Latest Post

नागपूर (शोधन सेवा) - ’मस्जीद तसेच मदरशांमध्ये काही तरी रहस्यमय सुरू असते. विशेषत: मदरशांमधून मुस्लिम धर्मातील मुलांवर एकांगी संस्कार केले जातात आणि त्यांना कट्टरतेकडे वळविले जाते,’ असाच समज समाजातील अनेक घटकांमध्ये आहे. परंतु वास्तविकता याउलट असून मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना इस्लाम धर्माची मूलभूत तत्त्वे तसेच इतर विषय शिकविले जातात. त्यामुळे मदरसा ही संशयास्पद कृत्यांची जागा नाही, तर ते एक प्रकारचे ज्ञानमंदिरच आहे,’ असे प्रतिपादन सैय्यद हाजी नदवी यांनी व्यक्त केले. 
’जमात-ए-इस्लामी-हिंद’ तर्फे रविवार,28 ऑक्टोबर रोजी  जाफरनगर येथील जामिआ हुसैनिया या मदरसामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी नदवी बोलत होते. यावेळी राजेंद्र सिंह, महादेव विठौले, योगेश जान बंधु, आशीष जगनीत, रूपेश सोनावाला, प्रयोग श्रीराव,  प्रा. मदावे, बोरकर, मि.बावनकुड़े ,विलास खड़से  गुरुदेव सेवा मंडल चे अध्यक्ष आदी उपस्थित होते. नदवी म्हणाले, मदरशांबाबत मुस्लिमेतर समाजात बरेचसे गैरसमज आहेत. तेथे नेमके काय सुरू असते, याबद्दल समाजातील प्रत्येकालाच जिज्ञासा असते. ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी आणि मदरशांबाबत असलेले गैरसमज दूर सारण्याच्या उद्देशाने ’मदरसा परिचय आणि चहापाणी’ या अनोख्या मोहिमेची 
सुरुवात ’जमात ए इस्लामी   
हिंद’ने सुरूवात केली आहे. मदरसा परिचयाचा हा देशातील पहिलाच प्रयोग असून, त्यासाठी नागपूरची निवड करण्यात आली. ’जमात ए इस्लामी हिंद’ने यापूर्वी ’मस्जीद परिचय’ असा उपक्रम राबविला. नागपूरसह संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविण्यात आला. आता जमाततर्फे ’मदरसा परिचय आणि चहापाणी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात मुस्लिमेतर बांधवांना मदरशांमध्ये थेट प्रवेश दिला जात आहे. तेथे नेमके काय घडते, विद्यार्थ्यांना काय शिकविले जाते, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध असतात, हे सगळे थेट बघता येणार आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक हिंदू बांधवांनी हिरिरीने सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी मदरशातील व्यवस्था आणि तेथील कार्यपद्धती जाणून घेतली. मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना पहाटेच्या (फजर) च्या नमाजापासून मशिदींमध्ये सुरू होणारे धार्मिक परिचालन, अरबी भाषेतील कुरआन पठणाचे शिक्षण, दररोज पाचवेळा, तर शुक्रवारी दुपारी अदा करण्यात येणारी सामूहिक नमाज आदींबाबत माहिती देण्यात येते. याखेरीज त्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक विषयसुद्धा शिकविले जातात. या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि कम्प्युटर प्रयोगशाळेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. 
गैरसमज दूर सारणे आवश्यक 
कार्यक्रमात सहभागी झालेले पं. वासुदेव दिवेदी म्हणाले ’मदरसा आणि मशिदींबाबत बरेच गैरसमज आहेत. सहसा येथे इतरांना प्रवेशच नसतो, अशी धारणा असल्याने येथे नेमके काय चालते, हा कुतुहलाचा विषय असतो. त्यामुळे जमाततर्फे सुरू करण्यात आलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे आणि यात सहभागी होऊन मला खरच आनंद झाला. येथील व्यवस्था आणि कार्यपद्धती बघून सगळे गैरसमज दूर झालेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमाअतचे सदस्य, मदरश्याचे शिक्षक मुफ्ती मोहम्मद साबिर, मौलाना रहमतुल्लाह , मौलाना फखरुल हसन, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना सैयद नाशीत हुसैन, मुफ्ती बिलाल अहमद, आधुनिक शिक्षाचे  शिक्षक  मोहम्मद साकिब क़ाज़ी सलीम, अब्दुल अलीम, मोहम्मद आतिफ़, कारी नौशाद, कारी सलमान, मोहम्मद राग़िब मोहम्मद सोहेल व  दीनियात चे  शिक्षक हाजी अशफ़ाक, मौलाना मुदस्सिर, माज़ अहमद,  कारी इसहाक अहमद यांनी परिश्रम घेतले. हाफ़िज़ शाकिरुल अकरम फ़लाही यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांच्या प्रश्नांची  उत्तर दिले.

प्रेषितांचे जीवन हे समस्त मानवकल्याणासाठी मार्गदर्शक आहे़ जेव्हा मी हा ग्रंथ वाचायला सुरूवात केली तेव्हा माझ्या अंगावर शहारे येत होते़ मुहम्मद पैगंबरांची एक-एक वचने मनाला भावत होती़  त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन मला विचार करायला प्रेरित करीत होते़ साहित्यीक, चळवळीतले कार्यकर्ते, लेखक, प्रबोधक, इतिहासाचे अभ्यासक, राजकारणी, सामान्य नागरिकांनी देखील पैगंबरांचे चरित्र वाचायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ़ जयसिंगराव पवार यांनी केले़
  सोलापूर येथील अॅड़ गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे फडकुले सभागृहात आयोजित  ‘प्रेषित मुहम्मद (सल्ल.) नवयुगाचे प्रणेते’ या ग्रंथाच्या शानदार प्रकाशन समारंभात शनिवारी ते बोलत होते़ 
मंचावर उस्मानाबाचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, ग्रंथाचे लेखक इफ्तेखार अहमद, लिंगायत धर्म अभ्यासक चन्नवीर मठ, मायबोली प्रकाशन मुंबईचे संचालक सलीम खान, गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरचे अध्यक्ष समिउल्ला शेख आदी उपस्थित होते़ 
  पुढे बोलताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, इफ्तेखार अहमद यांनी ‘प्रेषित मुहम्मद (स.) नवयुगाचे प्रणेते’ हा ग्रंथ सरळ, सोप्या आणि उत्तम मराठीत लिहिल्याने मराठीजणांना नक्कीच समजायला सोपे जाईल. प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत शेजाऱ्याचा हक्क सांगताना ते म्हणाले होते, शेजारी जर उपाशी झोपत असेल आणि तुम्ही (मुस्लिम) जर पोटभर जेवत असाल तर ते इस्लामला मान्य नाही़ जर तुमच्या घरात पंचपक्वानाच अन्न शिजत असेल तर त्याचा सुवास दरवळू नये याची काळजी घ्यावी आणि जर तुम्ही फळे अथवा अन्य खाद्य पदार्थ आणून खात असाल तर त्याची सालपटे रस्त्यावर फेकू नका. यामुळे येणारे जाणारे व आजूबाजूच्या गरीब लेकरांत अशी फळे खाण्याची इच्छा होईल आणि त्यांना ते जर नाही मिळाले तर ते नाराज होतील़ त्यामुळे एक तर त्यांना आपले अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचवा . ते देणे होत नसेल तर कमीत कमी ते खाऊन राहिलेली सालपटं रस्त्यावर फेकू नका़ त्यांच हे उदात्त मानवीय दृष्टीकोण मला फार आवडला असल्याचेही डॉ़ पवार म्हणाले़ प्रेषितांचं चरित्र वाचल्यानंतर मी तर त्यांच्या प्रेमातच पडलो असल्याचेही डॉ़ पवार म्हणाले़
यावेळी उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील म्हणाले, इफ्तेखार अहमद हे माझे मित्र असून, अत्यंत साधेपणा व उच्च विचाराची ही व्यक्ती आहे़  यांनी दीर्घ संशोधनानंतर हा ग्रंथ लिहिला असून,  वाचनाऱ्याशी हा ग्रंथ संवाद साधत असल्यासारखे वाटतो़ यात भावानुवाद दडला आहे. तो प्रत्येकाला जमत नाही़ मात्र इफ्तेखार अहमद यांनी हे पुस्तक रेखाटताना फार खबरदारी घेतली असल्याचेही ते म्हणाले़ सत्य साहित्याचा आत्मा आहे़ आज मोठ्या प्रमाणात इतिहासाचे विकृतीकरण होत चालले आहे़ प्रत्येक जण आपल्या विचारानुसार इतिहासाला कलाटणी देतोय इतिहास लेखकांनी त्यात स्वत:चे कधी मत मांडायचे नाही, असे सांगत नव्या पिढीला इतिहास माहित नसल्याने दोन समाजात दुरावा निर्माण होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली़ 
कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने झाली़ प्रास्ताविक सरफराज अहमद यांनी केले़ यावेळी त्यांनी या ग्रंथातील मांडणी, संदर्भ व गरज याचे सविस्तर वर्णन केले. 
या पुस्तकाचे लेखक इफ्तेखार अहमद म्हणाले की, प्रेषितांची शिकवण आणि कुरआनचं मार्गदर्शन हे फक्त मुस्लिमांसाठीच नसून ते समस्त मानवजातीकरिता आहे़ आम्हाला हे वारसामध्ये भेटले असून, हा पैगाम सर्वांपर्यंत पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे़ हाच उद्देश हा ग्रंथ लिहिण्यामागचा आहे़ कुरआनचं भाषांतर, प्रेषितांचं जीवन चरित्र बऱ्याच भाषेत झाले आहे़ मात्र मराठीत ते मोठ्या प्रमाणात झालं नाही़ समस्त मराठीभाषिकांना प्रेषितांचं जीवन कळण्यासाठी समजेल अशा मराठीभाषेत हे लिहिल आहे़ सर्वात पहिल्यांदा अनुवाद मीरमुहम्मद याकुब यांनी केला होता़ त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी फंड जमा करून मूळ अरबीतून कुरआनचं भाषांतर मराठीत करून घेतलं.  यानंतर जमाअते इस्लामी हिंदच्या इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टनंही कुरआनचं मराठीत अनुवाद केला आहे़ साने गुरूजी, मुन्शी अमीनोद्दीन यांनी देखील मराठीत अनुवाद केला मात्र ते पुरेसे झाले नाही़ मात्र हा ग्रंथ अकॅडमीक आणि सुलभ आहे. जे की प्रत्येकाला समजेल. दीर्घ अभ्यासाअंती, संशोधनानंतर हा ग्रंथ तयार झाला आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले असून, प्रत्येकाने एकदातरी हा ग्रंथ वाचावा, असेही ते म्हणाले.   यानंतर मायबोली प्रकाशनचे सलीम खान यांचंही समयोचित भाषण झालं. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन साहिल शेख यांनी केले़  आभार संघर्ष खंडागळे यांनी मानले़   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. गाजीयोद्दीन रिसर्चच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

मृत्यु नंतर जिवनावर श्रद्धा व् विश्वास याचा आमच्या जिवनाशी एक अतुट नात आहे. त्या श्रद्धेवर विश्वास (ईमान-ऐतबार) जिवनातील प्रत्येक क्षेत्रांवर परिणामकारक ठरतो. मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा ही आपल्याला एक निर्मात्याच्या अस्तित्वाला बळकटी प्रदान करते आणि त्याला एक जिवंत वास्तव बनवते. हा विश्वास मानवाला आपल्या निर्मात्याप्रति आपुलकी तर देतोच पण त्याच सोबत मानव व विश्वनिर्माता यांच्यातील बंधन दृढ करतो. मृत्यूनंतर जागतिक न्यायालयात माझी हजेरी ही श्रद्धा स्वत: मध्ये एक क्रांतीकारी आत्मा आहे. ही आत्मा जेव्हा मन आणि बुद्धीमध्ये संचार करते तेव्हा ती मानवास पुर्णपणे बदलुन टाकते. व्यक्तिमत्वाला स्वच्छ, निर्मळ दिशा देते. व्यक्तिला सत्याचा ध्वजवाहक आणि न्यायाचा पाईक बनवुन असत्य, अत्याचार,  वासना, क्रुरतेपासुन सावध करते आणि मनात सदाचार आणि पुण्यकर्माची मोचेर्र्बांधणी करते. चंगळवादात तल्लीन लोकांना पारलौकीक जिवनाबद्दल आकर्षण निर्माण करते. मानवास निर्मात्याच्या आदेशाचा आज्ञाधारक, त्याच्या व्यवस्थेचा सच्चा सैनिक व रक्षक बनविते. ही श्रद्धा माणसास सत्य व न्यायाच्या स्थापनेसाठी संघर्ष करण्यासाठी उर्जा प्रदान करते. मानवाला संकटे आणि जिवनात उद्भवलेल्या विपरित परिस्थीतीशी सामना करण्यासाठी ताकद, हिम्मत, आत्मविश्वास प्रदान करते आणि मानवजातीची निस्वार्थ सेवा करण्यासाठी त्याग व उपकाराची भावना निर्माण करते.  

- मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी 
संकलन - साजीद आझाद, निलंगा

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांचे पुत्र अब्दुर्रहमान यांच्या कथनानुसार, सुफ्फावाले गरीब लोक होते. एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याच्या घरात दोन मनुष्यांचे  अन्न आहे त्याने येथून तिसऱ्याला घेऊन जावे आणि ज्याच्याजवळ चार मनुष्यांचे अन्न आहे त्याने एक अथवा दोन मनुष्यांना घेऊन जावे.’’ तेव्हा माझ्या वडिलांनी (अबू बक्र (रजि.)  यांनी) आपल्या घरी तीन लोकांना आणले आणि पैगंबरांनी आपल्या घरात दहा लोकांना नेले. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण 
पैगंबर मुहम्मद (स.) लोकांचे नेता व सेनापती होते. जर त्यांनी त्यांच्या घरी दहा लोकांना घेऊन गेले नसते तर सर्वसामान्य लोक दोन, चार, सहा आणि आठ लोकांना आनंदाने का  घेऊन जातील. कायद्यानुसार जबाबदार लोकांनी त्याग व बलिदान केले तर त्याच्या मागे चालणाऱ्यांमध्ये अधिकाधिक त्याग व बलिदानाची भावना उद्दिपित होईल. पुढे चालणारेच जर मागे राहिले तर मागे चालणाऱ्यांमध्ये आणखीन मागे जाण्याच्या भावनेस चालना मिळेल. 
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, इस्लामकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पैगंबर मुहम्मद (स.) लोकांना देत होते. पैगंबरांना जे काही मागण्यात आले, त्यांनी मागणाऱ्याला  ती वस्तू अवश्य दिली. एकदा एक मनुष्य पैगंबरांकडे आला तेव्हा पैगंबरांनी त्याला दोन टेकड्यांदरम्यान चरणाऱ्या सर्व शेळ्या देऊन टाकल्या. तो मनुष्य आपल्या कबिल्यात गेला आणि  म्हणाला, ‘‘हे लोकहो! इस्लामचा स्वीकार करा कारण दारिद्र्य व उपासमारीला न घाबरणाऱ्या मनुष्यासारखे मुहम्मद (स.) देतात.’’ 
कथनकार (माननीय अन रजि.) पुढे म्हणतात की मनुष्य फक्त जगाच्या इच्छेपोटी ईमान बाळगतो, परंतु अधिक काळ लोटला नाही तोच इस्लाम त्याच्या आत्म्यामध्ये पैगंबरांच्या  शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे प्रवेश करतो आणि जग व जगातील साधनसामुग्रीपासून इस्लामच्या दृष्टीने अधिक प्रिय बनतो. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, एका ‘नबी’ (पैगंबर)चा परिचय करून देताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर आहे.’’  पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘धर्माचा प्रसार (आवाहन) करण्याच्या अपराधापोटी त्या ‘नबी’च्या समुदायातील लोकांनी त्यांना इतके मारले की ते रक्तबंबाळ केले आणि ‘नबी’ची स्थिती अशी होती की त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील रक्त पुसत पुसत म्हणायचे की हे अल्लाह! माझ्या समुदायाचा हा अपराध क्षमा कर. (आणि आता यांच्यावर प्रकोप कोसळवू नकोस.) कारण हे लोक  अज्ञान आहेत, सत्य स्थिती जाणत नाहीत.’’ (हदीस : बुखारी)
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘तुम्हाला कधी उहुदच्या दिवसापेक्षा अधिक कठीण व त्रासदायक एखादा दिवस कंठावा लागला  आहे काय?’’ पैगंबर म्हणाले की आएशा (रजि.)! तुमच्या कुरैश समुदायाकडून मला खूप त्रास झाला आणि सर्वांत अधिक कठीण व त्रासदायक दिवस कंठावा लागला तो उ़कबाचा दिवस होता. त्या दिवशी मी स्वत:ला अब्द या लैल इब्ने अब्द किलालसमोर सादर केले, परंतु जे काही मला हवे होते ते देण्यास त्याने नकार दिला. तेव्हा मी बेचैन होऊन आणि विचार करीत  तेथून निघालो. जेव्हा मी करनुस्सआलिब पोहोचलो तेव्हा दु:ख थोडे कमी झाले, मग मी आकाशाकडे पाहिले तेव्हा मला जिब्रिल (अ.) दिसले. त्यांनी मला हाक मारून म्हटले, ‘‘तुमच्या समुदायाने जे काही तुम्हाला सांगितले आणि ज्याप्रकारे त्यांनी तुमच्या वक्तव्याचे उत्तर दिले आहे ते अल्लाहने ऐकले आणि अल्लाहने तुमच्याकडे डोंगरांचे नियोजन करणारे देवदूत  पाठविले आहेत. तुम्हाला वाटेल तो यांना आदेश द्या, ते सत्याला नाकारणाऱ्यांच्या बाबतीत तुमचा आदेश स्वीकारतील.’’ मग मला डोंगरांच्या देवदूताने हाक दिली, सलाम केला आणि  म्हटले, ‘‘अल्लाहने ऐकले आणि मला डोंगरांच्या नियोजासाठी पाठविण्यात आले आहे आणि माझ्या पालनकर्त्याने मला तुमच्याकडे पाठविले आहे जेणेकरून तुम्ही मला जो आदेश  इच्छित असाल तो द्या आणि जे काही तुम्हाला हवे आहे ते सांगा. हवे तर दोन्हीकडील डोंगरांना मी अशाप्रकारे जवळ करीन की हे लोक त्यांच्या दरम्यान चिरडले जातील.’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही. त्याऐवजी मला अशी अपेक्षा आहे की त्यांच्या अपत्यांपैकी असे लोक असतील जे फक्त अल्लाहची भक्ती करतील, त्याच्याबरोबर कोणालाही भागीदार बनविणार  नाहीत.’’ 
(हदीस : बुखारी, मुस्लिम)

आदरणीय सहल बिन साद (रजि.) उल्लेख करतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘जो कोणी मला दोन जबड्यांमधील अवयव (जीभ) आणि दोन टांगांमधील अवयव  (जननेंद्रिय) या दोहोंची जमानत देईल तर मी त्याला जन्नतची हमी (गॅरंटी) देतो.’’ (बुखारी)

निरुपण
चारित्र्य सावरण्यासाठी माणसाचे जिव्हेवर नियंत्रण असणे अपरिहार्य आहे. जिभेवर नियंत्रण नसलेला माणूस चारित्र्यसंपन्न असू शकत नाही. खोटारडे बोलणे, लावालावी करणे, खोटी  आश्वासने देणे, मगरुरीने बोलणे, शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे इ. सर्व जिव्हेवर नियंत्रण नसल्याची लक्षणे आहेत. कुरआनात आहे, ‘‘हे ईमानधारकांनो, सत्य तेच बोला आणि मोजूनमापून शब्द वापरा.’’ 
न्यायनिवाड्याच्या दिवशी प्रत्येक माणसाला जिभेविषयीदेखील जाब द्यावा लागेल. निर्मिकाने माणसाला मुळात बोलण्याची क्षमता दिली ती सत्य बोलण्यासाठी आणि सत्याच्याच  प्रचारासाठी. न्यायनिवाड्याच्या दिवशी बहुतांशी लोकांना नरकाग्नीची कठोर सजा सुनावली जाईल ती जिव्हेच्या वाईट वापरामुळे. जिव्हेवर नियंत्रण जरी अवघड असले तरी सातत्याने  प्रयत्न केल्यास ते अशक्य नाही. 
चारित्र्यसंपन्न माणूस जिव्हेविषयी सदैव जागृत असतो. तो मितभाषी असतो. जिव्हेनंतर उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी जनेनेंद्रियाचा उल्लेख केला आहे. कुरआनात आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळपासही फिरकू नका.’’ 
कामवासनेवर नियंत्रण खूप खूप महत्त्वाचे आहे. कामवासनेच्या परिपूर्तीसाठी केवळ एकच मार्ग अल्लाहने वैध ठरवला आहे आणि तो आहे विवाह! विवाहबाह्य संबंध इस्लामला  अजिबात मान्य नाही. तो व्यभिचारच आहे आणि कुरआनचा सार असा आहे की व्यभिचारी माणूस कदापि जन्नतमध्ये जाणार नाही. इस्लामी कायदेशास्त्राप्रमाणे व्यभिचाऱ्याला
जगातही दगडांनी ठेचून मारण्याची कठोर शिक्षा प्रयुक्त केली आहे, तीसुद्धा समाजादेखत! वरवर ही शिक्षा कठोर वाटत असली तरी एक-दोन व्यभिचाऱ्यांनादेखील ही शिक्षा समाजादेखत  दिली गेली तर परिणामस्वरूप हजारो-लाखो भगिनींची इज्जत-अब्रू सुरक्षित होईल आणि माणसे स्वप्नातदेखील व्यभिचार करण्याचा विचारही करणार नाहीत. जिव्हेवर आणि  कामवासनेवर संपूर्णत: नियंत्रण असलेल्या माणसाचे उर्वरित जीवनही साहजिकच अत्यंत इमानी व उदात्त असेल. अशा माणसाला पैगंबरांनी याच जीवनात मरणोत्तर जीवनात जन्नत  (स्वर्ग) प्रदान करण्याचीजमानत, हमी, गॅरंटी दिली आहे.

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

आजपासून सुमारे १४५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरबस्थानच्या वाळवंटामध्ये लोक कबिले (समूह) बनवून राहायचे. प्रत्येक कबिल्याचा एक सरदार असे. वर्ण, वंश, व्यवसाय यावरून  प्रत्येकाची आपापली एक ओळख होती. प्रत्येक कबिला एकदुसऱ्यांवर आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत असे. यातूनच त्यांच्यात युद्धाच्या ठिणग्या पडायच्या. अज्ञानाचा अंधकार  पसरलेला होता. मर्जीत आले तोच कायदा. दिवसाढवळ्या चोऱ्या, दरोडे पडायचे. अशा या परिस्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाले. एका मार्गभ्रष्ट   समाजाला योग्य दिशा देण्यासाठी ज्या तत्त्वज्ञानाची आवश्यकता होती ते या कुरआनच्या शिकवणीतून देण्यात येत होते. तसेच समाजातील कुप्रथा नष्ट करण्यासाठी कुरआनच्या  स्वरूपात एक संविधान ईश्वराने प्रेषितांच्या स्वाधीन केले. ज्याच्या माध्यमाने पैगंबरांनी समाज पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेतले.
समाजातील उच्चनीचता, भेदभाव, अन्याय, अत्याचार दूर करून त्या जागी न्याय, समता, बंधुत्व प्रस्थापित करण्याचा पैगंबरांनी प्रयत्न केला. लोकांमध्ये एकतेची भावना वृद्धिंगत करून  कुरआनमधील कायद्याची कठोर अंमलबजावणी केली. हळूहळू लोकांची मानसिकता बदलत होती, जीवनाचे वास्तविक ज्ञान वाढत होते, जीवन जगण्यासाठी काही नीतिनियम असले  पाहिजेत याची जाणीव निर्माण झाली होती. या सर्व मानवी प्रकृतीला अनुकूल गरजांची कुरआनच्या माध्यमातून पूर्तता करण्यात येत होती. चोरीची शिक्षा ठरविण्यात आली. जो चोरी  करेल त्याचे मनगटापासून हात छाटण्याचे आदेश देण्यात आले. लोकांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली. चोऱ्या दरोड्यांचे प्रमाण कमी होऊ लागले. या काळात मदीनेत बनू मक़्जुम  नावाच्या उच्चभ्रू काबिल्यातील फातिमा नावाच्या स्त्रीकडून चोरीचा गुन्हा घडला होता! चोरीचे हे प्रकरण पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या न्यायालयात दाखल झाले! साहजिकच आता  कुरआनच्या कायद्यानुसार त्या स्त्रीला शिक्षा होणार होती; तरीसुद्धा लोकांमध्ये ही उत्सुकता लागली होती की पैगंबर (स.) आता काय न्याय देतील? कारण ही स्त्री एका उच्चभ्रू  कबिल्याची सदस्य आहे आणि त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे. कबिल्यामध्ये अस्वस्थता वाढू लागली! त्या स्त्रीच्या शिक्षेमध्ये काही कपात व्हावी यासाठी प्रयत्न होऊ लागले.  पैगंबरांच्या जवळच्या लोकांना मध्यस्तीसाठी विनवणी केली गेली, शेवटी एक शिष्टमंडळ त्या स्त्रीची शिफारस घेऊन पैगंबरांच्या न्यायालयात पोहचला व शिक्षा कमी करण्याची मागणी  केली. पैगंबर (स.) काही वेळ शांत राहिले, चेहरा लाल झाला होता. थोड्या वेळाने पैगंबरांनी त्या शिष्टमंडळाला उत्तर दिले; नव्हे तर आपला निकाल सांगितला. पैगंबर (स.) म्हणाले,  ‘‘मला अल्लाहने न्याय प्रस्थापित करण्यासाठी या जगात पाठविले आहे, तुम्ही शिक्षा कमी करण्याची शिफारस करता!’’ पुढे पैगंबर (स.) जे म्हणाले ते अगदी मन सुन्न करणारे आहे.  पैगंबर (स.) शेवटी म्हणाले, ‘‘हा चोरीचा अपराध जर या फातिमाऐवजी माझ्या फातिमाच्या (पैगंबरांची प्रिय मुलगी) हातून जरी घडला असता तर तिलासुद्धा मी हीच शिक्षा दिली  असती.’’ आता यापुढे कोणाची हिंमत होती शिफारस करण्याची? सर्व जण निमूटपणे निघून गेले. न्यायानुसार त्या स्त्रीला शिक्षा करण्यात आली.
(संदर्भ:- बुखारी (हदीस संग्रह) खंड क्र.२, पान क्र. १००३)
आज आमच्या समाजाला अशा प्रकारच्या न्यायाची नितांत गरज आहे. जेणेकरून अपराधांचे प्रमाण कमी होतील. न्यायदान करताना जर ही भावना निर्माण झाली की, कोणत्याही  परिस्थितीत कोनावरही अन्याय होऊ नये, तर जनतेचा न्यायव्यवस्थेवारिल विश्वास नक्कीच वाढेल. न्यायालयात न्यायदान करणाऱ्यांकडूंन हीच अपेक्षा!!

- संकलन : शेख अब्दुल हमीद,
मो.: ७३८५३१४१४३

आदरणीय माई आयशा (रजि.) सांगतात की, माझ्याकडे एक भगिनी आपल्या दोन मुलींसह काही मागण्यासाठी आली. (त्या तिघीही उपाशी होत्या.) त्या वेळी माझ्याकडे फक्त एक खजूर होती जी  मी तिला दिली. तिने खजुरीचे दोन भाग करून आपल्या दोन्ही मुलींना दिले पण स्वत: मात्र खाल्ले नाही. (ती स्वत: उपाशी असूनही) ती निघून गेल्यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) आले आणि  त्यांना मी ही घटना सांगितली. पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ज्या व्यक्तीला मुली देऊन अजमावले गेले आणि तिने मुलींचे खुशीने संगोपन केले तर या मुली त्या व्यक्तीला नरकाग्नीपासून दूर ठेवतील.’’  (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
मुलींचे संगोपन करणे एक महान सत्कर्म आहे. म्हणून मुलीच्या जन्मावर निराश न होता आनंद साजरा करावयास हवा. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा मुलींच्या बाबतीत एक उपदेश असा आहे,  ‘‘ज्याने तीन मुली अथवा तीन बहिणींचे संगोपन केले, त्यांना चांगले शिकवले, त्यांना दयेने आणि प्रेमाने वागवले, इथपर्यंत की वयात आल्यावर त्यांचा विवाह करून दिला तर अशा व्यक्तीसाठी  अल्लाहने जन्नत (स्वर्ग) राखीव अर्थात अनिवार्य केली.’’
यावर एकाने विचारले की जर कोणाला दोनच मुली असतील तर? ‘‘दोन मुलींच्या बाबतीत हाच मोबदला मिळेल.’’
इब्ने अब्बास (रजि.) म्हणतात की जर कोणी एकाच मुलीच्या बाबतीतही विचारले असते तर पैगंबरांनी हाच मोबदला सांगितला असता. कुठे ते क्रौर्य की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात लोक मुलींना जन्मत:च जिवंत पुरत होते! आणि पैगंबरांच्या प्रबोधनानंतर कसे घडले हे महान परिवर्तन कुठे की लोक मुलींच्या जन्मानंतर आनंदाने भारावून जाऊ लागले.
दिव्य कुरआनात आहे, ‘‘काय बेतेल त्या दिवशी जेव्हा अल्लाह या निष्पाप मुलींना जिवंत करून विचारली की तुम्हाला कोणत्या गुन्ह्यापायी आणि कोणी ठार केले?’’ मृत्युपश्चात अल्लाहसमोर  आपल्या प्रत्येक कृत्याबद्दल जाब द्यावा लागेल हे वास्तव मनमस्तिष्कात एकदा का बिंबले की केवळ स्त्री-भ्रूण हत्येचाच नव्हे तर सारे गंभीर प्रश्न मार्गी लागतील. अल्लाहसमोर जाब द्यावा  लागेल की ही जाणीव पतीपत्नीला मुलीचा गर्भपात करू देणार नाही. सोनोलॉजीस्टला गर्भलिंग परीक्षा करू देणार नाही. हीच भीती स्त्रीरोगतज्ज्ञाला गर्भपाताची सर्जरी करण्यापासून परावृत्तकत रील  व हीच उत्तरदायित्वाची जाणीव पतीला, सासूसासNयांना व त्यांच्या सहकुटुंबियांना हुंड्यासाठी नववधूंना जिवंत जाळण्यापासूनही रोखण्याचे काम करेल! 
समाजाला गुन्हेगारीपासून आणि दुराचारापासून रोखण्याचा आणि सदाचारी बनविण्याचा किती महान आणि गुणकारी तथा प्रॅक्टिकेबल उपाय आहे हा! आमच्या देशात हा उपाय राबविण्याची सद्बुद्धी  अल्लाह आम्हाला प्रदान करो!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget