Latest Post

माननीय सौबान (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर प्रवासात होतो. इतक्यात पैगंबरांवर ‘‘वल्ल़जीना यकनि़जूऩज़्जहबा वल-फ़िज़्ज़ता.’’ ही आयत   अवतरित झाली, तेव्हा आमच्यापैकी काहींनी म्हटले, ‘‘सोन्या-चांदीचा साठा करण्याच्या बाबतीत ही आयत अवतरित झाली. यावरून ज्ञात होते की ते गोळा करणे चांगली गोष्ट नाही.  कोणती साधन-संपत्ती गोळा करणे योग्य आहे हे जर आम्हाला माहीत पडले असते तर आम्ही ती गोळा करून ठेवली असती.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सर्वांत उत्तम खजिना अल्लाहचे  नामस्मरण करणारी जिव्हा आणि अल्लाहच्या कृतज्ञतेने भरलेले हृदय आणि सदाचारी पत्नी आहे जी ‘दीन’च्या मार्गावर चालण्यात पतीची साहाय्यक बनते.’’ (तिर्मिजी)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारे माहीत होते की मुखाने अल्लाहचे नामस्मरण करणे आणि नामस्मरण म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेसह केले जाणारे ईशनामस्मरण आणि हेदेखील माहीत झाले की आपल्या  धर्मश्रद्धाळू (दीनदार) पतीच्या संकटे व अडचणींमध्ये संयमाने राहणारी पत्नी धर्माच्या मार्गात आधार बनते. मार्गातील अडथळा बनत नाही, म्हणून खरोखरच अशी पत्नी अल्लाहची फार  मोठी कृपा आहे.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येकजण निरीक्षक व संरक्षक आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला विचारले जाईल  त्या लोकांच्या बाबतीत जे तुमच्या देखरेखीखाली असतील. शासकदेखील संरक्षक आहे आणि त्यालाही त्याच्या प्रजेलाविषयी विचारणा होईल आणि पती आपल्या कुटुंबियांचा संरक्षक आहे  आणि पत्नी आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे आणि सेवक आपल्या मालकाच्या संपत्तीचा संरक्षक आहे, तर मग तुमच्यापैकी प्रत्येकजण संरक्षक आहे आणि  तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या लोकांच्या बाबतीत विचारले जाईल जे त्याच्या संरक्षणात होते.’’ (मुत्तफक अलैहि)

स्पष्टीकरण
या हदीसचा हा भाग विशेष लक्ष देण्यायोग्य आहे कारण स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे. या हदीसवरून स्पष्ट होते की पती आपल्या पत्नीला फक्त  खाऊपिऊ घालण्यापुरताच जबाबदार नाही तर तिचा धर्म व नैतिकतेचे रक्षण व संरक्षण करणे त्याचीच जबाबदारी आहे. पत्नीची जबाबदारी दुप्पट आहे. ती पतीचे घर व संपत्तीची  संरक्षक असण्याबरोबरच त्याच्या मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची विशिष्ट जबाबदारीदेखील तिच्यावर आहे, कारण पती उपजीविका प्राप्त करण्यासाठी अधिकांश घराबाहेर राहतो आणि  घरात मुले आपल्या मातांकडेच असतात, म्हणून मुलांचे संरक्षण आणि शिक्षण-प्रशिक्षणाची आणखी एक जबाबदारी त्यांच्या आईवर पडते.

मुलाबाळांचे अधिकार
सईद बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘पिता आपल्या मुलाबाळांना जे काही देतो त्यापैकी सर्वोत्तम भेट म्हणजे त्याचे चांगले शिक्षण   व प्रशिक्षण होय.’’ (हदीस : जामिउल उसूल, मिश्कात) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपली मुलेबाळे सात वर्षांची झाल्यास त्यांना नमाज अदा करण्याचा आदेश द्या आणि  जेव्हा ते दहा वर्षांचे होतील तेव्हा त्यांना नमाजकरिता मार द्या आणि या वयाचे झाल्यानंतर त्यांचे अंथरुण वेगळे करा.’’ (हदीस)

स्पष्टीकरण
या हदीसवरून स्पष्ट होते की मुले जेव्हा सात वर्षांची होतात तेव्हा त्यांना नमाजची पद्धत शिकविले आणि नमाज अदा करण्यास सांगितले पाहिजे आणि जेव्हा ते दहा वर्षांची होतील  आणि नमाज अदा करीत नसतील तर त्यांना मारदेखील दिला जाऊ शकतो. त्यांना हे समजाविले पाहिजे की तुमचे नमाज अदा न करणे आमच्या नाराजीचे कारण बनेल. या वयाला  पोहोचल्यानंतर मुलांचे अंथरुण वेगळे केले पाहिजे, अनेक मुलांनी एकाच बेडवर झोपू नये.

कुरआनची वर्णनशैली, त्याची रचना व त्यातील बऱ्याचशा विषयांना मनुष्य चांगल्या प्रकारे समजू शकत नाही जोपर्यंत तो त्याच्या अवतरणस्थितीला चांगल्या प्रकारे समजून घेत नाही.
कुरआन काही अशा स्वरूपाचा ग्रंथ नाही की सर्वोच्च अल्लाहने एकाचवेळी तो लिहून पैगंबर मुहम्मद (स.) यांना देऊन टाकला असावा त्यांना सांगितले असावे की याला प्रकाशित करून लोकांना एका विशिष्ट जीवनपद्धतीकडे बोलवा. तसेच हा कुरआन काही अशा स्वरूपाचा ग्रंथही नाही की लेखनात्मक पद्धतीने ग्रंथाचा विषय व त्याच्या मध्यवर्ती कल्पनेवर त्यात चर्चा केलेली असावी. याच कारणामुळे त्यात लेखनात्मक क्रमबद्धताही आढळत नाही व पुस्तकी शैलीही आढळत नाही. वास्तविकपणे कुरआनचे खरे स्वरूप असे आहे की सर्वश्रेष्ठ अल्लाहने अरबस्तानातील मक्का शहरातून आपल्या एका दासाला पैगंबरत्वाच्या सेवेसाठी निवडले. त्याला हुकूम दिला की आपल्या शहरापासून व आपल्या घराण्या (कुरैश) पासून आवाहनाला प्रारंभ करा. हे कार्य सुरू करण्यासाठी प्रारंभी ज्या आदेशांची व सूचनांची गरज होती केवळ त्याच प्रथम दिल्या गेल्या. त्यांच्यात जास्त करून तीन विषयांचा समावेश होता.
त्यापैकी एक विषय असा की पैगंबर मुहम्मद (स.) यांना शिकवण देणे की त्यांनी पैगंबरत्वाच्या वैभवशाली कार्यासाठी स्वत:ला कशा प्रकारे तयार करावे आणि कोणत्या पद्धतीने काम करावे.
दुसरा विषय असा की सर्वमान्य सत्यासंबंधी प्राथमिक स्वरूपाची माहिती देणे. सत्यासंबंधी सभोवतालच्या लोकांमध्ये गैरसमजुती पसरलेल्या होत्या त्यामुळे लोकांचे वर्तन चुकीचे बनले होते, त्यांचे ढोबळपद्धतीने खंडन करणे.
तिसरा विषय असा की योग्य वर्तनाचे आवाहन देणे आणि ईशमार्गदर्शनाच्या त्या नैतिक मूलतत्त्वांना स्पष्ट करून सांगणे की ज्यांच्या अनुसरणात माणसाचे कल्याण व त्याचे सुदैव दडले आहे.
सुरवातीच्या काळातील हे संदेश प्राथमिक आवाहनाच्या अनुषंगाने काही लहान लहान संक्षिप्त बोलांचा समावेश असलेले असायचे. त्या बोलांची भाषा अत्यंत शुद्ध, अत्यंत गोड, अत्यंत प्रभावी आणि संबोधित समाजाच्या रसिकतेनुसार उत्तम साहित्यिक सौदर्य बाळगणारी होती. जेणेकरून ते बोल त्यांच्या हृदयात तीरासमान रूतून बसतील. त्यांच्यातील लयमाधुर्यामुळे कर्ण आपोआप त्यांच्याकडे आकर्षिले जातील आणि त्यांच्यातील प्रमाणबद्ध सौंदर्यामुळे जिव्हा उत्स्पूâर्तपणे त्यांचे उच्चारण करू लागतील. शिवाय त्या वाणीवर स्थानिक रंगाची छाप अधिक होती. यद्यपि सांगितले तर जात होते विश्वव्यापी सत्य परंतु त्याच्यासाठी प्रमाण व पुरावे आणि उदाहरणे मात्र त्याच निकटवर्ती परिसरातून घेतलेले होते, ज्यांच्याशी संबोधित लोक चांगल्या प्रकारे परिचित होते. त्याच लोकांचा इतिहास, त्यांचीच परंपरा, त्यांच्याच दैनंदिन निरीक्षणात येणारे भग्नावशेष आणि त्यांच्याच सर्व श्रद्धात्मक व नैतिक आणि सामूहिक स्वरूपाच्या बिघाडासंबंधी एवूâण चर्चा केली जात होती. म्हणजे त्या लोकांसाठी ती वाणी परिणामकारक ठरेल.
अशा प्रकारे ‘आवाहना’चा हा प्राथमिक टप्पा चार-पाच वर्षांपर्यंत चालत राहिला. या कालावधीत पैगंबर मुहम्मद (स.) त्या लोकांत करीत असलेल्या प्रचाराची प्रतिक्रिया तीन प्रकारात उमटली.
(१) पैगंबरांचे सदरहू आवाहन स्वीकारून काही सदाचारी माणसे मुस्लिम (उम्मत) बनण्यासाठी तयार झालीत.
(२) एक मोठी संख्या अज्ञानामुळे अथवा स्वार्थापोटी विंâवा वडिलोपार्जित पद्धतीच्या प्रेमामुळे विरोधास तयार झाली.
(३) मक्का शहर आणि कुरैशांच्या सीमेपलीकडे जाऊन सदरहू नूतन आवाहनाचा आवाज तुलनात्मकरीत्या अधिक विस्तृत क्षेत्रात पोहोचू लागला.
आवाहनाचा दुसरा टप्पा
त्यानंतर येथून आता त्या आवाहनाचा दुसरा टप्पा सुरू होतो. या कालखंडात इस्लामी चळवळीत आणि अज्ञानमूलक व्यवस्थेमध्ये भयंकर जीवघेणे संघर्ष पेटून ते सतत आठ-नऊ वर्षांपर्यंत चालत राहिले. केवळ मक्का शहरातच नव्हे, तसेच केवळ कुरैश लोकांतच नव्हे, तर अरबस्तानाच्या बव्हंशी विभागातदेखील जे लोक जुन्या अज्ञानमूलक व्यवस्थेला कायम ठेवू इच्छित होते ते लोक सदरहू चळवळीला हिंसेच्या मार्गाने नष्ट करण्यास तत्पर बनले, त्यांनी ती चळवळ चिरडून टाकण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच योजून पाहिले. खोटा प्रचार केला, शंकाकुशंका पसरविल्या आणि आरोप व आक्षेपांची सरबत्ती केली. सामान्यजनांच्या मनात नाना तNहेचे वसवसे घातले. माहिती नसलेल्या लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांचे म्हणणे ऐकण्यापासून रोखण्याचे प्रयत्न केले. इस्लाम स्वीकारणाऱ्यांवर अत्यंत व्रूâरपणे जुलूम व अत्याचार केले. त्यांच्यावर आर्थिक व सामाजिक बहिष्कार टाकले त्यांचा इतका छळ केला की त्यांच्यापैकी पुष्कळ लोकांना दोनदा घरादारांचा त्याग करून हब्श देशाकडे ‘हिजरत’ (स्थलांतर) करणे भाग पडले. सरतेशेवटी तिसऱ्यांदा सर्वच नवमुस्लिमांना मदीनेकडे ‘हिजरत’ (स्थलांतर) करावी लागली. परंतु असा भयंकर आणि प्रतिदिन वाढत असलेला प्रतिकार होत असतानादेखील इस्लामी चळवळ पैâलावतच होती. मक्का शहरातील एकही घर विंâवा कुटुंब असे उरले नव्हते की ज्यातील कोणत्या न कोणत्या व्यक्तीने इस्लाम स्वीकारलेला नसेल. बहुतेक विरोधकांच्या शत्रुत्वाची तीव्रता व त्याच्या कडवटपणाचे कारण हेच होते की स्वत: त्यांचे भाऊ, पुतणे, मुले, मुली, बहिणी आणि मेव्हणे इस्लामी आवाहनाचे केवळ अनुयायीच बनले नव्हते तर त्यासाठी प्राणार्पण करणारे सहायकही बनले होते. अशा प्रकारे विरोधकांचे प्रिय आप्तेष्टच त्यांच्याशी झुंज देण्यासाठी उभे ठाकले होते. याउपरही ते लोक त्याअगोदरही त्यांच्या समाजात उत्तम लोक म्हणून गणले जात असत आणि इस्लामी चळवळीत सामील झाल्यानंतर तर ते इतके सत्यनिष्ठ व इतक्या शुद्ध आचरणाची माणसे बनत असत. जगाला त्या आवाहनाच्या श्रेष्ठत्वाची जाणीव झाल्याशिवाय राहू शकत नव्हती. ते आवाहन लोकांना आकर्षित करीत होते व त्यांना अशा प्रकारे घडवीत होते.
अशा प्रकारच्या प्रदीर्घ व तीव्र संघर्षाच्या काळात सर्वोच्च अल्लाह प्रसंगानुसार व गरजेनुसार आपल्या पैगंबरावर असे चैतन्यमय दिव्य प्रकटन अवतरित होता की ज्याचा ओघ नदीच्या प्रवाहासारखा व ज्याची शक्ती महापुरासमान आणि ज्याचा प्रभाव खवळलेल्या उग्र अग्नीसमान होता. त्या दिव्य प्रकटनात एकीकडे इमानधारकांना त्यांची प्राथमिक कर्तव्ये सांगितली जायची, त्यांच्यात संघटनात्मक जाण उत्पन्न केली जायची, त्या इमानधारकांना ईशपरायणता, पापभीरुता आणि श्रेष्ठ आचरण व शुद्ध चारित्र्याची शिकवण दिली जायची. त्यांना सत्यधर्माच्या प्रचाराच्या पद्धती सांगितल्या जायच्या. यशस्वी ठरण्याची अभिवचने व जन्नत-स्वर्गप्राप्तीच्या आनंदवार्तेने त्यांचे धैर्य उंचावले जायचे. संयम व सहनशीलता आणि धैर्यशीलतेने अल्लाहच्या मार्गात झटण्याचा उत्साह त्यांच्यात निर्माण केला जायचा. अशा प्रकारे प्राणार्पणाचा इतका जबरदस्त जोश आणि इतका दांडगा उत्साह त्यांच्यात उत्पन्न केला गेला की येणारी सर्व संकटे सहन करण्यासाठी व विरोधाच्या प्रचंड वादळाचाही मुकाबला करण्यासाठी ते तयार झाले होते. दुसरीकडे त्या चैतन्यमय दिव्य प्रकटनात विरोध करणाऱ्यांना व सरळमार्गापासून तोंड फिरविणाऱ्यांना आणि गफलतीची साखरझोप घेणाऱ्या लोकांना त्या समाजांच्या विनाशकारी शेवटाचे भय दाखविले गेले, ज्यांचा इतिहास त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होता. त्या राष्ट्रांच्या उद्ध्वस्त वस्त्यांच्या भग्नावशेषापासून त्यांना धडा दिला गेला. ज्या भग्नावशेषांवरून ते प्रवासाच्या हेतूने रात्रन् दिवस ये-जा करीत असत. त्या लोकांना एकेश्वरत्व आणि परलोकाचे प्रमाण व पुरावे त्या उघड निशाण्यांद्वारे दिले गेले; ज्या रात्रन् दिवस पृथ्वी व आकाशांत त्यांच्या डोळ्यांसमोर प्रकटावस्थेत होत्या. ज्यांना ते स्वत:ही आपल्या जीवनात सदोदित दिसत होत्या व जाणवत होत्या. त्या लोकांवर त्यांच्या अनेकेश्वरत्वाचे दोष, जीवनात अनिर्बंध असण्याच्या त्याच्या दाव्याचे व परलोकाच्या इन्काराचे दोष दाखविले. वाडवडिलांचे अंधानुकरण करण्याचे दोष अशा स्पष्ट प्रमाणाद्वारे व पुराव्यानिशी उघड केले गेले जे अंत:करणात भिडणारे आणि बुद्धीला पटणारे होते. याशिवाय त्यांच्या एक अन् एक शंकेचे निरसन केले गेले. त्यांच्या प्रत्येक आक्षेपाचे योग्य उत्तर दिले गेले. त्या लोकांचा प्रत्येक गुंता व पेच ज्यात ते स्वत:ही गुंतलेले होते आणि इतरांनाही त्यात अडकविण्याचा ते प्रयत्न करीत होते त्याची उकल केली गेली. सर्व बाजूंनी वेढून अज्ञानमूलक व्यवस्थेला असे घट्ट आवळले गेले की बुद्धीच्या व शहाणपणाच्या जगात तिला कोठेही थारा उरला नाही. त्याचबरोबर त्यांना ईश्वराचा कोप, ‘कयामत’चे महाभयंकर प्रसंग आणि जहन्नम-नरकाच्या यातनेचे भय दाखविले गेले. त्या लोकांची, त्यांच्या दुराचारासंबंधी, त्यांच्या चुकीच्या जीवनवर्तनासंबंधी, अज्ञानमूलक रूढी व सत्याच्या शतृत्वासंबंधी तसेच इमानधारकांच्या छळणूकीसंबंधी निर्भत्र्सना केली गेली. नीतिमत्ता व संस्कृतीची ती महान मूलतत्त्वे त्यांच्या समोर प्रस्तुत केली गेली ज्यांच्या आधारावर सदैव ईश्वरप्रणीत सुसंस्कृतीची उभारणी होत आली आहे.
हा दुसरा टप्पा आपल्या जागी स्वत:च अनेक मजलांचा अंतर्भाव असलेला होता. त्यापैकी प्रत्येक टप्प्यामध्ये आवाहन अधिक विस्तृत होत गेले. आवाहनासाठी होणारे प्रयत्नही तीव्र होत गेले व त्यांचा प्रतिकारही अधिकाधिक प्रखर बनत गेला. निरनिराळ्या प्रकारच्या श्रद्धा आणि निरनिराळ्या प्रकारच्या कार्यपद्धती असलेल्या समूहांशी गाठ पडत गेली व अशा प्रकारच्या स्थित्यंतरानुसारच अल्लाहकडून येणाऱ्या संदेशात विषयांची विविधताही वाढत गेली.... अशी आहे महान कुरआनच्या मक्केत अवतरलेल्या सूरतींची (कुरआनोक्तींची) पाश्र्वभूमी.

इस्लामच्या राजकीय व्यवस्थेचा पाया तीन तत्वांवर आधारलेला आहे.   
 1) तौहीद-एकेश्वरत्व 
2) रिसालत-पैगंबरत्व 
3) खिलाफत- प्रतिनिधित्व. 

या तत्वांना चांगल्या प्रकारे समजावून घेतल्याशिवाय इस्लामची संपूर्ण राजकीय व्यवस्था समजणे कठीण आहे. आणि म्हणून या तत्वांचा संक्षिप्त असा खुलासा करीत आहे.
""तौहीद'' चा अर्थ हा आहे की अल्लाह या जगाचा आणि या जगामध्ये राहणाऱ्या सर्वांचा निर्माता आहे, पालनकर्ता व स्वामी आहे. शासन व अधिकार त्याचाच आहे. तोच आज्ञा देण्याचा व मनाई करण्याचा अधिकार बाळगतो, आणि आज्ञापालन व गुलामी फक्त त्याचीच, त्यामध्ये इतर कोणीही भागीदार नाही. आपले हे अस्तित्व, आपली इंद्रिये व शक्ती ज्यांचा आपण उपयोग करतो आणि आपले ते अधिकार जे आपल्याला जगातील वस्तूंवर प्राप्त आहेत आणि त्या वस्तू ज्यांच्यावर आपण आपल्या अधिकाराचा वापर करतो- त्यापैकी कोणतीही गोष्ट आपण निर्माण केलेली व प्राप्त केलेली नाही. या गोष्टी आपल्याला बक्षिसादाखल देण्यामध्ये अल्लाहशिवाय दुसरा कोणीही सहभागी नाही आणि म्हणून आमच्या अस्तित्वाचे उद्दिष्ट, आपल्या शक्तीचा वापर आणि आपल्या अधिकाराच्या मर्यादा निश्चित करणे हे न आमचे काम आहे न दुसऱ्या कोणाला या प्रश्नात दखल देण्याचा अधिकार आहे. हे फक्त त्या अल्लाहचे काम आहे, ज्याने आपल्याला त्या शक्ती व अधिकारांसह निर्माण केले आणि पुष्कळशा गोष्टी आपल्या उपभोगासाठी दिल्या. एकेश्वरत्वाचे हे तत्व मानवी अधिकारशाहीचा मूळापासून इन्कार करते. एक व्यक्ती असो वा एक कुटुंब, एक वर्ग असो वा एक गट, एखादा समाज असो वा सामूहिकरीत्या साऱ्या जगाचे लोक असोत, अधिकारशाहीचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत कोणासही पोहचत नाही. सत्ताधीश फक्त अल्लाह आहे आणि त्याची आज्ञा हाच कायदा आहे.
अल्लाहचा कायदा ज्या साधनाद्वारे मानवापर्यंत पोहोचला आहे त्याचे नाव "रिसालत' म्हणजे पैगंबरत्व आहे. याद्वारे आपल्याला दोन गोष्टी मिळतात. एक "ग्रंथ' ज्यामध्ये स्वत: अल्लाहने आपला कायदा निवेदन केलेला आहे. दुसरी ग्रंथाचे प्रमाणभूत स्पष्टीकरण जे पैगंबरांनी अल्लाहचा प्रतिनिधी या नात्याने आपल्या उक्ती व कृतीद्वारे केलेले आहे. अल्लाहच्या ग्रंथात ती सर्व तत्वे निवेदन केली गेली आहेत, ज्याच्यावर मानवी जीवनाची व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे आणि पैगंबरांनी ग्रंथाच्या या मनिषेनुसार प्रत्यक्षात एक जीवनव्यवस्था तयार करून ती अंमलात आणली आणि तिचा आवश्यक तो खुलासा करून आपल्यासाठी एक आदर्श कायम केला आहे. या दोन्ही गोष्टीचे एकत्रित नाव इस्लामी परिभाषेत "शरियत' आहे आणि हीच ती मूलभूत घटना आहे जिच्यावर इस्लामी राज्य कायम होते.
आता "खिलाफत' चा विचार करू. अरबीमध्ये हा शब्द प्रतिनिधीत्वाबद्दल बोलला जातो. इस्लामी दृष्टिकोनानुसार जगामध्ये माणूस जमिनीवर अल्लाहचा प्रतिनिधी आहे. म्हणजे अल्लाहच्या राज्यात अल्लाहनेच दिलेल्या अधिकारांचा माणूस वापर करतो. आपण जेव्हा आपल्या मालमत्तेची व्यवस्था एखाद्या माणसाकडे सोपवितो तेव्हा आपल्यासमोर चार गोष्टी अवश्य असतात. एक ही की मालमत्तेचे खरे मालक आपण स्वत: आहोत, तो माणूस नव्हे. दुसरी ही की आपल्या मालमत्तेसंबंधी आपण दिलेल्या सूचनांनुसारच त्या माणसाला काम करावयाचे आहे. तिसरी गोष्ट ही की त्या माणसाला आपल्या अधिकारांचा वापर त्या मर्यादामध्येच करावयाचा आहे ज्या तुम्ही त्याला घालून दिल्या आहेत. चौथी गोष्ट ही की आपल्या मालमत्तेमध्ये आपल्या इच्छेला त्याने पुरे करावयाचे आहे, त्याच्या स्वत:च्या इच्छेला नव्हे. या चार अटी प्रतिनिधीचा शब्द उच्चारताच आपोआप माणसाच्या मनात येतात. एखादा प्रतिनिधी या चार अटींना जर पूर्ण करीत नाही तर आपण म्हणाल की त्याने प्रतिनिधीत्वाच्या जबाबदारीचे योग्य पालन केले नाही आणि त्याने तो करार मोडला, ज्याचा प्रतिनिधीत्वाच्या अर्थात समावेश आहे. ठीक याच अर्थ इस्लाम माणसाला अल्लाहचा प्रतिनिधी ठरवतो आणि खिलाफतीच्या कल्पनेमध्ये याच चार अटींचा समावेश आहे. या राजकीय दृष्टिकोनानुसार जी राज्यसत्ता प्रस्थापित होईल ती वस्तुत: अल्लाहच्या अधिपत्याखालील मानवी प्रतिनिधित्व असेल, ज्याला अल्लाहच्या राज्यात त्याने दिलेल्या आदेशानुसार आणि त्याने ठरविलेल्या मर्यादेत कार्य करून त्याची इच्छा पूर्ण करावयाची आहे.
खिलाफतीबद्दलच्या या खुलाशासंबंधी एवढी गोष्ट आणखीन समजून घेतली पाहिजे की इस्लामचा राजकीय दृष्टिकोन कोणा एका व्यक्तीला अगर कुटुंबाला अगर वर्गाला प्रतिनिधी ठरवित नाही. तर त्या सर्व समाजाकडे प्रतिनिधीत्वाचा अधिकार सोपवितो जो "तौहीद'(एकेश्वरत्व) व "रिसालत' (प्रेषित्व) च्या मूलभूत तत्वांचा स्वीकार करून प्रतिनिधीत्वाच्या अटी पुऱ्या करण्यास तयार व पात्र असतो. असा समाज, सामूहिकरीत्या प्रतिनिधीत्वाची जबाबदारी पत्करण्यास पात्र आहे आणि हे प्रतिनिधित्व त्या समाजातील प्रत्येक व्यक्तिप्रत पोहचते. याच बिंदूपासून इस्लाममध्ये "लोकशाही' ची सुरुवात होते. इस्लामी समाजाचा प्रत्येक घटक प्रतिनिधीत्वाचा हक्क व अधिकार बाळगतो आणि या हक्क व अधिकारामध्ये सर्व लोक समान भागीदार आहेत. कोणाचे कोणावर वर्चस्व नाही आणि ना कोणाला हा अधिकार आहे की त्याने दुसऱ्या कोणास या हक्क व अधिकारापासून वंचित करावे. राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी शासन बनविले जाईल ते या सर्व लोकांच्या मर्जनुसार बनविले जाईल. हेच लोक आपल्या प्रतिनिधीत्वाच्या अधिकारांचा एक भाग या शासनाकडे सोपवतील. या शासनाची उभारणी त्याच्या मतानुसार होईल आणि त्यांच्या सल्ल्याने ते चालेल. जी व्यक्ती त्यांचा विश्वास संपादन करील ती त्यांच्यातर्फे खिलाफतीची कर्तव्ये पार पाडील आणि जी त्यांचा विश्वास गमावून बसेल तिला सत्तेच्या अधिकार पदावरून दूर व्हावे लागले. या दृष्टीने इस्लामी लोकशाही ही एक परिपूर्ण लोकशाही आहे. तितकीच परिपूर्ण जितकी परिपूर्ण एखादी लोकशाही होऊ शकते. परंतु जी गोष्ट इस्लामी लोकशाहीला पाश्चिमात्य लोकशाहीतून वेगळी करते ती ही आहे की पश्चिमेचा राजकीय दृष्टिकोन ""सार्वभौम लोकशाही'' चा आहे तर इस्लामचा ""लोकतांत्रिक खिलाफत'' चा आहे. तेथे लोक स्वत: सत्ताधीश आहेत तर येथे सत्ताधीश अल्लाह आहे आणि लोक त्याचे प्रतिनिधी आहेत. तेथे आपले राज्यशास्त्र (शरियत) स्वत: लोक तयार करतात, येथे त्यांना त्या शरियतचे पालन करावे लागते जी त्यांना त्यांच्या अल्लाहने पैगंबरामार्फत दिलेली आहे. तेथे शासनाचे काम लोकांच्या मनिषा पूर्ण करणे हे असते. येथे शासन व ते निवडणारे लोक या सर्वांचे कार्य अल्लाहची मनिषा पूर्ण करणे हे असते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पाश्चिमात्य लोकशाही म्हणजे अनियंत्रित अशी एक लोकसत्ता आहे जी आपल्या अधिकाराचा वापर अनिर्बंधपणे करते. याउलट इस्लामी लोकशाही कायद्याने नियंत्रित असे आज्ञापालन आहे, जेथे आपले अधिकार अल्लाहने दिलेल्या आदेशानुसार त्याने ठरवून दिलेल्या मर्यादेत वापरले जातात. आता मी आपल्यासमोर त्या राज्याची संक्षिप्त पण स्पष्ट अशी रूपरेखा मांडतो जी  "तौहीद' (एकश्वरत्व), "रिसालत' (प्रेषित्व) व "खिलाफत' (प्रतिनिधित्व)च्या तत्वावर आधारलेली आहे.
या राज्यसत्तेचा उद्देश पवित्र कुरआनमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे. अल्लाह मानवी जीवनाला ज्या सद्‌गुणांनी अलंकृत पाहू इच्छितो ते सद्‌गुण प्रस्थापित करणे, त्यांची बुद्धी व उत्कर्ष घडवून आणणे हे त्या राज्यसत्तेचे उद्दिष्ट राहील. याबरोबरच अल्लाहला मानवी जीवनात जे दुर्गुण असणे पसंत नाही त्या दुर्गुणांना रोखणे व मिटविणे हेसुद्धा तिचे उद्दिष्ट राहील. इस्लाममध्ये राज्यसत्तेचे उद्दिष्ट केवळ देशाचा कारभार पाहणे आणि एखाद्या विशिष्ट समाजाच्या सामूहिक इच्छांची पूर्त करणे हे नाही, याऐवजी इस्लाम, राज्यसत्तेसमोर हे ध्येयधोरण ठेवितो जे प्राप्त करण्यासाठी तिला आपल्या सर्व साधनांचा, मार्गाचा व शक्तीचा वापर केला पाहिजे. आणि ते ध्येयधोरण हे आहे की अल्लाह आपल्या जमिनीवर आपल्या दासांच्या जीवनामध्ये जी निर्मळता, जे सौंदर्य, जी खुशाली, जी सुधारणा व प्रगती व जी सफलता पाहू इच्छितो ती त्यामध्ये दृग्गोचर व्हावी आणि बिघाडाच्या त्या सर्व प्रकारांचे उच्चाटन व्हावे जे अल्लाहजवळ त्याच्या जमिनीला उद्‌ध्वस्त करणारे आणि त्याच्या दासांचे जीवन खराब करणारे आहेत. या ध्येयधोरणाबरोबरच इस्लाम आपल्यासमोर चांगल्या व वाईटाची एक स्पष्ट अशी कल्पना ठेवितो, ज्यामध्ये अपेक्षित सद्‌गुणांना व अप्रिय अशा दुर्गुणांना स्पष्ट केले गेले आहे. या कल्पनेला दृष्टिसमोर ठेवून इस्लामी राज्यसत्ता प्रत्येक काळात व प्रत्येक परिस्थितीत आपल्या सुधारणेचा कार्यक्रम आखू शकते.
इस्लामची स्थायी निकड ही आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिक तत्वांचे पालन केले जावे आणि म्हणून तो आपल्या राज्यसत्तेसाठीसुद्धा हे निश्चित धोरण ठरवितो की तिचे राजकारण नि:स्पृह न्याय, अकलंकित सत्य आणि खरा प्रामाणिकपणा यांच्यावर प्रस्थापित व्हावे. तो देशाच्या राज्यकारभाराच्या किंवा राष्ट्राच्या हितसंबंधासाठी खोटेपणा, धोकेबाजी आणि अन्याय यांना कोणत्याही परिस्थितीत सहन करण्यास तयार नाही. देशामधील राजा व प्रजा यांचे संबंध असोत वा देशाबाहेरील दुसऱ्या राष्ट्रांबरोबरचे संबंध असोत, दोहोमध्ये तो सत्य, प्रामाणिकपणा व न्याय यांना हेतू व उद्दिष्टांवर प्राधान्य देतो. मुस्लिम व्यक्तिप्रमाणेच मुस्लिम राज्य सत्तेवरही तो निर्बंध घालतो की करार कराल तर तो पुरा करा देवघेवीची परिमाणे सारखी ठेवा, उक्तीप्रमाणे कृती करा आणि जशी कृती कराल तशीच उक्ती ठेवा. आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याचीही जाणीव ठेवा आणि दुसऱ्यांच्या कर्तव्याबरोबर त्यांच्या हक्कांना विसरू नका. सामथ्र्याला, अत्याचाराऐवजी न्यायाच्या प्रस्थापनेचे साधन बनवा. हक्काला जाणा व तो अदा करा कारण या अमानतींचा तुम्हाला तुमच्या अल्लाहसमोर पुरा हिशेब द्यावयाचा आहे.


स्त्रीची खरी जबाबदारी घर आहे

इस्लाम हे सुद्धा सांगतो की स्त्रीची खरी जबाबदारी, जिच्यासंबंधी ती अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. तिचे घर आहे. तिने पहिले प्राधान्य घराला द्यावयाचे आहे कारण ते तिच्या जबाबदारीत सामील आहे. ते तिच्या पतीच्या सुख-शांतीस कारणीभूत आहे, ” आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या. जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली, निश्‍चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.” (दिव्य कुरआन, 30:21).
पती, त्याचे घर आणि मुलांच्या बाबतीत अल्लाहसमोर जबाबदार आहे,” तुमच्यापैकी प्रत्येकजण जबाबदार आहे आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्यांच्या बाबतीत जबाबदार आहे. स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याची मुले यांच्या बाबतीत उत्तरदायी आणि रक्षक आहे.” (हदीस : बुखारी)
”उंटावर स्वार होणार्‍या (अरबांच्या) स्त्रियांमध्ये सर्वोत्कृष्ट कुरैशांच्या (स्त्रिया) प्रामाणिक आणि संयमी असतात, ज्या आपल्या छोट्या मुलांच्या बाबतीत दयाळू आणि पतीच्या व्यवहारांची रक्षण करणार्‍या असतात.” (हदीस : बुखारी).

आर्थिक व्यवहाराकरिता सशर्त परवानगी
    वरील जबाबदार्‍या पूर्ण करत असताना जर स्त्री आर्थिक व्यवहार करत असेल तर तिला त्याची परवानगी आहे. परंतु, ही परवानगी काही अटींच्या अधीन राहूल दिली जाते. त्यामध्ये खास करून खालील अटींवर लक्ष देणे योग्य आहे.
    1) ती परक्या पुरूषांसमोर पडद्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याच्यासमोर जाताना तिला इस्लामच्या शिकवणुकीनुसार शालीन पोषाख करावा आणि पडद्याची उपयुक्त व्यवस्था करावी लागेल.     ”हे पैंगबर (स.) इमानधारक स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या दृष्टींची जपणूक करावी आणि आपल्या लज्जास्थानांचे रक्षण करावे आणि आपला साजशृंगार दर्शवू नये, त्या व्यतिरिक्त जे सहजासहजी प्रकट होईल.” (दिव्य कुरआन, 24:31).     ” हे पैगंबर (स.) आपल्या पत्नी व मुली आणि इमानधारकांच्या स्त्रियांना सांगा की आपल्या चादरीचे पदर आपणावर आच्छादून ठेवत जा, ही अधिक योग्य पद्धत होय जेणेकरून त्या ओळखल्या जाव्यात आणि त्रास दिला जाऊ नये.”                             (दिव्य कुरआन , 33:59).
    2) हावभाव व बोलण्यात मृदुपणा नसावा आणि बेधडक बोलण्यापासून वाचले पाहिजे ज्यामुळे चारित्र्यहीनतेचे रस्ते मोकळे व्हावेत. ” हे पैगंबर (स.) च्या पत्नीनों! तुम्ही सामान्य स्त्रियांप्रमाणे नाहीत, जर तुम्ही अल्लाहचे भय बाळगणार्‍या असाल तर हळू आवाजात बोलत जाऊ नका की विकृत हृदयाचा एखादा माणूस लालसेत पडेल, तर स्पष्ट सरळ आवाजात बोला.” (दिव्य कुरआन, 33:32)
    3) ज्याच्याशी लग्नसंबंध होऊ शकतो अशा कोणत्याही पुरूषांबराबर (स्त्रीने) एकांतात राहू नये. स्त्री आणि लग्नसंबंध होऊ शकेल असा पुरूष एकांतात राहतील तर त्यांच्याबरोबर तिसरा सैतान असतो.” (हदीस : मुसनद अहमद).
4) कामाची दशा आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती अशी असू नये, ज्यामध्ये तिच्या स्त्रीसंबंधीच्या दुर्बलता, आवश्यकता आणि शरीअतच्या गरजांचा संकोच होऊ नये. हे तत्त्व कामाच्या वाटणीने, ज्याची चर्चा मागे झाली आहे, स्पष्ट आहे. या अटीच्या परिणामामुळे भांडवलवादी शक्तींना शोषणाची संधी मिळत नाही, जी व्यवसाय आणि स्त्रियांच्या बरोबरीच्या नावावर केली जात आहे.

नग्नता आणि अश्‍लीलतेसंबंधी
इतिहासाच्या प्रत्येक काळात अश्‍लीलता भांडवलदाराचे हत्यार राहिले आहे. देहव्यापार एक फार प्रसिद्ध व्यवसाय आहे. म्हणून  इस्लामने अश्‍लीलता आणि देहव्यापाराचे निर्मुलन करण्यासाठी विशेष उपाय योजले आणि मुळापर्यंत जाऊन त्याचे दरवाजे बंद केले. इस्लामने स्वेच्छा आणि व्यापारी आधारावरील प्रत्येक प्रकारच्या शरीर संबंधास अवैध ठरविले आहे, जे विवाहबाह्य आहे. अवैध शरीरसंबंधास दंडनीय गुन्हा ठरविला आहे आणि कठोर शिक्षेची तरतूद केली आहे, इतकेच नव्हे तर यापुढे जाऊन त्यास कारणीभूत होणार्‍या प्रेरक तत्वांना निषिद्ध ठरविले आहे.
    फक्त व्याभिचारच नाही तर अश्‍लील चित्रे, अश्‍लील साहित्य, अश्‍लील संभाषन, अश्‍लील विचारापर्यंत सर्व प्रकारच्या अश्‍लीलतेचा इस्लामने पूर्णपणे निषिद्ध केले आहे.
    ”अल्लाह न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो, आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो. तो तुम्हाला उपदेश करतो जेणेकरून तुम्ही बोध घ्यावा.” (दिव्य कुरआन, 16:90). ” हे पैगंबर (स.) यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने ज्या वस्तू निषिद्ध केल्या आहेत त्या तर अशा आहेत, निर्लज्जपणाची कामे मग ती उघड असोत अथवा गुप्त आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि अल्लाहबरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार कराल ज्याच्या संबंधात त्याने कोणतेही प्रमाण उतरविले नाही, आणि असे की अल्लाहच्या नावाने तुम्ही एखादी अशी गोष्ट सांगावी जिच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नसेल (की ती खरोखर त्यानेच फर्माविले आहे).” (दिव्य कुरआन, 7:33). ”हे पैगंबर (स.) यांना सांगा की, ” या मी तुम्हाला ऐकवितो की तुमच्या पालनकर्त्याने तुमच्यावर काय निर्बंध घातले आहेत. व  अश्‍लील गोष्टीच्या जवळपासदेखील फिरकू नका. मग त्या उघड असोत अथवा गुपित.”  (दिव्य कुरआन, 6:151)
    अश्‍लीलतेचे दरवाजे इस्लाम किती कणखरपणे बंद करतो याचा अंदाज या हदीसने होतो. पैगंबर मुहम्मद (स.)म्हणाले, ” डोळ्याच्या व्याभिचार पाहणे आहे, जीभेचा व्याभिचार बोलणे आहे आणि मनाचा व्याभिचार इच्छिणे आहे, जननेंद्रिय त्याची पूर्तता करतो किंवा त्यास नकार देते.” (हदीस : बुखारी).
    पाहण्याची मनाई फक्त वस्तू व अवयवापर्यंतच मर्यादित नाही. चित्र, व्हीडिओ, वेबकॉन्फरन्स इत्यादींचासुद्धा त्यात समावेश आहे. कोणत्याही स्त्रीच्या आकाराचे विस्तृत वर्णन करणे किंवा तिच्या छुप्या सौंदर्याचे चित्रांकन करणे हेसुद्धा इस्लाम पसंद करत नाही.
    ”कोणत्याही स्त्रीने एखाद्या स्त्रीचे आपल्या पतीसमोर (तिच्या) आकाराचे असे वर्णन करू नये जणूकाही तो तिला समोर पाहात आहे.” (हदीस : बुखारी).
    ज्या व्यापारामार्फत अश्‍लीलतेचा प्रचार-प्रसार तो व्यापार इस्लाम निष्क्रिय ठरवितो. जी व्यक्ती व्यापार, जाहिरात किंवा कोणत्याही माध्यमातून लोकांमध्ये अश्‍लीलतेचा प्रसार करते, पवित्र कुरआन त्या व्यक्तीस कठोर यातनेचा इशारा देतो.
    ” जे लोक इच्छितात की इमानधारकांच्या समुदायात अश्‍लीलता पसरावी ते लोक इहलोकात व परलोकात दु:खदायी शिक्षेस पात्र आहेत. अल्लाह जाणतो आणि तुम्ही जाणत नाही.” (दिव्य कुरआन, 24:19).
    पोर्नोग्राफी (अश्‍लील साहित्य, फिल्म वगैरे) अथवा याच्याशी संबंधित सर्व गोष्टींचा व्यापार निषिद्ध आहे. यातील कोणत्याही व्यापाराला कसल्याही प्रकारची मदत निषिद्ध आहे. अशा कंपनीचे शेअर विकत घेणे निषिद्ध आहे. ज्या कोणाचे थोडे भांडवल या व्यापारात लागले असेल तेही निषिद्ध. एखादी व्यक्ती इंटरनेटचा कॅफे चालवित असेल तर त्याने आपल्या कॅफेमध्ये चुकीची साईड पाहिली जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे. ” जेव्हा अल्लाह कोणत्याही गोष्टीची मनाई करतो तेव्हा त्याची किंमत (घेणे आणि देणे) याससुद्धा मनाई करतो.” (हदीस : मुसनद अहमद, अबु दाऊद).
    याप्रमाणे इस्लामने अश्‍लीलतेच्या उद्योगधंद्यात सहभागी असणारे, विकत घेणारे, त्यामध्ये भांडवल लावणारे आणि त्यांची कोणत्याही प्रकारे मदत करणारे अशा सर्वांचे रस्ते बंद केले आहेत. देहव्यापार तर इस्लामी समाजात अजिबात चालू शकत नाही. पवित्र कुरआनने दासींकडून असे काम करविणे (याची त्या काळातील सदाचारी लोकांतही प्रथा होती) यास मनाई केली आहे.
    ”आणि आपल्या दासींना आपल्या ऐहिक लाभापोटी वेश्या व्यवसायासाठी अगतिक करू नका. जेव्हा त्या स्वत: सच्चरित्र राहू इच्छित असतील.” (दिव्य कुरआन, 24:33.) क्रमश:

माननीय सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे एक महिला आली आणि आम्ही पैगंबरांजवळ बसलो होतो. `ती म्हणाली, ‘‘माझे पती सफवान बिन  मुत्तिल मला मारहाण करतात. जेव्हा मी नमाज अदा करीत असते आणि जेव्हा मी रोजा धारण करते तेव्हा मला रोजा मोडण्यास सांगतात आणि ते ‘फजर’ची (सूर्योदयापूर्वीची) नमाज  सूर्योदय होण्यापूर्वी अदा करीत नाहीत.’’ अबू सईद (रजि.) म्हणतात की सफवान तेथेच बसले होते. तेव्हा पैगंबरांनी सफवान यांना त्यांच्या पत्नीच्या तक्रारीबाबत विचारणा केली तेव्हा  त्यांनी उत्तर दिले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! नमाज अदा केल्यानंतर मारहाण करण्याच्या तक्रारीची हकीकत अशी आहे की ती दोन-दोन सूरहचे पठण करते आणि मी तिला तसे करण्यास  मनाई करतो.’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘एकच सूरह पुरेशी आहे.’’ सफवान पुन्हा म्हणाले, ‘‘रोजा मोडण्याच्या तक्रारीची हकीकत अशी की रोजा धारण करीत राहते आणि मी  तरूण मनुष्य आहे, संयम राखू शकत नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘एखादी स्त्री आपल्या पतीच्या परवानगीशिवाय रोजा (ऐच्छिक) धारण करू शकत नाही.’’ त्यानंतर सफवान   म्हणाले, ‘‘सूयोदयानंतर नमाज अदा करण्याबाबत सांगायचे झाले तर आम्ही सूर्योदयापूर्वी झोपेतून न उठण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या घराण्याचे आहोत.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हे सफवान!  जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तुम्ही नमाज अदा करा.’’ (अबू दाऊद)

स्पष्टीकरण
(१) पतींना हा अधिकार नाही की त्यांनी आपल्या पत्नींना फर्ज (अनिवार्य) नमाज अदा करण्यापासून रोखावे. महिलेकरिता हे आवश्यक आहे की तिने पतीच्या इच्छांचा आदर करावा  आणि धर्मपरायणतेच्या उत्साहापोटी तिने मोठमोठ्या सूरहचे पठण करू नये. ऐच्छिक नमाजबाबत असे की तिने पतीच्या गरजांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पतीच्या  परवानगीशिवाय ऐच्छिक नमाज अदा करू नये. तसेच ऐच्छिक रोजादेखील पतीच्या परवानगीशिवाय ठेवू नये.
(२) सफवान बिन मुअतिल रात्रीच्या वेळी लोकांच्या शेतांमध्ये सिंचनाचे पाणी सोडण्याचे काम करीत होता. रात्रीचा अधिकांश भाग अशाप्रकारे कष्ट करण्यात जात असेल तर मनुष्याला  वेळेवर फजरच्या नमाजसाठी जाग येणे शक्य नाही. सफवान बिन मुअतिल उच्च दर्जाचे सहाबी (पैगंबर मुहम्मद स. यांचे अनुयायी - साथीदार) होते. त्यांच्या बाबतीत असे म्हणणे चुकीचे ठरेल की ते फजरच्या नमाजच्या बाबतीत निष्काळजीपणा करतील. असे योगायोगाने होत असेल की ते रात्री उशिरा झोपले असतील आणि कोणी त्यांना उठविले नसेल आणि  फजरची नमाज राहून गेली. ही परिस्थिती पाहून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे सफवान! जेव्हा तुम्ही झोपेतून जागे व्हाल तेव्हा फजरची नमाज अदा करा.’’ अन्यथा जर  पैगंबरांजवळ ते नमाजच्या बाबतीत निष्काळजीपणा व गफलत करणारे असते तर पैगंबर त्यांच्यावर नाराज झाले असते.

माननीय असमा बिन्ते यजीद यांच्या कथनानुसार, मी आपल्या काही समवयस्क मुलींसोबत बसले होते आणि आमच्या जवळून पैगंबर मुहम्मद (स.) गेले. पैगंबरांनी आम्हाला सलाम  केला आणि म्हणाले, ‘‘तुम्ही चांगला व्यवहार करणाऱ्या पतींच्या कृतघ्न बनू नका.’’ आणि मग म्हणाले, ‘‘तुम्हा महिलांपैकी काहींची अशी स्थिती असते की आपल्या आईवडिलांच्या घरी  दीर्घकाळपर्यंत कुमारिका राहतात, मग अल्लाह त्यांना पती देतो आणि त्यांना अपत्य होते, मग एखाद्या गोष्टीवरून त्यांना राग येतो आणि पतींना म्हणतात, मला तुझ्याकडून कधी  विश्रांती लाभली नाही, तू माझ्याशी कसलाही उपकार केलेला नाहीस.’’ (हदीस : अल अदबुल मुफरद)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये महिलांना कृतघ्नतेपासून वाचण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा रोग सर्वसाधारणपणे महिलांमध्येच आढळतो. म्हणून महिलांना त्यापासून अलिप्त राहण्याचा खूप प्रयत्न करायला हवा.

माननीय औफ बिन मालिक यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी आणि करपलेल्या चेहऱ्याची महिला अंतिम निवाड्याच्या दिवशी या दोन बोटांसारखे असू.’’ (यजीद बिन जरीअ यांनी ही हदीस कथन करताना आपल्या हाताचे मधले बोट आणि अंगठ्याजवळचे बोटाकडे इशारा केला) म्हणजे ती महिला जिचा पती मरण पावला आणि  घराण्याची प्रतिष्ठा आणि वैयक्तिक रूप व सौंदर्य असतानादेखील तिने मेलेल्या पतीच्या मुलांकरिता स्वत:ला विवाहापासून दूर ठेवले, इतकेच काय ती मुले तिच्यापासून अलिप्त झाली  किंवा मृत्यूमुखी पडली. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
जर एखादी महिला विधवा झाली आणि तिची लहानलहान मुले असतील आणि लोक तिच्याशी विवाह करू इच्छितही असतील, परंतु ती आपल्या त्या निराधार मुलांच्या संगोपणासाठी  विवाह करीत नाही आणि अब्रू व निष्कलंक राहून जीवन व्यतीत करते. तर अशा महिलेला अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांचे सान्निध्य प्राप्त होईल.

माननीय  सुराका बिन मालिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी तुम्हाला उत्तम सदका (दानधर्म) सांगू का? ती जी तुझी मुलगी तुझ्याकडे परत पाठविली  गेली आहे आणि तिला तुझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणी कमवून खाऊ घालणारा नाही.’’ (हदीस : इब्ने माजा)

स्पष्टीकरण
अशी मुलगी जिची कुरूपता किंवा शारीरिक कमतरतेमुळे लग्न होऊ शकले नाही किंवा लग्नानंतर घटस्फोट झाला आहे आणि तुमच्याव्यतिरिक्त तिचे पालनपोषण करणारा कोणीही  नाही तर तिच्यावर जो काही खर्च कराल तो अल्लाहच्या दृष्टीने उत्तमोत्तम सदका (दान) असेल.

अनाथाचा अधिकार
माननीय सहल बिन सअद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी आणि अनाथाचे पालनपोषण करणारा आणि दुसऱ्या वंचितांचे पालनपोषण करणारा आम्ही  दोघे स्वर्गात अशाप्रकारे असू.’’ असे म्हणून पैगंबरांनी मधले बोट आणि अंगठ्याजवळचे बोट दाखविले आणि त्या दोन बोटांमध्ये थोडेसे अंतर ठेवले. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण
अनाथांचे पालनपोषण करणारे स्वर्गात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ राहतील आणि ही शुभवार्ता फक्त अनाथांचे पालनपोषण करणारांसाठीच नाही तर विवश आणि वंचित लोकांचे पालनपोषण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिमांच्या घरात सर्वांत उत्तम घर ते आहे ज्यात कोणी अनाथ असेल आणि त्याच्याशी  चांगली वर्तणूक केली जात असेल आणि मुस्लिमांचे सर्वांत वाईट घर ते आहे ज्यात कोणी अनाथ असेल आणि त्याच्याशी वाईट व्यवहार केला जात असेल.’’ (इब्ने माजा)

माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना आपल्या मनाचा निष्ठूरपणा आणि कठोरपणा सांगितला, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अनाथाच्या  डोक्यावर सहानुभूतीचा हात फिरवा आणि गरिबांना जेवू घाला.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
जर एखाद्या मनुष्याला आपल्या मनाच्या कठोरतेचा इलाज करण्याची इच्छा असेल तर त्याने सहानुभूती व कृपेने काम करण्याची सुरूवात करावी. गरजवंत व निराधार लोकांची गरज भागवावी आणि त्यांच्या कामांमध्ये त्यांची मदत करावी तेव्हा त्याच्या मनाचा कठोरपणा नष्ट होईल आणि त्याच्या मननात दया व कृपा निर्माण होईल.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget