Latest Post

        - अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत लेखकाने मानवी जीवनाच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष वेधून त्याच्या सोडवणुकीचे मार्ग सांगितले आहेत.
जो पर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, ``मी कोण आहे? मी कसा आहे? मी जबाबदार आहे की बेजबाबदार? स्वतंत्र आहे की अधिन, अधीन आहे तर कुणाचा? या जगातील जीवनाची निष्पत्ती आहे की नाही, असेल तर कोणती?
जीवनाच्या मूळ प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लेखकाने तीन प्रकार सांगितले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 15     -पृष्ठे - 24     मूल्य - 10      आवृत्ती - 7 (2013)


डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/e7fqimphcxncr0zez8m6k4zcv4j4j9tc

        - इनामुर्रहमान खान
या पुस्तिकेत मनुष्यस्वभावात धर्म भिनलेला असून तो जगाच्या अंतापर्यंत राहणारा आहे, हे सांगून मूलभूत प्रश्नांकडे वाचकाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ईश्वर कसा आहे? ईश्वर एकच आहे की अनेक आहेत? त्याचे गुण कोणकोणते आहेत? मनुष्याचे ईश्वरांशी संबंध कोणते असले पाहिजे? मनुष्याचे यश व कल्याण कशात आहे? त्याचे अपयश म्हणजे काय?
ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे धर्म आहे. या प्रश्नांची अचूक उत्तरांवर मानवी जीवनाचे या जगातील व परलोकातील यश अवलंबून आहे, हे स्पष्ट केले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 14   -पृष्ठे - 12        मूल्य - 10            आवृत्ती - 9 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/mrsikqz2jav6b0rktica0g2tmqj77dj9


फेरोजा तस्बीह- 9764210789 
(मिरजोळी चिपळून, रत्नागिरी)
बहुतेक आधुनिक मुस्लिम महिलांमध्ये आपल्या पतीचे कुफ्र (अवज्ञा) करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत आहे. छोट्या-छोट्या सांसारिक गोष्टीसाठी पती बरोबर वाद-विवाद करण्यात व तो कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यात अशा महिलांना आपला विजय झाला, असे वाटत असावे. दिवसभर काम करून थकून भागून घरी आलेल्या पती बरोबर पत्नी जर असा वाद घालत असेल तर अशा पुरूषांचे जीवन यातनामय होवून जाईल, यात वाद नाही. वास्तविक पाहता पती जेव्हा थकून भागून घरी येतो तर त्याची अपेक्षा केवळ हीच असते की पत्नीने हसतमुखाने त्याचे स्वागत करावे. मुलांनी पळत येवून त्याची गळाभेट घ्यावी. घर त्याला एका संरक्षित किल्यासमान भासत असते. जेथे थकून भागून आल्यानंतर त्याला सुरक्षा व समाधान मिळण्याची अपेक्षा असते. हेच मिळत नसेल व घरी आल्याबरोबर पत्नीकडून उशीर का केला? आता पावेतो कुठे होते? अशा सारखे प्रश्‍न विचारले जातील व आल्या-आल्या पतीसमोर आपल्याच अडचणींची यादी मांडली जात असेल तर त्या पुरूषाची काय अवस्था होत असेल हे अल्लाहच जाणो. अशा पुरूषांना घरात संतोष मिळणार नाही, हे ही तेवढेच खरे. छोट्या-छोट्या गोष्टींना मोठ्या करून ज्या महिला पतीबरोबर वाद घालतात आणि प्रत्येक वेळी आपण खरे असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा करतात, अशा महिला आपल्या पतीच्या नजरेतून उतरून जातात. अनेक महिला वाद घालताना टोकाची भूमिका घेतात. तुम्हाला जर पत्नी नाही सेवक पाहिजे असेल तर, मी चालली माहेरी तुम्ही तुमच्यासाठी अशी पत्नी घेऊन या जी उठता बसता तुमच्या आज्ञांचे पालन करेल.
अशा वर्तनापेक्षा प्रत्येक पत्नीने जर का हा विचार केला की, अल्लाहने आपल्याला पैसा कमावण्याच्या अपरिमित कष्टापासून सुरक्षित ठेवलेले आहे. आपल्यासाठी हे कष्ट आपला पती उपसतो आहे. तो कोण-कोणत्या परिस्थितीला तोंड देवून येत असेल त्यालाच माहित. पैसा कमाविणे सोपी गोष्ट नाही. गळेकापू स्पर्धेच्या आजच्या युगामध्ये हलाल मार्गाने पैसा कमावण्याएवढे दिव्य कोणतेच नाही. याची कल्पना जर महिलांनी ठेवली तर त्यांना त्यांच्या पतीच्या कष्टाचा अंदाज येईल व आपल्या अडचणी त्याच्या कष्टासमोर कसपटासमान वाटू लागतील. यातून त्यांच्या मनात पतीच्या हसतमुख स्वागताची इच्छा निर्माण होईल व त्या लहान सहान गोष्टीतून पतीला कसे समाधान मिळेल, यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, अशी मला खात्री आहे.
इस्लामने महिलेला कुटुंब व्यवस्थेमध्ये केंद्रस्थानी ठेवलेले आहे. मात्र टीव्ही व सोशल माध्यमावर येणार्‍या सततच्या उलट-सुलट मालिकांमुळे अनेक महिलांची सारासार विवेक बुद्धी बाधित होत आहे. त्यातून अनेक महिलांना लाज, लज्जेचा विसर पडलेला आहे.
भारताच्या राज्यघटनेने स्त्री-लाही तेवढेच अधिकार दिलेले आहेत, जेवढे पुरूषांना दिलेले आहेत. अनेक महिला या अधिकारांचा खर्‍या अर्थाने लाभही घेत आहेत. मात्र काही महिलांमध्ये या सवलतींमुळे उर्मटपणा आलेला आहे. त्यांनी त्या उरमटपणामधून सातत्याने पतीच्या विरूद्ध भूमिका घ्यावयास सुरूवात केलेली आहे. त्यांना वाटते की आपण आर्थिकरित्या स्वतंत्र असल्यामुळे घराच्या प्रत्येक सदस्याला आपल्या बोटावर नाचवू शकतो. मात्र महिलांनी हे विसरता कामा नये की, महिलांची सर्वात मोठी संपत्ती त्यांची पवित्र वागणूक असते. ज्यामुळेच त्या कुटुंबामध्ये सन्माननीय ठरत असतात. महिलांनी आपल्या हट्टी स्वभावाला मुरड घालून पतीला साथ देण्याची भूमिका जर का घेतली आणि अडचणीच्या वेळेस पतीच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला तर त्या महिलेचा सन्मान पतीच नाही तर घरातील सर्व सदस्य करतील, यात शंका नाही. मात्र आजच्या आधुनिक महिलांच्या वर्तणुुकीमुळे अनेक कुटुंबात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. वैवाहिक कलाहांना सीमा राहिलेली नाही. फॅमिली कोर्टांची व त्यात येणार्‍या दाव्यांची, दोहोंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्चर्य म्हणजे जेव्हा महिलांवर कौटुंबिक अत्याचार होतात तर त्याचे रक्षण करण्यासाठी कायदे आहेत. परंतु, महिलांच्या अशा उर्मट वागण्याने कुटुंबाला होत असलेल्या नुकसानापासून वाचविण्यासाठी कुठलाच कायदा नाही.
इस्लामने महिलांना लाज आणि लज्जेसह नेक वर्तन करण्याचा आदेश दिलेला आहे. मात्र आज अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरूषांची नक्कल करत त्यांच्या सारखे दिसण्या आणि वागण्याचा प्रयत्न   करीत आहेत. त्यांच्यासारखे कपडे, त्यांच्यासारखे वागणे, त्यांच्याचसारखे बोलणे, जाणून बुजून आपल्या वर्तनात आणत आहेत. अशा वर्तनातून पुरूषांसमोर आपले महत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा महिलांचा कल मग बेपर्दा राहण्याकडे वाढत आहे. अनेकवेळा अशा महिला आपल्या या वर्तनामुळे संकटात सापडतात. स्त्री-पुरूषांमध्ये यातून विनाकारण स्पर्धेचा भाव निर्माण होत आहे. ज्या महिला आपले स्त्रीत्व विसरून पुरूषांची कृत्रिम बरोबरी करण्याचा प्रयत्न करतात त्या नेहमीच तोंडघशी पडतात.
अल्लाहच्या नजरेतही त्यांची ही कृती निंदणीय ठरते. महिलांनी आपल्या ह्या वर्तणुुकीसंबंधी आत्मपरिक्षण करावयास हवे. आपले अधिकार क्षेत्र म्हणजेच घर हे सुंदर, सुरक्षित आणि सुसज्ज राहील याकडे जर त्यांनी अधिक लक्ष दिले तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी पुरूषांसारखा पोशाख व त्यांच्यासारखीच वर्तणूक तात्काळ सोडावयास हवी.
महिलांना जो शरई पोशाख घालण्याची परवानगी आहे त्यात महिला ह्या नितांत सुंदर व सुरक्षित भासतात. याची आठवण प्रत्येक महिलेने ठेवावयास हवी. शिवाय, महिला म्हणून जे अधिकार आम्हाला इस्लामने दिलेले आहेत, ते पुरेसे आहेत. नवीन पिढीचे संवर्धन करून देशासाठी जबाबदार नागरिक घडविणे ह्यापेक्षा दूसरे मोठे काम असूच शकत नाही. हे काम ज्या महिला मन लावून करतील त्याच आपल्या पतीच्याच नव्हे तर कुटुंबाच्या व समाजाच्या आदरास पात्र राहतील, यात शंका नाही.

ढूंडनेवाला सितारों की गुजरगाहों का
अपने अफकार की दुनिया में सफर कर न सका
जिसने सूरज की शुआओं को गिरफ्तार किया
जिंदगी की शबे तारी़क सहेर कर न सका
स्टिफन विल्यम फ्रँक हॉकिंग, एक नास्तीक होते. उच्च कोटीचे भौतिक शास्त्रज्ञ व खगोलशास्त्री होते. त्यांनी ईश्वराचाच नव्हे तर स्वर्ग आणि नर्क या दोन्ही संकल्पनांचा सुद्धा इन्कार केला होता. त्यांचे मत होते की, जे काही आहे हेच जीवन आहे. याच्या मागेही काही नाही व मृत्यूनंतरचे जीवन तर नाहीच नाही. आश्चर्य म्हणजे त्यांचे हे नास्तीक विचार त्यांच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या संशोधनावर त्यांनीच सूक्ष्म नजर टाकली असती तर ते नक्कीच आस्तीक झाले असते. खंत या गोष्टीची आहे की, त्यांना ईश्वर असल्याचे वैज्ञानिक पद्धतीने पटवून देण्यामध्ये मुस्लिमांना यश आलेले नाही. म्हणून एक कुशल वैज्ञानिक कुफ्र (सत्याचा इन्कार) च्या स्थितीत 14 मार्च 2018 रोजी जगाचा निरोप घेऊन गेला. म्हणून मला म्हणावेसे वाटते की, ”सॉरी स्टिफन! आम्ही तुला तुझ्याच भाषेमध्ये ईश्वर असल्याचे पटवून देऊ शकलो नाही.” 
वास्तविक पाहता उच्चशिक्षित नास्तीक लोक हे कुठल्याही धर्माविषयी पूर्वग्रह दुषित नसतात. म्हणून त्यांच्या समोर इस्लामच्या खर्‍या स्वरूपाची कार्यकारणभावासह मांडणी केल्यास ते तात्काळ इस्लामकडे आकर्षित होतात. याचा पुरावा हा की, मोरीस बुकॅले पासून ते किथ मूर पर्यंत अनेक वैज्ञानिकांनी इस्लामचा स्विकार केलेला आहे. एका अंदाजाप्रमाणे आजही दरवर्षी सरासरी किमान 20 हजार मूळ ब्रिटिश नागरिक इस्लामचा स्विकार करतात. त्यातील बहुतेक नास्तीक असतात. इंटरनेटवर ” इस्लाम इन ब्रिटन” एवढे टाईप करताच शेकडो लोकांची यादी स्क्रीनवर चमकू लागते. ज्यांनी अनैतिक जीवनाला कंटाळून इस्लामच्या शीतल छायेत येणे पसंत केले. 
बुद्धीवादी व्यक्तिंसाठी स्टीफन हॉकिंगचे आयुष्य हेच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होते आणि आहे. स्टीफन हॉकिंग यांना जरी इस्लाम समजला नसला तरी त्यांच्या जीवनाकडे पाहून इतर लोकांना मात्र इस्लाम नक्कीच समजेल याची मला खात्री आहे. यासाठीच हा लेखन प्रपंच.
स्टिफनचा जन्म 8 जनवरी 1942 साली ऑक्सफर्ड मध्ये एका विज्ञाननिष्ठ परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम फ्रँक हॉकिंग तर आईचे नाव ईसाबेला होते. दोघेही औषध निर्माण शास्त्रामध्ये निपुण होते. स्टिफन शालेय जीवनामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी होते. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना न्युरॉन मोटर अर्थात इनोट्रॉफिक लॅट्रल स्केलरॉसिस नावाचा दुर्धर रोग जडला. या आजारासंबंधी वैद्यक शास्त्रात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह असा आहे की, हा आजार ज्या व्यक्तीस झाला त्या इसमाच्या मज्जासंस्थेचा हळूहळू विनाश करतो. 2. हा आजार ज्या व्यक्तीस झाला त्याच्या हृदयाच्या पेशी हळूहळू निकामी होत जातात. मात्र जास्त वैज्ञानिक या आजारामुळे रूग्णाचा मेंदू बाधित होतो याच मतावर ठाम आहेत. म्हणून हे मानण्यास हरकत नाही की वयाच्या 21 व्या वर्षी झालेल्या या रोगामुळे स्टिफनच्या मेंदुतील न्युरॉन (जैविक रचना) हळूहळू बाधित होत गेले. ज्या कारणाने त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर जाणवू लागला. माता-पिता दोघेही वैद्यक शास्त्राशी संबंधित असल्याने त्यांनी तात्काळ तज्ञ डॉक्टर्सकडून स्टीव्हनवर उपचार सुरू केले. मात्र डॉक्टरांनी स्टिफनचे आयुष्य दोन वर्ष असल्याची भविष्यवाणी केली. तेव्हा स्टिफनने स्वतः म्हटले होते की, यानंतरचे (उर्वरित पान 7 वर)
त्याचे संपूर्ण जीवन हे बोनस आहे. 
15 मार्च 2018 रोजी जगातील जवळ-जवळ सर्वच वर्तमानपत्रामध्ये स्टिफनच्या मृत्यूच्या बातमीमध्ये डॉक्टरांच्या या भविष्यवाणीचा उल्लेख ठळकपणे करतांना असे म्हटले गेले की,  स्टिफनने दोन वर्षात होणार्‍या संभाव्य मृत्यूला धोका दिला व ते पुढे 50 वर्षापेक्षा जास्त जगले. यासंबंधीचे माझे मत असे की, स्टीफनने मृत्यूला धोका नाही दिला तर अल्लाहने त्याला उदंड आयुष्य देऊन हे सिद्ध केले की, ”वल्लाहु आला कुल्ली शैईन कदीर” अर्थात अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्यावर कादीर (वर्चस्व ठेऊन) आहे. तो काहीही करू शकतो. ज्याला तज्ञ डॉक्टरांनी दोन वर्षात मरणार असे घोषित केले त्याला 76 वर्षाचे उदंड आयुष्य देऊ शकतो. या एकाच गोष्टीवर सकारात्मकपणे स्टिफनने विचार केला असता तर त्याला ईश्वर असल्याचा साक्षात्कार झाला असता.
एका हायटेक व्हिलचेअरवर कपड्यावर कपडे रचलेले आणि त्यातून एक मुंडके दिसत असलेल्या स्टिफनला पाहताच दया येईल इतपत ते विकलांग होते. मात्र स्टिफनला एक यशस्वी आयुष्य देऊन अल्लाहने ती इंग्रजी म्हणही खोटी ठरविली की, A Healthy body can possess a healthy mind. ईश्वर असल्याचा हा पहिला पुरावा आहे. 
विकलांग अवस्थेतही न्युरो डिसीज म्हणजे मेंदू रज्जेचा विकार झालेला असतांनाही अल्लाहने स्टिफनला इतके वैज्ञानिक ज्ञान हस्तगत करण्यास पात्र बनविले की, तो विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जगाचे नेतृत्व करू शकला. हा ही ईश्वर असण्याचा दूसरा पुरावा आहे.
स्टिफन फक्त 76 वर्षाचे आयुष्य जगले एवढेच नाही तर त्यांनी जीवनाचा भरपूर आनंदही घेतला. त्यांनी एक नव्हे दोन लग्न केली. त्यांना तीन अपत्येही झाली. त्यांनी प्रेमही केले. ते ही आपल्याच मित्राच्या बायकोशी. स्टिफनने त्यांच्या हायटेक व्हील चेअरवर विशेष संगणक बसवून, त्यांच्यावर उपकार करणार्‍या डेव्हिड मेसनच्या बायकोशी, म्हणजे ऍलन मेसनशी प्रेम करून तिच्याशी दूसरे लग्न केले. ती स्टिफनची नर्स म्हणून काम करीत होती. अर्थात ते नास्तीक असल्यामुळे एक बायको असतांना, तिने दुर्धर आजारात साथ दिलेली असतांना, तिला सोडून आपल्या मित्राच्याच बायकोला त्याच्यापासून काढून स्वतः तिच्याशी लग्न करणे यात त्यांना कुठलाही अनैतिकपणा वाटला नाही. याबाबत आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी सर्व प्रकारच्या पाश्चिमात्य संगीताचा आस्वाद घेतला. शिवाय, जे भल्या-भल्यांना उपलब्ध होत नाही, अशी अंतराळची सफर सुद्धा केली. डोळे दिपवणारे यश, प्रसिद्धी मिळविली. अर्थात हे सर्व त्यांना देऊन अल्लाहने जगाला दाखवून दिले की, मला वाटले तर मी विकलांग व्यक्तीला सुद्धा एवढे वैभव देवू शकतो. बुद्धिमान लोकांसाठी स्टिफनच्या आयुष्याचा हा पैलू अल्लाहवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा आहे. 
स्टिफनच्या आयुष्यातील आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षी मेंदू बाधित झाल्यावरसुद्धा जे खगोलशास्त्रीय सिद्धांत त्यांनी मांडले ते स्वस्थ मेंदू असणार्‍यांनासुद्धा जमले नाही, हे कसे शक्य झाले? स्पष्ट आहे सृष्टीच्या निर्मात्याने, तुम्हा आम्हाला तसेच सार्‍या जगाला हा संदेश दिला की, मेंदू स्वस्थ असो का बाधित असो, शरीर स्वस्थ असो का विकलांग असो, ज्याला जे आणि जेवढे द्यायचे आहे ते मी देऊनच राहणार. म्हणजे पुन्हा कुरआनची ही आयत, ” वल्लाहु अला कुल्ली शैईन कदीर” या ठिकाणी पुन्हा सिद्ध होते. स्टिफनच्या आयुष्याचा हा पैलू सुद्धा अल्लाहवर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसा आहे.
1985 मध्ये जेव्हा स्टिफन वैज्ञानिकांच्या सर्न वर्ल्ड कॉन्फ्रन्ससाठी जेनेव्हा येथे गेले तेव्हा तेथे ते प्रचंड आजारी पडले. त्यांना तीव्र निमोनिया झाला. इतका की त्यांना वेंटीलेटरवर ठेवावे लागले. जेव्हा त्यांच्या प्रकृतीत फरक पडणार नसल्याची खात्री झाली तेव्हा त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांच्या पत्नी जेन ला वेंटिलेटर काढण्याची परवानगी मागितली. ज्या योगे स्टिफन यांना किमान शांतपणे मृत्युला सामोरे जाता येईल. मात्र जेन ने वेंटिलीटर काढण्याची परवानगी नाकारली व कसेबसे त्यांना परत इंग्लंडला आणले. त्या ठिकाणी त्यांच्यावर नव्याने उपचार करण्यात आले. मृत्यूच्या दाढेत गेलेल्या स्टिफनला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र हे करत असतांना डॉक्टरांनी स्टिफनच्या श्वसन नलिकेला छिद्र पाडावे लागले. त्यामुळे त्यांची वाचा गेली. त्यानंतरही स्टिफन विशेष यंत्राच्या साह्याने 14 मार्च 2018 पर्यंत जगले. हा सुद्धा ईश्वर असल्याचा पुरावाच आहे. 
यातून प्रत्येक बुद्धिमान माणसाला हा धडा घेता येऊ शकेल की, अल्लाह हाच जीवन आणि मृत्यूचा मालक आहे. कोणाला किती आयुष्य द्यायचे याचा सर्वस्वी अधिकार त्याचाच आहे.
स्टिफनचे शोध हे ईश्वर असण्याचा पुरावा आहे
स्टिफन हॉकिंग यांचा बिग बँग थेअरीचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात की, अनंत वर्षापूर्वी एक मोठा स्फोट झाला आणि पृथ्वी ही विभक्त झाली. त्यांच्या या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवर कुरआनच्या खालील आयातीचे अवलोकन करण्याचे आवाहन मी शोधनच्या प्रज्ञावंत वाचकांना करतो. 
1. “काय ते लोक ज्यांनी (प्रेषिताचे म्हणणे ऐकण्यास) नकार दिला आहे, विचार करीत नाही की हे सर्व आकाश व पृथ्वी परस्पर एकसंघ होते, नंतर आम्ही त्यांना विभक्त केले, आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव निर्माण केला? काय ते (आमच्या या निर्मितीस) मानत नाहीत?” (संदर्भ ः कुरआन - सुरह अल्अंबिया- आयत क्रमांक 30)
या आयातीमध्ये दिले गेलेले जबरदस्त आव्हान पाहा! यात मानवजातीला विचार करण्यास प्रोत्साहित केलेले आहे. यात दोन वैज्ञानिक सत्य मांडलेली आहेत. ज्यापैकी एक बिग बँग थेअरीच्या रूपात स्टीफनने मांडले. सातव्या शतकात जेव्हा कुरआन अवतरीत झाले तेव्हा सभ्य जगाला याची माहित नव्हती की आकाश व पृथ्वी एकसंघ होते व नंतर ते विभक्त झाले. 
2. “आकाशाला आम्ही स्वबळाने बनविले आहे आणि आम्ही याचे सामर्थ्य बाळगतो.” (संदर्भ ः कुरआन - सुरह अ़ज़्जरियात आयत नं.47)
स्टिफन हॉकींग यांनी आपले पुस्तक ’ए ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम’ मध्ये लिहिलेले आहे की, युनिव्हर्स (ब्रह्मांड) हे असिमीत आहे व त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होत असते. हे पुस्तक एवढे लोकप्रिय झाले की, त्याच्या 1 कोटी प्रती विकल्या गेल्या. यात स्टिफन ब्रह्मांडातील कृष्णविविरांच्या बाबतीत असे म्हटलेले आहे की, ही विविरे ज्यांना ते ब्लॅक होल असिमीत आकाराची आहेत. व त्यात ज्या गोष्टी एकदा आत गेल्या त्या बाहेर पडू शकत नाहीत. याबाबतीत कुरआनमध्ये अल्लाहने ब्रह्मांड स्वसामर्थ्याने बनविण्याचा दावा 1439 वर्षापूर्वी केलेला आहे. अर्थात जी गोष्ट जगाला स्टिफनने विसाव्या शतकात सांगितली ती गोष्ट कुरआनमध्ये सातव्या शतकात नमूद केलेली आहे. म्हणजेच कुरआन हा ईश्वरीय ग्रंथ आहे. 
एकंदरित स्टिफनचे जीवन आणि त्यांनी शोधानंतर मांडलेले वैज्ञानिक सिद्धांत हे कुठल्याही डोळस माणसाला अल्लाह आहे आणि तोच सर्व सृष्टींचा मालक आहे. त्यानेच आदम अलै. पासून या क्षणापर्यंत जन्मलेल्या लोकांना जन्माला घातलेले आहे व प्रलयाच्या दिवसापर्यंत येणार्‍या प्रत्येक माणसाला जन्माला घालणार आहे. तोच कर्ता, तोच करविता आहे. माणसाच्या यशस्वी जीवनाचे रहस्य कुरआनला समजणे व त्यातील आदेशांचे पालन करणे याच्यातच दडलेले आहे. इतिसिद्धम.

-डॉ. सबीहा ख़ान
नागपूर – (डॉ. एम. ए. रशीद) 
आज मुस्लिम महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या साक्षरतेबाबत लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परिपक्व इस्लामी ज्ञान नसल्याने कारण ट्रिपल तलाक़चा मुद्दा समोर आला. इ.सन १९३९मध्ये शरियतवर आधारित मुस्लिम पर्सनल लॉ बनविण्यात आला होता. मुस्लिम विवाह याच विधीअंतर्गत येतो. या विधीचे पालन करणे आमचा संवैधानिक अधिकार आहे. विवाह अधिनियमच्या अनुसार वधू पक्षाला हुंडा न देत निकाह कार्यक्रम आयोजित करण्याची शर्त ठेवण्यात आली आहे. वधूला सुनिश्चित रक्कम (मेहर) च्या आधारावर निकाह स्वीकार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. निकाह झाल्याबरोबरच पतीला मेहरची रक्कम पत्नीला देणे आवश्यक असते. असे विचार आंतरराष्ट्रीय महिला दिवसच्या वेळी जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. सबीहा ख़ान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
हा कार्यक्रम कांग्रेसनगर स्थित धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहाच आयोजित करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की मेहर प्राप्त करने पत्नीचा पहिला अधिकार आहे आणि हुंडा वधू पक्षावर अत्याचार आहे. तलाक़च्या अंतर्गत महिलांकरिता ख़ुलअ ( तलाक़ घेण्याचा) सुद्धा अधिकार आहे. वर्तमान शासन तलाक़बाबत मुस्लिम महिलांना ज्या परिस्थितीत आणू इच्छित आहे, त्यात अनेक कठीण बाबी आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे की आज आम्ही एकाच मंचवर १९ विभिन्न महिला संघटना मिळून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करीत आहोत.
सरोज आगलावे यांनी सांगितले की महिलांच्या शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये सुधारणा झालेली आहे आणि आता त्या पुढे जात आहेत, शिक्षणामुळे त्यांचे शोषण कमी झालेले आहेत. हे सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांचे फळ आहे. या व्यतिरिक्त स्त्रियांचे पारिवारिक जीवन अनेक बलिदानांनी युक्त आहे. ज्या प्रकारे आम्ही मुलींना चांगले संस्कार देतो त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा सुसंस्कृत करण्याची गरज आहे.
अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी सांगितले की स्त्री सक्षम असते, ती परिवाराला सुख आणि समृद्धीत साहाय्य प्रदान करते. मुलांना जन्म दिल्यापासून स्वतःच्या पायावर उभे होईपर्यंत आम्हा स्त्रियांची मुख्य भूमिका असते.
अरुणा सबाणे विदर्भातील प्रथम महिला संपादक आहेत, त्या म्हणाल्या की आत्मनिर्भर बनूनच मी माझ्या मुलांचे भविष्य बनविले आहे.
डॉ. शरयुताई तायवाड़े यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करीत सांगितले की स्त्रियांचे परिवारमध्ये उच्च स्थान आहे, ती  मॅनेजमेंटची गुरू आहे. ती घरकामाला योजनाबद्ध पद्धतीने आवरून बाहेरची कामेही पूर्ण करते.
शुभांगी घाटोळे यांच्या संविधान वाचनाने श्रोत्यांना अतिशय उत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना वनकर तसेच आभार संध्या राजुरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफीया अंजुम आणि बेनज़ीर ख़ान यांनी केले.
या कार्यक्रममध्ये भारतीय महिला फेडरेशन, शेतकरी संघटना, जमाअत ए इस्लामी हिंद, नागपुर महिला विभाग, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संघटना, अनाथ पीडित महिला क्रेडिट को-ऑपरेटिव सोसायटी, दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती, धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघ, राष्ट्रीय ओ.बी.सी. महिला महासंघ, माहेर सामाजिक संस्था, जे. के. एस. सखी मंच, विदर्भ असंघटित कामगार संघटना, सुबुद्ध महिला संघटना, पलीता महिला बहु समाजसेवा संस्था तसेच आवाज़ आशा, टॉपर फाउंडेशन आदी महिला संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विभिन्न समुदायाच्या मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

माननीय अब्दुल्लाह इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह दासाचा पश्चात्ताप शेवटच्या श्वासापूर्वीपर्यंत कबूल करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : जर एखाद्याने आपले संपूर्ण जीवन दुष्कर्मांत व्यतीत केले असेल परंतु 
मृत्यूपूर्वीच्या बेशुद्धावस्थेअगोदर त्याने खऱ्या मनाने अल्लाहपाशी पश्चात्ताप व्यक्त केला तर सर्व पाप धुतले जातील. शेवटचा श्वास घेण्यापूर्वीच्या अवस्थेत (म्हणजे प्राण निघून जाण्याच्या स्थितीत), त्या वेळी जर क्षमा मागील तर त्याला क्षमा केली जाणार नाही. म्हणूनच मरण डोळ्यांपुढे दिसण्यापूर्वी मनुष्याने पश्चात्ताप व्यक्त करावा.
माननीय इब्ने यसार (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकहो! अल्लाहपाशी आपल्या दुष्कर्मांची क्षमा मागा आणि त्याच्याकडे परता. मला पाहा, मी दिवसातून शंभर-शंभर वेळा अल्लाहपाशी मुक्तीची दुआ करतो.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय अबू जर गिफ्फारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘माझ्या दासांनो! मी स्वत:वर अन्यायाला निषिद्ध केले आहे, तेव्हा तुम्हीदेखील एकमेकांवर अन्याय करण्यास निषिद्ध समजा. माझ्या भक्तांनो! तुमच्यापैकी प्रत्येकजण मार्गभ्रष्ट आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी उपदेश करीन. माझ्याकडे उपदेशाची दुआ मागा तेव्हा मी तुम्हाला उपदेश करीन. माझ्या दासांनो! तुमच्यापैकी प्रत्येकजण उपाशी आहे त्या मनुष्याव्यतिरिक्त ज्याला मी भोजन देईन. तुम्ही माझ्यापाशी रोजी मागा, तेव्हा मी तुम्हाला जेऊ घालीन. माझ्या भक्तांनो! तुमच्यापैकी प्रत्येकजण विवस्त्र आहे त्या मनुष्याव्यतरिक्त ज्याला मी वस्त्र परिधान करीन. तुम्ही माझ्याकडे वस्त्र मागा, मी तुम्हाला वस्त्र नेसवीन. माझ्या भक्तांनो! तुम्ही रात्री आणि दिवसा दुष्कर्म करता आणि मी सर्व दुष्कर्म क्षमा करू शकतो, तेव्हा माझ्यापाशी क्षमा मागा, मी तुम्हाला क्षमा करीन.’’ (हदीस : मुस्लिम)
मानवावर प्रेम
माननीय अबू जर गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘कोणते काम उत्तम व उच्च दर्जाचे आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहवर ईमान बाळगणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (धर्मयुद्ध, प्रयत्नांची पराकाष्ठा) करणे.’’ मी विचारले, ‘‘कोणत्या प्रकारचे गुलाम मुक्त करणे अधिक चांगले आहे?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अशा गुलामांना मुक्त करणे ज्यांची किंमत अधिक असेल आणि जे आपल्या मालकांच्या दृष्टीने उत्तम असतील.’’ मी विचारले, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर काय करू?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘मग तुम्ही एखादे काम करणाऱ्याची मदत करा. अथवा त्या मनुष्याचे काम करा जो आपले काम उत्तमप्रकारे करू शकत नाही.’’ मी म्हणालो, ‘‘जर हे मी करू शकलो नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना त्रास देऊ नका. हा तुमचा ‘सदका’ (दानधर्म) असेल, ज्याचा बदला तुम्हाला मिळेल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘अल्लाहवर ईमान बाळगणे’ म्हणजे ‘दीने तौहीद’ म्हणजे इस्लामचा स्वीकार करणे. ‘जिहाद’चा अर्थ आहे जे लोक ‘दीने ह़क’ (इस्लाम) ला नष्ट करण्यासाठी तयार होतील त्यांचा सामना करणे. जर ते ‘दीन’ व त्याच्या अनुयायींना नष्ट करण्यासाठी तलवार उचलतील तर मुस्लिमाचे कर्तव्य आहे की त्यानेदेखील तलवार उचलावी आणि जाहीर करावे की ‘दीन’ आमचे प्राण आणि तुमच्या प्राणांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जर तुम्ही त्याचा वध कराल तर आम्ही तुमचा वध करू अथवा स्वत: मरण पत्करू.
अरबस्थानात गुलामीची प्रथा होती आणि अरबस्थानाच नव्हे तर त्या काळातील संपूर्ण सुसंस्कृत जगात ही निर्भत्र्सना आढळत होती. इस्लामचे जेव्हा पुनरागमन झाले तेव्हा त्याने मानवांना प्रोत्साहन देणे आणि मानवतेच्या समाजात सामील करण्यासाठी गुलामांच्या मुक्ततेला आपल्या कार्यक्रमात सामील केले आणि ते फार मोठे पुण्य असल्याचे निश्चित केले.
समाजातील गरजवंत लोकांची मदत करणे आणि एखाद्या मनुष्याचे काम करणे जे तो करू शकत नाही अथवा ओबडधोबड करीत आहे, फार मोठे पुण्य आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य इस्लाम स्वीकारलेल्या एखाद्या गुलामाला मुक्त करील तर अल्लाह त्या गुलामाच्या प्रत्येक अवयवाच्या बदल्यात त्या मनुष्याचा प्रत्येक अवयव नरकाच्या आगीपासून सुरक्षित करील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

-नझराना शेख, पणजी (गोवा)
इंटरनॅशनल सेंटर, दोनापाऊला, गोवामध्ये नुकतेच लैंगिक समानतेबद्दल अतिशय दुर्मिळ
चर्चासत्र पार पडले. स्त्रियांचे सबलीकरण करणे आणि लैंगिक समानताच्या दृष्टीने त्यांच्या काय समस्या आहेत यावर खूप चर्चा झाली.
प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन अधिकतर उत्साहाने साजरा केला जातो. परंतु महिलांसंबंधित समस्या दिवसेंदिवस जास्त वाढत आहेत. एका काळात समाजात ती अत्यंत दबलेली होती आणि आता ती स्वातंत्र्य व मुक्त आणि बहुतेक अधिकारांची हक्कदार असूनसुद्धा तिच्या दडपशाहीची आणि गैरवापराची कहाणी अजूनही कायम आहे. प्रत्यक्षात तिच्या दडपशाहीत दुसऱ्या मार्गाने वाढ होत आहे.
संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०१६-२०१७ ने सांगितले की अपहरण, मुली व स्त्रियांवर लैंगिक अत्याचार, या गुन्हेगारीची संख्या भयावह पातळीवर पोहचली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी तिची असुरक्षित वाढली आहे.
एनसीआरबी डेटा २०१६ नुसार २०१६ मध्ये स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २.९ टक्के वाढ झाली आहे.
बलात्काराची प्रकरणे जी २०१५ मध्ये ३४,६५१ होती त्यातही २०१६ मध्ये १२.४ टक्के वाड झाली आहे.
वर नमूद केलेले आकडे स्पष्ट करतात की, ‘स्वतंत्र आणि मुक्त’ अशी असणारी पश्चिम संस्कृतीचा नमुना घेऊन स्त्रियांची उन्नती करण्याचा आमचा निर्णय अयशस्वी ठरला आहे. ही संस्कृती तिला तो सन्मान देण्यासाठी चुकली आहे ज्यावर तिचा हक्क आहे. या संस्कृतीने  लैंगिक समानतेच्या आणि स्वातंत्र्याच्या नावावर खोटी प्रतिष्ठा देऊन तिला असला असुरक्षित आणि धोकादायक मंच दिला आहे ज्यामध्ये तिचे खूप चालाकीने शोषण चालू आहे.   
समानतेच्या नावावर तिला सर्व कृतींच्या क्षेत्रांत आणले गेले. तिला पुरुषाचे अनुकरण करून त्याच्यासारखे वागायला, त्याच्यासारखे दिसायला आणि त्याच्यासारखे सामथ्र्य दाखवायला भाग पाडले. याच्या व्यतिरिक्त स्त्रियांना त्यांची प्रमुख भूमिका म्हणजे एक परिपूर्ण गृहिणी, आई, पत्नी, बहीण, हीसुद्धा जबाब्दारीने पार पडण्याची अपेक्षा तिच्यापासून केली गेली. स्त्रियांनीदेखील स्त्री-पुरुष अशी दुहेरी भूमिका निभावण्याची तडजोड केली. असे करताना तिला हे कळून चुकले की तिने दीर्घकाळामध्ये काय गमावले. तिला या दुहेरी भूमिकेत आपले कौटुंबिक जीवन आणि मातृत्वाचे बलिदान द्यावे लागले, पुरुषांच्या पूर्वाभिमुख समाजात चांगल्यारीतीने रचलेल्या सापळ्यात ती सहजपणे अडकत गेली. आज स्त्रिया शिक्षित, आत्मनिर्भर होऊनसुद्धा जुन्या काळाची स्त्रियांवरील अत्याचाराची कहाणी आजच्या आधुनिक जगात कायम आहे.
पूर्वीच्या काळामध्ये स्पष्टपणे दिसणारी दडपशाही आज स्वातंत्र्य व समानता आणि न्याय या कवचाखाली एक सुनियोजित पद्धतशीर चालविली जात आहे, ज्यात तिचे शोषण नजरेला पडत नाही पण त्यामुळे तिला खूप नुकसान झाले आहे आणि तिच्यावरील वाढत्या अत्याचार आणि गुन्ह्यांचे मुख्य कारण बनले आहे.
ज्ञान किंवा शिक्षण मानवजातीसाठी एक मोठी भेट म्हणून मानला जाते. ज्यामुळे व्यक्ती, समाज आणि जगाचा विकास होतो. पण याला मनुष्याने फक्त संपत्ती मिळवून देण्याचे साधन मानले. पूर्वी स्त्रियांना काम करावे लागत नव्हते म्हणून त्यांना ज्ञान आणि शिक्षणापासून दूर ठेवले गेले आणि आता आधुनिक काळात मुलींना तो अधिकार मिळाला तेव्हा तिच्या भक्षकांनी त्याला तिचापासून पैसे उत्पन्न करायचा  स्रोत बनवून टाकले. बऱ्याच प्रकरणांमध्ये पालकही स्वार्थी होतात आणि मुलींच्या शिक्षणावर केलेला खर्च मिळवून घेण्यासाठी तिला स्रोत बनवतात. पुत्रांनी जे केले नाही किंवा करू शकत नाहीत अशा सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा मुलींना दिली जाते. मुलींपासून या वाढत्या अपेक्षा त्यांना पुढे जीवनात महाग पडतात. यासाठी त्यांचा विवाह उशिरा होतो आणि मग एक चांगला जोडीदार शोधणे तिला अवघड होते आणि वैवाहिक जीवन सुरू करण्यातही तिला समस्या येतात. काही स्त्रिया आयुष्यभर अविवाहितसुद्धा राहतात.
हुंडा प्रणालीचा धोका हाताळण्यासाठी अनेक कठोर कायदे तयार केले गेले आहेत आणि काही प्रमाणात त्यांचा फायदाही झाला आहे. परंतु इथेसुद्धा भक्षकांनी हुंडा हाताळण्याच्या नवीन पद्धतीं शोधून काढल्या आहेत. आज शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मुलींची नवरी म्हणून निवड होते ते याच कारणामुळे की ती काम करून त्यांच्या संपत्तीला भर घालेल. स्त्रियांवरच सर्व आर्थिक आणि घरगुती जाबाबदारी घालून  काही बाबतीत त्यांचे पती पूर्णत: बेजबाबदार बनले आहेत. ज्या स्त्रिया स्वत:च्या इच्छेनुसार नोकरी करायच्या अधीन असतात त्यांना पण भावनांच्या जाळ्यात फसवून त्यांच्या कमाईतून बराच पैसा या भक्षकांसाठी खर्च करण्यास लुभावले जाते. काही स्त्रियांना असल्या नोकऱ्यांतदेखील खेचले जाते, ज्यामध्ये फक्त त्यांच्या सौंदर्याची आणि शरीराची प्रशंसा होते आणि तिच्या अंत:करणाच्या प्रतिभेचे काही मोल होत नाही.
या आकर्षित करणाऱ्या ग्लॅमरस दुनियेत तिची गुंतागुंत होते ज्यामुळे शेवटी तिच्या नशिबाला एकाकीपणा, नैराश्य, विनाश वाट्याला येतो आणि बऱ्याच वेळा आत्महत्या करून तिला आपली सुटका करावी लागते. एका बाजूला जेथे लैंगिक समानतेची पदोन्नती चालू आहे तिथेच दुसरीकडे वय, वर्ग, सौंदर्य, शरीर यांच्या आधारावर महिलांचा भेदभाव चालू आहे. आणि हाच निकष पाळून लग्न व नोकरीसाठी तिची निवड होते. जी स्त्री उच्च पदावर पोचली आहे तीसुद्धा कुठल्यातरी पुरुषाची किंवा पुरुषासंबंधी गटाचीच कठपुतळी म्हणून चालते. या सर्व प्रकरणांत स्त्रिया आपल्या विरूद चालणाऱ्या कटाला ओळखण्यात चुकतात आणि ज्या वेळेस ते जाणतात तेव्हा फारच उशीर झालेला असतो.
आजच्या आधुनिक लढायांमध्ये सैनिकांपेक्षा जास्त नागरिकांची बळी जाते. त्यातही स्त्रियांना जास्त अत्याचार सहन करावा लागतो जो खूप वेळा लष्करी किंवा राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी पद्धतशीरपणे विविध रूपाने स्त्रियांवर घडविला जातो. देहव्यापाराच्या वाढत्या गरजेमुळे मानवी तस्करी आणखीनच वाढली आहे आणि याचा परिणामसुद्धा स्त्रियांनीच जास्त भोगला आहे.
स्त्रियांना न्याय देण्यात आपण कुठे कमी पडत आहोत याबाबतचे विश्लेषण करताना हे समजून घेणे आवश्यक आहे की पुरुषाची नक्कल करणे आणि त्याला आदर्श म्हणून मानणे हे या समस्यांचे समाधान नाही. पुरुष आणि स्त्री ही दोन भिन्न लिंग आहेत आणि त्यांना  समाजात आपली अनोखी भूमिका निभावण्यासाठी रचले गेले आहे. त्यांची विशिष्ट शारीरिक, जैविक आणि मानसिक निर्मिती हे दर्शविते की त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांना समान करण्याचा प्रयत्न शेवटी व्यर्थ ठरेल.
प्रश्न हा आहे की स्त्रीला आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुरुषाची नक्कल करणे किंवा त्याच्या पातळीवर पोहचणे का आवश्यक आहे? मानवाला जन्म देण्याची आणि मानवजातीला आपल्या प्रेमळता व काळजीने उभारण्याची उत्कृष्ट भूमिका तिला ईश्वराने दिली आहे, जी एक पुरुष प्रयत्न करूनसुद्धा साध्य करू शकत नाही. या भूमिकेने ती अशी मानवजाती आपल्या शिकवणीने निर्माण करू शकते जी खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या दुर्बल शरीराचा फायदा न घेता त्यांच्या कोमल हृदयाचे मोल करू शकते आणि तिला तो आदर देऊ शकते ज्यास ती पात्र आहे. आईच्या पदरात लहानपणीच हे संस्कार पुरुषांना मिळाले तर पुढे ते स्त्रियांविषयी होणाऱ्या प्रत्येक शोषणला बंदी घालू शकतात आणि असले वातवरणही निर्माण करू शकतात जिथे स्त्रियांविरुद्ध सगळ्या षड्यंत्रांना रोखू शकतात आणि सर्व वाईट गोष्टीचा मुळांपासून नाश होऊ शकतो.
लैंगिक समानता हा आजच्या आधुनिक समाजाचा नारा आहे. हा तोच समाज आहे जो भौतिकवाद, स्वार्थ, अमानवीपणा, लोभ, दृष्टा, शक्ती आणि संपत्तीसाठी वेड, असल्या बुद्धीच्या आधारावर विकसित झाला आहे. अशा समाजात स्त्रियांची सुरक्षितता कशी काय होणार? हा समाज लैंगिक समानता व स्वातंत्र्यच्या नावाखाली बनावट स्वाभिमान प्रदान करून महिलांचा लाभ घेऊन फक्त स्वत:ची तहान तृप्त करू शकतो. आज समता आणि मुक्तीची खरी परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. मुक्तीची मर्यादा आणि समता चे स्पष्टीकरण केल्याशिवाय यात पाऊल टाकणे अतिशय धोकेदायक आहे. स्त्रीच्या शोषणास प्रोत्साहन देणाऱ्या सर्व सामाजिक वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी वातावरण तयार करणेही गरजेचे आहे. पुरुषाचे अनुकरण करून स्त्री-जातीच्या विशिष्ट दर्जाचा केवळ अपमानच होईल आणि ही दुहेरी भूमिका बजावताना फसवणूकच स्त्रियांच्या हाती लागेल.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget