Latest Post

लेखक - डॉ. मकसुद आलम सिद्दिकी
भाषांतर - प्रो. मुबारक हुसेन मनियार

आयएमपीटी अ.क्र. 57              -पृष्ठे - 64                  मूल्य - 30            आवृत्ती - 4 (2015)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/tdy6n1t8c4ft2srnwf3vnbu5g02wbq4o


- इमामुद्दीन रामनगरी
मुस्लिम पैगंबर मुहम्मद (स.) यांना तर महानतम व अंतिम ईशदूत मानतातच परंतु मुस्लिमेतर विद्वान पैगंबर (स.) यांच्या विषयी काय म्हणतात याचे संकलन या पुस्तकात लेखकाने केले आहे. लेखक महोदयाने आपल्या कडून काहीही लिहिलेले नाही तर भारत व युरोपच्या विद्वानांची मतंयात आलेली आहेत.
त्या सर्वांनी पैगंबर (स.) यांच्या गुणांचा, सचोटीचा स्वीकार केला आणि सर्वांनी त्यांच्या महान व्यिक्तत्व, महान कार्य व महान शिकवणींची प्रशंसाच केली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 56              -पृष्ठे - 32                  मूल्य - 09            आवृत्ती - 3 (2008)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2an8ozlxlvoo9pcksu59eiyokxpafp90


आदरणीय मिकदाम इब्ने मअदी करब (रजि.) म्हणतात, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘स्वत:च्या कष्टाने कमावलेल्या अन्नापेक्षा श्रेष्ठ अन्न कधी कोणी खाल्ले नाही. प्रेषित  दाऊद (अ.) सुद्धा स्वत:च्या कष्टाच्या कमाईतून खात असत.’’ (बुखारी)

निरुपण
चरितार्थासाठी प्रत्येकाला कमावणे अपरिहार्यच आहे. मात्र ही कमाई कष्टाने आणि इमानेइतबारे कमावलेली असावी. ही स्पष्ट ताकीद इस्लामने दिली आहे. माणसासाठी श्रेष्ठतम आहार  तो आहे जो त्याने स्वत: कष्टाने व इमानदारीने कमाविलेला असावा. त्यापेक्षा श्रेष्ठ आहार दुसरा कुठलाच नाही. संसार करण्यासाठी कमावणेसुद्धा उपासनाच आहे. बऱ्याच लोकांचा  गैरसमज आहे की संसार करणे, कमावणे इ. धार्मिक कामे नव्हेत. हा गैरसमज दूर करण्यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदरणीय प्रेषित दाऊद (अ.) यांचे उदाहरण दिले की  अल्लाहचे महान प्रेषित असूनही तेसुद्धा कष्टाची कमाई करत असत. ते लोहारकाम करून अर्थार्जन करत असत.
माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये यासंबंधी इस्लामने सर्वाधिक प्राधान्य कष्टाच्या कमाईला दिले आहे. ‘हरामच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीचे कोणतेच सत्कर्म अल्लाह  स्वीकृत करणार नाही.’ अशी पैगंबर (स.) यांची ठाम भूमिका आहे.
मात्र सध्या लोक कष्टाची कमाई की हरामाची याची यत्किंचितही पर्वा करत नाहीत. नव्हे, नंबर एक व नंबर दोन यात फरकही करायला तयार नाहीत! पैसा हवा, मग तो नंबर एकचा  असो की नंबर दोनचा! हे सद्य समाजमन आहे.
शाकाहार आणि मांसाहाराचेच उदाहरण घेतले तर कष्टाचा आणि हरामाचा हा विचारच लोक करत नाहीत. इस्लामने शाकाहारालाही मान्यता दिली आहे आणि मांसाहारालाही! मात्र  कुठल्याही परिस्थितीत तो आहार कष्टाचा, मेहनतीचा, इमानेइतबारे कमावलेला असावा, हे अनिवार्य ठरवले आहे.
एका शाकाहारी कुटुंबात चर्चा करताना मी हा मुद्दा उपस्थित केल्यावर त्या कुटुंबाने प्रांजळपणे मान्य केले की, हो! सध्या समाजाचा, विशेषकरून तरुण पिढीचा कल हरामाच्या  कमाइकडेच अधिक आहे. हराम आणि हलालची चिंता कुणालाच नाही. कमाईच जर हरामाची, लबाडीची, बेइमानीची असेल तर अशा शाकाहाराला काय अर्थ आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,
‘‘जोडोनिया धन। उत्तमची व्यवहारे।
उदास विचारे। वेच करी।’’


- संकलन : डॉ. सय्यद रफीक

आदरणीय उमर बिन खत्ताब (रजि.) म्हणतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘कर्मांचा दारोमदार फक्त निय्यत (उद्दिष्ट) वर आहे. म्हणून माणसाला तेच फळ मिळेल ज्याची  त्याने निय्यत केली असेल. उदा. ज्या व्यक्तीने फक्त अल्लाह आणि पैगंबरांसाठी हिजरत (स्थलांतर) केली असेल त्याचीच हिजरत खरी हिजरत आहे. ज्याने रुपया-पैशांसाठी अथवा  स्त्रीशी विवाह करण्यासाठी हिजरत केली असेल तर त्याची हिजरत धनसंपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी गणली जाईल.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
कोणत्याही सत्कृत्याचा मोबदला त्या सत्कृत्यामागे उद्देश (निय्यत) काय आहे, हे पाहूनच दिला जाईल. म्हणूनच उद्देशाला असाधारण महत्त्व आहे. खरे तर अल्लाहजवळ कर्माचा उद्देशच  महत्त्वाचा आहे. इस्लाममध्ये हिजरत (स्थलांतर) हे खूप मोठे सत्कर्म आहे. एखाद्या ठिकाणी सन्मार्गावर जगणे अशक्यप्राय झाले असेल तर ते ठिकाण सोडावे, हिजरत करावी; पण  सत्याची कास सोडू नये असा संकेत इस्लामी शास्त्रात आहे. मात्र हे एवढे महान सत्कर्मसुद्धा जर अल्लाहऐवजी संपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी असेल तर अल्लाहजवळ त्याची काही एक  किंमत नाही. एखादे सत्कर्म कितीही मोठे असू द्या, ते जर फक्त अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी नसेल, नावलौकिकासाठी असेल, स्वार्थासाठी, संपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी असेल तर  न्यायनिवाड्याच्या दिवशी त्याची काहीच किंमत होणार नाही. त्याची गत खो्या पैशासमान होईल.
आपण दैनंदिन जीवनात अनेक सत्कर्मे करतो. नमाज, रोजा, जकात, हज असेल किंवा गोरगरीबांची सेवा, मातापित्यांची सेवा इ., ही सर्व सत्कर्मे आपल्या उपयोगी पडतील, जर ती  फक्त अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी असली तरच! अन्यथा जर ती ‘शो’साठी असतील तर सपशेल व्यर्थ आहेत, असे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट म्हणणे आहे. माझे एखादे  सत्कर्म फक्त माझ्या अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी असेल तर पेपरला फोटो, बातमी येवो अगर न येवो, समाजात त्याची चर्चा होवो वा न होवो, मला काय फरक पडणार? हा आहे  खरा नि:स्वार्थीपणा! पैगंबरांच्या एका हदीसचा आशय असा आहे की न्यायदानाच्या दिवशी अल्लाह कोणाची नमाज, रोजे, हज, दानधर्म त्याच्या तोंडावर फेकून देईल आणि त्याला कठोर शिक्षा करील. कारण त्याची नमाज अल्लाहसाठी नव्हती, जगाला दाखविण्यासाठी होती! त्याचे रोडे, दानधर्म आणि हज अल्लाहसाठी नव्हते तर समाजात त्याचे कौतुक व्हावे म्हणून होते. हीच गत प्रत्येक शो-पीस कर्माची होईल. 
पैगंबरांचा उपरोक्त उपदेश समस्त मानवजातीला सावधान करत आहे की प्रत्येक सत्कर्म हे फक्त अल्लाहला राजी करण्यासाठी करा! वाहवा व्हावी, नावलौकिक व्हावे यासाठी कदापि  करू नका!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

एक ही धुन है के इस रात को ढलता देखूं, 
अपनी आँखों से सूरज को निकलता देखूं
जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशी संघटना आहे की, जिचा सरळ संपर्क देशबांधवांशी आहे. कोणत्याही कार्यक्रमात सर्व समाजाला सोबत घेण्याकडे जमाअतचा कल असतो. मुस्लिम्मेतरांकडे उदार दृष्टीने पाहण्याची जमाअतची शिकवण आहे. यासंदर्भात जमाअतचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचे विचार नक्कीच उद्बोधक ठरतील. ते म्हणतात, ”मुस्लिमांमधून साधारणतः जी आंदोलने उदयास येतात ती दोनपैकी एका कारणासाठी केली जातात. 1. इस्लामच्या एखाद्या विषयाला घेऊन. किंवा 2. मुस्लिमांच्या जीवनाशी निगडित एखाद्या विषयाला घेऊन. परंतु, आम्ही जमाअतच्या माध्यमाने समग्र इस्लामला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. जमाअते इस्लामी आणि इतर मुस्लिम संघटनांमध्ये दूसरा फरक असा आहे की, दुसर्‍या कुठल्याही मुस्लिम संघटनांची आंदोलने इतर समाजाच्या संघटनांच्या आंदोलनासारखीच असतात. मात्र आम्ही ठीक त्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे, जी पद्धत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ठरवून दिलेली आहे. 
इतर मुस्लिम संघटनांमध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला सामील करून घेतले जाते जो जन्माने मुस्लिम असेल. त्यांची अशी धारणा असते की, जो मुस्लिम वंशात जन्मला तो चारित्र्यानेही मुस्लिम असणार. परिणामतः अशा संघटनांमध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांचा शिरकाव होतो. असे लोक जे विश्‍वासू नसतात, कोणतीही जबाबदारी पेलण्यास लायक नसतात. मात्र आम्ही जमाअतमध्ये अशा कोणत्याही व्यक्तीला या गृहितकावर घेत नाही की, आमुक एक जण मुस्लिम घरात जन्माला आहे म्हणून त्याचे वर्तनही इस्लामीच असेल. इस्लामचा कलमा, त्याचा अर्थ यांचा समजून उमजून स्विकार केल्यानंतर त्याच्यावर येणार्‍या जबाबदार्‍यांची चांगल्या प्रकारे जाण निर्माण झाल्यावरच आम्ही कोणत्याही व्यक्तीला जमाअतमध्ये घेतो. संघटनेत आल्यानंतरही ईमान (श्रद्धा) मध्ये टिकून राहण्यासाठी ज्या आवश्यक शर्ती आहेत त्याचे पालन त्याच्याकडून केले जाते किंवा नाही याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. येणेप्रमाणे मुस्लिम समाजातील चांगल्या चारित्र्यातील लोकांनाच वेचून-वेचून जमाअतमध्ये घेतले जाते.  म्हणजे चांगल्या चारित्र्याचे लोकच जमाअतमध्ये येतील याकडे लक्ष दिले जाते. 
अन्य मुस्लिम संघटनांची दृष्टी भारत आणि भारतात राहणार्‍या मुस्लिम समाजापर्यंतच सीमित असते. कोणाची नजर गेलीच तरी जास्तीत जास्त  जागतिक मुस्लिम समाजांच्या प्रश्‍नापर्यंत जाते. या संघटनांना मुस्लिम समाजातील प्रश्‍नांमध्येच रस असतो. त्यांच्या उपक्रमांमध्ये असे काहीच नसते जे देशबांधवांना आकर्षित करेल. उलट कधी-कधी त्यांचे उपक्रम असे असतात की, बिगर मुस्लिमांना इस्लामकडे आकर्षित होण्यामध्ये बाधाच निर्माण होते. मात्र जमाअतमध्ये समग्र इस्लाम हाच उपक्रमांचा केंद्रबिंदू असल्याने याकडे कोणीही आकर्षित होऊ शकतो. इस्लाम समग्र मानवजातीसाठी आहे. म्हणून आमची दृष्टी कुठल्याही विशिष्ट अशा समाज, देश किंवा त्यांच्या तात्कालीक प्रश्‍नांमध्ये गुरफटलेली नाही. उलट आमची दृष्टी समग्र मानवजाती व जगावर पसरलेली आहे. आमची अशी धारणा आहे की, मानवजातीचे प्रश्‍न हे आमचे प्रश्‍न आहेत. कुरआन आणि हदीसमध्ये त्या प्रत्येक प्रश्‍नाचे समाधान आहे व तेच समाधान आम्ही सर्वांसमक्ष ठेवतो. त्यातच सर्वांचे यश व कल्याण नीहित आहे. आमच्या या अजेंड्यामुळे मला विश्‍वास आहे की, फक्त मुस्लिमांमधीलच नव्हे तर मुस्लिम्मेतरांमधील सद्प्रवृत्तीचे लोक सुद्धा जमाअते इस्लामीकडे आकर्षित होतील.” (संदर्भ ः रूदाद भाग 1, पान क्र. 8-9).
जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मानवतावादी दृष्टीकोण कुरआनच्या शिकवणीवर आधारित आहे. ती शिकवण म्हणजे, 
1. ” लोकहो! आम्ही तुम्हाला एक पुरूष व एक स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले. जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकपणे अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त चारित्र्यवान (ईशपरायण) आहे. निश्‍चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (सुरे अलहुजरात ः आयत नं.13).
2. ”ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानवजातीला मोठेपण दिले आणि त्यांना खुश्की व जलमार्गावर वाहने दिली आणि त्यांना निर्मळ पदार्थाचे अन्न दिले व आपल्या बर्‍याचशा निर्मितींवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केले.” (सुरह बनी इसराईल आयत नं. 70)
कुरआनच्या वरील दोन्ही संदेशांमध्ये जात आणि धर्मावरून कुठलाही फरक केलेला नाही. समतेची एवढी मोठी शिकवण दुसरी असू शकत नाही. हीच शिकवण जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. हीच शिकवण परिणामकारकरित्या जगासमोर मांडण्याचे कार्य जमाअत गेल्या 77 वर्षांपासून करत आहे.
जगण्याचा हा स्वच्छ, सरळ आणि तणावरहित मार्ग त्या लोकांना मुळीच आवडत नाही ज्यांचे व्यवसाय हरामचे आहेत. दारू, व्याज, जुगार, अश्‍लिलता म्हणजेच समाजाला नुकसान पोहोचविणार्‍या वस्तूंच्या निर्मितीत जो वर्ग गुंतलेला आहे त्याला जमाअतचे हे कार्य आवडत नाही, हे ओघानेच आले. दुर्दैवाने सत्तेत आणि मीडियात याच वर्गाचे प्राबल्य आहे.  म्हणूनच जमाअतचा संदेश खरा असूनही बहुसंख्य लोकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचत नाही. उलट माध्यमांमधून इस्लाम विरूद्धचा प्रचार सातत्याने व आक्रमक पद्धतीने होत असल्यामुळे देशबांधवांमध्ये मुख्यत्वाने इस्लाम व पर्यायाने मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज खोलवर रूजलेले आहेत. 
या दुष्प्रचाराच्या वाईट परिणामापासून देशबांधवांना वाचवून त्यांच्या समोर सत्य परिस्थिती मांडण्याचे मोठे आवाहन जमाअत समोर आहे. त्यासाठी जमाअतच्या सदस्यांना अहोरात्र कष्ट करावे लागणार आहेत. 
वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान म्हणजे काय?
एक सफ मे खडे हो गए महेमूद व अयाज
न कोई बंदा रहा न कोई बंदानवाज
जमाअते इस्लामी हिंद वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान या संकल्पनेवर ठामपणे विश्‍वास ठेवते. अरबी भाषेमध्ये ’वहदत’ या शब्दाचा अर्थ ’एक’ असा आहे आणि ’इलाह’ म्हणजे पूजनीय. येणेप्रमाणे वहदत-ए-इलाह म्हणजे अल्लाह एक होय व तोच पूजनीय आहे, या विश्‍वाचा निर्माता आहे, शासक व मालक आहे. म्हणून त्याचे आदेश सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव मुकाट्याने मानतात. सूर्य, चंद्र, तारे लाखों वर्षांपासून अल्लाहने ठरवून दिलेल्या कक्षेमध्ये ठरवून दिलेले काम करत आहेत. निसर्गाची दिनचर्या ठरवून दिल्याप्रमाणे चालू आहे. कोणी अल्लाहला मानो किंवा न मानो, अल्लाहची कृपा सर्वांवर सारखीच आहे. ही संकल्पना म्हणजे वहदत-ए-इलाह. 
आता पाहूया, वहदत-ए-इन्सान म्हणजे काय? आपण आताच पाहिले आहे की, सुरह हुजरात आयत नं. 13 मध्ये अल्लाहने म्हटलेले आहे की, समस्त मानव समाज हा एकाच आई-वडिलांचा विस्तार आहे. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या जवळ-जवळ आठ अब्ज मानवांचे आई-वडिल एकच आहेत. म्हणजे समस्त मानवसमाज हा एकच आहे. या सत्याचा ठाम विश्‍वास मनाशी बाळगणे म्हणजेच वहदत-ए-इन्सान. 
सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. सर्वांचे अवयव सारखेच आहेत. सर्वांचे रक्त सर्वांना अर्थात रक्त गटाप्रमाणे चालते. फक्त वर्ण व चेहरेपट्टी वेगवेगळी आहे व तीही या कारणाने आहे की त्यांना ओळखता यावे. थोडक्यात जगातील प्रत्येक व्यक्ती दुसर्‍या कुठल्याही व्यक्तीचा रक्ताचा नातेवाईक आहे. समस्त मानवजात रक्ताच्या नात्याने बांधलेली आहे. वहदत-ए-इन्सान या संकल्पनेबद्दल बोलताना जमाअतचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”माणसांचे विविध गट व वंश यांची आपसातील ओढाताण, त्यांच्यातील भेदाभेद, एकमेकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची भावना, स्पृश्य-अस्पृश्यतेची भावना या आधारहीन आणि कृत्रिम आहेत. या मानवनिर्मित कल्पना आहेत. यांना कुठलाही ठोस आधार नाही. आपल्या मूळ प्रवृत्तीच्या विरूद्ध जावून माणसांनी कृत्रिमरित्या आपसात हे मतभेद उभे केले आहेत.
मतभेद कोणामध्ये होत नाहीत? एकाच वंशातील लोकांमध्ये सुद्धा होतात. एवढेच कशाला दोन सख्या भावांमध्ये सुद्धा होतात. खरे पाहता मानवा-मानवामध्ये मतभेद फक्त एकाच आधारावर होऊ शकतात ते म्हणजे श्रद्धा, नितीनियम आणि वर्तणूक. याच आधारावर एकाच आई-वडिलांची दोन मुले वेगवेगळी ठरू शकतात व याच आधारावर जगाच्या पुर्वेला राहणारा एक माणूस पश्‍चिमेला राहणारा दूसरा माणूस एक असू शकतो. राहता राहिला वर्ण, वंश, भाषा या वेगळेपणावर मैत्री किंवा शत्रुत्व ठरवणे निरर्थक आहे. असे म्हणणे कितपत तर्कपूर्ण आणि योग्य आहे की, अमूक डोंगर, नदी किंवा रेषेअलिकडे जी मूलं जन्माला येतात, अमूक एक भाषा बोलतात, त्यांच्या त्वचेचा रंग अमूक आहे तो आपला आहे आणि त्याला आमच्यावर संपूर्ण अधिकार प्राप्त आहेत. मात्र या पलिकडे जे मूल जन्माला येते, तमूक भाषा बोलते, त्याच्या त्वचेचा रंग तमूक आहे तो परका आहे. त्याच्यात आणि आमच्यात कोणताच संबंध नाही. 
आपल्याला आश्‍चर्य वाटायला हवे की, असे विचार आणि दृष्टीकोण माणसांमध्ये कसे काय उपजले? अशा विचारांना माणसाने आपल्या मनामध्ये कसा काय थारा दिला? माणसाच्या बुद्धी आणि आत्म्याने हे भेद कसे काय स्विकारले? नव्हे त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याला कशी काय मुभा दिली? साधारण बुद्धी असलेला माणूस सुद्धा समजू शकतो की, काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीयांमध्ये तशी भिन्नता तर आढळून येत नाही जशी बैल आणि घोड्यामध्ये, बकरी आणि उंटामध्ये आढळून येते व ज्या कारणांने त्यांना वेगवेगळे समजता येईल. हे काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीय हे सर्व एकाच हाडामांसाचे बनले आहेत. शरीर, बुद्धी, मन, अवयव व त्यांच्या क्षमता सर्व सारख्याच आहेत. या सर्वांची मानसिकता, भावना एक सारख्याच आहेत. यांची बलस्थाने व यांच्यातील त्रुटी यासुद्धा एकसारख्याच आहेत. यांच्यात अशी कोणतीही गोष्ट वेगळी नाही की ज्या आधारे आपण यांना ’वेगळे’ घोषित करू शकू. यांच्यातील सर्व गोष्टी समान आहेत. म्हणूनच ते सर्व एक आहेत. येथे कुरआनचा तो आदेश लागू होतो की, पृथ्वीवरील सर्व लोक एका आई-वडिलांची लेकरे आहेत. मग ते काळे असो का गोरे, अरबी असो का अरबेत्तर त्यांच्यातील वंश, कबिले आणि राष्ट्रीयत्वात्वर आधारित विभाजन फक्त त्यांना ओळखण्यापुरते आहे त्यापेक्षा अधिक नाही. 
या दोन मुलभूत शिकवणी वहदत-ए-इलाह आणि वहदत-ए-इन्सानचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जगात अनेक प्रेषित आले. इस्लाम कुठलाही नवीन धर्म नाही. कुरआन हा नवीन ग्रंथ नाही की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही अशी नवीन शिकवण जगाला दिलेली नाही, जी की, त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांपेक्षा वेगळी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची शिकवण ही ईतर प्रेषितांची शिकवणच आहे. फक्त त्याचे आधुनिक नाव इस्लाम आहे. आणि या शिकवणीच्या शेवटच्या ग्रंथाचे नाव कुरआन आहे. जगातील प्रत्येक बुद्धीवादी ज्याने हा ग्रंथ समजून वाचला तो या सत्यावर ठाम आहे की, हा ग्रंथ माणसां-माणसांमध्ये भेद करत नाही. समस्त मानवजात एक आहे. हाच दृष्टीकोण जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांसंबंधी आहे. (संदर्भ ः रूदाद भाग क्र. 5 पान क्र. 21 - 22 वर आधारित)

- एम.आय. शेख 
9764000737

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पत्नी आदरणीय आयशा (र.) यांनी पैगंबरांना विचारले, ‘‘हे पैगंबर (स.), उहुदच्या प्रसंगापेक्षाही भयंकर प्रसंग कधी आपण अनुभवला?’’ 
पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘हो, आयशा! माझ्या जीवनातील सर्वांत कठीण प्रसंग उकबा ताइफ) च्या दिवशीचा होता.’’ हा तो दिवस होता जेव्हा पैगंबर (स.) मक्कावासीयांकडून निराश होऊन  ताइफवासीयांकडे सत्याचा संदेश देण्यासाठी गेले होते. तेथील सरदार ‘अब्द या लैल’ने गुंडांना पैगंबरांच्या मागे लावले आणि त्यांनी सदुपयदेशाच्या प्रत्युत्तरात पैगंबरांवर दगडांचा वर्षाव  केला. पैगंबर (स.) रक्तबंबाळ झाले व बेशुद्ध होऊन कोसळले. मग अत्यंत निराश व दु:खी अवस्थेत तेथून परत निघाले. जेव्हा कर्नुस्सआलिब या ठिकाणी पोहचले तेव्हा दु:ख थोडे  हलके झाले. अल्लाहने प्रकोपाच्या फरिश्त्याला पैगंबरांच्या सेवेत पाठविले. तो फरिश्ता पैगंबरांना म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर (स.)! जर तुम्ही म्हणाल तर मी अबू कुबैस आणि  जबले अहमद या दोन पर्वतांना एक दुसऱ्यावर आदळतो जेणेकरून या दोन पर्वतांमधील हे अत्याचारी लोक छिन्नविच्छिन्न होऊन नष्ट व्हावेत.’’ क्षमामूर्ती पैगंबर (स.) उत्तरले, ‘‘नाही,  कदापि नाही! मला माझे कार्य करू द्या, मला या माझ्या भावंडांना ईश-प्रकोपापासून सावध करू द्या, कदाचित अल्लाह त्यांना सद्बुद्धी देईल अथवा यांच्या संततीमधून असे लोक  उपजतील जे सत्याचा स्वीकार करतील.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
पैगंबर मुहम्मद (स.) यांची क्षमाशीलता शब्दाच्या पलीकडची आहे. तिचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ते केवळ क्षमामूर्ती होते. स्वत:वर अपकार करणाऱ्यांवर त्यांनी उपकारच  केले. विष पाजणाऱ्यांनाही त्यांनी प्रेम दिले. ठार करायला आलेल्यांना प्राणदान व दया शिकविली. ताइफवासीयांकडून पैगंबरांची झालेली दयनीय अवस्था पाहून कोणी म्हणेल की अशा  असहाय परिस्थितीत ते क्षमा न करतील तर काय? पण आता हा चक्क पर्वतराज, फरिश्ताच त्याच्या समोर उभा आहे आणि या ताइफच्या अत्याचाऱ्यांना चिरडून टाकण्याची आज्ञा  मागत आहे! तरीही पैगंबर (स.) अशा रक्तबंबाळ अवस्थेतही ताइफवासीयांना क्षमा करत आहेत. किती महान आहे ही क्षमा! या क्षमेचे फळ? तेही तेवढेच महान आहे! आज त्या  ताइफवाल्या गुंडांची, सरदारांची मुलेबाळे, संपूर्ण ताइफवासी पैगंबरांवर जीवापार प्रेम करणारे मुस्लिम आहेत. ही क्षमाशीलता अंगीकारल्याशिवाय कोणी पैगंबरांचा खरा अनुयायी होऊ  शकत नाही. समस्त मानवजातीसंबंधी निखालस प्रेम, आपुलकी असल्याशिवाय हे शक्य नाही. क्षमाशीलतेचा हा पैगंबरी गुण त्यांच्या सर्व अनुयायांनी अंगीकारल्यास निश्चितच चित्र  बदलेल. 
‘‘सलाम उस पर के जिसने खूँ के प्यासों को कबाएँ दीं।
सलाम उस पर के जिसने गालियाँ खाकर दुआएँ दीं!’’

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही स्त्रीयांशी फक्त त्यांचे सौंदर्य पाहूनच विवाह करू नका, शक्य आहे की त्यांचे सौंदर्य त्यांचा विनाश करील. तद्वतच केवळ त्यांची संपत्ती पाहूनही  त्यांच्याशी विवाह करू नका. शक्य आहे की संपत्तीमुळे त्यांनी तुमची अवज्ञा करावी. खासकरून जेव्हा तुमच्या व तिच्या आर्थिक परिस्थितीत खूप तफावत असेल तेव्हा अवज्ञेची दाट  शक्यता असते. – तुम्ही (दीन) चारित्र्यालाच प्राधान्य देऊन त्यांच्याशी विवाह करा. एक काळीसावळी, मोलमजुरी करणारी मात्र चारित्र्यसंपन्न स्त्री (अल्लाहच्या नजरेत त्या रूपवान व  धनाढ्य स्त्रीपेक्षा) बेहतर आहे.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा म्हटले की, ‘‘सहसा चार बाबींचा विचार करून स्त्रीयांशी विवाह केला जातो.
(१) तिची संपत्ती पाहून, 
(२) तिचे खानदान, कुळाचे श्रेष्ठत्व पाहून,
(३) तिचे सौंदर्य पाहून आणि 
(४) तिची (दीनदारी) चारित्र्यसंपन्नता पाहून.
तुम्ही हे सदैव ध्यानात ठेवा की तिच्या चारित्र्यसंपन्नतेलाच प्राधान्य द्यावे.’’
(इब्ने माजा, दारमी, अबू दाऊद)

निरुपण
विवाह करताना बहुतांशी लोक फक्त सौंदर्य आणि संपत्तीलाच प्राधान्य देतात. आचारविचार, चारित्र्यसंपन्नतेला हवे तेवढे महत्त्व देत नाहीत. वैवाहिक जीवनाच्या खNया सुखसमाधानासाठी सौंदर्यापेक्षा व संपत्तीपेक्षा चारित्र्यसंपन्नताच अधिक महत्त्वाची आहे. मानवी जीवनात शीलाला जे महत्त्व आहे ते सौंदर्याला व संपत्तीला कदापि नाही. म्हणूनच आपल्या जीवनाच्या साथीदाराला निवडताना चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देण्यासंबंधी पैगंबरांनी उपदेश केला आहे. हा उपदेश केवळ मुलगी पसंत करतानाच नव्हे तर मुलगा पसंत  करतानाही महत्त्वाचा आहे. निव्वळ सौंदर्य व संपत्ती पाहून करण्यात आलेले विवाह अनेकदा मोकळीस येतात आणि पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
आचारविचारांना, चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देणे हेच माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. जे लोक शीलतेकडे दुर्लक्ष करून केवळ संपत्ती व सौंदर्याच्या मागे धावतात त्यांना खरे  वैवाहिक सुखसमाधान कदापि लाभू शकत नाही. सद्य अनुभव असा आहे की लोक म्हणतात आमच्या मुलाला स्थळ पाहा. ‘अट काय?’ अशी विचारणा केल्यावर त्यांची पहिली डिमांड असते की मुलगी गोरीपान, सुंदर हवी! आणि वर हुंडा भरपूर हवा. खरे पाहता, या दोन्ही गोष्टी चारित्र्यासमोर गौण आहेत. हुंडा घेणे देणे तर चक्क हराम आहे. पैगंबरांच्या उपरोक्त  उपदेशाचा सारांश हा आहे की एकाधी काळीसावळी मात्र शीलवान, चारित्र्यसंपन्न मुलगी एखाद्या रूपवान, गोऱ्यापान, धनाढ्य व चंगळवादी विचारसरणीच्या मुलीपेक्षा केव्हाही बेहतर आहे.

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget