Latest Post

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कुस्तीमध्ये दुसऱ्यावर मात करणारा शक्तिशाली नसतो तर राग आल्यानंतर स्वत:वर नियंत्रण राखणाराच खरा शक्तिशाली असतो.’’
(म्हणजे रागाच्या भरात तो अल्लाह व पैगंबरांना न आवडणारी कोणतीही कृती करीत नाही.) (हदीस : बुखारी)
माननीय अतिय्या सअदी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘राग शैतानी प्रभावाचा परिणाम आहे आणि शैतान आगीपासून बनविण्यात आला आहे आणि आग फक्त पाण्याने विझते, तेव्हा राग आलेल्याने वुजू करावी. (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये आणि दुसऱ्या हदीसींमध्ये ज्या रागाला शैतानी प्रभावाचा परिणाम म्हटले आहे तो राग म्हणजे स्वत:साठी आलेला राग. मोमिनला ‘दीन’ (इस्लाम धर्मा) च्या शत्रूवर येणारा राग हे खूपच चांगले गुणवैशिष्ट्य आहे. जर कोणी ‘दीन’ला नष्ट करण्यासाठी येत असेल तर त्यावेळी राग न येणे हे ‘ईमान’च्या कमीचे लक्षण आहे.
माननीय अबू जर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याच्या उभे राहण्याने राग आला तर बसावे. या पद्धतीने राग निघून गेला तर उत्तमच, अन्यथा जमिनीवर पहुडावे.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये आणि यापूर्वीच्या हदीसमध्ये राग नष्ट करण्याच्या ज्या पद्धती पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितल्या आहेत, अनुभवांती माहीत होते की त्या बरोबर आहेत.
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की आदरणीय मूसा (अ.) यांनी अल्लाहला विचारले, ‘‘हे माझ्या पालनकत्र्या! तुझ्या दासांपैकी कोण सर्वाधिक प्रिय आहे?’’ अल्लाहने सांगितले, ‘‘बदला घेण्याची शक्ती असूनदेखील क्षमा करणारा.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो (सत्याच्या विरोधात बोलण्यापासून) आपल्या जिव्हेचे रक्षण करील, अल्लाह त्याच्या दोषांवर पडदा घालील आणि जो आपल्या रागावर नियंत्रण करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याला शिक्षेपासून वाचवील आणि जो अल्लाहपाशी क्षमा मागेल अल्लाह त्याला क्षमा करील.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन गोष्टी मोमिनच्या सदाचारांपैकी आहेत, एक ही की जर कोणाला राग आला तर त्याच्या रागाने त्याच्याकडून अवैध काम करवू नये, दुसरी अशी की जेव्हा तो खूश असेल तेव्हा त्याची खुशी त्याला सत्याच्या परिघाबाहेर घालवू नये, आणि तिसरी गोष्ट अशी की सामथ्र्य असूनदेखील दुसऱ्याची वस्तू प्राप्त करू नका, ती घेण्याचा त्याला अधिकार नाही. (हदीस : मिश्कात)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य (जो कदाचित स्वभावाने हुशार होता) पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाला, ‘‘मला काही मार्गदर्शन करा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘रागाऊ नका.’’ त्या मनुष्याने पुन्हा पुन्हा तेच म्हटले, ‘‘मला काही मार्गदर्शन करा.’’ पैगंबरांनी प्रत्येक वेळी हेच उत्तर दिले, ‘‘रागाऊ नका.’’ (हदीस : बुखारी)
एखाद्याची नक्कल करणे
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एखाद्याची नक्कल करणे मला आवडत नाही, मग त्याच्या मोबदल्यात माला खूप धनसंपत्ती जरी दिली तरीही.’’ (हदीस : तिर्मिजी)
दुसऱ्यांच्या संकटावर खूश होणे
माननीय वासिला (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू आपल्या बंधुच्या संकटावर खूश होऊ नकोस, अन्यथा अल्लाह त्याच्यावर दया करील (आणि संकट दूर करील) आणि तुला संकटात परिवर्तीत करील.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ज्या दोन मनुष्यांच्या दरम्यान शत्रुत्व निर्माण होते, त्यांच्यापैकी एकावर त्यादरम्यान संकट कोसळते, तेव्हा दुसरा आनंद साजरा करतो. ही इस्लामी स्वभावाच्या विरूद्ध गोष्ट आहे. मोमिन (आज्ञाधारक) आपल्या बंधुच्या संकटावर आनंद साजरा करीत नाही, जरी त्यांच्यात शत्रुत्व असले तरीही.

माननीय इकराम (रजि.) यांच्या कथनानुसार, माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांनी सांगितले, ‘‘दर आठवड्यातून एकदा धर्मोपदेश करीत जा आणि दोन वेळा करू शकता आणि तीन वेळेपेक्षा अधिक धर्मोपदेश करू नका. या कुरआनपासून लोकांना निराश करू नका. तुम्ही लोकांकडे गेला आणि ते आपल्या संभाषणात मग्न असावेत आणि तुम्ही धर्मोपदेश सुरू करावा आणि त्यांचे संभाषण मध्येच थांबवावे, असे घडता कामा नये. जर तुम्ही असे केले तर ते धर्मोपदेश आणि मार्गदर्शनापासून निराश होतील. अशा वेळी नि:शब्द राहा आणि जेव्हा त्यांच्यात उत्सुकता निर्माण होईल आणि ते तुम्हाला धर्मोपदेश करण्यास सांगतील तेव्हाच तुम्ही धर्मोपदेश करा. आणि पाहा! लयबद्ध व अनुप्रासयुक्त अलंकारिक शब्दचित्रण करू नका (म्हणजे समजणार नाहीत असे अवघड शब्द बोलू नका), कारण मी पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या साथीदारांना पाहिले आहे की ते त्रासदायक शब्दोच्चार करीत नव्हते.’’
इमाम सरखसी (रह.) यांनी विस्तारात सांगितलेल्या एका हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
‘‘लोक अल्लाहच्या दासत्वाची घृणा करू लागतील अशा पद्धतीचा अवलंब 
करू नका.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : ‘‘जेव्हा ते तुम्हाला धर्मोपदेश करण्यास सांगतील’’चा अर्थ आहे की ते तोंडाने आपली इच्छा व्यक्त करतील. त्यांच्या चेहऱ्यावरून अंदाज येईल की आता ‘दीन’बाबत ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत, तेव्हाच आपण बोलायला सुरूवात करावी.
माननीय अबू यूसुफ (रजि.) यांच्या कथनानुसार, जेव्हा ‘जकात’ (इस्लामी धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक सक्षम मुस्लिमाने आपल्या संपत्तीचा अडीच टक्के भाग गोरगरिबांना दानधर्म म्हणून द्यावयाचा असतो त्यास ‘जकात’ म्हणतात.) अनिवार्य करण्यात आली आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहकडून आदेश देण्यात आला की त्यांनी लोकांकडून ‘जकात’ वसूल करावी तेव्हा पैगंबरांनी ‘जकात’ वसूल करण्यासाठी एका मनुष्याची नियुक्ती केली आणि त्याला म्हणाले, ‘‘पाहा! लोकांच्या हृदयाचा संबंध असलेली उत्तमोत्तम संपत्ती घेऊ नका, तुम्ही वृद्ध सांडणी घ्या, वांझ सांडणी घ्या आणि सदोष सांडणी घ्या.’’ ‘जकात’ वसूल करणारा निघून गेला आणि पैगंबरांच्या मार्गदर्शनानुसार लोकांच्या जनावरांमधून ‘जकात’ वसूल केली. इतकेच काय तो एका अरब खेडुताकडे गेला आणि त्याला म्हणाला, ‘‘अल्लाहने आपल्या पैगंबरांना आदेश दिला आहे की त्यांनी लोकांकडून ‘जकात’ वसूल करावी. ही ‘जकात’ त्यांची वितुष्टी नष्ट करील आणि त्याच्या ईमानमध्ये वाढ होईल.’’ ‘जकात’ वसूल करणाऱ्याला तो खेडूत म्हणाला, ‘‘ही आमची जनावरे आहेत. तुम्ही तेथे जा आणि त्यातून तुम्ही घ्या.’’ त्याने वृद्ध, दोषयुक्त आणि वांझ सांडणी घेतली. तेव्हा तो खेडूत म्हणाला, ‘‘तुमच्यापूर्वी आमच्या उंटांमधून अल्लाहचा हक्क वसूल करण्यासाठी कोणीही आला नाही. अल्लाह शपथ! तुम्हाला चांगले उंट घ्यावे लागतील. (अल्लाहसमोर खराब वस्तू सादर केली जाते काय?)’’ (हदीस : किताबुल खिराज)
स्पष्टीकरण : जर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पहिल्याच दिवसापासून लोकांकडून चांगल्या वस्तू ‘जकात’स्वरूपात वसूल केल्या असत्या तर कदाचित लोकांनी या आदेशाविरूद्ध बंड केले असते, परंतु हळूहळू जेव्हा लोकांमध्ये ‘दीन’ची मुळे घट्ट रोवली गेली आणि त्यांना संस्कार प्राप्त झाले तेव्हा मदीनेपासून दूरवर खेड्यापाड्यांत राहणाऱ्या लोकांची स्थिती अशी झाली की ते ‘जकात’स्वरूपात उत्तम वस्तू घेण्यास सांगू लागले.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा एखादी गोष्ट सांगत तेव्हा तिचा (जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा) तीन वेळा पुनरुच्चार करीत जेणेकरून ती गोष्ट लोकांना चांगल्या प्रकारे समजावी. (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : प्रत्येक भाषेत बोलण्याचे आणि भाषण करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात, ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या हृदयांत आपली वाणी उतरविणे हाच त्यामागील उद्देश असतो. ऐकणारे कोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसार भाषा व वक्तव्य अवलंबावे लागेल. अल्पशिक्षित लोकांसमोर तत्त्वज्ञासारखे बोलणे आणि अवघड शब्द व पद्धतींचा उपयोग करणे आवाहनाला परिणामशून्य बनविते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बाबतीत माननीय आएशा (रजि.) सांगतात–
‘‘पैगंबरांचे भाषण स्पष्ट व उघड असे, जो ऐकतो त्याला समजते.’’

अब्दुल मजीद खान, नांदेड
9403004232
मित्रानों ! जगाचं एक मुलभूत सत्य आहे़ ज्याच्या आधारे जगाची संपूर्ण व्यवस्था चालत आहे़ आपण (मनुष्य) सुद्धा या जगापासून वेगळे नाही तर या जगात त्याचा एक अंश म्हणून राहत आहोत़ म्हणून सर्वांसाठी हे सत्य ज्याप्रमाणे मुलभूत आहे त्याच प्रमाणे आपल्यासाठी सुद्धा मुलभूत सत्य आहे़ 
सध्या हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तिसाठी आणि जगातील सर्व माणसांसाठी एक बिकट समस्या बनली आहे की, आम्हा माणसांच्या जीवनातून शांती व समाधान लोप का पावले आहे? आमच्यावर संकटे सदैव का कोसळत असतात? आमच्या जीवनाची घडी का विस्कटली आहे? राष्ट्रा-राष्ट्रामध्ये संघर्ष का निर्माण झाला आहे? त्यांच्यात ओढातान का होत आहे? माणूस माणसाचा शत्रू का बनला आहे? जगात लक्षावधी माणसे मरत आहेत़ जगाचे अब्जावधीचे नुकसान होत आहे़ वस्तीच्या वस्ती बेचिराख होत आहेत़ बलवान आणि श्रीमंत लोक दुर्बलांना गीळंकृत करीत आहेत़ राज्यकारभारात अत्याचार होत आहेत. न्यायालयामध्ये अन्याय होत आहे, संपत्तीमध्ये अतिरेक, सत्तेमध्ये उन्माद आहे, मैत्रीत लबाडी आहे़ नितीमत्तेत सचोटी राहिली नाही़ माणसावरून माणसाचा विश्वास उडाला आहे़  धर्माच्या रूपात अधर्म होत आहे. मानवजात अनेक गटामध्ये विभागली गेली आहे़  प्रत्येक गट दुसऱ्या गटास दग्या-फटक्याने जुलूम अत्याचाराने बेईमानी व लबाडीने हानी पोहोचविण्यास पुण्यकार्य समजत आहे़ या सर्व वाईटाचे कारण काय आहे? अल्लाहच्या सृष्टीत आपण पाहतो सर्वत्र शांती पसरलेली दिसते़ ताऱ्यांमध्ये शांतता आहे़, हवेत शांतता, पाण्यात शांतता, झाडे झुडपे आणि जनावरांमध्ये शांतता आहे. संपूर्ण सृष्टीचा कारभार पूर्णपणे शांततेत चालू आहे़ कोठेही उपद्रव आणि अव्यवस्थेचा लवलेशही आढळत नाही़ परंतु, केवळ मानवी जीवनच शांततेपासून वंचित आहे? 
हा एक अवघड प्रश्न आहे, जो सोडविण्यासाठी नाकीनऊ येत आहेत़ याचे थोडक्यात उत्तर असे आहे की, माणसाने आपले जीवन सत्य आणि वास्तवतेच्या विरोधी शक्तींना सोपवले आहे़ म्हणून मानवास कष्ट भोगावे लागत आहे़ जोपर्यंत मानव स्वत:ला सत्य आणि वास्तविकेतच्या सुपूर्द करीत नाही तोपर्यंत त्यास कधीही शांतता प्राप्त होणार नाही़ उदा़ तुम्ही चालत्या आगगाडीच्या दारास आपल्या घरचे दार समजलात आणि ते उघडून बिनधास्त बाहेर पडलात जणू आपल्या घरच्या दालनात पाय टाकत आहात़ तर तुमच्या गैरसमजुतीमुळे रेल्वेचे दार घरचे दार बनणार नाही आणि ते मैदान सुद्धा की, ज्यावर आपण फेकले जाऊ घराचे दालन ठरणार नाही़ तुम्ही आपल्या ठायी काहीही समजले तरी वास्तविकतेमध्ये किंचितही बदल होणार नाही़ भरधाव चाललेल्या आगगाडीच्या दारातून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल त्याचा जो परिणाम होणार तो झाल्याशिवाय राहणार नाही मग पाय मोडल्यानंतर, डोके फुटल्यानंतर सुद्धा आपण हे मान्य करू नये की, आपण जे कांही समजले होतो ते चुकीचे होते? अगदी त्याचप्रमाणे आपण समजलो की या जगाचा कोणीही पालनकर्ता नाही किंवा आपण स्वत:च आपले ईश्वर बणून रहाल अथवा ईश्वराशिवाय अन्य एखाद्याचे ईशत्व मान्य कराल तर आपल्या अशा समजुतीमुळे वस्तुस्थिती कदापी बदलणार नाही़ ईश्वर हा ईश्वरच राहणाऱ त्याचे जबरदस्त साम्राज्य ज्यामध्ये आपण केवळ प्रजा म्हणून राहत आहोत़ सर्वाधिकारानिशी त्याच्याच अखत्यारित राहणार आहे. उलट आपल्या अशा चुकीच्या समजुतीमुळे जी जीवन पद्धती स्विकारली त्याची कटू फळे आपणास चाखावी लागतील मग यातना भोगल्यानंतर सुद्धा अशा चुकीच्या जीवनास आपल्या ठायी अचूक का समजावे?
सकल जगाचा ईश्वर कोणाच्या केल्याने सर्वव्यापी ईश्वर बनलेला नाही तो काही लाचार नाही, आपण त्याचे इशत्व मान्य करू तेव्हाच तो ईश्वर ठरेल़ आपण मान्य करा अथवा न करा तो तर स्वत: ईश्वर आहे़ त्याचे ईशत्व स्वबळावर उभे आहे़ त्याने स्वत: आम्हाला या संपूर्ण ब्रम्हांडाला बनविले आहे़  ही पृथ्वी, हा सूर्य आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या आदेशाच्या आधिन आहे़ या सृष्टीमध्ये जितक्या शक्ती कार्यरत आहेत़ त्याच्या आदेशाखाली आहेत. त्या सर्व वस्तू ज्यांच्या बळावर आपण जीवंत आहोत त्याच्या अधिकाराधीन आहेत़ स्वत: आपले अस्तित्व त्याच्या अधिकारात आहे़ आपण हे मान्य केले अथवा नाही तरी वस्तू स्थिती हीच आहे. या सर्व अवस्थेत सत्याचे तर काहीच वाईट होत नाही़ परंतु, फरक असा होतो की, आपण जर वस्तुस्थिती मान्य करून आपले तेच स्थान मान्य केले़ जे या सृष्टीमध्ये आपले वास्तविक स्थान आहे तर आपले जीवन योग्य राहील. आपल्याला सुख, शांती, समाधान लाभेल़  आपल्या जीवनाची घडी व्यवस्थित बसेल. परंतु, जर आपण व्यवस्थेविरूद्ध अन्य कोणतेही स्थान स्विकारले तर परिणाम तेच निघेल जो भरधाव चाललेल्या रेल्वेच्या दारास आपल्या घराचे दार समजून बाहेर पडण्याने निघतो. आघात आपल्या स्वत:ला सोसावा लागेल, पाय आपले मोडणाऱ, डोके आपले फुटणार, यातना आपल्या स्वत:ला भोगाव्या लागतील़ परिस्थिती जशी होती तशीच राहणार. आपण प्रश्न कराल की परिस्थितीनुसार आमचे उचीत स्थान कोणते आहे? त्याचे उत्तर असे आहे की, जर एखाद्या नोकरास आपण पगार देऊन नोकरीस ठेवले असेल़  तर त्या नोकराचे वास्तविक स्थान काय आहे? हेच की त्याने आपली़ नोकरी करावी, आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करावे़ मालकाच्या मर्जीनुसार काम करावे आणि नोकरीची मर्यादा ओलांडू नये़ नोकराचे काम नोेकरी करण्याशिवाय अन्य काय असू शकते? आपण जर अधिकारी आहात आणि एखाद्या हाताखाली असेल तर हाताखालच्या व्यक्तिचे काय काम असेल? हेच की त्याने ताबेदारी करावी़ अधिकाऱ्याच्या ऐटीत राहू नये.       
जर आपण एखाद्या इस्टेटीचे मालक असाल तर त्या इस्टेटीमध्ये आपली इच्छा काय राहील? अशीच की तिच्यावर आपली मर्जी चालावी़ आपल्याला काही हवे असेल तेच तिच्यात घडावे, आपल्या इच्छेविरूद्ध तिथले पानसुद्धा हलू नये़ आपल्यावर जर एखादी सत्ता काबीज असेल आणि सर्व अधिकार तिच्या ताब्यात असतील तर अशी राजेशाही असताना तेथे आपले काय स्थान असते? हेच की आपण सरळ प्रजा बनून रहावे आणि शाही कायद्याच्या बाहेर पाउल टाकू नये़ बादशाहाच्या राज्यात राहत असताना जर आपण स्वत:च बादशाहीचा दावा किंवा अन्य एखाद्याची बादशाही मान्य करून त्याच्या आदेशानुसार वागत असाल तर आपलं बंड खोट ठरेल़  बंड खोराशी जो व्यवहार केला जातो तो आपल्याला माहीत आहे़ 
या उदाहरणावरून आपण समजू शकतो की अल्लाहच्या या राज्यात आपले स्थान काय आहे? अल्लाहने आपल्याला बनविले आहे़ स्वाभाविकपणे आपले काम याशिवाय अन्य कोणतेही नाही की आपण आपल्या बनविणाऱ्याच्या मर्जीनुसार चालावे. अल्लाह आपले पालन करीत आहे़ त्याच्या खजिन्यातून आपण पगार घेत आहोत़  याशिवाय, आपले अन्य कोणतेही स्थान नाही की, आपण त्याचे नोकर आहोत़ आपला आणि सर्व जगाचा तो मालक आहे़ त्याच्या अधिकारात आपले स्थान दासाशिवाय अन्य काय असू शकते? ही पृथ्वी आणि हे आकाश सर्व त्याचीच इस्टेट आहे़ या इस्टेटीमध्ये त्याचीच मर्जी चालेल आणि त्याचीच मर्जी चालली पाहिजे. आपणास येथे स्वत:ची मर्जी चालविण्याचा कोणताच हक्क नाही़  जर आपण आपली मर्जी चालविण्याचा प्रयत्न कराल तर तोंडघशी पडाल. या राज्यात त्याची सत्ता त्याच्या ताब्यात आहे़ या राज्यात ईश्वराची सत्ता त्याच्या स्वत:च्या बळावर उभी आहे़ पृथ्वी आणि आकाशाची सर्व सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आपण यावर राजी असो किंवा नाराज असो, कोणत्याही परिस्थितीत आपण त्याचे रयत (गुलाम) आहोत़ आपला अथवा अन्य कोणत्याही माणसाचा दर्जा मग तो लहान असो की मोठा, गुलाम असण्याखेरीज अन्य कोणताही नाही. त्याचाच कायदा साम्राज्यात आहे आणि त्याचाच हुकूम हा हुकूम आहे़ गुलामापैकी कोणासही असा दावा करण्याचा हक्क नाही की मी ’हिज मॅजिस्टी’ आहे किंवा ’हिज हायनेस’ आहे अथवा हुकूमशाह किंवा सर्व सत्ताधिकारी आहे. कोणत्याही व्यक्तिस अथवा लोकसभेस किंवा विधानसभेस अथवा मंडळास हा अधिकार प्राप्त नाही, की या साम्राज्यात अल्लाहच्या कायद्याशिवाय आपल्या स्वत:चा कायदा लागू करावा आणि अल्लाहच्या रयतेला सांगावे की, आमच्या कायद्याचे पालन करा. कोणत्याही मानवीय सत्तेस हा अधिकार पोहचत नाही की, अल्लाहच्या आदेशाची उपेक्षा करून अल्लाहच्या दासावर आपला हुकूम चालवावा हे उचीत नाही अशा सर्व अवस्था बंडाच्या आहेत़ याची शिक्षा बंड करणारे व त्यांचे आदेश स्विकारणारे दोघांनाही मिळणे निश्चित आहे. मग ती शिघ्र मिळो अथवा उशीरा. आपले आणि जगातील प्रत्येक मुनष्याच्या डोक्यावरील केस अल्लाहच्या मुठीत आहेत. हवे तेव्हा धरून त्याने ओढावे़  त्याच्या या पृथ्वी आणि आकाशाच्या राज्यातून पळून जाण्याची ताकद कोणातही नाही़ त्याच्यापासून पळ काढून आपण कोठेही आश्रय मिळवू शकत नाही़ मातीत मिसळून आपला कण न् कण जरी विखूरला गेला, आगीत जळून आपली राख हवेत पसरली, पाण्यात वाहून आपण माशाचे भक्ष बनलो किंवा समुद्राच्या पाण्यात विरघळून गेलो़ तरी अल्लाह प्रत्येक ठिकाणाहून आपणास पकडून बोलावील़ वारा त्याचा दास आहे, पृथ्वी त्याची दास आहे, मासे आणि पाणी सर्व त्याच्या आदेशाच्या आधीन आहेत़ एका इशाऱ्यासरशी चोहोकडून आपण पकडीत सापडू मग तो आपल्यापैकी प्रत्येकाला बोलावून विचारेल की माझी रयत असूनही सत्ताधिशाचा दावा करण्याचा हक्क तुम्हाला कोठून प्राप्त झाला होता? माझ्या राज्यात आपले आदेश चालविण्याचे अधिकार तुम्ही कोठून आणले होते़ 1़ माझ्या सत्तेमध्ये आपला कायदा चालविणारे तुम्ही कोण? माझे दास असूनही इतरांचे दास्यत्व पत्करण्यावर तुम्ही राजी कसे झालात? माझे दास असूनही तुम्ही इतरांच्या आज्ञा कशा पाळल्यात? माझ्याकडून पगार घेऊन इतरांना तुम्ही अन्नदाता आणि पालनकर्ता मानलेत़ माझे गुलाम असूनही इतरांची गुलामी केलीत, माझ्या राज्यात राहून सुद्धा इतरांची सत्ता तुम्ही मान्य केली व इतरांच्या कायद्यांना कायदा समजलात आणि इतरांच्या हुकूमाचे पालन केले़ ही बंडखोरी तुमच्यासाठी वैध कशी ठरली होती? आपणापैकी कोणापाशी या आरोपाचे उत्तर आहे सांगा बघू? कोणते वकील तेथे आपल्या युक्त्या लावून बचावाचा मार्ग काढू शकतील? या बंडखोरीच्या अपराधाची शिक्षा भोगण्यापासून तुम्हास कोण वाचविणार आहे? 
ही माणसाची वास्तविकता आहे़ त्या वास्तविकतेशी जुळवून घेऊन, त्या एकमेव सत्ताधिशाच्या आज्ञांचे पालन केल्यास अर्थात त्याने सांगीतल्याप्रमाणे जीवन जगल्यास माणसाच्या आणि संपूर्ण जगताच्या जीवनात शांतता नांदवून तो विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल़ वास्तविक मालकाच्या कायद्याचे पालन करणे म्हणजे त्याची आराधना करणे होय. हेच मानवाच्या मुक्तीचे गमक आहे आणि हाच इस्लाम आणि हीच वास्तविकता आहे़

नाजिम खान, बार्शीटाकळी
9763869830
इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शरण असा होतो. मनुष्याला वास्तविक शांती त्याच वेळी प्राप्त होते जेव्हा तो स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनःशांती प्राप्त होते आणि समाजात शांती नांदू लागते. अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसारच आचरण हीच खरी शांती आहे आणि म्हणून या धर्माचे नाव ’इस्लाम’ (शांती) असे अल्लाहने ठेवले आहे. इस्लामने शांततेला अधिक महत्त्व दिले आहे. कुरआनात म्हटले आहे की, ”त्यांच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता शांतीचे निवासस्थान आहे. आणि तो त्याचा वाली आहे, त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगिकारली”(कुरआन, 6 :127) मानवी समस्यांवर एकमेव उपाय इस्लामी जीवनव्यवस्था आहे. जगात सुखशांती तेव्हाच नांदू शकते जेव्हा मानव आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनाची पायाभरणी इस्लामच्या तत्त्वानुसार करेल. हे मत फक्त यामुळे नाही की आम्ही मुस्लिम आहोत आणि इस्लाम आमच्या ईमानाचा अनिवार्य भाग आहे. वास्तविक पाहता हीच वस्तुस्थिती आहे.
मनुष्य एक सामाजिक अस्तित्व आहे. तो जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेकानेक संबंधामध्ये जखडलेला असतो. तो या जगात डोळे उघडताच आईवडील, आजी, सगेसंबंधींशी संबंध ठेवण्यास बाध्य होतो.  त्याचे संबंध कौटुंबिक, शेजारीपाजारी, आपल्या गावाशी, आपल्या देशाशी आणि समस्त मानवतेशी अनेकानेक प्रकारांनी जोडले जातात. हे सर्व संबंध जर सत्य आणि नैसर्गिक, स्वाभाविक पायावर उभारले गेले तरच ही आशा धरली जाऊ शकते की जगात मानवी हक्कांची पायमल्ली कधीही होणार नाही आणि जगात शांती, समृद्धी नांदू शकेल. या मानवी संबंधांना संतुलित, स्वाभाविक व शाश्वत करण्यासाठी एक अशा वैश्विक परिपूर्ण जीवनव्यवस्थेची आवश्यकता आहे जी अत्यंत संतुलित आहे. सुखसमृद्धी व विश्वशांतीची हमी देणारी आहे. अशा व्यवस्थेत उच्चनीचता नसते, त्यात श्रीमंत-गरीब, काळा-गोरा असा अस्वाभाविक भेद नसतो. अल्लाहने (ईश्वराने) या परिपूर्ण जीवनव्यवस्थेची सोय केली आहे. अल्लाह एक असे महान अस्तित्व आहे जो समस्त मानवजातीचा आणि सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, शासनकर्ता, मालक असल्याने प्रत्येक माणसाशी तो न्याय करू शकतो. मनुष्याच्या फक्त भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्याची सोय अल्लाहने केली आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आजपासून साडेचौदाशे वर्षांपूर्वी जीवनव्यवस्थेला व्यावहारिक रूप दिले. असे करून प्रेषितांनी इस्लामला मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व जीवनव्यवहारात कार्यान्वित करून जगापुढे समस्त मानवतेच्या कल्याणासाठी एक आदर्श ठेवला आहे.
अल्लाहला तो इस्लाम अपेक्षित नाही ज्याचे प्रदर्शन मुस्लिम लोक शतकानुशतके आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात करत आहेत. तो इस्लाम नव्हे जो मुस्लिमांंना त्यांच्या वारसाहक्कात प्राप्त झाला आहे. खरा इस्लाम कुरआन आणि सुन्नत (हदीस) मध्ये सुरक्षित आहे. आदर्श खलीफांच्या राज्यकाळात जी चालतीफिरती जीवनव्यवस्था प्रचलित होती तो खरा इस्लाम आहे, ज्यामुळे सुखसमृद्धी आणि मानवी कल्याणाचा समुद्र उफाळून आला होता. खरा इस्लाम एकमेव अल्लाहच्या आज्ञापालनाची शिकवण देतो. समस्त मानवतेसाठी एक आदर्श, संतुलित जीवनव्यवस्था म्हणजे इस्लाम होय. मानवतेला त्या इस्लामपासून लाभ घेण्याचा तसाच अधिकार आहे ज्या प्रकारे मानव ईश्वराच्या देणग्यांचा लाभ दररोज घेत आहे. मानवतेचे वैश्विक कल्याण, वैश्विक मुक्तीची हमी आणि परिपूर्ण व्यवस्था पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रात (सुन्नत) सुरक्षित आहे.
आजसुद्धा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील समस्त समस्यांची उकल इस्लाम आणि फक्त इस्लाममध्येच आहे. कुरआन स्पष्ट करतो की, ”आज आम्ही तुमची जीवनपद्धती (दीन) परिपूर्ण केली. तुमच्यावर आपल्या देणग्यांचा वर्षाव पूर्ण केला आणि इस्लामला तुमच्यासाठी आदर्श जीवनव्यवस्था म्हणून निश्चित केले.”
अशाच प्रकारे पवित्र कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी सृष्टीनिर्माता अल्लाहने स्पष्ट केले आहे, ”अल्लाहजवळ तर परिपूर्ण जीवनव्यवस्था फक्त इस्लाम आहे.”
इस्लामच्या शिकवणी आणि आदेश जगातील दुसऱ्या सर्व जीवनव्यवस्थांपेक्षा आणि शिकवणींपेक्षा पूर्णत: स्वाभाविक, समस्त मानवजातीसाठी स्वीकृत असे प्रत्येक देशासाठी आणि काळासाठी उपयुक्त सिद्ध झाले आहेत.

मोहम्मदी बेगम, अकोला
अल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधिश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले - वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ वसीला घेतो. परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही.

कुरआन आणि नबी सल्ल. यांची सुन्नत म्हणजे इस्लाम होय. इस्लाम या शब्दाचा अर्थच शांती आहे. म्हणजेच इस्लाम शांतीपूर्ण धर्म आहे. या धर्मामध्ये अल्लाहने एक लाख चोविस हजार प्रेषित पाठविले़ त्यामध्ये अंतिम प्रेषित म्हणून मुहम्मद सल्ल़ यांना पाठविले. ते समस्त मानवजातीसाठी. सर्व जगाला सत्याचा मार्ग दाखविण्यामध्येच मानवाची सुख, शांती सामावलेली आहे़ कुरआन या ईश्वरीय ग्रंथामध्ये शांतीचे सर्व मार्ग दाखविलेले आहेत. ते कसे? जर आपल्या घरात आपण एक शिकली सवरलेली सून जर का आणली आणि त्या मुलीने आपल्या नवीन झालेल्या वंशाला जर चांगली शिकवण दिली आणि त्याचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने केले तर ते एक कुटुंब, कुटुंबापासून एक समाज या दोन्ही गोष्टीमध्ये शांती दिसून येईल़ आपण आपल्यापासून दुसऱ्याचा फायदा जर होत असेल तर तो करावा़  उदा़ एखाद्या गरीब घराण्यात फार हुशार मुलगा आहे़ तो गरीबीमुळे शिकू शकत नाही तर त्याला मदत देणे़  म्हाताऱ्या माणसांना मदत करणे, शेजाऱ्यांच्या सुख-दु:खात सामिल होणे. हे सर्व तत्व कुरआनमध्ये शांती म्हणून सांगितले आहेत. आजच्या काळामध्ये लोक सगळं काही विसरले. कारण हे जग फक्त पैशाच्या मागे धावत आहे. लोकांना मूल, बाळ, आई-वडिल, नातेवाईक, समाज हे काहीच दिसत नाही. परंतु, माझ्या बंधू आणि भगिनीनों! जगामध्ये पैसाच सर्व काही नाही़ तर नबी सल्ल़ सांगतात आणि कुरआनच्या अनेक आयातींमध्ये सुद्धा सांगितले आहे की, माणसामध्ये माणुसकी प्रेमभाव आणि बंधुत्व असायला पाहिजे. हा आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे़ 
1. माणुसकी म्हणजे प्रेम 2. माणुसकी म्हणजे एकमेकांना समजून घेणे 3. माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणा 4. माणुसकी म्हणजे एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात. या नंतर आपण प्रगतीसंबंधी चर्चा करूया.
प्रगती : आपण सर्व लोक फक्त जगाची प्रगती बघतो़ जगाची प्रगती म्हणजे हेच एक घर आहे तर दुसरे घर असलं पाहिजे़ साध घर असेल तर बंगला असला पाहिजे, त्या बंगल्यामध्ये दुचाकी असली तर चारचाकी गाडी असली पाहिजे, पाच मुलं आहेत तर पाच बंगले असले पाहिजे़ या सर्व जगाला फक्त इथल्या प्रगतीची पडली आहे़  परंतु ही प्रगती मिळवून आपल्याला काही फायदा होणार नाही़  कारण हा प्रगतीचा प्रवास इथेच थांबणार आहे़  आपल्या प्रगतीचा खरा प्रवास म्हणजे पारलौकिक जीवन आहे़  आपण या जगामधून निघून गेल्यावर त्या जगाच्या प्रगतीसाठी आम्हाला काय करावे लागेल याचा विचार आज करणे गरजेचे आहे. तो प्रगतीचा प्रवास हाच खरा प्रवास आहे़ आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांनी सांगितलेल्या मार्गावर चलावे लागेल़ वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा लागेल़ मुला-बाळांना चांगले संस्कार द्यावे लागतील़ कधी खोटे बोलू नये, चोरी करू नये, कोणाची निंदा करू नये़ कारण अल्लाहतआलाने कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ”हे लोकहो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. पुरूषांनी दुसऱ्या पुरूषांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील, आणि स्त्रियांनीसुद्धा दुसऱ्या स्त्रियांची टिंगल उडवू नये. शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील. आपापसांत एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका. श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारात नाव मिळविणे फार वाईट गोष्ट आहे. जे लोक या वर्तनापासून परावृत्त होत नसतील ते अत्याचारी होत”(सुरःअलहुजरात आयत नं. 11). 
मुक्ती : मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला चांगली कामे करावी लागतील़ म्हणजे आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा अल्लाहने जगात मानवाला आचार व विचार स्वातंत्र्य देवून पाठविलेले आहे़ जेणेकरून पहावे की कोण सर्वोत्कृष्ट कर्म करतो? सदाचार म्हणजे काय हे अल्लाहने प्रत्येक युगात पैगंबरांद्वारे मनुष्यास शिकवले आहे़ आणि सर्वात अंतिम पैगंबर मुहम्मद सल्ल़ यांच्यावर पवित्र कुरआन हा ग्रंथ अवतरित करून सर्व काही विस्ताराने जगापुढे मांडले आहे़ मग आता जो कोणी कुरआनच्या मार्गदर्शनाचे पालन करील तो मरणोत्तर जीवनात स्वर्गप्राप्ती करेल आणि जो कोणी नकार देईल त्यास नरकामध्ये नेहमीसाठी फेकून दिले जाईल. आणि मग आपल्या शेवटच्या निर्णयापूर्वी या जगात जन्माला आलेल्या सर्वांच्या कर्माचा हिशोब घेण्यासाठी या सृष्टीच्या राजाचे न्यायालय स्थापित होईल़ ज्याने कणभर सुद्धा पुण्यकर्म केले असेल तो त्यास पाहील़ आणि ज्याने कणभर पापकर्म केले असेल ते सुद्धा तो पाहील.
अल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले आणि वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही तिथे तर आम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की, मी तुम्हाला जगात एवढे वर्ष ठेवले तेव्हा तुम्ही काय केले? म्हणून कुरआन आणि नबी सल्ल. यांनी सांगितले की, तुम्ही सत्याच्या मार्गावर चला तुमचा फार मोठा फायदा आहे आणी हीच खरी मुक्ती आहे़ 
यानंतर थोर पुरूष आणि संतांची नबी सल्ल़ यांच्या विषयीची व्यक्तव्य पाहू. 
1. शंकराचार्य सांगतात, इस्लाम आतंक नव्हे तर आदर्श आहे़ 
2. डॉ़ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इस्लाम शांती देणारा एक धर्म आहे़

नौशाद उस्मान, औरंगाबाद
9029429489
ज्या प्रकारे मनःशांतीशिवाय अभ्यास, अध्ययन शक्य नाही, परिक्षेत पास होणे शक्य नाही, त्याचप्रकारे कुटूंबात शांतीशिवाय कुटूंबियांची प्रगती शक्य नाही. तसेच गावात, शहरात संचारबंदी, तणाव असेल, तरीही गावात उद्योगधंदे, शिक्षण वगैरे हे सुरळीत चालणे शक्य नाही. यामुळे देशाची प्रगती शक्य नाही. शांती नांदावी यासाठी अशांती पसरविणारी तत्वे कोण व त्यांची मानसिकता कोणती आहे, त्याचे निदान होणे आवश्यक आहे. जाऊ द्या, उगीच कशाला नकारात्मक गोष्टींची घुसळण कशाला? असं म्हणून जर आपण याकडे दुर्लक्ष करत गेलो तर हा रोग आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. म्हणून काही कटू सत्ये पचवणेदेखील आवश्यक आहेत. त्याला फाटा देऊन प्रगती करणे शक्य नाही.
समाजात अफवा, गैरसमज पसरवून, तेढ निर्माण करून, ध्रुवीकरण आणि विषमता पसरवून आपली पोळी भाजवून घेणारी एक मानसिकता जोपासणारा फॅसिस्ट गट नेहमी राहिला आहे. हा गट समाजात कालांतराने एक एक टूम सोडत असतो. त्यासाठी तो गट फक्त निमित्त शोधत असतो. समाजात तेढ निर्माण करण्याची जी निमित्ते वापरली जातात, त्यापैकी एक म्हणजे आंतर धर्मीय किंवा आंतरजातीय विवाह.  उदाहरणार्थ अशीच एक टूम नुकतीच या गटाने सोडली होती, ती म्हणजे हादिया प्रकरण. 
लव जिहाद हा शब्द सर्वात आधी हिंदू जनजागृतीच्या वेब साइटवर आलाय. तथाकथित ’लव जिहाद’ अपराध आहे, असा कोणताही कायदा घटनेत नाही. धर्मांतरासाठी जबरदस्ती ही कोणीही करो, तो अपराधच असतो, पण त्याला विशिष्ट धार्मिक विशेषण लावणे, हा अपराध आहे. पूर्वोत्तर राज्यात ख्रिश्चन लोकं हे ’गन पॉइंट’वर धर्मांतर करत असल्याचाही आरोप होतो, त्याला काय म्हणाल? वस्तुस्थिती अशी आहे की, कोर्टात लग्न करण्यापूर्वी एक महिना अगोदर रजिस्ट्री कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यामुळे पालकांची मर्जी नसेल तर दोघांच्याही पालकांना याचा सुगावा लागतो आणि ते आपल्या पाल्यांना यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कधी-कधी यातून नितीन आगे सारखे प्रकार घडतात, तर कधी सैराट सारखे ऑनर किलींगचेही प्रकरण समोर येतात. हे टाळण्यासाठी वकील लोकं दोघांना ’वन डे मॅरेज’चा सल्ला देतात. वन डे मॅरेज म्हणजे कोणत्याही एका धर्म संस्कृतीनुसार लग्न करायचं आणि त्याच लग्नाची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयात करून टाकायची. यासाठी दोघेही एका धर्माचे असणे आवश्यक असते. म्हणून दोघांपैकी एक जण दुसऱ्याचा धर्म स्वीकारून टाकतो. यात नेहमी इस्लामच स्वीकारला जातो असं नाही. धर्मयुग मासिकात दर महिन्याला काही मुस्लिम मुली हिंदू बनून हिंदू युवकांशी लग्न केल्याच्या बातम्या देणारं एक नियमित स्तंभच आहे. त्यात त्या धर्माशी काही घेणं देणं नसते. फक्त ती एक कायदेशीर पळवाट असते. यात कोणतंही षडयंत्र, योजना वगैरे नसते. हे केरळ न्यायालयानेही मान्य केलंय की, हिंदू मुली इस्लाम स्वीकारून मुस्लिम युवकांशी लग्न करण्याचे प्रमाण जास्त आहे, मात्र त्यामागे कोणतीही देशविरोधी अशी योजना नाही. 
परंतु मुस्लिम युवकांशी लग्न केल्यानंतर त्यांना जेंव्हा इस्लाम कळतो, तेंव्हा ते इस्लामच्या प्रेमात पडतात. मग त्या मुस्लिम युवकाने काही वर्षांनंतर तीला सोडूनही दिलं, तरी त्या इस्लाम सोडत नाहीत. कारण एक कायदेशीर गरज म्हणून स्वीकारलेला समतावादी इस्लाम त्यांना आता मूक्तीचा एकमेव मार्ग वाटतो. म्हणून त्या दुसरं लग्न करतात तेही मुस्लिम युवकांशीच. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, अशा लोकांशी प्रत्यक्ष भेट करवून देऊ शकतो. मात्र स्वधर्म अहंकारापायी या गोष्टी अनेक जण मान्य करत नाही. हे कटू सत्त्य पचविण्यासाठी विवेक असावा लागतो. फक्त माझंच किंवा फक्त माझ्याच समाजाचं योग्य, याशिवाय सर्वकाही खोटं, कारण ते दुसऱ्यांचं आहे म्हणून, ही अविवेकी भुमिका सोडली पाहिजे. जे-जे माझं तेच चांगलं म्हणण्यापेक्षा जे-जे चांगलं तेच माझं म्हणून चांगुलपणा आत्मसात करण्याचा सामाजिक विवेक जोपासला गेला पाहिजे. याचे एक उदाहरण अमेरिकेत पाहायला मिळते. 
एक ज्यू महिला दोन वेगळे स्वयंपाक करत होती. तीला कारण विचारले तर म्हणाली की, माझ्या एका मुलाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर दुसऱ्याने इस्लाम स्वीकारलाय. माझ्या मुस्लिम मुलाला वराहाचे मांस चालत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करतेय. 
असे उदार स्वातंत्र्य आपले भारतीय संविधानदेखील प्रत्येकाला देते. ती उदारता प्रत्येक भारतीयात असली पाहिजे. याचा अर्थ सगळेच अविवेकी आहेत, असं नाही. विशेषकरून काही अपवाद वगळता हिंदू समाज हा नक्कीच विवेकी, सहिष्णु आहे. आनो भद्राय कांता क्रतवो यन्तु विश्वतः म्हणजे विश्वभरातून चांगले विचार आमच्याकडे येऊ द्या असे उदात्त विचार हिंदूंचा यजुर्वेद देतो. म्हणूनच भारतात सर्वात जास्त उदात्त इस्लाम, उदात्त अशा हिंदूंनीच स्वीकारला आहे. पण हळूहळू आता वातावरण बदलत आहे. देशाची ओळख असलेली ही उदात्त अशी सहिष्णुता कमी कमी होत चालली आहे, पण संपलेली नाही. आजही या देशातले बहुसंख्य लोकं शांतीवादी, सहिष्णु आहेत. फॅसिस्ट लोकांना मिळालेल्या मतांची टक्केवारी याचा पुरावा आहे. पण देशातली ही शांती, सहिष्णुता टिकवून ठेवण्याची, त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सामुहिक प्रयत्न करण्याची जबाबदारीही याच उदारवादी लोकांची आहे.

अता महंमद, कन्नड
मानवी जीवनातील सर्वांत महत्त्वाचा शक्तीस्रोत : एकेश्वारवाद आहे.
अल्लाह हा या संपूर्ण विश्वाचा, विश्वातील चराचर सृष्टीचा पालनकर्ता, शासक, मालक, व्यवस्थापक, सार्वभौम, सत्तेचा स्वामी , स्वयंपूर्ण, सर्वज्ञ, एकमेवाद्वितीय व अविभाज्य असल्याचे इस्लाम मानतो.
    हे चंद्र, सूर्य, तारे व धरती अब्जो वर्षांपासून भ्रमण करताहेत. सर्व अल्लाहच्या आदेशाला बांधलेले आहेत. आकाशाला त्याने छत बनविले. जीवितासाठी हवा, पाणी, वर्षा, अन्नधान्य, फलोपहार व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू निर्मिल्या. जगातील प्रत्येक वस्तू त्या अल्लाहवर विसंबून आहेत. परंतु तो कोणावर विसंबून नाही. म्हणून पवित्र कुरआनमध्ये असा उल्लेख आहे की या सृष्टीमध्ये एकापेक्षा जास्त ईश्वर असते तर साम्राज्य विस्तारासाठी त्यांच्यात भांडणे झाली असती व ही प्रचलित व्यवस्था केव्हाची कोलमडून पडली असती.
मानवाने ईश्वरी व्यवस्थेला बाजूला ठेवून जी धोरणे व व्यवस्था अमलात आणल्या त्या सर्व निरर्थक, निष्प्रभ व असफल ठरल्या. मग ती व्यवस्था सेक्युलर असो, जातीयवादी फासिस्ट असो, कम्युनिस्ट असो कोणतीही असो. केवळ पोकळ नारेबाजी आणि आंधळ्या-बहिऱ्या इच्छेतून लोकांना भाषणांच्या आहारी नेऊन सत्तेचा लाभ घेत राहण्यापलीकडे यांच्याजवळ दुसरे कोणतेही उपाय नाहीत, हे कटु सत्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी साडेचौदाशे वर्षांपूर्वी अस्पृश्यता, श्रेष्ठ-कनिष्ठ व सर्व प्रकारच्या विषमतेची सर्व भिंताडे पाडली. प्राचीन इतिहास आरंभापासून लाखो दासदासींनी भरलेला आहे. त्या प्रथेला संपुष्टात आणून जगभर प्रेम, दया करुणा व सहिष्णुतेचा संदेश पोहचविला व त्याला प्रत्यक्षात प्रस्थापित केले.’इस्लाम’ हा अरबी शब्द आहे व त्याचा अर्थ होतो- शांती. आत्मसमर्पण, आज्ञापालन, शिर नमविणे. ’मुस्लिम’चा अर्थ होतो- आज्ञाधारक, आत्मसमर्पण करणारा, शिर नमविणारा व शांतीचा मार्ग प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणारा. पवित्र कुरआनच्या अनुसार मर्यादा सांभाळून वागणारा म्हणजे विशिष्ट प्रकारे वागण्याची प्रक्रिया अवलंबविणारा म्हणजेच कर्तव्यदक्ष व्यक्तिलाच मुस्लिम म्हटले गेले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ”लोकांच्या कामी येऊन मनाला आनंद मिळत असेल व दुसऱ्याला आपणाकडून त्रास झाला तर मनात वेदना उठत असतील तर तुम्ही मुस्लिम आहात.” ज्याच्या छळापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल, जो पोट भरून जेवत असेल व शेजारी उपाशी झोपला असेल तर तो मुस्लिम नाही.”असे शेकडो आदेश आहेत की ज्यांचे पालन प्रत्येक मुस्लिमाला अत्यावश्यक आहेत. 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget