Latest Post

वर्तमान जगतातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिताग्रस्त आहे. यामुळे लिग संतुलन बिघडले आहे. मुले जास्त व मुली कमी होत चालल्या आहेत. परिणामतः समाजावर अत्यंत वाईट दुःष्परिणाम होत आहेत. समाजातील विचारवंत चिताग्रस्त असून या दुर्गुणापासून वाचण्याचा उपाय शोधत आहेत. स्वयंसेवी संघटना देखील प्रयत्न करीत असून आपल्या कुवतीनुसार उपाययोजना करीत आहेत. शासकीय स्तरावर याला थोपविण्याकरीता कायदे बनविले गेले आहेत. यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद असून देखील या समस्येचा अंत दृष्टीक्षेपात नाही. ईश निर्मित निसर्ग व्यवस्थेमधील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या गडबडीचे व असंतुलनाचे दुःष्परिणाम मानवाला भोगावेच लागत आहेत.
सर्वप्रथम वाढत्या लोकसंख्येला मुख्य समस्या म्हणून पुढे केले गेले व याच्या निवारणाकरीता ‘‘कुटुंब नियोजन’’ व इतर योजना मांडल्या गेल्या, जन्म नियंत्रणाचे कायदे बनविले गेले. पुढे मागे मग गर्भलिग निर्धारणाचे प्रयत्न व्हायला लागले. विभिन्न उपकरणांद्वारे मातेच्या उदरामधील भ्रूणाचे लिग माहिती करून घेण्याचे प्रयत्न होत असून स्त्री गर्भ असल्यास गर्भपात करविले जात आहेत.
फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हीच परिस्थिती आहे. याचमुळे जागतिक स्तरावर या समस्येविषयी चिता व्यक्त केली जात असून उपाय सुचविले जात आहेत.
जगभरात एकूण लोकसंख्येमध्ये मुलींची व मुलांची सरासरी १००:१०७ आहे. फ्रांसमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेमोग्राफिक स्टडीज तर्फे आयोजित ऑक्टोबर २००५ मधील सर्वेक्षणानुसार चीनमध्ये सरासरी १०० मुली व १३४ मुले आहेत. हे असेच चालू राहिले तर २०१५ ते २०३० च्या दरम्यान अडीच कोटी नवयुवकांना पत्नी मिळणे अशक्य होईल अशी आशंकाही यामध्ये व्यक्त केली गेली आहे. संन्हुआ संवाद समितीच्या माहितीनुसार सन २००३ मध्ये (चीन) देशातील २४ परगण्यांमध्ये ‘‘राष्ट्रीय लोकसंख्या व कुटुंब नियोजन आयोगा’’ द्वारे ही स्थिती सुधारण्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प राबविला गेला. या योजने अंतर्गत निव्वळ मुली असलेल्या कुटुंबाला रोख रकमेव्यतिरिक्त इतर सामाजिक फायदे पुरविण्याची तरतूद आहे. मागील तीन वर्षापासून या प्रकल्पाअंतर्गत मुली व मुले यांच्यातील तफावत १००:१३३.८ पासून १००:११९.६ पर्यंत घटविण्याचे लक्ष्य ठरविले गेले आहे. हा प्रकल्प आता सर्व राज्यांमध्ये व विभागांमध्ये राबवायची योजना आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ उर्दु १८ ऑगस्ट २००६)
भारतामध्ये दर १० वर्षानी लोकसंख्या मोजली जाते. इ. सन २००१ मध्ये लोकसंख्येने एकशे दोन कोटी सत्तर लाख पंधरा हजार (१,०२,७०,१५,०००) ची संख्या पार केली. यामध्ये एकूण ५३,१२,७७,००० पुरुष व ४९,५७,३९,००० महिला होत्या अशी माहिती दिली गेली. अर्थात १०० पुरुषांच्या तुलनेने ९३ स्त्रीया आहे. इ. सन १९९१ मधील लोकसंख्या सर्वेक्षणाच्या तुलनेने हे अंतर जास्त आहे. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ७ सप्टेंबर २००६)
देशामधील कित्येक राज्यांमध्ये मुलामुलींमधील ही तफावत खूपच जास्त आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेश उल्लेखणीय आहेत. या राज्यांमध्ये १००० मुलांमागे ८०० ते ९०० मुली आहेत. १९९१ च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये १००० मुलांमागे ८७५ मुली होत्या आणि २००१ मध्ये ती तफावत ७९३ वर पोहोचली. याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये १९९१ च्या जनगणनेनुसार १००० मुलांमागे ९४८ मुली होत्या तर २००१ मध्ये ९१७. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ २९ मे २००६)
मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. मुलांच्या तुलनेने मुलींना कनिष्ठ समजले जाते. त्यांच्या अस्तित्वाला माता पिता स्वतःवरील ओझे समजतात. त्यांचे पालन पोषण, त्यांची सुरक्षा, विवाहाबाबतीच्या अडीअडचणी इ. त्यांच्या (पालकां) करिता एक ओझे बनून जाते. या व्यतिरिक्त मुलींच्या बाबतीत अशा नाजुक आणि गंभीर समस्या उभ्या रहात आहेत की, मुलीला जन्माला न घालणेच बरे असे आईवडलांना वाटते.
अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझेच समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका रहात असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळी मध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारु त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे.
‘‘आणि त्यांपैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खूषखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळिमा पसरतो आणि तो रक्ताचा घोट गिळून बसतो. लोकांपासून लपतछपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवायचे, विचार करतो की, अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीमध्ये गाडावे? पहा कसे वाईट निर्णय घेत आहेत.’’ (कुरआन १६ : ५८, ५९)
मुलीपासून सुटका होण्याकरिता इस्लाम पूर्व अरबी टोळ्यांमध्ये काही अमानवी प्रथा खालील प्रमाणे होत्या.
 1. ‘‘प्रसुती समयीच एक खड्डा खोदला जात असे. जर मुलगी जन्मली तर जन्मानंतर त्वरीतच तिला गाडून टाकण्यात येत असे.’’ (इब्ने अब्बास)
 2. ‘‘मुलीला जन्मानंतर लगेचच मारून टाकुन कुत्र्यासमोर टाकले जाई.’’ (कतादा)
 3. डोंगरकड्यावरुन खाली फेकुन दिले जाई.
 4. पाण्यामध्ये बुडविले जात असे.
 5. गळ्यावरुन सुरी फिरवली जात असे.
 6. थोडी मोठी झाल्यानंतर साज शृंगारासहित वाळवंटामध्ये नेऊन एका खोल खड्ड्यामध्ये ढकलूनदेऊन वरुन माती ढकलली जात असे. (तफसी कबीर)
आजही वेगळी परिस्थिती नाही. जैसलमेर (राजस्थान) मधील ‘‘देवडा’’ या गांवाबद्दल प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये हे नमुद केले गेले आहे की, तेथे मागील १०० वर्षामध्ये एकाही मुलीचे लग्न झालेले नाही. जन्मतःच त्यांना मारुन टाकले जात आहे. कधी कधी तर हे काम जन्मदाती आईच करीत असे. मातेच्या दूधाबरोबरच नवजात मुलीला अफू चारली जाते. अथवा नाकावर वाळू भरलेली पिशवी ठेवली जाते किवा नाका तोंडामध्ये वाळू भरली जाते. गोधडी अथवा उशी चेहऱ्यावर टाकून ठेवली जाते जेणेकरून श्वास बंद पडावा नाहीतर तोंडामध्ये मिठाचा तोबारा भरला जातो. (‘‘राष्ट्रीय सहारा’’ ९ सप्टेंबर २००६)
स्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिग करुन मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याच साठी १९९४ मध्ये एक कायदा बनविला गेला होता. Natal Diagnostic Technique Regulation & Prevention of Misuse Act. या कायद्यान्वये गर्भलिग निदान गुन्हा ठरविला गेला असून देखील दरवर्षी ५ ते ७ लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते. (‘‘राष्ट्रीय सहारा’’, ६ जून २००६)
अशा Fertility Centres वर वेळोवेळी छापे घातले जात आहे. हे कार्य करणाऱ्या डॉक्टरांना अटक केली जाते, त्यांच्या विरुद्ध खटले चालतात आणि त्यांना शिक्षा देखील दिली जाते. तरी देखील या सामाजिक कुकर्माला थोपविणे तर दूरच उलट त्याचा प्रसार व फैलाव देखील थांबविता आला नाही.
इस्लामी उपाय
इस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो, व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या ज्या कारणांमुळे अथवा आशंकांमुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालन पोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे खूपच उत्तमप्रद सिद्ध झाले आहे.
सर्व प्रथम जनसामान्यांची मानसिकता तयार करण्याचे काम इस्लामने केले. कारण कुठलाही कायदा तोपर्यंत प्रभावशाली होत नाही जोवर जनसामान्य त्याला जुमानित नाही किवा जोवर त्याच्या गुणधर्मांचे आकलन होत नाही. तसेच न जुमानल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव त्यांना होत नाही.
इस्लामने प्रतिपादन केले की हे एक शैतानी कृत्य आहे. ‘‘आणि अशाच प्रकारे कित्येक बहूदेववादीसाठी त्यांच्या भागिदारांनी (कल्पित देवांनी) त्यांच्या संतानाच्या हत्येला आकर्षक बनविले आहे, जेणे करून त्यांना विनाशात टाकावे व त्याकरीता त्यांचा धर्म धूसर बनवून टाकावा.’’ (कुरआन ६ : १३७)
‘‘खचित नुकसानीमध्ये आहेत ते लोक ज्यांनी अज्ञान व मुर्खपणाखातीर आपल्या मुलांना ठार केले.’’ (कुरआन ६ : १४०)
काही अरबी टोळ्या मुलींना आर्थिक लचांड समजून त्यांना मारुन टाकत असत. कारण मुले मोठी झाल्यानंतर कामामध्ये मदत करतील परंतु मुली काहीच कामाच्या नसतात.
कुरआनने स्पष्ट केले की उपजीविकेच्या किल्ल्या अल्लाहच्या हाती आहेत. या धरतीवरील सर्व सजीवांच्या उपजीविकेची जबाबदारी ईश्वराने घेतली आहे. सशक्त असो वा अशक्त, धष्टपुष्ट असो वा अपंग, स्वतः उपजीविकेकरिता धावपळ करीत असो वा दुसऱ्यावर निर्भर असो, सर्वांना भाकरी मिळते ती अल्लाह (ईश्वरा) च्या आज्ञा व मर्जीनेच.
‘‘आणि आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार मारु नका, आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील (देतो).’’ (कुरआन ६ : १५१)
‘‘आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार करु नका. आम्ही त्यांनादेखील उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा. वस्तुतः त्यांची हत्या करणे एक मोठा अपराध आहे.’’ (कुरआन १७ : ३१)
इस्लाम मध्ये मुलींची हत्या त्या अपराधांमध्ये गणली जाते ज्यांना अल्लाह व त्याच्या प्रेषितांनी अवैध ठरविले आहे.
‘‘अल्लाहने तुम्हांकरिता अवैध ठरविले आहे, मातापित्यांची अवज्ञा, मुलींना जिवंत गाडून टाकणे व वायफळ खर्च करणे.’’ (मुस्लिम)
मुलींच्या हत्येला त्या घृणित कार्यांमध्ये समाविष्ट केले आहे ज्याबाबत परलोकामध्ये प्रश्नोत्तरे होतील.
‘‘आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली?’’ (कुरआन ८१ : ८,९)
संततीची हत्या न करण्याची प्रतिज्ञा
ईश्वराचे दूत आदरणीय मुहम्मद साहेब आपल्या अनुयायाकडून ज्या ज्या गोष्टींचे वचन घेत असत त्यामध्ये संततीची हत्या न करण्याचे देखील कलम होते. हुदैबिया येथील तहानंतर ते मक्का विजयापूर्वीपर्यंत अनेक महिला मक्केहून स्थलांतर करुन मदिना पोहोचल्या. ईश्वराने आपल्या प्रेषितांना त्यांकडून वचन घेण्याचा आदेश दिला.
‘‘हे नबी (स.) जेव्हा श्रद्धावंत स्त्रिया तुम्हाजवळ बैअत (प्रतिज्ञा) करण्याकरिता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की अल्लाहबरोबर कुठल्याही वस्तूला सामील करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, आपल्या संततीची हत्या करणार नाही, आपल्या हातापायासमोर कोणतेही कुभांड रचणार नाही आणि कुठल्याही चांगल्या कामामध्ये तुमची अवज्ञा करणार नाही, तर त्यांच्याकडून बैअत (प्रतिज्ञा) घ्या, आणि त्यांच्या बाबतीत अल्लाहजवळ क्षमेची प्रार्थना करा. निःसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे.’’ (कुरआन ६० : १२)
असेच वचन व प्रतिज्ञा प्रेषितांनी पुरुषांकडूनही घेतल्या, मदिनेला स्थलांतरापूर्वी ज्या ज्या नशीबवान लोकांनी ईशदूताच्या हातावर प्रतिज्ञा केली होती त्यामध्ये आदरणीय उबादा बिन सामित (रजि.) होते. ते कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले,
‘‘माझ्या जवळ या गोष्टींची प्रतिज्ञा करा की, अल्लाहच्या बरोबरीने इतर कोणालाही सम्मिलीत करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही आणि आपल्या संततीची हत्या करणार नाही.’’ (बुखारी)
मुलीचे अस्तित्व पुरुषाकरिता संकट अथवा झंझट आहे हे इस्लामला मान्य तर नाहीच उलट त्याने मुलीला स्वर्गप्राप्तीचे साधन ठरविले आहे.
आदरणीय अनस बिन मालिक (रजि.) उल्लेख करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांनी सांगितले की, ‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलीचे पालन पोषण सज्ञान होई पर्यंत केले तो अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी माझ्या इतका जवळ राहील (हे शब्द उच्चारतांना प्रेषित (स.) नी आपली दोन बोटे जुळवून दाखवली.)’’ (मुस्लिम)
दुसऱ्या प्रेषित कथनामध्ये असे शब्द आहेत -
‘‘ज्या व्यक्तीने दोन मुलींचे पालन पोषण केले, ती व्यक्ती आणि मी स्वर्गामध्ये अशा प्रकारे प्रवेश करु (यावेळी प्रेषित (स.) नी आपल्या दोन बोटांना दर्शविले.)’’ (तिरमिजी)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) कथन करतात की, ईशदूत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले -
‘‘ज्याच्या दोन मुली असून त्या जवळ आहेत तोपर्यंत तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल, तर त्या त्याच्याकरीता स्वर्गप्राप्तीचे साधन बनतील.’’ (सुनन इब्ने-माजा)
आदरणीय उकबा बिन आमिर (रजि.) उल्लेख करतात की, प्रेषित (स.) यांचे कथन आहे की,
‘‘ज्याला कुणाला तीन मुली असून त्याने संयम बाळगला तसेच आपल्या कुवतीनुसार त्यांना खाऊ पिऊ व लेवू घातले तर ते कर्म प्रलयाच्या दिवशी नरकापासून त्याच्याकरिता ढाल बनेल.’’ (सुनन इब्ने - माजा)
प्रेषितांच्या कथनामध्ये मुलीच्या शिक्षण व प्रशिक्षणाबाबत सक्त ताकीद केली गेली आहे. आदरणीय अबूसईद अल-खुदरी (रजि.) कथन करतात की, प्रेषित (स.) नी सांगितले की,
‘‘ज्या व्यक्तीने तीन मुलींचे पालन पोषण केले, त्यांना समाज-रीत व शिष्टाचार शिकविला, त्यांचे विवाह करून दिले आणि त्यांच्याशी सद्व्यवहार करित राहीला, त्याच्याकरिता स्वर्ग आहे.’’ (अबू दाऊद)
आदरणीय इब्ने अब्बास (रजि.) उल्लेख करतात की, ईश्वराच्या प्रेषितांनी सांगितले की,
‘‘ज्याने तीन मुलींचे अथवा भगिनींचे पालन पोषण केले, त्यांना शिष्टाचार शिकविला, त्याबरोबर सहानुभूतीने वागला येथपावेतो की ईश्वराने त्यांना (मुलींना) तृप्त केले, त्याच्या करीता ईश्वराने स्वर्ग अनिवार्य केला आहे.’’
कथन करणाऱ्यांनी नमूद केले आहे की, हे सर्व ऐकून एकाने विचारले ‘‘हे प्रेषित (स.) जर एखाद्याला दोनच मुली अथवा भगिनी असतील आणि तो असाच त्यांच्याशी वागला तर...?’’ प्रेषित (स.) नी सांगितले ‘‘त्याच्यासाठी देखील हेच प्रतिफल आहे.’’
कथनकर्ता खाली हे देखील नमूद करतो की, जर उपस्थितांपैकी एखाद्याने एका मुलीबरोबर अथवा एका बहिणीबरोबर सद्व्यवहाराबद्दल विचारले असले तर प्रेषित (स.) नी हेच उत्तर दिले असते. (शरह-अल-सुन्ना)
इस्लामच्या या शिकवणी नी मुलींना समाजामध्ये इतकी प्रतिष्ठा व सन्मान दिला आहे. यापेक्षा वेगळी कल्पना केलीच जाऊ शकत नाही. ज्या समाजामध्ये मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्याठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची मदत होऊ शकते.

पाश्चिमात्य देशांप्रमाणे नारी अत्याचार, अपमान व शोषणाच्या ज्या ज्या शापांनी भारत देखील ग्रस्त आहे, त्यांमधे अत्यंत क्लेषकारक ‘‘स्त्री भ्रूणहत्या’’ होय. आश्चर्य तर हे आहे की, अमानवतेची, क्रुरतेची व अनैतिकतेची ही सद्यस्थिती आमच्या देशाची ‘विशेषता’ बनली आहे... ज्या देशाला गर्व आहे धर्मप्रधान समाजाचा, अहिसा व अध्यात्मिकतेचा व स्त्रीत्वाच्या गौरवाचा व महिमेचा!!
तसे पाहता प्राचिन इतिहासामध्ये स्त्री कौटुंबिक व सामाजिक जीवनाच्या निच्चतम श्रेणीमध्ये दृष्टीस पडते परंतु ज्ञान, विज्ञानाची प्रगती तसेच संस्कृती व सभ्यता यामधील उत्क्रांतीमुळे परिस्थितीमध्ये बदल नक्कीच घडला आहे. तरी देखील अपमान, दुर्व्यवहार, अत्याचार व शोषणाच्या काही नवीन व आधुनिक (कु) परंपरांद्वारे आमच्या संवेदनशीलतेला खुले आवाहन दिले जात आहे. कन्या वधाच्या सीमित समस्येला विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अल्ट्रा सोनोग्राफी द्वारे ‘‘गर्भ लिग चिकित्से’’ द्वारे व्यापक प्रमाणावर ‘‘स्त्रीभ्रूणहत्या’’ बनविले गेले. शैक्षणिक व आर्थिक दृष्टया पुढारलेल्या वर्गामध्ये ही प्रवृत्ती जोमाने फोफावत आहे, ही जास्त चितेची बाब आहे.
या व्यापक समस्येला थोपविण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चिता व्यक्त होऊ लागली आहे. घोषवाक्यांपासून कायदे बनविण्यापर्यंतच्या सर्व वाटा चोखाळून झाल्या आहेत. जेथ-पावेतो कायदा व प्रशासनाचा प्रश्न आहे तेथे तर विटंबनाच ही आहे की, अपराध तीव्रगतीने पुढे पुढे जात असून कायदा व प्रशासन हळूहळू व तेही अंतर राखून चालले आहे. स्त्री मुक्ती आंदोलने अधुन मधुन चिता व्यक्त करीत असली तरी नाईटक्लब संस्कृती, सौंदर्य प्रतियोगिता संस्कृती, कॅटवॉक संस्कृती, पब संस्कृती, कॉलगर्ल संस्कृती, वॅलेन्टाईन संस्कृती, आधुनिक तसेच अतिआधुनिक संस्कृती मधील अनिर्बंध स्वैराचार, या सर्वांबाबत आणि (अमूल्य अशा मानवाधिकारांचा हवाला देवून) विकास व प्रगती बाबत जो उत्साह दाखविला जातो त्यांच्या तुलनेने स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्याबाबत कमी तत्परता दाखविली जाते.
काही वर्षांपूर्वी (मानव अधिकारांविषयी आयोजित) एका मुस्लिम सम्मेलनामध्ये बोलताना एका प्रसिद्ध व प्रमुख एन.जी.ओ. (बिगर शासकीय सेवा भावी संस्था) च्या विभागीय (महिला) सचीव उद्गारल्या की ‘‘देशातील पुरुष-स्त्री प्रमाणातील तफावत वाढत चालली आहे (१००० : ९७० ते १००० : ८४०). तरी देखील तुलनेने इतर समाजापेक्षा मुस्लिमांमध्ये ती तफावत नगण्य आहे. मी मुस्लिम समाजाला विनंती करते की, त्यांनी याबाबतीत इतर समाजाचे व राष्ट्राचे मार्गदर्शन व मदत करावी.
वर उल्लेखित लिग असंतुलनाबाबत एकाबाजूने हीच चिंता आमचे समाजधूरीण व्यक्त करीत असतात. दूसरीकडे प्रकर्षाने ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की, इतर समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. या परिस्थितीची कारणे व कारण घटक तुलनात्मक विश्लेषणानंतरच स्पष्ट होऊ शकतील. मुस्लिम समाजात सून पेटविली जात नाही, बलात्कार करून हत्या होत नाही, आईबापाच्या खांद्यावरून हुंडा व लग्नाच्या खर्चाच ओझ दूर करण्यासाठी मुली येथे आत्महत्या करीत नाहीत. पत्नीशी पटत नसेल तर सुटका करून घेण्यासाठी ‘हत्ये’ ऐवजी ‘तलाक’ चा विकल्प आहे. या उप्पर स्त्री भ्रूणहत्येचा शाप मुस्लिम समाजामध्ये नाही.
वस्तुतः भारतीय मुस्लिम समाज पूर्णपणे एतद्देशीय असून भारतीय समाजाचे एक अंग आहे. येथील उपजत परंपरा व रीतिरिवाजां मधील निरंतर सहजीवन व देवाण घेवाणी मुळे मुस्लिम समाजावर प्रभाव पडला आहे व यामुळे तो स्वतःला आदर्श इस्लामी समाज बनवू शकला नाही. खूपशा कमतरता त्यामध्ये आहेत. तरी देखील जे वैशिष्टयपूर्ण सद्गुण आढळतात त्याचे कारण इतर काही देखील नसून या समाजाच्या प्रगती व जडणघडणीमधील इस्लामचे योगदान व प्रभावशाली भूमिका हेच आहे.
१४०० वर्षांपूर्वी जेव्हा इस्लामचा प्रवेश अरब द्वीपकल्पामध्ये वाळवंटातील त्या असभ्य व निरक्षर समाजामध्ये झाला तेव्हा त्या समाजामध्ये अनैतिकता, चारित्र्यहीनता, अत्याचार, अन्याय, नग्नता व अश्लीलतेबरोबर स्त्रीजातीच्या उपमर्दाचे व कन्या हत्येचे असंख्य प्रकार प्रचलित होते. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे दैवी कार्य ही काही एक अशी ‘समाज सुधारणा मोहीम’ नव्हती तिचा प्रभाव जीवनाच्या काही अंगावर मर्यादीत कालावधी करिता पडावा व नंतर पुन्हा ‘‘येरे माझ्या मागल्या’’ व्हावे.या उलट प्रेषित (स.) चे लक्ष्य ‘संपूर्ण-परिवर्तन’ तसेच सर्वसमावेशक व स्थायी ‘क्रांती’ चे होते. याच करीता प्रेषित (स.) नी मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्यांना अलग अलग सोडविण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे कार्य केले. इस्लामच्या दृष्टीकोनातून या समस्येचा मूल बिदू सामाजिक व्यवस्था अथवा कायदा व प्रशासन नसून स्वयं ‘मानव’ आहे... अर्थात व्यक्तीचे अंतरंग, अंतरात्मा, त्याची प्रकृती व मनोवृत्ती, त्याचा स्वभाव, सद्सदविवेक बुद्धी, त्याच्या धारणा व अवधारणा, विचारसरणी, मानसिकता तसेच मनोप्रकृती होय !!
इस्लामच्या धोरणानुसार मानवाचा आपल्या निर्माणकर्त्या ईश्वराशी वास्तविक व नैसर्गिक संबंध जितका कमजोर असतो, समाजात तितके बिघाड निर्माण होतात. याचकरीता इस्लामने मानवामध्ये एकेश्वरवादाची भक्कम धारणा व पारलौकिक जीवनातील कर्मानुसार चांगला अथवा वाईट मोबदला (कर्मावर आधारित स्वर्ग अथवा नरक) मिळण्याचा अटूट विश्वास निर्माण करून पहिले पाऊल टाकले. पुढील पाऊल हे होते की, याच धारणेलाव विश्वासाला पायाभूत ठरवून समाजामध्ये सत्कर्याच्या प्रस्थापनेसाठी व संवर्धनाकरीता तसेच वाईट प्रवृत्ती व दुःष्कृत्यांचे दमन व निर्मूलनाचे कार्य करावे. इस्लामची संपूर्ण जीवन व्यवस्था याचसिद्धांतावर आधारित असून याच द्वारे कुप्रवृत्ती व दुष्कृत्यांचे निवारण होते.
कन्यावधाला समुळ नष्ट करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) नी अभियान चालविण्याऐवजी, भाषण करण्याऐवजी, आंदोलन करण्याऐवजी, कायदा-पोलीस, न्यायालय-जेल हे चालविण्याऐवजी फक्त एवढेच विधान केले, ‘‘ज्याला एक (अथवा अधिक) मुली असून तो त्यांना (प्रचलित प्रथेनुसार) जीवंतच गाडून टाकून हत्या करीत नसून, त्यांचे प्रेमाने व आपुलकीने पालनपोषण करील, त्यांना (सत्कर्म, शालीनता, सदाचारण व ईशपरायणतेचे) उत्तम ज्ञान देईल, तसेच मुलांना त्यांच्यावर प्राधान्य देणार नाही व उत्तम वर बघुन त्यांची गृहस्थी वसवून देईल, तो पारलौकिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये माझ्या सोबत राहील.’’
पारलौकिक, जीवनावर दृढ विश्वास करणाऱ्या लोकांवर वरील संक्षिप्त शिकवणीने जादुप्रमाणे प्रभाव टाकला. ज्यांचा चेहरा मुलीच्या जन्मामुळे काळवंडत असे (कुरआन १६ : ५८) त्यांचे चेहरे या विश्वासाने उजळले की त्यांना स्वर्गप्राप्तीचे साधनच मिळाले. तद्नंतर मुलगी शाप नव्हे तर वरदान, ईश कृपा, सौभाग्य व भरभराट समजली जाऊ लागली आणि पाहता पाहता समाजाने कात टाकली.
मानवी स्वभावानुसार मानव एखादे कृत्य कधई लाभाच्या आशेने करतो, तर कधी भीती, भय व नुकसानी पासून वाचण्याकरिता करतो. मानवाच्या निर्माणकर्त्या ईश्वरा व्यतिरिक्त इतर कोण बरे मानवी प्रवृत्ती व प्रकृतीला जाणू शकेल? यास्तव कन्या हत्या करणाऱ्यांना अल्लाहने चेतावणी दिली आहे. या अजब चेतावणीची शैली अशी आहे की, अपराध्याला नव्हे तर हत्या केल्या गेलेल्या मुलींना संबोधून कुरआन मध्ये प्रश्न केला गेला आहे.
‘‘आणि जेव्हा (परलोकांत हिशोबाच्या व न्यायनिवाडाच्या दिवशी) जिवंत गाडल्या गेलेल्या मुलीला (ईश्वराकडून) विचारले जाईल, की तुझी हत्या कुठल्या अपराधापाई केली गेली.’’ (कुरआन ८१ : ८, ९)
या ऋचेनुसार कन्याहत्या करणाऱ्यांना सक्त चेतावणी दिली गेली असून सर्वोच्च व सर्वशक्तीमान न्यायाधीश अल्लाहच्या न्यायालयात कठोर शिक्षा मिळणे ठरलेले आहे. एकेश्वरवादाच्या धारणेचा व त्या अंतर्गत पारलौकिक जीवनावरील दृढविश्वासाचाच हा चमत्कार होता की मुस्लिम समाजामधून कन्याहत्येचा शाप समूळ नाहीसा झाला. गत १४०० वर्षांपासून हाच विश्वास, हीच धारणा सूप्तपणे मुस्लिम समाजामध्ये कार्यरत आहे आणि आज देखील भारतीय मुस्लिम समाज कन्याहत्येपासून दूर, सुरक्षित आहे. देशाला या शापापासून मुक्त करण्यासाठी इस्लामच्या चीरस्थायी व प्रभावशाली विकल्पाचा परिचय करुन देणे ही सद्यस्थितीची नितांत गरज आहे.

प्रेषित मुहम्मद (स) यांनी स्त्रियांना दुआ (प्रार्थना) आणि अल्लाहचे नामस्मरण व जप जपण्याचीसुद्धा ताकीद केली आहे. यसीरा बिन्ते यासिर (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘हे स्त्रियांनो ! तुम्ही ‘तसबीह’ (सुबहानल्लाह), ‘तहलील’ (ला इलाहा इल्लल्लाहु) आणि ‘तकदीस’ (सुब्बूहुन कुद्दूसुन) हा जप आवश्यक करा. बोटांच्या कांड्यावर त्यांची गणना करा. याचे कारण असे की, बोटांनादेखील विचारले जाईल व म्हणविले जाईल. नामस्मरणात निष्काळजीपणा करू नका; नाहीतर अल्लाहच्या कृपेपासून वंचित रहाल.’’ (मिश्कातुलमसाबीह किताबुद्दावात, तिर्मिजी व अबू दाऊदचे प्रमाण)
प्रेषित मुहम्मद (स) यांनी काही वेळा स्त्रियांना विशेष नामस्मरणाचासुद्धा उपदेश केला आहे. माननीय अली (र) म्हणतात की, माननीय फातिमा (र) यांच्यापाशी कोणताही सेवक नव्हता. घरचे कामकाज त्या स्वतःच करीत असत. पीठ दळल्यामुळे त्यांच्या हाताला फोड आले होते. एकदा काही गुलाम आले होते. माननीय फातिमा (र) प्रेषित मुहम्मद (स) यांना आपल्या कष्टाविषयी सांगायला व एका गुलामाची मागणी करावयास गेल्या. प्रेषित मुहम्मद (स) घरी नव्हते, म्हणून माननीय आयेशा (र) यांच्याजवळ यासंबंधी बोलून माननीय फातिमा (र) घरी निघून आल्या. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांचेजवळ माननीय फातिमा (र) यांचे आगमन आणि त्यांच्या गरजेचा उल्लेख केला. प्रेषित मुहम्मद (स) रात्री आमच्या घरी आले. आम्ही पहुडलो होतो. त्यांना पाहून आम्ही उठून बसलो. त्यांनी सांगितले, ‘‘उठू नका. पडून रहा.’’ आणि आम्हा दोघांच्यामध्ये अशा प्रकारे बसले की, त्यांचे चरणकमल माझ्या पोटाला लागले होते आणि मला त्यांचा गारवा लागत होता. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हा लोकांनी ज्या गोष्टीची मागणी केली आहे तिच्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगू काय ? ती अशी की, जेव्हा तुम्ही आपल्या अंथरुणावर जाल तेव्हा ३३ (तेहतीस) वेळा ‘सुबहानल्लाह’, ३३ वेळा ‘अलहम्दुलिल्लाह’ आणि ३४ वेळा ‘अल्लाहु अकबर’ जपत जा. हे तुमच्यासाठी सेवकापेक्षा अधिक चांगले आहे.’’ (मिश्कातुल मसाबीह, किताबुद्दावात - प्रमाण बुखारी व मुस्लिम)
एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की, या वचनांचे प्रत्येक नमाजनंतर व झोपताना पठन करीत जा. (मागील प्रमाण - मुस्लिमच्या प्रमाणाने)
माननीय फातिमा (र) यांनी सेवकाची मागणी केली आणि त्याच्या उत्तरादाखल प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना अल्लाहची ‘तसबीह’, ‘तहमीद’ व ‘तकबीर’च्या जपाचा उपदेश केला. यात या गोष्टीकडे संकेत आहे की, अल्लाहच्या नामस्मरणाने माणसाच्या बळात व कार्यशक्तीतसुद्धा वृद्धी होते.
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या एक कन्या म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांना या दुआचे शिक्षण देत असत -
‘‘मी अल्लाहचा जप आणि स्तुती करते. चांगुलपणाची शक्ती अल्लाहद्वारेच मिळू शकते. अल्लाह जे इच्छितो ते घडते आणि जे इच्छित नाही ते घडत नाही. माझा विश्वास आहे की, अल्लाह प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. आणि अल्लाहच्या ज्ञानाने प्रत्येक गोष्टीला व्यापले आहे.’’ (अबू दाऊद (किताबुल अदब))
प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की, माणसाने जर सकाळी ह्या दुआचे पठन केले, तर महान अल्लाह संध्याकाळपर्यंत व संध्याकाळी केल्यास सकाळपर्यंत त्याचे रक्षण करील.
या वचनामध्ये जो भरवसा, विश्वास आणि समर्पणाची भावना प्रकट केली गेली आहे, ती खरोखर मनात उत्पन्न झाली आणि नंतर माणसाच्या वाणीने तिची अभिव्यक्तीसुद्धा झाली, तर खात्री आहे की महान अल्लाह रात्रंदिवस त्याचे रक्षण करील.
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नी आणि दुसऱ्या स्त्रिया नित्याचे जपतप आणि अल्लाहचे नामस्मरण व अल्लाहच्या प्र्रार्थना स्तुति वगैरेंचा जो इतमाम करीत असत त्याचा अंदाज खालील दोन घटनांवरून येईल.
प्रेषित मुहम्मद (स) सकाळच्या नमाजनंतर आपल्या पत्नी उम्मुल मोमिनीन माननीय जबेरिया (र) यांच्या घरातून बाहेर गेले. त्या वेळी त्या नमाजमध्ये मग्न होत्या.
‘चाश्त’च्या नमाजनंतर जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) परतले तेव्हासुद्धा नमाजच्या त्याच ठिकाणी बसून होत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना विचारले की, ‘‘मी जाताना (अल्लाहचे नामस्मरण करीत असता) ज्या स्थितीत तुमच्यापासून गेलो होतो, अद्याप तुम्ही त्याच स्थितीत आहात काय ?’’ त्यांनी होकारार्थी उत्तरादाखल मान हलविली. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘तुमच्यापासून गेल्यापासून मी चार वचने म्हटली आहेत. परंतु ती (अर्थाच्या दृष्टीने) वजनात तुमच्या अद्यापर्यंतच्या नामस्मरणाबरोबर असतील.’’ ती वचने अशी आहेत -
‘‘मी अल्लाहचे नामस्मरण व स्तुति इतकी करतो की, त्याच्या निर्मितीची संख्या असावी, त्याच्या प्रसन्नतेइतकी, त्याच्या सिहासनाइतकी आणि त्याच्या वचनांच्या शाईइतकी.’’ (मिश्कातुल मसावीह (किताबुद्दअवात) मुस्लिमच्या प्रमाणाने)
माननीय साद बिन अबी वक्कास (र) म्हणतात की, मी प्रेषित मुहम्मद (स) समवेत एका स्त्री (बहुत करून त्या प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकीच कोणीतरी असाव्यात.) च्या घरी गेलो. त्यांनी पाहिले की, त्यांच्यासमोर बी अथवा खडे पडलेले आहेत आणि त्या त्यांच्या आधारे स्तुति - वचनांची (तस्बीहात) गणना करीत आहेत. त्यांनी सांगितले की, मी तुम्हाला तस्बीह (स्तुति - वचनांचे पठन) ची यापेक्षा सोपी व श्रेष्ठ पद्धती सांगू काय ? ती अशी की तुम्ही असे म्हणा -
‘‘मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, आकाशात अल्लाहची जितकी निर्मिती आहे. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितकी अल्लाहची निर्मिती जमिनीत आहे. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितक्या जमीन व आकाशात वस्तु आहेत. मी अल्लाहचे स्तवन करते इतके की, जितका महान अल्लाह निर्मितीला उत्पन्न करणारा आहे. अल्लाहची महानता ही त्याच्याबरोबर आणि अल्लाहचे स्तवनसुद्धा त्याच्याबरोबर.’’
मनुष्य महान अल्लाहचे जितके स्तवन व स्तुति करील कमी आहे. यात रात्रंदिवस मग्न राहिला तरीसुद्धा त्याचा हक्क अदा होऊ शकत नाही. या हदीसमध्ये अशा संख्यांचा आश्रय घेतला गेला आहे, ज्यांची सीमा व संख्या अनाकलनीय आहे, जेणेकरून मनुष्याने त्यांच्या आधारे आपल्या असीम भावनांची अभिव्यक्ती करावी.
उपासनेचे आधिक्य
काही अप्रसिद्ध महिला सहाबींनादेखील उपासनेची खूप आवड होती. माननीय उमर (र) यांच्या एका दासीचे नाव जाइदा असे होते. त्यांच्यासंबंधी उल्लेख आहे की -
‘‘त्या, त्या महिलांपैकी होत्या ज्या उपासनेच्या बाबतीत खूप कष्ट घेत होत्या. त्यांच्या या सद्गुणामुळे प्रेषित मुहम्मद (स) त्यांच्याशी आपुलकीने वागत.’’
काही महिला सहाबी इतकी उपासना करीत असत की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांना मध्यममार्गी बनण्याची व समतोल राखण्याची ताकीद दिली. माननीय आयेशा (र) म्हणतात की, त्यांच्यापाशी हौला बिन्ते तुवैत बसलेल्या होत्या. इतक्यात प्रेषित मुहम्मद (स) यांचे आगमन झाले. मी म्हणाले, ‘‘या हौला बिन्ते तुवैत आहेत. यांच्या उपासनेची मोठी चर्चा आहे. असे म्हटले जाते की, या रात्री झोपत नाहीत. नमाज पढत असतात.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी नापसंती व्यक्त केली आणि म्हणाले -
‘‘असे करू नका. तितकीच उपासना करा जितकी तुमच्यात शक्ती आहे. अल्लाहची शपथ ! महान अल्लाह (आपल्या कृपाप्रसादाने तर) कंटाळणार नाही. तुम्ही स्वतः कंटाळून जाल. अल्लाहच्या दृष्टीने तर त्याला धर्माची तीच कर्मे पसंत आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणाऱ्याने त्यात निरंतरता व नियमितपणा अवलंबावा.’’ (बुखारी)
माननीय अनस (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी एकदा पाहिले की, मस्जिदच्या दोन खांबादरम्यान दोरी बांदलेली आहे. त्यांनी विचारणा केली की, येथे ही दोरी कसली ? लोक म्हणाले की, ही माननीय जैनब (र) (बहुतकरून उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश (र)) यांची आहे. त्या रात्री नमाज पढत असतात. जेव्हा त्या थकून जातात तेव्हा याचाच आधार घेऊ लागतात. प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले -
‘‘नाही ! ही पद्धत बरोबर नाही. ही सोडा, जोपर्यंत तुमच्यापैकी कोणत्याही व्यक्तीमध्ये आल्हाद आणि ताजेतवानेपणा शिल्लक आहे तोपर्यंत त्या व्यक्तीने नमाज अदा करणे आवश्यक आहे. जेव्हा थकेल तेव्हा तिने बसावयास पाहिजे.’’ (बुखारी (किताबुत्तहज्जुद) मुस्लिम (किताबुस्सलात))
सहाबानंतरच्या म्हणजे ताबयीनच्या काळात माननीय राबिया बसरिया आपल्या उपासने व तपश्चयेंसाठी फार प्रसिद्ध होत्या. अल्लामा इब्ने खल्लकान लिहितात -
‘‘त्या आपल्या काळातील मोठ्या लोकांपैकी होत्या. सदाचार, अल्लाहचे भय आणि त्याच्या उपासनेबाबत त्यांच्या घटना प्रसिद्ध आहेत.’’
त्यांची एक सेविका म्हणते की, त्या रात्रभर नमाज पढत असत. सूर्योदयाच्या वेळी थोडावेळ मुसल्ला (नमाज पढण्यासाठी अंथरण्याचे कापड) वरच झोपत असत. जेव्हा सूर्योदय होई तेव्हा घाबरून चटकन आपल्या अंथरूणावरून असे म्हणत उठून बसत ‘‘हे आत्म्या ! किती वेळ झोपशील आणि कोठपर्यंत झोपशील ? ती वेळ लवकरच येणार आहे जेव्हा तू असा झोपशील की, अंतिम दिनीच (कियामतच्या दिवशी) उठशील.’’ त्या प्रार्थनेत म्हणत असत, ‘‘हे अल्लाह ! तू त्या हृदयाला आगीत टाकशील का की जो तुझ्यावर प्रेम करतो.’’ असे म्हटले जाते की, एके दिवशी एक अप्रत्यक्ष आवाज आला की
‘असे होणार नाही. तुम्ही आमच्या बाबतीत सुविचार ठेवला पाहिजे.’ माननीय सुफयान सूरी (र) यांनी त्यांच्याजवळ अंतिम दिनाची आठवण करून म्हटले, ‘‘अरेरे, हे दुःख आणि क्लेश !’’ त्यांनी सांगितले, ‘‘चुकीची गोष्ट सांगू नका. असे म्हणा, ‘‘अरेरे, किती दुःख कमी आहे !’ त्याला कारण असे की, खऱ्या अर्थाने तेथील परलोकीचे दुःख मिळाले, तर श्वासोच्छवास करणे कठीण होईल. (वफीयातुल आयान लिब्नि खल्लकान)
उम्मुस्सहबा मआजा बिन्ते अब्दुल्लाह यांची इब्ने हिब्बान यांनी उपासिकामध्ये गणना केली आहे. असे म्हटले जाते की, त्यांचे पति अबुस्सहबा यांच्या मृत्यूनंतर स्वतःच्या मृत्यूपर्यंत त्या कधीही अंथरुणावर झोपल्या नाहीत. त्या रात्रभर जागून उपासना करणाऱ्या महिला होत्या. त्या म्हणत असत की, ‘‘या डोळ्यांचे आश्चर्य वाटते जे झोपत असतात, की जेव्हा त्यांना माहीत आहे की, कबरीत दीर्घ निद्रेत झोपावयाचे आहे.’’ त्या आपल्या एका प्रसंगाचे वर्णन करतात की, त्यांना पोटाचा काही त्रास होत होता, म्हणून घागरीत ठेवलेल्या नबीज (सातू व खजूरपासून बनविलेले मद्य) चा उपाय म्हणून उपयोग करण्याची त्यांना सूचना केली गेली. जेव्हा त्यांच्यासमोर त्याचा पेला आणला गेला, तेव्हा त्यांनी तो पेला ठेवला व प्रार्थना केली, ‘‘हे अल्लाह ! तुला हे ज्ञात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी ही हदीस ऐकविली होती की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी नबीजचा उपयोग करण्यास मनाई केली आहे. तू मला यापासून वाचव आणि आपल्या कृपेने माझी प्रकृती चांगली कर.’’ ही प्रार्थना केल्याक्षणी पेला पालथा झाला आणि त्यांचा त्रास नाहीसा झाला. (तहजीबुत्तहजीब १२ : ४५२ येथे या गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे, कोणत्याही कर्माचे बरोबर अथवा चुकीचे असण्याचा निर्णय कुरआन व सुन्नतच्या आधारे होईल. या पुस्तकात ज्या घटनांचा उल्लेख आला आहे त्यात एखादे वेळी न्यूनाधिक्य दिसून आले तर तो पुरावा ठरणार नाही. त्यांचा उल्लेख केवळ या दृष्टीने केला गेला आहे की, प्रारंभिक काळातील स्त्रिया उपासनेच्या किती इतमाम करीत असत व अल्लाहशी त्यांचे संबंध किती दृढ होते.)

इस्लामच्या मुलभूत आधारस्तंभांपैकी एक हजसुद्धा आहे. हज विशिष्ट दिवसांत काबागृहाला जाऊन विशिष्ट विधी अदा करण्याचे नाव आहे. उमराहमध्ये जवळजवळ हजसारख्याच विधि हजच्या वेळेला सोडून इतर वेळी अदा करण्यात येतात.
हज व उमराहची मोठी महत्ता वर्णिली गेली आहे. हदीसमध्ये त्याला स्त्रियांचे धर्मयुद्ध (जिहाद) म्हटले गेले आहे. माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, ‘‘आम्हीसुद्धा तुम्हा सर्वांबरोबर धर्मयुद्धात सामील होऊ शकतो का?’’ ते म्हणाले,
‘‘तुम्हा स्त्रींयासाठी सर्वांत चांगले व सुंदर धर्मयुद्ध ‘हज्जे मबरूर’ आहे.’’ (बुखारी (किताबुल हज))
एक अन्य कथनात आहे की, माननीय आयेशा (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा केली की, ‘‘मला पवित्र कुरआनमध्ये धर्मयुद्धापेक्षा अधिक श्रेष्ठ कार्य दिसत नाही. मग आम्हीसुद्धा तुम्हांसमवेत धर्मयुद्धात (जिहाद) का सामील होऊ नये?’’ प्रेषित उत्तरले,
‘‘नाही, तुम्हा लोकांसाठी सर्वश्रेष्ठ व सुंदर धर्मयुद्ध अल्लाहच्या काबागृहाची यात्रा म्हणजे ‘हब्जे मबरूर’ होय.’’ (जी अल्लाहसाठी केली असावी.) (नसाई (किताब मनासिकिल हज))
अबू हुरैराह (र) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘वृद्ध, लहान मूल, अशक्त व स्त्रीसाठी हज व उमराह ‘जिहाद’ आहे.’’ (मागीलप्रमाणे)
माननीय अबू हुरैरा (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत त्यांच्या पवित्र पत्नींनीसुद्धा हज केला होता. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या नंतर माननीय सौदा (र) यांनी हज केला नाही. दुसऱ्या पवित्र पत्नीं हजला जात असत. (तबकाते इब्ने साद - ८ : ५५)
हज्जतुलविदाअ (प्रेषित मुहम्मद (स) यांची अंतिम हज यात्रा) मध्ये दहा हजार सहाबींनी (प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सोबत्यांनी) प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समवेत हज अदा केला होता. अंदाज येतो की यात महिला सहाबींचीसुद्धा मोठी संख्या होती. उत्साह व आवड इतक्या प्रमाणात होती की, आजारी, गर्भवती व मुले असलेल्या महिलासुद्धा यात सामील झाल्या होत्या.
जबाआ बिन्ते जुबैर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्यासमोर निवेदन केले, ‘‘मी हजचा इरादा केला आहे, परंतु मी आजारी आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘हज करा. ‘इहराम’ (साध्या पांढऱ्या चादरीचा पोषाख, जो हज यात्रेच्या काळात हाजी लोक परिधान करतात. हे लक्षात असावे की, हजच्या काळात शिवलेले कपडे नेसण्याची मनाई आहे.) असा संकल्प करून बांधा की, महान अल्लाह जेथे रोखील तेथेच ‘इहराम’ काढीन. (बुखारी (किताबुन्नकाह), मुस्लिम (किताबुल हज).
माननीय जाबिर (र) म्हणतात की, ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी हिजरी सन १० मध्ये हजची घोषणा केली. तेव्हा आम्ही सर्वजण हजसाठी रवाना झालो. जेव्हा जुलहुलैफा या ठिकाणी पोचलो तेव्हा तेथे अस्मा बिन्ते उमैस (र) यांना मुहम्मद बिन अबू बकर (र) नावाच्या पुत्राचा जन्म झाला.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, प्रेषित मुहम्मद (स) ‘रौहा’मध्ये काही स्वारांशी भेटले. त्यांच्यापैकी एका स्त्रीने मूल दाखविले आणि प्रश्न केला की, ‘‘याचा सुद्धा हज होईल का?’’ प्रेषित उत्तरले, ‘‘होय, याचासुद्धा हज होईल आणि याचे पुण्य तुम्हाला लाभेल.’’ (मुस्लिम (किताबुल हज), अब दाऊद (किताबुल मनासिक)
एक अन्सारी महिला उम्मे सिनान हज्जतुलविदाअ (प्रेषितांची अंतिम हज यात्रा) मध्ये सामील होऊ शकल्या नव्हत्या. हजहून परतल्यानतर प्रेषितांनी याचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, ‘‘आम्हा लोकांजवळ दोनच उंटिणी होत्या. एकावर माझे पति आणि माझा मुलगा हजसाठी गेले. दुसऱ्या उंटिणीकडून जमिनीला जलसिचन करण्याचे काम घेतले जात होते.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘बरे तर तुम्ही रमजानच्या महिन्यात उमराह करा. महान अल्लाह हजच्या बरोबरीचे पुण्य प्रदान करील.’’ (बुखारी (अबवाबुल उमरा), मुस्लिम (किताबुल हज)
आणखी एक महिला ज्यांचे नाव उम्मेमाकल होते, त्यासुद्धा त्यावेळी हजला जाऊ शकल्या नव्हत्या. प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यांनासुद्धा रमजान महिन्यात उमरा करावयास सांगितले. (अबू दाऊद (किताबुल मानसिक या घटनेच्या विवरणात मतभेद आहेत. पहा औतुल माबूद - २ : १५०-१५१. असे शक्य आहे की, उपरोक्त दोन्ही कथन एकाच प्रसंगासंबंधी असावेत. जास्त शक्यता अशी आहे की, हे दोन्ही वेगवेगळे प्रसंग असतील. हाफिज इब्ने हजर (र) म्हणतात की, त्या महिलेच्या आडनावात मतभेद असेल अथवा अशाच अनेक घटना घडल्या असंतील आणि हीच गोष्ट अधिक योग्य वाटते. (अल इसाबा फी तमईजिस्सहाबा - ४ : ९९)
अशा प्रकारे ज्या महिला इच्छा करूनदेखील हजला जाऊ शकल्या नव्हत्या, त्यांना प्रेषित मुहम्मद (स) यांनी उमराह करण्याची प्रेरणा दिली. हजच्या बाबतीत स्त्रियांना सवलती उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचासुद्धा आदेश दिला आहे. स्त्रिया ‘महरम’ (‘महरम’ अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याच्याशी एखाद्या स्त्रीचा विवाह निषिद्ध अथवा वर्ज्य आहे. जसे भाऊ, चुलता, मामा, आजा, पुत्र वगैरे.) शिवाय हज करू शकत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, एका माणसाने प्रेषित मुहम्मद (स) यांना सांगितले, ‘‘माझी पत्नी हजला जाऊ इच्छिते आणि मी युद्धात सामील होण्यासाठी माझे नाव नोंदले आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले ‘‘तू आपल्या पत्नीसमवेत हजला जा.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
स्त्रिया स्वतःकडूनही हज करीत असत व आवश्यक झाल्यास दुसऱ्याकडूनही करीत असत.
माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (र) म्हणतात की, जुहैना टोळीची एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स) यांना म्हणाली की, माझ्या आईने हजला जाण्याचा नवस केला होता. परंतु हज करण्यापूर्वीच तिचे देहावसान झाले. मी तिच्यातर्फे हज करू शकते काय ? प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले,
‘‘तिच्यातर्फे हज करा. जर तुमच्या आईवर कर्ज असते, तर तुम्ही ते अदा केले नसते का ? अल्लाहचेसुद्धा कर्ज अदा करा. अल्लाहचा हा जादा अधिकार आहे की, त्याचे कर्ज अदा केले जावे.’’
माननीय फजल बिन अब्बास (र) म्हतात की, खसअम टोळीच्या एका स्त्रीने प्रेषित मुहम्मद (स) यांच्या समोर आपली व्यथा व्यक्त केली,
‘‘अल्लाहने आपल्या सेवकांवर हज अनिवार्य केले आहे. ही अनिवार्यता माझ्या वडिलांवरदेखील येते. परंतु ते फार वयस्क आहेत. वाहनावर बसू शकत नाहीत. जर मी त्यांच्यातर्फे हज केले तर त्यांचा फर्ज अदा होईल का ?’’ ते म्हणाले, ‘‘होय, अदा होईल.’’ (बुखारी (अबवाबुल उमरह), मुस्लिम (किताबुल हज))
धर्माचरणात कठोरता व सक्ती नापसंत आहे. एका महिलेने हजसंबंधी असाच व्यवहार अवलंबिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी त्यास मनाई केली.
उक्बा बिन आमिर जुहनी (र) म्हणतात की, माझ्या बहिणीने नवस केले होते की, मी काबागृहाला पायी जाऊन त्याचे दर्शन घेईन. बहिणीने मला सांगितले की यासंबंधी प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे पृच्छा करावी. मी विचारणा केली तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, ‘‘याची गरज नाही.’’ त्यांनी पायीही चालावे व वाहनाचासुद्धा उपयोग करावा. (एका कथनात आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी या नवसाचे प्रायश्चित्त (करणारा) करण्यास सांगितले.)
हजच्या प्रवासाला हदीसमध्ये महान अल्लाहच्या मार्गात प्रवास म्हणून संबोधले गेले आहे आणि असेही म्हटले गेले आहे की, महान अल्लाह हाजी लोकांची प्रार्थना स्वीकारतो. म्हणून त्यांच्याकडून प्रार्थना करण्याची प्रेरणा दिली गेली आहे. एका प्रसंगी उम्मे दरदा (र) यांनी माननीय सफवान यांना विचारले की, आपली हजला जाण्याची इच्छा आहे काय? त्यांनी सांगितले, ‘‘होय’’ माननीय उम्मे दरदा (र) यांनी त्यांना विनंती केली की, ‘‘आमच्या कल्याणासाठीसुद्धा प्रार्थना करा.’’ ते अशासाठी की प्रेषित मुहम्मद (स) यांनी म्हटले आहे की,
जो मनुष्य आपल्या भावासाठी त्याच्या अपरोक्ष जी प्रार्थना करतो ती स्वीकारली जाते. त्याच्या उशाशी एक फरिश्ता (देवदूत) त्याच्या प्रार्थनेवर आमीन (असेच होवो) म्हणत असतो. आणि असे म्हणतो की, महान अल्लाहने तुमचेही असेच कल्याण करावे. माननीय सफवान म्हणतात की, मी तेथून निघालो तर माननीय अबू दरदा (र) यांच्याशी भेट झाली. त्यांनीसुद्धा प्रेषित मुहम्मद (स) यांचे असेच कथन असल्याचे सांगितले.

उपासना धर्माचा जीव आहे. ही अल्लाहशी सेवकाच्या संबंधाला प्रकट करते. उपासनेच्या इतमामाने अल्लाहशी संबंध दृढ होतो. उपासनेतील उपेक्षा आणि निष्काळजीपणा या संबंधाला अधिक निर्बल करीत जातो. या उपेक्षेला नियंत्रित केले नाही, तर हा संबंध तुटूही शकतो. प्रारंभिक काळातील पुरुषांप्रमाणे महिलावर्गातसुद्धा उपासनेची फार आवड होती. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सर्व पत्नीं या बाबतीत विशेष उल्लेखनीय होत.
उम्मुलमोमिनीन माननीय जैनब बिन्ते जहश यांच्या बाबतीत माननीय उम्मे सलमा (र) म्हणतात -
‘‘त्या एक पुण्यशील, फार अधिक उपवास करणाऱ्या आणि रात्री खूप उपासना करणाऱ्या महिला होत्या.’’ (तब्काते इब्ने साद - ८ : १०८)
माननीय आयेशा (र) म्हणतात -
‘‘मी धर्माच्या बाबतीत ईशभीरूतेत, खरेपणा, सुसंबंधात आणि दान-धर्मात त्यांच्यापेक्षा अधिक चांगली कोणतीही स्त्री पाहिली नाही.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१६)
एका प्रसंगी खुद्द प्रेषित मुहम्मद (स) यांनी सुद्धा त्यांच्या पुण्यशीलता व ईशभीरूतेची साक्ष दिली आहे. जसे त्यांनी माननीय उमर (र) यांना सांगितले -
‘‘जैनब बिन्ते जहश एक चित्त, एकाग्र व अल्लाहचे भय बाळगणाऱ्या आहेत.’’ (अल-इस्तीआब फी अस्माइल असहाब - ४ : ३१७)
नमाजचा इतमाम
उपासना प्रकारात नमाजचे फार महत्त्व आहे. त्याच्या काही अटी व शिष्टाचार आहेत. त्याकडे लक्ष दिल्याशिवाय नमाजचा हक्कही अदा होऊ शकत नाही आणि त्याचा पूर्ण लाभही घेणे शक्य नाही. या अटीपैकी एक अट अशी आहे की नमाज योग्य वेळेतच अदा केली जावी.
माननीय अनस (र) यांच्या आईने प्रेषित मुहम्मद (स) यांना विचारले की, रात्री इशाच्या नमाजपूर्वीच मला झोप येऊ लागते. (त्यामुळे नमाज जाण्याचे भय राहते.) प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘‘अनसच्या आई ! नमाज लवकर अदा करीत जा. जेव्हा रात्रीचा अंधार सर्वत्र पसरतो तेव्हा इशाची वेळ होते. त्यावेळी तुम्ही अदा करीत जा. तुम्हाला कोणतेही पाप लागणार नाही.’’ (असदुलगाबा - ५ : ४६६)
यावरून कल्पना येते की, त्या नमाजचा किती इतमाम करीत असत. त्यांना याची चिता होती की, एखादेवेळी त्यांची नमाज अवेळी होता कामा नये.
मैमून बिन मेहरान म्हणतात की, ‘‘नमाजच्या वेळी जेव्हा जेव्हा मी माननीय उम्मे दर्दा (र) यांना भेटण्यास गेलो, तेव्हा त्यांना नमाजच्याच स्थितीत पाहिले.’’ (तहजीबुल असमा वल्लुगात - २ : ३६१)
जमाअतसह (सामुदायिक) नमाजमध्ये सम्मिलित होणे
स्त्रियांनी मस्जिदमध्ये जमाअतसह नमाजमध्ये सामील होणे आवश्यक नाही. त्यांच्यासाठी अधिक श्रेयस्कर हेच आहे की, त्यांनी घरीच नमाज अदा करावी. परंतु जमाअतसह नमाज अदा करण्याचे फार मोठे लाभ आहेत. जर परिस्थिती अनुकूल असेल आणि कोणत्याही नैतिक दोषाची शंका नसेल, तर त्या मस्जिदमध्ये जाऊ शकतात. याच कारणास्तव शरीअत (इस्लामी धर्म-कायदा) ने एकीकडे त्यांना घरीच नमाज अदा करण्याची प्रेरणा दिली, तर दुसरीकडे परुषांना सांगितले की, ‘‘त्यांनी इच्छिले तर मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका.’’ माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
‘‘तुमच्यापैकी कोणालाही त्याच्या पत्नीने मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागितली तर तिला मनाई करू नये.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन या शब्दांतदेखील आलेले आहे -
‘‘मस्जिदमध्ये महिलांचा जो भाग आहे त्यापासून त्यांना रोखू नका.’’ (मुस्लिम - किताबुस्सलात)
आणखी एका कथनाचे शब्द असे आहेत,
‘‘आपल्या स्त्रियांना मस्जिदमध्ये जाण्यास मनाई करू नका; परंतु त्यांची घरेच त्यांच्यासाठी अधिक चांगली आहेत.’’ (अबू दाऊद, किताबुस्सलात)
ही परवानगी जास्त करून रात्रीच्या (इशा) व पहाटेच्या फजरच्या नमाजसंबंधी आहे. कारण असे की, हे कथन खालील शब्दांसमवेत उद्धृत केले गेले आहे.
‘‘जेव्ह तुमच्या स्त्रिया रात्री मस्जिदमध्ये जाण्याची परवानगी मागतील तेव्हा त्यांना परवानगी द्या.’’ (बुखारी, किताबुलअजान, मुस्लिम, किताबुस्सलात)
यावरून हे लक्षात येते की, प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात विशेषतः इशा आणि फजरच्या नमाजमध्ये स्त्रियांना सामील होण्याची परवानगी होती. कथनावरून हे देखील कळते की, वास्तविकतः त्या या नमाजमध्ये सामील होत असत. खाली काही कथन उद्धृत केले जात आहेत -
 1. माननीय आयेशा (र) म्हणतात -
  ‘‘प्रेषित मुहम्मद (स) हे फजरची नमाज इतक्या अंधारात अदा करीत असत की, स्त्रिया चादरी गुंडाळून आपल्या घरी परत येत असत आणि अंधारामुळे ओळखल्या जात नसत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम किताबुल मसाजिद)
 2. माननीय उम्मे सलाम (र) म्हणतात -
  ‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांच्या काळात स्त्रिया फर्ज नमाजचा सलाम फेरताच उभ्या राहत असत आणि प्रेषित मुहम्मद (स) व त्यांच्या समवेत जे पुरुष नमाज अदा करीत, ते आपल्या जागी जोपर्यंत अल्लाह इच्छील तोपर्यंत बसून राहत (जेणेकरून स्त्रियांनी मस्जिदमधून प्रथम निघून जावे) आणि जेव्हा प्रेषित मुहम्मद (स) उठत, तेव्हा ते सुद्धा उठत असत.’’ (बुखारी, किताबुल अजान, मुस्लिम, किताबुल मसाजिद)
 3. माननीय अबू कतादा अन्सारी (र) कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
  ‘‘मी नमाजसाठी उभा राहतो आणि इच्छितो की, त्यात कुरआनचे दीर्घ पठन करावे. इतक्यात एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकतो, तेव्हा नमाज संक्षिप्त करतो. ही गोष्ट चांगली वाटत नाही की, मी त्याच्या आईला त्रासात घालावे.’’ (पूर्वीचे प्रमाण)
 4. एकदा इशाच्या नमाजमध्ये असाधारण विलंब झाला. प्रेषित मुहम्मद (स) नमाज पढविण्यासाठी खोलीतून बाहेर आले नाहीत. माननीय उमर (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांना सूचना मिळावी म्हणून मोठ्या आवाजात सांगितले की, स्त्रिया व मुले झोपी गेली. हे ऐकून प्रेषित मुहम्मद (स) नमाजसाठी आले. (प्रमाण मागील)
  जैनबुस्सकफया कथन करतात की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले -
  ‘‘जेव्हा तुमच्यपैकी एखादी स्त्री इशाच्या नमाजमध्ये सामील होईल, तर तिने त्या रात्री सुगंधाचा वापर करू नये.’’ (मुस्लिम, किताबुस्सलात)
हेच कथन माननीय अबू हुरैरा (र) द्वारेदेखील झालेले आहे की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या स्त्रीने सुगंधाचा उपयोग केला असेल तिने आमच्या समवेत इशाच्या नमाजमध्ये सामील होऊ नये.’’ (प्रमाण मागील)
या कथनावरून असे कळते की, स्त्रिया इशा आणि फजरच्या नमाजसाठी मस्जिदमध्ये सुद्धा जात असत, जेणेकरून त्यांना जमाअतसमवेत नमाज अदा करता यावी. असे शक्य आहे की, या नमाजमध्ये तरुण व वयस्कर हर प्रकारच्या स्त्रिया सामील होत असाव्यात. अन्य नमाजमध्ये विशेषकरून वयस्क स्त्रिया सामील होत असाव्यात. माननीय उम्मे सलमा बिन्ते अबू हकीम म्हणतात की,
‘‘मी पाहिले की म्हाताऱ्या स्त्रिया प्रेषित मुहम्मद (स) समवेत फर्ज नमाज अदा करीत असत.’’ (अलइस्तीआब - ४ : ३१७

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget