Articles by "प्रवचने"

muslims
आंशिक मुस्लिम
एका प्रकारचे मुस्लिम ते आहेत जे अल्लाह व प्रेषितांचा स्वीकार करून इस्लामला आपला धर्म म्हणून मान्यता देतात, परंतु आपल्या या धर्माला आपल्या संपूर्ण जीवनाचा केवळ एक अंश आणि एक विभाग म्हणून ठेवतात.
या विशिष्ट अंश व विभागात तर इस्लामवर श्रद्धा असते. उपासना असते. जप जाप्य व मुसल्ला (ज्यावर नमाज पढली जाते ते कापड) असतो, अल्लाहचे नामस्मरण असते, खाण्या-पिण्यात व काही सामाजिक बाबतीत संयम पाळला जात असतो आणि ते सर्वकाही असते ज्याला धार्मिक कार्यप्रणाली म्हणून संबोधले जाते, परंतु या विभागाशिवाय त्यांच्या जीवनातील इतर सर्व बाबी ते मुस्लिम असल्याचे दर्शवीत नाहीत. ते प्रेम करतील तर आपल्या मनासाठी किंवा आपल्या लाभासाठी किंवा आपल्या देश, जात अथवा दुसऱ्या कुणासाठी करतील. ते शत्रुत्व करतील आणि कुणाशी युद्धही करतील तेसुद्धा अशाच एखाद्या भौतिक अथवा मानसिक कारणामुळेच. त्यांचे कारभार, देवाण-घेवाण, त्यांचे जीवनव्यवहार व संबंध, त्यांचा त्यांच्या मुलाबाळांशी, त्यांच्या घराण्याशी, त्यांच्या समाजाशी व ज्यांच्याशी व्यवहार केला जातो अशा लोकांशी त्यांची वागणूक विशेषकरून धर्मापासून मुक्त व भौतिकतेवर अवलंबून असते. एक जमीनदार म्हणून अथवा एक व्यापारी, एक शासक, एक शिपाई, एक धंदेवाईक म्हणून त्यांचा काही दर्जा असू शकेल. परंतु त्यांचा मुस्लिम म्हणून कोणताही दर्जा असत नाही. याशिवाय अशा प्रकारचे लोक एकत्र येऊन सामूहिकरीत्या ज्या सांस्कृतिक, शैक्षणिक व राजनीतिक संस्था स्थापन करतील, त्यासुद्धा मुस्लिमांच्या संस्था म्हणून म्हटल्या जातील अथवा त्यांच्यावर आंशिक इस्लामी प्रभावसुद्धा असेल, परंतु वास्तविकत: त्यांचा इस्लामशी काडीचाही संबंध नसेल.

परिपूर्ण व सच्चे मुस्लिम

दुसऱ्या प्रकारचे मुस्लिम ते आहेत जे आपले संपूर्ण व्यक्तित्व व आपले संपूर्ण अस्तित्व इस्लामसाठी समर्पित करतात. त्यांच्या सर्व योग्यता त्यांच्या मुस्लिम असण्याच्या योग्यतेत विलुप्त होतात. ते पिता असतील तर मुस्लिम म्हणून, पती अथवा पत्नी असतील तर मुस्लिम म्हणून, व्यापारी, जमीनदार, मजूर, नोकर अथवा धंदेवाईक असतील तर मुस्लिम म्हणून. त्यांच्या भावना, त्यांच्या इच्छा, त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे विचार, त्यांची मते, त्यांची घृणा व आवड, त्यांची पसंती-नापसंती, सर्वकाही इस्लामच्या अधीन असेल. त्यांच्या हृदय व बुद्धीवर आणि त्यांच्या शरीर व प्राणावर इस्लामचा पुरेपूर ताबा असेल. त्यांचे प्रेम व शत्रुत्व इस्लामपासून मुक्त नसेल. ज्यांची भेट घेतील ती इस्लामसाठी घेतील आणि ज्यांच्याशी लढतील ते इस्लामसाठी लढतील. एखाद्याला काही देतील तर अशासाठी देतील की इस्लामची मागणी अशीच आहे की त्याला दिले जावे आणि जर एखाद्याला दिले नाही तर ते अशासाठी दिले नाही की इस्लाम असेच म्हणतो की त्याला दिले जाऊ नये. त्यांची ही कार्यपद्धती केवळ व्यक्तीपर्यंत मर्यादित नसते तर त्यांचे सामुदायिक जीवनसुद्धा पूर्णत: इस्लामी जीवनपद्धतीच्या अधीन असते. एक समुदाय म्हणून त्यांचे अस्तित्व केवळ इस्लामसाठी असते आणि त्यांचे संपूर्ण सामुदायिक वर्तन इस्लामी जीवनव्यवस्थेच्या तत्त्वावर आधारित असते.

अल्लाहला अपेक्षित असलेला मुस्लिम

हे दोन प्रकारचे मुस्लिम जरी विधिवत एकाच प्रेषिताचे व धर्माचे अनुयायी (उम्मत) आहेत व दोघासाठी मुस्लिम हा शब्द समान रूपाने लागू होतो, तरीसुद्धा वास्तविकत: ते एकमेकांपासून अगदी भिन्न आहेत. पहिल्या प्रकारच्या मस्लिमाची कोणतीही कामगिरी इस्लामच्या इतिहासात उल्लेखनीय अथवा अभिमानास्पद नाही. वास्तविकत: त्यांनी कोणतेही असले कृत्य केले नाही की ज्याने जागतिक इतिहासावर इस्लामी जीवपद्धतीची छाप सोडली असेल. पृथ्वीने असल्या मुस्लिमांचे ओझे कधीही सहन केले नाही. इस्लामला जर अवनती प्राप्त झाली असेल तर अशा लोकांमुळेच झाली. अशाच प्रकारच्या मुस्लिमांचे बाहुल्य मुस्लिम समाजात असण्याचा परिणाम असा दिसून आला की जगाच्या जीवनव्यवस्थेची लगाम अनेकेश्वरवादीच्या ताब्यात गेली आणि मुस्लिमांना त्यांच्या अधीन राहून केवळ एका सीमित धार्मिक जीवनाच्या स्वातंत्र्यावर समाधान मानावे लागले. अल्लाहला असले मुस्लिम कदापि अपेक्षित नव्हते. त्याने आपल्या प्रेषितांना जगात अशाकरिता पाठविले नव्हते आणि आपले ग्रंथसुद्धा अशासाठी उतरविले नव्हते की केवळ अशा प्रकारचे नावापुरते मुस्लिम जगात बनविले जावेत, असले नावापुरते मुस्लिम नव्हते तेव्हा मौल्यवान असलेल्या कोणत्याही वस्तूची जगात उणीव नव्हती की जिची पूर्तता करण्यासाठी वही (ईशसंदेश) व प्रेषित्वाचा क्रम सुरू करण्याची अल्लाहला गरज भासली असती.
वास्तविकत: जे मुस्लिम अल्लाहला अपेक्षित आहेत, ज्यांना तयार करण्यासाठी प्रेषितांना पाठविले गेले व ग्रंथ उतरविले गेले आणि ज्यांनी इस्लामी दृष्टिकोनाने कधी एखादे नावाजण्याजोगे कार्य केले आहे अथवा आज करू शकतात; ते केवळ दुसऱ्याच प्रकारचे मुस्लिम आहेत.

Kaba Sharif
विधिवत इस्लाम
धर्मशास्त्रीय व विधिवत इस्लाममध्ये माणसाच्या अंत:करणाची स्थिती पाहिली जात नाही व पाहिली जाऊ शकत नाही, तर केवळ त्याच्या तोंडी स्वीकृती व या गोष्टीस पाहिले जाते की तो ती आवश्यक चिन्हे प्रकट करतो किंवा नाही की ज्या तोंडी स्वीकृतीच्या पुष्टीसाठी आवश्यक आहेत.
जर एखाद्या माणसाने तोंडाने अल्लाह, प्रेषित (महम्मद स.), पवित्र करआन, परलोक व अन्य ईमानच्या (विश्वासाच्या) गोष्टी मान्य असल्याचा स्वीकार केला आणि त्यानंतर त्या आवश्यक अटीसुद्धा पूर्ण केल्या ज्यांच्यामुळे त्या मान्य केल्याचा पुरावा मिळतो, तर त्याला इस्लामच्या वर्तुळात घेतले जाईल आणि सर्व बाबतीत त्याच्याशी मुस्लिम समजून व्यवहार केला जाईल. परंतु ही गोष्ट केवळ या जगापुरती आहे आणि ऐहिकदृष्ट्या ती कायदेशीर व सांस्कृतिक आधार उपलब्ध करून देते की ज्यावर मुस्लिम समाजाची रचना केली गेली आहे. याचा उद्देश याशिवाय अन्य काही नाही की अशा स्वीकृतीने जितके लोक मुस्लिम समाजात दाखल होतील त्या सर्वांना मुस्लिम मानले जाते. त्यांच्यापैकी कोणालाही अनेकेश्वरवादी ठरविले जात नाही. त्यांना एकमेकांवर धार्मिक, कायदेशीर, नैतिक व सामाजिक अधिकार प्राप्त असतात. त्यांच्या दरम्यान वैवाहिक संबंध प्रस्थापित होतात, वारसा संपत्तीची विभागणी होते आणि इतर सांस्कृतिक संबंध अस्तित्वात येतात.

वास्तविक इस्लाम
परंतु पारलौकिक जीवनात मानवाची मुक्ती आणि त्याला मुस्लिम व मोमिन ठरविला जाणे आणि अल्लाहच्या प्रिय दासांमध्ये त्याची गणना होणे या विधिवत मान्यतेवर अवलंबून नाही तर तेथे अस्सल गोष्ट माणसाची अंत:करणाची स्वीकृती, त्याच्या हदयाचा कल व त्याचे आनंदाने व आवडीने आपल्या स्वत:ला पूर्णपणे अल्लाहच्या हवाली करणे होय.
 या जगात जे तोंडाने मान्य केले जाते ते केवळ इस्लामी न्यायाधीश, सामान्यजन व मुस्लिमांसाठी आहे, कारण ते केवळ प्रकट वस्तूच पाहू शकतात. परंतु अल्लाह माणसाच्या हृदयाला व त्यातील बाबींना पाहतो आणि त्याच्या ईमानचे मापन करतो.
त्याच्यापाशी ज्याप्रकारे माणसाचे परीक्षण केले जाते ते असे आहे की त्याचे जिणे व मरणे, त्याची प्रामाणिकता, त्याची आज्ञाधारकता व दासता आणि त्याचे संपूर्ण जीवनकार्य अल्लाहसाठी होत आहे की अन्य कोणासाठी? जर अल्लाहसाठी होत असेल तर तो मुस्लिम व मोमिन ठरेल आणि जर अन्य कोणासाठी होत असेल तर तो मुस्लिमही ठरणार नाही आणि मोमिनसुद्धा नाही. या दृष्टीने जो जितका निकृष्ट निघेल तितकाच त्याचा ईमान व इस्लाम निकृष्ट असेल. मग या जगात त्याची गणना कितीही श्रेष्ठ मस्लिमात झाली असेल आणि त्याला कितीही मोठ्या हुद्दयाने विभूषित केले गेले असेल.
अल्लाहजवळ केवळ या गोष्टीची किंमत आहे की जे काही त्याने तुम्हाला दिले आहे ते सर्वकाही तुम्ही त्याच्या मार्गात लावले किंवा नाही? जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तोच हक्क दिला जाईल जो प्रामाणिक लोकांना व उपासनेचा हक्क अदा करणाऱ्यांना दिला जातो. तुम्ही जर एखादी गोष्ट अल्लाहच्या उपासनेपासून वेगळी ठेवली तर तुमची ही मान्यता की तुम्ही मुस्लिम झाला म्हणजे स्वत:ला अल्लाहच्या हवाली केले, ही केवळ एक खोटी स्वीकृती ठरते. यामुळे जगातील लोक फसतील, या फसवणुकीमुळे तुम्हाला मुस्लिम समाजात स्थान मिळू शकेल, यामुळे जगात तुम्हाला मुस्लिमासारखे सर्व हक्क मिळू शकतील, परंतु अशा प्रकारे अल्लाह तुम्हाला प्रामाणिक लोकांत स्थान देऊ शकत नाही.
जर तुम्ही मी दर्शविलेल्या या विधिवत व वास्तविक इस्लाममधील फरकाचा विचार केला तर तुम्हाला कळेल की याचे परिणाम केवळ पारलौकिक जीवनातच वेगळे होतील असे नव्हे तर या जगातसुद्धा एका मोठ्या प्रमाणावर वेगळी परिणती होईल. जगात जे मुस्लिम आज आढळतात ते सर्व दोन प्रकारांत विभाजित केले जाऊ शकतात.

Quran
अल्लाह आपल्या पवित्र ग्रंथात आदेश देतो,
“सांगा, माझी नमाज, माझ्या तमाम उपासनेच्या पद्धती, माझे जीवन व मरण, सर्वकाही समस्त विश्वांचा स्वामी अल्लाहसाठीच आहे. ज्याचा कोणीही भागीदार नाही. अशीच मला आज्ञा दिली गेली आहे आणि सर्वप्रथम आज्ञापालनात मान तुकविणारा मीच आहे."
(कुरआन-६:१६२-१६३) या आयतीचे स्पष्टीकरण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या या कथनाने होते,
“ज्याने एखाद्याशी मैत्री व प्रेम केले तर ते अल्लाहसाठी आणि वैर केले तर अल्लाहसाठी आणि कुणाला दिले तर ते अल्लाहसाठी व एखाद्याला नकार दिला तर ते अल्लाहसाठी. अशा प्रकारे त्याने आपला ईमान पक्का केला म्हणजे तो पूर्णपणे मुस्लिम झाला."
जी आयत मी आपल्यासमोर प्रस्तुत केली त्यावरून असे कळते की इस्लामची अशी अपेक्षा आहे की माणसाने आपली उपासना आणि आपल्या जीवन व मृत्यूला केवळ अल्लाहसाठी विशिष्ट करावे आणि अल्लाहशिवाय कोणासही त्यात सहभागी करू नये, म्हणजे उपासना व त्याचे जीवन व त्याचे मरणे अल्लाहशिवाय अन्य कोणासाठी असू नये.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वाणीचे जे स्पष्टीकरण मी आपणास ऐकविले त्यावरून असे समजते की माणसाचे प्रेम व शत्रुत्व आणि आपल्या ऐहिक जीवनातील व्यवहारात त्याची देवाण-घेवाण केवळ अल्लाहसाठीच असणे ही ईमानची निकड आहे. त्याशिवाय ईमानला पूर्णत्व प्राप्त होत नाही, मग उच्च दर्जा प्राप्त होण्याची कवाडे खुली होण्याची गोष्टच कशाला? जितकी कमतरता यात या बाबतीत होईल तितकीच उणीव माणसाच्या ईमानमध्ये असेल. आणि जेव्हा अशा प्रकारे मनुष्य पूर्णपणे अल्लाहचा होईल तेव्हा कुठे जाऊन त्याचा ईमान पूर्ण होईल.
काही लोकांचा असा समज आहे की अशा प्रकारच्या गोष्टी केवळ श्रेष्ठ दर्जाचे द्वार उघडे करतात, नाहीतर ईमान व इस्लामसाठी माणसात ही स्थिती उत्पन्न होण्याची अट नाही. अन्य शब्दांत याचा अर्थ असा की या स्थितीशिवायदेखील मनुष्य मुस्लिम असू शकतो. परंतु हा चुकीचा समज आहे व हा चुकीचा समज उत्पन्न होण्याचे कारण असे आहे की सामान्यत: लोक (इस्लामी) धर्म शास्त्रीय व कायदेशीर इस्लाम आणि त्या वास्तविक इस्लाममध्ये जो अल्लाहच्या दृष्टीने विश्वसनीय आहे, फरक करीत नाहीत.

पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे,
"तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वत:ला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.

मद्याचा त्याग
तुम्ही ऐकले असेल की अरबस्थानात मद्यपानाचा किती जोर होता. स्त्री व पुरुष, तरुण व म्हातारे सर्वांनाच दारूचे वेड होते. वास्तविकतः मदिरेवर त्यांचे प्रेम होते. तिच्या प्रशंसेचे ते गीत गात असत आणि तिच्यावर प्राण देत होते. हेदेखील तुम्हाला ज्ञात असेल की दारूची सवय लागल्यावर ती सुटणे किती दुष्कर आहे. मनुष्य प्राण द्यावयास तयार होतो पण दारू सोडण्याची त्याची तयारी नसते. जर दारूड्याला दारू मिळाली नाही तर त्याची स्थिती आजारी माणसापेक्षा अधिक वाईट होते. परंतु तुम्ही कधी ऐकले आहे का की जेव्हा पवित्र कुरआनमध्ये ती निषिद्ध केल्याची आज्ञा आली तेव्हा काय घडले? तेच अरब लोक जे दारूवर प्राण देत होते. ही आज्ञा ऐकताच त्यांनी स्वत:च्या हाताने दारूचे माठ फोडून टाकले. मदीना शहराच्या गल्ल्यांमधून दारू अशी वाहत होती जणू पावसाचे पाणी वाहत आहे. एका मैफिलीत काही लोक बसून दारू पीत होते, जेव्हा प्रेषित (मुहम्मद स.) यांच्याकडून दिली गेलेली दवंडी ऐकली की दारू निषिद्ध ठरविली गेली आहे, तेव्हा ज्याचा हात जेथे होता तेथेच राहिला. ज्याने तोंडाला पेला लावला होता त्याने लगेच तो दूर केला आणि त्यानंतर एक घोटसुद्धा घशात जाऊ दिला नाही. असा आहे वैभवशाली ईमान! यालाच म्हणतात अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या आज्ञेचे पालन!

अपराधाची कबुली

काय तुम्हाला कल्पना आहे की व्यभिचाराची शिक्षा किती कठोर ठेवली गेली आहे? उघड्या पाठीवर शंभर कोडे, ज्यांची कल्पना केल्यास माणसाच्या अंगावर शहारे यावेत आणि जर व्यभिचारी विवाहित असेल तर दगडांचा वर्षाव करून ठार करण्याची शिक्षा आहे. अशा कठोर शिक्षेचे नाव ऐकूनच माणसाचा थरकाप होईल. परंतु तुम्हालाही कल्पना तरी आहे का की ज्यांच्या हृदयात ईमान होते त्यांची स्थिती कशी होती? एका माणसाकडून व्यभिचाराचे कृत्य घडले. कोणीही न्यायालयापर्यंत पकडून नेणारा नव्हता. पोलिसांना बातमी देण्यास कोणीही नव्हता. केवळ हृदयात ईमान (विश्वास) होते की ज्याने त्या माणसाला सांगितले, “जर तू अल्लाहच्या कायद्याविरूद्ध स्वत:च्या मनाची वासना पूर्ण केली आहेस तर आता जी शिक्षा अल्लाहने त्यासाठी ठरविली आहे ती भोगण्यास तयार हो.” नंतर तो मनुष्य स्वतः प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या सेवेत हजर झाला आणि म्हणाला, “हे प्रेषित (मुहम्मद स.)! मी व्यभिचार केला आहे. मला शिक्षा द्या.” प्रेषितांनी तोंड फिरवून घेतले तेव्हा दुसऱ्या बाजूला येऊन त्याने तीच गोष्ट सांगितली. प्रेषितांनी पुन्हा तोंड फिरवले तेव्हा त्याने पुन्हा समोर येऊन शिक्षेची याचना केली, “जे पाप मी केले आहे त्याची मला शिक्षा द्या." याला म्हणतात ईमान! ज्याच्या हृदयात ईमान आहे त्याच्यासाठी उघड्या पाठीवर शंभर कोरडे सहन करणेच नव्हे तर दगडांच्या वर्षावात मृत्यु स्वीकारणेसुद्धा सोपी गोष्ट आहे परंतु अवज्ञाकारी म्हणून अल्लाहसमोर हजर होणे कठीण आहे.
तुम्हाला माहीत आहे की माणसाला आपल्या नातेवाईकांपेक्षा कोणीही अधिक प्रिय नसतो. विशेषत: वडील, भाऊ, मुले तर इतके प्रिय असतात की त्यांच्यावरून सर्वकाही ओवाळून टाकण्यात मनुष्य धन्यता मानतो. परंतु आपण बद्र व उहुदच्या युद्धांचा थोडा विचार करा की त्यात कोण कोणाच्या विरूद्ध लढला होता. बाप मुस्लिमांच्या सेनेत आहे तर मुलगा अनेकेश्वरवाद्यांच्या सैन्यात. किंवा मुलगा इकडे आहे तर बाप दुसरीकडे. एक भाऊ इकडे आहे तर दुसरा भाऊ तिकडे. अगदी जवळचे आप्तेष्ट एकमेकांविरूद्ध युद्धात आले आणि अशा प्रकारे लढले की जणू हे एकमेकाला ओळखतसुद्धा नाहीत. त्यांच्यातील हा जोश काही रुपये-पैसे अथवा जमिनीसाठी भडकलेला नव्हता, काही वैयक्तिक शत्रुत्वसुद्धा नव्हते, तर केवळ या कारणासाठी ते स्वत:च्या रक्त-मांसाविरूद्ध लढले की ते अल्लाह व प्रेषित (मुहम्मद स.) यांच्यासाठी बाप, मुलगा, भाऊ व संपूर्ण कुटुंबाला त्यागण्याचे अथवा बळी देण्याचे सामर्थ्य बाळगत होते.

जुनाट रुढी-परंपरांना मूठमाती

आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की अरबस्थानात जितक्या जुनाट रुढी-परंपरा होत्या, इस्लामने जवळजवळ त्या सर्वांचाच बीमोड केला. सर्वांत मोठी प्रथा म्हणजे मूर्तीपूजा होती. ही प्रथा शेकडो वर्षांपासून होती. इस्लामने सांगितले की या मूर्तीना सोडून द्या. दारू, व्यभिचार, जुगार, चोरी आणि वाटमारीची अरबस्थानात सर्रास प्रथा होती. इस्लामने या सर्वांचा त्याग करण्यास सांगितले. स्त्रिया उघड्या फिरत असत. इस्लामने आज्ञा दिली की पडदा पद्धतीचा अवलंब करा. स्त्रियांना वारसाहक्क दिला जात नसे. इस्लामने सांगितले की वारसा संपत्तीत त्यांचादेखील हिस्सा आहे. दत्तकपुत्राला तोच दर्जा दिला जात असे जो औरस पुत्राला असतो. इस्लामने सांगितले की तो सख्ख्या पुत्राप्रमाणे नाही तर जर दत्तक पुत्राने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला तर तिच्याशी विवाह केला जाऊ शकतो. थोडक्यात कोणतीही अशी जुनी पद्धत नव्हती की जी मोडण्याची आज्ञा इस्लामने दिली नसेल.
परंतु तुम्हाला कल्पना आहे की ज्यांनी अल्लाह व प्रेषितांवर ईमान धारण केले होते त्यांची कार्यपद्धती कशी होती? शेकडो वर्षांपासून ज्या मूर्तीची ते आणि त्यांचे वाडवडील पूजा-अर्चना व नवस करीत असत त्यांना या ईमानधारकांनी आपल्या हाताने फोडले. शेकडो वर्षांपासून घराण्याच्या ज्या प्रथा चालत आल्या होत्या त्या सर्वांना त्यांनी पूर्णत: नष्ट केले. ज्या वस्तूंना ते पवित्र मानीत असत त्यांना अल्लाहची आज्ञा आल्यावर पायाखाली तुडवून टाकले. ज्या गोष्टींना ते घाणेरड्या मानीत असत अल्लाहची आज्ञा येताच त्यांना धर्मानुकूल समजू लागले. ज्या वस्तु शेकडो वर्षांपासून शुद्ध समजल्या जात असत त्या अकस्मात अशुद्ध ठरल्या आणि ज्या अशुद्ध समजल्या जात असत त्या एकाएकी शुद्ध झाल्या. अनेकेश्वरत्वाच्या ज्या पद्धतीत आमोद-प्रमोद व लाभाची सामुग्री होती अल्लाहची आज्ञा येताच तिचा त्याग केला आणि इस्लामच्या ज्या आज्ञांचे पालन माणसाला दुष्कर वाटते त्या सर्वांचा आनंदाने स्वीकार केला. याचे नाव आहे ईमान व याला म्हणतात इस्लाम. त्या वेळी जर अरब लोकांनी असे सांगितले असते की अमुक गोष्ट आम्ही मान्य करीत नाही, कारण त्यात आमचे नुकसान आहे आणि अमुक गोष्ट आम्ही अशासाठी सोडत नाही की त्यात आमचा फायदा आहे; अमुक काम आम्ही अवश्य करू कारण वाडवडिलांपासून हेच होत राहिले आहे, रोमन लोकांच्या अमुक गोष्टी आम्हाला पसंत आहेत आणि इराणी लोकांच्या अमुक गोष्टी आवडतात. अरबस्तानातील लोकांनी अशाच प्रकारे इस्लामची एक-एक गोष्ट रद्द केली असती तर आपण कल्पना करू शकता की आज एकसुद्धा मुस्लिम जगात आढळला नसता. 

अल्लाहच्या प्रसन्नतेचा मार्ग
बंधुनो, पवित्र कुरआनमध्ये स्पष्टोक्ती आहे, __"तुम्ही जोपर्यंत (अल्लाहच्या मार्गात) तुमच्या सर्वाधिक प्रिय वस्तू खर्च करत नाही; तोपर्यंत तुम्ही पुण्य प्राप्त करू शकत नाही.” (कुरआन-३:९२)
बस्स, हीच आयत इस्लाम व ईमानचा प्राण आहे. इस्लामचे मूळ वैभव यातच आहे की तुम्ही स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींचा अल्लाहसाठी त्याग करावा. जीवनाच्या सर्व बाबतीत तुम्ही पाहता की अल्लाहची आज्ञा तुम्हाला एकीकडे येण्याचे आवाहन करते तर मनाच्या इच्छा दुसरीकडे बोलावतात. अल्लाह एका कामाची आज्ञा देतो तर आमचे मन म्हणते की यात तर त्रास अथवा नुकसान आहे. अल्लाह एखाद्या गोष्टीची मनाई करतो तर मन म्हणते की ही तर फार मजेशीर गोष्ट आहे अथवा फायद्याची गोष्ट आहे. एकीकडे अल्लाहची प्रसन्नता आहे तर दुसरीकडे एक जग उभे आहे. जीवनात प्रत्येक पावलावर माणसाला दोन मार्ग आढळतात. एक मार्ग इस्लामचा आहे आणि दुसरा अनेकेश्वरत्व व वितुष्टाचा. ज्या माणसाने जगातील प्रत्येक गोष्टीला ठोकर मारून अल्लाहच्या आज्ञेपुढे आपले मस्तक नमविले त्याने इस्लामचा मार्ग अवलंबिला आणि ज्याने अल्लाहची आज्ञा धुडकावून आपल्या मनाची अथवा जगाची प्रसन्नता प्राप्त केली त्याने अनेकेश्वरत्व अथवा वितुष्टाचा मार्ग अंगीकारला आहे.

१) मनाची गुलामी
 जर एखाद्या माणसाने असे म्हटले की अल्लाह व पैगंबर (स.) यांचा आदेश असा आहे, तर असू द्या. माझे मन ते मान्य करीत नाही. मला तर यात नुकसान दिसते. म्हणून मी  अल्लाह व पैगंबर (स.) यांचे म्हणणे न ऐकता मी माझ्या मते चालीन, तर अशा माणसाचे मन ईमान (विश्वास) पासून रिक्त असेल. तो मुसलमान नव्हे तर तो ढोंगी आहे जो तोंडाने  तर सांगतो की मी अल्लाहचा दास व पैगंबरांचा अनुयायी आहे. परंतु वास्तविकतः तो आपल्या मनाचा गुलाम व आपल्या मनाचा अनुयायी आहे.

२) रीति रिवाजांचे बंधन

. अशाचप्रकारे जर एखादा मनुष्य असे सांगतो की अल्लाह आणि पैगंबरांची आज्ञा काहीही असो, परंतु अमुक गोष्ट तर वाड-वडिलांपासून चालत आली आहे. ती कशी सोडता येईल?  अथवा अमुक कायदा तर माझ्या घराण्यात अथवा भाऊकीत ठरविला आहे तो कसा मोडता येईल? तर अशा माणसाची सुद्धा ढोंगी लोकांत गणना होईल, मग नमाज पढून पळून त्याच्या  कपाळावर कितीही मोठा घट्टा पडलेला का असेना आणि दर्शनी त्याने कितीही धर्मानुकूल चेहरा बनविला का असेना, त्याला कारण असे की धर्माच्या मूळ तथ्यांनी त्याच्या हृदयाचा ठाव  घेतला नाही. रुकूअ (वाकलेल्या स्थितीत गुडध्यावर हात ठेऊन थांबणे), सिजदे (जमिनीवर मस्तक टेकणे) आणि उपवास व हजचे नाव धर्म नव्हे. त्याशिवाय माणसाचा चेहरा व त्याच्या  पोषाखात सुद्धा धर्म असत नाही तर मुळात अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आज्ञापालन करण्याचे नाव धर्म (दीन) आहे. जो मनुष्य आपल्या बाबतीत अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या  आदेशांचे पालन करण्यास नकार देतो, खरे पाहता त्याचे हृदय धर्मापासून रिक्त आहे. त्याची नमाज, त्याचा उपवास व त्याचा धर्मानुकूल चेहरा एक फसवणुकीशिवाय अन्य काही नाही.

३) दुसऱ्या जातींचे अनुकरण
अशाचप्रकारे जर एखादा मनुष्य अल्लाहचा ग्रंथ व त्याच्या पैगंबराच्या आदेशांची पर्वा न करता म्हणत असेल की मी अमुक गोष्टीचा अशासाठी अवलंब केला की ती इंग्रज लोकांत रूढ  आहे आणि अमुक गोष्ट अशासाठी मान्य करावी की तमुक जातीची प्रगती त्यामुळे होत आहे. तसेच अमुक गोष्ट अशासाठी मान्य करावी की अमुक मोठा माणूस तसे म्हणत आहे. तर  अशा माणसाने सुद्धा आपल्या ईमानची चिंता बाळगणे आवश्यक आहे. या गोष्टी ईमानशी जुळणे शक्य नाही. जर आपण मुसलमान आहात व मुसलमान राहू इच्छिता तर त्या प्रत्येक  गोष्टीला फेकून द्या जी अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आदेशाविरूद्ध आहे. जर तुम्ही असे करू शकत नाही तर इस्लामचा दावा तुम्हाला शोभा देत नाही. तोंडाने तर सांगावयाचे की  आम्ही अल्लाह व पैगंबरांना मानतो, परंतु आपल्या जीवनाच्या बाबतीत प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या बोलण्यापुढे अल्लाह व पैगंबर (स.) यांचे म्हणणे रद्द करीत राहणे हे इमानही नाही व इस्लामही नाही. तर याचे नाव ढोंगीपणा आहे.

पवित्र कुरआनच्या अठराव्या पाऱ्यात (भागात) महान अल्लाहने स्पष्ट शब्दात फर्माविले आहे-
आम्ही उघड करून करून सत्य व असत्यामधील फरक विशद करणाऱ्या आयती उतरविल्या आहेत. अल्लाह ज्याला इच्छितो या आयतींच्याद्वारे सरळ मार्ग दाखवितो. लोक म्हणतात की आम्ही अल्लाह आणि  त्याच्या पैगंबरावर ईमान आणले आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली. मग त्यानंतर त्यांच्यापैकी काही लोक आज्ञाधारकतेपासून तोंड फिरवितात. असले लोक ईमानदार नाहीत. आणि जेव्हां त्यांना अल्लाह व  पैगंबराकडे बोलविले जाते जेणेकरून पैगंबर (स.) यांनी त्यांच्या बाबतीत निर्णय द्यावा तेव्हां त्यांच्यापैकी काही लोक तोंड फिरवितात. तथापि जेव्हां गोष्ट त्यांच्या फायद्याची असेल तेव्हां ती मान्य करतात. काय त्या  लोकांच्या हृदयात रोग आहे अथवा ते शंकेत पडले आहेत किंवा त्यांना अशी भीती आहे की अल्लाह आणि त्याचे पैगंबर (स.) त्यांचा हक्क मारतील कोणत्याही परिस्थितीत, कारण कांहीही असले तरी, हे लोक स्वतःच  आपल्यावर जुलुम करणारे आहेत. वास्तविकतः जे ईमानदार आहेत त्यांची पद्धत तर अशी आहे की जेव्हां त्यांना अल्लाह व त्याच्या पैगंबराकडे बोलाविले जाईल जेणेकरून पैगंबर (स.) यांनी त्यांच्या बाबतीत निर्णय  द्यावा तेव्हां त्यांनी म्हणावे की आम्ही ऐकले आणि आज्ञेचे पालन केले. असलेच लोक मोक्ष प्राप्त करणारे आहेत आणि जो कोणी अल्लाह व त्याच्या पैगंबरांच्या आज्ञेचे पालन करील आणि अल्लाहला भीत राहील व  त्याच्या अवज्ञेपासून दूर राहील बस्स तोच सफल होईल.
- सूरतुन्नूर - ४६-५२
ह्या आयतीत ईमानची जी व्याख्या सांगितली आहे त्यावर विचार करा. मुळात ईमान असा आहे की स्वतःला अल्लाहचा ग्रंथ व त्याच्या पैगंबरांच्या आदेशाच्या स्वाधीन करावे. जी आज्ञा तेथून मिळेल तिच्या समोर  नतमस्तक आणि तिच्यापुढे कुणाचेही ऐकू नका, स्वतच्या मनाचेही नको, घराण्यातील लोकांचेही नको आणि जगातील लोकांचेही नको. अशी स्थिती ज्या माणसाची होईल तोच मोमिन व मुसलमान आहे - आणि ज्याची अशी स्थिती नसेल त्याची दशा ढोंगीपेक्षा अधिक नाही.

prayer
 मुसलमान असण्यासाठी कमीत कमी कोणत्या अटी आहेत. मनुष्याने कमीत कमी  काय असणे आवश्यक आहे की जेणे करून तो मुसलमान म्हणविण्यास पात्र असावा.

कुफ्र (अनेकेश्वरवाद) काय आहे आणि इस्लाम काय आहे?

ही गोष्ट समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की अनेकेश्वरवाद (नास्तिकता) काय आहे आणि इस्लाम काय आहे? अनेकेश्वरवाद अथवा नास्तिकता ती आहे  ज्यात मनुष्य अल्लाहची आज्ञा पाळण्यास नकार देतो. आणि इस्लाम तो आहे ज्यात मनुष्य केवळ अल्लाहच्या आज्ञेचे पालन करतो. तो अशा प्रत्येक पद्धती अथवा कायदा किंवा  आज्ञेचे पालन करण्यास नकार देतो जी अल्लाहने पाठविलेल्या मार्गदर्शनाच्या विरुद्ध असते. इस्लाम आणि अनेकेश्वरवाद (नास्तिकता. अल्लाहचा इन्कार) मधील हा फरक पवित्र  कुरआनमध्ये स्पष्टपणे दाखविला गेला आहे. म्हणून फर्माविले गेले आहे की,“जे अल्लाहने उतरविलेल्या मार्गदर्शनानुसार निर्णय करीत नाहीत असलेच लोक वास्तविकतः अनेकेश्वरवादी (इन्कार करणारे) आहेत."
-सूरतुल माइदाह-४४

निर्णय करण्याचा अर्थ असा नव्हे की जो खटला न्यायालयात जाईल केवळ त्याचाच निकाल अल्लाहच्या ग्रंथानुसार हावा, तर वास्तविकता याचा अर्थ तो. निकाल अथवा निर्णय आहे जो  प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात सदैव करीत असतो. प्रत्येक वेळी तुमच्या समोर हा प्रश्न उभा राहतो की अमुक काम करावे किवा करु नये? अमुक गोष्ट अशी केली जावी की तशी  केली जावी? अशा सर्व प्रसंगी एक पद्धत अल्लाहचा ग्रंथ आणि त्याच्या प्रेषितांची परंपरा दर्शविते आणि दुसरी पद्धत माणसाच्या स्वतःच्या इच्छा अथवा बापजाद्यांच्या चालीरीती किंवा  मानवनिर्मित कायदे दर्शवितात. मग जो मनुष्य अल्लाहने दाखविलेली पद्धत सोडून एखाद्या अन्य पद्धतीनुसार काम करण्याचा निर्णय घेतो तो वास्तविकत: नास्तिकतेची (अल्लाहचा   इन्कार करण्याची पद्धत अवलंबितो. जर त्याने आपल्या संपूर्ण जीवनात याच पद्धतीचे अवलंबन केले असेल तर तो पूर्णपणे काफिर (इन्कार करणारा, आहे. जर तो काही बाबतीत तर  अल्लाहच्या आदेशांना मानत असेल आणि कांही बाबतीत आपल्या इच्छांना अथवा चालीरीतींना किंवा मानवाच्या कायद्याला अल्लाहच्या कायद्यावर प्राधान्य देत असेल तर जितक्या  प्रमाणात तो अल्लाहच्या कायद्याचे उल्लंघन करतो तितक्या प्रमाणात तो काफिर ठरतो. एखादा अर्धा काफिर आहे, कुणी एक-चतुर्थांश काफिर आहे. कुणी एक-दशांश काफिर आहे  आणि कुणी विसाव्या भागाने काफिर आहे. एखादा मनुष्य अल्लाहच्या कायद्याचे जितके उल्लंघन करतो तितकाच तो काफिर ठरतो.
इस्लाम याशिवाय अन्य काही नाही की माणसाने केवळ अल्लाहचा दास असावे. तो स्वमन, वंश व टोळी, मौलवी व पीर (संत) वगैरेंचाही दास असू नये आणि जमीनदार, तहसीलदार  आणि मॅजिस्ट्रेट किंवा अल्लाहला सोडून कोणाचाही त्याने दास असू नये. पवित्र कुरआनमध्ये फर्माविले आहे
"हे पैगंबर! (स.) ग्रंथधारकांना सांगा की या, आम्ही आणि तुम्ही एका अशा गोष्टीवर सहमत होऊ जी आमच्या आणि तुमच्या दरम्यान एकसमान आहे. (म्हणजे जी गोष्ट तुमच्या   पैगंबरानेही सांगितली आहे. आणि अल्लाहचा प्रेषित असण्याच्या नात्याने मी सद्धा तीच गोष्ट सांगत आहे.) ती गोष्ट अशी की एक तर आम्ही अल्लाहशिवाय कोणाचेही दास बनून राहू नये, दुसरी अशी की ईश्वरत्वात कोणासही भागीदार करू नये आणि तिसरी गोष्ट अशी की आमच्यापैकी कोणत्याही माणसाने कोणत्याही माणसाला अल्लाहच्या जागी आपला मालक व  आपला स्वामी बनवू नये. या तीन गोष्टी जर त्यांनी मान्य केल्या नाही तर त्यांना सांगा की साक्षी रहा आम्ही तर मुसलमान आहोत म्हणजे आम्ही या तिन्ही गोष्टी मान्य करतो." -सूरह आले इमरान : ६४

"काय ते अल्लाहच्या आज्ञापालनाशिवाय अन्य एखाद्याची आज्ञा पाळू इच्छितात? वास्तविकतः अल्लाह तर तो आहे ज्याच्या आज्ञेचे पालन कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीवरील व  आकाशातील प्रत्येक वस्तु करीत आहे आणि सर्वांना त्याच्याकडेच परतावयाचे आहे."
- सूरह आले इमरान : ८३

या दोन्ही आयतीत एकच गोष्ट सांगितली गेली आहे. ती अशी की खरा धर्म अल्लाहची ताबेदारी व आज्ञापालन करणे होय. अल्लाहच्या उपासनेचा अर्थ असा नव्हे की फक्त पाच वेळा  त्याच्यापुढे सिजदा (नमाज पढणे) करावा. तर त्याच्या उपासनेचा अर्थ असा आहे की रात्री व दिवसा सदैव त्याच्या आज्ञेचे पालन करावे. ज्या गोष्टींची त्याने मनाई केली आहे, ती करू  नये आणि ज्या गोष्टीचा हुकुम दिला आहे त्याची अम्मलबजावणी करावी. प्रत्येक बाबतीत हे पहावे की अल्लाहची काय आज्ञा आहे. हे पाहू नये की तुमचे स्वतचे मन काय सांगत  आहे, तुमची बुद्धी काय म्हणते, वाड-वडिलांनी काय केले होते, कुळ व भाऊकीची काय इच्छा आहे, मौलवी साहेब आणि पीर (साधु) साहेब काय म्हणत आहेत आणि अमुक साहेबांची  काय आज्ञा आहे किंवा अमुक साहेबांची काय इच्छा आहे. जर तुम्ही अल्लाहच्या आज्ञेला डावलून कोणाचेही ऐकले तर तुम्ही त्याला ईश्वरत्वात भागीदार बनविले. त्याला तो दर्जा दिला  जो केवळ अल्लाहचा दर्जा आहे. आज्ञा देणारा तर केवळ अल्लाहच आहे.

"उपासनेच्या लायक तर केवळ तोच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि ज्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात. पृथ्वी व आकाशातील प्रत्येक वस्तु त्याच्या आज्ञेचे पालन करीत आहे."  - सूरतुल अनआम : ५७

 अनेकेश्वरवादिता व पथभ्रष्टता मुळात कोठून निघते. पवित्र कुरआन आम्हाला सांगतो की हे  दुर्दैवी संकट येण्याचे तीन मार्ग आहेत

(१) मनाची गुलामी
पहिला मार्ग मानवाच्या स्वतःच्या मनाच्या इच्छा आहेत
"अर्थात त्याच्यापेक्षा मोठा पथभ्रष्ट कोण असू शकेल ज्याने अल्लाहच्या आदेशांच्याऐवजी आपल्या मनाच्या इच्छांचे अनुसरण केले?  अशा अत्याचारी लोकांना अल्लाह सन्मार्ग दाखवीत नाही."
- सूरतुल कसस : ५०
याचा अर्थ असा की सर्वात अधिक माणसाला मार्गभ्रष्ट करणारी गोष्ट माणसाच्या स्वतःच्या मनातील इच्छा आहे. जो मनुष्य  इच्छेचा गुलाम झाला तो अल्लाहचा दास बनणे कदापि शक्य नाही. जरी अल्लाहने त्याला मनाई केली तरी तो सदेव असेच पाहील  की मला कोणत्या कामात धन-प्राप्ती होईल, मला सन्मान व प्रसिद्धी कोणत्या कामात मिळेल, मला आमोद-प्रमोद व आनंद कोणत्या  कामात मिळेल; मला आराम व ऐश्वर्य कोणत्या कामात प्राप्त होईल. बस्स, या गोष्टी ज्या कामात असतील त्यांचाच तो अवलंब  करील. या गोष्टी ज्या कामात नसतील त्या तो कदापि करणार नाही, मग त्याची आज्ञा अल्लाहने का दिलेली असेना. तर मग याचा  अर्थ असा की अशा माणसाचा ईश्वर महान अल्लाह नसून त्याचा ईश्वर त्याचे मन आहे. त्याला सबुद्धी कशी मिळू शकेल? हीच  गोष्ट पवित्र कुरआनमध्ये अन्य

ठिकाणी अशाप्रकारे सांगितली आहे.
"हे पैगंबर! तुम्ही त्या मनुष्याच्या स्थितीवर विचार तरी केला काय की ज्याने आपल्या मनाच्या इच्छेला आपला ईश्वर बनविले  आहे? काय तुम्ही अशा माणसावर नजर ठेऊ शकता? काय तुम्हाला असे वाटते की या लोकांपैकी बरेचजण ऐकतात व समजतात?  कदापि नाही, हे तर जनावराप्रमाणे आहेत. नव्हे तर त्यांच्यापेक्षाही हीन दर्जाचे आहेत.'
सूरतुल फुरकान : ४३,४४
मनाचे गुलाम जनावरापेक्षा अधिक वाईट असणे एक अशी गोष्ट आहे ज्यात कोणत्याही शंकेला स्थान नाही. कोणतेही जनावर  आपणास असे आढळणार नाही जे अल्लाहने ठरवून दिलेल्या सीमेला सोडून पुढे जात असेल. प्रत्येक प्राणी तीच दप्तु खातो जी  अल्लाहने त्याच्यासाठी ठरवून दिलेली आहे. तितकीच खातो. जितक्या प्रमाणात ठरवून दिलेली आहे आणि जितके काम ज्या  प्राण्यासाठी ठरविले आहे तितकेच तो करतो. परंतु मनुष्य एक असा प्राणी आहे की जेव्हा हा आपल्या इच्छेचा गुलाम बनतो तेव्हां  तो असली-असली कृत्ये करतो की सैतानाला सुद्धा लाज वाटावी.

(२) वाड- वडिलांचे अंधानुकरण

हा तर मार्गभ्रष्टता येण्याचा पहिला रस्ता आहे. दुसरा मार्ग असा आहे की वाड-वडिलांपासून ज्या चालीरीती, ज्या श्रद्धा व विचार, ज्या  प्रकारचे वागणे चालत आलेले आहेत त्यांचा मनुष्य गुलाम बनतो आणि अल्लाहच्या आज्ञेपेक्षा त्यांना श्रेष्ठ समजू लागतो आणि त्या  उलट जर अल्लाहची आज्ञा त्याच्यासमोर प्रस्तुत केली गेली तर सांगतो की मी तर तेच करीन जे माझे वाड-वडील करीत असत  आणि जी माझ्या घराण्याची व टोळीची पद्धत आहे. जो मनुष्य असल्या रोगाने पछाडलेला आहे तो बरे अल्लाहचा दास कसा बनू  शकेल? त्याचे ईश्वर तर त्याचे वाड-वडील व त्याच्या घराण्याचे व टोळीचे लोक आहेत. त्याला हा खोटा दावा करण्याचा कोणता  अधिकार आहे की मी मुसलमान आहे? पवित्र कुरआनमध्ये सुद्धा यावर कठोरपणे खबरदार केले आहे.

.
"आणि जेव्हा जेव्हां त्यांना सांगितले गेले की जी आज्ञा अल्लाहने पाठविली आहे तिचे अनुसरण करा. तेव्हा त्यांनी हेच सांगितले की  आम्ही तर त्या गोष्टीचे अनसरण करू जी आम्हाला बाड-वडिलांकडून मिळाली आहे. जर त्यांच्या वाड-वडिलांना एखादी गोष्ट कळाली  नसेल आणि ते सरळ मार्गावर नसतील तरी सुद्धा हे त्यांचेच अनुकरण करीत राहतील काय?
- सूरतुल बकराह : १७०
दुसऱ्या ठिकाणी सांगितले आहे -
"आणि जेव्हां त्यांना सांगितले गेले की या फर्मानाकडे या जो अल्लाहने पाठविला आहे आणि या पैगंबर (स.) यांच्या पद्धतीकडे या.  तेव्हां त्यांनी सांगितले की आमच्यासाठी तर केवळ तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना पाहिले आहे. काय  हे वाडवडिलांचेच अनुकरण करीत राहतील. मग त्यांना कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नसो आणि ते सरळ मार्गावर नसोत? हे  ईमानधारकांनो! तुम्हाला तरी स्वतःची काळजी असली पाहिजे. जर तुम्ही सरळ मार्गाला लागाल तर दुसऱ्या कुणाच्या मार्गभ्रष्टतेने  तुम्हाला नुकसान पोहचणार नाही, शेवटी तर सर्वाना अल्लाहकडे परत जावयाचे आहे. त्यावेळी अल्लाह तुम्हाला तुमच्या चांगल्या व  वाईट कृत्याविषयी सर्व काही सांगेल."
सूरतुल माइदाह : १०४,१०५
ही अशी पथभ्रष्टता आहे ज्यात जवळजवळ प्रत्येक काळातील अज्ञानी लोक गुरफटलेले आहेत आणि नेहमी अल्लाहच्या पैगंबरांचे  मार्गदर्शन स्वीकारण्यापासून हीच गोष्ट माणसाला रोखत असते. हजरत मूसा (अले.) यांनी जेव्हां लोकांना अल्लाहच्या शरीअतकडे  (कायद्याकडे, मार्गाकडे) बोलाविले होते तेव्हां देखील लोकांनी असेच म्हटले होते,"काय तू आम्हाला त्या मार्गापासून हटवू इच्छितोस  ज्यावर आम्ही आपल्या वाड-वडिलांना चालत असताना पाहिले आहे?"
-सूरह यूनुस : ७८
हजरत इब्राहीम (अलै.) यांनी जेव्हा आपल्या टोळीवाल्यांना

अनेकेश्वरवादापासून रोखले तेव्हा त्यांनी सुद्धा असेच सांगितले होते -
"आम्ही आपल्या वाड-वडिलांना याच ईश्वरांची उपासना करताना पाहिले आहे."
-सूरतुल अंधिया : ५३
थोडक्यात असे की अशाचप्रकारे प्रत्येक पैगंबरासमोर लोकांनी हाच मुद्दा सांगितला की तुम्ही जे म्हणता ते आमच्या वाड-वडिलांच्या  पद्धतीविरुद्ध आहे म्हणून ते आम्ही मान्य करीत नाही. पवित्र कुरआनमध्ये म्हटले आहे -
"म्हणजे असेच होत राहिले आहे की जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या वस्तीत भीती दाखविणारा म्हणजे पैगंबराला पाठविले तेव्हां तेव्हा  त्या वस्तीच्या सुखवस्तु लोकांनी असेच सांगितले की आम्ही आपल्या वाड-वडिलांना एका पद्धतीचा अवलंब करताना पाहिले आहे  आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत. पैगंबरांनी त्यांना सांगितले की, जर मी याच्यापेक्षा चांगली गोष्ट  तुम्हाला सांगितली की ज्यावर तुमचे वाड-वडील चालत असता तुम्ही पाहिले आहे तर काय असे असून देखील तुम्ही तुमच्या वाड- वडिलांचे अनुकरण करीत रहाल? त्यांनी उत्तर दिले की, आम्ही ती गोष्ट मान्य करीत नाही जी तुम्ही घेऊन आला आहात. मग  जेव्हा त्यांनी असे उत्तर दिले तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना खूप शिक्षा दिली आणि आता पहा की आमचे आदेश खोटे ठरविणाऱ्यांचा कसा शेवट झाला आहे."
-सूरतुज्जुखरुफ़ : २३-२५
हे सर्व काही सांगितल्यावर महान अल्लाह फर्मावितो की एक तर वाडवडिलांचेच अनुकरण करा अथवा आमच्या आदेशांचे पालन  करा. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत. मुसलमान बनू इच्छिता तर सर्व काही सोडून केवळ तीच गोष्ट मान्य करा  जी आम्ही सांगितली आहे -
"म्हणजे जेव्हां त्यांना सांगितले गेले की त्या आज्ञेचे पालन करा जी अल्लाहने पाठविली आहे. तेव्हां ते म्हणाले की, नाही. जरी  शैतान आम्हाला नरकाच्या प्रकोपाकडे बोलावीत असला तरी सुद्धा आम्ही ती गोष्ट अवलंबू जिघा अवलंय आम्ही आमच्या वाड- वडिलांना करताना पाहिले आहे. जो कोणी स्वतःला पूर्णपणे अल्लाहच्या सुपुर्द करील आणि


सत्कर्म करणारा असेल त्याने तर दोरी मजबूत धरली आणि शेवटी सर्व बाबी अल्लाहच्या हातात आहेत आणि जो कोणी याचा इन्कार करील तर हे नबी, तुम्हाला त्याच्या इन्काराने दु:खी होण्याची गरज नाही. ते सर्व आमच्या कडे परत येणार आहेत. मग आम्ही त्यांन्या त्यांच्या कृत्यांचा परिणाम दाखवून देऊ."    - सूरह लुक़मान : २१-२३

(३) अल्लाहशिवाय इतरांच्या आज्ञेचे पालन

हा पथभ्रष्टता येण्याचा दुसरा मार्ग होता. तिसरा मार्ग पवित्र करआनने असा सांगितला आहे की मनुष्य जेव्हां अल्लाहची आज्ञा सोडून  दुसऱ्या लोकांची आज्ञा पाळू लागतो आणि असा विचार करतो की अमुक मोठा मनुष्य आहे अथवा अमुक माणसाच्या हातात माझी  रोजी आहे म्हणून त्याचे म्हणणे ऐकले पाहिजे. अमुक मनुष्य मोठा पदाधिकारी आहे म्हणून त्याची आज्ञा पाळली पाहिजे. अमुक महाशय आपल्या शापाने मला नष्ट करतील किंवा आपल्या बरोबर स्वर्गात घेऊन जातील म्हणून ते जे सांगतील तेच खरे आहे. अमुक  जात फार प्रगती करीत आहे. तिच्या पद्धती अवलंबिल्या पाहिजेत. तर असंल्या माणसासाठी सद्बुद्धी प्राप्त होण्याचा मार्ग बंद पडतो.

"जर तू पृथ्वीवर राहणाऱ्या त्या लोकांच्या आज्ञेचे पालन केले तर ते तुला अल्लाहच्या मार्गावरून पथभ्रष्ट करतील."
-सूरतुल अनआम : ११६

म्हणजे मनुष्य सरळ मार्गावर तेव्हां असू शकतो जेव्हां त्यांचा ईश्वर एक असेल, ज्याने शेकडो हजारो ईश्वर स्वीकारले असतील आणि  जो कधी या ईश्वराच्या म्हणण्यानुसार तर कधी त्या ईश्वराच्या म्हणण्यानुसार चालत असेल तर त्याला कसा मार्ग मिळू शकेल?

आता आपणास कळले असेल की पथभ्रष्टतेची प्रमुख कारणे तीन आहत १) मनाची गुलामी, २) वाड-वडील, घराणे आणि टोळीच्या  प्रथांची गुलामी, ३) सामान्यपणे जगातील त्या लोकांची गुलामी ज्यात श्रीमंत लोक, तत्कालीन शासक आणि भोंदू धर्मगुरु व पथभ्रष्ट जाती सर्व यात सामील आहेत.

या तीन मोठ्या मूर्त्या आहेत ज्या ईश्वराच्या दावेदार बनल्या आहेत. जो मनुष्य मुसलमान बनू इच्छितो त्याला सर्वप्रथम या तिन्ही  मूर्त्या फोडल्या पाहिजेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने तो मुसलमान बनेल, ज्याने या तिन्ही मूर्त्या आपल्या हृदयात बसविल्या असतील  तो ईश्वराचा दास बनणे कठीण आहे. तो दिवसात पन्नास वेळा नमाज पढून व दाखविण्यासाठी उपवास ठेऊन आणि मुसलमानाप्रमाणे चेहरा बनवून लोकांना फसवू शकतो. स्वतः आपल्या मनाला सुद्धा फसवू शकतो की मी पक्का मुसलमान आहे. परंतु तो अल्लाहला फसवू शकत नाही.

अल्लाहने आपणास आज्ञा दिली होती की तुमच्या वारसाहक्कात सर्व मुलगे व मुली सामील आहेत. आपण याचे उत्तर काय देता? असे की आमच्या वाड वडिलांच्या कायद्यात मुलगे व  मुली सामील नाहीत. त्याशिवाय असे की आम्ही अल्लाहच्या कायद्याऐवजी वाड-वडिलांचा कायदा मानतो. कृपा करून मला सांगा की काय इस्लाम याचेच नाव आहे? आपणास सांगितले  जाते की हा घराण्याचा कायदा मोडा. आपल्यापैकी प्रत्येकजण म्हणतो की जेव्हां सर्वजण मोडतील तेव्हा मी सुद्धा मोडीन. जर दुसऱ्यांनी मुलीला संपत्तीतील हिस्सा दिला नाही आणि मी  दिला तर माझ्या घराची संपत्ती दुसऱ्याजवळ जाईल. परंतु दुसऱ्याच्या घराची माझ्या घरी येणार नाही. विचार करा की या उत्तराचा अर्थ काय आहे? काय अल्लाहच्या कायद्याची  अंमलबजावणी या अटीवरच केली जाईल की दुसऱ्याने केली तर आपण सुद्धा कराल? उद्या आपण म्हणाल की दुसऱ्यांनी व्यभिचार केला तर मी सुद्धा करीन. दुसरे चोरी करतील तर मी  सुद्धा करीन. म्हणजे दुसरे लोक जोपर्यंत सर्व अपराध सोडून देत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा सर्व अपराध करीत राहीन. गोष्ट अशी आहे की या बाबतीत तिन्ही मूर्त्यांचे पूजन होत आहे.  मनाची, वाडवडिलांची व अनेकेश्वरवाद्यांची सुद्धा गुलामी केली जात आहे आणि या तिन्ही प्रकारच्या गुलामींबरोबरच इस्लामचा सुद्धा दावा करता.
ही केवळ दोन उदाहरणे आहेत, नाहीतर डोळे उघडून पाहिले तर अशा प्रकारचे अनेक रोग आपल्या लोकांत पसरलेले आढळतील. आणि या सर्वात आपण हेच पहाल की कुठे एका मूर्तीचे   पूजन होत आहे, कुठे दोन मूर्त्यांचे तर कुठे तिन्ही मूर्त्यांचे. जर या मूर्त्यांचे पूजन होत असेल आणि त्यांच्याबरोबर इस्लामचा दावा सुद्धा आपण करीत असाल तर आपण कशी आशा  बाळगू शकता की आपल्यावर अल्लाहकडून त्या कृपेचा वर्षाव होईल जिचा वायदा खऱ्या मुसलमानाबरोबर केला गेला आहे?

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget