Latest Post


जसे वचनबद्धता अल्लाहचे वैशिष्ट्य आहे तसेच क्षमा करणेदेखील अल्लाहचे मानवतेला मोठे वरदान आहे. जर असे नसते तर अल्लाहने या जगाला आणि यातील मानवजातीला कधीच नष्ट केले असते. पवित्र कुरआननात म्हटले आहे की, “तोच आपल्या मानवांचा पश्चात्ताप स्वीकारतो आणि त्यांच्यातील अवगुणांना माफ करून टाकतो.” (कुरआन) जर अल्लाहची तशी इच्छा असती तर माणसांच्या वाईटपणासाठी त्यांचा नाश केला असता. अशाच प्रकारे मानवांना म्हटले आहे की, “जर तुम्ही कुणाच्या वाईट कृत्यांना क्षमा केले तर अल्लाह तुम्हालादेखील माफ करण्याचे सामर्थ्य राखतो.” (कुरआन-३) माणसांनी एकमेकांना क्षमा केली पाहिजे. असे केल्यास अल्लाह माणसांना क्षमा करतो, कारण तो परमदयाङू आहे. अल्लाह म्हणतो, “तुमच्या विधात्याने आपल्या दयेने आणि क्षमाशीलतेने तुमच्यासाठी जो स्वर्ग निर्माण केला आहे त्या स्वर्गाकडे धाव घ्या, ज्याचा विस्तार सबंध आकाश आणि साऱ्या धरतीसमान आहे. हा स्वर्ग अशा सदाचारी लोकांसाठी तयार केला गेला आहे जे टंचाईत असोत की भरभराटीत आपली साधने लोकांच्या सेवेत बहाल करतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करून टाकतात. अशाच लोकांना अल्लाह पसंत करतो.” (कुरआन)

या आयतींनुसार सदाचारी लोक म्हणजे जे कुणावर रागवत नाहीत आणि लोकांकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना क्षमा करतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक अनुयायी अबू मसऊद आपल्या गुलामास मारहाण करत होते. त्यांच्या मागून आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) होते आणि म्हणत होते की, “जितके नियंत्रण या गुलामावर तुमचे आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहचे तुमच्यावर आहे.” अबू मसऊद म्हणतात या घटनेनंतर मी पुन्हा आयुष्यात कधी कुणावर रागवलो नाही. तसेच एका अन्य अनुयायींनी प्रेषितांना विचारले, “मी माझ्या सेवेत असणाऱ्यांच्या किती चुका माफ करू?” प्रेषित म्हणाले, “दररोज शंभर वेळा.” क्षमाशीलतेचे वर्णन पवित्र कुरआनात फार सुंदररित्या केले आहे.

“जो लोकांना अल्लाहकडे बोलावतो, नेक कर्म करतो आणि म्हणतो की मी श्रद्धावंत आहे त्यापेक्षा चांगले कुणाचे बोलणे. भले आणि वाईट समान नसतात. जे चांगले असेल त्याद्वारे वाईटावर उपाय करा. त्यामुळे ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते तोच तुमचा जीवलग मित्र होईल. पण जे संयमी लोक असतात त्यांनाच हे लाभते आणि ज्यांचे नशीब मोठे त्यांच्याच भाग्यात हे येते.” (कुरआन-४१)दिलेले वचन पूर्ण करणे हे स्वतः अल्लाहचे वैशिष्ट्य आहे. पवित्र कुरआनात अल्लाह स्वतःविषयी असे म्हणतो की, निश्चितच अल्लाह कधीही वचनभंग करत नाही. अल्लाहने केलेले हे वचन आहे आणि तो कधीच आपल्या वचनाच्या विरोधात जात नाही. अल्लाह कधीही आपला शब्द टाळत नसतो. अल्लाहपेक्षा आपल्या वचनाशी बांधिल इतर कोण असू शकतो? (पवित्र कुरआन, विविध अध्यायांतील आयती) साधारणपणे दोन माणसांनी आपसात केलेल्या करारास वचन म्हटले जाते. पण जीवनातील प्रत्येक क्षेत्रात वचनपूर्ती करावी लागत असते. मग ते सामाजिक असो की आर्थिक, संस्कृती-सभ्यतेशी निगडीत असो की राज्यव्यवस्थेशी संबंधित असो; प्रत्येक क्षेत्रात माणसाने वचनबद्धता पाळली पाहिजे. मुस्लिमांच्या बाबतीत असे म्हटले गेले आहे की जर ते आपले वचन पाळत नसतील तर त्यांची श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. जे वचन पाळतात अशा श्रद्धावंतांसाठी कुरआनात म्हटले आहे की, “असे लोक त्यांच्याकडील अमानती परत करतात. वचनभंग करत नसतात. आपल्या नमाजांविषयी (उपासना) ते दक्ष असतात. तेच लोक स्वर्गाचे वारस असतील. अशाच लोकांना उच्च दर्जाच्या स्वर्गांचा वारसा लाभेल, कारण ते लोक आपल्या विधात्याच्या आयतींवर श्रद्धा ठेवतात, त्यास भागीदार जोडत नाहीत. त्यांना जे काही जमेल ते इतरांना देतात. अशाच लोकांच्या हृदयांना आपल्या विधात्याकडे परतण्याची सतत भीती असते.” (पवित्र कुरआन-२३)

लोकांना पुरेपूर माप करून देणे हे अल्लाह आणि समाजाशी केलेले वचन आहे. “माप करताना पुरेपूर द्या. वजन करताना प्रमाणित तराजूने तोलून द्या.” (कुरआन-१७)

सगळ्यात महत्त्वाचे वचन म्हणजे माणसांनी अल्लाहशी केलेले वचन होय. हे वचन माणसाने अल्लाहशी केलेले असल्याने समस्त मानवांशी, समाजाशी, जनसमूहांशी त्याचा संबंध आहे. जे लोक अल्लाहशी केलेले वचन पूर्ण करतात, आपसातला करार मोडत नाहीत, असे लोक खऱ्या अर्थाने ज्या नातेसंबंधांना अल्लाहने जोडून ठेवण्याचे आदेश दिले आहेत ते जोडून ठेवतात. (कुरआन-१६)ईद-उल-अज़्हा ला आपल्याकडे बकरी ईद ही म्हटले जाते जे की चुकीचे आहे. ही ईद केवळ बकऱ्याची कुर्बानी देण्यापर्यंत मर्यादित नसून या ईदच्या मागे फार मोठा इतिहास आहे. हजरत इब्राहिम अलै. आपले एकुलते एक सुपूत्र इस्माईल अलै. यांची अल्लाहच्या आदेशाने कुर्बानी देण्याची तयारी असल्याच्या घटनेची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. या ईदचा थोडक्यात संदेश त्याग आहे. आपण स्वतः या घटनेपासून प्रेरणा घेऊन गरीबांसाठी, देशासाठी काय त्याग करू शकतो याचा वार्षिक आढावा घेण्याची संधी प्रत्येकाला ही ईद उपलब्ध करून देते.   ईदनिमित्त आजच्या महामारीच्या युगात रक्त, प्लाज्मा दान तसेच वंचित घटकांसाठी आपण काय त्याग करु शकतो, हा विचार मनात येणे आणी तो प्रत्यक्षात रुजविने हे जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने ईदुल अज्हा  साजरी करण्याचे सार्थक होईल आणी खऱ्या अर्थाने आपण इब्राहीम अलै. यांचे अनुयायी असल्याचे सिद्ध होईल.

ईद-उल-अज्हा संपूर्ण जगभर साजरी केली जात आहे. इस्लामी कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यामध्येच ज्याला जिलहज्जा म्हणतात जगाच्या काना-कोपऱ्यामधून लाखो हाजी (भाविक) अल्लाहच्या मार्गामध्ये म्हणजेच हज यात्रे मध्ये सामिल होत असतात व तेथे इब्राहीम अलै. च्या आपल्या सुपूत्राच्या कुर्बानीच्या घटनेची आठवण ठेवून प्रतिकात्मकरित्या बकऱ्याची किंवा उंटाची कुर्बानी देत असतात. जे हजला जावू शकत नाहीत ते आपापल्या ठिकाणी कुर्बानी देवून आपण मानवतेच्या मार्गामध्ये त्याग करण्यासाठी बांधिल असल्याची ग्वाही देतात. परंतु दुर्दैवाने कोरोनामुळे गत आणी ह्या वर्षी सऊदी अरेबिया व्यतिरिक्त इतर देशातील हज यात्रेकरूंना सामिल होण्याची परवानगी नाही.

हज  हा खरे तर  अरबी शब्द-- त्याचा अर्थ होतो - दर्शन करण्याचा  निश्चय करणे. हजसाठी जगभरातील लाखोंच्या संख्येने मुस्लिमबांधव काबाच्या दर्शनाचा निश्चय करुन मक्का या शहराकडे निघतात. हज मुस्लिम बांधवाना संपूर्ण  आयुष्यात  एकदाच पार पाडण्याचे  संकेत देण्यात  आले आहेत जो कोणी मक्का शहरापर्यंत जाण्या-येण्याचा   खर्च करण्याची क्षमता  बाळ्गतो केवळ त्या व्यक्तीवरच हे कर्तव्य अनिवार्य करण्यात  आले  आहेत. हा खर्च स्वकष्टार्जित असेल तर उत्तमच. त्यामुळेच अवैधमार्गार्तून कमाविलेल्या संपत्तीतून हज यात्रा करता येत नाही.  

हजचा इतिहास फार उद्बोधक आहे. आजपासून 4 हजार 500 वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अलै.) यांनी अल्लाह ची उपासणा  करण्याखातर एक  छोटेसे  घर बांधले होते. त्याचा उद्देशच जणू असा होता की जगातील कोणत्याही भाविकाने जो शरिराने तंदुरूस्त असेल  आणी आर्थिक क्षमता  बाळगू  शकतो, त्यानेच काबाचे दर्शन घेण्यासाठी निघावे. परंतु निघताना आपली अंत:करणे निर्मळ ठेवावीत तसेच वासनांवर आवर घालावा. रक्तपात, अनाचार , अर्वाच्य बोलणे ह्या पासून जो संयम राखू शकेल त्यानेच अल्लाहचा गुलाम बनून मार्गस्थ व्हावे. हे नियम अर्थात बंधन घालण्याचे कारण म्हणजे तो काळ असा होता कि बहुतेक सर्वांना अल्लाहचे विस्मरण झाले होते. भानामती, जादुटोना व ताईत्त-गंड्याचे स्त्तोम माजले होते. ह्या अनिष्ट प्रथा, चालीरिति त्यांना सहन होनाऱ्या  नव्हत्या. म्हणूनच त्यांनी परिवर्तनचा हा विडा उचलला. 

हजरत इब्राहीम (अलै.) व हजरत ईस्माईल (अलै.) यांच्या कारकिर्दित हजला महत्त्वाचे स्वरुप प्राप्त झाले. परंतु त्यांच्या हयातीनंतर हजमध्ये एवढ्या बिघाडाचे स्वरुप आले की अहंकार, स्वार्थ, स्वैराचार, अश्लिलतेने थैमान घातले होते. जणू हा काळ अंधःकारमय म्हणून गणला जावू लागला होता. ही स्थिती अशीच पुढे हजारो वर्षे चालत राहिली. 

या काळात कोणी पैगम्बर जन्माला आला नाही की, पैगम्बरांची शिकवण देखील लोकापर्यंत पोहोचली  गेली नाही. अखेर हजरत इब्राहीम (अलै.) ह्यांचे भाकित खरे ठरले. त्यांच्या  संततीमधून एक परिपूर्ण व्यक्तीमत्व 6 व्या शतकात  जन्मास  आले. ज्यांचे नाव मुहम्मद बिन अब्दुल्लाह (स.) असे होते. त्यांचा जन्म झाला व अरबस्थानात जणू नवचैतन्य निर्माण झाले. भविष्यातील ज्या कार्याचा आराखडा हजारो वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अ.) ह्यानि बांधला होता. ते पूर्णत्वास तर आलेच परंतु केवळ 23 वर्षाच्या कालखंडात सर्व अनिष्ट प्रथांना पायबंद घालून एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला गेला. असे धाडस आणी कार्य करणारी व्यक्ती सामान्य असूच शकत नव्हती.  त्यांचे हे कार्य त्या काळात तर उल्लेखनिय  होतेच परंतू आजही 1442 वर्षानंतर सर्व मानव जातीला प्रेरणा देणारे असेच आहे. अज्ञान आणि अंधकारमय युगातील सर्व अनिष्ट प्रथा नष्ट   केल्या गेल्या.

’’हज्जचे महिने नियत (निश्चित केलेले) आहेत. जी व्यक्ती ह्या निश्चित महिन्यामध्ये हज करण्याचे ठरवील तर त्याने वैषयिक वासनेपासून दूर रहावे. आणि अभद्र बोलू नये आणि भांडणतंटे करू नये. जे काही तुम्ही सत्कर्मे कराल ते अल्लाह जाणतो आहे आणि हज्जच्या काळांत सोबत शिदोरी घ्या. सर्वोत्तम शिदोरी म्हणजे अल्लाहचे भय बाळगणे होय. आणि हे ज्ञानीजनहो माझे भय बाळगा.’’  (सुरे बकरा :197)

’’नंतर जेव्हा हज्जसंबंधीचा विधी तुम्ही पूर्ण कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही अल्लाहचे स्मरण करा जसे तुम्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत होतात. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक स्मरण करा, (परंतु अल्लाहचे स्मरण करणार्यांमध्येही खूप फरक आहे.) त्यांच्यापैकी काही तर असे आहेत जे म्हणतात कि, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला या लोकीच सर्वकाही दे. अशा व्यक्तीसाठी परलोकमध्ये काहीही वाट्याला येणार नाही.’’  (सुरतुल बकरा :200) 

जगभरातून सामील झालेले हाजी यांचा देश, प्रांत बोलीभाषा ही निरनिराळी असू शकते, परंतू त्यांनी परिधान केलेला पोशाख (एहराम) मात्र सारखाच असतो. गरीब असो अथवा श्रीमंत सर्वजण अल्लाहसमोर समसमान. हाच संदेश ह्या यात्रेतुन पहावयास मिळ्तो. हज यात्रेत श्रद्धावंतांच्या समोर जसजसा काबागृह जवळ येवू लागतो, तसतसा हा हाजी अल्लाहच्या भेटीसाठी बेभान होतो. जीवनात केलेली दुष्कृत्यांबद्दल मनात अपराधी भावना निर्माण होतात. तसेच या यात्रेतून मिळालेल्या सकारात्मक उर्जेतून हाजी भविष्यकाळात एक चांगला, आज्ञाधारक व सुजान नागरीक बनण्याची प्रतिज्ञा मनात करूनच मक्का सोडतो.जणू एक वेगळीच उर्जा त्याच्या अंगात संचारते. हज यात्रेत सामिल झालेल्या सर्वच हाजींची हीच अवस्था असते. हज प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक हाजी हा साक्षात अल्लाहच्या भेटीसाठी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीका लकलब्बैक  (मी हजर आहे, तुझ्या घराच्या दर्शनासाठी) अशा घोषणा करत पुढे सरकत असतो.

मुहम्मद पैगम्बर (स.) हे अंतिम प्रेषित होत त्यांच्यानंतर कोणी प्रेषित जन्माला  येणार नाही हे सत्य आहे. त्यांनी  हजमध्ये सामील झालेल्या यात्रेकरुसाठी दिलेले शेवटचे भाषण आजही  तेवढेच समर्पक व प्रत्येकाने अनुकरण करावे असेच आहे. ह्या शेवटच्या संवादातून त्यानी सर्व मानव एकमेकांचे  बंधूच असून मानवतावाद आणी विश्व- बंधुत्वाचा संदेशच दिला. वास्तविक पाहता जगातील मानवाधिकाराची ही पहिलीच सनद असून, त्यानंतर पुढच्या कालखंडात मानवाधिकाराच्या संवेदना जागतिक स्तरावर लोकांमध्ये जाग्या झाल्या.

- अस्लम जमादार, पुणे

(लेखक परिवर्तन - अल्पसंख्यांक शैक्षणिक चळ्वळीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)

पूर्ण जगामध्ये इस्लामि कॅलेंडर नुसार जिल्हज्जा या बाराव्या महिन्याच्या दहा तारखेला बकरीद ईद साजरी करण्यात येते या ईदच्या दिवसाला आणि या महिन्याला इस्लाम मध्ये अन्यन साधारण महत्व आहे याच महिन्यामध्ये इस्लामच्या अनुयायांसाठी जे पात्र आहेत अर्थात जे हज यात्रेसाठी अरबस्थानातील मक्का याठिकाणी जाऊ शकतात खर्च करण्याची आर्थिक ऐपत आणि शारीरिक ऐपत धारण करतात त्यांच्यासाठी हज यात्रा आवश्यक आहे, हज यात्रा ही एक उपासना विधी आहे ती या महिन्यात आठ ते बारा या ठराविक तारखांना ठराविक पद्धतीने करावयाची असते याच हज यात्रेदरम्यान दहा ते बारा या तारखांना जगातील इस्लामचे संपूर्ण अनुयायी ज्यांना शक्य आहे ते अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी करतात आणि गोर गरीबांमध्ये वितरित करतात 

जगभरातील मुस्लिम बांधव बकरीद मध्ये जनावरांची कुर्बानी का करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेषित इब्राहीम अलै सलाम यांच्या जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज पासून सुमारे चार हजार वर्षापूर्वी अर्थात ईसा पूर्व 2100 वर्षापूर्वी आदरणीय इब्राहीम यांचा जन्म इराकमधील उर शहरात आजर  नावाच्या प्रमुख महांताच्या घरी झाला जे राजपुरोहित तर होतेच मूर्ती बनवून विकण्याचा त्यांचा व्यापारही होता. त्यांच्याकडे अपार संपत्ती होती परंतु हे सर्व मूर्तिपूजक होते स्वतःला चंद्रवंशी व सूर्यवंशी म्हणून घेत मूर्ति तयार करणे आणि तिच्यासमोर नतमस्तक होणे ही बाब आदरणीय इब्राहीम आलै सलाम यांना पटत नव्हती म्हणून ते आपल्या वडिलांना विविध प्रश्न विचारीत परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. प्रेषित इब्राहीम आलै सलाम यांनी लोकांना विविध प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सर्वांना काही ना काही गरजा आहेत माझा अल्लाह, ईश्वर गरजवंत नाही तो एकमेव आहे जमीन आणि आकाशामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता, सर्वांना निर्माण करणारा ,जन्म देणारा, पालन पोषण करणारा, मृत्यु देणारा माझा तुमचा आणि विश्वाचा अल्लाह, ईश्वर आहे तो एकच आहे म्हणून त्यांनी  इतर देवी-देवतांचा इंकार केला येथूनच त्यांची पहिली परीक्षा सुरू झाली.   तेथील राजाने त्यांना जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली पुजाऱ्याचा मुलगा म्हणून अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अल्लाह, ईश्वरा वरील तो एक असल्याचा दृढ विश्वास असल्यामुळे ते डगमगले नाहीत माघार घेतली नाही वडिलांनी घरातून काढून टाकले. राजाच्या आदेशाने अतिशय मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला अग्निकुंडाची आग भयंकर होती तरीपण पर्वता पेक्षा अधिक दृढ हृदय बाळगणाऱे एका ईश्वरावर विश्वास ठेवणारे प्रेषित इब्राहीम विचलित झाले नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले "ज्यांना तुम्ही ईश्वरत्वात भागीदार ठरविता त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही".

राजाच्या आदेशाने शिपायांनी प्रेषित इब्राहीम यांना धगधगत्या अग्निकुंडात फेकून दिले. आदरणीय इब्राहीम अल्लाचे प्रेषित होते अल्लाहने त्यांचे रक्षण केले. अग्नीला आदेश दिला " हे अग्नी, थंड हो शांती, सुरक्षा, सुखदायी हो इब्राहीम साठी " अल्लाह, ईश्वराच्या आदेशाने अग्नी इब्राहीम साठी थंड व शांत बनली अग्नित फेकून देणे इतके महाभयंकर होते की, त्याजागी आदरणीय प्रेषित यांना त्या लोकांमध्ये वास्तव्य करणे अशक्य होते. म्हणून अल्लाने त्यांना स्वदेश त्यागाचा आदेश दिला उर शहराला सोडून निघून जावे.  प्रेषित इब्राहीम यांनी आपली पत्नी व पुतण्या लूत अलैसलाम यांना सोबत घेऊन आपला देश सोडला त्यांनी राजपुरोहिताची गादी, धनसंपत्ती सोडून सीरिया , पॅलेस्टाईन, इजिप्त आणि अरबस्तानातील विविध देशात फिरत राहिले. अल्लाहलाच माहित या प्रवासात त्यांना किती अडचणी आल्या असतील. ते धनसंपत्ती कमविण्याच्या चिंतेत भटकत नव्हते तर लोकांना प्रत्येकाच्या गुलामगिरीतून मुक्त करून फक्त एका अल्लाचे, ईश्वराचे गुलाम बनावे हा संदेश देत होते. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आमची ही परीक्षि आहे. या भ्रमंतीमध्ये लोकांना सत्याची जाणीव करून देताना त्यांना कोठेही शांती लाभली नाही. वर्षानुवर्षे विना बिऱ्हाड भटकत राहिले. अशाच प्रकारे तारुण्य निघून जाऊन केस पांढरे झाले आणि जीवणाची दुसरी परीक्षा सुरू झाली. वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांना संतती प्राप्त झाली नव्हती. अल्लाहने त्यांना 86 व्या वर्षी संतती दिली. ते करत असलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी कोणीतरी वारस हवा म्हणून त्यांनी अल्लाकडे प्रार्थना,  संततीची याचना केली होती.पुत्र प्राप्ती नंतर अल्लाहने त्यांची दुसरी परीक्षा घेतली म्हातारपणी पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद काही औरच होता. कृतज्ञता व्यक्त केली याच काळात अल्लाहचा आदेश मिळाला की काबागृहासाठी जागा निश्चित केलेली आहे तुम्ही तिकडे जा. आपल्या पत्नीला व लहान मुलाला घेऊन आज काबागृह जिथे उभा आहे तेथे पोहोचले हा परिसर निर्जन निर्जल ओसाड निर्मनुष्य होता.

या ठिकाणी दूरदूरपर्यंत वस्ती आणि पाणीही नव्हते. अल्लाहाने पुन्हा आदेश दिला पत्नी व मुलाला येथे सोडून निघूनजा. आदरणीय इब्रहिम  अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक झाले विरान वाळवंटात निर्मनुष्य जागी आपल्या पत्नीला, लहान मुलाला सोडून जाताना त्यांच्या मनस्थितीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही म्हातारपणी नुकतेच  पुत्रप्राप्ति झाली होती की हा आदेश प्राप्त झाला.

पुढे गेल्यावर काबागृहाकडे तोंड करून प्रार्थना केली "हे माझ्या निर्माणकर्त्या प्रभू, मी अशा निर्जन व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू असे मी अशासाठी केले आहे की, या लोकांनी येथे नमाज कायम करावी म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर आणि यांना खावयास फळे दे कदाचित ते कृतज्ञ होतील " प्रेषितांची पत्नी आणि लहान मुल आदरणीय  इस्माईल त्या वाळवंटात एकटे पडले थोडं फार अन्नपाणी होती ते संपले अन्नपाणी नाही म्हणून आईला दूध एत नव्हते. मुलाची परिस्थिती वाईट होती भुकेने व्याकुळ होते कोठे पाणी मिळते काय किंवा कुणीप्रवासी दिसतील तर पाणी मागता येईल कारण मुल रडत होते म्हणून आई हजरा त्या ठिकाणी असलेल्या दोन टेकड्या सफा ,मरवा यावर चढून इकडे तिकडे पाहत होती, प्रार्थना करत होती, दोन्ही टेकड्या मध्ये त्यांनी सात फेऱ्या मारल्या टेकडीवर जात पुन्हा मुल एकटे आहे म्हणून धावून परत येत. जीव कासावीस होत होता मूल रडत होते अल्ला पाहत होता दोन्ही टेकड्यांमध्ये किमान 450 मीटर अर्थात चौदाशे 80 फूट एवढं अंतर होतं 7व्या फेरी  मध्ये 3.15 किमी अंतर त्यांनी पार केलं होतं. शेवटी सातव्या फेरीनंतर त्या ठिकाणी देवदूतांनी पाण्याचा झरा निर्माण केला.  जो जमजम च्या नावाने आजही अस्तित्वात असून जगातील सर्वात वैज्ञानिक दृष्टीने शुद्ध असून अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी संपूर्ण जगातून येणारे लोक घेऊन जातात. पाण्यासाठी आईची ती पराकाष्ठा जगभरातील अनुयायासाठी हज यात्रेतील आवश्यक परंपरा म्हणून अनिवार्य केली  गेली.त्या सात फेऱ्या तशाच पूर्ण केल्याशिवाय हजपूर्ण होत नाही. दुसऱ्यापरीक्षेमध्ये ही प्रेषित इब्राहीम यशस्वी झाले. पाण्यामुळे त्या ठिकाणी वस्ती झाली होती. अधून मधून प्रेषित मुलास भेटण्यासाठी येत. अशाप्रकारे मुलगा, प्रेषित इस्माईल 14 वर्षाचे झाले. आतापर्यंत अल्लाहने प्रेषित इब्राहीम यांना ज्या ज्या परीक्षेत आजमावले त्या सर्व परीक्षेमध्ये ते खरे उतरले. 

आता तिसरी परीक्षा सुरू झाली होती. मुलास भेटावयास गेले असताना आपल्या मुलास त्यांनी जे सांगितले ते कुराणाच्या शब्दात खालील प्रमाणे आहे "तो मुलगा जेव्हा त्यांच्यासमोर धावपळ करण्याच्या वयात आला तेव्हा एके दिवशी प्रेषित इब्राहीम यांनी त्याला सांगितले हे माझ्या मुला मी स्वप्नात पाहतो की, मी तुझा बळी देत आहे आता सांग तुझा काय विचार आहे, मुलाने सांगितले हे पिताजी जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसे करा अल्लाहाने इच्छिले तर आपणास मी  धैर्यशील आढळेल. पूर्ण विश्व पिता पुत्राचा संवाद स्तब्ध होऊन ऐकत होता. कुराणाची स्पष्टोक्ती आहे "सरते शेवटी जेव्हा या दोघांनी अल्लाच्या आज्ञापालनात मान तूकविली आणि प्रेषित इब्राहीम यांनी पुत्राला ओणवे केले." पुत्राला ओणवे करणे यासाठी 

की बळी देताना पुत्राच्या चेहऱ्याकडे पाहून प्रेषित यांचे याचे प्रेम उफाळून येऊ नये आणि त्यांचे हात डगमगायला नको. पुत्राच्या गळ्यावर सुरी फिरवणार तोच अल्लाहने आवाज दिला, आकाशवाणी झाली कुराणात आहे "आणि आम्ही पुकारले हे इब्राहीम तू स्वप्न साकार केलेस,आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो निश्चितच ही एक उघड परीक्षा होती." परीक्षा तर होतीच परंतु अल्लाहने आदरणीय इस्माईल यांना वाचविले. ह्या परीक्षेत आदरणीय प्रेषित इब्राहीम खरे उतरल्यानंतर त्यांना अल्लाहने जे बक्षीस दिले त्याचा उल्लेख कुराणाच्या शब्दात "आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा व गुणगाण भावी पिढ्यांत सदैव ठेवले.  सलाम आहे इब्राहीम अलैसलाम वर आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. अल्लाहने एक सुदृढ मेंढा बळी देण्याचा आदेश दिला हे याच्या साठी होते की आदरणीय इब्राहीम आपल्या मुलाचा बळी देत होते परंतु अल्लाहने योग्य वेळी त्यांना रोखले ह्याचे बक्षीस अल्लाहने अशाप्रकारे दिले की या बलिदानास आदरणीय प्रेषित इब्राहीम यांची परंपरा आणि कार्य घोषित केले. बलिदानाची ही परंपरा श्रद्धावंतासाठी अंतिम दिनापर्यंत जिवंत ठेवली.प्रत्येक वर्षी याच दिवशी म्हणजे या महिन्याच्या दहा तारखेला जनावरांची कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी करताना आदरणीय इब्राहीम यांचे ते बलिदान आठवते जे त्यांनी उर शहरापासून येथपर्यंत केले होते कुर्बानीचा उद्देश ईश्वराचे आज्ञापालन आहे म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरीदच्या दिवशी विश्वाच्या अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी देतात. गोर गरीबांमध्ये वाटतात. ही एक उपासना आहे जी अल्लाच्या आदेशानुसार इब्राहीम आले सलामच्या परंपरेनुसार प्रतीकात्मक देण्यात येते. तसे पाहिले तर हजरत इब्राहीम यांचे पूर्ण जीवन कुर्बानीची, बलिदानाची गाथा आहे. जगातील प्रत्येक वस्तू पेक्षा आपल्या म्हातारपणात प्राप्त झालेल्या मुलांच्या जीवनापेक्षा निर्माणकर्त्या अल्लाचा आदेश महत्त्वाचा आहे. आणि हेच अल्लाच्या दासाचे कर्तव्य आहे. माणसाची परीक्षा आहे आमचं सुध्दा कर्तव्य आहे पालन कर्त्याचा निर्माण कर्त्या, मालकाचा आदेश सर्वपरी म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले जीवन जगावे त्यातच आमचं आमच्या विश्वासचे कल्याण आहे.

- अ. मजीद खान

नांदेड, 

Mo. 9403004232माझ्या बंधुनो! प्रत्येक मुस्लिम स्वत: असे समजतो आणि तुम्हीसुद्धा असेच समजत असाल की मुस्लिमाचा दर्जा अनेकेश्वरवादीपेक्षा अधिक उच्च आहे. अल्लाहला मुस्लिम (आज्ञाकारी) प्रिय आहेत व अनेकेश्वरवादी (अवज्ञाकारी-काफिर) अप्रिय आहेत. मुस्लिमाला अल्लाहकडून क्षमा मिळेल व अनेकेश्वरवाद्यांना क्षमा मिळणार नाही. आज्ञाधारक स्वर्गामध्ये जाईल व अनेकेश्वरवादी नरकामध्ये जाईल. मला वाटते की आज तुम्ही यावर विचार करा की शेवटी मुस्लिम व अनेकेश्वादीमध्ये इतका मोठा फरक का आहे? अनेकेश्वरवादीसुद्धा प्रेषित आदम (अ.) यांची संतती आहे आणि तुम्हीसुद्धा. अनेकेश्वरवादीसुद्धा असाच मनुष्य आहे जसे तुम्ही आहात. त्याचेसुद्धा तुमच्याप्रमाणेच हात, पाय, डोळे, कान आहेत. तोसुद्धा याच हवेत श्वास घेतो. हेच पाणी पितो. याच पृथ्वीवर राहतो. हेच उत्पन्न खातो. अशाप्रकारे जन्म घेतो व अशाच प्रकारे मरतो. याच अल्लाहने त्यालासुद्धा निर्माण केले आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आहे. मग शेवटी त्याचा दर्जा का खालचा आहे आणि तुमचा उच्च? तुम्हाला जन्नत का मिळेल आणि त्याला जहन्नममध्ये का घातले जाईल?

केवळ नावाचा फरक आहे का?

हे विचार करण्यासारखे आहे. मनुष्यामनुष्यात इतका मोठा फरक केवळ इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे तर असू शकत नाही की तुम्हाला अब्दुल्लाह व अब्दुर्रहमान आणि अशाच अन्य नावाने बोलविले जाते आणि त्यांना दीनदयाळ व कर्तारसिंह आणि रॉबर्टसनसारख्या नावाने ओळखले जाते. अथवा तुम्ही खतना करवून घेता व तो करवून घेत नाही किंवा तुम्ही मांस भक्षण करता आणि तो ते खात नाही. अल्लाह ज्याने सर्व मानवांना निर्माण केले आहे आणि जो सर्वांचा पालनकर्ता आहे असा जुलूम तर कदापि करू शकत नाही की अशा लहान सहान गोष्टीवरून त्याने आपल्या निर्मितीत फरक करावा आणि एका दासाला जन्नत पाठवावे व दुसऱ्याला जहन्नममध्ये पोहचवावे.माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी सांगितले,

पैगंबर मुहम्मद (स.) लोकांपैकी सर्वांत जास्त दानशूर होते आणि रमजान महिन्यात इतर महिन्यांपेक्षा अधिक दानशूर होत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

रमजान महिना हा तर सदाचाराचा महिना आहे. म्हणून या महिन्यात दानशीलतेत वाढ होणे स्वाभाविक आहे.

सहीह बुखारीतील एका हदीसनुसार ज्ञात होते की जिब्रिल (अ.) रमजानच्या प्रत्येक रात्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटत असत आणि त्यांच्यासोबत कुरआन पठण करीत असत. जेव्हा पैगंबर जिब्रिल  (अ.) यांना भेटत असत तेव्हा दुसऱ्यांना लाभकारी सिद्ध होण्यास वाहत्या वाऱ्यापेक्षासुद्धा जास्त दानशूर होत असत.

माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांच्याकडून उल्लेखित आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर माझ्याजवळ उहुद पर्वताएवढे सोन्याचे भांडार जरी असेल तरी माझ्या प्रसन्नतेची गोष्ट त्या भांडारातून तीन रात्रीत काहीच शिल्लक राहणार नाही की मी एखादे कर्ज फेडण्यासाठी त्यातून काही घ्यावे.’’(हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

या हदीसनुसार कळते की दानशीलता पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चारित्र्याचे अत्यंत ठळक वैशिष्ट्य होते. धन प्राप्त करण्यात नव्हे तर धन वितरित करण्यात पैगंबर प्रसन्न होत असत. धन कितीही जास्त असो, त्याचे समाप्त होण्यावर पैगंबर दु:खी होण्याऐवजी आनंदित होत होते.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget