Latest Post

cuffs
शासन, सत्ता आणि अधिकार हाती आले की राजकारण्यांना अपराध आणि गुन्हेगारीचे रान मोकळे झाले समजा. कारण त्यांच्या हाती सत्ता असते. शिवाय त्यांच्यापैकी बरेचजण गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगताशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे शिक्षण नसताना आणि कोणतीही योग्यता व पात्रता नसताना भविष्य बनविण्याचा सर्वांत सोपा आणि सरळ उपाय म्हणजे राजकारणच. गुंडगिरी, दादागिरी करणारे, समाजासाठी उपद्रवी ठरलेले आणि जनतेचे आर्थिक, मानसिक आणि लैंगिक शोषण केलेले लोक, त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात शिक्षण नसल्याने काहीही करता येत नसलेले लोकच राज्याची खुर्ची बळकावलेले असल्याचे सध्या पाहायला मिळते. चौथी-पाचवी पास-नापास असलेले लोक थेट मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होत असल्याचा किळसवाणा इतिहासही या गोष्टीची साक्ष देतो. यामुळे याचे दुष्परिणाम संपूर्ण मानवजातीलाच भोगावे लागत आहेत.
मात्र इस्लामची अशी शिकवण आहे की अपात्र आणि दुराचारींना मुळीच शासकीय हुद्दा देता कामा नये.
प्रेषित मुहम्मद(स.) यांना एकदा विचारण्यात आले की, ‘‘हे जग कधी नष्ट होईल?‘‘
यावर प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले की, ‘‘जेव्हा अनामत नष्ट करण्यात येईल तेव्हा जग नष्ट होण्याची वाट पाहा.‘‘
लोकांनी विचारले की, ‘‘अनामत नष्ट होणे म्हणजे काय?‘‘
‘‘जेव्हा देशाचे शासन नालायक आणि अपात्र लोकांच्या हाती येईल, तेव्हा जग नष्ट होण्याची वाट पाहा!‘‘ प्रेषित मुहम्मद(स.) उत्तरले.(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
या प्रेषितवचनांवरून हे लक्षात येते की हे केवळ जग नष्ट होण्याचे संकेत अर्थात महाप्रलयाचे भयानक चित्र आहे. अर्थातच जेव्हा एखाद्या अपात्र आणि नालायक व्यक्तीच्या हाती अधिकार अगर शासनव्यवस्था येते, तेव्हा ती व्यक्ती जनतेला सळो की पळो करून सोडते. सर्वत्र अंधेर नगरी आणि चौपट राजा याचे प्रत्यक्ष चित्र डोळ्यांना पाहण्याचे दुर्दैव ओढावते. जनता इतकी वैतागून जाते की, या लाजिरवाण्या जगण्यापेक्षा मेलेले बरे, असे वाटू लागते. म्हणूनच जनतेचे सर्वप्रथम कर्तव्य हेच आहे की, निवडणुकांच्या वेळी राजकारण्यांच्या गुंडगिरीला न घाबरता आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता विवेकबुद्धीचा वापर करूनच मतदान करावे.
चारित्र्यवान संघटित समाजाची आवश्यकता
समाज सुसंघटित नसला आणि त्यातून नीतिमत्ता आणि चारित्र्यशीलता संपली की, गुन्हेगारी बोकाळत असते. एक काळ असा होता की, माणूस आपले चारित्र्य जपत होता, त्याच्यावर समाजाचा वचक होता. गुन्हेगारी करण्याचा विचारसुद्धा कोणाच्या ध्यानीमनी येत नसे. मात्र आज समाज हा विखुरलेला, आपली वचक आणि धाक हरवून बसलेला आहे. प्रत्येकजण स्वातंत्र्याच्या झिंगेत सर्व काही करायला मोकळा झाला आहे. त्याला समाजाला जाब देण्याची जाणीव तर संपलीच शिवाय सामाजिक बांधिलकीसुद्धा नष्ट पावली आहे. सामाजिक आणि नैतिक मूल्यांची ऐशी-तैशी झाली आहे. यामुळे समाजविघातक प्रवृत्तींना बळ मिळत आहे. अशा या बिकट आणि संकटमय परिस्थितीत मात्र समाजबांधणीचे आणि सकारात्मक व नैतिक मूल्ये जोपासण्यासाठीचे कार्य करणे गरजेचे झाले आहे. यासाठीच प्रेषित मुहम्मद(स.) यांनी वारंवार ताकीद केली आहे की सामूहिकता हा मानवतेचा प्राण आहे. सामाजिकतेपासून विभक्त होता कामा नये. जो माणूस स्वतःला समाजापासून विभक्त करतो, त्याचा नाश उपस्थित आहे. प्रेषितांनी हेच तत्त्व या शब्दांत स्पष्ट केले आहे,
‘‘सैतान हा मानवांसाठी लांडगा आहे.(अर्थात शत्रु आहे) लांडगा हा कळपातून एकाकी पडलेल्या शेळीचा फडशा पाडतो, त्याचप्रमाणे समाजविभक्त माणसाची स्थिती असते. म्हणून तुम्ही आपसात गटबाजी करू नका, जमात अगर समाज आणि मस्जिद ह्या तुमच्या संघटिततेसाठी अत्यावश्यक बाबी आहेत.‘‘ (संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्नदे अहमद)
इस्लामी विचारवंतांनी म्हटले आहे की, ‘‘समाजातील उपद्रवी घटक नष्ट करायचे असतील आणि गुन्हेगारीचे निर्मूलन करायचे असेल तर चारित्र्यवान सुसंघटित समाज असल्याशिवाय हे शक्य नाही.”(संदर्भ : प्रस्तावना, इब्ने अब्दुल बर, २१/२७५)
इस्लामचे थोर विचारवंत ‘इब्ने तैमिया‘ यांनी म्हटले आहे की,
‘‘सामाजिकता आणि सहकाराशिवाय मानवी गरजांपूर्ण होऊ शकत नाहीत. मानवी गरजांची पूर्तता दोन गोष्टींवर अवलंबून आहे, प्रथम हितांची जोपासना आणि उपद्रवांचा खातमा. त्याचप्रमाणे यासाठी या गोष्टीची आवश्यकता आहे की, लोकांनी समाजाच्या नैतिक बंधनात राहावे, सुसंगठित राहावे. मात्र याबरोबरच समाज चालविण्यासाठी एका सुनियोजित व्यवस्थेची नितांत गरज असते आणि ही समाजव्यवस्था अगदी स्पष्ट नियम व तत्त्वावरच शक्य असते. या ठिकाणी हे मात्र विसरता कामा नये की, हे स्पष्ट नियम केवळ इस्लामनेच प्रदान केले आहेत. म्हणून गुन्हेगारीचे समूळ निर्मूलन हे इस्लामी समाजव्यवस्थेतच शक्य आहे. ईश्वराने म्हटले आहे की, ‘‘आम्ही(ईश्वराने) प्रेषितांना स्पष्ट संकेत आणि मार्गदर्शनासह पाठविले आहे आणि त्यांच्यासोबत ग्रंथ आणि प्रमाण पाठविले, जेणेकरून लोक न्यायावर कायम राहावेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हदीद - २५)
सुसंघटित आणि सदाचारी समाज उभा करण्यासाठी केवळ लोकांचा बाजार गोळा करून चालत नाही, अथवा एखाद्या क्षणिक गरजेपुरते, केवळ ऐहिक आणि भौतिक गरजेपोटी समाजास संघटित करून चालणार नाही. तर यासाठी मजबूत नैतिक आधार आणि मूल्यांची गरज आहे. इस्लामी सामुदायिकतेचा आधारसुद्धा तोच आहे, जो प्रेषितत्त्वाचा उद्देश आहे. अर्थातच मानवजातीसाठी सौभाग्यप्राप्ती आणि हितांची जोपासना करणे होय. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे प्रेषिता! आम्ही(स्वयं ईश्वराने) तुम्हाला समस्त जगवासीयांसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे.‘‘ (संदर्भ : सूरह-ए-अंबिया - १०७)
सारांश
उपरोक्त स्पष्टीकरणावरून हे लक्षात येते की इस्लामने गुन्हेगारी निर्मूलनाचे जे उपाय योजिले आहेत, ते क्षणिक आणि अस्थायी स्वरुपाचे नसून अर्थपूर्ण आणि स्थायी आहेत. एवढेच नव्हे तर गुन्हेगारी निर्मूलनासाठी इस्लामशिवाय पर्यायच नाही. शिवाय इस्लाममुळे केवळ गुन्हेगारीचे निर्मूलनच होत नाही, तर माणसाच्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सार्थक होऊन दोन्ही लोकी सुख, समाधान, शांती आणि वास्तविक यश प्राप्त होते आणि हेच इस्लामचे प्रमुख उद्दिष्ट होय. कारण माणूस जोपर्यंत गुन्हेगारीपासून स्वतःला दूर ठेवीत नाही, अन्याय व अत्याचार आणि दुष्कर्म सोडून सत्य, न्याय आणि सदाचाराचा मार्ग अवलंबत नाही, अर्थात इस्लामी मार्गावर आपले जीवन व्यतीत करीत नाही, तोपर्यंत ईश्वर प्रसन्न होत नाही आणि जर ईशप्रसन्नतेची आसच नसेल, तर तो कोणत्या अर्थाने मुस्लिम होऊ शकेल? हीच बाब कुरआनात अशा शब्दांत व्यक्त करण्यात आली आहे,
‘‘बरे हे कसे शक्य आहे की, जो मनुष्य नेहमी अल्लाहच्या मर्जीप्रमाणे वागणारा आहे, तो त्या माणसाप्रमाणे कृत्ये करील, जो अल्लाहच्या कोपाने वेढला गेला आहे, आणि ज्याचे अंतिम ठिकाण नरक आहे, जे अत्यंत वाईट स्थान आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-आलि इम्रान - १६२)
म्हणजेच ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्याची तीप आस आणि कामना ही सर्वच गुन्हेगारी निर्मूलनाचे आणि सदाचारी, सुख-समाधानी तसेच यशस्वी जीवनाचे मूळ आहे.
दुसरी लक्षणीय गोष्ट अशी की, इस्लामी शिकवणीचा लाभ हा त्यावर आचरण केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. केवळ इस्लामी नियम अगर विधानाचे प्रगल्भ ज्ञान आत्मसात केले आणि कृतीच मात्र केली नाही, तर काहीच उपयोग होणार नाही. डॉक्टरने कितीही प्रभावी औषध दिले आणि त्या औषधांची व उपचारपद्धतींची केवळ माहितीच ठेवली आणि त्याच्या उपचारपद्धतीनुसार औषध घेतलेच नाही तर आजार बरा होण्याची आशा बाळगणे हे मूर्खपणाचे लक्षण ठरेल. असेच हे देखील आहे. गुन्हेगारी निर्मूलनाचे इस्लामी उपाय अमलात आणल्याशिवाय काहीही शक्य नाही.

Justice hammer
इस्लामने ज्याप्रमाणे इतरांचे प्राण घेण्याची शिक्षा तजवीज केली आहे, त्याचप्रमाणे शारीरिक क्षती पोचविण्याची, अवयव कापण्याची वा इतर प्रकारची शारीरिक पीडा देण्याचीसुद्धा शिक्षा लागू केली आहे. अर्थातच या शिक्षेस ‘किसास‘(बदला घेण्याची) शिक्षा, ‘दैयत‘(खून वा क्षतीभरपाईची) शिक्षा म्हटले गेले आहे. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,‘‘आणि तौरातमध्ये यहुद्यांवर हा आदेश लिहिण्यात आला होता की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्वच जखमांसाठी बरोबरीचा बदला होय. मग जो ‘किसास‘चा सदका करील. ते त्याच्याकरीता प्रायश्चित्त आहे आणि जे ईश्वराच्या कायद्यानुसार निवाडा करीत नाहीत, तेच अत्याचारी आहेत.”(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ४५)
जखम व तिचे प्रकार
इस्लामी कायद्यात जखमांचे विविध प्रकार वर्णन करण्यात आलेले असून त्यांचा दर्जा ठरविण्यात आला आहे.
 1. एखादा अवयव शरीरापासून विभक्त करणे, उदाहरणार्थ, हात कापणे, डोळा फोडणे वगैरे.
 2. शरीराचा एखादा अवयव निकामी करणे. उदाहरणार्थ, एखाद्या अवयवास अशाप्रकारे क्षती पोचविणे की, तो निकामी व्हावा. म्हणजेच ऐकू न येणे, हाताने पकडता न येणे, पायाने चालता न येणे, डोळ्याने न दिसणे, कानाने ऐकू न येणे, समागम करता न येणे, बोटांनी पकडता न येणे वगैरे.
 3. शरीराच्या वरच्या भागावर अथवा चेहर्यावर जखम करणे. यात रक्त वाहणे, मांसाचा लचका तोडणे वगैरे सामील आहे.
 4. डोक्याच्या खाली जखम करणे. उदाहरणार्थ छाती व पोट फाडणे, क्षती पोचविणे वगैरे.
 5. मामुली चोप देणे वगैरे.
शारीरिक जखमांवर लागू करण्यात आलेली शिक्षाहत्येप्रमाणेच शारीरिक क्षती पोचविण्याच्या शिक्षेसाठी अटी व शर्ती लागू आहेत. यामध्येसुद्धा जाणूनबुजून, चुकून व नकळत होणार्या हत्येच्या अपराधांप्रमाणेच शिक्षा लागू करण्यात आली आहे.
जखम पोचविण्याची शिक्षा ‘किसास‘ होय
अर्थातच ‘किसास‘ म्हणजे बदला आणि तोही तंतोतंत. जेवढ्या प्रमाणात जखम करण्यात आली असेल, अगदी त्याच प्रमाणात अपराध्यास जखम करून शिक्षा देण्यात येईल, किंवा क्षतीग्रस्ताने संमती दिल्यास ‘दैयत‘ म्हणजेच जखमेची आर्थिक भरपाई देण्यात येईल अथवा क्षतीग्रस्ताने माफ केल्यास अपराध्यास माफ करण्यात येईल.

- विजय गोपाल मंगल
   
    या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत.
    कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण आणि मृत्यूनंतर काय होईल याविषयी सावध करण्यात आले आहे. हे पुस्तक भ्रष्टाचार समाप्त करण्यास, सांप्रदायिक तणाव नष्ट करण्यास आणि विश्वबंधुत्व वाढीस लागण्यास उपयुक्त असे आहे. अट हीच आहे की वाचकाने या पुस्तकाचे पूर्णत: निरपेक्षपणे अध्ययन करावे.

आयएमपीटी अ.क्र. 186     -पृष्ठे - 16     मूल्य - 10                आवृत्ती - 2 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/wxs34ou4l1pxmhlfsy1vi579i9usag2m

माननीय अबू राफेअ (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एक उंट एका व्यक्तीकडून कर्जस्वरूपात घेतला, मग पैगंबरांजवळ जकातस्वरूपात काही उंट आले तेव्हा  त्यांनी मला आदेश दिला, ‘‘त्या व्यक्तीला तो उंट देऊ?’’ मी म्हणालो, ‘‘या उंटांमध्ये फक्त एकच उंट खूप चांगला आहे आणि सात वर्षांचा आहे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तोच त्याला द्या,  कारण उत्तमप्रकारे कर्जफेड करणारा मनुष्य उत्तम असतो.’’ (हदीस : मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सधन कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यात टाळाटाळ करणे अत्याचार आहे आणि जर कर्जदार  ‘‘अमुक सधन व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करून घ्या’’ असे म्हटल्यास विनाकारण कर्जदाराच्या डोक्यावर स्वार होता कामा नये, त्याचे हे म्हणणे मान्य करावे आणि ज्याचा त्याने  हवाला दिला आहे त्याच्याकडून कर्जाची परतफेड करून घ्यावी.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
मनुष्याजवळ कर्जफेड करण्यासाठी काहीही नसेल आणि तो म्हणाला की ‘‘जा अमुक व्यक्तीकडून कर्जाची परतफेड करून घ्या. आमच्यात त्याबाबत बोलणी झालेली आहे. तो कर्जफेड  करण्यास राजी आहे.’’ तेव्हा कर्ज देणाऱ्याने असे म्हणू नये की ‘‘मी तर तुझ्याकडूनच कर्जफेड करून घेईन. मी दुसऱ्या कुणाला ओळखत नाही.’’ इतकेच नव्हे तर त्याच्याशी मृदु स्वरात  बोलावे आणि ज्याचा तो हवाला देत आहे त्याच्याकडून कर्जफेड करून घ्यावी.

माननीय अबू हुरैरा यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य लोकांचा माल (कर्जाच्या स्वरूपात) घेईल आणि तो त्याच्या परतफेडीची मनोकामना बाळगत  असेल तर अल्लाह त्याच्याकडून त्याची परतफेड करील आणि ज्या मनुष्याने माल कर्जाच्या स्वरूपात घेतला आणि त्याच्या परतफेडीची मनोकामना नसेल तर अल्लाह त्या कारणास्तव  त्या मनुष्याचा विनाश करील.’’ (हदीस : बुखारी)

माननीय शरीद सुलमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘कर्ज परतफेड करू शकणाऱ्याचा (न फेडण्यासाठीचा) बहाणा त्याच्या अब्रूला आणि त्याच्या  शिक्षेला वैध ठरवितो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

‘अब्रू’ला वैध ठरविणे म्हणजे जो मनुष्य कर्ज घेतो आणि कर्ज परतफेड करण्याची क्षमता असूनदेखील परतफेड केली नाही तर त्याचा हा अपराध आहे की समाजाच्या दृष्टिकोनातून  त्याला लज्जित केले जाऊ शकते आणि त्याला शिक्षा दिली जाऊ शकते. जर एखाद्या देशात इस्लामी कायदा असेल आणि तेथे एखादा असा मनुष्य आढळला तर इस्लाम कायद्याची  अंमलबजावणी करणारे त्याला शिक्षा देऊ शकतात आणि त्याला अपमानीत करण्याची दुसरी पद्धतदेखील अवलंबिली जाऊ शकते.

आपले जे बंधु राजकीय सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत, त्यांनी चांगले समजून घ्यायला हवे की ते या देशाचे मालक नाहीत. त्या खुर्चीवर निरंतर बसून राहण्याचा त्यांनी ठेका घेतलेला नाही. ते ईश्वराला या देशाचा स्वामी मानत असोत अथवा जनतेला स्वामी मानत असोत, एक दिवस त्यांना ही खुर्ची सोडावी लागणार आहे. त्या खुर्चीचे कर्तव्य त्यांनी कितपत पार पाडले, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. ईश्वराला जर ते देशाचा स्वामी मानतात व स्वतःला त्याचा प्रतिनिधी, त्याच्याबद्दलच्या सर्व उत्तरदायित्वाची नीट जाणीव ठेऊन त्याच्या इच्छेनुसार कार्य केले, तर ती वास्तवतेची स्वीकार ठरेल. तुमचे जीवन एक जबाबदार जीवन ठरेल आणि तुमचा सर्व व्यवहार संतुलित असेल. सत्तेच्या त्या मदापासून तुम्ही पूर्णतः अलिप्त असाल, जी भल्याभल्यावर आपला अंमल चढवून त्यांना मदांध व बेहोश करुन सोडते. तुम्ही जनतेला जर, देशाचे स्वामी मानत असतात, तर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी या नात्याने काम केले पाहिजे. कसल्या दुष्कृत्याला जनतेने कधी क्षमा दाखविली नाही. तुमच्या प्रत्येक कृतीवर इतिहासकारांची नजर आहे. सद्यस्थितीत दोन्ही गोष्टी तुमच्या आखत्यारीत आहेत. तुम्ही असे कार्यही करु शकता की त्यासाठी अनेक पिढ्या तुमच्या कृत्यांवर अभिमान बाळगतील, इतिहासकार आदरपूर्वक तुमचे नाव उच्चारील. तसेच तुम्ही अशी कृतीही करु शकता, ज्यामुळे तुमच्या नावावर भावी पिढ्या थुंकतील व इतिहासतज्ज्ञ आपल्या कृत्यांना ‘काळी कृत्ये’ म्हणून संबोधतील नीट ध्यानात ठेवा. सत्तेच्या खुर्चीवर असताना तुम्हाला स्वतःची जी छबी दिसते, ती तुमच्या प्रतिमेचे खरे चित्र नव्हे. तुमची खरी प्रतिमा उद्या इतिहासकाराच्या लेखणीतून उतरेल.सत्ता मिळविण्याच्या लालसेने झपाटलेल्या आणि त्यासाठी न्याय, अन्याय, उचित, अनुचित या बाबी धाब्यावर बसवून आटापिटा करणार्यांनीही ही गोष्ट चांगली लक्षात ठेवावी.
 
मुसलमान, देशाची आवश्यकता ठरु शकतात
या समयी भारत देश सैध्दान्तिक व व्यावहारिक गदारोळाच्या वावटळीत आहे. अशी अवस्था कोणत्याही देशात, एक निश्चित दिशा घेण्याआधी होत असते. एका बाजूला युरोपचे भौतिकवादी विचार व दृष्टिकोन आहेत, जे या देशावर लादले जात आहेत आणि याच विचारांवर आधारित व्यावहारिक पध्दती बनल्या आहेत. राजकीय सत्तेच्या बळावर या देशाला त्यांच्या मुशीत ओतले जात आहे. दुसर्या बाजूला देशाची प्राचीन, धार्मिक व नैतिक प्रकृती आहे. या प्रकृतीचे जठर अद्याप नास्तिकवादाची व भौतिकवादाची माशी पचवू शकण्यास पूर्णतः तयार नाही. नंतर धार्मिक स्वभाव असलेल्या जाती, काही कारणास्तव देशासमोर अशी गोष्ट माडण्यात असफल ठरल्या आहेत. ज्याची आवश्यकताही आहे आणि मागणीही आहे. त्या गोष्टीच्या आधारावर एखादी अशी व्यवस्था स्थापित व्हावी, जिच्यामुळे लोकांची भौतिक भूकही भागावी आणि त्यांची नैतिक व आध्यात्मिक तहानही शमली जावी. या गोष्टींच्या अभावाने देशात असंख्य गुंतागुंतीच्या समस्या निर्माण करुन सोडल्या आहेत आणि संपूर्ण देश भांबावलेल्या अवस्थेत उभा आहे.
या संधीत पुढे सरसावून ती उणीव भरुन काढणे मुसलमानांचे काम होते, कारण त्यांच्यापाशी ती गोष्ट आहे, जिची देशाला आणि देशबांधवांना अत्यंत आवश्यकता आहे. पण दुःखाची बाब अशी की देशातील गुंतागुंततीच्या समस्या सोडविणारे होण्याऐवजी, मुसलमान स्वतःच एक समस्या बनून राहिले आहेत. मुसलमानांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे सोडून दिले आणि सारा भारत देश काटेरी झुडुपांनी व्यापून गेला आणि सर्वाधिक काटेरी भाग खुद्द त्यांच्या वाट्याला आला आहे.
मुसलमानांच्या वर्तमान स्थितीचे विवेचन करताना एका विचारवंताने त्यांना अगदी सत्य असे सांगितले आहे की ‘तुमचा वर्तमानकाळ वा तुमचा भविष्यकाळ या प्रश्नावर अवलंबून आहे की ईश्वराच्या प्रेषिताकरवी, तुम्हापर्यंत पोचलेल्या ईशमार्गदर्शनाशी तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवहार करीत आहात, ज्या मार्गदर्शनासाठीच तुम्हाला मुसलमान म्हटले जाते? त्या मार्गदर्शनाचे जर तुम्ही अचूक अनुसरण केले आणि तुमच्या सामूहिक जीवनात जर संपूर्ण इस्लामचे प्रतिबिब उमटू लागले, तर तुम्ही जगात विजय प्राप्त कराल, तसेच परलोकात सफलता मिळवाल. भय, अनादर, पराजय व पारतंत्राचे जे काळे ढग तुमच्या डोक्यावर गोळा झाले आहेत ते बघता बघता निघून जातील. तुमच्याकडून न्यायाची आशा केली जाईल, तुमच्या सत्यप्रियतेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास टाकला जाईल. तुमचे कथन सत्याचे प्रमाण मानले जाईल. तो काळ आठवण म्हणून इतिहासात एखाद्या कथा-कहाणीच्या स्वरुपात राहील की इस्लामसारख्या विश्वविजयी शक्तीचे अनुयायी कधी काळी इतके मूर्ख बनले होते की ‘मुसा’ (अलै) ची काठी (असा) त्यांच्या हातात असताना ते जादुगारांच्या काठ्यांना आणि दोरांना पाहून भयाने थरथर कापत होते.
उपद्रवातून कल्याण
मुसलमानांच्या सर्व समस्यांचे वास्तविक निराकरण यात आहे. त्यांच्या तात्कालिक आणि प्रासंगिक समस्यांचे तसेच निरंतरच्या जातीयवादाच्या समस्यांचेही हेच निराकरण आहे. निःसंशयपणे देशाच्या समस्यांचा तोडगाही हाच आहे. त्यांच्यावर जी निरनिराळी संकटे येऊन कोसळत आहेत, ती एकीकडे त्यांनी आपले वास्तविक कर्तव्य विसरुन टाकले, या निष्क्रियतेची ती शिक्षा आहे आणि दुसरीकडे त्यांना खडबडून जागृत केले जात आहे. आता तरी सावरून सावध व्हा आणि आपले कर्तव्य पार पाडा नाही तर तुम्हाकडे दुर्लक्ष केले जाईल.
लोकसमूहात जिवंतपणा व चेतना असेल, तर असे हादरे त्यांना जागे करुन सोडतात. अशा दुर्घटनातून लाभ घेण्याची त्यांच्यात क्षमता जर असेल, तर ते जागे होऊन, याच दुर्घटनांना उन्नतीची पायरी (शिडी) करुन टाकतात. भडकणारा अग्नी वार्याच्या झोताने जास्त भडकतो, परंतु मिणमिण जळणारा दीप त्याच वार्याने विझुन जातो. आता तुम्ही भडकणारा अग्नी व्हायचे की मिणमिणणारा व विझणारा दीप व्हायचे हा तुमच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. या उपद्रवामुळे कल्याणाची उत्पत्ती होऊ लागली आहे आणि त्यासाठी ईश्वराचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. आता मुसलमान लोक वस्तुस्थितीवर गंभीरपणे विचार-चितन करु लागले आहेत. तिच्या गांभीर्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि झोपेतही ते काही बरळू लागले आहेत.
एका पाठोपाठ एक असे धक्के बसल्याने त्यांचे डोळे उघडले आहेत. ते आपल्या वास्तविक कर्तव्यापासून दूर भरकटले आहेत, ही जाणीवही त्यांच्यात जागृत होऊ लागली आहे. संपूर्ण संघटन करण्याच्या आवश्यकतेची जाणीवही त्यांच्यात उत्पन्न होऊ लागली आहे. त्यांच्या मनात आपल्या अन्न-वस्त्राच्या विवंचनेच्या पुढे जाऊन काही तरी करायला हवे, हा विचारही कधी शिवला नाही, त्यांनाही संघटनेच्या आवश्यकतेची जाणीव होऊ लागली आहे. त्यांच्यात अनेक अशी माणसे आहेत की एका हाकेवर ओ देण्याची कळकळ त्यांच्या अंतःकरणात आहे, त्यांच्या स्वभावाशी जुळणारी हाक त्यांच्या कानी पडत नाही. आता ‘मुस्लिम समुदाया’च्या ज्येष्ठ व्यक्तींचे हे कर्तव्य आहे की अशा नाजुक प्रसंगी त्यांनी ‘मिल्लत’ला उचित मार्गदर्शन करावे आणि वाईटातून चांगले निघण्याचा जो पैलू समोर येत आहे, उम्मतमध्ये एक प्रकारची तहान निर्माण झाली आहे, तिच्या तृप्तीची तरतूद करावी. देशव्यापी पातळीवर मुस्लिमांना असा कार्यक्रम द्यावा की ते पालापाचोळ्याप्रमाणे उडवून दिले जावू नयेत. त्यांना जीवनशक्तीही प्राप्त व्हावी आणि त्यांनी देशासाठी उपयोगी सिध्द व्हावे.
तात्कालिक व स्थानीय उपाय
वर वर्णन केलेले कार्य, हेच खरे कार्य आहे, परंतु तात्कालिक व स्थानिक पातळीवर करण्याची काही कामे अशी आहेत, ज्यावर सहानुभूती बाळगणार्या लोकांनी लक्ष ठेवायला हवे.
 1. दंगलग्रस्त क्षेत्रात साधारणतः भीतीचे व हालअपेष्टांचे वातावरण बनते आणि भल्याभल्या माणसांची मती कुंठित बनते. त्याचप्रमाणे काही अतिउत्साही माणसे भावनेच्या भरात एखादे अनुचित कृत्य करुन टाकतात. या दोन्ही गोष्टींपासून धोका संभवतो अशी अवस्था दूर करण्याचे ठोस प्रयत्न व्हायला पाहिजेत. या बाबतीत मूळ गोष्ट तर ईश्वरावर भरवसा असला पाहिजे, परंतु त्याचबरोबर अन्य काही गोष्टीही या प्रयत्नात सहाय्यभूत ठरतात. उदाहरणार्थ, ऐकण्यात आलेल्या प्रत्येक अफवेवर विचार केल्याविना विश्वास केला जाऊ नये, आपल्या चुकांवरही लक्ष ठेवणे, विरोधी पक्षाच्या भूमिकेतून दंगलीसंबंधी विचार करणे, चित्राच्या दोन्ही बाजू पाहणे, कृती करणारे हात मूळ नसून, कृती करायला लावणारी मस्तके, मूळ आहे. हे दृष्टीसमोर ठेवायला हवे. अशा प्रकारच्या गोष्टी दृष्टीसमोर ठेवल्याने मानसिक समतोल राहातो आणि समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यास मदत होते.
 2. विरोधी पक्षाकडे स्वतः होऊन मैत्रीचा हात पुढे करणे फार कठीण काम आहे. एखादा माणूस हातात लाठी घेऊन तुमच्या अंगावर धावून येतो तेव्हा तुम्ही त्याला प्रेमाने आलिगन देण्यासाठी समोर जाणे ही मोठ्या शौर्याची गोष्ट आहे. सत्य असे आहे की त्यापेक्षा अधिक परिणामकारक तलवार अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. असे करण्याचे साहस असेल तर ‘खोडसाळपणात स्पर्धा’ करण्याऐवजी ‘सज्जनपणात स्पर्धा’ करण्याचा आरंभ होऊ शकतो. तथापि ही गोष्ट नीट लक्षात ठेवावी की बरोबरीच्या दर्जाने मैत्रीचा हात पुढे करणे आणि निराशेने शरणागत होणे, यात मोठा फरक आहे. आपले अस्तित्व दुसर्याच्या अधीन करणे, यात सज्जनपणाही नाही किवा औदार्यही नाही.
 3. आपसात सहानुभूतीची व सहाय्य करण्याची भावना वाढविणे, दान करण्यास सदैव तत्पर राहाणे, कोणत्याही आधारशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहाण्याचा दृढ संकल्प करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे अधिकांश वाईट गोष्टींचे जे मूळ आहे, ती स्वार्थपरायणता, हट्टीपणा व दुही आणि फाटाफूट दूर करणे आपले अनिवार्य कर्तव्य ठरते. संघटन व नेतृत्वाचे केंद्र नसल्याची केवळ जाणीव व त्याबद्दल केवळ गार्हाणी करुन अगर तसे केंद्रस्थान स्थापण्याची केवळ अभिलाषा बाळगणे पुरेसे नाही. यासाठी प्रांजळपणे प्रयत्न आवश्यक आहे, हे मनावर चांगल्या रीतीने बिबविले पाहिजे. कोणतेही नेतृत्व आकाशातून पडत नाही. आपल्यातूनच ते उदयाला येईल. त्यासाठी उच्छृंखलपणा सोडून, स्वतःला संघटनेच्या चौकटीत बांधून घेण्याची तयारी ठेवायला हवी.
 4. वरील उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी प्रत्येक मोहल्ल्यात समिती स्थापन होणे आवश्यक आहे. या समितीकडे ‘जकात’ व ‘दान’ यांची सामूहिक रीतीने वसुली करण्याची जबाबदारीही सोपविली जावी. ‘बैतुल-माल’ची स्थापना केली जावी. आपल्या कार्यक्षेत्रात शांतता व सलोखा राहील व अशांतता व उपद्रव दाबला जाईल, असे जनमत त्यांनी निर्माण करावे. अशा चांगल्या उद्दिष्टांसाठी तयार करणे आणि त्यांनाही सहकार्य देणे गरजेचे आहे. या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हंगामी परिस्थितीत ज्या शांतीसमित्या स्थापन केल्या जातात, त्यात अधिकांश माणसे तीच असतात ज्यांनी दंगलखोरांची पाठराखण केलेली असते. या समित्यांना एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे साधन केले जाते.
  म्हणून अशा शांति-समित्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधरणतः काहीच सहाय्यकारक ठरत नाहीत. अशा समित्यांमध्ये त्याच लोकांना घेतले पाहिजे जे फार प्रख्यात नसू देत, परंतु स्वहित व पक्षहितापासून वर येऊन केवळ सेवाभावाने व निखालस ईशसेवेच्या भावनेने कार्य करण्याचे त्यांच्यात धैर्य असावे. ही गोष्ट तेव्हाच शक्य होईल, जेव्हा भल्याबुर्याची पारख करणारी नीर-क्षीर वृत्तीची ओळख आम जनतेला होईल.
 5. मदत कार्य नियमितपणे केले जावे अथवा सहानुभूती बाळगणार्या स्वयंसेवी लोकांनी ते कार्य करावे. दंगलपीडितांमध्ये आपल्या जातीचे कोण आहेत आणि दुसर्या जातीचे कोण आहेत, या हीन भावनेने हे सेवाभावी कार्य कधीही गलिच्छ करु नये. ज्या कोणावरही जुलूम-अत्याचार झालेला आहे. तो सच्चा मनाच्या व निःपक्षपाती माणसाच्या सहानुभूतीस व मदतीस पात्र आहे. त्याचप्रमाणे धर्म व जातीचा विचार न करता, अत्याचार करणारांनाही मदत केली जावी त्यांची मदत अशी करायची की त्यांना अत्याचार करण्यापासून रोखण्याचे ठोस प्रयत्न करायला हवेत.
 6. साधारणतः दंगलींचा शेवट, पोलिसांनी खटले भरल्यावर होतो. ते टाळणे तर शक्य नाही. सर्वसाधारण पोलीस प्रकरणात ज्या मार्गाचा अवलंब केला जात असतो, ते जातीय दंगलीसंबंधी खटल्यात कदापि वापरले जाऊ नयेत. खोटे बोलणे, बनावट साक्षीदार हजर करणे, अथवा आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यापेक्षा, खरे बोलून शिक्षा भोगणे हजारपटीने चांगले आहे. ज्या माणसात सत्यावर ठामपणे राहण्याची शक्ती असते, तेच मैदान मारु शकतात. काही ताजी उदाहरणे अशी आढळून आली आहेत की काही धैर्यवान माणसांनी सत्य व निःपक्षपाती जबाब देऊन न्यायालयालाही आर्श्चचकित केले आणि विरुध्द पक्षाच्या लोकांच्या माना खाली गेल्या.
हे काही विचार आहेत, ज्यावर सर्वांनी विचार करावा असे आम्हाला वाटते. सामान्य परिस्थितीतही ते विचार करण्यायोग्य आहेत आणि दंगलीच्या तणावग्रस्त अवस्थेत तर ते कार्यान्वित करणे अत्यंत निकडीचे आहे. सामान्य परिस्थितीतच ते कार्यान्वित करण्याचा प्रबंध केला गेला, तर (ईश्वरी इच्छा असल्यास) तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची वेळच येणार नाही. निष्कर्ष अनेक असू शकतात, परंतु सत्य असे आहे की मूळ गोष्ट हे निष्कर्ष नव्हे, हे सोनेरी सिध्दान्त नव्हेत अगर कार्यक्रमही नव्हेत. तर मूळ गोष्ट आहे अंतःकरणाची ओढ, ईमानची तळमळ, सेवाभावना व सत्यावर दृढपणे राहाण्याचे धैर्य. ईश्वरी कृपेने आपल्या समाजात या गुणांची उणीव नाही. उणीव आहे ती केवळ संघटित होऊन कार्याला वाहून घेण्याची!


एखाद्या माणसाला जीवे मारणे हे किती मोठे पाप आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. एका माणसाची हत्या करणे म्हणजे समस्त मानवजातीची हत्या करण्यासम असल्याचे कुरआनात म्हटले आहे.(संदर्भ : सूरह-ए-माइदा : ३२) म्हणूनच इस्लामने मानवहत्या करण्याची शिक्षासुद्धा कठोर स्वरुपाची दिली आहे. शिवाय ही शिक्षा ईह आणि पारलौकिक या दोन्ही जीवनात तजवीज करण्यात आली आहे. मानवहत्या करणारी व्यक्ती नेहमीसाठी नरकाग्नीत राहणार. कुरआनात म्हटले आहे,
‘‘जो माणूस एखाद्या श्रद्धावंतांची हत्या करील, त्याची शिक्षा नरकाग्नी आहे, ज्यात तो नेहमीकरिता राहणार. त्याच्यावर ईश्वराचा क्षोभ आणि धिक्कार आहे आणि ईश्वराने त्याच्यासाठी अत्यंत कठोर शिक्षा ठेवली आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ९३)

इस्लामी कायद्यात मानवहत्येची शिक्षा विविध पैलूंनी लागू करण्यात आली आहे.
 1. किसास - अर्थात प्राणाच्या बदल्यात प्राण घेणे, म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा देणे.
 2. दैयत - अर्थात खून झालेल्या व्यक्तीच्या वारसांना योग्य खूनभरपाई देणे.
 3. प्रायश्चित्त - यांत गुलाम स्वतंत्र करणे अगर दोन महिने सतत रोजे(इस्लामी उपवास) ठेवणे होय.
 4. वारसासंपत्ती हक्कापासून वंचित ठेवणे-जर खुनी हा खून झालेल्या व्यक्तीचा वारसदार असेल तर ही शिक्षा देण्यात येईल.
 5. वारसापत्राच्या हक्कापासून वंचित ठेवणे-जर मयताने आपल्या संपत्तीमधून काही प्रदान करण्याची सूचना केली असेल तर ते विश्वसनीय नसेल.
कुरआनात म्हटले आहे,
‘‘तौरातमध्ये आम्ही यहूदींवर हा आदेश लिहिला होता की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि सर्व जखमांसाठी बरोबरीचा बदला, मग जो किसासचा सदका करेल, त्याच्यासाठी प्रायश्चित आहे, आणि जे लोक ईश्वराने अवतरित केलेल्या कायद्यानुसार निवाडा करीत नाहीत, तेच अत्याचारी आहेत.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ४५)
तसेच,
‘‘कोणत्याही श्रद्धावंताचे हे काम नाही की त्याने इतर श्रद्धावंताची हत्या करावी. केवळ याऐवजी की त्याकडून चूक घडावी आणि जी व्यक्ती एखाद्या श्रद्धावंताची चुकून हत्या करते, त्याचे प्रायश्चित्त हे आहे की, एका श्रद्धावंत गुलामास मुक्त करावे आणि जर मयत व्यक्ती तुमच्या शत्रुपक्षाची असेल तर याचे प्रायश्चित्त हेच आहे की एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करावा आणि ती मयत व्यक्ती जर मुस्लिमेतर समूहाची सदस्य असेल, ज्याच्याशी तुमचा शांतीकरार असेल तर त्या मयताच्या वारसांना खूनभरपाई देण्यात यावी आणि एक श्रद्धावंत गुलाम मुक्त करावा. मग ज्याला गुलाम मुक्त करण्यासाठी मिळाला नाही, त्याने सतत दोन महिने उपवास ठेवावेत. हे या अपराधाचे प्रायश्चित्त करण्याची पद्धत आहे आणि ईश्वर खूप दयाळू वतत्वज्ञानी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ९२)
हत्येचे प्रकार
शरीअतमध्ये हत्येचे विविध प्रकार वर्णन करण्यात आले असून त्याच प्रकारांनुसार शिक्षा लागू करण्यात आली आहे.
 1. जाणूनबुजून हत्या करणे
  या प्रकारामध्ये खून करणारी व्यक्ती पूर्ण तयारीनिशी आणि जाणूनबुजून माणसाचा प्राण जाईपर्यंत मारते आणि प्राण गेल्यावरच त्याला सोडते. याच्या दोन अटी आहेत. पहिली अशी की मयत जीवंत आणि मानव असावा, अर्थात मृतास ठार करण्यामुळे आणि मयत हा मानव नसेल तर शिक्षा लागू होणार नाही. दुसरी अट अशी की मयत व्यक्तीचे प्राण हल्लेखोराच्या प्रयत्नांमुळे गेलेले असावे. नसता हल्लेखोराच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण न जाता इतर कोणत्याही कारणास्तव गेले असेल तर शिक्षा लागू होणार नाही.
 2. विनाहेतु हत्या होणे

 3. खुन्याने हत्या करण्याच्या उद्देशाने मारले नसेल मात्र खून झाला तर यासाठी गुन्हा सिद्ध होण्याच्या तीन अटी आहेत. पहिली अशी की मयत हा खुन्याच्या प्रयत्नातून मेला असावा, दुसरी अट अशी की खुन्याने मयतावर अतिरेक केला असावा आणि तिसरी अट अशी की मृत्यू आणि मृत्यूच्या सबबीमध्ये संबंध असावा. या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्या तरच खुन्यास शिक्षा देण्यात येईल.
 4. चुकून झालेली हत्या

 5. उदाहरणार्थ, एखादा माणूस सिंहाची शिकार करीत होता आणि बंदुकीची गोळी चुकून एखाद्या माणसाला लागली, तर याला चुकून झालेली हत्या म्हणता येईल.
यामध्ये पहिल्या प्रकारची हत्या केल्यास खुन्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. अथवा दैयत(खून भरपाई), वारसासंपत्तीचा अधिकार न देणे वगैरेची शिक्षा देण्यात येईल. दुसर्या प्रकारची शिक्षा झाल्यास दैयत(खूनभरपाई) प्रायश्चित्त अथवा दंडविधान अथवा दोन महिन्यांचे रोजे(इस्लामी उपवास) ठेवणे, ही शिक्षा लागू होईल. शिवाय अतिरिक्त शिक्षा म्हणून वारसाहक्कापासून वंचित ठेवण्यात येईल. तिसर्या प्रकारची मानवहत्या झाल्यास याची मूळ शिक्षा ही दैयत(खूनभरपाई) आणि प्रायश्चित्त होय. यात अतिरिक्त शिक्षा म्हणून दंड आणि रोजे, तसेच वारसासंपत्तीचा हक्क हिसकावणे होय.
गुन्हा सिद्ध होण्याच्या अटी व शर्तीहत्येचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी निम्नलिखित अटी व शर्ती आवश्यक आहेत.
 1. खुनी हा वयात आलेला, मानसिक स्थिती सुदृढ असलेला आणि स्वतंत्र असावा.
 2. मृत व्यक्तीने कोणाचीही हत्या केलेली नसावी अथवा ती सामरिक द्रोही नसावी अर्थात धर्मयुद्धातील शत्रुपक्षाची नसावी, इस्लाम त्यागलेली विवाहित आणि व्यभिचारी नसावी.
 3. मयत व्यक्तीने खुन्यावर हल्ला केलेला नसावा, म्हणजेच खुन्याने आत्मरक्षण करण्यासाठी मयताचा खून केलेला नसावा.
 4. मयत व्यक्ती ही मुस्लिम असो वा मुस्लिमेतर खुन्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल.
 5. खुनी आणि मयत व्यक्ती समलिंगी असावी.
या अटी व शर्ती पूर्ण झाल्यावरच खुन्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल.

- डॉ. रजीऊल इस्लाम नदवी

    आजची गंभीर समस्या स्त्री भ्रूणहत्या होय. निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे. यामुळे लिंग संतुलन बिघडले आहे. परिणामत: समाजावर अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहेत.
    मुलींना कमी लेखण्याच्या सामाजिक प्रवृत्तीमुळेच स्त्री जन्म नाकारला जात आहे. त्यांच्या अस्तित्वाला मातापिता स्वत:वरील ओझे समझतात. या पुस्तिकेत स्त्री भ्रूणहत्येची कारणे आणि त्यावरील उपाय सांगतांना स्त्री भू्रण हत्या कशी थोपवावी, त्यावरील इस्लामी उपाय कोणते आहेत यावर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 181   -पृष्ठे - 20    मूल्य - 10      आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/9hlr0rshbo1exa9wzr93mvs83p92y59x

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget