January 2022


जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या सर्व विधींपेक्षा श्रेष्ठ विधी ’वही’द्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो,ज्ञान पोहोचविणारा ईशदूत असतो तर ज्ञान प्राप्त करणारा जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती ’प्रेषित’ असतो.

इरसाल अब के हक़ ने किया ऐसा एक रसूल

जिसने सरों के साथ दिलों को झुका दिया

गात ज्ञान हस्तगत करण्याची जी साधने आहेत त्यापेक्षा एक अधिकचे साधन प्रेषितांकडे असते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडेही ते साधन होते, ज्याचे नाव वही (वह्य /वहीह) असे आहे. ही वही म्हणजे ईश्वराचा संदेश होता. हा संदेश जिब्राईल अलै. या फरिश्त्या (ईशदूत) च्या मार्फतीने प्रेषित सल्ल. यांच्यापर्यंत पोहोचत होता. याच माध्यमातून संपूर्ण कुरआन अवतरित झाला. अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यातील या संपर्क व्यवस्थेबद्दल मराठी वाचकांसाठी फारसी माहिती उपलब्ध नाही. या विशेषांकाच्या माध्यमातून ती पुरवावी यासाठीचा हा लेखन प्रपंच. 

पहिली वही येण्यापूर्वीची स्थिती

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म 22 एप्रिल 570 रोजी झाला. त्यांच्या जन्माची असामान्य घटना जगाच्या उद्धारासाठी ईश्वरीय योजने (मिशन)चा एक भाग होती. वयाच्या 40 व्या वर्षी सर्वप्रथम त्यांच्यावर वही नाजील (अवतरित) झाली. परंतु तिच्या अवतरणाची पूर्वची तयारी म्हणून ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची 40 वर्षापर्यंत विशेष काळजी घेतली होती. 

त्यावेळी मक्का शहरामध्ये सर्वत्र मूर्तीपूजा प्रचलित होती. चोहिकडे अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, भ्रष्टाचार, अनैतिकता आणि विश्वासघातकीपणाचे वातावरण पसरलेले होते. अशा दुषित वातावरणामध्ये सुद्धा मुहम्मद सल्ल. यांच्या व्यक्तीमत्वामध्ये वाईट गोष्टींचा लवलेशही नव्हता, ही त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा होती. त्यांना मूर्तीपूजेमध्ये  काडीचे आकर्षण नव्हते, ते अनैतिक नव्हते, ते भ्रष्ट नव्हते, उलट मक्कामध्ये सर्वात जास्त नितीमत्तेचे धनी होते. ते एवढे विश्वासू होते की, मक्कावासीय त्यांना सादिक (खरा) आणि अमीन (अमानतदार) म्हणून ओळखत. म्नका शहरातील लोकांना शेती येत नव्हती ते व्यापारी वृत्तीच होते. व्यापारासाठी त्यांना   वारंवार लांबच्या प्रवासात जाण्याचा योग येई, तेव्हा ते आपल्या मौल्यवान वस्तू अमानत म्हणून मुहम्मद सल्ल. यांच्याकडे ठेवत. प्रेषितत्व मिळण्यापूर्वी सुद्धा त्यांची विश्वासर्हता मक्का शहरामध्ये सर्वात जास्त होती. जेव्हा ते अमानती ठेऊन जात तेव्हा मुहम्मद सल्ल. त्या जसच्या तशा जतन करून ठेवत व परत आल्यावर ज्यांच्या त्यांना परत करत. त्यात काडीचा बदल होत नसे. 

मक्का शहरामध्ये चोहीबाजूने वाईट गोष्टींचे थैमान चालत असतांना सुद्धा मुहम्मद सल्ल. यांना कधीच त्याचे आकर्षण वाटले नाही. बालपणी फक्त दोन वेळेस त्यांना ’किस्सा गो’ (मनाने गोष्टी रंगऊन सांगणाऱ्यां) चे किस्से ऐकण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत शेळ्या चारणाऱ्या मुलाकडे आपल्या शेळ्या ठेऊन, ’किस्से’ ऐकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळा त्यांना झोप लागली व जाता आले नाही. ही ईश्वरीय व्यवस्था होती. याबद्दल मुहम्मद सल्ल. वाईट गोष्टी, रूढी आणि परंपरा यांची त्यांना प्रचंड चीढ होती. पण त्या वाईट परंपरा मोडून नवीन चांगल्या परंपरा कशा निर्माण कराव्यात या संबंधी त्यांना काहीच माहित नव्हते. चांगले म्हणजे नेमके काय? हे माहित नव्हते. हलाल काय? हराम काय? या संबंधी सुद्धा त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. म्हणून आपसुकच त्यांच्या मनामध्ये यासंबंधीचे चिंतन सुरू झाले. त्यांना तनहाई (एकटेपणा) आवडू लागला म्हणून ते ’सत्तू’ (विशिष्ट प्रकारचे भाजलेले पीठ) आणि पिण्याचे पाणी घेऊन मक्कापासून दोन मैलावर उंच पहाडावर असलेल्या एका गुहेमध्ये जाऊन जिचे नाव,’ गारे हिरा’ होते तिथे एकटे बसू लागले. चांगल्या गोष्टीबद्दल चिंतन करू लागले. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांच्या व्यक्तीमत्वात झालेले हे बदल सुद्धा ईश्वरीय योजनेचाच एक भाग होता. त्यांच्या मार्फतीने ईश्वराला जगाची दिशा बदलावयाची होती. वाईट मार्गावरून जगाला चांगल्या मार्गावर आणावयाचे होते. म्हणून मुहम्मद सल्ल. यांना असे एकटे पाडण्यात आले. मक्काच्या धकाधकीच्या दिनचर्येपासून लांब जावून गारे हिराच्या कुशीत एकट्याने शांत बसण्याची आवड त्यांच्यात निर्माण करण्यात आली. 

वहीच्या प्रत्यक्ष अवतरणाचा सिलसिला

वयाची 40 वर्षे पूर्ण होताच त्यांच्या व्यक्तीमत्वात एक क्रांतीकारक बदल झाला. त्यांना खरी स्वप्ने पडू लागली. ते रात्री स्वप्नात जे पाहत दिवसा अगदी तशाच घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडू लागल्या. अशाच अवस्थेत सहा महिने सरले. असे म्हटले जाते की अगाऊ, खरी स्वप्ने फक्त प्रेषितांनाच पडतात व हा प्रेषितत्वाचा 46 वा भाग असतो. एव्हाना हिरामध्ये चिंतन करत तीन वर्षे संपली होती. अशातच रमजानच्या 21 व्या रात्री म्हणजे 10 ऑगस्ट 610 च्या रात्री ज्यावेळी त्यांचे वय 40 वर्षे, 6 महिने आणि 12 दिवस होते, अचानक ईशदूत जिब्रईल अलै. सलाम गारे हिरामध्ये प्रकट झाले. जिब्रईल अलै. यांच्या अशा अचानक आगमनाने मुहम्मद सल्ल. गडबडून गेले. जिब्राईल अलै. यांच्या आगमनाबरोबर गारे हिरा उज्ज्वल प्रकाशाने उजळून निघाली. इकडे मुहम्मद सल्ल. घाबरलेले होते, तिकडे जिब्राईल आत्मविश्वासाने पावले टाकत पुढ्यात येऊन उभे राहिले व म्हणाले, ’वाचा!’ तेव्हा प्रेषित उत्तरले मला वाचता येत नाही. जिब्राईल अलै. यांनी पुन्हा दोन वेळा, ’वाचा!’ असे म्हटले. मुहम्मद सल्ल. यांनी पुन्हा तेच उत्तर दिले. तेव्हा जिब्राईल अलै. यांनी मुहम्मद सल्ल. यांना तीन वेळा करकचून मिठी मारली. ती मिठी इतकी जबरदस्त होती की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी नंतर या भेटीचे वर्णन करताना सहाबा रजि. समोर सांगितले होते की, त्यांच्या मिठीने माझ्या शरिरातील जणू सर्व शक्तीच संपून गेली होती. 

तिसऱ्या वेळा वाचा म्हटल्यानंतर मिठी सोडल्यावर जिब्राईल अलै. यांनी कुरआनच्या पहिल्या पाच आयती मुहम्मद सल्ल. यांच्या समोर वाचल्या आणि त्यांना त्या आयातींचे पठण करण्यास सांगितले. त्या आयाती पुढीलप्रमाणे होत, ‘इक़रा बिस्मी रब्बिकलजी खलक-खलकल इन्सान मिन अलक अकरऊ व रब्बकल अकरमू, अल्लजी अल्लम बिल-अ-कलम, अल्लमल इन्सान मआलमू याअलम’ (वाचा आपल्या पालनकर्त्याच्या नावाने! ज्याने जन्माला घातले मानवाला मांसाच्या तुकड्यापासून. वाचा! तुमचा पालनहार अत्यंत उदार आहे, त्याने लेखनीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जानत नव्हता.) (संदर्भ : सुरे अल-अलक़ आयतक्र. 1 ते 5.).

वरील पाच आयातींचा संदेश देऊन जिब्राईल अलै. अंतर्धान पावले. तेव्हा मुहम्मद सल्ल. प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत घरी परतले. त्यांचे शरीर थरथरत होते. त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढली होती. घरी येताच त्यांनी आपल्या पत्नी हजरत खतीजा यांना सांगितले की, ’’मला चादरीने पांघरून टाका’’ चादर पांघरून काहीवेळा शांत बसल्यानंतर ते स्थिरावले. त्यानंतर त्यांनी हजरत खतीजा रजि. यांना सर्व घटनाक्रम सांगितला व म्हणाले की, ’या घटनेमुळे मला काय झालंय कळत नाहीये. मला माझ्या जीवाची भीती वाटतेय.’’ त्यावर खतीजा रजि. उत्तरल्या, ’’कदापि नाही! आपल्या जीवाला काहीच धोका होणार नाही. आपण लोकांवर दया दाखविता, अडल्या नडल्यांच्या कामी येता, गरीबांची मदत करता, पाहुण्यांचे स्वागत व आदराआतिथ्य करता, सत्यावर असलेल्या प्रत्येकाची साथ देता, तेव्हा ईश्वर तुम्हाला कदापि धोका होऊ देणार नाही.’’ 

हजरत खतीजा रजि. यांच्या या बोलण्याने मुहम्मद सल्ल. यांना थोडा धीर आला. नंतर हजरत खतीजा रजि. यांनी मुहम्मद सल्ल. यांना आपले चुलतभाऊ ’वरका बिन नौफेल बिन असद बिन अब्दुल उज्जा’ यांचेकडे घेऊन गेल्या. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारलेला होता, त्यांना इब्रानी भाषा येत होती, ते बायबल हाताने लिहीत, त्यावेळी ते वृद्ध आणि दृष्टीविहीन झाले होते. त्यांनी मुहम्मद सल्ल. यांच्या मुखातून सारा वृत्तांत ऐकला आणि आश्चर्याने ओरडले. ’’अरे ! हा तर तोच ईशदूत आहे ज्याने मुसा अलै. (मोझेस)कडे ईश्वराचा संदेश आणला होता. ओह! कदाचित मी आज सुदृढ असतो किंवा त्या दिवसापर्यंत जीवंत राहू शकलो असतो ज्या दिवशी तुमचे लोक तुम्हाला मक्कामधून घालवून टाकतील तर मी तुमची खूप मदत केली असती’’ यावर प्रेषित सल्ल. यांनी चकित होऊन विचारले की, ’’अच्छा! तर मला आमीन आणि सादीक म्हणणारे माझेच लोक मला मक्कातून काढून टाकतील?’’ तेव्हा वरका बिन नौफेल उत्तरले, ’होय! ईश्वराचा हा संदेश ज्यांनी-ज्यांनी आणला त्यांना-त्यांना त्यांच्याच वंशाच्या लोकांनी शत्रुत्व करून आपल्यातून काढून टाकलेले आहे.’’ 

तबरी आणि इब्ने हश्शाम या इस्लामी पंडितांनी असे नमूद केलेले आहे की, पाच आयातीच्या या अवतरणानंतर घरी परतल्यावर वरका बिन नौफेल यांची भेट घेतल्यानंतर मुहम्मद सल्ल. परत गारे हिरामध्ये जावून बसले. त्यांच्या मनामध्ये नाना-विचार येत होते. पुढे त्यांनी या संबंधी सहाबा रजि. यांच्याशी बोलताना या घटनेसंबंधी असे म्हटले होते की, ’’ अल्लाहने जगामध्ये जेवढे लोक निर्माण केले त्यातील शायर (कवी) आणि पागल (वेडा) हे लोक मला अत्यंत नापसंत होते. इतके की मी त्यांच्याकडे पाहत सुद्धा नसे. परंतु वहीच्या अवतरणानंतर मी माझ्याशीच बोललो की मी त्यांच्यासारखाच आहे की काय? एका दिवशी मी पहाडाच्या टोकाकडे जात होतो, तेव्हा माझ्या मनात विचार आला पहाडावरून स्वतःला खाली झोकून देऊन आत्महत्या करावी व या दबावातून कायमची सुटका करून घ्यावी. हे विचार चालू असतानाच पहाडाच्या मध्यामध्ये मी जेव्हा पोहोचलो तेव्हा आकाशवाणी झाली की, ’’ हे मुहम्मद सल्ल. !  तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात आणि मी ईशदूत जिब्राईल आहे. तेव्हा मी आकाशाकडे पाहिले तेव्हा जिब्राईल अलै. एका माणसाच्या रूपाने आकाशात पाय रोवून उभे होते आणि म्हणत होते. ते पुन्हा म्हणाले, ’’ ऐ मुहम्मद सल्ल.! अल्लाहने प्रेषित म्हणून तुमची निवड केलेली आहे.’’तेव्हा मी एकाच ठिकाणी जड अवस्थेत उभा होतो. न मला एक पाऊल पुढे टाकता येत होते ना मागे घेता येत होते. परंतु मी माझे डोके वर करून आकाशाकडे जिब्राईल अलै. यांच्याकडे व त्यांच्या आजूबाजूला रोखून पाहत होतो. सर्वत्र मला जिब्राईलच दिसत होते. त्यांच्याकडे पाहता-पाहता मी इतका अभिभूत झालो होतो की माझ्या मनातील आत्महत्येचा विचार कधी निघून गेला हे मलाच कळाले नाही. मी निश्चल उभा होतो. शेवटी जिब्राईल अलै. अंतर्धान पावले आणि मी माझ्या घराकडे परत आलो व ह. खतीजा रजि. यांच्या जवळ बसलो. तेव्हा त्यांनी विचारले की, ’’आपण कोठे होतात? मी सेवकाला मक्का शहरामध्ये पाठवून सगळीकडे शोध घेतला.’’ त्यावर मुहम्मद सल्ल. यांनी आकाशात जिब्राईल अलै. यांना पाहिल्याची सर्व घटना सांगितली. तेव्हा हजरत खतीजा रजि. आनंदाने उद्गारल्या,’’ हे चुलत्याचे पुत्र ! आपण आनंदी व्हा आणि दृढ रहा. त्या ईश्वराची शपथ ज्याच्या ताब्यात माझा जीव आहे, मला आशा आहे की आपण एक उत्तम प्रेषित म्हणून आपली कामगिरी बजावाल. त्यानंतर त्यांनी परत वरका बिन नौफेलकडे जाऊन हा घटनाक्रम सुद्धा सांगितला. तेव्हा ते उद्गारले,’’ हे खतीजा ! त्या ईश्वराची शपथ ज्याच्या हातात वरकाचा जीव आहे. मुहम्मद सल्ल. कडे तोच ईशदूत पुन्हा आलेला आहे जो हजरत मुसा अलै. कडे वारंवार येत होता आणि त्याने मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित्वाची शुभवार्ता दिलेली आहे’’ हजरत खतीजा रजि. यांनी घरी येऊन वरका बिन नौफेलशी झालेला वार्तालाप मुहम्मद सल्ल. यांच्याशी कथन केला. त्यानंतर काही अवधी लोटल्यानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतः वरकाशी भेट घेऊन या घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली. तेव्हा त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की, तुम्हाला महान प्रेषित म्हणून ईश्वराने निवडलेले आहे. पुन्हा आलेला ईशदूत हा जिब्राईलच होता. यानंतर काही दिवस जिब्राईल अलै. येण्याचा क्रम बंद झाला. कुठलीही वही अवतरित झाली नाही. त्यामुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. दुःखी होते आणि अनेकवेळा त्या उंच पहाडावर जात होते. त्यांच्या मनात पुन्हा आत्महत्येचे विचार घोळत होते. एक दिवस स्वतःला पहाडावरून झोकून देण्याचा पक्का विचार करून ते पहाडावर पोहोचले तेव्हा जिब्राईल अलै. पुन्हा अवतरित झाले आणि म्हणाले, ’’हे मुहम्मद सल्ल. आपणच खरे रसूल आहात.’’ जिब्राईलच्या भेटीमुळे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मनाला थोडी शांती लाभली. 

हाफिज इब्ने हजर यांनी म्हटलेले आहे की, ’’वही येण्याचा सिलसिला यासाठी थांबविण्यात आला होता की, प्रेषित सल्ल. यांच्या जीवाला थोडा आराम मिळावा आणि चित्त स्थीर व्हावे. जेव्हा ते स्थिर झाले तेव्हा पुन्हा वही येण्याचा सिलसिला सुरू झाला व दूसरी आयत जी नाजिल झाली ती ’’या अय्युहल मुदस्सीर...’’ हे पांघरून ओढून पहूडणाऱ्या उठा आणि खबरदार करा, आणि पालनकर्त्याच्या महानतेची घोषणा करा आणि आपले कपडे स्वच्छ ठेवा आणि अपवित्रतेपासून दूर रहा आणि उपकार करू नका अधिक प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या पालनकर्त्यासाठी धैर्य राखा जेव्हा प्रलयाच्या दिवशी मोठा आवाज केला जाईल तो दिवस फारच कठीण असेल, अश्रद्धावानांसाठी सोपा असणार नाही.  वगैरे वगैरे...’’ यानंतर वही येण्याच्या प्रक्रियेमध्ये गती आली आणि जगाला चांगले काय? वाईट काय? हराम काय? हलाल काय? इत्यादी संबंधी मार्गदर्शन करण्यात आले व हळूहळू परिपूर्ण इस्लामी जीवन शैलीचा परिचय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मार्फतीने जगाला करून देण्यात आला. ज्यात शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, युद्धनिती, कायदा, न्यायशास्त्र, भौतिकशास्त्र आणि या सर्व शास्त्रांचा उपयोग करण्याची विधी शिकविली गेली. थोडक्यात यशस्वी जीवन जगण्यासाठी माणसाला ज्या-ज्या ज्ञानाची गरज आहे ते-ते ज्ञान अवतरित करण्यात आले अणि या सर्व ज्ञानाचा / शास्त्रांचा पाया नैतिकतेवर ठेवण्याचे व अनैतिकेला नापसंत करण्याचे शिक्षण देण्यात आले आणि वयाच्या 63 व्या वर्षी ज्या तिथीला त्यांचा जन्म झाला होता त्याच तिथीला त्यांना पर्दा फरमाविण्याचा आदेश झाला. 

एकंदरित जगातील ज्ञान प्राप्त करण्याच्या ज्या विधी आहेत, जसे स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, ज्ञान मिळविता येते. या ज्ञान मिळविण्याच्या विधींपेक्षा श्रेष्ठ विधी वहीद्वारे मिळालेले ज्ञान आहे. कारण स्पर्श करून, ऐकूण, बोलून, चव चाखून, पाहून, निरिक्षण करून, चिंतन-मनन करून जे काही माणसाला अवगत होते त्यात चूक होण्याची भरपूर शक्यता असते. मात्र ’वही’ एक असा विश्वासपात्र मार्ग आहे, ज्या मार्गाने मिळालेले ज्ञान हे त्रुटी विरहित असते. कारण ज्ञान देणारा हा ईश्वर असतो, ज्ञान पोहोचविणारा ईशदूत तर ज्याला ज्ञान प्राप्त झाले तो जगातील सर्वात विश्वासपात्र व्यक्ती प्रेषित असतो. आणि शेवटचे प्रेषित म्हणून द मोस्ट ट्रस्टेड मॅन ऑफ द वर्ल्ड असे ज्यांना म्हटले जाते व अल्लाहने स्वतः ज्यांच्याबद्दल असे म्हटले आहे की, ’’हे पैगंबर (सल्ल.) ! आम्ही तुम्हाला संपूर्ण जगासाठी कृपा बनवून पाठविले आहे.’’ (संदर्भ : सुरे अम्बीया आयत क्र. 107). तसेच  ज्यांचा समावेश मायकेल एच. हार्ट आपल्या ’द हंड्रेड मोस्ट इन्फ्लुयन्शल पर्सन्स इन हिस्ट्री’ मध्ये प्रथम स्थानावर करतो, ते मुहम्मद मुस्तफा सल्ल. असतात तेव्हा त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या शिकवणीवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. थोडक्यात वहींचा समुच्चय असलेले कुरआन हे किती कठीण कष्टाअंती प्रेषित मुहम्मद यांनी जगाला दिले या गोष्टीचा आता वाचकांना अंदाज आलाच असेल. कुरआनसारखा परिपूर्ण ग्रंथ मानवाला दिल्याबद्दल ईश्वराचे व अपरिमित कष्ट सहन करून ते आमच्यापर्यंत पोहोचविले, याबद्दल मुहम्मद सल्ल. यांचे कोटी-कोटी आभार.- एम.आय.शेख


प्रेषित्व मिळाल्यापासून मदीनेला प्रयाण करेपर्यंत म्हणजेच तब्बल 13 वर्षापर्यंत हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या अनुयायींना अतोनात कष्ट सहन करावे लागले. लोखंडी सळईने त्यांना डागले गेले, तापलेल्या वाळूवर नग्नावस्थेत ओढले गेले, त्यांच्या मार्गात काटे टाकले गेले, त्यांना विविध प्रकारे कष्ट देण्यात आले. परंतु, त्यांच्या अनुयायांची नि:स्वार्थता, निर्भयता आणि उच्चदर्जाचे चारित्र्य पाहून हळू-हळू नैसर्गिक जीवन-प्रणालीकडे लोक वळू लागले. पाहता-पाहता अरब देशातले लोकच नव्हें तर संपूर्ण जगातील लोक ईस्लामधर्माकडे आकर्षित होऊ लागले.

प्रेषित हजरत मुहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम ईस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित आहेत. हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म अरबस्थानात अशावेळी झाला जेव्हा अरबस्थान अधर्म, अशांती आणि अनेकेश्वरवादाच्या भयंकर काळोखात हेलकावे खात होता. वंशवाद, घराणेशाही आणि भूमिवाद इत्यादी कारणावरून नेहमी झटापटी होऊन रक्ताचे पाट वाहत होते. स्त्रियांची अवहेलना करणे, नवजात मुलींची हत्या करणे, जुगार खेळणे, मद्यपान करणे ह्या वाईट रूढींना चोहीकडे उधान आले होते. अरबस्थानात नव्हे तर जगातही अशांततेचा धुमाकूळ माजला होता. सर्वत्र धार्मिक अवनती होत होती. उच्च-नीच पणाला ऊत आले होते, नीतिमत्ता लयाला जात होती. स्वैराचार, अधर्म, अशांतीच्या काळकुट्ट अंधकारातून सुटका कधी होईल असे लोकांना वाटत होते. अखेर 20 एप्रिल 571 इ.स. म्हणजे ईस्लामी सन हिजरीच्या 50 वर्षापूर्वी 12 रबीउल अव्वल ईस्लामी कालगणनेनुसार तिसरा महिना, सोमवारच्या सकाळच्या प्रहरी मक्केच्या एका प्रतिष्ठित कुरैश कुटुंबात हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला. 


हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या वडिलांचे नाव हजरत अब्दुल्लाह आणि आईचे नाव ‘बीबी आमेना’ होते. त्यांच्या जन्माअगोदर 4-5 महिन्यापूर्वी त्यांचे वडील वारले होते. ते सहा वर्षाचे झाल्यावर आईचे छत्रही हरपले. आईच्या निधनानंतर त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांचे आजोबा ‘अबु मुत्तलिब’ यांच्यावर आली. दोन वर्षानंतर आजोबा सुध्दा वारले. अशा प्रकारे वयाच्या आठ वर्षापर्यंत आई-वडील आणि आजोबाविना ते पोरके झाले. आजोबानंतर काका ‘हजरत अबु-तालिब’ यांनी त्यांचे पालन पोषण केले. त्या काळातील परंपरेनुसार ते लहान वयातच आपल्या काकाबरोबर व्यापाराच्या निमित्ताने परदेशात जाऊ लागले. देशात आणि विदेशात ते ‘सादिक’ आणि ‘अमीन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या पंचविसाव्या वर्षी हजरत खतीजा नामक परमपवित्र विधवा स्त्रीशी ते विवाहबध्द झाले. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना ‘प्रेषितावस्था’ प्राप्त झाली आणि तेव्हापासून त्यांच्यावर क्रमाक्रमाने ‘कुरआन शरीफ’ चे अतवरण होऊ लागले. प्रेषित्व मिळाल्यावर लोकांना ईशआज्ञेकडे बोलावण्याची (इस्लामचा प्रसार करण्याची) आज्ञा त्यांना प्राप्त झाली. त्यांनी लोकांना संबोधून सांगितले की, ‘‘लोक हो ! केवळ एकट्या अल्लाहची उपासना (बंदगी) करा. व्याभिचार, चोरी, मद्यप्राशन, जुगार यांचा पूर्णपणे त्याग करा. दुर्बलांची मदत करा, स्त्रियांना त्यांचा हक्क द्या, अल्लाहची भीती बाळगा, लक्षात ठेवा मृत्यु अटळ आहे. मृत्युनंतर निर्माणकर्त्या ईश्वरासमोर सर्वांना जाब दयावा लागणार आहे. बघा, एका मनुष्याची हत्या म्हणजे संपूर्ण मानवतेची हत्या होय.’ लोक हो ! तुम्ही सर्व एकच आहात. तुमच्यात कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. श्रेष्ठत्व रंगावर अथवा वंशावर नसून ईशभक्ति आणि ईशभितीवर अवलंबून आहे.’’


हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या या प्रचाराचा आरंभ होताच स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारा अधिकारी वर्ग, कट्टर कुरैश आणि अनेकेश्वरवादी त्यांचे शत्रु झाले. प्रेषित्व मिळाल्यापासून मदीनेला प्रयाण करेपर्यंत म्हणजेच तब्बल 13 वर्षापर्यंत हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या अनुयायींना अतोनात कष्ट सहन करावे लागले. लोखंडी सळईने त्यांना डागले गेले, तापलेल्या वाळूवर नग्नावस्थेत ओढले गेले, त्यांच्या मार्गात काटे टाकले गेले, त्यांना विविध प्रकारे कष्ट देण्यात आले. परंतु, त्यांच्या अनुयायांची नि:स्वार्थता, निर्भयता आणि उच्चदर्जाचे चारित्र्य पाहून हळू-हळू नैसर्गिक जीवन-प्रणालीकडे लोक वळू लागले. पाहता-पाहता अरब देशातले लोकच नव्हें तर संपूर्ण जगातील लोक ईस्लामधर्माकडे आकर्षित होऊ लागले. मक्केत शत्रुचे वर्चस्व आणि कष्ट देणे अधिकच वाढल्यामुळे ईस्लाम धर्मियांना तिथे राहणे कठीन झाले होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ईश आज्ञेने मक्केहून मदिनेला प्रयाण केले. त्यांच्या आगमनानंतर मदिना आणि आसपासच्या परिसरात न्याय, शांतता आणि बंधुत्वाचा सुगंध दरवळू लागला आणि दिवसेंदिवस ईस्लाम धर्म प्रफुल्लित होऊ लागला, वाढू लागला. ज्या दिवशी हजरत मुहम्मद सल्ल. यांनी मक्केहून मदिनेत पदार्पण केले त्या दिवसापासून ईस्लामी कालगणना हिजरी-सनाची सुरूवात झाली. ईश्वराचे लाडके प्रणेते आणि ईस्लामचे संदेशवाहक असूनही हजरत मुहम्मद सल्ल. यांची राहणी अत्यंत साधी आणि सरळ होती. खाण्यास जाडे-भरडे अन्न आणि झोपण्यास जमिनीवर फक्त एक चटई. जीवनभर त्यांनी कधीही भरपूर जेवण केले नाही. उलट कधी-कधी तीन-तीन दिवस त्यांना उपाशी राहावे लागत होते. या साध्या राहणीमागचे कारण गरीबी आणि दारिद्रय नव्हते तर त्यांना शतकानुशतकांच्या लोकांचे मार्गदर्शन केवल उपदेश म्हणून नव्हे तर स्वत: त्याच मार्गाचर अनुसरण करून दाखवायचे होते. हजरत मुहम्मद सल्ल. यांनी अरफातच्या मैदानावर एक लाख चोवीस हजार अनुयायांच्या समक्ष जो अतिम संदेश लोकांना दिला तो त्या काळाच्या अनुयायांपुरताच मर्यादित नव्हता तर प्रलयापर्यंतच्या सर्व लोकांवर तो बंधनकारक आहे. या अंतिम उपदेशच्या वेळी त्यांनी लोकांना सांगितले. ‘‘लोक हो ! मला वाटते मी आणि तुम्ही पुन्हा इथे जमणार नाही. आजपासून या शहरात रक्त वाहणे निषिद्ध आहे. म्हणूनच तुमच्यावर हत्या करणे, कुणाचा अवमान करणे, कुणाचा माल हडपणे अपराध हराम ठरविले गेले आहे. लवकरच आपण सर्वांना ईश्वराच्या समोर हाजर व्हायचे आहे आणि सर्वांना आपल्या कृत्यांबद्दल जाब द्यावा लागणार आहे. तेव्हा माझ्यानंतर एकमेकांचे नुकसान करू नये. जे दुष्कृत्य आजपर्यंत घडले त्यांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका!’’ जगाचा निरोप घेतांना, प्राणोत्क्रमणच्या वेळी जमा झालेले सहाबा रजि. (सहकारी) यांना संबोधून ते म्हणाले होते, ‘‘ज्याची मला आज्ञा झाली, आजपर्यंत तेच मी तुमच्यापर्यंत पोहचविले आहे. अल्लाहच्या आदेशात बदल करू नका. लोकांवर बळजबरी करू नका कारण अल्लाहाने फर्माविले आहे की, परलोकाचे घर म्हणजेच ‘जन्नत’ एक असे पवित्र स्थान आहे की त्यावर हक्क त्याच लोकांना मिळणार आहे जे जमीनीवर विद्रोहचे अपराधी नाहीत. जमीनीवर कोणत्याही प्रकारचे दंगे किंवा भांडण करत नाहीत. कारण जन्नत पाक आणि पवित्र लोकांसाठी आहे. पवित्र लोकांच्या कर्माचे ते फळ आहे.’’ हजरत मुहम्मद सल्ल. यांनी ज्या इस्लामची शिकवण दिली, जो मार्ग आपल्या जीवनात त्यांनी अवलंबविला, जो संदेश ते घेऊन आले. त्यावरून हे स्पष्ट होते की ते शांतीचे महान प्रणेते होते. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे, आपल्या कृर्त्यांचा जाब विचारणारा आहे, परलोकाविषयीची ही निष्ठा माणसाला स्वैराचार प्रवृत्तींपासून दूर ठेवते. ‘जगत महर्षी’च्या दुस-या पानावर महात्मा गांधीचे म्हणणे उद्धृत केलेले आहे. ज्यात ते म्हणतात, ‘‘नि:संशय ईस्लाम तलवारीने पसरला नसून प्रेषितांचे साधे जीवन, नि:स्वार्थता, प्रेम, निर्भयता, ईश्वरावर दृढ आस्था आणि विश्वास यांच्या बळावर पसरला आहे.’’ संपूर्ण जगासाठी कल्याणाचा मार्ग दाखविण्याकरिता ईश्वराचा संदेश घेवून येणारे रहमतुल्लील आलमीन हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांना ईश्वराने ज्या दिवशी जगात पाठविले होते त्याच दिवशी आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो दिवस म्हणजे 12 रबीउल अव्वलचा सोमवार होय. जगाला ईशभक्ती, शांती-समृध्दी, न्याय-बंधुत्व, एकता आणि नैतिकतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद सल्ल. ज्या दिवशी जगात आले त्याच दिवशी त्यांनी पर्दा फरमाविला. शांतीचे महान प्रणेते हजरत मुहम्मद सल्ल. यांचा जीवन, पथप्रदर्शन प्रलयापर्यंतच्या लोकांकरिता आदर्शच आहे. 


- डॉ. अर्जिनबी युसूफ शेख

अकोला

dr.arjinbee@gmail.com. 

मो. 93718 95126 प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी मानवी इतिहासातील एकमेव समग्र क्रांती घडविली. जगाला एक नविन विचार, दिशा आणि उद्देश प्रदान केला. या क्रांतीने सामाजिक, शैक्षणीक, अध्यात्मीक आणि राजकीय क्षेत्रात आमुलाग्र परिवर्तन घडवून एक नवीन विश्व निर्माण केले. एक नवजीवन, एक नवसंस्कृती आणि एक नवीन सभ्यता उदयास आली. त्यांनी लोकांच्या विचारांमध्ये कायापालट घडवून आणला. अरबस्थानातील क्रूर, अत्याचारी, असभ्येत आकंठ बुडालेला आणि नैतिकदृष्ट्या खोल गर्तेत पडलेला जनसमुह प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नैतिकता, सभ्यतेच्या शिकवणीमुळे जागतिक ज्ञानाचा दिपस्तंभ झाला. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांंनी मानवाच्या आंतरिक आणि बाह्य विश्वात क्रांती घडवून आणली आणि एक नव-मानव आणि आदर्श समाज निर्माण करुन दाखविला. प्रेषित मुहम्मद सल्ल. इतिहासातील एकमेव व्यक्ती आहेत ज्या व्यक्तीने ऐहीक आणि अध्यात्मिक दोन्ही पातळीवर अभुतपुर्व आणि दैदीप्यमान यश प्राप्त केले व जगाला सफलतेचा मार्ग दाखविला.

बरस्थानाच्या निर्जन वाळवंटातून निघून या पुरोगामी आणि आधुनिक जीवन व्यवस्थेने मोरोक्कोपासून होर्डजपर्यंत फक्त आफ्रिका, अशिया आणि युरोप खंडालाच प्रभावित केले नाही तर पाहता-पाहता संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा हा प्रभाव तात्कालिक नव्हता. गेल्या दीढ हजार वर्षात यात सातत्याने वाढ होत आहे आणि आज सर्वात वेगाने प्रसार होणारी जीवन व्यवस्था आहे. जगातील प्रत्येक तीन व्यक्तीत एक या विचारधारेचा अनुयायी आहे. निसंदेह प्रेषित मुहम्मद (सल्ल.) जगातील सर्वकालीन प्रभावी व्यक्ती होत.


सत्ता, संपत्ती, सेना इत्यादी कोणतीच संसाधने जवळ नसतांना अवघ्या तेवीस वर्षाच्या संघर्षमय जीवनात प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी मानवतेवर जो असीम प्रभाव टाकला तो भारावून टाकणारा आहे. अनाथावस्था अतिशय लाचार व असहाय्य स्थितीचे दुसरे नाव आहे. त्यांच्या जीवनाची सुरूवात एका अनाथ बालकाच्या रूपाने होते. नंतर आम्ही त्यांना एक यातनाग्रस्त देशत्याग केलेल्या व्यक्तीच्या स्वरुपात पाहतो आणि शेवटी तेच एक राष्ट्राचे ऐहिक व आध्यात्मिक नेते बनले. त्यांना या मार्गात ज्या कसोट्या व प्रलोभने, अडचणी व बदल, अंध:कार व उजेड, भय व प्रतिष्ठा, परिस्थितीच्या चढ-उतारातून जावे लागले त्या सर्वात प्रेषितांना अभुतपुर्व यश प्राप्त झाले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ही प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही. राज्यसत्ता या जगातील भौतीक सामर्थ्याची पराकाष्ठा असते; प्रेषितांनी सामर्थ्याचे सर्वोच्च स्थान प्राप्त करुन जगाचा निरोप घेतला.


जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आदर्श नायकाची भूमिका पार पाडली. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) अनेक रूपात आपल्यापुढे येतात. एक राष्ट्राध्यक्ष, शासक, अजेय सेनापती, न्यायनिष्ठ न्यायाधीश, थोर तत्वज्ञानी, राजनितीज्ञ, महान उपदेशक, प्रामाणीक व्यापारी, समाजसुधारक, अध्यात्मिक गुरु, उत्तम वक्ते, योद्धे, अनाथाचे पालनकर्ते, गुलामांचे रक्षक, स्त्रीजातीचे उद्धारक, एक आदर्श पती, वडील, संत. थोडक्यात सर्वांगीणदृष्टया त्यांचे व्यक्तीमत्व एक आदर्श व्यक्तीमत्व होय. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांंनी जीवनातील प्रत्येक भूमिका अशा  उत्कृष्टपणे वठविली की जगाच्या अंतापर्यंत संपूर्ण मानवजातीसाठी ती प्रमाण ठरावी. त्यांचे कर्तृव जीवनाच्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण जीवनावर व्यापलेले आहे. म्हणूनच कुरआन सांगतो. 


’’निसंदेह! प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांचे जीवन तुमच्यासाठी उत्कृष्ट नमुना आहे.’’


प्रेषितांनी जगाला परिचय करून दिलेल्या इस्लामी जीवन व्यवस्थेचे सर्वात प्रथम वैशिष्ट म्हणजे त्यांनी मानवसमाजाला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना वास्तविक स्वातंत्र्य प्रदान केले. माणूस स्वतंत्र जन्मला आणि स्वातंत्र्य माणसाचा जन्मसिध्द हक्क आहे. प्रेषितांनी फक्त या संबंधीचे प्रवचणच दिले नाही तर प्रत्यक्षात एक आदर्श समाज घडवून आणला. 


दीड हजार वर्षापूर्वी अरब मधून गुलामगिरीचे पुर्णपणे उच्चाटन केले आणि गुलामगिरी मुक्त स्वतंत्र समाज स्थापित केला. जो आजच्या तथाकथित प्रगतीशील अमेरीका सारख्या देशालाही एकविसाव्या शतका पर्यंतही साध्य करता आला नाही. आजदेखील तेथील कृष्णवर्णीय नागरीकांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो.


गुलामांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी माणूस बनविले. हीन, दीन, माणूसपण नाकारलेल्या सामान्य गुलामांना प्रतिष्ठा बहाल केली. ते ही आपल्या सारखेच मानव आहेत ही भावना लोकांमध्ये निर्माण केली. गुलामांना मुक्त केले आणि त्यांचा विकासाचे मार्ग मोकळे केले, म्हणूनच गुलाम राजे बनले. मानवी इतिहासात गुलाम राजे बनले हे केवळ प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीमुळेच शक्य झाले. आपल्या देशाचा इतिहास पहिला तर दिल्लीच्या तख्तावर सुलतान म्हणून आलेला कुतुबुद्दीन ऐबक, शमसुद्दिन अल्तमश, गियासुद्दिन बलबन असे जवळपास नऊ सुलतान पुर्वाश्रमीचे गुलाम होते. 


विषमता ही कोणत्याही समाजाला लागलेला दुर्दम्य आजार असतो. ज्या समाजात विषमता नांदते तो समाज कधीही प्रगती करु शकत नाही. त्या समाजात कधीही शांती नांदू शकत नाही. उलट असा समाज अंतर्गत यादवी आणि कलहामुळे नष्ट होण्याचीच जास्त शक्यता असते. पैगंबर सल्ल. यांनी सर्व विषमता आणि असमानतेचा कडाडून विरोध केला आणि विश्वबंधुत्वाचा आणि समानतेचा अद्वितीय सिध्दांत मानवतेला दिला. तसे पाहता जगातील सर्व इश्वरी धर्मांनी / समाज सुधारकांनीही याच सिद्धांताचा प्रचार केला, परंतु प्रेषितांनी या सिध्दांताला व्यवहारिक स्वरुपात सादर केले. 


प्रेषितांनी लोकशाही शासनप्रणालीला तिच्या सर्वोकृष्ट रूपात स्थापन केले. राजसत्ता, राजे-महाराजे आणि तिला प्रस्थापितांच्या वंशवादाच्या परंपरेतून मुक्त करुन कर्तृत्व आणि योग्यतेवर आधारीत माणसाच्या सुपूर्द केले. कायद्याचे राज्य निर्माण केले. राष्ट्राच्या सर्वोच्च शासकाला देखील सामान्य माणसाप्रमाणे न्यायाधिशासमोर हजर व्हावे लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवीन राज्यघटना अमलात आणली. जनतेला माहिताचा अधिकार दिला जो अधिकार मिळविण्यासाठी आम्हाला एकविसाव्या शतकाची वाट पाहावी लागली तो माहितीचा अधिकार इस्लामने पंधराशे वर्षापुर्वीच दिला. जनतेला आपल्या नालायक शासकाला परत बोलविण्याचा अधिकार दिला. (ठळसहीींें लरश्रश्र लरलज्ञ) जो आज देखहल आमच्यासाठी स्वप्नवत आहे. राज्यकर्ता जनतेचा मालक नसून सेवक असल्याची नवीन संकल्पना जगासमोर आणली. डर्शीींरपीं ङशरवशीीहळि चा फक्त सिध्दांतच मांडला नाही तर प्रेषित (सल्ल.) यांनी आणि त्यानंतर आलेल्या खलीफांनी प्रत्यक्षात तो कृतीतून सिद्ध करून दाखविला. 


प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीजातीचा उद्धार केला. शेकडो वर्षापासुन पिडीत आणि शोषित व क्षुद्र समजल्या  जाणाऱ्या स्त्रीला त्यांनी सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य प्रदान केले. महिलांना दीड हजार वर्षापुर्वीच शिक्षणाचे, अध्यापनाचे तसेच उपासनेचे सर्व अधिकार प्रदान केले. प्रेषित सल्ल. यांच्यावर सर्वप्रथम श्रद्धा आणणारी ही स्त्रीच होती. तसेच इस्लामसाठी सर्वात प्रथम आपल्या प्राणाचे बलीदान देणारी देखील स्त्रीच होती. भावी पिढीच्या जडणघडण करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकून इस्लामने स्त्रीला आदर्श समाजनिर्मितीची महत्वपूर्ण जबाबदारी दिली. स्त्रीला पतीच्या निवडीचे अधिकार, ‘खुलअ’ अर्थात घटस्फोट घेण्याचे, पुर्नविवाहाचे अधिकार प्रदान केले, स्त्रीला वारसा हक्क प्रदान केला. प्रेषितांनी शोषणमुक्त आणि वेश्यामुक्त समाज निर्माण करुन दाखविला.


प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अथेन्स, रोम, इराण किंवा चीनच्या विद्यापीठातून धडा घेतला नव्हता ते स्वत: निरक्षर होते. परंतु त्यांनी संपूर्ण मानवजातीला महानतेच्या सिध्दांताची ओळख करुन दिली. प्रेषित सल्ल. यांंची क्रांती ही बौध्दीक क्रांती होती. म्हणूनच कुरआनच्या अवतरणाची सुरूवात ज्ञानाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या आयातीने होते. तद्नंतर प्रेषित सल्ल. यांनी ज्ञान, विज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली आणि संपुर्ण जगाला प्रज्वलंत केले. प्रेषित सल्ल. यांनी मानवाला शास्त्रीय दृष्टीकोन दिला. विज्ञानाची ओळख करुन दिली. संशोधन वृत्तीला प्रोत्साहीत केले. ज्ञान मिळविण्यासाठी चीनला जावे लागले तरी जाऊन ज्ञानार्जन करा असे फर्माविले. विवेकाला मानवाची सर्वात मोठी संपत्ती संबोधिले. अरबांमध्ये बोटावर मोजता येतील एवढे साक्षर लोक होते. परंतु पैगंबर सल्ल. यांनी आपल्या 23 वर्षाच्या प्रेषित्वाच्या काळात संपूर्ण अरबला फक्त साक्षरच केले नाही तर अशा पध्दतीने सुसंस्कृत केले की ते पुढे ज्ञान आणि विज्ञानासह प्रत्येक क्षेत्रात दिपस्तंभ ठरले. युरोपच्या उदयाच्या अगोदर पाचशे वर्षे मुस्लीमांनी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. 


प्रेषितांनी आपल्या जीवनव्यवस्थेने जगाला अपराध निर्मुलनाचे रहस्य सांगीतले. अपराधाची मुळ कारणे विषद करुन त्याच्या निवारणाचा मार्ग दाखविला. लोकांच्या मनात इश्वराचे भय निर्माण केले. तो सदासर्वदा आपल्याला पाहत आहे आणि अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी तोच आपल्या कर्माचा योग्य मोबदला देईल. ईश्वराचे भय लोकांच्या मनात इतके बसविले की लोक स्वतः अपराधापासून परावृत्त झाले. ज्यांच्या हातून काही गुन्हा झाला ते लोक गुन्हा घडल्यास स्वत: शिक्षा मागायला येऊ लागले. आज देखिल जगात जेथे जेथे इस्लामी संविधान आहे तेथे-तेथे अपराधाचे प्रमाण तुलनामत्क दृष्ट्या अत्यल्प आहे. हेच इस्लामी राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून थोडक्यात म्हणावे लागेल की ही राज्यघटना त्रिकालाबाधीत व्यवहार्य आहे.अरब हे घोर व्यसनी, दारुचे चाहते होते. ज्याच्या घरात सर्वात जुनी दारु तो धनवान समजला जाई. अशा व्यसनामध्ये लिप्त समाजाला प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी पुर्णपणे नशामुक्त करुन दाखविले. टप्प्या-टप्प्यात त्यांचे प्रबोधन केले आणि कालांतरणाने जेंव्हा दारु हराम करण्यात आली त्यावेळे मदिनाच्या गल्ली बोळात दारुचे पाट वाहत होते. लोकांनी आपल्या जवळील दारु ओतून दिली. -(उर्वरित पान 4 वर)


जो त्यावेळेस दारु पित होता त्याने उलटी करुन प्यायलेली दारु बाहेर काढली. अशा पध्दतीने पुर्ण समाज नशामुक्त करण्यात आला. ज्याचे इतिहासात दुसरे उदाहरण सापडणार नाही. 


प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी लोकांना सर्व अवडंबरातुन मुक्त करुन वैज्ञानिक दृष्टीकोन प्रदान केला. समाजाला पुर्णपणे कर्मकांड, अंधश्रध्दा, जादू टोणा, भूतप्रेत इत्यादी पासून पुर्णपणे मुक्त केले. तसेच धर्मपंडिताच्या पाखंडातून समाजाची सुटका केली. लोकांना वस्तुनिष्ठ आणि तार्कीक वैचारिक बैठक दिली.


प्रेषितांनी कोणत्याही सैनिक अ‍ॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतले नव्हते. तरी देखील अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत झालेल्या युध्दात ते अजेय राहीले. निर्विवादपणे ते एक महान योद्धे होते. त्यांच्या युध्दनितीचा अभ्यास केल्यास डोळ्याचे पारणे फिटतात. या भुतलावर एखादा व्यक्ती सिध्दांतवादीही असावा, सैनिक ही असावा आणि नेताही असावा, हे अशक्य प्राय आहे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या रूपाने जगाने या अतिदुर्लभ विशेषतांच्या संयोगाला मूर्त स्वरुपात पाहिले आहे. 


प्रेषितांनी कुरआनच्या मार्गदर्शनात एक संपुर्ण व्यवस्था निर्माण केली. सत्य, शांती, समता, न्याय आणि स्वातंत्र्य हे या व्यवस्थेचे मूळ सिध्दांत. नैतीकता आणि सदाचार आणि इशभय या व्यवस्थेचा पाया या व्यवस्थेने समाजाला पुर्णपणे शोषणमुक्त केले. मानवी इतिहासात सर्वप्रथम मानवअधिकाराला घटनात्मक रूप दिले. कोणतेही भेदभाव न बाळगता फक्त मानवतेच्या आधारावर न्याय निर्धारित करण्यात आला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परस्पर संबंध अधोरेखीत करण्यात आले. याच तत्वाच्या प्रेरणेने आज मानवअधिकार आयोग आणि संयुक्त राष्ट्र काम करते. पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी मानवतेच्या इतिहासातील एकमेव अशी रक्तहीन क्रांती घडविली ज्यात उभय पक्षाकडून फक्त 1100 लोकांचा बळी गेला. मक्कावर विजय प्राप्त झाल्यानसंतर जवळपास दहा लाखचौरस मैलचा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता.परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या क्रांतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही क्रांती तात्कालिक नव्हती. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जे तत्व आणि सिध्दांत दिले, जेव्हा-जेव्हा जगात याची अमलबजावणी होईल पुन्हा तशीच क्रांती होऊन तसाच निकोप समाज व निस्वार्थ व्यक्तीमत्वाचे लोक निर्माण होतील. 


प्रेषित सल्ल. यांचे जीवन म्हणजे कुठली अख्यायिका नव्हे, ते एक अटल सत्य आहे आणि मानवतेला शेवटपर्यंत मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ आहे. जेवढ्या सुक्ष्मपणे प्रेषित सल्ल. यांच्या संपुर्ण जीवनाचा अभ्यास करण्यात आला, तेवढा जगात कोणाचाही करण्यात आलेला नाही. प्रेषित सल्ल. यांच्या वकत्व्य आणि आचारणाची सत्यता पडताळण्यासाठी ज्या लोकांच्या माध्यमातुन ही माहिती मिळाली त्यांच्याही विश्वासहर्तेची पडताळणी करण्यासाठी त्यांच्याही संपुर्ण जीवनाचा अभ्यास करण्यात आला. 


जवळपास एक लाख लोकांची पडताळणी करुन पैगंबर सल्ल. यांचे  वक्तव्य आणि आचारणाला हदीस संकलकांनी संपादित केलेले आहे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. साहेब फक्त मुसलमानासाठी प्रेषित म्हणून पाठविले गेले नाही. कुरआनचे स्पष्ट प्रतिपादन आहे की, ’हे प्रेषित! आम्ही तुम्हाला संपुर्ण जगवासीयासाठी कृपा बनवून पाठविले आहे’ (कुरआन)


ईश्वराने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना सफल मानवी उद्धाराची जीवन व्यवस्था देऊन पाठविले नसते तर जग आतापर्यंत विनाशाताच्या खाईत लोटले गेले असते. ते आले आणि त्यांनी जगाला विनाशापासुन वाचविले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जगावर एवढे उपकार आहेत म्हणूनच प्रत्येक वेळेस त्यांच्या नावावर आपण मुहम्मद (स.) म्हणतो अर्थात ईश्वर त्यांच्यावर कृपा करो. 


- अर्शद शेख 

आर्किटेक्ट

मो. 94222 22332


 


अल्पसंख्याकांना अभय, हे लोकशाहीचे भूषण मानले जाते. हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या लोकसत्ताक राज्यात अनेक अल्पसंख्यांक जमाती होत्या. त्या सर्व जमातींना हजरत पैगंबरांनी कायद्यान्वये अभय दिले. अल्पसंख्यांकाचा धर्म, त्यांची संस्कृती अबाधित ठेवण्याकरिता त्यांनी वेळोवेळी जाहीर फर्माने काढली आहेत. केवळ मुस्लिम बहुसंख्यांक म्हणून त्यांचेच राज्य आहे असे अल्पसंख्यांकांना वाटू नये, या विषयी प्रेषित मुहम्मद सल्ल. फार दक्षता घेत. एखाद्या लहान अल्पमतवाल्या जमातीला देखील राज्याविषयी आपुलकी व विश्वास वाटेल असे वर्तन ठेवण्याबद्दल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली होती.  

समाजात सर्व साधारणपणे अशी कल्पना स्थापित आहे कि धर्म आणि राजकारण हे दोन वेगवेगळे विषय आहेत. राजकारण घाणेरडं आणि धर्म पवित्र मानला जातं. धर्म ही प्रत्यकाची वैयक्तिक बाब आहे असाही समज आहे. धर्म, पूजा पाठ आणि काही कर्मकांडाशी संबंधित आहे म्हणून ते आपल्या घरापर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजे हा ही समज व्यापक प्रमाणात समाजात रूजलेला आहे. राजकारण हे देशाचे शासन चालविण्यासंबंधीची विचारधारा आहे. राजकारणाचा धर्माशी काही एक संबंध नाही. इतर धर्मांच्या बाबतीत ही धारणा जरी खरी असली तरी इस्लामच्या बाबतीत ही धारणा बरोबर नाही कारण इस्लाममध्ये धर्म आणि राजकारण यांना वेगळे करताच येत नाही. उलट धर्माच्या उच्च नीति मुल्यांच्या पायावर राजकारणाची इमारत उभी करावी लागते. 

पल्या देशात साधारणपणे अध्यात्मिक प्रवृत्तीच्या सज्जन लोकांनी राजकारणांत पडू नये असा सल्ला दिला जातो. मुस्लिमांमध्येही उलेमांनी राजकारणात भाग घेऊ नये, असा एक विचार प्रवाह अलिकडे प्रबळ झालेला आहे. भारतीय परिपेक्षात जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती ही की, धर्मापासून राजकारणाला दूर ठेवा म्हणणारी मंडळी सत्ता प्राप्त करण्यासाठी मात्र धर्माचा केवळ आधारच घेत नाहीत तर त्याचा  दुरुपयोग देखील करतात. 

काही जण म्हणतात इस्लामचे दोन प्रकार आहेत; एक सुफी इस्लाम आणि दुसरा राजकीय इस्लाम. सुफी इस्लाम हे भारतीय संस्कृतीशी निगडित आहे आणि राजकीय इस्लाम परकीय व आक्रमक आहे, असा भ्रम पसरविला गेला आहे. वास्तविक पाहता इस्लाम एकाच आहे. पैगंबर मुहम्मद (सल्लम.) यांनी आपल्या आयुष्यात धार्मिक, सामाजिक व राजकीय सुधारणा एकाच वेळी अत्यंत यशस्वीपणे करून दाखविल्या. धार्मिक आणि सामाजिक सुधारणाप्रमाणेच राजकीय सुधारणा करण्यात पैगंबरांना संपूर्ण यश मिळाले. मानव्य हे त्यांच्या राजकारणाचे अधिष्ठान आहे. दडपशाही, भ्रष्टाचार, जुलूम, लाच लुचपत, अत्याचार, द्वेष, तिरस्कार, ध्रुवीकरण यापासून त्यांनी आपल्या राजकारणास दूर ठेऊन राजकारण केले होते. ज्यात सहकार्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मानवी मुल्यांचा समावेश होता. त्यांचे राजकारण म्हणजे या उच्च नीति मुल्यांचे प्रात्यक्षिकच होय.

 आजची पाश्चात्य राष्ट्रे ज्या लोकशाहीचा मोठा अभिमान बाळगून आहेत, ती लोकशाही प्रस्थापित करण्याचे पहिले श्रेय हजरत मुहम्मद सल्ल. यांच्याकडे जाते. त्यांनी ज्या काळात अरबस्तानात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली त्या काळात पाश्चात्य राष्ट्रांमध्ये बेबंदशाही बोकाळलेली होती, पाश्चात्य राष्ट्रांचे जंगली युग अजून संपलेले नव्हते किंबहुना आजही संपलेले नाही. फक्त त्यांच्या जंगली व्यवस्थेवर आधुनिक सभ्यतेचा बुरखा त्यांनी घातलेला आहे. हजरत पैगंबरांच्या लोकशाही नंतर 1000 वर्षांनी पाश्चात्य राष्ट्रात लोकशाहीच्या संकल्पना लोकांच्या मनात मूळ धरू लागल्या. इसवी सन 1641 साली राजा व प्रजा यामधील यादवीस तोंड फुटून त्याचे पर्यावसान 1688 सालाच्या फ्रेंच क्रांतीमध्ये झाले. लोकशाहीच्या गोंडस नावाखाली वाटेल त्याला धिंगाणा घालण्याची त्यांनी ही एक सोय करून ठेवली आहे. ज्यामुळे लोकशाही म्हणजे ‘उचल्यांचा बाजार’ न वाटता सुखाचे राज्य वाटावे, अशी त्यांच्या लोकशाहीची रचना आहे.

पैगंबरांच्या लोकशाहीत कोणत्याही एका गटाचा वरचष्मा नव्हता. सर्वाना त्यांच्या योग्य ते प्रमाणे राज्यकारभारात स्थान मिळे. त्यामुळे कोणत्याही कर्तबगार लोकांस महत्वाचे स्थान मिळत असे. त्यांच्या प्रशासनातील अधिकारी मंडळी फक्त स्वजातीयांच्या किंवा आप्तेष्टांच्या कल्याणाकरिता न झटता साऱ्या राष्ट्राच्या कल्याणाकरिता झटत असत. सरकारी अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी पैगंबर म्हणतात,’ त्यांनी (अधिकाऱ्यांनी ) आपली राहणी साधी ठेवली पाहिजे. गरजूंना त्यांना सहज भेटता आले पाहिजे. जे बेकार आहेत, जे आपले जीवन जगण्यास असमर्थ आहेत त्यांना सहाय्य देता आले पाहिजे. मुस्लिमेतर नागरिकांना जे हक्क आहेत ते अबाधित ठेवता आले पाहिजेत.’

समता 

हजरत मुहम्मद पैगंबर सल्ल. प्रणित लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे समता. समता ही खरी लोकशाहीची द्योतक असते. ज्या राष्ट्रात काळा-गोरा हा भेदभाव केला जातो, वर्णावर योग्यता ठरविली जाते, उच्चनीचपणा दाखविला जातो, धनिक आणि गरीब असे कप्पे पडले जातात त्या राष्ट्रांनी आपल्या लोकशाहीचा कितीही डांगोरा पिटला तरीही ती लोकशाही आदर्श  अशी कधीच होणार नाही. इतकेच नव्हे तर ते लोकशाहीचे विडंबन आहे असे मानले जावे. लोकशाही म्हटली की त्या ठिकाणी स्पृश्यास्पृश्यता, भेदभाव, उच्चनीचपणा किंवा तुष्टीकरण असता कामा नये. सगळ्यांना सारखे स्वातंत्र्य, सारखा न्याय, सारख्या सवलती म्हणजेच खरी लोकशाही होय. पैगंबरांच्या लोकशाहीत श्रीमंतापासून ते गरिबांपर्यंत सर्व नागरिक समतेने राहात होते. त्या ठिकाणी अरब, निग्रो असा भेदभाव नव्हता. मुस्लिमाना एक कायदा आणि ज्यू लोकांना एक कायदा असा पंक्ती प्रपंच दृष्टीस पडत नव्ह्ता. पैगंबरांचे लक्ष व्यक्तीच्या कर्तबगारीवर व योग्यतेवर होते. त्यांच्या लोकशाही मध्ये सैन्याचा सर्वाधिकारी झैद रजि.  नावाचे गुलाम होते. त्याचप्रमाणे मुख्य मशिदीत अजान देण्याचा बहुमान बिलाल रजि. नावाच्या काळ्या निग्रो या सहाबींना  देण्यात आला होता. हजरत पैगंबरांच्या राज्यात मालक व नोकर यामध्ये देखील आदर्श अशी समता होती. स्वतःला पंचपक्वान्ने आणि नोकरास कोंडाभाकर असा प्रकार तेथे दृष्टीस पडत नसे. आपण खातो तेच अन्न आपल्या नोकरास द्या, अशी हजरत पैगंबरांची आज्ञा असल्यामुळे मालक जे अन्न खाई तेच अन्न नोकरास मिळत असे. त्याप्रमाणेच नोकरास वाजवी पेक्षा जास्त काम कधीच देण्यात येत नसे. एखाद्या वेळी नोकरास कामाचा जास्त ताण पडला तर खुद्द मालक त्याच्या मदतीस जात असे. मालक व नोकर यामध्ये हजरत पैगंबर सल्ल. यांनी घालून दिलेला समतेचा उपक्रम त्यांच्या अनुयायांनी किती इमाने इतबारे चालू ठेवला हे पुढील उदाहरणावरून सिद्ध होण्यासारखे आहे. 

एकदा असे झाले की, इस्लामी लष्कराने जेरूसलम जिंकले व पराभूत ख्रिश्चन शासकांसोबत वाटाघाटीसाठी अमिरूल मोमेनीन हजरत उमर फारूख रजि. (द्वितीय खलीफा) यांना पाचारण केले. ते तहाच्या वाटाघाटीसाठी जेरुसलेमकडे निघाले. निघताना त्यांनी फक्त एक नोकर सोबत घेतला होता. बसावयास फक्त एकच उंट असल्यामुळे हजरत उमर रजि. व त्यांचा नोकर आळीपाळीने उंटावर बसून जेरुसलेमकडे मार्गक्रमण करू लागले. हजरत उमर रजि. उंटावर बसले की त्यांचा नोकर पायी चालत असे, काही अंतर गेल्यावर हजरत उमर नोकरास उंटावर बसवीत व आपण पायी चालत. ज्यावेळी जेरुसलेम शहर जवळ आले त्यावेळी नोकराची उंटावर बसण्याची पाळी आली होती. शहर जवळ आले म्हणून तो नोकर उंटावर बसावयास संकोच करू लागला. पण हजरत उमर यांच्या आग्रहामुळे त्याला उंटावर बसावे लागले. नोकर उंटावर व हजरत उमर पायी चालत जेरुसलेमच्या वेशी जवळ आले. हजरत उमर यांचा सर सेनापती अबू उबेद रजि. हे त्यावेळी वेशीजवळ स्वागताकरिता उभे होते. नोकर उंटावर व राजा पायी चालत असलेला पाहून जेरुसलेम चे लोक तुच्छतेने हसतील अशी त्यांच्या सेनापतीने हजरत उमर यांना कळवून त्यांना उंटावर बसण्याचा आग्रह केला. त्यावर हजरत उमर म्हणाले, ’तुमच्या सारखी सूचना मला आतापर्यंत कोणी केली नाही. आपली ही सूचना मुस्लिमांची नाचक्कीच करील. आता पर्यंत आपली अधोगती झाली होती व आपला सगळीकडे धिक्कार होत होता. परंतु आपल्या इस्लाम धर्मामुळे आम्हां सर्वांस सारखा मान मिळाला आहे. आपण सांगता त्या प्रमाणे मी वागेन तर पुन्हा आपली पूर्वीप्रमाणे अधोगती झाली आहे हे सिद्ध होईल.’ आणि हजरत उमर रजि. जमिनीवर व नोकर उंटावर अशा अवस्थेतच ते जेरूसलम शहरामध्ये दाखल झाले. त्यांचा हा निर्णय जेरूसलम वासियांना चकीत करून गेला. जेरूसलमवासी हजरत उमर रजि. यांच्या न्यायप्रिय व समानतेच्या या प्रात्यक्षिकाला पाहून भाराहून गेले. वरील उदाहरणावरून इस्लामच्या लोकशाहीत मालक व नोकर यामध्ये किती समता होती हे स्पष्टपणे दिसून येईल. 

स्वातंत्र्य

हजरत मुहम्मद पैगंबर सल्ल. प्रणित लोकशाहीत प्रत्येक नागरिकास पूर्ण स्वातंत्र्य होते. कोणीही सर्वसाधारण नागरिक राज्यप्रमुखास        -(उर्वरित पान 23 वर)

बेडरपणे जाब विचारीत असे. एकदा एका नागरिकाने खलिफा उमर यांना भर सभेमध्ये एका गोष्टीचा जाब विचारला. त्या बरोबर काही लोकांनी त्या नागरिकास गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून खलिफा म्हणाले, ’त्याला मोकळेपणाने बोलू द्या. नागरिकांनी जाब विचारून आम्हास जाणीव करून दिली तर त्यांनी आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडले असेच मी म्हणेन.’ हजरत मुहम्मद (सल्ल.) यांनी  काढलेली राजकीय फर्माने पाहिली म्हणजे परधर्मीयांच्या आचार व विचार स्वातंत्र्याबद्दल ते किती दक्ष होते हे सहज दिसून येते. त्यांच्या राज्यात ज्यू लोकांचे फार मोठे प्रस्थ होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय व्याज होता. त्यामुळे गरीबांचे जरी शोषण होते तरी ज्यूंच्या हातात धन खेळत होता. आपला धर्म प्रसार त्यांनी नेटाने चालू ठेवला होता. मुसलमानांचा ते उघड हेवा करीत, पण, हजरत मुहम्मद सल्ल. यांनी राजकीय अधिकाराच्या जोरावर त्या लोकांची मुस्कटदाबी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही किंवा त्यांची संपत्ती जप्त करून टाकली नाही. आपल्या धर्माविरुद्ध वाटेल त्या खोट्या नाट्या कंड्या पिकवितात म्हणून त्यांनी ज्यू लोकांस जरब दाखविली नाही किंवा मुसलमानांचा उघड-उघड द्वेष करतात म्हणून त्यांचे खून पडले नाहीत. आपल्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला किंवा समूहाला इतके स्वातंत्र्य दिल्याची उदाहरणे आपणास फारच थोडी सापडतील. 

अल्पसंख्याकांना अभय

अल्पसंख्याकांना अभय, हे लोकशाहीचे भूषण मानले जाते. हजरत मुहम्मद (सल्ल.) यांच्या लोकसत्ताक राज्यात अनेक अल्पसंख्यांक जमाती होत्या. त्या सर्व जमातींना हजरत पैगंबरांनी कायद्यान्वये अभय दिले. अल्पसंख्यांकाचा धर्म, त्यांची संस्कृती अबाधित ठेवण्याकरिता त्यांनी वेळोवेळी जाहीर फर्माने काढली आहेत. केवळ मुस्लिम बहुसंख्यांक म्हणून त्यांचेच राज्य आहे असे अल्पसंख्यांकांना वाटू नये, या विषयी प्रेषित मुहम्मद सल्ल. फार दक्षता घेत. एखाद्या लहान अल्पमतवाल्या जमातीला देखील राज्याविषयी आपुलकी व विश्वास वाटेल असे वर्तन ठेवण्याबद्दल त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली होती.  

सरकारी नोकर म्हणजे जनतेचा सेवक, त्याने आपली जात किंवा धर्म याचा विचार न करता न्यायाने वागले पाहिजे असा दंडक घालण्यात आला होता. अल्पसंख्यांक असलेल्या ख्रिश्चन जमातीशी एक मुस्लिम अधिकाऱ्याने उद्धट व बेजबाबदार वर्तन केले म्हणून त्याला राजीनामा देण्यास खलिफा हजरत उमर रजि. यांनी भाग पाडले. न्याय धर्माकडे पाहून दिला जात नव्हता किंवा पैशा आधारे विकला जात नव्हता. गरीब असो, श्रीमंत असो, नोकर असो कोणीही मुसलमान असो किंवा परधर्मीय असो, सर्वांना हजरत मुहम्मद सल्ल. यांच्या राज्यात सर्वांना सारखा न्याय मिळत असे. 

न्याय

एकदा त्यांच्या समोर मुस्लिम विरूद्ध ज्यू असा एक तंटा आला असतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मुस्लिम व्यक्तीला दोषी ठरविले. पवित्र कुरआनाच्या आज्ञेप्रमाणे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी न्यायास अत्यंत श्रेष्ठ स्थान दिले आहेत. कुरआनमध्ये न्यायाच्या महत्वाला अधोरेखित करताना परमेश्वराने म्हटले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहा आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-बापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरी देखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.’’ (सुरे निसा : आयत नं. 135) 

हजरत मुहम्मद सल्ल. प्रणित  लोकशाहीचे लक्षात ठेवण्यासारखे एक वैशिष्ट्ये म्हणजे अधिकाराचा सदुपयोग होय. अलिकडे राजकारण हाती घेतले की ते यशस्वी करण्याकरिता अत्याचाराच्या कित्येक वेळा अवलंब करावा लागतो, असे नामुष्कीचे उद्गार काढणाऱ्या मुत्सद्यांच्या तोंडास हजरत पैगंबरांनी चांगलीच पाने पुसली आहेत. अधिकाराचा दुरूपयोग करून केले जाणारे अत्याचारी राजकारण जगाच्या इतिहासात अत्यंत लांछनास्पद समजले जाते. अत्याचाराचा वारंवार आश्रय घ्यावा लागणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. राजकारणातून सत्ता मिळते आणि अधिकारातून सत्ता मिळते आणि हे अधिकार ही राजकारणामधील एक प्रचंड शक्ती आहे. उत्कृष्ट राजकारणाचा दाखला म्हणून आपणास राजकीय अधिकारांच्या सदुपयोगाकडे बोट दाखविता येईल. याच गोष्टीचा पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी अवलंब केला होता. 

राजकारण यशस्वी करण्याकरिता त्यांनी अत्याचाराचा भस्मासुर कधीही निर्माण होवू दिला नाही. त्यांनी लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवल्यापासून एकंदर राजकारणाचा विचार केला म्हणजे अत्याचाराचे अनेक प्रसंग त्यांनी मोठ्या शिताफीने टाळले होते हे लक्षात यावयास फारसा वेळ लागणार नाही. उदाहरणादाखल म्हणून आपणास एका प्रसंगाचा उल्लेख करता येईल. एकदा हजरत मुहम्मद सल्ल. यांना बदनाम करण्याकरिता व त्यांचे लोकशाही शासन उलथून टाकण्यासाठी काही ज्यू लोकांनी एक भयंकर कट रचला होता. पण हा कट ऐनवेळी उघडकीस आल्यामुळेे ज्यू लोकांचा बेत सपशेल फसला. न्यायासनासमोर त्यांची चौकशी होऊन त्यांना योग्य त्या शिक्षा झाल्या. पण तेवढ्यामुळे जनतेचे समाधान झाले नाही. ज्यांनी हा कट करून राष्टास धुळीस मिळविण्याचा प्रयत्न केला त्यांचीच काय पण ‘ एकजात सर्व ज्यू लोकांची कत्तल करा’ अशा गर्जना शहराच्या कानाकोपऱ्यातून ऐकू येऊ लागल्या. तुमच्या हातून झाले नाही तर आम्हास परवानगी द्या, आम्ही त्यांची कत्तल करतो असे काही लोक हजरत मुहम्मद सल्ल. यांना उघडपणे बोलू लागले. दहा बारा ज्यू लोकांनी चूक केली म्हणून त्यांचे प्रायश्चित सर्व ज्यू लोकांना देणे म्हणजे धडधडीत त्यांच्यावर अत्याचार होय असे हजरत मुहम्मद सल्ल. यांना वाटल्यामुळे त्यांनी ज्यू लोकांच्या हत्याकांडास संमती दिली नाही किंवा त्यांच्यावर कडक नियंत्रणही घातले नाही. जेव्हा आस बिन जबल रजि. यांची यमनचे गव्हर्नर म्हणून त्यांनी नेमणूक केली. त्यावेळी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना पुढीलप्रमाणे उपदेश केला, ’’ तुम्ही प्रजाजनांस अत्यंत दयाळूपणाने व विचाराने वागविले पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी कठोरपणाने वागता कामा नये किंवा त्यांची संपत्ती लुटता काम नये. त्रस्त लोकांचे सुस्कारे परमेश्वर दरबारी लवकर रुजू होतात, या गोष्टीची आठवण असू द्या.’’ वरील लोकशाही मुल्यांचा निःपक्षपातीपणे विचार केल्यावर अशी आदर्शभूत लोकशाही प्रस्थापित करणारे प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) श्रेष्ठ दर्जाचे राजकीय धुरंधर होते व त्यांनी स्थापित केलेली राजकीय मुल्ये प्रलयाच्या दिवसापर्यंत  मानवजातीला आदर्श राजकारण कसे करावे, याचे मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत, यात शंका असण्याचे कारण नाही. सभ्यतांच्या उदय आणि ऱ्हासाबद्दल काही विचार या आधीच्या लेखात मांडले आहेत. आणखीन काही गोष्टींचा या संदर्भात तपास करताना असे दिसून येते की सभ्यतांचा विस्तार होत असताना किंबा एका ठराविक स्थितीस पोहोचल्यानंतर त्यांना ज्या समस्यांशी तोंड द्यावे लागते, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याचे प्रत्युत्तर देण्याची त्यांची क्षमता असते किंवा नाही. मुळात सभ्यतांचा जन्म कठीण प्रसंगातून होतो. अशा कोणत्याही सभ्यतेच्या अनुयायांमध्ये समोरील आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी नसेल तर त्या सभ्यतांचे भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही सभ्यतेचा प्रवास सतत सुरू असावा लागतो. एक व्यक्ती असो की समाज अथवा त्यापासून उदयास आलेली सभ्यता हे सर्व या विश्वाचे (Universe) घटक आहेत. ज्या प्रकारे धरती इतर ग्रह, धरतीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व या विश्वाचे घटक आहेत. हे ब्रह्मांड निर्मितीनंतर स्थिर नसून आपल्या प्रवासाच्या प्रत्येक बिंदूवर सदैव विस्तारत आहे. एका व्यक्तीपासून जसे कुटुंब जन्माला येते, त्यापासून समाज, संस्कृती; तसेच या जगातील सर्व सभ्यता विस्तारत आहेत. हा सृष्टीचा नियम आहे. जर काही कारणाने विश्वातील एखादे अस्तित्व या सृष्टीच्या नियमाविरूद्ध जात असते तर मग त्याचा मृत्यू अटळ आहे. अशाच प्रकारे सभ्यतांना विस्तारायला हवे. त्या सभ्यतेमध्ये विस्तारासाठी पूरक तत्त्वे असायला हवीत. कोणत्याही संस्कृती-सभ्यतेमध्ये विभाजनाला थारा नसतो. यासाठी ती सभ्यता साऱ्या मानवजातीला आकर्षित करणे गरजेचे असते. जर मानवजातीला वेगवेगळ्या निकषांवर विभागले जात असेल तर ही प्रक्रिया सृष्टीच्या नियमांविरूद्ध जात आहे असे समजले जावे आणि नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्याचबरोबर त्या सभ्यतेची नैतिक मूल्ये सर्वसमावेशक असायला हवेत. जर समाजातील मानवांना निरनिराळ्या निकषांवर विभागले गेले तर मग संस्कृतीचे वेगवेगळ्या परंपरेत विभाजन होईल. याचा अर्थ संस्कृतीचे रूपांतर परंपरेत होईल. परंपरा कोणत्याही मानवी समूहासाठी प्रगतीची दारे उघडत नाही. प्रगतीचे दार बंद झाले की ती संस्कृती स्वतःहून आपला विनाश ओढवते. तसेच सभ्येमध्ये संतुलन असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या त्या सभ्यतेतील माणसामाणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. वंश, वर्ण, जात अशा प्रकारचे भेदभाव जर माणसामाणसांमध्ये केले जाऊ लागले तर ती संस्कृती स्वतःच विभाजनाकडे जाते. अशा संस्कृतीवर आधारित सभ्यतादेखील मग एक सभ्यता म्हणून शिल्लक राहात नाही.

जगात ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माने मानवजातीची विभागणी केली, पण ही विभागणी वर्ण, वंश, जात या निकषांवर नाही. ख्रिस्ती धर्माने मानवजातीला ख्रिस्ती आणि बिगर ख्रिस्ती अशी विभागणी केली, तर दुसरीकडे इस्लाम धर्माने सकल मानवजातीची विभागणी श्रद्ध आणि अश्रद्ध अशी केली. म्हणजे ही बिभागणी अटळ नाही. आज जे लोक ख्रिस्ती नाहीत उद्या ते ख्रिस्ती धर्मात प्रवेश करू शकतात. तसेच ज्या लोकांनी इस्लाम धर्मावर आज श्रद्धा ठेवलेली नाही ते उद्या श्रद्धा बाळगू शकतात.

कोणतीही वैश्विक सभ्यता ज्या धर्मावर ती आधारित असेल त्या धर्माची विचारधारा देखील वैश्विक असायला हवी. म्हणजे वैश्विक नियमांशी सुसंगत असायला हवी. त्याच्या शिकवणी एखाद्या विशिष्ट समाज-समूहासाठी, भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशांसाठी, विशिष्ट जाती-समुदायासाठी नव्हे तर साऱ्या मानवजातीसाठी असायला हवी. त्याचे संबोधन साऱ्या मानवजातीला असायला हवे. या निकषांवर जगातील दोन सभ्यतांमध्ये बरेच साम्य आहे. एक ख्रिस्ती आणि दुसरे इस्लाम. या दोन्ही सभ्यता ज्या धर्मावर आधारित आहेत त्यांच्या शिकवणी साऱ्या मानवजातीसाठी आहेत. यासाठी ईश्वराची कल्पना एकत्वाची असावी. इस्लाम धर्मात एकमेव ईश्वराची कल्पना असल्याने सारी मानवजात समान आहे. समानता ज्या सभ्यतेत नसेल ती सदोष असेल आणि दीर्घकाळानंतर त्या सभ्यतेत विभागनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. एकाच ईश्वराने साऱ्या मानवजातीला एक पुरुष आणि एका स्त्रीच्या जोडप्याद्वारे जन्म दिला असल्याने सारे मानव एकसमान आहेत. जर मानसामाणसांत भेदभाव केला गेला तर तो धर्माच्या शिकवणींविरूद्ध असल्याने त्याला महत्त्व उरत नाही. ख्रिस्ती धर्मात ईश्वराचे तीन रूप मानले जात असल्याने काही प्रमाणात त्या धर्माच्या अनुयायांमध्ये समानतेचा अभाव आढळतो. एका प्रख्यात इतिहासकाराने असे म्हटले आहे की पाश्चिमात्य राष्ट्रवादाने राष्ट्रवादाच्या विषाणूला जन्म दिला म्हणून ख्रिस्ती सभ्यता एकसंघ राहू शकली नाही. आज ज्या सभ्यतेला ख्रिस्ती सभ्यता म्हणतात ती खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य सभ्यता आहे.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही सभ्यतेने मानवजातीच्या विकासात योगदान द्यायला हवे. आज जगात पाश्चात्य सभ्यतेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याचे कारण असे की मानवी जीवनाचा एकही पैलू त्यांनी असा सोडला नाही ज्याच्या विकासात पाश्चात्य विचारवंतांनी आपले योगदान दिले नसेल. विज्ञानाचे क्षेत्र असो की मानवजातीच्या आरोग्याचे तंत्रज्ञान असो की इतर कोणतेही क्षेत्र, या सर्वांमध्ये पाश्चिमात्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. पण त्याचबरोबर जगातील इतर राष्ट्राचा नाश करण्यात देखील पाश्चात्य सभ्यताच सर्वांत अग्रेसर आहे. त्याचे हे कर्तृत्व सृष्टीच्या नियमांविरूद्ध असल्याने त्याला याचे परिणाम आज ना उद्या भोगावे लागणार आहेत हेदेखील निश्चित. ख्रिस्ती धर्मियांच्या आधी मुस्लिम शास्त्रज्ञांनी विद्वानांनी जगभर ज्ञानाचा प्रसार केला. ते विज्ञानाचे क्षेत्र असो की तंत्रज्ञानाचे मुस्लिम वैज्ञानिकांनी बरेच शोध लावलेले आहेत. बरेच तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, इतिहास, वाड्मय आणि इतर ज्ञानाच्या साऱ्या स्रोतांची सुरुवात मुस्लिमांनी केली. नंतरच्या काळात यूरोपियनांनी हा वारसा पुढे चालवतच इतर नवनवीन शोध लावले आणि तंत्रज्ञानाचा विकास केला, जो आम्ही सध्या पाहात आहोत. खगोलशास्त्र आणि अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रांमध्येदेखील मुस्लिमांनी बरेच संशोधन केले. जगातली पहिली नासासारखी वेधशाळा तुर्कीमध्ये होती.

इस्लामी शिकवणींची सुरुवातच मानवजातीच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या आदेशाने होते. कोणतीही मुस्लिम व्यक्ती जोपर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत असत नाही तोवर तो सदाचारी होऊ शकत नाही. कोणत्याही सभ्यतेला धर्माचा, धार्मिक ग्रंथाचा मुलाधार नसेल तर ती सभ्यता जास्त काळ टिकू शकत नाही. धर्माशी बंड करून जगात कम्युनिझमची विचारधारा विकसित करण्यात आली. त्या विचारधारेवर आधारित राष्ट्र सभ्यतेची निर्मिती करताना रशिया, चायना वगैरे देशांमध्ये २-४ कोटी लोकांची हत्या केली गेली. मानवजातीचे रक्त सांडून जी सभ्यता जगात रुजविण्याचे प्रयत्न केले गेले ती जेमतेम ५० वर्षे टिकली नाही. चायनाने उघडपणे जरी कम्युनिझमशी फारकत घेतली नसली तरी त्या राष्ट्रात ती नष्ट झाली आहे. नावापुरता कम्युनिस्ट पक्ष जीवंत ठेवला आहे, ते जगाला दाखवण्यासाठी. निधर्मी सभ्यता असो की निधर्मी राज्यसत्ता मानवजातीने त्यांना कधीही महत्त्वाचे स्थान दिलेले नाही. सभ्यतेचा आधार नेहमी धार्मिक शिकवण, आचारविचार, नीतीशास्त्र, धार्मिक विधी राहिला आहे.

पण या धार्मिक शिकवणींचा आधार कोणता? प्रत्येक धर्मात धर्मग्रंथ असतात ज्यांना धर्माचे, धार्मिक शिकवणींचे मूळ समजले जाते. पण हे धार्मिक ग्रंथ कशाच्या आधारवर आहेत? ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचे धर्मग्रंथ मानवाने रचलेले, साकारलेले नाहीत, तर ते एकमेव ईश्वराने पाठवलेले आहेत. या ग्रंथांमध्ये ज्या शिकवणी आहेत त्या बुद्धिमत्तेला आव्हान देणाऱ्या नाहीत तर बुद्धिमत्ताच या शिकवणींचा मुलाधार आहे, असे जाहीरपणे घोषणा करतात. शिवाय धर्मग्रंथामधील शिकवणी शंकास्पद नसायला हव्यात. कुरआनातील शिकवणींची सुरुवातच अशी होते की हा धर्मग्रंथ अल्लाहने पाठविलेला आहे यात शंका नाही आणि त्याबरोबर या धर्मग्रंथातील कोणतीही गोष्ट अशी नाही जी शंकास्पद असेल. जगाने कितीही ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास केला असला तरी आजदेखील इस्लामचा धर्मग्रंथ कुरआनातील कोणत्याही गोष्टींना विज्ञानाने आव्हान दिलेले नाही.

सांगायचे तात्पर्य हे की कोणत्याही सभ्यतेच्या शिकवणींचा मुलाधार भक्कम असणे गरजेचे आले. जर यात त्रुटी आढळत असतील तर मग एक तर तो ग्रंथ मानवाने रचलेला आहे किंवा यातील मजकुरामध्ये मानवांनी आपल्या आवडीनिवडीनुसार ढवळाढवळ केलेली असेल.


- सय्यद इफ्तिखार अहमदstatcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget