Articles by "एकेश्वरवाद"

namaz
सामाजिक एकता सबळ व दीर्घकालापर्यंत अस्तित्वात राहावी म्हणून अल्लाहाने काही कर्तव्ये माणसाकरिता अनिवार्य केली आहेत. पहिले (अनिवार्य) कर्तव्य म्हणजे नमाज, जगातील सर्व मुस्लिमांनी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करायला हवी. जगाच्या पाठीवर कुठेही निवास करणाऱ्या मुस्लिमाने पश्चिमाभिमुख (किबलाकडे तोंड करून) होऊन नमाज अदा करावी, असा आदेश आहे. काबागृह हे केंद्र आहे व जगातील सर्व मुस्लिम त्याच दिशेकडे तोंड करून उभे राहतात. कंबरेपर्यंत वाकतात (रुकू करतात), नतमस्तक होतात (सज़दा करतात) व गुडघ्यावर बसतात (कायद्यात बसतात). संपूर्ण जगातील बहुतांश मुस्लिम दिवसातून पाच वेळा नियमितपणे नमाज अदा करतात. एकतेचे हे मनोहारी दृश्य इस्लामशिवाय इतर कोणत्याही धर्मात वा पंथात पाहायला मिळत नाही. पाचही वेळा मुस्लिमांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका ओळीत उभे राहून एकत्रितपणे नमाज अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तो जर एकटा असेल तर त्यास एकटे नमाज पढण्याची मुभा आहे. मात्र एकत्रितपणे एका इमामाच्या पाठीमागे शिस्तबद्धपणे उभे राहून नमाज पढण्यास अधिक प्राधान्य देण्यात येते. म्हणून दोन मुस्लिमांना नमाज अदा करावयाची असल्यास, तिला
एकतेचे स्वरुप देण्याकरिता एकाने नमाजाचे नेतृत्व करावे (इमामत करावी) व दुसऱ्याने मागे (बाजूला) उभे राहून त्याचे अनुकरण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

उपरोक्त संक्षिप्त वर्णनाने हे सिद्ध होते की, एकेश्वरत्व, प्रेषितत्व, पवित्र ग्रंथ कुरआन व मरणोत्तर जीवन या ईशदत्त तत्त्वांच्या आधारे, जगातील लोकांना देश, समाज, वंश, वर्ण, भाषा इत्यादी बाबींनी निर्माण होणारे भेदभाव विसरून, एक जागतिक समाज निर्माण करता येतो. इस्लामने ईशआराधनेच्या ज्या पध्दती प्रदान केल्या आहेत, त्यांचा स्वीकार केल्यास समाजात निश्चितच एकतेचे वातावरण निर्माण होते. अल्लाहने अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) व अंतिम ग्रंथ कुरआनद्वारे सर्व मानव समाजाला अशी परिपूर्ण जीवन व्यवस्था प्रदान केली आहे की, मानवाला कोणत्याही काळात व कोणत्याही स्थळी आपल्या कोणत्याही समस्येचे समाधान करण्यासाठी इतरत्र कोणतेच मार्गदर्शन प्राप्त करण्याची निश्चितच गरज भासणार नाही.

मग सत्याचा इन्कार का?
ही अतिशय दुर्दैवाची व शरमेची बाब आहे की, ज्या जनसमूहाला अल्लाहने इतका परिपूर्ण व सर्वंकष जीवनमार्ग दिला होता आणि समता व सामाजिक एकता स्थापित करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती, तसेच इस्लामचा प्रसार करून संपूर्ण मानव समाजास एकत्रित आणण्याचे कार्य दिले होते, तोच जनसमूह त्याला सोपविलेल्या कर्तव्यांची पायमल्ली करून आपल्या एकतेला छिन्न-विच्छिन्न करण्याचे दुष्कर्म करीत आहे. जगातून उच्च-नीच, स्पृश्यास्पृश्यता, परस्पर द्वेष व तिरस्काराची तुच्छ भावना नष्ट करून पृथ्वीवरील अन्याय व अत्याचाराचे वातावरण संपुष्टात आणावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगण्यात आली होती. अल्लाहाच्या एकत्वाच्या सत्य मार्गाचा अवलंब करून लोकांत विश्वबंधुत्वाची भावना जागृत करावी, असे कार्य त्यांना सोपविण्यात आले होते, जेणेकरून जुलुमाऐवजी न्याय, युध्दाऐवजी शांती, द्वेष व शत्रुत्वाऐवजी हितचिंतन व आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे व त्यांनीही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासारखे दयावान व कृपाळू-करुणामय सिध्द व्हावे असे अपेक्षित आहे.

'तौहीद' म्हणजे केवळ अल्लाहचे अस्तित्व मान्य करणे असा अर्थ होत नाही. जगात असा कोणताच समाज नव्हता व आजही नाही जो अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करतो. जगात फार पूर्वीपासून नास्तिक अस्तित्वात आहेत. रशियाचे नास्तिकत्व तर सर्वांना माहीतच आहे. पण रशियाचे नास्तिकशासक एक पंचमांश नागरिकांनासुद्धा अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करण्यास राजी करू शकले नाहीत. आश्चर्य म्हणजे ते गेले चाळीस-पन्नास वर्षे नास्तिकतेचा प्रचार करीत आहेत व या प्रचारासाठी शक्ती व संपत्तीचा बेछूट व्यय करीत आहेत. गंमतीची गोष्ट अशी की, मागच्या जागतिक युध्दात जेव्हा जर्मन फौजा विजयी होत रशियात शिरु लागल्या तेव्हा स्टालिनने स्वत: जनतेस आवाहन केले की, मस्जिद व चर्चमध्ये जाऊन अल्लाहची प्रार्थना करा की, त्याने आमची रक्षा करावी. याचाच अर्थ असा की, जे लोक अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करतात, तेच वेळ पडल्यास अल्लाहसमोर हात पसरून दयेची याचना करतात. सारांश मानव कधीही अल्लाहच्या अस्तित्वाचा इन्कार करू शकला नाही आणि करु शकणार नाही.
'तौहीद' (एकेश्वरत्व) म्हणजे एकमेव अल्लाहचीच बंदगी (उपासना) करणे असे होते. जगातील कोणताही समाज सर्व शक्तींना (आराध्यांना) ईश्वर मानत नाही.
भारतातील अनेकेश्वरत्वी परमात्मा हाच ईश्वर आहे असे मानतात. भूतकालीन झरतुष्ट्री (इराणी अग्निपूजक) ईश्वर एक आहे असे मानत असत. कुरआन मक्कावासी अश्रध्दावंताना विचारतो की, त्यांना कोणी जन्म दिला? ते उत्तर देतात अल्लाहाने!' त्यांना पुन्हा विचारले जाते की, धरती व आकाश कोणी निर्माण केले? ते पुन्हा म्हणतात, 'अल्लाहाने!' पुरातन कालापासून आजपर्यंत माणूस दिशाभूल करणाऱ्यांमुळे गोंधळला गेला आहे. सर्वांना माहीत आहे की, 'ईश्वर एक आहे', तरीही ते अनेक शक्तींची (ईश्वरांची) पूजा करण्याची चूक करीत असतात.

Polytheism
कुरआनचे अध्ययन केल्यास लक्षात येते की, अल्लाह जो विश्वाचा निर्माता, मार्गदर्शक व सर्वांचा पालनकर्ता आहे, केवळ तोच ईश्वर आहे, या तत्त्वाची पुन्हा पुन्हा जाणीव करून देण्यात आली आहे. हीच बाब मानवी मनावर बिंबविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले आहेत. कुरआनने अल्लाहचे अस्तित्व पटवून देण्यापेक्षा तोच सर्वांचा पालनकर्ता असून केवळ तोच ईश्वर आहे या तत्त्वाची पुष्टी केली आहे. नास्तिकतेबाबत कुरआनात विशेष चर्चा नाही, मात्र अनेकेश्वरत्वाचे अनेक आयतींद्वारा खंडन करण्यात आले आहे. अल्लाहसह इतरांनाही ईश्वर मानण्यासंदर्भात लोक चार प्रकारच्या चुका करतात. (१) अल्लाहसोबत इतरांची आराधना करणे. (२) ईशगुण इतरांना प्राप्त असल्याबाबत श्रद्धा बाळगणे. (३) । अल्लाहसमान इतरांनाही शक्ती वा सामर्थ्य प्राप्त असते, अशी श्रद्धा बाळगणे. (४) । अल्लाहचे हक्क इतरांना बहाल करणे. १) अल्लाहसोबत इतरांना आराध्य मानण्याचे ठळक उदाहरण द्यायचे झाल्यास ख्रिस्ती धर्मीयांचा उल्लेख करता येईल. ते येशु ख्रिस्तांना अल्लाह-पुत्र मानतात. अल्लाह कोणत्याही सजीव प्राण्याचे रुप घेऊन अवतार धारण करतो, ही कल्पनाच मुळी फोल आहे. अल्लाह जो संपूर्ण विश्वाचा सृजनकर्ता आहे, तो एका माणसाचे रूप धारण करील, ही बुद्धीस न पटणारी बाब आहे. अल्लाहचा पुत्र मानणे म्हणजे माणसाला अल्लाहचा दर्जा देण्याचा अनेकेश्वरत्वी दृष्टीकोन आहे. अशाच प्रकारे अनेकेश्वरत्वी देवदूतांना अल्लाहच्या मुली मानतात. राम हा अल्लाहचा अवतार होता असे, मानणेही अनेकेश्वरत्वी श्रध्देचे उदाहरण आहे. २) ईशगुण इतरांनाही प्राप्त असतात असे मानणे हाही अनेकेश्वरत्वाचा प्रकार आहे. अल्लाह संपूर्ण विश्वातील प्रत्येकाचे म्हणणे ऐकत असतो. अल्लाहला संपूर्ण विश्वातल्या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त आहे. जगाच्या पाठीवरून कोणत्याही कानाकोपऱ्यातून दिलेली आरोळी त्यास ऐकू येते. तो एकाच समयी सर्वकाही बघू शकतो. अल्लाह सर्वकाही एकाच वेळी पाहू शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो, अशा प्रकारे दुसऱ्या शक्ती वा व्यक्तींनाही पाहता येते, ऐकता येते, सर्वकाही समजते असे मानणे म्हणजे एकेश्वरत्वास नाकारणे होय. एखादी व्यक्ती बिछाण्यावर पडल्या पडल्या एखाद्या महापुरुषाला (संत-साधूला) मदतीकरिता हाक देत असेल, तर ईशगुण त्या महात्म्यासही प्राप्त आहे असे तो समजत आहे, असा अर्थ निघतो. ३) अशाच त-हेने जे अधिकार अल्लाहस प्राप्त आहेत ते मानवासही प्राप्त आहेत, असे मानणे म्हणजे मानवाची अल्लाहशी बरोबरी करणे मानले जाईल. अल्लाह सर्व प्राण्यांचा भाग्यविधाता आहे. अल्लाहने मनुष्याला जे काही दिले आहे त्यात कोणीही कमी-जास्त फरक करू शकत नाही. अल्लाहच्या इच्छेविरुद्ध कोणीही कोणास ठार करू शकत नाही व अल्लाह एखाद्याला ठार करू इच्छित असेल तर त्याला जगातल्या सर्व शक्ती एकत्र येऊनही वाचवू शकत नाहीत. माणसाने अल्लाहचे अधिकार इतर शक्तींनासुद्धा प्राप्त आहेत, असा विश्वास बाळगणे फार मोठी चूक आहे. ईशगुण इतरांनाही प्राप्त असतात, अल्लाह इतर सजीवांचे रूप धारण करतो, अल्लाहचे अधिकार इतर शक्तींनाही प्राप्त असतात या धारणे वा श्रध्देमुळेच माणसे अनेकेश्वरत्वी होऊन ईश्वरेतरांची पूजा-अर्चा वा उपासना करण्याची चूक करतात. मनुष्य त्याच शक्ती वा व्यक्तीची उपासना करतो जिच्यापासून त्याचे भाग्य निश्चित होण्याची त्याला शक्यता वाटते. जर त्याच्या मनात दृढ विश्वास असेल की, अल्लाहव्यतिरिक्त इतर कोणत्याच शक्तीला अल्लाहसारखे सामर्थ्य व अधिकार प्राप्त नाही तर तो अनेकेश्वरत्वाकडे वळणार नाही. ४) उपरोक्त तिन्ही कारणांमुळे मनुष्य अनेकेश्वरत्वाकडे वळतो. माणसांनी अल्लाहची उपासना करायला हवी, त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला हवे, पण चुकीच्या धारणांमुळे तो इतरांची उपासना करू लागतो. कुरआनच्या शिकवणीनुसार, अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीच ईश्वर वा उपास्य होऊ शकत नाही. अल्लाह सर्वकाही ऐकतो, सर्वकाही पाहतो, तो सर्वज्ञ आहे व तोच सर्वशक्तिमान आहे, तोच प्रार्थना ऐकू शकतो, प्रार्थना मान्य करू शकतो. म्हणून त्याचे दासत्व स्वीकार करायला हवे. त्याचीच उपासना करायला हवी. कुरआनात बऱ्याच वेळा याच बाबींचा उल्लेख केला गेला आहे. उद्देश्य हाच की, मनुष्याने अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणासही पूज्य (आराध्य) मानू नये.
ज्याप्रमाणे आराध्याच्या बाबतीत माणूस चूक करतो, तसाच तो पालनकर्त्याच्या बाबतीतही चूक करतो. 'रब' म्हणजे पालनकर्ता. 'इलाहा' व 'रब' (आराध्य व पालनकर्ता) या दोन्ही संज्ञाच्या बाबतीत मानवाने चुकीच्या धारणा निर्माण करून अल्लाहनिर्मित व अल्लाहद्वारेच अस्तित्वात असलेल्या सजीव व निर्जीवांना उपास्य मानले आहे.

लोक समजतात अल्लाहव्यतिरिक्त इतरही शक्ती अन्नपुरवठा करतात, पालनपोषण करतात, आरोग्य व सुदृढ देहयष्टी देतात, म्हणून ते त्यांची उपासना करू लागलेत. मानवाने पालनकर्त्या अल्लाहचे पालनपोषणाचे श्रेय इतरांशी निगडीत केले, कारण ते त्यांना अनन्यसाधारण शक्ती व सामर्थ्यांचे धनी वाटतात. काही लोकांना देवदूत तर काहींना माणसे, काहींना ग्रह तर काहींना नक्षत्रे, जनावरे, वृक्ष मानवाचे हितकर्ते व मानवाच्या गरजा पुरविणारे वाटतात. काही तर माणसांनाच माणसाचे पालनकर्ते मानतात. सम्राट नमरुद इराकचा शासक होता, सर्व शक्ती त्याच्या हातात एकवटली होती. म्हणून तो स्वत:ला तेथील जनतेचा पालनकर्ता समजू लागला. म्हणून इब्राहीम (अ.) यांनी त्यास म्हटले की, माझा पालनकर्ता जीवनदाता आहे व जीवनाचा अंतही करणारा आहे. नमरुद उत्तरला, “मीही ज्याला हवे त्याला जीवित ठेवतो व नको असेल त्याला मारून टाकतो." मग इब्राहीम (अ.) यांनी सांगितले, “माझा अल्लाह पूर्वेकडून सूर्याचा उदय करतो, तू असे कर की सूर्योदय पश्चिमेकडून करून दाखव." नकारवादी नमरुद निरुत्तर झाला. त्याला ठाऊक होते की, तो स्वत: जगाचा पालनकर्ता नाही. तरीही त्याने लोकांचा पालनकर्ता असण्याचा हट्ट सोडला नाही.
याचप्रमाणे किंग फारोह (फिरऔन) ची कथा आहे. फारोहने जाहीर केले होते की, तो सर्वांत मोठा पालनकर्ता आहे. कारण त्याचे संपूर्ण इजिप्तवर वर्चस्व होते. मात्र एकेश्वरत्वात पालनकर्त्यांचा सहकारी किंवा भागीदार नसतो, म्हणून कुरआनात अल्लाहस बऱ्याच ठिकाणी 'पालनकर्ता' संबोधिले गेले आहे. उद्देश हाच की, मानवाच्या मनावर ही बाब खोलवर रुजविली जावी की, अल्लाहच सर्वांचा पालनकर्ता व आराध्य आहे व त्याच्याव्यतिरिक्त साऱ्या मानवजातीचा इतर कोणीही पालनकर्ता नाही व आराधनेस पात्रही नाही. निश्चितच याच दृढ श्रद्धाभावनेने संपूर्ण मानवजातीचे कल्याण व उत्कर्ष साधता येईल.

Makkah
मुस्लिमांना हे सांगितले जात आहे की, एकेश्वरत्व काय आहे आणि त्यांना समजून घ्यावे लागत आहे की एकेश्वरत्व हा आहे. तसे पाहिले असता स्वत:ची सामान्य स्थिती पाहता मी सांगू शकतो की मी मुस्लिम आहे. मी मुस्लिम मातापित्याच्या घरी जन्मलो. माझे आई-वडील मुस्लिम होते. माझ्या कानातसुद्धा 'ला इलाहा इल्लल्लाहु' (अर्थात-अल्लाहशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही.) चा ध्वनी पोचला. मला एकेश्वरत्व मान्य आहे कारण एकच अल्लाहला मी मानतो. व्यवहाराची गोष्ट मी करीत नाही, धार्मिक जीवनात माझ्यात व त्या व्यक्तीच्या दरम्यान उल्लेखनीय फरक आहे, जी एकेश्वरत्वाला मानीत नाही. ती आपल्या देवी-देवतांची पूजा करते आणि मी अल्लाहचे नाव घेतो, जेव्हा ईश कृपा होते, तेव्हा मी पवित्र कुरआनचेच पठन करतो आणि गीता अथवा बायबल अथवा तौरेतचे करीत नाही. या पवित्र कुरआनमध्ये काय लिहिलेले आहे? हे तर धर्मपंडितच जाणतात. मी तर याचे पठन करतो. जेव्हा शपथ घेण्याचा प्रसंग ओढवतो तेव्हा मी अल्लाहची आणि पवित्र कुरआनचीच शपथ घेतो, दुसऱ्या कुणाची नाही कारण मी मुस्लिम आहे, एकेश्वरवादी आहे. जेव्हा एखादे नवस करतो तेव्हा कोणत्याही देवी अथवा देवताच्या स्थानावर नाही, मुस्लिम संतांच्या समाधीवर जातो. याच प्रकारच्या वारसाने मिळालेल्या इस्लामने हा प्रश्न उभा केला आहे की, एकेश्वरत्व काय आहे? आणि कदाचित याच इस्लामला पाहून कवि हालीने म्हटले होते -
करे गैर गर बुत की पूजा तो काफिर, जो ठहराए बेटा खुदा का तो काफिर।
झुके आगपर बहर सजदा तो काफिर, कवाकिब में माने करिश्मा तो काफिर॥
मगर मोमिनोंपर कुशादा हैं रहे परस्तिश करे शौक से जिसकी चाहे।


अर्थात - इतर कुणी मूर्तीपूजा केली तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. जसे हिंदू, जर कुणी एखाद्याला (येथे संदर्भ येशू ख्रिस्त) ईश्वराचा पुत्र मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा. जर कोणी (येथे संदर्भ अहुरमज्दला मानणारा अग्निपूजक पारशी समाज) अग्नीसमोर नतमस्तक झाला तर तो अल्लाहचा इन्कार करणारा मानला जातो. तर एखाद्याने तेजस्वी ताऱ्यामध्ये चमत्कार असल्याचे मानले तर तो अल्लाहचा इन्कार करणारा ठरतो. परंतु श्रद्धावंतांसाठी (मुस्लिमांसाठी) सर्व मार्ग मोकळे आहेत. त्यांनी आपल्या इच्छेनुसार कोणतीही पूजा करावी.
याच्या पुढे जाऊन एकेश्वरत्व असा आहे की, आराधना आणि अर्चना अल्लाहची करा आणि आज्ञापालन त्या शक्तीचे करा, ज्याची आज्ञा काळावर चालत असेल. याशिवाय त्याचे आज्ञापालन कराल तर अल्लाहचे भय बाळगून करा. अल्लाहच्या भीतीसारख्या स्थितीत सेवा, सैतानाच्या आज्ञेचे पालन अथवा त्या शक्तीच्या आज्ञेचे पालन करा जी काळावर आपला हुकूम चालवीत आहे. जर तिला भिऊन तिची सेवा कराल तर या गोष्टीचा मेळ एकेश्वरत्वाशी बसत नाही. असे नव्हे तर अल्लाह ज्याची आज्ञा पूर्णपणे पाळली जाते, असे मानून अल्लाहच्याच भयाने थरथरत त्याच्या द्रोहींची सेवा व आज्ञापालन करू नका, कारण तुम्ही एकेश्वरवादी आहात. एकेश्वरत्वाच्या विरुद्ध त्या गोष्टीपासून तरी स्वत:ला वाचवा ज्या पुरातन काळापासून अनेकेश्वरत्व म्हणून ओळखल्या जातात. परंतु जे अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान आहेत, ज्यांना सामान्यत: अल्लाहखेरीज इतरांची उपासना करणारे आणि सैतान नाही तर शासक म्हणून ओळखले जातात, त्यांच्याविरुद्ध काही सांगण्याची गरज नाही, कारण त्यांचे जग वेगळे आहे आणि आमचे वेगळे. जर असे कराल तर ही ऐहिकता ठरेल जी धार्मिकतेच्या विरुद्ध आहे.

जगाच्या प्रत्येक धर्मात ईश्वराची कल्पना आहे. उपासनेची कल्पना आहे. शुद्धतेचे काही समान असलेले प्रकार प्रत्येक धर्मात आढळतात. प्रत्येक धर्मात आपल्या मानलेल्या उपास्यांसमोर नमले जाते, मस्तक टेकले जाते, त्याच्याच नावे बळी दिला जातो, त्याच्याचसाठी उपाशी राहिले जाते, नजराणे दिले जातात. इस्लाम या सर्व प्रकारांना एका ईश्वरासाठी निश्चित करतो. तो म्हणतो “हे पर्वत, या नद्या, हे चंद्र, हा सूर्य, ही दूध देणारी जनावरे, हे चावणारे सर्प, विंचू, हे सर्व तुमच्यापेक्षा निम्नतर आहेत. त्यांना तुमच्या सेवेसाठी निर्मिले आहे. त्यांच्यापैकी कोणासमोर तुमचे हात पसरणे, तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाचे नमणे; तुमच्या मस्तकाचा अपमान आहे, कृतघ्नता आहे, नीचपणा आहे, अनेकेश्वरत्व आहे. तुमच्यासमोर फरिश्त्यांना (देवदूतांना) नतमस्तक करविले गेले. तुमच्या प्रतिष्ठित मस्तकाला ही गोष्ट शोभा देते की, त्याने कुणासमोर कदापि नमू नये आणि आपल्या निर्मात्या व स्वामीसमोर अवश्य नमावे. जर तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आपल्या एकमेव ईश्वर ज्याचा कोणीही सहभागी नाही. अशा अल्लाहच्या समोर नम्र राहाल तर त्याच अर्थाने स्वत:देखील अद्वितीय व्हाल."
या दृष्टिकोनाने म्हणजे ईमान (श्रद्धा) व उपासनेच्या वर्तुळात मुस्लिमांची फार मोठी संख्या एकेश्वरत्वाच्या आवश्यकता पूर्ण करीत आहे. ते संतुष्ट आहेत आणि समजतात की, “आम्ही एकेश्वरत्वाच्या निकडी पूर्ण करीत आहोत." तर खात्रीने या वर्तुळाच्या सीमेपर्यंत त्यांचा संतोष अगदी बरोबर आहे. यात कोणतीही मतभिन्नता नाही. निश्चितपणे या दृष्टिकोनाने म्हणजे श्रद्धा व उपासनेत ते एकेश्वरत्वाच्या निकडी श्रद्धापूर्वक पूर्ण करीत आहेत. वाणीने व कृतीनेसुद्धा. परंतु जसे प्रारंभीच सांगितले आहे मानवाच्या अस्तित्वाचा आणखी एक दृष्टिकोन आहे.
मानव हा एका समुदायाचा अंश, एक सामाजिक अस्तित्व आहे. तो एकटा जन्माला तर आला आहे; परंतु एकटा राहत नाही आणि राहूही शकत नाही. जेथे एकाचे दोन झाले की समाजरचना सुरू झाली आणि सामूहिकतेच्या निकडीसमोर येऊ लागल्या. आपापसातील प्रेम, दयाभाव, समदुःखीभाव, ऐक्य व प्रेम, सहानुभूती व दुःख, विमोचन, त्याग व निष्ठा, यासारखे गुण एका चारित्र्यसंपन्न समाजासाठी आवश्यक व उत्तम गोष्टी होत. परंतु आणखी एक गोष्ट सामूहिकतेसाठी आवश्यक आहे आणि ती म्हणजे अत्याचार! मानवाची खुद्द आपली सामूहिक आवश्यकता आहे की, एखादी शक्ती अशी असावी जिने मानवाच्या हक्क व सीमांची निश्चिती करावी आणि त्यांना सामर्थ्य व शक्तीनिशी ठरवलेल्या सीमांचे पालन करणारे ठेवावे. जर अशी एखादी शक्ती विद्यमान नसेल तर मानवाचा अजाणपणा, त्याची इच्छा आणि त्याचा स्वार्थ दुसऱ्यांच्या सीमेवर अतिक्रमण करील. जी व्यक्ती तुलनेने अधिक शक्तिमान असेल ती विनावेसणीच्या बैलाप्रमाणे ज्या हिरव्या शेतात इच्छिल त्यात तो घुसेल आणि त्याला रोखणारा कुणीच असणार नाही. लोकांची न अब्रू सुरक्षित राहील, न प्राण न वित्त, यालाच अराजकता असे म्हणतात. इतिहासात एखादासुद्धा दिवस असा आढळत नाही की, एखादा मानवी समाज अशा अराजकतेच्या अवस्थेत राहिला असेल. प्रत्येक काळात सुसंस्कृत मनुष्य कोणा न कोणा शक्तीच्या आधीन राहिलेला आहे. कोणती न कोणती शासक शक्ती त्याला सामर्थ्य व शक्तीनिशी ठरलेल्या सीमेच्या बंधनांत ठेवणारी राहिली आहे. मग ती शासक शक्ती एखाद्या मानवी समाजातून वर आलेली असो अथवा कुठून बाहेरून येऊन आच्छादली असो. यापेक्षा वेगळी स्थिती अर्थात अराजकता अव्यवहार्यच नव्हे तर अकल्पनीय आहे. साम्यवादी तत्त्वज्ञानात अवश्य एका अशा स्थितीचे स्वप्न पाहिले अथवा दाखविले गेले आहे की, जेव्हा शक्तीने आर्थिक समानता आणली जाईल तेव्हा मानवी मूल्ये बदलतील आणि स्वार्थ व चुकीच्या इच्छांना मूठमाती मिळेल. त्यानंतर मनुष्याला याची गरज भासणार नाही, की एखाद्या शक्तीने त्याला बळजबरीने आपल्या सीमेत ठेवावे आणि ही शक्ती जिचे दुसरे नाव शासन आहे, वाळलेल्या पानाप्रमाणे गळून पडेल. परंत ही एक काल्पनिक गोष्ट आहे व मी या अर्थाने तिला साम्यवादी तत्त्वज्ञान म्हटले आहे की ही कल्पना जगतातील एक कल्पनेची भरारी आहे. व्यावहारिक जगताशी याचा काडीमात्र संबंध नाही. एवढेच नव्हे, तर साम्यवादी व्यवस्थेने तर आणखीनच ही गोष्ट स्पष्ट केली आहे की, मनात स्वत: आपल्या नैसर्गिकतेच्या दृष्टीने या गोष्टीचा मोताद आहे की, त्याचे एखादे आश्रय स्थान असावे, ज्याप्रमाणे स्त्रीच्या नैसर्गिकतेची गरज आहे की तिला एक छत्रछाया असावी, एक पांघरून असावे की, ज्याच्या छायेत राहून तिने शांतता प्राप्त करावी. याच झाकणाला ‘पती' म्हणून संबोधतात. अगदी याचप्रमाणे मानवी समाजाची आवश्यकता, त्याच्या स्वभावाला एका पतीची आवश्यकता आहे, ज्याच्या छायेत त्याने निश्चिंत होऊन राहावे, ज्याचे आज्ञापालन करावे. एवढेच नव्हे तर महिलांमध्ये अशी उदाहरणे सापडतात की, एखाद्या मागासलेल्या अथवा प्रगत महिलेने कोणत्या न कोणत्या प्रकारे आपले संपूर्ण आयुष्य पतिविना व्यतीत करावे. परंतु मानवी समाज एखाद्या शासक शक्तीविना एक दिवससुद्धा जीवित राहू शकत नाही. असे एखादे उदाहरण वर्तमान काळात मिळत नाही, न इतिहासात, न मानवी बुद्धी अशा स्थितीची कल्पना करू शकते. मानवी समूहाची ही आवश्यकता विविध काळांत आणि विविध प्रदेशांत विविध पद्धतींनी पूर्ण होत राहिली आहे.

हे मान्य केल्यानंतर की मनुष्याने एखाद्या आज्ञेच्या अधीन राहणे त्याची स्वत:ची गरज आहे, नाही तर एक मनुष्य दुसऱ्यासाठी संकट बनेल. असा प्रश्न उभा राहतो की, या सामाजिक प्राण्याला मर्यादेच्या बंधनात ठेवणारा कोण असावा? अखेर माझा हुकूम तुमच्यावर व तुमचा हुकूम माझ्यावर का चालावा? हुकूम चालविण्याचा हा अधिकार कोठून व कोणत्या आधारे प्राप्त होतो? त्याचबरोबर ही गोष्टसद्धा दृष्टीसमोर असावी की, हुकूम चालविणे आणि लोकांचे मस्तक आपल्यासमोर नमविणे इतकी रूचकर गोष्ट आहे की, यापेक्षा अधिक कोणतीही चविष्ट गोष्ट मनुष्याला शोधून काढणे शक्य झाले नाही. ही गोष्ट इतकी चवदार आहे की, तिच्यासाठी भावाने भावाचा गळा कापलेला आहे. पुत्र पित्याशी दोनहात करण्यास सरसावला आहे. तिच्यासाठी कोण सूर्याचा प्रतिनिधी बनला? कुणी चंद्राशी संबंध जोडले? फिरऔन, सूर्यवंशी व चंद्रवंशी याच गोष्टीचा चमत्कार आहे. कोणी एखाद्या अन्य नामधारी ईश्वराचा प्रवक्ता बनला. थोडक्यात असे की, ईश्वराच्या सेवकांवर आपली आज्ञा चालविण्याच्या आवडीने मानवाकडून ते सर्वकाही करविले, जे त्याच्या डोक्यात येऊ शकत होते. रक्ताच्या नद्या वाहविल्या गेल्या. पृथ्वीचे तुकडे तुकडे करविले गेले. राष्ट्रांनी हल्ले चढविले. जातींना वांशिक श्रेष्ठत्वाची मदिरा पाजली गेली. धार्मिक वेड उत्पन्न केले गेले, म्हणजेच, ज्या कोणत्या प्रकारे शक्य झाले, सामान्य लोकांचा आपल्या या आकांक्षेसाठी उपयोग केला गेला. यापेक्षाही मोठे संकट असे की, जेव्हा सत्यासाठी संघर्ष केले गेले आणि ईश्वराच्या सेवकांना सेवकांच्या गुलामीतून मुक्तता प्रदान करून देण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा त्यांनासुद्धा त्याच जमातीचे समजले गेले व समजाविले गेले.
हळूहळू जेव्हा बादशाही लोकशाहीचा काळ आला आणि मानव बौद्धिक व सांस्कृतिक उन्नती करता करता अशा ठिकाणी पोचला की प्रत्येक गोष्टीचे व प्रत्येक पद्धती व तत्त्वाचे विश्लेषण करून निश्चित करू लागला, तेव्हा त्याच दोन गोष्टी ज्यांचा आताच उल्लेख आला, अधिक स्पष्ट रूपात समोर आल्या. एक अशी की, एकाला दुसऱ्यावर आपली आज्ञा चालविण्याचा अधिकार कोठून व का मिळाला? दुसरी अशी की, ज्याला कोणाला हुकूम चालविण्याचा अधिकार असेल अथवा त्याला हा अधिकार दिला गेला, त्याने प्रत्येक दोष व उणिवांपासून स्वच्छ, शुचिर्भूत व पवित्र असले पाहिजे. पहिल्या गोष्टीसंबंधी निश्चित केले गेले की, प्रत्येकाच्या आईने त्याला स्वतंत्र म्हणून जन्म दिला आहे, त्याच्यावर कुणाची मर्जी चालू नये. एखाद्या कुलीनाचीही नाही आणि एखाद्या पोपचीही नाही. न एखाद्या राजाची न कोणत्या ईश्वराची. तर त्यावर स्वत: त्याचीच मर्जी चालली पाहिजे. ही मर्जी कशी चालेल? त्याचे प्रकार एकापेक्षा अधिक आहेत. दुसऱ्या गोष्टीसंबंधी मानवी बुद्धीने विचार केला की, सर्वसत्ताधिकार आणि दोष व उणिवांत विरोध आहे. सर्वसत्ताधिकाऱ्याला दोष, उणिवांपासून स्वच्छ व चुकापासून मुक्त असणे आवश्यक आहे. या गरजेपोटी त्यांनी ज्या कोणा सर्वसत्ताधिकाऱ्याला राजमुकूट घातला त्याला शुचिर्भूत व पवित्र गृहीत धरले; या गोष्टीचा विचार न करता की, तो असा असो वा नसो. इटलीत मुसोलिनीच्या काळात जागोजागी लिहिले होते, "मुसोलिनी चुका करीत नाही." यापूर्वी चर्चकाळात जागोजागी लिहिलेले असे, "पोप चुका करीत नाही." मानवी वृद्धी ही गोष्ट मान्य करीत नाही की, चुका करणारी व्यक्ती सर्वसत्ताधिकारी बनू शकते. 'रूसो' ज्याची देणगी वर्तमान निधर्मी लोकशाही आहे, त्यानेसुद्धा जेव्हा सामान्यजनांना सर्वसत्ताधारी बनविले तेव्हा त्याच्यासमोर अशी अडचण आली की, जनसमूह ज्याला सामान्य लोक मूर्ख म्हणतात, त्याला शुचिर्भूत व पवित्र कसे मानावे व मानावयास लावावे? म्हणून त्याने आम लोकांची इच्छा अथवा Common will च्या नावाने निर्मिती केली व त्याला निर्दोष व अचूक गृहीत धरले. हे सर्व अशासाठी की, कोणत्याही राजनैतिक व्यवस्थेचा पाया सर्वसत्ताधिकारी असतो आणि त्याला मानल्याशिवाय कोणतीही राजनैतिक व्यवस्था प्रत्यक्षात येऊ शकत नाही आणि सर्वसत्ताधिकाऱ्याला शुचिर्भूत व पवित्र मानल्याशिवाय अन्य उपाय नाही. मी शपथपूर्वक सांगू शकतो की, मी बालपणापासून “सुब्बूहुन कु सुन रब्बुना व रब्बुल मलाइकति वरूह" पठन करीत असे. याचा अर्थसुद्धा माहीत होता. परंतु जेव्हा राजनैतिक व्यवस्थेच्या सर्वसत्ताधिकाऱ्याच्या अपेक्षित आवश्यक गुणांनी परिचित झालो, तेव्हा कुठे कळले की, 'शुचिर्भूत व पवित्र' चा अर्थ असा आहे. कदाचित सर्वसामान्य मुस्लिमांप्रमाणे मीसुद्धा नकळतपणे विचार न करता काहीसा असाच नि:संदिग्ध विचार बाळगत होतो की, ज्याप्रमाणे राजेलोक स्तुतिकाव्यावर खूश होऊन बक्षिसे देत असत, त्याप्रमाणे महान अल्लाहसुद्धा प्रसन्न होत असेल की, माझे सेवक किती चांगले आहेत की माझे गुणगान करीत आहेत. माझी प्रशंसा करीत आहेत. मला शुचिर्भूत व पवित्र मानीत आहेत. अल्लाहसंबंधी ही कल्पना अनिच्छेने विचार केल्याशिवाय बनते. पण आता मी इतक्या विचार व चिंतनानंतर मनातून उसळणाऱ्या विश्वासाने सांगतो की, अल्लाहला आमच्या स्मरण व प्रशंसेची गरज नाही. आम्ही त्याच्या त्या गुणांचे याचक आहोत. आम्ही त्याची गरज नाही. तो जगातील सर्वांत मोठे सत्य असण्याबरोबरच आमची सर्वांत मोठी गरज आहे. आम्ही त्याला व त्याच्या गुणांना समजू शकत नाही. आमच्याजवळ त्याला व त्याच्या गुणांना समजण्याचे कोणतेही साधन नाही. हे त्याचे उपकार आहे की, त्याने आम्हाला आपल्या व आपल्या गुणांचा परिचय देण्याची व्यवस्था केली. त्याने आम्हाला हे दाखविण्याची व्यवस्था केली की, त्याच्याशी आमचा संबंध कसा असावयाचा पाहिजे. त्याने आम्हाला आपले गुण अशासाठी दाखविले आहेत की, त्याप्रमाणे आम्ही त्याच्याशी संबंध जोडावेत. केवळ जिभेने त्याच्या गुणांचे वर्णन करून थांबू नये तर त्या गुणांना धारण करणाऱ्याच्या इच्छेवर स्वत:ला पूर्णपणे सोपवावे.
आता ही गोष्ट विचारणीय आहे की, महान अल्लाह जो खरोखर सर्वसत्ताधिकारी आहे. त्याचाच सर्वसत्ताधिकार का आवश्यक आहे? कोणत्या कारणामुळे 'सर्वसत्ताधिकार केवळ त्या अद्वितीयालाच शोभा देतो?'
जरा विचार करा. तो मनुष्य जो स्वत: लहानसे जग आहे, जो अगणित पात्रतेचा स्वामी आहे, ज्याने आपल्या सर्व पात्रतांना अद्याप ओळखले नाही, ज्याने सृष्टीची अनेक लपलेली रहस्ये उलगडली आहेत, ज्याने सृष्टीतील अनेक गोष्टींना आपल्या अधीन केले आहे, तो पाण्यात माशापेक्षा अधिक चांगले पोहतो. हवेत उड्डाण करण्यात पक्ष्याना मागे टाकले आहे, चंद्रावर ध्वज गाडले आहे आणि मंगळावरसुद्धा पोहचला आहे; अशा माणसावर कोणाचा हकूम चालावयास पाहिजे? एक सामान्य बुद्धीचा माणूसदेखील सांगेल की, अशा महान मनुष्यावर हुकूम त्याचा चालावयास पाहिजे जो त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमान असेल आणि ज्याचे ज्ञान असीम असेल. अशा विवेकी माणसावर हुकूम त्याचा चालावयास पाहिजे जो त्याच्यापेक्षा अधिक विवेक बाळगणारा असेल, ज्याचा विवेक अथांग असेल. तो नि:पक्षपाती असावा. तो एखाद्याची बाजू घेणारा व एखाद्याचा विरोधी नसावा. तो कोणत्याही वंशाचा नसावा की ज्यामुळे वंशवादाची शंका यावी. तो कोणत्याही जमातीचा नसावा की एखाद्याने त्याच्या जमातवादी स्वार्थाला बळी पडावे. तो कोणत्याही वर्गाशी संबंधित नसावा की एखाद्या वर्गवादास बळी पडावा. त्याच्यात कोणाविरुद्ध तिरस्कार व सूडभावना नसावी. त्याचे ज्ञान इतके विस्तृत व सखोल असावे की तो भविष्यातील उद्यालासुद्धा तितकाच जाणणारा असावा जितका तो वर्तमान जाणतो. या गुणांना धारण करणारा सांगा या जगात कोण आहे? एखादा पीरसाहेब? एखादा पंडित? एखादा पोप? एखादा राजा? कुणी मुसोलिनी? कुणी हिटलर? अथवा सामान्यजनातील बहुसंख्य? यांच्यापैकी कोणात हे गुण आढळतात का? या गुणाविना एखाद्याला सर्वसत्ताधिकारी मानून त्याच्या अधीन होणे श्रेष्ठ मानवतेचा अपमान नव्हे काय? पण जाऊ द्या, श्रेष्ठ मानवतेला एखाद्या आंधळ्याच्या हाती देणे म्हणजे आपल्याच पायांनी चालत जाऊन विनाशाच्या खाईत पडणे नव्हे काय? __अशा श्रेष्ठ व उच्च मनुष्यावर तर त्याचा हुकूम चालावयास पाहिजे, जो सर्व प्रकारच्या उणिवांपासून मुक्त असावा. तो “फअआलुल्लिमा युरीद" (अर्थात - जो तो इच्छितो चांगले करतो) असावा. “ला युसअलु अम्मा यफअलु" (अर्थात - प्रश्न केला जात नाही त्याला जो काही तो करतो) असावा. जो शुचिर्भूत व पवित्र असावा. शुचिर्भूतता व पवित्रतेविना सर्वसत्ताधिकाऱ्याचा मुकूट कोणालाही शोभा देत नाही आणि जर त्याला एखाद्याने बळजबरीने उचलून नेले तर तो जगासाठी संकट बनतो.

धर्म व जग एक असण्याचा हा अर्थ पूर्णत: चुकीचा आहे, जो बहुतेक धर्मपरायण लोक लावतात, की उपासना तर अल्लाहची करावी. अनिवार्य धार्मिक कृत्ये व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी केलेली कामे तर अल्लाहच्या आज्ञेनुसार अदा केली जावीत. उरल्या जागतिक बाबी, जशा राजनीती, सामाजिकता, अर्थकारण, सामूहिकता वगैरे. तर या बाबतीत त्याचप्रमाणे कृती केली जावी जशी दुसरे लोक करतात. राजनीतीत तशाच प्रकारे भाग घेतला जावा जसा एखाद्या अन्य व्यक्तीचा सर्वसत्ताधिकार मानणारे घेतात आणि समाधान मानावे की, इस्लामी राजनीतिचा हक्क अदा झाला. जर हे बरोबर असेल तर ही गोष्ट या टोकापर्यंत पोचेल की, 'बिस्मिल्लाह' (आरंभ करतो, अल्लाहच्या नावाने) म्हणून उजव्या हाताने दारू पिणे, पैगंबर मुहम्मद (स.) च्या कृतीचे अनुकरण ठरेल. राजनीतिक व्यवस्था इस्लामी असो अथवा गैरइस्लामी त्याचा पाया घातला जातो सर्वसत्ताधिकाराने, पहिले पाऊल म्हणून सर्वसत्ताधिकाराची समस्या सोडविली जाते. कोणत्याही राजनीतिक व्यवस्थेसंबंधी पहिला प्रश्न असा असतो की, त्यात सर्वसत्ताधिकारी कोणाला मानले गेले आहे? या प्रश्नाच्या उत्तरानेच इस्लामी राजनीती दुसऱ्या राजनीतीपेक्षा भिन्न आहे हे स्पष्ट होते. इस्लाममध्ये रूपावर अधिक चर्चा नाही. सांस्कृतिक व वैचारिक उन्नतीने कोणतेही रूप धारण करावे. जर त्यात सर्वसत्ताधिकारी म्हणून अल्लाहला मानले असेल आणि त्यात नागरिकाची स्तिती वेसणरहित उंटाची नसेल. आपल्या स्वामीच्या इच्छेच्या अधीन एका सहाय्यकाची आहे, तर ती इस्लामी राजनीती होय. जर अल्लाहशिवाय कुणा दुसऱ्याचा सर्वसत्ताधिकार मानला जात असेल, तर ती इस्लामी राजनीती नव्हे. मग ती चालविणारी चाळीस दिवस जप-तप करण्यामध्ये लागलेली व्यक्ती असो अथवा हातात पवित्र कुरआन धारण करणारे धर्मपंडित असोत. कारण ज्या प्रकारे अल्लाहच्या उपासनेत इतर कोणाला सामील करणे अनेकेश्वरत्व आहे, तसेच त्याच्या सर्वसत्ताधिकारी असण्याच्या त्याच्या गुणात सामील करणे अथवा स्वत: सामील होणे अनेकेश्वरत्व व त्याच्याशी बंडखोरी आहे. "ला इलाहा इल्लल्लाहु"चा अर्थ जेथे अल्लाहशिवाय इतर कोणी उपास्य नाही असा आहे, तेथेच अल्लाहशिवाय अन्य कोणीही शासनकर्ता नाही असासुद्धा आहे. यापैकी एक मान्य करणे आणि दुसरे अमान्य करणे एकेश्वरत्वाच्या श्रद्धेच्याच काय बुद्धीच्यासुद्धा उलट आहे. जर हे अनेकेश्वरत्व आहे, तर हा मोठा अत्याचार आहे. “इन्नशिर्का लजुलमुन अजीम' अर्थात नि:संशय अनेकेश्वरत्व मोठा जुलूम आहे. या मोठ्या जुलमासह जर नकळत नसेल तर उपासना, नामस्मरण मी सांगू शकत नाही की, अल्लाहच्या तराजूत किती वजन प्राप्त करू शकतील. महान अल्लाह नि:संशय क्षमा करणारा व दयाळू आहे. परंतु जर तो तसाच भोळा-भाबडा असता, जसा की आमचे भोळे-भाबडे धार्मिक लोक त्याला समजतात, की केवळ तोंडी जमाखर्च करणाऱ्यांना तो आपल्या प्रामाणिक लोकांच्या समूहात सामील करून घेईल, तर किती चांगले झाले असते! पण वस्तुस्थिती अशी आहे की, एक मूर्ख मनुष्यदेखील जेव्हा एखाद्याला मित्र बनवितो तेव्हा त्याच्या सुंदर वर्णनशैली व दीर्घ वर्णनाने समाधानी होत नाही, तर त्याला विविध पद्धतीने तपासतो व पारखतो.
तर बंधुनो! “एकेश्वरत्व काय आहे?" चे हे उत्तर. याचा अर्थ असा की, महान अल्लाहच्या उपास्याच्या गुणाला व त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला वेगवेगळे ठेवले जाऊ नये आणि असेही केले जाऊ नये की, त्याच्या उपास्याच्या गुणाला व्यावहारिकरीत्या मानले जावे आणि त्याच्या सर्वसत्ताधिकारीच्या गुणाला केवळ डोक्यात व पुस्तकात राहू दिले जावे. त्याचे व्यावहारिक स्वरूप असेच होऊ शकते की, आम्ही आपल्या उपासनेच्या भावनेला आणि आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या आवश्यकतेला दुसऱ्या सर्वसत्ताधिकाराच्या दावेदाराकडून व आपल्या सर्वसत्ताधिकाराच्या दाव्याकडून तोंड फिरवून आणि एकाला दुसऱ्यात समाविष्ट करून आपल्या जुलूम करणाऱ्याला महाकोपी, शुचिर्भूत व पवित्र, अत्यंत मेहरबान व दया करणाऱ्या अल्लाहच्या हुजुरात सादर करावे. जर या दोघांना वेगवेगळे केले तर दोघे निर्जीव होतील. हा अल्लाहचा सर्वसत्ताधिकारदेखील एवढी मोठी कृपा आहे व त्यात इतकी विपुलता आहे की त्यांची गणना करणे अशक्य आहे, ज्याप्रमाणे त्याच्या अन्य बक्षिसांची गणना संभव नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहचा सर्वसत्ताधिकार मान्य करवून त्याच्या आज्ञा लागू करण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी जी युद्धे केली, तह केले, करार केले आणि एक राज्यप्रमुख म्हणून ते सर्वकाही आपल्या विशिष्ट शैलीत व अत्यंत पावित्र्य व शुचिर्भूततेने केले, जे अन्य सर्वसत्ताधिकाराच्या दावेदारांचे प्रतिनिधी करतात. तर मग त्यांना शासनाची रूची आणि ऐश्वर्याचा शौक होता काय? मग हे सर्वकाही त्यांनी का केले? ही गोष्ट स्पष्ट आहे की, बालकाचे शिक्षण केवळ प्रेम व ममता आणि प्रलोभन व प्रोत्साहनाने होत नाही, तर तंबी व शिस्तपालनाचीसुद्धा गरज असते. अगदी तसेच प्रत्येक चिंतन कृतीची व्यवस्था आपल्या गरजेप्रमाणे लोक तयार करण्यासाठी शक्तीचा प्रयोग करतात. इस्लामसुद्धा हेच करतो. अल्लाहच्या आवडीची माणसे तयार करण्यासाठी जेथे धर्मावरील दृढ श्रद्धा व सदाचार, प्रलोभन व प्रोत्साहन आणि धार्मिक प्रवचन व उपदेश आवश्यक आहे, तेथे शक्तीचा सोटासुद्धा आवश्यक आहे. आता ही गोष्ट प्रकाशमान दिनाप्रमाणे स्पष्ट झालेली आहे की, शक्तीचा हा सोटा जर अल्लाहच्या सर्वसत्ताधिकारी असण्याशी व त्याच्या प्रसन्नताप्राप्तीशी जोडलेला असेल, तर ही अल्लाहची मोठी कृपा आहे. जर हा सोटा या गोष्टीपासून मुक्त होऊन अपात्र हातात गेला तर माणसासाठी तितकेच मोठे संकट ठरेल.
पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास या प्रकाशात करा. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की, जर माणसांची एखादी जमात त्या सत्य उपास्यांच्या सेवेत निमग्न होऊन त्याच्याच सर्वसत्ताधिकाराची गुलाम बनल्यास तिला या जगात असा सन्मान व प्रतिष्ठा, अशी शांतता व पवित्र जीवन मिळेल जे एखाद्या अन्य पद्धतीने मिळू शकत नाही. अल्लाहचा गुलाम आणि तो निराश्रित असावा, हे कसे शक्य आहे? आणि अशातली गोष्ट नव्हे की कधी काळी असे घडले होते, तर -
'आज भी हो जो इब्राहीम सा ईमा पैदा।
आग कर सकती है अंदाजे गुल्सिता पैदा॥'
अर्थात - जर आजसुद्धा पैगंबर इब्राहीम (अ.) सारखी अढळ श्रद्धा निर्माण झाली तर पैगंबर इब्राहीम (अ.) यांना आगीत टाकले असता अल्लाहच्या कृपेने ती आग एका उद्यानात परिवर्तित झाली होती. तसला चमत्कार पुन्हा घडेल व आजदेखील आग उपवनात बदलेल.

Allah
अल्लाहला संपूर्ण अधिकार आहे की, तो जे इच्छील ती आज्ञा देईल. सेवकांना त्यासंबंधी कसे व का विचारण्याचा अधिकार नाही. जरी त्याच्या सर्व आज्ञा विवेक व कल्याणावर आधारित आहेत. परंतु मुस्लिम सेवक त्याच्या आज्ञेचे पालन अशासाठी करीत नाही की, ती त्याला योग्य वाटते अथवा कल्याणकारी समजतो, तर केवळ अशासाठी करतो की ही स्वामीची आज्ञा आहे. जी वस्तू त्याने निषिद्ध ठरविली आहे ती अशासाठी निषिद्ध आहे की, त्याने निषिद्ध ठरविली आहे आणि अशाच प्रकारे जी त्याने धर्मसंमत ठरविली आहे. तीसुद्धा कोणत्या अन्य आधारावर नव्हे, तर केवळ या आधारावर धर्मसम्मत आहे की जो अल्लाह या साऱ्या वस्तूंचा मालक आहे, तो आपल्या सेवकांना त्या वस्तूंच्या उपयोगाची परवानगी देतो. म्हणून पवित्र कुरआन पूर्ण भर देऊन हे तत्त्व ठरवितो की, वस्तूंच्या निषिद्ध व धर्मसम्मत असण्यासाठी स्वामीची परवानगी व प्रतिबंध असण्याशिवाय अन्य कोणत्याही आधाराची अजिबात गरज नाही. तशाच प्रकारे सेवकासाठी एखादे काम धर्मानुकूल असणे किंवा नसण्याचा आधार याच्याशिवाय अन्य काही नाही की, अल्लाह जी धर्मानुकूल ठरवील ती धर्मानुकूल आहे आणि जिला धर्म प्रतिकूल ठरवील ती धर्म प्रतिकूल.
(सुबोध कुरआन, भाग १)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget