Latest Post

प्रथमतः आपण काबागृहाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे महत्त्व पाहू या. पितापुत्र (इब्राहीम व इस्माईल) काबागृहाचे बांधकाम उभारीत होते व प्रार्थना करीत होते,

‘‘हे आमच्या पालनकर्त्या प्रभू! आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. हे प्रभू आम्हा दोघांना तुझे आज्ञाधारक बनव. आमच्या वंशामधून असा समाज घडव, जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल. आम्हाला आमच्या उपासनेचा विधी सांग आणि आमच्या उणिवांकडे दुर्लक्ष कर. निःसंशय तू क्षमावंत आणि दयावंत आहेस.’’    (कुरआन २: १२७-१२८)

पितापुत्राच्या वरील प्रार्थनेवरून हेच सिध्द होते की काबागृह बांधण्याचा जो मूळ हेतु होता तो साध्य करण्यासाठी त्यांच्या वंशामधूनच तो समाज उभा राहिला जो आज्ञाधारक (मुस्लिम) होता.

येथे हे स्पष्ट केले पाहिजे की त्यांच्या प्रार्थनेत त्यांनी विनवणी केली होती,

‘‘आमच्या वंशामधून असा समाज घडव जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल.’’

येथे मुस्लिम हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ होतो आज्ञाधारक.

काबागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पुत्राला आणि पत्नीला इतरत्र स्थलांतरित केले नाही. ते तेथेच स्थायिक झाले, जो वाळवंटी, ओसाड प्रदेश होता व तो निर्मनुष्य प्रदेश होता. काबागृहाजवळ त्यामुळे त्यांची जी वंशावळ जन्माला येणार होती ती सर्व ‘‘त्या एक अल्लाहचेच आज्ञाधारक असतील.’’ इब्राहीम (अ.) यनी स्वतः अल्लाहजवळ त्यावेळी प्रार्थना केली,

‘‘हे पालनकर्त्या प्रभू! मी एका निर्जल व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी.’’ (कुरआन १४: ३७)

‘‘या लोकांनी येथे नमाज कायम करावी’’ याचा अर्थ असा आहे की त्यांनी अल्लाहची सेवा (इबादत-उपासना) करावी. अल्लाहचा धर्म पाळावा आणि त्याचा प्रसार करावा. प्रार्थना श्रध्दाशीलतेचे अनिवार्य अंग आहे. म्हणून ‘‘लोकांनी नमाज कायम करावी’’ याचा अर्थच असा होतो की इस्लाम धर्म (आज्ञाधारकता) पूर्णरूपेन प्रस्थापित केला जावा. अल्लाहच्या आज्ञाधारकतेचा (इस्लाम) एक आदर्श त्यांच्या वंशात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रस्थापित झाला याची साक्ष इतिहास देत आहे.

त्यांच्या वंशातून पुढे आज्ञाधारक समाज कसा बनणार होता? अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या पध्दती त्यांना कशा प्रकारे माहीत होणार? यासाठी त्या पितापुत्रांनी अल्लाहजवळ अशी विनवणी केली होती,

‘‘हे पालनकर्त्या प्रभू! या लोकांमध्ये ह्यांच्यातील एक प्रेषित उभा कर. जो तुझे संदेश यांना ऐकवील आणि यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देऊन ह्यांचे जीवन पवित्र करील. तूच प्रभूत्वशाली न्याय करणारा आहेस.’’ (कुरआन २: १२९)

मानवी इतिहासातील या दोन प्रार्थना आहेत ज्यांचा स्वीकार अल्लाहने कालांतराने (सुमारे २००० वर्षानंतर) केला. आदरणीय मुहम्मद (स.) यांच्या रूपात ‘प्रेषित’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या (सहाबी) रूपात ‘आज्ञाधारक समाज’ उभा केला. (इस्लामी राष्ट्र निर्माण केले.) हा आज्ञाधारक समाज म्हणजेच मुस्लिम समाज आणि मुस्लिम राष्ट्र होय. त्यांचे नाव मुस्लिम (आज्ञाधारक) यासाठी झाले की इब्राहीम (अ.) यांनी त्यांचा उल्लेख आपल्या प्रार्थनेत याच मुस्लिम शब्दाने केलेला होता. अशा प्रकारे इब्राहीम (अ.) यांनी मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुस्लिम हे नाव अगोदरच दिले होते. हे कुरआनच्या ‘हज्ज’ या अध्यायाने सिध्द केले आहे.

वरील विवेचनाने हे सिध्द होते की काबागृहाला इस्लामचे प्रेरणास्रोत आणि केंद्र संबोधने अगदी योग्य आहे.

इस्लामची साक्ष काय आहे? हा एक समर्पक प्रश्न आहे. ज्याचे उत्तर हे इस्लामला जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. इस्लाम हा धर्म सत्य धर्म पूर्वनियोजित आहे. तीच स्थिती ‘इस्लामची साक्ष’च्या उत्तराची आणि त्याच्या व्यावहारिक स्वरुपाची आहे. हे नियोजन प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या व्यावहारिक जीवनाची देन आहे. सामान्यतः साक्षीला आपण एखाद्या व्यक्तीचे खरे दस्तऐवज (प्रतिज्ञापत्र) म्हणतो. इस्लामच्या धार्मिक दृष्टिकोनातून हे खरे दस्तऐवज म्हणजे प्रतिज्ञापत्र या जगापुढे सर्व लोकांना दाखविले पाहिजे. सत्याची साक्ष देण्याला दोन अंग आहेत एक शाब्दिक, तोंडी आणि दुसरे व्यावहारिक.

अ) तोंडी साक्ष: तोंडी साक्ष देणे म्हणजे इस्लामबद्दल त्याच्या मूलभूत तत्त्वांपासून ते सर्वकाही माहिती इस्लामच्या आदेशांपर्यंतची मुस्लिमेतर बांधवांना अतिशय योग्य पध्दतीने देणे. माहिती त्यांच्यासमोर अशा पध्दतीने मांडणे की जेणेकरून एक खुला ग्रंथ त्यांच्या पुढे राहावा आणि त्यांना त्यांच्या श्रध्देविषयीचा दोष जाणून घेण्यास व इस्लामचे उघड सत्य आत्मसात करण्यास काही एक अडचण राहू नये. या कार्यासाठी काही अत्यावश्यक बाबींचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे.

१) प्रथमतः चर्चा ही त्यांच्या मूलभूत तत्त्वांविषयी व्हावी जेणेकरून त्यांना त्यांच्या श्रध्देविषयी उघड उघड कल्पना येऊन जावी. इस्लामविषयी माहिती देताना अल्लाह एकमेव ईश्वर आहे (एकेश्वरत्व) प्रेषित्व आणि पारलौकिक जीवनावर उघड चर्चा व्हावी. इस्लामचे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ.विषयींचे आदेश त्यांना स्पष्ट करून सांगावेत. इस्लाम मानवी जीवनाच्या समस्या कशा प्रकारे सोडवतो आणि इस्लामच्या आज्ञाधारकतेत या क्षणभंगूर जीवनाचे साफल्य दडून बसले आहे याची स्पष्ट माहिती (उकल) त्यांना करून द्यावी.

२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इस्लाम आणि इस्लामेतर काय आहे याची बौध्दिक आणि तार्किक चर्चा करून गांभीर्याने त्यांना समजून सांगावेत. यासाठी आजचे प्रचलित धर्म तत्त्वज्ञान, संस्कृती आणि सामाजिक व्यवस्थेविषयी इतंभूत माहिती असणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे मुस्लिमेतरांविषयी एक तार्किक बैठक तयार होते आणि त्यामुळे इस्लामेतर तत्त्वांना मुळासकट उखडून टाकण्यास मदतच होते. हे अशा पध्दतीने व्हावे की त्यांच्या भावनांना स्पष्टपणे उघड केले जावे आणि त्यांच्या श्रध्देमुळे आणि धार्मिक आचरणांमुळे मानवतेची कशी हानी होते हे समजून दिले पाहिजे. मुस्लिमेतर श्रध्दा आणि तत्त्वे हे सर्व इस्लामची साक्ष देण्यासाठी अत्यावश्यक आहे. आणि त्यांच्याशिवाय साक्ष देणे पूर्ण होऊ शकत नाही. इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देणे म्हणजे नवीन इमारत बांधण्यासारखे आहे आणि नवीन इमारतीसाठी सर्वप्रथम नवीन पाया घालणे अत्यावश्यक आहे. पायाविना इमारत अशक्य आहे. पायाभरणी झाल्यानंतरच इमारत व भिती उभ्या राहू शकतात. जनमानसात इस्लामचा पाया मजबूत व्हावा आणि त्यांच्या मनात आणि हृदयात घर करून राहावे यासाठी जमीन तयार करणे (पाया भरणे) अत्यावश्यक आहे. यासाठी जमिनीची मशागत तेव्हाच होईल जेव्हा आपण जमिनीत उगवलेले खोटे तत्त्व आणि श्रध्दांना उपटून त्यांचे मन निर्मळ बनवू शकू. जहाजात सामान तेव्हाच ठेवता येईल जेव्हा ते रिकामे असेल अन्यथा नाही. याच तत्त्वाने, इस्लाम मनुष्याच्या मनात तेव्हाच घर करून राहील जेव्हा ते इतर श्रध्दांपासून मोकळे आणि निर्मळ होईल. कुरआननुसार एकेश्वरत्व, प्रेषित्व आणि परलोकत्व यांनाच फक्त इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देण्यासाठी उपयोगात आणणे पुरेसे नाही. तर यासाठी अनेकेश्वरत्वाचा, असत्य धर्माचा स्वीकार करण्याचा आणि प्रेषित्वाविषयी आणि पारलौकिक तत्त्वाविषयी श्रध्दाहीनतेचा कडाडून निर्धारपूर्वक विरोध होणे अत्यावश्यक आहे. यासाठी अश्रध्देचे प्रकार आणि ही श्रध्दाहीनता त्यांच्या मनात कशी प्रवेशकरती झाली याचा ऐतिहासिक आढावा घेणे, तसेच त्यांच्या शिळ्या आणि खोट्या मनोकामनांना उघड करणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्यांच्या तत्त्वांची निरर्थकता त्यांच्यासमोर उघड होते आणि त्यांना जमीनदोस्त करण्यास ते स्वतःहून तयार होतात. काबागृहातील ३६० मूर्तींना याच एकमेव पध्दतीने त्या लोकांनी स्वतः जमीनदोस्त केले होते. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली तिला कुरआन स्पष्ट करीत आहे,

‘‘धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी तागूत (मूर्तींचा) इन्कार करून अल्लाहवर श्रध्दा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’ (कुरआन २: २५६)

३) तिसरी बाब आहे इस्लामचा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा तसेच इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा मित्रत्वाने, सौजण्याने आणि गोडीने अत्यंत व्यवस्थितपणे मांडला गेला पाहिजे. मृदुभाषेमध्ये लोकांना पटेल अशा प्रकारे तसेच सौहार्दपूर्ण चर्चेतून शास्त्रोक्त पध्दतीने उद्देश प्राप्ती सहज होते. कारण इस्लामचा प्रामाणिकपणा आणि इस्लामेतर श्रध्देचा खोटारडेपणा समोर आणणे ही काही फक्त शैक्षणिक बाब नाही. एक सत्यधर्म प्रचार आणि प्रसारकार्य आहे. बुध्दीविवेकास आवाहन करून श्रोत्याच्या मनात आणि हृदयावर इस्लामसंदेशाची खोलवर छाप पडणे आवश्यक आहे, अन्यथा सर्व व्यर्थ. यासाठी समोरच्या श्रोत्याच्या मानसिक स्थितीचा विचार करूनच त्याच्याशी संभाषण व्हावे. आमंत्रण देण्याची पध्दत, भाषा आणि तंत्र कुरआननुसार असणे अत्यंत आवश्यक आहे. कुरआनची पध्दत प्रभावशाली असून कुरआनची भाषाशैलीसुध्दा सुसंगत अशी आहे. कुरआनचा संवाददेखील गोड आहे. गैरसमज निर्माण होईल अशी कुरआन संवादाची भाषाशैली मुळीच नाही. कुरआनची स्पष्ट शैली आहे आणि ती स्फूर्तीदायक आणि आकर्षक भाषणशैली आहे. कारण अरबांना ही शैली फार आवडत होती. दुसरीकडे वैश्विक तत्त्वे, नैसर्गिक नियम आणि दररोजच्या घटनांचा उल्लेख अत्यंत प्रभावीपणे आणि अनुकूल चर्चेतून मांडला गेला आहे. लोकांना इस्लामकडे आमंत्रिक करण्यासाठी अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना खालीलप्रमाणे उपदेश केला,

‘‘हे पैगम्बर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहीत, आणि लोकांशी विवाद करा अशा पध्दतीने जी उत्तम असेल.’’ (कुरआन १६: १२५)

वरील तिन्ही गरजा या मूलाधाराचे व्यावहारिक स्वरूप आहे.

४) चौथी बाब इस्लामकडे आमंत्रण कार्य - हे एखाद्या सहानुभूतीमुळे अथवा राष्ट्राभिमानाने अथवा भाषणकौशल्याच्या प्रेरणेने प्रवृत्त झालेले मूळीच नसावे. जे काही सांगितले गेले ते गांभीर्यपूर्वक, श्रध्दापूर्वक आणि अल्लाहच्या प्रेमातून बाहेर पडले पाहिजे. ते मानवतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे. हृदयातून आपले म्हणणे इतरांच्या चुकांसाठी शोक करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. श्रोत्यांची ही भावना झाली पाहिजे की सांगणारा (प्रचारक) आपणास काही नवीन देत आहे. आपणाकडून काहीही न घेता एक उघड सत्य आपणापुढे मांडत आहे. लोकांना इस्लामच्या कृपाछत्राखाली आणण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांची जी चिता आणि प्रबळ आकांक्षा होती त्याला कुरआनने खालील शब्दांत वर्णन केले आहे,

‘‘बरे तर हे पैगम्बर (स.)! कदाचित तुम्ही यांच्यामागे दुःखापायी आपले प्राण गमावणार आहात, जर यांनी या शिकवणुकीवर श्रध्दा ठेवली नाही?’’ (कुरआन १७: ६)

ब) व्यावहारिक साक्ष: व्यावहारिक साक्ष अथवा पुरावा तो आहे जो इस्लामचा प्रचारक आपल्या प्रत्यक्ष जीवनातून देतो. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीशः आणि मुस्लिम राष्ट्राने इस्लामचे खरे रूप प्रदर्शित केले पाहिजे.
त्यांची अल्लाहच्या एकेश्वरत्वावर गाढ श्रध्दा पाहिजे. तसेच प्रेषितवाद आणि परलोकत्वाची श्रध्दासुध्दा अटळ पाहिजे आणि जीवनकार्यात त्याचे प्रतिबिब पडले पाहिजे. त्यांचा स्वभाव आणि वर्तणूक ही इस्लामच्या आदेशाबरहुकूम पाहिजे. त्यांचे संपूर्ण जीवनकार्य कुरआन आणि हदीसनुसार नियंत्रित असणे अत्यावश्यक आहे.

त्यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय कार्य अर्थात संपूर्ण जीवन अल्लाह आणि प्रेषित (स.) यांनी घालून दिलेल्या नियमांनुसारच नियंत्रित आणि संचलित असणे अत्यावश्यक आहे. ह्या प्रकारची आज्ञाधारकता इस्लामचे खरे रुप दर्शविते. ह्या आज्ञाधारकते मुळे जगाला कळून येते की कशा प्रकारचे नागरिक, कशा प्रकारचा समाज आणि सामाजिक व्यवस्था इस्लामला अभिप्रेत आहे.

व्यावहारिक साक्षीची स्थिती ही नैतिक किवा तोंडी साक्षी पेक्षा अत्यंत महत्वाची आहे. की ज्यांत प्रचारकाचे व्यावहारिक रूप लोकांसमोर येत नाही. तसेच नव्वद टक्के लोकांना धर्म प्रचाराचे प्रभावी साधन म्हणून व्यावहारिक साक्ष अथवा पुरावाच अपेक्षित आहे. बौध्दिक आव्हान अथवा भावनात्मक आवाहन त्यांच्या आकलनापलिकडचे असते. ह्या संदर्भात येथे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्राचा पुरावा अपेक्षित आहे जो एक आदर्श आहे. त्यांनी लोकांना इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले तेव्हा ते स्वतः इस्लामचे पाईक म्हणूनच. त्यांनी जेव्हा दुसऱ्यांना इस्लामच्या आदेशांचे पालन करण्यास सांगितले तत्पूर्वी ते स्वतः त्या आदेशा बरहुकूम आचरण करीत राहिले.

इस्लामचे हे खरे स्वरुप आहे. इस्लामचा खरा अर्थ हा आहे जो प्रमाण आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या इस्लामसाठीच्या प्रयत्नांचे मोजमाप करता येते. ह्या प्रमाणाच्या जितक्या जवळ व्यक्ती (मुस्लिम) असेल तितके ते ह्या कामी (इस्लाम प्रचार) यशस्वी ठरतात. ह्या ध्येयापासून दूर तेच राहतात जे ह्या प्रमाणापासून (स्टँडर्ड) पासून अथवा आदर्शापासून दूर राहतात.

‘अर्रहमानु अर्रहीमु’– हे दोन्ही शब्द कृपेपासून बनले आहेत. पहिल्यामध्ये आवेश व उत्साह आणि विपुलतेचा अर्थ आपल्यात सामावलेला आहे आणि दुसऱ्यात निरंतरता आणि कायमस्वरूपीपणाचा अर्थ आढळतो. कृपाळू तो ज्याची कृपा अतिशय जोशपूर्ण आहे. हवा, पाणी व दुसऱ्या सर्व गरजांची पूर्तता त्याच कृपेचे प्रतिबिंब आहे. मग त्याच गुणवैशिष्ट्याचा परिणाम आहे की त्याने सर्वांत मोठी कृपा (कुरआन) पाठविली. अल्लाह म्हणतो,
‘‘अर्रहमानु, अल्लमल कुरआना, खल़कल इन्साना अल्लमहुल बयाना.’’
    कृपाळूने कुरआनची शिकवण दिली, कृपाळूने मानवाला निर्माण केले, कृपाळूने मानवाला बोलण्याची क्षमता दिली. आणि कृपावंत तो ज्याच्या कृपेचा क्रम कधीच संपत नाही, ज्याची कृपा व दया निरंतर राहणार आहे. ही गुणवैशिष्ट्ये मानल्यामुळे अनिवार्य ठरते की मानवाने अशाप्रकारे जीवन व्यतीत करावे जे कृपावंत पसंत करतो, जेणेकरून आणखीन अधिक कृपेचे हक्कदार बनावे आणि त्या नियमांनुसार आपल्या जीवनाची इमारत बांधू नये जे त्याला आवडत नाहीत, अन्यथा तो आपली दृष्टी वळवील. मग जे लोक ‘दीन’चे कार्य करतात त्यांना वाईट परिस्थितींमध्ये आणि संकटांमध्ये आठवले पाहिजे की जेव्हा ते पालनकत्र्याचे कार्य करीत आहेत तेव्हा तो त्यांना या जगात आपल्या कृपांपासून वंचित का करील?
‘अल-काईमु बिल-किस्ति’– म्हणजे न्यायी व न्यायाधीश. जर अल्लाह न्यायी व न्यायाधीश आहे तर त्याच्या दृष्टीने प्रामाणिक व आरोपी समान असू शकत नाहीत. दोघांशी तो सारखाच व्यवहार या जगात करणार नाही आणि त्या जगातही करणार नाही.
‘अल-अ़जी़ज’– शासक. ज्याच्या सत्तेने सर्वांना घेरले आहे, ज्याच्या सत्तेला कोणी आव्हान देऊ शकत नाही, अथवा त्याने आपल्या प्रामाणिक दासांना प्रभुत्व व सत्ता देण्याचा निर्णय घेतला तर कोणतीही शक्ती त्याचा निर्णय रोखू शकणार नाही आणि ज्याला तो शिक्षा देऊ इच्छिल तो त्यापासून वाचू शकणार नाही आणि कोणी त्याचा निर्णय टाळू शकणार नाही.
‘अल-ऱकीब’– देखरेख करणारा. जेव्हा तो दासांच्या कर्मांची देखरेख करीत आहे तेव्हा त्यांच्यानुसारच मोबदला व शिक्षा देईल.
‘अल-अलीम’– जाणणारा. संपूर्ण ज्ञान बाळगणारा. कोण कुठे आहे व काय करीत आहे आणि कोणाला कशाची आवश्यकता आहे, त्याचे प्रामाणिक दास कुठे आहेत आणि कोणत्या संकटात अडकले आहेत. तसेच तो ज्ञान बाळगतो म्हणून कोणाला एखादी वस्तू देण्यात अन्याय करीत नाही. प्रत्येकाला तोच देईल ज्याचा तो हक्कदार आहे. त्याच्या कृपा व मदतीचे हक्कदार निष्क्रिय होऊ शकत नाहीत आणि त्याच्या राग व शिक्षेचे हक्कदार यशस्वी होऊ शकत नाहीत.
    येथे सांगण्यात आलेल्या काही आवश्यक गुणवैशिष्ट्यांमध्ये आणखी सर्व गुणवैशिष्ट्ये सामावतात. या ठिकाणी यापेक्षा अधिक सांगणे कठीण आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते की अल्लाहच्या अनेक गुणवैशिष्ट्यांना विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी कुरआन व हदीसचे पठण व अध्ययन करणे गरजेचे आहे. जे लोक अरबी भाषा जाणतात आणि जे लोक जाणत नाहीत, दोघांनी विचार करण्याची गोष्ट आहे की आयतींच्या शेवटी अल्लाहची गुणवैशिष्ट्ये का आणली गेली आहेत आणि त्यांना त्यापासून कोणत्या उपदेशाचा लाभ होतो.
जगाशी अनिच्छा आणि परलोकाची काळजी
    माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले,
‘‘फ-मय्यंरिदिल्लाहु अय्यंहदियहू यश्रह सदरहू लिलइस्लामि.’’
(ज्याला अल्लाह उपदेश देण्याचा निर्णय घेतो त्याची छाती इस्लामसाठी उघडतो.)
    या आयतीच्या पठणानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा प्रकाश छातीत प्रवेश करतो तेव्हा छाती उघडते.’’ लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! त्याला ओळखता येईल अशी त्याची एखादी अनुभूत निशाणी आहे काय?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘होय त्याची अनुभूत निशाणी ही आहे की मनुष्याच्या हृदयाला या जगाचा वीट आलेला असतो आणि कायमस्वरूपी घराची त्याला ओढ लागलेली असते आणि मरण येण्यापूर्वी मरणाच्या तयारीला लागतो.’’
स्पष्टीकरण : ज्या मनुष्याच्या हृदयात इस्लामची वास्तविकता उतरते तेव्हा त्याचे हृदय
    या समाप्त होणाऱ्या जगापासून दूर पळू लागते आणि त्याला परलोकाची ओढ लागते. मृत्यू येण्यापूर्वी पुण्यकर्म करू लागतो.

- एम.आय.शेख

आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामां है सौ बरसका पल की खबर नहीं

प्रथम मी आपले अभिनंदन करतो की आपण हा लेख वाचण्याचा निर्णय केला. मला खात्री होती की, या लेखाचे शिर्षक वाचूनच अनेक वाचक हा लेख वाचणार नाहीत. मृत्यू अटळ आहे मात्र आपण सर्वजण अशा अभिनिवेशात जगत आहोत जणू कधी आपण मरणारच नाही. अनेक लोक तर ’मृत्यू’ संबंधी बोलणे टाळतात. त्यासंबंधी बोलणे अशुभ समजतात. इस्लामने मात्र मृत्यूला नजरेसमोर ठेवून आचरण करण्याची ताकीद केलेली आहे. 
गम्मत पहा जगातील बहुतेक व्यवस्था मृत्यूवर बोलने टाळतात तर इस्लाम मृत्यूला नेहमी डोळ्यांसमोर ठेवण्याची ताकीद करतो. अशा वेळी इस्लाममध्ये मृत्यू संबंधी नेमकी काय संकल्पना आहे? हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. तर चला या संबंधी पाहूया. मृत्यूची भीती यासाठी वाटते की, तो माणसाचा जीव घेतो, पत्नीला विधवा करतो, मुलांना अनाथ करतो, अवलंबिताना निराधार करतो, आप्तांना रडवितो, वस्त्यांना उध्वस्त करतो, संस्थांचा नाश करतो, चविला नष्ट करतो, आशेला निराशेमध्ये बदलतो. गरीबांनाही मृत्यू येतो, श्रीमंतांना ही मृत्यू येतो, आस्तिकही मरतात, नास्तिकही मरतात. 
मृत्यू म्हणजे काय?
शरिरापासून आत्मा विलग होणे म्हणजे मृत्यू. मग प्र्रश्न उरतो की आत्मा काय आहे? कुरआन त्याचे उत्तर देतो की, आत्मा अल्लाहचा, शरिराला जिवंत राहण्याचा आदेश आहे. तो एका ठरावीक मुदतीसाठी दिलेला आहे. ती मुदत संपताच आदेश परत घेतला जातो आणि शरीर निपचित पडते. आत्मा ’आलमे बरजक’(मृत्यूलोक) मध्ये रवाना होतो. तो तेथे ’डे ऑफ जजमेंट’ (प्रलयाचा दिवस) पर्यंत वास्तव्यास राहतो. तद्नंतर त्याला पुन्हा शरीर प्राप्त करून दिल्या जाईल व त्याच्या जीवनाचा हिशोब घेण्यात येईल. ही आहे इस्लाममध्ये मृत्यूसंबंधीची संकल्पना.
न्यायासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता
जगाच्या रचनेकडे डोळसपणे पाहिले असता एक गोष्ट चटकन लक्षात येते ही की, हे जग अपूर्ण आहे. याला पूर्णत्व प्रदान करण्यासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता आहे. उदा. कल्पना करा की एका सुनेला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मारून टाकले. तेंव्हा प्रश्न हा निर्माण होतो की, ऐन तारूण्यात तीला जीव द्यावा लागला त्याची भरपाई कोण करणार? कुणी म्हणेल सासरच्यांना ’लॉ ऑफ द लँण्ड’ ने शिक्षा दिली आहे. ठीक आहे! पण त्यामुळे तिचे अकाली संपलेले जीवन तिला परत थोडेच मिळणार? तीला सर्वंकश न्याय मिळण्यासाठी ’आखिरत’ची दुनिया असणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने ज्या शक्तीशाली लोकांनी दुर्बलांवर अत्याचार केले, दंगे केले, लोकांची घरे जाळली, निरपराध लोकांच्या हत्या केल्या, अबलांवर बलात्कार केले, त्यांना न्याय तेंव्हाच मिळेल जेंव्हा शक्तीशाली व दुर्बल पुन्हा आमने-सामने उभे केले जातील व दुर्बलांना सर्व शक्तीमान अल्लाहकडून न्याय दिला जाईल. तेव्हाच हे जग पूर्णत्वाला आले असे म्हणता येईल. 
जगात बलवानांनी दुर्बलांवर केलेल्या अत्याचाराचा बदला देण्यासाठी एक सर्वशक्तीमान अशी शक्ती आणि ’द डे ऑफ जजमेंट’ची आवश्यकता यासाठीच आहे. म्हणून आखिरत आवश्यक आहे. याची कल्पना जगाला स्पष्ट शब्दात कुरआनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. या गोष्टीची जाणीव सतत डोळ्यापुढे राहिली व मृत्यूनंतर येणार्या अनिवार्य अकांउन्टीब्लिटी (जबाबदारी)ची सतत आठवण राहिली तर माणसं जगामध्ये जबाबदारीने वागतील. म्हणून इस्लाममध्ये मृत्यूची सतत आठवण ठेवण्याची वारंवार ताकीद दिली गेली आहे. या संबंधी कुरआन स्पष्ट निर्देष देतो की, ’प्रत्येक जीवीतास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रूजू व्हायचे आहे.’ (सुरे अंबिया आ.नं.35).
मृत्यूची वैशिष्ट्ये 
मृत्यूचे एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला, कुठे आणि केव्हा येईल हे कुणालाच माहित नाही. याच्यात तर खरी मजा आहे. कल्पना करा मृत्यूची जर का माणसाला पूर्व कल्पना असती तर किती गजहब झाला असता? एक-एक दिवस जड गेला असता. जीवन निरस झाले असते. ही अल्लाहची एक प्रकारची कृपाच आहे की त्या असीम दयावंताने आपल्याला मृत्यूची तिथी कळणार नाही याची व्यवस्था करून ठेवली आहे. खरे पाहता ही एक सवलत आहे. मात्र या सवलतीचा दुरूपयोग करण्याकडेच आपल्या सर्वांचा कल असतो. आपण असे वागतो जणू कधी मरणारच नाही. म्हणून कुरआन आपल्याला सावधानतेचा इशारा देतो की, ”त्या घटकेचे ज्ञान अल्लाहपाशीच आहे, तोच पर्जन्यवृष्टी करतो, तोच जाणतो की आईच्या उदरात काय वाढत आहे, कोणतीही व्यक्ती जाणत नाही की उद्या तो काय कमाई करणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला हे माहीत नाही की उद्या त्याला कोणत्या भूमीवर मृत्यू येणार आहे, अल्लाहच सर्वकाही जाणणारा व माहितगार आहे.”(सुरे लुकमान, आयत नं. 34).
मृत्यूचे आणखीन एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला ? कोणत्या वयात? येईल हे कोणालाच सांगता येत नाही. अगदी तज्ञ डॉक्टर सुद्धा याबाबतीत ठामपणे काही सांगू शकत नाहीत. या तरतुदीचा सुद्धा आपण गैरफायदा घेत असतो. प्रत्येकाला वाटत असते की ”अजून आपले वय तर काय?” आपल्याला भरपूर जगायचे आहे. रोज रस्त्यावर होणारे अनेक अपघात व त्यात मरणारी अनेक माणसे आपल्याला रोज खोटं सिद्ध करत असतात. तरी माणूस आपल्या धुंदीत जगत असतो. त्याचा विचार असतो की आपण खूप जगणार आहोत. त्याचा हाच विचार त्याला दुसर्यावर अन्याय करून स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी प्रेरित करीत असतो. म्हणून इस्लामची ताकीद आहे की, जगाच्या झगमगाटात मृत्यूला विसरू नका. 
आपल्याला कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो. अपघातच नव्हे तर जगात अनेक कारणांनी, अनेक लोक मरत असतात, काही ना आईच्या गर्भातच मृत्यू येतो तर काही बाल्यावस्थेत मृत्यू पावतात. काहीना ऐन तारूण्यात मृत्यू येतो तर काही दरम्यानी वयात मरतात. साधारणपणे वृद्ध झाल्यातर मृत्यू येतो हा समज सतत खोटा सिद्ध होत असतो. तरी प्रत्येक माणूस स्वतःला पूर्ण आयुष्य मिळणार याच विश्वासाने जगत असतो. हाच विश्वास माणसाला बेजबाबदार जीवन जगण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. म्हणून इस्लाम ताकीद करतो की लक्षात ठेवा तुम्हाला कधीही मृत्यू येऊ शकतो. म्हणून जबाबदारीने वागा, अल्लाहचे भय बाळगा.
अनेक जणांना आपल्या आरोग्यावर मोठा विश्वास असतो. पण अनेक ’सुपर फिट’ अंतरराष्ट्रीय खेळाडूंना सुद्धा अचानक मृत्यू येतो. तर अनेक व्यक्ति आपले रोगट शरीर घेऊन वर्षोनवर्ष जगत असतात. म्हणून चांगले आरोग्य जीवंत राहण्याची हमी होऊ शकत नाही. म्हणून सतत मृत्यूची आठवण डोळ्यासमोर ठेऊन जगण्यातच शहाणपण आहे. याचे कारण असे की, समजा कोणाला पूर्ण आयुष्य जरी लाभले तरी ते साधारणपणे 60-70 वर्षाचे असते. त्यातही 15-20 वर्ष बालपण व शेवटची 15-20 वर्षे वृद्धत्वात व्यतीत होतात. मग उरलेल्या तारूण्याच्या 30-40 वर्षात कुणावर अन्याय करून नेहमीसाठीच्या मृत्यूनंतरचे जीवन धोक्यात घालणे किती धोक्याचे आहे, याची चेतावणी कुरआन खालील शब्दात देतो.” लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी, स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी-अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. (सुरे आलेइम्रान, आयत नं. 14).
आखिरत संबंधी एक सुंदर तर्क असा देता येईल की, आज आपले अस्तित्व आहे. म्हणून यापूर्वीही (म्हणजे जन्मापूर्वी) ते होते व या नंतरही (म्हणजे मृत्यूनंतरही) ते राहील एवढे निश्चित. ज्याअर्थी आपल्या जन्मापूर्वीच्या जीवनावर आपला काही अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावर ही काही अधिकार नसणार आहे तर मग या दोहोंमधील 60-70 वर्षांच्या आयुष्यातच आपल्याला अमर्यादित अधिकार कसा काय मिळू शकतो की आपण मनाला वाटेल तसे जगू, मनाला वाटेल तसे वागू?
वास्तविक पाहता जग हे एक परीक्षा केंद्र आहे. उदा. विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करण्यासाठी कोणतेही पुस्तक / गाईड वापरण्यासाठी स्वतंत्र असतो पण परीक्षा केंद्रात प्रवेश करताच त्याचे सर्व स्वातंत्र्य संपते व वर्षभर त्याने केलेल्या अभ्यासावर त्याचे पुढील भविष्य अवलंबून असते. ठीक असेच या 60-70 वर्षाच्या जीवन काळात माणसं कसेही वागण्यासाठी स्वतंत्र आहेत. मात्र मृत्यू येता क्षणी आपले स्वातंत्र्य संपते. 60-70 वर्षात जगतांना केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांवरच आपले पुढील भविष्य अवलंबून असते. या संबंधी एक सुंदर हदीस आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छीतो ती अशी की - प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टी पूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा.
एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नाची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे. 
1.जीवन कुठे व्यतीत केले 2. तारूण्य कुठे खर्चि घातले 3. संपत्ती कोठून मिळविली. 4. कोठे खर्च केली. 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला.
मृत्यूची सतत आठवण कशी ठेवता येईल?
आधून-मधून कब्रस्तान मध्ये जावे. त्यावेळी आपल्याला जाणीव होईल की या ठिकाणी अशी अनेक माणसं शांतपणे पडलेली आहेत ज्यांना जीवंतपणी वाटत होतं की त्यांच्या शिवाय त्यांचे घर, व्यापार, देश चालूच शकत नाहीत. मृत व्यक्तीच्या गुस्लच्या वेळी हजर राहणे आणि पाहणे तो स्वतः अंघोळ करण्याच्या सुद्धा लायक नाही. तेव्हा त्याची असाह्यता लक्षात येते व आपली औकात आपल्याला कळते. अशा प्रकारे मृत्यूची सतत आठवण ठेवता येईल.
मृत्यू आणि नमाज
माणूस दर दिवशी जीवनापासून दूर तर मृत्यूच्या जवळ जात असतो, मग शहाणा माणूस जवळ येणार्या अडचणीवर मात करण्याच्या तयारीला लागतो. मूर्ख मात्र दर वाढदिवसाला नवीन केक कापत कशाचीच पर्वा न करता जगत राहतो. जरा गंभीरपणे विचार केला तर लक्षात येईल की, मृत्यू आणि नमाज दोन्हीमध्ये एक समानता अशी आहे की, दोन्हीमध्ये माणसाला अल्लाहशी भेटण्याची समान संधी आहे. नमाज मध्येही माणूस अल्लाहची भेट घेतो. मृत्यूनंतरही माणूस अल्लाहची भेट घेतो. नमाज पढतांना ज्याला जेवढा आनंद येत असेल तेवढाच मृत्यू येताना त्याला आनंद येईल. नमाजला जाण्यासाठी ज्याला भिती वाटते त्याला मृत्यूचीही भिती वाटणार, एवढे नक्की. म्हणून मन लावून नमाज अदा करणे अत्यंत आवश्यक आहे. 
जगात मोठ्या प्रमाणात अनैतिकता बोकाळलेली आहे. त्यामुळे नातेसंबंध उध्वस्त होत आहेत. कोणावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही, अशा परिस्थितीत मुस्लिमांसमोर नैतिक जीवन जगण्याचे एक मोठे आव्हान आहे. यातून मुस्लिमांवरील इतर समाजाचा विश्वास वृद्धींगत होत जाईल, अन्यथा गैरविश्वासाचे जे वातावरण सध्या जगात सर्वत्र व्याप्त आहे त्यात आणखीन भर पडेल. शेवटी कोणीतरी असायलाच हवा ना! ज्याच्यावर विश्वास ठेवून लोक आपले व्यवहार करू शकतील. तर मित्रांनों! सज्ज व्हा, नमाजच्या माध्यमातून नीतिमत्ता हस्तगत करा. कुरआनच्या आदेशांना समजून घ्या म्हणजे त्यांच्यावर अंमलबजावणी करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होईल. त्यासाठी कायम मृत्यूला डोळ्यासमोर ठेवा. नैतिकतेवर चलण्याचा तो एक खात्रीशीर मार्ग आहे. अल्लाह आपल्या सर्वांचे रक्षण करो. आमीन.

-अर्शिया शकील खान, नालासोपारा

प्राचीन काळापासून आजपर्यंत स्त्रियांचे स्थान, मर्यादा, हक्क मानसन्मान या बाबतीत नियमित चर्चा घडत आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीला पापाची जजनी, नरकाचे घर आणि सर्व मानवी संकटांचे उगमस्थान मानले जाते. ग्रीसमध्ये तर बऱ्याच काळापर्यंत या विषयावर चर्चा होती की स्त्रियांच्या शरीरात आत्मा आहे की नाही. अरबस्थानात मुलगी जन्माला आली की तिला जिवंत गाडले जायचे. भारतामध्ये मृत पतीच्या चितेवर सतीच्या नावावर तिला जाळण्यात यायचे. प्रत्येक राष्ट्रात व प्रदेशात स्त्रियांची फार वाईट अवस्था होती.
अल्लाहने आपले अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यामार्फत स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त केले. अल्लाहने स्त्री व पुरुष यांना एका जीवापासून निर्माण केले गेले. दोघांना समान स्थान दिले. व्यावहारिक व सामाजिक घटनांमध्ये स्त्रियांच्या हक्कांना स्थान दिले जेणेकरून स्त्रियांचे शोषण होऊ नये. मालमत्तेत वारसाहक्क प्रदान करून आर्थिक सुरक्षा प्रदान केली.
‘‘स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्काधिकार आहेत जसे पुरुषांचे हक्क त्यांच्यावर आहेत.’’ (सूरह अल बकरा – २२८)
अल्लाहने कुरआनमधील या आयतीद्वारे स्त्रियांच्या पूर्ण हक्कांची पूर्तता केली. तिला शिक्षण, प्रशिक्षणाचा अधिकार दिला. आपल्या पसंतीने लग्न करणे, पती व पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असेल तर आणि एकत्र राहणे शक्य नसेल तर विभक्त होऊन दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली. विधवा स्त्रियांच्या दुसऱ्या विवाहाला अनुमती दिली गेली.
महान कवी अल्लामा इक्बाल म्हणतात की, ‘‘कदाचित जर मी मुस्लिम नसतो आणि हे मान्य केले नसते की कुरआन हा ईशग्रंथ आहे, तर मग माझे मत असे असते की हा ग्रंथ कोणा बुद्धिवान स्त्रीकडून लिहिला गेला असावा. कारण कुरआनात स्त्रियांना इतके अधिकार दिले गेले आहेत की जे जगातील कुठल्याही धर्मात आढळत नाहीत.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींना प्रोत्साहन देताना ई. उरम्हगंम म्हणतो, ‘‘इस्लामच्या आधी स्त्रियांना खरा अभिमान व दर्जा प्राप्त नव्हता. चो मुहम्मद (स.) याच्या शिकवणींनंतर त्यांना मिळाला.’’
तसेच डी. बलॉडनने आपले पुस्तक ‘सुन्नत नबवी व जदीद सायन्स’मध्ये नमूद केले की ‘‘इस्लामने स्त्रियांना जे हक्क प्रदान केले ते इतिहासात कुठेही आढळत नाहीत.’’
सध्या ‘तलाक’चा मुद्दा खूप चर्चिला जात आहे. तलाक स्त्रियांवर अत्याचार आहे. वगैरे!
‘तलाक’ म्हणजे विवाहबंधनातून मुक्त होणे. तलाक हे विवाहबंधनातून मुक्त होण्याचे पहिले पाऊल नव्हे तर अंतिम पाऊल आहे. हा हक्क पती व पत्नी दोघांना देण्यात आला आहे. स्त्रीने घेतलेल्या तलाकला ‘खुलअ’ म्हणतात. वैवाहिक जीवनात पती-पत्नींमध्ये स्वाभाविक भिन्नता, दुराचार, संकुचितपणा, एकत्र कुटुंब व्यवस्था अशा बऱ्याच कारणांमुळे विवाद झाले आणि मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे एकत्र राहणे अवघड होऊन बसले. इस्लामने तलाकची परवानगी दिली. थोडक्यात जखम असह्य झाली तर तो अवयव कापून टाकणे क्रमप्राप्त ठरते. इस्लाम ताबडतोब कारवाई करण्याचा आदेश देत नाही. कोणत्या वाईट प्रथेला नीट करण्याचे उपाय सुचवितो. नंतर नाइलाज झाला तरच ही अंतिम कारवाई किंवा शिक्षेचा आदेश देतो.
उदा. तलाकचा अगोदर वाद मिटविण्यासाठी असा उपाय सुचविण्यात आला आहे की पत्नीची समजूत घालावी. जर प्रतिसाद मिळाला नाही तर पती व पत्नीच्या नातेवाईकांकडून एक एक सदस्य नियुक्त करून मतभेदांची चौकशी करण्यात यावी आणि उपाय सुचविण्यास सांगावे. अर्थात अल्लाहने आपल्या कायद्यानुसार मानसाच्या चांगल्या जीवनाचा प्रारंभ केला आहे. आपल्याला त्याची जाणीव ठेवली पाहिजे. इस्लामी शिकवणींवर विचारमंथन केल्याने नक्कीच इस्लाम हा स्त्रियांचा रक्षक असल्याची आपली खात्री पटेल.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहची ९९ नावे आहेत, शंभरात एक कमी. ती मुखोद्गत करणारा नंदनवनात (जन्नतमध्ये) दाखल होईल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : ‘मुखोद्गत करणे’ म्हणजे जो मनुष्य त्या नावांचा अर्थ व उद्देश जाणून 
घेईल आणि त्यांची निकड व मागणी पूर्ण करील, दुसऱ्या शब्दांत त्याचा अर्थ असा आहे की मनुष्याने ती गुणवैशिष्ट्ये आत्मसात करावीत आणि आपल्या संपूर्ण जीवनात त्या निकडींवर आचरण करावे.
या हदीसमध्ये सर्व नावांची यादी देण्यात आलेली नाही. ती नावे जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या निकडी माहीत करून घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे मनुष्याने पवित्र कुरआनचे पठण करावे. त्यात अल्लाहने आपली सर्व गुणवैशिष्ट्ये सांगितली आहेत आणि त्यांच्या निकडी काय आहेत आणि मनुष्याने त्यांचा कशाप्रकारे लाभ घेतला पाहिजे हे सर्व कुरआनमध्ये सांगितले गेले आहे. परंतु त्यापासून पूर्णत: तोच लाभ घेऊ शकतो जो कुरआनचे पठण व समजून पठण करण्याची सवय लावून घेईल. मग पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ती आपल्या शब्दांत निकडींसह व्यक्त केली आहेत. त्या दोन्हींच्या अध्ययनांति माहीत होईल की अल्लाहच्या गुणवैशिष्ट्यांपासून नामोस्मरण व मुखोद्गत कशाप्रकारे करण्यात यावे. आम्ही या ठिकाणी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये ज्यांचा कुरआनमध्ये वारंवार उल्लेख आला आहे आणि ज्यांपासून मुस्लिमांच्या प्रशिक्षणातून मोठ्या प्रमाणात काम घेण्यात आले आहे, उद्धृत करीत आहोत आणि तेही संक्षिप्तपणे, कारण हे पुस्तक तो विषय विस्तृतपणे सांगण्याची परवानगी देत नाही.
१. अल्लाह : हे त्या अस्तित्वाचे नाव आहे ज्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. हा शब्द एकमेव ईश्वराव्यतिरिक्त दुसऱ्या कोणासाठीही वापरला गेलेला नाही. हा ज्या मूळ शब्दापासून निर्माण झाला आहे त्याचे दोन अर्थ आहेत- प्रेमाने एखाद्याकडे झडप घालणे, पुढे जाणे आणि धोक्यापासून बचाव करण्यासाठी एखाद्याकडे धावणे आणि त्याच्या आश्रयात स्वत:ला झोवूâन देणे. अल्लाह आमचे उपास्य आहे. आमचे हृदय त्याच्या प्रेमाने भरलेले असावे ही त्याची निकड आहे. आमच्या मनात त्याच्या प्रेमाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही प्रेम असू नये. आमच्या शरीराच्या व प्राणाच्या सर्व शक्ती आणि क्षमता त्याच्यासाठी अर्पित असावीत. फक्त त्याचीच उपासना आणि दासत्व असावे. फक्त त्याच्याचपुढे नतमस्तक व्हावे आणि फक्त त्याच्याचसाठी भेटवस्तू व बलिदान सादर करावे. फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवावा आणि फक्त त्याच्याच कार्यासाठी स्वत:ला झोवूâन द्यावे. अल्लाहव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडेही संकटसमयी व कठीणसमयी मदत मागू नये. ही निकड आहे अल्लाहच्या उपास्य असण्याची आणि नि:संशय प्रोत्साहित झालेली निकड आहे.
२. रब : हा शब्द ज्या मूळ शब्दापासून बनला आहे त्याचे अर्थ आहेत- पालनपोषण करणे, संगोपन करणे, व्यवस्थित ठेवणे, अनेक धोक्यांपासून वाचवून आणि सर्व साधनसामुग्रीचे नियोजन करीत शिखरावर पोहोचविणे, अल्लाहचे ईशत्व एक स्पष्ट गोष्ट आहे. आईच्या उदरातील अंधारात हवा आणि अन्न कोण पोहोचवितो? जगात येणापूर्वी बालकाच्या अन्नाचे कोण नियोजन करतो? मग आई-वडील आणि दुसऱ्या लोकांच्या हृदयांत प्रेम निर्माण करणारा कोण आहे? असे घडले नसते तर मांसाच्या गोळ्याला कोण उठविल? त्याच्या गरजा कोण पूर्ण करील? मग हळूहळू शरीर आणि बुद्धीच्या क्षमतांची कोण वृद्धी करतो? तारुण्य व आरोग्य कोणाची देन आहे? मग ही जमीन व आकाशाचा कारखाना कोणासाठी चालत राहतो? हे सर्व त्याच्या ईशत्वाचे उपकार नाहीत काय? त्याच्याव्यतिरिक्त कोणी आहे काय? आणि तो त्याच्या ईशत्वात भागीदार आहे काय? जर फक्त तोच आमचे कल्याण करणारा आणि पालनपोषण करणारा आहे तर जीभ, हात, पाय, शरीर व प्राणाच्या सर्व क्षमता फक्त त्याच्याच बनून राहाव्यात, ही त्याची अगदी उचित निकड आहे. मग त्याने फक्त अन्नपाण्याचीच व्यवस्था केली नाही तर हे त्याच्या ईशत्वाचे उपकार आहेत की आमच्या जीवनाला योग्य स्थितीत ठेवण्यासाठी आणि आमच्या आत्म्याचे संगोपन करण्यासाठी त्याने आपला ग्रंथ पाठविला जो सर्व उपकारांमध्ये सर्वांत मोठा उपकार आहे. या उपकाराची निकड आहे की आम्ही त्याच्या ग्रंथाचा मान राखावा, त्याला आपले हृदय व आत्म्याचे अन्न बनवावे, त्याचा आपल्या जीवनात समावेश करावा आणि उपकृत गुलामाप्रमाणे जगभर त्याची चर्चा करावी आणि ज्या लोकांना त्याची रुचि व गोडवा माहीत नाही त्यांना तो माहीत करून द्यावा.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू पुण्यकार्य क्षुल्लक समजू नकोस. तू आपल्या बंधुला हसतमुखाने भेटलास तरी ते पुण्य आहे  आणि आपल्या हौदातील पाणी बंधुच्या भांड्यात ओत, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दोन मनुष्यांदरम्यान तडजोड घडवून आणा, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुम्ही एखाद्याला आपल्या वाहनावर बसवा, अथवा त्याचे ओझे आपल्या वाहनावर ठेवा हेदेखील पुण्यकर्म आहे. चांगले बोलणेदेखील पुण्यकर्म आहे. नमाजकडे उठणारे तुमचे प्रत्येक पाऊल पुण्यकर्म आहे. वाटेतील दगड व काटे बाजूला सारणे हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : बुखारी) 
स्पष्टीकरण : दुसऱ्या एका हदीसमध्ये आहे की ‘‘तुम्ही आपल्या संपत्ती व प्रतिष्ठेद्वारे एखाद्याला लाभ पोहचवाल, हेदेखील पुण्यकर्म आहे. एक मनुष्य आपले मत चांगल्या प्रकारे  सांगू शकत नसेल आणि तुम्हाला ती देणगी मिळाली असेल तर आपल्या बंधुची बाजू मांडणे आणि त्याचे मत स्पष्ट करून सांगणे, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुम्हाला शक्ती प्रदान  करण्यात आली आहे तर एखाद्या दुर्बलाची मदत करा, हेदेखील पुण्यकर्म आहे. तुमच्याजवळ ज्ञान आहे, तेव्हा दुसऱ्यांना योग्य गोष्ट सांगणे, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ 
माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक मुस्लिमावर ‘सदका’ (दान) करणे अनिवार्य आहे.’’ तेव्हा मी विचारले, ‘‘जर  एखाद्याजवळ देण्यासाठी काहीही नसेल तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याने कमवावे, स्वत: खावे आणि गरिबांनाही द्यावे.’’ मी म्हणालो, ‘‘जर तो हे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘एखाद्या गरजवंत संकटात सापडलेल्या मनुष्याची मदत करावी.’’ मी विचारले, ‘‘जर तो हे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना पुण्य करण्यास प्रोत्साहित करावे.’’ मी  म्हणालो, ‘‘जर तो असे करू शकला नाही तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांना त्रास देऊ नये, हेदेखील पुण्यकर्म आहे.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या बंधुच्या गरजेला उपयोगी पडणाऱ्या मनुष्याला त्याच्या गरजेच्या वेळी अल्लाह मदत करील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : एका हदीसमध्ये आहे की ‘‘अल्लाहने आपले काही दास लोकांची मदत करण्यासाठी निर्माण केले आहेत. लोक आपली गरज त्यांच्यापर्यंत पोहचवितात आणि ते ती  पूर्ण करतात. हे लोक अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहचा राग आणि शिक्षेपासून सुरक्षित राहतील.’’ 
आचरणाचे शिष्टाचार
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले की अल्लाहने सांगितले, ‘‘मी दुसऱ्या भागीदारांच्या तुलनेत अनेकेश्वरत्वापासून अधिक निस्पृह आहे. ज्या  मनुष्याने एखादे पुण्यकर्म केले आणि त्यात माझ्याबरोबर त्याने कोणा दुसऱ्याला भागीदार बनविले तर माझा त्याच्या आचरणाशी काहीही संबंध नाही. मी त्याच्या आचरणाने निराश  आहे. ते आचरण त्या दुसऱ्याचा वाटा आहे ज्याला माझ्याबरोबर भागीदार बनविले.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : विशेषत: पुण्याईची ईशकृपा लाभलेल्या लोकांनी आणि ‘दीन’चे कार्य करणाऱ्यांनी विचार करायला हवा की या हदीसमध्ये काय सांगितले गेले आहे. यात पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी सांगितले की पुण्याईचे कसलेही कार्य असू दे, मग त्याचा संबंध उपासनेशी असो की व्यवहारांशी, नमाजशी असो की अल्लाहच्या दासांच्या सुश्रूषेशी, अथवा त्याचा उद्देश  देखावा आणि प्रतिष्ठा करणे असो की एखाद्या गटाकडून किंवा मनुष्याकडून शाबासकी मिळविण्याशी असो; अल्लाहपाशी त्याचे मूल्य फक्त शून्य असेल. जर त्याची प्रसन्नतादेखील  याचा उद्देश असेल आणि लोकांची प्रशंसा प्राप्त करणेदेखील त्याचा हेतू असेल तरीही ते आचरण वाया जाईल आणि जर सुरूवातीला अल्लाहच्या प्रसन्नतेने आचरणास प्रोत्साहन मिळाले  मात्र नंतर दुसऱ्यांच्या प्रसन्नतेने त्याची जागा घेतल्यास हेदेखील आचरण वाया जाईल. म्हणून अतिशय सतर्क राहावे लागेल. शैतान येण्याचे हजारो दरवाजे आहेत. अशा अदृश्य  शत्रूच्या हल्ल्यांपासून बचाव करण्याचा एक उपाय आहे तो म्हणजे अल्लाहपुढे नतमस्तक होणे, त्याला आपली विवशता सांगणे, अल्लाहने मदत केली नाही तर दुर्बल मनुष्य शैतानाच्या  हल्ल्यांपासून कसा वाचू शकतो?

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget