Latest Post


अल्लाहने मानवाला बुद्धी दिली आहे ज्याद्वारे तो ज्ञानप्राप्ती करतो. त्याला विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती बहाल केली आहे, ज्याद्वारे तो चांगल्या आणि वाईटाची पारख करू शकतो. खरे आणि खोटे ओळखण्याची जन्मजात कुव्वत माणसाला लाभलेली आहे. या साऱ्याबरोबरच त्यास इच्छा, योजना, अधिकार आणि स्वातंत्र्यही दिलेले आहे. विचार आणि विवेकाचा उपयोग करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मानवाला दिले गेले आहे. माणूस शिकला सवरलेला नसला तरी या सर्व उपजत गोष्टींमुळे चूक आणि बरोबर, खरे आणि खोटे, चांगले आणि बाईट याबद्दलची पारख त्याला आपसुकच येते. प्रत्येक माणसाला आयुष्यात कोणत्या न कोणत्या वळणावर त्याच्या निर्मितीबाबतचे प्रश्न पडतातच. त्याचबरोबर मरणोपरांत आपले काय होईल हाही प्रश्न अधूनमधून छळत असतो. प्रत्येक माणूस आपले ज्ञान, आपले विचार आणि विवेकानुसार या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. माणूस अशिक्षित असला तरी त्याला त्याच्या निर्मात्याचा ध्यास असतो.

जगातील सारी विश्वविद्यालये अलिकडच्या काळात म्हणजे गेल्या आठ-दहा शतकांत प्रस्थापित झालेली आढळतात. मग त्यापूर्वी सारे लोक अज्ञानी होते काय? किंबहुना आधुनिक विज्ञान हे अलीकडच्या दोन-तीन शतकांत प्रस्थापित झाले आणि प्रगल्भ झाले असे म्हणता येईल. म्हणजेच मानवाच्या निर्मितीपासूनच अल्लाहने प्रत्येक मानवाला मग ती स्त्री असो की पुरुष बुद्धी, विवेक, आकलन, वैचारिक बैठक, निर्णयक्षमता त्याचबरोबर स्वातंत्र्यही दिले आहे.

आधीपासूनच श्रद्धावंत आणि नास्तिक यांचे आपले आपले हेवेदावे आणि विचार आहेत. आधुनिक विज्ञानवादी ही सारी सृष्टी कोणी निर्माण केली नसून ती स्व: निर्माण झालेली आहे असे मानतात. तर श्रद्धावंत या सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे असा दृढ विश्वास बाळगून आहेत. खरे पाहता विश्वातील प्रत्येक वस्तू नियमांच्या व बंधनांच्या अधीन आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आपापल्या कक्षेत नियमबद्ध भ्रमण करीत असून ते आपला वेग तसूभरही कमीजास्त करू शकत नाहीत. वस्तु: अंतरिक्षातील सर्व लहानमोठ्या ग्रहापासून पृथ्वीतलावरील अगदी सूक्ष्म जीव-जंतू असो की अणु-रेणू असो सर्वांना त्यांना घालून दिलेल्या नियमातच रहावे लागते. खुद्द मानवदेखील निसर्गनियमांच्या अधीन आहे. विश्वातील प्रत्येक वस्तू, प्राणीमात्र, जीवजंतू, वनस्पती यांच्यासाठीही काही नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसारच त्यांची उत्पत्ती होते आणि क्षतीही. ईश्वरी नियमानुसारच सारे सजीव त्यांना घालून दिलेल्या काळाच्या मर्यादेत जिवंत राहून जगतात आणि मरणही पावतात. साक्षात मानवाच्या जीवनाचा आढावा घेतल्यास तोसुद्धा या नियमांच्या अधीन आहे असे सिद्ध होते. किंबहुना जो माणूस स्व:च्या ताकदीवर आणि हिमतीवर गर्व करतो त्याच्या श्वासोच्छवास, हृदयाचे आकुंचन प्रसरण, चालत असताना हातांची होणारी लयबद्ध हालचाल, त्याची पचनसंस्था इतकेच काय त्याच्या पापण्यांची उघडझाप सुद्धा त्याच्या हातात नाही.

काय आहे अंधार?

एखादा इसम आपल्या जन्मदात्या मातापित्याच्या अस्तित्वालाच मानत नसेल तर अशा माणसास आपण काय म्हणाल? ही सारी सृष्टी अशीच किंवा आपोआपच निर्माण झालेली नसून या सृष्टीचा एक निर्माता आहे असा ठाम विश्वास श्रद्धावंताचा आहे. नास्तिक आणि आधुनिक विज्ञानवादी या सिद्धान्तांना मानत नसले तरी ते आपल्या दाव्यास सिद्धही करू शकलेले नाहीत. विश्वातील बहुतांशी लोक ईश्वराचे अस्तित्व मानतात, कारण श्रद्धा ही मानवी स्वभाव आहे. बहुतांशी लोक कोणा न् कोणावर श्रद्धा बाळगून असतात. काहींची श्रद्धा देवावर, गुरू, बुवा, बाबा, पीर, फकीर, ऋषीमुनी, देवी-देवता, प्राणिमात्र इतकेच नव्हे तर पंचमहाभुतातील अग्नी, वायू, जल, आकाश, ग्रह-तारे, चंद्र, सूर्य यापासून ते थेट सैतान, राक्षसावरही असते. जो तो आपल्या मर्जीनुसार, परंपरेनुसार किंवा त्याला झालेल्या साक्षात्कारानुसार आपली श्रद्धा ठेवतो. आपण ज्याला पूज्य मानतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे काय? याचा आपला विवेक वापरून जो विचार करत नाही तो खरा अंधारात आहे. डोळे असून आंधळा आहे, ज्ञान असून अज्ञानी आहे, ऐकू येणारा असून बहिरा आहे. जगातील असे कोट्यावधी लोक अशा अंधाराच्या खाईत आपले जीवन व्यतीत करीत आहेत. खरा ईश्वर कोण, आपला निर्माता कोण, आपल्या निर्मितीचा उद्देश काय, मरणानंतर आपले काय होईल? असे प्रश्न या अंधारातल्या लोकांना पडत नसतील? मानवाच्या स्व:च्या मर्यादा आहेत. असे असूनसुद्धा माणूस ‘अश्रफुल मखलुकात’ म्हणजेच अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. सृष्टीतील सर्व सजीवांपैकी केवळ मानवाला बुद्धी मिळाली आहे ज्याद्वारे तो विचार करू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याला स्व:चे निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे. आपल्या हिताचे आणि अहिताचेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे. अशी बुद्धिमत्ता, वैचारिक पातळी, निर्णयप्रक्रिया आणि स्वातंत्र्य हे मानवाशिवाय कोणत्याही प्राण्यास नाही, त्यामुळेच तर मरणोपरांत जीवनात ऐहिक जीवनातील पापपुण्यांचा हिशेब फक्त मानवाचाच घेतला जाईल, इतर प्राण्यांचा नाही. त्यामुळे आपण माणूस म्हणून जगताना आपल्या निर्मात्यास ओळखण्याची, त्याची उपासना करण्याची, त्याच्यावर श्रद्धा बाळगण्याची किंवा न बाळगण्याची मुभा अल्लाहने मानवाला दिली आहे. सृष्टीतल्या इतर सर्व गोष्टी जसे सूर्य, चंद्र, तारे, आकाश, धरणी, झाडेझुडपे इतकेच काय सर्व प्राणीसुद्धा अल्लाहचीच उपासना करतात. अल्लाहची उपासना करण्याचे व न करण्याचे स्वातंत्र्य अल्लाहने मानवाला दिलेले आहे.

खरे तर अल्लाहने मानवाची निर्मिती अल्लाहच्या उपासनेसाठीच केलेली आहे. कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे, ’’आणि आम्ही (अल्लाहने) जिन्न आणि मानव यांना आमच्या उपासनेसाठी निर्माण केले आहे.’’ (कुरआन, 51:56) याचा अर्थ मानवाची निर्मितीच मुळात अल्लाहच्या उपासनेसाठीच झालेली आहे. परंतु त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता आणि विवेक याचा वापर करून अल्लाहची उपासना करायची की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्यदेखील दिलेले आहे. तसेच सृष्टीत अशी अनेक चिन्हेही दाखवलेली आहेत ज्यातून अल्लाहच्या अस्तित्वाचे प्रकटीकरण होते.

तुम्ही अल्लाहची उपासना करा किंवा न करा तो तुम्हाला तुम्ही जिवंत असेपर्यंत दाणापाणी देण्याची व्यवस्था करतो. त्याने तुमची निर्मिती केली आहे त्यामुळे तुम्हाला दाणापाणी देण्याची जबाबदारीही घेतली आहे. प्रथम मानवाच्या निर्मितीपासून अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीस विविध प्रकारे मार्गदर्शनही केलेले आहे. विश्वाच्या विविध स्थळी आणि वेळी आपले पैगंबर पाठवून मानवाला असे ठाम आणि स्पष्टपणे सांगितले की, ’’अल्लाहशिवाय उपासनेयोग्य कोणीच नाही.’’ हा एकमेव संदेश देण्यासाठी आणि मानवाला सन्मार्ग दाखविण्यासाठी विविध ग्रंथांचे वेळोवेळी अवतरणही केले. आता इतके सर्व स्पष्ट सांगितलेले असताना जर एखाद्या व्यक्तीने अल्लाहचा इन्कार केला अथवा त्याची उपासना नाकारली तर तो खरेच इतक्या लख्ख आणि स्वच्छ प्रकाशातही गडद अंधाराच्या अधिपत्याखाली नाही काय? त्यामुळे प्रत्येक माणसाने आपण ज्याची पूजा करतो, ज्यांची उपासना करतो तो खरोखरीच आपला निर्माता आहे की नाही याची तपासणी केली पाहिजे. अंधारातून प्रकाशाकडे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा हा अंधार अधिकाधिक गडद होत जाऊन आपण त्यात सामावले जाऊ हे जाणून घेतले पाहिजे. हा जाणून घेण्याचा काळ केवळ आपल्या मृत्यूच्या काळापूर्वीची वेळ आहे. त्यानंतर मात्र या अंधारातून उजेडाकडे जाणे शक्य नाही. याचा अर्थ असा होतो की जे अल्लाहवर विश्वास ठेवतात, त्याची उपासना करतात, त्याला आपला निर्माता मानतात आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखविलेल्या सन्मार्गावर मार्गक्रमण करतात त्यांनाच मरणोपरान्त जीवनात जन्नत मिळणार आहे. यात महत्त्वाची अट अशी की, अल्लाहशिवाय इतर कोणाचीच उपासना त्यांनी करू नये आणि त्याच्या उपासनेत कोणासही भागीदार बनवू नये. त्याचबरोबर प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत असे मानणे आणि सत्कार्य करणेही अत्यावश्यक आहे. नेमके हेच कलमा-ए-तौहीदमध्ये म्हटलेले आहे. ते असे- लाइलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलल्लाह अर्थात- अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही (उपासनेयोग्य) आणि मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.

जो यावर विश्वास ठेवत नाही, अल्लाहची उपासना करीत नाही तो खऱ्या अंधारात आहे. आपण उच्च विद्याविभूषित असलो तरी धर्माच्या बाबतीत कधीच खोलवर जात नाही. वाडवडिलांपासून किंवा पारंपरिकदृष्ट्या जे धार्मिक संस्कार आपल्यावर होतात तेच आपण बरोबर मानून त्याचीच अंमबजावणी करतो आणि तसेच संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीवर करतो. हेच आपल्यावर केलेले संस्कार योग्य आणि बरोबर आहेत की नाही याची तपासणी करणे आपले कर्तव्य नाही काय? किंबहुना डोळस असून शुद्ध आंधळेपणाने आपण त्यावर आचरण करतो. खरे तर हा आपला बौद्धिक अंधार आहे. आपल्या ईश्वराला ओळखण्यासाठी आपण आपल्या बुद्धीचा कधीच वापर करत नाही. ही आपली बौद्धिक दिवाळखोरी नाही का?

जे अल्लाहची उपासना करणार नाहीत, त्यास आपला निर्माता मानणार नाहीत, अशा व्यक्ती जे त्रिवार सत्य आहे ते लपवतात अथवा त्याचा इन्कार करतात अशांनाच काफीर असे संबोधले जाते. हे त्रिवार सत्य म्हणजे अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव निर्माता, मालक, पालनकर्ता आहे आणि केवळ तोच उपासनेच्या लायक आहे. किंबहुना साऱ्या सृष्टीने फक्त त्याची उपासना करणे हा त्याचा हक्क आहे. मरणोपरांत जीवनात अल्लाहची उपासना न केल्यामुळे, त्यास आपला निर्माता मानण्यास इन्कार करणारे तोट्यात राहतील. नरकाग्नीत त्यांना शिक्षा दिली जाईल आणि त्यातून ते बाहेर कधीच येणार नाहीत. कुरआन मजीदमध्ये असा उल्लेख आहे की, जे अल्लाहचा इन्कार करतात त्यांनी इहलोकी जीवनात कितीही सत्कार्य केले तरी पारलौकिक जीवनात ती सर्व सत्कार्ये मृगजळाप्रमाणे असतील. परंतु अल्लाह कोणावरही अन्याय कधीच करीत नाही. त्याचा इन्कार करणाऱ्यासही त्याच्या सत्कार्याचा योग्य तो मोबदला तो याच जीवनात देतो, मग तो मोबदला त्याच्या संपत्तीच्या स्वरूपात असेल, प्रसिद्धीच्या स्वरूपात असेल, आरोग्याच्या स्वरूपात असेल किंवा त्याच्या मुलांबाळांच्या स्वरूपात असेल.

‘कुफ्र’ या शब्दाचा खरा अर्थ लपवणे किंवा झाकणे असा आहे आणि जो मनुष्य अल्लाहच्या सत्याचा इन्कार करणारा आहे तो श्रद्धाहीन आहे. त्यालाच काफीर असे म्हटले जाते. कुफ्र हे एक घोर अज्ञान आहे आणि अल्लाहशी अनभिज्ञ असणे यापेक्षा मोठे अज्ञान काय असू शकते? खरे तर कुफ्र एक अत्याचार आहे. कृतघ्नता आहे. अल्लाहशी प्रतारणा, विद्रोह आहे. त्यामुळे मनुष्याने वेळीच या अंधारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या निर्मात्यास अर्थात अल्लाहला ओळखून त्याच्या उपासनेच्या उजेडाकडे आपले पाऊल टाकले पाहिजे. तरच आपल्याला मरणोपरांत जीवनात खऱ्या अर्थाने यश प्राप्त होईल.

प्रकाशाच्या वाटा

कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

‘‘जे ईमानधारक आहेत त्यांचा मित्र अल्लाह आहे. तो त्यांना अंधारातून काढून प्रकाशाकडे आणतो.‘‘ (कुरआन, 2:257)

खरे तर अंधाराचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या प्रकारांनाही वेगवेगळे पदर आहेत. या उलट प्रकाश हा एकमेवाद्वितीय आहे. एकदा प्रकाशाची किरणे आली की कोणत्याही प्रकारच्या अंधकाराला जागाच उरत नाही. परंतु हा उजेड प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारचे अडथळे मात्र दूर केले पाहिजेत. कारण अंधार करण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत. उदा. तुम्ही डोळे बंद करा अंधार होईल, तुम्ही पडद्याआड व्हा अंधार होईल किंवा अशी कोणतीही गोष्ट करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत उजेड पोहचणार नाही. परंतु तुम्ही डोळे उघडले तर समोर उजेड दिसेल. उजेडाच्या साऱ्या वाटा केवळ अल्लाहपासून सुरू होतात, कारण तोच या सृष्टीचा निर्माता आहे आणि पालनकर्ताही. अल्लाहने म्हटले आहे,

’’अल्लाह श्रद्धावंताचा मित्र आहे आणि श्रद्धाहीनांचा कोणी वाली नाही.‘‘ (कुरआन, 47:11)

या संदेशाद्वारे अल्लाह हे सांगू इच्छितो की जे अल्लाहवर श्रद्धा ठेवून त्याची उपासना करून श्रद्धावंत झाले आहेत त्यांना त्याने त्याच्या खऱ्या उजेडात आणले आहे. त्यांच्या आयुष्यभर ते त्या प्रकाशाच्या झगमगाटात राहतील. हा प्रकाश ईमानाचा आहे, श्रद्धेचा आहे. हा उजेड दाखवण्यासाठी अल्लाहने वेळोवेळी समस्त मानवजातीसाठी वेगवेगळे पैगंबर पाठविले. वेगवेगळ्या धर्मग्रंथांचे अवतरण वेगवेगळ्या वेळी केले. कुरआन मजीद हा ग्रंथ अवतरित करून अल्लाहने कयामतपर्यंत सकल मानवजातीला उजेडाचा स्रोत निर्माण करून दिला आहे. म्हणून अल्लाह कुरआन मजीदमध्ये म्हणतो-

’’हा ग्रंथ आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे जेणेकरून तुम्ही मानव समाजास अंधारातून प्रकाशाकडे आणाल हे अल्लाहच्या आज्ञेने आणि त्या सर्वशक्तिमान अल्लाहच्या मार्गाकडे.‘‘ (कुरआन, 14:1)

याचा अर्थ असा होतो की अल्लाह आपला निर्माता आहे आणि त्याने सर्व पैगंबरांना आज्ञा दिली की त्यांच्या अनुयायांना अंधारातून प्रकाशाकडे आणा. वरील आयतीत अल्लाहने दोन गोष्टींचा उहापोह केला आहे तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि त्यानंतर अल्लाहच्या मार्गावर मार्गक्रमण. उजेडाकडील प्रवास म्हणजे अल्लाहवर श्रद्धा आणि सन्मार्ग होय. आणखी एका ठिकाणी कुरआन मजीदमध्ये अल्लाहने म्हटले आहे-

’’अल्लाह आकाशांचा आणि पृथ्वीचा प्रकाश आहे.‘‘ (कुरआन, 24:35)

या आयतीद्वारे अल्लाहने स्पष्ट केले आहे की तोच खऱ्या प्रकाशाचा स्रोत आहे. त्यामुळे जे अल्लाहची मर्जी प्राप्त करण्यासाठी शांततामय सन्मार्गावर चालतात त्यांना अल्लाहच श्रद्धाहीनतेच्या अत्यंत खोल आणि काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी मदत करतो आणि त्यानुसार मार्गदर्शनही करतो.

उजेडाची ही वाट अत्यंत खडतर असली तरी ज्यास अल्लाहची मर्जी प्राप्त होते त्यास ती सहज साध्य होते. प्रकाशाची ही वाट त्याचे इहलोकातील जीवनच फक्त सुखी, समृद्ध, समाधानी करत नाही तर परलोकातही त्यास जन्नतच्या स्वरूपात कायमस्वरूपी उजेडप्राप्ती होते. हा प्रकाश त्यानंतर कधीही न संपणारा आहे. खरे तर या जीवनरूपी परीक्षेचे ते फलितच आहे. यासाठी आपल्या बुद्धीचा, सद्सद्विवेकाचा, विचारशक्तीचा वापर करून आपल्या अंतापूर्वी आपल्या निर्मात्यास ओळखले की तो सर्वशक्तिमान अल्लाह आपल्याला या जीवनातच वेढणाऱ्या काळ्याकुट्ट अंधारातून आणि मरणोपरांत नरकाग्नीच्या यातनेपासून वाचवेल. त्यामुळे आता आपणच ठरवायचे आहे की कायमस्वरूपी अंधारात आणि नरकाग्नीत राहण्यासाठी कोणाही ऐऱ्यागैऱ्याची पूजा उपासना करायची की सर्वशक्तिमान विश्वनिर्मात्याप्रती सश्रद्ध होऊन सन्मार्गावर चालून त्याची उपासना करून इहलोक आणि परलोकातही प्रकाशाचा मार्ग धरून यशाचे वाटेकरी व्हायचे.

बंधूभगिनीनो! आपण सारे एकाच आदम आणि हव्वाची लेकरे आहोत. आपले आयुष्य केवळ खाणेपिणे, उठणे-बसणे, झोपणे-जागणे, कमावणे-खाणे, चंगळमस्ती करणे यासाठी नसून आपल्या खऱ्या निर्मात्यास ओळखून त्याची उपासना करण्यासाठी आहे. जो अल्लाहला नाकारून इतरांना पूज्य मानतो तो खऱ्या अंधारात आहे आणि अशा स्थितीत त्याचा मृत्यू झाल्यास तो नरकाग्नीच्या खाईत लोटला जाईल आणि कायमस्वरूपी शिक्षा भोगेल. जो अल्लाहसाठी आपले सर्वस्व वाहील, फक्त त्याचीच उपासना करेल आणि त्याच्या प्रेषितांच्यामार्फत दाखविलेल्या मार्गावर चालेल तो अक्षय प्रकाशाच्या लखलखाटात राहील. त्यास जन्नत अर्थात स्वर्गप्राप्ती होऊन तिथला तो कायम निवासी राहील. आता आपण ठरवायचे की अंधारात गुरफटून राहायचे की प्रकाशाशी हातमिळवणी करायची. 


- डॉ. इकबाल मिन्ने

(लेखक : औरंगाबादचे रेडिओलॉजिस्ट असून, विख्यात साहित्यिक आहेत. संपर्क मो.- 7040791137)माननीय जुन्दुब बिन अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहव्यतिरिक्त मला हे स्वीकार्य नाही की तुम्हांपैकी कोणी माझा प्रगाढ मित्र असावा. कारण ईश्वराने मला त्याचा मित्र बनविले आहे जसे त्याने इब्राहीम (अ) यांना त्याचा मित्र बनविले होते.’’

स्पष्टीकरण

अल्लाहसोबत दासाचे प्रगाढ प्रेम असणे यास ‘खुल्लत’ म्हणतात. अशाच प्रकारे माणसासोबत अल्लाहच्या प्रेमातिरेकाससुद्धा ‘खुल्लत’ म्हटले जाते. हे प्रेम खरेतर अल्लाहच्या प्रभुत्वाची अनिवार्यता आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कथनाचा अर्थ, अल्लाहने मला त्याचा दोस्त (खलील) बनविले आहे. याचा अर्थ होतो की, तो माझा मित्र आहे. माझ्या हृदयावर खरेतर त्याचेच अधिपत्य आहे. मी त्याच्यात बिलवूâल हरवून गेलो आहे. त्याच्या प्रेमाने माझ्या हृदयात घर केले आहे.

अशा प्रकारचे अत्यंतिक प्रेम केवळ एकाचसाठी असू शकते. ‘खुल्लत’मध्ये दुसऱ्याची भागीदारी असंभव आहे. एका कविचे काव्य आहे, ‘‘माझी प्रियतमा माझ्या अंतरात आत्म्यासारखी व्याप्त आहे’’ आणि याचमुळे ‘खलील’ला ‘खलील’ म्हटले जाते.

शंका : कुरआनच्या कथनात परस्पर अंतर-विरोध अथवा विरोधाभास आढळतो. परंतु कुरआन तर असे आवाहन करतो की त्यात विरोधा-भास नाही.

कुरआन एक संतुलित आणि सामंजस्यपूर्ण ग्रंथ आहे. यातील कथन आणि वक्तव्यात विसंगती नाही. हा एक असा असाधारण गुण आहे जो अन्यत्र मिळणार नाही. मुख्य रूपाने बहुविध ज्ञानव्यापक नियम-व्यवस्थेत ग्रंथात चुका अनिर्वाय असतात. कुरआन विभिन्न परिस्थितीत थोडा थोडा करून २३ वर्षाच्या कालावधीत अवतरित झाला आहे. अशा स्थितीत यात अगणित विरोधाभास आणि नियमांची भिन्नता असली पाहिजे. परंतु तसे नाही, कुरआनची एक कडी दुसऱ्या कडीसोबत याप्रकारे गुंतलेली आहे की नियम व कायदा याप्रकारे एक-दुसऱ्याबरोबर परस्पर समन्वय साधून आहेत. सामंजस्यरूप धारण केले आहे, जसे एखाद्या मशीन व यंत्राचे भाग एकमेकांत गुंतलेले असून कार्यरत आहेत. कुरआन आपल्या या गुणाचे वर्णन याप्रकारे करीत आहे,

``काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाही? जर हे अल्लाहशिवाय अन्य कोणाकडून असते तर यांत पुष्कळसा विसंवाद आढळला असता.''

(दिव्य कुरआन - ४ : ८२)

कुरआनद्वारा स्थापित मानदंड हा कायमस्वरूपी मानदंड आहे. त्यात कसलाही आंतर्विरोध कुरआनच्या वर्णनात उत्पन्न होत नाही. परंतु विविध प्रसंग व वस्तूचे विवरण क्रमांक बदलल्याने जो प्रभाव वाढविण्यासाठी विशेष हेतुने केलेला आहे, काही विशिष्ट परिस्थितीत सामान्य नियम टाळून काही आदेश दिले गेले आहेत, त्यांना विरोधाभास अथवा आंतर्विरोध म्हणता येणार नाही. जगाच्या प्रत्येक कायद्यात आणि व्यवस्थेत `अपवाद'चे स्थान आहेच. भाषेच्या नियमांतसुद्धा `अपवाद' पाहायला मिळतो. ही लवचिकता आणि सरलतेचे द्योतक आहे. असे जर नसेल तर कठोरतेचे व विविधतेचे स्वरूप प्राप्त होईल. आंतर्विरोध त्या वेळेला झाला असता जेव्हा त्याचा एक नियम दुसऱ्या नियमाला लागू पडण्यात अडचण आली असती. आंतर्विरोध नसण्याचा अर्थ असा की उद्देश आणि मौलिक नियमांत उलटफेर व्हायला नको. असे कुरआनमध्ये कोठेही आढळत नाही की, एक नियम दुसऱ्या नियमाला निष्क्रिय आणि अप्रभावी बनवेल. एका गोष्टीला सत्य ठरवून त्याच गोष्टीला दुसऱ्या ठिकाणी खोटे ठरवून देईल, असे कदापि शक्य नाही.

कुरआनात नमुद केले आहे,

``त्या दिवशी कोणत्याही मानव आणि जिन्नला त्याचा गुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही.'' (दिव्य कुरआन - ५५ : ३९) 

याच्या विरुद्ध बऱ्याच ठिकाणी कुरआन ने नमुद केले आहे.

``तर शपथ आहे तुझ्या पालनकर्त्याची आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू की तुम्ही काय करीत होतात.'' (दिव्य कुरआन - १५ : ९२-९३)

आणि याचप्रमाणे,

``आणि थोडे थांबवा यांना काही विचारावयाचे आहे यांना.'' (दिव्य कुरआन - ३७ : २४)

येथे पहिल्या `आयती'मध्ये प्रलय दिनी अपराध्याला विचारण्याचा नकार दिला आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या `आयती'त विचारपूस करण्याची गोष्ट सांगितली आहे. या दोन्ही बाबतीत विरोध दिसून येत आहे.

याचे समाधान असे होते की जेथे जेथे या `आयती' आल्या आहेत त्यावेळेच्या प्रसंगाबाबत व त्याच्या मागे-पुढे घडलेल्या प्रसंगाबाबत पूर्ण गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. अभ्यास केल्यानंतर तथ्य समोर येते आणि जाणवणाऱ्याचा विरोध संपुष्टात येतो.

एक समाधान हेच की दोन वेगवेगळ्या प्रसंगी ही गोष्ट सांगितलेली आहे. अपराध्याची चौकशी केल्यानंतर, त्याच्या कर्माचे रेकॉर्ड दाखविल्यानंतर स्पष्ट केले जाईल. मग नंतर त्याला नरकाकडे घेऊन जाताना तो काही विनंती, विनवणी करेल तर त्यावेळी त्याच्या विनवणीवर चौकशी होणार नाही. जसे पुढे कुरआनात नमूद केले आहे,

``गुन्हेगार तेथे आपल्या चेहऱ्यावरून ओळखून घेतले जातील आणि त्यांना कपाळाचे केस आणि पाय धरून फरफटले जाईल.'' (दिव्य कुरआन - ५५ : ४१)

त्यांचे चेहरे स्वत:च साक्ष देतील की ते अपराधी आहेत, तसेच त्यांच्या कर्माची नोंदही त्यांना अपराधी सिद्ध करीत आहे. आता मात्र त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्याची गरज नाही. त्यांना आता फरफटत यातनागृहात नेण्यात येत आहे.

दुसरे समाधान असे की विचारल्यावर ते नकार देतील तेव्हा तर अल्लाहच्या विशाल ज्ञानापुढे त्यांचा अपराध सिद्ध झाला असेल. त्याला पुन्हा विचारण्याची गरज नाही. जर विचारणा झालीच तर अपराधींना त्यांच्या अपराधाला स्पष्ट करण्याच्या हेतूने विचारले जाईल. जगात असताना तर `हिशेबाचा दिवस' ते अमान्य करीत. आता स्वत: पाहिला ना तो दिवस! या फटकाऱ्याने त्या अपराधींच्या यातनेत वाढ होईल. जसे वरील आयतीत आपण पाहिले आहे.

पवित्र कुरआनात एका ठिकाणी म्हटले आहे,

``हे पैगंबर (स.) यांना सांगा, काय तुम्ही त्या ईश्वराशी कुप्रâ (द्रोह) करता आणि दुसऱ्यांना त्याचा तुल्यबळ ठरविता ज्याने पृथ्वीला दोन दिवसात बनवून टाकले? तोच तर सर्व जगवासियांचा पालनवर्ता आहे. त्याने (पृथ्वीला अस्तित्त्वांत आणल्या नंतर) वरून तिच्यावर पर्वत रोवले आणि तिच्यांत समृद्धी ठेवली आणि तिच्यांत सर्व मागणाऱ्यांसाठी प्रत्येकाच्या मागणी व गरजेप्रमाणे योग्य अंदाजाने अन्नधान्याची साधने उपलब्ध करून दिली. ही सर्व कामे चार दिवसांत उरकली. मग त्याने आकाशाकडे लक्ष दिले, जे त्यावेळी धुरासमान होते. तेव्हा त्याने दोन दिवसांत आकाश बनवून टाकले.'' (दिव्य कुरआन - ४१ : ९-१२)

कुरआनात अन्य सात ठिकाणी (७:५४, १०:३, ११:७, २५:५९, ३२:४, ५०:३८) असे दाखविले आहे की पृथ्वी, आकाश आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे, त्यांची निर्मिती सहा दिवसांत पूर्ण झाली. परंतु वरील `आयातीत' पृथ्वी दोन दिवसांत, पृथ्वी वरील जीवजंतू, पर्वत इत्यादी चार दिवसांत, नंतर आकाश दोन दिवसांत बनविले. या प्रकारे सृष्टीच्या निर्मितीत आठ दिवस लागले. या गोष्टींत काही मेळ बसत नाही.

दुसरी शंका ही की धरतीची निर्मिती आकाशापूर्वी दाखविली आहे. कुरआन ७९:३० मध्ये आकाश निर्मितीनंतर पृथ्वीनिर्माण, पसरविणे, अंथरण्याची गोष्टसांगितली आहे. या दोन्ही गोष्टींत विरोधाभास जाणवतो. 

शंकेचे निरसन :

या दोन प्रकारच्या शंकांचे निरसन याप्रकारे आहे. वरील `आयतीत' पृथ्वीच्या निर्माणाचे सविस्तर वर्णन आहे. नंतर संक्षिप्त रूपाने पुनरुक्ती आहे. दोन दिवसांत पृथ्वीrच्या निर्मितीनंतर पर्वत, वनस्पती, जीव-जंतू इत्यादींच्या निर्मितीसाठी अतिरिक्त दोन दिवस लागले. एवूâण चार दिवस झाले. पृथ्वीच्या निर्मितीनंतर जीव-जंतूसाठी चार दिवस नाही लागले. मग दोन दिवसांत आकाशाची निर्मिती या प्रकारे एवूâण चार अधिक दोन असे सहा दिवस झाले.

येथे दिवसाचा अर्थ एक दीर्घकाळ, जसे कुरआनमध्ये स्पष्ट केले आहे ,

 `` एक अशा दिवसात ज्याचे प्रमाण तुमच्या  गणनेनुसार एक हजार वर्ष आहे.'' (दिव्य कुरआन ,३२:५)

पृथ्वीrची निर्मिती व आकाश निर्मिती यात पहिले काय? याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. दोन्ही कथनांप्रमाणे असे प्रतीत होते की दोन्हींचे निर्माणकार्य एकत्रित झाले आहे. काही निर्मिती आकाशची व काही निर्मिती धरतीची. जेव्हा एकाच्या निर्मितीची चर्चा सुरू असताना असा अर्थ नाही की दुसरी निर्मिती पूर्ण झाली आहे. जेव्हा कोणी आपले घरकाम सुरू करतो तर जमिनीवर, भिंतीवर, छतावर प्रत्येक भागात थोडे थोडे काम मागे पुढे सुरू राहते, जेवढे निर्माणासाठी जरूरीचे आहे. यावरून निर्माणकार्याची कल्पना केली जाऊ शकते.

एक दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की मागे-पुढे वर्णन करण्याचा अर्थ असा की निर्माणकार्याकडे लक्ष वेधणे होय. काळाच्या दृष्टिकोनातून पहिले वर्णन केलेले निर्माणकार्य पहिले असेल असे नाही.

एका व्यक्तीने स्वत:चे घर उभारले. नंतर त्याने बंगला बांधला. त्यानंतर विहीर खणली. एका मित्राला आपल्या निर्माणकार्याचा परिचय करून देताना म्हणतो, हे मित्रा!ही पाहा विहीर, तो पाहा बंगला ज्याचे बांधकाम मी करून घेतले आणि ते पाहा एक मोठे घर जे मी माझ्या मिळकतीने उभारले. कोणाचेही सहाय्य लाभलेले नाही.

या वर्णाने त्याचा हेतू फक्त हाच की मोठमोठाली कामे एक-एक करून तुमच्या समोर मांडली. इथे त्याचा हेतू असा नाही की पहिले कोणते काम केले व नंतर काय केले. पुन्हा मी घर बनविले. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी वर्णन केलेल्या वस्तूचे निर्माण केल्यानंतर घर बनविले. इथे `पुन्हा'ने तात्पर्य असे की ``नंतर हेही'' याचप्रकारे कुरआनमध्ये धरतीनंतर आकाशनिर्मितीचा उल्लेख आहे, पण त्याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे धरतीची निर्मिती अल्लाहने केली आहे. त्याचप्रकारे आकाशाची निर्मितीही अल्लाहने एकटेच केली आहे.

एक असेही मत आहे की, ``आकाशाच्या निर्मितीनंतर धरतीला अंथरणे''चे वर्णन (कुरआन ७९:३०) प्रमाणे असे सिद्ध होत नाही की धरतीच्या निर्मितीचे वर्णन आहे. धरती फार पूर्वी तयार झाली. नंतर हजारों वर्षानंतर पर्वत, समुद्र व सपाटीकरण झाले. धरतीच्या `अंथरूणा'चा अर्थ असा की भूतल जीवांसाठी उपयोगी होणे होय. म्हणून निर्माणकार्य नंतरचे असे म्हणता येणार नाही.

समाधानासाठी विवरण हे असंभव नाही. म्हणून `आयती'मध्ये विरोध मानणे आवश्यक नाही.सर्व लोकांना आपल्या सद्सद्विवेक बुद्धीप्रमाणे वागण्याचे समान हक्क आहेत आणि आपल्या धर्माप्रमाणे अनिर्बंधपणे आचरण करण्याचा व त्याचा प्रसार व प्रचार करण्याचा हक्क राहील. (भारतीय घटना कलम २५) धार्मिक स्वातंत्र्याच्या या कलमामुळे एखाद्या समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्याला बाधा आणणाऱ्या व त्याला त्याच्या धार्मिक शिकवणींविरूद्ध आचरण करण्यास भाग पाडणाऱ्या अशा कोणत्याही नागरी कायद्याला वावच राहात नाही. जर असे केले तर तो धर्मामध्ये हस्तक्षेप होईल. लोकांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे जे स्वातंत्र्य भारतीय घटनेने दिले आहे त्याचा काय उपयोग? घटनेचे हे कलम रद्द करावे किंवा ‘मुस्लिम पर्सनल लॉ’च्या रक्षणाची हमी द्यावी.

भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिमांना त्यांच्यावर समान नागरी कायदा जबरदस्तीने लादण्यात येणार नाही असे आश्वासन दिले होते. समान नागरी कायदा फक्त त्या लोकांवर बंधनकारक राहील जे स्वखुशीने त्याचे बंधन स्वीकारण्यास तयार होतील. असा कायदा करण्याचे काम भावी पार्लमेंटचे राहील. 

प्रत्येक व्यक्तीला तो ज्या गटाचा किंवा समुदायाचा आहे, त्या जातीच्या पर्सनल लॉप्रमाणे आचरण करण्याची त्याला पूर्ण मुभा राहील. जगामध्ये कितीतरी धर्मनिरपेक्ष देश आहेत की तेथे मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करत नाही. मग आपल्याकडेच का हा हस्तक्षेप होतो? राष्ट्रीय एकात्मता यावर न्या. वाय. व्ही. चंद्रचूड यांनी सांगितले होते, ‘‘सर्वांसाठी विवाहाचा एक कायदा झाल्यास राष्ट्रीय एकतेसाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. पण यामुळे जेव्हा अल्पसंख्य जमातींना ही जाणीव होईल की त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरांना नाहीसे केले जात आहे. तर त्यांची प्रतिक्रिया चांगली राहणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांच्या संबंधावर त्याचा प्रतिकुल परिणाम होईल.’’ 

प्रत्येक मुस्लिमाला बंधनकारक किंवा अनिवार्य नियम कुरआनने दिलेले असताना काही आधुनिक विचार असणारे मुस्लिमसुद्धा आहेत. त्यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये आधुनिक

संस्कृतीच्या प्रवाहानुसार बदल करण्याचे ठरवून आपले गट तयार केले आहेत. त्यांच्या मते इस्लामची सामाजिक व्यवस्था आता जुनी झाली आहे. ती आताच्या आधुनिक काळाशी मेळ खात नाही. शरिया कायद्यातून मुक्त होऊन स्त्री पुरुष समान दर्जा राहील असा समाज बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना माहीत नाही की कुरआनमध्ये स्त्रियांना कोठेही कमी लेखले गेलेले नाही. उलट त्यांना पुरुषांपेक्षा जास्तच उच्च स्थान दिले आहे.

ईश्वराने सर्व मानवजातीच्या हिताचेच योग्यप्रकारे शरिया कायदे केले आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई स्टडी सर्वâल, भारतीय महिला मंच या आणि यासारख्या संघटनांनाही समान नागरी कायदा हवा आहे. धर्मनिरपेक्ष एकात्मता निर्माण करण्यावर यांचा भर असतो. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी शास्त्रीय दृष्टिकोन, आधुनिक शिक्षण, कुरआनचा आधुनिक ज्ञानावर आधारित अर्थ लावण्यावर भर दिला होता.

पारसी, खिश्चन धर्मामध्येसुद्धा इस्लाम धर्माप्रमाणे दत्तक कायदा अस्तित्वात नाही. परंतु जुव्हेनाइल जस्टीस कायद्यान्वये सर्व धर्मीयांना कोणत्याही धर्माचे मूल दत्तक घेता येते. समान नागरी कायदा हा केवळ मुस्लिमांच्या विरोधात नसून खिश्चन, शीख, बौद्ध, जैन, लिंगायत, आदिवासी यांच्यासुद्धा पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून समान नागरी कायदा जबरदस्तीने थोपण्याचा प्रयत्न देशाच्या एकता आणि अखंडतेला विभाजन करणारा आहे.

‘लॉ कमिशन ऑफ इंडिया’ने १६ प्रश्नांची एक प्रश्नावली काढलेली होती. या प्रश्नांत अधिकाधिक प्रश्न मुस्लिमांशी संबंधित होते. सरकार एकीकडे लॉ कमिशनच्या माध्यमातून तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलत आहे. सर्वोच्च न्यायालय तीन तलाक आणि बहुविवाह पद्धत बंद करण्याच्या दिशेने निर्णय घेऊ पाहात आहे. तलाक देण्याच्या मुस्लिम पतींच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे. लग्न, तलाक, या गोष्टी धार्मिक आहेत. त्यामुळे हा राष्ट्रीय चर्चेचा विषय नाही. भारतात प्रदीर्घ काळापासून सर्व जातीधर्मांचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. समान नागरी कायद्याला राष्ट्रीय एकात्मतेशी जोडणे अयोग्य आहे. गोळवलकर गुरुजी जे ज्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक होते त्या वेळी म्हणाले होते, ‘‘जे लोक समान नागरी कायद्याच गोष्ट करतात ते मूर्ख आहेत. या राष्ट्राला एकात्मतेची खरी गरज आहे, सारखेपणाची नाही.’’ निसर्गसुद्धा एकसारखा नाही. ऋतुसुद्धा एकसारखे नाहीत. दिवसाचे २४ तासांचे

वेळापत्रकसुद्धा एकसारखे नाही. मनुष्यप्राणी, सर्व वेगवेगळ्या जाती-कुळातील बनविले ईश्वराने, देशात वा जगात कोठेही विभिन्न श्रद्धा, धर्म, रुढीपरंपरा, रितीरिवाज, समाज पद्धती बनविल्या आहेत, त्यांना एकसारखेपणात आणणे कितीतरी अवघड आहे.

जर सरकारला काही करायचे असेल तर त्याने महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा. कोपर्डी आणि त्यासारखे अक्षम्य अपराध करणाऱ्यांवर शरई कायद्यानुसार कडक शिक्षा द्यावी. सच्चर कमिशनने मुस्लिमांसाठी केलेल्या शिफारशी लागू कराव्यात. मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात १५ टक्के आरक्षण लागू करावे, शिक्षणाच्या वाटा सुलभ कराव्यात. निर्दोष मुलांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यांची हकनाक शिक्षा देऊन त्यांचे आयुष्य बरबाद करू नये. त्यांना मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या संधी नाकारू नयेत. स्त्रीभ्रूणहत्या कायदा कडक करावा.

प्रत्येक मुस्लिम ईश्वराने अवतरित केलेली जीवनव्यवस्था व मुस्लिम पर्सनल लॉला शरियतचा एक अविभाज्य घटक मानतो, तो मुस्लिम पर्सनल लॉचा विरोधक व समान नागरी कायद्याचा समर्थक कसा होईल? ईश्वराची कृपा आहे की याबाबतीत मुस्लिम जागृत आहेत. यामध्ये सर्व संघटनांचे मुस्लिम एकत्र आहेत. यामध्ये महिलासुद्धा आहेत. याचे उदाहरण म्हणजे स्वाक्षरी अभियान. याला सर्व थरांतील महिला आणि पुरुषांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सर्व तळागाळातील लोक एका ठिकाणी एका वेळ लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आहेत. आम्ही शरिया कायद्याबाबत पूर्णपणे समाधानी आहोत. कृपया यात काडीचाही बदल होणार नाही आणि तो बदलण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो बदलणे आम्हाला मंजूर नाही. सरकारने मुस्लिमांचा दृष्टिकोन योग्य प्रकारे जाणून घ्यावा. मुस्लिमेतर समाजाचे गैरसमज दूर करावेत. मीडियाने चुकीचा इस्लाम लोकांना दाखवू नये. सरकारने लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करावा जातीचे भांडवल, मतांचे भांडवल करून आपसांत गैरसमज न पसरविता गुण्यागोविंदाने सर्वांनी एकत्र राहावे, हीच आम्हा मुस्लिम जनतेची रास्त मागणी आहे.माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

मी एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, ‘‘काय तुम्ही ‘वित्र’ची नमाज अदा करण्याअगोदर झोपता?’’ त्यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे आएशा (रजि.)! माझे डोळे झोपतात परंतु माझे हृदय मात्र झोपत नाही.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे झोपण्याच्या स्थितीतसुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) गफलतीपासून अलिप्त राहत असत. त्यांचा आत्मा निद्रावस्थेतसुद्धा जागृत राहत असे, हे याचे स्पष्टप्रमाण आहे की पैगंबरांच्या पवित्र हृदयावर भौतिकेचे नव्हे तर आध्यात्मिकतेचे वर्चस्व होते. याचमुळे पैगंबरांचे हृदयदीप निद्रावस्थेतसुद्धा प्रज्वलित राहात असे.

शंका : कुरआन शेकडो वर्षे जुना ग्रंथ असल्याने आपल्या मूळ स्वरूपात सुरक्षित नाही, कारण प्राचीन धार्मिक ग्रंथांच्या सुरक्षेसाठी काही साधन नव्हते.

कुरआन हा ईशग्रंथ सिद्ध झाल्यानंतर सर्वांत प्रथम प्रश्न असा की, दीड हजार वर्षे झाल्यानंतर कुरआन आपल्या मूळ स्वरूपात सुरक्षित आहे काय? जरी कुरआन ईशग्रंथ असला तरी इतक्या मोठ्या काळात त्यात फेरबदल आणि परिवर्तन होण्याची संभावना आहे. असे असेल तर त्याचा लाभ समाप्त होईल आणि तो ईशग्रंथ संबोधण्याच्या अधिकारापासून मुक्त होईल.

हा एक स्वभाविक प्रश्न आहे. आजपासून दोन-तीनशे वर्षांपूर्वी पुस्तकांना सुरक्षित ठेवण्याची योग्य साधने नव्हती. मुद्रणालय तर नव्हतेच, लेखनसामुग्रीही उपलब्ध नव्हती. प्राचीन काळी पुस्तकांच्या अनेक प्रति तयार करण्याकरिता लिपिक आपल्या हस्ताक्षरांत लिहीत असे. त्यांत चुका होत असत. वेळोवेळी त्यांत नवीन अंश, भाग जोडले जात आणि काही भाग वगळले जात. किडे, वाळवी आणि अग्नी व पाणी इत्यादीपासून संपूर्ण पाने अथवा पुस्तकाचा काही भाग नष्ट होत असे. त्या क्षतीग्रस्त अथवा हरवलेले भागांना त्या विषयाचे विद्वान पंडित आपल्या स्मरण शक्तीच्या आधारे पुन्हा लिहून काढीत. या प्रकारे पुस्तकाचे बहुमूल्य रूप नष्ट होत असे. हेच कारण आहे की सगळ्या जुन्या पुस्तकांच्या प्रतीत पाठांतर व वेगळे अंश सापडतात.

प्रमाण नसतांना अधिक तर लोक मूर्खपणे श्रद्धा व आस्थेने वशीभूत होऊन अशुद्ध प्रतींना डोळे झावूâन शुद्ध समजतात. जर ते ग्रंथ धार्मिक असतील तर श्रद्धा व भक्तीभावाने अधिक घट्ट धरून ठेवतात. परंतु वैज्ञनिक पद्धतीने तपास केल्यास वादाची पुष्टी तर होत नाही आणि वास्तविकता स्पष्ट होते. हे साशंक तथ्य आहे की, काय पवित्र कुरआनची स्थिती अशीच आहे अथवा याहून भिन्न आहे. शंकांच्या वलयातून निघून विश्वास संपादन करण्याच्या स्थितीत निष्पक्ष भावाने वास्तविकता शोधण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे हे आवश्यक आहे की पवित्र कुरआनच्या सुरक्षा साधनांचे परीक्षण करून त्याचे सुरक्षित असल्याची पुष्टी वैज्ञानिक प्रमाणाच्या आधारे प्राप्त केली जावी, मात्र धार्मिक आस्थेवर विश्वास न ठेवता.

पवित्र कुरआन अल्लाहचा अंतिम ग्रंथ आहे. संपूर्ण मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी त्याचे सुरक्षित राहणे अनिवार्य आहे व हा ईशयोजनेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. अल्लाहने सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. याचा स्पष्ट उल्लेख कुरआनमध्ये केलेला आहे. (कुरआन १५ : ९) परंतु ईश्वराने अलौकिक, अप्राकृतिक साधनांचा वापर न करता याची सुरक्षा मानवांद्वारे करवून घेतली आहे जी मानवशक्तीच्या ताब्यात आहे. त्याची पारख केली जाऊ शकते. जर अलौकिक रूपात सुरक्षेची व्यवस्था केली गेली असती तर आमच्यासाठी ती तपासणे व विश्वासपात्र परिस्थितीत पोहोचणे शक्य झाले नसते.

कुरआनच्या सुरक्षेसाठी दोन साधनांचे सहाय्य घेतले गेले. ही दोन्ही साधने अवतरणकाळापासून काही बदल न करता व्यवहारात आणले जात आहेत. पहिले आहे, ``हिफ़्ज करणे'' तोंडीपाठ करणे व दुसरे आहे लिपीबद्ध करून ग्रंथरूपात सुरक्षित करणे.

पवित्र कुरआन थोडे-थोडे करून अवतरित झाला आहे. हे अवतरण देवदूतामार्फत तोंडी ध्वनिउच्चारणासोबत होत असे. अवतरणानंतर तात्काळ पैगंबर मुहम्मद (स.) त्त्वरित पाठ करून घेत आणि त्याचा प्रचार व प्रसारही करीत. पैगंबर स्वत: लिखाण करीत नसत व याकरिता लेखनकार्य करणारे लिपीक या कामासाठी नियुक्त केले होते व ते तात्काळ अवतरित कुरआनचे अंश लिहून घेत असत. कुरआनच्या ``आयती''चे अवतरण झाल्यावर लिपीक बोलविले जात आणि त्या आयतींना लिहून घेतले जाई. लिखित भाग पैगंबर (स.) पठण करवून घेत, कारण योग्य असल्याचे समाधान व विश्वास प्राप्त होई. त्या ``आयती'' अनेक लोक कंठस्थ करून एकमेकांना ऐकवीत. अन्य अनुयायी लोकांना ऐकवीत व संदेशाचा प्रचार-प्रसार करीत. लेखन सामुग्रीच्या रूपात झाडांची मोठाली पाने, उंटाची रूंद हाडे आणि कातडीच्या बारीक सालीचा वापर होत असे. मग त्याची अनेक प्रतिलिपी तयार करून दुसऱ्या मुस्लिमांपर्यंत पोहोचविली जाई व ठेवली जाई. त्यामुळे इतरांना वाचण्याची संधी मिळेल.

कुरआन पठणाला पुण्यकार्यांत सामील केले. त्याचबरोबर दररोज नमाज (प्रार्थना) मध्ये कुरआनच्या काही अंशाचे वाचन (तोंडी) अनिवार्य केले गेले. वर्षांतून एक महिना `रमजान'मध्ये समाजाच्या सर्व लोकांना सामूहिकरित्या नमाज पठणात संपूर्ण कुरआनचे पठण व ऐकणे अनिर्वाय झाले, प्रचलित झाले. ही सर्व कामे पैगंबरांच्या जीवनकाळातच सुरू झाली होती व साऱ्या मुस्लिमांसाठी आदर्श बनली होती.

याप्रकारे कुरआनची शिकवण व उपदेश यांच्या शिकण्या शिकवण्याचे कार्यही जोरात सुरु झाले. पाहता पाहता घरोघरी शिक्षणप्रशिक्षण आणि ज्ञानाच्या ज्योतीची चळवळ सुरू झाली. निरक्षरता व अज्ञानाचा अंधकार दूर झाला. साधारणपणे सर्वच मुस्लिम कुरआन शिक्षणात भाग घेऊ लागले. परंतु जे लक्ष देणारे दक्ष होते ते समाजात विशिष्ट स्थान प्राप्त करत होते. लोकांचा समूह त्यांच्याकडून शिक्षण घेण्याकरिता एकत्र होत असत. हे असे घडत गेले आणि अरब राष्ट्रावर इस्लामचा प्रभाव पडत गेला आणि सत्तास्थानावर मुस्लिम काबीज झाले आणि कुरआनचा आधार घेत सत्ता प्रस्थापित झाली. कुरआनज्ञानात जो श्रेष्ठ ठरला त्याला शासनात उच्च पद बहाल केले गेले. अशा प्रकारे व्यावहारिक जीवनात कुरआन उन्नतीचे साधन बनले. धार्मिक आस्था आणि पुण्य अर्जित करण्याबरोबर भौतिक उन्नतीसाठीचे कारण म्हणून कुरआन-प्रशिक्षणाकडे लोक आकृष्ट होऊ लागले आणि हे स्वभाविक होते. त्या काळी कुरआनव्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रंथांची चलती नव्हती कारण विविध प्रकारच्याज्ञानापासून हे लोक दूर होते. सरकारी व्यवस्थेनुसार कुरआनचे अध्ययन घेण्यावर विशेष भर होता.

वरील कारणांनी लाखों लोक पिढ्या न् पिढ्या कुरआनचे शब्द, आयती, त्यांचे उच्चारण व अर्थज्ञान शिकत गेले. लाखों इसम असे आहेत ज्यांना संपूर्ण ग्रंथ कुरआन क्रमश: कंठस्थ आहे, पाठ आहे. याव्यतिरिक्त लिखित स्वरूपात याचा विस्तार इतका झाला की कोणतेही घर कुरआनच्या प्रतीशिवाय नव्हते. (त्या काळी मुद्रणालय नसतानासुद्धा) कारण ही दैनंदिन गरज होती. ते लिखित प्रती समोर ठेवून पाठ करीत असत. आता मुद्रणव्यवस्था अस्तित्त्वात आल्यानंतर अधिक प्रमाणात कुरआनचे मुद्रण होत आहे.

कुरआनच्या अवतरणकाळापासून ते आजतागायत एक दिवस असा गेला नाही की कुरआन लिखित रूपात नाही अथवा कोणी हाफीज नाही. त्याच्या पाठांतरात आणि मुद्रणांत जेवढी काळजी घेतली जाते, तेवढी अन्य पुस्तकांबाबत घेतली जात नाही. इतिहासातील उल्लिखित प्रमाणाप्रमाणे कुरआनच्या संरक्षणाची सगळी काळजी घेत प्रत्येक प्रत प्रमाणित केली जाते. हेच कारण आहे की जगाच्या कोणत्याही भागात उपलब्ध कुरआनच्या प्रतीमध्ये कमी-जास्त आयती नाहीत, कोणतीही आयत मागे-पुढे नाही, ाâमवारीत त्रुटी नाही आणि पाठांतरात फरक नाही, लाखो प्रतीत अशी आश्चर्यजन्य साम्यता आणि शुद्धता कुरआनव्यतिरिक्त कोणत्याही प्राचीन पुस्तकांत आढळत नाही.लग्नाला उर्दूमध्ये निकाह म्हंटले जाते. यामध्ये सर्वात चांगली गोष्ट मला जी वाटते ती महेर आहे. प्रत्येक निकाहमध्ये वराकडून वधूला निश्चित रक्कम भेट म्हणून दिली जाते. त्याशिवाय निकाहच होत नाही. इस्लामने स्त्रीला महेर घेण्याचा अधिकार दिलेला आहे. महेर किती असावा याबाबत वधू आणि वराकडून जाणकार लोक आपसात चर्चा करून निर्णय घेतात. साधारणपणे महेर रोख रक्कम किंवा सोन्याच्या स्वरूपात असते. मात्र एका मुस्लिम मुलीने यात बदल करून पुस्तक रूपाने महेर मागितल्याची घटना नुकतीच केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात घडली. येथे राहणारी शहला नेचीयिल या मुलीने आपल्या नियोजित पतीकडून  महेरमध्ये 50 दुर्लभ पुस्तकांची मागणी करून सगळ्यांना चकित केले. शहलाचा होणारा पती अनिस आता मल्लापुरम ते हैद्राबाद दरम्यान फिरून प्रत्येक मोठ्या पुस्तकाच्या  दुकानातून आपल्या नियोजित पत्नीला देण्यासाठी पुस्तकांचा शोध घेतोय. शहलाने हैद्राबाद युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्र या  विषयात एम.ए. केलेले आहे. तिने वर पक्षाला 50 पुस्तकांची यादीच  दिलेली आहे. अनिसनेही निर्णय  घेतला आहे की, काहीही करून तो ही पुस्तके मिळविणारच आणि महेरमध्ये देणारच.   महेर हे काही वधूची किमत नाही. हा तर एक सुंदर उपहार आहे. जो पती आपल्या पत्नीला निकाहच्या दरम्यान दोन साक्षीदारांसमक्ष देतो. महेर पत्नीचा अधिकार आहे तर पतीचे कर्तव्य. एकदा महेर दिल्यानंतर त्या रक्कमेचे स्वामीत्व पत्नीकडे जाते. तिला जसे योग्य वाटेल तसे त्या रकमेचा ती विनियोग करू शकते. पती त्या रक्कमेला परतही मागू शकत नाही आणि तिला कसे खर्च करावे, याचे निर्देशही देऊ शकत नाही. इस्लामने महिलांना जे आर्थिक अधिकार दिलेले आहेत त्यातील एक हा अतिशय सुंदर अधिकार आहे. मात्र  आजकाल मुस्लिम समाजातील नव्या पिढीची मुलं महेर देण्यामध्ये जास्त गंभीर नाहीत. निकाहच्या वेळेस महेरची रक्कम उधारीवर  ठेवण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. असे करून ते महेर देण्याचे  टाळत आहेत. एवढेच नव्हे तर इस्लाममध्ये निकाह अतिशय साध्या पद्धतीने मस्जिदीमध्ये करण्याचे शरियाच्या  निर्देशांचीही अवहेलना केली जात आहे. मुस्लिमांमध्येही आता हिंदूंप्रमाणे मोठ-मोठी खर्चिक निकाह केले जात आहेत. लाखों रूपये किंमतीच्या वस्तू दहेजच्या नावाखाली दिल्या जात आहेत.  

बेंगलुरूचे खणन व्यावसायिक आणि कर्नाटक सरकारचे पूर्वमंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या नुकत्याच झालेल्या लग्नात 500 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या लग्नाची चर्चा देशभरात झाली. या लग्नात एक हजार रूपये किमतीची लग्नपत्रिका तयार करण्यात आली होती. जेवणामध्ये 16 प्रकारचे गोड पदार्थ तयार करण्यात आले होते. पाहुण्यांच्या जेवणावर 60 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नवरीच्या आभुषणांवर 150 कोटी रूपये खर्च करण्यात आले. नवरीच्या एका साडीची किंमत 40 लाख असल्याचे माध्यमांमधून लोकांना समजले. मंडप वगैरेवर 25 कोटी रूपये तर मेकप आर्टिस्टवर 30 लाख रूपये खर्च करण्यात आले.  

 भारतात मोठ्या घराण्यांमध्ये होणाऱ्या लग्नामध्ये अशा अवाजवी खर्चाची एक मोठी परंपराच आहे. अलिकडे हिंदू धर्मीयांमध्ये मध्यमवर्गीयांची लग्नेही खर्चिक होऊ लागलेली आहेत. हिंदू धर्मातील जागरूक लोकांनी या संबंधी सामाजिक चेतना निर्माण करून लग्नातील खर्च  कमी करण्यासाठी प्रयत्न चालविलेले  आहेत. कारण की, खर्चिक लग्नांचा सरळ संबंध कन्याभ्रुण हत्येशी आहे. अनेक स्तरावर प्रयत्न होवूनही हिंदू  समाजामध्ये होणाऱ्या अवास्तव खर्चाला आळा बसू शकलेला नाही.  

 आजकाल मुस्लिमांमध्ये सुद्धा निकाह दरम्यान अवास्तव  करण्याची प्रवृत्ती वाढीस लागत असल्याचे दिसून येत आहे. मुस्लिमांमध्ये गरीबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे भपकेबाज लग्नांचा परिणाम गरीब मुस्लिमांवर होत आहे. त्यामुळे अनेक गरीब मुस्लिमांच्या मुलींची लग्न वेळेवर होत नसल्याचे माझ्या लक्षात आलेले आहे. हुंडा, दहेज, अवास्तव खर्च याला शरियते इस्लामीयाने निषिद्ध ठरवलेले आहे. यासंबंधी उत्तर प्रदेशमध्ये एक चांगली घटना घडलेली आहे. बरेलवी मर्कज दर्गाह आला हजरतशी  संबंधित उलेमांनी एक फतवा जारी करून अशी घोषणा केली आहे की, दहेज मागणाऱ्या लोकांच्या लग्नात ते सामिल होणार नाहीत आणि निकाह लावणार नाहीत.  एकीकडे जनार्दन रेड्डीच्या मुलीच्या लग्नाची नकारात्मक चर्चा देशात सुरू असताना दूसरीकडे औरंगाबादच्या एका व्यापाऱ्याच्या मुलीच्या लग्नाची सकारात्मक चर्चाही देशात होत आहे. अजय मुनोत नावाच्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीच्या लग्नात होणाऱ्या अवास्तव खर्चाला फाटा देवून त्या खर्चात 90 गरीबांना 1 बीएचकेचे पक्के घर बांधून भेट म्हणून दिलेले आहे. ही घरे बांधण्यासाठी दीड कोटी रूपये त्याने खर्च केलेले आहेत. दीड एकर जमीनीत ही कॉलनी बांधण्यात आलेली आहे. मुलीचे लग्न साध्या पद्धतीने करून तो खर्च अजय मुनोतने गरीबांच्या घरासाठी करून एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवलेले  आहे.  मुस्लिम समाजातही महेरची शिफारस शरियतने केलेली आहे तर दहेजची निंदा. समाज कोणताही असो लग्न म्हणजे दोन परिवारांना जवळ आणणारी घटना असते. त्यामुळे लग्न अतिशय साध्या पद्धतीने आणि दोन परिवारांमध्ये आनंद द्विगुणीत अशा पद्धतीने होणे अपेक्षित आहे. 

- मीना नलवार

धर्माबाद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget