यशाचा खरा मार्ग

Success
आतापर्यंत ज्या गोष्टींचा उहापोह करण्यात आला, त्या गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. मात्र यासाठी आपले मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणेही आवश्यक आहे. जर पूर्वीच आपण एखादा विशिष्ट विचार मनात घेऊन बसलो तर कोणतेही सत्य आपल्या अंत:करणास स्पर्श करू शकत नाही, हे निश्चित!शिवाय ज्या ज्या वेळी या जगात अथवा देशात धर्म हा आपल्या मूळ स्वरूपात आला, त्या प्रसंगी या मूळ धर्माकडूनसुद्धा हेच घोषित करण्यात आले. आजसुद्धा या गोष्टी कोणत्या न् कोणत्या स्वरूपात जगातील समस्त धर्मांत आढळतात. कारण असे की धर्म हा नेहमीच आपल्या मूळ स्वरूपानुसार एकच असतो आणि असे व्हावयासही हवे. अल्लाह एकच आहे! म्हणूनच त्याच्याकडून येणारा संदेशसुद्धा एकच असून त्याचे खरे नाव इस्लाम असे आहे. अर्थातच असा धर्म जो मानवास अल्लाहसमोर आत्मसमर्पण करण्याची शिकवण देतो. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देश वा राष्ट्रात त्याच्या पैगंबरांच्या माध्यमाने जो धर्म आला, तो मुळात इस्लाम हाच धर्म होय. मात्र जसजसा काळ लोटत गेला तसतसे लोकांनी आपापल्या सवलतीनुसार परिवर्तन घडवून आणले. पाहिजे ते समाविष्ट केले आणि नको ते वजा केले. याच प्रकारातून मग विविध शाखा फुटल्या आणि बरेच कृत्रिम धर्म निर्माण झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच असून या मूळ धर्माचा आधार निम्नलिखित तीन गोष्टींवर आहे. (१) हे विश्व अल्लाहशिवाय निर्माण झालेले नसून अल्लाहशिवाय कार्यरत नाही. तो सर्वगुणसंपन्न असून त्याच्या समान इतर कोणीही नाही.(२)अल्लाहने आपली महत्त्वपूर्ण निर्मिती अर्थात मानवजातीस आपला संदेश पैगंबरांच्या माध्यमाने पाठविला आणि प्रत्येक  काळ  व  प्रत्येक  भूभागात  पाठविला. कोणासही यापासून वंचित ठेवले नाही. (३) समस्त मानवांना एके दिवशी आपल्या खऱ्या स्वामीसमोर अर्थात अल्लाहसमोर आपल्या भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. प्रत्येकास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला आणि वाईट कर्माचा वाईट मोबदला मिळणारच.
या तीन गोष्टी इस्लामच्या मूलभूत गोष्टी असून इस्लाम हाच धर्म नेहमीकरिता अल्लाहकडून आलेला सत्यधर्म होय. सर्वांत शेवटी इस्लाम धर्म आपल्या मूळ, परिपूर्ण आणि अंतिम स्वरूपात अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत जगात आला. त्यांचे पूर्ण जीवन आजही आपल्या मूळ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही पैगंबराच्या जीवनाचा मूळ इतिहास आज उपलब्ध नाही.याचप्रमाणे अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झालेला ईशग्रंथ अर्थात कुरआनसुद्धा मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त जगात इतर कोणताही ईशग्रंथ त्याच्या मूळ स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. आता जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आणलेला धर्म अर्थात इस्लाम धर्म मार्गदर्शन करू शकतो. या काळात स्वत:ला इस्लाम धर्माचा अनुयायी असण्याचा दावा करणारे भरपूर लोक आहेत. मात्र अल्लाहच्या दृष्टिकोनात खरा मुस्लिम केवळ तोच आहे, जो इस्लामच्या नियमांवर आपले विचार आणि भावना तसेच आपले जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. इस्लाम व कोण्या विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांचा, विशिष्ट भू-प्रदेशाचा अथवा विशिष्ट काळापुरता धर्म नसून तो अल्लाहकडून समस्त मानवजातीकरिता व जग अस्तित्वात असेपर्यंत एक विश्वव्यापी जीवनमार्ग आहे. या धर्माची सर्वप्रथम शिकवण अशी की मानवाने एकाच अल्लाहस या जगाचा निर्माता, पोशिंदा आणि पूज्य स्वीकारावे. त्याचीच एकट्याची आराधना करावी, त्याच्या आदेशांचे पालन करावे. इतर कोणासही त्याच्यासम ठरविता कामा नये. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा करता कामा नये, कोणाच्याही आदेशाचे पालन करता कामा नये. अर्थातच यावर पूर्ण विश्वाससुद्धा असावा की अल्लाहच पूज्य आणि आराध्य असून केवळ त्याच्या मर्जी व कायद्यानुसारच जीवनाची वाटचाल करावी, आपले तन-मन-धन केवळ त्याला समर्पित करावे, त्याच्याच समोर नतमस्तक व्हावे, त्यालाच मदत मागावी, त्याचाच धावा करावा आणि त्याच्याच मर्जीचे जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत पालन करावे. या विश्वाचा व आपला स्वामी त्यालाच मानावे. त्याच्याव्यतिरिक्त इतक कोणाचीही आज्ञा पाळता कामा नये. इतर कोणाही व्यक्तीने दाखविलेला मार्ग स्वीकारून जीवनाची वाटचाल करून स्वत:चे वाटोळे करून घेता कामा नये.
जी व्यक्ती अशा स्वरूपात अल्लाहचा स्वीकार करते, ती ईशमार्गाशिवाय इतर कोणाच्याही मार्गदर्शनाचा अवलंब करू शकत नाही. स्वत:च्या इच्छा-अभिलाशा आणि आवडीनिवडीसुद्धा अल्लाहच्या मर्जीच्या स्वाधीन करते. अल्लाहने आपल्या अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिलेल्या जीवनमार्गानुसार जीवन जगून यशस्वी व कल्याणकारी जीवनाची वाट धरावी. इस्लामची दुसरी अट अशी आहे की अल्लाहने जीवन जगण्यासाठी जो मार्ग दिला तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिला आणि इस्लाम हेच त्याचे नाव होय. अर्थात माणसाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना अंतिम पैगंबर मानावे आणि अशी धारणा ठेवावी की ते या समस्त जगवासियांकरिता अल्लाहचा संदेश घेऊन आले आणि सर्वांचे पैगंबर व कल्याणकारी सुधारक आहेत. त्यांच्यानंतर आता कोणीही पैगंबर येणार नाही. यासाठी त्यांच्यावर अल्लाहकडून अवतरित झालेला अंतिम ईशग्रंथ हा कुरआन असून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या ग्रंथानुसार स्वत: प्रत्यक्ष कर्म करून दाखविले. इस्लामची तिसरी धारणा अशी की मानवाने या गोष्टीवर श्रद्धा ठेवावी की त्यास मृत्यूपश्चात आपल्या प्रत्येक कर्माचा अल्लाहसमोर जाब द्यावा लागणार आहे. यासाठी त्यास परत जीवन प्राप्त होणार असून ते कधीही संपणारे नसेल. माणसास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला मोबदला स्वर्गरूपी जीवनाच्या स्वरूपात मिळणार आणि वाईट कर्मांचा मोबदला नरकाच्या यातनामय जीवनाच्या स्वरूपात मिळणार आहे, हे निश्चित!
या इस्लामच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण शिकवणी असून या शिकवणी माणसाच्या अंत:करणाची साद होय. हे समजून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही!

Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget