Latest Post


माननीय अब्दुल्लाह बिन औफ (रजि.) सांगतात.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) अधिकतर ईशस्मरणात राहत असत. व्यर्थ गोष्टींपासून सावध राहत आणि नमाजला दीर्घ व भाषण संक्षिप्त करत असत. ते विधवा व निर्धन गरीबांसोबत चालण्यात संकोच करीत नव्हते आणि विधवा व निर्धनांचे प्रत्येक काम ते करून देत असत. (हदीस : नसई, दारमी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) अधिकतर ईश्वराला स्मरण करीत असत. ईशस्मरणाशी संबंधित प्रत्येक काम ईशस्मरणात समाविष्ट आहे. पैगंबर अल्लाहचे स्मरण विविध प्रकारे प्रत्येक क्षणी करीत असत.

खरे जीवन ईशस्मरण व त्याच्या आठवणीशी संबंधित आहे. ज्या जीवनात ईशस्मरण नाही, ते जीवन नाही तर ते संताप व अभावग्रस्तता आहे. हे वेगळे आहे की एखादा मनुष्य या गोष्टीची जाणीव ठेवून नसेल.

या जगाविषयी पैगंबर मुहम्मद (स.) यांना तर कमीच आवड होती. जगाविषयीच्या गोष्टी ते कमीच बोलत असत. तसे पाहता भौतिक गोष्टीसुद्धा बुद्धीविवेकपूर्ण व उद्देशपूर्ण असत. वास्तविकपणे त्यांना व्यर्थ म्हटले जाऊ शकत नाही. परंतु उपलक्षी त्यांना व्यर्थ म्हटले गेले आहे. व्यर्थ गोष्टींशी अभिप्रेत त्या गोष्टी आहेत ज्यांचा कोणताच वास्तविक उद्देश नसावा आणि जे ईशस्मरणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबोधित नसतील. स्पष्ट आहे की पैगंबरांच्या तोंडून अशी व्यर्थ गोष्टनिघणे अशक्य होते.

मूळत: थोड्यासाठी ‘कलील’ शब्द प्रयुक्त झाला आहे. ‘़कलील’ शब्द निषेधच्या अर्थानेसुद्धा वापरला जातो. या अर्थाने काही लोकांनी या हदीसचा अर्थ असा सांगितला आहे की अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या तोंडून कधीही व्यर्थ बोलत नसत.

अल्लाहशी घनिष्ट संबंध असल्यास नमाज स्वाभाविकपणे दीर्घ होते. तसेच भाषणात अनावश्यक गोष्टींपासून दूर राहिल्यास आणि केवळ आवश्यक गोष्टी करणे पर्याप्त समजले तर भाषण कधीही लांबले जात नाही किंवा ते कंटाळवाणे होत नाही. म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याची दीर्घ नमाज आणि त्याचे संक्षिप्त भाषण त्याच्या बुद्धीमत्तेचे प्रतीक आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

मनुष्याच्या नादानपणाची व अविचारी गोष्ट ही आहे की त्याने भाषण तर लांबलचक द्यावे, परंतु नमाज जी अभिष्ट आहे तिला संक्षिप्त करावे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात किंचितसासुद्धा अहंकार नव्हता जेव्हा की अल्लाहने त्यांना सर्वोच्च स्थान बहाल केले होते.पवित्र कुरआनात नाहक हत्या करण्यास मोठा अपराध ठरवला गेला आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. “जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा वध केला आणि ती हत्या न्याय्य मृत्युदंड नसेल अथवा धरतीवर उपद्रव माजवण्यासाठी नसेल तर अशा व्यक्तीने जणू साऱ्या मानवजातीची हत्या करण्यासारखे आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने कुणाचा जीव वाचवला तर त्याने साऱ्या मानवजातीला वाचवण्यासारखे आहे.” (पवित्र कुरआन-५:३२) यावरून हे स्पष्ट होते की इस्लामच्या नजरेत नाहक हत्या करणे भयंकर अपराध आहे आणि जर कुण्या व्यक्तीने एखाद्या निष्पाप माणसाला वाचवले तर हे पुण्याचे कर्म आहे. नाहक जीव घेणारा खऱ्या अर्थाने समाजाशी बंड करून मानवतेविरूद्ध पाऊल उचलतो. अशा माणसास मानवी जीवनाची किंमत नसते, तेव्हाच तो असे अत्याचार करण्यास धजावतो. हा असा माणूस सबंध मानवजातीला धोकादायक ठरतो. या उलट जो मनुष्य निष्पाप व्यक्तीला मृत्युच्या दाढोतून वाचवतो तो फक्त एक पुण्यकर्म करतो. इतकेच नव्हे तर तो मानवजातीची आणि मानवी प्राणाची कदर करतो. मानवतेचा हितचिंतक असतो. अशीच माणसे समाजात वावरण्यायोग्य असतात. कारण तो समाजात रक्षक असतो. म्हणूनच कुरआनने असे म्हटले आहे की निष्पाप व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. दुसऱ्या ठिकाणी पवित्र कुरआन असे म्हणतो की नाहक हत्या करणे म्हणजे उपद्रव माजविण्यासारखे आहे आणि उपद्रव माजवणारे लोकच त्यास बळी पडतील असे नाही तर इतरांनाही त्याच्या झळा सोसाव्या लागतील. आपल्या समाजात जर उपद्रव माजविणारे काही लोक असतील तर त्यांच्यावर अंकुष ठेवणे सबंध समाजाचे कर्तव्य ठरते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अर्थ अशा कृतींना समाजामध्ये थारा देण्यासारखे असेल जे समाजासाठी घातक आहे.जमीन माणसांना राहण्यालायक आहे का नाही हे माणसांच्या वर्तवणुकीवरूनच ठरते. माणसं जर सदाचारी असतील तर जमीन राहण्यालायक बनते आणि ते दुराचारी असतील तर जमीनीवर राहण्यापेक्षा जमीनीच्या पोटात राहणे जास्त योग्य असते. जनसमूहाचे वर्तन त्यांच्या श्रद्धेनुसार ठरत असते. ईश्वराने संपूर्ण मानव समुहांसाठी श्रद्धा म्हणून इस्लामला पसंती दिलेली आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (संदर्भ : आले इमरान आयत नं. 19). 

जोपर्यंत मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक व्यवहारिकदृष्ट्या इस्लामचा संदेश इतर समाजापर्यंत परिपूर्णरित्या पोहोचविण्याचा संकल्प करणार नाहीत तोपर्यंत जगात होणारे अत्याचार कमी होणार नाहीत. कारणकी सदाचाराची स्थापना करण्यासाठी दुराचाराची पाळेमुळे खंदून काढल्याशिवाय आदर्श समाजाची निर्मिती शक्य नाही. दुराचारी व्यवस्थेतील वाईट गोष्टी हटविल्याशिवाय सदाचारी व्यवस्थेच्या चांगल्या गोष्टींची पेरणी करणे संभव नाही. या कामासाठी मौखिक उपदेशांपेक्षा व्यवहारिक प्रयत्नांची गरज आहे. पैगंबरी मिशनचा उद्देश नैतिक रूपाने श्रेष्ठ समाजाची निर्मिती करणे हाच होता. 

सत्याचा संदेश म्हणजे काय? 

लाईलाहा ईलल्लाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह (सल्ल.) म्हणजे अल्लाहशिवाय कोणी ईश्वर नाही आणि मुहम्मद सल्ल. हे त्याचे प्रेषित आहेत. या दोन वाक्याच्या श्रद्धासुत्राने रानटी प्रवृत्तीच्या अरबी टोळ्यांच्या जीवनामध्ये अभूतपूर्व अशी क्रांती घडवून आणली आणि पाहता-पाहता शंभर वर्षाच्या आत पृथ्वीवरील एक तृतीयांश भूमीवर या श्रद्धा सुत्राने ताबा मिळविला. हेच श्रद्धा सुत्र म्हणजे सत्याचा संदेश होय. 

सत्याचा संदेश का द्यावा?

पृथ्वीवर खऱ्या अर्थाने शांतता व सुव्यवस्थता  राखण्यासाठी हा संदेश द्यावा. या संदेशाशिवाय जगाकडे दूसरा पर्याय नाही.  

सत्याचा संदेश कसा द्यावा?

ईश्वर एक आहे आणि त्याचे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) आहेत. हे सत्य आहे आणि या सत्याचा संदेश जगाला कसा द्यावा? याचे मार्गदर्शन सुद्धा कुरआनमध्येच केले गेलेले आहे. म्हणून म्हटलेले आहे की, ’’हे पैगंबर सल्ल. ! आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे (लोकांना) आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहीत, लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल.’’ (संदर्भ : सुरे नहेल आयत क्र. 125). प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की,’’ तुम्ही जमिनीवर राहणाऱ्या लोकांवर दया करा आकाशात राहणारा ईश्वर तुमच्यावर दया करील.’’ (तिर्मिजी : खंड-2 हदीस क्र. 19).

भारतापुरता विचार केला तर भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आचरणाची व त्याच्या प्रचार व प्रसाराचा मुलभूत हक्क सर्व नागरिकांना दिलेला आहे. म्हणूनच भारताचे नागरिक म्हणून मुस्लिमांना इस्लामनुसार जीवन जगण्याची व त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क अनुच्छेद 25 नुसार मिळालेला आहे. मात्र हा हक्क प्रत्यक्षात वापरतांना तारतम्य बाळगण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे कारण या ह्न्नाच्या विरूद्ध अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा केलेला आहे. इस्लामच्या सुरूवातीच्या काळात इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक मुस्लिम व्यक्ती तळमळीने काम करता होता. मात्र अलिकडच्या काळात भौतिक प्रगती आणि उच्च राहणीमानाच्या हव्यासापोटी मुस्लिम समाजामध्ये इतरांपर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याच्या प्रक्रियेमध्ये संथपणा आलेला आहे. नव्हे अनेक मुस्लिम असे आहेत ज्यांच्या जीवनात इस्लाम नावापुरताच शिल्लक राहिलेला आहे. वास्तविक पाहता आज देशात भ्रष्टाचार, अनाचार, अन्याय, अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की तो नष्ट करण्यासाठी इस्लामची शिकवण संपूर्ण ताकदीने देणे गरजेचे झाले आहे. उदा. कल्पना करा तुम्ही कोविड-19 च्या औषधाचा शोध लावण्यात यशस्वी झालात तर तुमच्यात ते औषध इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याची जी तळमळ उत्पन्न होईल तीच तळमळ किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तळमळ इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमच्यात आणि प्रत्येक मुस्लिमाममध्ये असायला हवी. 

सत्याचा संदेश दिला नाही तर?

इस्लामला श्रद्धा म्हणून अंगीकारणे यावरच पृथ्वीवरील शांतता आणि सुव्यवस्था तसेच मानवकल्याण अवलंबून असल्यामुळे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी वेळ आणि संपत्ती खर्च करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य करण्यापासून मुस्लिम समाज कुचराई करत असेल तर त्याचे काय परिणाम होतील, याची भविष्यवाणी सुद्धा कुरआनमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणूनच म्हटलेले आहे की, ’’ तुम्ही जर तोंड फिरवाल तर अल्लाह तुमच्या जागी एका अन्य जनसमुहाला उभा करेल आणि ते तुमच्यासारखे असणार नाहीत.’’ (संदर्भ : सुरे मुहम्मद आयत क्र. 38).

सत्याचा संदेश देण्यासाठी कोण पात्र आहे?

तसे पाहता सत्याचा संदेश देणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती (च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.’’ (सुरे आलेइमरान आयत क्र.110). परंतु काही लोकांवर याची विशेष जबाबदारी येते. म्हणूनच कुरआनच्या याच सुरहमध्ये म्हटलेले आहे की, ’’तुमच्या पैकी एक गट असा जरूर असावा जो सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा असेल. अशाच लोकांना साफल्य लाभेल.’’(सुरे आलेइमरान 104) 

अगदी प्रेषित काळापासून आजपर्यंत इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. त्या प्रक्रियेतून आलेल्या अनुभवातून हा संदेश पोहोचविणारा व्यक्ती कसा असावा? या संदर्भाचे काही ठोकताळे ठरविण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे -

1. संदेश देणाऱ्या व्यक्ती (दाई) मध्ये इस्लाम हाच एकमेव सत्यधर्म आहे याचा संपूर्ण आत्मविश्वास असावा. 

2. त्याला कुरआनची आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राची इत्यंभूत माहिती असावी. 

3. ज्याला संदेश दिला जात आहे (मदू) त्याच्याकडून इस्लाम आणि मुस्लिमांसंबंधी विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांचे उत्तर संदेश देणाऱ्याकडे तयार असावेत. 

4. संदेश देणाऱ्याचे चारित्र्य इस्लामच्या शिकवणी बरहुकूम असावे. त्याच्या बोलण्यात आणि चारित्र्यात विरोधाभास नसावा. 

5. त्याला इस्लामच्या इतिहासाची इत्यंभूत माहिती असावी. त्याच्या वागण्याबोलण्यात नम्रता असावी. अल्लाहने आपले प्रेषित हारूण आणि मुसा अलैसलाम यांना दुष्ट फिरऔन (फारेह)कडे भेटीसाठी पाठवितांना ताकीद केली होती की,’’त्याच्याबरोबर नरमाईने बोला. कदाचित तो उपदेश स्वीकारेल अथवा भीती बाळगेल’’ (सुरे ताहा आयत क्र. 44).

6. संदेश देतांना वापरली जाणारी भाषा आक्रमक किंवा विकृत नसावी. बोलण्यामधील अवाजवी आक्रमकता हे एक मानसिक रोगाचे लक्षण आहे. चरित्रहीन व्यक्तीच विकृत भाषेचा वापर करत असतात. 

7. संदेश देतांना जर का कोणी पलटून संदेश देणाऱ्याला उद्धट वागणूक दिल्यास किंवा इस्लामबद्दल अपशब्द काढल्यास ते सहन करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. म्हणून कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’कृपावंताचे (अस्सल) दास ते आहेत जे जमिनीवर नम्रपणे चालतात आणि अज्ञानी  (लोक) त्यांच्या तोंडी लागले तर (ते) म्हणतात की, तुम्हाला सलाम.’’ (सुरे फुरकान आयत नं.63).

संदेश देणाऱ्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, आपले कर्म आणि आपला प्रत्येक शब्द फरिश्ते (ईशदूत) रेकॉर्ड करत आहेत. संदेश देणाऱ्याने वाईट बोलणाऱ्याला वाईट पद्धतीने उत्तर दिल्यास एक गोष्ट स्पष्ट होवून जाते की, त्याच्यामध्ये सहनशिलतेचा अभाव आहे व त्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या संदेश देण्याच्या पद्धतीबद्दल पुरेसे ज्ञान नाही. लक्षात ठेवा मित्रांनों! कोणताही लोकसमुह त्याच्या नैतिक आचरणानेच ओळखला जातो आणि विनम्रतेशिवाय नैतिक आचरण शक्य नाही. 

8. संदेश देणारा चांगला श्रोता असावा. ज्याला संदेश दिला जात आहे त्याचेही म्हणणेही मन लावून ऐकण्याची त्याच्यात पात्रता असावी. 

9. संदेश देणाऱ्या व्यक्तीला तो संदेश ज्याला देत आहे त्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेची जाण असायला हवी. समोरची व्यक्ती जरी अपरिचित असेल तरी त्याच्या देहबोलीवरून त्याला चटकन ओळखता यावे की, संदेश ऐकणाऱ्याची मनःस्थिती कशी आहे? जर तो लक्षपूर्वक ऐकत असेल तर त्याला उत्तमोत्तम भाषेत, तार्किक दृष्टीने आणि मृदू वाणीने संदेश द्यावा. जर तो इकडे-तिकडे पहात असेल, उडवा-उडवीची उत्तरे देत असेल, तो एकाग्रचित्त नसेल, त्याला कुठेतरी जाण्याची घाई असेल तर संदेश देणाऱ्याने तात्काळ त्याला मोकळीक द्यावी. 

10. संदेश देणाऱ्याने संदेश ऐकणाऱ्यावर कधीच आपले श्रेष्ठत्व गाजवू नये. त्याला कमी लेखू नये उलट त्याला सन्मानजनक वागणूक द्यावी, त्याच्या हितासाठी आपल्याकडे बरेच काही देण्यासारखे आहे अशा भावनेने संभाषण करावे. बेजोड तर्क देवून कधीही पुढील व्यक्तीस निरूत्तर करू नये, यामुळे तो चिडून इस्लामच्या विरूद्ध जाईल. 

11. इस्लामचा संदेश पुन्हा-पुन्हा द्यावा. कारण माणूस चांगला उपदेश फारसा लक्षात ठेवत नाही. कोणत्या घटिकेला संदेश त्याच्या मनावर परिणाम करून जाईल, हे सांगता येत नाही म्हणून कंटाळा न करता वेगवेगळ्या दृष्टीकोनातून एकाच व्यक्तीला पुन्हा-पुन्हा संदेश द्यावा. 

12. एखादी व्यक्ती मोठ्या दुःखात असेल, निराश असेल, त्याने जवळचे लोक गमावलेले असतील, तो तणावग्रस्त असेल, अत्याचार सहन करत असेल किंवा वैफल्यग्रस्त असेल अशा व्यक्तीस धीर देऊन अल्लाहची कृपा किती विशाल आहे व तो नक्कीच त्याला दुःखातून काढेल, हे सत्य त्याच्या मनावर बिंबवावे. प्रत्येक दुःखानंतर सुख येतेेच ही ईश्वरी लीला आहे. हे त्याला पटेल अशा पद्धतीने सांगितले तर अशी व्यक्ती पटकन संदेश ग्रहण करते. 13. संदेश देणाऱ्याने बोलताना उच्च कोटीचे तर्क आणि मृदू भाषेचा वापर करावा व आपण समोरच्या व्यक्तीचे हितैशी आहोत याची त्याला खात्री पटवून द्यावी. 14. होता होईल तेवढे कुरआनच्या आयातीचे हवाले द्यावेत, संदेश जशाचा तसा द्यावा, त्यात मनाने काही घुसडू नये. कारण बऱ्याच वेळेस ऐकणारे हे सांगणाऱ्या पेक्षा जास्त समजदार असतात. 15. संदेश देणाऱ्याने आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची मनोभावाने सेवा करावी. त्याच्या सुख-दुःखामध्ये सामील व्हावे. अडी-अडचणीमध्ये मदत करावी. त्याने लोकांसाठी नेहमी उपलब्ध असावे. अशा व्यक्तीचा संदेश लोक इतरांच्या तुलनेने लवकर स्वीकार करतात. 

संदेश देण्याच्या पद्धती

संदेश प्रत्येक भेट घेऊन बोलून देणे ही एक प्रभावशाली पद्धत आहे. शिवाय, लेखन, भाषण, डिबेटच्या माध्यमातूनही संदेश देता येतो. आजकाल समाज माध्यमाच्या मार्फतही उत्तमोत्तम पोस्ट करून संदेश देता येणे सहज शक्य आहे. संदेश एकट्याने देण्यापेक्षा सामुहिक प्रयत्नातून संदेश दिल्या गेल्यास तो जास्त प्रभावशाली ठरतो. अनेकवेळा संदेश देण्याच्या प्रक्रियेतून गैरसमज निर्माण होवून संदेश देणाऱ्याचे नुकसान होवू शकते, असे नुकसान सहन करण्याची सहनशक्ती त्याच्यामध्ये असावी. 

संदेश स्वीकारण्यामागील अडचणी

1. इस्लामचा संदेश स्वीकारणे म्हणजे आपल्या अनैतिक इच्छा-आकाक्षांचा बळी देणे होय. म्हणून इच्छेचे गुलाम लोक इस्लामचा संदेश सहजासहजी स्वीकारत नाहीत. 

2. इस्लामचा संदेश स्वीकारला तर आर्थिक नुकसानाची भीती ही मक्काकालीन कुरैशपासून ते आजच्या  आधुनिक काळातील लोकांच्या मनामध्ये एकसारखीच आहे. इस्लामचा संदेश स्वीकारताच व्याजापासून मिळणाऱ्या सहज लाभाला मुकावे लागते. दारूचा व्यवसाय बंद करावा लागतो, फॅशन, सिनेउद्योगावर पाणी सोडावे लागते. अनैतिक मार्गाने सत्तेतून मिळणाऱ्या लाभाचा त्याग करावा लागतो. खोटे बोलता येत नाही, धोका देता येत नाही, प्रत्येक बाबतीत हलाल आणि हराम (वैध आणि अवैध)ची अट पाळावी लागते. वाड-वडिलांकडून चालत आलेल्या चुकीच्या परंपरांचा त्याग करावा लागतो. चंगळवादी जीवनशैली सोडावी लागते. याप्रकारची एक ना अनेक बंधने येतात म्हणून सहसा लोक इस्लामचा संदेश खरा आहे हे पटल्यावर सुद्धा ते स्वीकारत नाहीत. 

अशा लोकांच्या बाबतीत मौलाना अबुल आला मौदूदी यांनी म्हटलेले आहे की, ‘‘ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाहीत. मग त्याच्या समोर काही लोक खऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां, हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती.’’(संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35)

इस्लामचा संदेश न दिल्यामुळे भारतीय मुस्लिमांनी भरपूर हानी सहन केलेली आहे. जातीय दंगलीपासून मॉबलिंचिंग पर्यंत, बॉम्बस्फोटाच्या घटनेत खोटे आरोपी बनविण्यापासून डिटेन्शन सेंटरमध्ये टाकण्याची जी भाषा केली जात आहे त्यामागे मुस्लिमेत्तर बांधवांचा इस्लाम संबंधीचा चुकीचा समज / गैरसमज तसेच इस्लाम संबंधीची अवास्तव भीती कारणीभूत आहे. मुस्लिमांनी इस्लामचा संदेश त्यांच्या पर्यंत आपल्या वाणी आणि आचरणातून पोहोचविणे तर सोडाच नेमका त्याविरूद्ध संदेश त्यांच्यापर्यंत जाईल, याची व्यवस्था त्यांनी आपल्या आचरणातून केली. एवढे असले तरी - दिल नाउम्मीद नही नाकाम ही तो है, लंबी गम की शाम सही शाम ही तो है. चांगल्या कार्यासाठी इस्लामचा संदेश देण्याएवढे चांगले कार्य दूसरे कोणतेच नाही व चांगले कार्य करण्यामध्ये उशीर जरी झाला तरी हरकत नाही. आता तरी भारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पूर्ण आत्मविश्वासाने देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. बाकी सर्व ईश्वराच्या हाती आहे. म्हणून शेवटी दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हाला इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याचे कल्याणकारी आणि महान कर्तव्य बजावण्याची समज, शक्ती आणि धैर्य प्रदान कर. आमीन.’’ 

- एम.आय.शेख


माननीय आएशा (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापुढे दोन कामांपैकी एक काम करण्याचा विकल्प ठेवला असता पैगंबर अनिवार्यपणे जे काम सोपे आहे त्यास स्वीकारत. अट हीच होती की ते काम चुकीचे नसावे. जर ते चुकीचे असले तर त्यापासून सर्वप्रथम अलिप्त राहणारे पैगंबर होते. पैगंबरांनी स्वत:साठी कोणाशीही कधीही बदला घेतला नाही. परंतु अल्लाहच्या प्रतिष्ठेविरूद्ध जर एखादे कृत्य केले जाई तेव्हा ते अल्लाहसाठी त्याचा बदला अवश्य घेत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

जीवनधर्माला हे कधीही अपेक्षित नाही की मनुष्याने स्वत:ला कष्ट द्यावेत. इस्लामने या संन्यासी धारणेचा निषेध केला आहे की एखाद्या मनुष्याला कठोरतम तपस्येविना आणि जीवघेण्या साधनेविना पूर्णत: प्राप्त होत नाही. याचमुळे दोन कामांपैकी एकाचा विकल्प पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पुढे ठेवला जाई तेव्हा ते त्या कामाला करत जे सहजरित्या किंवा अधिक सोपे असे. पैगंबरांनी अनुयायींच्या सहजसोपेपणाला नेहमी प्राधान्य दिले. पैगंबरांची कार्यनीती अनुयायींसाठी एक आदर्श आहे.

ज्याप्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) मानवजातीत सर्वांपेक्षा श्रेष्ठ दानशूर होते जसे त्यांचे कथन आहे, ‘‘मी मानवांपैकी सर्वांत जास्त दानशूर आहे.’’ (हदीस : बैहकी) अगदी याचप्रमाणे सर्व मानवांपैकी सर्वांत जास्त ईशपरायण व्यक्ति पैगंबर मुहम्मद (स.) हेच होते. एका पैगंबराची हीच कार्यनीती व व्यक्तित्व असते.

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे खरे अनुकरण हे आहे की मनुष्याने पैगंबरांच्या या दोन्ही वैशिष्टयांना आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.पवित्र कुरआनात अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना उद्देशून असे म्हटले आहे की “दिवसाच्या तेजाची आणि शांत अंधार पसरत असलेल्या रात्रीची शपथ, तुझ्या विधात्याने तुला अधांतरी सोडलेले नाही. तुमच्यासाठी पहिल्या परिस्थितीपेक्षा नंतरची स्थिती चांगलीच असणार आहे.” याचा अर्थ असा की रात्र आणि दिवस एकामागोमाग परतत असतात. त्याचप्रमाणे माणसाची स्थितीदेखील बदलत असते. बदल हा सृष्टीचा नियम आहे. एकच परिस्थिती कधीच राहात नसते. जर हे नियम निसर्गाला लावून दिले नसते आणि फक्त दिवसच दिवस किंवा नेहमीच रात्र असती तर कालचक्रदेखील स्थिरावले असते. स्थिरता म्हणजे ज्यात जीवन नसते. बदल होत राहाणे हे जीवन आहे. या जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात. ते येत राहाणार, कारण हाच जीवंत असल्याचा पुरावा आहे.

माणसाने या बदलांना घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट एकच परिस्थिती असती तर विचलित अवस्था निर्माण होते. रात्रंदिवसाचे हे कालचक्र सबंध मानवजातीमध्ये फिरत असते. आज जे लोक श्रीमंत आहेत, ते काल गरीब होते. आज जे गरीब आहेत, जर सृष्टीच्या नियमात बदल झाला नसता तर हे सदैव गरीबच राहातील. हा अल्लाहचा न्याय नाही. श्रीमंती आणि वंचितावस्था माणसामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये बदलत असते. कठीण प्रसंग जसे येतात तसे ते निघूनही जातात, कारण त्यांनासुद्धा बदलांचा नियम लागू आहे. पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की “तुमच्यावर कोसळणारी अनिष्ठ आपदा हे पूर्वीपासूनच नोंदवून ठेवलेली घटना आहे. त्यानुसारच मानवजातीला आपत्तींना सामोरे जावे लागते.” 

प्रेषितांना संबोधून याच अध्यायात अल्लाहने पुढे सांगिलते आहे की “तुम्ही अनाथ असताना तुम्हाला आश्रय दिला. तुम्हाला स्वावलंबी केले. एकाच परिस्थितीशी तोंड द्यावे लागत नाही, जसे तुम्ही गरीब होता तेव्हा तुम्हाला त्याने श्रीमंत केले. तसेच तुम्हीदेखील गरजूंची काळजी घ्या. कुणी मागिलत्यास झिडकारू नका. तुमच्या विधात्याने जी तुम्हाला देणगी दिली ती जाहीर करा.”माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.

एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उंटाच्या पाठीवरील जुन्या लाकडी हौद्यावर फाटलेल्या चादरीसह हजयात्रा केली होती. त्या जुन्या लाकडी हौद्याची किंमत चार दिरहम किंवा त्यापेक्षा कमी होती.

स्पष्टीकरण

ज्या प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना साधी राहणीची शिकवण दिली त्याचप्रमाणे पैगंबरांनी स्वत:सुद्धा साध्या रहाणीचा अंगीकार केला होता. त्यांनी भौतिक थाटमाटाकडे दुर्लक्ष केले होते. पैगंबरांची ही साधी राहणी त्या वेळची आहे जेव्हा पूर्ण अरब इस्लामच्या अधिनस्त झाला होता. ही घटना हिजरी सन १० ची आहे. पैगंबरांनी इच्छिले असते तर स्वत:साठी फार काही सुखसुविधा आणि थाटमाटाला हस्तगत केले असते.


माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) एका चटईवर झोपले आणि जेव्हा ते झोपेतून जागे होऊन उठून बसले तेव्हा त्यांच्या शरीरावर चटईचे वण पडलेले होते. यावर आम्ही पैगंबरांना विनंती केली की त्यांच्यासाठी एक बिछाना बनवून देऊ का?

त्यावर पैगंबर म्हणाले, ‘‘मला या जगाशी काहीही देणे घेणे नाही. मी या जगात तर त्या प्रवाशासमान आहे जो एखाद्या झाडाच्या सावलीत अल्पकाळ विसावतो. नंतर त्यास सोडून आपल्या गंतव्याकडे प्रस्थान करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत:च्या व्यवहारनीतीद्वारा सिद्ध केले की हे जग यासाठी नाही की कोणी एखाद्याने जगाच्या मोहात पडून जगावे आणि मरून पडावे. हे जग तर एक मार्ग व साधन आहे आणि त्यासच गंतव्य व साध्य समजण्याची घोडचूक कधीही करू नये.

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की चटई (गोणपाट) वर झोपण्याची ही घटना त्या काळातील आहे जेव्हा इस्लाम सत्तेत होता.

ही एक वस्तुस्थिती आहे की या जगाशी जो कोणी प्रेम करील तेव्हा पारलौकिक जीवनाचे महत्त्व व त्याचे मूल्य त्याच्या नजरेत शिल्लक राहू शकत नाही. म्हणून मनुष्याची नजर सतत पारलौकिक जीवनाकडे असली पाहिजे. या जगात स्वत:चे दायित्व निर्वाहण करण्याचीच चिंता लागून असली पाहिजे.


books

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, “ज्ञान संपादन करणे प्रत्येक मुस्लिम पुरुष आणि स्त्रीसाठी अनिवार्य कर्तव्य आहे.” ते पुढे म्हणतात की प्रतिभासंपन्न लोक आकाशातील ताऱ्यांसारखे असतात जे अंधार पसरला असताना लोकांना दिशा दाखविण्याचे कार्य करतात. ज्ञान अशी शक्ती आहे ज्यापासून माणसाचे व्यक्तिमत्त्व विस्तृत लोते. तो आपल्या स्वतःच्या अस्तित्वात बंदिस्त राहात नाही. आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांना परिचित असतो. त्यांच्यावर चांगले संस्कार करतो. एका लोकाभिमुख समाजाच्या गरजा काय आहेत हे त्याच्या लक्षात येते. मग त्या पूर्ण करण्यासाठी तो आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो. असे करत असताना तो खऱ्या अर्थाने मानवी समाजाची उन्नती करत असतो. ज्ञानाच्या बाबतीत जे वंचित असती, त्यांना शिकण्यासाठी लागणाऱ्या साधनसुविधांची पूर्तता करतो. तो स्वतः हे सर्व करत असताना इतरांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची काळजी घेत असतो. याच ज्ञानाच्या आधारे तो आकाशाकडे पाहातो आणि इतर निर्मितींबाबत विचारविनिमय करतो आणि एक वेळ अशी येते जेव्हा तो धरतीवरून आकाशात झेपावतो आणि इतर ग्रहांविषयी माहिती गोळा करतो, ज्यांचा प्रभाव आपल्या धरतीवर पडत आहे. प्रतिभासंपन्न ज्ञानी लोकांचे हे सारे कार्य ईश्वराची उपासनाच असते. पवित्र कुरआनची सुरुवातच ज्ञान संपादनाने झालेली आहे. अल्लाह म्हणतो, “आपल्या विधात्याच्या नावाने वाचा, ज्याने माणसाला लेखणी व इतर साहित्याद्‌वारे असे ज्ञान दिले जे यापूर्वी कधी दिले गेले नव्हते.” (पवित्र कुरआन)

प्रेषितांनी सांगितले आहे की जो माणूस ज्ञान संपादनासाठी घराबाहेर पडतो, अल्लाह त्याच्यासाठी स्वर्गाचा मार्ग सुकर करतो. शिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रवास करणे, घर सोडून जगात त्याचा शोध घेण्यासाठी जाणे, वाचन - लेखन करणे, एकमेकांशी विचारविनिमय करणे या सर्व बाबी पुण्याकार्यात गणल्या जातात. ज्ञानी लोकांविषयी पवित्र कुरआनात अल्लाह असे म्हणतो की जे लोक उभ्याने, बसून, कुशीवर टेकून अल्लाहची आठवण करतात, आकाश व पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी विचारविनिमय करतात ते धन्यतेस पात्र आहेत. ते नरकाच्या शिक्षेपासून मुक्त होतात. (पवित्र कुरआन-३)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget