हा पुरुष जात असला तरी वाटेत कोणी सलाम केला तर लगेच तो सलाम परत करी. मग तो सलाम अगदी हीनदीनाचा का असेना.

कोण होता तो? लोक त्याला ‘अल्-अमीन’ म्हणत. आपण होऊन लोकांनी ही त्याला पदवी दिली होती. अल्-अमीन म्हणजे विश्वासार्ह. त्याचे जीवन इतके आदर्शरूप, सचोटीचे, कष्टाचे, सन्माननीय असे होते की सर्वांना त्याच्याविषयी आदर व विश्वास वाटे. परंतु लोक असे का पाहत आहेत त्याच्याकडे? अल्-अमीनाकडे साशंकतेने का पाहत आहेत? हा मनुष्य नवीन धर्म सांगू लागला होता. लोक त्याला वेडा म्हणू लागले. समाजाची जुनी बंधने तो नष्ट करू पाहत होता. प्राचीन हक्क, जुने दुष्ट व भ्रष्ट रीतीरिवाज सोडा असे सांगत होता. हा हट्टी, माथेफिरू क्रांतिकारक आहे, असे आता लोक म्हणत व तो जाऊ लागला म्हणजे संशयाने बघत.
कोण होता तो? ते का पैगंबर मुहम्मद (स.)? होय. होय, तेच ते शांतपणे रस्त्यातून विचारमग्न होणारे व जाणारे. शिव्याशाप, निंदा सहन करीत जाणारे ते मुहम्मद (स.) होते. कुरैशांच्या कुळात, काबागृहाच्या उपाध्यायांच्या कुळात जन्मले होते.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि अल्लाहु तआला अनहु) (रजि.) निवेदन करतात, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
इस्लामचे आधारस्तंभ पाच आहेत. १. अल्लाहशिवाय दुसरा कुणी ईश्वर नाही व मुहम्मद (स.) हे त्याचे दास व प्रेषित आहेत, या वस्तुस्थितीची साक्ष देणे.
“अशहदु अला ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलूहु."
(मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि प्रेषित आहेत.) २. नमाज कायम करणे. ३. जकात देणे. ४. हज करणे. ५. रमजानचे रोजे करणे.
(बुखारी-मुस्लिम) प्रेषितांनी इस्लामला इमारतीची उपमा देऊन तिचे आधारस्तंभ कोणते हे येथे स्पष्ट केले आहे.
इस्लाममध्ये सर्वप्रथम श्रद्धेला महत्त्व आहे. अल्लाह एक आहे, त्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही आणि प्रेषित मुहम्मद (स.) हे त्याचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत, या सत्याचा स्वीकार करून तशी प्रतिज्ञा करणे म्हणजे श्रद्धा बाळगणे. माणसाच्या आचार, विचार व उच्चारावरून ही गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे की, तो अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासही ईश्वर मानीत नाही. त्याचप्रमाणे तो प्रेषित मुहम्मद (स.) यांना अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित मानतो.
अल्लाहला एकमेव ईश्वर मानणे याचा अर्थ अल्लाह हा एकटा साऱ्या विश्वाचा निर्माता, पालनकर्ता, नियंता, शास्ता, त्राता आहे. तोच जीवन-मृत्यूचा आणि शेवटच्या निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे. त्याचीच उपासना, प्रार्थना, स्तुती व याचना केली पाहिजे. भक्ती व आज्ञापालन त्याचेच केले पाहिजे. त्याशिवाय कोणीही भक्ती व आज्ञापालनास पात्र नाही.

आदरणीय मुहम्मद (स.) हे अल्लाहचे आज्ञाधारक व प्रेषित आहेत यावर श्रध्दा ठेवणे म्हणजे त्यांच्या शिकवणीप्रमाणे आचरण करणे. अल्लाहने मानवाच्या शिकवण व मार्गदर्शनासाठी जी एक जागतिक व्यवस्था केली आहे त्यामधील ते शेवटचे प्रेषित आहेत. त्यांची शिकवण व त्यांचे मार्गदर्शन माणसावर बंधनकारक आहेत. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून त्यानुसार आचरण करणे इस्लाम आहे.
इस्लाममध्ये दिवसातून पाच वेळची नमाज (प्रार्थना) माणसावर बंधनकारक आहे. १. पहाटेची-फज्र २. दोनप्रहरची -जोहर ३. सायंकाळपूर्वीची-असर ४. सूर्यास्तावेळची-मगरिब व ५. रात्रीची-इशा. नमाज कायम करणे म्हणजे नमाजची व्यवस्था कायम करणे. स्वत: नियमितपणे जमाअतीबरोबर पाच वेळा नमाज अदा करणे आणि इतरांना नमाज अदा करण्यास प्रवृत्त करणे. नमाजीसाठी मसजिदींची व अन्य व्यवस्था करणे होय.
त्यागाशिवाय माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनत नाही. मालमत्तेबद्दल वाटणारे प्रेम व तिची हाव माणसाला सदाचारापासून दूर ठेवते आणि म्हणून अल्लाहने 'जकात' देणे माणसावर बंधनकारक ठरविले आहे. ठरविण्यात आलेल्या हिशोबाप्रमाणे माणसाने आपल्या मालमत्तेवर दरवर्षी जकात दिली पाहिजे. त्याचप्रमाणे ईशकार्यात सढळ हाताने खर्च केला पाहिजे. गोरगरिबांना व दीनदुबळ्यांना दानधर्म केला पाहिजे. माणसाने या सत्याचे स्मरण ठेवले पाहिजे की, त्याला जे काही लाभते ते अल्लाहच्या कृपेमुळेचलाभते.
प्रवासखर्चाची ऐपत असणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने आयुष्यातून एकदा हिजरी सनाच्या जिल्हज महिन्यात अरबस्थानातील मक्का शहरी जाऊन बैतुल्लाहचे-अल्लाहच्या काबागृहाचे दर्शन घेतले पाहिजे. त्याची जियारत करून सई, तबाफ करणे, अरफातला जाणे, कुरबानी करणे वगैरे विधी केले पाहिजेत. याला हज करणे म्हणतात.
पाचवे कर्तव्य हे आहे की, प्रत्येक स्त्री-पुरुषाने दरवर्षी रमजान महिन्यात महिन्याचे पुरे रोजे केले पाहिजेत. भल्या पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्नपाणी वगैरे काहीही न घेता केला जाणारा उपवास म्हणजे रोजा.
अल्लाहने श्रद्धा बाळगल्यानंतर नमाज, जकात, हज व रमजानचे रोजे व चार धार्मिक जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. ही कर्तव्ये योग्यप्रकारे व जाणीवपूर्वक पार पाडली तर ती माणसाला आज्ञाधारक व सदाचारी बनवितात.
नमाज अल्लाहचे सतत स्मरण घडविते व त्यामुळे माणसास सरळमार्गावर राहण्यास मदत होते. जकात त्यागाची शिकवण देते. माणूस ईश्वराने दिलेले धन ईशकार्यात खुशीने खर्च करतो आणि त्याचे धन व मन निर्मळ होते. हजमध्ये माणसाला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. त्याला खर्चही करावा लागतो. आपल्या मुलाबाळांपासून व कारभारापासून निव्वळ अल्लाहच्या आज्ञेवरून तो दूर जातो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला दिव्यत्वाची प्रचिती घडते. रोजा, मनोनिग्रह घडवितो व अल्लाहचे भय बाळगून माणूस वाईट आचारविचारापासून दूर राहतो.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget