Articles by "साहबी"

जैनब (रजि.) या अत्यंत उदार व दानशूर होत्या. फकीर व गरीबांना मदतीचा हात त्या देत व भुकेलेल्यांना पोटभर अन्न देत असत. यामुळे `उम्मुल मसाकीन' (गरीबांची आई) या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. त्यांचे पहिले लग्न पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आतेभाऊ माननीय अब्दुल्ला बिन जहश (रजि.) यांच्याशी झाले होते. ते फार महान सहाबी (रजि.) होते. ई.स. ३ मध्ये उहुदच्या युद्धाआधी त्यांनी अल्लाहजवळ प्रार्थना केली की, ``हे अल्लाह मला युद्धात असा बरोबरीचा योद्धा दे जो अत्यंत रागीट व पराक्रमी असेल. तुझ्या मार्गात लढताना त्याच्या हातून मला मरण येऊ दे. तो माझे नाक, कान, ओठ कापून टाको. मी तुझ्याकडे येईन तेव्हा तू विचारावेस की हे अब्दुल्लाह (रजि.) तुझे नाक, कान, ओठ कापलेले का आहेत ? तेव्हा मी म्हणावे, ही हे अल्लाह तुझ्या पैगंबरासाठी व तुझ्यासाठी कापलेले आहेत.'' त्यांची ही प्रार्थना मान्य झाल्याची आकाशवाणी झाली. ती ऐवूâन ते म्हणाले, ``माझ्या प्रेताचे तुकडे तुकडे होईपर्यंत मी लढेल. उहुदच्या युद्धात ते जोशात लढले त्यांच्या तलवारीचे तुकडे तुकडे झाले. पैगंबर (स.) यांनी तेव्हा त्यांना खजुरीच्या झाडाची एक काठी त्यांना दिली ती घेऊन तलवारीसारखा तिचा वापर त्यांनी केला. ते या युद्धात शहीद झाले. मूर्तिपूजकांनी त्यांचे नाक, कान, ओठ कापले व ते दोऱ्यात ओवले.

माननीय अब्दुल्लाह (रजि.)च्या निधनानंतर त्या वर्षीच पैगंबरांनी माननीय जैनब (रजि.) यांच्याशी विवाह केला. बारा ओकया महर दिला. त्या वेळी जैनब (रजि.) या जवळपास ३० वर्षाच्या होत्या. त्यानंतर दोन-तीन महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. खुद्द पैगंबरांनी जनाजाच्या नमाजचे नेतृत्व केले. `जन्नतुल बकी' येथे त्यांचे दफन केले. माननीय खदीजा (रजि.) नंतर जैनब (रजि.) यांचेच भाग्य होते की पैगंबर (स.) यांच्या हातून त्यांचे अत्यसंस्कार झाले. पैगंबर (स.) यांच्या इतर पत्नींचा मृत्यू पैगंबर (स.) यांचा मृत्यूनंतर झाला.


या दुसरे खलीफा उमर (रजि.) यांची कन्या होत्या. माननीय हफ्सा (रजि.) पैगंबरी जाहीर होण्याच्या ५ वर्ष आधी जन्मल्या होत्या. त्यांचे लग्न माननीय कैनस बिन खिदाफा (रजि.) यांच्याशी झाले होते. ते बनी सहम या कबिल्याचे होते. त्यांनी हफ्सा (रजि.) सह इस्लाम धर्म स्वीकारला होता. माननीय कनैस (रजि.) नबूवत ६ मध्ये हब्शा येथे स्थलांतर करून गेले. पैगंबरांच्या स्थलांतरापूर्वी ते मक्का येथे आले व त्यांच्यासह स्थलांतर करून मदीना येथे गेले.

माननीय कनैस (रजि.) सत्यमार्गाचे वीर पराक्रमी शिपाई होते. हिजरी सन २ मध्ये झालेल्या बदरच्या युद्धात ते फार उत्साहाने सामील झाले होते. हिजरी सन ३ मध्ये उहुदच्या युद्धात त्यांनी पराक्रम केला व जखमी झाले. त्यांना मदीना येथे आणले गेले, परंतु त्यांचा तेथे मृत्यू झाला. इद्दत (चार महिने दहा दिवस)चा काळ संपल्यावर उमर फारूख (रजि.) यांना त्यांच्या विवाहाची चिंता वाटू लागली. एकदा एकांतात पैगंबर (स.) यांनी अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्याशी हफ्सा (रजि.)चा उल्लेख केला. माननीय अबू बकर (रजि.) यांना उमर (रजि.)यांना आपल्या मुलीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ते गप्प राहिले तेव्हा उमर (रजि.) उस्मान (रजि.)कडे गेले. त्यांच्या पत्नी रुकय्या (रजि.) हिचे निधन झाले होते. त्यांच्यापुढेही तोच प्रस्ताव ठेवला. उस्मान (रजि.) यांनी नकार दिला. उमर (रजि.) शेवटी पैगंबर (स.)यांच्याकडे गेले व सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ``अबू बकर (रजि.) व उस्मान (रजि.) पेक्षा श्रेष्ठ माणसाशी हफ्सा (रजि.)चा विवाह का होऊ नये?'' त्यानंतर त्यांचा विवाह पैगंबरांशी झाला.

बुखारी यांनी लिहिलेल्या हदीशीनुसार, हफ्शा (रजि.) या स्वभावाने कडक होत्या. प्रसंगी त्या पैगंबर (स.) यांना सुद्धा निर्भीडपणे उत्तरे देत. एके दिवशी पिता उमर (रजि.) यांना ही गोष्ट कळली. त्यांनी आपल्या मुलीला विचारले, ``तू पैगंबर (स.) यांना बरोबरीच्या नात्याने उत्तरे देतेस? हे बरोबर आहे का?'' तेव्हा त्या उत्तरल्या, ``होय? मी असे बोलते.'' तेव्हा उमर (रजि.) म्हणाले, ``बेटी अल्लाहच्या प्रकोपाचे भय बाळग.''

हफ्शा (रजि.) या पैगंबरांशी देखील प्रत्येक अडचणीबदल बोलताना निर्भीड असत. त्यांचा स्वभाव कडक असूनही हफ्सा (रजि.) या धर्मपरायण व ईशपरायण होत्या. एकदा जिब्रिल (अ.) पैगंबरांसमोर हफ्सा (रजि.) विषयी म्हणाले, (त्या फार उपासना करणाऱ्या व रोजे ठेवणाऱ्या आहेत) ``हे मुहम्मद (स.) त्या स्वर्गात देखील तुमच्याबरोबर राहतील.''

पैगंबर (स.) यांनी हफ्सा (रजि.) यांच्या शिक्षणाची खास व्यवस्था केली होती. शिफा बिन्ते अब्दुल्लाह (रजि.) यांनी त्यांना लिहिणे शिकविले. तसे मुंगी चावल्यावर म्हणायचा मंत्रही शिकविला. पैगंबरांनी कुरआनच्या पानांचा संग्रह करून हफ्सा (रजि.) यांच्याजवळ ठेवला होता. पैगंबर (स.) यांच्या निधनानंतरही त्या आयुष्यभर त्यांच्याच घरी राहिल्या. मदीना येथे वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मदीनाचे गव्हर्नर मरवान यांनी जनजाच्या नमाजचे नेतृत्व केले. मृत्यूपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र केले व गाबा येथील आपल्या मिळकतीचा ट्रस्ट करण्यास आपला भाऊ अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांना सांगितले व अशा तऱ्हेने आपली संपत्ती त्यांनी वाटून टाकली.


हुमेरा आणि सिद्दीका यांची उपाधी उम्मे अब्दुल्लाह. अब्दुल्लाहची आई आएशा (रजि.) होती. या कुरैश खानदानातील बनू तैइम या कबिल्यातील होत्या. आईचे नाव उम्मे रुमान बिन्ते आमीर (रजि.) होते. त्या एक महान माननीय साहबीया होत्या. पैगंबरांना पैगंबरी मिळून चार वर्षे झाली, तेव्हा शव्वाल महिन्यात त्या जन्मल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचे बालपण माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्या छत्रछायेत गेले. त्या लहानपणापासूनच बुद्धिमान व चाणाक्ष होत्या. बालपणीची प्रत्येक गोष्ट त्यांना आठवत होती. तेवढी स्मरणशक्ती इतर साहबी साहबीयांची नव्हती.

पैगंबरांशी विवाह होण्यापूर्वी माननीय आएशा (रजि.) यांचे लग्न जूबेर बिन मतआम यांच्या मुलाशी ठरले होते. परंतु त्या मुलाच्या आजीच्या सांगण्यावरुन हा विवाह जुबेरने मोडला. कारण माननीय अबू बकर (रजि.) यांचे सर्व कुटुंबीय मुस्लिम झाले होते. खुला बिन्ते हकीम (रजि.) यांनी पैगंबरासाठी आएशा (रजि.) यांना विवाह करण्याबाबत संदेश दिला. अबू बकर (रजि.) यांनी आश्चर्याने विचारले, ``मी त्यांचा मानलेला भाऊ आहे. भावाच्या मुलीबरोबर लग्न होऊ शकते काय?'' पैगंबरांना (स.) येऊन खुला (रजि.) ने विचारले असता पैगंबर म्हणाले, ``अबू बकर (रजि.) माझे धर्मबंधु आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलीशी विवाह होऊ शकतो.'' ऐवूâन अबू बकर (रजि.) खूश झाले. आपली मुलगी पैगंबरांची पत्नी होणार याचा त्यांना आनंद झाला. हा विवाह पार पडला. पाचशे दिरहम महर देऊन अबू बकर (रजि.) यांनी स्वत:च निकाह पढवून हा विवाह संपन्न केला.

एकदा अरबस्तानात शव्वाल महिन्यात प्लेग पसरला व त्याने वस्त्या उजाड झाल्या होत्या. माननीय आएशा (रजि.) यांचा विवाह याच महिन्यात झाला व काही वर्षांनंतर याच महिन्यात सासरी त्यांची पाठवणी केली गेली. तेव्हापासून या महिन्याला अशुभ समजणे बंद झाले. माननीय आएशा (रजि.) यांच्याशी विवाहाची शुभवार्ता पैगंबर (स.) यांना   स्वप्नात दिली गेली होती. स्वप्नात त्यांनी पाहिले की एकजण रेशमी कपडात गुंडाळलेली एक वस्तु पैगंबरांना दाखवीत म्हणाला, ``ही वस्तु तुमची आहे.'' पैगंबर (स.) यांनी ती उघडली तर त्यात माननीय आएशा (रजि.) यांचा चेहरा दिसला. हा विवाह अत्यंत साधेपणाने झाला. त्या म्हणत, ``मी मैत्रिणीबरोबर खेळत होते तेव्हा माझ्या आईने घराबाहेर जाण्यास प्रतिबंध करेपर्यंत मला त्या विवाहाची काहीच कल्पना नव्हती.'' जेव्हा त्या जन्मल्या तेव्हा आई-वडील मुस्लिम होते. त्यामुळे त्याच्या जन्मापासूनच इतर धर्माचे संस्कार त्यांना मिळाले नाहीत.


माननीय सौदा (रजि.) कुरैशच्या (कबिल्यातील) घराण्यातील होत्या. त्यांच्या आईचे नाव समूस बिन्ते कैस होते त्या अन्सार (मदीनावासी) च्या बनू नज्जार या खानदानातील होत्या. माननीय सौदा (रजि.) यांचे पहिले लग्न त्यांचे चुलतभाऊ माननीय सकरान बिन अमरौ (रजि.)यांच्याशी झाले होते.

अल्लाहने सौदा (रजि.) यांना चांगल्या गुणधर्मांनी युक्त केले होते. जेव्हा पैगंबरानी इस्लामचा प्रचार सुरू केला, तेव्हा त्यांनी `लब्बैक' म्हणून त्याचा स्वीकार केला. त्यांच्या पतीनेही त्याचा स्वीकार केला. हबशाच्या (अबीसीनीया) दुसऱ्या देशांतरात (स्थलांतर) सौदा (रजि.) व त्यांचे पती ही सामील होते. अनेक वर्षे तेथे राहून मक्का येथे परत आले. काही काळानंतर सकरान (रजि.) यांचा मृत्यु झाला. सौदा (रजि.) विधवा झाल्या.

या सुमारासच माननीय खदीजा (रजि.) यांचे निधन झाले होते. मातृविहीन चार मुलींना पाहून पैगंबर (स.) फार दु:खी होत असत. खुला (रजि.) नामक एक सहाबीया यांनी पैगंबरांना विनंती केली, ``हे पैगंबर (स.)! खुदीजा (रजि.) च्या निधनानंतर आपण नेहमी दु:खी दिसता.'' ``होय'' पैगंबर म्हणाले, ``घराची व्यवस्था आणि मुलींची देखभाल त्या करीत असत.'' खुला (रजि.) म्हणाली, ``आपल्याला एका पत्नीची गरज आहे. मी यासाठी प्रयत्न करू का?'' त्यांची परवानगी घेऊन माननीय सौदा (रजि.) जवळ तिने निकाहचा प्रस्ताव पाठविला. सौदा (रजि.) व त्यांच्या पित्याने तो मान्य केला व ४०० दिरहम (महर) देऊन पित्याने सौदा (रजि.) यांचा विवाह पैगंबरांशी लाऊन दिला. सौदा (रजि.)चा भाऊ जो मुसलमान नव्हता, त्याला हे कळल्यावर त्याने फार शोक केला. काही काळानंतर तो मुस्लिम झाला व आपल्या वागणुकीचा त्याला शेवटपर्यंत पश्चात्ताप होत राहिला. पैगंबरांना पैगंबरी मिळाल्यावर दहा वर्षांनी हा विवाह झाला.

सकरान (रजि.) यांच्या घरी नांदत असताना माननीय सौदा (रजि.) यांना एक स्वप्न पडले की त्या उशी घेऊन पहुडल्या असताना एकाएकी आकाश फाटले व चंद्र त्यांच्या अंगावर कोसळला. त्यांनी हे स्वप्न आपले पती सकरान (रजि.) यांना सांगितले. त्यांनी स्वप्नफल सांगितले, ``मला लवकरच मृत्यु येईल व तुम्ही अरबचे चंद्र पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नी बनाल.'' आणि खरोखरच तसे घडले.

पडदा पद्धतीचे मार्गदर्शन येण्याअगोदर माननीय उमर (रजि.) यांचे म्हणणे होते की पैगंबरांच्या घरातील स्त्रियांनी बाहेर येऊ नये. माननीय सौदा (रजि.) त्या काळात घराबाहेर प्रातर्विधी इ. साठी जात असत. एके दिवशी त्या जंगलाकडे यासाठीच जात असताना रस्त्यात माननीय उमर (रजि.) यांनी त्यांना पाहिले. त्यांच्या मजबूत देहयष्टीमुळे त्यांना ओळखून उमर (रजि.) म्हणाले, ``हे सौदा (रजि.) मी तुला ओळखले आहे.'' ऐवूâन त्यांना वाईट वाटले. त्यांनी पैगंबरांना जाऊन सांगितले. परंतु ते गप्प राहिले. त्यानंतर पडदासाठी दिव्य आयत अवतरली व स्त्रियांवर पडदा लागू झाला.

सौदा (रजि.) स्वभावाने कडक परंतु हास्यविनोदात रमणाऱ्या होत्या. त्यामुळे पैगंबर (स.) त्यांच्यावर अत्यंत खूश होते. त्या अत्यंत दयाळू आणि दानशूर होत्या. गरजूंना त्या नेहमी दानधर्म करीत असत. त्या कलाकुसरीतही प्रविण होत्या. कातडी कमावण्याचे काम करीत व त्यापासून जी प्राप्ती होई ती गरीबांमध्ये वाटून टाकीत. माननीय उमर (रजि.) यांनी दिरहम भरलेली थैली त्यांच्याकडे पाठविली तेव्हा त्यांनी त्या दिरहमाचे गरीबांना दान दिले. त्यांच्यात ते वाटून टाकले. माननीय आएशा (रजि.) म्हणतात, ``पैगंबरा (स.) समवेत राहण्याचे वेड असलेली दुसरी स्त्री मी पाहिली नाही. माझा आत्मा जर त्यांच्या शरीरात असता तर किती बरे झाले असते.''

भाग ४

माननीय सौदा (रजि.) १० हिजरीमध्ये पैगंबरासमवेत हजला गेल्या. लठ्ठपणामुळे त्यांना भरभर चालता येत नव्हते. म्हणून पैगंबर (स.) यांनी त्यांना मुज्दल्फाकडे आधीच रवाना केले... `हज्जतुल विदा' च्या वेळी पैगंबरांनी आपल्या पत्नींना सांगितले, ``या हजनंतर तुम्ही घरीच राहा.'' त्यांच्या निधनानंतर त्यांची कोणतीही पत्नी घराबाहेर पडली नही. सौदा (रजि.) म्हणत, ``मी हज आणि उमरा दोन्हीही केलेले आहेत. आता मी त्यासाठी बाहेर पडणार नाही.'' माननीय सौदा (रजि.) यांचे निधन २२ हिजरीमध्ये झाले. माननीय सकरान (रजि.) या पहिल्या पतीपासून त्यांना अब्दुलरहमान (रजि.) नावाचा मुलगा होता; जो माननीय उमर (रजि.) यांच्या खिलाफतीच्या काळात जलूला येथील युद्धात मारला गेला. पैगंबरांपासून सौदा (रजि.) यांना मुलबाळ वगैरे झाले नाही.


माननीय खदीजा (रजि.) हे नाव आणि हिंदची माता, ताहेरा (पाक) हे संबोधन ज्यांचे आहे त्यांचा जन्म `आमुलफिल' (हत्तीवाल्यांच्या वर्षापूर्वी) १५ वर्षे म्हणजे इ.स.५५५ मध्ये झाला. बालपणापासून त्या सज्जन आणि पुण्यशील होत्या. वयात आल्यावर त्यांचा विवाह अबुहाल हिन्द बिन नबाश तमीमी यांच्याबरोबर झाला. त्यांच्यापासून त्यांना दोन मुलगे, हाला व हिंद झाले. त्यापैकी हालाचा मृत्यू इस्लामपूर्वीच झाला तर हिंद एक सहाबी (पैगंबर (स.) यांचे शिष्य, सहकारी) झाले.

अबू हालाचा मृत्यु झाला. त्यानंतर खदीजाचा दुसरा विवाह आतिक बिन आबिद मखजुमी यांच्याबरोबर झाला. त्याच्यापासून त्यांना हिन्दा नामक एक कन्या झाली. काही काळानंतर दुसऱ्या पतीचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा तिसरा विवाह पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी झाला.

या लग्नापूर्वी खदीजा (रजि.) या आपला वैधव्याचा काळ जास्त करून एकान्तवासात व्यतीत करीत असत. काही काळ त्या काबागृहात व्यतीत करीत तर काही काळ त्या युगातील प्रसिद्ध व आदरणीय भविष्यवेत्या (काहीना) स्त्रियांबरोबर व्यतीत करीत. त्यांच्याशी त्या काळातील परिवर्तनावर कधीकधी चर्चा करीत असत. कुरैशच्या अनेक मोठमोठ्या सरदारांकडून त्यांना विवाहाबद्दल विचारले जाई, परंतु एकमागून एक संकटांनी (तिन्ही मुले व दोन्ही पती यांचे मृत्यु) त्यांचे मन जगातून उचाट झाले होते. त्यांचे वडील म्हातारपणामुळे मोठा व्यापार-धंदा सांभाळू शकत नव्हते. त्यांचा खदीजा (रजि.) व्यतिरिक्त कोणताही वारस जिवंत नव्हता. त्यामुळे आपल्या अत्यंत बुद्धिमान कन्येच्या सुपूर्द सगळा व्यापारउदीम करून त्यांनी एकान्तवास स्वीकारला. काही अवधीनंतर त्यांचेही निधन झाले.

खदीजा (रजि.) यांनी आपला व्यवसाय उत्तमरीतीने सुरू ठेवला. त्यांचा व्यापार सीरियापासून यमन देशापर्यंत पसरलेला होता. या विशाल व्यवसायासाठी त्यांनी खूप कर्मचारी ठेवले होते. त्यात अरबी, ईसाई, यहुदी आणि काही गुलाम यांचा समावेश होता. व्यापाराचे सुयोग्य धोरण व प्रामाणिकपणा यामुळे त्यांचा व्यापार दिवसेंदिवस वाढतच राहिला. त्यांना अशा एका व्यक्तीची गरज होती जी योग्य, बुद्धिमान, प्रामाणिक असेल आणि जिच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांना देश-विदेशात व्यापारासाठी पाठवता येईल.

भाग २

त्या वेळी मुहम्मद (स.) यांच्या पवित्र विचारसरणीची चर्चा मक्का शहरातील घराघरात होत होती. मुहम्मद (स.) अगदी तरूण होते, त्यांना `अमीन' (ठेव सांभाळणारा प्रामाणिक मनुष्य) या उपाधीने ओळखले जाई. खदीजांच्या कानावर या पवित्र व्यक्तीच्या वागणुकीची बातमी स्वाभाविकरित्याच पोहोचली. त्यांना व्यापाराच्या विकासासाठी अशाच सर्वगुणसंपन्न व सर्वसमावेशक समन्वयकाची आवश्यकता होती. त्यांनी मुहम्मद (स.) यांना निरोप पाठविला की, ``आपण सीरिया देशापर्यंत माझ्या व्यापाराच्या वस्तू पोहचवण्याचे काम कराल तर मी इतरांपेक्षा दुप्पट मोबदला देईन.'' मुहम्मद (स.) त्या काळात आपले चुलते अबू तालिब यांच्या छत्रछायेत राहत होते. त्यांना खदीजा (रजि.) यांच्या व्यापाराबद्दल अधुनमधून माहिती मिळत असे.

त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला व व्यापारासाठी माल घेऊन बसरा शहराकडे रवाना झाले. त्यांच्याबरोबर खदीजा (रजि.) यांनी मयसरा नावाच्या खास गुलामाला त्यांची देखभाल करण्यासाठी पाठविले. त्याला ताकीद दिली की प्रवासात पैगंबर (स.)यांना काहीही त्रास होता कामा नये. या दौऱ्यात पैगंबरांच्या प्रामाणिकपणा, सभ्यता इ. गुणांमुळे व्यापारात व नफ्यात दुप्पट वाढ झाली. काफिल्यातील इतर लोकांबरोबर ते इतके चांगले वागले की प्रत्येक व्यक्ती त्यांची स्तुती करू लागली व त्यांच्यावर जीव टावूâ लागली. मक्केत आल्यानंतर मयसराकडून या दौऱ्याची हकीकत खदीजा (रजि.) यांना कळाली आणि त्या अत्यंत प्रभावित झाल्या. त्यांनी आपल्या नफीसा नावाच्या दासीमार्फत पैगंबरांकडे विवाहाचा प्रस्ताव पाठविला. त्यांचा होकार मिळताच खदीजा (रजि.) यांचे चुलते अमर बिन असद यांना बोलविण्यात आले. त्यांचे त्या वेळी ते पालक होते.

भाग ३

इकडे मुहम्मद (स.) देखील आपले काका अबू तालिब व घराण्यातील बुजुर्ग मंडळीना घेऊन खदीजा (रजि.) यांच्या घरी आले. अबू तालिब यांनी लग्नाचे मंत्र पठण करून त्यांचा निकाह लावून दिला. त्यात ५०० चांदीची (दिरहम) नाणी महर ठरविण्यात आला. त्या वेळी मुहम्मद (स.) यांचे वय २५ वर्षे आणि खदीजा (रजि.) यांचे वय ४० वर्षे होते.

निकाहनंतर मुहम्मद (स.) बहुधा घराबाहेर राहू लागले. कित्येक दिवस मक्केच्या गुफांमध्ये उपासना करीत असत. दहा वर्षे अशीच लोटली. एके दिवशी नेहमीप्रमाणे हीरा या गुफेत चिंतन करीत असताना अल्लाहच्या आदेशाने जिब्रिल (अ.) तेथे आले व म्हणाले, ``क्रम या मुहम्मद!'' (हे मुहम्मद उठा) पैगंबरांनी दृष्टी उचलून पाहिले तर त्यांना एक सुंदर चेहरा दिसला. त्याच्या कपाळावर तैयबाचा कलमा लिहिलेला होता. ते जिब्रिल होते. त्यांनी मुहम्मद (स.) यांना गळामिठी घातली व जवळ दाबत म्हटले, ``वाचा!'' पैगंबर (स.) म्हणाले, ``मी लिहू वाचू शकत नाही.'' परत त्यांना आलिंगन देत ते म्हणाले, ``वाचा!'' पैगंबरांनी तेच उत्तर दिले. तिसऱ्यांदाही वाचावयास सांगितले, ``वाचा अल्लाहच्या नावाने ज्याने हे सर्व निर्मिले पाण्याच्या थेंबाने (रक्ताच्या पेशीने) माणसाला बनविले. तुमचा परवरदिगार फार दयाळू आहे, तुम्ही वाचा.'' अल्लाहने माणसाला लेखणीद्वारे ज्ञान शिकविले जे त्याला काही माहीत नव्हते. पैगंबरांच्या पवित्र जिव्हेवर `इकराबिस्मी....'' हे शब्द उमटू लागले. या विचित्र अनुभवाने मुहम्मद (स.) अत्यंत प्रभावित झाले. घरी परतले आणि म्हणाले, (जमलूनी, जमलूनी) ``माझ्यावर पांघरूण घाला.'' माननीय खदीजा (रजि.) यांनी तसे केले व म्हणाल्या, ``आपण कोठे होता? मी अगदी काळजीत होते. कित्येक माणसांना तुमच्या शोधार्थ मी पाठविले होते.'' पैगंबरांनी त्यांना तो सगळा अनुभव सांगितला. माननीय खदीजा (रजि.) म्हणाल्या, ``आपण सत्य तेच बोलता, गरीबांना मदत करता, अतिथ्यशील आहात, दयाळू आहात, ठेव प्रामाणिकपणे जपणारे अमीन आहात, दु:खितांची खबर ठेवता, अल्लाह आपल्याला एकटे सोडणार नाही, एकाकी पाडणार नाही.'' पैगंबरांना घेऊन त्या आपले काका वर्का-बिन-नौफिल यांच्याकडे गेल्या. या काकांनी मूर्तिपूजेला कंटाळून खिस्ती धर्म स्वीकारला होता. पूर्वीच्या दैवी ग्रंथांचे-तौरात, जबूर, इंजील ते गाढे अभ्यासक होते. खदीजा (रजि.)यांनी मुहम्मद (स.) यांचा विचित्र अनुभव त्यांना सांगितला. वर्का ते ऐवूâन म्हणाले, ``हा तोच देवदूत आहे जो मूसाकडे पाठविला गेला होता. जर मी त्या दिवसांपर्यंत जिवंत राहू शकलो असतो, जेव्हा तुमच्या जमातीतील लोक तुम्हाला देशत्याग करावयास भाग पाडतील.'' पैगंबर (स.) यांनी विचारले, ``काय हे लोक मला देशाबाहेर काढतील?'' वर्का म्हणाले, ``होय, तुमच्यावर जे अवतरले आहे ते ज्यांच्या-ज्यांच्यावर अवतरते, जग त्यांचे विरोधी होते. जर मी त्या काळापर्यंत जगलो तर तुम्हाला जरूर मदत करीन.'' यानंतर वर्कांचा लवकरच मृत्यु झाला. खदीज (रजि.)यांना कळून चुकले की आदरणीय मुहम्मद (स.) यांना पैगंबर म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

त्यांनी त्वरीत इस्लाम धर्म स्वीकारला. सर्व इस्लामी ग्रंथ या गोष्टीची पुष्टी करतात की माननीय खदीजा (रजि.) या इस्लामचा स्वीकार करणाऱ्या पहिल्या महिला अनुयायी (सहाबीया) आहेत. पैगंबरांशी विवाहानंतर खदीजा (रजि.) या २५ वर्षे जगल्या. कुरआन अवतरल्यानंतर नऊ वर्षे त्या जगल्या. या काळात त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आत्मिक संघर्षाला हसत हसत साथ दिली व तो सहन करीत पैगंबरांच्या जीवलग व त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या पत्नी सिद्ध झाल्या.

माननीय खदीजा (रजि.) यांनी इस्लाम स्वीकारताच त्यांच्या नातेवाईकांमध्ये इस्लामचे आकर्षण वाढले. तरूणात माननीय अली (रजि.) व वयस्कांमध्ये माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.), जैद बिन हारिसा (रजि.) इत्यादींनी इस्लाम स्वीकारला. तदनंतर हळूहळू अनेक लोक या धर्मात प्रविष्ट होऊ लागले. इस्लामच्या या विस्ताराने माननीय खदीजा (रजि.) आनंदित झाल्या. आपल्या जवळच्या तसेच दूरच्या गैरमुस्लिम नातेवाईकांच्या टीकेची पर्वा न करता त्यांनी पैगंबरांना धर्मप्रचारात मदत केली. त्यांनी आपली सर्व संपत्ती इस्लामला अर्पण केली. त्यातून अनाथ व विधवा यांची देखभाल, निराधारांना मदत, गरजूंना सहाय्य दिले गेले.

इकडे कुरैश लोक नवमुस्लिमांवर अत्याचार करू लागले व इस्लामच्या प्रचारात अडथळे निर्माण करू लागले. त्यांनी पैगंबर व त्यांच्या अनुयायांना छळण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.

भाग ४

जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) काफिरांच्या मूर्ख बडबडीने त्रस्त होत तेव्हा खदिजा (रजि.) त्यांना समजावत, ``हे पैगंबर आपण दु:खी होऊ नका. आजपर्यंत एकही पैगंबर असा झाला नाही ज्याची लोकांनी टर उडविली नसेल.'' हे ऐवूâन पैगंबरांची नाराजगी दूर होत असे. अशा प्रकारे या दु:खदायी काळात खदीजा (रजि.) या पैगंबराच्या समविचारी व दु:खात केवळ सामीलच नव्हत्या, तर प्रत्येक संकटाच्या वेळी त्यांना मदत करीत असत. पैगंबर म्हणत, ``मी जेव्हा काफिराची बडबड ऐवूâन खदिजा (रजि.) याला त्याबद्दल सांगत असे तेव्हा त्या मला धीर देत व कोणत्याही दु:खावर त्यांचे समजावणे हे औषधाप्रमाणे काम करी व माझे दु:ख हलके होत असे. त्या काळातील एक व्यापारी एके ठिकाणी म्हणतो, मी एकदा अज्ञानाच्या काळात मक्का येथे माल खरेदीसाठी आलो असता अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब यांच्याकडे थांबलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अब्बास यांच्यासह बाजारात गेलो. काबागृहाजवळून जात असता एक तरूण आकाशाकडे पाहून नंतर काबागृहाकडे तोंड करून उभा राहिला. थोड्या वेळाने पोरगेलासा मुलगा आला, तो ह्या तरूणाजवळ उभा राहिला. थोड्या वेळाने एक स्त्री आली व या दोघांच्या मागे उभी राहिली. तिघांनी नमाज अदा केली व निघून गेले. मी म्हणालो, `अब्बास मला वाटते मक्का शहरात क्रांती होणार आहे.' ते उत्तरले, ``होय, तुला माहीत आहे का हे दोघे कोण आहेत?'' - `नाही', ते उत्तरले. तो तरूण व तो मुलगा, दोघे माझे पुतणे आहेत. ती स्त्री मुहम्मद (स.) यांची पत्नी खदीजा (रजि.) होती. माझा पुतण्या मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की त्यांचा धर्म दिव्य आहे आणि अल्लाहच्या आदेशानेच तो प्रत्येक काम करतो. अजून तर त्या तिघांखेरीज कोणी त्या धर्माचा अनुयायी झालेला नाही. मला वाटले चौथा अनुयायी मी झालो तर किती बरे होईल!''

भाग ५

वरील उदाहरणावरून दिसून येते की खदीजा (रजि.) यांच्या या प्रेम, सहानुभूती, त्याग इ. गुणांमुळे पैगंबराचे त्यांच्यावर अमर्याद प्रेम होते. त्या जिवंत असेपर्यंत पैगंबरांनी दुसरा विवाह केला नाही. माननीय खदीजा (रजि.) मुलाचे पोषण आणि घरातील कामकाजदेखील उत्तमरित्या करत असत. संपत्ती व ऐशआराम असूनदेखील त्या पैगंबरांची सेवा स्वत: करीत असत. उदा. पैगंबरासाठी काही ताटात घेऊन त्या येत असताना जिब्रिल (अ.) तेथे पोहचले. त्यांनी सांगितले, ``पैगंबर त्यांना माझा आणि अल्लाहचा सलाम सांगा. खदीजा (रजि.) ची पैगंबरांवर एवढी श्रद्धा होती की पैगंबरी मिळण्याआधी व नंतरच्या काळात पैगंबराच्या प्रत्येक वचनावर त्यांनी श्रद्धा ठेवली. त्यामुळे पैगंबर (स.) त्यांची खूप स्तुती करीत असत. पैगंबरी मिळाल्यावर सात वर्षानंतर कुरैशांनी अबू तालिबच्या घराला वाळीत टाकले त्या वेळीदेखील खदीजा (रजि.) त्यांच्यासोबत होत्या. तीन वर्षापर्यंत त्यांनी हा वनवास सहन केला. त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले. ११ रमजान १० नबवी वर्ष हा तो दिवस होता. त्या वेळी खदीजा (रजि.) ६५ वर्षाच्या होत्या.

भाग ६

पैगंबरांना त्यांच्या निधनाने धक्का बसला ते नेहमी नाराज असत त्यानंतर माननीय सौदा (रजि.) त्यांचा विवाह झाला. खुदीजा (रजि.) यांना ते कधी विसरू शकले नाहीत. जेव्हा ते कुर्बानी करीत तेव्हा खुदीजा (रजि.) यांच्या मैत्रिणींना अगोदर त्यातील हिस्सा पोहोचता करीत. खुदीजा (रजि.) यांचा कोणी नातेवाईक त्यांच्याकडे आला तर त्याचे आदरातिथ्य करीत.

खदीजा (रजि.) यांची स्तुती केल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत व घरात प्रवेश करतानाही खुदीजा (रजि.) यांची स्तुती करीत. माननीय आएशा (रजि.) यांनी एकदा इर्षेने विचारले, ``पैगंबर (स.)! ती विधवा व म्हातारी स्त्री होती, अल्लाहने त्यांच्यापेक्षा चांगली पत्नी तुम्हाला दिली आहे.'' ऐवूâन पैगंबरांना राग आला. म्हणाले, ``अल्लाहशपथ! मला खदीजा (रजि.) पेक्षा चांगली पत्नी मिळाली नाही. जेव्हा सगळे काफीर होते त्यांनी इस्लाम स्वीकारला. सगळ्यांनी मला खोटे ठरविले तेव्हा त्यांनीच मला पाठिंबा दिला. आपली सगळी संपत्ती मला अर्पिली.'' आएशा  (रजि.) यांनी घाबरुन निश्चय केला की, ``इथून पुढे मी खदीजा (रजि.) यांना भलेबुरे म्हणणार नाही.''

खदीजा (रजि.) कडून एवूâण सहा अपत्ये पैगंबरांना झाली. पहिले कासीम (रजि.) ते लगेच वारले. मग जैनब (रजि.), अब्दुल्लाह (रजि.) तेही बालपणीच वारले. त्यानंतर रुकय्या (रजि.), उम्मे कुलसुम (रजि.), फातेमा तुज्जोहरा (रजि.) ही मुले जन्मली.

एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना एका लष्करी मोहिमेच्या नेतृत्वासाठी अतिशय बुद्धिमान आणि युद्धकुशल शूरवीराची गरज भासली, म्हणून त्यांनी माननीय अमरु बिन आस(र.)यांना प्रेषितदरबारी हजर राहण्याचे आदेश दिले. माननीय अमरु बिन आस(र.)आदेश मिळताच प्रेषितदरबारी हजर झाले. आदरणीय प्रेषितांनी म्हटले,
‘‘मी तुम्हाला एका मोहिमेवर रवाना करीत आहे. ईश्वराची इच्छा असल्यास तुम्ही सुरक्षित राहाल आणि बरीच संपत्ती तुमच्या पदरी येईल.’’
माननीय अमरु(र.)यांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले,
‘‘हे प्रेषित! मी संपत्ती मिळविण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला नसून केवळ ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी इस्लामचा स्वीकार केला आहे.’’
‘‘पवित्र संपत्ती पवित्र आचरण असणार्या व्यक्तीकडे येणे उत्तम आहे.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून माननीय अमरु बिन आस(र.)आनंदाने मोहिमेवर रवाना झाले. त्यांना आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी ‘मर्दे स्वालेह’ अर्थात ‘शुद्ध आचरण असलेले पुरुष’ या नावाने संबोधित केले.
माननीय अमरु बिन आस(र.)हे इस्लामच्या आरंभ काळातील अशा शूरवीरांपैकी आहेत ज्यांच्या शौर्य, युद्धकौशल्य, दमदार नेतृत्व आणि विवेकशील युद्धनीतिमुळे इस्लामी शासनास स्थैर्य लाभले. ते कुरैश कबिल्याचे सुपुत्र होत. त्यांची वंशावळ अशी आहे.
‘अमरु पिता आस पिता वायल पिता हाशिम पिता सईद पिता सहम पिता अमरु पिता हसीस पिता कआब पिता नुवैयी पिता गालिब.’
त्यांच्या मातेचे नाव ‘नाबिगा’ असे होते. त्यांचे पिता ‘आस बिन वायल’ हे कबिल्याचे सरदार व न्यायाधीश होते. तसेच ते अतिशय श्रीमंत असल्याने समाजात त्यांचे वर्चस्व होते. ते इस्लामचे कट्टर विरोधी होते. ते मरणोत्तर जीवनावर विश्वास ठेवीत नसत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास(र.)यांचे कथन आहे की, ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे सुपुत्र ‘कासिम’ आणि ‘अब्दुल्लाह’ यांचे बालपणातच निधन झाले, तेव्हा याच ‘आस बिन वायल’ यांनी उपहासात्मक विधान काढले की,
‘मुहम्मद(स.) यांची वंशवेल समाप्त झाली. त्यांचा एकही पुत्र त्यांचा वारसा चालविण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही. आता मुहम्मद(स.) वारले की लोकांचा पिच्छा आपोआपच सुटेल.’ याच प्रसंगी दिव्य कुरआनाची ‘सूरह-ए-कौसर’ अवतरली आणि यामध्ये ईश्वराने आपल्या लाडक्या प्रेषितांच्या सांत्वनास्तव घोषणा केली की, ‘हे प्रेषिता! आपला वारसा निश्चितच चालू राहील. तुम्ही शोकाकुल होऊ नका. ज्यांनी तुमच्यावर उपहासात्मक वाक्य काढले, त्यांचीच वंशवेल आम्ही संपवीत आहोत.’
आणि खरोखरच! आदरणीय प्रेषितांचा उपहास करणार्यांची वंशवेल संपूनच गेली. त्यांच्या वंशाचा कोणीच वारसदार शिल्लक राहिला नाही.
इस्लामच्या या अतिकठोर द्वेष्ट्याच्या घरात इस्लामसाठी जीवन अर्पण करणारे माननीय अमरु बिन आस(र.)जन्मले होते. अमरु बिन आस(र.)हे आदरणीय प्रेषितांपेक्षा सहा वर्षांनी लहान होते. त्यांच्या इस्लामद्रोही पित्याने त्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिले होते. म्हणूनच ते शिक्षण व प्रशिक्षण घेऊन उच्चदर्जाचे युद्धनीतिज्ञ बनले. माननीय अमरु(र.)यांनीसुद्धा इस्लामद्वेषाचा पित्याचा हा वारसा बर्याच काळापर्यंत सुरु ठेवला.
त्यांचे धाकटे बंधू माननीय हिश्शाम बिन आस(र.)यांनी मात्र इस्लामच्या प्रारंभी काळातच इस्लाम स्वीकारला आणि इस्लामद्रोह्यांच्या छळ आणि अमानवी यातनांना बळी पडले. शेवटी त्यांनी ‘अॅबीसीनिया’ कडे स्थलांतर केले. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जोरदार विरोध केला. त्यांनी इस्लामी लष्कराबरोबर घनघोर युद्ध केले.
आपल्या इस्लामस्वीकृतीचा वृत्तांत त्यांनी स्वतःच या शब्दांत मांडला,
‘‘मी ‘एहजाब’च्या युद्धातून परत येत असताना आपल्या हाताखालील तमाम लोकांना निमंत्रित करून सांगितले की, ईश्वराची शपथ! आपण किती जरी प्रयत्न केले तरी मुहम्मद(स.) यांची भूमिका निश्चितच दृढ आणि न्यायनिष्ठ वाटते. तसेच ते नेहमीच आपल्यापेक्षा प्रभावी ठरतात. मुहम्मद(स.)च्या काही सोबत्यांनी ‘अॅबीसीनिया’ देशात राजा ‘नेगूस’चा आश्रय घेतला आहे. आपणही तेथेच स्थायिक होऊ या. येथे मुहम्मद(स.) च्या प्रभुत्वाखाली राहण्यापेक्षा राजा ‘नेगूस’ च्याच आश्रयात राहणे श्रेयस्कर आहे. या ठिकाणी(अर्थात मक्का शहरात) आपल्या समाजाने जर मुहम्मद(स.) यांचा पराभव केला, तरी राजा ‘नेगूस’चे आपल्याबरोबर चांगलेच वर्तन राहील. कारण आपण श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोक आहेत.’ माझ्या या विचारावर सर्वच सहमत झाले. मग आपसात सल्लामसलतीत निर्णय झाला की, आपल्याकडील प्रसिद्ध आणि मूल्यवान असलेली वस्तू अर्थात उच्च दर्जाचे चामडे आपण राजाला भेट म्हणून देऊ. तो आपल्यावर खूप प्रसन्न होईल. म्हणून आम्ही विपुल प्रमाणात चामडे घेऊन अॅबीसीनियाकडे निघालो. अॅबीसीनियात पोहोचताच आमची गाठ माननीय इब्ने उमैया(र.)यांच्याशी पडली. त्यांना आदरणीय प्रेषितांनी काही कामानिमित्त राजा नेगूसकडे पाठविले होते. आम्ही राजा नेगूसच्या दरबारी पोहोचलो. मी राजा बेगूसला नीतिनीयमाप्रमाणे साष्टांग नमस्कार केला. त्याने माझे स्वागत करून विचारले, ‘आमच्यासाठी काही विशेष भेट आणली काय?’ आम्ही उच्चदर्जाचे सोबत आणलेले चामडे त्याच्या समोर ठेवले. राजा खूप प्रसन्न झाला. मग मी त्यास म्हणालो, ‘‘राजवर्य! आपल्याकडे आमच्या शत्रू(अर्थात आदरणीय प्रेषित(स.) ने पाठविलेला माणूस आलेला आहे. त्यास(अर्थात माननीय इब्ने उमैया(र.)) ठार करण्याकरिता आमच्या स्वाधीन करावे. त्याने आमच्या बर्याच प्रतिष्ठितांना त्रास दिला आहे.’’ माझे हे वाक्य ऐकून राजा नेगूस अत्यंत क्रोधित झाला. त्याने आपला हात आपल्या माथ्यावर मारला. त्याच्या या कृत्याने मला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. मी म्हणालो,
‘‘हे राजन! मला याची पूर्वकल्पना असती की, माझ्या बोलण्याचे आपणास इतके वाईट वाटेल, तर मी बोललोच नसतो. क्षमस्व!’’ राजा नेगूस क्रोधित होऊन म्हणाला, ‘‘तुम्ही एका अशा पुरुषाच्या सोबत्यास माझ्या हातून ठार करू इच्छिता ज्यावर आदरणीय मूसा(अ.) या प्रेषिताप्रमाणेच दिव्य बोध होतो.’’
मी प्रश्न केला, ‘‘हे राजन! खरोखरच हे सत्य आहे काय?’’ बादशाह उत्तरला, ‘‘अमरु! तुम्ही खरोखरच दुर्दैवी आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे. तुम्ही त्यांना शरण जा. त्यांचे अनुकरण स्वीकारा. ज्याप्रमाणे मूसा प्रेषितांनी ‘फॅरो’ या क्रूर बादशाहाचा पराभव केला होता, त्याचप्रमाणे प्रेषित मुहम्मद(स.) सुद्धा आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करतील. म्हणून तुम्ही माझ्या हातावर आदरणीय प्रेषितांच्या सत्य धर्माची दीक्षा घ्यावी.’’ असे म्हणून राजा नेगूस याने आपला हात पुढे केला आणि मी त्याच ठिकाणी इस्लामचा स्वीकार केला. माझ्या विचारातही अभूतपूर्व क्रांती घडून आली होती. दरबारातून मी सरळ आपल्या सवंगड्यांकडे आलो. त्यांच्यासमोर मी इस्लाम स्वीकारण्याची घटना जाहीर केली नाही आणि सरळ मदीनाकडे प्रस्थान केले. रस्त्यात माननीय खालिद बिन वलीद(र.)व उस्मान बिन तलहा(र.)भेटले आणि मी त्यांना विचारले, ‘‘हे खालिद कोठे निघालात?’’ ‘‘ईश्वराची शपथ! आम्ही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याकडे इस्लाम स्वीकारण्यासाठी निघालो आहोत. मग आम्ही एकत्र प्रेषित दरबारी पोहोचलो. आधी माननीय खालिद बिन वलीद(र.)यांनी प्रेषितांकडून इस्लामची दीक्षा स्वीकारली मग मी प्रेषितांजवळ जाऊन म्हणालो,
‘‘हे प्रेषित! मी इस्लाम स्वीकारण्यासाठीच हजर झालो. परंतु आपण माझे पाप आणि आपणास केलेला विरोध क्षमा करावा!’’
यावर प्रेषित म्हणाले, ‘‘हे अमरु! इस्लामचा स्वीकार केल्यावर ईश्वर संपूर्ण पाप माफ करतो आणि इस्लामसाठी केलेल्या स्थलांतरामुळेसुद्धा पुर्वी केलेले सर्व पाप धुवून निघतात.’’ प्रेषितांचे हे उत्तर ऐकून मला खूप मानसिक समाधान लाभले आणि मी तत्काळ इस्लामचा स्वीकार केला आणि मक्का शहरी परतलो.’’
परंतु आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना सोडून त्यांचे मन मक्का शहरात रमले नाही. त्यांनी काही दिवसांतच मदीनेस स्थलांतर करून प्रेषितांसोबत वास्तव्य केले.
माननीय अमरु बिन आस(र.)यांच्या सर्व लढायांपैकी सर्वांत महत्त्वाचे युद्ध म्हणजे इजिप्तवर केलेली यशस्वी चढाई होय. याच विजयपूर्ण युद्धाने इतिहासात त्यांची विशेष ओळख आहे. सीरियावरील महत्त्वपूर्ण विजयानंतर त्यांनी आपल्या लष्करी कारवाईचा मोर्चा इजिप्तकडे वळविला. यामध्ये त्यांनी अतिशय सुपीक आणि समृद्ध असलेले इजिप्त तर ताब्यात घेतलेच, शिवाय तराबलस आणि जवळपासच्या इतर प्रदेशांवरही सत्य धर्माचा झेंडा रोवून मानवजातीस अन्यायी व अत्याचारी सत्तेच्या जोखडातून मुक्त केले.
इजिप्त देशावर सुद्धा रोमन सम्राटाचा ताबा होता. रोमन सम्राटाच्या हातून ‘सीरिया’ हिसकावून घेतल्यामुळे तो इजिप्तमध्ये इस्लामी लष्करास पराभूत करण्याची जोरदार तयारी करीत होता. इजिप्तवर चढाई करण्यात मोठ्या अडचणी आणि समस्या असूनही माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांची परवानगी मिळविली. हिजरी सन १८ मध्ये माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इजिप्तच्या ‘बेबीलॉन’ शहरावर हल्ला केला. घनघोर युद्धानंतर इस्लामी लष्कराने या शहराचा ताबा घेतला. यानंतर त्यांनी नाईल नदीवर वसलेले प्राचीन शहर ‘गरजुल’ बलाढ्य येथे लष्कर तैनात केलेले होते. या लष्कराने तब्बल एक महिण्यापर्यंत इस्लामी लष्करास झुंज दिली आणि शेवटी शरणागती पत्करली. या किल्ल्याच्या पायथ्याशी नाईल नदी वाहात असे. जहाजे आणि युद्धनौका किल्ल्याच्या मुख्य द्वारावर थांबत असत. अर्थात हे एक बंदरच होते. या किल्ल्यास ताब्यात घेतल्याशिवाय इजिप्त देशात पुढचा विजय मिळविणे अतिशय कठीण व जवळपास अशक्यच होते. माननीय अमरु(र.)यांनी या किल्ल्यास वेढा दिला. हा वेढा बरेच दिवस चालू होता. किल्ल्याच्या रक्षणार्थ असलेल्या लष्कराने देखील खूप निकरीची झुंज दिली. इस्लामी लष्कराने केंद्रीय इस्लामी शासनाकडून मदतीसाठी आणखीन कुमक मागविली. माननीय उमर फारुक(र.)यांनी दहा हजारांचे लष्कर पाठविले . या लष्कराचे नेतृत्व माननीय जुबैर(र.)यांच्याकडे होते. त्यामुळे माननीय जुबैर(र.)यांनी किल्ल्याच्या खंदकाची पाहणी करून रणनीती आखली. तरीदेखील सात महिने उलटूनही किल्ला ताब्यात आला नाही. म्हणून माननीय जुबैर(र.)यांनी एक लांबलचक सोल घेऊन किल्ल्याच्या तटावर चढून आत शिरकाव केला. त्यांच्या मागे इस्लामी लष्करसुद्धा आत शिरले आणि आत जाऊन किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार उघडले. संपूर्ण इस्लामी लष्कर किल्ल्यात शिरले आणि इजिप्शियन सैन्याची तारांबळ उडाली. इजिप्शियन लष्कराने काही सामान्य अटी समोर ठेवून इस्लामी लष्कराबरोबर तडजोड केली. माननीय अमरु(र.)यांनीसुद्धा जास्त रक्तपात घडू नये या पवित्र हेतूने त्यांना अभयदान दिले. या किल्ल्याचे नाव ‘कसर-ए-शमा’ असे होते.
‘कसर-ए-शमा’ येथे काही दिवस वास्तव्य केल्यावर माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इजिप्तचे सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे शहर ‘अस्कंदरीया’ कडे आपला मोर्चा वळविला. रस्त्यामध्ये ‘अश्मून’, ‘आलिया’, ‘कूम’, ‘माफूक’, ‘करयून’ आणि इजिप्तच्या आणखीन काही ठिकाणच्या फौजांनी इस्लामी लष्करास अयशस्वी झुंज दिली आणि पराभव पत्करला. अशा प्रकारे माननीय अमरु(र.)यांनी आपली यशस्वी घोडदौड चालूच ठेवली आणि ‘अस्कंदरीया’ शहरास धडक मारली. या शहरात तब्बल पन्नास हजाराचे रोमन लष्कर इस्लामी लष्कराचा सामना करण्यास सज्ज होते. शहरास चारही बाजुंनी उंच तटबंदी होती. हत्यारे आणि रसदसुद्धा मुबलक प्रमाणात रोमन लष्कराकडे होती.
शिवाय त्यांच्याकडे युद्ध नौकादेखील होत्या. ‘बलाजुरी’ आणि ‘मुकरीजी’ या इतिहासतज्ञांनी लिहिले की, येथील सेनापती ‘मकोकस’ हा इस्लामी लष्करास टक्कर देण्याच्या मनःस्थितीत नव्हता. कुशल योद्धा असल्याने आणि युद्धांचा दीर्घ अनुभव असल्याने इस्लामी लष्कराचे बळ त्याने ओळखले होते. तरीदेखील रोमन सम्राटाच्या मर्जीखातर त्यास हे युद्ध करणे भाग पडले. त्याला याची चांगलीच जाण होती की, रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेले सीरिया आणि इतर भाग इस्लामी लष्कराने मोठ्या जिद्द आणि चिकाटीने हिसकावून घेतले होते. ते सहजासहजी इजिप्त सर केल्या वाचून श्वासही घेणार नाही. म्हणून त्याने माननीय अमरु(र.)यांच्याशी एक गुप्त करार केला की, हे युद्ध आमची मर्जी व इच्छा नसताना रोमन सम्राटाच्या आग्रहाखातर आम्ही करीत आहोत. बळजबरीच हे युद्ध आमच्यावर लादण्यात येत असून इच्छा नसतानाही आम्हास तुमच्याविरुद्ध लढावे लागत आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या समाजाच्या लोकांना ठार करु नये. अशा प्रकारे हे युद्ध टळले आणि इस्लामी लष्कराशी तडजोड झाली.
या घटनेमुळे इजिप्त देशाच्या इतर शहरात राहणार्या रोमन नागरिकांचे धैर्य खच्ची झाले. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी इतर शहरांना ताब्यात घेण्यासाठी उमैर(र.), उकबा(र.)आणि खारजा(र.)यांच्या नेतृत्वात लष्करे रवाना केली. बर्याच ठिकाणी रोमन लष्कराशी त्यांचा सामना झाला आणि इस्लामी लष्कराने कोठेच माघार न घेता आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली. अशा प्रकारे अल्पशा काळातच संपूर्ण इजिप्त इस्लामी लष्कराने रोमन सम्राटाकडून हिसकावून तेथील जनतेच अन्यायमुक्त केले.
इजिप्तवर विजय मिळविल्यानंतर माननीय अमरु बिन आस(र.)यांनी आपला मोर्चा ‘बरका’ कडे वळविला. ‘बरका’ हा अतिशय दाट वस्तीचा आणि इजिप्त व पश्चिमी तराबलसच्या दरम्यानचा सुपीक प्रदेश होता. परंतु या ठिकाणी इजिप्तचेच शासन होते. ‘बरका’मध्ये दाखल होताच माननीय अमरु(र.)यांनी येथील सर्वांत महत्त्वाचे केंद्रीय शहर ‘अन्ताबलस’ ला लष्करी वेढा दिला. परंतु येथील नागरिकांनीसुद्धा युद्धाच्या भानगडीत न पडता हे शहर इस्लामी लष्कराच्या स्वाधीन केले. ‘बरका’ ताब्यात घेतल्यावर माननीय अमरु(र.)यांनी ‘उकबा बिन नाफेअ(र.)यांना ‘जवेला’कडे लष्करी कारवाईसाठी रवाना केले. हे शहर सुडानच्या सीमेवर होते. मागील युद्धातील पराभवामुळे आणि इस्लामी लष्कराच्या सहिष्णुतावादामुळे, तसेच त्याच्या उदार नीतीमत्तेमुळे तेथील रहिवाशांनीसुद्धा युद्ध न करताच रोमन साम्राज्य झुगारून इस्लामी शासन व्यवस्था पसंत केली आणि हे शहर इस्लामी लष्कराच्या अधिपत्याखाली आले. यानंतर माननीय अमरु(र.)यांनी आपला मोर्चा रोमन सागराच्या किनार्यावरील आणि आफ्रिका प्रदेशातील ‘तराबलस’कडे वळविला. तराबलसवासियांना इस्लामी लष्कराची वार्ता मिळताच त्यांनी किल्ल्यात आश्रय घेतला. अमरु बिन आस(र.)यांनी पूर्वेकडे पाडाव टाकून पूर्ण किल्ल्यास वेढा दिला. हा वेढा पूर्ण दोन महिन्यांपर्यंत होता. परंतु शहरात प्रवेश करण्याचा कुठलाच मार्ग निघत नव्हता. योगायोगाने इस्लामी लष्कराचे काहीजण शिकारीसाठी गेल्यावर त्यांची दृष्टी किल्ल्याकडे जाणार्या एका मार्गावर पडली. तसेच त्यांना हेदेखील आढळून आले की, समुद्र आणि किल्ल्यादरम्यान कोणतीच तटबंदी नाही. त्यांनी याची भौगोलिक परिस्थिती अमरु बिन आस(र.)यांना तत्काळ कळविली. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी याच मार्गाने शहरात पूर्ण लष्करासह प्रवेश केला आणि रोमन लष्कराची दानादान उडविली. दोन्ही सैन्यांत घनघोर युद्ध झाले आणि त्यांचा इस्लामी लष्करासमोर टिकाव लागला नाही. शत्रूपक्षाने इस्लामी लष्करासमोर शरणागती पत्करली.
‘तराबलस’ वर विजयी पताका रोवून माननीय अमरू बिन आस(र.)यांनी तेथेच तळ ठोकून लष्कराचा एक दस्ता ‘तराबलस’ पासून थोड्या अंतरावर असलेल्या ‘सबरा’ शहराकडे पाठविला. हा दस्ता शहरात दाखल झाला आणि येथील सुरक्षा दलाने इस्लामी लष्करासमोर आत्मसमर्पण केले.
माननीय अमरु बिन आस(र.)यांनी लाखो चौरस मैल क्षेत्रावर इस्लामी शासनाचा झेंडा रोवला आणि आता ते ‘अस्कंदरीया’पासून शेकडो मैल दूरवर एका अशा ठिकाणी वास्तव्यास होते जेथे पाणी कमी हते आणि प्रवासही खडतर होता. परंतु त्यांचे मनोबल खूप कणखर आणि मजबूत होते. आता त्यांना आपली विजयी दृष्टी ट्यूनेशिया, अलजझायर आणि मोरॅक्कोकडे वळली. त्यामुळे त्यांना इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांना पत्र पाठविले की, ‘‘आम्ही ‘तराबलस’पर्यंतचा भाग ताब्यात घेतला. आता येथून टयूनेशिया, अलजसायर आणि मोरॅक्को फक्त नव्वद दिवसांच्या अंतरावर आहे. परवानगी असेल, तर आम्ही या प्रदेशावरही इस्लामी राज्य स्थापन करू. माननीय उमर फारुक(र.)यांनी पत्राचे उत्तर देताना लिहिले,
‘’अफ्रिकया(ट्यूनेशिया, अलझझायर व मोरॅक्को) मध्ये प्रवेश करू नका. हा प्रदेश उपद्रव आणि वैरभावाचे केंद्र आहे. तेथील लोक संघटित नसतात. तेथील पाणीच असे आहे की, त्यास पिणारा माणूस हा कठोरहृदयी होतो.’’ याचबरोबर माननीय अमरु बिन आस(र.)यांना माननीय उमर फारुक(र.)यांनी इजिप्तचे राज्यपालपद बहाल करण्याचीदेखील घोषणा केली. अस्कंदरीयावर ताबा मिळविल्यानंतर बरेच रोमन लोक शहर सोडून रोमन सम्राटाच्या शहरात जाऊन वसले होते. त्यामुळे तेथील बरेच बंगले आणि हवेल्या रिकाम्या होत्या. माननीय अमरु बिन आस(र.)यांनी याच ठिकाणी देशाची राजधानी बनविण्याची परवानगी माननीय उमर(र.)यांच्याकडे मागितली. परंतु माननीय उमर फारुक(र.)यांनी परवानगी दिली नाही आणि त्यांना लिहिले की,
‘‘मला योग्य वाटत नाही की, तुमच्या आणि माझ्या दरम्यान एवढी मोठी नदी आडवी असावी आणि एवढे मोठे अंतर असावे.’’
यानंतर माननीय अमरु(र.)यांनी ‘किस्तान’ नावाचे नवीन शहर उभारले आणि याच शहरास येथील इस्लामी सत्तेचे केंद्र बनविले. हे शहर अशा प्रकारे उभारण्यात आले, त्याचा सविस्तर वृतान्त शिबली नोअमानी(र.)या इतिहासतज्ञांनी ‘अल फारुक’ या ग्रंथात अशा प्रकारे सादर केला आहे,
‘‘माननीय अमरु(र.)हे ‘अस्कंदरीया’हून ‘कसर-ए-शमा’ येथे आले. अस्कंदरीयावरील हल्ल्याच्या वेळी ठोकण्यात आलेले तळ अजूनही तसेच रिकामे पडलेले होते. म्हणून त्यांनी याच तळावर नवीन शहर वसविले. प्रत्येक कबिल्याच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आणि ‘मआविया बिन खदीज’, ‘शरीक बिन समी’, ‘अमरू बिन मख्जूम’ आणि ‘इब्ने नाशेरा’ यांना नगररचना करण्याची जबाबदारी सोपविली. येथे एक विशाल ‘जामा मस्जिद’(केंद्रीय मस्जिद) उभारण्यात आली. या अतिविशाल मस्जिदीस तिन्ही बाजुंना द्वार बसविण्यात आले आणि मुख्य प्रवेशद्वार हे राजधानीच्या इमारतीच्या समोरच्या दिशेस ठेवण्यात आले. माननीय अमरु(र.)यांनी इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांच्यासाठीसुद्धा एका निवासाची इमारत उभी केली परंतु माननीय उमर फारुक(र.)यांनी लिहिले की, ‘‘त्याचे मी काय करणार.’’ म्हणून शेवटी ही विशाल वास्तु शहराच्या मुख्य बाजारपेठेसाठी वापरण्यास घेतली. हे शहर हिजरी सन २१ मध्ये उभारण्यात आले.’’
किस्तात शहर उभारण्यास सुरुवात झाली तेव्हाच माननीय अमरु(र.)यांनी शहराच्या समोर आणि नाईल नदीच्या पश्चिमी किनार्यावर एक अस्थायी स्वरुपाची छावणीदेखील उभारली. नंतर माननीय उमर फारुक(र.)यांनी अमरु बिन आस(र.)यांना आदेश पाठविला की, ‘‘शहराच्या चारही बाजूस भव्य तटबंदी उभी करा.’’ हा आदेश मिळताच अमरु बिन आस(र.)यांनी एका भव्य व अलिशान आणि मजबूत किल्ल्याची निर्मिती केली.
माननीय उमर फारुक(र.)यांनी इस्लामी राज्यांच्या सर्व राज्यपालांना आदेश दिला की, त्यांनी ‘हज’ च्या प्रसंगी मदीना शहरी यावे आणि संपूर्ण जनतेस आवाहन केले की, ‘‘जर नागरिकास एखाद्या राज्यपालाविरुद्ध तक्रार असेल, तर ती निर्भयतेने माझ्याकडे करावी.’’ एकदा माननीय उमर फारुक(र.)यांनी अशाच प्रसंगी लोकांना उद्देशून भाषण करताना म्हटले,
‘‘इस्लामी शासनाच्या जनवासियांनो! ज्या लोकांची मी तुमच्या राज्याचे राज्यपालपदी नेमणूक करतो, त्यांना या गोष्टीचा मुळीच अधिकार नाही की, त्यांनी तुम्हास चापट मारावी, तुमची संपत्ती बळकावावी किवा इतर कोणत्याही प्रकारे तुमचा छळ करावा. या उलट मी नेमलेल्या राज्यपालांची जवाबदारी आणि कर्तव्य हे आहे की, त्यांनी तुमच्या प्राण, संपत्ती आणि इभ्रतीचे रक्षण करावे आणि तुम्हाला आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या सत्यमार्गावर आचरणाची दिशा द्यावी. हे प्रत्येक राज्यपालाचे परम कर्तव्य असून ज्या राज्यपालाने या कर्तव्यात थोडी जरी कुचराई केली, त्याच्या बाबतीत निःसंकोचपणे तक्रार करावी. मी या तक्रारीची याच ठिकाणी गंभीर दखल घेऊन फिर्यादीस न्याय देईन.’’
एवढ्यात एक बिगरमुस्लिम इजिप्शियन उठून उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘अमीरुल मुअमिनीन ‘अमरु बिन आस’ या राज्यपालाने मला विनाकारण शंभर कोरडे मारले.’’ माननीय उमर फारुक(र.)यांनी त्यास सांगितले की, ‘‘तुम्हीसुद्धा राज्यपालास शंभर कोरडे मारू शकता आणि ते देखील या सर्व उपस्थितासमोर!’ आणि मग राज्यपाल अमरु बिन आस(र.)यांनी त्यास दोनशे दिरहम घेऊन ही शिक्षा माफ करण्याची विनंती केली व फिर्यादीने ती आनंदाने मान्य केली.
एकदा तर अतिशय विलक्षण घटना घडली. ती अशी की, इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)यांच्याकडे तक्रार आली की, इजिप्तचे राज्यपाल अमरु बिन आस(र.)यांचा मुलगा ‘इब्ने अमरु’ याने घोडदौडीच्या प्रशिक्षण मैदानावर एका इजिप्शियन बिगर मुस्लिम रहिवाशास असे सांगून बदडले की, ‘मी मोठ्या बापाचा अर्थात राज्यपालाचा पुत्र असल्याने माझ्या सरावाच्या वेळी घोडेस्वारीसाठी येऊन मला त्रास देऊ नकोस.’
माननीय उमर फारुक(र.)यांनी फिर्यादीस आपल्याचकडे थांबवून घेतले. आणि इब्ने अमरु या आरोपीस तत्काळ हजर होण्याचे आदेश दिले. त्यांनी फिर्यादीच्या हातात कोरडा देऊन म्हटले,
‘‘या मोठ्या बापाच्या बिघडलेल्या पुत्राचा या कोरड्याने खरपूस समाचार घे. तुझा आत्मा शांत होईपर्यंत मारीत राहा!’’
फिर्यादीने हातात कोरडा घेऊन सर्वांसमक्ष ‘इब्ने अमरु’ अर्थात राज्यपालाच्या पुत्राला बदडण्यास सुरुवात केली. याचबरोबर माननीय उमर फारुक(र.)म्हणत होते,
‘‘मार! आणखीन मार, या मोठ्या बापाच्या लाडात बिघडलेल्या पुत्राला!! आणखीन मार!!!’’
फिर्यादीने त्यास मारुन झाल्यावर माननीय उमर फारुक(र.)यांनी इजिप्तचे राज्यपाल असलले आरोपीचे वडील माननीय अमरु(र.)यांना फिर्यादीसमोर करून म्हणाले,
‘‘तुझी इच्छा असेल तर यांनादेखील चांगले बदडून काढ! याच मोठ्या बापाचा तो बिघडलेला पूत्र आहे!’’ परंतु फिर्यादी म्हणाला, ‘‘हे उमर(र.)! आता माझी तक्रार संपली. मला न्याय मिळाला!’’ आता माननीय उमर फारुक(र.)यांनी या दोन्ही बाप- लेकांना क्रोधपूर्ण शब्दात खडसावले,
‘‘याच्या आईने(अर्थात फिर्यादीच्या आईने) तर याला ‘स्वतंत्र’ मानवाच्या स्वरुपात जन्म दिला, तुम्ही केव्हापासून यास गुलाम बनविले?’’
माननीय उमर फारुक(र.)यांच्या या वाक्याचा अर्थ असा की, प्रत्येक माणूस हा स्वतंत्रपणे जन्मतो. अर्थात स्वातंत्र्य हा प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून त्याच्यावर अत्याचार करणे म्हणजे त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे व त्यास गुलाम बनविणे होय. इस्लामी शासनाच्या राज्यपालाच्या मुलालासुद्धा जनतेवर अत्याचार करण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून अत्याचारपीडितास समाधान होईपर्यंत आरोपीस शिक्षा मिळालीच पाहिजे. हाच इस्लामी शासनाचा नियम आहे. याच नियमामुळे जनतेने रोमन साम्राज्य झुगारून इस्लामी शासनाची न्यायपूर्ण छत्रछाया स्वीकारली आणि जवळपास ७५ टक्के विश्व इस्लामी शासनाच्या अधिपत्याखाली आले.
इजिप्तच्या इस्लामी राज्यपालपदी असताना माननीय अमरु बिन आस(र.)यांनी ‘नहरे अमीरुल मुआमिनीन’ हा कालवा बांधला. याचा संक्षिप्त इतिहास असा आहे की, हिजरी सन २१ मध्ये मदीना शहर आणि याच्या परिसरात भयंकर दुष्काळ पडला. नद्या-नाले पूर्णतः आटून गेले होते. परिणामी तेथील व्यापारसुद्धा बंद झाला. ही दुष्काळजन्य परिस्थिती हातळण्यासाठी उमर फारुक(र.)यांनी सर्व राज्यपालांना पाचारण केले. सर्व राज्यपालांनी मदीनासाठी भरघोस मदत केली. ‘इजिप्त’ मदीनापासून खूप दूर असल्याने तेथून मदत पोहोचू शकली नाही. म्हणून माननीय उमर(र.)यांनी त्यांना पत्र लिहिले की, ‘तत्काळ मदत पोहोचवावी.’
यावर माननीय अमरु(र.)यांनी उत्तर दिले की ‘हे अमीरुल मुअमिनीन, लवकरच मदत पाठवीत आहे. रसद घेऊन उंटाचा मोठा काफिला रवाना करीत आहे. तसेच समुद्र मार्गानेही रसद येण्याची आशा आहे.’
यानंतर त्यांनी ‘नहरे अमीरुल मुअमीनीन’ या विशाल कालव्याची निर्मिती केली. शेवटी संपूर्ण इजिप्त जिकून इस्लामी शासनास जोडणारा हा थोर सेनापती परलोक मार्गी रवाना झाला.

प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहर त्याग करून मदीना शहरात वास्तव्य केले आणि संपूर्ण मदीना शहर प्रेषितत्वाच्या सुगंधाने ढवळून निघाले. सर्वत्र मदीना शहरात आनंदाचे वातावरण होते. एके दिवशी काही सोबत्यांनी बारा वर्षे वयाचा एक गोंडस आणि निरागस मुलगा प्रेषितदरबारी हजर केला आणि आदरणीय प्रेषितांना म्हणाले,
‘‘हे प्रेषित! हा मुलगा ‘नज्जार’ परिवाराचा सुपुत्र असून यास दिव्य कुरआनचा अभ्यास करण्याचा खूप छंद आहे. याने आतापर्यंत कुरआनाच्या एकूण सतरा ‘सूरती’ मुखपाठ केल्या आहेत.’’
विश्वकृपाळू प्रेषित मुहम्मद(स.) हे ऐकून खूप आनंदीत झाले. त्यांनी या मुलास दिव्य कुरआनच्या मुखपाठ असलेल्या सूरती वदन्याचा आदेश दिला. या सुकुमाराने तत्काळ आदेशाचे पालन केले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) खूप प्रसन्न झाले आणि आशीर्वाद देऊन त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरविला, हेच बाळ ‘माननीय झैद बिन साबित अन्सारी(र.)होत.
धार्मिक ज्ञानसंपदा आणि शिक्षण-प्रशिक्षणात हाडाचे शिक्षक असलेल्या प्रेषितसोबत्यांपैकी एक असलेले माननीय झैद बिन साबित अन्सारी हे वयाच्या अकराव्या वर्षीच इस्लामचे खंदे समर्थक बनले. त्यांचा जन्म हिजरी सन पूर्व १२ मध्ये झाला. ते ‘अबू सईद’ या टोपणनावानेसुद्धा ओळखले जातात. ते इस्लामी धर्मशास्त्राचे अतिशय महान विद्वान होते. त्यांची वंशपरंपरा अशी,
झैद पिता साबित पिता जहाक पिता झैद पिता लजान पिता अमरु पिता अबद पिता ऑफ पिता गनम पिता मालिक पिता नज्जार.
माननीय झैद बिन साबित(र.)यांचे पिता प्रेषित स्थलांतराच्या पाच वर्षांपूर्वीच वारले होते. लहानपणीच त्यांची पितृछाया हरपल्याने ते माता ‘नवार बिन्त मालिक’ यांच्याच प्रेमळ मायेत वाढले. हिजरी सन पूर्व १ मध्ये इस्लाम धर्माचे प्रचारक व प्रसारक माननीय मुसअब बिन उमैर(र.)हे मदीना शहरी आले, त्याच वेळी त्यांच्या इस्लाम प्रचारकार्यामुळे ‘अवस’ आणि ‘खजरच’च्या घराण्यात इस्लाम धर्मावर चर्चा रंगल्या. याच काळात इस्लाम धर्म स्वीकारण्याचे सौभाग्य मिळविणार्यांपैकी माननीय झैद बिन साबित(र.)सुद्धा आहेत. ईश्वराने त्यांना अत्यंत पवित्र आचरण आणि मनमिळाऊ स्वभावाने वरदानित केले होते. इस्लाम स्वीकारताच त्यांनी दिव्य कुरआनचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांच्या अभ्यासु वृत्तीमुळे ते सर्व अन्सारी सोबत्यांमध्ये प्रतिष्ठित होते. प्रचंड स्मरणशक्ती असल्याने आणि अभ्यासु वृत्तीमुळे सर्वांचे ते खूप लाडके होते. त्यांनी अगदीच अल्पकाळात अरबी भाषेव्यतिरिक्त इतर बर्याच भाषांचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळविले होते. त्यांना अरबी, इब्रानी, अॅबिसीनीयन, कब्ती, रोमन, पर्शियन आणि इतर अनेक भाषांतर उत्तम प्रभुत्व मिळविले होते. त्यांचे हस्ताक्षरदेखील अतिशय सुरेख होते. शिवाय कलाकुसरीच्या कामात त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले होते. अंकगणित आणि भूमिती शास्त्रात त्यांनी बरेच संशोधन केले होते.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) त्यांच्यातील या सर्व विषयांच्या प्राविण्यामुळे त्यांचा खूप लाड पुरवीत असत. त्यामुळे आदरणीय प्रेषितांवर अवतरित होणारे दिव्य कुरआन लिहिण्याची कामगिरी देखील त्यांच्यावरच सोपविण्यात आली होती.(संदर्भ : मुस्नदे अहमद)
‘बदर’च्या रणांगणावरील इस्लाम आणि इस्लामविरोधी शक्तीदरम्यान हिजरी सन २ मधील रमजान महिन्यात झाले. धर्मयुद्धात सहभागी होण्याकरिता वयार्ची पंधरा वर्षे पूर्ण होण्याची अट प्रेषितांनी लावली होती. परंतु धर्मयुद्धाने प्रेरित झालेले माननीय झैद(र.)हे आपल्या सवंगड्यांना घेऊन प्रेषितदरबारी हजर झाले आणि युद्धात सहभागी होण्याची परवानगी देण्याची विनंती केली. परंतु आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली नाही.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ओहदच्या धर्मयुद्धात आपल्या युद्धकौशल्याची चुणूक दाखविली. यानंतर त्यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्याबरोबर बर्याच युद्धांत आपले कौशल्य दाखविले. तबूकच्या युद्धात त्यांनी अभूतपूर्व कौशल्य दाखविले. एवढेच नव्हे, तर अतिशय कमी वयात आदरणीय प्रेषितांनी त्यांना लष्कर प्रमुखपदसुद्धा दिले.
माननीय उमर फारुक(र.)यांच्या इस्लामी शासनकाळात ते मदीना शहराचे न्यायाधीश होते. एकदा इस्लामी शासक माननीय उमर फारुक(र.)आणि ‘उबै बिनकआब(र.)’ यांच्यात काही कारणास्तव मतभेद निर्माण झाले. त्यांचे मतभेद प्रकरण माननीय झैद(र.)यांच्या न्यायालयात दाखल झाले. माननीय उमर फारुक(र.)हे इस्लामी शासक असल्याने माननीय झैद(र.)यांनी त्यांना विशेष आसनाची व्यवस्था केली आणि माननीय उबै बिन कआब(र.)हे सामान्य आसनावर बसले. ही विशेष व्यवस्था पाहून माननीय उमर(र.)खूप नाराज झाले आणि माननीय झैद(र.)यांना म्हणाले, ‘‘न्यायालयात राजा आणि प्रजेदरम्यान असा कोणताच भेद असेलला मी खपवून घेणार नाही आणि ते माननीय उबै बिन कआब(र.)यांच्या बाजूला जाऊन बसले.
माननीय उमर फारुक(र.)यांना माननीय झैद(र.)यांच्या कार्यकौशल्यावर खूप विश्वास होता. ते मक्का शहरी पवित्र हज यात्रेस गेल्यावर माननीय झैद(र.)यांच्यावरच इस्लामी शासनाची जवाबदारी सोपवून गेले होते. शिवाय शासकीय कारभाराचे इस्लामी नियम आणि कायदेकानू तयार करण्यात त्यांनी खूप हातभार लावला. शासकीय वेतनश्रेणी आणि आर्थिक व्यवस्थेचे उत्तम नियम त्यांनी घालून देण्यास मदत केली.
हिजरी सन २४ मध्ये माननीय उमर(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय उस्मान(र.)यांनी इस्लामी शासनाची धुरा सांभाळली, तेव्हासुद्धा त्यांनी इस्लामी राज्यकारभारास भरपूर मदत केली. माननीय उस्मान(र.)सुद्धा त्यांचा खूप आदर करीत असत.
माननीय उस्मान(र.)यांच्या हौतात्म्यानंतर माननीय अली(र.)यांनी हाती इस्लामी शासनाची धुरा सांभाळली. त्यांच्या काळातही माननीय झैद बिन साबित(र.)यांनी इस्लामी शासनाची आजीवन सेवा केली.
माननीय झैद(र.)यांना असलेल्या धर्मज्ञानाच्या बाबतीत आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) हे स्वतः म्हणत की, इस्लामच्या अनिवार्य कर्माचे सर्वांत जास्त ज्ञान झैद(र.)यांना आहे. वारसाहक्क विधीतील अतिशय कठीण ज्ञानावर त्यांना कमालीचे प्रभुत्व होते. प्रेषितांच्या काळातसुद्धा ते धर्मविधीच्या विविध विषयांवर फतवे देत असत. माननीय उमर फारुक(र.)यांनी मदीना शहरात त्यांची उपस्थिती अगदी अनिवार्य समजली होती. त्याचप्रमाणे माननीय झैद(र.)यांना दिव्य कुरआन, प्रेषितवचने आणि धर्माविधी तत्त्वज्ञानातही पारंगत होते. एवढेच नव्हे तर कुरआनच्या पठनातील उच्चारशास्त्रातही ते कुशल हते. त्यांच्याकडून एकूण ९२ प्रेषितवचने कथन करण्यात आली आहेत.
माननीय झैद(र.)शुद्ध आचरणाचे व्यक्ती होते. त्यांच्या नीतिमत्ता ग्रंथाच्या पानावर इस्लाम स्वीकारण्यातील पुढाकार, ज्ञानार्जनाचा छंद, प्रेषितावरील अपार प्रेम, प्रेषित जीवनचरित्राचे अनुकरण, सत्यवचन आणि नम्रता हे विशेष गुणधर्म स्पष्टपणे आढळतात. त्यांनी जीवनाचा अधिकांश काळ प्रेषितांच्या सोबत व्यतीत केला. सकाळी उठून ते प्रेषितांकडे जात असत. आदरणीय प्रेषितसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करीत असत. त्यांना आपल्याजवळ बसवीत असत. ‘ज्यू’ लोकांकडून होणारा इब्रानी भाषेतील पत्रव्यवहार तेच हाताळत असत. आदरणीय प्रेषितांच्या आदेशामुळेच त्यांनी इब्रानीसह अनेक भाषा अवगत केल्या होत्या.
प्रेषित जीवनाच्या नियमांचा माननीय झैद(र.)अगदी काटेकोरपणे अनुकरण करीत आणि इतरांनाही याचे नियम शिकवीत असत. प्रेषित जीवनाच्या नियमांविरुद्ध कोणाचेही कर्म ते मुळीच खपवून घेत नसत. एके दिवशी आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘तीन गोष्टी मुस्लिम माणसाच्या अंतःकरणास चैतन्य प्रदान करतात. प्रथम हे की, प्रत्येक कार्य ईशप्रसन्नतेखातरच करावे. द्वितीय हे की, शासकांना सत्यनिष्ठेचा आग्रह करावा, तृतीय हे की, संघटित राहावे.
माननीय झैद(र.)यांचा स्वभाव खूप मनमिळाऊ होता. ते सर्वांनाच मोठ्या आनंदाने, प्रेमपूर्वक व आस्थेने भेटत असत. कोणत्याही लहान-मोठ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देत असत. आपल्या ज्ञानावर कधीच गर्व करीत नसत. विद्येबरोबरच त्यांच्यात विनयशीलता होती. अशा या अत्यंत महान आणि सूज्ञ इस्लामी विद्वानाचे जीवनचरित्र आपल्यासाठी मोठाच बोधात्मक उपदेश आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी हिजरी सन ४६ मध्ये हे महान विद्वत्ता, ज्ञान-विज्ञानाचा अभूतपूर्व खजिना संपूर्ण मानवजातीस देऊन परलोकी प्रवासास निघाला.

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या दरबारी एकदा माननीय अली(र.)हजर होते. एवढ्यात एक अत्यंत देखणी देहयष्टी, रुंद आणि उंच शरीर, सुंदर आणि बोलके डोळे असलेला एक तरुण आत येण्याची परवानगी मागत होता. त्यांचा आवाज ऐकून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) म्हणाले,
‘‘हे पवित्र आचरणाच्या तरुणा! तुमचे हार्दिक स्वागत असो.’’
हे तरुण ज्यांना स्वयं आदरणीय प्रेषितांनी ‘‘तय्यबुल मुतय्यिब’’(पवित्र आचरणाचा) या अति-प्रतिष्ठित शब्दांनी संबोधिले, हेच माननीय अम्मार बिन यासिर(र.)होत. माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांची गणना प्रेषितांच्या अतिशय लाडक्या सोबत्यांमध्ये होते. त्याचे पिता माननीय यासिर(र.)आणि माता सन्माननीय सुमैया(र.)यांनीदेखील इस्लाम स्वीकारला होता. माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांची वंशशृंखला अशी आहे,
‘‘अम्मार पिता यासिर पिता आमिर पिता मालिक पिता कनाना पिता कैस पिता अलहसीन पिता लूझीम पिता औफ पिता आमिरुल अकबर पिता याम पिता अनस.’’
माननीय अम्मार(र.)यांचे पिता माननीय यासिर(र.)हे ‘कहतानी’ वंशाचे असून ‘येमेन’ चे रहिवासी होते. ते आपल्या हरवलेल्या भावाच्या शोधार्थ ‘मक्का’ शहरी आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे दोन बंधु ‘मालिक’ आणि ‘हारिस’ देखील होते. त्यांचा भाऊ मक्का शहरात त्यांना सापडला नाही. म्हणून त्यांचे बंधु ‘येमेन’ला परत गेले, परंतु माननीय यासिर मक्का शहरातच स्थायिक झाले. ही घटना प्रेषितजन्माच्या पांच वर्षापूर्वीची आहे. अबू हुजैफा यांनी माननीय यासिर(र.)यांचे लग्न ‘सुमैया’ नावाच्या मुलीशी केले. याच सन्माननीय सुमैया(र.)च्या पोटी अम्मार(र.)आणि अब्दुल्लाह(र.)ही दोन मुले जन्मली. काही काळानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इस्लामचा प्रचार सुरु केला आणि या संपूर्ण कुटुंबाने इस्लामचा स्वीकार केला.
‘सहीह बुखारी’ ग्रंथात आहे की, माननीय अम्मार(र.)यांनी व त्यांच्या परिवाराने अगदीच सुरुवातीच्या काळात इस्लाम स्वीकारला. हा काळ इतका कठीण होता की, इस्लामचे नाव घेणार्यास असीम यातना सहन कराव्या लागत असत. इस्लाम स्वीकारतेवेळेस यांचा परिवार अबू जहल या अत्यंत भयानक इस्लामद्रोह्याचे गुलाम होता. इस्लाम धर्माचे द्रोही आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांनासुद्धा आतोनात अमानवी यातना देत होते. या दोन मुले अर्थात अम्मार, अब्दुल्लाह आणि त्यांचे माता-पिता यासिर आणि सुमैया यांच्यावरसुद्धा खूप अमानवी अत्याचार करण्यात आले. माता सुमैया(र.)आणि पिता यासिर(र.)हे खूप वृद्ध होते. इस्लामद्रोह्यांनी केलेले असीम अत्याचार सोसूनही त्याचे पाय कधीच डगमगले नाहीत. वृद्ध असलेले यासिर(र.)शेवटी शत्रूंचे अत्याचार सहन करताना मृत्यू पावले आणि मग एके दिवशी ‘अबू जहल’ या इस्लामद्रोह्याने अतिशय वृद्ध असलेल्या सुमैया(र.)यांच्या गुप्तांगावर भाला मारून ठार केले. इस्लाम स्वीकारण्यावरून ईश्वरासाठी दिलेले हे इतिहासातील पहिले बलिदान होय. यानंतर अम्मार(र.)यांचे बंधु अब्दुल्लाह(र.)यांनासुद्धा क्रूरकर्मा ‘अबू जहल’ याने ठार केले. आता केवळ अम्मार बिन यासिर(र.)राहिले. त्यांना या घटनांचे अपार दुःख झाले. परंतु क्षणभरही त्यांनी इस्लामचा ध्यास सोडला नाही. माता, पिता आणि बंधुच्या हौतात्म्यानंतर त्यांच्यावर अमानवी अत्याचारांची शृंखला चालूच होती.
मदीनेस स्थलांतरापर्यंत माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांनी इस्लाम द्रोह्यांचे खूप छळ सोसले. दरम्यानच्या काळात अॅबीसीनियामध्ये ते काही काळ राहिले. माननीय अम्मार(र.)प्रेषित स्थलांतरपूर्वी एक महिन्यापूर्वी मदीनेस स्थलांतर केले. त्यांच्यासोबत आणखीन प्रेषितांचे पाच सोबती होते.
माननीय अम्मार(र.)यांनी आधी ‘कुबा’कडे स्थलांतर केले. तेथे माननीय मुबश्शिर(र.)यांनी त्यांना आश्रय देऊन त्यांचा पाहुणचार केला होता. नंतर आदरणीय प्रेषितांनीसुद्धा ‘कुबा’कडे स्थलांतर केले होते. त्यांनी तेथे ‘मस्जिद-ए-कुबा’ची आधारशिला ठेवली. इतर सोबत्यांप्रमाणे माननीय अम्मार(र.)यांनीदेखील या कामात मन लावून भाग घेतला. काही दिवसांनंतर माननीय अम्मार(र.)प्रेषितांसोबत मदीनेस आले. प्रेषितांनी त्यांना कायमस्वरुपी तेथे राहण्याकरिता जागा सुद्धा प्रदान केली.
माननीय अम्मार(र.)हे इस्लामचे शूर शिपाई होते. आदरणीय प्रेषितांवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. अगदी ‘बदर’च्या युद्धापासून इस्लामचे अंतिम युद्ध म्हणजे ‘तबूक’पर्यंत प्रत्येक युद्धात ते प्रेषितांबरोबर प्राण पणाला लावून लढले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) सुद्धा त्यांच्या कार्य, प्रामाणिकतेची अगदी मनापासून कदर करीत असत.
एका युद्धाच्या वेळी लष्करप्रमुख खालिद बिन वलीद(र.)आणि अम्मार बिन यासिर(र.)यांच्यात मतभेद झाले. प्रेषितदरबारी आल्यावरसुद्धा खालिद बिन वलीद(र.)यांनी अम्मार बिन यासिर(र.)यांना खूप ठणकावले. तेव्हा अम्मार बिन यासिर(र.)प्रेषितांना म्हणाले, ‘‘हा माणूस आपल्या उपस्थितीतसुद्धा मला दरडावून बोलत आहे.’’ यावर आदरणीय प्रेषित खालिद बिन वलीद(र.)यांना उद्देशून म्हणाले, ‘‘हे खालिद(र.)! तोंड बंद करा! जो अम्मारकरिता वाईट शब्द बोलतो, तो जणू ईश्वराविरुद्ध वाईट शब्द बोलतो. जो अम्मार यांचा द्वेष करतो, तो जणू ईश्वराचा द्वेष करतो आणि जो अम्मार यांचा अपमान करतो, तो जणू ईश्वराचा अपमान करतो!’’ आदरणीय प्रेषितांचे हे शब्द ऐकून माननीय खालिद बिन वलीद(र.)खूप घाबरले. त्यांनी अम्मार(र.)यांची माफी मागितली. माननीय खालिद बिन वलीद(र.)म्हणतात की, ‘‘तो दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता. मी प्रेषितांना विनंती केली की, मी अम्मारची माफी मागितली आणि त्यांनी मला मनःपूर्वक माफ केले. म्हणून आपण ईशदरबारी माझ्या मोक्षाची प्रार्थना करावी.’’
माननीय अबू बकर(र.)यांचा इस्लामी खलीफा खूप आदर करीत असत. इस्लामचे दुसरे खलीफा माननीय उमर फारुक(र.)यांचेदेखील ते खूप जवळचे मित्र होते. एकदा कुरैश कबिल्याचे काही प्रतिष्ठित लोक माननीय अबू सुफयान(र.), माननीय हारिस(र.), माननीय सुहैल बिन अमरु(र.)हे माननीय उमर फारुक(र.)यांच्याकडे आलेले होते. एवढ्यात माननीय अम्मार(र.), माननीय बिलाल(र.)आणि माननीय सुहैब(र.)देखील माननीय उमर(र.)यांना भेटण्यासाठी आले, तेव्हा माननीय उमर फारुक(र.)यांनी प्रथम माननीय अम्मार(र.), बिलाल(र.)आणि सुहैब(र.)यांची भेट घेतली आणि मग माननीय अबू सुफयान(र.)यांना भेटले. हिजरी सन २० मध्ये माननीय उमर फारुक(र.)यांनी माननीय अम्मार(र.)यांची ‘कुफा’च्या राज्यपालपदी नेमणूक केली तेव्हा कुफावासीयांना उद्देशून ‘आदेशपत्र’ पाठविले,
‘‘कुफावासियांनो! मी तुमच्याकडे माननीय अम्मार(र.)यांना राज्यपालपदी पाठविले आणि माननीय इब्ने मसऊद(र.)यांना धर्मशिक्षक आणि मंत्रीपदी पाठविले आहे. हे दोघेजण आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांचे लाडके आणि बदरच्या युद्धात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळविलेले ज्येष्ठ सोबती आहेत. त्यांच्या आदेशांचे पालन करावे. इब्ने मसऊद(र.)यांना मी तुमच्या भागाच्या आर्थिक प्रकरणांची जवाबदारी पण सोपविली आहे. उस्मान बिन हारिस(र.)यांना पूर्व इराकचे भूमापन आणि महसुलाची जवाबदारी सोपविली आहे. माननीय अम्मार(र.)यांनी एक वर्ष, नऊ महिण्यांपर्यंत ‘कुफा’चे राज्यपालपद भूषविले.
माननीय अम्मार बिन यासिर(र.)यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. संपूर्ण आयुष्यभर इस्लामची सेवा करण्यात गेले त्यामुळे त्यांना स्वतःचे घर बांधण्याचीसुद्धा सवड मिळाली नाही. ते राज्यपालपदी असतानासुद्धा त्यांच्या राहणीमानात काहीच बदल झाला नाही. ते स्वतःची कामे स्वतःच करीत. बाजारात स्वतः जाऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून स्वतःच्या पाठीवर घेऊन येत. घरातील सर्व कामकाज स्वतःच करीत. पोषाखसुद्धा खूप साधा वापरीत. एखाद्या ठिकाणी फाटल्यास स्वतःच्या हाताने त्यात ठिगळ लावीत. ते अतिशय सौम्य स्वभावाचे होते. धैर्य आणि संयम त्यांच्या स्वभावात होता. कलह आणि भांडणतंट्यापासून ते खूप दूर असत. बदरच्या युद्धात त्यांचा एक कान तुटला होता. एकदा एक टवाळखोराने त्यांना चिडविण्यासाठी आरोळी मारली, ‘‘ए कानकाप्या!’’ माननीय अम्मार(र.)यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून अतिशय प्रेमपूर्वक स्वरात म्हटले,
‘‘माझा हा कान इस्लामरक्षणार्थ कापण्यात आला व मला याचा अभिमान आहे!’’
त्यांचे माननीय अली(र.)यांच्यावर खूप प्रेम होते. त्यांना कोणी वाईट म्हटलेले ते खपवून घेत नसत. सत्यवचन बोलण्यात ते कोणासमोरही घाबरत नसत. ते प्रत्येक काम ईश्वराच्या प्रसन्नतेखातर करीत असत. सत्यासाठी ते आजीवन लढले.

अरब समाजाचा आणि जगातील इतर राष्ट्रांचासुद्धा इस्लामपूर्व काळ हा अगदीच मार्गभ्रष्ट काळ होता. लिहिण्या-वाचण्याची कमतरता असलेल्या अरब समाजात मात्र कवनशास्त्र खूप प्रगत होते. अरब लोक अशिक्षित व असंस्कृत तर होतेच, परंतु अख्ख्या जगामध्ये कवनशास्त्रात त्यांचा कोणी स्पर्धक नव्हता. उच्च भाषाशैली आणि कविता त्यांच्या स्वभावातच होती. जणू अगदी लहानलहान मुलेसुद्धा कवनशास्त्रात तरबेज असत. एवढेच नव्हेतर गुलामांनासुद्धा कवनशास्त्रावर कमालींचे प्रभुत्व होते. त्या काळात मोठमोठी कविसंमेलने होत असत. या कविसंमेलनात दूरदूरचा प्रवास करून पुरुष व महिला मोठ्या संख्येत सहभागी होत असत. स्त्रियांसुद्धा कवनशास्त्रात खूप तरबेज होत्या. अरबांना आपल्या काव्यशक्तीचा एवढा अभिमान होता की, बिगर अरबांना ते ‘अजमी’(अर्थात बोलता न येणारा) या नावाने संबोधत असत. तसे पाहता ‘अरब’ या शब्दाचाच अर्थ ‘वक्तृत्व कलेत पारंगत असलेला’ असा होतो. आणि त्यांच्या वक्तृत्व प्राविण्यामुळेच ते जगभर ‘अरब’ या नावाने प्रसिद्ध होते.
हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने सर्वांनाच प्रभावित करीत असत. वैयक्तिक आवडीशिवाय हे लोक आपल्या वक्तृत्वकलेने आणि काव्याने राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती बदलून टाकीत असत. अगदी युद्धाच्या वेळी योद्ध्यांना युद्धप्रेरणा देण्यासाठी सर्वांत जास्त प्रभावी माध्यम वक्तृत्वशास्त्रच होते. एखाद्याचा विरोध करण्यासाठीसुद्धा सर्वांत प्रभावी माध्यम कवनशास्त्रच होते. ‘तलवारीपेक्षाही जास्त तीक्ष्ण असलेले प्रभावी हत्यार म्हणजे कवनशास्त्र’, असेच त्या काळी समीकरण होते. कवनशास्त्राने त्या काळी मोठमोठे शूरवीर आणि योद्धे तयार केले. युद्धातील जय-पराजयाची पूर्ण परिस्थिती आणि सामाजिक व राजकीय परिस्थिती बदलून टाकण्याची अफाट शक्ती त्यांच्या कवनशास्त्रात होती.
अशा काळात आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी प्रेषित्वाची घोषणा करताच संपूर्ण अरबस्थान त्यांच्या विरोधात पेटून उठला. त्यांच्या विरोधात या समाजाने तलवार आणि भाल्यासह कवनशास्त्राच्या अतिप्रभावी हत्याराचासुद्धा भरपूर वापर केला. आदरणीय प्रेषितांनी मायभूमीचा त्याग केल्यावरसुद्धा हा विरोध थंडावण्याचे नाव घेत नव्हता. इस्लामद्रोह्यांनी इस्लाम व प्रेषितांविरुद्ध कवितांचा पर्वत रचून संपूर्ण अरब जगतात आणि अरब समाजाच्या प्रत्येक व्यक्तीत इस्लामविरोधी प्रेरणात्मक चळवळ उभी केली होती. इस्लामविरोधी कविता काही दिवसांतच कित्येक मैल दूरवर आपला प्रभाव टाकत होत्या. इस्लामसमर्थकांना रात्रंदिवस अशा काव्यांचा सामना करणे भाग होते. या मानसिक त्रासातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रेषितसोबत्यांनी माननीय अली(र.)यांना विनंती केली की, ‘‘आपण इस्लामद्रोह्यांच्या इस्लामविरोधी काव्यांचे सडेतोड आणि प्रभावी उत्तर देणार्या कविता रचाव्यात’ माननीय अली(र.)यांनी यासाठी आदरणीय प्रेषितांची परवानगी घेण्याची अट घातली. प्रेषितसोबत्यांनी ही विनंती प्रेषितांना केली, तेव्हा प्रेषितांनी या कामाची जबाबदारी माननीय अली(र.)यांच्यावर टाकण्याऐवजी मदीना शहरातील मुस्लिमांची सभा बोलावून आवाहन केले,
‘‘ज्या लोकांनी तलवारीने माझे समर्थन केले, त्यांच्यापैकी कोण आहे जो या इस्लामविरोधी काव्यास तोंड देऊन इस्लामचे समर्थन करील?’’ एवढ्यात एक अन्सारी सोबती उठून उभे राहून म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! मी यासाठी तयार आहे.’’
‘‘तुम्ही त्यांच्या काव्याचा सामना कसा कराल? प्रेषितांनी विचारले,
‘‘हे प्रेषित! मी आपले काव्य इस्लामचे समर्थन आणि इस्लामद्रोह्यांच्या विरोधात तयार करेन.’’
आदरणीय प्रेषितांनी त्यांना परवानगी दिली. इस्लामसमर्थक कविता रचणारे हे महान कविवर्य म्हणजेच - ‘माननीय हस्सान बिन साबित अन्सारी(र.)’ होत.
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांनी इस्लामसमर्थनार्थ आपल्या सर्व काव्यशक्ती पणाला लावून संपूर्ण अरब जगतात इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर दिले आणि इस्लामची भरपूर सेवा केली. माननीय हस्सान बिन साबित(र.)हे ‘खजरज’ परिवाराच्या ‘नज्जार’ या प्रतिष्ठित शाखेचे सुपुत्र होत. त्यांची वंश शृंखला अशी आहे.
‘हस्सान’ पिता साबित पिता मंझर पिता हराम पिता अमरु पिता झैद मनात पिता अदी पिता अमरु पिता मालिक पिता नज्जार पिता सआलबा पिता अमरू पिता खजरज.’’ त्यांचे प्रसिद्ध टोपण नाव ‘अबू वलीद’ असे होते. परंतु त्यांना ‘शायर-ए-रसूल’ अर्थात ‘प्रेषितांचे कवि’ या नावानेच जास्त संबोधण्यात येते. त्यांच्या मातेचे नाव ‘फरिआ बिन्त खालिद’ असे होते. त्या ‘खजरज’ परिवाराच्या ‘साअदा’ या शाखेच्या गर्भश्रीमंत असलेल्या ‘माननीय साअद बिन उबादा(र.)’ यांची पुतनी होत. त्यांनासुद्धा इस्लाम स्वीकृतीचे सौभाग्य लाभले होते.
माननीय हस्सान(र.)यांनी एका अशा परिवारात जन्म घेतला, जो पहिल्यापासूनच काव्यशास्त्रात अरब समाजात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित होता. काव्यशास्त्राची या परिवारात परंपरागत आवड होती. त्यांनी आपल्या प्राचीन वाडवडिलांचा हा वारसा मोठ्या कौशल्याने जपला होता. तसेच या परिवाराने अरबी भाषेतील काव्यशास्त्रात नवनवीन संशोधनसुद्धा केले. म्हणून हा परिवार संपूर्ण अरबजगतात नावाजलेला आणि प्रसिद्ध होता.
माननीय हस्सान(र.)यांनी काही दिवसातच इस्लामविरोधी काव्याचे सडेतोड उत्तर देऊन विरोधकांची तोंडे बंद केली. ते हिजरी सन पूर्व ६५ वर्षांपूर्वी जन्मले आणि वयाच्या पासष्ठाव्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून आपल्या कवन कौशल्याच्या माध्यमाने इस्लामची अभूतपूर्व सेवा केली. इस्लाम स्वीकारण्यापूर्वीही ते अरब जगतात क्रमांक एकचे कवि होते आणि अरब जगातील प्रत्येक व्यक्तीचे ते पहिल्या पसंतीचे नावाजलेले आणि आवडते कवि हते.
इस्लाम स्वीकृतीपूर्वी त्यांचे दिवस-रात्र याच कार्यात व्यतीत होत असे. कबिल्याच्या आपसांतील लढायांमध्ये ते योद्ध्यांना प्रेरित करण्यासाठी आवेशपूर्ण कवन करून त्यांची थैर्यशक्ती वाढवीत असत. युद्धभावना भडकाविण्यासाठी त्यांच्या कविता खूप प्रसिद्ध होत्या.
इस्लामस्वीकृतीच्या वेळी ते वयोवृद्ध होते. परंतु इस्लाम स्वीकृतीमुळे त्यांच्या काव्यात तारुण्य व नवचैतन्य निर्माण झाले. तसेच त्यांच्या काव्यशैलीतसुद्धा कमालीचा बदल झाला होता. प्रेषितकाळामध्ये त्यांनी सर्वांत मोठे ‘जिहाद बिल लिसान’ अर्थात मौखिल धर्मयुद्ध केले. एकीकडे त्यांनी इस्लामद्रोही कविंची आपल्या काव्यशक्तीने सडेतोड उत्तर देऊन तोंडे बंद केली तर दुसरीकडे त्यांनी इस्लामसमर्थनार्थ आणि प्रेषितत्वाच्या समर्थनार्थ सुद्धा प्रभावी काव्यरचना केली. या काव्यामुळे इस्लामसमर्थक वर्गात नवचैतन्य निर्माण झाले.
माननीय हस्सान(र.)हे अतिशय हळव्या स्वभावाचे होते. म्हणून त्यांना युद्धात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही. इब्ने यसीर(र.)या इतिहासकाराने लिहिले की, ‘एहजाब’ च्या युद्धामध्ये(हिजरीसन ‘५‘) माननीय हस्सान(र.)यांच्या बाबतीत एक अतिशय विचित्र घटना घडली. या युद्धात सर्व इस्लामद्रोही लोकांनी आणि ‘ज्यू’ लोकांनी संघटित होऊन मदीना शहरावर हल्ला चढविण्याचा निश्चय केला. या कटकारस्थानाची वार्ता प्रेषितांना मिळाली. त्यांनी मुस्लिमांना एका किल्ल्यात थांबविले. कारण या ठिकाणी मुस्लिमांचा लष्करी दस्ता उपलब्ध नव्हता. या किल्ल्यात माननीय हस्सानसुद्धा इतर आबालवृद्धांसमवेत होते. याच काळात एक ‘ज्यू’ किल्ल्याजवळ येऊन परिस्थितीचा आढावा घेऊ लागला. आदरणीय प्रेषितांच्या आत्या सन्माननीय सफया बिन्त अब्दुल मुतल्लिब(र.)त्या ‘ज्यू’ माणसास पाहून हस्सान बिन साबित(र.)यांना म्हणाल्या, ‘त्या ‘ज्यू’ ला जाऊन ठार करा.’ परंतु माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे धैर्य झाले नाही आणि माननीय सफया(र.)यांनी एक लाकडी दांडा त्या शत्रूच्या डोक्यात इतक्या जोरात मारला की तो जागीच कोसळला. आता माननीय सफया(र.)म्हणाल्या, ‘‘आता तरी जाऊन त्याचे शीर धडा वेगळे करा!’’ परंतु माननीय हस्सान(र.)म्हणाले, ‘‘हे अब्दुल मुतल्लिबच्या कन्ये! त्याचे मुंडके कापण्याचे धैर्य माझ्यात नाही.’’
माननीय हस्सान बिन साबित(र.)यांचे बरेच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. शिवाय त्यांचे काव्यसंग्रह भारत, ट्यूनेशिया, ब्रिटेन आणि इतर देशांत प्रकाशित झाले असून बर्याच भाषांमध्ये त्यांचे भाषांतरसुद्धा झाले आहे.

धर्मावरील प्रेम ईश्वराचे महान वरदान आहे. स्त्री असो की पुरुष, मूल असो की वृद्ध, ईश्वर ज्याला इच्छितो त्याला हे वरदान देतो. प्रेषितत्वाच्या अंतिम काळात मदीनावासीयांनी एका निरागस मुलामध्ये धर्मश्रद्धा आणि प्रेषितप्रेमाचा एक विचित्र स्वभाव अनुभवला. हा मुलगा नेहमी प्रेषितदरबारी हजर राहात असून मोठ्या तल्लीनतेने आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांची वचने ऐकत असे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) भाषणासनावर विराजमान होत असत, तेव्हा हा मुलगा त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे भाषण अगदी तन्मयतेने ऐकत असे. प्रत्येक बोल तो स्मरणात ठेवीत असे. तो प्रेषितांबरोबर नमाज अदा करीत असे आणि रमजान महिन्यात रात्रीच्या वेळी जागून प्रेषिताबरोबर ईशोपासना करीत असे. प्रेषितांचेही त्याच्यावर प्रेम होते. एकदा प्रेषितांच्या सेवेत ‘ताईफ’ शहरातून द्राक्षे पाठविण्यात आली. हा मुलगादेखील तेथे हजर होता. प्रेषितांनी त्यास द्राक्षांचे दोन झुबके देऊन सांगितले की, ‘‘एक तुझ्यासाठी व एक तुझ्या आईसाठी. घरी जाऊन एक झुबका आईस दे .’’ त्याने स्वतःस दिलेला एक झुबका रस्त्यातच खाल्ला. त्यास तो खूप गोड लागल्याने त्याने आईस दिलेला दुसरा झुबका देखील खाऊन घेतला. शेवटी तो लहान मुलगाच होता. त्याने आपल्या आईस या बाबतीत काही सांगितले देखील नाही. काही दिवसांनी प्रेषितांनी त्यास विचारले, ‘‘हे मुला! आईस द्राक्षाचा झुबका दिलास का?’’ ‘‘नाही! हे प्रेषिता (स.)! मी दिला नाही. दोन्ही झुबके मी स्वतःच खाल्ले.’’ प्रेषितांच्या उपदेशाने तो मुलगा सत्यवचनी झाला होता. त्याचे हे उत्तर ऐकून प्रेषितांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले. त्यांनी त्याचा कान धरून लाडिकपणे म्हणाले, ‘‘लबाड कुठला!’’
हा मुलगा ज्याचा आदरणीय प्रेषित अत्यंत लाड पुरवीत असत. तोच मुलगा.. माननीय नोअमान बिन बशीर(र.)होय.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)हे ‘खजरज’ परिवाराच्या ‘हारिस’ शाखेचे सपुत्र होत. त्यांची वंशशृंखला अशी आहे,
‘‘नोअमान पिता बशीर पिता साअद पिता सआलबा पिता खलास पिता झैद पिता मालिक पिता अगर पिता सआलबा पिता कआब पिता खजरज पिता हारिस पिता खजरजुल अकबर.
बदरच्या युद्धाच्या तीन महिन्यांपूर्वी हिजरी सन ‘२’ मध्ये माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांचा जन्म झाला. त्यांनी एक इस्लामप्रिय परिवारात जन्म घेतला. बालपणापासूनच त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण इस्लामी वातावरणात झाले. त्यांचे पिता माननीय बशीर बिन साअद अन्सारी यांनी प्रेषितांच्या अगदी प्रारंभीच्या प्रतिकूल काळात इस्लामचा स्वीकार केला होता. तसेच ते आदरणीय प्रेषितांचे खूप जवळचे श्रद्धाळू आणि सोबती होते. ते बदर, ओहद, एहजाब आणि इतर सर्वच युद्धांत आदरणीय प्रेषितांसोबत शत्रूंशी लढले. आदरणीय प्रेषितांच्या स्वर्गवासानंतर इस्लामी शासनाची धुरा सांभाळण्यासाठी अन्सारी सोबत्यांच्या एका मोठ्या वर्गाची भूमिका होती की, इस्लामी शासनाची धुरा ‘माननीय साअद बिन उबादा अन्सारी(र.)’ यांना सोपविण्यात यावी. परंतु माननीय बशीर बिन साअद(र.)यांनी मुहाजिरीन सोबत्यांचे समर्थन केले आणि सर्व अन्सार सोबत्यांनी माननीय अबू बकर(र.)यांना इस्लामी शासक नेमले.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांच्या माता सन्माननीय ‘उमरा(र.)’ या माननीय अब्दुल्लाह बिन खाहा(र.)यांची बहीण होती. त्यांचे पुत्र नोअमान(र.)वर अपार प्रेम होते. एकदा त्यांनी एक विशिष्ट संपत्ती नोअमान(र.)यांच्या नावे करण्यासाठी आपले पती बशीर(र.)यांचे मन वळविले आणि यासाठी आदरणीय प्रेषितांची साक्ष घेण्यासाठीदेखील तयार केले. माननीय बशीर(र.)हे आपल्या चिमुकल्या नोअमान(र.)यांना प्रेषितांसमोर हजर करून म्हणाले, ‘‘हे प्रेषिता! मी आपली अमुक अमुक संपत्ती आपल्या साक्षीने या मुलाच्या नावे करीत आहे!’’ प्रेषितांनी विचारले, ‘‘तुम्ही याच्या इतर भावडांनादेखील या संपत्तीचा वाटा दिला काय?’’
‘‘नाही दिला, हे प्रेषिता!’’ बशीर(र.)उत्तरले. ‘‘तर मग हा अन्याय होईल आणि मी अन्यायाची साक्ष देऊ शकत नाही! हे बशीर! ईश्वराच्या नाराजीचे भय बाळगा. त्याला अन्याय मुळीच पसंत नाही!!’’ प्रेषितांनी सांगितले. प्रेषितांचा आदेश ऐकून माननीय बशीर(र.)यांनी घरी येऊन आपल्या पत्नीस वृत्तांत सांगितला आणि त्यांच्या पत्नीनेसुद्धा प्रेषितांच्या आदेशावर मान झुकविली.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी खूप कमी वयात प्रेषितांची असंख्य वचने मुखपाठ केली होती. ते आठ वर्षे आणि सात महिन्याचे असतानाच आदरणीय प्रेषितांनी परलोकमार्गी कूच केले.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)लहानपणापासूनच प्रेषितांच्या सोबत असल्याने त्यांच्या नीतिमत्तेत खूप पावित्र्य होते. त्यांच्यात धैर्य, संयम, मृदु स्वभाव आणि दानशूरता यासारखे असंख्य गुणधर्म आढळतात. त्यांच्या जीवनाचा एक अतिशय मोठा भाग तंटे-बखेड्यांत व्यतीत झाला, तरी देखील त्यांनी शक्य होईल तेवढे रक्तपातापासून स्वतःस अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. अतिशय नाजूक आणि गंभीर परिस्थितीतही स्वतःस नियंत्रणात ठेवले.
त्यांच्या दानशूरतेबाबत एक विचित्र घटना इतिहासात आढळते. ते ‘हमस’ शहराचे राज्यपाल असताना ‘प्रसिद्ध कवि एअशा हमदानी’ त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘मी ‘यजीद’ बादशाहकडे गेलो आणि त्याला मदतीची विनंती केली. परंतु त्याने मला रिकाम्या हाती परत केले. नंतर मी आपल्याकडे खूप आशा व आकांक्षेने आलो आहे. माझ्यावर कर्जाचे प्रचंड ओझे असून मला आर्थिक मदतीची खूप गरज आहे.’’ माननीय नोअमान(र.)यांनी त्यास सांगितले की, ‘‘तुम्हाला देण्यासारखी रक्कम सध्या माझ्याजवळ नाही.’’ ‘एअशा हमदानी’ त्यांचे उत्तर ऐकून फार निराश झाले. माननीय नोअमान(र.)यांचे हृदयदेखील त्यांची ही केविलवाणी परिस्थिती पाहून पाझरले. त्यांनी जनतेस हाक देऊन सांगितले, ‘‘एअशा हमदानी यांना आज आर्थिक मदतीची खूप गरज आहे. म्हणून त्यांची मदत करावी.’’ माननीय नोअमान यांच्या या आवाहनामुळे लोकांनी आपसात वर्गणी करून वीस हजार दिरहमची रक्कम जमा करून त्यांना दिली.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)हे अतिशय उच्च कोटीचे ज्ञानी व विद्वान होते. आदरणीय प्रेषितांच्या काळात वयाने लहान असूनही आपल्या प्रचंड स्मरणशक्तीमुळे त्यांना प्रेषितांची प्रत्येक शिकवण, कार्यप्रणाली, जीवनशैली आणि नीतिमत्तेचे नियम अवगत झाले होते. आदरणीय प्रेषितांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांनी सन्माननीय आयशा(र.)आणि माननीय उमर(र.)यांच्याकडून धर्मज्ञानाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी आदरणीय प्रेषितांचे एकूण १२२ वचने कथन केली. त्यांच्या शिष्यवृंदामध्ये इमाम शैबी, सिमाक बिन हरब, अबुइसहाक, सालिम बिन अबू जाअद, उरवा बिन जुबैर, अबू कलाबा, उबैदुल्लाह, हबीब बिन सालिम, अब्दुल मलिक बिन और यासारखे तज्ज्ञ होत.
माननीय नोअमान(र.)यांनी विविध ठिकाणी राज्यपालपदाच्या जबाबदार्या पार पाडल्या. म्हणून त्यांनी अनेक स्वरुपाच्या प्रकरणांचे निर्णय दिल्याने त्यांचा अनुभव तगडा होता. प्रकरणे हताळताना आणि निर्णय देताना दिव्य कुरआन आणि प्रेषित जीवनचरित्राच्या आधारावर निर्णय देण्यात ते तरबेज होते. शिवाय त्यांची वक्तृत्वशैलीसुद्धा खूप आकर्षक होती. भाषण देताना ते प्रेषितवचनांचे अचूक संदर्भ सादर करीत असत. आपल्या कानांकडे बोट दर्शवून म्हणत की, ‘‘मी आदरणीय प्रेषितांकडून या कानांनी ऐकले.’’
त्यांचे लिखाणशास्त्र माहितीचा खजिना असे. त्यांना भाषाशास्त्र आणि साहित्यात विशेष रस होता. साहित्य आणि कवनशास्त्राच्या नियमांचे काटेकोर पालन करून त्यांनी बरेच साहित्य आणि कविता रचल्या.
माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी आदरणीय प्रेषितांची जी वचने कथन केली आहेत, त्यापैकी काही वचने या ठिकाणी सादर करीत आहोत.
  1. नमाज पढण्यासाठी करण्यात आलेल्या रांगा सरळ ठेवा अन्यथा ईश्वर तुमच्यात मतभेद निर्माण करील.
  2. तुम्ही श्रद्धावंतांना आपसात दया करणे, प्रेम करणे आणि कृपा व उपकार करण्याच्या बाबतीत अशा स्वरुपात पाहाल जसे शरीराच्या एका अवयवास त्रास अथवा क्षती पोहोचल्यास शरीराचे इतर अवयवदेखील ज्वराने फणफणतात.
  3. जे वैध आणि धर्मसंमत आहे, ते अगदीच स्पष्ट आहे. तसेच जे अवैध आणि धर्मविरोधी आहे, तेदेखील अगदीच स्पष्ट आहे. या दोन्हींच्या दरम्यान केवळ काही बाबीच अस्पष्ट आहेत. बर्याच जणांना याचे ज्ञान नाही. अर्थात जो माणूस एखाद्या बाबीच्या संशयास्पद अथवा अस्पष्ट परिस्थितीतही स्वतःस त्यापासून दूर ठेवील, तोच आपला धर्म आणि आपली इभ्रत सुरक्षित ठेवू शकेल आणि पवित्र व डागरहित असेल. तसेच जो माणूस संशयास्पद अथवा अस्पष्ट बाबीत गुरफटून जाईल, तो अवैध आणि धर्मविरोधी बाबींच्या गर्तेत बुडून जाईल. खबरदार! मानवी शरीरात एक मांसाचा गोळा आहे. तो ठीक राहिल्यास संपूर्ण शरीर सुदृढ असेल आणि तोच बिघडला तर संपूर्ण शरीर बिघडेल. तो मासाचा गोळा म्हणजेच तुझे हृदय होय!
  4. ‘‘प्रार्थना हीच उपासना आहे.’’ असे म्हणून आदरणीय प्रेषितांनी दिव्य कुरआनची ही आयत पठन केली, ‘‘तुमच्या पालनकर्त्याचा आदेश आहे की, माझ्याकडे प्रार्थना करा व मागणी करा. मी(निश्चितच तुमची मागणी) पूर्ण करीन आणि तुम्ही मागितलेली बाब तुम्हास प्रदान करीन. जे लोक माझ्या उपासनेस गर्विष्ठपणाने पाठ दाखवतील त्यांना अपमानित होऊन नरकाग्नीत जावे लागेल.’’
  5. माननीय नोअमान बिन बशीर(र.)यांनी हिजरी सन ६४ मध्ये माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांचे इस्लामी शासन स्वीकारले. अब्दुल्लाह बिन जुबैर(र.)यांनी त्यांना ‘हमस’ च्या राज्यपालपदी नेमले आणि ‘सीरिया’ व इतर भागाच्या राज्यपालपदी ‘जहाक बिन कैस’ यांची नेमणूक केली. तिकडे मलिक बिन मरवान या जुलमी शासकाने ‘जहाक बिन कैस’ यांच्यावर आक्रमक स्वारी केली. माननीय नोअमान(र.)यांनी ‘जहाक बिन कैस’ यांच्या मदतीसाठी कुमक पाठविली. दोन्ही लष्करात घनघोर युद्ध झाले. या युद्धात इस्लामशासित लष्करास पराभव पत्करावा लागला.
माननीय ‘जहाक बिन कैस’ यांच्या पराभवानंतर अब्दुल मलिकच्या लष्कराने माननीय नोअमान(र.)यांना एकटे गाठून ठार करून त्यांचे शीर त्यांच्या पत्नीला दिले. अशा प्रकारे माननीय नोअमान बिन बशीर अन्सारी(र.)यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण इस्लामच्या सेवेत अर्पण केला आणि शेवटी आपले प्राणसुद्धा ईश्वरीय धर्मावर बलिदान केले. ही घटना हिजरी सन ६५ मध्ये घडली. या वेळी त्यांचे वय ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि एक पत्नी असा परिवार होता.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget