Latest Post

Ambition
इन्सान की तलब वहीं पर पूरी होती है
जहाँ से तलब जगाई जाती है
मनुष्य ज्या वातावरणात प्रथम आपले डोळे उघडतो, ते वातावरण त्याला आवडू लागते. लहान बाळ त्याला दिसेल ती वस्तू तोंडात घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच प्रत्येक वस्तू खाण्यासाठीच असते असा त्याचा समज असतो ही त्याची पहिली आकांक्षा असते. मूल जेव्हा थोडेसे वाढते आणि बागडायला लागते तेव्हा त्याची इच्छा गोडधोड खाण्याची होते. त्याला रंगीबेरंगी कपडे आवडू लागतात आणि ते आपल्याला हवेत म्हणून ते हस्तगत करण्याची आकांक्षा निर्माण होते. मूल जेव्हा शाळेत जावू लागते तेव्हा वर्गामध्ये सर्वात जास्त गुण मिळविण्याची आकांक्षा त्याच्यात निर्माण होते. तरूण झाल्यावर चांगली पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवून भरपूर संपत्ती कमाविण्याची आकांक्षा त्याच्यात निर्माण होते. हे सर्व प्राप्त करून झाल्यानंतर त्याला पत्नी म्हणून एक सुंदर तरूणीशी विवाह करण्याची आकांक्षा निर्माण होते. ती पूर्ण झाल्यावर आपल्याला गुटगुटीत बाळ व्हावे, अशी इच्छा निर्माण होते. मुलं झाल्यानंतर त्यांना चांगल्या शाळेत शिकविण्याची इच्छा निर्माण होते. मग तो त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल, यासाठी आयुष्यभर झटत असतो.
    येणेप्रमाणे प्रत्येक मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्या न कोणत्या गोष्टी हस्तगत करण्यामध्येच व्यस्त असतो आणि इच्छित वस्तू हस्तगत करण्याच्या मागेच तो आयुष्यभर पळत असतो.
    परंतु, जर का या इच्छा, आकांक्षाना हस्तगत करण्यापेक्षा त्याने मूळ गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले तर त्याला कळून चुकेल की या सर्व गोष्टी हस्तगत करण्यामागचा मूळ उद्देश काय आहे? प्रत्येकाने विचार केला की आपल्या मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होत आहेत त्या कोठून निर्माण होत आहेत? तर आपल्याला कळून चुकेल की आपल्या इच्छा कोठून निर्माण होतात? प्रत्येक माणसाच्या मनामध्ये इच्छा, आकांक्षा निर्माण करणारा व त्यांची पूर्ती करणारा एकमेव अल्लाह आहे, ज्याने त्याला जन्माला घातले आणि त्याच्या मनामध्ये इच्छा आणि आकांक्षा निर्माण केल्या.
    मनुष्याच्या मनामध्ये तीव्र इच्छा आणि आकांक्षा नसत्या तर त्या हस्तगत करण्यासाठी त्याने प्रयत्नच केले नसते व त्यांच्यातील क्षमतेचा विकासच झाला नसता. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या इच्छा आकांक्षेच्या पूर्तीसाठी फक्त अल्लाहकडेच मदत मागावी, कारण अल्लाहशिवाय दूसरी कोणतीही शक्ती नाही जी निस्वार्थपणे कोणालाही काही देऊ शकेल. आपल्याला अपेक्षित गोष्टी चुकीच्या पद्धतीने गोळा करणे, अनैतिक पद्धतीने संपत्ती जमा करणे आणि त्यातून आपल्या इच्छांची पूर्ती करणे हे स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही विनाशकारी असते. जे लोक अल्लाहने दाखविलेल्या सत्यमार्गावर चालत कष्टाने संपत्ती कमावितात आणि आपल्या इच्छा आणि आकांक्षांची पूर्ती नैतिक चौकटीत राहून करतात त्यांचे जीवन सफल तर होतेच शिवाय त्यांच्यामुळे समाजाचेही कल्याण होते.
    अल्लाहने मानसामध्ये इच्छा आणि आकांक्षा उत्पन्न करून त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. अल्लाहने मनुष्यासमोर आकांक्षांची पूर्ती करण्यासाठीचे दोन मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत. एक- नैतिक मार्ग, जो की अल्लाहचा मार्ग आहे आणि दूसरा अनैतिक मार्ग, जो सैतानाचा आहे. जर अल्लाहच्या मार्गाचा आपण स्वीकार केला तर इच्छापूर्तींसह आत्मिक आनंदाची अवर्णनीय अशी अनुभूती आपल्याला होते. या उलट जर का सैतानाचा मार्ग चोखाळला तर सकृतदर्शनी यशस्वी झाल्यासारखे जरी वाटले तरी अशी व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण समाज आयुष्यभर तणावग्रस्त राहतो. याचा अंतिम परिणाम वाईटच होतो. या मार्गात मनुष्य पथभ्रष्ट झाल्याने त्याचा आत्मा आजारी पडतो आणि त्या आजारपणातूनच सामाजिक गुन्हेगारीचा जन्म होतो. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून सत्य मार्गाची शिकवण द्यावी व वाम मार्गाच्या प्रलोभनापासून दूर राहण्याची ताकीद करावी, जेेणेकरून त्यांचे आयुष्य यशस्वी होईल. मुलांसाठी आई-वडिल अल्लाहकडे मुलांना आकर्षित करण्याचे सर्वात मोठे साधन आहे. अल्लाहने म्हटलेले आहे की, ”तुम्ही सरळ माझ्याकडे आपल्या गरजा मांडा. मी त्या पूर्ण करण्यास समर्थ आहे.” अल्लाहकडे मागितल्यामुळे आपल्याला अपमानास्पद सुद्धा वाटत नाही. याउलट माणसाकडे मागितल्याने आपल्याला अपमानास्पद वाटते. म्हणून दुसर्‍याकडे मागण्यापेक्षा व चुकीच्या मार्गावर पळत राहण्यापेक्षा अल्लाहने दाखविलेल्या मार्गाने कष्ट करून माणसाने जर स्वतःचा संबंध अल्लाहशी जोडून घेतला तर तो कधीच अयशस्वी होत नाही. निर्विवादपणे अल्लाह सर्व सृष्टीचा मालक व चालक आहे. तो सर्व जीव, जंतूंच्या गरजा पूर्ण करण्यास समर्थ आहे. तो फक्त मनुष्यच नव्हे तर पशु-पक्षी आणि अन्य श्‍वापदे एवढेच नव्हे तर पाण्यातील अजस्त्र जीवांचा पोषणकर्ता आहे आणि हे काम तो लिलया करतो. तो सामर्थ्यशाली आहे, म्हणून आपल्याला आपल्या गरजा, इच्छा आणि आकांक्षाच्या पूर्तीसाठी फक्त त्याच्याकडेच रूजू व्हायला हवे. कारण अल्लाह आपल्या मानेच्या मुख्य रक्तवाहिनीपेक्षाही जवळ आहे.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या वलीमा (लग्नानंतर वरपक्षाकडून दिले जाणारे जेवण) मध्ये श्रीमंतांना आमंत्रण असते आणि  गरिबांना विसरण्यात येते ते सर्वांत वाईट जेवण असते. तसेच ज्या व्यक्तीने वलीमाचे आमंत्रण नाकारले त्याने अल्लाह व पैगंबर (स.) यांची अवज्ञा केली.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
वलीमा सुन्नत (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उक्ती व कृती) आहे आणि ज्या वलीमामध्ये श्रीमंतांना आमंत्रण असते आणि विभागातील गरिबांना आमंत्रण दिले नाही तो वाईट वलीमा  आहे. कोणत्याही विवशतेशिवाय आमंत्रण नाकारणे ‘सुन्नत’विरूद्ध आहे. माननीय इमरान बिन हुसैन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘फासिक’ (दुराचारी) लोकांचे  आमंत्रण स्वीकारण्यास मनाई केली आहे. (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
‘फासिक’ म्हणजे जो अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदेश अतिदृढतेने नाकारतो, वैध व निषिद्धचा विचार करीत नाही. अशा मनुष्याचे आमंत्रण नाकारावे जो ‘दीन’ला तुच्छ  लेखतो, तेव्हा धर्मनिष्ठ लोक त्याची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कसे जाऊ शकतात? मित्राचा शत्रू मित्र होऊ शकत नाही. त्याचे आमंत्रण सहजतेने आणि ईमानधारकांच्या तोंडी  स्वीकारण्यास मनाई करा.

आई-वडील आणि नातेवाईकांचे अधिकार
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! माझ्या चांगल्या व्यवहाराचा अधिक हक्कदार कोण आहे?’’  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुझी आई.’’ त्याने पुन्हा विचारले, ‘‘त्यानंतर कोण?’’ पैगंबरांनी सांगितले, ‘‘तुझी आई.’’ त्याने विचारले, ‘‘त्यानंतर कोण?’’ पैगंबर म्हणाले,  ‘‘तुझी आई.’’ त्याने विचारले, ‘‘मग कोण?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुझे वडील आणि मग दर्जेप्रमाणे तुझे आप्तस्वकीय.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
आईचे दर्जा वडिलांपेक्षा अधिक आहे. हीच गोष्ट पवित्र कुरआनातदेखील आढळून येते. ‘सूरह लुकमान’मध्ये अल्लाह म्हणतो, ‘‘आम्ही मानवाला आपल्या मातापित्यांचा हक्क  ओळखण्याची स्वत: ताकीद केली आहे.’’ आणि त्यातच अल्लाह पुढे म्हणतो, ‘‘त्याच्या आईने यातनामागून यातना सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवले आणि दोन वर्षे तिचे दूध  सोडविण्यास लागले.’’ याच कारणास्तव ‘उलमा’ (इस्लामी धर्मपंडित) यांनी लिहिले आहे की आदर व सन्मानाच्या बाबतीत वडिलांपेक्षा आई अधिक हक्कदार आहे आणि सेवेच्या  दृष्टीकोनातून आईचा दर्जा अधिक आहे.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुझे नाक मातीने माखले जावे.’’ (म्हणजे अपमानत व्हावे.) हेच वाक्य पैगंबरांनी तीन वेळा   म्हटले. लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! कोण अपमानित व्हावा? (आणि हे शब्द कोणत्या लोकांसाठी तुम्ही म्हणत आहात?)’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तो मनुष्य, ज्याला वृद्ध आई- वडील (किंवा त्यांच्यापैकी एक) लाभले (आणि त्यांची सेवा करून) स्वर्गात (जन्नतमध्ये) दाखल झाला नाही.’’ (हदीस : मुस्लिम)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहने तुमच्यावर आईवडिलांशी दुर्व्यवहार करण्यास निषिद्ध केले आहे आणि मुलींना जिवंत पुरणे आणि लालसा व कंजूषपणा आणि तुमच्यासाठी त्याने नापसंत केले आहे अनावश्यक संभाषण आणि अधिक प्रश्न करणे आणि संपत्ती नष्ट करणे.’’

स्पष्टीकरण
‘अधिक प्रश्न करणे’ म्हणजे एखाद्या वस्तूच्या बाबतीत अकारण उत्साह दाखविणे. याचा अर्थ मनुष्याला जी गोष्ट माहीत नाही त्याबाबतदेखील विचारू नये असा नसून याचा अर्थ असा  आहे की बनीइस्राईलनी गाय कापण्यासंबंधी जसे खोदून खोदून प्रश्न विचारले होते तशाप्रकारे खोदून खोदून प्रश्न विचारू नये. ‘दीन’चा अवलंब न करणारे लोक आजदेखील अशाप्रकारे  खोदून खोदून विचारणा करतात.

Islamic Law
न्याय म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे. अन्यायग्रस्ताला वस्तुतः न्यायाची खरी व्याख्या ताबडतोब समजते. परिभाषा करायची असेल तर दोन वस्तु अगदी तंतोतंत समान प्रमाणात वाटणे म्हणजे न्याय, अर्थात अफरातफरीमध्ये समतोल कायम करणे म्हणजेच कायद्याच्या भाषेत न्याय होय. दुसर्या भाषेत असे की एखाद्या प्रकरणात सत्यानुसार निवाडा करण्यात यावा.
कोणत्याही समाजाची सामाजिक बंधने अबाधित ठेवायची असेल तर न्याय हाच मूळ आधार होय. या शिवाय समाजव्यवस्था टिकू शकत नाही. हेच कारण आहे की समाज आणि राज्य टिकविण्यासाठी इस्लामने न्यायव्यवस्थेला असे महत्त्व दिले, जे इतर कोणत्याच धर्मात देण्यात आले नाही. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘ईश्वर न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नहल - ९०)
न्यायपूर्ण वर्तन हेच ईशपरायणतेचा परमोच्च दर्जा असल्याचे कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ईश्वरासाठी सत्यावर अढळ राहणारे आणि न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ८)
न्याय स्थापन करण्याचे विविध प्रसंग असतात. पहिल्या प्रसंगी मानवाने स्वतः आपल्यावरच न्याय स्थापन करावा. याचा अर्थ असा आहे की त्याने इतरांसाठीही तेच पसंत करावे, जे स्वतःसाठी करतो. त्याच प्रमाणे स्वतःच्या अधिकारांइतकीच त्याला इतरांच्या अधिकारांचीही जाणीव असावी. म्हणून कुरआनात ही बाब सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहे की, न्यायाची स्थापना करायची असेल तर सर्वप्रथम स्वतःवर आणि आपल्या नातलग आणि सगेसोयर्यांवर स्थापन करा. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहणारे आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. यद्यपि तुमच्या न्यायाचा आणि तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-बापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरीदेखील मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो वा गरीब, ईश्वर तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली, तर समजून असा की जे काही तुम्ही करता, ईश्वराला त्याची पूर्ण माहिती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १३५)
हीच गोष्ट प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अशाप्रकारे वर्णन केली आहे,
‘‘शपथ आहे त्या ईश्वराची, ज्याच्या हाती माझे प्राण आहे, ती व्यक्ती श्रद्धावंत(मुस्लिम) असूच शकत नाही, जो आपल्या शेजार्यासाठी तीच बाब पसंत करीत नाही, जी स्वतःकरीता पसंत करते.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
नेमक्या याच विचारसरणीचा अभाव असल्याचे आज पूर्ण समाजात आणि जगामध्ये अरेरावी माजली आहे. इतरांची चिता जळू द्या, मात्र आपली पोळी तुपात भाजली पाहिजे, या आधुनिक काळातील विचारसरणीमुळे असंख्य जणांचे अधिकार पायदळी चिरडले जात आहेत. यातूनच गुन्हेगारीचे अक्राळविक्राळ राक्षस न्याय, मानवता आणि नैतिकताचा बळी घेत आहे. मात्र इस्लामच्या या मोजक्या विचारसरणीचा अवलंब केला तर निश्चितच गुन्हेगारीवर आळा बसेल आणि मानवतेला अन्यायास बळी पडून न्यायासाठी दारोदार ठेचाळत हिडण्याची दुर्दैवी पाळी येणार नाही.
न्याय स्थापन करण्याचा दुसरा प्रसंग हा राज्य अगर शासन होय. राज्यशासनानुसार न्याय स्थापन करता येते, मात्र हे लक्षात असावे की, याआधारावर शासन स्थापन जर करायचे असेल तर शासकाने स्वतः आपल्यावर न्यायाची स्थापना करावी. प्रेषित मुहम्मद(स.) आणि सुरुवातीच्या काळातील चारीही इस्लामी शासकांची न्यायव्यवस्था हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे स्वतः सक्तीने यावर कार्यरत होते.

- मु. जैनुल आबिदीन मंसुरी
    या पुस्तकात देशबांधवांमध्ये इस्लामी सण `बकर ईद'च्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कुर्बानी विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत. कुर्बानीची सार्थकता आणि औचित्याविषयी करण्यात येणाऱ्या गैरसमजांना समर्पक उत्तर दिले आहे.
    इस्लाम द्वेषाने पीडित होऊन इस्लामला आणि मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नांची तकीसिद्ध व ठोस पुराव्यांसहित उत्तरे देऊन देशातील सौहार्दाच्या वातावरणात विष कालवणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळावे म्हणून हा प्रयत्न आहे.

आयएमपीटी अ.क्र. 189  -पृष्ठे - 12   मूल्य - 08          आवृत्ती - 2 (2012)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/96o9e4784t6skkjyrnobf95udr5pw1wn

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे युवकांनो! तुमच्यापैकी जो निकाहची (विवाहाची) जबाबदारी उचलू शकतो त्याने  निकाह करून घेतला पाहिजे कारण तो दृष्टी खाली ठेवतो आणि लज्जास्थानांचे रक्षण करतो. (म्हणजे नजरेला इकडे-तिकडे भटकण्यापासून आणि वासनाविषयक शक्तीला अनियंत्रित  होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्यात सक्षम नाही त्याने कामवासनेचा जोर शमविण्यासाठी कधी कधी रोजा धारण करावा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो, तिच्या संपत्तीच्या आधारावर, तिच्या घराण्याच्या प्रामाणिकपणाच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर आणि तिच्या ‘दीन’च्या (धर्माच्या) आधारावर. तर तुम्ही ‘दीनदार’ (धर्मनिष्ठ) स्त्रीशी विवाह करा, तुमचे भले   होईल.’’(हदीस : मुत्तफक अलैहि)

स्पष्टीकरण
स्त्रीमध्ये या चार गोष्टी पाहिल्या जातात. कोणी संपत्ती पाहतो, कोणी घराण्याची प्रतिष्ठा पाहतो आणि कोणी तिच्या रूप व सौंदर्यामुळे तिच्याशी विवाह करतो आणि कोणी तिच्या धर्मपरायणतेला पाहतो. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना उपदेश दिला आहे की खरी गोष्ट जी पाहण्याची आहे ती तिची (दीनदारी) धर्मनिष्ठा आणि (तकवा) संयम आहे.  त्याचबरोबर जर आणखीन सर्व गुणवैशिष्ट्येदेखील त्यात सामील झाले तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु धर्मश्रद्धा विसरणे आणि फक्त संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर विवाह  करणे मुस्लिमांचे काम नाही.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्त्रियांशी त्यांच्या रूप व सौंदर्यामुळे विवाह करू नका, कदाचित त्यांचे सौंदर्य त्यांना  नष्ट करील आणि त्यांच्या श्रीमंतीकडे पाहून त्यांच्याशी विवाह करू नका, कदाचित त्यांची संपत्ती त्यांना अवज्ञा व उद्धटपणात परिवर्तीत करील, म्हणूनच ‘दीन’च्या आधारावर विवाह  करा आणि काळ्या वर्णाची ‘दीनदार’ (धर्मनिष्ठ) सेविका अल्लाहच्या दृष्टीने गौरवर्णी चांगल्या घराण्याची स्त्रीपेक्षा उत्तम आहे.’’ (हदीस : मुन्तका)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जर तुमच्याकडे विवाहाचा संदेश घेऊन आलेल्या व्यक्तीचा ‘दीन’ व स्वभाव तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही तिच्याशी विवाह करा. जर तुम्ही असे  केले नाही तर पृथ्वीवर मोठा उपद्रव निर्माण होईल.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
ही हदीस अगोदरच्या हदीसकथनाचे समर्थन करणारी आहे. पैगंबर मुहम्मद (स.) सांगण्याचा अर्थ असा की विवाहाच्या बाबतीत पाहण्याची गोष्ट म्हणजे ‘दीन’ व स्वभाव आहे. जर हे न   पाहता धनसंपत्ती व घराण्याची प्रतिष्ठा पाहिली गेली तर मुस्लिमांमध्ये त्यामुळे मोठा उपद्रव निर्माण होईल. जे लोक इतके भौतिकवादी बनतील की ‘दीन’ त्यांच्या नजरेतून उतरेल  आणि धनसंपत्तीच त्यांच्यासाठी पाहण्याची गोष्ट बनली तर असे लोक ‘दीन’ची शेती सिंचित करण्याचा विचारच कसा करतील? या स्थितीला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उपद्रव म्हटले  आहे.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी नमाजचा महामंत्र (तशह्हुद) देखील शिकविला आणि निकाहचा महामंत्रदेखील. इब्ने   मसऊद यांनी नमाजचा महामंत्र सांगितल्यानंतर म्हटले की आणि निकाहचा महामंत्र असा आहे की ‘‘कृतज्ञता व स्तुती फक्त अल्लाहसाठीच आहे, आम्ही त्याचीच मदत मागतो, आम्ही   त्याच्याकडूनच मुक्तीची अपेक्षा करतो आणि आपल्या अस्तित्वाच्या दुष्टव्याच्याकरिता अल्लाहचा आश्रयात स्वत:ला झोकून देतो, ज्याला अल्लाहचे मार्गदर्शन लाभले (आणि मार्गदर्शन  इच्छिणाऱ्यालाच तो मार्गदर्शन देतो) त्याला कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि ज्याला त्याने मार्गभ्रष्ट केले (आणि मार्गभ्रष्ट फक्त त्यालाच करतो जो मार्गभ्रष्ट होऊ इच्छितो)  त्याला कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही, आणि मी साक्ष देतो की अल्लाहव्यतिरिक्त कोणीही उपास्य नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व पैगंबर आहेत.’’

Earth
न्यायाचे तीन पैलू आहेत
वैधानिक न्याय, सामूहिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय न्याय.
वैधानिक न्याय
वैधानिक न्याय म्हणजे सर्वांना समान न्याय मिळावा. कोणत्याही प्रकारचा वांशिक, आर्थिक, प्रादेशिक, धार्मिक भेद न पाळता आणि आपला व परका न समजता अन्यायपीडितास न्याय देणे हे इस्लामी कायद्याचे पहिले दंडविधान होय. इतिहासामध्ये इस्लामने प्रस्थापित केलेल्या न्यायव्यवस्थेची असंख्य उदाहरणे विरोधकांना तोंडघशी पाडणारे आहेत. विस्तार भयास्तव येथे केवळ एका घटनेचाच उल्लेख करण्यात येत आहे.
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या काळामध्ये एका उच्चकुलीन अर्थात कुरैश परिवारातील स्त्रीने चोरी केली व प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इस्लामी दंडविधानानुसार तिचे हात कापण्याचा निवाडा दिला. मात्र कुरैश परिवारजणांना प्रेषितांचा हा निर्णय त्यांच्या प्रतिष्ठेस धक्का लावणारा वाटला. त्यांना वाटले की आपण इतके उच्चकुलीन आहोत आणि समाजामध्ये आपली प्रतिष्ठा राहणार नाही. हात कापण्याच्या शिक्षेमुळे आपण समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. म्हणून त्यांनी प्रेषितांच्या जवळचे असलेले उसामा बिन झैद(र.) यांना या बाबतीत शिफारस करण्यास सांगितले की, या शिक्षेत काही कमी करावी. मात्र जेव्हा ही सगळी हकीकत उसामा(र.) यांनी सांगितली, तेव्हा प्रेषित मुहम्मद(स.) यांना खूप संताप चढला आणि त्यांनी स्पष्टपणे बजावले की,
‘‘हे तुम्हाला काय झाले की ईश्वराने निश्चित केलेल्या शिक्षांमध्ये कमतरता करण्याची शिफारस करतात. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुमच्या पूर्वीचे मानवसमुदाय याच कारणास्तव नष्ट झाले आहेत. त्यांच्यातील प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा गुन्हा करीत, तेव्हा तिला शिक्षा देत नसे आणि साधारण व्यक्ती जेव्हा एखादा अपराध करीत तेव्हा तिला शिक्षा देत असे. मी तुम्हाला स्पष्टपणे बजावतो की, जर माझी मुलगी फातिमा(र.) हिने जरी चोरी केली असती तर तिलासुद्धा शिक्षा देण्यात माझी आत्मप्रतिष्ठा आडवी आली नसती. ईश्वराची शपथ! मी तिचेही हात कापले असते.‘‘(संदर्भ : प्रेषित वचन संग्रह - बुखारी)
इस्लाममध्ये वैधानिक न्यायाचे हेच वैशिष्ट्य आहे की न्याय हा सर्वांसाठी कोणाताही भेदभाव न पाळता करणे आवश्यक आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘तुम्ही मुस्लिमांपैकी जेव्हा कोणी न्यायाधीश न्यायनिवाडा करीत असेल, तेव्हा त्याने रागाच्या भरात निर्णय देता कामा नये, आणि न्यायालयात हजर असलेल्या पक्ष प्रतिपक्षादरम्यान बसविण्यात आणि पाहण्यातसुद्धा भेदभाव करता कामा नये. एवढेच नव्हे तर इशारा करण्यातसुद्धा भेदभाव करता कामा नये.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - जामिउस्सगीर)
सामूहिक न्याय अगर सामाजिक न्याय
कोणत्याही मानवास स्पृश्य-अस्पृश्य, प्रतिष्ठित-अप्रतिष्ठित, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत आणि आपला परका न मानता समाजातील प्रत्येक व्यक्तीस केवळ माणूस या नात्याने समानरित्या न्यायदानास सामाजिक न्याय असे म्हणता येईल. याच न्यायाची शिकवण इस्लामने दिली आणि केवळ शिकवणच न देता ही न्यायव्यवस्था स्थापन करण्याचा जागतिक आणि ऐतिहासिक विक्रम नोंदविला. कुरआनाने श्रेष्ठत्वाचा अगर प्रतिष्ठेचा आधार सदाचार आणि ईशपरायणतेस देऊन समस्त मानवजातीतील सडक्या व बुरसटलेल्या स्पृश्यास्पृश्यतेचे कृत्रिम भेदभाव नष्ट करून लोकांना केवळमात्र मानवाचा दर्जा दिला आणि याच आधारे न्यायव्यवस्था स्थापन केली. कुरआनात सडेतोडपणे म्हटले आहे,
‘‘तुमच्यापैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित माणूस तो आहे, जो तुमच्यापैकी सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १३)म्हणजेच प्रतिष्ठा ही ईशपरायणता आणि सज्जनतेतच आहे.
दुसरी गोष्ट अशी की सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीस या गोष्टीचा जन्मसिद्ध अधिकार आहे की त्याने आपल्या पात्रता व शिक्षण-प्रशिक्षणानुसार काम करावे. शिक्षण-प्रशिक्षण, प्रगती आणि विकासाची दारे सर्वांसाठीच खुली आहेत. कोणावरही कोणतेही काम करण्याची बळजबरी करणे अगर त्याचे शोषण करणे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी परखडपणे घोषणा केली आहे की, ‘‘ज्या व्यक्तीने ज्या माणसाकडून मजुरी करून घेतली आणि त्याची मजुरीची रक्कम दिली नाही, त्या व्यक्तीविरुद्ध(स्वयं) ईश्वराने युद्धाचे रणशिंग फुंकले.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
अर्थातच एखाद्या माणसाकडून काम करून घेतल्यावर त्याच्या कामाचा मोबदला न देणे म्हणजे ईश्वरी कोपास बळी पडणे होय. म्हणजे कोणाची मजुरीची रक्कम बुडविणारा माणूस हा मुस्लिम होऊच शकत नाही.
आंतरराष्ट्रीय न्याय
इस्लामने न्याय स्थापन्याची गोष्ट केवळ मुस्लिमांपर्यंतच मर्यादित ठेवली नसून समस्त जगात मुस्लिम आणि मुस्लिमेतरांतही काहीच भेदभाव न बाळगता न्याय स्थापन करण्याची शिकवण दिली आहे. जे लोक अद्यापही इस्लामच्या न्यायप्रिय छत्रछायेत आलेले नाहीत अशा लोकाशीही धर्माच्या आधारावर द्वेष आणि कलह ठेवण्याची इस्लामने मुळीच परवानगी दिली नाही. न्याय म्हणजेच न्याय आणि तो प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क असल्याने मुस्लिमेतरांनाही सारख्याच प्रमाणात मिळावा, मुस्लिमेतरांशीही मुस्लिमांनी स्नेहपूर्ण संबंध ठेवावेत, समता व बंधुभावाची जोपासना करावी, हीच इस्लामची मुख्य भूमिका आहे. ईश्वराने कुरआनात स्पष्टपणे म्हटले आहे,
‘‘ईश्वर तुम्हास या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही अशा मुस्लिमेतर जणांशी सदाचार आणि न्यायपूर्ण रितीने वागावे, जे धर्माच्या बाबतीत तुमचा विरोध करीत नाहीत आणि ज्यांनी तुम्हाला तुमचे घरदार सोडण्यास भाग पाडले नाही.(अर्थात घर परिवार त्यागण्यास विवश करण्याचे अत्याचार केले नाही.) ईश्वर न्याय करणार्यांना पसंत करतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-मुमतिहना - ८)
याच शिकवणीवर आपले आचरण असावे आणि याच आचरणास प्रकारच्या न्यायपूर्ण आधार बनवून इस्लामी कायदा असलेल्या राज्यात मुस्लिमतरांचेही अधिकार मुस्लिमांसम ठरविण्यात आले आहेत. ज्या सवलती आणि संधी व प्रगतीची दारे मुस्लिमांसाठी उघडी आहेत, तीच दारे मुस्लिमेतरांसाठीही उघडी आहेत. इस्लामी शासनाने ज्या जवाबदार्या मुस्लिम रयतेवर टाकल्या आहेत, त्या मुस्लिमेतर रयतेवरसुद्धा टाकल्या आहेत. मुस्लिम आणि मुस्लिमेतर या दोघांना एकच कायदा अगर दंडविधान लागू असेल. उदाहरणार्थ, खून करण्याची शिक्षा इस्लामी कायद्याने देहदंड अगर मृत्यूदंड निश्चित केली आहे. या संविधानानुसार एखाद्या मुस्लिम व्यक्तीने मुस्लिमेतराचा खून केला असेल तर खुन्यास देहदंड अगर मृत्यूदंडाची शिक्षा होणारच.(संदर्भ : इस्लामी शासनात मुस्लिमेतरांचे अधिकार, लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट मुंबई) इस्लामी न्यायव्यवस्थेच्या या सर्वसामान्य परिचयातून आपल्या लक्षात आलेलेच असेल की, इस्लामने न्यायव्यवस्थेला किती जबरदस्त महत्त्व दिले आहे. एवढेच नव्हे तर इस्लाम धर्म हा मुळात या विश्वामध्ये न्यायाची स्थापना करण्यासाठीच आला आहे. इस्लामी न्यायप्रणाली ही मानवाच्या प्रत्येक क्षण आणि प्रत्येक पडणारे पाऊल आणि प्रत्येक कर्म व क्षेत्राला व्यापलेले आहे. अगदी धंदा-व्यापारातही आणि माणसाच्या अर्थार्जनातही न्याय हीच कसोटी ठरविण्यात आली आहे. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे लोकहो! अगदी तंतोतंत न्यायानुसार मोजमाप करून देवाणघेवाण करा आणि लोकांना त्यांच्या हक्कांच्या वस्तूंमध्ये घट करून देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजवू नका!‘‘(संदर्भ : सूरह-ए-हूद - ८५)

- विजय गोपाल मंगल
   
    या पुस्तकात कुरआनमध्ये सांगितलेल्या मानवतेच्या शिकवणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक विधीशास्त्राचे स्नातक व व्यवस्थापनशास्त्रात स्नातकोत्तर आहेत.
    कुरआन मनुष्याच्या संपूर्ण जीवनाकरिता मार्गदर्शन आहे. मानवास जगात पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण आणि मृत्यूनंतर काय होईल याविषयी सावध करण्यात आले आहे. हे पुस्तक भ्रष्टाचार समाप्त करण्यास, सांप्रदायिक तणाव नष्ट करण्यास आणि विश्वबंधुत्व वाढीस लागण्यास उपयुक्त असे आहे. अट हीच आहे की वाचकाने या पुस्तकाचे पूर्णत: निरपेक्षपणे अध्ययन करावे.

आयएमपीटी अ.क्र. 186     -पृष्ठे - 16     मूल्य - 10                आवृत्ती - 2 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/nwjurk1evv1e3b9ndt82ejfhgyr3j8d1

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget