चिंताजनक बाब


माझ्या प्रिय बंधुनो! आपण कदाचित असे समजू नये की मी मुस्लिमांना अनेकेश्वरवादी (काफिर) ठरवू इच्छितो. असे नव्हे. माझा हा हेतु कदापि नाही. मी स्वत:देखील विचार करतो आणि असे इच्छितो की आमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने स्वत: विचार करावा की शेवटी असे काय घडले आहे की आम्ही अल्लाहच्या कृपेपासून वंचित राहिलो आहोत? आमच्यावर चोहीकडून संकटे का येत आहेत? ज्यांना आम्ही अनेकेश्वरवादी अर्थात अल्लाहची अवज्ञा करणारे दास म्हणतो त्यांचे सर्वत्र आमच्यावर प्रभुत्व आहे. याचे कारण काय?आणि आम्ही जे अल्लाहचे आज्ञाधारक (मुस्लिम) असल्याचा दावा करतो ते सर्वत्र प्रभावहीन होण्याचे कारण काय? याच्या कारणासंबंधी जितका जास्त मी विचार केला तितका मला विश्वास होत गेला की आमच्यात व अनेकेश्वरवादीमध्ये केवळ नावाचा फरक उरला आहे. नाहीतर आम्हीसुद्धा अल्लाहकडून बेपर्वा व त्याच्यापासून निर्भय आणि त्याची अवज्ञा करण्यात त्यांच्यापेक्षा काही पाठीमागे नाही. आमच्यात व त्यांच्यात थोडा फरक अवश्य आहे. परंतु यामुळे आम्ही कोणत्याही चांगल्या मोबदल्यास पात्र ठरत नाही तर उलट शिक्षेस पात्र ठरतो. कारण आम्हास माहीत आहे की पवित्र कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे आणि असे असूनदेखील त्याला आम्ही अशी वागणूक देतो जसा एक अनेकेश्वरवादी (इन्कार करणारा) देतो. आम्हाला माहीत आहे की प्रेषित मुहम्मद (स.) अल्लाहचे प्रेषित आहेत. असे असूनदेखील आम्ही त्यांच्या अनुयायित्वापासून असे पलायन करतो जसा एखादा अनेकेश्वरवादी करतो. आम्हाला याची जाणीव आहे की खोटारड्याला अल्लाहने धिक्कारले आहे, लाच खाणाऱ्याला व देणाऱ्याला नरकवास निश्चित ठरविले आहे. व्याज खाणाऱ्याला व देणाऱ्याला घोरतम अपराधी ठरविले आहे. निंदा करण्यास आपल्या स्वत:च्या बावाचे मांस भक्षण करण्यासारखे पाप ठरविले आहे. अश्लीलता, निर्लज्जपणा व व्यभिचाराच्या कृत्यावर भयंकर प्रकोपाची धमकी दिलेली आहे. परंतु या सर्व गोष्टी माहीत असूनदेखील आम्ही ही सर्व कृत्ये स्वैरपणे करतो, जणू आम्हाला अल्लाहचे अजिबात भय नाही. हेच कारण आहे की आम्ही अनेकेश्वरवाद्यांच्या तुलनेत थोडेफार मुस्लिम म्हणून आहोत असे दिसते. त्याबद्दल आम्हाला बक्षीस मिळत नाही तर उलट शिक्षा दिली जाते. अनेकेश्वरवाद्यांचे आमच्यावर अधिपत्य असणे व सर्वत्र पराभव पत्करणे याच अपराधाची शिक्षा आहे की आम्हाला इस्लामची देणगी दिली गेली होती आणि असे असूनदेखील आम्ही त्याची कदर केली नाही.

प्रियजनहो, आजच्या प्रवचनात जे काही मी सांगितले आहे ते या उद्देशाने नव्हे की मी तुमची निंदा करावी. निंदा करण्याचा माझा हेतु नाही. माझा उद्देश असा आहे की जे काही आम्ही हरविले आहे ते परत प्राप्त करण्याची आम्ही चिंता करावी. हरविलेली  वस्तु परत मिळविण्याची चिंता माणसाला त्याच वेळी होते जेव्हा त्याला माहीत असते की कोणती वस्तु त्याने हरविली आहे आणि ती किती मौल्यवान होती. म्हणूनच मी तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्हीसुद्धीवर आला आणि जर तुम्हाला कळले की खरोखर बहुमूल्य वस्तु तुमच्याजवळ होती तर तुम्ही ती परत मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल.


Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget