Latest Post

कोणत्याही समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जगणे एकमेकांना सहकार्य लाभत नसेल तर जगणे शक्यच होणार नाही. त्यासाठी प्रत्येक माणसाने समाजहितासाठी आपले योगदान देणे  गरजेचे आहे. जसे एका माणसाविषयी हे विचार लागू आहेत, तसेच कोणत्याही समाजासाठी धार्मिक समुदायासाठी देखील हे सूत्र लागू पडते, ज्या देशात, समाजात, शहरात वा  गल्लीमोहल्ल्यात जे जे लोक एकमेकांच्या सहवासात राहातात त्यांनी एकमेकांच्या अडीअडचणी, समस्या सोडविणे, गरजा पूर्ण करणे अनिवार्य ठरते आणि असे करताना जात, धर्म, भाषा, भौगोलिक सीमा अशा कोणत्याही मानवी मर्यादांचे बंधन घालता येत नाही. रमजान मानवाच्या चारित्र्यात वाढ करणारे एक उत्तम प्रशिक्षण आहे. हा महिना मानवाच्या नैतिक  प्रशिक्षणाचा महिना आहे. आज सगळीकडे विविध रूपांमध्ये कुकर्मे मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. संपत्ती आणि लैंगिकतेच्या आकांक्षेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने माणूस प्रत्येक  प्रकारचे वैध-अवैध कृत्य करण्यास विवश आहे. त्याच्या ऐहिक आकांक्षांच्या उद्देशाचा थांगपत्ताच नाही. व्यक्तीची चारित्र्यिक निर्मिती झाल्यास या नैतिक समस्यांचे कायमस्वरूपी  निराकरण होऊ शकते आणि या चरित्र निर्मितीचा संदेश घेऊन येत असतो रमजानचा महिना. या महिन्यात ईश्वराचा प्रत्येक भक्त ईश्वरी प्रेरणेने, स्वेच्छेने कोणत्याही प्रकारच्या  जबरदस्ती व लालसेविना आपला जास्तीतजास्त वेळ कुरआन पठण,  गरिबांना दानधर्म, सत्कर्म, सद्चिंतन इत्यादींचे आचरण करण्यात मग्न असतो आणि हाच चांगल्या सामाजिक  परिवर्तनाचा पाया आहे. पवित्र कुरआन हा धर्मग्रंथ सर्व मानवजातीकरिता मार्गदर्शक म्हणून अवतरला गेला आहे. यात दानधर्म, एकमेकांचे प्रत्येक बाबीत सहकार्य देण्यासंबंधी जे आदेश  आलेले आहेत त्यात धार्मिक वा इतर कोणतेच निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. जकात देणे हे योगदान प्रत्येक मुस्लिमावर, ज्याचे ठराविक वार्षिक उत्पन्न असेल, अनिवार्य केले गेले  आहे. जकातमधून प्राप्त होणारे धन कोणकोणत्या लोकांच्या हितासाठी खर्च करावे याची सविस्तर माहिती कुरआनमध्ये सांगितली गेली आहे. यात कुठेही असा उल्लेख नाही की जगातचे  धन फक्त मुस्लिम समाजातील लोकांसाठीच खर्च करावे. गरजवंत, प्रवासी, दरिद्री, गुलाम, कैदी कोणत्याही धर्माचे, संस्कृतीचे असोत, त्याच्या हितांसाठी मुस्लिमांनी खर्च करावे असे  कुरआनचे स्पष्ट आदेश आहेत. रमजानचे रोजे मुस्लिमांवर अनिवार्य ठरविताना त्यांच्यात हे ईशभय निर्माण करण्यासाठी, ज्यांचा संबंध समाजाच्या बांधिलकीशी आहे, अनिवार्य केले  गेले आहेत असे म्हटले आहे. जर रमजानचा उद्देश पूर्ण होत नसेल आणि त्याकडे हे लोक (मुस्लिम) दुर्लक्ष करीत असतील तर या महिन्याचा खराखुरा लाभ त्यांना मिळणार नाही.  स्वत:चे जीवन यशस्वी करायचे असेल तर समाजासाठी योगदान आणि लोककल्याणाची कामे करणे अनिवार्य आहे. हाच या रमजान महिन्याचा संदेश दरवर्षी मुस्लिमांना दिला जातो.  रमजानच्या संपूर्ण महिनाभर रोजे करणाऱ्या रोजेदारास अल्लाहकडून विशिष्ट प्रकारचा कृपावर्षावाचे बक्षीस मिळत असते. या आनंदास द्विगुणीत करण्यासाठी रमजानुल मुबारक  संपताच ईद साजरी करण्यात येते. तो आनंदाचा दिवस काही औरच असतो. ईदचा दिवस अत्यंत खुशीचा, प्रसन्नतेचा व उत्साहाचा आहे आणि ईदची नमाज ही खुशीची नमाज आहे.  इस्लाममध्ये आनंद आणि दु:खाची एक स्पष्ट धारण आहे. जसे- अल्लाह कोणत्या गोष्टींमुळे प्रसन्न होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे अप्रसन्न याचे भान एक सच्चा मुसलमान आपल्या  प्रत्येक कामात ठेवत असतो. एखाद्याची गरज भागविण्यात अथवा गरजवंताची मदत करण्यात जो आनंद मिळतो तो माणसाला अंतर्गत सुख प्रदान करीत असतो. हा आनंद  ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीपेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली, स्थायी व फार काळ टिकणारा प्रदान करीत असतो. ईदचा आनंद इस्लामच्या याच सर्वव्यापी चिरप्रसन्नतेच्या निश्चितीचा  (अवधारणेचा) एक भाग आहे. जकात म्हणजे आपल्या संपत्तीतील अडीच टक्के हिस्सा दीन-दुबळ्यांना, वाटसरू, गरजवंत व नातेवाईकांना दान करणे होय. गोरगरिबांना आपल्या  बरोबरीने जी काही खरेदी करता येईल अशा भावनेने जो कोणी जकात अदा करतो त्या व्यक्तीची ईद खऱ्या अर्थाने परमोच्च आनंदाच्या दिशेने प्रवास करते आणि त्यास गंतव्य स्थान प्राप्त होते. ‘ईदुल-फित्र’मध्ये अल्लाहकडून आपल्या दासाला हेच सर्वकाही मिळत असते. त्यामुळेच ईदचा हर्षोल्हास इतर आनंदोत्सवांपेक्षा पूर्णत: वेगळा असतो. ईदच्या दिवशी आपणास  उत्तमता, स्वच्छता, सहिष्णूता आणि आपसातील सहकार्याचे उच्च दर्शन घडते आणि हाच ईदचा खरा अत्यानंद असतो. दुसऱ्यांकरितादेखील आनंदाचे साधन असतो तोच आनंद  अल्लाहला प्रिय असतो. ईद गरीब-श्रीमंत अशा सर्व थरांतील लोक एकत्रितपणे साजरी करतात. एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात आणि वंचितांना मदतीचा हात पुढे करतात. अशा रीतीने समाजातील प्रत्येकाच्या आनंदास नव्हे तर अत्यानंदास पारावार राहत नाही! अल्लाह आम्हा सर्वांना सत्कर्मांचा मार्ग अवलंबिण्याची शक्ती देवो.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

मशिदीवरील लायटिंग, रोषणाई, नमाजींची वर्दळ वगैरे आपण स्वत: एखाद्यावेळी मुस्लिम मोहल्ल्यातून जातांना अनुभवली असेल. त्यावेळी आज विशेष काय आहे असे तिथे कुणाला विचारले असता, ’आज बडी रात है’ असे वाक्य आपण एखाद्या वेळी ऐकले असाल. तेव्हा ही बडी रात नेमकी असते काय याबद्दल आपण पाहू या.
      रमजानच्या ज्या रात्री निसर्गकर्त्याकडून प्रेषित मुहम्मद सल्लम यांना कुरआनचा पहिला संदेश ”इकरा (वाचा/शिका)” मिळाला, ती रात्र ”लैलतुल कद्र (महानतेचि रात्र/महान रात्र/महारात्र)” म्हणून घोषित करण्यात आली आहे. याला शब-ए-कद्र देखील म्हणतात, ज्याचा अर्थ तोच होतो. परंतु आपल्या देशात सर्वसाधारणपणे याला ”बडी रात” म्हणतात. या रात्रीत केलेल्या भक्तीचे पुण्य हजारो महिने केलेल्या भक्तीएवढे मिळते. ”आम्ही याला (कुरआनला) कद्रच्या रात्री अवतरले आहे. आणि तुम्हाला काय माहीत, ’कद्र’ची रात्र काय आहे?  कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे. फरिश्ते आणि रूह (जिब्रिल) त्यात आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात. ती रात्र पूर्णत: ’शांती’ आहे. उष:काळापर्यंत.”                  - कुरआन (97:105)
    हे खरे आहे की, या रात्रीत ती ऐतिहासिक घटना घडली आहे, ज्या घटनेने जगाला पालटून दिलं, ते म्हणजे या रात्रीत ईश्‍वराकडून प्रेषितांवर कुरआन अवतरित होण्यास सुरुवात झाली. याच कुरआनची शिकवण देऊन प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी अरबस्थान आणि पूर्ण जगात क्रान्ती घडविली. हेच कुरआन वाचून मुलींना जिवंत पुरणारे अरब स्त्रीचा सम्मान करू लागले, आपल्या मुलींनाही शिक्षण देऊ लागले, विवस्त्र राहून काबा गृहाला प्रदिक्षणा घालणारे पुरेपूर कपडे नेसू लागले, आफ्रिकन हबशींना शूद्र समजणारे त्यांना समतेची वागणूक देऊ लागले. त्याचे पडसाद पाश्‍चात्य आणि पौर्वात्य देशांतही पडून अनेक परिवर्तनवादी चळवळी सुरु झाल्या. या जागतिक क्रान्तीची सुरुवात मात्र याच महात्रिपासून झाली होती. म्हणून हजार महिन्यात जे काम झालं नाही, ते या एका रात्रीत झालंय. कारण प्रारंभ हेच अर्ध यश असते. कदाचित म्हणूनच या रात्रीत केलेली उपासना हजारो महिने केलेल्या उपासनेसमान आहे. पण ही महारात्र रमजानच्या नेमक्या कोणत्या तारखेला येते, ते स्पष्ट नाहीये. याची तारीख प्रेषित मुहम्मद सल्लम यांना माहीत होती. एकदा या रात्रीची तारीख लोकांना सांगण्यासाठी प्रेषित घराबाहेर निघाले असता, बाहेर दोन माणसांत भांडणं सुरु झाले होते. त्यावेळी अल्लाहने त्यांना त्या तारखेचा विसर पाडला आणि प्रेषित या महारात्रीची तारीख विसरून गेले. याविषयी प्रेषितपत्नी आदरणीय आयेशा सिद्दिका सांगतात कि, प्रेषितांनी म्हटलंय - ”रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांच्या विषम तारखांमध्ये या महान रात्रीचा शोध घ्या.” - संदर्भ: हदीस (प्रेषित वचन) बुखारी शरीफ (खंड-3, भाग-32, हदीस क्र. 234). म्हणजे रमजानच्या 21, 23, 25, 27 आणि 29 या पाच विषम तारखांच्या  रात्रींपैकी कोणती तरी एक रात्र ”शब ए कद्र” असू शकते. या पाच रात्रींना उर्दूत ”ताक (विषम) रात्र” देखील म्हणतात. या पाचही रात्री मशिदीत रोजच्या नमाजव्यतिरिक्त रात्री उशिरापर्यंत वयैक्तिगतरित्या अतिरिक्त (नफील) नमाज पढली जाते, काही लोकं रात्रभर जागरण करून अल्लाहचं नाम:स्मरण करतात. बर्‍याच जागी रात्रभर ”मुताअला-ए-कुरआन” (कुरआनची चिकित्सा करण्याकरिता केलेले अध्ययन) केले जाते. तर काही ठिकाणी मशिदीत समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात. यात प्रवचने, बोधपर भाषणं, ईशस्तवन (हम्द) किंवा प्रेषित महती (नात) गायिली जाते. हे सर्व पाचही विषम रात्रींना यासाठी केले जाते कि, यापैकी जी कोणती रात्र ”शब ए कद्र” असेल त्या रात्रीच्या भक्तीचे पुण्य हजार रात्रीएवढे मिळेल म्हणून. तसेच त्या महारात्रीशिवाय इतर चार रात्री केलेली भक्तीदेखील वाया जाणार नाहीये. परंतु काही विचारवंत ही महारात्र 27 रमजानचिच असल्याचा अनुमान व्यक्त करतात. म्हणून भारत देशात बहुसंख्य लोकं फक्त रमजानच्या 27 व्या रात्री म्हणजे 26 वा रोजा असतो त्या दिवसाच्या रात्रीच जागरण करून मशिदीत अतिरिक्त नमाज पढतात. मात्र आता जनजागरणाने लोकं पाचही रात्री उपासना करू लागले आहे. खरं म्हणजे त्या रात्रीची वास्तविक तारीख फक्त अल्लाहलाच ठाऊक आहे. लोकांनी त्याचा शोध घेण्यासाठी पाचही रात्री जास्तीत जास्त उपासना करावी, याचसाठी कदाचित अल्लाहने प्रेषितांना त्या रात्रीच्या तारखेचा विसर पाडला असावा. याविषयी मौलाना अबुल कलाम आजाद म्हणतात -
    ”हे इमानवंता! तू ज्या महारात्रीचा रमजानच्या विषम रात्रीत शोध घेतोस, त्या रात्री जो ग्रंथ (कुरआन) अवतरण्यास सुरुवात झाली होती, त्या ग्रंथावर जर तू आचरण करणे सुरु केले तर तुझ्या आयुष्याची प्रत्येक रात्र ही महारात्र ठरू शकते.” अशी ही क्रान्तिकारी रात्र आपल्यापैकी प्रत्येकाचे आयुष्य पालटून ते प्रत्येक दृष्टीने समृद्ध करू दे, हीच अल्लाहशी प्रार्थना, आमीन!

- नौशाद उस्मान

रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र. सर्व जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव. जगभरातील ईद साजरा करण्याचा पॅटर्नही एकच आणि रोजाचाही पॅटर्नही एकच. फक्त भौगोलिक घटनाक्रमावरून थोडा फार एखाद दिवसाचा किंवा सहर, इफ्तार आणि ईद साजरी करण्यातला वेळेचा फरक. महिनाभराच्या कठीण उपवासानंतर रोजेधारकांना बक्षीसाच्या स्वरूपात अल्लाहकडून भेट म्हणून ईदचा दिवस. या दिवशी समाजातील सर्वच स्तरातील लोक मोठ्या उत्साहाने ईद साजरी करतात परंतु, शेजारी, मित्रपरिवाराला सोबत घेत, गळा भेट घेऊन, ईद मुबारक म्हणत आणि एकाच पंगतीत बसवून स्वत: सर्वांना शिरखुर्मा आणि इतर रूचकर पदार्थ वाढत. यात भर पडते ती अत्तर आणि सुरम्याची. हा माहोल एवढं सुख आणि समाधान देतो की कितीही कुणाबद्दल कटूता असलीतरी त्याला माफ करत आलींगन द्यायला भाग पाडतो. 
    रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिम बांधवाला त्यातल्या त्यात रोजेधारकाला स्वत:ला बदलायला, विचार करायला आणि दान, धर्म करायला प्रेरित करतो. संयम, आत्मीयता आणि माफ  करण्याच्या प्रवृत्ती या महिन्यात अधिक वृद्धींगत होते. त्याची फलश्रुती ईदच्या दिवशी दिसते. कुठल्याही सणादिवशी लोक आपल्या कुटुंबातील लोकांसोबत रममाण असतात. मात्र ईदच्या दिवशी कुटुंबापेक्षा अधिक मित्रांना, शेजार्‍यांना, ओळखीच्या व्यक्तींना, परिसरातील गरीबांच्या सेवेत अधिक जातो. त्यांना आग्रहाने घरी बोलावून शिरखुर्माचा आस्वाद घेण्यासाठी भाग पाडतो. घरातील प्रत्येकाचे कोणी ना कोणी मित्र असतात. लहानगा असेल तर त्याचे मित्र, मोठा असेल तर त्याचे मित्र. म्हणजेच या दिवशी घरातल्या सर्व लहान, थोरांच्या सर्वधर्मीय जवळच्या व्यक्तीना घरी बोलावून जेवू घातल्याशिवाय ईद साजरी झाल्यासारखी वाटतच नाही. गळा भेट घेऊन ईद मुबारक म्हणणे, एवढीच भेट या दिनी स्विकारली जाते. ज्यामुळे चेहर्‍यावर नूर बहरत असतो आणि स्मीत हास्याने ईदची खुशी झळकत असते. ही खुशी चेहर्‍यावर फुलविण्यात मोठा वाटा असतो तो घरातील स्त्रीयांचा. कारण त्यांच्या परिश्रमामुळेच सर्व काही मिष्टान्न तयार झालेले असतात. खासकरून ईदच्या दिवशी शिरखुर्म्याची चव ही सर्वश्रेष्ठ स्वादाच्या पलीकडील असते. तसा स्वाद इतर दिवशी येत नसल्याचा मित्रपरिवाराचं म्हणण आलं.
    रमजानमध्ये कोणाला काय मिळते?
    अल्लाहने कुरआनमध्ये म्हटले आहे की, “हे इमानधारकांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्या(लोकां) वर, जेणेकरून तुम्ही चारित्र्यवान व्हाल.” (संदर्भ : सुरह बकरा आयत नं.183).
    म्हणजेच अल्लाहकडून इमानधारकांसाठी चारित्र्यनिर्माणाची भेट मिळते. सर्वचजण म्हणतात, उत्तम चारित्र्य ही यशाची गुरूकुल्ली असते. ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनातही. रोजाच्या काळात कठीण प्रशिक्षण असते. त्यामुळे महिनाभर नियमानुसार रोजे करणे, तरावीहची नमाज अदा केल्यामुळे रोजेधारकाला उत्तम शरीरयष्ठी प्राप्त होते. त्याचे शरीर निरोगी बनते. रोजा माणसामध्ये भुकेची जाणीव उत्पन्न करतो. अन्न धान्यांची कदर करायला शिकवितो. पाण्याची महत्ता वाढवितो. भुकेलेल्याचा त्रास करवून देतो. जेणेकरून त्यांच्याबद्दलही मनात आत्मीयता वाढावी. या सर्वांमुळे अन्नदान करायला माणूस प्रेरित होतो. तसेच रमजान गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी श्रीमंताना प्रेरित करतो. ते म्हणजे जकात, सदका आणि फित्राच्या माध्यमातून. जकातमुळे तर समाजातील जवळपास 8 गटातील लोक सुखावतात. कुरआनच्या सुरे तौबात म्हटले आहे की, ” हे दान तर खर्‍या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्‍वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकारी जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.”   
म्हणजेच 1. फकीर 2. मिस्कीन, 3. जकात वसूल करणारे 4. तालीफे कुलूब. 5. प्रवासी, 6. निर्दोषींना सोडविणे 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्ग सुलभतेसाठी  8. कर्जदारांना कर्जमुक्त करण्यासाठी.
    सदका म्हणजे गरीबांना करण्यात येणारे दान आणि फित्रा म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे पावने दोन किलो गहू अथवा तत्सम रक्कम गरीबांमध्ये दान करणे. यामध्ये श्रीमंत, मध्यमवर्गीय आदींचा समावेश होतो. याचा अर्थ गरीबांना गरीबीतून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत होते. आणि शेवटी एवढे अल्लाहने या रोजेधारकांसाठी ईदची सर्वात मोठी भेट दिली आहे. ईदची नमाज सामुहिकपणे ईदगाहवर अदा करण्याला प्राधान्य आहे. ज्यामुळे सामुहिकपणे प्रार्थना होते आणि येथे सर्वांच्या भेटीगाठी होतात. आणि आनंदाने ईदगाहून शांततेने आपापल्या घरी जाणे. म्हणूनच रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र ही एकात्मता, सौहार्द, प्रेम, आपुलकी वाढविण्यासाठी अल्लाहकडून प्रत्येक इमानधारकाला मिळालेली भेटच आहे.
    आदरणीय सआद बिन औस रजि. आपले वडील औस यांच्या हवाल्याने सांगतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ” जेव्हा ईद-उल-फित्रचा दिवस येतो तेव्हा अल्लाहचे दूत प्रत्येक रस्त्याच्या कडेला उभे राहतात आणि घोषणा करतात की, ’ हे मुस्लिमानों! आपल्या पालनकर्त्याकडे चला जो फार मोठा कृपाळू आहे. जो पुण्यकर्म करण्याचा आदेश देतो आणि ते करण्याची क्षमता देतो. आणि त्यावर परत बक्षीसही देतो. तुम्हाला त्याच्याकडून (प्रेषितांच्या मार्गाने) तरावीहची अतिरिक्त नमाज अदा करण्याचा आदेश झाला. त्याचेही तुम्ही पालन केले. दिवसा रोजा ठेवण्याचा आदेश झाला तुम्ही रोजेही केले. आपल्या पालनकर्त्याचा आदेश तुम्ही पूर्णपणे मानला तर आता चला आपापले बक्षीस घ्या.”
    जेव्हा ईदची नमाज संपते तेव्हा एक ईशदूत घोषणा करतो की, ” हे लोकांनों ! तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला मुक्ती दिलेली आहे. आता तुम्ही आपापल्या घरी परत जा. अशा पद्धतीने ही आठवण ठेवत की हा दिवस बक्षीसाचा दिवस आहे. जगामध्ये याला भलेही ईदचा दिवस म्हटले जात असेल मात्र परलोकांमध्ये याला बक्षीसाचा दिवस म्हटले जाते. (संदर्भ : तरगीब : अलमंजुरी, हदीस प्रभा पेज नं.41)
गावांमधील ईद
    गावातील ईदचा आनंद औरच असतो. कारण सर्व गाव एक कुटुंबासारखं असतं. त्यामुळे प्रत्येक उत्सव येथे सामुहिकपणे साजरा होतो. त्यात ईदचा दिवस म्हणजे सर्वांसाठी पर्वनीच असते. गावातील ईदगाहवर ज्यावेळेस नमाज पठण करण्यासाठी लोक जातात. त्यावेळेस गावातील बारा बलुतेदारही इदगाहकडे वळतात. मुस्लिम बांधव ज्यावेळेस ईदगाहकडे निघतात त्यावेळेस प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती आपल्या हातात अन्नधान्याची पिशवू भरून घेउन निघतो. जशी नमाज संपते तशी प्रत्येकजण पिशवीतील धान्य, काही पैसे ईदगाहवर जमा झालेल्या बारा बलुतेरादारांना देत राहतो. त्याचवेळेस तो उपस्थितांना जेवणाचे आमंत्रणही देतो. जशी नमाज पठण करून घराकडे लोक निघतात ते घरात जाण्याअगोदर मित्रांना, जवळच्या व्यक्तींना आवतन देउनच घरात प्रवेश करतात. त्यानंतर घरातील आई, बहिण, बायको यांच्याशी सौहार्दपणे सलाम, दुआ देतात. यावेळी बच्चेकंपनी ईदीसाठी घरातील मोठ्यांकडे अट्टहास धरतात. त्यामुळे त्यांनाही कोणी नाही म्हणत नाही. अशा पद्धतीने सर्वांशी आत्मीयतेने साजरा होणारी ईद-उल-फित्र अल्लाकडून मिळालेली देणगीच म्हटले तर वावगे ठरणार नाही.
    शेवटी अल्लाहकडे प्रार्थना आहे की, माझ्या देशात शांतता नांदावी, पाऊस मुबलक व्हावा, शेती भरभराटीला यावी, प्रेम, आपुलकी वृद्धींगत व्हावी, प्रत्येकाला न्याय मिळावा, दारू, गुटखा, जुगार, व्याज यापासून देशबांधवांना दूर ठेव, देश सुजलाम, सुफलाम व्हावा, राजकारण्यांना सद्बुद्धी मिळावी, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी, सर्व देशबांधवाना चारित्र्यसंपन्न बनव. (आमीन.)

ईद म्हणजे उत्सव फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईदुल फित्र म्हणजे दान देण्याचा उत्सव. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लामध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद उल फित्र दूसरी ईद उल अजहा. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर जी ईद येते तिला ईदुल फित्र असे म्हणतात. अल्लाहने या दोन्ही ईदच्या दिवशी श्रीमंतांवर गरीबांना दान देऊन ईद साजरी करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे ईदला जाण्यापूर्वी फित्रा अर्थात गहू, खजूर, किशमिश किंवा नगदी रूपये गरीबांना दान दिल्याशिवाय ईदच्या नमाजला जाता येत नाही. रमजानच्या महिन्यात महिनाभर दान, पुण्य केले जाते. तेवढ्यावरही न थांबता परत ईदच्या दिवशी दान देण्यासाठी अल्लाहने श्रीमंतांना प्रोत्साहित केलेले आहे.
    कुठल्याही प्रकारचा कर्कश संगीत, डीजेचा आवाज, टुकार चित्रपटातील गीतावर केला जाणारा अश्‍लिल नाच, पैशाचा किंवा विजेचा अपव्यय किंवा हुल्लडबाजी ईदच्या दिवशी करता येत नाही. कुठल्याही प्रकारचे प्रदुषण ईदच्या दिवशी होत नाही. कुठल्याही प्रकारचा नशापाणी ईदच्या दिवशी कोणी करत नाही, कुठलीही घोषणाबाजी होत नाही. गटागटाने लोक अल्लाहचे नामस्मरण करत ईदगाह मैदानावर शांतपणे जमा होतात. तेवढ्याच शांतपणे दोन रकात नमाज अदा करून घरी परत येतात आणि मित्र परिवारासह शिरखुर्म्याचा आस्वाद घेतात. ईदचा जो मुख्य कार्यक्रम असतो तो ईदगाहवरील नमाजचा असतो. तो साधारणत: एक ते दीड तासात संपतो. महिनाभर उन्हा-तान्हात उपाशीपोटी राहिलेल्या जिवांवरील खाण्यापिण्याची बंधने ईदच्या दिवशी उठलेली असतात. त्यामुळे त्या दिवशी थकलेल्या जीवांना दिलासा मिळतो आणि कळते की खाणे आणि पाणी पिणे याचे महत्त्व मानवी जीवनात किती असते?
    ईदच्या पूर्वी ईदच्या तयारीसाठी म्हणून बाजार फुललेले असतात. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक मुस्लिम नवीन कपडे, चप्पल, बूट, कॉस्मेटिक्स, सुकामेवा, साखर, सुगंध इत्यादी खरेदी करत असतो. त्यामुळे मार्केटमध्ये नवचैतन्य निर्माण होते.
    महिनाभर केलेल्या उपवासातून आणि अतिरिक्त ईबादतीतून मुस्लिमांच्या चारित्र्याचा ग्राफ उंचावलेला असतो. मोह, माया, काम, क्रोध यावर मात करून येत्या 11 महिन्यात सदाचाराने वागण्याचा प्रत्येकाने आपल्या परीने निर्णय केलेला असतो. ज्यांनी जाणीवपूर्वक रोजे केले आणि 11 महिने आपले चारित्र्य जपण्याचा प्रण केला. ते त्यामध्ये यशस्वीही होतात. त्यांचे अस्तित्व समाजासाठी भांडवल ठरते.     लौकिक अर्थाने ईदचा अर्थ एवढाच जरी असला तरी ईदचे महत्त्व यापलिकडेही आहे. ते कोणते हे समजून घेऊ.
    आज समाजामध्ये चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई आहे.  त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, महिला आणि मुलांचे शोषण होत आहे, वाईट चारित्र्याच्या लोकांनी प्रत्येक क्षेत्र व्यापल्यामुळे असे घडत आहे. अशावेळी चांगल्या लोकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी इतर समाजाप्रमाणे मुस्लिम समाजावरही आहे. त्यासाठी दरवर्षी इस्लाम महिनाभर लोकांना चारित्र्यसंवर्धनाचे प्रशिक्षण देतो. हे प्रशिक्षण अनिवार्य असल्यामुळे प्रत्येकजण ह्या प्रशिक्षणाला आनंदाने सामोरे जातो. महिनाभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्याला समाजामधील वंचित लोकांच्या भूकेची व तहानलेल्या लोकांच्या वाईट परिस्थितीची आपोआप जाणीव होते. रमजान नंतर तो आपल्या मगदूरीप्रमाणे दानपुण्य करत राहतो. समाजातून गरीबी नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहतो. हे फक्त इस्लामी व्यवस्थेमध्येच शक्य आहे की, श्रीमंतांकडून जकात, फित्रा, सदका, घेऊन तो गरीबांना दिला जातो. अन्यथा इतर व्यवस्थांमध्ये तर व्याजाच्या व्यवस्थेतून गरजूंचे आर्थिक शोषण केले जाते. गरीबांना अधिक गरीब तर श्रीमंतना अधिक  श्रीमंत बनविण्याकडे व्यवस्थेचा कल असतो. गरीब लोक कायम गरीबीत राहिल्यास स्वस्तात मजूर उपलब्ध होत राहतील व त्यामुळे कारखानदारी भरभराटीला येते व देशाची आर्थिक प्रगती होते, असा विचार भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने केला जातो. हा विचार एवढा प्रबळ आहे की, साम्यवादाला सुद्धा यावर उपाय सुचवूनसुद्धा काही साध्य करता आलेले नाही.
    समाजातील काही घटकांना ठरवून सातत्याने गरीब ठेवले गेल्यामुळे समाजामध्ये विषमता वाढत चाललेली आहे. आपल्या देशामध्ये तर विषमतेने तर एवढा कळस गाठलेला आहे की, गरीबीमुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या करीत होते. त्यात आता शहरी भागातील गरीबांच्या आत्महत्येंचीही भर पडत चाललेली आहे. गरीबीमुळे येणारे अनेक रोग उदा. टी.बी., दमा, अ‍ॅनिमिया, मानसिक आजार वाढलेले आहेत. सार्वजनिक स्वास्थ्य व्यवस्था बकाल असल्यामुळे या आजारांना बळी पडणार्‍या गरीबांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मतदान ग्रामीण भागामध्ये होत आहे, विकास शहरी भागाचा होत आहे. अनुत्पादक गोष्टींमध्ये गुंतवणूक वाढत आहे, अत्यावश्यक कृषी उत्पादनामध्ये गुंतवणूक कमी होत आहे. अशा या विषम परिस्थितीशी लढण्याची शक्ती इस्लामच्या समाजवादी वैचारिक शक्तीतून मिळू शकते. इतर कुठल्याही व्यवस्थेमध्ये या विषमतेला नष्ट करण्याची क्षमता राहिलेली नाही, याची खात्री झालेली आहे. रमजान आणि ईदच्या पार्श्‍वभूमीवर चारित्र्यवान नागरिक देशाला मिळत राहोत. एवढीच प्रार्थना. आमीन. सर्व देशबांधवांना ईदच्या शुभेच्छा.

- एम.आय.शेख

प्रेषित ह. मुहम्मद (स.,) यांनी फर्माविले आहे की, ‘‘ज्या व्यक्तीने ईमानपूर्वक आणि अल्लाहकडून मोबदला मिळावा या आशेवर ‘लैलतुल  कद्र’ (शबे कद्र) मध्ये इबादत (प्रार्थना) केली, त्याचे सर्व गुन्हे (पाप) माफ केले जातील.’’ (हदीस– बुखारी)

भावार्थ
ज्याप्रमाणे पावसाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी फार मोलाचा असतो, त्याचप्रमाणे अल्लाहची निकटता सामीप्य प्राप्त करण्यासाठी इस्लामी शरिअतने ठरविलेल्या खास वेळा, खास दिवस व  खास रात्री अत्यंत मोलाच्या असतात. उदा. रात्री तहज्जुदच्या नमाजची वेळ, शुक्रवारचा दिवस, रमजानचा महिना, अरफातचा दिवस वगैरे. त्याचप्रमाणे ‘कद्र’ची रात्र, अल्लाहची प्रसन्नता  प्राप्त करण्यासाठी अत्यंत योग्य व अनुकूल अशी रात्र आहे. म्हणूनच रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा रात्रीमध्ये तिचा शोध घेण्यास प्रेषित (स.) यांनी फर्माविले आहे.

माननीय ह. आयेशा (रजि.) निवेदन करतात, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे, ‘‘शबे कद्र’चा रमजान महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात, विषम रात्रीमध्ये (२१, २३, २५,  २७, २९ वी रात्र) शोध घ्या. (हदीस- बुखारी) ठराविक रात्र यासाठी दर्शविली गेली नाही की तिच्या शोधाची आवड निर्माण व्हावी. लोकांनी काही रात्री अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यतीत  करावे. या दृष्टीने ‘अ‍ेअतिकाफ’ मागील हिकमत ही स्पष्ट होते. जो रमजानच्या शेवटच्या दशकामध्ये केला जातो. आता प्रश्न उद्भवतो की जगाच्या एका भागात रात्र असताना, इतर  भागात दिवस असतो. मग इतर भागातील लोकांना ‘कद्र’चे फायदे कसे मिळेल? याचे उत्तर असे की, शरीअतने ज्यावेळेला लाभदायक ठरवून इबादतीसाठी निश्चित केले आहे,  त्याबाबतीत स्थानीक वेळा प्रमाण मानली जाईल. त्यामुळे शबे ‘कद्र’चा लाभही स्थानीक वेळ प्रमाणित मानल्याने, शिल्लक राहतो आणि जगातील सर्व भागातील इबादत करणाऱ्यांना तो  मिळू शकतो. ‘रुह’ने अभिप्रेत ‘रुहूल अमीन’आहेत. ही हजरत जिब्रईल (अ.) यांची पदवी आहे. त्यांचा उल्लेख विशेषकरून यासाठी केला गेला आहे की ते फरिश्त्यांचे (देवदुतांचे) सरदार  आहेत. त्यावेळची परिस्थिती नजरेसमोर यावी, जेव्हा फरिश्ते अल्लाहचा संदेश घेऊन उतरत होते. प्रत्येक आज्ञा घेऊन उतरतात याचा अर्थ हा आहे की, ‘शबे कद्र’मध्ये फरिश्ते अकारण  उतरले नव्हते. उदा. कुरआनच्या पाच आयतींना ज्या सुरए ‘अलक’च्या सुरुवातीच्या आयती आहेत उतरविणे, मक्केमधील ‘हिरा’ गुहेत उतरणे, ह. मुहम्मद (स.) यांच्यावर अल्लाहची  वह्यी (संदेश) उतरवून, त्यांना प्रेषितत्वाची वस्त्रे देणे, त्याच्यामध्ये वह्यी ग्रहन करण्याची व तिला योग्य प्रकारे वाचण्याची पात्रता निर्माण व्हावी म्हणून त्यांना आपल्या हृदयांशी धरून  कवटाळणे, याशिवाय कल्याण व समृद्धी उतरविण्यासंबंधी देवदुतांना जे आदेश दिले गेले होते, त्यापैकी प्रत्येक आज्ञेचे त्यांनी योग्यप्रकारे पालन केले. कुरआन उतरविण्याच्या समयी  आकाशावर कडक पहारे बसविण्यात आले होते. शैतानांनी व्यत्यय आणू नये, त्यांना आकाशात काही ऐकण्याची संधी मिळू नये म्हणून पहारे बसविले होते. कुरआन अवतरण्यापूर्वी  कोणालाही ही खबर नव्हती की अल्लाहचा संदेश अवतरणार आहे. अशाप्रकारे अल्लाहने त्या रात्री (कद्र) कुरआन उतरविले तिला सर्व प्रकारच्या संकटापासून सुरक्षित राखण्याची व्यवस्था  केली होती. त्या रात्रीला पूर्णपणे शांततेची रात्र बनविले होते. ही मंगलरात्र पवित्र कुरआनच्या उद्घाटनाची रात्र होती, जी ‘शबे कद्र’ म्हणून साजरी केली जाते. ‘कद्र’च्या रात्री  सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत शांततेचा व समृद्धीचा वर्षाव होत असतो आणि म्हणूनच ही संपूर्ण रात्र इबादतीस पात्र आहे. या रात्री जो ग्रंथ अवतरण झाला (कुरआन) तो ही पूर्णपणे शांततेचाच ग्रंथ आहे, कुरआन हा मानवजातीस शांततेचा संदेश आहे. याचा स्वीकार करणारे भौतीक जगात शांततेचे जीवन जगतील आणि परलौकीक जीवनात त्यांना चिरस्थायी शांतता  लाभेल.

हज’चा अर्थ होतो पवित्र स्थानाला भेट देणे. या उपासनापध्दतीला हज असे म्हणतात, कारण त्यात पवित्र स्थान काबागृहाची यात्रा अभिप्रेत आहे.
महत्त्व: प्रत्येक श्रध्दावंताचे कर्तव्य आहे की त्याने आयुष्यात एकदा हजयात्रा करावी, जर तो प्रौढ असेल आणि त्याची तितकी आर्थिक क्षमता असेल. एखादी प्रौढ आणि आर्थिक सक्षम व्यक्ती काबागृहाची यात्रा (हज) करत नाही तर ती व्यक्ती आज्ञाधारक (मुस्लिम) राहण्याचा दावा करू शकत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘लोकांवर अल्लाहचा हा हक्क आहे की या गृहापर्यंत पोहोचण्याची ऐपत आहे त्याने त्याची हजयात्रा करावी आणि जो कोणी या आदेशाचे पालन करण्यास नकार देईल त्याने समजून असावे की अल्लाह सकल जगवासियांपासून निरपेक्ष आहे.’’ (कुरआन ३: ९७)
वरील कुरआनोक्तीला स्पष्ट करताना खालील हदीस (प्रेषितवचन) आहेत,
‘‘जर एखाद्या व्यक्तीला सशक्त कारण नसेल अथवा जालीम राज्यसत्तेमुळे हजयात्रा करणे अशक्य आहे, हेसुध्दा कारण नसेल तर ती व्यक्ती यहुदी अथवा इसाईप्रमाणे मृत्यु पावली तरी काही एक फरक पडणार नाही.’’
‘‘आदरणीय उमर (रजि.) यांच्यानुसार, अशी व्यक्ती यहुदी अथवा इसाईप्रमाणे मरण पावली (हे शब्द तीनदा उच्चारले गेले) जिला आर्थिक सुबत्ता आहे आणि हजयात्रा करणे सुकर आहे तरी हजयात्रा न करता मृत्यु आला.’’
याविरुध्द ज्याने हजयात्रा गांभीर्यपूर्वक व्यवस्थितरित्या पार पाडली अशा व्यक्तीची वाखाणणी करताना स्पष्ट करण्यात आले आहे की या पवित्र कार्याव्यतिरिक्त अधिक चांगले कृत्य दुसरे असूच शकत नाही.
अशा प्रकारच्या मान्यताप्राप्त हजयात्रेसाठी स्वर्ग हेच एकमेव पारितोषिक आहे.
‘‘जो हजयात्रेला जाऊन तेथे कोणतेही पाप आपल्या हातून करीत नाही आणि विधीपूर्वक सर्व हजकार्य व्यवस्थित पार पाडतो तो नुकत्याच जन्मलेल्या बालकाप्रमाणे निरागस बनून परत येतो.’’ (बुखारी)
अल्लाह आणि त्याचे प्रेषित (मुहम्मद स.) यांनी हजयात्रेला इतके महत्त्व का दिले आहे? हजयात्रेव्यतिरिक्त एखाद्याचा मुस्लिम (आज्ञाधारक) राहण्याचा दावा खोटा कसा ठरतो? हजयात्रेने स्वर्गप्रवेश सुकर कसा बनतो? या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी आपणास हजयात्रा म्हणजे काय हे सर्वप्रथम पाहावे लागेल. इस्लाम धर्माच्या आत्म्याशी हजयात्रेचा कसा संबंध आहे, इस्लामी चारित्र्यसंवर्धनकार्यात हजयात्रेला काय महत्त्व आहे? अल्लाहची उपासना करण्यात व्यक्तीला हजयात्रेमुळे काय मदत मिळते? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपणास खालील दोन प्रश्नांची उकल करून घ्यावी लागेल. प्रथम काबागृह म्हणजे काय, जिथे लोक हजयात्रेला जातात? ते कशासाठी बांधले गेले? त्याचा इस्लामशी संबंध काय? आणि दुसरे म्हणजे हजयात्रेत कोणते धर्मविधी पार पाडले जातात आणि त्यांचा हेतु काय? हे सर्व मुद्दे अभ्यासले गेले तर स्पष्ट होईल की हजयात्रेला इस्लाममध्ये अनन्यसाधारण महत्त्व का आहे.

- प्रा. खुर्शीद अहमद
    11 सप्टेंबर 2001 हा दिवस अमेरिकेच्या इतिहासात काळा दिवस आहे. ह्या घटनेने अमेरिकेलाच नाही तर पाश्चात्य जगताला सुद्धा हलवून सोडले. अमेरिकेची ही एकशे दहा मजली इमारत आर्थिक सत्ता केंद्र होती. अमेरिकेची सशक्त अर्थ व्यवस्था, संपन्नतेचे प्रतीक होती.
    विश्वव्यापी भांडवलशाहीचे वैभवशाली प्रतिरूप म्हणजे वर्ल्डट्रेड सेंटर होते. याविषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तकात केली आहे जेणेकरून वास्तवता वाचकाच्या समोर यावी आणि वाचकास निर्णया प्रत येण्यास मदत व्हावी.

आयएमपीटी अ.क्र. 121   -पृष्ठे - 24     मूल्य - 10      आवृत्ती 

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/6yip84dic1668zm6n0arh12j9khp5ay4


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget