Articles by "स्त्री आणि इस्लाम"


स्त्री म्हटले की अन्याय सहन करणारी अशी परिभाषा सर्वमान्य झालेली आहे. अगदी त्रेतायुगापासून स्त्री वर अन्याय होत आहे आणि आजही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने चालूच आहे. स्त्री युगानयुगे अन्याय सहन करत आलेली आहे. जगाच्या पाठीवरील सर्वच राष्ट्रात तिच्यावर अन्याय होत आहेत. इतिहासात डोकावून पाहिले तर इराक, भारत, चीन, अरब प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय व तिची अवहेलना व्हायची. यत्र नारिस्ते पूजेतम रमते तत्र देवता, असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या भारत देशांमध्ये स्त्रीला जिवंत जाळण्याची प्रथा होती. ग्रीकमध्ये तर स्त्रीला आत्मा आहे की नाही यावर वाद विवाद होते. स्त्री अगदी अन्यायाने ग्रासून गेली होती. स्त्रीला अधिकार किंवा हक्क हे शब्द सुद्धा माहित नव्हते. मात्र इस्लाम धर्माने स्त्रियांना अन्याय, अत्याचारापासून वाचविले व तिला न्याय दिला. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामी विरुद्ध आवाज उठविला. 

रात स्त्रीच्या तीन स्पष्ट भूमिका असतात. आई, पत्नी व कन्या. इस्लामने या तिनी भूमिकांना अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.

1.आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

      इस्लाममध्ये अल्लाह आणि पैगंबर यांच्या नंतर आईला सर्वोच्च दर्जा प्राप्त आहे. मुलांना आई-वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि आज्ञा पालनाचा आदेश देतो. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. आई आपल्या बालकास नऊ महिने पोटात वाढविते व दोन वर्षे आपले दूध पाजवीते. त्यामुळे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मुहम्मद पैगंबरांनी तर आईच्या बाबतीत सद्व्यवहाराची ताकीदच केली आहे. माननीय अबू हुरैरा रजि. यांनी सांगितले की, एक इसम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे आला व त्याने  पैगंबर (सल्ल.) यांना विचारले, माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, तुझी आई! पुन्हा त्याने तोच प्रश्न दोन वेळेस विचारला. प्रेषितांनी दोन्ही वेळेस आईच सद्व्यवहारास अधिक पात्र असल्याचे सांगितले. व नंतर वडील असे म्हटले. अल्लाहने आईला खूप मोठे श्रेष्ठत्व बहाल केले आहे.

2. पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा 

इस्लाममध्ये स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इस्लामची अशी मान्यता आहे की, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही. पैगंबरांना त्यांच्या एका साथीदाराने पत्नीच्या अधिकारा बाबतीत विचारले असता पैगंबर (सल्ल.)  म्हणाले, जेव्हा तुम्ही भोजन कराल तेव्हा तिलाही भोजन द्या जेव्हा तुम्ही वस्त्रे परिधान कराला तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. रागाच्या भरात तिला मारहाण करू नका तिला बरे वाईट बोलू नका तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त रहा. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर तिची दुसरी चांगली सवय कोणती आहे त्यावर लक्ष द्या. प्रेषित (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे. 

3. कन्येच्या रूपात स्त्रीचा दर्जा -

अज्ञानकाळात म्हणजेच इस्लामपूर्व काळात मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते. परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेशदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलताना देखील त्यांची मान शरमेने खाली जात होती इतकेच नव्हे तर कठोर हृदयी बाप आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली तसेच पैगंबर यांचे म्हणणे असे होते की, तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिणी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर त्याला स्वर्गात निश्चितच स्थान प्राप्त होईल. तसेच एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (सल्ल.) यांनी सांगितले जी व्यक्ती दोन मुलींची त्यांच्या तारुण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील,  अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने एकत्र येऊ असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखवली. तसेच मुलींशी घृणा करू नका त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत. (हदीस मसनद अहमद). पैगंबर (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार ’’आपल्या त्या मुलीवर उपकार करा जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुमच्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’

पैगंबर (सल्ल.) यांचे हे विचार ऐकूणच मन भरून येते. वरील नैतिक स्वरूपाचे अधिकार व उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे ज्ञान इस्लामने मानवाला प्रदान केले आहेत. इस्लामी शिकवणीचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे अधिकार खालील प्रमाणे सांगितले आहेत.

1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे. कुरआननेे हे अधिकार दिले आहेत. जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जवाब द्यावा लागेल.

2. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण त्यांचे शिक्षण प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ सूचना दिली आहे. 

3. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलींच्या परवानगीनेच होईल असे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत विधवा वा घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारीकेची अनुमती घेतल्या शिवाय तिचा विवाह होणार नाही.

4. इस्लाममध्ये ’महेर’ दिला जातो. म्हणजेच लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची रक्कम. हा महिलेचा अधिकार आहे. महिलेला महेर दिलाच जातो तो देणे अनिवार्य राहील. महेर विना विवाह वैध नसेल. विवाह प्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने व संपत्ती देणे अनिवार्य आहे. तिची स्वतःची संपत्ती आहे. यास महेर म्हटले जाते. परंतु ते निश्चित करणे अनिवार्य असते. 

5. इस्लाममध्ये स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी विवाहापूर्वी पित्यावर विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी पतीवर येते.  तसेच महत्त्वाची बाब म्हणजे जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित असेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते हा तिचा वैधानिक अधिकार आहे. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग धंद्याचेे स्वातंत्र प्रदान केले आहे. स्त्रियांना वारसा हक्कांबाबत पुरुषांप्रमाणेच हक्क दिलेले आहेत. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मौल्यवान संपत्ती असते. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. उत्तम चारित्र्यवान श्रद्धावंत भोळ्याभाबड्या स्त्रीयांच्या चारित्र्यावर आरोप करण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरूद्ध इस्लामी कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीवर व्याभिचार व चारित्र्य हिनतेचा मिथ्या आरोप करील त्याला 80 फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. इस्लाम स्त्रीस समीक्षण व आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार प्रदान करतो. अशा प्रकारे वरील सर्व बाबीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर इस्लाम धर्माने स्त्रियांवर होणारे अनेक अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना प्रतिष्ठेचे व श्रेष्ठत्वाचे स्थान दिले आहे. 

- पूजा वडगावकर


जर इस्लामी शिकवणींचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे खालील अधिकार आढळून येतात.

1) एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे.
    अरबांच्या काही जमातीतील लोक आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. कुरआनने त्या मुलींना जिवंत राहण्याचा अधिकार दिला आणि म्हटले की, जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जाब द्यावा लागेल. कुरआनोक्ती आहे,
    "तो क्षण आठवा, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली?''    (दिव्य कुरआन, 81 : 8-9)
2)    इस्लामनुसार प्रत्येक मुलास त्याच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि आपल्या निष्काळजीपणामुळे त्याच्यावर मृत्यू ओढवला जाऊ नये, या नैतिक व वैधानिक अधिकारांसह तो जन्म घेत असतो. पवित्र कुरआनचा असा आदेश आहे,
    "ज्या मातापित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपानकाल पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी - आपल्या मुलांना पूर्ण दोन वर्षे स्तनपान करावे. अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पध्दतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.''    (दिव्य कुरआन, 2 : 233)
3)    इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण, त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभसूचना दिली आहे.
4)    इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास व संरक्षकास निश्चितच महत्त्व दिले आहे. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की विवाह त्या मुलींच्या परवानगीनेच होईल. जर महिला विधवा वा घटस्फोटिता असेल तर स्पष्टपणे आपली मान्यता व्यक्त करील आणि कुमारिका असेल तर तिच्या मौनास मूक संमती समजली जाईल. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
    "जोपर्यंत विधवा व घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारिकेची अनुमती घेतल्याशिवाय तिचा विवाह होणार नाही.''    (हदीस)
5)    इस्लामने "महर' (लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची कबूल केलेली रक्कम) ला महिलेचा अधिकार म्हटले आहे आणि पुरुषास असा आदेश दिला आहे की,
ज्या महिलेशी त्याचा विवाह होईल, त्याने कोणत्याही परिस्थितीत "महर'ची रक्कम तिला देणे अनिवार्य राहील. "महर'विना विवाह वैध नसेल. कुरआनने स्पष्ट शब्दांत घोषणा केली आहे,
    "स्त्रियांना "महर' (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा.''            (दिव्य कुरआन, 4 : 4)
    विवाहप्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने वा संपत्ती इ. देणे अनिवार्य आहे, ज्यास "महर' म्हटले जाते. "महर' उधारदेखील असू शकतो. परंतु तो निश्चित करणे अनिवार्य असते. "महर' स्त्रीची स्वत:ची संपत्ती आहे, तिला त्यावर पूर्ण अधिकार आहे. तिच्या संरक्षकाचा त्यामध्ये कसलाही अधिकार नाही.
6)    इस्लाम स्त्रीचे पालनपोषण करण्याचा अधिकार मान्य करतो. विवाहापूर्व मुलींच्या संगोपणाची संपूर्ण जबाबदारी तिच्या पित्यावर असते आणि विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी तिच्या पतीवर येते. जर महिला श्रीमंत असेल तर तिच्याकरिता पती नोकरसुध्दा ठेवील. जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित नसेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते. हा तिचा वैधानिक अधिकार आहे आणि पतीने तो पूर्ण करणे आवश्यक आहे.
7)    इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग-धंद्याचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. तिला व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व कारागिरी, नोकरी, अध्ययन-अध्यापन, पत्रकारिता व लेखनकार्य- सर्व वैध कार्य करण्याची अनुमती आहे. त्यासाठी ती घराच्या बाहेरदेखील पडू शकते, परंतु कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कसलाही बिघाड वा बाधा निर्माण होऊ नये आणि तिच्या स्थिरतेत विघ्न निर्माण होऊ नये, याकरिता तो (इस्लाम) तिच्यावर काही बंधने अवश्य लावतो.
8)    इस्लामने धन-संपत्तीत स्त्रीच्या मान्यतेसंबंधीच्या अधिकारास मान्य केले आहे आणि त्यातील कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपास अनुचित व अवैध ठरविले आहे. ज्याप्रमाणे मिळकतीचा हक्क पुरुषाला आहे अगदी तसाच अधिकार स्त्रीलादेखील आहे. कुरआनचा आदेश आहे,
    "जे काही पुरुषांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे स्त्रियांनी कमविले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे.''     (दिव्य कुरआन, 4 : 32)
    वारसाहक्काबाबत कुरआन म्हणतो,
    "पुरुषांसाठी त्या संपत्तीत वाटा आहे जी आई-वडिलांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी मागे ठेवली असेल आणि स्त्रियांसाठीही त्या संपत्तीत वाटा आहे.''        (दिव्य कुरआन, 4 : 7)
9)    इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मोठी मौल्यवान संपत्ती आहे. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. एखाद्या स्त्रीच्या सतीत्वावर आक्षेप घेणे आणि तिच्यावर व्यभिचार व चरित्रहीनतेचा आरोप करणे इस्लामच्या दृष्टिकोनातून हे सर्व मोठे अपराध व गंभीर गुन्हे आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माणसाला नष्ट करणाऱ्या सात गुन्ह्यांपैकी एकाचा उल्लेख असा केला आहे.
    "उत्तम चारित्र्यवान, श्रध्दावंत, भोळ्या-भाबड्या स्त्रियांवर मिथ्या आरोप करणे.''
    इस्लामने कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या निर्दोष स्त्रीवर व्यभिचार व चरित्रहीनतेचा मिथ्या आरोप करील त्याला ऐंशी फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये.
10) इस्लाम स्त्रीस समीक्षा व आपले मत व्यक्त करण्याचादेखील अधिकार प्रदान करतो. कुरआनने पुरुष व स्त्री दोघांना चांगुलपणाचा आदेश देण्याचा आणि कुकृत्यापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे. कुरआनोक्ती आहे,
    "ईमानधारक पुरुष व ईमानधारक स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.''            (दिव्य कुरआन, 9 : 71)
यामध्ये धर्माचा प्रसार-प्रचाराचे, समाजाच्या विकासाचे कार्य, वैचारिक व प्रशासकीय विद्वान आणि अधिकाऱ्यांचे समीक्षा, टीका-टिप्पणी सर्व काही येते. स्त्रीने आपल्या मर्यादेत राहून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे हे तिचे कर्तव्य आहे.

अज्ञानकाळात (अर्थात इस्लामपूर्व काळात) अरबवासी मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते, परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेषदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलतानादेखील त्यांची मान शरमेने खाली जात होती. इतकेच नव्हे तर काही कठोरहृदयी बाप आपल्या हाताने आपल्या निष्पाप (अल्पवयीन) मुलींना जिवंत दफन करीत होते कुरआनने म्हटले आहे,
"अल्लाह, पृथ्वी व आकाशांच्या राज्याचा मालक आहे, जे काही इच्छितो निर्माण करतो, ज्याला इच्छितो त्याला मुली देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले देतो, ज्याला इच्छितो त्याला मुले व मुली दोन्ही देतो आणि ज्याला इच्छितो त्याला अपत्यहीन बनवितो. तो सर्वकाही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर समर्थ आहे.''                (दिव्य कुरआन, 42 : 49 - 50)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली,
"अल्लाहने एखाद्या व्यक्तीची मुलींद्वारे कोणतीही कसोटी घेतली तरी त्या व्यक्तीने त्यांच्याशी सदव्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते. या मुली त्या व्यक्तीकरिता नरकापासून वाचण्याचे साधन असतील.''    (हदीस : बुखारी)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
"तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिनी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर तो स्वर्गात निश्चितच प्रविष्ट होईल.''                (हदीस : तिर्मिजी)
एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
"जी व्यक्ती दोन मुलींचे त्यांच्या तारूण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील, अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने (एकत्र) येऊ.'' असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखविली.    (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात,
"ज्याला मुलगी असेल त्याने तिला दफन केले नाही अथवा तिच्याशी उपेक्षेने वागला नाही किंवा तिच्याऐवजी आपल्या मुलास प्राधान्य दिले नाही, तर अल्लाह त्यास स्वर्गात स्थान देईल.''    (हदीस)
एकदा अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
"मुलींशी घृणा करू नका, त्या सहानुभूतीची प्रतिमा व अतिमौल्यवान आहेत.''     (हदीस : मुसनद अहमद)
माननीय सुराका (रजि.) यांना अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारले,
"सर्वात मोठे दान कोणते हे मी तुम्हाला सांगू नये काय?''
माननीय सुराका (रजि.) यांनी नम्रपणे सांगितले, ""हे अल्लाहचे पैगंबर (स.)! आपण अवश्य सांगावे.''
पैगंबर म्हणाले, ""आपल्या त्या मुलीवर उपकार कर जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुझ्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.''     (हदीस)
    अशाप्रकारे इस्लामने स्त्रियांचे संवैधानिक अधिकारदेखील सुरक्षित केले आहेत आणि नैतिक स्वरूपातसुध्दा तिला उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे स्थान प्रदान केले आहे.

इस्लाममध्ये स्त्रीचे स्थायी अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्त्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही, अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही.
पत्नीच्या बाबतीत कुरआनने म्हटले आहे,
"अल्लाहच्या संकेतांपैकी हे आहे की, त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करुणा उत्पन्न केली. निश्चितच यात बरीच संकेताचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे चिंतन व मनन करतात.''     (दिव्य कुरआन,  30 : 21)
आणखी एके ठिकाणी अल्लाहची आज्ञा आहे,
"पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत. या आधारावर की, अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की, पुरुष आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या प्रामाणिक स्त्रिया आहेत, त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात.''    (दिव्य कुरआन, 4 : 34)
कधीकधी माणसाला एखादी गोष्ट आवडत नसते, परंतु त्यात सद्वर्तनाचे अगणित पैलू असतात. स्त्रियांच्या बाबतीत कुरआन स्पष्टोक्ती आहे,
"त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा. जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की, एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले ठेवले असेल.''    (दिव्य कुरआन, 4 : 19)
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका साथीदांराने त्यांना पत्नीच्या अधिकारांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले,
"जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तिलाही खायला द्या, जेव्हा तुम्ही वस्त्रे घ्याल तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. (रागाच्या भरात) तिच्या तोंडावर मारू नका आणि तिला बरे-वाईट बोलू नका (तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास) तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त राहा.''    (हदीस : अबू दाऊद)
एका विशिष्ट प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आज्ञा केली,
"कोणत्याही ईशभक्ताने (मोमीन) कोणत्याही धर्मपरायण (मोमीना) पत्नीचा द्वेष करू नये. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर दुसरी चांगली वाटेल.''   
    (हदीस : मुस्लिम)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
""ईमानधारकांपैकी परिपूर्ण ईमानधारक तीच व्यक्ती आहे जिचा स्वभाव (वर्तणूक) चांगला असेल आणि तुमच्यापैकी उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नींशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे.''     (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एके ठिकाणी आणखी फर्माविले आहे,
""हे विश्व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वांत उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे.'    (हदीस : मुस्लिम)

इस्लाम अल्लाह आणि पैगंबर यांच्यानंतर आईला सर्वोच्च दर्जा देतो. आई व वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि त्यांच्या आज्ञापालनाचा आदेश देतो. कुरआनोक्ती आहे,
"आणि ही वस्तुस्थिती आहे की, आम्ही मानवाला आपल्या मातापित्यांचा हक्क ओळखण्याची स्वत: ताकीद केली आहे. त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध सोडण्यास लागले. (म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की) माझ्याप्रती कृतज्ञता दाखव आणि आपल्या मातापित्यांशी कृतज्ञ राहा.''    (दिव्य कुरआन, 31 : 14)
अल्लाहचे आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.)1 यांनी वडिलांशीदेखील सद्व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे, परंतु आईशी सद्व्यवहार करण्यावर त्यांनी जास्त भर दिला आहे.
पैगंबरांचा आदेश आहे,
"मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सदव्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या आईच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो, मी मनुष्यास त्याच्या पित्याच्या बाबतीत (सद्व्यवहाराची) ताकीद देतो.''     (हदीस : इब्ने माजा)
माननीय अबू हुरैरा (रजि.)2 यांचे कथन आहे की, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला व म्हणाला,
""हे अल्लाहचे पैगंबर (स.)! माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे ?''
पैगंबर म्हणाले, ""तुझी आई!''
त्याने विचारले, ""त्यानंतर कोण ?''
पैगंबर म्हणाले, ""तुझी आई!''
त्याने पुन्हा विचारले, ""त्यानंतर कोण?''
पैगंबरांनी सांगितले, ""तुझी आई!''
त्याने विचारले, ""त्यानंतर कोण?''
मग पैगंबर म्हणाले, ""तुझे वडील!''    (हदीस : अल-अदबुल मुफद्न)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे,
""आईची अवज्ञा करणे आणि मुलींना जिवंत दफन करणे हे अल्लाहने तुमच्यावर निषिध्द ठरविले आहे.''                                                   (हदीस)
अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असेही फर्माविले आहे,
""आईच्या पायाखाली स्वर्ग आहे.''    (हदीस)

इस्लामने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून बाहेर काढले. तिला न्याय दिला. तिला सर्व मानवी अधिकार दिले, वागणूक, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्रदान केले आणि समाजास तिचा सन्मान करण्यास शिकविले. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामीविरुध्द इस्लामने आवाज उठविला, ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले. इस्लामच्याच प्रभावामुळे तिच्या पूर्वच्या दास्यत्वाच्या दशेस योग्य व यथार्थ ठरविण्याचे साहस आज कुणीही करू शकत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
"लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि त्या दोघांच्यापासून पुष्कळ पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा. ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की, अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.''    (दिव्य कुरआन, 4 : 1)
ही या गोष्टीची घोषणा होती की एक मानव व दुसऱ्या मानवाच्या दरम्यान जे खोटे भेदभाव जगात निर्माण करण्यात आले आहेत, ते सत्याच्या प्रतिकूल, निराधार व निर्मूळ आहेत. संपूर्ण मानवजात एकाच जीवापासून निर्माण झाली आहे. सर्वांचा उद्गम एकच आहे. जन्मजात न कोणी श्रेष्ठ आहे न हीन, न कोणी उच्च जातीचा आहे आणि न कोणी नीच जातीचा सर्वांना सारखे व समान अधिकार आहेत.

उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला नियंत्रित केले नाही, तर हा संबंध तुटूही शकतो. प्रारंभिक काळातील पुरुषांप्रमाणे महिलावर्गातसुद्धा उपासनेची फार आवड होती. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सर्व पत्नीं या बाबतीत विशेष उल्लेखनीय होत.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश यांच्या बाबतीत माननीय उम्मे सलमा (र) म्हणतात -
‘‘त्या एक पुण्यशील, फार अधिक उपवास करणाऱ्या आणि रात्री खूप उपासना करणाऱ्या महिला होत्या.’’ (तब्काते इब्ने साद - ८ : १०८)
माननीय आयेशा (र) म्हणतात -
‘‘मी धर्माच्या बाबतीत ईशभीरूतेत, खरेपणा, सुसंबंधात आणि दान-धर्मात त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कोणतीही स्त्री पाहिली नाही.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१६)
एका प्रसंगी खुद्द प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुद्धा त्यांच्या पुण्यशीलता व ईशभीरूतेची साक्ष दिली आहे. जसे त्यांनी माननीय उमर (र) यांना सांगितले -
‘‘जैनब बिन्ते जहश एक चित्त, एकाग्र व अल्लाहचे भय बाळगणाऱ्या आहेत.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१७)
नमाजचा इतमाम
उपासना प्रकारात नमाजचे फार महत्त्व आहे. त्याच्या काही अटी व शिष्टाचार आहेत. त्याकडे लक्ष दिल्याशिवाय नमाजचा हक्कही अदा होऊ शकत नाही आणि त्याचा पूर्ण लाभही घेणे शक्य नाही. या अटीपैकी एक अट अशी आहे की नमाज योग्य वेळेतच अदा केली जावी.
माननीय अनस (र) यांच्या आईने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, रात्री इशाच्या नमाजपूर्वीच मला झोप येऊ लागते. (त्यामुळे नमाज जाण्याचे भय राहते.) प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘अनसच्या आई ! नमाज लवकर अदा करीत जा. जेव्हा रात्रीचा अंधार सर्वत्र पसरतो तेव्हा इशाची वेळ होते. त्यावेळी तुम्ही अदा करीत जा. तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही.’’ (असदुलगाबा - ५ : ४६६)
यावरून कल्पना येते की, त्या नमाजचा किती इतमाम करीत असत. त्यांना याची चिता होती की, एखादेवेळी त्यांची नमाज अवेळी होता कामा नये.
मैमून बिन मेहरान म्हणतात की, ‘‘नमाजच्या वेळी जेव्हा जेव्हा मी माननीय उम्मे दर्दा (र) यांना भेटण्यास गेलो, तेव्हा त्यांना नमाजच्याच स्थितीत पाहिले.’’ (तहजीबुल असमा वल्लुगात - २ : ३६१)
जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये सम्मिलित होणे
स्त्रियांनी मस्जिदमध्ये जमाअतसह नमाजमध्ये सामील होणे आवश्यक नाही. त्यांच्यासाठी अधिक श्रेयस्कर हेच आहे की, त्यांनी घरीच नमाज अदा करावी. परंतु जमाअतसह नमाज अदा करण्याचे फार मोठे लाभ आहेत. जर परिस्थिती अनुकूल असेल आणि कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल, तर त्या मस्जिदमध्ये जाऊ शकतात. याच कारणास्तव शरीअत (इस्लामी धर्म-कायदा) ने एकीकडे त्यांना घरीच नमाज अदा करण्याची प्रेरणा दिली, तर दुसरीकडे परुषांना सांगितले की, ‘‘त्यांनी इच्छिले तर मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका.’’ माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
‘‘तुमच्यापैकी कोणालाही त्याच्या पत्नीने मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागितली तर तिला मनाई करू नये.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन या शब्दांतदेखील आलेले आहे -
‘‘मस्जिदमध्ये महिलांचा जो भाग आहे त्यापासून त्यांना रोखू नका.’’ (मुस्लिम - किताबुस्सलात)
आणखी एका कथनाचे शब्द असे आहेत,
‘‘आपल्या स्त्रियांना मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका; परंतु त्यांची घरेच त्यांच्यासाठी अधिक चांगली आहेत.’’ (अबू दाऊद, किताबुस्सलात)
ही परवानगी जास्त करून रात्रीच्या (इशा) व पहाटेच्या फजरच्या नमाजसंबंधी आहे. कारण असे की, हे कथन खालील शब्दांसमवेत उद्धृत केले गेले आहे.
‘‘जेव्ह तुमच्या स्त्रिया रात्री मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागतील तेव्हा त्यांना परवानगी द्या.’’ (बुखारी, किताबुलअजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
यावरून हे लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात विशेषतः इशा आणि फजरच्या नमाजमध्ये स्त्रियांना सामील होण्याची परवानगी होती. कथनावरून हे देखील कळते की, वास्तविकतः त्या या नमाजमध्ये सामील होत असत. खाली काही कथन उद्धृत केले जात आहेत -
 1. माननीय आयेशा (र) म्हणतात -
  ‘‘प्रेषित मुहम्मद (स) हे फजरची नमाज इतक्या अंधारात अदा करीत असत की, स्त्रिया चादरी गुंडाळून आपल्या घरी परत येत असत आणि अंधारामुळे ओळखल्या जात नसत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम किताबुल मसाजिद)
 2. माननीय उम्मे सलाम (र) म्हणतात -
  ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात स्त्रिया फर्ज नमाजचा सलाम फेरताच उभ्या राहत असत आणि प्रेषित मुहम्मद (स) व त्यांच्या समवेत जे पुरुष नमाज अदा करीत, ते आपल्या जागी जोपर्यंत अल्लाह इच्छील तोपर्यंत बसून राहत (जेणेकरून स्त्रियांनी मस्जिदमधून प्रथम निघून जावे) आणि जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) उठत, तेव्हा ते सुद्धा उठत असत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुल मसाजिद)
 3. माननीय अबू कतादा अन्सारी (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
  ‘‘मी नमाजसाठी उभा राहतो आणि इच्छितो की, त्यात कुरआनचे दीर्घ पठन करावे. इतक्यात एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकतो, तेव्हा नमाज संक्षिप्त करतो. ही गोष्ट चांगली वाटत नाही की, मी त्याच्या आईला त्रासात घालावे.’’ (पूर्वीचे प्रमाण)
 4. एकदा इशाच्या नमाजमध्ये असाधारण विलंब झाला. प्रेषित मुहम्मद (स) नमाज पढविण्यासाठी खोलीतून बाहेर आले नाहीत. माननीय उमर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना सूचना मिळावी म्हणून मोठ्या आवाजात सांगितले की, स्त्रिया व मुले झोपी गेली. हे ऐकून प्रेषित मुहम्मद (स) नमाजसाठी आले. (प्रमाण मागील)
  जैनबुस्सकफया कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
  ‘‘जेव्हा तुमच्यपैकी एखादी स्त्री इशाच्या नमाजमध्ये सामील होईल, तर तिने त्या रात्री सुगंधाचा वापर करू नये.’’ (मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन माननीय अबू हुरैरा (र) द्वारेदेखील झालेले आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या स्त्रीने सुगंधाचा उपयोग केला असेल तिने आमच्या समवेत इशाच्या नमाजमध्ये सामील होऊ नये.’’ (प्रमाण मागील)
या कथनावरून असे कळते की, स्त्रिया इशा आणि फजरच्या नमाजसाठी मस्जिदमध्ये सुद्धा जात असत, जेणेकरून त्यांना जमाअतसमवेत नमाज अदा करता यावी. असे शक्य आहे की, या नमाजमध्ये तरुण व वयस्कर हर प्रकारच्या स्त्रिया सामील होत असाव्यात. अन्य नमाजमध्ये विशेषकरून वयस्क स्त्रिया सामील होत असाव्यात. माननीय उम्मे सलमा बिन्ते अबू हकीम म्हणतात की,
‘‘मी पाहिले की म्हाताऱ्या स्त्रिया प्रेषित मुहम्मद (स) समवेत फर्ज नमाज अदा करीत असत.’’ (अलइस्तीआब - ४ : ३१७

इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात येतात.
हज व उमराहची मोठी महत्ता वर्णिली गेली आहे. हदीसमध्ये त्याला स्त्रियांचे धर्मयुद्ध (जिहाद) म्हटले गेले आहे. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ ते म्हणाले,
‘‘तुम्हा स्त्रींयासाठी सर्वांत चांगले व सुंदर धर्मयुद्ध ‘हज्जे मबरूर’ आहे.’’ (बुखारी (किताबुल हज))
एक अन्य कथनात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, ‘‘मला पवित्र कुरआनमध्ये धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेष्ठ कार्य दिसत नाही. मग आम्हीसुद्धा तुम्हांसमवेत धर्मयुद्धात (जिहाद) का सामील होऊ नये?’’ प्रेषित उत्तरले,
‘‘नाही, तुम्हा लोकांसाठी सर्वश्रेष्ठ व सुंदर धर्मयुद्ध अल्लाहच्या काबागृहाची यात्रा म्हणजे ‘हब्जे मबरूर’ होय.’’ (जी अल्लाहसाठी केली असावी.) (नसाई (किताब मनासिकिल हज))
अबू हुरैराह (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘वृद्ध, लहान मूल, अशक्त व स्त्रीसाठी हज व उमराह ‘जिहाद’ आहे.’’ (मागीलप्रमाणे)
माननीय अबू हुरैरा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत त्यांच्या पवित्र पत्नींनीसुद्धा हज केला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या नंतर माननीय सौदा (र) यांनी हज केला नाही. दुसऱ्या पवित्र पत्नीं हजला जात असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ५५)
हज्जतुलविदाअ (प्रेषित मुहम्मद (स) यांची अंतिम हज यात्रा) मध्ये दहा हजार सहाबींनी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सोबत्यांनी) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत हज अदा केला होता. अंदाज येतो की यात महिला सहाबींचीसुद्धा मोठी संख्या होती. उत्साह व आवड इतक्या प्रमाणात होती की, आजारी, गर्भवती व मुले असलेल्या महिलासुद्धा यात सामील झाल्या होत्या.
जबाआ बिन्ते जुबैर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर निवेदन केले, ‘‘मी हजचा इरादा केला आहे, परंतु मी आजारी आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘हज करा. ‘इहराम’ (साध्या पांढऱ्या चादरीचा पोषाख, जो हज यात्रेच्या काळात हाजी लोक परिधान करतात. हे लक्षात असावे की, हजच्या काळात शिवलेले कपडे नेसण्याची मनाई आहे.) असा संकल्प करून बांधा की, महान अल्लाह जेथे रोखील तेथेच ‘इहराम’ काढीन. (बुखारी (किताबुन्नकाह), मुस्लिम (किताबुल हज).
माननीय जाबिर (र) म्हणतात की, ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी हिजरी सन १० मध्ये हजची घोषणा केली. तेव्हा आम्ही सर्वजण हजसाठी रवाना झालो. जेव्हा जुलहुलैफा या ठिकाणी पोचलो तेव्हा तेथे अस्मा बिन्ते उमैस (र) यांना मुहम्मद बिन अबू बकर (र) नावाच्या पुत्राचा जन्म झाला.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) ‘रौहा’मध्ये काही स्वारांशी भेटले. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मूल दाखविले आणि प्रश्न केला की, ‘‘याचा सुद्धा हज होईल का?’’ प्रेषित उत्तरले, ‘‘होय, याचासुद्धा हज होईल आणि याचे पुण्य तुम्हाला लाभेल.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
एक अन्सारी महिला उम्मे सिनान हज्जतुलविदाअ (प्रेषितांची अंतिम हज यात्रा) मध्ये सामील होऊ शकल्या नव्हत्या. हजहून परतल्यानतर प्रेषितांनी याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हा लोकांजवळ दोनच उंटिणी होत्या. एकावर माझे पति आणि माझा मुलगा हजसाठी गेले. दुसऱ्या उंटिणीकडून जमिनीला जलसिचन करण्याचे काम घेतले जात होते.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘बरे तर तुम्ही रमजानच्या महिन्यात उमराह करा. महान अल्लाह हजच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करील.’’ (बुखारी (अबवाबुल उमरा), मुस्लिम (किताबुल हज)
आणखी एक महिला ज्यांचे नाव उम्मेमाकल होते, त्यासुद्धा त्यावेळी हजला जाऊ शकल्या नव्हत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांनासुद्धा रमजान महिन्यात उमरा करावयास सांगितले. (अबू दाऊद (किताबुल मानसिक या घटनेच्या विवरणात मतभेद आहेत. पहा औतुल माबूद - २ : १५०-१५१. असे शक्य आहे की, उपरोक्त दोन्ही कथन एकाच प्रसंगासंबंधी असावेत. जास्त शक्यता अशी आहे की, हे दोन्ही वेगवेगळे प्रसंग असतील. हाफिज इब्ने हजर (र) म्हणतात की, त्या महिलेच्या आडनावात मतभेद असेल अथवा अशाच अनेक घटना घडल्या असंतील आणि हीच गोष्ट अधिक योग्य वाटते. (अल इसाबा फी तमईजिस्सहाबा - ४ : ९९)
अशा प्रकारे ज्या महिला इच्छा करूनदेखील हजला जाऊ शकल्या नव्हत्या, त्यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उमराह करण्याची प्रेरणा दिली. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचासुद्धा आदेश दिला आहे. स्त्रिया ‘महरम’ (‘महरम’ अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याच्याशी एखाद्या स्त्रीचा विवाह निषिद्ध अथवा वर्ज्य आहे. जसे भाऊ, चुलता, मामा, आजा, पुत्र वगैरे.) शिवाय हज करू शकत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, एका माणसाने प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितले, ‘‘माझी पत्नी हजला जाऊ इच्छिते आणि मी युद्धात सामील होण्यासाठी माझे नाव नोंदले आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले ‘‘तू आपल्या पत्नीसमवेत हजला जा.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
स्त्रिया स्वतःकडूनही हज करीत असत व आवश्यक झाल्यास दुसऱ्याकडूनही करीत असत.
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, जुहैना टोळीची एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाली की, माझ्या आईने हजला जाण्याचा नवस केला होता. परंतु हज करण्यापूर्वीच तिचे देहावसान झाले. मी तिच्यातर्फे हज करू शकते काय ? प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘तिच्यातर्फे हज करा. जर तुमच्या आईवर कर्ज असते, तर तुम्ही ते अदा केले नसते का ? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे की, त्याचे कर्ज अदा केले जावे.’’
माननीय फजल बिन अब्बास (र) म्हतात की, खसअम टोळीच्या एका स्त्रीने प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली,
‘‘अल्लाहने आपल्या सेवकांवर हज अनिवार्य केले आहे. ही अनिवार्यता माझ्या वडिलांवरदेखील येते. परंतु ते फार वयस्क आहेत. वाहनावर बसू शकत नाहीत. जर मी त्यांच्यातर्फे हज केले तर त्यांचा फर्ज अदा होईल का ?’’ ते म्हणाले, ‘‘होय, अदा होईल.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
धर्माचरणात कठोरता व सक्ती नापसंत आहे. एका महिलेने हजसंबंधी असाच व्यवहार अवलंबिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यास मनाई केली.
उक्बा बिन आमिर जुहनी (र) म्हणतात की, माझ्या बहिणीने नवस केले होते की, मी काबागृहाला पायी जाऊन त्याचे दर्शन घेईन. बहिणीने मला सांगितले की यासंबंधी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा करावी. मी विचारणा केली तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘याची गरज नाही.’’ त्यांनी पायीही चालावे व वाहनाचासुद्धा उपयोग करावा. (एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी या नवसाचे प्रायश्चित्त (करणारा) करण्यास सांगितले.)
हजच्या प्रवासाला हदीसमध्ये महान अल्लाहच्या मार्गात प्रवास म्हणून संबोधले गेले आहे आणि असेही म्हटले गेले आहे की, महान अल्लाह हाजी लोकांची प्रार्थना स्वीकारतो. म्हणून त्यांच्याकडून प्रार्थना करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. एका प्रसंगी उम्मे दरदा (र) यांनी माननीय सफवान यांना विचारले की, आपली हजला जाण्याची इच्छा आहे काय? त्यांनी सांगितले, ‘‘होय’’ माननीय उम्मे दरदा (र) यांनी त्यांना विनंती केली की, ‘‘आमच्या कल्याणासाठीसुद्धा प्रार्थना करा.’’ ते अशासाठी की प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की,
जो मनुष्य आपल्या भावासाठी त्याच्या अपरोक्ष जी प्रार्थना करतो ती स्वीकारली जाते. त्याच्या उशाशी एक फरिश्ता (देवदूत) त्याच्या प्रार्थनेवर आमीन (असेच होवो) म्हणत असतो. आणि असे म्हणतो की, महान अल्लाहने तुमचेही असेच कल्याण करावे. माननीय सफवान म्हणतात की, मी तेथून निघालो तर माननीय अबू दरदा (र) यांच्याशी भेट झाली. त्यांनीसुद्धा प्रेषित मुहम्मद (स) यांचे असेच कथन असल्याचे सांगितले.

पवित्र कुरआन व हदीसमध्ये नमाजनंतर सर्वांत अधिक महत्त्व अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यास दिलेले आहे. जकात (अडीच टक्केप्रमाणे दान-धर्म) त्याचेच एक कायदेशीर रूप आहे. नमाजद्वारे मनुष्य ही भावना प्रकट करतो की, त्याने हृदय व मेंदू आणि अवयव व त्याचे अंगप्रत्यांग सर्वकाही अल्लाहसमोर नतमस्तक आहेत आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करणे, या गोष्टीचे चिन्ह आहे की, तो संपत्तीला आपली मालमत्ता समजत नाही आणि ती त्या प्रत्येक ठिकाणी खर्च करण्यास तयार आहे, जेथे अल्लाहने खर्च करण्याची आज्ञा दिली आहे. अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची मागणी पुरुषाकडेही आहे आणि स्त्रियांकडेदेखील. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहच्या मार्गात खर्च करणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांना महान मोबदल्याचा वायदा केला गेला आहे. म्हटले आहे -
‘‘निःसंशय दानधर्म करणारे पुरुष आणि दानधर्म करणाऱ्या स्त्रिया आणि ज्यांनी अल्लाहला चांगले ऋृण दिले त्यांना वाढवून दिले जाईल व त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे.’’ (सूरतुल हदीद : १८)
हदीसमध्ये महिलांना विभिन्न पैलूने अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. यात त्यांच्या स्वभाव, मानसशास्त्र व वातावरणाचेसुद्धा औचित्य पाहिले गेले आहे.
माननीय जाबिर (र) आणि माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (स) कथन करतात की, एका ईदच्या प्रसंगी प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना उद्देशून वेगळे भाषण दिले. त्यात त्यांना दानधर्म पुण्याईचीसुद्धा प्रेरणा दिली. यावर महिलांनी आपले दागिने व अन्य वस्तू सादर केल्या. माननीय बिलाल (र) त्या वस्तू आपल्या चादरीत गोळा करीत होते. (बुखारी (किताबुल ईदैन), मुस्लिम (किताबुल ईदैन)
माननीय अबू बकर (र) यांच्या सुपुत्री माननीय अस्मा (र) यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उपदेश केला.
‘‘खर्च करा. गणना करू नका. (की काय द्यावे आणि काय देऊ नये). नाहीतर अल्लाहसुद्धा मोजूनच देईल. आणि वाचवून सुरक्षित ठेऊ नका. अल्लाहसुद्धा त्याप्रमाणेच देईल.’’ (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात)
माननीय आयेशा (र) म्हणतात की, आम्ही एकदा बकरी कापली (आणि ती वाटून टाकली). प्रेषित मुहम्मद (स) यांनी विचारणा केली, ‘‘त्यापैकी काही शिल्लक आहे का ?’’ आम्ही सांगितले, ‘‘केवळ फरा उरलेला आहे.’’ ते म्हणाले, ‘‘असे म्हणा फरा सोडून सर्वकाही उरले आहे.’’ (मिश्कातुल मसाबीह (किताबुज्जकात), तिर्मिजीचे प्रमाण.
अशा प्रकारे प्रेषित मुहम्मद (स) यांनी ही कल्पना समजाऊन दिली की, मनुष्य जे काही दान पुण्य करतो ते वाया जात नाही, तर वाया तर ते जाते तो खाऊन पिऊन समाप्त करतो. दानधर्म, पुण्यच वास्तविकतः शिल्लक उरतात. ते अशासाठी की, त्यांचा मोबदला व पुण्य अल्लाहजवळ सुरक्षित आहे.
काही वेळा मनुष्य अशा स्थितीत नसतो की, एखाद्याला त्याने मोठे सहाय्य करावे आणि थोडीशी मदत करताना संकोच होतो. ही स्थिती विशेषतः स्त्रियांची होते. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना सांगितले, ‘‘दान लहानात लहान वस्तूचेसुद्धा होऊ शकते. यामुळे शक्य आहे की, गरजूची खरी गरज पुरी होत नसेल. प्रसंगी आधार त्याला मिळू शकतो.’’
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्म्द (स) म्हणाले, ‘‘खजुराचा एक तुकडा का असेना, तो देऊन नरकापासून आपले संरक्षण करा. हा पोट भरलेल्या माणसाच्या ज्याप्रमाणे उपयोगी पडतो, त्याचप्रमाणे उपाशी माणसालासुद्धा उपयोगी पडतो.’’ (मंजुरीच्या कथनानुसार अहमदने ते कथन केले. अत्तर्गीब वत्तरहीब पृष्ठ - १७८.)
उम्मे बुजैद (र) म्हणतात, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाले की, याचक माझ्या दारावर येतो. कधी कधी घरात एखादी वस्तू अशी नसते जी त्याला देता यावी, म्हणून लाज वाटते. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, (याचकाला मोकळ्या हाताने पाठवू नका) ‘‘काही नसेल तर जळलेले खूर का असेना देऊन पाठवा.’’ जळलेले खूर एक निरुपयोगी वस्तू आहे. यात याचकाला मोकळ्या हाताने पाठविण्याची सक्त मनाई आणि त्याला काही न काही देण्याची ताकीद आहे.
स्त्रियांचे संबंध विशेषतः नातेवाईक व शेजाऱ्यांशी असतात. त्यांचा हक्कसुद्धा जास्त असतो. हदीसमध्ये स्त्रियांना हा हक्क देण्याची प्रेरणा दिली गेली आहे.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र) यांच्या पत्नी व एका अन्सारी महिलेने माननीय बिलाल (र) यांच्यामार्फत प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, त्या आपले पति व मुलांवरसुद्धा दानधर्म करू शकतात काय ? प्रेषित म्हणाले, ‘‘होय, त्या त्यांच्यावरसुद्धा दानधर्म करू शकतात.’’
‘‘त्यांना तर दुप्पट मोबदला मिळेल - जवळिकीचा मोबदलासुद्धा व दानधर्माचा मोबदलासुद्धा.’’ (बुखारी (किताबुन्नफकात), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय उम्मे सलमा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘जर मी आपले पति अबू सलमा यांच्या मुलावर खर्च केले, जी माझीच मुले आहेत आणि ज्यांना मी सोडूही शकत नाही, तर महान अल्लाह त्याचे पुण्य देईल का?’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘त्यांच्यावर खर्च करा. तुम्ही जे काही त्यांच्यावर खर्च कराल तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल.’’ (प्रमाण मागीलप्रमाणे)
माननीय मैमूना (र) यांनी एका दासीला मुक्त केले. त्यांनी याचा उल्लेख प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर केला. प्रेषित म्हणाले, ‘‘जर तुम्ही तिला आपल्या मामांना दिले असते तर अधिक पुण्य मिळाले असते.’’ (बहुतेक त्यांना गरज होती.) (बुखारी (किताबुल हिबा), मुस्लिम (किताबुज्जकात))
माननीय अबू हुरैरा (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘हे मुस्लिम स्त्रियांनो! तुमच्यापैकी कोणत्याही शेजारणीने आपल्या शेजारणीला तुच्छ समजू नये. जरी शेळीची खूर का असेना. (कोणत्याही परिस्थितीत भेट म्हणून द्या.)’’ (बुखारी (किताबुल हिबा))
याचे दोन अर्थ संभव आहेत. एक असा की, प्रत्येक मुस्लिम स्त्रीने यथाशक्ती आपल्या शेजारणीला नजराणा भेट देत राहिले पाहिजे. जर एखादी मोठी वस्तू देता येणे शक्य नसेल, तर लहानशी वस्तू द्यावी. असा विचार करू नये की, लहानशी वस्तू कशी काय द्यावी. दुसरा अर्थ असा आहे की, ज्याला भेटवस्तू दिली जाईल त्याने हे पाहू नये की कोणती वस्तू दिली आहे आणि त्याची किमत काय आहे. तर त्या भावना, प्रेमाची किमत करावी, जी त्याच्या पाठीमागे आहे आणि लहानात लहान वस्तूसुद्धा रद्द करू नये.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, मी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, माझे दोन शेजारी आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या घरी भेटवस्तू पाठवू ? ते म्हणाले, ‘‘ज्याचा दरवाजा तुमच्या जवळ असेल, त्याला पाठवा.’’ (बुखारी (किताबुल हिबा))
यावरून ज्ञात होते की, माननीय आयेशा (र) शेजाऱ्यांचे हक्क जाणत होत्या. तथापि त्या हे समजू इच्छित होत्या की, एकापेक्षा अधिक शेजारी असतील तर कोणाचा अधिकार जास्त आहे ?
या सैध्दांतिक शिक्षणानंतर आता प्रारंभिक काळातील मुस्लिम महिलांच्या अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याच्या प्रवृत्तीचा अल्पसा परिचय दिला जात आहे.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब (र) यांच्यात अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची असीम भावना होती आणि त्या फार दानधर्म व पुण्य करीत असत. इमाम जहबी त्यांच्या वर्णनात म्हणतात -
‘‘धर्म, अल्लाहचे भय, दान-पुण्य व नेकी आणि कल्याणाच्या दृष्टीने त्यांची गणना उत्तम महिलांमध्ये होत असे.’’ (सियरु अअलामिन्नुबलाइ - २ : १४९)
त्यांची स्थिती अशी होती की, परिश्रम करून जे काही कमवीत असत ते गरीब व दीन-दुःखी लोकांना वाटून टाकीत असत.
माननीय आयेशा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी आपल्या पत्नींना सांगितले,
‘‘तुमच्यापैकी मला सर्वप्रथम ती भेटेल जिचे हात सर्वांत लांब आहेत.’’
आम्ही आपले हात मापत असू जेणेकरून हे पहावे की, कोणाला मृत्यू प्रथम येईल. माननीय जैनब (र) बुटक्या बांध्याच्या होत्या; परंतु सर्वांत प्रथम त्यांना मृत्यू आला. यावरून आम्हाला कळले की, प्रेषित मुहम्मद (स) यांचा हेतु असा होता की, दानधर्म व पुण्यात जी सर्वांत पुढे आहे, तिला प्रथम मृत्यू येईल. त्या स्वतःच्या हाताने काम करीत असत आणि जे प्राप्त होत असे त्याचे दानधर्म करीत असत. (मुस्लिम (किताबुल फजाइल)
बरजा बिन्ते राफिअ म्हणतात की, माननीय उमर (र) यांनी बारा हजार दिरहम बैतुलमाल (राज्यकोष) मधून माननीय जैनबसाठी पाठवून दिले. जेव्हा ही मोठी रक्कम त्यांच्यापर्यंत पोचली, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मी या रकमेचे काय करू ? माझ्या अन्य भगिणी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पवित्र पत्नीं) ही रक्कम गोरगरिबांत वाटण्यास अधिक सक्षम आहेत.’’ त्यांना म्हटले गेले की, ही रक्कम आपल्यासाठीच आहे. त्या म्हणाल्या, ‘‘सुबहान अल्लाह ! ही ठेऊन द्या आणि एका कापडाने झाका.’’ मग माननीय जैनब (र) मला म्हणाल्या, ‘‘यात हात घाला आणि एक मूठ अमुकच्या घरी व एक मूठ अमुकच्या घरी पोचवून या.’’ अशा प्रकारे आपल्या नातेवाईकांत व अनाथ लोकांत वाटावयास लावीत राहिल्या. जेव्हा अल्पशी रक्कम उरली, तेव्हा मी म्हणाले, ‘‘यात आमचासुद्धा हक्क आहे ना ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘बरे, आता कापडाखाली जे काही उरले आहे ते तुमचे आहे.’’ हे पस्तीस दिरहम होते. एका कथनात आहे की, जेव्हा ही गोष्ट माननीय उमर (र) यांना कळली की, त्यांनी सर्व रक्कम अशा प्रकारे वाटून टाकली आहे, तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांच्याकडून पुण्याचीच अपेक्षा आहे.’’ मग माननीय उमर (र) स्वतः त्यांच्या घरी आले. दारावर उभे राहून सलाम (अभिवादन) केला. नंतर आणखी एक हजार दिरहम पाठविले आणि विनंती केली की, ही रक्कम स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी खर्च करा. परंतु ती रक्कमसुद्धा त्यांनी वाटून टाकली.
त्या इतक्या स्वाभिमानी होत्या की, राज्यकोषातून मिळालेल्या या अनुदानानंतर आकाशाकडे हात उचलून त्यांनी प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह ! माननीय उमर (र) यांचे अनुदान घेण्यासाठी आता मला जिवंत ठेऊ नकोस.’’ त्यांचे त्याच वर्षी निधन झाले. (तबकाते इब्ने साद - ८ : १०९, ११०.)
त्यांनी आपल्या प्रेतावर पांघरण्यासाठी कापड (कफन) स्वतः तयार करून ठेवले होते. इकडे माननीय उमर (र) यांनीसुद्धा त्यांच्या मृत्यूसमयी राज्यकोषातून पाच कपडे स्वतः निवडून पाठविले. त्याच कपड्यांत त्यांना दफन केले गेले आणि त्यांच्या भगिनी हिमना बिन्ते जहश यांनी ते कापड जे माननीय जैनब यांनी तयार केले होते, दान म्हणून देऊन टाकले. (तबकाते इब्ने साद - ८ : ११०)
माननीय जैनब (र) यांच्या निधनानंतर माननीय आयेशा (र) यांनी उद्गार काढले,
‘‘त्या गेल्या, ज्या प्रशंसनीय, अनुपम, अनाथ व विधवांच्या आश्रयस्थान होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : ११०)
उस्मान बिन अब्दुल्लाह जहशी म्हणतात,
‘‘जैनब बिन्ते जहश यांनी एकही दिरहम अथवा दीनार मागे ठेवला नाही. जे काही हाती येई त्याचे दान करीत. त्या गरीब अनाथांचे आश्रयस्थान होत्या.’’
म्हणतात, त्या ज्या घरात राहात होत्या ते घर वलीद बिन अब्दुल मलिक यांनी मस्जिदे नबवीच्या विस्तारासाठी ते पन्नास हजार दिरहममध्ये खरेदी केले होते. (तबकाते इब्ने साद - ८ : ११४)
प्रेषित मुहम्मद (स) माननीय आयेशा (र) यांच्यावर सर्वांत अधिक प्रेम करीत असत. या कारणास्तव माननीय उमर (र) यांनी त्यांचे अनुदानसुद्धा जास्त ठेवले होते. त्यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकी प्रत्येकीला दहा हजार दिरहम व माननीय आयेशा (र) यांना बारा हजार दिरहम नेमुन दिले. (तबकाते इब्ने साद - ८ : ६)
परंतु माननीय आयेशा (र) फार दानी होत्या. जे काही मिळत असे ते दान करण्यात खर्च करीत असत. त्यांच्या दानी वृत्तीचे व अल्लाहच्या खर्च करण्याची कल्पना खालील प्रसंगावरून करता येईल.
उम्मे जराह म्हणतात की, माननीय अब्दुल्लाह बिन जुबैर (र) यांनी दोन पिशव्या रक्कम ज्यात एक लक्ष दिरहम असतील, माननीय आयेशा (र) यांच्याकडे पाठविली. त्यांनी थाळी मागितली आणि त्याच्यातूनच रक्कम लोकांत वाटून टाकली. त्या दिवशी त्यांचा रोजा होता. संध्याकाळ झाली तेव्हा मला म्हणाल्या, ‘‘हे मुली ! रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) काही खावयास आण.’’ मी म्हणाले, ‘‘आज आपण एवढी मोठी रक्कम वाटून टाकली. काय हे शक्य नव्हते की इफ्तारसाठी मटण मागविले असते ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘जाऊ दे, बरे-वाईट बोलू नकोस. जर अगोदर तू सांगितले असते, तर मटणसुद्धा मागविले असते. (तबकाते इब्ने साद - ८ : ६७)
अता बिन अबी रिबाह म्हणतात की, एकदा माननीय मुआविया (र) यांनी माननीय आयेशा (र) यांना एक लाख दिरहम पाठवून दिले. त्यांनी ती रक्कम उम्महातुलमोमिनीन (प्रेषितांच्या पवित्र पत्नी) यांच्यामध्ये वाटली. (सियरु आलामिन्नुबलाइ - २ : १४१)
उर्वा बिन जुबैर (र) म्हणतात की, मी पाहिले की, माननीय आयेशा (र) यांनी सत्तर हजार दिरहम दानधर्मामध्ये घातले आणि स्वतः त्यांची स्थिती अशी होती की, त्या आपल्या कपड्यांना ठिगळे लावीत असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ६६)
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते खुजैमा (र) इस्लाम स्वीकारण्यापूर्वीसुद्धा गरीब याचक व दरिद्री लोकांना खूप मदत करीत असत. याच कारणामुळे त्यांना ‘उम्मुलमसाकीन’ (अर्थात-गरीब याचकांची आई) म्हटले जात असे. (तबकाते इब्ने साद - ८ : ११५, अल इस्तीहआब)
उम्मुलमोमिनीन माननीय सौदा बिन्ते जमआ (र) यांना माननीय उमर (र) यांनी दिरहमने भरलेली पिशवी पाठविली. जेव्हा त्यांच्यापर्यंत ही पिशवी पोचली तेव्हा विचारले, ‘‘यात काय आहे ?’’ उत्तर मिळाले, ‘‘दिरहम आहेत’’. त्यांनी विचारले, ‘‘खजुराप्रमाणे दिरहम भरले आहेत काय ?’’ मग एका मुलीला सांगितले, ‘‘एक थाळी घेऊन ये.’’ त्याच थाळीने सर्व रक्कम वाटावयास लावली. (तबकाते इब्ने साद - ८ : ५६)
माननीय अस्मा (र) ह्या माननीय अबू बकर (र) यांची कन्या व माननीय आयेशा (र) यांची सख्खी भगिनी होत्या. मुहम्मद बिन मुनकदिर त्यांच्या बाबतीत म्हणतात -
‘‘त्या स्वभावाने उदार होत्या.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)
आपल्या मुलींना व घरातील मंडळींना उपदेश करीत असत की, ‘‘अल्लाहच्या मार्गात खर्च करा आणि दानधर्म करा. असा विचार करीत बसू नका की, स्वखर्चानंतर जे काही उरेल ते पुण्यकार्यात खर्च करू, शिल्लक राहण्याची वाट पाहत राहाल तर कोणतीच वस्तू शिल्लक राहणार नाही आणि खर्च कराल तर काही तुटवडाही पडणार नाही.’’ (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)
माननीय उमर (र) यांनी एक हजार दिरहम माननीय अस्मासाठी अनुदान मुकरर केले होते. (तबकाते इब्ने साद - ८ : २५३)
परंतु अल्लाहच्या मार्गात खर्च करण्याची त्यांची रीत अजब होती. अबुज्जुबैर म्हणतात की, मी माननीय आयेशा (र) आणि माननीय अस्मा (र) पेक्षा अधिक दानशूर कोणालाही पाहिले नाही. परंतु दोघींची पद्धत वेगळी होती. माननीय आयेशा (र) एक-एक वस्तू जमा करीत आणि नंतर जेथे गरज असे तेथे खर्च करीत असत. परंतु माननीय अस्मा (र) उद्यासाठी काहीही शिल्लक ठेवीत नसत. जे काही हाती येत असे ते सर्व खर्च करून टाकीत असत. (अल अदबुल मुफर्रद - १ : ३७७, सियरु आलामिन्नबलाइ - २ : २११)
फातिमा बिन्ते मुंजिर म्हणतात की, जर कधी माननीय अस्मा (र) आजारी होत, तेव्हा त्यांच्यापाशी असलेल्या गुलामांना त्या मुक्त करीत असत. (तबकाते इब्ने साद - ८ : २५२)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget