Articles by "आधारस्तंभ"

एकाच अल्लाहवर, प्रेषित आणि पारलौकिक जीवनावर विश्वास, श्रद्धा ही मुक्तीची गुरुकिल्ली आणि इस्लामच्या भक्कम इमारतीचा पाया आहे. यानंतर पाच बाबी अशा आहेत की, त्या मूलभूत आधारस्तंभ बनतात, ज्यावर इस्लामची इमारत उभी आहे.
या पाच बाबी (स्तंभ) म्हणजे
    • एकेश्वरत्व आणि प्रेषितत्व यांची ईश्वरासमोर साक्ष देणे,
    • नमाज प्रस्थापित करणे,
    • जकात अदा करणे,
    • रमजान महिन्यामध्ये उपवास (रोजे) करणे,
    • काबागृहाची पवित्र यात्रा/हज करणे
एकेश्वरतत्व व प्रेषितत्व: यांची साक्ष देणे म्हणजे जाणीवपूर्वक, श्रद्धेने, विश्वासपूर्वक पवित्र कलिम्याची (इस्लामी धर्मसुत्राची) कृतीमध्ये अंमलबजावणी करणे. अल्लाहची गुलामी, भक्ती, प्रसन्नताप्राप्ती व प्रेषितांचे आज्ञापालन हे जीवनामध्ये उन्नती, उत्कर्ष व कायमस्वरुपी पवित्र क्रांती घडवून आणणे आणि ही क्रांती वरील गोष्टींशिवाय शक्य नाही. याकरिता त्यांची अंमलबजावणी, एवढेच नव्हे तर नमाजसुद्धा एक पुढचे पाऊल आहे.

नमाज: प्रस्थापित करण्याचा उद्देशच हा आहे, की मानवाला जाणीवपूर्वक, श्रद्धेने आणि विश्वासाने अल्लाहचे स्मरण व्हावे. गुलामी व आज्ञाधारकता यांची वचनपूर्ती अल्लाहप्रती व्हावी. आंतरबाह्य गोष्टींची पूर्तता करुन अल्लाहसमोर असहायतेने, लाचारीने, अजीजीने मान तुकवावी. नमाज दिवसातून पाच वेळा अनिवार्य आहे. नमाज मानवाला अल्लाहचा सच्चा दास बनविते. त्याला ईश्वरी कोपापासून व अवज्ञेपासून वाचविते. त्याला एक उत्तम आदर्श मानव बनविते. नमाजमुळे ईश्वराशी जवळीक साधली जाते. त्याची भक्ती व उपासना करण्यासाठी इतर कोणत्याही माध्यमाची जरुरी नाही. नमाज अदा करणारी प्रत्येक व्यक्ती ईश्वराच्या प्रेषिताने दाखविलेल्या मार्गाने स्वतः सन्मार्गामार्फत थेट संबंध प्रस्थापित करू शकते. सामूहिक नमाज (सर्व समावेशकपणे) श्रद्धाळू दासांकरिता सामूहिक बल, शिस्त आणि बंधुत्व निर्माण करण्याकरिता आहे. नमाजकरिता जागेची कोणतीही अट नाही, परंतु ती जागा स्वच्छ, पवित्र असली पाहिजे. मस्जिद ही शिस्त व सामूहिकता निर्माण करण्याकरिता आणि मंगल व कर्तव्यपरायणतेचे वातावरण निर्माण करण्याकरिता आहे. सुन्नत व नवाफल नमाज (प्रेषितांच्या आचरण पद्धतीनुसार व अतिरिक्त नमाज) सामायिक पद्धतीने अदा न करता स्वतंत्र व्यक्तिशः अदा करतात. इस्लामची शिकवण आहे की, मुस्लिमाने अल्लाहची स्तुति, आठवण, स्मरण, कुरआनचे पठन आणि इतर अधिक नमाजच्या सहाय्याने आपल्या घराचे वातावरण पवित्र व मंगलमय करावे. नमाज प्रत्येक स्त्री-पुरूषाला अनिवार्य आहे. तथापि स्त्रियांनी घरी नमाज अदा करणे श्रेयस्कर आहे.

मस्जिद व्यक्तिगत मालकीची किंवा खानदानी मिळकत नसते. अल्लाहच्या (ईश्वराच्या) उपासनेचे ते प्रार्थनाघर आहे. मस्जिदमध्ये श्रीमंत-गरीब, राजा-प्रजा, ज्ञानी-अडाणी, शहरी-खेडूत, भांडवलदार-मजूर, काळा-गोरा सर्व एकाच ओळीमध्ये उभे राहून, खांद्याला खांदा लावून नमाज अदा करतात. याप्रमाणे नमाज अल्लाहच्या गुलामीबरोबरच शिस्तबद्धता, उपासना, बंधुत्व, समानता, उत्तमोत्तम आचरण, कर्तव्यपरायणता यांची शिकवण देते. इस्लाम धर्माचे उत्तम ज्ञान असणारा आणि बहुसंख्याकांचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र असणारा नमाजचे नेतृत्व करण्याचा सर्वाधिकार बाळगतो. नेतृत्वाकरिता कोण्या वंशाची किंवा खानदानाची अट नाही. प्रत्येक मुस्लिम इमाम (नेता) बनू शकतो. नमाज अरबी भाषेत होते. कारण वेगवेगळी भाषा बोलणारे मनुष्य, उपासनेची एक भाषा बोलणारे असणे आवश्यक आहे आणि म्हणून साऱ्या विविधतेच्या व फरकांच्या दलदलीतून निघून समानतेच्या व बंधुत्वाच्या कडीमध्ये एकत्र गुंफले जावेत ही यामागची भावना आहे. नमाज ही अल्लाहचे प्राचीन उपासनाघर ‘काबागृह’कडे तोंड करुनच अदा केली जाते, जेणेकरून श्रद्धाळू व भक्तांमध्ये विश्वबंधुत्व व समानता निर्माण व्हावी आणि ते पूर्णतः इस्लामी एकतेच्या केंद्रबिदूत सामावले जावेत.

जकात: अदा करणे ज्याच्याजवळ साडेबावन तोळे चांदी किंवा त्या किमतीएवढी अतिरिक्त रोख रक्कम किंवा धंद्याचा माल आहे, अशा प्रत्येक मुस्लिम स्त्री-पुरुषाने वर्षातून एकदा अडीच टक्के (२.५%) माल किंवा किमत वेगळी करुन अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी गरिबाला मदत म्हणून दान केली पाहिजे. पूर्ण जकात गोळा करुन सामूहिकरितीने लाचार, मजूर आणि गरीब लोकांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी वापरली पाहिजे. हे तरी किमान केलेच पाहिजे. एका सच्च्या मुस्लिमाला धर्मप्रचार व प्रसार, उन्नती व प्रगतीकरिता, गरीब, लाचार व असहाय यांच्या मदतीकरिता आपल्या संपत्तीमधला जास्तीत जास्त वाटा खर्च करण्याचा उद्देश हा आहे. संपत्ती व ऐहिक सुख, भौतिक प्रेमजे साऱ्या वाईटाचे, दुष्कर्मांचे मूळ आहे, ते आपल्या मनातून, हृदयातून निघून जावे आणि अल्लाह व ईशधर्म-इस्लाम आणि पारलौकिक जीवनाविषयी ओढ व प्रेम सर्व सत्कर्म व सन्मार्गाचे उगमस्थान असलेल्या हृदयामध्ये वसावे. जे लोक अल्लाहच्या मार्गामध्ये आपली संपत्ती खर्च करतील त्यांना पारलौकिक-मरणोत्तर जीवनामध्ये त्याचा मोबदला अनंत पटीने मिळेल आणि ऐहिक जगामध्येसुद्धा अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपल्या देणग्यांनी व उपकारांनी त्यांना प्रसन्न करेल.

एकेश्वरत्वाला आणि प्रेषित्वाला मान्यता तोंडी स्वरूपात दिली जाते. ते त्यांच्या शाब्दिक अर्थापेक्षा जास्त काही सूचित करते. ते तोंडी एकेश्वरत्वाचे आणि प्रेषित्वाचे अभिवचन सर्व प्रेषितांना, ईशग्रंथांना, दूतांना तसेच पारलौकिक जीवन आणि नशीब या सर्वांना मान्यता देते. थोडक्यात, हे इस्लामच्या संपूर्ण श्रध्देलाच मान्यता आहे. कारण जो प्रेषित मुहम्मद (स) यांचे प्रेषित्व मान्य करतो त्याच क्षणी तो या सर्व अदृश्य सत्यतेलासुध्दा मान्य करतो की ज्यांना प्रेषितांनी सर्वांपर्यंत पोहचविले आहेत.
एकेश्वरत्वात आणि प्रेषित्वात अंतःकरणपूर्वक श्रध्दा असणे हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग त्या श्रध्देला मान्य करणे आणि मानल्यानंतर तोंडी अभिवचन देणे होय, प्रेषितवचनांचा आणि धार्मिक विद्वानांच्या टिकात्मक साहित्याचा अभ्यास केल्यानंतर हे कळून येते की मुस्लिम (श्रध्दावंत) बनण्यासाठी फक्त मनापासून श्रध्दा असणे हे पुरेसे नाही तर त्यासाठी तोंडी अभिवचन अथवा घोषणा करणे हेसुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. तोंडी घोषित केल्याशिवाय श्रध्दा वैध ठरत नाही. तोंडी अभिवचन देणे आणि घोषणा करणे म्हणजे सत्य मान्य करणे की इस्लाम हा धर्म- परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे आणि कुजबुजणारी मुहीम मुळीच नाही. इस्लामच्या कर्तव्यांची पूर्तता एकांतात होऊच शकत नाही. हा तो धर्म आहे जो समस्त मानवतेशी उंच आवाजात संभाषण करीत आहे. (कुजबुज नव्हे) जीवनाच्या प्रचंड अशा गोगांटामध्ये इस्लाम मनुष्याला प्रस्थापित करीत आहे. इस्लाम मनुष्याला चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यानच्या निरंतर चाललेल्या संघर्षात गुंतवून ठेवतो. इस्लाम मुस्लिमाला अविश्वास आणि अनाचाराच्या निरंतर लढाईतील सैनिकांमध्ये सर्वांत पुढे ठेवतो. अशा परिस्थितीत इस्लामचा स्वीकार करण्याची आम घोषणा करणे अत्यावश्यक ठरते. ती त्याच्या श्रध्दाशीलतेने (ईमानने) त्यावर सोपविलेल्या धर्मप्रचारकाची आणि कर्तव्यपूर्तीसाठी लढणारा सैनिकाच्या जबाबदारीची घोषणा आहे. म्हणून इस्लामच्या श्रध्दाशीलतेबद्दल आम घोषणा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मौलिक कार्य आहे.
या मान्यतेचा आणि उद्घोषणेचा आपण जर राजकीय दृष्टिकोणातून विचार केला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. जो कोणी व्यक्ती अल्लाहच्या एकेश्वरत्वाला आणि मुहम्मद (स) यांच्या प्रेषित्वाला जाहिररित्या मान्य करून विश्वास ठेवतो, त्याला श्रध्दावंत (मुस्लिम) म्हणतात. जरी तो खरोखरच विश्वास श्रध्दा ठेवत नसेल किवा व्यवहारात इस्लामच्या कर्तव्यपूर्तीस अपयशी ठरत असेल. श्रध्दाशीलतेची (ईमानची) जाहिररित्या कबूली देऊन त्या व्यक्तीस इतर मुस्लिमांप्रमाणेच राजकीय आणि सामाजिक फायदे मिळतात. जर दुसरा एखादा व्यक्ती मनापासून इस्लामवर श्रध्दा ठेवून आहे परंतु त्याने त्यास जाहिररित्या कबूली दिली नाही तर त्याला मुस्लिम म्हणून स्वीकारले जाणार नाही. तो तर मुस्लिमेतरच राहील आणि त्याच्याशी तसाच व्यवहार केला जाईल. मनुष्याने जर इस्लामच्या श्रध्देतील अचूकपणा आणि सत्यतेवर निष्ठा ठेवली तर अशी व्यक्ती इस्लामचा मजबूत पाया प्राप्त करून घेते आणि उत्साहाने इस्लामवर श्रध्दा ठेवून जाहिररित्या त्याला मान्य करते. अशा प्रकारे मनुष्य इस्लामच्या प्रथमस्तंभास परिपूर्ण करतो म्हणजेच इस्लामच्या प्रथमस्तंभाची उभारणी करतो.

नमाज कर्तव्यपूर्तीतील पहिली महत्त्वाची पायरी आहे. दुसरे कोणतेही कर्तव्य याबरोबरीचे नाही. श्रध्दावंताचे (मुस्लिम) प्रत्येक कृत्य आज्ञाधारकता आहे. परंतु प्रार्थनेचे (नमाज) कृत्य सर्व कृत्यांपेक्षा श्रेष्ठतम आहे. नमाज प्रार्थना म्हणजे अल्लाहशी दृश्य स्वरुपात आणि परिणामस्वरूपात शरणागती आहे. नमाजकडे एक दृष्टीक्षेप या सत्यतेला स्पष्ट करते. नम्रता, लीनता, स्तुती आणि स्तुतीगान हे सिध्द करते की दास्यतेचे आणि विनम्रतेचे दुसरे एखादे असे नमाजच्या स्वरूपातील उदाहरण मिळणे अशक्य आहे. नमाजमध्ये झुकून दोन्ही हाथ बांधून उभे राहणे, कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होणे, नम्रतेने नतमस्तक (सजदा) होणे आणि सातत्याने स्तुतीगान आणि प्रेमपूर्वक अल्लाहची भीती बाळगून असणे ही सर्व नमाजची अंगभूत लक्षणे आहेत. दिव्य कुरआन आणि प्रेषितकथन (हदीस) हे नमाजच्या सद्गुणांनी आणि सर्वोत्कृष्ठतेने भरलेले आहेत. त्यातील काही स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहेत.
नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण आहे. नमाज प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या परंपरेनुसारच अदा करतात. श्रध्दाशीलता धारण केल्यानंतर सर्वप्रथम श्रध्दावंत नमाज अदा करतो. नमाज त्या सत्यतेचे द्योतक आहे की व्यक्ती श्रध्दाशील आहे, अल्लाहवरच त्याची निष्ठा आहे. अल्लाह एकमेव स्वामीश्रेष्ठ आहे आणि मी त्याचा नम्र दास आहे. हा विश्वास त्याच्या नमाजच्या कर्तव्यपूर्तीतून दिसून येतो. नमाजबद्दल अनेक हदीसींचा उल्लेख आलेला आहे.
याचप्रमाणे दिव्य कुरआनमध्ये अनेक ठिकाणी श्रध्दाशीलतेच्या उल्लेखानंतर त्वरित नमाजचा उल्लेख आलेला आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक श्रध्दा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.’’ (कुरआन २: २७७)
तसेच दुसऱ्या ठिकाणी कुरआनोक्ती आहे,
‘‘जे लोक ग्रंथाचे पालन करतात व ज्यांनी नमाज कायम केली आहे, निश्चितच अशा सदाचारी लोकांचा मोबदला आम्ही वाया जाऊ देणार नाही.’’ (कुरआन ७: १७०)
‘‘परंतु त्याने ना खरे मानले आहे आणि ना नमाज अदा केली’’ (कुरआन ७५: ३१)
हे त्या सत्यतेला स्पष्ट करीत आहे जर मनुष्याच्या हृदयात श्रध्देचे बीजारोपण झाले तर त्यातून पहिले अंकूर फुटेल ते नमाज असेल. नमाज श्रध्देचे पहिले प्रकटीकरण फक्त नाही तर ते तर्कशुध्द परिणाम आहे. ज्याचे हृदय श्रध्देने काठोकाठ तुडुंब भरलेले असेल त्याचे मस्तक आज्ञाधारकतेत नमाजमध्ये नतमस्तक होणारच आहे. हे खरोखर तर ती आंतरिक स्थिती आहे ज्याचे प्रकटीकरण नमाजच्या रूपात होत असते. जसे प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून आहे तसेच श्रध्देतून नमाज आहे आणि नमाज श्रध्देसाठी आहे. म्हणून नमाज श्रध्देची अत्यावश्यक बाब आहे हे काही फक्त अनुमान नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अतिस्पष्ट कथन आहे, ‘‘जो कोणी फर्ज नमाज (अनिवार्य प्रार्थना) साठी हलगर्जीपणा करतो, अशा व्यक्तीशी अल्लाहला काही देणेघेणे नाही.’’ (अहमद)
‘‘खरोखरच! नमाज मनुष्याला श्रध्दाहीनतेपासून आणि द्रोहापासून वेगळे करते.’’ (मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी नमूद करून ठेवले आहे की ज्या वस्तीतून आजान ऐकू येत असे त्या वस्तीवर जिहाद (पवित्र युध्द) केला जात नसे. जेथून अजानचा स्वर ऐकू येत नसे त्या वस्तीवर चढाई केली जात असे. कारण ती वस्ती श्रध्दाहीन लोकांची आहे हे समजून येत असे. म्हणून नमाज श्रध्दाशीलतेचे प्रतीक आहे. श्रध्दावंत व्यक्ती या प्रतीकाशी नमाजशी निगडीत असते.
कुरआनोक्ती आहे की कयामतच्या दिवशी दूत नरकवासींना विचारतील,
‘‘ते (दूत) गुन्हेगारांना विचारतील,‘‘तुम्हाला कोणत्या गोष्टीने नरकात नेले?’’ ते म्हणतील, ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो आणि गरिबांना जेऊ घालत नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४२ - ४३)
नरकवासी लोक उत्तर देतील,
‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यांपैकी नव्हतो.’’ (कुरआन ७४: ४३)
याचाच अर्थ स्पष्ट होतो की जो कोणी नमाज अदा करतो तो श्रध्दावंत असतो आणि त्याची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर निष्ठा असते. हे अगदी स्पष्ट आहे की व्यक्तीची जन्नत (स्वर्ग) अथवा जहन्नम (नरक) साठीची लायकी आणि पात्रता श्रध्दाशीलता आणि श्रध्दाहीनतेवर अवलंबून आहे. जेव्हा मनुष्यांना जहन्नममध्ये (नरकात) डांबले जाईल तेव्हा ते सर्व गुपितांना जाणून घेतील जे अदृश्य सत्य होते. ते मान्य करतील की ही यातना परिणाम आहे त्यांच्या नमाज अदा करण्याच्या हलगर्जीपणाचा! ईमान (श्रध्दा) आणि नमाज कयामतच्या दिवशी एक दुसऱ्यास पूरक आणि वैशिष्ट्यपूर्ण असे असतील. ‘‘जहन्नमी (नरकवासी) त्या वेळी असे म्हणण्याऐवजी की ‘‘आम्ही त्यांच्यापैकी नव्हतो ज्यांनी श्रध्दा ठेवली.’’ (‘‘आम्ही श्रध्दावंतांपैकी नव्हतो.’’) असा पश्चात्ताप करून करून म्हणतील की ‘‘आम्ही नमाज अदा करणाऱ्यापैकी नव्हतो.’’
या संकेतवचनांच्या आधारे काही धार्मिक विद्वानांचे मत आहे की जो कोणी हेतुपुरस्सर नमाजची हेळसांड करेल आणि नियमित हे कृत्य करीत राहील तर तो शिरच्छेद करण्याच्या लायक बनतो. ही शिक्षा धर्मद्रोही (विद्रोही) ला दिलेल्या शिक्षेसारखीच आहे.
आणखी एक अतिमहत्वाचे नमाजचे वैशिष्ट्य कुरआन स्पष्ट करीत आहे त्याची पुष्टी हदीसीमध्ये (प्रेषितकथन) सुध्दा आहे, ती म्हणजे नमाजला धार्मिक कृती म्हणून संबोधले गेले आहे. नमाज श्रध्दाशीलतेची (ईमान) रक्षक आहे. नमाज जर कायम केली गेली तर इतर ईश आदेशांचे पालन आपोआप होऊ लागते. याविरुध्द नमाजची हेळसांड झाली तर इतर ईश आदेशांचे उल्लंघन होणे साहजिक आहे. हृदयाचे महत्त्व शरीरात जसे आहे त्यासारखेच नमाजचे महत्त्व श्रध्दाशीलतेसाठी आहे. हृदय जर तंदुरूस्त असेल तर रक्त शरीराच्या सर्व भागांत पसरते आणि पूर्ण शरीर हे कार्यक्षम व तंदुरूस्त बनते. जर हृदयाची स्पदने बंद झाली आणि हृदयक्रिया बंद पडली तर पूर्ण शरीर निर्जीव बनते, अकार्यक्षम बनते. अशा प्रकारची अनेक उदाहरणे कुरआन आणि हदीसीमध्ये स्पष्ट केली गेली आहेत. हदीसीमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे इस्लामचा पाया हा पाच स्तंभांवर आधारित आहे आणि तसेच ईमानचा (श्रध्देचा) स्तंभ नमाज आहे, प्रार्थना आहे.
‘‘श्रध्देचे मूळ हे एकेश्वरत्व आणि प्रेषित मुहम्मद (स) यांना मान्य करण्यात आहे आणि श्रध्देचे मूळ (स्तंभ) इस्लाम आहे.’’ (तिरमीजी)
हा एक सज्जड पुरावा आहे या वास्तवतेचा की जकात, हज, रोजे हे श्रध्दाशीलतेचे (ईमानचे) स्तंभ आहेत आणि श्रध्देची इमारत त्यांच्याशिवाय उभीच राहू शकत नसली तरी नमाजचे महत्त्व वेगळेच आहे. नमाजच्या गुणांमुळे नमाज श्रध्देचा सर्वगुणसंपन्न स्तंभ आहे, म्हणूनच नमाजला पूर्ण श्रध्देचे वैशिष्ट्य गणले जाते. जर नमाजला सोडून दिले तर श्रध्दा आपले अस्तित्व गमावून बसते.
आदरणीय खलीफा उमर (र) आपल्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘‘माझ्यासाठी तुमची सर्वात मोठी समस्या नमाज ही आहे. जो कोणी नमाज कायम करील आणि तिला पूर्ण न्याय देईल तर तो पूर्ण श्रध्देचे रक्षण करतो. आणि जो कोणी नमाजला सोडून देतो तर ती व्यक्ती फार काही गमावून बसते.’’ (मालिक)
नमाजच्या वैशिष्ट्यांची कारणे: दिव्य कुरआन आणि हदीसीच्या पुराव्यानुसार नमाजचे महत्त्व लक्षात येते. स्वाभाविकपणे एखादी व्यक्ती विचारू शकते की हे असे कसे की पाच स्तंभांपैकी नमाज एक स्तंभ आहे तर मग नमाज एकटी पूर्ण श्रध्देसारखी कशी आहे? या प्रश्नाचे उत्तर हे आणखी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. नमाज काय आहे आणि त्याचा उद्देश काय आहे? दिव्य कुरआन स्पष्ट करीत आहे की नमाज अल्लाहचे स्मरण आहे.
‘‘मीच अल्लाह आहे माझ्या शिवाय कोणीच ईश्वर नाही. म्हणून तू माझीच भक्ती कर आणि माझ्या स्मरणाकरिता नमाज कायम कर.’’ (कुरआन २०: १२-१४)
नमाज ईशदासाला ईश्वराच्या सान्निध्यात नेते.
‘‘आणि नतमस्तक व्हा (नमाज अदा करा) व आपल्या पालनकर्त्याशी जवळीक साधा.’’ (कुरआन ९६: १९)
मनुष्य अल्लाहच्या अगदी जवळ असतो जेव्हा तो नतमस्तक होतो. (सजदा करतो) म्हणून मनुष्य नमाज अदा करीत असेल तर तो त्या वेळी अल्लाहशी संभाषण साधून असतो. नमाज अदा करताना मनुष्य सर्व गोष्टींपासून अलिप्त होऊन स्वतःला अल्लाहच्या सान्निध्यात आणि अल्लाहसमोर उभा आहे असे समजून अल्लाहशी वार्तालाप करतो.
अल्लाहचे स्मरण करणे, अल्लाहशी जवळीक साधणे आणि अल्लाहशी संभाषण करणे म्हणजेच नमाज अदा करणे होय. याव्यतिरिक्त दुसरे आणखी काय माध्यम असू शकते अल्लाहची शरणागती आणि पूर्ण श्रध्देला प्राप्त करण्यासाठी? नाही! निश्चित नाही!! अल्लाहची भक्ती करण्यासाठीचे प्रत्येक कृत्य श्रध्देचेच फळ आहे. अल्लाहच्या स्मरणाने (नमाज) श्रध्देचे मूळ सशक्त बनते त्यास जोपासले जाते. श्रध्दावंतांना उपदेश केला जातो की त्यांनी खालील महावाक्य सतत उच्चारून श्रध्देला सशक्त बनावे.
‘‘ला ईलाह ईल्ललाह’’
दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह!
अल्लाहशिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही.
‘‘लोकहो, तुमची श्रध्दा बळकट करा’’ दुसरा कोणी ईश्वर नाही परंतु अल्लाह’’ हे महावाक्य पुन्हापुन्हा उच्चारून!’’ (बुखारी)
जर झाडाच्या मुळांनी त्यांची जीवनशक्ती आणि अन्नपाणी घेण्याचे बंद केले तर झाडाची वाढ खुंटेल आणि झाड वाळून जाईल. तसेच मनुष्याचे हृदय हे जर अल्लाहच्या स्मरणाने खाली असेल तर श्रध्दा जीवंत ठेवणे त्याच्यासाठी अशक्य आहे. ज्या मनुष्याची श्रध्दा डळमळीत आहे, त्याचे प्रत्येक कृत्य हे सत्यतेविरुध्द आणि अल्लाहच्या भयाने रिक्त असे असेल. धर्मनिष्ठ कृत्य (सत्कार्य) त्याच व्यक्तीच्या हाताने पार पडेल ज्याचे हृदय श्रध्देने आणि सामर्थ्याने पुरेपूर भरलेले असेल, ज्यांचा उगम अल्लाहच्या स्मरणात आहे. नमाज अल्लाहचे फक्त स्मरण नाही तर नमाज खरोखरच अल्लाहच्या स्मरणाचे अत्युत्तम, परिपूर्ण आणि कार्यक्षम असे बेजोड माध्यम आहे. म्हणून धर्मनिष्ठा आणि अल्लाहची भक्ती नमाज अदा करण्यात आहे. हे सत्य आपण एक उदाहरण घेऊन स्पष्ट करू या, एखादा भाट (खुशामत्या) जो आपल्या राजासमोर येत नाही आणि त्याच्याविषयी आदर सन्मानसुध्दा दाखवत नाही तर त्याला विश्वासु आणि आज्ञाधारक समजले जात नाही. विश्वासु आणि आज्ञाधारकता त्याच व्यक्तीपासून अपेक्षित आहे जो राजदरबारात राजासमोर हजेरी लावण्यात हलगर्जीपणा करत नाही आणि राजाला आदर सन्मान दाखविण्यात कसूर करत नाही. हे स्वाभाविक आहे की जी व्यक्ती तुमच्याजवळ येत नाही ती तुमच्या इच्छेला आणि प्रसन्नतेला जाणून घेण्यास तयार होऊ शकतच नाही. तुमच्यासाठी अशी व्यक्ती काहीएक त्याग करू शकणार नाही. नमाज हे अल्लाहच्या दरबारात हजेरी लावणे आहे. आणि अल्लाहच्या प्रति निष्ठेचे आणि आदराचे प्रकटीकरण आहे. कोणी अंतकरणाने ही हजेरी देण्यास आणि निष्ठा दाखविण्यास तयार नसेल तर अशी व्यक्ती अल्लाहचे आदेश जीवनव्यवहाराच्या या विस्तृत क्षेत्रात पाळू शकणारच नाही हे अगदी स्पष्ट आहे.
नमाजची पूरक वैशिष्ट्ये: नमाजचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये आपण पाहिलीत, परंतु नमाजचे आणखी काही उपजत अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु ही सर्व पूरक अशी वैशिष्ट्ये आहेत तरी ती अत्यंत महत्त्वाची आणि मौलिक आहेत. त्यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे कारण त्यावरून इस्लामचे दर्शन आणि जीवनप्रणाली कळून येते. हे पूरक आकर्षक गुण आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.
१) इस्लाम आपल्या अनुयायींना त्यांचे जीवनकार्य त्यांच्या मनावर बिबवतो. यासाठी ते स्वाभाविकपणे एक शिस्तबध्द सामुदायिक जीवनाचे नेतृत्व करतात. त्यांचा एक नेता असतो जो अल्लाहच्या आदेशांनुसार स्वतः जीवन कंठत असतो आणि समाजापुढे आदर्श ठेवतो. तो ईशआदेशांना प्रस्थापित करतो. त्याच्या नेतृत्वाखाली लोक एक शिस्तबध्द आणि प्रशिक्षित लष्करासारखे वागतात. तो जेव्हा त्यांना हालचाल करण्याची मुभा देतो तेव्हा ते हालचाल करू शकतात आणि जेव्हा तो त्यांना थांबवतो तेव्हा ते थांबतात. अशी ही उच्च प्रतीची शिस्त नमाजमध्ये अंतर्भूत आहे आणि नमाज इस्लामच्या अनुयायींच्या मनावर शिस्तबध्दता ठसवत असते. जेव्हा त्यांना नमाजसाठी बोलविले जाते तेव्हा ते आपले घरदार, कारखानदारी, दुकानदारी सोडून मशिदीची वाट चालू लागतात. मशिदीत ते सरळ रेषेत व रांगेत उभे राहतात आणि नमाजचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे (इमाम) आदेश पूर्णतः पाळतात. एखादा व्यक्ती या सामुदायिक प्रार्थनेत आपल्या नेत्याविरूध्द शारीरिक आणि मानसिक दुर्लक्ष करूच शकत नाही. हे सर्व काही दैवी आदेशांच्या आज्ञाधारकतेनुसार धार्मिक आज्ञा आणि परलोकाची जाण ठेवून पार पाडले जाते. नमाजव्यतिरिक्त या जगात दुसरी कोणती प्रार्थना आहे जी मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण शिस्तबध्दतेने देत आहे?
२) इस्लामला आपल्या अनुयायींमध्ये प्रेमाचे आणि बंधुत्वाचे अतूट नाते स्थापित करणे अपेक्षित आहे. इस्लाम त्याच मुस्लिम व्यक्तीला खरा मुस्लिम सिध्द करतो जो आपल्या भावासाठी तेच पसंद करतो जे स्वतःला पसंद आहे. नमाज माणसामध्ये प्रेम आणि बंधुत्व निर्माण करते. जेव्हा वस्तीतील लोक प्रार्थनेसाठी अल्लाहसमोर एकत्र येतात तेव्हा ते शारीरिक आणि अध्यात्मिक बंधुभाव प्रस्थापित करतात. त्यांचे एकमेकाचे खांदे आणि अंगठे फक्त एकमेकांना भिडलेले असत नाहीत तर त्यांची मनेसुध्दा एकीने बांधली जातात. ते फक्त आपल्या स्वतःसाठीच प्रार्थना करीत नाहीत तर सर्वांसाठी मार्गदर्शन मदतीची आणि क्षमेची याचना करतात. काय यापेक्षा चांगले दुसरे एखादे मार्ग मानवतेवर प्रेम करण्याचे याव्यतिरिक्त आहे? मनुष्य आपल्या बांधवांचा प्रार्थनेत आणि नमाजमध्ये कधीच विसर पडू देत नाही. तो अल्लाहसमोर सातत्याने याचना करतो की,
‘‘आम्हा सर्वांना सरळ मार्ग दाखव.’’ (कुरआन १: ५)
‘‘अल्लाहच्या सर्व सदाचरणी दासांवर शांतीचा वर्षाव सतत होवो.’’
‘‘हे आमच्या पालनकर्त्या ! आम्हाला इहलोकीही चांगले फळ दे आणि परलोका मध्येही चांगले फळ दे आणि नरकाग्नीच्या यातनांपासून आम्हा सर्वांना वाचव.’’ (कुरआन २: २०१)
अति उच्च समजली जाणारी विश्वबंधुत्वाची कल्पना इस्लामच्या या विश्वबंधुत्वाच्या कल्पनेपुढे फिकी आहे. जो दर्जा इस्लामने आपल्या अनुयायींसाठी निश्चित केला आहे तो बेजोड आहे.
३) इस्लाम समस्त मानवांना एक स्वामीचे दास समजतो. इस्लाम समस्त मानवजातीला एका आईवडीलाची लेकरे मानतो. मानव सर्व एकमेकांचे भाऊ भाऊ आहेत.
‘‘हे अल्लाहच्या दासानों तुम्ही सर्व बंधु व्हा.’’ (कुरवादी)
इस्लाम आज्ञा देतो की कोणीही दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमी लेखू नये. कुणीही रंगाने, वंशाने, कुळाने, श्रीमंतीने अथवा राष्ट्राने एकमेकात उचनीच नाहीत. ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन आहे,
‘‘मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायणता या सदगुणांवर अवलंबून आहेत.’’
नमाज समाजातील, माणसामाणसातील भेदाभेद दूर करून एकसंघ समाजनिर्मितीचा पाया घालते. राजा आणि रक एकसाथ उभे राहून एकसाथ आपल्या स्वामीपुढे नतमस्तक होतात. हे नमाजच्या प्रक्रियेतील एकतेचे प्रकटीकरण आहे. आध्यत्मिक स्तरावरसुध्दा नमाज सर्वांना एकसमान बनविते. अल्लाहचे महात्म्य आणि मनुष्यांचे पूर्ण नम्रता धारण करणे हे सर्व मनुष्यांच्या मनांमध्ये एकीची भावना जागृत करते. प्रत्येकजण जाणून घेतो की अल्लाह आणि फक्त अल्लाह प्रभुत्वशाली आहे. सर्व माणसे त्याची निर्मिती व दास आहेत. नमाजमुळे प्रत्येकाला त्याच्या तुच्छतेची जाणीव सतत होत राहते. म्हणून असा मनुष्य रंगभेद, जातीभेद, वंशभेद, राष्ट्रभेद, उच्चनीचता या कुकर्मांना कधीच थारा देत नाही. स्वतःलासुध्दा इतरांपेक्षा काही वेगळा अथवा श्रेष्ठ समजत नाही. अशा प्रकारे नमाज या सत्यवचनाला सिध्द करून दाखविते की ईशपरायणता आणि धर्मनिष्ठा हेच फक्त श्रेष्ठतेचे लक्षण आहे. मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या धर्मनिष्ठेवर आणि ईशपरायण या सद्गुणांवर अवलंबून आहे.

जकातचे महत्त्व: इस्लाममध्ये प्रार्थनेपेक्षा म्हणजेच नमाजपेक्षा इतर कोणतेही कृत्य जास्त महत्त्वाचे नाही याबद्दल सविस्तर उल्लेख मागील प्रकरणात झाला आहे. म्हणून जकात आणि नमाजचे महत्त्व एकसारखेच आहे असे म्हणणे तर्कशुध्द होणार नाही. परंतु आपण कुरआनची याविषयीची संकेतवचने आणि हदीसचा विचार करता चटकन लक्षात येते की नमाजनंतर जकातचे स्थान आहे. दिव्य कुरआन श्रध्देचा उल्लेख करताना अनेकदा दोन धर्माचरणांचा उल्लेख लगेच सोबत देतो. ते म्हणजे नमाज आणि जकात. निष्ठावंत मुस्लिमांची प्रतिमा दिव्य कुरआन खालीलप्रमाणे स्पष्ट करीत आहे,
‘‘जे लोक श्रध्दा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, निःसंशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दुःखाचा प्रसंग नाही.’’ (कुरआन २: २७७)
वरील संकेतवचन विशेष महत्त्वाचे आहे कारण सच्चा मुस्लिम होण्यासाठी अनेक धर्माचरण आत्मसात करणेसुध्दा आवश्यक आहेत. सच्चा मुस्लिमचे वैशिष्ट्ये सांगताना कुरआन सर्वप्रथम श्रध्देचा उल्लेख करतो. श्रध्देनंतर कुरआन इस्लामच्या इतर आधारस्तंभांचा उल्लेख न करता लगेचच नमाज आणि जकातचा उल्लेख का करीत आहे? इतर चांगल्या गोष्टींचा उल्लेख त्याऐवजी का करीत नाही? असे करण्याला साहजिकच काही महत्त्व आहे. आपण विचारपूर्वक लक्ष दिल्यास हेतु लक्षात येईल. अल्लाह नमाज आणि जकात (गरीबांसाठी द्यावयाचा निधी) या दोघांना श्रध्देच्या व्यावहारिकतेच्या पायाचे दोन दगड समजून अतिमहत्त्व देतो. मनुष्याने ही दोन्ही कृत्ये व्यवस्थित पार पाडली तर धर्म पूर्णपणे पाळण्यासाठीचा व्यावहारिक पुरावाच असा मनुष्य देत असतो. अशा माणसाकडून इतर धर्माचरण श्रध्देच्या मूलतत्त्वानुसार पाळणे सहज शक्य होते. तो येथे हलगर्जीपणा दाखवूच शकत नाही. असे का बरे घडावे? या प्रश्नाचे उत्तर श्रध्देच्या अर्थामध्ये आणि श्रध्देच्या वैशिष्ट्यांमध्ये लपलेले आहे जे नमाज आणि जकातसाठी सारखेच आहेत. आपण जर श्रध्देच्या मूलतत्त्वाचे तर्कशुध्द विभाजन केले तर ते दोन विभागांत होईल.
१) ईशआदेश जे अल्लाहचे मनुष्यावरील हक्कासंबंधी आहेत.
२) ईशआदेश जे मानवतेचे मनुष्यावरील हक्कासंबंधी आहेत.
श्रध्देचे व्यावहारिक रूप म्हणजे मनुष्याने अल्लाहचे हक्क जाणून घेऊन तसेच मानवतेचे हक्क जाणून घेऊन त्यानुसार जीवन कंठत राहाणे होय. आपण हे पाहिलेच आहे की नमाज अल्लाहच्या हक्कासंबंधी अनिवार्य असे मूलतत्त्व आहे तर जकात मानवतेच्या हक्कासाठीची अनिवार्यता आहे. जेव्हा मनुष्य मशिदीत नमाज अदा करतो, तेव्हा तो अल्लाहच्या हक्कासंबंधी जागृत असतो आणि मशिदीबाहेरसुध्दा अल्लाहच्या हक्कासंबंधी सचेत राहतो. अशा परिस्थितीत तो मनुष्य अल्लाहचे हक्क सातत्याने अदा करीत जातो. तसेच मनुष्य जकात आपल्या समाजबांधवांसाठी, शेजाऱ्यांसाठी स्वखुशीने खर्च करतो. असे करताना उपकार न करता फक्त ईशप्रसन्नतेसाठीच इतरांवर खर्च करतो. असाच मनुष्य मानवतेच्या कल्याणासाठी सतत झटत असतो.
या विषयाची आणखी एक बाजू आहे. कुरआन वारंवार जोर देऊन सांगत आहे की श्रध्दा तेव्हाच जिवंत शक्ती म्हणून अस्तित्व धारण करते जेव्हा अल्लाहवरील प्रेम हे इतर सर्वांपेक्षा प्रभुत्वशाली असते. आणि ऐहिक जीवनात मनुष्य आपल्या पारलौकिक जीवनास प्राधान्य देतो. हे ध्येय साध्य करण्यासाठी नमाज आणि जकात अत्यंत प्रभावी साधन आहे. नमाज मनुष्याला अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करून देते तर जकात मनुष्याला त्याच्या देशबांधवांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील ठेवते. जर अल्लाहची प्रसन्नताप्राप्ती आणि पारलौकिक जीवनसाफल्य हे एखादा कठीण चढ चढून जाण्यासारखे आहेत, तर त्या रेल्वेचे दोन इंजीन म्हणजे नमाज आणि जकात आहेत. चढ चढताना एक इंजीन (नमाज) ट्रेनला पुढे ओढते तर दुसरे इंजीन (जकात) हे त्या ट्रेनला मागून ढकलत राहते. अशा प्रकारे जीवनाची ही ट्रेन आपल्या ध्येयापर्यंत पोहचते. म्हणून या दोन्ही मूलतत्त्वांना इस्लामचा खरा आधार म्हणतात. कारण इस्लामी व्यावहारिकतेत त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मक्केतील श्रध्दाहीनांविरुध्द जिहाद पुकारण्यासाठी अंतिम आदेश देताना कुरआन स्पष्टोक्ती आहे की आपल्या तलवारी म्यानात ठेवू नका जोपर्यंत तुम्ही शत्रुंचा नाश करीत नाही अथवा ते इस्लाम कबूल करीत नाहीत. दोन दशके त्यांना इस्लामची शिकवण देण्यात आली होती आणि त्यांना श्रध्दावंत बनण्यासाठी सर्व काही प्रयत्न झाले होते. याप्रसंगी कुरआन काही अटी त्यांच्यासाठी स्पष्ट करीत आहे, ज्यानुसार त्यांनी श्रध्दावंत बनून राहावे आणि त्यांच्याविरुध्द जिहाद समाप्त केला जावा.
कुरआनोक्ती आहे, ‘‘मग जेव्हा निषिध्द महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे. आणि जर अनेकेश्वरवादींपैकी कोणी इसम शरण मागून तुमच्याकडे येऊ इच्छित असेल जेणेकरून अल्लाहची वाणी ऐकावी तर त्याला आश्रय द्या येथपावेतो की त्याने अल्लाहची वाणी ऐकावी. मग त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहचवा. हे अशासाठी करावयास पाहिजे की हे असे लोक आहेत ज्यांना ज्ञान नाही.’’ (कुरआन ९: ५-६)
पुढे याच अध्यायात कुरआन स्पष्टोक्ती पुन्हा आहे,
‘‘पण जर त्यांनी पश्चाताप केला व नमाज कायम केली व जकात दिली तर हे तुमचे धर्मबंधु आहेत आणि जाणणाऱ्यां लोकांसाठी आम्ही आमचे आदेश स्पष्ट करीत आहोत.’’ (कुरआन ९: ११)
यावरून हे अगदी स्पष्ट होते की श्रध्देचा (ईमान) स्वीकार जरी झाला असेल तरी इस्लामचा स्वीकार मात्र नमाज कायम करणे आणि जकात देणे या दोन्ही कृत्यांना आत्मसात करण्यावर अवलंबून आहे. मनुष्य जर या दोन्ही कर्तव्यांना पार पाडत नसेल तर त्याची श्रध्दा अस्वीकार्य आहे, निरर्थक आहे. जकात देणे हे कृत्य श्रध्देची पूर्वअट आणि अंगभूत गुण आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हा मुद्दा स्पष्ट करताना सांगितले आहे,
‘‘मला आदेश देण्यात आला आहे त्या लोकांविरुध्द लढाई करण्याचा जो पर्यंत ते हे मान्य करतील की ईश्वर कोणी दुसरा नाही. परंतु अल्लाह आणि ते नमाज कायम करतील व जकात देतील. त्यांनी असे केले तर त्यांचे जीव आणि वित्तरक्षणाची जबाबदारी माझी आहे. त्यांची सर्व कार्ये अल्लाहसाठी आहेत.’’ (मुस्लिम)
नवमुस्लिमांसाठी कुरआन जकात देण्याची अट घालत नाही तर हे सर्वांसाठी आहे, यासाठी अपवाद नाही. एखादा मुस्लिम जकात देण्याचे बंद करतो तर त्याच्याविरुध्द इस्लामी शासन त्याला शिक्षा करते. अबु बकर (र.) यांच्या शासनकाळात काही टोळ्यांनी जकात देण्यास नकार दिला होता तेव्हा त्यांनी त्यांच्याविरुध्द युध्द घोषित केले. जेव्हा उमर (र.) यांनी हा आदेश अंमलात आणण्यासाठी दिरंगाई दाखविली तेव्हा अबु बकर (र.) यांनी घोषित केले,
‘‘मी, अल्लाह शपथ त्याच्या विरोधात लढेन ज्यांनी नमाज आणि जकात या दोहोत फरक केला.’’ (कारण दोन्ही कृत्ये कुरआनने एकत्रित करून सांगितली आहेत) (मुस्लिम)
हा वादाचा मुद्दा आदरणीय उमर (र.) यांनीच स्वीकारला नाही तर सर्व सहाबांनी (र.) यांनीसुध्दा स्वीकारला. यावरून आपण या निष्कर्षाप्रत येतो की मुस्लिमांचे जीवित आणि वित्तिय संरक्षण हे त्याच्या नमाज अदा करणे आणि जकात देण्यावर अवलंबून आहे. नमाज अदा करणारा आणि जकात देणारा आदरणीय ठरतो. नमाज अदा तर केली जाते परंतु त्याच्याकडून जकात मात्र दिली जात नाही तर अशा मुस्लिमासाठीसुध्दा सारखीच शिक्षा आहे जी नमाज सोडणाऱ्यासाठी आहे. त्याच्याविरुध्द युध्द पुकारले आहे. कुरआनोक्ती आहे,
‘‘हे पैगम्बर (स.) यांना सांगा,’’ मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखा मला दिव्यबोधाद्वारे सांगण्यात येते की तुमचा उपास्य तर केवळ एकच उपास्य आहे, म्हणून तुम्ही सरळ त्याच्याकडेच रोख ठेवा, आणि त्याच्याकडे क्षमायाचना करा. विनाश आहे त्या अनेकेश्वरवादींसाठी जे जकात देत नाहीत आणि परलोकांचा इन्कार करणारे आहेत. उरले ते लोक ज्यानी मान्य केले आणि सत्कृत्ये केली, त्यांच्यासाठी निश्चितपणे असा मोबदला आहे ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही.’’ (कुरआन ४१: ६-८)
‘‘शिक्षा तर मी ज्याला इच्छितो त्याला करतो. पण माझी कृपा प्रत्येक वस्तूवर आच्छादित आहे आणि ती मी त्या लोकांसाठी लिहीन जे अवज्ञापासून दूर राहतील, जकात देतील व माझ्या संकेतांवर श्रध्दा ठेवतील.’’ (कुरआन ७ : १५६)
हे निदर्शनात येते की पहिल्या आयतमध्ये जकात न देणे म्हणजे श्रध्दाहीनतेचे कृत्य आणि परलोकाला अस्वीकार करण्यासारखे कृत्य आहे तर दुसऱ्या आयतनुसार जकात देणे हे श्रध्दाशीलतेचे प्रभावी लक्षण आहे आणि सदाचार आहे असे म्हटले आहे. या दोन्ही आयतींनुसार जकात देणे ही श्रध्दाशीलतेची अनिवार्यता आहे. जो श्रध्दावंत आहे तो जकात न चुकता देतो.
कुरआनची वरील संकेतवचन आणि हदीस कथनांनुसार जकातचे इस्लाममध्ये असलेले स्थान सिध्द होते. इस्लामची ही इमारत जकातला पूर्ण न्याय दिल्याशिवाय उभीच राहू शकत नाही. आणि म्हणूनच जकातला इस्लाममध्ये श्रध्देचे महत्त्वाचा आधारस्तंभ ठरविले आहे.

इस्लामने अगदी स्पष्ट आदेश जकात कशी जमा करावी आणि कशी खर्च करावी याबद्दल दिलेले आहेत. जकातव्यतिरिक्त दानधर्म करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य जकातसाठी दिले गेलेले नाही. या बाबतीत जकातचे व्यवस्थापन हे नमाज सामुदायिकरित्या कायम करण्यासारखे आहेत. ही सामुदायिक व्यवस्था आहे. इस्लामी शासन आपल्या महसूल खात्यातर्फे जकात गोळा करते आणि गरजूंना त्याचे वाटप करते. शासनाला जकात देणे अनिवार्य आहे. कुरआन जकात कुणासाठी खर्च करावी हे तपशीलाने सांगत आहे आणि जकातच्या खर्चाचा खातेवाटप स्पष्ट देत आहे. जे जकातसाठी काम करतात त्यांचा विशेष उल्लेख कुरआन करीत आहे. कुरआनच्या स्पष्टीकरणानुसार जकात गोळा करणे आणि वाटप करणे ही शासनाची धार्मिक जबाबदारी आहे आणि हे इस्लामी व्यवस्थेचे एक महत्त्वाचे अंग आहे. हदीसमध्ये अनेक वेळा याबाबत उल्लेख आलेला आहे.
जकातची सामुदायिक व्यवस्था खालील कारणांमुळे आवश्यक आहे.
१) हे इस्लामच्या तत्त्वानुसार आहे. इस्लाम स्वभावतः सामुदायिक आहे. इस्लाम जगाला जे देऊ इच्छितो, ते त्याच्या सामुदायिक व्यवस्थेतूनच शक्य आहे. यामुळे मुस्लिम समाज एक शिस्तबध्द आणि योजनाबध्द जीवन कंठत राहतो.
२) गरीबांची मदत करून त्यांचे कल्याण करणे, इस्लामचे रक्षण इ. अत्यावश्यक गोष्टी आहेत, परंतु श्रीमंत लोकांचा या बाबींकडे हलगर्जीपणा नजरेआड करता येण्यासारखा नाही. म्हणूनच जकात गोळा करण्याची जबाबदारी शासनाकडे देऊन इस्लाम या हक्कांची अंमलबजावणी पूर्ण रूपात करू इच्छितो.
जेथे इस्लामी शासन नाही तेथे सामुदायिक व्यवस्था यासाठी कार्यरत राहणे आवश्यक आहे. नमाजला कायम करणे, विशेषतः जुमा (शुक्रवार) आणि दोन ईदच्या वेळी नेतृत्व हे त्या नमाजचे शासनकर्त्याने करणे अपेक्षित आहे. याचा अर्थ असा नाही की नेता गैरहजर असल्यास प्रत्येकाने नमाज स्वतंत्र्यरित्या अदा करावी. समाजातील लोकांनी एखादा इमाम नियुक्त करून अशा स्थितीत सामुदायिक नमाज अदा करावी. जकातसाठीसुध्दा हीच अट आहे. इस्लामी शासन अस्तित्वात जरी नसले तरी जकातची व्यवस्था सामुदायिकरीतीने होणे आवश्यक आहे. मशिद बांधण्यासाठी मुस्लिम समाज जसा एकत्र येतो आणि नमाजसाठी इमाम नियुक्त करून सामुदायिक नमाज अदा केली जाते त्याचप्रमाणे त्यांनी जकात गोळा करण्यासाठी आणि जकात वितरण करण्यासाठी सामुदायिक व्यवस्था करावी. त्यासाठी ‘‘बैतुलमाल’’ (लोककोषागार) स्थापन करून मुस्लिम समाजात जकातचे व्यवस्थापन करावे. इस्लामी शासन जेथे नसेल तेथे अशा संस्था जकातचे हेतु साध्य करण्यास सहाय्यक ठरतात. अशी व्यवस्था ज्या मुस्लिम समुदायात केली नसेल तर ते सर्वजण चूक करत आहेत. एक धार्मिक अपराध करीत आहेत.
जकातसाठी शब्दावली: धार्मिक शब्दावलीत जकातसाठी आणखी दोन संज्ञा (नाव) वापरात आहेत. एक ‘‘सदका’’ (दान) आणि ‘‘इनफाकफी सबीलिल्लाह’’- अल्लाहच्या नावाने खर्च करणे. या दोन्हींचा येथे विचार करू या. ‘सदका’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘सिदक’ या शब्दाने झालेली आहे. ज्याचा अर्थ सदाचार व देण्यासाठी गंभीर असा होतो. हे दोन्ही गुण त्या व्यक्तीमध्ये आहेत हे सिध्द होते. तसेच ‘‘इनफाकफी सबीलिल्लाह’’म्हणजे अल्लाहच्या नावाने म्हणजे अल्लाहच्या सेवेत खर्च करणे. जकात आणि दान देण्याचे अंतिम ध्येय अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे आहे. जकात अल्लाहच्या नावानेच दिली जाते हे त्याच्या मूळ हेतूमुळे कळून येते. म्हणून ही तिन्ही शब्दावली एकाच वास्तवतेची असून त्याचे हे तीन घटक आहेत.
कुरआनने मात्र ही तिन्ही नावं एकाच अर्थाने वापरली आहेत. जकात, सदका (दान) आणि अल्लाहच्या नावाने खर्च करणे इ. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते. हे गौण आहे की तिन्हींपैकी एखाद्या रूपात खर्च केला जात असेल. म्हणून कुरआन आणि हदीसमध्ये खर्च करण्याच्या हेतु आणि ध्येय यावर लक्ष दिले गेले आहे आणि वैधानिकतेकडे दुर्लक्ष केले गेले आहे. इस्लामच्या कायद्यानुसार जकात देणे सधन मनुष्यासाठी आवश्यक आहे आणि कायद्याने बंधनकारक आहे. परंतु सदका (दान) आणि अल्लाहच्या नावाने खर्च करणे ऐच्छिक आहे.

सर्वप्रथम अल्लाहचे आभार ज्याने रमजान सारखा पवित्रोत्तम महिना दिला. अन्य सर्व महिन्यांपेक्षा या महिन्याचे विशेष हे की याचे आगमन व गमन दोहोंसाठी मुसलमान उत्कंठेने   वाट पहात असतात आणि उत्कंठाही लाभाशिवाय थोडीच असते. तेव्हा हे असे लाभ तरी कोणते हे पाहणे उद्बोधक ठरते. या महिन्यातील लक्षवेधी बाबी – १) कुरआनचे नाजिल होणे,  २) रोजे, ३) शबे कद्र, ४) तरावीह आणि ५) जकात. या पाचमधील जकातचे महत्त्व ‘सलातुज्जकात’ या शब्दातूनच स्पष्ट होते. म्हणजेच नमाजबरोबरच जकातचे महत्त्व अल्लाहनेच  स्पष्ट केले आहे. तर रोजास मी जबाबदार आहे असे स्पष्ट करून कोणासही या बीबत कसलाही फरक करण्यास वाव नाही, भले हज जीवनात शक्य होवो न होवो हजचे महत्त्वही सारखेच.
येथे विचार प्रस्तुत आहे तो रमजानचे रोजे, जकात यांचा आइ म्हणून रमजानचे विशेषत्व वर स्पष्ट केले. नंतर काहीसे रोजाकडे वळावेरोजापासून आरोग्य सुदृढ होण्यास मदत होते हे
सर्वश्रुत आहे, सर्वमान्यही आहे. आरोग्य ही बाब केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नसून त्याला सामाजिक महत्त्व आहे आणि ते म्हणजे चारित्र्य. मुसलमान चारित्र्यवान असतील आणि   म्हणूनच त्यास अल्लाहने बरगुजीदा कौम म्हणून घोषित करतानाच अशा चारित्र्यासाठी त्याने एक मंत्रही दिला तो तत्तकुन म्हणून अर्थात तकवा. एकदा का हा तकवा आत्मसात केला  की जीवन मग ते या भूतलावरील असो की मरणोत्तर ते यशस्वी असाच खुलासा कुरआनात आढळतो आणि तो मान्य असण्यास कोणतीही अडचण असू नये असे वाटते. कारण तकवा  म्हणजे अल्लाहप्रती प्रेम व भीती. म्हणजेच जे मी करत आहे, बोलत आहे, जो विचार माझ्या मनात चालला आहे, या सर्वांना अल्लाह जाणत असतो. सृष्टीतील प्रत्येक चीजवस्तूचा तो  मालक आहे. यात मानवही आलाच.
मानवाचा मालक अल्लाह व मानव हा त्याचा बंदा. आपण कोठेही नोकरी करत असलो किंवा इतर कोणताही धंदा-उद्योग, अल्लाहचे भय असेल तर भ्रष्टाचार होणे नाही. भ्रष्टाचार  म्हणजे तरी काय जो आचार भ्रष्ट तो भ्रष्टाचार! तो या तकवामुळे टळत असतो. असा हा तकवा उपलब्ध होण्यासाठीच हे रोजे. मी चुकून खायचे प्यायचे म्हटले तरी ते शक्य होत  नाही. अल्लाह हे जाणतो व आपला बंदा आपल्या कसोटीला उतरला याची नोंद बंद्याचे आमालनाम्यात एकदा का झाली की माझ्या कौमचा हा विश्वासू आपला अनुयायी खास जाणून  शिफारसयोग्य ठरतो. कारण त्याने चारित्र्य जपबले आहे. चारित्र्याचे सर्टिफिकेट जसे या भूतलावर लागते तसे ते दुसऱ्या जगतात म्हणजे मरणोत्तर ठिकाणी पाहिजे असते आणि ते  सर्वांनी येथूनच प्राप्त करून घ्यायचे असते. असे हे प्रमाणपत्र साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रोजा होय. ज्यातून तकवाही लाभतो व चारित्र्याचे प्रमाणपत्रही लाभते. यापेक्षा  कोणास अधिक ते काय हवे.
सर्टिफिकेट कोणतेही असो ते प्राप्त करण्यापोटी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात आणि आपण अशा प्रमाणपत्रासाठी पात्र असल्याचे सिद्धही करावे लागते. अशी सिद्धता आपण तकवा  धारण केल्यास आपले काम सोपे होते. जसे रोजामुळे खोटे बोलणे विसरून जातो, कुविचारांना, कुकर्मांना थारा देत नसतो. साहजिक आपले मनावर हळूहळू का होईना ताबा मिळविणे  शक्य होते.सतत महिनाभर रोजाचे हेच कारण आहे. मात्र केवळ रोजे ठेवायचे म्हणून ठेवले तर अल्लाह यश न देता आपण उपाशी राहण्याचे, तहान सोसण्याचेच काम केले, जे  निरर्थक ठरते. आपला तकवा तसे करू देत नाही. अल्लाहच्या बंद्याचे भल्यासाठीच हे रोजे आहेत हे यावरून स्पष्ट व्हावे. याच महान मानवाने आपले बजेट सुनिश्चित करावे व  त्यानुसार अल्लाहला अपेक्षित असलेला त्याग मग तो पैशांच्या रूपात असो की धान्य-कपड्यांच्या, गरजूंना अशा त्यागातून मुक्त करण्याची संधी साधतानाच आपले चारित्र्याचे प्रमाणपत्र  साध्य करण्यासही भरीव मदत मिळते. हे कार्य करताना तसेच रोजे करताना आपण आपले नातलग याचे रोजे व्हावेत त्याचे जीवन उंचावे याचाही विचार मनी असतो. जो इस्लामचा   एक अविभाज्य घटक आहे. अर्थात सामान्यत: आपण रोजासाठी उठलो, शेजारी काय स्थिती आहे हे पाहतोच ना! सहरी-इफ्तारसाठी जी देवाणघेवाण होते ती प्रेम व ऋणानुबंधाचे  वाढीसाठीच असते. आणि हेच ऋणानुबंध सामाजिक बंधुता, एकोपा यासही दृढ करते. शबे कद्रचे महत्त्व तर न्यारेच. कारण या एका रात्रीचे इबादतीस एकहजार रात्रींच्या इबादतीचे  इनाम यांतून ते स्पष्ट होते. वर नमूद केलेल्या बाबींबरोबरच आम्हाला हे ज्याद्वारे प्राप्त करण्याचा मार्ग सापडतो तो कुरआन आणि कुरआन नाजिल झाले तो महिना रमजान आणि  म्हणून रमजान व त्यातील रोजे हे अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच जकातही. आपण हे ज्या महिन्यात मिळते तो महिना रमजान. म्हणून त्याचे आगमनासाठीही उत्कंठा आणि हे जे प्राप्त झाले त्याचे आभार मानण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी लगतच ईदच्या चंद्रदर्शनाची तेवढीच उत्कंठा. याच उत्कंठेतून समस्त बांधवांस  रमजान मुबारकबरोबरच ईद मुबारक!

-बशीर मोडक, रत्नागिरी

रमजानमध्ये स्वत:ची थुंकीसुद्धा गिळायची नसती का हो? दिवसभर पाणीसुद्धा पित नाही का तुम्ही? तुम्ही लोकं रात्रभर खात असता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे रमजान महिन्यात  अमुस्लिम बांधवाकडून हमखास विचारली जातात. हे ऐकून थोडीशी चिडचीड होते, तरीही गैरसमज दूर करण्यासाठी अनिच्छेनं अशास्त्रीय प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कधीकधी उत्तरं  देताना स्वत:बद्दल लाज वाटू लागते. कारण, रमजानच्या बाबतीत असलेले गैरसमज अजूनही अमुस्लिमांमधून काढू शकलेलो नाही. तर उलटपक्षी केवळ शिरखुर्मा आणि खाऊच्या  व्यंजनापुरता रमजान माहिती असतो. क्वचित एखादाच असतो जो मोहल्ल्यात येऊन रमजान समजून घेतो. तसं सध्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाण- घेवाण झपाट्यानं वाढलीय.  त्यामुळे रमजान, बकरईद, मुहर्रमचं महत्त्व सांगणारी मॅसेज् सिझनवारी मोबाईलची मेमरी व्यापत असतात. त्यामुळे माहितीत भर पडलीय. याआधी फक्त जाडजूड पुस्तकातच ही  माहिती धूळ खात पडायची. या माहितीजालानं अनेकांच्या माहितीत मोठी भर टाकलीय. अजुनही माहिती स्वपुरतीच मर्यादित आहे.
महिनाभरात मोहल्ल्यात आनंदाचं वातावरण असतं. या महिन्यात घरांत महिला मंडळाचं काम बरंच वाढतं. भल्या पहाटे तीनच्या सुमारास घरातल्या महिलांचा दिवस सुरू होतो.  मध्यरात्री होणाऱ्या ‘तहज्जुद’च्या नमाजनंतर महिला सहरीच्या कामाला लागतात. सहरी म्हणजे, रोजा ग्रहण करण्यापूर्वीची न्याहरी किंवा जेवण. त्यासाठी प्रॉपर स्वयंपाक केला जातो.  स्वयंपाक तयार होताच गाढ झोपलेल्या मंडळींना उठवायची जबाबदारीदेखील गृहणीच सांभाळते. आंघोळीब्रश आटोपल्यानंतर सहरीचं जेवण घेतलं जातं. आमच्या लहाणपणी सहरी   आटपायला फजरची अजान व्हायची. अर्थात फजरची अजान ही सहरी संपवण्याची प्रमाणवेळ समजली जायची. आता मात्र, रमजानचे विशेष टाईम-टेबल कार्ड पहिल्याच दिवशी वितरीत केले जातात. त्यात सहरी आणि इफ्तारची प्रमाणवेळ दिलेली असते. योग्य वेळेवर सहरी आणि इफ्तार व्हावीत असा पायंडा आहे.. साधारण साडे-चार पावणेपाचपर्यंत सहरीची वेळ  असते. गाढ झोपेतून उठल्यावर जेवण जातं का? हादेखील प्रश्न असतो. त्यामुळे अपरिहार्यपणे सहरी करावीच लागते. झोप आवरली नाही आणि सहरीची वेळ संपली की उपाशीपोटीच  रोजा ग्रहण करावा लागतो. मेट्रो शहरात हे टाईमटेबल जरासं वेगळं असतं.. शहरी व्यस्तता लक्षात घेता वेळेत आठ-दहा मिनिटाचा फरक असतो. फजरच्या नमाजनंतर दिवस  सूर्यास्तापर्यंत कुरआनचं पठण केलं जातं. महिनाभरात जास्तीतजास्त वेळा कुरआनचं अध्ययन व्हावं असा अलिखित नियमच असतो. महिनाभरात साधारण तीन ते चार वेळा अख्खं  कुरआन वाचलं जातं. तसंच नमाजही किमान पाच वेळा तरी पठण केली जावी.. यालाच इबादत म्हणतात. आमच्या लहानपणी मित्रांत जास्तीतजास्त इबादत कोण करेल याची स्पर्धा   लावली जायची. आजही घरची ज्येष्ठ मंडळी मुलांमध्ये धार्मिकता रुजवण्यासाठी अशी स्पर्धा लावतात.
घरातली जी मंडळी रोजा नाही त्यांच्यासाठी सकाळचा चहा-नाष्टा वेळेवर देणं ही घरातल्या गृहिणीची जबाबदारी.. तसेच त्यांच्यासाठी दुपारचं जेवणही गृहिणींना वेळेवर तयार करावं  लागतं. नसता सासू-सासऱ्याची दिवसभर कटकट सुरू असते. संध्याकाळ सरता इफ्तारची तयारी गृहिणीलाच करावी लागते. इफ्तारच्या अखेर वेळेपर्यंत गृहिणी किचनमध्ये स्वयंपाक  करत असते. इफ्तारला कच्च्या (पेंड) खजूराला जास्त महत्त्व असते. दिवसभराचा रोजा गोड खाऊनच इफ्तार करायचा असतो. खजूर नसले की काहीतरी हलकं खाऊन इफ्तार केला  जातो. एखादं खजूर खाऊन दोन घोट पाणी पिणं. त्यानंतर काहीतरी न्याहरी घेणं हा इफ्तारीचा बेसिक नियम आहे. अन्यथा बकाबका खाल्यानं अपचणाचे त्रास सुरू होतात. तसेच  रिकाम्या पोटी जास्त पाणी पिल्यानं उलट्या व मळमळ होते. इफ्तारनंतर एखाद्या तासानं व्यवस्थित जेवायचं असतं. इफ्तारनंतर जेवणाची तयारी शेवटी घरातल्या स्त्रीचीच  जबाबदारी.. रात्री तरावीह म्हणजे विशेष नमाज होते. या नमाजमध्ये ३० दिवसात कुरआनचे दोन ते तीन सिपारे पठण केले जातात. त्यामुळे ही नमाज साधारण तासभर  चालते.  नमाजनंतर घरातली सर्वांची जेवणं आटोपल्यानंतर महिलांना खरकटं स्वच्छ करुन झोपण्यास रात्रीचे बारा वाजतात. मग परत सकाळी उठून सहरीची तयारी.. उफ्फ किती ही मरमर एका स्त्रीची..!
महिनाभर आधीच रमजानची तयारी सुरू असते. घरातल्या सर्व वस्तू घासून-पुसून स्वच्छ केल्या जातात. घरातलं धुणं काढलं जातं. घर-दुकानाला रंग-रंगोटी केली जाते. महिनाभर  घरखर्चासाठी हात थोडासा सैलच केला जातो. घरात या महिन्यात बाहेरुन येणाऱ्यास आदरातिथ्य करण्यास मोठं महत्त्व आहे. घरात येणारा प्रत्येक पाहुणा आणि आप्तस्वकीयांना  इफ्तार करवल्याशिवाय जाऊ न देणं हे रमजानचं वैशिष्ट्य आहे. या महिन्यात खातीरदारी वा मेहमान नवाजीचं वेगळं महत्त्व असतं. असं सांगितलं जातं की, रमजान महिन्यात  उपाशींना जेवू घालणं मोठ्या सत्कर्माचं काम आहे. रोजेदारांना इफ्तार करवणं म्हणजे मोठं पुण्य समजलं जातं. असं म्हंटलं जातं की, घरात येणारा प्रत्येकजण रिज्क घेऊनच येतो.  त्यामुळे महिनाभर इफ्तार पाट्र्या रंगत असतात. बड्या प्रशस्त हॉटेलपासून ते एखाद्या टुरीस्ट हबला जाऊन इफ्तार पाट्र्या दिल्या जातात. घरात इफ्तारच्या मोठ्या जेवणावळी आणि  पंगती बसवल्या जातात. मोठ्या आत्मियतेनं रोजेदारांना इफ्तार करवला जातो. इफ्तारनंतर जेवण आणि अनेकदा सहरीचीसुद्धा व्यवस्था केली जाते. सहरी आणि इफ्तार करवणं   बरकतीचं अर्थात पुण्याचं मानलं जातं. महिनाभर मोहल्ल्यातून मस्जिदीमध्ये रोजेदारांसाठी पकवानाच्या थाळ्या पाठवल्या जातात. यात अमुस्लिमांची संख्यादेखील मोठी असते. महिनाभर घराघरातलं वातावरण आधात्मिक होऊन जातं. घरातली मनोरंजनाची साधनं याकाळात बंद केली जातात. घरात प्रत्येकजण कुरआन आणि सिपारेंचं पठण करत असतो.  (कुरआन ३० दीर्घ खंडांमध्ये विभागले आहे. यातून ३० छोटी-छोटी पुस्तिका तयार केली आहेत. याला सिपारे म्हणतात. सिपारे वाचायला आणि हाताळायला कुरआनपेक्षा सोयीचे असते.)  घरातली ज्येष्ठ मंडळी हातात तसबीरी घेऊन अल्लाहचा जप करत असतात. मोहल्ल्यातल्या मस्जिदी नमाजच्या पाचही वेळा भरुन जातात. रमजान काळातले शुक्रवार विषेश महत्त्वाची  मानले जातात. यादिवशी छोट्या ईदसारखं वातावरण असतं. जुमाला सामूहिक नमाजनंतर शांती आणि भरभराटीसाठी विशेष दुआ केली जाते. रमजान हा केवळ रोजा म्हणजे उपाशी  राहण्याचा महिना नाही, तर हा आत्मशुद्धीचा महिना समजला जातो. महिनाभर अन्न-पाणी वर्ज्य करुन स्वत:चीच परीक्षा घेतली जाते. उपाशी राहणं हे केवळ रमजानचा हेतू नाही.
तर रोजा ग्रहण करुन अल्लाहची आराधना करावी. उपाशी राहून आपल्या इंद्रिय शक्ती आटोक्यात आणता याव्यात. आपल्या नफ्स अर्थात उमाळ्या मारणऱ्या इच्छांना तिलांजली देता  यावी, त्यावर विजय मिळवता यावा. यासाठी रमजानचं विशेष महत्त्व आहे.
महिनाभरात सदाचार ग्रहण करावेत. वाईट विचार आणि कर्मांना थारा न देता चांगले आचरण करावं, हा सुप्त हेतू रमजानचा आहे. रोजा स्थितीत केवळ उपाशी राहून झोपा काढणे किंवा आराम करण्यास मनाई करण्यात आलीय. रोजा स्थितीतही आपली दिनचर्या थांबू न देता कामं करत राहावीत. असा नियम घालण्यात आला आहे. आपण वर्षभर बकाबका खातच  असतो, किमान महिनाभर तरी शरीरातील अवयवांना आराम मिळावा हादेखील शास्त्रीय हेतू रमजानमागे असतो.
रमजानच्या शेवटच्या दहा दिवसाचं खूप महत्त्व आहे. या काळात इबादतचा कालावधी वाढवला जातो. तसेच रोजे मीस होऊ नये याची विषेश काळजी घेतली जाते. २० दिवसांत  आध्यात्मिक वातावरण तयार झाल्यानं, महिना संपतोय याची रुखरुख जाणवायला लागते. त्यामुळे महिन्याचे खास क्षण राखून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्ऌप्त्या योजल्या जातात. या  दिवसात कुटुंबातले परगावी असलेले सदस्य मुळगावी परत येतात. नातवं आणि मुलींना खास बोलावणं पाठवून आणलं जातं. आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचं खास सेलेब्रेशन  सुरू होतं. खरेदी आणि हॉटेलिंगची आठवडाभर धूम असते. कुटुंबातील अनेक जण जमा झाल्यानं सहरी आणि इफ्तारी कौटुंबिक मेळावाच असतो. अलिकडे हॉटलिंगचं फॅड वाढलं तसं  इफ्तारच्या पद्धतीदेखील बदलल्या आहेत. सुरवातीला फक्त हे फॅड महानगरापुरतं मर्यादित होतं. पण आता हे फॅड छोट्या शहरापर्यंतही येऊन पोहचलंय. छोट्या शहरात व्हेजनॉनव्हेज  खानावळी इफ्तारीचं 'खास इंतजाम' करतात. त्यात इस्लामी ढंगाच्या खानावळीत तर रुबाबच वेगळा असतो. इफ्तारीसाठी हॉटेलची खास सजावट केली जाते. मित्र-मंडळी तसेच घरातलं  अख्ख कुटुंब इफ्तार पार्टीसाठी हॉटेलला जातात. तसेच फँक्शन हॉलमध्ये खास इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. मित्र-परिवार आणि नात्यातल्या मंडळींना खास मेजवानी दिली जाते.  तसेच मदरसा आणि आश्रमशाळेतील मुलांना इफ्तारी आणि सहरीची सोय केली जाते. ईदनंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या आठवड्यातल्या एका ठराविक दिवशी अख्ख कुटुंब ‘बासी ईद’  साजरी केली जाते. त्यासाठी संपूर्ण कुटुंब टूरिस्ट हब किंवा शहरातील सार्वजनिक गार्डनला जातात. यातून कौटुंबिक आनंद मिळवणं हाच हेतू असतो. मुस्लिम राष्ट्रात तर रमजानसाठी  महिनाभराची सुट्टी जाहीर केली जाते. आपल्याकडे तर खास रमजानसाठी उर्दू शाळांची वेळ अध्र्यावर आणली जाते. रमजान महिना खाऊच्या वेगवेगळ्या पदार्थासाठीदेखील ओळखला  जातो. घरात तर महिनाभर खाद्यपदार्थाची रेलचेल असते. दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, भोपाळ, लखनऊ, मुंबई, म्हैसूर ही शहरं रमजानच्या विशेष खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहेत.. चवीष्ठ नॉनव्हेजची असंख्य प्रकार रमजान महिन्यात विशेष आकर्षणं असतात, हैदराबादला हरीस आणि हलीम, औरंगाबादला फालुदा, मुंबईला मालपोवा, दिल्लीला पराठे रात्रभर  ग्राहकांच्या सेवेत रुजू असतात. हॉटेलमध्ये सहरीची खास सोय केलेली असते. दिल्लीला चांदणी चौक, मुंबईला महंमद अली रोड, औरंगाबादला बुढ्ढी लेन, हैदराबादला चारमिनार अशी  प्रसिद्ध ठिकाणं आहेत. जिथं खवैय्यांसाठी विशेष मेजवानी असते. दुसरीकडे मार्केटची रमजानला वेगळी तयारी सुरू असते. खरेदीदाराच्या पसंती व आवडीनिवडी लक्षात घेता मार्केट  सजवलं जातात. खाद्यवस्तु, कपडे आणि दागीण्यांची रेलचेल ग्राहकांना मार्केटकडे खुणावत असते. ईदला नवा कपडा घालणं सुन्नत समजलं जातं. सुन्नत म्हणजे शुभ, तसं नवीन  कपडे घालावी अशी सक्ती किंवा अट नाहीये. प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार कपड्यांची खरेदी करतो. त्यामुळे घरात ईदला लग्नघरासारखी कपड्यांची खरेदी होते. पुरुष मंडळी  पठाणी, शेरवानी, कुडता-पायजमाला पसंती देतात. तर महिलांकडून जरीदार आणि टिकल्यांच्या वस्त्रांची मुख्यत्वे निवड केली जाते. पंजाबी ड्रेस आणि साडी या महिलांसाठी सदाबहार  वस्त्रे मानली जातात. यासह रोज वापरण्यासाठी एखाद-दुसरा ड्रेस हमखास ईदला घेतला जातो. घरात-दुकानावर तसेच ऑफीसवर काम करणारे एकूण सर्व सव्र्हंटलादेखील रमजानमध्ये  कपडे घेतली जातात. जाळीदार टोप्या, उच्च दर्जाची अत्तरं रमजानचं खास आकर्षण असते. हजारो रुपये टोप्या आणि अत्तरांवर खर्च केली जातात.
रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात दान-धर्म केला जातो. वर्षभरातील जकात या महिन्यात काढली जाते. जकात काढणे म्हणजे, आपल्या कमाईतून गरीबांसाठी विषेश समभाग काढला  जातो. दर माणसी विशिष्ट ठराविक रक्कम जकात म्हणून काढली जाते. पैसा, कपडे, स्रfगणे, धान्य आणि गरजेच्या वस्तु या स्वरुपात ही जकात काढली जाते. जकात काढण्याचं एक  महत्त्वाचं कारण म्हणजे, समाजातील आर्थिक दुबळ्या गटांना इद साजरी करण्याचा आनंद मिळावा. त्यासाठी प्रत्येकांनी आपल्या कमाईचा विशिष्ट भाग आर्थिक दुबळ्या गटांसाठी  काढायचा असतो. ही जकात स्थावर मालमत्ता, रोकड आणि स्रfगण्यांच्या मार्केट व्यॅल्यूएशनवर ठरवली जाते. ईद-उल-फितरची नमाज होण्यापूर्वी जकात आर्थिक दुबळ्या गटांपर्यत पोहचवणं बंधनकारक असते.
शिरखुर्मा हे ईदचं वेगळंच आकर्षण असतं. शत्रूता विसरुन सर्वांना ईदच्या भेटीगाठी घेतल्या जातात. जुनी विखुरलेली नाती ईदला सावरली जातात. नवी नाती जुळवण्यासाठीदेखील ईदची  निवड केली जाते. घरातल्या बच्चेकंपनी आणि लहान बहिणींना ईदी म्हणजे भेटवस्तु दिल्या जातात. ईदला पाहुणे आणि मित्र-मंडळींना आग्रहानं बोलावलं जातं. त्यांचा विशेष पाहुणचार  केला जातो. घरात बोलावून शिरखुर्मा, गुलगुले आणि लज्जतदार फुड खाऊ घातले जातात. तसेच येणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या व्हरायटीची अत्तरं लावली जातात. महिनाभर रोजा  असल्यानं अशक्तपणा येतो. हा अशक्तपणा घालवण्यासाठी शिरखुर्म्यात मुख्यत्वे ड्रायफ्रूटचा वापर केला जातो. दोन तीन वाट्या शिरखुर्माचं शरबत घेतल्यास तरतरी वाटायला लागते.  ईदच्या दिवशी मित्र आणि पाहुण्यांना विशेष जेवणावळीदेखील दिल्या जातात.

-कलीम अजीम, अंबाजोगाई

कोणत्याही समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जगणे एकमेकांना सहकार्य लाभत नसेल तर जगणे शक्यच होणार नाही. त्यासाठी प्रत्येक माणसाने समाजहितासाठी आपले योगदान देणे  गरजेचे आहे. जसे एका माणसाविषयी हे विचार लागू आहेत, तसेच कोणत्याही समाजासाठी धार्मिक समुदायासाठी देखील हे सूत्र लागू पडते, ज्या देशात, समाजात, शहरात वा  गल्लीमोहल्ल्यात जे जे लोक एकमेकांच्या सहवासात राहातात त्यांनी एकमेकांच्या अडीअडचणी, समस्या सोडविणे, गरजा पूर्ण करणे अनिवार्य ठरते आणि असे करताना जात, धर्म, भाषा, भौगोलिक सीमा अशा कोणत्याही मानवी मर्यादांचे बंधन घालता येत नाही. रमजान मानवाच्या चारित्र्यात वाढ करणारे एक उत्तम प्रशिक्षण आहे. हा महिना मानवाच्या नैतिक  प्रशिक्षणाचा महिना आहे. आज सगळीकडे विविध रूपांमध्ये कुकर्मे मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. संपत्ती आणि लैंगिकतेच्या आकांक्षेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने माणूस प्रत्येक  प्रकारचे वैध-अवैध कृत्य करण्यास विवश आहे. त्याच्या ऐहिक आकांक्षांच्या उद्देशाचा थांगपत्ताच नाही. व्यक्तीची चारित्र्यिक निर्मिती झाल्यास या नैतिक समस्यांचे कायमस्वरूपी  निराकरण होऊ शकते आणि या चरित्र निर्मितीचा संदेश घेऊन येत असतो रमजानचा महिना. या महिन्यात ईश्वराचा प्रत्येक भक्त ईश्वरी प्रेरणेने, स्वेच्छेने कोणत्याही प्रकारच्या  जबरदस्ती व लालसेविना आपला जास्तीतजास्त वेळ कुरआन पठण,  गरिबांना दानधर्म, सत्कर्म, सद्चिंतन इत्यादींचे आचरण करण्यात मग्न असतो आणि हाच चांगल्या सामाजिक  परिवर्तनाचा पाया आहे. पवित्र कुरआन हा धर्मग्रंथ सर्व मानवजातीकरिता मार्गदर्शक म्हणून अवतरला गेला आहे. यात दानधर्म, एकमेकांचे प्रत्येक बाबीत सहकार्य देण्यासंबंधी जे आदेश  आलेले आहेत त्यात धार्मिक वा इतर कोणतेच निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. जकात देणे हे योगदान प्रत्येक मुस्लिमावर, ज्याचे ठराविक वार्षिक उत्पन्न असेल, अनिवार्य केले गेले  आहे. जकातमधून प्राप्त होणारे धन कोणकोणत्या लोकांच्या हितासाठी खर्च करावे याची सविस्तर माहिती कुरआनमध्ये सांगितली गेली आहे. यात कुठेही असा उल्लेख नाही की जगातचे  धन फक्त मुस्लिम समाजातील लोकांसाठीच खर्च करावे. गरजवंत, प्रवासी, दरिद्री, गुलाम, कैदी कोणत्याही धर्माचे, संस्कृतीचे असोत, त्याच्या हितांसाठी मुस्लिमांनी खर्च करावे असे  कुरआनचे स्पष्ट आदेश आहेत. रमजानचे रोजे मुस्लिमांवर अनिवार्य ठरविताना त्यांच्यात हे ईशभय निर्माण करण्यासाठी, ज्यांचा संबंध समाजाच्या बांधिलकीशी आहे, अनिवार्य केले  गेले आहेत असे म्हटले आहे. जर रमजानचा उद्देश पूर्ण होत नसेल आणि त्याकडे हे लोक (मुस्लिम) दुर्लक्ष करीत असतील तर या महिन्याचा खराखुरा लाभ त्यांना मिळणार नाही.  स्वत:चे जीवन यशस्वी करायचे असेल तर समाजासाठी योगदान आणि लोककल्याणाची कामे करणे अनिवार्य आहे. हाच या रमजान महिन्याचा संदेश दरवर्षी मुस्लिमांना दिला जातो.  रमजानच्या संपूर्ण महिनाभर रोजे करणाऱ्या रोजेदारास अल्लाहकडून विशिष्ट प्रकारचा कृपावर्षावाचे बक्षीस मिळत असते. या आनंदास द्विगुणीत करण्यासाठी रमजानुल मुबारक  संपताच ईद साजरी करण्यात येते. तो आनंदाचा दिवस काही औरच असतो. ईदचा दिवस अत्यंत खुशीचा, प्रसन्नतेचा व उत्साहाचा आहे आणि ईदची नमाज ही खुशीची नमाज आहे.  इस्लाममध्ये आनंद आणि दु:खाची एक स्पष्ट धारण आहे. जसे- अल्लाह कोणत्या गोष्टींमुळे प्रसन्न होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे अप्रसन्न याचे भान एक सच्चा मुसलमान आपल्या  प्रत्येक कामात ठेवत असतो. एखाद्याची गरज भागविण्यात अथवा गरजवंताची मदत करण्यात जो आनंद मिळतो तो माणसाला अंतर्गत सुख प्रदान करीत असतो. हा आनंद  ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीपेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली, स्थायी व फार काळ टिकणारा प्रदान करीत असतो. ईदचा आनंद इस्लामच्या याच सर्वव्यापी चिरप्रसन्नतेच्या निश्चितीचा  (अवधारणेचा) एक भाग आहे. जकात म्हणजे आपल्या संपत्तीतील अडीच टक्के हिस्सा दीन-दुबळ्यांना, वाटसरू, गरजवंत व नातेवाईकांना दान करणे होय. गोरगरिबांना आपल्या  बरोबरीने जी काही खरेदी करता येईल अशा भावनेने जो कोणी जकात अदा करतो त्या व्यक्तीची ईद खऱ्या अर्थाने परमोच्च आनंदाच्या दिशेने प्रवास करते आणि त्यास गंतव्य स्थान प्राप्त होते. ‘ईदुल-फित्र’मध्ये अल्लाहकडून आपल्या दासाला हेच सर्वकाही मिळत असते. त्यामुळेच ईदचा हर्षोल्हास इतर आनंदोत्सवांपेक्षा पूर्णत: वेगळा असतो. ईदच्या दिवशी आपणास  उत्तमता, स्वच्छता, सहिष्णूता आणि आपसातील सहकार्याचे उच्च दर्शन घडते आणि हाच ईदचा खरा अत्यानंद असतो. दुसऱ्यांकरितादेखील आनंदाचे साधन असतो तोच आनंद  अल्लाहला प्रिय असतो. ईद गरीब-श्रीमंत अशा सर्व थरांतील लोक एकत्रितपणे साजरी करतात. एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात आणि वंचितांना मदतीचा हात पुढे करतात. अशा रीतीने समाजातील प्रत्येकाच्या आनंदास नव्हे तर अत्यानंदास पारावार राहत नाही! अल्लाह आम्हा सर्वांना सत्कर्मांचा मार्ग अवलंबिण्याची शक्ती देवो.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget