अरब समाजाची तर ही परिस्थिती होतीच, शिवाय अरब
देशाव्यतिरिक्त जगाच्या पाठीवरील इतर देशांची परिस्थितीसुद्धा कमी-अधिक
प्रमाणात अशीच दयनीय होती. मानवता शांती, समाधान आणि संरक्षणासाठी विषम
परिस्थितीत सर्वत्र ठेचाळत भटकत होती. तिला कुठेही थारा मिळत नव्हता. अगदी
रोम आणि पर्शियासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणार्या साम्राज्यांतसुद्धा
मानवता रक्तबंबाळ होती. मानवाधिकारांची पायमल्ली करणे हा शब्द तर खूपच
कमी, अगदी शेकडो माणसांना भुकेल्या वाघ, लांडग्यसारख्या हिंस्र पशुंसमोर
फेकून देऊन मानवसंहाराचा खेळ पाहण्याची मौजमजा राजे-रजवाडे पाहण्यात दंग
असत. असा प्रकार या सुसस्कृत देशात घडत असे.
अशा अमानवी परिस्थितीत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी
ईश्वराच्या आदेशाने कंबर कसली. सत्य आणि न्याय स्थापनेचे हे जागतिक
पातळीवरील आव्हान मोठ्या संयम आणि शौर्याने स्वीकारले आणि समाजसुधारणेचा
पाया प्रथम आपल्याच समाजात रोवून एक आदर्श समाज घडविला.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.)
यांना प्रेषितत्व प्राप्त झाले, तेव्हा त्यांनी या अमानवी आणि रूढीवादी
परिस्थितीचे आव्हान स्वीकारले आणि एका नवीन दृष्टिकोनाचे हत्यार उपसले. हा
दृष्टिकोन कुरआनाच्या शब्दांत अशा प्रकारे सादर करण्यात आला,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की तुम्ही त्या
आज्ञांचे अनुसरण करा ज्या अल्लाहने अवतरल्या आहेत तेव्हा ते म्हणतात की
‘‘आम्ही त्याच गोष्टींचे अनुसरण करू ज्याचे अनुसरण आमचे वाडवडील करीत
होते.‘‘ त्यांना काहीही कळत नसताना व ते सन्मार्गावर नसतानादेखील त्यांचेच
अनुसरण करणार का? इन्कार करणार्या लोकांची अवस्था अशी आहे जणू गुराखी
जनावरांना हांक देतो आणि जनावरे ओरड व हांकेखेरीज अन्य काहीच ऐकत नाहीत.
ते बहिरे, मुके आणि आंधळे आहेत त्यामुळे त्यांना काहीही कळत नाही.‘‘ (कुरआन: २ - १७०)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असत्याविरुद्ध आणि
रूढीवादाविरुद्ध प्रत्यक्ष आवाज उठवला? एका न्यायहीन, अमानवी, शोषणवादी,
जीर्ण-शीर्ण, विषमता असलेल्या रुढीवादी समाजाचे स्वरुप बदलून जागतिक
क्रांतीच घडविली. सत्य, न्याय, बंधुत्व, समता, मानवता आणि आधुनिकतेची
स्थापना केली. हा निश्चितच एक चमत्कार असून त्यांच्या या चमत्काराचे अगदी
इस्लामविरोधकांनीसुद्धा तोंडभरून कौतुक केले. रात्रंदिवस दारुच्या झिंगेत
वावरणारा, समता, न्याय, बंधुत्वाचा लवलेशही नसलेला, तुरळक कारणांवरुन
माणसांचे मुडदे पाडणारा, मुलींना जीवंत गाडून फाजील अभिमान आणि
प्रतिष्ठेचे रक्षण करणारा, लूटमार करणारा आणि सावत्र आईस बापाची जागीर
समजून शय्येवर ओढणारा हा समाज, व्याजासारख्या भांडवलशाहीच्या भावनेने
मस्तीला येऊन आर्थिक शोषण करणारा हा समाज, गुलाम आणि दासींची खरेदी-विक्री
करणारा आणि प्राण्यांपेक्षाही तुच्छ वागणूक देणारा हा समाज, प्रेषित
मुहम्मद (स.) यांनी सादर केलेल्या शिकवणुकीचा स्वीकार करतो, सदाचार आणि
सत्यप्रियतेच्या शाश्वत मानवी मूल्यांना उराशी कवटाळतो, महिलांचे
वस्त्रहरण करणारा हा समाज महिलांना प्रतिष्ठेच्या सिंहासनावर बसवितो,
मुलींच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा करतो, हा चमत्कार जागतिक इतिहासाच्या
क्षितिजावर आजपर्यंत प्रखर सूर्याप्रमाणे तळपताना दिसत आहे.
कबीला बंदी
जो समाज विविध कबिल्यांमध्ये विखुरलेला होता आणि
कबिलावादाच्या वैरभावाने फणफणत होता, एक-दुसर्याच्या जिवावर बेतलेला होता,
एका कबिल्याच्या तलवारी इतर कबिल्याच्या लोकांच्या रक्तसाठी आसुसलेल्या
होत्या, अशा असभ्य लोकांमध्ये स्नेह, प्रेम, ममत्व, समता आणि बंधुभाव
निर्माण केला. समस्त वैरभाव आणि उच्च-नीचतेच्या भावनांना कायमची मूठमाती
दिली. दुभंगलेली मने आणि फाटलेल्या हृदयांना जोडले. विखुरलेल्या समाजास
जोडून जातीभेद आणि वर्णभेद नष्ट केला. एकास काटा रुतला तर दुसर्याच्या
काळजास वेदना होऊ लागल्या. दुभंगलेल्या आणि विखुरलेल्या मानवतेने एका
शरीराचे रूप धारण केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेल्या कामगिरीचे
उदाहरण अवघ्या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. समाजातील आर्थिक,
वांशिक आणि वर्णावर आधारित विषमता नष्ट करण्याचे समाजसुधारकांनी
प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारतामध्ये गांधीजींनी दलित बांधवांना
उच्चवर्णीयांबरोबर समान अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी असाधारण
प्रयत्न केलेत, कनिष्ठ समजल्या जाणार्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. १९५५
साली स्पृश्यास्पृश्यतेविरुद्ध कायदासुद्धा करण्यात आला, मात्र जातीय
विषमतेचे वातावरण आजही भारतामध्ये मानवतेस होरपळून काढणारे बाकी आहेच, हे
विशेष!
समता
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजातील विषमता नष्ट केली.
संपत्तीचा भक्त, भौतिकवाद व चंगळवादासमोर मान तुकविणार्या ज्या समाजात
संपत्तीच्या आणि शक्ती व सामर्थ्याच्या आधारावर माणसाची किंमत ओळखण्यात
येत असे आणि श्रीमंत व सामर्थ्यवान म्हणजे प्रतिष्ठित, उच्च व सन्मानित
तसेच दीन-दुबळा, गरीब आणि दरिद्री म्हणजे नीच, कनिष्ठ समजण्यात येत असे.
अशा ठिकाणी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजाच्या मानसिकतेमध्ये आणि अगदी
आत्म्यामध्ये अशी विचारसरणी निर्माण केली की माणूस हा साधन-संपत्ती, शक्ती
व सामर्थ्यामुळे मोठा होत नसून सदाचार, उच्च नैतिकता आणि ईशपरायणतेमुळेच
मोठा होतो. अर्थातच ईशपरायणता म्हणजे अंतरात्म्यातील अशा स्वरुपाच्या
अनुभूतीचे नाव आहे, जिच्या आधारावर माणूस प्रत्येक कार्य ईश्वराच्या
आदेशानुसार पार पाडण्याची अत्याधिक श्रद्धा आणि ईश्वरी आदेशांविरुद्ध
असलेल्या कार्याप्रति अत्याधिक घृणा करतो. कुरआनात ही बाब अशा शब्दांत
मांडलेली आहे,
‘‘आणि जे लोक न दिसणार्या आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात, त्याच्याकरिता उत्तम बक्षीस आणि मोबदला आहे.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-मुल्क – ६७ : १२)
ईश्वर हाच सर्वशक्तीशाली आणि महान असल्याचा निश्चितपणे
स्वीकार करण्यात आला आणि सर्वांत जास्त त्याचेच भय मन-मस्तिष्कात असेल तर
माणसाचे मोठेपण हे संपत्ती, वर्ण व वंशाच्या आधारे नव्हे तर उच्च नैतिकता
आणि सदाचाराच्या आधारावर ठरविण्यात येईल. यावरून निश्चितच समाजाचे विषम
स्वरुप समानतेमध्ये परिवर्तीत होईल. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी
कुरआनाच्या याच आदर्श विचारसरणीच्या आधारावर समाजात समता, न्याय व बंधुभाव
निर्माण केला. समाजशास्त्रज्ञ ‘अॅलेक्स इंकलस‘ याने स्पष्टपणे म्हटले आहे
की मानवाच्या महानतेमध्ये विश्वास आणि न्यायाची वाटणी आधुनिकता हे प्रमुख
अंग होय.
अशा प्रकारे इस्लामने एक आधुनिक दृष्टिकोन सादर केला
आणि केवळ सादरच केला नसून त्यास व्यावहारिक स्वरुपदेखील प्रदान करण्याची
किमया घडवून आणली.
दारुबंदी
जगातील समस्त दुराचारांची जननी असलेली ही दारू
अरबवासीयांच्या जीवनाचा कसा अविभाज्य घटक होता, याचा वरील प्रकरणात आपण
उहापोह केलेलाच आहे. दारूच्या विरहात एक क्षणही सहन न करणार्या या
समाजासमोर जेव्हा कुरआनाची ही शिकवण अवतरित झाली की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ही दारू, जुगार, वेदी व शकुन ही
सर्व अमंगल सैतानी कामे होत, त्यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की
तुम्हाला यश मिळेल.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-अलमाईदा - ८९)
माननीय अनस (रजी.) यांचे कथन आहे की,
‘‘मी एकदा अबू उबैदा, उबई इब्ने कअब आणि अबू तलहा
वगैरेंना दारू पाजीत होतो. एवढ्यात अचानक एका व्यक्तीने येऊन इस्लाममध्ये
दारू निषिद्ध झाल्याची सूचना दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामचा
हा आदेश पाठविताच त्या मैफलीत बसलेल्या सर्वांनीच दारू भरलेले माठ फोडून
टाकले. ही अवस्था केवळ अबू तलहा यांच्याच घराची नसून समस्त मदीना शहरातील
लोकांनी आपापल्या हातांनी दारूचे माठ फोडून टाकले. पूर्ण शहरातील
रस्त्यांवर लोकांनी फेकलेल्या दारूमुळे नद्या वाहत होत्या.‘ (संदर्भ : बुखारी - वचनसंग्रह)
जीवापाड प्रिय असलेली दारू इस्लामच्या केवळ एकाच
इशार्यावर लोकांनी ठोकारून लावली. विशेष म्हणजे कोणतीही पोलिसयंत्रणा व
कोणताही दारूबंदीचा अधिकारी नसताना हे अद्भूत कार्य घडले.
जुगार, व्याजखोरी आणि इतर दुष्कर्म
त्याचप्रमाणे जुगार, व्याजखोरी, व्यभिचार,
स्त्रियांवरील अत्याचार, कन्या-हत्या, गुलामांवर अत्याचार आणि यासारख्या
अनेक दुष्कर्मांवर कायमचा आळा बसला. व्याजखोरीवर कायमचा आळा बसवून
मानवजातीस महाजनी वा भांडवलदारी व्यवस्थेच्या विळख्यातून कायमची मुक्ती
मिळाली.
गुलामीची अमानवी प्रथा
गुलामीची अमानुष प्रथासुद्धा नष्ट करण्यात आली.
गुलामांचे व दासींचे स्वातंत्र्य आणि त्यांच्याशी उत्तम व्यवहार हा
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आंदोलनाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू होता.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट शब्दांत शिकवण दिली की,
‘‘जे लोक तुमच्या स्वाधीन आहेत (अर्थात गुलाम व दासी)
त्यांनादेखील तेच खाऊ घाला, जे तुम्ही स्वतः खाता आणि वापरण्यासाठीही तेच
वस्त्र द्या, जे तुम्ही स्वतः वापरता. त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा
जास्त काम देऊ नका. त्यांच्यावर कामाचे जास्त ओझे झाल्यास तुम्ही स्वतः
त्यांची मदत करा.‘‘ (संदर्भ : बुखारी - भाग २ वचनसंग्रह)
प्रेषित मुहम्मद (स.) यांची ही सूचना मिळताच त्यांच्या
तात्कालीन अनुयायांनी आपापल्या गुलामांशी असा सद्व्यवहार केला की गुलाम
कोण आणि स्वामी कोण, हे ओळखणे अशक्य होऊन बसले. लोक आपल्या कमाईतून
गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करू लागले. अशा प्रकारे गुलामीची प्रथा नष्ट
करण्यात आली.
वस्तुतः हा सगळा चमत्कार प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या
व्यक्तीमत्त्वाच्या असाधारण प्रभावाचा होता. गुलामांना पायाखाली
ठेवणार्यांनी गुलामांना उराशी कवटाळले, सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम व
सहानुभूती देऊ लागले. त्यांचा मान-सन्मान वाढला. वर्ण आणि वंशवादाला
मूठमाती मिळाली. काळा-गोरा भेद नष्ट पावला. जो अरब समाज कृष्णवर्णीयांना
तुच्छ लेखत होता आणि गुलामांना जनावरांपेक्षाही खालच्या पातळीची वागणूक
देत होता, तोच अरब समाज आता मात्र कृष्णवर्णीय असलेले गुलाम माननीय बिलाल
(रजी.) यांना प्रतिष्ठा व सन्मानाच्या दृष्टीने पाहण्यात धन्यता समजू
लागला. त्यांना इस्लामी समाजात इतका मान व सन्मान मिळाला की मस्जिदे
नबवीमध्ये आणि काबागृहावर त्यांनी अजान दिली. हा सन्मान इस्लाममध्ये इतर
कोणालाही हेवा वाटावा असाच आहे.
आर्थिक परिवर्तन
दारु, जुगार, सट्टा, व्याजखोरी, व्यभिचार व गुलामीची
तसेच कन्या-हत्यांची प्रथा नष्ट झाली. व्याजखोरी महाजनी व्यवस्थेच्या
आर्थिक शोषणास बळी पडलेल्या सामान्य जनतेला मुक्ती मिळाली. व्याजावर
आधारित कर्जाच्या ठिकाणी व्याजरहित कर्जाची आणि अनाथ, गोरगरीब, विधवा,
वृद्ध, आजारी, वाटसरू, बेरोजगारांसाठी शासकीय अर्थसाह्याची व्यवस्था
करण्यात आली. कुरआनात म्हटले आहे की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकाच्या बहुतेक
धर्मपंडित व साधु सन्यासी लोकांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल
लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक
शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जो सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते
अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत. एक दिवस येईल की याच सोने व चांदीवर
नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजु आणि
पाठींना डागले जाईल. हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठविला होता,
घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद.‘‘ (संदर्भ : कुरआन, ९:३४,३५)
अशाप्रकारे इस्लामने भांडवलशाही विचारसरणीच्या ठिकाणी
एका समाजहितवादी विचारसरणीची स्थापना केली. आणि ‘सामाजिक न्याय व बंधुत्व‘
सारख्या मानवी मूल्यांची जोपासना होऊ लागली.
सामाजिक परिवर्तन
सामाजिक स्तरावर असमानतेच्या ठिकाणी समतेची स्थापना
झाली. वंशभेद, गरिबी-श्रीमंतीतला भेद, वर्णभेद व आपला नि परक्यातील भेद
नष्ट झाला. कारण इस्लामने अशी शिकवण दिली की, माणसाची प्रतिष्ठा आणि
मोठेपणा हे वर्ण, वंश, संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर नसून ईश्वरी
आदेशांवर आचरण करण्याच्या आधारावर आहे.
सांस्कृतिक परिवर्तन
मद्यपान, जुगार, व्यभिचार, लूटमार, चोर्या-मार्या,
बलात्कार, गुलामीची प्रथा, भेदभाव आणि यासारख्या अनैतिक आचरण पद्धती नष्ट
झाल्या आणि एका आदर्श संस्कृतीवर आधारित आदर्श समाजाची स्थापना झाली.
स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार बंद झाले, स्त्री-पुरुषांतील अश्लीलतेने
शीलतेचे स्वरुप धारण केले, व्यभिचार, नग्नता व लैंगिक शोषणाविषयी समाजात
घृणा निर्माण झाली. व्यभिचार आणि बलात्कारासाठी कडक शिक्षा लागू करण्यात
आली. स्त्रियांना संपत्तीमध्ये वारसा अधिकार देण्यात आला. भ्रूणहत्या आणि
मुलींना जिवंत गाडण्याची प्रथा बंद करण्यात आली. तिच्या सर्वोपरी
रक्षणास्तव लोक प्राणांची बाजी लावू लागले.
या ठिकाणी ही बाब मुळीच विसरता कामा नये की, आजही
राजस्थान, तामिळनाडू आणि अन्य भागांत नवजात मुलींची हत्या करण्याची प्रथा
सुरु आहे. शासनाने याकरिता कायदा करूनही ही प्रथा बंद झालेली नाही.
सतीच्या अमानुष प्रथेविरुद्ध एकोणिसाव्या शतकात राजाराम मोहन रॉय यांनी
आंदोलन केले आणि तात्कालीन ब्रिटीश शासनाने सती प्रथेविरुद्ध कायदासुद्धा
केला. मात्र १९८७ साली राजस्थानात ‘देवराला‘ या ठिकाणी धूमधडाक्यात सतीची
प्रथा आयोजित करण्यात आली. रुपकुंवर नावाच्या विधवेने सतीच्या नावावर
आत्मदहन वा आत्महत्या केली.
यापूर्वीदेखील सतीच्या असंख्य घटना घडल्या आणि मानवतेची
सर्रास राखरांगोळी झाली. अन्याय आणि अत्याचाराच्या भयानक आगीत मानवता सती
गेली, तिच्या अवार्त टाहोने आजही भारतासारख्या आधुनिक देशाच्या
संस्कृतीचे कान फाटत आहेत. देशातील समाजसुधारकांचे समस्त प्रयत्न निष्फळ
ठरले, कायदा हतबल ठरला. मात्र ही बाब निश्चितच लक्षणीय आहे की, प्रेषित
मुहम्मद (स.) यांनी स्त्री-अत्याचारांचा समूळ नायनाट करण्याचा इतिहास
घडविला.
राजनैतिक न्यायाची स्थापना
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घडविलेल्या क्रांतीने
कबिल्यांवर अधिनायकत्वाच्या ठिकाणी परामर्शदायी सभेची स्थापना केली.
परंपरागत पेशवाई नष्ट होऊन रयतेच्या मतदानावर आधारित राज्याची स्थापना
झाली. सामान्यजनांना राजकीय घडामोडींमध्ये भाग घेण्याची संधी प्रदान
करण्यात आली. शासक हा जनतेसमोर उत्तरदायी ठरविण्यात आला आणि हेदेखील
निश्चित करण्यात आले की शासकास सामान्य रयतेच्या जीवनस्तरापेक्षा उच्च
स्तरावर जगणे निषिद्ध ठरविण्यात आले. इस्लामने अशा प्रकारचे सत्यनिष्ठ
शासन स्थापन करून दाखविले.
अशा प्रकारे एकीकडे समस्त जनतेच्या मानसिकता, स्वभाव
आणि विचारसरणीत सुधारणा घडविण्यात आली, व्यक्तीगत आचरणाच्या सर्व पद्धतींत
परिवर्तन घडविण्यात आले, तर दुसरीकडे मात्र अमानवी असलेले सामाजिक स्वरुप
हे मानवताप्रिय स्वरुपात परावर्तीत करण्यात आले. हे अत्यंत मौलिक
स्वरुपाचे परिवर्तन व्यक्तीगत स्तरावरच नव्हे तर सामूहिक स्तरावरसुद्धा
झाले आणि ईश्वराच्या प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हे महान कार्य
प्रेषितत्वांच्या अवघ्या तेवीस वर्षांतच पार पाडले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा विलक्षण कमाल
या समस्त मौलिक परिवर्तनामागे जी आश्चर्यकारक आणि
चमत्कारिक बाब आहे, ती बाब अशी की, या ऐतिहासिक परिवर्तनामागे केवळ २३
वर्षांत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेले कार्य होय. हा बदल एका अशा
समाजात घडवून आणला, जो समाज अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता. त्या
ठिकाणी छापखाने नव्हते, वृत्तपत्रे, दैनिके, साप्ताहिके, मासिके नव्हती,
टी.व्ही. आणि इंटरनेटसारखी गतिमान प्रसारमाध्यमे नव्हती. टेलिफोन,
मोबाईलसेवा नव्हती, रेल्वे, मोटारगाड्या, विमानसेवा नव्हती, अत्याधुनिक
शिक्षण संस्था नव्हत्या, ज्ञान व संशोधनाची व्यवस्था नव्हती,
ए.टी.एम.सारख्या व्यवस्था नव्हत्या. एखादे संघटित शासनही नव्हते आणि लष्कर
व पोलिसयंत्रणा तसेच कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नव्हती. ‘हम करे सो
कायदा‘ आणि ‘बळी तो कानपिळी‘ सारख्या अवस्थेत वयाच्या चाळीसाव्या वर्षी
मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांनी अवघ्या २३ वर्षांच्या
अल्पावधीतच एवढी महान क्रांती घडवून आणण्याचा चमत्कार दाखविला.
धर्माचा कट्टर विरोधक असलेल्या कार्लमाक्र्सने ‘दास कॅपिटल‘ १८८७ मध्ये
लिहिले आणि रशियातील समाजवादी क्रांती १९१७ मध्ये अर्थात तीस वर्षानंतर
घडली. शिवाय ही क्रांती घडण्यापूर्वी रशियन जनतेत शिक्षण आणि विवेकशक्ती
होती, विचारसरणीच्या प्रसारासाठी आधुनिक प्रसारमाध्यमे उपलब्ध होती.
सर्वकाही असताना ही विचारसरणी शंभर टक्के जनतेने स्वीकारलेली इतिहासात
कोठेही दिसत नाही. शिवाय जी क्रांती घडली तिच्यातील मानवी हिंसा आणि संहार
जगजाहीर आहेच. मग आणखीन एक बाब लक्षणीय अशी की या विचारसरणीवर आधारित
क्रांती १९९४ साली अर्थात ७७ वर्षानंतर सोविएत संघाची शकले विखुरल्यावर
आपला उरला-सुरला प्रभावदेखील हरवून बसली.
‘न्यूज टाइम्स‘ च्या सप्टेंबर १९८८ च्या अंकामध्ये ‘आयगर अॅरिविक‘ यांनी लिहिले आहे की,
‘‘१९१७ साली रशियामध्ये क्रांती घडली आणि समाजाचे
स्वरुपसुद्धा बदलले, मात्र यामुळे राष्ट्राची मानसिकता बदलली नाही.
पूर्वीची भांडवलशाही मानसिकता तशीच राहिली. हीच मानसिकता अर्थात
भांडवलशाही विचारसरणी घेऊन रशियात समाजवादी स्वरुपाचा समाज तयार झाला.‘‘
सदरील लेखकानुसार आतून भांडवलशाहीची कीड लागलेली ही
समाजवादी समाजव्यवस्था रशियात उभी करण्यात आली. परिणामी समस्त जनतेच्या
शक्तीवर कम्युनिस्ट दलाची शक्ती प्रस्थापित झाली आणि या शक्तीवर केवळ
एकट्या व्यक्तीचा अर्थात स्टॅलीनचे प्रभुत्व स्थापन झाले. देशामध्ये खर्या
अर्थाने सामाजिक व्यवस्था निर्माण होऊच शकली नाही. जनतेचे वैयक्तीक
अधिकार समाजवादी नावाच्या एकाधिकारशाहीने गिळंकृत केले. मान्यवर लेखकाच्या
कथनानुसार जनतेस पदव्या आणि नोकर्या त्यांच्या क्षमता आणि पात्रतानुसार न
देता सामाजिक स्तराच्या आधारावर देण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच या
अन्यायाच्या परिणामस्वरुपी रशियामध्ये स्वतंत्र चिंतन आणि नवनिर्माणाच्या
आधारावर जोरदार आंदोलने सुरु झाली. समाजवादाच्या नावावर सुरु असलेल्या
एकाधिकारशाहीचे पितळ उघडे पाडण्यासाठी ही आंदोलने जोमाने कार्य करू लागली.
स्वतः रशियन विचारवंतानीच रशियात समाजवादी क्रांती खर्या अर्थाने आलीच
नसत्याच्या सत्यावरून पडदा उचलला आणि रशियात ख्रिस्ती धर्माने पाय पसरले.
मात्र येथील शोकांतिका संपता संपत नव्हती. मायकल हार्ट या अमेरिकी लेखकाने
लिहिले की,
‘‘येशू मसीह हे ख्रिस्ती धर्माच्या विशिष्ट नैतिक आणि
धार्मिक श्रद्धांचे कर्णधार असले तरी ख्रिस्ती धर्मज्ञानास सेंट पॉल यांनी
विशिष्ट प्रगती दिली. त्यांनीच नवीन करारनाम्याचे अधिकांश भाग लिहिले.‘‘
तात्पर्य एवढेच की, जगात मोठमोठे समाजसुधारक आलेत,
त्यांनी समाजसुधारणेचे कार्यदेखील केले. मात्र जगाच्या निर्मितीपासून
आजपर्यंत जेवढे समाजसुधारक येऊन गेले, त्यापैकी कोणताही असा समाजसुधारक
सापडणे अशक्य आहे, ज्याने अवघ्या वीस-बावीस वर्षांच्या अत्यल्प काळामध्ये
अरबच्या एका अशा अज्ञानी, अशिक्षित, मानवताविरोधी भावनांनी पेटलेल्या
समाजातील एकेक व्यक्तीच्या व्यक्तीगत स्वभावात समस्त समाजात पूर्णपणे
परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळविले असेल. हा ऐतिहासिक विश्वविक्रमी प्रयोग
म्हणजे केवळ एक चनत्काराच असू शकतो आणि असा चमत्कार प्रेषितांकडूनच आणि
विशेषतः प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडून घडू शकतो. मात्र आश्चर्याची बाब
अशी की, या सर्व शंभर महानतम व्यक्तीमध्ये मान्यवर लेखकांनी प्रथम
स्थानावर प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठेवले असून पहिला अध्याय त्यांच्यावर
आधारित लिहिला आहे, तो अशा प्रकारे,
‘‘जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तीमध्ये प्रेषित
मुहम्मद (स.) यांना प्रथम स्थानावर ठेवण्याच्या माझ्या या निर्णयामुळे
काही लोकांना आश्चर्य वाटले असेल आणि काहीजण विरोध करतील मात्र
इतिहासामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) हे एकच असे व्यक्तीमत्त्व होते जे
धार्मिक आणि व्यावहारिक या दोन्ही स्तरांवर पूर्णरुपाने यशस्वी ठरले.‘‘ (पृष्ठ : ३३)
मान्यवर लेखकांनीसुद्धा तेच लिहिले, जे मी वरील मजकुरात सांगितले आहे,
‘‘या पुस्तकात उल्लेखलेल्या अधिकांश व्यक्तीना ही
फायदेशीर संधी मिळाली होती की त्यांचा सभ्य व प्रगत संस्कृती असलेल्या
समाजात जन्म झाला, शिक्षण-प्रशिक्षण झाले आणि समाजसुधारणेसाठी आवश्यक
असलेली साधने त्यांना उपलब्ध होती. मात्र आदरणीय मुहम्मद (स.) यांना अशा
संधी प्राप्त नव्हत्या. ते दक्षिणी अरब प्रदेशामध्ये जन्मले. त्या काळी हा
प्रदेश जगाच्या पाठीवरील सर्वांत जास्त मासागलेला, पिछाडलेला, अज्ञानी,
अशिक्षित आणि मानवताविरोधी मानसिकतेने पिसाळलेला होता. व्यापार, कला,
ज्ञान-विज्ञान आणि संशोधनाचा लवलेशही नव्हता. धार्मिक आणि व्यावहारिक
प्रक्रियेचा हा विलक्षण संबंध होता. मला असे मनापासून वाटते की यामुळे
आदरणीय मुहम्मद (स.) यांना मानवेतिहासातील सर्वांत जास्त प्रभावशाली
व्यक्तीत्व असण्याचा अधिकार प्राप्त आहे.‘‘ (पृष्ठ - ४०)
या ठिकाणी मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय
विचारवंताच्या आत्म्याची हाक ऐकल्यावर आपल्यासमोर निश्चितच एक प्रश्न उभा
राहतो आणि तो म्हणजे असा की, हे कोणते आकर्षण होते, कोणती शक्ती होती,
कोणता सत्यवाद होता, आणि कोणता चमत्कार होता की ज्यामुळे इतक्या कठीण
संकटमय परिस्थिती आणि पावलो-पावली असह्य अडचणी असतानासुद्धा प्रेषित
मुहम्मद (स.) यांनी जीवनाच्या अत्यंत अल्पशा काळामध्ये एका नवीन समाज
निर्माण केला आणि हा समाज आदर्श नियमानुसार प्रत्यक्ष चालवूनही दाखविला.
एक आदर्श आचरणशैली, आदर्श संस्कृतीचा प्रत्यक्ष नमुना जगासमोर ठेवला. एक
न्यायसंमत जीवन आणि सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायावर आधारित समाजाचे
केवळ सिद्धान्तच स्पष्ट केले नसून अशा आदर्श समाजाची प्रत्यक्ष
स्थापनासुद्धा करून दाखविली.
मुस्लिम जगत आणि आदर्श आचरण
आता आपण या ठिकाणी या विषयावरसुद्धा थोडक्यात चर्चा करू
या की, आदरणीय मुहम्मद (स.) हे अंतिम प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर आता या
भूतलावर ईश्वरी वाणी अगर दैवी शिकवणी घेऊन कोणीही येणार नाही. शिवाय
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर जो ग्रंथ अवतरित झाला अर्थात कुरआन,
ग्रंथदेखील मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अंतिम ग्रंथ असल्याने
प्रेषितांनी केलेल्या समाजसुधारणेच्या महान कार्याची जवाबदारी त्यांच्या
अनुयायांवर अर्थात मुस्लिम जगतावर आहे. कुरआनात स्पष्टपणे ईश्वराचा हा
आदेश मुस्लिम जगतास संबोधून आहे,
‘‘आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात, ज्यास
मानवांच्या मार्गदर्शन व सुधारणेकरिता निवडण्यात आले आहे. तुम्ही
सदाचाराचा आदेश देता आणि दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर
श्रद्धा बाळगता.‘‘ (संदर्भ : कुरआन, आलिइम्रान - ११०)
कुरआनाच्या या संदर्भानुसार समाजसुधारणेचे जे कार्य
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केले, त्याची जवाबदारी आता मुस्लिम समुदायावर
टाकण्यात आली आहे. कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आदर्शाचे
(अर्थातच कुरआनाची प्रत्यक्षात अंमलबजावणीची कार्यशैली) मार्गदीप आज
मुस्लिमंच्या हाती आहे. याच मार्गदीपाच्या प्रखर असलेल्या सत्यप्रकाशाच्या
माध्यमाने मानवताविरोधी आणि असत्याच्या अंधारातून स्वतः जीवनाची वाटचाल
तर करायचीच आहे, मात्र इतरांना असत्य, अज्ञान आणि अन्यायाच्या अंधारात
खितपत पडायला सोडून देणे हा अक्षम्य अपराध आहे. ईश्वराने हा जो मार्गदीप
प्रदान केला आहे, तो समस्त मानवजातीस मार्गदर्शन करण्यासाठी दिला आहे.
स्वतः पोटभर खाऊन शेजार्यास उपाशी ठेवणेदेखील ईश्वरास पसंत नहा. मग
जीवनाच्या सर्वांत जास्त महत्त्वाच्या विषयी ही बाब ईश्वरास मुळीच पसंत
नाही की स्वतः मार्गदीपाच्या प्रकाशात चालावे आणि इतरांना मात्र अंधारात
चाचपडत सोडून द्यावे. खरे पाहता मुस्लिमांच्या जन्माचा उद्देशच
समाजसुधारणेचे हे महान कर्तव्य पार पाडण्यासाठी झालेला आहे.
ही गोष्ट प्रत्येक मुस्लिम आणि मुस्लिमेतर जनतेने नीट
लक्षात घ्यावयास हवी की, केवळ मुस्लिमाच्या घरी जन्म घेतल्यामुळे अथवा
मुस्लिमासारखे नाव ठेवल्याने कोणी पूर्णपणे मुस्लिम होत नसतो. कारण
मुस्लिम हा केवळ जन्मानुसार नव्हे तर कर्मानुसार होतो. कारण जात-पात आणि
वंश व वर्णाचा इस्लामशी फक्त परिचय करून देण्याइतकाच संबंध आहे. ही बाब
कुरआनात अशा शब्दांत मांडण्यात आलेली आहे,
‘‘हे बदावी (ग्रामीण अरबी) समजतात की, ‘‘आम्ही श्रद्धा
ठेवली (अर्थात पूर्णपणे मुस्लिम झालो.) (मात्र) त्यांना सांगा की तुम्ही
श्रद्धा ठेवली नाही, तर असे म्हणा की, आम्ही समर्पित झालो. (खर्या
अर्थाने) श्रद्धा अद्यापही तुमच्या हृदयात दाखल झालेली नाही. जर तुम्ही
अल्लाह आणि त्याचे प्रेषित (स.) यांची अज्ञाधारकता स्वीकारली तर तो
तुमच्या कर्ममोबदल्यात कोणतीही कमतरता करणार नाही. खचितच अल्लाह मोठा
क्षमाशील आणि परमकृपाळू आहे. खरोखर श्रद्धावंत तर ते आहेत, ज्यांनी अल्लाह
आणि त्याच्या प्रेषितांवर (अर्थात प्रेषित मुहम्मद (स.)) यांच्यावर
श्रद्धा ठेवली, मग त्यांनी कोणतीही शंका मनात येऊ दिली नाही. आणि आपल्या
जीवितवित्तानिशी अल्लाहच्या मार्गात पराकाष्ठा केली तेच खरे श्रद्धावंत
लोक होत.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-हुजरात - १४,१५)
अर्थातच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका सद्क्रांतीचे
प्रत्यक्ष स्वरुप मानवजगतासमोर सादर केले आहे. म्हणून मुस्लिमांचे हे
कर्तव्य आहे की त्यांनी मानवतेच्या कल्याणास्तव सामाजिक व आर्थिक
अन्यायाविरुद्ध दंड थोपटावे आणि सत्य, न्याय, स्नेह व बंधुत्वासाठी
प्रयत्नशील असावे.