प्रेषित (स) यांची गरज
अशा प्रसंगी एक व्यक्ती आपल्या समोर येते आणि म्हणते,
जे सत्य तुम्ही जाणून घेऊ इच्छिता, त्याचे ज्ञान मला दिले गेले आहे आणि ते
असे आहे,
‘‘या सृष्टीचा एक ईश्वर आहे ज्याने संपूर्ण सृष्टीची
रचना केली आहे, आणि आपल्या असामान्य शक्तीद्वारे त्याची व्यवस्था सांभाळली
आहे. ज्या वस्तू तुम्हास प्राप्त आहेत, त्या सर्व त्यानेच देऊ केल्या
आहेत आणि प्रत्येक बाब त्याच्याच अधीन आहे. हे जे तुम्ही पहात आहा की
भौतिक जगात, निसर्गात कोणताही विरोधाभास नाही, ते व्यवस्थितरित्या आपले
कार्य करीत आहे, जेव्हा की मानवी जग अपूर्ण असल्याचे दिसते. येथे प्रचंड
अराजकता माजली आहे, त्याचे कारण, हे की मानवाला स्वातंत्र्य देऊन त्यास
आजमाविले जात आहे. तुमच्या स्वामीची इच्छा आहे की त्याचा कायदा जो भौतिक
जगात प्रत्यक्षात लागू होत आहे, तो मानवाने आपल्या जीवनाकरिता स्वतः लागू
करावा. तेच अस्तित्व सृष्टीचा निर्माता आहे, तोच त्याची निगा राखणारा आहे.
तुमच्या कृतज्ञता व आभार प्रकटनाचा तोच खराखुरा हक्कदार आहे आणि तोच आहे
जो तुम्हास आश्रय देऊ शकतो. त्याने तुमच्याकरिता एका अनंत अमर्याद जीवनाची
व्यवस्था करून ठेवली आहे, जे मृत्यूपश्चात येणार आहे, जेथे तुमच्या आशा,
आकांक्षा, अभिलाषा पूर्ण होऊ शकतील. जेथे सत्य - असत्य विलग केले जाईल आणि
सदाचारीना त्यांच्या सदाचाराबद्दल व दुराचारीना त्यांच्या दुराचाराबद्दल
फलप्राप्ती होईल. त्याने माझ्या माध्यमाने तुमच्यापाशी आपला ग्रंथ पाठविला
आहे, ज्याचे नाव ‘कुरआन’ आहे. जो यास मान्यता देईल तो यशस्वी होईल, जो
अमान्य करील, तो अपमानित होईल.’’
हा आवाज प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आहे, जो दिड हजार
वर्षापूर्वी अरबस्तानच्या वाळवंटात बुलंद झाला होता. आणि आज सुद्धा आम्हास
साद घालित आहे. सत्य जाणून घ्यावयाची इच्छा असेल तर माझ्या या आवाजाकडे
तुमचे कान लावा आणि जे काही मी सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका.
काय हा आवाज खरोखर सत्याचा आवाज आहे? काय आपण यावर
श्रद्धा ठेवली पाहिजे, यावर विश्वास ठेवला पाहिजे? ते कोणते परिणाम वा
मापदंड आहे, ज्याद्वारे हे चूक व बरोबर असणेचा निर्णय घेता यावा?
काही लोकांचे असे मत आहे की या सत्याचा आम्ही त्यावेळी स्वीकार करू
ज्यावेळी प्रत्यक्षात ते आमच्या डोळ्यांना दिसेल. सत्याचे स्वचक्षूंनी ते
दर्शन घेऊ इच्छितात परंतु जणू एखाद्याने अंकगणिताच्या माहितीविना
खगोलशास्त्राचे अध्ययन करण्याचा प्रयत्न करावा व म्हणावे की तो खगोल
शास्त्राच्या केवळ त्याच गोष्टींना मान्य करील ज्या उघड्या डोळ्यानी पाहता
येतात, अंकगणिताचा तर्क मी मान्य करणार नाही, अशातलाच हा प्रकार होय.
त्याचा हा आग्रह, मानवाला आपल्या स्वतःच्या क्षमता, सामर्थ्याचे वस्तुनिष्ठ
ज्ञान नसल्याचे द्योतक आहे.
मानवाची पाहण्याची शक्ती मर्यादित आहे. वास्तवतेला
पाहणे त्याच्या आवाक्यापलिकडचे आहे. वास्तवता आपण पाहू शकत नाही. त्याची
अनुभूती मात्र आपणास होते. एकवेळ होती जेव्हा मानले जायचे की जगाची
निर्मिती चार वस्तूंनी झाली आहे. आग, पाणी, हवा आणि माती. दुसर्या शब्दात
पहिल्यांदा मनुष्याचा असा गैरसमज होता की सत्य, वास्तवता एक अशी वस्तू आहे
जी पाहता येणे शक्य आहे. परंतु आधुनिक संशोधनाने त्यास चुकीचे सिद्ध केले
आहे. आता जगातल्या सर्व वस्तू सूक्ष्म अणू (परमाणू) पासून बनल्या
असल्याचे आपण जाणतो. अॅटम - अणू एका सर्वसाधारण सफरचंदाच्या
आकारमानापेक्षा तितकाच लहान असतो जितका आपल्या जमिनीपासून सफरचंद असते.
अॅटम, एका अर्थाने सूर्यग्रहमाला (Solar System)
आहे ज्याचे एक केंद्र आहे. या केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रान असतात
आणि त्याच्या चोहोबाजूनी इलेक्ट्रान वेगवेगळ्या कक्षा वर्तुळात अशा
प्रकारे गतिमान असतात, जसे सूर्याच्या चोहोबाजूनी त्याच्या ग्रहांचे भ्रमण
सुरु असते. आकारमानाने सेंटिमीटरच्या पाच हजार करोड भागापैकी एक भाग
म्हणजे इलेक्ट्राॅन होय. आपल्या केंद्राच्या चोहोबाजूनी एका सेकंदात तो
करोडो वेळा प्रदक्षिणा घालतो. त्याची नुसती कल्पना करणे देखील कठिण
किबहुना अशक्यप्राय आहे. इतकेच नव्हे तर अंतर्विश्वातील ही अंतिम मर्यादा
आहे किवा नाही याचीही आपणास कल्पना नाही. या आंतरविश्वामध्ये आणखीन लहान
सहान विश्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावरून आपली पाहण्याची दृष्टी किती कमकुवत आहे, हे
स्पष्ट होते. मग प्रश्न हा उद्भवतो की प्रोटॉन आणि न्यूट्रानचे अत्यंत
सूक्ष्म कण एकत्रितरित्या जे केंद्र बनवितात, ते कशा प्रकारे स्थिर आहे.
शेवटी त्या केंद्रातून न्यूट्रान व प्रोटॉन बाहेर का पडत नाहीत. ती कोणती
वस्तू आहे जी त्याना परस्पर जखडून ठेवून आहे. शास्त्रज्ञांचे असे मत आहे
की या भौतिक कणा दरम्यान एक ऊर्जा अस्तित्वात आहे आणि याच ऊर्जेने
केंद्रातील न्यूट्रान व प्रोटॉन नामक कणाना परस्परात जखडून ठेवले आहे.
त्यास प्रतिबद्ध ऊर्जा (Binding Energy) संबोधिले गेले आहे.
अर्थात पदार्थ आपल्या अंतिम अंशरूपात ऊर्जा होय. मी म्हणतो, काय ही ऊर्जा
डोळ्यांनी पाहिली जाऊ शकते? कोणत्याही सूक्ष्मदर्शी (माइक्रोस्कोप) द्वारे
त्यास पाहिले जाऊ शकते? यावरून सत्य, वास्तव, आपल्या अंतिम रूपात एक
दृष्टीस न पडणारी गोष्ट आहे, मानवी चक्षूंनी त्याचे दर्शन घेता येणे शक्य
नाही, हे आधुनिक विज्ञानाने स्वतः मान्य केल्याचे सिद्ध होते.
आता जर प्रेषित (स.) यांचे कथन मान्य करण्यास आपण ही अट
घातली की ते ज्या सत्याची, वास्तवतेची सूचना देत आहेत, त्या आम्हास पाहता
व स्पर्श करता आल्या पाहिजेत, तेव्हाच आम्ही ते मान्य करू, तर ही अत्यंत
मूर्खपणाची गोष्ट ठरेल. जसे भारतीय इतिहासाचा एखादा विद्यार्थी ईस्ट
इंडिया कंपनी संदर्भात अध्ययन करते वेळी आपल्या अध्यापकांना म्हणावे की
कंपनीची सर्व पात्रे माझ्यासमोर आणून उभी करा आणि त्यानी सर्व घडलेल्या
घटनांची माझ्या समोर पुनरुक्ती करावी, तेव्हाच मी तुमचा इतिहास खरा मानीन,
अशातलाच हा प्रकार आहे.
मग तो कोणता निकष आहे ज्या आधारे आपण, हा संदेश खरा की
खोटा, आणि आपण तो स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेता येईल? माझ्या मते
सदर संदेशाच्या पडताळणीची तीन विशिष्ट अंगे आहेत. पहिले हे की त्याची
व्याख्या सत्याशी किती समानता बाळगते. दुसरे हे की जीवनाच्या अंत -
परिणामाबाबत त्याने प्रस्तुत केलेला दावा हा निव्वळ दावाच आहे की त्याचा
काही पुरावा देखील त्याचेकडे उपलब्ध आहे. तिसरी गोष्ट ही की त्याने
प्रस्तुत केलेल्या संदेशामध्ये काय असे एखादे असामान्य वैशिष्टय आढळून
येते की त्यास ईश्वरवाणी संबोधिले जाऊ शकेल? या तिन्ही दृष्टिकोनातून
जेव्हा आपण प्रेषित (स.) यांच्या कार्याची पडताळणी करतो तेव्हा त्यापैकी
प्रत्येक पैलू संदर्भात ते अत्यंत यशस्वीरित्या त्या निकषावर पूर्णतः
सत्यावर असल्याचे माहित होते.
-
प्रेषित (स.) यांनी सृष्टीची जी व्याख्या केली आहे,
त्यामध्ये आपल्या सर्व समस्यांचे समाधान आहे. आपल्या आंतरबाह्य जगतात
जितके प्रश्न निर्माण होतात, त्या सर्वांचे ते उत्कृष्ट उत्तर आहे.
-
जीवनाच्या अंतिम परिणामाबाबत प्रेषित (स.) यांचा जो
दावा आहे, त्याकरिता तो एक स्पष्ट पुरावाही स्वतःजवळ बाळगतो. तो हा की
विद्यमान जीवनात त्या परिणामाचा नमुनाही आपणास दाखवून दिला जो नंतरच्या
जीवनात येण्याची तो खबर देत आहे.
-
तो ज्या वाणीला ईश्वराची वाणी म्हणतो, त्यामध्ये
इतके असामान्य वैशिष्टय आढळते की निःसंशय ते एखाद्या महान अलौकिक दिव्य
शक्तीची वाणी आहे, एखाद्या मनुष्याची ती वाणी असू शकत नाही, हे मान्य
करावे लागते.
चला, आता या तिन्ही बाजूनी प्रेषित (स.) यांच्या संदेशाचे परीक्षण करून पाहू या.
प्रेषित (स.) यांची सत्यता
प्रेषिताच्या संदेशाचे पहिले स्पष्ट वैशिष्टय हे की ते मानवाच्या
अंतर्मन-स्वभावाशी एकरूप होते. याचा अर्थ असा की मानवानी उपजत जी प्रकृती
आहे, तीच सदर व्याख्येची प्रकृती आहे. सदर व्याख्येचा पाया एकमेव
ईश्वराच्या अस्तित्वावर ठेवणेत आला आहे आणि एका ईश्वरा संबंधीचा विवेक
मानवाच्या प्रकृतीत समाविष्ट आहे. त्यास दोन भक्कम पायाभूत आधार आहेत. एक
हा की मानवी इतिहासाच्या सर्व ज्ञात युगामध्ये मानवाच्या बहुसंख्येने
किबहुना जवळपास संपूर्ण जनसंख्येने ईश्वराचे अस्तित्व मान्य केले आहे.
मानवाची बहुसंख्या ईश्वरी विवेकापासून रिक्त राहिली असावी असे एखादे युग
कधीही मानवावर आलेले नाही. ईश्वराप्रती विवेक, मानवी स्वभावाचा अत्यंत
शक्तिशाली विवेक असल्याचीच प्राचीन काळापासून आजतागायत मानवी इतिहासाची
सर्वमान्य साक्ष आहे. दुसरा आधार हा की माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा
अनायासे त्याचे अंतर्मन ईश्वराला पुकारु लागते. जेथे एखादे आश्रय दृष्टीस
पडत नाही तेव्हा ईश्वराचा आश्रय तो शोधू लागतो. सुशिक्षित असो वा निरक्षर,
धार्मिक असो वा नास्तिक, पुरोगामी असो वा संकुचित वृत्तीचा; जेव्हा कधीही
त्याच्यावर असा प्रसंग ओढवतो ज्यावेळी त्याचे काहीच चालेनासे होते,
त्यावेळी तो एका अशा अस्तित्वाकडे याचना करू लागतो जे सर्वशक्तीमान आहे,
आणि जे सर्व शक्तींचा खजिना आहे. आपल्या नाजूक समयी ईश्वराचे स्मरण करण्यास
मनुष्य विवश आहे. त्याचे एक बोलके मजेदार उदाहरण आपणास स्टालिनच्या
जीवनात आढळून येते.
हा उल्लेख चर्चिलने दुसर्या महायुद्धाशी सबंधित आपल्या पुस्तकात भाग ४ पृष्ठ क्रमांक ४३३ वर केला आहे -
इ. स. १९४२ च्या नाजूक परिस्थितीत हिटलर संपूर्ण
युरोपकरिता धोकादायक बनला होता. चर्चिलने मॉस्कोला भेट दिली होती.
त्याप्रसंगी चर्चिलने आपल्या संयुक्त लष्करी कारवाई संबंधाची योजना
स्टालिनला सांगितली. चर्चिल लिहतात की सदर योजनेवर चर्चा करता करता एक असा
मुद्दा उपस्थित झाला ज्यावर चर्चिलचा उत्साह इतका वाढला की न राहवून
त्याच्या तोंडून शब्द निघाले , “May God Prosper this undertaking.'' (ईश्वर या मोहिमेत यश देवो)१
त्याचबरोबर प्रेषिताच्या आवाहनाचे हे वैशिष्टय आहे की मनुष्याला ज्या
प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, तसेच विश्व व जगाला पाहताना आपल्या
मनमस्तिष्कात जे प्रश्न निर्माण होत असतात, त्या सर्व प्रश्नांची ती
व्याख्या आहे.
विश्वाच्या अध्ययनाने आपणास या निष्कर्षापर्यंत
पोहचविले होते की केवळ योगायोगाने वा अपघाताने या सृष्टीची उत्पत्ती होऊ
शकत नाही. त्याचा निर्माणकर्ता अवश्य असला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर या
व्याख्येत आहे. जग केवळ भौतिक मशीन नाही. यामागे एखादे असामान्य मस्तिष्क
असले पाहिजे, जे त्यास चालवित असावे असे आपणास वाटत होते. या व्याख्येत
त्या प्रश्नाचे उत्तरही समाविष्ट आहे. त्या कृपाळू अस्तित्वाचा आपण शोध
घेत होतो आणि आपला आश्रय बनू शकेल, अशा एका अस्तित्वाच्या शोधार्थ आपण
होतो. सदर व्याख्येत त्याचे उत्तरही सापडते.
मानवी जीवन इतके अल्पायुषी का ही गोष्ट आपणास मोठी
चमत्कारिक वाटत होती. मानवाला आपण अमर पाहू इच्छित होतो. आपण आपल्याकरिता
एका विशाल विस्तृत मैदानाच्या शोधात होतो, जेथे आपल्या आशा, अभिलाषा साकार
व्हाव्यात. या व्याख्येमध्ये त्याचे उत्तरही आहे. मग खर्याचे खरे व
खोट्याचे खोटे उघड व्हावे आणि चांगले व वाईट विभक्त केले जावे, प्रत्येक
मानवाला त्याचे योग्य स्थान दिले जावे, ही मानवी परिस्थितीची निकड होती.
त्या प्रश्नाचे उत्तर देखील सदर व्याख्येमध्ये आढळते. तात्पर्य जीवना
संदर्भातील सर्व प्रश्नांची पूर्णतः उत्तरे त्यामध्ये आहेत आणि ती उत्तरे
अशी आहेत की याहून उत्कृष्ट उत्तरांची आपण कल्पना देखील करू शकत नाही.
याद्वारे विश्वाच्या अध्ययनाने आपल्या मस्तिष्कात निर्माण झालेल्या त्या
सर्व प्रश्नांचे निराकरण होते.
प्रेषितांच्या संदेश - आवाहनाचे दुसरे मोठे वैशिष्टय
पाहू. जीवनाच्या परिणामाबाबत जो दृष्टिकोन तो प्रस्तुत करतो, त्याचा एक
व्यवहारिक नमुना स्वतः आपल्या जीवनात प्रस्थापित करून आम्हास दाखवतो. तो
म्हणतो, जगाचा अशाच तर्हेने जुलमी व अत्याचारपिडीतासह अंत होणार नाही तर
त्याच्या अंतानंतर सृष्टीचा स्वामी प्रकट होईल आणि खर्या खोट्या
व्यक्तींना एकमेंकापासून विभक्त करील. ती वेळ येण्यामध्ये जो विलंब होतो
आहे, तो केवळ वर्तमान परिक्षेच्या कार्यकलापाच्या समाप्ती पुरता आहे, जे
तुमच्याकरिता अध्याहृत आहे.
उपरोक्त नुसते कथन करून तो बाजूला हटत नाही तर
त्याबरोबर मी जे काही करतो, ते खरे असण्याचा पुरावा, त्या न्यायालयाचा एक
नमुना विश्वाचा स्वामी माझ्या माध्यमाने याच जगात तुम्हाला दाखवून देईल,
असा तो दावा करतो. माझ्या माध्यमाने सत्याला तो प्रतिष्ठित करील व
असत्याला पराजित करील, आपल्या आज्ञाधारकांना प्रतिष्ठा प्रदान करील आणि
अवज्ञाकारींना अपमानित करून त्याना प्रकोपात टाकील. ही घटना घडूनच राहील
मग जगातील लोकांचा कितीही विरोध का होईना आणि त्याला नष्ट करण्याकरिता
त्यानी आपली सर्व शक्ती पणाला का लावेनात, असाही तो दावा करतो.
ज्याप्रमाणे परलोक (आखिरत) घडणे हे निश्चितरित्या ठरले आहे आणि कोणी त्यास
प्रतिबंध करू शकत नाही. त्याप्रमाणे माझ्या जीवनात त्याचा नमुना प्रदर्शित
होणे अनिवार्य आहे. ही एक निशाणी असेल येणार्या दिवसाची आणि हा पुरावा
असेल या गोष्टीचा की सृष्टीची निर्मिती न्याय तत्वावर झाली आहे. तसेच या
गोष्टीचा देखील की मी ज्या शक्तीचा प्रतिनिधी आहे, ती एक अशी शक्ती आहे जी
सर्व शक्तींपेक्षा श्रेष्ठतर आहे. ही शक्ती एके दिवशी तुम्हाला स्वतःसमोर
उभी करून सर्व आधीच्या व नंतरच्या मानवांचा निर्णय करील.
हे आव्हान तो त्या समयी देत आहे जेव्हा की तो एकाकी
आहे. संपूर्ण राष्ट्र - लोकसमूह त्याचा शत्रू बनले आहे. त्याची स्वतःची
मातृभूमी त्याला थारा द्यावयास तयार नाही. त्याच्या जवळच्या नातलगांनीही
त्याची साथ सोडली आहे. त्याचेकडे भौतिक साधन सुविधा नाहीत, आणि तो पूर्ण
विश्वासानिशी विजय माझा होईल आणि माझ्या माध्यमाने ईश्वरी न्यायलयाची
धरतीवर प्रस्थापना होईल, अशी घोषणा करीत आहे.
ऐकणारे त्याची थट्टा मस्करी करतात,परंतु अत्यंत
गंभीरतेने तो आपले कार्य तडीस नेत आहे. देशातील बहुसंख्य लोक त्याची हत्या
करण्याचा निर्णय घेतात, त्याचे सर्वकाही उध्वस्त करतात, देशत्याग करण्यास
त्याला विवश करतात, त्याला संपविण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावतात.
परंतु हे सर्वकाही त्याच्यापुढे निष्प्रभ ठरते, फार कमीच लोक त्याला साथ
देतात. एकीकडे मूठभर साथीदार तर दुसरीकडे प्रचंड बहुसंख्या असते. एकीकडे
साधन सामग्रीची विपुलता तर दुसरीकडे साधन सामग्रीचा तुटवडा. एकीकडे देश
बांधवांचे, राष्ट्राचे समर्थन तर दुसरीकडे सगेसोयरे व इतरांचा एकत्रित
विरोध. अशा कठिण परिस्थितीत त्याचे साथीदार वरचेवर भयभीत होतात, परंतु
प्रत्येक वेळी तो असेच म्हणतो की प्रतीक्षा करा, ईश्वरी निर्णय प्रस्थापित
झाल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही शक्ती त्यास रोखू शकत नाही.
चौथे शतकही संपले नव्हते. त्याचे आव्हान पूर्णत्वास
पोहचते, आणि इतिहासातील आपल्या पद्धतीची एकमेव अशी वेगळी घटना घडते. ज्या
दाव्यानिशी एका व्यक्तीने आपल्या कामास सुरुवात केली होती, अगदी त्याच
स्वरुपात त्याचा दावा पूर्णत्वास पोहचला आणि त्याचे विरोधक त्यात काही कमी
जास्त करू शकले नाहीत. सत्य व मिथ्या वेगवेगळे झाले. ईश्वराच्या
आज्ञाधारकांना प्रतिष्ठा मिळाली आणि अवज्ञाकारींचा प्रभाव संपुष्टात येऊन
त्याना शासित बनविले गेले.
अशा प्रकारे या संदेशाने मानवांना ज्या परिणामाची सूचना दिली होती, त्याचा
एक नमुना जगात प्रस्थापित केला गेला, जो प्रलया (कयामत) पर्यंत एक धडा व
बोध आहे. या नमुन्याची परिपूर्णता परलोक (आखिरत) मध्ये होईल ज्यावेळी अखिल
मानवजातीला ईश्वरी न्यायालयात उपस्थित करून त्यांच्याबाबत निर्णय होईल.
त्या मानवाचा दावा सत्य असणेचा तिसरा पुरावा, ती वाणी
होय ज्यास तो ईशवाणी (कलामे इलाही) म्हणून प्रस्तुत करतो. सदर ईशवाणी येऊन
कित्येक शतके लोटली. परंतु त्याचे महात्म्य, त्याची सत्यता आणि वास्तवते
संदर्भात त्या मधील कथनाचा एक शब्द देखील चुकीचा सिद्ध होऊ शकला नाही,
जेव्हा की त्रुटी, उणीवारहित कोणतेही असे मानवी पुस्तक आढळत नाही.
दुसर्या शब्दात कुरआन ईश्वरी ग्रंथ असल्याचा स्वतः
कुरआनच पुरावा आहे. त्याची विविध अंगे आहेत परंतु या ठिकाणी मी केवळ
त्याच्या तीन पैलू - संदर्भात वर्णन करीन. एक त्याची निवेदन शैली, दुसरा,
त्याच्या अर्थामध्ये विरोधाभास नसणे, तिसरा त्याचे चिरस्थायित्व -
शाश्वतपणा !